पश्चिम बंगाल -संस्कृती
(हा लेख १५ ऑगस्ट २०२६ च्या एकता मासिकात प्रसिद्ध झाला .)
एकीकडे हिमालयाच्या पर्वत रांगा आणि दुसरीकडे गंगा ब्रह्मपुत्रेच्या सान्निध्यात, युनेस्कोच्या वारसा यादीतल्या सुंदरबन त्रिभुज प्रदेशातील जैवविविधतेने नटलेला संपन्न बंगाल, समृद्ध संस्कृती, कला, साहित्य ल्यायलेला आहे. प्राचीन संदर्भ असलेलं बंगाल हे भारतातले महत्त्वाचे राज्य आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि सामाजिक सुधारणां मध्ये मोठा वाटा आहे. बंगालची दुर्गा पूजा परंपरा जगप्रसिद्ध आहे.आणि भारताला रवींद्रनाथ टागोर आणि बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांनी राष्ट्रासाठी गीत दिलं.अशा दिग्गजांचा बंगाल.
"हा देश इतरांच्या मते नुसती निष्क्रिय वस्तू असेल आणि अरण्य,पर्वत,पठारे ,नद्या ,माती अशी देशाची ओळख करून देत असतील,परंतु मी माझ्या देशाकडे माझी आई म्हणून पाहतो. माझ्या मातृभूमीची मी आई म्हणून पूजा बांधतो ,तिची स्तुती गातो,आपल्या आईच्या छातीवर बसून एखादा दैत्य तिचे रक्त पीत असेल, तर तिचा पुत्र काय करील? समाधानाने जेवत बसेल? आपल्या पत्नी मुलांसह आनंदी जीवन जगत राहील? कि आईच्या रक्षणार्थ धाव घेईल? असा प्रश्न विचारून आपल्या संस्कृतीत 'देश ही मातृभूमी आहे' हा दृष्टीकोन देणाऱ्या योगी अरविंद यांनी प्रखर राष्ट्रवादाचा पाया प्रथम बंगाल मधुनच घातला. बंगालच्या भूमीतील स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद या दोन प्रभृतींनी भारताचे राष्ट्रीय आणि अध्यात्मिक पुनरुत्थान केले आहे.
बंगाल मधील मुख्य शहरे म्हणजे कलकत्ता, जलपाईगुडी,आसनसोल,मिदनापूर, सिलिगुडी, हावडा, मालदा आणि दोर्जे लिंग अर्थात दार्जीलिंग. हे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले मनमोहक शहर आहे.भारतातील वसाहतकालीन थंड हवेचे ठिकाण, सूर्याची पहिली किरणे याच शहरावर पडतात. जगातील सर्वात उंच असलेल्या कांचनजंगा शिखर सोनेरी पिवळ्या रंगाने न्हाऊन निघते. या शिखरांनी वेढलेले हिरवेगार चहाचे मळे असे बहरलेले निसर्ग सौंदर्य आणि तिथली संस्कृती . वसाहतवादाचा प्रभाव तिथल्या वास्तू, रस्ते, रेल्वे चहाचे मळे यावर दिसतो पण, फोडा आणि राज्य करा हे धोरण इथल्या संस्कृती वर अजिबात प्रभाव पडू शकले नाही इतकी संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. टेकडीवर असलेले महांकाल मंदिर , तिथल्या घंटांचा नाद, प्रार्थना ध्वजांनी वेढलेले कठडे ,भव्य प्रवेशदार आणि लयबद्ध मंत्रोच्चाराचा आवाज असे पवित्र व उत्साही वातावरण असलेल्या परिसरात भगवान शिव, साई बाबा, प्रभूश्रीराम कालीमाता, देवी पार्वती यांची मंदिरे आहेत. हा परिसर म्हणजे मुळ दार्जीलिंग मठ होय.
दार्जीलिंग हे आपल्या निसर्गसौंदर्या बरोबरच समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि उत्सवांसाठी ओळखले जाते. येथे प्रामुख्याने नेपाळी, तिबेटी आणि बंगाली संस्कृतीचा मिलाफ पाहायला मिळतो。कुर्सियांग, कालिम्पोंग आणि मिरिक या शहरांमध्ये प्रामुख्याने नेपाळी लोकसंख्या आहे. पश्चिम बंगालच्या मैदानी प्रदेशाच्या सान्निध्यामुळे, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या तराई प्रदेशात मुख्यत्वे बंगाली लोकसंख्या आढळते. येथील लोकांमध्ये नेपाळी, तिबेटी, वांशिक जमाती आणि हिंदू अशी विविधता आढळते.
