Monday, 10 August 2026

पश्चिम बंगाल -संस्कृती

                                                           

                                                              पश्चिम बंगाल -संस्कृती 

                         (हा लेख १५ ऑगस्ट २०२६ च्या एकता मासिकात प्रसिद्ध झाला .)



एकीकडे हिमालयाच्या पर्वत रांगा आणि दुसरीकडे गंगा ब्रह्मपुत्रेच्या सान्निध्यात, युनेस्कोच्या वारसा यादीतल्या सुंदरबन त्रिभुज प्रदेशातील  जैवविविधतेने नटलेला संपन्न  बंगाल, समृद्ध संस्कृती, कला, साहित्य  ल्यायलेला आहे. प्राचीन संदर्भ असलेलं बंगाल हे भारतातले महत्त्वाचे राज्य आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि सामाजिक सुधारणां मध्ये मोठा वाटा आहे. बंगालची दुर्गा पूजा परंपरा जगप्रसिद्ध आहे.आणि भारताला रवींद्रनाथ टागोर आणि बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांनी राष्ट्रासाठी गीत दिलं.अशा दिग्गजांचा बंगाल. 


"हा देश इतरांच्या मते नुसती निष्क्रिय वस्तू असेल आणि अरण्य,पर्वत,पठारे ,नद्या ,माती अशी देशाची ओळख करून देत असतील,परंतु मी माझ्या देशाकडे माझी आई म्हणून पाहतो. माझ्या मातृभूमीची मी आई म्हणून पूजा बांधतो ,तिची स्तुती गातो,आपल्या आईच्या छातीवर बसून एखादा दैत्य तिचे रक्त पीत असेल, तर तिचा पुत्र काय करील? समाधानाने जेवत बसेल? आपल्या पत्नी मुलांसह आनंदी जीवन जगत राहील? कि आईच्या रक्षणार्थ धाव घेईल? असा प्रश्न विचारून आपल्या संस्कृतीत 'देश ही मातृभूमी आहे' हा दृष्टीकोन देणाऱ्या योगी अरविंद यांनी प्रखर राष्ट्रवादाचा पाया प्रथम बंगाल मधुनच घातला. बंगालच्या भूमीतील स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद या दोन प्रभृतींनी भारताचे राष्ट्रीय आणि अध्यात्मिक पुनरुत्थान केले आहे. 


बंगाल मधील मुख्य शहरे म्हणजे कलकत्ता, जलपाईगुडी,आसनसोल,मिदनापूर, सिलिगुडी, हावडा, मालदा आणि दोर्जे लिंग अर्थात दार्जीलिंग. हे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले मनमोहक शहर आहे.भारतातील वसाहतकालीन थंड हवेचे ठिकाण, सूर्याची पहिली किरणे याच शहरावर पडतात. जगातील सर्वात उंच असलेल्या कांचनजंगा शिखर सोनेरी पिवळ्या रंगाने न्हाऊन निघते. या शिखरांनी वेढलेले हिरवेगार चहाचे मळे असे बहरलेले निसर्ग सौंदर्य आणि तिथली संस्कृती . वसाहतवादाचा प्रभाव तिथल्या वास्तू, रस्ते, रेल्वे चहाचे मळे  यावर दिसतो पण, फोडा आणि राज्य करा हे धोरण इथल्या संस्कृती वर अजिबात प्रभाव पडू शकले नाही इतकी संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत.  टेकडीवर असलेले महांकाल मंदिर , तिथल्या घंटांचा नाद, प्रार्थना ध्वजांनी वेढलेले कठडे ,भव्य प्रवेशदार आणि लयबद्ध मंत्रोच्चाराचा आवाज असे पवित्र व उत्साही वातावरण असलेल्या परिसरात भगवान शिव, साई बाबा, प्रभूश्रीराम कालीमाता, देवी पार्वती यांची मंदिरे आहेत. हा परिसर म्हणजे मुळ दार्जीलिंग मठ होय. 

    दार्जीलिंग हे आपल्या निसर्गसौंदर्या बरोबरच समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि उत्सवांसाठी ओळखले जाते. येथे प्रामुख्याने नेपाळी, तिबेटी आणि बंगाली संस्कृतीचा मिलाफ पाहायला मिळतो。कुर्सियांग, कालिम्पोंग आणि मिरिक या शहरांमध्ये प्रामुख्याने नेपाळी लोकसंख्या आहे. पश्चिम बंगालच्या मैदानी प्रदेशाच्या सान्निध्यामुळे, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या तराई प्रदेशात मुख्यत्वे बंगाली लोकसंख्या आढळते. येथील लोकांमध्ये नेपाळी, तिबेटी, वांशिक जमाती आणि हिंदू अशी विविधता आढळते.  

लेपचा हे येथील मूळ रहिवासी आहेत. जेव्हापासून बहुतेक भूभाग पूर्णपणे जंगलांनी व्यापलेला होता, तेव्हापासून ते येथे राहत आले आहेत. त्यांचे मूळ मंगोलियन आहे. त्यांची भाषा ‘रोंग- रिंग’ आहे त्यांना ‘रोन्गपा’ म्हणतात. महिला, कोंबड्या ,गुरे पालन, शेळ्या मेंढ्या, डुकरे पालन हा पारंपारिक व्यवसाय करतात. हे लोक गहू तांदूळ, मका, वेलची यांची शेती करतात.

बौद्ध धर्माचे पालन करणारी खाम्पा ही एक जमात आहे.   

नेपाळमध्ये अनेक वांशिक गट आहेत, त्यापैकी एक म्हणजे गोरखा. गोरखा जमात ही डोंगराळ जमातीचा एक प्रमुख भाग आहे. खुकुरी नावाचे पारंपरिक चाकूसारखे शस्त्र बाळगण्यावरून त्यांची ओळख पटते. त्यांच्या शौर्य, पराक्रम, निष्ठा आणि जोम, गिर्यारोहण यात त्यांचे अमुल्य योगदान आहे.  

बंगाल मध्ये विविध सण व उत्सव साजरे होत असतात. 

चैता दसाई जो उर्वरित भारतात रामनवमी म्हणून ओळखली जाते, हा दार्जिलिंगमधील सर्वात मोठ्या आणि भव्य हिंदू उत्सवांपैकी एक आहे. यात प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस साजरा करतो.    रामकथांव्यतिरिक्त, मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात एक मिरवणूक काढली जाते, जिथे लोक देवी किंवा शक्तीला वाईटावर चांगल्याच्या विजयासाठी प्रार्थना करतात. 

लोसार (Losar) हा तिबेटी नववर्षाचे स्वागत करणारा एक प्रमुख सण आहे。फेब्रुवारी मध्ये होणारा हा उत्सव सुमारे १५ दिवस चालतो, ज्यामध्ये पारंपरिक नृत्य, संगीत आणि स्वादिष्ट तिबेटी खाद्यपदार्थांचा आनंद घेतला जातो。

येथे राहणाऱ्या बहुसंख्य लोकांचे मूळ तिबेटमध्ये आहे. चांद्र-सौर पद्धतीनुसार हे नववर्ष फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येते आणि ते संपूर्ण तिबेट, भूतान, नेपाळ आणि भारतात साजरे केले जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, इतर सामान्य नववर्षांप्रमाणे नसून, तिबेटी नववर्ष कधीकधी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ साजरे केले जाते. उत्सवाच्या अकराव्या दिवशी 'चोन्गा चोपा' हा उत्सव साजरा केला जातो. सर्व काही भगवान बुद्धांना समर्पित असते आणि लोक नवीन कपडे घालतात, स्वादिष्ट पारंपरिक पदार्थ बनवतात आणि मनसोक्त नाचतात. 


दसरा आणि दुर्गा पूजा: दार्जीलिंगमध्ये ऑक्टोबर मध्ये नवरात्र अतिशय उत्साहात साजरा केला जातो。 या काळात संपूर्ण शहर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवले जाते。इथला हा सर्वात मोठा सण आहे,दुर्गामासुर आणि महिषासुर राक्षसांचा वध दुर्गा मातेने केला.आणि महादुर्गा जिला जगधात्री म्हटले जाते तिने , 'स्वतःला अजिंक्य समजणाऱ्या देवांचा' अभिमान नष्ट केला. ही दोन्ही देवीची एकच रूपे असली तरी हा फरक आहे. बंगाल मध्ये या जगाधात्रीचा जगाची रक्षक म्हणून पूजा केली जाते. आनंद मठ या कादंबरीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी देवी जगाधात्रीचे वर्णन केले आहे. काली, दुर्गा आणि जगधात्री मिळून भारतमाता आहे म्हणजे ‘मदर इंडिया’ चि तीन रूपे दाखवली आहेत.त्याचाच जागर आपण वंदे मातरम...गीतातून करत असतो.   

दसरा –विजयादशमी आणि तिहार - हा नेपाळी व गोरखा लोकांचा मुख्य सण आहे, या उत्सवात फुलपती आणि लाखे नृत्य याला महत्व असते. संगीत व नृत्य कार्यक्रमांची रेलचेल असते. डोंगराळ भागातील क्षेत्रात सुद्धा दुर्गामातेची पूजा केली जाते. मिरवणुका निघतात. 

डोल पौर्णिमा/डोल यात्रा/होळी  = झोपाळ्यांची मिरवणूक=   ही यात्रा फाल्गुन पौर्णिमेला रात्री साजरी होते. गोपाल समुदाय हा उत्सव राधा कृष्ण यांची भक्ती म्हणून करतो. हा उत्सव असं बंगाल ब्रज प्रांत, ओरिसा राजस्थान त्रिपुरा इथेही साजरा करतात.

शारदा पोर्णिमा किंवा कोजागरत पोर्णिमा-  अशीच एक अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पोर्णिमा बंगाल मध्ये साजरी करतात.पावसाळ्याच्या समाप्तीचा हा सण असतो. पावसाचा देव इंद्र, त्याचा हत्ती ऐरावत यांच्या सह लक्ष्मीची पूजा केली जाते. बंगालच्या दयावो, ब्राह्मो, कुमुलंग परम्परा नुसार विशेष दिवस ठरला असतो. 



पोहेला बोईसाख =नवोबोर्शो = बंगाली कालेन्देर नुसार पारंपारिक नाव वर्षाचा हा सण १४ किंवा १५ एप्रिल ला येतो. वसंत ऋतूतील कापणीचा ह उत्सव असतो. यावेळी प्रभात फेर्या काढल्या जातात. नृत्ये, विविध पथके , वेशभूषा असलेले चित्ररथ मिरवणुकीत असतात.व्यावसायिक नवीन खातेवही सुरु करतात.भूतकाळ विसरून एकता आणि पुनर्मिलनाचा हा भाग असतो. 

दार्जीलिंग ऑरेंज फेस्टिव्हल (Darjeeling Orange Festival): डिसेंबर महिन्यात साजरा होणारा हा एक अनोखा उत्सव आहे。 यामध्ये आसपासच्या ५० हून अधिक गावांतील शेतकरी एकत्र येतात आणि विविध प्रकारच्या ताज्या संत्र्यांचे प्रदर्शन व विक्री करतात, संत्र्य्पासून बनवलेले विविध पदार्थ याचे आकर्षण असते. 。

दार्जीलिंग कार्निवल  म्हणजेच तिस्ता चहा आणि पर्यटन महोत्सव:  स्थानिक संस्कृती, पर्यटन आणि कला यांचे मनोहारी दर्शन घडवणारा हा दहा दिवसांचा नेत्रदीपक उत्सव असतो.ऐंशी च्या दशकात वांशिक संघर्षाने भंग झालेली शांतता पुन्हा मिळवण्याच्या दृष्टीने तरुणांनी एकत्र येऊन हा कार्निवल सुरु केला. मुख्य उद्देश लोकंमध्ये एकोपा निर्माण करणे आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात जगातील सर्वोत्तम चहाची चव चाखण्याची संधी मिळते。दार्जीलिंग चहाचा इतिहास, त्याचे विचिध प्रकार आणि चहाची चव घेण्याचे समारंभ आयोजित केले जातात. प्रसिद्ध स्थानिक रॉक बँडच्या मैफिली हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. काव्यवाचन सत्रे, चित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन. यासोबतच स्थानिक लोकनृत्य आणि कला संस्कृतीचे प्रदर्शनही असते。चहा उद्योग आणि पर्यटन हे बंगालच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत. 

