Wednesday, 4 February 2026

शिल्पकार-बी आर खेडकर

                                                   

चरित्र नायक -शिल्पकार चरित्र कोश

शिल्पकार-बी आर खेडकर

१२ ऑगस्ट १९२६, मृत्यू १३ ऑगस्ट २०१६

 
                                       

ज्यांची स्मारकशिल्पे सर्वाधिक संख्येने महाराष्ट्रभर लागली आहेत असे शिल्पकार म्हणजे बी.आर. खेडकर. त्यांच्या आईचे नाव चंद्रभागा. खेडकरांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती व खेळणी बनविण्याचा व्यवसाय होता. लहानपणीच मातृ-पितृछत्र हरपल्याने वडीलबंधू दत्तोबा खेडकर यांनीच बी.आर. खेडकरांना वाढविले. घरातच मूर्तिकाम होत असल्याने त्यांना साहजिकच त्यात रस होता. शाळेत जाता-येता शिवाजी प्रिपरेटरी हायस्कूलच्या आवारातील शिवाजी महाराजांचा पुतळा ते तासन्तास न्याहाळत असत. ‘अशी भव्य मूर्ती आपल्याला कधी बनवता येईल’ हा ध्यास त्यांच्या बालमनाने घेतला आणि हीच त्यांच्या शिल्पसाधनेची सुरुवात ठरली. केवळ दुसर्या इयत्तेपर्यंत शालेय शिक्षण घेतलेल्या खेडकरांनी शिल्प किंवा चित्रकलेचे रीतसर शिक्षण न घेताच स्वत:ची कला विकसित केली.

खेडकर पुण्यात १९५०-१९५५ च्या दरम्यान गणेशाच्या सुबक मूर्ती, सजावटी, ऐतिहासिक, पौराणिक, राजकीय व सामाजिक विषयावरील देखावे व सजावटी करत. त्यामुळे त्यांना नावलौकिक मिळाला. पण यात ते समाधानी नव्हतेे. शिल्पकार करमरकरांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याने त्यांच्या मनात घर केले होते. त्याचा प्रभाव इतका होता की, लहानपणी त्यांनी गणपतीची मूर्ती बनवली होती व तिला शिवाजी महाराजांचे तोंड लावले होते!

मूर्तिकामातून मिळणारे पैसे व गरिबी यांचा ताळमेळ बसत नव्हता. म्हणून त्यांनी सिनेमा क्षेत्रात, स्टूडिओतील सेटवर कलात्मक काम करण्याचे ठरविले. भालजी पेंढारकरांच्या पुण्यातील स्टूडिओत खेडकरांना नोकरी मिळाली. त्यानंतर प्रभात फिल्म कंपनीतल्या उमेदवारीच्या काळात दिग्दर्शक फत्तेलाल व मोल्डिंग विभागाचे सोनोपंत परदेशींनी त्यांना मोल्डिंग कौशल्यांबरोबर व्यवहारी जीवनासंबंधीही मोलाचे मार्गदर्शन केले. पुढे मुंबईच्या मोहन स्टूडिओत त्यांनी के. आसिफ यांच्याकडे नोकरी केली. तेथे खेडकर यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटाचे भव्य सेट व शिल्पे तयार केली. याच वेळी त्यांनी सिनेसृष्टीला डमी पात्रासाठी मुखवटा तयार करण्याच्या तंत्राची ओळख करून दिली. यानंतर मात्र ते सिनेसृष्टीतील नावलौकिक व पैसा सोडून पुण्यात परतले व त्यांनी शिल्पकलेला वाहून घेतले.

                                            

१९६१ मध्ये घडविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हे खेडकरांचे पहिले शिल्प होय. हा पुतळा सातार्याला पवई नाका येथे आहे. आशिया खंडातला सर्वांत मोठा समजला जाणारा शिवाजी महाराजांचा साडेअठरा फुटांचा अश्वारूढ पुतळा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व अमेरिकेतील सॅन होजे येथील त्यांनी बनविलेले शिवाजी महाराज, संत बसवेश्वर, श्रीमंत बाजीराव पेशवे असे अश्वारूढ पुतळे त्यांच्या शिल्पप्रतिभेची साक्ष देतात.