लेपचा हे येथील मूळ रहिवासी आहेत. जेव्हापासून बहुतेक भूभाग पूर्णपणे जंगलांनी व्यापलेला होता, तेव्हापासून ते येथे राहत आले आहेत. त्यांचे मूळ मंगोलियन आहे. त्यांची भाषा ‘रोंग- रिंग’ आहे त्यांना ‘रोन्गपा’ म्हणतात. महिला, कोंबड्या ,गुरे पालन, शेळ्या मेंढ्या, डुकरे पालन हा पारंपारिक व्यवसाय करतात. हे लोक गहू तांदूळ, मका, वेलची यांची शेती करतात.
बौद्ध धर्माचे पालन करणारी खाम्पा ही एक जमात आहे.
नेपाळमध्ये अनेक वांशिक गट आहेत, त्यापैकी एक म्हणजे गोरखा. गोरखा जमात ही डोंगराळ जमातीचा एक प्रमुख भाग आहे. खुकुरी नावाचे पारंपरिक चाकूसारखे शस्त्र बाळगण्यावरून त्यांची ओळख पटते. त्यांच्या शौर्य, पराक्रम, निष्ठा आणि जोम, गिर्यारोहण यात त्यांचे अमुल्य योगदान आहे.
बंगाल मध्ये विविध सण व उत्सव साजरे होत असतात.
चैता दसाई जो उर्वरित भारतात रामनवमी म्हणून ओळखली जाते, हा दार्जिलिंगमधील सर्वात मोठ्या आणि भव्य हिंदू उत्सवांपैकी एक आहे. यात प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस साजरा करतो. रामकथांव्यतिरिक्त, मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात एक मिरवणूक काढली जाते, जिथे लोक देवी किंवा शक्तीला वाईटावर चांगल्याच्या विजयासाठी प्रार्थना करतात.
लोसार (Losar) हा तिबेटी नववर्षाचे स्वागत करणारा एक प्रमुख सण आहे。फेब्रुवारी मध्ये होणारा हा उत्सव सुमारे १५ दिवस चालतो, ज्यामध्ये पारंपरिक नृत्य, संगीत आणि स्वादिष्ट तिबेटी खाद्यपदार्थांचा आनंद घेतला जातो。
येथे राहणाऱ्या बहुसंख्य लोकांचे मूळ तिबेटमध्ये आहे. चांद्र-सौर पद्धतीनुसार हे नववर्ष फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येते आणि ते संपूर्ण तिबेट, भूतान, नेपाळ आणि भारतात साजरे केले जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, इतर सामान्य नववर्षांप्रमाणे नसून, तिबेटी नववर्ष कधीकधी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ साजरे केले जाते. उत्सवाच्या अकराव्या दिवशी 'चोन्गा चोपा' हा उत्सव साजरा केला जातो. सर्व काही भगवान बुद्धांना समर्पित असते आणि लोक नवीन कपडे घालतात, स्वादिष्ट पारंपरिक पदार्थ बनवतात आणि मनसोक्त नाचतात.
दसरा आणि दुर्गा पूजा: दार्जीलिंगमध्ये ऑक्टोबर मध्ये नवरात्र अतिशय उत्साहात साजरा केला जातो。 या काळात संपूर्ण शहर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवले जाते。इथला हा सर्वात मोठा सण आहे,दुर्गामासुर आणि महिषासुर राक्षसांचा वध दुर्गा मातेने केला.आणि महादुर्गा जिला जगधात्री म्हटले जाते तिने , 'स्वतःला अजिंक्य समजणाऱ्या देवांचा' अभिमान नष्ट केला. ही दोन्ही देवीची एकच रूपे असली तरी हा फरक आहे. बंगाल मध्ये या जगाधात्रीचा जगाची रक्षक म्हणून पूजा केली जाते. आनंद मठ या कादंबरीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी देवी जगाधात्रीचे वर्णन केले आहे. काली, दुर्गा आणि जगधात्री मिळून भारतमाता आहे म्हणजे ‘मदर इंडिया’ चि तीन रूपे दाखवली आहेत.त्याचाच जागर आपण वंदे मातरम...गीतातून करत असतो.