कालीम्पोंग दार्जीलिंग लोकमहोत्सव =हा महोत्सव, बंगालचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने, राज्य सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि वस्त्रोद्योग (MSME&T) विभाग आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो. मंगर, धिमाल, तामांग, लेपचा, राय, खास, भुतिया, तिबेटी, लिंबू, सरकी, भुजेल, नेवार, गुरुंग, कामी, दमाई आणि शेर्पा यांसह डोंगराळ प्रदेशातील विविध समुदाय त्यांची रंगीबेरंगी लोकगीते आणि नृत्ये सादर करत आहेत .  

माघे संक्रांत (Maghe Sakranti): जानेवारी महिन्यात हा सण नेपाळी समाजात माघ महिन्याची सुरुवात म्हणून साजरा केला जातो。विक्रम संवत किंवा येले पंचांगानुसार माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सन साजरा केला जातो. सूर्याच्या उत्तरायणाशी संबंधित हा सण आपल्या सारखाच १४ जानेवारीला असतो.   या दिवशी लोक भागमती व गंडकी या  नद्यांमध्ये किंवा झऱ्यांमध्ये स्नान करतात。सूर्याची पूजा केली जाते पुढच्या शेतीच्या हंगामासाठी सूर्याला प्रार्थना केली जाते. दार्जीलिंग च्या हिमालयीन प्रदेशात हा सण भगवान शिवाच्या भक्ती संदर्भात साजरा केला जातो . 


पश्चिम बंगाल मध्ये मकर संक्रांतीला पौष संक्रांत म्हणतात.ताज्या कापलेल्या भाताच्या पिकापासून विविध मिठाई बनवतात.पश्चिम बंगाल मध्ये शांतीनिकेतन येथे पौष महिन्याच्या सातव्या दिवशी पौष मेळा भरतो. पण संक्रांत हा सण सगळीकडेच निसर्गाच्या पुजेशी संबधित असतो.  


संसारी पूजा: दार्जीलिंग परिसरातील ही एक प्रसिद्ध स्थानिक सामुदायिक पूजा आहे。 बैशाख महिन्यात संसारी मातेची (सृष्टीची जननी) प्रार्थना केली जाते。 यात धर्मभेद विसरून सर्व गावकरी एकत्र येऊन चांगल्या पावसासाठी आणि पिकासाठी प्रार्थना करतात。

चोत्रूल दिचेन (festival of miracles) बुद्ध जयंती: बौद्ध संस्कृतीचा प्रभाव असल्याने, दार्जीलिंगमध्ये बुद्ध जयंती मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते.

 भारताव्यतिरिक्त, बुद्ध जयंती मंगोलिया, जपान, तैवान आणि दक्षिण व आग्नेय आशियातील इतर प्रदेशांमध्येही साजरी केली जाते. या दिवशी बौद्ध अनुयायी ध्यानधारणा, मंत्रपठण, पूजा करतात. अनेक मठ आणि मंदिरांमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करतात. परंपरेचा एक भाग म्हणून, घरांमध्ये स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसोबत खीर किंवा दुधाची लापशी तयार केली जाते. 

घूम मठ, भुतिया बस्ती मठ,मगधोग योलमोवा या प्राचीन मठांमध्ये प्राचीन बौद्ध ग्रंथ जतन करून ठेवले आहे.

पश्चिम बंगाल संस्कृतीची मुळे बंगाली साहित्य,संगीत, ललित कला, नाटक आणि चित्रपट यात रुजलेली आहेत. येथील वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात सूक्ष्म फरक दिसतो. 

       

                                                                                           

बंगाली साहित्य = बंगाल ला साहित्याचा एक समृध्द वारसा लाभलेला आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय,रवींद्रनाथ टागोर, मायकेल मधुसूदन दत्त, ईश्वर चंद्र विद्यासागर, काझी नझ रूल  इस्लाम, शरदचंद्र चट्टोपाध्याय,ही प्रमुख नावे. राजाराम मोहन रॉय, स्वामी विवेकानंद यांच्या सामाजिक सुधारणेचा प्रभाव इतल्या साहित्यावर सुद्धा दिसतो.


बंगाली लोकसाहित्यात महाकाव्ये, काव्ये, लोककथा, नाटके, लोकगीते, म्हणी आहेत. त्यावर इथे राज्य केलेल्या विविध वंशांचा प्रभाव आढळतो. पोर्तुगीज, फ्रेंच इंग्रज इत्यादी. इथल्या संगीताची परंपरा साहित्यावर आधारितच आहे.


लोकसंगीतामध्ये कबीगान गोम्भिरा,भावाइया,कीर्तन, गजान संगीत पण येते. काली मातेला समर्पित असलेल्या संगिताला शामा संगीत म्हटले जाते.    

 रंगभूमी व चित्रपट =   आधुनिक रंगभूमीची ओळख युरोपिअन लोकांनी बंगालला करून दिली पण सतराव्या शतकातील स्वदेशी रंगभूमीची बंगालची दीर्घ परंपरा आहे. इथे जात्रा हे पारंपारिक लोकनाट्य खूप लोकप्रिय आहे.  

दार्जीलिंग म्हटले कि माउंट एव्हरेस्ट आणि कांचनजंगा शिखर याबरोबरच आठवतात ते बॉलीवूडचे चित्रपट. कोलकत्ता हे बंगाली चित्रपट उद्योगाचे केंद्र आहे. सत्यजित राय यांनी केलेला चित्रपट 'कांचनजंघा' दार्जीलिंग चाच. तसेच आराधना, राजू बन गाय जंटलमन, परिणीता,बर्फी ,यारीयां,जग्गा जासूस यांचे चित्रीकरण दार्जीलिंग येथे च झाले आहे.ऋत्विक घटक, मृणाल सेन, तपन सिंन्हा , अपर्णा सेन, बुद्धदेव दासगुप्ता, गौतम घोष, कौशिक गांगुली, ऋतुपर्ण घोष,अशा अनेक दिग्दर्शकांचा समावेश आहे. 


बंगालची संगीत परंपरा= बाऊल संगीत हा बंगालच्या लोक संगीताचा वारसा आहे.यात हिंदू भक्ती संप्रदाय,सुफिवाद आणि बौद्ध धर्माचे मिश्रण दिसते. प्राचीन असलेल्या या परंपरेमध्ये अध्यात्मिक लोकसंगीताचा समावेश असतो.  बाऊल गाताना एकतारी, दोतारा तंतुवाद्य, डूग्गी (ढोल),खामक आणि बासरी ,मंजिरा यांचा वापर करतात. हे गायन करणाऱ्या कालाराला बाउल म्हणतात.आपल्याकडे जशी भाट परंपरा आहे तिचं ही परंपरा आहे. हे लोक वैष्णव धर्माचे पालन करतात. गावागावात जाऊन भगवान विष्णूचे भजन गाऊन लोक गीते गाऊन भिक्षा मागत फिरत असतात. देवाची भक्तिमय आळवणी करता करता समाजाला शिकवण सुद्धा देत असतात. बंगाल मधील संत श्री chaitany महाप्रभू यांनी नाम संकीर्तानाचे महत्व सांगणारे शिक्षाष्टकम हे स्तोत्र रचले आहे. त्यांच्या अनुयायांनी जी बंगाली गाणी रचली तिचं सुरुवातीची बाऊल गीते होत.  या संगीत प्रकाराची ओळख, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी जगाला करून दिली.या वर बौद्ध विचारांचा प्रभाव असल्याने याच्या काही रचना पाली भाषेत सुद्धा आहेत. 

रवींद्र संगीत-   यालाच टागोर गीते पण म्हणतात. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेली गीतांची एक विशेष संगीत शैली आहे,यात शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्य धून यांचे काव्यात्मक  मिश्रण दिसते. यात शब्द आणि स्वर याला सारखेच महत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील ठुमरी शैलीवर आधारित हे संगीत आहे. यात भक्ती, प्रेम, प्रकृती, देशभक्ती,भाव भावना, असे विषय आहेत, टागोर यांची अशी जवळ जवळ २२३० गीत रचना आहेत. हा संग्रह  ‘गीतबीतान’ अर्थात  ‘गीत बगीचा’ म्हणून प्रसिद्ध आहे.याचे ६४खंड आहेत.  ही गीते बंगाली जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर आधारित आहेत. बंगालचे राष्ट्रगीत  ‘आमार सोनार बांगला ...’ एकला चलो रे... , ही प्रसिद्ध गीते सर्वाना माहितीच आहेत. या रवींद्र संगीताने अर्थात गुरुदेवांच्या गीतांनी  भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्वाची भूमिका पार पाडली. बंगला मध्ये असे एकही शहरी वा ग्रामीण भागातले घर नाही कि, जिथे ही गीते गायली जात नाहीत.स्वामी विवेकानंद तरुण असतांना त्यांनी रवींद्र संगीत शैली मध्ये संगीत रचना केली होती. विवेकानंद यांनी शिक्षण घेता घेता भारतीय शास्त्रीय संगीत आणि विविध वाद्य यंत्र यांचे शिक्षण घेतले होते. हे सर्वज्ञात आहेच.    

नृत्य =   बंगालला नृत्याचा पण प्राचीन वारसा लाभलेला आहे. यात शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, आणि युद्ध नृत्य यांचा समावेश आहे. पश्चिम बंगाल ब्रिटा नृत्य,गंभीरा नृत्य,संथाल नृत्य, लाठी नृत्य, आणि आदिवासी जमातीचे छाऊ नृत्य ही पारंपारिक नृत्ये आहेत. दार्जिलिंग,   दार्जिलिंगमध्ये नेपाळी लोकसंख्येचे वर्चस्व आहे, त्यामुळे साहजिकच येथे नेपाळी लोक सर्वाधिक प्रमाणात दिसतात. नेपाळी लोकांची संस्कृती अत्यंत समृद्ध आहे, जी त्यांच्या लोकनृत्य आणि लोकगीतांमधून स्पष्टपणे दिसून येते. बहुतेक नृत्ये देव-देवतांना समर्पित आहेत. ही नृत्ये आणि गीते केवळ बौद्धांपुरती मर्यादित नाहीत, तर हिंदू देवतांना समर्पित नृत्येदेखील आहेत. विविध वांशिक लोकांमध्ये गायली जाणारी गीते आणि लोकनृत्ये सणांशी संबंधित असतात.  


 छाऊ नृत्य- हे पूर्व भारतातले  एक प्रसिद्ध आदिवासी, मार्शल आर्ट वर आधारित शास्त्रीय नृत्य आहे .वसंतोत्सवात सादर होते.युद्ध कौशल्याचे कसरती प्रयोगा द्वारे पौराणिक कथेवर  आधारित असते. रामायण, महाभारत व स्थानिक लोककथा तील प्रसंग, भव्य मुखवटे व रंगीबेरंगी पोषाख करून नर्तक सादर करतात.

पुरुलिया, सराईकेला आणि मयूरभंज या तीन शैली आहेत, प. बंगालची शैली  पुरुलिया आहे. डोक्यावर विविध प्रकाराचे टोप आणि मुखवटे हे पुरूलिया छाऊ चे वैशिष्टय़ आहे.

दार्जिलिंगमधील काही सर्वात प्रसिद्ध नृत्यप्रकार म्हणजे – धन नृत्य, झांकरी, यात्रा, खुकुरी नाच, बालन, देवरा, पंचबुद्ध, धिमाय, संगिनी, चुटकी, झ्याउरे, सखिया, डम्फू नाच, मारुनी नाच इत्यादी.

मारुनी नाच हे सर्वात जुने नेपाली लोकनृत्य आहे. प्रभू श्रीरामांच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतण्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा उत्सव साजरा करतात. यात लांब झगा परिधान केलेले पुरुष हे नृत्य सादर करतात.

 धन नृत्य= लिंबू (याकथुंग)लोकांचे हे लोकनृत्य आहे. धन म्हणजे भात . म्हणून याला भात नृत्य किंवा भात कापणी नृत्य पण म्हणतात. हा भात कापणीचा उत्सव असतो. स्त्री पुरुष दोघेही हा आनंदोत्सव साजरा करतात. झ्याउरे नृत्य सुद्धा भात लावणीच्या आनंदाच्या प्रसंगी प्रेम आणि आनंद व्यक्त करण्यासाठी सदर केले जाते. 

झांकरी नृत्य= झान्करी म्हणजे मांत्रिक, इथे ग्रामीण भागात आजारी लोकांवर उपचार करण्यासाठी या नृत्याचा उपयोग करतात. आरोग्यसेवा व डॉक्टरची सोय नसल्याने विशिष्ट मुद्रांचा व संगीताचा वापर करून हे नृत्य उपचारा दरम्यान करतात. 

