Monday, 9 February 2026

जम्मू काश्मीर संस्कृती

                            

                                             जम्मू काश्मीर संस्कृती


चहूबाजूनी बर्फाच्छादीत हिमालय पर्वताच्या कुशीत वसलेले, हिरवीगार जंगले, गवतांची कुरणे, चारही दिशांना नयनरम्य देवदार वृक्षराजी, शुद्ध पाणी, आल्हाददायक हवामान , स्वच्छ व नितळ अशा क्रिस्टल क्लिअर बारमाही वाहणाऱ्या नद्या, आरू घाटी आणि शेषनाग नदीच्या संगमावर वसलेले, श्रीनगर पासून केवळ ९२ किलोमिटर अंतरावरील पहलगाम , श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, युसमर्ग असलेले सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले भारतातील पाचवे राज्य ,भारताचा मुकुट आणि भारताचे नंदनवन म्हणजे जम्मू काश्मीर.

जगातल्या सर्व देशांपेक्षा भारतात सर्वात जास्त सण उत्सव साजरे होतात. प्रत्येक उत्सव धामधुमीत साजरा होतो. प्रत्येक धर्माचे आपले आपले उत्सव असतात. तसेच प्रत्येक भागाचे, त्या त्या राज्याप्रमाणे उत्सव असतात. अशा उत्सव आणि सण यामुळेच भारत देश आपले पवित्र असे सांस्कृतिक रूप आजही जपून आहे. म्हणूनच भारतीय संस्कृती टिकून आहे.


आमच्या संस्कृतीत पंचमहाभूते आकाश,पृथ्वी, आप, तेज, वायू यांना प्राचीन काळापासून महत्व आहे. म्हणून आपण निसर्ग पूजक आहोत. काश्मीर म्हणजे तर निसर्गाच्या सौन्द ऱ्याने ओतप्रेत भरलेला प्रदेश. जम्मू काश्मीर ,सुंदर बाग- बगीचे, महाल, किल्ले आणि धार्मिक स्थळां साठी प्रसिद्ध आहेच , त्याच बरोबर प्रसिद्ध आहे ते कटरा च्या माता वैष्णोदेवी तीर्थ स्थळासाठी. तसे पहिले तर हिंदूंची भूमीच पण हिंदुस्थान पेक्षा विशेष दर्जा दिल्याने त्यांचा ध्वज वेगळा. संविधान वेगळे, प्रशासकीय अधिकार वेगळे असे स्वरूप एके काळी होते. जम्मू मध्ये हिंदू धर्मिय जास्त तर काश्मीर मध्ये मुस्लिम संख्येने जास्त.

इथला इतिहास बघता, अशोकाने इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात काश्मीरमध्ये बौद्ध धर्माची ओळख करून दिली . इथे हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचे मिश्रण होते. या भागात मुघल आणि इतर शासक व राजांनी राज्य केले. त्यातल्या मुघल सम्राट अकबराचे हे अत्यंत आवडते ठिकाण. ब्रिटिश काळात पण युरोपीय पर्यटकांना हे ठिकाण आकर्षित करत होते. हिंदू पौराणिक संदर्भा नुसार संत आणि ऋषीमुनींचे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचे हे महत्वाचे ठिकाण कश्यप ऋषींशी जोडलेले आहे. तेराव्या व चौदाव्या शतकामधे काश्मीर मध्ये इस्लाम चा प्रवेश झाला. काश्मीरच्या खोर्यावर पठाणांनी ६७ वर्षे राज्य केले. सोळाव्या शतकात अकबराने काश्मीर ताब्यात घेतला, अठराव्या शतकात अब्दालीने काश्मीर घेतला. पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत काश्मीर प्रदेश डोगरा शासकांकडे होता. अठराव्या शतकात डोगरा लोकांकडे राज्य होते. त्यापैकी शेवटचे म्हणजे १९४७ पर्यंतचे डोगरा शासक महाराजा हरी सिंह होत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे ठिकाण सर्वात आवडीचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले. पहलगाम ची बैसरन व्हॅली हे काश्मीरचे स्वित्झर्लंड म्हणून ओळखतात आणि अमरनाथ यात्रेचे प्रवेशद्वार म्हणून सुद्धा .



ज्यांनी ज्यांनी इथे राज्य केले त्यांच्या संस्कृतिचा प्रभाव इथल्या लोकांवर दिसतो. त्यांच्या जीवनशैलीवर या मिश्र संस्कृतीचा प्रभाव दिसणे साहजिक आहे. त्याच प्रमाणे त्यांचे सण वार, उत्सव, काही परंपरा, रूढी, शेती प्रक्रिया ,पशु पक्षी, प्राणी, कुटुंब, निसर्ग, अध्यात्म, खाद्य संस्कृती. आरोग्य, समाज व्यवस्था या सगळ्यांवर भारतीय मूल्यांची मोहोर आहे. जम्मू काश्मीरच्या या परंपरेची ओळख करून घेऊ. कृतज्ञता हा आमचा स्थायी भाव. तेंव्हा हेच आमच्या संस्कृतीत प्रतिबिंबित होतं.

