Monday, 6 July 2020

‘ विचार – पुष्प ’ भाग ३




विचार – पुष्प भाग ३    



                                       बालमानस – १  

                
                 लहान मुलांचे मानसशास्त्र हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. बाल वयात ते आपले आई वडील,     
            घरातील लहान मोठे आणि संपर्कातील माणसे यांचे निरिक्षण करीत असतात. ते काय बोलतात ते    
           नीट ऐकून मनात साठवत असतात. ते मूल जिज्ञासू असेल तर विचारायलाच नको. कारण या
          बालवयात होणारे संस्कार त्याला आयुष्यभर पुरत असतात.
         
       नरेंद्र असाच सर्वांपेक्षा वेगळा. त्याला प्रत्येक गोष्टींचे कुतूहल असे. दुपारच्या वेळी कुटुंबातल्या सर्व स्त्रिया एकत्र जमून रामायण महाभारताचे वाचन करीत असत. त्या कथा नरेंद्रला फार आवडत, रामायणाच्या तर विशेष आवडत. श्रीराम आणि सीता यांच्या विषयी तर नरेंद्रच्या मनात अपार श्रद्धा व भक्ति उत्पन्न झाली होती. एव्हढी की त्यांच्या मूर्ति आणून त्याने खोलीत ठेवल्या आणि त्याची रोज पुजा पण होऊ लागली. एकदा राम कथेच्या कीर्तनात त्याने ऐकले की हनुमंत केळीच्या वनात असतो. त्या बालबुद्धीला खरेच वाटले. कीर्तनकारांना त्याने विचारले, की मला हनुमंत त्या वनात भेटेल का ? कीर्तनकाराने  समजूत काढायची म्हणून, हो म्हटले. आणि नरेंद्र हनुमंताला भेटण्यासाठी  त्या केळीच्या वनात गेला,  खूप वेळ बसला तरी त्याची भेट झाली नाही. निराश होऊन तो परत आला आणि आईला संगितले .आईने “ प्रभु रामाचंद्राने काहीतरी काम सांगितलं असेल म्हणून तो तिकडे गेला असणार अस सांगून बालमनाची समजूत काढली खरी. आणखी एकदा असाच अनुभव त्याला आला.
       
     त्यांच्याकडे नोकर चाकर होते ते अदबीने वागत बोलत .प्रेमळ होते ते. त्यांच्या मुलांशी गप्पा ही होत असत. एकदा नरेंद्रशी बोलत असताना एका नोकराने म्हटले, “विवाह किती वाईट गोष्ट आहे” तर प्रपंचत किती कटू अनुभव येतात तेही त्याने नरेंद्रला संगितले. या बोलण्याचा नरेंद्रवर इतका खोलवर परिणाम झाला की त्याल वाटले, राम आणि सीता या देवतांना आपण मानतो. पण त्यांचा विवाह झाला आहे आणि त्या क्षणीच प्रभू रामचंद्र नरेंद्रच्या मनातून उतरले, त्याने आईकडे धावत जाऊन हे संगितले. पण ती माऊली या बालमानला काय समजवणार? भुवनेश्वरी देवी म्हणल्या. “तू असं कर, श्रीरामांच्या ऐवजी शिवाची पुजा कर. हे म्हणणे पटले. अर्थातच नरेंद्रला हे माहिती नसावे की शिव पार्वती यांचा ही विवाह झालेला आहे म्हणून. त्या बालबुद्धीने लगेच वर खोलीत जाऊन राम -सीतेच्या मूर्ति काढून टाकल्या आणि शिवाची मूर्ती आणून त्याची स्थापना केली. मोठा होई पर्यन्त शिवाची पुजा चालू होती.

      असे घडत असते बालमन. बालवयात मुलांना घडवताना त्यांची जिज्ञासा, त्यांचे कुतूहल पूर्ण करताना आईवडिलांनी आणि मोठ्यांनी खूप विचारपूर्वक उत्तरे दिली पाहिजेत. आपण स्वताही वागताना नीट काळजी घेतली पाहिजे.

© डॉ.नयना कासखेडीकर                                                                                       

ही मालिका ज्यांना ऑडिओ स्वरुपात ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या


या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा. 

Sunday, 5 July 2020

‘ विचार – पुष्प ’भाग २






                                       'विचार पुष्प' भाग- २ 




स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ---                 

                                                      खरे शिक्षण
                
         मुलांना कोणत्या शाळेत घालायचं हा मोठा प्रश्न आजच्या पालकांसमोर असतो. खरय की शिक्षण आपल्या आयुष्यातला महत्वाचा घटक असतो. शिक्षण हे औपचारिक आणि अनौपचारिक दोन्हीही . औपचारिक शिक्षण म्हणजे शालेय , महाविद्यालयीन, पुस्तकी शिक्षण, तर अनौपचारिक शिक्षण  म्हणजे घरात कुटुंबात,बाहेर समाजात, आजूबाजूला घडणार्‍य घटना यातून मिळालेले शिक्षण व मोठ्यांनी केलेले  संस्कार सुद्धा. शाळेत घेतलेले पाठ्यपुस्तकांतले शिक्षण म्हणजे निव्वळ  माहिती असते. ब्रिटीशांनी घालून दिलेल्या या शिक्षण पद्धतीमुळे आपल्या देशात जीवनमूल्ये शिकवणार्‍या, व्यवहारज्ञान शिकविणार्‍या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. शिक्षण क्षेत्रातली आजची स्थिति बघता स्वार्थ आणि मानवी मूल्यांची घसरण याच वरचढ होत आहेत.

          हे तर स्वामी विवेकानंदांना तेंव्हाच कळलं होत. त्यांचाही या शिक्षण पद्धतीला विरोध होता. शिक्षणविषयी त्यांची मते आजही  डोळे उघडणारी आहेत. ते म्हणतात, “ आपल्याला जीवन घडविणारे, माणूस निर्माण करणारे, व चांगले विचार आत्मसात करविणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही जर चार पाच विचार आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरविलेत तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणार्‍या व्यक्तिपेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल. जे शिक्षण सामान्य लोकांमध्ये चारित्र्यबल, सेवा, तत्परता आणि साहस निर्माण करू शकत नाही ते काय कामाचे? यामुळे किल्ली दिलेल्या यंत्रासारखे तुम्ही राबता. ज्यामुळे सामान्य  माणूस स्वताच्या पायावर उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण. चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण आम्हाला हवे आहे”

        हे स्वामी विवेकानंदांचे विचार आजही तंतोतंत लागू आहेत. आजच्या शिक्षण क्षेत्राला आणि देशाला पण .आजच्या घडीला भरकटलेला युवक, टंगळमंगळ करुन वेळ वाया घालविणारा युवक, दिशा नसणारा व ध्येय नसणारा युवक, रस्त्यारस्त्यात, चौकात हास्यविनोद करणारा, छेड छाड करणारा, आंदोलने, मोर्चे यात स्वार्थासाठी व कुणी संगितले म्हणून सहभागी होणारा युवक उद्याच्या भारताची चिंता आहे.        

