Friday, 11 September 2020

विचार–पुष्प,भाग-४८

 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

                      विचार–पुष्प,भाग-४८ 

                    असामान्य, अद्वितीय, स्वामी विवेकानंद

 आणि सर्वधर्म परिषद सुरू झाली. धर्मविषयक वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होत होत्या. यात प्रामुख्याने दोन भाग केले होते, पहिला भाग होता, प्रत्येक धर्मातील तत्वचिंतन आणि विविध सिद्धांत, तर दुसर्‍या भागात, परमेश्वराचे स्वरूप, धर्माचे महत्व, ईश्वरी साक्षात्कार, परमेश्वरचा अवतार, अंनैतिकतेच्या कल्पना असे विषय ठेवले होते. या चर्चा  दहा दिवस चालल्या होत्या. तर उत्तरार्धात चर्चेचे विषय होते, कौटुंबिक जीवन, ललितकला, विज्ञानातील शास्त्रे, नीतीविषयी सिद्धांत, अखिल मानवमात्रा विषयीचे प्रेम, ख्रिस्तधर्मप्रचारक मिशनर्‍यांची कार्यपद्धती. भिन्न धर्माच्या अनुयायांनी एकमेकांना समजून घ्यावे हा हेतु होता.

  परिषदेच्या चौथ्या दिवशी, बॉस्टनचे रेव्हरंड जोसेफ कुक यांनी आवेशात विषय मांडला, तो असा, “आपण ईश्वराला टाकू शकत नाही किंवा आपली सद्सद्विवेक बुद्धी बाजूला सारू शकत नाही. मानवाच्या आत्म्याला शांती देईल, आपल्या पापांचे भान राखून ईश्वरापुढे नम्र होण्यास शिकवेल, असा कोणता धर्म या पृथ्वीवर वा परलोकात कोठे असेल, तर तो ख्रिस्त धर्म हा एकमेव होय”.

याशिवाय आपल्यावरची टीका समजून घेणारे आणि त्या टीकेपासुन आपण काय शिकावे याचा विचार करणारे पण काहीजण होते. रशियातून आलेले सर्जी वोल्कोन्सकी आणि केंब्रिजचे कर्नाल थॉमस वेंटवर्ध हिगीसन्स हे दोन जण समजून घेणारे होते. धर्म आकाशा एव्हढा व्यापक आणि सर्वांचा समावेश करून घेणारा हवा असं मत त्यांनी मांडलं. तर विवेकानंदांच्या विचारांचं त्यांनी स्वागत केलं.

हिंदुधर्मातील मूर्तीपूजेवर ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून फार टीका होत असे. तिला उद्देशून बॉस्टनच्या रेव्हरंड ई.एल.रेक्सफोर्ड यांनी आपल्या निबंधात म्हटले की, “जोवर कोणतेही दैवत रूप एखाद्या व्यक्तीच्या विनम्र `मनाला आणि अंतकरणाला धरून ठेवीत आहे तोवर न्यायाच्या दृष्टीने विचार केला, तर कोणाही माणसाला त्यावर निष्ठूरपणे प्रहार करता येणार नाही . एखादी मूर्ती फोडून टाकण्याचा खरा अधिकार या जगात एकाच व्यक्तिला असतो. आणि ती म्हणजे, जीने त्या मूर्तीची पूजा केली असते. त्या मूर्तीचे आपल्या दृष्टीने आता काही काम उरले नाही हे केवळ ती व्यक्तीच म्हणू शकते. आणि हे निश्चित आहे की, जी ईश्वरी शक्ती या सर्व आकारांच्या द्वारे, कार्य करीत आहे आणि त्या सर्वांना आपले माध्यम बनवीत आहे, ती दिव्य शक्ती एखाद्या ओबडधोबड मूर्तीच्या द्वारा देखील आपल्या बालकापर्यंत पोहोचू शकते”. ख्रिस्ती धर्माचे बहुतेक सारे प्रतिनिधी हिंदू धर्मावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत.

    विवेकानंदांच्या भाषणातून चैतन्य सळसळत असायचे त्यामुळे हा विलक्षण प्रभाव कसा रोखायचा ही चिंता सतत धर्मोपदेशकांना होती. म्हणून त्यांचा हिंदू धर्मावरचा हल्ला परिषद पुढे जात होती तसतसा प्रखर होत गेला.