सिंधु दर्शन महोत्सव - या राज्याचा बराचसा भाग हिमालयाच्या पर्वत रांगांनी व्यापलेला आहे. या राज्यातून बऱ्याच नद्या वाहतात. सिंधु, झेलम, सतलज, चिनाब, रावी या मुख्य नद्या इथे आहेत. जून मध्ये सिंधु नदीचा सन्मान करणार हा एक उत्सव असतो. सिंधु नदी, सिंधु चे खोरे आमच्या पाच हजार वर्ष पूर्वीच्या प्राचीन संस्कृतीची आठवण करून देते. वेद, पुराणे महाभारत रामायण अशा अनेक ग्रंथात सिंधु नदीचे वर्णन आहे. लेह लडाख मध्ये सिंधु नदीच्या काठावर दरवर्षी म्हणजे प्रत्येक गुरुपौर्णिमेला तीन दिवस सिंधु दर्शन महोत्सव आयोजित केला जातो. याची सुरुवात १९९७ मध्ये झाली. सांप्रदायिक एकतेचे प्रतीक म्हणून सिंधु नदी उत्सवाकडे पहिले जाते. भारतीय सिंधु नदीचे महत्व कळावे म्हणून हा महोत्सव सुरू झाला आहे. दरवर्षी देशाच्या विविध भागातून या महोत्सवाला लोक येतात. महोत्सवात येताना विविध राज्यातले लोक आपल्या राज्यातल्या नदीचे पाणी मातीच्या भांड्यात बरोबर घेऊन येतात व ते पाणी सिंधु नदीच्या पाण्यात विसर्जित करतात. याशिवाय विदेशी पर्यटक सुद्धा येतात.


सिंधु नदीच्या काठावर ‘शे’ इथे पर्यटकांसाठी एक स्वागत समारंभ आयोजित केला जातो. राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी लडाख बौद्ध संघटना, हिंदू ट्रस्ट, सुन्नी व शिया लोक, शीख गुरुद्वारा प्रबंधक समिति व ख्रिश्चन मोरवीयन चर्च यांची एक संयुक्त कमिटी हे आयोजन करतात. नदीच्या काठावर पन्नास ज्येष्ठ लामा धार्मिक प्रार्थना करतात. शिवाय विविध राज्यातील कलाकार सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका च सादर करतात. धनुर्विद्या आणि पोलो खेळाच्या स्पर्धा या निमित्ताने घेतल्या जातात.


ज्या नदीच्या तटावर आमची वैदिक संस्कृति पल्लवित झाली, या नदीवर अनेक ऋषीमुनींनी तपस्या केली. याच नदी काठावर अनेक वेद, पुराणांची रचना झाली. ज्या नदीमुळे आम्हाला आमची सांस्कृतिक ओळख मिळाली, आमच्या देशाला नाव मिळालं, हजारो वर्षांपूर्वी ही नदी आमचे श्रद्धा केंद्र होते, नदीचे सूक्त म्हणून रोज आम्ही या नदीला अर्घ्य वाहत होतो. प्रणाम करत होतो, तिचे स्तवन करत होतो. ती सिंधु नदी फाळणी नंतर पाकिस्तानातून वाहते असे वाटून दुर्लक्ष केले पण जेंव्हा गृहमंत्री असलेले लालकृष्ण आडवाणी १९९६ मध्ये निवडणूक प्रचारासाठी लेह ला आले तेंव्हा सिंधु नदीच्या काठावर चोगलमसर मध्ये रेस्ट होऊस मध्ये उतरले आणि रेस्ट होऊस च्या बाजूने वाहणारी नदी सिंधु नदी आहे हे त्यांना जेंव्हा कळले तेंव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तेंव्हा पासून सिंधु नदीसाठी सिंधु दर्शन महोत्सव विचार सुरू झाला. काश्मीरमधल्या आतंकवादालाही बगल देऊन सर्व लोकानी याचे स्वागत केले. आता तो प्रत्यक्षात उतरला. लेह सारख्या दुर्गम भागात सुद्धा सिंधु नदीच्या दर्शनासाठी व स्पर्शासाठी आसुसलेले लोक लेहला पोहोचतात. यात हिंदू, बौद्ध, शीख, मुस्लिम सगळे सामील असतात. २०२१ मध्ये पहिला सिंधु महाकुंभ पण इथे संपन्न झाला. अशा प्राचीन आणि अमूल्य अशा गौरवशाली सिंधु नदीचा सन्मान करण्याचा हा महोत्सव आहे.

शिकारा महोत्सव- काश्मीर मध्ये ‘दाल लेक’ सगळ्यानाच परिचित व लोकप्रिय ठिकाण आहे. शिकारा हे त्यांची जीवनरेखा समजली जाते. शिकारा ही एक लाकडा पासून बनवलेली हाऊस बोट आहे. काश्मीर मधल्या दाल लेक मधील दळणवळण पर्यटन आणि मासे पकडण्यासाठी प्रसिद्ध व उपयोगी असणारी ही बोट तिथल्या लोकांचे जीवन जगण्यासाठीचे एक महत्वाचे साधन आहे. यात्रेकरू किंवा पर्यटकांना एका ठिकाण हून दुसऱ्या ठिकाणी नेणारे हे महत्वाचे प्रवासी साधन. शिकारा देवदार च्या लाकडा पासून तयार करतात.असेच शिकारा केरळ मध्ये पण असतात. काश्मीर सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शिकारा महोत्सव २०१६ मध्ये सुरू केला. स्पर्धेत भाग घेतलेले , रंगीबेरंगी रंगात सजवले व रंगवले गेलेले,एका रांगेत दाल लेक मध्ये उभे असलेले शिकारे, या महोत्सवात आपल्याला आकर्षित करतात. यावेळी शिकारा रेस, ड्रगन बोट रेस, कैनो पोलो मॅच अशा स्पर्धा होतात. जुलै किंवा ऑगस्ट मध्ये होणाऱ्या या महोत्सवात काश्मीर च्या संस्कृतीचे दर्शन होते.