© डॉ.नयना कासखेडीकर                                                                                       

ही मालिका ज्यांना ऑडिओ स्वरुपात ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या  या 
 playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

लिंकवर जाऊन यू ट्यूब व्हिडिओ बघावा. 

Saturday, 4 July 2020

‘ विचार – पुष्प’ भाग १





स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ---     विचार – पुष्प
   
     भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तीला,योग्य दिशा देणार्‍या व्यक्तीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक ,वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.
   
एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतर्राष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा  गुरू झालेले स्वामी विवेकानंद.
    
आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले. अनुयायी तयार केले. भारतीय संस्कृती बरोबरच इतर धर्म व परंपरा यांचाही जवळून अभ्यास व चिंतन केले. त्यासाठी प्रवास केला. भेटी घेतल्या, ग्रंथ वाचन केले. 
  
या जीवनात स्वामी विवेकानंद अनेक गोष्टींना सामोरे गेले. त्यांनी अनेक अनुभव घेतले. त्यांच्या जीवनात अनेक घटना घडल्या. त्यातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे. यात त्यांच्या बालपणा पासूनचे प्रसंग, कौटुंबिक प्रसंग, त्यांचा भारत प्रवास, त्यांना भेटलेली माणसे, त्यांची धर्म ,विज्ञान ,अध्यात्म याविषयीची मते, वाचकांना कळावीत आणि या व्यक्तिमत्वाचा येणार्‍या पिढीला परिचय व्हावा हाच उद्देश आहे. यासाठी अनेक लेखकांनी लिहीलेल्या स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा संदर्भ वापरला आहे. लॉक डाऊन काळात ही मालिका लिहिली आणि अत्यंत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आज ४ जुलै, स्वामी विवेकानंद यांचा स्मृतीदिन. आजपासून रोज एक भाग विचार-विश्व या माझ्या ब्लॉग वर जगभरातल्या वाचकांना वाचायला मिळेल.               

१. ध्येय  
          
       जीवनात, आपली प्रत्येकाचीच काहींना काही ध्येये असतात.म्हणजे स्वप्नच म्हणाना. आपल्याला सन्मान मिळावा, आपल्याला उत्तुंग यश मिळावं. आपला प्रत्येक प्रयत्न यशस्वी व्हावा.आणखी बरच काही. मग त्याप्रमाणे आपण प्रयत्नांची शिकस्त ही करत असतो. कोणाचं मार्गदर्शन घेत असतो. सल्ला घेत असतो. एखादी व्यक्ती पण आपल्याला प्रेरणा देणारी असते.त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते.आणि आपण पुढे जात असतो. आपल्या जीवनात एखादा आदर्श आपल्यासमोर असेल तर आपले ठरवलेले ध्येय  लवकर साध्य करता येते.
       
       स्वामी विवेकानंदांच्या मते, एखाद्याच्या समोर आदर्श असेल तर तो मनुष्य एखादीच चुक करेल, पण जर समोर आदर्शच नसेल तर तो मनुष्य मात्र, अगणित चुका करेल.म्हणून जीवनात एखादा आदर्श असणे महत्वाचे आहे असे विवेकानंदांना वाटते. ते म्हणतात, युवकांनी उदात्त ध्येये ठेवली पाहिजेत, ती साध्य  होईपर्यन्त त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. प्रगतिच्या वाटेवर त्यांचे पाऊल सतत पुढेच पडले पाहिजे.यश प्रयत्नपूर्वक खेचून आणले पाहिजे”. त्यासाठी त्यांच्यात हवी दुर्दम्य इच्छाशक्ती. ती असेल तर तुम्हाला अपेक्षित असलेले यश, मान सन्मान, कीर्ती नक्कीच प्राप्त होईल. अपयशाला सामोरं जाऊन ते यशामध्ये बदलविण्याचे धाडस आपल्यात हवं. मग आपले भाग्य आपल्याच हातात हे अनुभवायचे असेल तर आत्मनिर्भर व्हायला  हवे.   



© डॉ.नयना कासखेडीकर     
ही मालिका ज्यांना ऑडिओ स्वरुपात ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या 

https://youtu.be/ItBZQhUesYI 

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा.सर्व भाग ऐकण्यासाठी खाली लिंक दिली आहे .   

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk

Thursday, 18 June 2020

‘क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता’ राणी लक्ष्मीबाई


               
क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता राणी लक्ष्मीबाई



सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में भी आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥
 --- सुभद्रा कुमारी चौहान

       भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात फक्त वीर पुरुष सहभागी नव्हते झाले, तर, साहसी विरांगना पण सामील झाल्या होत्या. मंगल पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूरशाह यांच्या बरोबरच झाशीच्या राणी लक्ष्मी बाई या ही बरोबरीने लढल्या.   
     एकोणीसाव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील एक अग्रणी सेनानी होत्या राणी लक्ष्मीबाई. त्यांच्या शौर्यामुळे क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता म्हणून त्यांचं अढळ स्थान आजही आपल्या मनात कायम आहे. राणी लक्ष्मीबाईंचे ग्वाल्हेर इथले समाधी स्थळ पाहून, कविवर्य भा.रा.तांबे म्हणतात,
  
              ``रे हिंद बांधवा, थांब या स्थळी । अश्रू दोन ढाळी।।
                ती पराक्रमाची ज्योत मावळे  । इथे झांशीवाली ।।''