दसरा –विजयादशमी आणि तिहार - हा नेपाळी व गोरखा लोकांचा मुख्य सण आहे, या उत्सवात फुलपती आणि लाखे नृत्य याला महत्व असते. संगीत व नृत्य कार्यक्रमांची रेलचेल असते. डोंगराळ भागातील क्षेत्रात सुद्धा दुर्गामातेची पूजा केली जाते. मिरवणुका निघतात.
डोल पौर्णिमा/डोल यात्रा/होळी = झोपाळ्यांची मिरवणूक= ही यात्रा फाल्गुन पौर्णिमेला रात्री साजरी होते. गोपाल समुदाय हा उत्सव राधा कृष्ण यांची भक्ती म्हणून करतो. हा उत्सव असं बंगाल ब्रज प्रांत, ओरिसा राजस्थान त्रिपुरा इथेही साजरा करतात.
शारदा पोर्णिमा किंवा कोजागरत पोर्णिमा- अशीच एक अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पोर्णिमा बंगाल मध्ये साजरी करतात.पावसाळ्याच्या समाप्तीचा हा सण असतो. पावसाचा देव इंद्र, त्याचा हत्ती ऐरावत यांच्या सह लक्ष्मीची पूजा केली जाते. बंगालच्या दयावो, ब्राह्मो, कुमुलंग परम्परा नुसार विशेष दिवस ठरला असतो.
पोहेला बोईसाख =नवोबोर्शो = बंगाली कालेन्देर नुसार पारंपारिक नाव वर्षाचा हा सण १४ किंवा १५ एप्रिल ला येतो. वसंत ऋतूतील कापणीचा ह उत्सव असतो. यावेळी प्रभात फेर्या काढल्या जातात. नृत्ये, विविध पथके , वेशभूषा असलेले चित्ररथ मिरवणुकीत असतात.व्यावसायिक नवीन खातेवही सुरु करतात.भूतकाळ विसरून एकता आणि पुनर्मिलनाचा हा भाग असतो.
दार्जीलिंग ऑरेंज फेस्टिव्हल (Darjeeling Orange Festival): डिसेंबर महिन्यात साजरा होणारा हा एक अनोखा उत्सव आहे。 यामध्ये आसपासच्या ५० हून अधिक गावांतील शेतकरी एकत्र येतात आणि विविध प्रकारच्या ताज्या संत्र्यांचे प्रदर्शन व विक्री करतात, संत्र्य्पासून बनवलेले विविध पदार्थ याचे आकर्षण असते. 。
दार्जीलिंग कार्निवल म्हणजेच तिस्ता चहा आणि पर्यटन महोत्सव: स्थानिक संस्कृती, पर्यटन आणि कला यांचे मनोहारी दर्शन घडवणारा हा दहा दिवसांचा नेत्रदीपक उत्सव असतो.ऐंशी च्या दशकात वांशिक संघर्षाने भंग झालेली शांतता पुन्हा मिळवण्याच्या दृष्टीने तरुणांनी एकत्र येऊन हा कार्निवल सुरु केला. मुख्य उद्देश लोकंमध्ये एकोपा निर्माण करणे आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात जगातील सर्वोत्तम चहाची चव चाखण्याची संधी मिळते。दार्जीलिंग चहाचा इतिहास, त्याचे विचिध प्रकार आणि चहाची चव घेण्याचे समारंभ आयोजित केले जातात. प्रसिद्ध स्थानिक रॉक बँडच्या मैफिली हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. काव्यवाचन सत्रे, चित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन. यासोबतच स्थानिक लोकनृत्य आणि कला संस्कृतीचे प्रदर्शनही असते。चहा उद्योग आणि पर्यटन हे बंगालच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत.
कालीम्पोंग दार्जीलिंग लोकमहोत्सव =हा महोत्सव, बंगालचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने, राज्य सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि वस्त्रोद्योग (MSME&T) विभाग आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो. मंगर, धिमाल, तामांग, लेपचा, राय, खास, भुतिया, तिबेटी, लिंबू, सरकी, भुजेल, नेवार, गुरुंग, कामी, दमाई आणि शेर्पा यांसह डोंगराळ प्रदेशातील विविध समुदाय त्यांची रंगीबेरंगी लोकगीते आणि नृत्ये सादर करत आहेत .
