साहित्य कट्टा वर्तक बाग
पुणे, दिनांक 22 जुलै 19 --
वारा धूमकेतू सारखा
पिंजून तन मन गेला
माज्या गावाची पायवाट शोधत
तुज्या गावातून आला.
..
काय करू कसं करू
सांग माज्या सजणा
वैशाख वणवा जाळत गेला
आषाढात बरस ना...
आषाढात बरस ना ... अशा या तरल भावना, आणि संवेदनांचा आषाढ जोरदार बरसला वर्तक बागेतील साहित्य कट्ट्यावर.
मराठी भाषा संवर्धन समिति पुणे महानगर पालिका आणि संस्कार भारती साहित्य विभागाच्या, मासिक साहित्य उपक्रमात हा ||आषाढ|| कार्यक्रम संपन्न झाला. आषाढ म्हणजे फक्त पाऊस आणि संबंधित कविता नसून, त्यात, साध्या आणि सरळ शब्दातून व्यक्त झालेलं त्यांचं निसर्ग प्रेम आहे, मनाच्या वेदना आहेत, प्रीती आहे, नात्यांचं दर्शन आहे, अन्यायाच्या विरोधातले बंड आहे. अस्वस्थता आहे, करुणा आहे. विविधरंगी प्रतिमा पण आहेत.
भाग्यश्री देसाई, शंतनु पुराणिक आणि मोनिका जोशी यांनी अतिशय समर्थपणे कवितांचे सादरीकरण केले. आषाढ हा भाग्यश्री देसाई यांचा पहिलाच काव्यसंग्रह. आणि तोही त्रैभाषिक असलेला. पण वर्षभरात या संग्रहाला जवळ जवळ डझन भर पुरस्कार मिळाले आहेत. इतके पुरस्कार कसे? याचं उत्तर यातल्या सशक्त कवितेचे वेगळे विषय.
‘जे न देखे रवी ते देखे कवी’ हे अगदी खरच . उदाहरणार्थ – आपल्या घरातले रोज वापरतो ते पायपुसणे काय, पण त्यावरील भाष्य म्हणजे पायपुसणी ही कविता. त्या ‘पायपुसणी’ वर एखादी गृहिणी कसे आईच्या मायेने, प्रेमाने काळजी घेते, वापरुन निस्तेज झालेल्यांना कशी धुवून चकचकीत करते. त्याचं हे साध पण परिणामकारक भाववर्णन या कवितेत आहे. ‘सारं कसं शांत शांत’ ही कविता मनाला चटका लावणारी होती. पुणे मुंबई प्रवासात सकाळी सकाळीच खाटीकखान्यात नेल्या जाणार्या कोंबड्यांचा गच्च भरलेला टेम्पो बघून मनात दाटलेल्या भावना आणि मुंबईहून पुण्यास परत येताना पुन्हा तोच टेम्पो रिकामा होऊन योगायोगाने दिसल्याने, कळवललेल्या मनाने व्यक्त केलेल्या वेदना यात आहेत, ज्या ऐकून श्रोतेही कळवळतात. ही कविता सादर करताना भाग्यश्री ताई भावविवश होतात आणि चार आसवं त्या कोंबड्यांसाठीही गळतात.
‘काळी मांजर’ ही अशीच एक कविता घाबरलेल्या सुनेला आत्मविश्वास देणारी. यात नववधू माप ओलांडताना काळी मांजर आडवी जाते त्यावेळी कुजबुजणार्या आसपासच्या बायकांना दम भरणारी आणि सुनेला आश्वस्त करणारी सासू यात रेखाटली आहे.
‘इथे जगणं सोप्पं नसतं’ ही कविता जगायचं असेल तर दगडासारखे जगा कारण ज्या दिवशी तासले जाल देवत्वाला पोहोचाल असा मोलाचा संदेश देऊन जाते.
याप्रमाणेच आर्जव, सांग ना, ते बोलत नाहीत, सवय, धुकं अशा मनाची अस्वस्थता निर्माण करणार्या कविता सादर झाल्या. देव आत्मा परमात्मा, श्रद्धा अंधश्रद्धा सोशल नेटवर्किंग पत्रिका या सगळ्या कवितेत वेदना आहे, सुखद क्षण आहेत. अटळ मृत्यूच चिंतन आहे. अन्यायाविरूद्ध भांडण आहे. या बरोबरच हिंदीतल्या कश्मकश्म, अजीब दास्ता, ये तन्हाईया अशा कविता तर इंग्लिश मधील Tell me, Innocence, Life, Assurance या कविताही खूप भावल्या. मोनिका जोशी आणि शंतनु पुराणिक यांनी भाग्यश्री देसाई यांच्या बरोबर कवितेचा सुंदर आस्वाद रसिकांना दिला. रसिक प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली. या बरोबरच या कविता केंव्हा आणि कशा सुचल्या, त्यामागची पार्श्वभूमी काय होती या सगळ्या गोष्टी भाग्यश्री ताई त्यांच्या निवेदनात किस्से सांगताना उलगडून दाखवत होत्या.... आणि आषाढ चांगलाच बरसत होता.
सुरूवातीला नटराजपूजन करण्यात आले. ध्येयगीत व पाहुण्यांचा परिचय सीमा भोळे यांनी सादर केले, प्रास्ताविकात डॉ. नयना कासखेडीकर यांनी साहित्य कट्टयाच्या या बाराव्या वर्धापनदिन कार्यक्रमापर्यंतची वाटचाल सांगून संस्कार भारतीच्या दैनंदिनी प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर मीनाताई सासणे, हल्याळ दिलीप दत्तात्रेय, अतिक शेख, वैजयंती आपटे, अभिनेत्री वसुधाताई देशपांडे, अभिनेते अनिल खोपकर, तसेच इतर मान्यवर व रसिक प्रेक्षक आवर्जून उपस्थित होते.
प्रसिद्धी
No comments:
Post a Comment