                                       
शाहू महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधी, जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर, महर्षी कर्वे, स्वा. सावरकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, राजीव गांधी, एस.एम. जोशी, साधू वासवानी यांचे पूर्णाकृती पुतळे त्यांनी तयार केले आहेत. अहिल्याबाई होळकर, कस्तुरबा गांधी, क्रांतिवीर नाना पाटील, लाल बहादूर शास्त्री, पं. नेहरू, सुभाषचंद्र बोस इत्यादींचे ३०० ते ४०० अर्धपुतळे त्यांनी तयार केले आहेत.

पुण्यातील शनिवार वाड्यासमोरील दिल्ली दरवाज्याकडे असलेला,थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा खेडकर यांनीच तयार केला.


                                       
शिल्पाची प्रमाणबद्धता, साधर्म्य, आविर्भाव, व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, इतिहासाच्या जाणकारांकडून शिल्पाचे परीक्षण करून घेण्याची पद्धत यांमुळे खेडकरांची शिल्पे जनसामान्यांनाही आवडतात. स्मारकशिल्पांच्या व व्यावसायिक कामात शिल्पकार खेडकर गुंतले होते. त्यामुळे आयुष्यात शिल्पकलेची कलात्मक अभिव्यक्ती व प्रयोगशील आविष्कार यांकडे ते वळू शकले नाहीत.

खेडकरांना ‘फाय फाउण्डेशन’ पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा ‘जीवन साधना’ पुरस्कार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘लोकमान्य कलोपासक’ पुरस्कार, २००७ चा भारती विद्यापीठाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार, शारदा ज्ञानपीठाचा ‘महर्षी’ पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

- डॉ. नयना कासखेडीकर

--------------------

Tuesday, 3 February 2026

ज्येष्ठ नाट्य समीक्षक वि.भा.देशपांडे


                                                 मराठी विश्वकोश कोश नोंद -नाट्य शास्त्र

ज्येष्ठ नाट्य समीक्षक वि.भा.देशपांडे

डॉ. देशपांडे विश्वनाथ भालचंद्र उर्फ विभा (जन्म- ३१मे १९३८,पुणे, मृत्यू- ९मार्च २०१७,पुणे.),


नाट्य समीक्षक वि भा. देशपांडे यांचा जन्म पुणे येथे ३१ मे १९३८ रोजी झाला. पुणे येथील नूतन मराठी विद्यालय आणि स.प. महाविद्यालय येथे त्यांचे शालेय आणि एम ए पर्यन्त, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. विद्यार्थी दशेतच त्यांच नाटकात सहभाग सुरू झाला. नूमवि प्रशालेत स्पर्धा, वार्षिक संमेलने, आंतरशालेय नाट्य वाचन स्पर्धेत सहभाग आणि यश. आणि नाट्य प्रेमी शिक्षक यांचे संस्कार या काळात झाले. तर महाविद्यालयीन जीवनात सुद्धा नाटक आणि एकांकिका यामध्ये सहभाग असायचा. त्यासाठी काही बक्षिसेही त्यांना मिळाली होती. पुढे पीडिए(प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशन) आणि रंगायन या संस्थांशी त्यांचा संबंध आला. एकीकडे शिक्षण चालू असताना त्याच वेळी रंगभूमीचा अभ्यास व नाट्यानुभव घेणं पण चालू होतं. पदवी नंतर, साधारण १९६३ पासून त्यांचे नाट्य विषयक लेखन सुरू झाले. प्रसिद्ध अशी पुरुषोत्तम नाट्यस्पर्धा त्याच वेळी सुरू झाली होती त्यात पहिल्याच वर्षी भाग घेतला,तेंव्हापासून पुढची पन्नास वर्षे स्पर्धक, परीक्षक, संयोजक आणि प्रमुख पाहुणे या नात्याने ते पुरुषोत्तमशी जोडलेले राहिले. पुढे स्पर्धेवर त्यांनी समीक्षात्मक लेखन सुरू केले.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते सांगली येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.त्यानंतर १९७१ मध्ये ते पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयात मराठी आणि नाट्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांचे नाट्य विषयक लेखन सुरूच होते. मॉडर्न महाविद्यालय, एम.ई.एस व विलींग्डन महाविद्यालयात त्यांनी ३५ वर्षे अध्यापनाचे काम केले.मॉडर्न महाविद्यालयातून ते १९९८ मध्ये निवृत्त झाले. नंतरचा पूर्ण वेळ नाट्य समीक्षक म्हणून काम केले. पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेज शिवाजी विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ येथे त्यांनी नाट्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा विद्यार्थ्यानी पीएचडी आणि एम फिल चे प्रबंध संशोधन केले आहे.

