Tuesday, 14 July 2026

वारी पंढरीची .....

 

वारी पंढरीची .....

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव !


पंढरपुरची वारी म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख. जगातल्या अनोख्या अध्यात्मिक यात्रेपैकी एक महत्वाची यात्रा. शिस्त, श्रद्धा, एकता आणि समरसतेची यात्रा. महाराष्ट्राच्या सर्व भागातून हजारो वारकरी आणि कर्नाटकातून हरिदास, इतर राज्यातून दर वर्षी आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशीला पंढरीत येतात. जुलै उजाडला कि वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे, त्याची तयारी मात्र आधीच सुरु असते. दरवर्षीच पावसाळा आणि आषाढी वारीचे गणित काहीही झाले, काहीही घडले तरी पक्के असते. वारकरी संप्रदायासाठी पंढरीची ही वारी अतिशय महत्वाची असते. पाऊस नसल्याने कोरडा दुष्काळ असो वा अतिवृष्टीमुळे परिसर जलमय झालेला असो. वारकर्यांची, विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायची ओढ कायम असते. संततधार सरींमध्ये सुद्धा ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वारकऱ्यांची पाऊले पंढरीची वाट चालत असतात. ... आळंदी - देहूहून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या निघणार्या पालख्यांचे वेळापत्रक जाहीर होते. अंदाजे २०ते २४ दिवसांनी पालख्या पंढरीत येऊन दाखल होतात.

पालखी सोहोळ्याच्या रचनेत क्रम ठरलेला असतो. आधी नगारा बैल गाडी, यांचे नगारा वादन प्रवास करताना अखंडपणे सुरु असते. त्यामागे दोन अश्व, एकावर जरीपटका घातलेला स्वार असतो तर दुसरा अश्व मोकळा असतो त्यावर संत बसतात अशी भक्तांची श्रद्धा असते. त्यामागे काही दिंड्या, जवळ जवळ २७ दिंड्या असतात. मग पालखी रथ, पुन्हा काही दिंड्या मागे.या मागच्या दिंड्या दोनशे पेक्षा जास्त असतात. प्रत्येक दिंडीमध्ये एक वीणा घेतला भक्त, एक पखावज वादक, टाळकरी, हातात ध्वज घेतलेले भक्त, डोक्यावर तुळशी वृंदावन व पाण्याचे हंडे घेतलेल्या महिला आणि अनेक इतर वारकरी चालत असतात. कपाळी गोपीचंदन व बुक्का, तुळशीमाळ गळ्यात घातली कि वारकरी होऊन त्या संप्रदायाचे नियम आचरायचे असतात. नियमित वारी करायची असते, ‘रामकृष्ण हरी’ हा जप करायचा असतो. नित्य नेमाने हरिपाठ म्हणायचा असतो. मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करायचे असते. परपुरुष व परस्त्री विठ्ठल रुक्मिणी समान मानायचे असते. अशी ही श्रद्धा, म्हणून वारकरी एकमेकांना माऊली म्हणूनच संबोधतात.


इतर सामील असलेल्या पालख्या म्हणजे ,त्र्यंबकेश्वर हून संत निवृत्तीनाथांची पालखी, पैठण हून संत एकनाथांची, सास्वधून सोपानकाका यांची, एदलाबाद हून संत मुक्ताबाईची, नरहरी सोनार, संत नामदेव,रोहिदास, चोखोबा यांची पंढरपूरहून, जनार्दन स्वामींची व संत बहिणाबाई यांची संभाजीनगरहून, वडगाव येथून जयराम स्वामी यांची पालखी, शिरसावडीचे शेकुबोवा यांची पालखी, कोळेहून घाडगे बाबा न्ची ,तर, चिंचगाव हून तपकिरी बोवा यांची पालखी, मच्छिंद्रगड हून मच्छिंद्र नाथांची, मंगळवेढा येथून दामाजी यांची, शंकर महाराज यांची माहुली अमरावती येथून,तर शिराळा येथून गोरक्षनाथ यांची पालखी पंढरपूरसाठी रवाना होते.


ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.... अशा अखंड जयघोषात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून प्रस्थान करते. तर संत तुकारामांची पालखी देहू हून प्रस्थान करते. प्रस्थानानंतर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा पहिल्याच दिवशी मुक्काम त्यांच्या आजोळ घरी आळंदीत गांधीवाड्यात असतो तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम देहू गावातल्या त्यांच्या वंशजांच्या इनामदार वाड्यात असतो. भागवत धर्माची पताका हातात धरून, डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात तुळशीच्या माळा, टाळ आणि मृदुंगाच्या गजरात हजारो अबाल वृद्ध भक्तांचा मेळा पुण्यात दाखल होतो. वाकडेवाडी येथे दोन्ही पालख्याचा संगम होतो. हा वैष्णवांचा मेळा आळंदी देहूहून पायी चालत चालत मुळा मुठेच्या संगमावर येतो तेंव्हा गावातले सर्व भक्त, भाविक या पालख्यांचे दर्शन घेतात आणि या सोहोळ्याचे साक्षीदार होतात. नाही देहू आळंदी, नाही पंढरी, तर निदान अगदी आपल्या इथेच गावाच्या वेशीपाशी दर्शनाचा लाभ घेत भाविक धन्यता मानतात. विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट, हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा गजर होत असलेल्या या चैतन्यमय वातावरणात चिंब भिजतात.
 