माघे संक्रांत (Maghe Sakranti): जानेवारी महिन्यात हा सण नेपाळी समाजात माघ महिन्याची सुरुवात म्हणून साजरा केला जातो。विक्रम संवत किंवा येले पंचांगानुसार माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सन साजरा केला जातो. सूर्याच्या उत्तरायणाशी संबंधित हा सण आपल्या सारखाच १४ जानेवारीला असतो. या दिवशी लोक भागमती व गंडकी या नद्यांमध्ये किंवा झऱ्यांमध्ये स्नान करतात。सूर्याची पूजा केली जाते पुढच्या शेतीच्या हंगामासाठी सूर्याला प्रार्थना केली जाते. दार्जीलिंग च्या हिमालयीन प्रदेशात हा सण भगवान शिवाच्या भक्ती संदर्भात साजरा केला जातो .
पश्चिम बंगाल मध्ये मकर संक्रांतीला पौष संक्रांत म्हणतात.ताज्या कापलेल्या भाताच्या पिकापासून विविध मिठाई बनवतात.पश्चिम बंगाल मध्ये शांतीनिकेतन येथे पौष महिन्याच्या सातव्या दिवशी पौष मेळा भरतो. पण संक्रांत हा सण सगळीकडेच निसर्गाच्या पुजेशी संबधित असतो.
संसारी पूजा: दार्जीलिंग परिसरातील ही एक प्रसिद्ध स्थानिक सामुदायिक पूजा आहे。 बैशाख महिन्यात संसारी मातेची (सृष्टीची जननी) प्रार्थना केली जाते。 यात धर्मभेद विसरून सर्व गावकरी एकत्र येऊन चांगल्या पावसासाठी आणि पिकासाठी प्रार्थना करतात。
चोत्रूल दिचेन (festival of miracles) बुद्ध जयंती: बौद्ध संस्कृतीचा प्रभाव असल्याने, दार्जीलिंगमध्ये बुद्ध जयंती मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते.
भारताव्यतिरिक्त, बुद्ध जयंती मंगोलिया, जपान, तैवान आणि दक्षिण व आग्नेय आशियातील इतर प्रदेशांमध्येही साजरी केली जाते. या दिवशी बौद्ध अनुयायी ध्यानधारणा, मंत्रपठण, पूजा करतात. अनेक मठ आणि मंदिरांमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करतात. परंपरेचा एक भाग म्हणून, घरांमध्ये स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसोबत खीर किंवा दुधाची लापशी तयार केली जाते.
घूम मठ, भुतिया बस्ती मठ,मगधोग योलमोवा या प्राचीन मठांमध्ये प्राचीन बौद्ध ग्रंथ जतन करून ठेवले आहे.
पश्चिम बंगाल संस्कृतीची मुळे बंगाली साहित्य,संगीत, ललित कला, नाटक आणि चित्रपट यात रुजलेली आहेत. येथील वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात सूक्ष्म फरक दिसतो.
बंगाली साहित्य = बंगाल ला साहित्याचा एक समृध्द वारसा लाभलेला आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय,रवींद्रनाथ टागोर, मायकेल मधुसूदन दत्त, ईश्वर चंद्र विद्यासागर, काझी नझ रूल इस्लाम, शरदचंद्र चट्टोपाध्याय,ही प्रमुख नावे. राजाराम मोहन रॉय, स्वामी विवेकानंद यांच्या सामाजिक सुधारणेचा प्रभाव इतल्या साहित्यावर सुद्धा दिसतो.
बंगाली लोकसाहित्यात महाकाव्ये, काव्ये, लोककथा, नाटके, लोकगीते, म्हणी आहेत. त्यावर इथे राज्य केलेल्या विविध वंशांचा प्रभाव आढळतो. पोर्तुगीज, फ्रेंच इंग्रज इत्यादी. इथल्या संगीताची परंपरा साहित्यावर आधारितच आहे.
लोकसंगीतामध्ये कबीगान गोम्भिरा,भावाइया,कीर्तन, गजान संगीत पण येते. काली मातेला समर्पित असलेल्या संगिताला शामा संगीत म्हटले जाते.
रंगभूमी व चित्रपट = आधुनिक रंगभूमीची ओळख युरोपिअन लोकांनी बंगालला करून दिली पण सतराव्या शतकातील स्वदेशी रंगभूमीची बंगालची दीर्घ परंपरा आहे. इथे जात्रा हे पारंपारिक लोकनाट्य खूप लोकप्रिय आहे.