नाटकातल्या माणसांच्या सहवासात वावरत असताना ,रंगभूमि समजून घेत असताना आणि ट्य विषयी लेखन करत असताना विभांना वाटले की, या विषयातले सैद्धांतिक ज्ञान संपादन करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वोच्च अशी पदवी मिळवण पण आवश्यक आहे म्हणून त्यांनी डॉक्टरेट मिळवायचे ठरविले. ‘पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकातील व्यक्तिरेखाटण’ (१८८०ते१९८०), या नाट्यविषयावर त्यांनी पीएचडी केली.पीएचडी ही पदवी १९७४ साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मिळाली. त्यांनी मराठी, बंगाली, कर्नाटक, अशा वेगवेगळ्या रंगभूमीचा अभ्यास केला. नाट्य परंपरेचे सामाजिक भान शोधण्यासाठी ते भारतभर फिरले. संस्कृत, हिन्दी, छत्तीसगढी, कन्नड, तमीळ, तेलुगू, पंजाबी, गुजराथी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन या भाषेतली नाटके ही पाहिली,अभ्यासली. वेगवेगळ्या वृत्तपत्रात लिखाण करण्याबरोबर त्यांनी नाटक या विषया संबधी जवळ जवळ ५० ग्रंथ लिहिले व काही संपादित केले आहेत.

पाच दशकाहून जास्त काळ ते सांस्कृतिक अर्थात नाट्य क्षेत्रात कार्यरत होते. नाट्य विषयक रंगमंचीय कार्यक्रम , सादरीकरण, एकपात्री प्रयोग, व्याख्याने, चर्चा यात त्यांचा मार्गदर्शक, संहिता लेखक आणि वक्ता म्हणून सहभाग असायचा. त्यांचे नाट्य विषयक दहा स्वतंत्र ग्रंथ आहेत. नाट्य विषयक संपादित पंधरा ग्रंथ आहेत. त्यांनी मराठी वाड:ग्मयात टाकलेली मोलाची भर म्हणजे, त्यांचा १२०० पानी मराठी नाट्यकोश २००० साली प्रकाशित झाला. हा नाट्यकोश भारतातला पहिला कोश आहे. मराठी भाषेतील नाट्य सृष्टीतीची साद्यंत माहिती देणारा हा मराठीतलाही पहिला नाट्यकोश मानला जातो. या कोशासाठी खुद्द तात्यासाहेब शिरवाडकर यांनी त्यांना प्रेरणा दिली होती. दीडशे वर्षात असा नाट्य कोश मराठी रंगभूमीसाठी असलेला उपलब्ध नव्हता. हा कोश म्हणजे विसाव्या शतकात रंगभूमीला मिळालेली देणगी ठरली. विष्णुदास भावे यांच्या पासून ते तेंडुलकर यांच्या पर्यंत नाटककारांचा अभ्यास त्यांनी केला. मराठी रंगभूमीचा शंभर वर्षांचा कालखंड त्यांनी शब्दबद्ध केला. यात दीडशे वर्षातील नाटके, नाटककार, कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, समीक्षक, पडद्या मागील मदतनीस, प्रेक्षक, नाट्यसंस्था, नाट्यगृह, नाट्यनिर्माते, नाट्य ग्रंथ, नियतकालिके, संमेलनाध्यक्ष, नाट्य परिनिरीक्षण मंडल आणि भारतीय रंगभूमीचा आलेख इत्यादी माहिती आहे. या कोशाचा हिन्दी अनुवाद सुद्धा प्रकाशित झाला आहे.