यात्रा नाच = म्हणजे मिरवणुकीत केला जाणारा नाच. नेपाली लोक पावसाळ्यात इंद्र देवाचे आभार मानतात. तर काही जन  वाईट शक्तींचा नाश केल्यबद्दल शिवाचेही आभार मानतात.राक्षस आणि देवतांचे मुखवटे घालून कलाकार सादरीकरण करतात. ही इंद्रयात्रा आठवडाभर चालते. मुखवटे व रथ हे याचे आकर्षण असते.    

तमंग सेलो म्हणजे दम्फू नृत्य.= तामांग लोकांचे हे ढोल नृत्य आहे. बालन नृत्य - यात देवदेवतांच्या लीला नृत्यातून सदर करतात ,साधारण धार्मिक उत्सवा प्रसंगी चेत्री आणि बहुन जमाती मध्ये करतात. 

पंच बुद्ध नृत्य= धर्मानुसार बुद्धांची पाच रूपे आहेत. या नृत्यात पाच नर्तक ही पाच रूपे प्रेझेंट करतात. दिशा, रंग आणि मुद्रा हे यात महत्वाचे असतात.   

धीमे नृत्य हे सुद्धा नेवार समुदाय कापणीच्या हंगामात सादर करतात. धीमे हा पारंपारिक ढोल आहे, तो वाजवून हे सादरीकरण होते.

चाम नृत्य-

चाम हा एक अत्यंत अद्वितीय, पारंपरिक आणि वारसा नृत्यप्रकार आहे, जो हिमालयीन प्रदेशात बौद्ध भिक्षूंद्वारे कोणत्याही विशेष बौद्ध सण किंवा प्रसंगी सादर केला जातो. हे एक जोशपूर्ण नृत्य असते. मोठे मुखवटे  भूतान, लाहौल आणि स्पिती, तिबेट, आणि दार्जिलिंग यांसारख्या काही ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याशिवाय कठपुतली,लाठी, अलकाप, गोम्भिरा, धामेल फकीर,छोकरा नझरुल,ही नृत्ये आहेत.

कालीघात चित्रकला 

चित्रकला -  कालीघात चित्रकला ही भारतीय चित्रकलेची एक प्रमुख शैली आहे. या शैलीत विशेषतः काली चे ,देव देवतांचे चित्र साकारलेले दिसते. सामाजिक इतर दृश्येही चितारलेली आहेत. आज लंडन मधील विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात जलरंग, रेखिय चित्रे, व हस्त निर्मित लिथोग्राफ अशा ६४५ चित्रांचा संग्रह कालीघाट  चित्रसंग्रह म्हणून प्रदर्शित केला आहे. 

बंगालला मध्ययुगीन काळापासून टेराकोटा वास्तुकलेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. बंगाली कलेत मातीची भांडी, हस्तिदंत, पितळ धातू ,यांचा मोठ्या प्रमाणात वापर दिसतो. या शैलीत बांधलेली मशिदी, मंदिरे, राजवाडे, किल्ले, घरे, मठ धर्मशाळा आहेत. प्राचीन बंगाल मध्ये पाल-सेना शिल्पकला पाहायला मिळते. नवाबांच्या काळात या प्रदेशात हस्तिदंती शिल्पकला भरभराटीस आली असे म्हणतात. 


प्रत्येक प्रदेशाची हस्तकला ही त्याची विशेष ओळख असते.  थांका हा दार्जिलिंग संस्कृतीचा एक अत्यंत लोकप्रिय भाग आहे.  हस्तिदंती दागिने, पारंपरिक मुखवटे, गालिचे, टेराकोटा वस्तू , लाकूडकाम, चामड्याच्या वस्तू  आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तिथल्या कारागिरीची साक्ष देतात. 


बंगाली वस्त्र परंपरा प्रसिद्ध आहे. मलमल कापडावर  जामदानी नक्षीकाम, ही तिथली प्रसिद्ध मुघल शैलीतील वस्त्र कला आहे.  बंगाली साडीचे /शारी अनेक प्रकार आहेत.मंगल वस्त्र  म्हणून लाल काठाची पांढरी साडी वैशिष्टय़ पूर्ण असते. जामदानी, तांट, मलमल, तांगेल, कांथा, राजशाही सिल्क, ढाकई रेशम, बालुचेरी इत्यादी इथल्या संस्कृती च्या खुणा आहेत. पुरुष कुर्ता, पायजमा, धोतर घालतात. 

 खाद्य संस्कृती -भात व मासे हे बंगालचे प्रमुख अन्न आहे. या बरोबर भर्ते हा पदार्थ खातात. इलीश भर्ता, शुतकी भर्ता, बेगुन भर्ता , लक्षात आलेच असेल कि हे आपले भरीत आणि मासे व इतर समुद्री खाद्य पण भाता बरोबर खातात. दार्जिलिंगमध्ये मोमो हा खाद्यपदार्थांची राणी आहे. तो इतका लोकप्रिय आणि स्थानिकांचा आवडता आहे की, त्याने बहुतेक थंड हवेच्या ठिकाणांमध्ये आणि उत्तर भारतीय राज्यांमध्येही लोकप्रियता मिळवली आहे. 


काही प्रसिद्ध स्थानिक आंबवलेल्या पदार्थांमध्ये गुंद्रुक, किनेमा आणि सिंकी यांचा समावेश आहे. इथली खाद्य संस्कृती आंबवलेल्या पदार्थांनी व पेयांनी समृद्ध आहे. 


बंगाल मध्ये, गोड पदार्थ म्हणजे दुधापासून तयार केलेली मिठाई आणि स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असते. रसगुल्ला, संदेश, रस मलई, चमचम, खीर कदम, दरबेश, पायेश, लाबोंग लतिका, सीताभोग, मिष्टी दोई, कोलार बोरा-केळ्याचे वडे संक्रातीला करतात, 

                 

                        

                                              

निसर्गरम्य सौंदर्याव्यतिरिक्त, दार्जिलिंग चहा जगभरात अत्यंत लोकप्रिय आहे. एकरभर डोंगराळ जमीन , विस्तीर्ण हिरव्यागार चहाच्या बागांनी व्यापलेली आहे.       

 दार्जिलिंगमध्ये असंख्य चहा बागांचे दौरे आयोजित केले जातात. थेट चहाच्या बागेतून ताजी खुडलेली चहाची पाने मिळतात .

बंगाल मधील लग्न सोहोळा ही अनुभवण्याची गोष्ट आहे. 

बंगाली विवाह कलकत्त्याला जाऊन प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. सगळीकडेच विधी चा उद्देश एकच पण परंपरा थोड्या फार वेगळ्या.

यातील 'गाये होलुद' किंवा गात्रो-हरिद्रा हा हळदी समारंभ असतो .हा सोहोळा म्हणजे वधू वराचे भौतिक शरीर व सूक्ष्म शरीर शुद्ध करणे. प्राचीन वैदिक परंपरा अजूनही पाळली जाते. हेच आपल्या संस्कृतीचे वैशिष्टय़ आहे. यातील विधी व त्या मागचे कारण बघितले तर आदर,  कृतज्ञता, आशिर्वाद या मूल्यांची मुळे किती प्राचीन काळापासून आहेत हे लक्षात येते. 

पती पोत्रो ही लग्नाची तारीख/ मुहूर्त निश्चितची बैठक, मग आशीर्वाद समारंभ अर्थात साखरपुडा ,यात तांदूळ आणि तिपतीया घास ची पाने वर, वधूला देतो.

ऐबुरो भात हा समारंभ म्हणजे लग्नाआधी विशेष भोजन समारंभ . लग्नगाठ बांधण्या आधीचे हे दोघांचे शेवटचे भोजन असते.


होलूद कोटा च्या संध्याकाळी कुंकू, पान -सुपारी घेऊन, शोभायात्रा काढत, सर्व महिला गंगेला लग्नाचे आमंत्रण द्यायला व विवाह सोहोळ्यात तिचे पाणी वापरण्याची परवानगी मागायला जातात. गंगेच्या आणलेल्या या पाण्यानेच हळद लावल्यानंतर वधू व वर आंघोळ करतात. त्या नंतर केळ्याच्या झाडाला सुद्धा आमंत्रणं देतात.

शंख पोरानो म्हणजे, आपल्याकडे मंगळसूत्र हे लग्न विधीचे महत्त्वाचे प्रतिक आहे तसेच बंगाल मध्ये लाल व पांढ-या बांगड्या प्रतिक असते. आपल्याकडे लग्नाचा हिरवा चुडा असतो. वधूला हळद लावल्यानंतर शंख व पोला या बांगड्या भरतात. लग्नात 

सात पाक परिक्रमा, सोमोप्रोदान (कन्यादान), सोपतोपोडी(सप्तपदी), ओंजोली, सिंदूर दान असे विधी होतात असे एक आठवडा लग्नाचे कार्यक्रम सुरू असतात.

नुकत्याच बंगालमध्ये निवडणुका झाल्या. त्या पार्श्वभूमीवर बंगाल खूप चर्चेत आला. हे सर्व बघून मग सर्वांच्याच मनात प्रश्न उभे राहिले , हीच यांची संस्कृती?   नाही मना मनात देशभक्तीची बीजे रोवणारा बंगाल खूप वेगळा आहे.

(सर्व फोटो गुगल वरून साभार परत.)

ले. डॉ.नयना कासखेडीकर ,पुणे.

               ---------------

Wednesday, 5 August 2026

आषाढात बरस ना.....

                                                                    साहित्य कट्टा वर्तक बाग 

पुणे, दिनांक 22 जुलै 19 --

                                                  आषाढात बरस ना......

 

वारा धूमकेतू सारखा

पिंजून तन मन गेला

माज्या गावाची पायवाट शोधत

तुज्या गावातून आला.

..

काय करू कसं करू

सांग माज्या सजणा

वैशाख वणवा जाळत गेला

आषाढात बरस ना...

आषाढात बरस ना ... अशा या तरल भावना, आणि संवेदनांचा आषाढ जोरदार बरसला वर्तक बागेतील साहित्य कट्ट्यावर.

मराठी भाषा संवर्धन समिति पुणे महानगर पालिका आणि संस्कार भारती साहित्य विभागाच्या, मासिक साहित्य उपक्रमात हा ||आषाढ|| कार्यक्रम संपन्न झाला. आषाढ म्हणजे फक्त पाऊस आणि संबंधित कविता नसून, त्यात, साध्या आणि सरळ शब्दातून व्यक्त झालेलं त्यांचं निसर्ग प्रेम आहे, मनाच्या वेदना आहेत, प्रीती आहे, नात्यांचं दर्शन आहे, अन्यायाच्या विरोधातले बंड आहे. अस्वस्थता आहे, करुणा आहे. विविधरंगी प्रतिमा पण आहेत.

                          

निर्माती, अभिनयातून व्यक्त होणारी अभिनेत्री, तर मोठ्या कॅनव्हास वर कुंचल्यातून व्यक्त होणारे असे आशयघन चित्र साकारणारी चित्रकार असलेल्या भाग्यश्री देसाई किती संवेदनशील कवयित्री आहेत हे कालच्या कार्यक्रमात सर्वांनीच अनुभवले.

भाग्यश्री देसाई, शंतनु पुराणिक आणि मोनिका जोशी यांनी अतिशय समर्थपणे कवितांचे सादरीकरण केले. आषाढ हा भाग्यश्री देसाई यांचा पहिलाच काव्यसंग्रह. आणि तोही त्रैभाषिक असलेला. पण वर्षभरात या संग्रहाला जवळ जवळ डझन भर पुरस्कार मिळाले आहेत. इतके पुरस्कार कसे? याचं उत्तर यातल्या सशक्त कवितेचे वेगळे विषय.

‘जे न देखे रवी ते देखे कवी’ हे अगदी खरच . उदाहरणार्थ – आपल्या घरातले रोज वापरतो ते पायपुसणे काय, पण त्यावरील भाष्य म्हणजे पायपुसणी ही कविता. त्या ‘पायपुसणी’ वर एखादी गृहिणी कसे आईच्या मायेने, प्रेमाने काळजी घेते, वापरुन निस्तेज झालेल्यांना कशी धुवून चकचकीत करते. त्याचं हे साध पण परिणामकारक भाववर्णन या कवितेत आहे. ‘सारं कसं शांत शांत’ ही कविता मनाला चटका लावणारी होती. पुणे मुंबई प्रवासात सकाळी सकाळीच खाटीकखान्यात नेल्या जाणार्‍या कोंबड्यांचा गच्च भरलेला टेम्पो बघून मनात दाटलेल्या भावना आणि मुंबईहून पुण्यास परत येताना पुन्हा तोच टेम्पो रिकामा होऊन योगायोगाने दिसल्याने, कळवललेल्या मनाने व्यक्त केलेल्या वेदना यात आहेत, ज्या ऐकून श्रोतेही कळवळतात. ही कविता सादर करताना भाग्यश्री ताई भावविवश होतात आणि चार आसवं त्या कोंबड्यांसाठीही गळतात.