       आणि हो खरच, हे समाधी स्थळ बघताना आपण भारावून जातो, नतमस्तक होतो आणि दोन अश्रु ढाळल्याशिवाय कुठलाच हिंदुस्तानी (आपल्या देशाचा इतिहास माहिती असलेला) तिथून बाहेर पडत नाही. हा माझाही अनुभव आहे. हे पावन तीर्थ म्हणजे, ग्वाल्हेरच्या जवळ १८ जून १८५८ रोजी, सकाळी सकाळीच ब्रिटिश सैन्याने हल्ला चढविला आणि राणी लक्ष्मी बाई रणांगणात धाव घेऊन तलवारीचे सपासप वार करत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. दोन्हीकडून आलेल्या सैन्यांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. ही परिस्थिति लक्षात घेऊन राणी आपल्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या आणि जरा पुढे जात नाही तसा ओढा लागला आणि घोडा अडला. नेमका आता त्यांचा नेहमीचा घोडा नव्हता. हा घोडा, ओढा ओलांडला तयार नव्हता आणि त्याच वेळी घात झाला. इंग्रजांशी लढतांना रक्तबंबाळ होऊन राणी लक्ष्मी बाई खाली कोसळल्या. ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला तिथेच या लढवय्या राणी लक्ष्मी बाईंचे स्मारक आणि समाधी बांधली आहे. तेच हे स्थळ. या क्रांतिकारकांच्या स्फूर्तीदेवतेला वीरमरण येऊन १८ जून २०२०ला १६३ वर्ष पूर्ण होत आहेत.
           
        



   १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण त्या आधी १८५७ पासून स्वातंत्र्याचा क्रांतिकारक लढा आपले सेनानी लढत होते. मेरठ च्या लष्करी छावणीतल्या बंडापासून याला सुरुवात झाली होती. मग हे बंड सर्व भारतात पसरले. १८५७ चा हा इंग्रजी सत्तेविरुद्ध केलेला पहिला भारतीय स्वातंत्र्य लढा होता. याला राजकीय,सामाजिक, आर्थिक धार्मिक आणि लष्करी अशी अनेक कारणे होती. तेंव्हा वर्षभर चाललेल्या युद्धात इंग्रज विजयी झाले पण, यामुळे का असेना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात तर झाली.  

         खरे निमित्त झाले होते, ईस्ट इंडिया कंपनीकडून अवलंबलेले साम्राज्यवादी धोरण आणि जनतेवर लादलेले जुलुमी शासन .या कंपनीने अनेक भारतीय प्रदेश जिंकले. कंपनीच्या सैन्यातील भारतीय आणि ब्रिटिश सैन्यात, सोयी सुविधा आणि पगारामध्ये भेदभाव केला जात होता. कंपनी काही नगदी पिकं जबरदस्तीने घ्यायला लावून ती भारतीय लोकांकडून स्वस्तात विकत घेऊन, चीनला मोठ्या नफ्यात विकत असे. कामगार आणि शेतकरी यांच्याकडून कर वसूली मोठ्या प्रमाणात केली जात असे. हा सगळा जाच भारतीयांना असह्य झाला होता. त्यांना सुटका हवी होती त्यामुळे शिपायांनी हे बंड पुकारलं होतं.         

       गव्हर्नर जनरल डलहौसीने १८५७ च्या पूर्वीच अनेक लहान मोठे प्रांत हस्तगत केले होते. अनेक संस्थाने खालसा झाली. आपल्या साम्राज्य विस्तारासाठी इंग्रजांनी १८३३ पासून १८५७ पर्यन्त अनेक युद्धे केली होती.
इंग्रजांची सत्ता खिळखिळी करण्यासाठी भारतात सगळीकडे प्रयत्न सुरू झाले. उठाव झाले ते मोडून इंग्रजांनी दिल्ली, लखनौ, माळवा ताब्यात घेतले. झाशीला वेढा दिला. तिथे राणी लक्ष्मी बाई इंग्रजांशी लढली.
          
      लढणे ही किमया तर लक्ष्मी बाईंनी म्हणजे मणिकर्णिका ने लहानपणीच साधली होती. चिमाजी आप्पांचे  कारभारी मोरोपंत तांबे आणि भागीरथी बाई यांची कन्या मणिकर्णिका उर्फ सर्वांची मनू. ती चार वर्षांची असताना मातृछत्र हरपलं. लहानगी मनू त्यामुळे सतत वडिलांबरोबर राहत असे. मूळचे खांदेशातल्या जळगाव जिल्ह्यातले पारोळा गावचे मोरोपंत, पेशव्यांच्या आश्रयाला होते त्यामुळे ते ब्रम्हावर्तात राहायला होते. तिथे मनुच्या बरोबरची दुसर्‍या बाजीरावांची दत्तक मुले, नानासाहेब पेशवे ,रावसाहेब पेशवे आणि बाजीरावांकडे दानाध्यक्ष म्हणून काम करणारे पांडुरंग टोपे यांचा मुलगा तात्या टोपे अशा सर्वजणांचं बालपण एकत्र गेलं. रामायण महाभारताची पारायणे त्यांनी एकत्र केली. मराठ्यांचा इतिहास एकत्र वाचला. एकत्र शिक्षणा बरोबरच ब्रम्हावर्तातल्या कार्यशाळेत, आख्याड्यात, घोडेस्वारी, तलवारबाजी, बंदूक चालविणे, पिस्तूल, जांबिया चालविणे, असे सर्वच धडे गिरविले होते. अश्व परीक्षेचे सर्व मापदंड तिला माहिती होते, युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत ती पारंगत होती. मल्लखांब मध्ये पण ती तरबेज झाली. युद्धाचे डावपेच पण शिकली. लिहिणे, वाचणे याबरोबरच मोडी लिपि शिकली.
         

   
       
         मूळच्या कुठल्याही राजघराण्यातली नसतानाही पेशव्यांच्या राजघराण्यात मात्र ती वाढली होती. वडिलांबरोबर दरबारात जात होती. तिला सर्वजण छबेली म्हणून हाक मारत. राजवाड्यात सर्वांची लाडकी झाली होती छबेली. लहानपणी नाना घोड्यावर बसले की छबेली पण घोड्यावर बसायची. ते हत्तीवर बसले की ही पण हत्तीवर बसायचा हट्ट करायची. बाजीरावांनी तिला आपल्या मुलाप्रमाणेच मानलं होतं. या राजवाड्यात तीन वीर घडत होते जे १८५७ च्या लढ्यात देशासाठी आपल्या जिवाची बाजी लावून इंग्रजांशी लढणार होते. जेंव्हा श्रीमंत नानासाहेबांनी स्वातंत्र्य रणपटावर आपला फासा कानपुरला टाकला तेंव्हाच त्यांच्या या बाल मैत्रीण छबेली ने आपला फासा झाशीवर टाकला होता. 
        