              
  विवेकानंदांनी आपला हिंदू धर्मावरचा निबंध नवव्या दिवशी सादर केला. सकाळपासून आरोप प्रत्यारोप,टीका असे करत विवेकानंदांना संध्याकाळी पाच वाजता व्यासपीठ मिळाले. विषय हिंदू धर्म आहे हे माहिती असल्याने कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. सर्वजण जागा मिळावी म्हणून तासभर आधी येऊन बसले होते. काहींना प्रवेश मिळू शकला नाही इतकी गर्दी झाली. कोलंबस सभागृह गच्च भरले होते. स्त्रियांची संख्या जास्त होती.

      आठवडा झाला विवेकानंद आपल्या हिंदू धर्मावर होत असलेली टीका आणि ख्रिस्त धर्माचा गौरव ऐकत आले होते. हिंदू धर्माला कमी लेखले जात होते त्यामुळे, स्वामीजींचा स्वाभिमान डिवचला गेला होता. त्यांनी या टीकेचा कठोर शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, “ आम्ही पूर्वेकडून आलेले प्रतिनिधी गेले काही दिवस इथे बसलो आहोत आणि एका अधिकारपदाच्या भूमिकेतून आम्हाला सांगितलं जात आहे की, आम्ही सर्वांनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार करायला हवा. का? तर ख्रिस्त धर्मीय राष्ट्रे आज सर्वात अधिक प्रगतिशील आहेत.

आम्ही आता आमच्या आसपास पाहतो, तर आम्हाला असं दिसतं की इंग्लंड हे ख्रिस्त धर्मीय राष्ट्र आज जगात सर्वात पुढारलेले आहे आणि ते पंचवीस कोटी लोकांच्या मानेवर पाय रोवून उभं आहे. आम्ही इतिहासात मागे वळून पाहतो, तर आम्हाला आढळून येतं की, ख्रिस्तधर्मी युरोपच्या समृद्धीचा प्रारंभ स्पेन पासून झाला. त्या स्पेनच्या समृद्धीची सुरुवात झाली ती, मेक्सिको वर आक्रमण करण्यापासून,आपल्या बांधवांचे गळे कापून ख्रिस्त धर्म प्रगतीशील होत जातो. अशा प्रकारची किंमत देऊन मिळणारी समृद्धी सौम्य प्रकृतीचा हिंदू स्वीकारणार नाही.

       मी इथे बसलो आहे. आणि मी जे काही सारं ऐकलं तो असहिष्णु वृत्तीचा कळस होता. इस्लाम धर्माचे गोडवे गायलेले मी आता ऐकले, हे मुसलमान भारतात हातात तलवार घेऊन अत्याचार करीत आले आहेत. रक्तपात आणि तलवार ही हिंदूंची साधनं नाहीत. त्यांचा धर्म सर्वांविषयीच्या प्रेमाच्या आधारावर उभा आहे. यावर श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

           

 
 हे तर जगातल्या ख्रिस्त धर्मियांबद्दल झाले. पण, भारतात मिशनरी हिंदू धर्माचा प्रचार करतात त्याला म्हणावे तेव्हढे यश येत नाही. यावर विवेकानंद म्हणाले, “एका हातात बायबल आणि दुसर्‍या हातात तलवार घेऊन तुम्ही येता.ज्या तुमचा धर्म केवळ कालपरवाचा म्हणावा, ते तुम्ही आम्हाला उपदेश करण्याकरता येता ज्या आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी तुमच्या धर्माइतकीच उदात्त तत्त्वं आणि भगवान येशू ख्रिस्ताएव्हढीच पावन जीवनं यांचा आदर्श हजारो वर्षांपूर्वीच घालून दिला आहे. तुम्ही आम्हाला पायाखाली तुडविता आणि आपल्या पायाखाली असणार्‍या धुळी एव्हढीच किंमत आम्हाला देता. आमच्या लोकांना दारू पिण्यास शिकवून तुम्ही त्यांना अधोगतीचा रस्ता दाखविता. आमच्या स्त्रियांचा तुम्ही अपमान करता. आमच्या धर्माची हेटाळणी करता, की जो धर्म अनेक दृष्टीने तुमच्या धर्मापेक्षा सरस आहे, कारण तो माणुसकी अधिक जपणारा आहे. आणि असं सारं केल्यावर तुम्ही विचारात पडता की भारतात ख्रिस्ती धर्माचा एव्हढा थोडा प्रसार का होतो? याचं कारण मी सांगतो, याचं कारण हे आहे की, तुम्ही मंडळी त्या येशू ख्रिस्तासारखी नाही, की ज्याच्या बद्दल आम्हाला आदर वाटावा. तुम्हाला असं वाटतं का, त्याच्याप्रमाणच सर्वांसाठी प्रेमाचं संदेश घेऊन, त्याच्या सारखी ऋजुता व नम्रता धारण करून आणि इतरांसाठी कष्ट घेण्याची व काहीतरी सोसण्याची तयारी ठेऊन तुम्ही आमच्या दाराशी आलात,तर आम्ही तुमचं स्वागत करणार नाही? नाही, तसं कधी होणार नाही. अशा भूमिकेनं जो कुणी आमच्याकडे येईल त्याचं म्हणणं आम्ही आमच्या प्राचीन ऋषींचं म्हणणं ऐकण्याइतकच आदरानं ऐकू”.