                        

‘काळी मांजर’ ही अशीच एक कविता घाबरलेल्या सुनेला आत्मविश्वास देणारी. यात नववधू माप ओलांडताना काळी मांजर आडवी जाते त्यावेळी कुजबुजणार्‍या आसपासच्या बायकांना दम भरणारी आणि सुनेला आश्वस्त करणारी सासू यात रेखाटली आहे.

‘इथे जगणं सोप्पं नसतं’ ही कविता जगायचं असेल तर दगडासारखे जगा कारण ज्या दिवशी तासले जाल देवत्वाला पोहोचाल असा मोलाचा संदेश देऊन जाते.

याप्रमाणेच आर्जव, सांग ना, ते बोलत नाहीत, सवय, धुकं अशा मनाची अस्वस्थता निर्माण करणार्‍या कविता सादर झाल्या. देव आत्मा परमात्मा, श्रद्धा अंधश्रद्धा सोशल नेटवर्किंग पत्रिका या सगळ्या कवितेत वेदना आहे, सुखद क्षण आहेत. अटळ मृत्यूच चिंतन आहे. अन्यायाविरूद्ध भांडण आहे. या बरोबरच हिंदीतल्या कश्मकश्म, अजीब दास्ता, ये तन्हाईया अशा कविता तर इंग्लिश मधील Tell me, Innocence, Life, Assurance या कविताही खूप भावल्या. मोनिका जोशी आणि शंतनु पुराणिक यांनी भाग्यश्री देसाई यांच्या बरोबर कवितेचा सुंदर आस्वाद रसिकांना दिला. रसिक प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली. या बरोबरच या कविता केंव्हा आणि कशा सुचल्या, त्यामागची पार्श्वभूमी काय होती या सगळ्या गोष्टी भाग्यश्री ताई त्यांच्या निवेदनात किस्से सांगताना उलगडून दाखवत होत्या.... आणि आषाढ चांगलाच बरसत होता.

                          

सुरूवातीला नटराजपूजन करण्यात आले. ध्येयगीत व पाहुण्यांचा परिचय सीमा भोळे यांनी सादर केले, प्रास्ताविकात डॉ. नयना कासखेडीकर यांनी साहित्य कट्टयाच्या या बाराव्या वर्धापनदिन कार्यक्रमापर्यंतची वाटचाल सांगून संस्कार भारतीच्या दैनंदिनी प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर मीनाताई सासणे, हल्याळ दिलीप दत्तात्रेय, अतिक शेख, वैजयंती आपटे, अभिनेत्री वसुधाताई देशपांडे, अभिनेते अनिल खोपकर, तसेच इतर मान्यवर व रसिक प्रेक्षक आवर्जून उपस्थित होते.

                              
                                                                           प्रसिद्धी


 

             ले. --- डॉ. नयना कासखेडीकर

                                                     --------------------------

 

 

Thursday, 23 July 2026

आकाशवाणी आणि मी

 

आकाशवाणी आणि मी


“ ३११.५५ मीटर्स अर्थात ९६३ किलोहर्ट्झ वर आकाशवाणीचे हे जळगाव केंद्र आहे”. Opening signature tune झाली कि, ही उद्घोषणा करून केंद्र सुरु करायचे आणि आमची ड्युटी सुरु. पुढचे काही तास आम्ही AIR वर live. २०० किलोमीटर परिसरात या केंद्राचे श्रोते होते. केव्हढा हुरूप होता तो !

महाविद्यालयात शिकत असतांना आकाशवाणीत माझा गमतीशीर प्रवेश झाला. त्यावेळी रेडिओचे युग होते. कारण सकाळ रेडिओवरील पहिल्या सिग्नेचर ट्यूनने व्हायची आणि रात्र सुद्धा रेडिओवरील कार्यक्रमाने. त्यामुळे बहुतेक सर्व श्रोते रेडिओशी घट्ट नाते जोडून असायचे. एव्हढेच काय सर्वांचे दिवसाचे वेळापत्रक आकाशवाणीच्या कार्यक्रमाप्रमाणे जोडलेले असायचे. गावातल्या, शहरातल्या कॉलनी अथवा गल्लीतल्या, चाळीतल्या प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळच्या ‘सातच्या बातम्यांचा’ आवाज येत असे. तसाच तो ‘बिनाका गीतमालिकेचा’ पण येई.

  ऐंशीच्या दशकांत, साधारण १९८२, ८३ चा काळ. असेच एकदा रेडिओवरील कार्यक्रम ऐकतांना निवेदन करणाऱ्या युवक युवतींची भाषा आम्हाला काही ऐकायला आवडत नव्हती. अतिशय अशुद्ध आणि कशीतरी रेलू वाटायची. अरे, आपण तर यांच्यापेक्षा शुद्ध व चांगले बोलू शकतो, आपल्याला देतील का बोलायला हे लोक? चला प्रयत्न करायला काय हरकत आहे, असे म्हणून एक मैत्रीण व मी आकाशवाणी जळगाव केंद्रात गेलो. तिथे भेटलो आणि आमची ही भाषेची तक्रार सांगितली. आमची टेस्ट घेतली, स्टुडीओत माईकवर, बोलायला आणि काही मजकूर वाचायला सांगितला आणि मग काय! दुसर्या दिवशी या म्हणून सांगितले. लगेच दुसर्या दिवशी धडधडत्या अंत:करणाने आकाशवाणीत पोहोचलो. युवावाणीच्या संध्याकाळच्या कार्यक्रमात आम्हाला कार्यक्रमाचे live compering करायला सांगितले. यशस्वीपणे ते केले. त्यानंतर एकदा एक विषय देऊन त्यावर भाषण द्यायला सांगितले. विषय होता हुंडा बंदी. वा, काय प्रसिद्धी मिळाली या talk ला. हुंडाबळीच्या रोज घटना घडत होत्या. हुंडाबंदीवर जोरदार भाषण लिहून काढून ते वाचलं होतं. अगदी तावातावात. अगदी आता आता पर्यंत ते सांभाळून ठेवले होते. बहुतेक सगळ्या ओळखीच्यांनी ते ऐकले होते. शाबासकी दिली होती. आपला आवाज एकाच वेळी एव्हढ्या लोकांनी ऐकला होता? नक्कीच अप्रूप होते ते, आपण हे करू शकतो असा आत्मविश्वास आणखीन दृढ झाला होता. त्याच वेळी उद्घोषक दत्ता सरदेशमुख यांनीही आमची धडपड बघून रीतसर ऑडीशन द्यायला सांगितली. पास होण्याची खात्री होतीच आणि सुरु झाला होता आकाशवाणीचा माझा प्रवास.


 नाही म्हणायला लहानपणी, आकाशवाणीच्या pune केंद्रावर ‘बालोद्यान’ हा मुलांचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी live असायचा. त्यात आम्ही सुट्टीच्या काळात प्रत्यक्ष सहभागी व्हायचो. बालगोपालांचा मेळाच भरे. मुलांशी प्रत्यक्ष संवाद होत असे. मनोरंजन, बालकलाकारांचे सादरीकरण असे ही असायचे, पुण्यात रंगमंचावर सादर होणारी तेंव्हाची बालनाट्ये, आकाशवाणीचा बालोद्यान कार्यक्रम, गणेश उत्सवातील देखावे, मेळे व त्यातील सहभाग, या सगळ्याचे गारुड मनावर असे.

वालचंदनगरला राहत होतो, मी तेंव्हा आठवीत शिकत होते. माझी आई तिथून शेळगाव (इंदापुर) जवळ अपडाऊन करायची. तिचे पहिल्यापासुनचे वेळापत्रक म्हणजे रेडिओच्या वेळा व कार्यक्रमच होते. त्यामुळे सकाळच्या सातच्या mumbai केंद्रावरच्या बातम्या हा अविभाज्य भाग होता आमच्या दैनंदिन जीवनाचा आणि त्यानंतर दर रविवारी लागणारी “मीने मीने ...टेकाडे भाऊजी ...” ही ‘प्रपंच’ श्रुतिका. अप्रतिम. हे मुंबई केंद्र आठवीत असतांना ऐकताना वाटले नव्हते कि आपणही अशाच मालिकेत पुढे भविष्यात भाग घेणार आहोत. असो. आकाशवाणीच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले. व्यक्तिमत्व विकासाला पोषकच होते सारे.

उद्घोषिका बरोबरच वेगवेगळ्या विभागांत केलेले काम मग ते शैक्षणिक विभाग, कृषी विभाग, युवावाणी, ड्रामा, महिला विभाग, प्रत्येक विभागांत केलेले, production/ कार्यक्रम निर्मितीचे काम, drama artist म्हणून सहभाग, रेकॉर्डिंग, dubbing, निवेदन, live कार्यक्रम, ‘झुंबर’ या कौटुंबिक श्रुतीकेतला दीर्घ काळ सहभाग, नभोनाट्यांतील सहभाग, हे सर्व करताना केलेली धावपळ, केलेला अभ्यास. अनेक तज्ञ लोकांच्या झालेल्या भेटी, घेतलेले प्रशिक्षण आणि अनुभवी लोकांचे मार्गदर्शन याला तोड नाही. डॉ.उषा शर्मा त्यापैकीच एक. आजसुद्धा आमची मैत्री कायम आहे. हे आज जवळ जवळ ३६ वर्षांनी आठवले तरी ऊर अभिमानाने भरून येतो. ९० च्या दशकात जळगाव आकाशवाणी केंद्रात उद्घोषिका म्हणून घेतलेल्या अनुभवाचा भविष्यात अनेक ठिकाणी उपयोग झाला. सर्व meltron मशीन्सशी मैत्री झाली होती. पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर इथल्या pune आकाशवाणीचा प्रवास सुरु झाला. इथे मात्र जबाबदाऱ्या, Ph.D. चा अभ्यास यामुळे ट्रान्स्मिशन केले नाही, सेक्शनलाच काम केले. कै.मा.नीलकंठ कोठेकर सर एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व! त्यांना गुणांची चांगली पारख होती. पुन्हा पुण्यात ते भेटले. Ph.D thesis चा पहिला ड्राफ्ट त्यांनाच दाखवला होता. जळगावला असतांना डिप्लोमा इन जर्नालीझम मुक्त विद्यापीठाच्या आणि बॅचलर व मास्टर डिग्रीच्या वेळी ही त्यांचे मार्गदर्शन होतेच. १९९५ पासून माझा मोर्चा पत्रकारितेकडे वळला.

१३ फेब्रुवारी हा जागतिक रेडीओ दिन म्हणून साजरा होत असतो. कारण याच दिवशी १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिले प्रसारण झाले. आज सिंहावलोकन करताना, AI च्या नव्या जगात प्रवेश करताना, माध्यमांच्या आधुनिक युगांत वावरताना, आकाशवाणी/ रेडीओ हे माध्यम अगदी तळागाळापर्यंत, दुर्गम भागात, यशस्वीपणे पोहोचणारे आणि खात्रीचे होते, विश्वासार्ह होते, नव्हे अजूनही आहेच हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवते.

‘आकाशवाणी जळगाव केंद्र’ मध्यम लहरीवर प्रसारित होत असलेले हे all india radioचे खानदेशमधील ग्रामीण व शहरी भागाला जोडणारे एक महत्वाचे माध्यम. प्रादेशिक केंद्र. अर्थातच मराठी. या केंद्राची स्थापना १९७६ मध्ये झाली पण केंद्र प्रत्यक्षात १९७८ पासून सुरु झाले. या केंद्राचे कार्यक्रम शिरसोली या जळगावपासून ११ किलोमीटरवर असलेल्या प्रक्षेपण केंद्रातून सहक्षेपित होतात. जळगाव, धुळे, नाशिक व बुलढाणा या जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि जडणघडणीत जळगाव आकाशवाणी केंद्राचा मोठा वाटा आहे. शिक्षण, कला, शेती, हवामान, आरोग्य, विज्ञान, क्रीडा, संस्कृती, व्यापार, अशा विषयातून, महिला, बाल, युवक, शेतकरी या सर्वांनाच मार्गदर्शन आणि मनोरंजन करणारी ही संस्थाच आहे जणू. विशेषतः या माध्यमाचा नैसर्गिक आपत्तीमध्ये थेट माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी जास्त उपयोग होतो. रेडीओ हे जनसंवादाचं सर्वत्र, सहज उपलब्ध होणारे, टिकाऊ, बहुमुखी असं माध्यम आहे.