दार्जीलिंग म्हटले कि माउंट एव्हरेस्ट आणि कांचनजंगा शिखर याबरोबरच आठवतात ते बॉलीवूडचे चित्रपट. कोलकत्ता हे बंगाली चित्रपट उद्योगाचे केंद्र आहे. सत्यजित राय यांनी केलेला चित्रपट 'कांचनजंघा' दार्जीलिंग चाच. तसेच आराधना, राजू बन गाय जंटलमन, परिणीता,बर्फी ,यारीयां,जग्गा जासूस यांचे चित्रीकरण दार्जीलिंग येथे च झाले आहे.ऋत्विक घटक, मृणाल सेन, तपन सिंन्हा , अपर्णा सेन, बुद्धदेव दासगुप्ता, गौतम घोष, कौशिक गांगुली, ऋतुपर्ण घोष,अशा अनेक दिग्दर्शकांचा समावेश आहे.
बंगालची संगीत परंपरा= बाऊल संगीत हा बंगालच्या लोक संगीताचा वारसा आहे.यात हिंदू भक्ती संप्रदाय,सुफिवाद आणि बौद्ध धर्माचे मिश्रण दिसते. प्राचीन असलेल्या या परंपरेमध्ये अध्यात्मिक लोकसंगीताचा समावेश असतो. बाऊल गाताना एकतारी, दोतारा तंतुवाद्य, डूग्गी (ढोल),खामक आणि बासरी ,मंजिरा यांचा वापर करतात. हे गायन करणाऱ्या कालाराला बाउल म्हणतात.आपल्याकडे जशी भाट परंपरा आहे तिचं ही परंपरा आहे. हे लोक वैष्णव धर्माचे पालन करतात. गावागावात जाऊन भगवान विष्णूचे भजन गाऊन लोक गीते गाऊन भिक्षा मागत फिरत असतात. देवाची भक्तिमय आळवणी करता करता समाजाला शिकवण सुद्धा देत असतात. बंगाल मधील संत श्री chaitany महाप्रभू यांनी नाम संकीर्तानाचे महत्व सांगणारे शिक्षाष्टकम हे स्तोत्र रचले आहे. त्यांच्या अनुयायांनी जी बंगाली गाणी रचली तिचं सुरुवातीची बाऊल गीते होत. या संगीत प्रकाराची ओळख, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी जगाला करून दिली.या वर बौद्ध विचारांचा प्रभाव असल्याने याच्या काही रचना पाली भाषेत सुद्धा आहेत.
रवींद्र संगीत- यालाच टागोर गीते पण म्हणतात. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेली गीतांची एक विशेष संगीत शैली आहे,यात शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्य धून यांचे काव्यात्मक मिश्रण दिसते. यात शब्द आणि स्वर याला सारखेच महत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील ठुमरी शैलीवर आधारित हे संगीत आहे. यात भक्ती, प्रेम, प्रकृती, देशभक्ती,भाव भावना, असे विषय आहेत, टागोर यांची अशी जवळ जवळ २२३० गीत रचना आहेत. हा संग्रह ‘गीतबीतान’ अर्थात ‘गीत बगीचा’ म्हणून प्रसिद्ध आहे.याचे ६४खंड आहेत. ही गीते बंगाली जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर आधारित आहेत. बंगालचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांगला ...’ एकला चलो रे... , ही प्रसिद्ध गीते सर्वाना माहितीच आहेत. या रवींद्र संगीताने अर्थात गुरुदेवांच्या गीतांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्वाची भूमिका पार पाडली. बंगला मध्ये असे एकही शहरी वा ग्रामीण भागातले घर नाही कि, जिथे ही गीते गायली जात नाहीत.स्वामी विवेकानंद तरुण असतांना त्यांनी रवींद्र संगीत शैली मध्ये संगीत रचना केली होती. विवेकानंद यांनी शिक्षण घेता घेता भारतीय शास्त्रीय संगीत आणि विविध वाद्य यंत्र यांचे शिक्षण घेतले होते. हे सर्वज्ञात आहेच.