केसर महोत्सव- खाद्य पदार्थाला रंग चव आणि गंध आणणारा सर्वात महाग असा मसाल्याचा पदार्थ आहे. महाग यासाठी की जवळ जवळ चाळीस हजार फुलांपासून अर्धा किलोग्राम केशर मिळते असे म्हणतात. सर्वात उच्च दर्जाचे केसर भारतात फक्त जम्मू काश्मीर मध्येच पिकते. काश्मीर मध्ये केसर महोत्सव हा अनोखा महोत्सव ऑक्टोबर नोंहेंबर मध्ये साजरा होतो. केसर च्या कापणी वेळी हा उत्सव असतो. या हंगामात हे शहर ‘केशर शहर’ म्हणून ओळखले जाते. या उत्सवाची परंपरा मुघल काळापूर्वी पासूनच सुरू झालेली आहे. या उत्सवाच्या काळात काश्मीर मध्ये आलेले पर्यटक केशरच्या शेतात कापणीत भाग घेऊ शकतात. केशर हा जगातील सर्वात महागडा मसाला, भारतीय राजेशाही जेवणातला एक प्रमुख पदार्थ मनाला जातो. काश्मीरच्या सुंदर दऱ्या खोऱ्यामद्धे केशरची लागवड केली जाते. लाल सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशरची शेती इथे शतकानुशतके केली जाते. श्रीनगर मधील पंपोर (केसर शहर) आणि बडगाम मधील करेवा येथे केशरा ची शेती आहे. या भागातील हजारो कुटुंबाचा हा व्यवसाय आहे. हा केशर महोत्सव म्हणजे केशर उत्पादकांना केशरची बाजारपेठ मिळवून देणे हा सुद्धा उद्देश असतो. या महोत्सवात केशर संबंधी फिल्म शो आयोजित केलं जातो. सांस्कृतिक कार्यक्रम असतात, केशरचे विविध पदार्थ उपलब्ध असतात. या उत्सवात केशर तोडण्या बरोबरच ,पारंपरिक लोकसंगीत, लोकनृत्य सादर केली जातात आणि त्यानंतर प्रमुख गोष्ट म्हणजे केशर कहवा (चहा) पिण्याचा समारंभ असतो.



केशर म्हणजे फुलतील पुंकेसर असतात. हे हाताने तोडून ,फुलातून वेगळे काढून वाळवतात. केशर म्हणजे काश्मीर च्या सांस्कृतिक समृद्ध वारशाचे प्रतीक आहे. या काळात केशरच्या फुललेल्या बागा आणि आसमंतातील केशरचा सुगंधी दरवळ आपल्याला आकर्षित करतो. केशरचा चहा म्हणजे कहवा आणि जाफरानी पुलाव हे प्रसिद्ध काश्मिरी पदार्थ सर्वांना आवडतात. शिवाय तो आयुर्वेदिक औषधी पदार्थ आहे.

गुरेज महोत्सव – श्रीनगरच्या जवळ असणारी हिमालयातील शांत गुरेज घाटी, प्राचीन सिल्क रूटवर आहे. या घाटातून नीलम नदी वाहते. रिव्हर राफ्टिंग साठी अत्यंत योग्य स्थान असलेल्या या घाटातील लोक गुरेज वार्षिक महोत्सव साजरा करतात. रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, जोरबिंग,सायकलिंग अशा गोष्टींचा आनंद घेतात. पेंटिंग ड्रॉईंग च्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. काश्मिरी संस्कृतीचे प्रदर्शन करणारे संगीताचे कार्यक्रम यावेळी सादर होतात. गुरेज खोऱ्यातील लोक त्यांची संस्कृति परंपरा ,हस्त कौशल्ये, खाद्य संस्कृति याचे प्रदर्शन या उत्सवात करतात.

                          

                            

टयूलिप महोत्सव – काश्मीर मधला, वसंत ऋतुतला, निसर्गाच्या सौंदर्याचा नेत्रदीपक असा हा एक लोकप्रिय महोत्सव. काश्मीर मध्ये संपूर्ण परिसरात शेकडो टुलिप गार्डन आहेत. वसंतात हे टुलिप छान बहरलेले असतात. या उद्यानामध्ये साठ ते सत्तर प्रकारचे टयूलिप प्रजाती असतात. आशिया खंडातील सर्वात मोठे टुलिप गार्डन इंदिरा गांधी मेमोरियल टयूलिप गार्डन असलेल्या काश्मीर मध्ये याचा उत्सव नसेल तरच नवल. जवळ जवळ ३० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र व्यापलेल्या, मंत्रमुग्ध करणारा टयूलीप गार्डन चा देखावा फार मनमोहक असतो. श्रीनगर ला विशेषता हा महोत्सव मार्च एप्रिल मध्ये आयोजित करतात. यात हस्त शिल्प, निरनिराळ्या लज्जतदार खाद्य पदार्थाची मेजवानी, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असा भरगच्च कार्यक्रम असतो. स्थानिक कारागीर आणि विक्रेत्याना त्यांच्या हस्तकला आणि उत्पादनाचे प्रदर्शन करण्यास व बाजारपेठ उपलब्ध करण्यास याचा उपयोग होतो. देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत इथल्या फुलांना प्रचंड मागणी असते. त्यामुळे इथे विविध शोभेच्या आणि औषधी वनस्पतींच्या रोपांचे उत्पादन घेतले जाते.