जळगाव केंद्र news on AIR App आणि १०२.१ वरील FM वर सुद्धा हे ऐकू येते. रेडीओ कम्युनिकेशनमध्ये रेडीओ लहरींचा वापर करून माहिती अवकाशात वाहून नेली जाते. या क्षमतेला ‘बँडविड्थ’ म्हणतात. ‘हेनरिक हर्ट्झ’ या जर्मन भौतिक शास्त्रज्ञाने ११ नोहेंबर १८८६ या दिवशी रेडीओ लहरींचे अस्तित्व पहिल्यांदा सिद्ध केले. या रेडीओ सम्प्रेषणाला प्रथम वायरलेस टेलिग्राफी म्हटले गेले. रेडीओच्या पहिल्या दोन दशकाला ‘रेडीओ टेलीग्राफी युग’ म्हटले गेले. या काळात रेडीओचा वापर व्यक्ती-व्यक्ती, व्यावसायिक, राजनैतिक व लष्करी मजकूर संदेशाचे वहन करण्यासाठीच होत होता. कारण ऑडीओ मोड्युलेशनसाठी आवश्यक असणाऱ्या सतत लहरींचे प्रसारण होऊ शकत नव्हते.


    रेडीओचा इतिहास बघितला तर त्याचे प्रसारण, शोध, कालरेषा यावर संशोधन होत असताना हर्ट्झ, लॉर्ड रेले, ऑगस्टो रीघी, ओलीव्हर यांच्या प्रमाणेच भारतीय भौतिकशास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी केलेले प्रयोगसुद्धा लक्षात घेतले गेले. १९०८ च्या सुमारास औद्योगिक देशांनी आंतरखंडांमधील टेलिग्राम ट्रॅफिकची देवाणघेवाण करण्यासाठी आणि त्यांच्या वसाहती आणि नौदल ताफ्यांशी संवाद साधण्यासाठी शक्तिशाली ट्रान्सोसेनिक ट्रान्समीटरचे जगभरातील नेटवर्क तयार केले. पहिल्या महायुद्धादरम्यान, सतत लहरी रेडिओ ट्रान्समीटर, रेक्टिफाइंग इलेक्ट्रोलाइटिक आणि क्रिस्टल रेडिओ रिसीव्हर डिटेक्टरच्या विकासामुळे रेजिनाल्ड फेसेंडेन आणि इतरांनी अॅम्प्लिट्यूड मॉड्युलेशन (AM) रेडिओटेलीफोनी साध्य केली, ज्यामुळे ऑडिओ प्रसारित करता आला.

१९२० मध्ये प्रसारण सेवा देणारी अनेक रेडीओ स्टेशन सुरु झाली. पुढे नियोजित सेवा सुरु झाली. रोटेड्राममध्ये नेदरलंड, कॅनडा, लंडनमध्ये चेम्सफोर्ड, नंतर मेक्सिको, क्युबा, ऑस्ट्रेलियात मेलबर्न, तसेच न्यूझीलंड, डेन्मार्क इथेही स्टेशन सुरु झाली. १९२२ मध्ये अमेरिकन स्टेशन निर्माण झाली. औद्योगिक प्रसारणही सुरु झाले. फ्रांस, सोविएत युनियन,चीन, बेल्जीयम, चेकोस्लोव्हेकिया, जर्मनी, स्पेन, इटली, जपान, नॉर्वे, पोलंड सर्वांनी ही सेवा सुरु केली. अगदी सुरुवातीला याचा उपयोग फक्त एखादा महत्वाचा निरोप पाठवणे एव्हढाच होता. पुढे विद्यापीठात याचा उपयोग केला गेला. शेतकर्यांना कृषी बाजार अहवाल पाठवण्यासाठी झाला. व्यवसायासाठी उपयोग झाला. हे सर्व काम हौशी आणि प्रायोगिक स्तरावर सुरु होते.

पुढे डेट्रॉईट न्यूज या वृत्तपत्राने जेंव्हा रेडीओ स्टेशन सुरु केले तेंव्हा ते खरे एक ‘नवे माध्यम’ म्हणून लोकांनी अनुभवले. ही स्टेशन्स म्हणजे हाताने बनवलेली उपकरणे होती. काही कार्यक्रमाच्या प्रयोगामुळे देशभर हे माध्यम लोकप्रिय झाले, सामान्य लोकांना खूप जवळचे वाटू लागले. श्रोत्यांना आकर्षित कसे करायचे, त्यांना सतत जोडून कसे ठेवायचे यावर सतत विचार करून रेडीओ कार्यक्रम याचे स्वरूप लोकांच्या लक्षात आले. त्यांच्या सर्जनशीलतेमुळे हे माध्यम हळूहळू स्थानिक भाषेतील एक अभिव्यक्तीचे माध्यम बनले. पुढे सुनियोजित प्रसारण सुरु झाले.

अनेक ट्रान्समीटर मधून येणाऱ्या रेडीओ लहरी एकमेकांमध्ये व्यत्यय न आणता, एकाच वेळी हवेतून जातात कारण प्रत्येक ट्रान्समीटरच्या रेडीओ लहरी हर्ट्झ, किलो हर्ट्झ, मेगा हर्ट्झ, किवा गिगा हर्ट्झ मध्ये मोजल्या जाणार्या वेगवेगळ्या फ्रीक्वन्सीवर आधारित असतात.

एकोणिसाव्या शतकात बिनतारी संदेश बरोबर रेडीओचा उदय झाला. भारतात २३ जुलै हा राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो. १९२४ मध्ये मद्रासमध्ये पहिला रेडिओ क्लब स्थापन झाला होता. लाहोर, अलाहाबाद, पेशावर, डेहराडून इथेही हौशी रेडीओ क्लब सुरु होते.बडोदा, त्रिवेंद्रम, हैद्राबाद, औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा नभोवाणी सुरु होती. म्हैसूरमध्ये १९३५ मध्ये सुरु झालेल्या नभोवाणीला ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. आकाशवाणी म्हणजे आकाशातून येणारा आवाज, तेच नाव पुढे १९५६ मध्ये भारत सरकारने भारतातील सर्व केंद्रांना अधिकृतपणे दिले.


    पहिला खाजगी हौशी रेडीओ क्लब ऑफ बॉम्बे ने जून १९२३ मध्ये देशात प्रथम प्रसारण सुरु केले. त्यातून प्रेरणा घेऊन भारतातले पहिले औपचारिक प्रसारण मुंबई केंद्रावरुन १ जुलै १९२७ ला सुरु केले गेले आणि रेडीओ या नव्या माध्यमाचे युग सुरु झाले. सुरुवातीला मर्यादित श्रोत्यांसाठी प्रसारण होत असे. ४८ किलोमीटर परिसरातच हे प्रक्षेपण ऐकू यायचे. भजन, शास्त्रीय संगीत, बातम्या, सरकारी सूचना, सामाजिक भाषणे असत. उद्दिष्टे होती- देश विदेशातील बातम्या संकलित करून बातमी पत्रे देणे, जनतेला माहिती पुरविणे, मनोरंजन करणे , प्रबोधन करणे, सल्ला व मार्गदर्शन देणे. हे Indian Broadcasting Company मार्फत होत असे. ही कंपनी १९३० मध्ये बंद झाली आणि भारत सरकारने हे काम स्वताकडे घेतले.१९३० ते १९३६ ब्रिटीश सरकारने नियंत्रण ठेवले आणि all india radio ची (AIR) स्थापना झाली. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन air चे काम सुरु झाले. लोकांना माहिती देणे, लोकांना शिक्षण देणे आणि लोकांचे मनोरंजन करणे या त्रिसूत्रीवर आकाशवाणीचे काम सुरु आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात आकाशवाणीचा अधिक विकास झालेला दिसतो. आज आकाशवाणीची देशभरात सुमारे पाचशे ते सहाशे प्रसारण केंद्रे आहेत. भौगोलिक क्षेत्राच्या ९०% भागात ती आहेत. ९९.१९% लोकसंख्येपर्यंत ती पोहोचली आहे. २३ भाषा आणि १८२ बोलीभाषेत ही केंद्रे कार्यक्रमांची निर्मिती करत असतात. ते अत्यंत दुर्गम, ग्रामीण आणि सीमावर्ती भागातील श्रोत्यांपर्यंत आकाशवाणीच्या माध्यमातून पोहोचतात.

आकाशवाणी हे जगातील रेडीओचं सर्वात मोठं जाळं असलेले आणि देशातील सर्व लोकांपर्यंत पोहोचणार जनसंवादाचे माध्यम आहे. ‘भारत देश स्वतंत्र झाला’ ही अधिकृत ऐतिहासिक घोषणा या देशातील लाखो लोकांनी रेडिओवरून ऐकली आणि आनंद साजरा केला. ते किती परिणामकारक आहे ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात १९४७ मध्ये भाग घेतलेल्या अनेकांनी अनुभवले आहे. स्वातंत्र्य लढ्यात रेडिओ ने सर्व देशभक्तांना, सामान्य लोकांना, साहित्यिक व लेखक आणि कवींना, क्रांतीकारकांना, विचारवंताना, राजकारण्यांना, सैन्याला अशा सर्वाना स्वातंत्र्य या विषयाबद्दल एकत्र बांधून ठेवले. अशी मोठी शक्ती या माध्यमा मध्ये आहे. विश्वासार्हता हे खरे याचे वैशिष्ट्य आहे. प्रसारण हे जरी तांत्रिक दृष्ट्या महत्वाचे असले तरी मानवी सहभाग, मानवी विचार हे ही महत्वाचे आहे. त्यामुळे AI च्या नव्या जगात AI tools वापरून केलेले सादरीकरण यापेक्षा प्रत्यक्ष माणसाचा सहभाग असलेले सादरीकरण जास्त विश्वासार्ह असेल हे नक्की .

कारण रेडीओ हे माध्यम युद्धात, संकटात आणि आज आकर्षण असलेल्या अनेक नव्या डिजिटल माध्यमाच्या गर्दीत सुद्धा खात्रीशीर माध्यम आहे, हे जगभरात सिद्ध झाले आहे. अगदी पहिल्या महायुद्धापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत ते तंत्रज्ञानाचा एव्हढा मोठा विकास झाल्यानंतर सुद्धा आजच्या गाझा पट्टीतील युद्धापर्यंत, ‘रेडिओ’ हे प्रसार माध्यम महत्वाची भूमिका अखंडपणे बजावत आहे. या सर्व भौगोलिक अडचणीतून वाट काढत, कमी खर्चात, जास्त वेगाने व क्षणात माहितीचा प्रसार करणारे हे माध्यम आहे. त्यासाठी तुमच्याकडे फक्त रिसिव्हर म्हणजे रेडीओ फ़्रिक़्वेन्सि मिळणारे यंत्र/ट्रांझिस्टर हवे. बस्स. कारण तुम्हाला फक्त आवाज ऐकायचा आहे, आणि इथेच खात्री आणि विश्वासाची कसोटी लागते ती आकाशवाणीकडे आहे. ज्या लोकांना माहितीची आवश्यकता आहे त्यांच्या पर्यंत ती विश्वसनीयरित्या पोहोचली पाहिजे. म्हणून रेडीओ वरचा आवाज हा अधिक विश्वासक व आश्वासक दोन्हीही असतो.

चक्रीवादळ, पूरस्थिती, भूस्खलन, त्सुनामी किंवा भूकंप झालेल्या क्षेत्रात तसेच युद्धभूमीवर सर्व उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणी पुढे काय वाढून ठेवले आहे? आत्ता त्या क्षणाला आपण काय करायचे? कुठे जायचे? संरक्षण कुठे मिळणार आहे? हे सर्व निर्णय घ्यायला, त्या क्षणी मार्गदर्शनाची गरज असते. ते रेडिओवरील संदेशाने मिळते.

याचे उदाहरण म्हणजे आता गाझा पट्टीतील ऑक्टोबर २०२३ मध्ये हमास ने केलेल्या हल्ल्यात सर्व उध्वस्त झाले. अनेक रेडीओ स्टेशन्स (२३स्टेशन्स) बंद पडली. मोठी जीवितहानी, शोकाकुल व भ्यायलेले नागरिक, सर्व व्यवहार ठप्प, रोगराई च्या प्रसाराची भीती, वीज नाही, आर्थिक महासंकट, पायाभूत सुविधांचा नाश, अन्न टंचाई, महागाई, उपासमार, पण अशा कोलमडलेल्या परिस्थितीत आणि युद्धजन्य परीस्थितीत विश्वसनीय प्रसारण होणे आवश्यक असते. गाझा पट्टीत ‘जमान एफ.एम.स्टेशन’ पुन्हा सुरु करून, प्रसारण सुरु झाले त्यामुळे लोकांना मोठा आधार वाटला असेल. अशा परिस्थितीत रेडिओ म्हणजे जीवदायिनी रेखा ठरते.