       जात्याच चपळ आणि हुशार असलेली मनू लग्नाची दिसू लागली. मोरोपंत वरसंशोधनास लागले होतेच. इकडे त्याचवेळी झाशी चे संस्थानिक गंगाधरराव नेवाळकर पत्नी गेल्यामुळे पुनर्विवाहासाठी कुलीन कन्येच्या शोधात होते, कर्तबगार गंगाधर पंतांची रयतेवर चांगली जरब होती. मनूचा विवाह गंगाधर पंतांशी झाला आणि ती झाशी संस्थांनाची राणी लक्ष्मी झाली. लग्नानंतर दरबारातल्या कामकाजात राणीने लक्ष घालणे गंगाधरपंताना मान्य नव्हते. स्वतंत्र वृत्तीत वाढलेली स्वछंदी मनू लग्नानंतर जणू बंधनात राहू लागली. पण म्हणून राणी लक्ष्मीबाईने गप्प न बसता आपला वेळ व्यायाम, कसरती, घोडेस्वारी, रोज सुरू ठेवत, बरोबरच्या सर्व सामान्य महिलांनासुद्धा एकत्र करून याचे शिक्षण देऊ लागली. त्यात त्यांना पारंगत केले. याचा प्रत्यक्ष उपयोग ब्रिटीशांनी हल्ला केला तेंव्हा घोडदळात झाला. तेंव्हा हे महिलांचे सैन्य कामी आले.
          
         झाशी संस्थानच्या राणीला मुलगा झाला. संपूर्ण झाशी आनंदित झाली होती. गंगाधरपंत ही आनंदात होते. गादीला वारस मिळाला होता. आनंदोत्सव साजरा झाला. पण तीन महिन्याचा होऊन त्या मुलाचा मृत्यू झाला. गंगाधरपंत दु:खी झाले.सगळी झाशी दुखी झाली. हा आघात गंगाधरपंताना सहन झाला नाही. संस्थांनाच्या वारसा हक्कासाठी दत्तक पुत्र घेण्याचे ठरविले. दत्तक विधान झाले. मुलाचे नाव दामोदर ठेवले. थोड्याच दिवसात गंगाधरपंत निवर्तले. पण याच वेळी, हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसी ने घेतला होता. झाशी संस्थान पण खालसा करून जाहीरनामा काढण्यात आला. हे दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकार मध्ये विलीन करण्यात आले. पण नुसत्या कागदोपत्री हे संस्थान खालसा होणार नव्हते. जिथे नानासाहेबांनी अशा न्याय  व अन्यायाचे उत्तर इंग्रजांना दिलेच होते. तसेच नानांची ही बहीण छबेली थोडी गप्प बसणार होती? तिघेही जण एकमेकांच्या संपर्कात होते, एकमेकांना मार्गदर्शन आणि सहकार्य करत होते. आता झाशी वर इंग्रजांचा अधिकार राहील अशी इंग्रजांची क्रूर आणि कुटिल नीती कळताच राणी लक्ष्मीबाई अपमान आणि मानभंगामुळे संतापून कडाडली, “मेरी झांसी नाही दूंगी!”

          राणीची नित्याची दिनचर्या चालू होती. इंग्रजां विरुद्ध लढणारी ही रणलक्ष्मी पती निधनानंतर श्वेत वस्त्र परिधान केल्यावर शीतल आणि सौम्य  दिसायची. एव्हढच काय या घटनेनंतर त्यांनी नथ वगैरे सारखे सौभाग्य अलंकार कधीच घातले नाहीत. इंग्रजांनी केशवपनास काशीला जाऊ दिले नाही म्हणून डोक्यावर केश सांभार तसाच ठेऊन प्रायश्चित्त म्हणून ,रोज अभ्यंग स्नानानंतर त्या अर्घ्य सोडत असत. नंतर तुलसी पुजा आणि पार्थिवलिंग पुजा. पूजेअर्चे नंतर गायन- वादन, पुराण श्रवण होत असे. त्यांचे देवदर्शनाला जाणे थाटामाटात असे. कधी मेण्यात, कधी घोड्यावरून जात. त्या प्रमाणे वेष पण परिधान करत असत. मेण्यातल्या स्वारीपुढे डंका निशाण, हलके वाजणारी रणवाद्य, निशाण्यामागून दोनशे विलायती लोक, मागेपुढे शंभर स्वार, कारभारी, मुत्सदी, मानकरी, भैय्यासाहेब उपासने, आश्रित मंडळी आणि शिबंदीचे लोक, इत्यादि असत. शिंगे कर्णे वाजत. बंदुकीचे शेकडो आवाज निघत, मग बुरुजा वरील चौघडा राणी दर्शनाहून परत येईपर्यंत वाजत राही. त्यांच्या दरबारात मोठ मोठे शास्त्री, विद्वान, वैदिक पंडित,याज्ञीक, पुराणिक, गवई, सतारवादक नामांकित कारागीर होते. त्यांची स्वता जातीने लक्ष घालून काळजी घेत. त्यांना चांगल्या गुणांची कदर होती. शिपायांच्या तब्येतीची आत्मियतेने चौकशी करत. त्यांचा पराक्रम गौरवीत,          

       यानंतर राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावरून राजवाड्यात राहायला गेल्या. जून १८५७ मध्ये शिपायांचा पुन्हा उद्रेक झाला तेंव्हा इंग्रज पळून गेले होते आणि पुन्हा राणी किल्ल्यावर राज्यकर्ती झाली पण परिस्थिति बिकट होती. खजिना रिकामा, मनुष्यबळ नाही, प्रजा भ्यायली होती. पण ही परिस्थिती लक्ष्मीबाईंनी खूप धीराने आणि खंबीरपणे हाताळली. प्रजेतल्या लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. धोरणीपणाने जुन्या विश्वासातील लोकांना बोलावून त्यांना महत्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या. कुणाला सल्लागार मंडळात घेतले. निकामी तोफा पुन्हा सुरू केल्या.