नृत्य = बंगालला नृत्याचा पण प्राचीन वारसा लाभलेला आहे. यात शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, आणि युद्ध नृत्य यांचा समावेश आहे. पश्चिम बंगाल ब्रिटा नृत्य,गंभीरा नृत्य,संथाल नृत्य, लाठी नृत्य, आणि आदिवासी जमातीचे छाऊ नृत्य ही पारंपारिक नृत्ये आहेत. दार्जिलिंग, दार्जिलिंगमध्ये नेपाळी लोकसंख्येचे वर्चस्व आहे, त्यामुळे साहजिकच येथे नेपाळी लोक सर्वाधिक प्रमाणात दिसतात. नेपाळी लोकांची संस्कृती अत्यंत समृद्ध आहे, जी त्यांच्या लोकनृत्य आणि लोकगीतांमधून स्पष्टपणे दिसून येते. बहुतेक नृत्ये देव-देवतांना समर्पित आहेत. ही नृत्ये आणि गीते केवळ बौद्धांपुरती मर्यादित नाहीत, तर हिंदू देवतांना समर्पित नृत्येदेखील आहेत. विविध वांशिक लोकांमध्ये गायली जाणारी गीते आणि लोकनृत्ये सणांशी संबंधित असतात.
छाऊ नृत्य- हे पूर्व भारतातले एक प्रसिद्ध आदिवासी, मार्शल आर्ट वर आधारित शास्त्रीय नृत्य आहे .वसंतोत्सवात सादर होते.युद्ध कौशल्याचे कसरती प्रयोगा द्वारे पौराणिक कथेवर आधारित असते. रामायण, महाभारत व स्थानिक लोककथा तील प्रसंग, भव्य मुखवटे व रंगीबेरंगी पोषाख करून नर्तक सादर करतात.
पुरुलिया, सराईकेला आणि मयूरभंज या तीन शैली आहेत, प. बंगालची शैली पुरुलिया आहे. डोक्यावर विविध प्रकाराचे टोप आणि मुखवटे हे पुरूलिया छाऊ चे वैशिष्टय़ आहे.
दार्जिलिंगमधील काही सर्वात प्रसिद्ध नृत्यप्रकार म्हणजे – धन नृत्य, झांकरी, यात्रा, खुकुरी नाच, बालन, देवरा, पंचबुद्ध, धिमाय, संगिनी, चुटकी, झ्याउरे, सखिया, डम्फू नाच, मारुनी नाच इत्यादी.
मारुनी नाच हे सर्वात जुने नेपाली लोकनृत्य आहे. प्रभू श्रीरामांच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतण्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा उत्सव साजरा करतात. यात लांब झगा परिधान केलेले पुरुष हे नृत्य सादर करतात.
धन नृत्य= लिंबू (याकथुंग)लोकांचे हे लोकनृत्य आहे. धन म्हणजे भात . म्हणून याला भात नृत्य किंवा भात कापणी नृत्य पण म्हणतात. हा भात कापणीचा उत्सव असतो. स्त्री पुरुष दोघेही हा आनंदोत्सव साजरा करतात. झ्याउरे नृत्य सुद्धा भात लावणीच्या आनंदाच्या प्रसंगी प्रेम आणि आनंद व्यक्त करण्यासाठी सदर केले जाते.
झांकरी नृत्य= झान्करी म्हणजे मांत्रिक, इथे ग्रामीण भागात आजारी लोकांवर उपचार करण्यासाठी या नृत्याचा उपयोग करतात. आरोग्यसेवा व डॉक्टरची सोय नसल्याने विशिष्ट मुद्रांचा व संगीताचा वापर करून हे नृत्य उपचारा दरम्यान करतात.
यात्रा नाच = म्हणजे मिरवणुकीत केला जाणारा नाच. नेपाली लोक पावसाळ्यात इंद्र देवाचे आभार मानतात. तर काही जन वाईट शक्तींचा नाश केल्यबद्दल शिवाचेही आभार मानतात.राक्षस आणि देवतांचे मुखवटे घालून कलाकार सादरीकरण करतात. ही इंद्रयात्रा आठवडाभर चालते. मुखवटे व रथ हे याचे आकर्षण असते.
तमंग सेलो म्हणजे दम्फू नृत्य.= तामांग लोकांचे हे ढोल नृत्य आहे. बालन नृत्य - यात देवदेवतांच्या लीला नृत्यातून सदर करतात ,साधारण धार्मिक उत्सवा प्रसंगी चेत्री आणि बहुन जमाती मध्ये करतात.