बादामवारी वसंत पुष्पोत्सव’ हा महोत्सव वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव असतो.

हेमीस महोत्सव- लडाख मध्ये हेमीस गोम्पा काश्मीरचा सर्वात मोठा मठ आहे. पद्मसंभव जयंती च्या निमित्ताने हा उत्सव साजरा केला जातो. पद्मसंभव तिबेट मधील बौद्ध धर्माचे संस्थापक होते. या गोम्पा मठाच्या प्रांगणात दोन दिवस हा उत्सव साजरा होतो. या उत्सवात लोक पारंपरिक पोशाख, आभूषणे, टोप्या व मुखवटे घालून ‘चाम’ हे पारंपरिक नृत्य करतात. लडाख मधील बौद्ध धर्माची, संस्कृतिची ओळख होते.


                                

बाहू मेला – जम्मू मध्ये समृद्ध वारसा असलेला प्राचीन बाहू किल्ला आहे.त्या किल्ल्यात महाकाली देवीचे मंदिर आहे. ती बावे वाली माता म्हणून ही ओळखली जाते. नवरात्रात या देवीच्या मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी असते. बाहू किल्ला मेला भरतो, त्यात सूर्योदय होत असतानाचा जप. त्यावेळचा धूप दीप चा हवेत भरलेला सुगंध, भजन व मातेचा मंत्र जागर, प्रार्थना यामुळे वातावरण पवित्र होते. महाकालीचा आशीर्वाद घेण्यासाठी दर्शन करण्यासाठी भक्तांची भली मोठी रांग लागलेली असते. ही देवी या क्षेत्रातील सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहे. प्राचीन कथेनुसार तीन हजार वर्षांपूर्वी प्रसिद्ध राज्य बाहुलोचन ने हा किल्ला आणि हे मंदिर बांधले आहे.


वैष्णव देवी - जम्मूला मंदिरांचे शहर सुद्धा म्हणतात. वैष्णव देवी हे तीर्थ स्थान जम्मूचेच. म्हणजे त्रिकुटा भगवती (काली सरस्वती आणि लक्ष्मी) चे पवित्र गुफा मंदिर आहे. वर्षभर याची यात्रा सुरू असतेच, पण नवरात्रात इथे विशेष महोत्सव असतो.


खीर भवानी महोत्सव – काश्मीर मधला हिंदूंचा सर्वात महत्वाचा उत्सव आहे. तुलमुल्ला गावात ही भवानी देवी खीर भवानी म्हणून (पारंपरिक प्रसादाची तांदळाची खीर यावरून )ओळखली जाते.


असाच एक हिंदू उत्सव शिवखोरी उत्सव पण महाशिवरात्रीला साजरा होतो. उधमपुर जिल्ह्यातल्या रानसू गावातील टेकडीवर गुहेमद्धे शिवाचे मंदिर आहे, तर आठव्या नवव्या शतकात बांधलेले उधमपुर जिल्ह्यातील क्रिमची गावात सात प्राचीन हिंदू मंदिरांचा समूह आहे. पांडव वनवासाच्या काळात इथे राहिले होते म्हणून ही मंदिरे पांडव मंदिर म्हणून पण ओळखले जाते. ही मंदिरे शिव, पार्वती, गणेश, विष्णु यांची आहेत. प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमूना आहे.

रघुनाथ मंदिर दक्षिण जम्मूला आहे. हे प्रभू श्रीरामांचे मंदिर राजा गुलाब सिंह यांनी बांधले असे म्हणतात. जम्मू काश्मीरचे सौन्दर्य नुसते निसर्ग सौन्दर्यच नाही तर हिंदू धर्माच्या वारसा असलेल्या प्राचीन धार्मिक गोष्टी सुद्धा हिंदू धर्माचा पुरावा इथे आपल्याला देत असतात. रघुनाथ मंदिरात रामनवमीचा उत्सव जोरदार साजरा होतो. हे मंदिर सुद्धा दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटले नाही.

बैसाखी – १३ अप्रिल ला साजरा होणार शिखांचा एक मुख्य सण काश्मीर मध्ये साजरा केला जातो. शिखांचा नववर्षाभिनंदनाचा हा सण शेतातील कापणी वर आधारित आनंदाच्या पर्वाची सुरुवात असते. हा निसर्गावर म्हणजे शेतीवर आधारित कृषि उत्सव आहे. रब्बीची पिके हातात आल्याने आपल्या कष्टाचे चीज झाले याचे समाधान आणि ईश्वराचे आभार व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. पंजाब मध्ये विशेषता गव्हाचे उत्पादन होते. गहू म्हणजे पंजाबतील शेतकऱ्यांचे सोने असते, शेतात तयार झालेले गव्हाचे पीक सोन्याइतकेच महत्वाचे असते. बैसाखीच्या दिवशी या पिकाची कापणी सुरू होते, त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. गावा गावात मेळ्यांचे आयोजन केले जाते, पारंपरिक वेशातील लोक भांगडा आणि गिद्दा लोकनृत्य सादर करून आनंद व्यक्त करतात. हा सण म्हणजे एकतेचे प्रतीक मानले जाते.