       लक्ष्मी बाई दानशूर आणि श्रद्धाळू  होत्या. त्यांनी रंजले गांजलेले गोरगरीब आणि साधू संन्याशी यांच्यासाठी दानधर्म केला. गोवध बंदी सुरू केली. काही सण आणि धार्मिक कार्यक्रम सुरू केले. कल्याणकारी कामे मार्गी लावली. कलेला प्रोत्साहन दिले. त्यांना नाटकांची हौस होती. ग्वाल्हेर मध्ये नाटके होत, त्या मराठी नाटकांचे प्रयोग त्या झाशी मध्ये आयोजित करत असत. नाटक कंपनीची तेव्हढे दिवस खाण्या पिण्याची सोय करत. राजा हरिश्चंद्र, रासक्रीडा, बाणासूरी आख्यान होई. विशेष म्हणजे नाट्य कलाकारांना दरबारात बोलावून, नाटकासाठी पात्रांना लागणारी जरीची वस्त्रे, खर्‍या हिर्‍याचे दागिने समोर मांडून त्यातून निवडायला सांगत. त्यांच्या पुढे सारा खजिनाच मोकळा ठेवत. त्यामुळे नाटकात पात्रे अधिकच खुलून दिसत असत. राणी साहेब ही नाटके तीन तीन तास बसून बघत असत. दरबारातल्या स्त्रियांसाठी त्या खास प्रयोग ठेवत असत.               

         झाशीतल्या स्त्रियांसाठी राणीने किल्ल्यावर हळदी कुंकवासारखे कार्यक्रम आयोजित केले. त्यांच्या दरबारी असलेल्या विष्णुशास्त्री भट यांनी या हळदीकुंकू कार्यक्रमाचे वर्णन त्यांच्या पुस्तकात करून ठेवले आहे. ते वाचून एखादा राजा किंवा राणी म्हणजे राज्यकर्ता आपल्या प्रजेवर किती प्रेम करतो हे लक्षात येते. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात किती सवाष्णींच्या बांगड्या फुटणार माहिती नाही म्हणून आणि लढाई सुरू व्हायच्या आधी योद्धे आपल्या बायकांना माहेरी वा सुरक्षित स्थळी पाठवणार, मग परत भेट होईल की नाही अशा अवस्थेत राणीने हा एकत्रीकरणाचा कार्यक्रम योजला होता,
        
      १८५७ चा चैत्र महिना होता. राणीने झाशीतल्या आणि आसपासच्या एकूण एक स्त्रियांना आपल्याकडील हळदीकुंकू समारंभास आदराने निमंत्रित केलं होतं. भव्य महालात चैत्र गौरीची प्रतिष्ठापना केली होती. त्याची गौरीची सजावट, मांडणी आणि सुशोभन दोन मजली इतके उंच होते. मागच्या दारातील मोठ मोठ्या टाक्यांमधून मणांनी हरभरे भिजत घातले होते. शंभर ते दीडशे जणी फक्त हळदी कुंकू लावायला उभ्या होत्या. तेव्हढ्याच जणी अत्तर, गुलाबपणी, खिरापत द्यायला आणि स्वत: राणी जातीनं गुलाब पुष्प देऊन सर्व महिलांचं स्वागत करायला उभी होती. या हळदीकुंकू समारंभास एक लाख सुवासिनींनी हजेरी लावली होती. एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीचं जाणलेलं मन हे राणीच्या संवेदनशील मनाची साक्ष देतं. स्त्री असल्यामुळेच तिनं उद्या भविष्यात या झाशीच्या महिलांवर काय प्रसंग येऊ शकतो याचा विचार केला होता. ती एक खंबीर योद्धा असली तरीही ती एक स्त्री होती. राणी आणि झाशीतली प्रजा यांच्यात चांगले नाते निर्माण झाले होते.      

          सर्व संस्थानात इंग्रजांविरुद्ध लढ्याची तयारी जोरात चालू होती. मेरठ झाले, कानपुर झाले. आता झाशी.  झाशी १८५७ च्या संग्रामाचं एक प्रमुख केंद्र बनलं. इंग्रजांनी झाशीवर आक्रमण केले. राणीने किल्ल्याची तटबंदी सर्व बाजूने मजबूत केली. ते पाहून इंग्रज सेनापती हयू रोज पण आश्चर्य चकित झाला होता.राणीने फौजांना धीर दिला. रणांगणावर तुम्हाला मरण आले तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची सर्व व्यवस्था मी करेन. असे आश्वासन पण दिले,   
      
         ४ एप्रिल १८५७ ची रात्र. नऊ दिवस नऊ रात्र अखंड शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा इंग्रजांनी झाशीचा पाडाव केलाच. दुर्दैवाने झाशीच्या बाबतीत राणी अपयशी ठरली. राणीने किल्ल्यावरून झाशीचे हृदय द्रावक दृश्य पाहिले. शांत आणि सुंदर झाशी शहराची वाताहत झाली होती. ती बघून तिचे मन दुखी कष्टी झाले. मुख्य दरवाजाचे रक्षण करणारेच शूर गोलंदाज खुदाबक्ष आणि गुलाम घोष खान इंग्रजांच्या गोळ्यांना बळी पडल्याचे कळताच, राणीवर आणखी एक आघात झाला. तिच्या मनात आले शेवटी इंग्रजांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातच दारूगोळा पेटवून चितेवर स्वर व्हावे, पण एका अनुभवी वृद्ध सरदाराने राणीसाहेबांना धीर दिला. आत्मघात हे पाप आहे असे सांगीतले आणि आजच्या रात्री इंग्रजांची फळी तोडून, पेशव्यास जाऊन मिळावे असा सल्लाही दिला. हा विचार राणीसाहेबांना पटला.
      
         


         जाण्यापूर्वी सर्वांचा निरोप घ्यायला राणीसाहेब बाहेर आल्या आणि म्हणल्या, “मी तुमचा सर्वांचा आणि माझ्या या प्रिय झाशीचाही आता निरोप घेते आहे, महालक्ष्मीची मर्जी असेल तर, पुन्हा आपल्या भेटी होतीलही . खुल्क खुदा का, मुल्क बादशहा का, अंमल राणी लक्ष्मीका. राणी लक्ष्मी तर निघून चालली आहे. पण माझ्या या प्रिय भारतात परमेश्वरचा मात्र कधीही पराभव होणार नाही. माझी श्रद्धा आहे ही. त्याचा ध्वज उभा ठेवण्यासाठीच हा संग्राम आहे”.असे म्हणून सर्वांना नमस्कार करून संगितले की, ज्यांना इंग्रजांना शरण जायचं आहे त्यांनी शरण जा, ज्यांना माझ्याबरोबर यायचं आहे त्यांनी या, ज्यांना इथेच थांबायचे आहे त्यांनी इथेच थांबा, माझी सर्व कोठारं खुली आहेत काय हवं ते घ्या. स्वताचं रक्षण करा. काल्पी वर लावलेला स्वराज्याचा जरीपटका त्यांना खुणावत होता. म्हणून त्या काल्पीला गेल्या.
          