                      

            
शिवाजीनगर ते फर्ग्युसन रोडने दोन्ही पालख्या, संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आणि संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे थांबून आरत्या होऊन पालख्या डेक्कनला येतात. मग टिळक चौक आणि लक्ष्मी रोडने त्या आपल्या ठरलेल्या ठिकाणी, निवडुंग्या विठ्ठल मंदिरात तुकारामांची पालखी तर पालखी विठोबा मंदिरात ज्ञानेश्वरांची पालखी विसाव्याला थांबतात. पुण्यामध्ये दोन दिवस पालखीचा मुक्काम असतो, या वारीत अनेक दिंड्या सामील होतात. मग सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडी शेगाव,वाखरी आणि पंढरपूर, असा पंधर ते सतरा दिवस पायी प्रवास करत करत पालख्या एकदाच्या चंद्रभागेच्या तीरावरील पंढरीला पोहोचतात.

या वारीतला रिंगण सोहोळा एक अनुभवण्याचा, आनंद देणारा, उर्जा देणारा असा ऐतिहासिक सोहोळा असतो. एकूण ३ ते ४ गोल रिंगण होतात तर ३ उभे रिंगण होतात. चांदोबाचा लिंब वाखरी, इसबावी या ठिकाणी उभे रिंगण होते. तर गोल रिंगण पुरंदवडे, खुडूस फाटा,भंडी शेगाव, बाजीराव विहीर इथे रिंगण सोहोळा होते. शेतकरी लोक आपल्या मेंढ्या घेऊन येतात तेंव्हा त्यांचे पालखीभोवती रिंगण होते. अश्वांची दौड असते. उडीचे खेळ होतात.वाखरी येथे शेवटचे रिंगण होते.       

आषाढ दशमीला संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात. इथे पोहोचल्यावर वारकर्यांचा आनंद गगनात मावत नाही. “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल....” च्या गजराने मंदिराचा परिसर दणाणतो. विठुरायाच्या दर्शनाने पंधरा दिवस पायी चालल्याचे कष्ट सगळे भक्त विसरतात, एक अध्यात्मिक अनुभूती त्यांना मिळते. संपूर्ण पंढरपूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघते. मंदिर परिसर भक्तीच्या उत्साहाने भारला जातो. मंदिर भक्तांनी फुलून गेलेलं असते.






यंदा पावसाने सुरुवातीला वाट पाहायला लावून, चिंता करायला लावून, एकदम जो कोसळला तो नद्या, नाले मुसळधार पावसाने दुथडी भरून वाहिल्या, इंद्रायणीला पूर आला. आळंदी जलमय झाली. मावळ मध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळला, जनजीवन विस्कळीत तर झालेच पण, शेवटी देहू आळंदीला येणाऱ्या वारकर्यांना सुरक्षेसाठी पुण्यातच थांबण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने वारकरी पुण्यात आधीच मुक्कामी पोहोचले होते.

दरवर्षी पेरण्या करून मराठवाड्यातील वारकरी भक्त वारीत सामील होत असतात. यंदा काही ठिकाणी पाऊस पडला नाही तर ते तसेच पेरण्या न करता सामील झाले आहेत. विठ्ठलाच्या भरवशावर. पावसाची आणि पुढील वर्षाची शेताची जबाबदारी पांडुरंगाच्या शिरावर टाकून भक्त या भक्तीच्या पदयात्रेत सामील होतात.

वारीचा इतिहास बघितला तर लक्षात येते कि, वारी म्हणजे तीर्थयात्रेची नियमित प्रथा. म्हणजे पवित्र स्थळी दर वर्षी जाणे येणे. भागवत धर्माचा प्रसार तेराव्या शतकात सुरु झाला तेंव्हाच वारीची परंपरा पण सुरु झाली. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी आणि संत तुकारामाच्या घराण्याने ही पायी वारी परंपरा जोपासली. ही परंपरा ७०० ते ८०० वर्षांची आहे. अजूनही ही परंपरा तेव्हढ्याच उत्साहाने आणि श्रद्धेने साजरी करतात. पंढरपूर आणि वारी हे भक्तीचे अविभाज्य प्रतिक आहे. वारी हा श्रद्धेचा उत्सव असतो. सामुदायीक पदयात्रा असते,


ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पादुका पालखीतून नेण्याची परंपरा तुकाराम महाराजांचे सुपुत्र जगद्गुरू नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये सुरु केली असे म्हणतात. एकत्र निघणार्या या पालख्या १८३२ पासून वेगवेगळ्या स्वतंत्र मार्गाने जाऊ लागल्या.