संस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रात त्यांचा सतत वावर असायचा. कोणत्याही नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ते आवर्जून जायचे. सभासमारंभाला जायचे. नाट्य विषया बरोबरच माणसे जोडण्याची त्यांची आवडती कला होती. रंगमंचीय मित्रच असायचे ते सर्वांचे. मराठी नाट्य समीक्षा करताना ते अभिनेते, दिग्दर्शक यांच्याशी चर्चा करत, नाटक, साहित्य आणि संगीत या त्यांच्या आवडत्या विषयावर प्रेम असल्याने त्यांना या संदर्भात,नाटके पाहताना व या क्षेत्रातील संबंधित माणसांना भेटताना त्यांच्या या साहित्य आणि नाट्य प्रवासात अनेक दिग्गज माणसे भेटली. त्यावर सुद्धा त्यांनी ‘भ्रमणगाथा’ हे पुस्तक लिहिले.

या प्रवासात त्यांना आचार्य अत्रे, वि.वा.शिरवाडकर, पु.ल.देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, पंडित भीमसेन जोशी, कमलाकर सारंग, अशी दिग्गज नाटककार मंडळींशी विभांचा संपर्क आला. मैत्री झाली. त्यांच्यावर विभांनी पुस्तके लिहिली. यात त्यांची नाटके , त्यांचे प्रयोग, त्या त्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ठ्ये त्यांनी लिहिली आहेत. त्यामुळे या पुस्तकातून रंगभूमीच्या इतिहासातील अनेक प्रसंग व घटना उलगडल्या आहेत.

त्यांची आणखी काही पुस्तके म्हणजे, नाटकातील माणसे, गाजलेल्या भूमिका, नाटक नावाचे बेट, निळू फुले, निवडक नाट्यप्रवेश-पौराणिक,निवडक नाट्यप्रवेश ऐतिहासिक ,निवडक नाट्यप्रवेश सामाजिक, भाग एक व भाग दोन, वारसा रंगभूमीचा, आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा, कालचक्र एक अभ्यास, नटसम्राट एक आकलन, नाटककार खानोलकर, नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती), नाट्य मित्र, नाट्य व्यक्तिरेखाटण-पौराणिक, ऐतिहासिक, नाट्यसंवाद रचना कौशल्य, नाट्यस्पंदने (नाट्य विषयक लेख), निवडक नाट्य मनोगते, मराठी नाटक पहिले शतक, मराठी रंगभूमी-स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ, रंगभूमीचा इतिहास - खंड एक व खंड दोन, माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास, यक्षगान लोकनाटक, रायगडला जेंव्हा जाग येते-सिंहावलोकन, (१९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथ स्वरूपाचे लेखन, स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक, वसंत शिंदे व्यक्ति- कलावंत, मराठी एकांकी, अशी नाट्य विषयक पुस्तके प्रकाशित आहेत.नाटकातली माणसं या त्यांच्या पुस्तकात विभांनी प्रेक्षक म्हणून नाटकातल्या माणसांना फक्त रंगमंचावर बघता येते परंतु, नाट्य वेड आणि नाट्य अभ्यासामुळे विभांनी, मुखवट्या पलीकडची माणसे अनुभवली.त्या माणसांच्या सृजनाचा अनुभव घेतला. त्यांच्यातले माणूसपण शोधले. त्यांच्या या पन्नासाव्या पुस्तकात निवडक वीस कलाकार अर्थात नाटकीय माणसे त्यांनी मांडली आहेत, ती आहेत भालचंद्र पेंढारकर, शिलेदार कुटुंबिय, आत्माराम भेंडे, डॉ.श्रीराम लागू,विजया मेहता, प्रा.मधुकर तोरडमल, श्रीकांत मोघे, सई परांजपे,रत्नाकर मतकरी,सुलभा देशपांडे,,अमोल पालेकर, विक्रम गोखले, नाना पटेकर, सुहास जोशी, दिलीप प्रभावळकर,विनय आपटे, सतीश आळेकर,डॉ. मोहन अगाशे, प्रशांत दामले इत्यादी. नाटकातली अमराठी माणसेही त्यांना भेटली. तसेच २००४ साली ते लंडन येथे गेले असताना शेक्सपियर चे स्मारक आणि इंग्लिश रंगभूमी त्यांनी पाहिली.