करोना साथीच्या काळात रेडिओवरील बिहार झारखंड मध्य प्रदेश इथे शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षण आकाशवाणीच्या प्रसारणावर अवलंबून होते. स्मार्ट फोन व इंटरनेट उपलब्ध नसलेल्या ठिकाणी आकाशवाणीने हे काम केले. ओरिसा तामिळनाडू सारख्या किनारी प्रदेशात मच्छीमार आकाशवाणीच्या हवामान बुलेटीन वर अवलंबून होते. २०१९ च्या फणी या तीव्र चक्रीवादळावेळी रेडिओच्या अलर्ट मुळेच अनेकजण सुरक्षितपणे किनार्यावर परतले. मोबाईल ला नेटवर्क नसतांना रेडिओच आपत्कालीन संदेश साधन म्हणून कामाला आले.

अशा बिकट प्रसंगी रस्ते बंद, फोन बंद, दळणवळण पूर्णतः कोलमडलेले, आताचे इंटरनेट कनेक्शन सुद्धा बंद झाले तर अशा परिस्थितीवर फक्त आणि फक्त रेडिओच मात करू शकतो. सगळे जग एकत्र जोडण्यासाठी ‘रेडिओ सिग्नल’ एक खात्रीशीर आधार होता, आहे आणि उद्याही असेल. रेडिओ चा सिग्नल नेहमीच युद्ध क्षेत्रातील संकट समयी, सुरु असलेल्या मदत कार्यात, संदेश जलद पोहोचवण्याच्या कामात. डिजिटल माध्यमांपर्यंत किंवा अवकाशातील दूरस्थ सीमेपर्यंत सुद्धा सर्वांच्या पुढे ताकदीने उभा असेल, कार्यरत असेल. कारण हे आवाजाचे तरंग अदृश्य असले तरी, तेच आज कुठल्याही बदलत्या तंत्रज्ञानातसुद्धा लोकांपर्यंत संदेश पोचविण्यात अग्रेसर असतील. त्यांचे रक्षण करण्यात आघाडीवर असतील आणि लोकांना जोडून ठेवण्यात ताकदवान असतील.

भारतात २००२ मध्ये कम्युनिटी रेडिओचा प्रवास सुरु झाला. पहिले कम्युनिटी रेडीओ स्टेशन फेब्रुवारी २००४ मध्ये सुरु झाले. आता भारतात ५२८ कम्युनिटी रेडीओ स्टेशन्स आहेत. अनेक विद्यापीठे, शैक्षणिक संस्था यांनी अशी कम्युनिटी रेडीओ स्टेशन्स सुरु केली आहेत. आरोग्य, शिक्षण, पोषण, शेती, सामाजिक विकास हे विषय घेऊन स्थानिक भाषा अथवा बोली भाषांमध्ये प्रसारण होत असल्याने, सांस्कृतिक दृष्ट्या ही सर्व समाजाशी जोडले जातात व लोक परंपरा, संगीत व मौखिक परंपरा व वारसा जपण्यात यशस्वी होत आहेत.

भारतीय लष्कराचा उत्तराखंड मध्ये ज्योतिर्मठ आणि j&k मधील राजौरी मधील एफ एम रेडीओ स्टेशन, बुंदेलखंड मधील महिलांचा कम्युनिटी रेडीओ, कच्छ मधील बोली भाषेतला कम्युनिटी रेडीओ, दिल्लीतील तिहार तुरुंगातील कैद्यांनी चालवलेला रेडीओ अभिव्यक्ती, असे हे लोकांशी थेट संवादाचे माध्यम खूप परिणामकारक आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ‘मनकी बात’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागरिकांशी थेट होत असलेला संवाद.

भारतातले रेडीओ उडान २०१४ मध्ये सुरु झालेले पहिले online रेडीओ स्टेशन, जे दृष्टीबाधित लोक /प्रस्तुतकर्ता व स्टाफ चालवतो. त्यांचे आज १२० देशात सव्वा लाख श्रोते आहेत.

अशा प्रकारे रेडिओचे अनेक व्यावहारिक उपयोग आहेत, ज्यामध्ये प्रसारण, व्हॉइस कम्युनिकेशन, डेटा कम्युनिकेशन, रडार, रेडिओ लोकेशन आणि रिमोट कंट्रोल यांचा समावेश आहे.

                             रेडीओच्या शोधकर्त्यांना मानाचा मुजरा.

 

डॉ. नयना कासखेडीकर, पुणे

--------------------------------

Tuesday, 14 July 2026

वारी पंढरीची .....

 

वारी पंढरीची .....

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव !


पंढरपुरची वारी म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख. जगातल्या अनोख्या अध्यात्मिक यात्रेपैकी एक महत्वाची यात्रा. शिस्त, श्रद्धा, एकता आणि समरसतेची यात्रा. महाराष्ट्राच्या सर्व भागातून हजारो वारकरी आणि कर्नाटकातून हरिदास, इतर राज्यातून दर वर्षी आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशीला पंढरीत येतात. जुलै उजाडला कि वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे, त्याची तयारी मात्र आधीच सुरु असते. दरवर्षीच पावसाळा आणि आषाढी वारीचे गणित काहीही झाले, काहीही घडले तरी पक्के असते. वारकरी संप्रदायासाठी पंढरीची ही वारी अतिशय महत्वाची असते. पाऊस नसल्याने कोरडा दुष्काळ असो वा अतिवृष्टीमुळे परिसर जलमय झालेला असो. वारकर्यांची, विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायची ओढ कायम असते. संततधार सरींमध्ये सुद्धा ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वारकऱ्यांची पाऊले पंढरीची वाट चालत असतात. ... आळंदी - देहूहून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या निघणार्या पालख्यांचे वेळापत्रक जाहीर होते. अंदाजे २०ते २४ दिवसांनी पालख्या पंढरीत येऊन दाखल होतात.

पालखी सोहोळ्याच्या रचनेत क्रम ठरलेला असतो. आधी नगारा बैल गाडी, यांचे नगारा वादन प्रवास करताना अखंडपणे सुरु असते. त्यामागे दोन अश्व, एकावर जरीपटका घातलेला स्वार असतो तर दुसरा अश्व मोकळा असतो त्यावर संत बसतात अशी भक्तांची श्रद्धा असते. त्यामागे काही दिंड्या, जवळ जवळ २७ दिंड्या असतात. मग पालखी रथ, पुन्हा काही दिंड्या मागे.या मागच्या दिंड्या दोनशे पेक्षा जास्त असतात. प्रत्येक दिंडीमध्ये एक वीणा घेतला भक्त, एक पखावज वादक, टाळकरी, हातात ध्वज घेतलेले भक्त, डोक्यावर तुळशी वृंदावन व पाण्याचे हंडे घेतलेल्या महिला आणि अनेक इतर वारकरी चालत असतात. कपाळी गोपीचंदन व बुक्का, तुळशीमाळ गळ्यात घातली कि वारकरी होऊन त्या संप्रदायाचे नियम आचरायचे असतात. नियमित वारी करायची असते, ‘रामकृष्ण हरी’ हा जप करायचा असतो. नित्य नेमाने हरिपाठ म्हणायचा असतो. मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करायचे असते. परपुरुष व परस्त्री विठ्ठल रुक्मिणी समान मानायचे असते. अशी ही श्रद्धा, म्हणून वारकरी एकमेकांना माऊली म्हणूनच संबोधतात.


इतर सामील असलेल्या पालख्या म्हणजे ,त्र्यंबकेश्वर हून संत निवृत्तीनाथांची पालखी, पैठण हून संत एकनाथांची, सास्वधून सोपानकाका यांची, एदलाबाद हून संत मुक्ताबाईची, नरहरी सोनार, संत नामदेव,रोहिदास, चोखोबा यांची पंढरपूरहून, जनार्दन स्वामींची व संत बहिणाबाई यांची संभाजीनगरहून, वडगाव येथून जयराम स्वामी यांची पालखी, शिरसावडीचे शेकुबोवा यांची पालखी, कोळेहून घाडगे बाबा न्ची ,तर, चिंचगाव हून तपकिरी बोवा यांची पालखी, मच्छिंद्रगड हून मच्छिंद्र नाथांची, मंगळवेढा येथून दामाजी यांची, शंकर महाराज यांची माहुली अमरावती येथून,तर शिराळा येथून गोरक्षनाथ यांची पालखी पंढरपूरसाठी रवाना होते.


ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.... अशा अखंड जयघोषात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून प्रस्थान करते. तर संत तुकारामांची पालखी देहू हून प्रस्थान करते. प्रस्थानानंतर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा पहिल्याच दिवशी मुक्काम त्यांच्या आजोळ घरी आळंदीत गांधीवाड्यात असतो तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम देहू गावातल्या त्यांच्या वंशजांच्या इनामदार वाड्यात असतो. भागवत धर्माची पताका हातात धरून, डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात तुळशीच्या माळा, टाळ आणि मृदुंगाच्या गजरात हजारो अबाल वृद्ध भक्तांचा मेळा पुण्यात दाखल होतो. वाकडेवाडी येथे दोन्ही पालख्याचा संगम होतो. हा वैष्णवांचा मेळा आळंदी देहूहून पायी चालत चालत मुळा मुठेच्या संगमावर येतो तेंव्हा गावातले सर्व भक्त, भाविक या पालख्यांचे दर्शन घेतात आणि या सोहोळ्याचे साक्षीदार होतात. नाही देहू आळंदी, नाही पंढरी, तर निदान अगदी आपल्या इथेच गावाच्या वेशीपाशी दर्शनाचा लाभ घेत भाविक धन्यता मानतात. विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट, हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा गजर होत असलेल्या या चैतन्यमय वातावरणात चिंब भिजतात.
 
                      

            
शिवाजीनगर ते फर्ग्युसन रोडने दोन्ही पालख्या, संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आणि संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे थांबून आरत्या होऊन पालख्या डेक्कनला येतात. मग टिळक चौक आणि लक्ष्मी रोडने त्या आपल्या ठरलेल्या ठिकाणी, निवडुंग्या विठ्ठल मंदिरात तुकारामांची पालखी तर पालखी विठोबा मंदिरात ज्ञानेश्वरांची पालखी विसाव्याला थांबतात. पुण्यामध्ये दोन दिवस पालखीचा मुक्काम असतो, या वारीत अनेक दिंड्या सामील होतात. मग सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडी शेगाव,वाखरी आणि पंढरपूर, असा पंधर ते सतरा दिवस पायी प्रवास करत करत पालख्या एकदाच्या चंद्रभागेच्या तीरावरील पंढरीला पोहोचतात.

या वारीतला रिंगण सोहोळा एक अनुभवण्याचा, आनंद देणारा, उर्जा देणारा असा ऐतिहासिक सोहोळा असतो. एकूण ३ ते ४ गोल रिंगण होतात तर ३ उभे रिंगण होतात. चांदोबाचा लिंब वाखरी, इसबावी या ठिकाणी उभे रिंगण होते. तर गोल रिंगण पुरंदवडे, खुडूस फाटा,भंडी शेगाव, बाजीराव विहीर इथे रिंगण सोहोळा होते. शेतकरी लोक आपल्या मेंढ्या घेऊन येतात तेंव्हा त्यांचे पालखीभोवती रिंगण होते. अश्वांची दौड असते. उडीचे खेळ होतात.वाखरी येथे शेवटचे रिंगण होते.       

आषाढ दशमीला संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात. इथे पोहोचल्यावर वारकर्यांचा आनंद गगनात मावत नाही. “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल....” च्या गजराने मंदिराचा परिसर दणाणतो. विठुरायाच्या दर्शनाने पंधरा दिवस पायी चालल्याचे कष्ट सगळे भक्त विसरतात, एक अध्यात्मिक अनुभूती त्यांना मिळते. संपूर्ण पंढरपूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघते. मंदिर परिसर भक्तीच्या उत्साहाने भारला जातो. मंदिर भक्तांनी फुलून गेलेलं असते.





यंदा पावसाने सुरुवातीला वाट पाहायला लावून, चिंता करायला लावून, एकदम जो कोसळला तो नद्या, नाले मुसळधार पावसाने दुथडी भरून वाहिल्या, इंद्रायणीला पूर आला. आळंदी जलमय झाली. मावळ मध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळला, जनजीवन विस्कळीत तर झालेच पण, शेवटी देहू आळंदीला येणाऱ्या वारकर्यांना सुरक्षेसाठी पुण्यातच थांबण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने वारकरी पुण्यात आधीच मुक्कामी पोहोचले होते.