विवेकानंदांनी मिशनर्‍यांच्या प्रचार पद्धतीवर कडक टीका केली आणि त्यांनी काय केल तर भारतात त्यांचं स्वागत होईल हे ही संगितले. वीस सप्टेंबरला पापी मानवाचा ख्रिस्ताच्या द्वारा होणार उद्धार आणि पेकिंगमधील (आताचा प्रचलित उच्चार बियींग)  धर्म हे दोन विषय मांडले गेले. पण यावरची चर्चा लवकर आटोपली. कारण काही नियोजित वक्तेच आले नव्हते. सभागृह तुडुंब भरलेले. याचवेळी विवेकानंद व्यासपीठावर आलेले दिसले. तर लोकांना हा एव्हढा आनंद झाला.

                         

विवेकानंदांचे चार शब्द जरी ऐकायला मिळाले तरी ते श्रोत्यांना हवे असत. इतक त्यांचं आकर्षण होतं. कित्येक वेळा कंटाळवाणी झालेली भाषणे ऐकून श्रोते निघून जातील अशी भीती वाटली की व्यासपीठावरून सांगितले जायचे की सत्राच्या शेवटी विवेकानंद थोडा वेळ बोलणार आहेत.  मग श्रोते सहनशीलतेने बसून राहत.

20 सप्टेंबरला पेकिंगमधील धर्म हा विषय श्री हेडलँड यांनी मांडला. चीनच्या धार्मिक परिस्थितिबद्दल जी विधाने हेडलँड यांनी केली त्याचा खरपूस समाचार विवेकानंदांनी घेतला. विवेकानंद यांनी ऐनवेळी विषय मांडला, कारण चीनवर होणारी टीका पर्यायाने भारतावर टीका होती. चीनमध्ये बुद्ध धर्म होता. बुद्ध धर्माबद्दल विवेकानंदांना आदर होता. यावर ते म्हणाले, “अमेरिकेतील माझ्या ख्रिस्तधर्म बांधवांनो, चीनी जनतेच्या आत्म्याचा उद्धार व्हावा यासाठी मिशनरी तेथे जातात. चीनमधल्या भीषण दरिद्र्याचा उल्लेख येऊन गेला. मला असं विचारायचं आहे, त्यांच्या आत्म्याचं राहू देत, त्यांची शरीर भुकेमुळे गतप्राण होऊ नयेत म्हणून मिशनर्यांनी कोणते प्रयत्न केले?   