त्याच प्रमाणे त्यांनी काही पुस्तकांचे संपादन केले. ती पुस्तके म्हणजे, प्रतिमा रूप आणि रंग- के नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन, गानयोगी मल्लिकार्जुन मन्सूर, निवडक एकांकिका, प्रयोगक्षम एकांकिका, पु.ल.पंच्याहत्तरी, मराठी कलभिरुची, मराठी नाट्यसमीक्षा–काही दृष्टीकोण, मराठी भाषा-साहित्य, रंगयात्रा(१९५० ते १९८५ रंगभूमीविषयक लेख संग्रह) अशा संपादित पुस्तकांप्रमाणेच त्यांनी काही गौरव ग्रंथ सुद्धा संपादित केले. ते असे, चित्तरंजन कोल्हटकर, जितेंद्र अभिषेकी, नाट्य गौरव विशेषांक, पी.डी.ए नाट्य निर्मिती, पी.डी.ए. वार्षिक, पुणे नाट्य संमेलन, बालगंधर्व जन्मशताब्दी, मॉडर्न महाविद्यालय दशक पूर्ती, राम गणेश गडकरी दशकपूर्ती, ललित कला दर्श ७५ वर्षे, शरद तळवलकर, साहित्य सूची दिवाळी अंक

नाट्य समीक्षक वि भा देशपांडे, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे २००६ ते २०११ पर्यन्त प्रमुख कार्यवाह होते. त्यांनी कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह अशा वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळल्या. या क्षेत्रात ते ‘विभा’ म्हणूनच ओळखले जायचे. साहित्य परिषदेच्या मराठी वाड:मयाचा इतिहास खंड सात चे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले. कोशासारख्या संशोधनपर लेखनापासून ते वृत्तपत्रीय सदर लेखनापर्यन्त जवळ जवळ चाळीस वर्षे त्यांनी नाट्य किंवा रंगभूमीविषयक सर्व विषय हाताळले.

अध्यापन करताना आकाशवाणी आणि दूरदर्शन वरील अनेक नाट्य विषयक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग होता. त्यांनी नभोनाट्य लेखन सुद्धा केले.पीडीए संस्थेत जाणार कुठे, बंडू नानू गुलाबी हत्ती अंमलदार या नाटकातून अभिनय केला तर, तुझे आहे तुजपशी,ससा आणि कासव या नाटकाचे दिग्दर्शन केले. विविध मान्यवरांच्या जाहीर मुलाखती घेतल्या.