दरवर्षी पेरण्या करून मराठवाड्यातील वारकरी भक्त वारीत सामील होत असतात. यंदा काही ठिकाणी पाऊस पडला नाही तर ते तसेच पेरण्या न करता सामील झाले आहेत. विठ्ठलाच्या भरवशावर. पावसाची आणि पुढील वर्षाची शेताची जबाबदारी पांडुरंगाच्या शिरावर टाकून भक्त या भक्तीच्या पदयात्रेत सामील होतात.

वारीचा इतिहास बघितला तर लक्षात येते कि, वारी म्हणजे तीर्थयात्रेची नियमित प्रथा. म्हणजे पवित्र स्थळी दर वर्षी जाणे येणे. भागवत धर्माचा प्रसार तेराव्या शतकात सुरु झाला तेंव्हाच वारीची परंपरा पण सुरु झाली. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी आणि संत तुकारामाच्या घराण्याने ही पायी वारी परंपरा जोपासली. ही परंपरा ७०० ते ८०० वर्षांची आहे. अजूनही ही परंपरा तेव्हढ्याच उत्साहाने आणि श्रद्धेने साजरी करतात. पंढरपूर आणि वारी हे भक्तीचे अविभाज्य प्रतिक आहे. वारी हा श्रद्धेचा उत्सव असतो. सामुदायीक पदयात्रा असते,


ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पादुका पालखीतून नेण्याची परंपरा तुकाराम महाराजांचे सुपुत्र जगद्गुरू नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये सुरु केली असे म्हणतात. एकत्र निघणार्या या पालख्या १८३२ पासून वेगवेगळ्या स्वतंत्र मार्गाने जाऊ लागल्या.

वारकरी आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला वर्षातून एकदा जातात.अशा चार तीर्थयात्रा निघतात. चैत्र वारी, कार्तिक वारी, आषाढी वारी, माघी यात्रा. वर्षातील सर्वात मोठी तीर्थयात्रा म्हणजे आषाढी एकादशीची यात्रा, यालाच देवशयनी एकादशी म्हणतात. याच दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरु होते असे म्हणतात. व चातुर्मास सुरु होतो.

वारीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात जात धर्म भाषा आणि श्रीमंत गरीब असा भेदभाव नसतो. सगळे एकाच पातळीवर, एकाच उद्देशाने विठ्ठलाच्या दर्शनाच्या हेतूने च एकत्र प्रवास करतात. वारीत सामील असलेला भक्त वारकरी शिस्तीचे पालन करतो. वेळेचे पालन करतात. सेवाभाव हा मुख्य गाभा असतो. प्रवासात अन्नदान पाणी दान आणि वारकर्यांची सेवा करणे याला खूप महत्व आहे. ही परंपरा समजून सर्व जण ते फॉलो करतात. यात दिंड्यांचे निरीक्षण केले तर खूप गोष्टी बघायला मिळतात. वारीच्या मार्गावर रस्त्यारस्त्यात वारकर्यांची व्यवस्था केलेली असते. तिथे पायी चालून दमलेल्या भक्तांना पायाला तेल चोळून देणे मसाज करणे, बरे नसेल तर औषध पाणी विचारणे, काहीही मदतीची गरज भासली तर ती त्याच्या पर्यंत पोहोचविणे, मुक्कामाच्या ठिकाणी त्यांच्या साठी सोयी सुविधांचा लाभ उपलब्ध करून देणे.


 या बाहेर गावाहून आलेल्या दिंड्या जिथे मुक्काम करतात तिथले दृश्य तर बघण्यासारखे असते. वारीतलेच लोक छोटी छोटी दुकाने थाटतात. इस्त्रीची सोय असते, दाढी कटिंग साठी दुकान अर्थात हे सलून म्हणजे फक्त खुर्ची टाकलेली किंवा खाली काही अंथरून त्यावर बसायची सोय केलेली. चहा कॉफीचे दुकान- हे बरोबर ट्रकमधून आणलेले छोटेसे टेबल मांडून केलेलं अमृतपेयाचे दुकान, पाण्याची व्यवस्था असते.ट्रक मध्ये तर, परिसरातील रहिवासी वारकर्यांची सेवा, त्यांना झोपायला जागा देऊन, सकाळचा नाश्ता देऊन आणि दोन्ही वेळचे जेवण देऊन सेवा करतात.



गल्ल्या गल्ल्यातून वारकऱ्यासाठी जेवणाच्या पंगती बसतात. शिवाजीनगर मधील आमच्या इमारती मधे आळंदीकर शहा पालखी मुक्काम काळात सर्व वारकर्यांना सकाळी गरम गरम पोहे आणि चहा यांची सोय करतात. या माउलींची सेवा घडावी म्हणून त्यांच्या मदतीला सर्व रहिवासी स्वखुशीने हजर राहतात. हे गेली अनेक वर्षे आम्ही पाहत आहोत. उजवीकडे गल्लीत नांदेड चि दिंडी थांबली होती. अत्यंत सुनियोजित वेळापत्रक असते त्यांचे. दिंडी प्रमुख स्पीकरवर सर्व सूचना देत होते. सकाळी अकरालाच जेवायला बसलेल्या वारकऱ्यांना, “पानात काहीही टाकू नका, जेव्हढे हवे तेव्हडेच घ्या, जेवणानंतर सुंदरकांड आहे. त्यानंतर भजन, हरीपाठ, कीर्तन असे एकापाठोपाठ नामस्मरणाचे कार्यक्रम जाहीर केले. संध्याकाळीच लवकर जेवणे करून लवकर झोपून उद्या पहाटे ३ लाच उठून आवरून तयार व्हायचे आहे आणि पहाटे ४ ला पुण्याहून पुढे मार्गस्थ व्हायचे आहे.” आणि खरच २,३ दिवस मुक्कामी असलेल्या विठुरायाच्या भक्तांचा हा वैष्णवांचा मेळा पहाटेच उठून पंढरीकडे रवाना झाला.आज दोन्ही पालख्या ज्ञानेश्वर माउलींची सासवड मार्गे लोणंद -फलटणकडे आणि तुकोबारायांची पालखी बारामती सणसर कडे निघाली आहे.


                                   
                                           चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥१॥

डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥

संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥२॥

तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥३॥

जन्म नाहीं रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥४॥

                                        - संत तुकाराम

                                                        जय जय रामकृष्ण हरी !

                                           (सर्व फोटो मायाजाल वरून साभार परत)

       - डॉ.नयना कासखेडीकर,पुणे.

                        ------------------------------------------------                 

Thursday, 16 April 2026

महिलांची कृषीक्षेत्रातील भूमिका- अपेक्षा आणि वास्तव

 

                   महिलांची कृषीक्षेत्रातील भूमिका- अपेक्षा आणि वास्तव

      स्त्री, कृषी आणि राष्ट्र यांचा संबंध म्हणजे डोळ्यासमोर येतो तो स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवताना, परकीय राजवटीत उध्वस्त झालेल्या पुण्याच्या भूमीवर राजमाता जिजाऊनी सोन्याचा नांगर फिरवला तो इतिहासातला प्रसंग. स्वराज्य मिळवून ते सुराज्य होण्यासाठीची सुरुवातच जमिनीशी नाते सांगणारी होती.

स्त्रिया आणि शेती यांचा संबंध तसा प्राचीन काळापासूनच आहे.पण अलीकडल्या शतकात आपल्या परिचयाचे नाव असणारी, जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी आणखी एक अस्सल शेतकरी जी कष्टाचेच जीवन जगली, अनुभवाचेच बोल बोलली अशी कवयित्री बहिणाबाई चौधरी. तिचे सर्व आयुष्य शेतीशी निगडीत होते. ती निसर्गाला देव मानत होती. बी पेरलं कि कोंब येतो, मले त्यात देव दिसतोअसं शेतीशी तिचं नातं होतं. असं नातं असणाऱ्या स्त्रीचं मन शेती प्रक्रियेत किती गुंतलेले आहे हे लक्षात येते. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.


भारतातील शेती मुख्यता महिला कामगारांवर अवलंबून आहे.तर ७० % भारतीय कुटुंबांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. लोकसंख्येच्या पन्नास टक्के महिला या लोकशाहीमध्ये महत्वाच्या आहेत. समाजकारण, राजकारण, शिक्षण, मिडिया, उद्योग, असे संघटीत व असंघटीत अशा सगळ्या क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. त्याच प्रमाणे कृषिप्रधान असलेल्या भारतात तर कृषी क्षेत्रांत हा सहभाग जास्त आहे. हे क्षेत्र पारंपारिक असल्याने अनेक शतकांपासून या क्षेत्रांत स्त्रिया काम करत आहेत. त्यांचे योगदान मोठे आहे. घरकाम, मातृत्व, मुलांचे पालन-पोषण, कौटुंबिक जबाबदारी याबरोबरच त्या शेतीची कामे करतात. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या ६० ते ७०% स्त्रिया निरक्षर आहेत. त्यामुळे शेतीविषयक काही माहिती अधिकचे कौशल्ये यापासून त्या वंचित राहतात.




  
  भारतातील कृषीक्षेत्रात कामगार महिलांची संख्या जास्त आहे पण विनावेतन कामाचे महिलांचे प्रमाण जास्त आहे. बिहार, उत्तर प्रदेश मध्ये ८० टक्के महिला कामगार प्रमाण आहे परंतु निम्म्याहून अधिक महिलांना पगार मिळत नाही. प्रत्यक्ष शेती, पेरणी, पुनर्लागवड त्यापूर्वी शेतातील कचरा वेचणे, तण काढणे, शेतीची स्वच्छता, कापणी, निंदणी, खते देणे, औषध फवारणी, सिंचन, तोडणी, उपणनी, खणणी आलेले उत्पादन साफ करणे, उन्हात वाळवणे व त्याची साठवण करणे, अशी सर्व कामे स्त्रीचीच. फुलशेती, फळे, भाजीपाला असेल तर तोडणी व सुरक्षित ठेवणे हे ही त्यांचीच जबाबदारी असते. तसेच त्याला पूरक असणारे उद्योग आणि पशुपालन , त्यांच्या चार पाण्याचे बघणे, मधमाशीपालन, मत्स्यपालन, कुकुट पालन, दुग्ध व्यवसाय, अळीम्बी लागवड, उसतोड कामगार, मासेमारी करणाऱ्या, वनउपज गोळा करणाऱ्या, सेंद्रिय शेती करणाऱ्या या शेतीशी निगडीत व्यवसायात महिलांचे योगदान जास्त आहे. खूप कष्ट आहेत. ही सर्व कामे गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असल्याने तसेच ती हातानेच करायची असल्याने ती स्त्रियांच्याच वाट्याला येतात.




शेतकरी महिला नुसतीच शेतकरी स्त्री नाही तर ती शिक्षिका असते, स्त्री विविध भूमिका आणि जबाबदार्या संभाळताना तिचा माती,पाणी, वृक्ष जंगल अशा निसर्गाशी जोडलेली असते . तिची काही निरीक्षणे आणि अनुभव शेती व पर्यावरण यांचे संवर्धन आणि संरक्षण यासाठी कमी येतात. त्या अशा जबाबदार्या चांगल्या पार पाडतात. शेतकरी महिला कारागीर असते, उद्योजक असते. मार्गदर्शक असते. अशा अनेक पातळीवर तिची क्षमता असते, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून एक शेतकरी स्त्री शेतीत सुद्धा जबाबदारीने कामे करत आहे, नव्या बदलांना सामोरे जात आहे. या सर्व गुणांमुळे स्त्रिया शेती व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन करू शकतात.वेळ कष्ट, अर्थ आणि बी बियाणे यांचा योग्य वापर त्या करतात.कोविड-१९ या संकटात अनेक अन्न पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या. अन्नौत्पादन व अन्न सुरक्षा प्रश्न निर्माण झाले ,गंभीर झाले,पण स्थानिक पातळीवर महिलांनी हे काम मोठ्या कष्टाने यशस्वीपणे केले, तेंव्हा शेतकरी स्त्रिया नुसत्या कामगार नाहीत तर त्या अन्नव्यवस्थेचा कणा आहेत हे सिद्ध झाले.