याच दिवशी गुरुद्वारात विशेष कीर्तन लंगर आणि नगर कीर्तन आयोजित केली जातात, भारतात याचे ऐतिहासिक महत्व आहे. कारण याच दिवशी शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना केली. समानता साहस आणि धर्म रक्षा या सिद्धांताची सुरुवात यावेळी झाली. “देश को गुलामी से आझाद करने के लिए मुझे एक शिश चाहिये” असे आवाहन करून पाच वीरांना घेऊन (गुरु गोविंद सिंह के पंच प्यारे) गुरु गोंवीदांनी खालसा पंथ सुरू केला. त्यांनी संघर्ष करून मुघल साम्राज्य नष्ट केले . त्यामुळेच हा बलिदानाचा उत्सव सुद्धा मानला जातो. याच दिवशी जालीयनवाला बाग हत्याकांडात हजारो लोक मारले गेले . त्यामुळे हा दिवस शीख समाजासाठी महत्वपूर्ण मानला जातो. श्रीनगर च्या जुन्या शहरात काठी दरवाजा व छत्ती पादशाहीसह खोऱ्यातील गुरुद्वारात याच स्मरणार्थ उत्सव साजरा केला जातो. जम्मू काश्मीरमधील शांती आणि समृद्धी साठी व प्रत्येकाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते.

लोहडी उत्सव - सूर्य आणि अग्नि देवतेच्या प्रीत्यर्थ साजरा होणारा लोहडी महोत्सव. या पर्वानंतर दिवस हळू हळू मोठा होत जातो. हिवाळा संपत असतो. रब्बी पिकांच्या कापणीचा हा महोत्सव असतो, याच काळात ऊस तोडणी पण सुरू होते. या महोत्सवात छज्जा पारंपरिक नृत्य करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. बाळाचा पहिला लोहडी सण आणि नवविवाहित जोडप्यांचा पहिला लोहडी सण यांचे महत्व असते. आपल्याकडे बाळाचा व नवविवाहितेचा पहिला संक्रांत सण साजरा करतात हे वाचकांच्या नक्कीच लक्षात आले असेल. दिवस ढोलकीच्या थापा आणि नृत्य जुलूस याने साजरा होतो आणि संध्याकाळी दारादारात आणि शेतात लोहडी/ होळी पेटवली जाते. त्याच्या भोवती फेर धरून लोक पारंपरिक भांगडा आणि गिद्दा नृत्य सदर करतात. गाणी म्हणतात. पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घालतात. ईश्वराजवळ समृद्धीचा आशीर्वाद मागतात. रात्री जेवणावळी झडतात मका भुईमुगाच्या शेंगा, तीळ गूळ याचे बनवलेले पदार्थ खातात. लोक स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतात. हाच सण पोंगल, बिहू, संक्रांती म्हणून विविध राज्यात साजरा होत असतो. भारतीय संस्कृती निसर्गपूजक आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. याशिवाय लडाख महोत्सव, माथो नाग रांग, गलदान, नामचोट हे ही प्रमुख उत्सव असतात .


लोसर – ३ ते ५ मार्च मध्ये उंच पर्वतीय भागात तिबेटी नव वर्ष साजरे होते तो लोसार उत्सव. नृत्य, विविध विधी आणि प्रार्थना सादर करून शांती आणि सद्भावना संदेश देणारा हा उत्सव असतो.

कंचोथ- माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात कंचोथ म्हणजे गौरी तृतीयेचा सण – काश्मीर मध्ये किश्तवाड, रामबन, डोडा या पहाडी प्रदेशात व भद्रवाह, कोटली, मथोला, घाटा, खाकल गुप्त गंगा चिनोट, कापर, भालरा, भेज, चिंचोर या क्षेत्रात पण साजरा करतात. तीन दिवसांचा हा धार्मिक सण, विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो म्हणून साजरा करतात.

या बरोबरच तिथे असणाऱ्या मुस्लिम बांधवांचे सण उर्स आणि ईद पण साजरी होतात.

लोकसंगीत – रबाब, गजल, सूफी संगीत, इथले प्रसिद्ध संगीत आहे. सुफियाना कलाम हा त्यांचा वारसा आहे . हे माकम रागात सादर केले जाते. या संगीताचा प्रसार पंधराव्या शतकात झाल्या चे म्हणतात. तिथले प्रसिद्ध वाद्य संतूर आणि साज, सतार, वासोल व डोकरा. या वाद्यांच्या साथीने संगीत सादर केले जाते. हफिज नगमा हा सुफियाना कलामवर आधारित नृत्य प्रकार आहे. धार्मिक उत्सवांच्या वेळेला सादर केले जाणारे शास्त्रीय संगीत ‘वानवुन संगीत’ आहे.जम्मू काश्मीर च्या शास्त्रीय संगीतावर पर्शियन संगीताचा प्रभाव आहे. मुकाम हा राग त्याच प्रकारात मोडतो, तर लडाख संगीतावर तिबेटी संगीताचा प्रभाव मानला जातो.