त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले. त्यातले काही म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार, जयंतराव टिळक गौरव निधि पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेचा गौरव, कै.माधव मनोहर नाट्य समीक्षक पुरस्कार, राजा मंत्री पुरस्कार,वि.स. खांडेकर नाट्य समीक्षक पुरस्कार (१९८३),कॉसमॉस पुरस्कार, भाषा रत्नम पुरस्कार (२००४) रंगत संगत सन्मान, वत्सला बाई अंबाडे साहित्य निर्मिती पुरस्कार असे चौदा पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

इंदिरा भालचंद्र पुरस्कार – वि.भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला इंदिरा-भालचंद्र पुरस्कार देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना, त्यांचे ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. दहा हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह असे याचे स्वरूप आहे. या आधी विजया मेहता यांच्या ‘झिम्मा’ आणि डॉ. अजय वैद्य यांच्या ‘मास्टर दत्ताराम :नाट्यवीर ‘यांना ,तसेच मोहन जोशी यांना ‘नट-खट’ साठी हा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. वि.भा. देशपांडे यांनी रंगभूमीचे साक्षेपी अभ्यासक म्हणून जवळ जवळ चार दशके काम केले. ९ मार्च २०१७ रोजी त्यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी विशाखा,जावई आणि नातू असा परिवार आहे.

संदर्भ-

१. http://prafullaphadkemhantat.blogspot.com/2017/03/blog-post.html

२. https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=466678599711

३. https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/vb-deshpande-1428949/

४. https://www.marathisrushti.com/articles/dr-vi-bha-deshpande/

५. ले. देशपांडे वि.भा.पुस्तक- मराठी नाट्य कोश, निशांत प्रकाशन,पुणे .वर्ष-२०००

६. ले. देशपांडे वि.भा. पुसतक- नाटकातली माणसे, उन्मेष प्रकाशन,पुणे

७. ले. देशपांडे वि.भा. पुस्तक- गाजलेल्या रंगभूमिका- रोहन प्रकाशन,पुणे वर्ष- २००६

८. ले.देशपांडे वि.भा.,पुस्तक- भावलेली नाटके- श्रीपाद प्रकाशन ,पुणे

९. विकिपिडिया वेबसाईट

१०.मराठी विश्वकोश वेबसाईट

११. लोकसत्ता,लोकमत,सकाळ, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाईम्स. याचे ई- अंक

( ही नोंद मराठी विश्वकोश नाट्य शास्त्र यासाठी लिहिली होती. ती कोशाच्या website वर उपलब्ध आहे . त्याची लिंक = https://marathivishwakosh.org/59849/ )

-ले- डॉ. नयना कासखेडीकर.





-------------------------------------------

चरित्र नायक - शिल्पकार प्रमोद कांबळे

 

                             चरित्र नायक -   चित्रकार, शिल्पकार

                                         प्रमोद कांबळे (११ ऑगस्ट १९६४)     


          वास्तववादी शैलीत काम करणारे प्रमोद दत्तात्रेय कांबळे हे अहमदनगरचे. माझी मुलं चित्रकारच होतील’, असे ठाम विश्वासाने सांगणाऱ्या चित्रकार दत्तात्रेय कांबळे व आई अन्नपूर्णा यांची प्रेरणा सतत त्यांच्या पाठीशी होती. वडील नगरच्या प्रगत कला विद्यालयात कलाशिक्षक होते. प्रमोद यांचे तीनही भाऊ चित्रे काढीत. त्यामुळे घरात चित्रकलेला पोषक वातावरण होतेच. वडिलांबरोबरच शाळेतील कलाशिक्षक व ज्येष्ठ चित्रकार र.बा. केळकर यांनी तिसर्या इयत्तेपासूनच प्रमोद यांना प्रत्यक्ष शिल्प बनविण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी जाहिरातींचे फलक रंगवणे, निवडणूक काळात भिंती रंगवणे, संक्रांतीत पतंग करून विकणे, दिवाळीत आकाशकंदील विकणे, गणपतीसाठी आराशी करून देणे ही कामेही त्यांनी केली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर नगरलाच प्रगत कलाविद्यालयात फाउण्डेशन कोर्स करून नंतर मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण केले.