  
      २०११ च्या जनगणनेनुसार जवळ जवळ ५५% महिला शेतीची कामे करतात. २०१७ / १८ च्या आकडेवारीनुसार ७०% पेक्षा जास्त महिला कामगार शेतीच्या कामात सहभागी आहेत. गेल्या दशकात महिला कृषी कामगारांची संख्या वाढली आहे. शेतीसंबंधित सार्वजनिक किंवा धोरणात्मक व्यवहार असेल तर पुरूषच पुढे असतात. कारण शेतीचा मालकीहक्क स्त्रीला नाही. बहुतेक वारसा हक्कानेच जमिनीची मालकी मिळत असते. त्यामुळे काही योजना व फायदे केवळ जमीन मालकीच्या निकषामुळे स्त्रियांना मिळत नाहीत असे अनुभवास आले आहे. कारण शेतीवर/जमिनीवर फक्त शेतकर्याचे/पुरुषांचे नाव लागले असते त्यांच्या स्त्रियांचे /बायकांचे नाही. पितृसत्ताक पद्धत. त्यामुळे महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळत नाही. यासाठी ग्रामपंचायतीने महिलांना शेतकरी म्हणून ओळख पत्र द्यावे आणि त्या आधारे विविध योजना आणि सुविधांचा लाभ त्यांना मिळावा अशी मागणी महिला शेतकरी करत आहेत. कायद्यात तशी तरतूद आहे पण अंमलबजावणी होत नाही. भारतात च नव्हे तर जगभरात हीच परिस्थिती असल्याचे दिसते. जमीन मालकी, भाडेपट्टा हक्क व वारसा कायदे अशा धोरणांचा फायदा स्त्रियांना होत नाही.

 

 शासनाच्या ,महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘नमो ड्रोन दीदी’ योजना, लखपती दीदी ,महिला किसान सक्षमीकरण परोयोजना अशा योजना व अनुदानाच्या योजना आहेत.यामुळे आर्थिक मदत, शाश्वत शेती प्रशिक्षण, उपजीविकेसाठी तांत्रिक प्रशिक्षण, सुविधा उपलब्ध होऊन महिला शेतकऱ्यांना लाभ मिळून,त्यांच्या सहभागाने राष्ट्रीय स्तरावर कृषी क्षेत्राचे चित्र बदलेल.

फक्त १३ ते १४ % महिलांकडेच जमीन नावावर आहे. त्यामुळे शेतातील महिलांच्या कामाचे अहवाल कमीच असतात. आणि त्याचा परिणाम म्हणून जनगणना आकडेवारीत महिला शेतकऱ्यांची संख्या कमीच नोंदली जाते. त्यामुळे कर्ज मिळणे, स्वतंत्र निर्णय घेणे, आणि सरकारी योजनांचा लाभ मिळणे यावर मर्यादा येतात. अशी कागद पत्रे महिलांकडे नसल्याने त्यांना पिक विमा संरक्षणाचा लाभ पण मिळत नाही. वास्तविक घरातले शेतकरी पुरुष कामानिमित्त शहरात स्थलांतर करतात तेंव्हा शेतकरी म्हणून सर्व जबाबदारी महिलांच्या अंगावर पडते. कुटुंबातीलच एक सदस्य समजून तिचे श्रम गृहीत धरले जातात. किंवा शेतीचे काम घरकामाचाच भाग गृहीत धरला जातो. त्यामुळेच त्यांना मोबदला मिळत नाही.


  स्त्रियांमध्ये उपजतच असलेल्या आत्मविश्वास, सहनशीलता, सेवा भाव, त्याग, संयम या गुणांमुळे त्यांना योग्य मार्गदर्शन व शिक्षण आणि संधी मिळाली तर कृषी क्षेत्रांत सुद्धा चांगली कामगिरी करू शकतात. हा विचार शासनाने त्यांच्या शेतकरी महिला धोरण ठरवताना करायला हवा. म्हणजे शेतकरी महिला आत्मनिर्भर होतील, त्यांना समान संधी उपलब्ध करून द्यायला हवी, शेती व्यवस्थापनासाठी नवे तंत्रज्ञान त्यानी अवगत करायला हवे. त्यांचा प्रात्याक्षिके. अभ्यास दौरे, भेटी, गट चर्चा अशा कार्यक्रमात सुद्धा सहभाग वाढवायला हवा .   

अशा अनेक महिलांचा गौरव करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी पद्मश्री सारखे पुरस्कार शासन देत आहे. पद्मश्री पुरस्कार मिळालेली उल्लेखनीय नावे म्हणजे, बिहारची, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणारी -राजकुमारी देवी, झारखंड मधील पर्यावरण संवर्धन करणारी जमुना तुडू, मेघालयातील हळदीची सेंद्रिय शेती करणारी - कमला पुजारी, स्वदेशी बियाण्यांची बँक तयार करणारी महाराष्ट्रातील राहीबाई पोपोरे, हरियानातील पिक पेरणी कापणी ते बाजारात उत्पादन विक्रीपर्यंत सर्व कामे स्वत करणारी अमरजित कौर, या सगळ्यांना पद्मश्री मिळाले आहे. हा गौरव इतर शेतकरी महिलांना प्रेरणा देणारा आहे.अशाच यशोगाथा भारताबाहेर सुद्धा अमेरिका, युरोप, आफ्रिका येथील शेतकरी महिलांच्या आहेत. या देशातील शेतकरी महिलांनी नवनव्या कल्पना राबवून, विज्ञाननिष्ठ शेती करून आणि सामुहिक प्रयत्न याच्या आधारे शेतीचे चित्रच बदलून टाकले आहे. म्हणजे दुष्काळग्रस्त भागात सूक्ष्म सिंचन व कोरडवाहू पिके घेऊन उत्पादन वाढवले आहे. सेंद्रिय शेती करून थेट ग्राहकांना विक्री करून शेतीला उद्योगाचे स्वरूप दिले आहे. हरितगृह व्यवस्थापन, देता आधारित शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात युरोपातील महिला आघाडीवर आहेत.


सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला माल अथवा उत्पादने, भाजीपाला फळे सर्वच आरोग्याला हितकारक आहेत. विषमुक्त आहेत. शिवाय कमी खर्चात उपलब्ध होऊ शकतो.

म्हणूनच शेती व्यवसायात शेती विषयक सर्व उद्योगांमध्ये सुद्धा महिलांचे प्रमाण वाढायला हवे. सहभाग वाढायला हवा. प्रशिक्षित महिला उद्योजक निर्माण व्हायला हवेत. केंद्र सरकारची तसेच मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना जाहीर झाली आहे. त्यात महिलांना प्राधान्य द्यावे. कारण त्यांच्यात कृषी उद्योजक बनण्याची प्रचंड क्षमता आहे. तसेच सध्याच्या काळात ग्राहकांमध्ये आरोग्य विषयक जागरुकता वाढली आहे. त्यामुळे सुरक्षित आणि पौष्टिक वेष्टनबंद पदार्थांची मागणी वाढत आहे. दैनंदिन जीवनात या गोष्टीन्चे महत्व वाढल्याने सूक्ष्म अन्न प्रक्रियेतील रोजगाराच्या संधी सुद्धा वाढल्या आहेत. अन्नप्रक्रिया उद्योग तर स्त्रियांना योग्य संधी, योग्य आर्थिक मदत व तांत्रिक सहाय्य, प्रगत यंत्र सामग्रीचा पुरवठा, योजनांचा लाभ, सहकारी तत्वांचा लाभ, थोडे मार्गदर्शन यांचा व्यवस्थित मेळ घातला तर महिला शेतकरी उत्तम उत्पादनाबरोबर चांगल्या उद्योजक बनतील. देशाच्या अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्राचा १३% वाटा आहे.महिलांचा सहभाग असल्याने अन्नप्रक्रिया उद्योगामुळे पोषणयुक्त ,दर्जेदार चांगला व परवडणारा माल तयार होईल.अन्न प्रक्रियेत गुणवत्ता सुधारणा होईल.भेसळयुक्त अन्नपदार्थापासून संरक्षण मिळेल.सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होईल.  

यांत दुध प्रक्रिया उद्योग( खवा, पेढे, श्रीखंड, पनीर, ताक. लस्सी,दही, तूप ),मसाले प्रक्रिया (सर्व प्रकारचे मसाले व चटण्या), फळे व पालेभाज्या (जाम, जेली आईसक्रिम, सूप, चिप्स,ज्यूस), धान्य आणि तेलघाणा प्रक्रिया (सर्व तेल उत्पादने), पावडर ( धने, जिरे, हळद, मिरची ),पशुखाद्य, मांस आणि पोल्ट्री खाद्य, बेकरी product (केक, ब्रेड, बिस्किटे, टोस्ट, चिवडा) शीत साखळी, रेडी तू इट  व रेडी टू कुक उत्पादने अशा क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. मागील दोन दशकात महिला बचत गट चांगले काम करून दाखवत आहे. अशांचे सामुहिक गट तयार करून, ब्रँडिंग, विपणन, साठवणूक, पॅकेजिंग या प्रक्रियेतील आवश्यक ज्ञान उपलब्ध करून दिले तर त्या नक्की आत्मनिर्भर होतील यात शंका नाही. यातील औपचारिकता पूर्ण करताना येणारे अडथळे सरकारनेच दूर करावेत ,जेणे करून महिलांना लाभ मिळेल. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. ग्रामीण विकासाला चालना मिळेल.  त्यासाठी शेती तंत्रज्ञान व शिक्षणाची जोड प्रशिक्षण, स्वावलंबन व सक्षमीकरण याचे प्रयत्न झाले तर अंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भारताची अर्थव्यवस्था फायद्याची ठरेल.हे नक्कीच शक्य आहे. २०२६ हे वर्ष महिला शेतकऱ्यांचे आन्तर्राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. या वर्षाच्या निमित्ताने खालील गोष्टींचा विचार व अंमलबजावणी व्हावी असे वाटते.     

1.      शेतकरी महिलांना आताच्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान युगांत, डिजिटल युगांत साक्षर व्हावे लागेल. तशी उपाययोजना ,प्रशिक्षण, सोय शासन व सहकारी तत्वावर अमलात आणली गेली पाहिजे. त्यामुळे हवामानाचा अंदाज, यासारखी शेतीसंबंधित माहिती डिजिटल माध्यमातून त्या मिळवू शकतील. 

2.      शासनाच्या कृषी विस्तार सेवांमध्ये असलेले पुरुषांचे वर्चस्व कमी करून महिलांना स्थान द्यायला हवे.

3.      वेगवेगळ्या कृषी केंद्रामार्फत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिल्यास महिलांचा सहभाग वाढेल.

4.      शेती संबधित विशिष्ठ यंत्रे, अवजारे वापरण्याचे प्रशिक्षण महिला शेतकर्यांना द्यावे.

5.      शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी स्त्रीच्या नावावर सातबारा चा उतारा हवा अशी अटच आहे. तरच लाभ घेता येईल. म्हणून शेत जमिनींवर संयुक्त मालकी हक्क व ओळख महिला शेतकर्यांना मिळाली पाहिजे ज्यामुळे त्यांना कृषी कर्ज, सरकारी योजनांचा लाभ आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची संधी मिळेल. त्यासाठी सर्व स्तरावरील विविध शासकीय योजना त्यांना माहिती असणे आवश्यक आहे. हा अवेअरनेस वाढवला पाहिजे. त्यासाठी एकत्र येऊन संवाद व्हायला हवा. यामुळे महिला शेतकरी केवळ मजूर न राहता त्या शेतकरी म्हणून सुद्धा त्यांना प्रतिष्ठा लाभेल. तेच अधिकार मिळतील.  

6.      महिलांनी केलेल्या सेंद्रिय उत्पादन शेती उत्पादने आणि सूक्ष्म अन्न प्रक्रियेतील उत्पादने याच्या निर्यातीला पाठींबा मिळायला हवा. बाजारपेठेत प्रवेशाची हमी मिळायला हवी.

7.      महिला शेतकर्यांना शेतात काम करताना  येणाऱ्या अडचणींना मदत म्हणून व सोयी सुविधा उदा. शेताजवळ स्वच्छ पाणीपुरवठा, पाळणाघर, उर्जा अशा सुविधा उपलब्ध असाव्यात.शिवाय त्यांच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा सुरक्षित असायला हवा .  

8.      कृषी संबधित राष्ट्रीय आर्थिक धोरणात महिलांच्या श्रमाचा व त्या देत असलेल्या वेळेचा विचार व्हावा.

9.      निर्णय प्रक्रियेत महिला शेतकर्यांना स्थान द्यावे .    

10.    पुरुष आणि महिला असा लिंगाधारित वेतन भेदभाव करू नये. त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा.

11.     शेतकरी म्हणून स्त्रियांना सुद्धा विमा हवा.

 

ले. डॉ नयना कासखेडीकर, पुणे. 

---------------------------------