लोकनृत्य - नैसर्गिक सौन्दर्य शिवाय कश्मीर पारंपरिक नृत्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या राज्यातले बहुतेक सर्व उत्सव पारंपरिक लोकनृत्याने साजरे होत असतात. लग्न समारंभ, जन्मदिन, पिके कापणी यासाठी त्यांचे विशेष संगीत व नृत्ये असतात. लोकनृत्यात राउफ, भांड जश्न, भांड पाथेर, कुड, हिकत, हफिजा, लादी शाह, बाछा नगमा, वूएगी-नचून, दुम्हाल ही नृत्ये येतात.


दुमहल नृत्य फक्त वट्टाल जनजातीचे पुरुष सादर करतात,आनंदाच्या प्रसंगी हे नृत्य सादर केले जाते.तर वूएगी-नाचुन प्रकारचे नृत्य विवाह प्रसंगी सादर करतात. विशेषता लग्नानंतर नववधू सासरी जायला निघते तेंव्हा सर्व महिला तीच्याभोवती फेर धरून नृत्य करून निरोप देतात. हा प्रकार काश्मिरी पंडितांकडे असतो.

कुड नृत्य बहुतेक गावातील ग्राम देवतेला किंवा लोकदेवतेला धन्यवाद देण्यासाठी ,सन्मानित करण्यासाठी, कृतज्ञता म्हणून सादर केले जाते. यात छैना,ढोल, नरसिंह आणि बासरी या विशिष्ट वाद्यांचा उपयोग करतात. हा उत्सव खरे तर पावसाळ्यातील नैसर्गिक संकटापासून वाचण्यासाठी, आपल्या शेती, पिके, कामगार, मुळेबाळे, कुटुंब यांच्या वर निसर्गाची कृपा दृष्टी राहण्यासाठी या देवतेला साकडे घातले जाते.

भांड पाथेर हे पारंपरिक नृत्य नाट्य अर्थात लोकनाट्य आहे.

वाद्ये – काश्मीर मधील बरीचशी वाद्य यंत्रे इराण मध्ये तयार झाली आहे. तिथले प्रसिद्ध वाद्य संतूर आणि साज, सतार, वासोल व डोकरा. या वाद्यांच्या साथीने संगीत सादर केले जाते. संतूर हे एक काश्मीर चे प्रसिद्ध पारंपरिक वाद्ययंत्र आहे. अक्रोड चे लाकूड, स्टील आणि बांबू वापरुन हे वाद्य तयार केले जाते. यालाच शततंत्री वीणा पण म्हणतात. सूफी संगीतात याचा वापर जास्त असतो. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात मान्यता मिळालेले या शतकातले संतूर हे वाद्य आहे. पंडित शिवकुमार शर्मा प्रसिद्ध संतूर वादक होते.त्यांनी संतूर हे वाद्य काश्मीर च्या खोऱ्यातून हिंदुस्थानी संगीताच्या व्यासपीठावर आणले. तसे हे वाद्य या भागातले प्राचीन वाद्य आहे.संतूर शिवाय चित्रपटाचे पार्श्वसंगीत पूर्णच होऊ शकत नाही असा एक काळ होता.


 


तुंबकनार हे एक काश्मीर चे परांपरिक वाद्य आहे. लग्न समारंभ सारख्या आनंदी प्रसंगी हे वाजवतात. याच प्रमाणे रबाब हे पण एक काश्मिरी वाद्य आहे. हे अफगाणिस्तान मधून आलेले वाद्य आहे.

कलाकुसर व हस्त कारागिरी

जम्मू आणि काश्मीर मध्ये हस्तकौशल्य व कारागिरी म्हणजे सौंदर्याचा आविष्कार असतो. पश्मीना शाल, काश्मिरी गालिचे, पेपर माचे वस्तु विशेष असतात.

लाकडी कोरीव काम - काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचे प्रतिबिंब जम्मू काश्मीर च्या कारागिरांनी बनवलेल्या प्रत्येक वस्तु, कापड, भांडी, खुर्च्या टेबल, बॉक्स, ट्रे यावर दिसते. लकडवरील कोरीव काम ही महत्वाची कला विविध डिझाईन, शैली यामुळे प्रसिद्ध आहे. या प्रदेशातल्या निसर्गात असणारी चिनार वृक्ष व त्याच्या फांद्या पाने,वेली, फुले, आक्रोडच्या लाकडावर कोरीव कामात आढळते. ते फर्निचर, सजावटीचे पॅनल्स विविध बॉक्स यांच्यावर सुद्धा अत्यंत बारीक कोरीवकाम नाजुक व आकर्षक बनवले असते. या कारागिरीवर पर्शियन, मुघल आणि स्थानिक काश्मिरी यांचा प्रभाव आहे. आक्रोड लाकडा वरील कोरीव काम तिथली पारंपरिक घरे, राजवाडे, देवस्थाने यांच्या सजवटीत वापरलेले दिसते. हे नाजुक व गुंतगुंतीची कला साकार करणारे हात पिढ्यानपिढ्या ही कला जपत आहेत. काश्मीर मध्ये कोरीव कामासाठी फक्त अक्रोडचेच लाकूड वापरले जाते.