           इंग्रजांच्या तावडीतून सुटून दामोदरला घेऊन राणी काल्पिला तात्या टोपे यांना जाऊन भेटली. दोघे मिळून त्यांच्या सैन्यांसह ग्वाल्हेरच्या मदतीला धावले. सैन्याची नियमित कवायत सुरू ठेवली. तिच्या बरोबर मंदर आणि काशी ह्या जिवलग दासीही होत्या. आणि मोर्चे बांधणीचा विचार सुरू असतानाच, १८ जूनला ब्रिटिश अधिकारी स्मिथ आपल्या सैन्यासाह ग्वाल्हेरला येऊन धडकला होता.

        मर्दानी पोशाख चढवलेली राणी लक्ष्मी तिच्या दासीसह आपल्या तंबूत सरबत पित होती, सावध होतीच. त्या वेळीच, ग्वाल्हेर ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळ्या दिशांनी चढाई केल्याचं कळलं आणि त्याला तोंड द्यायला राणी लक्ष्मीबाई तंबूतून सपकन बाहेर आली, घोड्यावर स्वार झाली, तळपत्या समशेरीसह रणांगणात उतरली. शूर राणी लक्ष्मीबाई, समोर येणार्‍या प्रत्येक ब्रिटिश सैन्याला सपासप तलवारीने कापत होती. आपले सैन्य धारातीर्थी पडून कमी होत होते तरी भंगलेल्या सैन्याला गोळा करत राणी सर्वांच्या पुढे शौर्याने झुंजत होती.  
      
         इंग्रजी योद्ध्यांना त्यांनी बेजार केले. तळपणार्‍या या विजेचा अवतार पाहून ब्रिटिश सैन्यही आवेशाने लढत होते. आधल्या दिवशी परतवून लावलेला स्मिथ, आपल्या नव्या सैन्याला घेऊन हट्टाला पेटून लढत होता. तेव्हाढ्यात, “बाई साहेब, मेले, मेले” असा आवाज कानी आला. त्यांची दासी धारातीर्थी कोसळली होती. मारणार्‍या फिरंग्याच्या अंगावर राणी धावून गेली आणि आपल्या दासीला मारणार्‍याचा सुड घेतला. अचानक दोन्ही कडून फौजा आल्या हे ओळखून राणी लक्ष्मी बाई त्यातून बाहेर पडली आणि घोड्याला टाच देऊन शत्रूच्या टप्प्यातून राणी निसटली पण, थोडं पुढे जाताच घोडा अडला. कारण समोर ओढा होता. तो ओलांडायला घोडा तयार होईना. यावेळी नेमका राणीचा राजरत्न हा नेहमीचा घोडा नव्हता. तेव्हढ्यात इंग्रजी घोडेस्वार राणीच्या अंगावर कोसळले, पण काहीही झालं तरी शरण जाणं नाही. मरेपर्यंत लढायच हाच निश्चय होता. अनेक तलवारींशी एकटीची तलवार भिडत होती. आघातावर आघात होत होते. एकाने मागून राणीच्या मस्तकावर वार केला. छातीवर दूसरा वार झाला. राणी लढता लढता  कोसळली. आज ती शौर्यस्फूर्तीच्या शिखरावर विराजमान झाली होती. या शेवटच्या क्षणी पण, तिने आपल्यावर वार करणार्‍या गोर्‍या सार्जंटचा चुराडा केला. मानिनी होती ती. युद्ध करून रणांगणावर मरण येणे केंव्हाही चांगले असेच राणीला वाटत होते. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये व विटंबना होऊ नये असे आधीच सहकार्‍यांना सांगून ठेवले होते. शत्रूची नजर चुकवून सहकार्‍यांनी राणीला जवळच्याच गंगागीर बुवा यांच्या पर्णकुटीत नेले. इंग्रजांच्या हातात पडण्याआधीच सेवक रामचंद्र याने राणीला स्वातंत्र्य समराच्या चितेवर ठेऊन अग्नी दिला.
         
       ब्रिटीशांनी राणी लक्ष्मीबाईंना हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क म्हटले आहे. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राणीच्या पराक्रमाची जाणीव ठेऊन आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला राणी झाशी रेजिमेंट असे नाव दिले. स्वामी विवेकानंदांना पण राणीबद्दल तिच्या शौर्याबद्दल अभिमान वाटत होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर या रण लक्ष्मी बद्दल खूप गर्व आहे. ते म्हणतात, “लक्ष्मी राणी आमची आहे हे म्हणण्याच्या मान आपल्याला आहे. तो इंग्लंडच्या इतिहासाला अजून मिळालेला नाही. इटलीत एव्हढी मोठी राज्यक्रांती झाली पण, राणी लक्ष्मी सारखी कुणी झाली नाही. हा गर्व करण्याचं भाग्य हे भारत भू तुलाच आहे .” खरंच, आपण सर्व भारतवासी भाग्यवान आहोत.  
       
        


        मी एकदा ग्वाल्हेरला गेले असताना, हातात असलेल्या वेळात प्रसिद्ध संगीत सम्राट तानसेन यांची समाधी, सूर्यमंदिर हे बघून, या समाधी स्थळाला भेट देता देता रात्रीचे साडेसात- आठ वाजले, रिक्षावाला म्हणाला बंद होईल आता. पण जाऊन बघू, नशिबात असेल तर उघडे असेल. असे म्हणून आम्हीही आग्रह केला आणि त्या रस्त्याने रिक्शा घ्यायला लावली. शेवटच्या दहा पंधरा मिनिटात आत धावत जाऊन का असेना, दर्शन घ्यायचे होते. आणि इच्छा पूर्ण झाली. आधीची मनस्थिती म्हणजे हे ठिकाण बघायचे एव्हढीच होती. पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आत गेल्यावर वेगळीच अनुभूति घेतली. झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष लढाई लढली त्या जागेवर आपण उभे आहोत हा विचारच स्फूर्ति देणारा होता. अभिमान वाटत होता. तिथून पाय निघेना. मन इतिहासातल्या घटना शोधू लागलं. अंगावर रोमांच उभे राहिले. अंत:करण भरून आलं.               
ग्वाल्हेर च्या कोटा की सराय मधल्या रण राणी च्या या समाधीस्थळाला साश्रूपूर्ण वंदन करून, जड पावलाने तिथून निघालो.