या काळात त्यांना अनेक बक्षिसे मिळाली. अंतिम वर्षी जे.जे.चे सुवर्णपदकही मिळाले. शिक्षण संपल्यानंतर चित्रपट क्षेत्रात चांगली संधी मिळत असतानाही त्यांचे मन तिथे रमले नाही; कारण ओढ होती गावच्या मातीची. त्यामुळेच मुंबई-पुण्यासारखी कलेला पोषक अशी शहरे सोडून कलेचे वातावरण नसलेल्या अहमदनगर या गावात अनेक आव्हाने झेलत, त्यांनी चित्र व शिल्पकलेचा व्यवसाय सुरू केला.

भारताच्या स्वातंत्र्याला १९९७ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून सारे जहाँ से अच्छाया शीर्षकाचे ७०×२० फुटांचे ५०० हून अधिक थोर व्यक्तींची पेन्सिलचित्रे असलेले भव्य चित्र त्यांनी नगर महापालिकेच्या महावीर सभागृहात काढले. या कलाकृतीत देवदेवता, ॠषिमुनी, थोर महापुरुष, स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, खेळाडू अशा विविध क्षेत्रांतील विशेष व्यक्तींची चित्रे असून ते नगर शहरात येणार्या पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. एम.आर.आर.सी.चा गौरवशाली इतिहास सांगणारे द स्पिरिटहे ९०×१० फुटांचे पेन्सिल चित्र, वॉर मेमोरियल्सचे भव्य शिल्प, गणपती उत्सवातील भुलेश्वर मंदिराची प्रतिकृती अशी त्यांची आणखी काही उल्लेखनीय कामे आहेत.

नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट येथील नन्ही दुनियाया प्रकल्पासाठी कांबळे यांनी २००४ मध्ये वन्य प्राण्यांची लाइफ साइजशिल्पे बनविली. आई व मूल या संकल्पनेवर आधारित वाघ, हत्ती, गोरीला, उंट, गाय, मगर, जिराफ, झेब्रा अशा सर्व वन्यप्राण्यांची फायबरमधील ही अभ्यासपूर्ण शिल्पे लोकप्रिय झाली. त्यांचे उद्घाटन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले. यांतील काही शिल्पांच्या प्रतिकृती मुंबईच्या काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये २०१० मध्ये प्रदर्शित केल्या होत्या.

तसेच कलाजगत न्यासाची स्थापना, लहान मुलांसाठी स्पर्धा, शिबिरे अशा उपक्रमांतून मुलांमध्ये चित्र व शिल्पकलेची आवड निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न ते करीत आहेत. नगरसारख्या ठिकाणी प्रमोद कांबळे यांनी आर्ट गॅलरीही सुरू केली आहे.

या सगळ्या उपक्रमांत मूळ नगरच्याच असणार्या त्यांच्या सुविद्य अर्धांगिनी, पूर्वाश्रमीच्या स्वाती उपासनी, सर्वार्थाने सहभागी असतात.

उत्तम कौशल्य, तांत्रिक ज्ञान व व्यवसायाची उत्तम जाण असणारे प्रमोद कांबळे शिल्पाकृतींचा विविध प्रकारे वापर करून त्यांतून यशस्वी व्यावसायिक शिल्पकार म्हणून नावारूपाला आले आहेत.

-----------------------


प्रमोदजींच्या स्टुडीओ ला नगर येथे भेट दिली तेंव्हाची छायाचित्रे -







- डॉ. नयना कासखेडीकर

                                                -----------------------


चरित्र नायक नोंद -डॉ नीलम गोऱ्हे

                                                               


                                                            चरित्र नायक नोंद -डॉ नीलम गोऱ्हे 

                                                                शिल्पकार चरित्रकोश ,खंड १० 

                                                                       भाग -राजकारण 














 मा.नीलम ताईन्ची मुलाखत घेतली तेंव्हा 


          -डॉ नयना कासखेडीकर , पुणे

----------------------------------------------------------------