पंच बुद्ध नृत्य= धर्मानुसार बुद्धांची पाच रूपे आहेत. या नृत्यात पाच नर्तक ही पाच रूपे प्रेझेंट करतात. दिशा, रंग आणि मुद्रा हे यात महत्वाचे असतात.
धीमे नृत्य हे सुद्धा नेवार समुदाय कापणीच्या हंगामात सादर करतात. धीमे हा पारंपारिक ढोल आहे, तो वाजवून हे सादरीकरण होते.
चाम नृत्य-
चाम हा एक अत्यंत अद्वितीय, पारंपरिक आणि वारसा नृत्यप्रकार आहे, जो हिमालयीन प्रदेशात बौद्ध भिक्षूंद्वारे कोणत्याही विशेष बौद्ध सण किंवा प्रसंगी सादर केला जातो. हे एक जोशपूर्ण नृत्य असते. मोठे मुखवटे भूतान, लाहौल आणि स्पिती, तिबेट, आणि दार्जिलिंग यांसारख्या काही ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याशिवाय कठपुतली,लाठी, अलकाप, गोम्भिरा, धामेल फकीर,छोकरा नझरुल,ही नृत्ये आहेत.
| कालीघात चित्रकला |
चित्रकला - कालीघात चित्रकला ही भारतीय चित्रकलेची एक प्रमुख शैली आहे. या शैलीत विशेषतः काली चे ,देव देवतांचे चित्र साकारलेले दिसते. सामाजिक इतर दृश्येही चितारलेली आहेत. आज लंडन मधील विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात जलरंग, रेखिय चित्रे, व हस्त निर्मित लिथोग्राफ अशा ६४५ चित्रांचा संग्रह कालीघाट चित्रसंग्रह म्हणून प्रदर्शित केला आहे.
बंगालला मध्ययुगीन काळापासून टेराकोटा वास्तुकलेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. बंगाली कलेत मातीची भांडी, हस्तिदंत, पितळ धातू ,यांचा मोठ्या प्रमाणात वापर दिसतो. या शैलीत बांधलेली मशिदी, मंदिरे, राजवाडे, किल्ले, घरे, मठ धर्मशाळा आहेत. प्राचीन बंगाल मध्ये पाल-सेना शिल्पकला पाहायला मिळते. नवाबांच्या काळात या प्रदेशात हस्तिदंती शिल्पकला भरभराटीस आली असे म्हणतात.
प्रत्येक प्रदेशाची हस्तकला ही त्याची विशेष ओळख असते. थांका हा दार्जिलिंग संस्कृतीचा एक अत्यंत लोकप्रिय भाग आहे. हस्तिदंती दागिने, पारंपरिक मुखवटे, गालिचे, टेराकोटा वस्तू , लाकूडकाम, चामड्याच्या वस्तू आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तिथल्या कारागिरीची साक्ष देतात.
बंगाली वस्त्र परंपरा प्रसिद्ध आहे. मलमल कापडावर जामदानी नक्षीकाम, ही तिथली प्रसिद्ध मुघल शैलीतील वस्त्र कला आहे. बंगाली साडीचे /शारी अनेक प्रकार आहेत.मंगल वस्त्र म्हणून लाल काठाची पांढरी साडी वैशिष्टय़ पूर्ण असते. जामदानी, तांट, मलमल, तांगेल, कांथा, राजशाही सिल्क, ढाकई रेशम, बालुचेरी इत्यादी इथल्या संस्कृती च्या खुणा आहेत. पुरुष कुर्ता, पायजमा, धोतर घालतात.
खाद्य संस्कृती -भात व मासे हे बंगालचे प्रमुख अन्न आहे. या बरोबर भर्ते हा पदार्थ खातात. इलीश भर्ता, शुतकी भर्ता, बेगुन भर्ता , लक्षात आलेच असेल कि हे आपले भरीत आणि मासे व इतर समुद्री खाद्य पण भाता बरोबर खातात. दार्जिलिंगमध्ये मोमो हा खाद्यपदार्थांची राणी आहे. तो इतका लोकप्रिय आणि स्थानिकांचा आवडता आहे की, त्याने बहुतेक थंड हवेच्या ठिकाणांमध्ये आणि उत्तर भारतीय राज्यांमध्येही लोकप्रियता मिळवली आहे.