 ©  डॉ. नयना कासखेडीकर

                    ------------------------------------------------------------------    

Friday, 24 April 2020

व्यंग लेखक डॉ. शंकर पुणतांबेकर


                        व्यंग लेखक डॉ. शंकर पुणतांबेकर

           हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध व्यंगकार, साहित्यिक, कादंबरीकार, दिवंगत डॉ. शंकरराव पुणतांबेकर यांच्या येथे शब्द माझे जळती या पुस्तकाचे प्रकाशन, शुक्रवार  दिनांक २७ डिसेंबर २०१९, रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. दामोदर खडसे यांच्या हस्ते संध्याकाळी ५ वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाले. त्या निमित्त पुस्तकाचा परिचय करून देणारा हा  लेख.   

          
                         


           ‘येथे शब्द माझे जळती हा पुस्तकाचे नाव वाचून, वाचक नक्कीच संभ्रमात पडले असतील की शब्द जळती... ?  म्हणजे काय. नक्कीच हे पुस्तक वेगळे आहे. यातल्या सर्व रचना समाजातल्या व्यंग्यावर, विरोधाभासावर  विचार करायला लावणार्‍या आहेत. आपण रोजच दैनिकांमध्ये, मासिकांमध्ये व्यंगचित्र बघत असतो, वाचत असतो. हे चित्र अत्यंत बोलक असत. त्या व्यंगचित्रकाराला काय सांगायचं आहे ते तो चित्राच्या भाषेत मांडतो. ते बघून आपणही मनातल्या मनात हसतो. कारण ते परिणामकारक असतं. तुमच्या डोळ्यासमोर आर. के.  लक्ष्मण, शि. द. फडणीस यांची व्यंगचित्रे आली असणार. एखादं चित्र किंवा फोटो हजार शब्दाचं काम करतं. हाच परिणाम साधत असतं व्यग्यकाराचं व्यंग लेखन. फक्त ते चित्रांऐवजी शब्दातून भाष्य करतं. ते वाचकांना बोचणारं असतं.
           
         या पुस्तकात लेखक डॉ. पुणतांबेकर सरांनी व्यंगछटा असलेल्या छोट्या छोट्या रचनांचा रूपबंध मांडला आहे. तो वाचकांशी प्रत्यक्ष हितगुज करतो. व्यंगप्रकार, व्यंगत्मक लेखन हिन्दी साहित्यात आपल्याला दिसतो. मराठीत शब्दात आला नाही. मराठीत जो  विनोद प्रकार आहे ते व्यंग नाही, तो ह्युमर आहे. व्यंग म्हणजे विडंबन. या दोन्ही प्रकारांची निर्मिती विसंगती आणि विकृती यामुळेच होते. विनोदामुळे हसू येते पण व्यंगामुळे वाचक गंभीर होतो. मनोरंजनाबरोबर तो अंतर्मुखही होतो. झेंडूची फुले या केशवकुमार अर्थात आचार्य अत्रे यांच्या विडंबन काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेत स.ग. मालशे म्हणतात, “विडंबनकार आणि त्याचा वाचक हे दोघेही समंजस आणि अभिरुचिसंपन्न, कल्पक आणि बुद्धीमान असावे लागतात”.
           
           पुणतांबेकर सरांच्या शैलीतले उदाहरण म्हणजे, हर बिरबल को अकबर नही मिलता’, किंवा, वह प्रोफेसर हो कर भी विद्वान है यातला उपहास आपल्याला  गंभीरपणे विचार करायला भाग पाडतो.
डॉ. शंकरराव रघुनाथ पुणतांबेकर ! प्रसिद्धीपरांगमुख व्यक्तिमत्व, मराठी असले तरी हिन्दी साहित्य विश्वातले एक अत्यंत महत्वाचे नाव. अत्यंत संवेदनशील. जन्माने मध्यप्रदेशातील गुणा जिल्ह्यातले म्हणजे हिन्दी भाषिक प्रदेशातलेच. पण त्यांचा शैक्षणिक प्रवास मात्र, ग्वाल्हेरला बीए, आग्र्याहुन एल॰ एल॰ बी., आग्र्यातच हिन्दी व इतिहासात एम.ए., पुण्यातून हिंदीत पीएच डी आणि मग विदिशा आणि जळगाव येथील महाविद्यलयांमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा. सर्व शिक्षण हिंदीतूनच झाले. त्यामुळे की काय पण त्यांची साहित्य निर्मितीही साहजिकच हिंदीत झाली.  
          अगदी सुरूवातीला त्यांनी हिन्दी एकांकिका आणि लघुकथा, हास्य व्यंग, व्यंग निबंध, कादंबरी, कथा असे अनेक व्यंग प्रकार हाताळले. १९५६ साली प्रथम कल्याणी ही एकांकिका लिहून आपल्या साहित्य निर्मितीला सुरुवात केली. व्यंगचा अभ्यासपूर्ण परिचय करून देण्याच्या दृष्टीने केलेल्या श्रमाचा परिपाक म्हणजे व्यंग अमरकोश हा सुमारे नऊ हजार पेक्षा जास्त हिन्दी शब्दांचा कोश. हिन्दी साहित्यात त्यांनी हा नवा प्रयोग केला.
               सरांना १९९५ साली हिन्दी व्यंगात्मक लेखनासाठी दिला जाणारा अखिल भारतीय चकल्लस पुरस्कार मिळाला तेंव्हा त्यांची मुलाखत मी घेतली होती. ते स्वता:च्या व्यंग लेखन प्रवासाबद्दल म्हणाले होते, “आपल्या आसपास घडणार्‍य घटना, प्रसंग, विविध व्यक्तींच्या वागणुकीतून आढळणार्‍य विसंगतीचे लोकांपुढे केलेले भेदक दर्शन म्हणजे व्यंग. हे लिखाण एका वेगळ्या शैलीत व्हायला हवे. त्यामुळे त्यात परिणमकरकता येते, केवळ विनोद निर्माण करणे एव्हढेच यात अभिप्रेत नाही. तर त्यात वास्तवाचे चित्रण हे एक विशिष्ट परिणाम साधण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर, उमेदीच्या काळात विशेषत:  व्यावहारिक आयुष्याला सुरुवात करताना ज्या अनेकानेक विसंगतीपूर्ण अनुभवांना मला सामोरे जावे लागले, त्यामुळे या प्रकारात आकर्षित होऊन, मी लिहिण्यास उद्युक्त झालो.
               