 

                                  

काश्मिरी पश्मीना ने जागतिक स्तरावर आपला दर्जा टिकवून ठेवला आहे. पश्मीना ही काश्मिरी कारागिरांची ओळख आहे. पश्म म्हणजे मऊ, हा पर्शियन शब्द आहे. लडाख मधील उंच प्रदेशातील चांग टांगी जातीच्या शेळयांपासून काढलेली अत्यंत बारीक व मऊ लोकर हाताने कातली जाते आणि अत्यंत कौशल्याने व परिश्रम घेऊन त्यापासून मऊ, उबदार शाल किंवा वस्त्र हाताने विणले जाते. हे लोकरीचे तंतु केसांपेक्षाही बारीक असते. त्यामुळे वजनाला अत्यंत हलके असते. पश्मीना काश्मीरच्या संस्कृतिची ओळख आहे. पशमीना प्रमाणेच काश्मिरी शाल आणि कानी शाल या सर्वात जुन्या प्रसिद्ध शाली आहेत.


                  

काश्मिरी कार्पेटस/गालिचे – नामदा,काली आणि वाघू अशा तीन प्रकारचे गालिचे काश्मीरमधले हस्तकलेचे उत्तम नमुने आहेत. हे गालिचे लोकर आणि रेशीम वापरुन भरतकाम करून तयार केले जातात.

काश्मिरी पेपर माचे
– टाकाऊ कागद, कापड आणि तांदूळ यांच्या लगद्यापासून विविध रंगीबेरंगी, आकर्षक वस्तु तयार करतात.





आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक विदेशी दौऱ्यावर जाताना आमच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगणारी कलाकृति भेट म्हणून घेऊन जातात आणि आपल्या इथल्या हस्तकला, कलाकार व कारागिरांना प्रोत्साहन देतात. आताच जून मध्ये कॅनडा येथे झालेल्या G-7 दौऱ्यात त्यांनी काश्मिरी पेपर माचे चा बॉक्स भेट म्हणून नेला होतं. तो त्यांनी अलबर्टाच्या उप राज्यपाल सलमा लखानी यांना हा गोल्ड लीफ पेपर माचे बॉक्स भेट दिला. वेगवेगळे आकार, रंग, नक्षीकाम, साचे असे आकर्षक वस्तु तयार करतात. या कलात्मक वस्तु कुपवाडा, बडगाम, बारामुल्ला, अनंतनाग येथे मिळतात.


भाषा – मानवाच्या विकासामध्ये भाषेचे स्थान महत्वाचे आहे. समाजाची प्रगती असो वा परिवर्तन किंवा संघर्ष असो, या सगळ्यांची वाहक म्हणून भाषा असते. ज्ञान मिळवण्याचे साधन असते, भाव व्यक्त करण्याचे माध्यम असते. जम्मू काश्मीर राज्यात अनेक भाषा बोलल्या जातात पण मुख्यता कश्मीरी, डोगरी, हिन्दी, इंग्रजी, उर्दू या भाषा आहेत. त्याशिवाय पंजाबी, गुजरी, बुरुशास्की, पहाड़ी, तिब्बती इत्यादि. मुख्य लिपि शारदा, देवनागरी, रोमन, परशो-अरबी आहेत. काश्मिरी भाषेतली वृत्तपत्रे कोशुर न्यूज प्रकाशित होते.

या भागात राहणारे आदिवासी बांधव पण त्यांच्या भाषा बोलतात.

जम्मू काश्मीर ची खाद्य संस्कृती –

काश्मिरींच्या लग्न समारंभातले जेवण म्हणजे वाजवान . शाही भोज . हे वाजवान म्हणजे एक राईसप्लेट नव्हे तर त्यात कमीत कमी सात डिशेश पासून सुरुवात होऊन जास्तीत जात ३६ प्रकारच्या डिश समाविष्ट असतात. काश्मीर त्याच्या सौन्दर्यामुळे हिंदुस्थानच्या डोक्यावरचा मुकुट समजला जातो. त्यात इथली खान-पान संस्कृती हे एक मुख्य कारण पण आहे. एखाद दुसरा पदार्थ नाही तर, चक्क काश्मिरी शादीओंकी दावत असते. ते एक शाही भोजन असते. ‘वाजवान’ काश्मिरी शब्द ‘वाजा’ म्हणजे ‘कुक’ आणि ‘वान’ म्हणजे ‘दुकान’. वाजाच्या दुकानात मिळणारे पक्वान्न . काश्मिरात लग्न ठरवण्याची तारीख या वाजा च्या वेळेवर अवलंबून असते.वाजा ला वेळ असेल तीच तारीख ठरवली जाते.


तांब्याच्या भांड्यात चुलीवर बनवलेले मेजवानीचे पदार्थ असतात वाजवान मध्ये. काश्मिरी दावत चा समारोप कहवा ने होतो.

डोगरी खाद्य पदार्थात अंबल, कुलथी कि दाल,खट्टा मांस, दाल पट्ट,मां दा मदरा,असे खूप पदार्थ आहेत तर चॉकलेट बर्फी,पतीस्ता,सुंद पंजिरी हे स्वीट डेझर्ट पदार्थ आहेत.

जम्मू चे प्रसिद्ध भोजन म्हणजे पुलाव, राजमा, आलू दम. तर, काश्मिरी भोजन म्हणजे रोगन जोश, दम ओलाव, शाब देग, गोश्तबा, मोदुर पुलाव.