काही प्रसिद्ध स्थानिक आंबवलेल्या पदार्थांमध्ये गुंद्रुक, किनेमा आणि सिंकी यांचा समावेश आहे. इथली खाद्य संस्कृती आंबवलेल्या पदार्थांनी व पेयांनी समृद्ध आहे.
बंगाल मध्ये, गोड पदार्थ म्हणजे दुधापासून तयार केलेली मिठाई आणि स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असते. रसगुल्ला, संदेश, रस मलई, चमचम, खीर कदम, दरबेश, पायेश, लाबोंग लतिका, सीताभोग, मिष्टी दोई, कोलार बोरा-केळ्याचे वडे संक्रातीला करतात,
निसर्गरम्य सौंदर्याव्यतिरिक्त, दार्जिलिंग चहा जगभरात अत्यंत लोकप्रिय आहे. एकरभर डोंगराळ जमीन , विस्तीर्ण हिरव्यागार चहाच्या बागांनी व्यापलेली आहे.
दार्जिलिंगमध्ये असंख्य चहा बागांचे दौरे आयोजित केले जातात. थेट चहाच्या बागेतून ताजी खुडलेली चहाची पाने मिळतात .
बंगाल मधील लग्न सोहोळा ही अनुभवण्याची गोष्ट आहे.
बंगाली विवाह कलकत्त्याला जाऊन प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. सगळीकडेच विधी चा उद्देश एकच पण परंपरा थोड्या फार वेगळ्या.
यातील 'गाये होलुद' किंवा गात्रो-हरिद्रा हा हळदी समारंभ असतो .हा सोहोळा म्हणजे वधू वराचे भौतिक शरीर व सूक्ष्म शरीर शुद्ध करणे. प्राचीन वैदिक परंपरा अजूनही पाळली जाते. हेच आपल्या संस्कृतीचे वैशिष्टय़ आहे. यातील विधी व त्या मागचे कारण बघितले तर आदर, कृतज्ञता, आशिर्वाद या मूल्यांची मुळे किती प्राचीन काळापासून आहेत हे लक्षात येते.
पती पोत्रो ही लग्नाची तारीख/ मुहूर्त निश्चितची बैठक, मग आशीर्वाद समारंभ अर्थात साखरपुडा ,यात तांदूळ आणि तिपतीया घास ची पाने वर, वधूला देतो.
ऐबुरो भात हा समारंभ म्हणजे लग्नाआधी विशेष भोजन समारंभ . लग्नगाठ बांधण्या आधीचे हे दोघांचे शेवटचे भोजन असते.
होलूद कोटा च्या संध्याकाळी कुंकू, पान -सुपारी घेऊन, शोभायात्रा काढत, सर्व महिला गंगेला लग्नाचे आमंत्रण द्यायला व विवाह सोहोळ्यात तिचे पाणी वापरण्याची परवानगी मागायला जातात. गंगेच्या आणलेल्या या पाण्यानेच हळद लावल्यानंतर वधू व वर आंघोळ करतात. त्या नंतर केळ्याच्या झाडाला सुद्धा आमंत्रणं देतात.
शंख पोरानो म्हणजे, आपल्याकडे मंगळसूत्र हे लग्न विधीचे महत्त्वाचे प्रतिक आहे तसेच बंगाल मध्ये लाल व पांढ-या बांगड्या प्रतिक असते. आपल्याकडे लग्नाचा हिरवा चुडा असतो. वधूला हळद लावल्यानंतर शंख व पोला या बांगड्या भरतात. लग्नात
सात पाक परिक्रमा, सोमोप्रोदान (कन्यादान), सोपतोपोडी(सप्तपदी), ओंजोली, सिंदूर दान असे विधी होतात असे एक आठवडा लग्नाचे कार्यक्रम सुरू असतात.
नुकत्याच बंगालमध्ये निवडणुका झाल्या. त्या पार्श्वभूमीवर बंगाल खूप चर्चेत आला. हे सर्व बघून मग सर्वांच्याच मनात प्रश्न उभे राहिले , हीच यांची संस्कृती? नाही मना मनात देशभक्तीची बीजे रोवणारा बंगाल खूप वेगळा आहे.
(सर्व फोटो गुगल वरून साभार परत.)
ले. डॉ.नयना कासखेडीकर ,पुणे.
---------------
No comments:
Post a Comment