           व्यंग हा काही केवळ हास्य निर्मिती साठी केलेला विनोद नसतो. त्यापेक्षाही काहीतरी वेगळं असतं. हास्य’, दर्द भूलनेका नशा जगाता है’,  तो, व्यंग’, नशा भुलने का दर्द जगाता है.  कोणतीही विसंगती समाजासाठी, समाजरचनेतील अनेक घटकांसाठी नुकसानकारक व हानिकारक असते. त्याचे दर्शन तेव्हढ्याच उत्कटतेने समोर यायला हवे. लेखणीच्या फटकार्‍यातून ही तीव्रता समजू शकते. हा आसूड, फटका, प्रहार आमच्या मनात क्षोभ व चीड निर्माण करु शकतो. ही माणसाला अंतर्मुख करायला लावणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे विचारांची आंदोलने व भावनांचे कल्लोळ उसळतात. व्यंग लेखनाला भाषेची समृद्धी आहे पण विषय विविधता नाही. आपल्याकडे तर जातीप्रथा, शिक्षण, नैतिक मूल्यांचे अध:पतन असे महत्वाचे विषय आहेत की त्यांचे विदारक स्वरूप तेव्हढ्याच तीव्रतेने लोकांपुढे यावयास हवे. पण तसे होत नाही, कारण परिणांकरकता आणि कसदार विचारांपेक्षा लिखाणाद्वारे मिळणारी लोकप्रियताच महत्वाची वाटते।               
  
        व्यंगात इतकी शक्ति आहे की, लेखक व टीकाकारांनी उपरोध आणि वक्रोक्तिपूर्ण लिखाण समजाऊन घेतले  पाहिजे. तेंव्हाच त्याची शक्ति आणि परिणामकारकता कळेल. तेंव्हाच हा साहित्य प्रकार आणखी लोकप्रिय होईल. व्यंग लिखाण मातब्बरांच्या लेखणीतून अक्षररूप घेण्याची वाट पाहत आहे.”  सरांच्या मते, व्यंगाच्या व्याख्येत मुख्य तीन घटक आहेत ते म्हणजे, विसंगती, त्यातून निर्माण झालेले विसंगतीचे दर्शन आणि ते मांडण्याचे कौशल्य .

          सरांनी कादंबरी, निबंध, नाटक हे प्रकार हाताळले. व्यंग लेखनास त्यांचे प्राधान्य होतेच. यावर त्यांची जवळ जवळ 30 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.व्यंग अमर कोशा बरोबरच शतरंग के खिलाडी, व्यंग संग्रहाचे आठ खंड, की ज्यात एक हजार रचना आहेत. एक मंत्री स्वर्ग लोक मे , जहा देवता मरते है , या कादंबर्‍या. यातले एक मंत्री स्वर्गलोकमे चे मराठीत भाषांतर डॉ. ओमप्रकाश शर्मा यांनी केल आहे. श्रीधर दिक्षित यांनी सरांच्या कथा मराठीत भाषांतरित केल्या आहेत. रावण तूम बाहर आओ’, माल रोड मर्डर’, सफेद कौए काले हंस’, दरखास्त ही नाटके त्यांनी लिहिली आहेत. व्यंग लेखनाचे बहुतेक सर्व पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

          हरियाली और काटे या कादंबरीला केंद्रीय हिन्दी निदेशलायचा पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा हिन्दी साहित्य अकादमीचा पुरस्कार, मध्यप्रदेश साहित्य संघ, भोपालचा अक्षर साहित्य पुरस्कार, तसेच अखिल भारतीय चकल्लस पुरस्कार मिळाला आहे.

           एव्हढे मोठे साहित्यिक असूनही ते सहजच आमच्यात मिसळत, गप्पा मारत, भेटायला येत, नेहमी पत्राला उत्तर देत. सणावाराला पत्ररूपी ग्रिटींग आणि आशीर्वाद पाठवत, कधीही घरी गेलं की कायम त्यांच्या पुस्तक खोलीत लिखाण करत असायचे. हसतमुखाने स्वागत करत गप्पांच्या महफिलीत सामील व्हायचे. आपल्या सहकारी आणि मित्र मंडळीत मनमोकळ्या आणि धीरगंभीर, पारदर्शक स्वभावामुळे त्यांनी प्रेमादर संपादन केला होता. कोणताही भपका आणि प्रसिद्धीच्या झोतापासून ते नेहमीच दूर असायचे. त्यामुळेच ज्ञानपीठ पुरस्करपासून ते वंचित राहिले याची हळहळ साहित्य क्षेत्रात सुद्धा व्यक्त होते. त्यांच्या अकृत्रिम वागण्यामुळे आणि सहज वृत्ती मुळे आम्ही सर्व च प्रभावित झाल्यावाचून राहायचो नाही. एकदा तर पत्रकारितेच्या कोर्स साठी त्यांची मुलाखत घ्यायची होती तर चक्क ते स्वत:च आमच्या घरी आले मुलाखत द्यायला. 

         


आज ते नाहीत. पण ते असतानाच तेथे शब्द माझे जळती हे पुस्तक तयार झाले होते. पण प्रकाशन राहिले होते करायचे . हे पुस्तक म्हणजे आकाशवाणी जळगाव केंद्रासाठी रोज सकाळी प्रसारित होणार्‍या विचारपुष्प या वैचारिक मालिकेसाठी केलेलं त्यांच्या शैलीतील लिखाण आहे. त्यांचीच प्रस्तावना आहे.  ६८ रचनांचा खजिनाच आहे यात. गावठी मालती, एक होते बाळासाहेब, आमच जगणं, पडदा, आत्मा जीवंत आहे, एक अदृश्य तारा, सोमनाथ, मध्यमवर्गीय जीवनशैली, श्रद्धा अंधश्रद्धा प्रवास असे कटू वास्तव सांगणार्‍या व्यंगछ्टा यात आहेत, हरिभाऊ आपटे, भाऊसाहेब खांडेकर, ना.सी.फडके, टॉलस्टॉय यांच्याही छटा आहेत.हे पुस्तक मराठी वाचकांना व्यंग्य कळावे आणि त्यांना आस्वाद घेता यावा, तसेच मराठी लेखकाने व्यंग्य लेखांकडे वळावे म्हणून त्यांनी लिहिले आहे.

--- डॉ. नयना कासखेडीकर

                       ----------------------------------------------------------------------