नदरू यखिनी –एक प्रसिद्ध डिश . कमल काकडी आणि दही मिळून हा पदार्थ बनवला जातो. वेलदोडा तेजपान आणि आले यांचा सुंदर स्वाद पदार्थाची चव आणखीन वाढवतो.


गोश्तबा – राजा महाराजांच्या काळातील एक महत्वाची डिश होती. ही एक शाही नॉनवेज डिश आहे.

योगर्ट लैंब करी – कांदा , पुदिना, हिरवी काली इलायची आणि मालवा ची फुले यांचा हा पदार्थ असतो.

नॉनवेज सिक कबाब , त्याच बरोबर रोगन जोश ही पण एक प्रसिद्ध नॉनवेज डिश आहे.

हाक हे प्रसिद्ध व लोकप्रिय सूप आहे. पालक आणि त्या प्रदेशातील भाज्या यांचे बनवले असते.

दम आलू – छोटे छोटे बटाटे व ग्रेवी असणारा हा पदार्थ स्वादिष्ट असतो. अत्यंत लोकप्रिय आहे.


                             

स्ट्रीट फूड मध्ये गोल गप्पे, पाणी पुरी, छोले कुलचे, हे पदार्थ लज्जतदार असतात. इथल्या प्रत्येक रस्त्यांवर हे पदार्थ मिळतातच. पण हे मिळण्याची काही स्पेशल ठिकाणे आहेत तिथेच तुम्ही हे खाल्ले पाहिजे.

मोदूर पुलाव- तांदूळ, केशर आणि विविध मसाले यांच्या स्वादच हा सुंदर पदार्थ ,तिथला एक प्रमुख पदार्थ आहे. मालाईदार तांदूळाची खीर हा एक गोड पदार्थ आणि विविध मिठाई तिथली खासियत आहे.

शुफ्ता- सुका मेवा साखर आणि मसाले मिळून बनवलेली मिठाई ही एक काश्मिरी मिठाई आहे. इलायची. मेवा यांनी सजवलेली तांदूळाचा बनवलेला हलवा म्हणजे फिरनी, एक काश्मिरी गोड पदार्थ भोजना च्या शेवटी खाल्ला जातो. स्वीट डिश .

कहवा – एक हर्बल ग्रीन टी. जम्मू काश्मीर मधली खाद्य संस्कृती मधली एक महत्वाची पद्धत. हा चहा केशर बदाम आणि अक्रोडचा मसाला घालून करतात. कुठल्याही महत्वाच्या सणाला हा चहा तयार केला जातो.जसे आपण सणावारी गोड धोड करतो तसे हा चहा असतोच. कहवा चहा २० प्रकारचे असतात. काही ठिकाणी यालाच मोगल चहा असेही म्हणतात. हा चहा प्रत्येक घरात होतो. यात काही लोक दूध पण घालतात.


आणखी एक प्रकारचा चहा म्हणजे बटर टी. तिबेटकडून आलेला हा चहा लोणी आणि मीठ घालून तयार करतात, काही लोक त्यात याक चे मांस मिसळतात.

आणखी एक पदार्थ, खंबीर.. ? आश्चर्य वाटले ? हं म्हणजे एक प्रकारची पोळी असते. मख्खन वाली चाय बरोबर ही खातात. ति गव्हाचीच जाड रोटी असते. अशीच आणखी एक रोटी म्हणजे गव्हाचीच पण ती केशर टाकून बनवली असते. खुसखुशीत, तोंडात विरघळणारी व गोड असणारी ही पोळी प्रसिद्ध काश्मिरी पदार्थ आहे.

ल्यादेर त्सचमन- हे एक काश्मिरी पनीर आहे ,ग्रेवी बरोबर शिजवले जाते. हा पारंपरिक शाकाहारी पदार्थ आहे. असाच एक पदार्थ म्हणजे काश्मिरी बैंगन. म्हणजे आपल्याकडील भरली वांगीच. काश्मिरी राजमा हा उत्तर भारतातला लोकप्रिय पदार्थ.

                                  



काश्मिरी लोकांचे आवडते खाद्य म्हणजे थुकपा. खरं तर तिबेट कडून आलेला हा पदार्थ. थुकपा म्हणजे स्वादिष्ट भाज्यांच्या सुपातील नूडल्स.

                                                       
                                                                    

एक लक्षात आले असेल कि जम्मू काश्मीर काही वेगळे नाही. आपलीच हिंदू संस्कृती तिथे पुरातन काळापासून नांदत होती. आपल्या चाली रीती, परंपरा, रिवाज हे तिथे आजही पाळले जातात. अनेक आक्रमकांनी जम्मू काश्मीर च्या सरळ, साध्या लोकांमध्ये मिसळून जाऊन स्वतःची संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धर्माचा प्रचार वाढवला. त्यांच्या प्रभावाखाली येऊन त्या त्या धर्माची आपल्या संस्कृतीत सरमिसळ झाली.आणि म्हणून मिश्र संस्कृतीचा अनुभव आपल्याला येतो. पण तरीही ‘अनेकता में एकता’ हे सूत्र आम्हाला भारत वर्ष म्हणून एकत्र बांधून ठेवते.


- डॉ नयना कासखेडीकर.


-----------------------

No comments:

Post a Comment