वारकरी आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला वर्षातून एकदा जातात.अशा चार तीर्थयात्रा निघतात. चैत्र वारी, कार्तिक वारी, आषाढी वारी, माघी यात्रा. वर्षातील सर्वात मोठी तीर्थयात्रा म्हणजे आषाढी एकादशीची यात्रा, यालाच देवशयनी एकादशी म्हणतात. याच दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरु होते असे म्हणतात. व चातुर्मास सुरु होतो.

वारीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात जात धर्म भाषा आणि श्रीमंत गरीब असा भेदभाव नसतो. सगळे एकाच पातळीवर, एकाच उद्देशाने विठ्ठलाच्या दर्शनाच्या हेतूने च एकत्र प्रवास करतात. वारीत सामील असलेला भक्त वारकरी शिस्तीचे पालन करतो. वेळेचे पालन करतात. सेवाभाव हा मुख्य गाभा असतो. प्रवासात अन्नदान पाणी दान आणि वारकर्यांची सेवा करणे याला खूप महत्व आहे. ही परंपरा समजून सर्व जण ते फॉलो करतात. यात दिंड्यांचे निरीक्षण केले तर खूप गोष्टी बघायला मिळतात. वारीच्या मार्गावर रस्त्यारस्त्यात वारकर्यांची व्यवस्था केलेली असते. तिथे पायी चालून दमलेल्या भक्तांना पायाला तेल चोळून देणे मसाज करणे, बरे नसेल तर औषध पाणी विचारणे, काहीही मदतीची गरज भासली तर ती त्याच्या पर्यंत पोहोचविणे, मुक्कामाच्या ठिकाणी त्यांच्या साठी सोयी सुविधांचा लाभ उपलब्ध करून देणे.

या बाहेर गावाहून आलेल्या दिंड्या जिथे मुक्काम करतात तिथले दृश्य तर बघण्यासारखे असते. वारीतलेच लोक छोटी छोटी दुकाने थाटतात. इस्त्रीची सोय असते, दाढी कटिंग साठी दुकान अर्थात हे सलून म्हणजे फक्त खुर्ची टाकलेली किंवा खाली काही अंथरून त्यावर बसायची सोय केलेली. चहा कॉफीचे दुकान- हे बरोबर ट्रकमधून आणलेले छोटेसे टेबल मांडून केलेलं अमृतपेयाचे दुकान, पाण्याची व्यवस्था असते.ट्रक मध्ये तर, परिसरातील रहिवासी वारकर्यांची सेवा, त्यांना झोपायला जागा देऊन, सकाळचा नाश्ता देऊन आणि दोन्ही वेळचे जेवण देऊन सेवा करतात.

गल्ल्या गल्ल्यातून वारकऱ्यासाठी जेवणाच्या पंगती बसतात. शिवाजीनगर मधील आमच्या इमारती मधे आळंदीकर शहा पालखी मुक्काम काळात सर्व वारकर्यांना सकाळी गरम गरम पोहे आणि चहा यांची सोय करतात. या माउलींची सेवा घडावी म्हणून त्यांच्या मदतीला सर्व रहिवासी स्वखुशीने हजर राहतात. हे गेली अनेक वर्षे आम्ही पाहत आहोत. उजवीकडे गल्लीत नांदेड चि दिंडी थांबली होती. अत्यंत सुनियोजित वेळापत्रक असते त्यांचे. दिंडी प्रमुख स्पीकरवर सर्व सूचना देत होते. सकाळी अकरालाच जेवायला बसलेल्या वारकऱ्यांना, “पानात काहीही टाकू नका, जेव्हढे हवे तेव्हडेच घ्या, जेवणानंतर सुंदरकांड आहे. त्यानंतर भजन, हरीपाठ, कीर्तन असे एकापाठोपाठ नामस्मरणाचे कार्यक्रम जाहीर केले. संध्याकाळीच लवकर जेवणे करून लवकर झोपून उद्या पहाटे ३ लाच उठून आवरून तयार व्हायचे आहे आणि पहाटे ४ ला पुण्याहून पुढे मार्गस्थ व्हायचे आहे.” आणि खरच २,३ दिवस मुक्कामी असलेल्या विठुरायाच्या भक्तांचा हा वैष्णवांचा मेळा पहाटेच उठून पंढरीकडे रवाना झाला.आज दोन्ही पालख्या ज्ञानेश्वर माउलींची सासवड मार्गे लोणंद -फलटणकडे आणि तुकोबारायांची पालखी बारामती सणसर कडे निघाली आहे.


                                   
                                                 चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥१॥

डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥

संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥२॥

तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥३॥

जन्म नाहीं रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥४॥

                                        - संत तुकाराम

                                                             जय जय रामकृष्ण हरी !

                                               (सर्व फोटो मायाजाल वरून साभार परत)

       - डॉ.नयना कासखेडीकर,पुणे.

                        ------------------------------------------------                 

No comments:

Post a Comment