    भारतातील तीस कोटी लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोकांना एकवेळचं जेवण ही पुरत नाही. त्यांना मिशनरी जरूर मदत करतात पण केंव्हा? ते आपला धर्म सोडून ख्रिस्त धर्म स्वीकारतील तेंव्हा. मग हिंदूंना ती मदत मिळत नाही. पूर्वेकडच्या देशांना आज खरी गरज आहे, ती चतकोर भाकरीची. आमच्याकडे धर्म नको इतका आहे. त्यांना अन्न हवं आहे. पण त्यांना धोंडे मिळतात. तेंव्हा तुम्हाला मानवी बंधुत्वाचा अर्थ समजावून द्यायचा असेल तर, हिंदूंशी सहानुभूतीने वागा. मग भले हिंदूंनी आपला धर्म टाकला नाही तरी त्याचा विषाद मानू नका. मिशनरी जरूर पाठवा, पण रोजचे दोन घास अन्न सुलभतेने मिळण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे हे शिकवण्यासाठी पाठवा. तत्वज्ञानातल्या सिद्धांतांचे घोट पाजण्यासाठी पाठवू नका”. ज्यांनी ज्यांनी भारतातल्या दारिद्र्याचा उपहासात्मक उल्लेख केला होता, त्यांना उत्तर म्हणून ते म्हणाले, माणसाची किंमत भारतात, तो दरिद्री आहे का धनवान यावर केली जात नाही. धर्माची शिकवणूक देणार्‍यांच्या बाबतीत तर दरिद्री असणं हे भूषण मानलं जातं. मी स्वत: निष्कांचन आहे. मला ओळखणारे काही लोक इथे व्यासपीठावर आहेत, ते तुम्हाला ग्वाही देतील की, माझं उद्याचं जेवण कुठे आहे हे मला माहिती नाही. अशा अवस्थेत माझी गेली कित्येक वर्षे गेली आहेत. तेंव्हा जवळ पैसा असणं की नसणं याला महत्व नाही. भारतात तर पैसे घेऊन जो धर्म सांगतो तो भ्रष्ट मानला जातो”.

समारोप करताना ते म्हणाले, “आपण सर्वजण जाणतो की, जो ख्रिस्ताचा अनुयायी होत नाही त्याला ख्रिस्त धर्मियांकडून कोणतीही मदत मिळणार नाही. मानवाचं मूलभूत स्वातंत्र्य, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य या गोष्टींना या देशात खूप मोठा मान आहे असं मी कितीतरी वेळा ऐकत आलेलो आहे. मी अद्याप धीर सोडलेला नाही. सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!”  अशा प्रकारे धर्मविषयक सर्व तात्विक प्रश्नांचा ऊहापोह वेगवेगळ्या कार्यक्रमातून झाला.

     विवेकानंदांच्या निबंधाबद्दल भगिनी निवेदिता यांनी मत व्यक्त केले की, असे म्हणता येईल की जेंव्हा त्यांनी बोलण्यास प्रारंभ केला,तेंव्हा त्यांचा विषय होता, हिंदूंच्या धर्मविषयक कल्पना. पण जेंव्हा त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला, तेंव्हा हिंदू धर्म एका नव्या रूपात अवतीर्ण झाला”. तर रोमां रोलां यांनी म्हटलंय, “विवेकानंदांचा निबंध हा भारतामध्ये तीन हजार वर्षात धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान या संदर्भात जे काही चिंतन होत आले होते, त्याचा सारभूत निष्कर्ष होता”. 

निबंधाची मांडणी करता करता विवेकानंदांनी भिन्न धर्माच्या अनुयायांना आपलेसे करून घेतले होते. सर्वांच्या मनात भाव निर्माण केला की आपले मार्ग भिन्न असले, आपल्या विचारधारा वेगळ्या असल्या, तरी  आपण सर्वजण भिन्न मार्गाने जात असलेले पूर्णतेचे यात्रिक आहोत. हेच ते विश्वबंधुत्व होते.

विवेकानंद जे बोलत होते ते फक्त एखाद्या ग्रंथाच्या आधारे नव्हते ,विचारांच्या आधारे नव्हते तर स्वत:च्या अनुभवावर आधारित बोलत होते. त्यामुळे सर्व लोकांना ते खात्रीने पटत होते. सतरा दिवस चाललेली ही परिषद समारोपाकडे वाटचाल करत होती.

 २७ सप्टेंबर, परिषदेचा समारोप. आतापर्यंतच्या इतिहासात कधी झाली नव्हती अशी गर्दी लोटली होती. चोहोबाजूंनी श्रोते तासभर आधीपासून येत होते. कोलंबस आणि वोशिंग्टन सभागृह गच्च भरून गेले होते. सात ते आठ हजार लोक उपस्थित होते . ज्यांना प्रवेश मिळाला नाही ते लांबपर्यंत रस्त्यांवर उभे होते. ही परिषद उद्घाटनापासूनच उत्तरोत्तर यशस्वी होत होती. विवेकानंद व्यासपीठावर दुसर्‍या रांगेत बसले होते. त्या क्षणाला त्यांच्या मनाची अवस्था वेगळी होती. अस्वस्थ होती. लोकांना ते अज्ञात होते, पण आज ते समारोपाला जमलेल्या प्रचंड जनसमुदायातील आणि शिकागो शहरातील प्रत्येकाच्या परिचयाचे झाले होते, त्यांना ओळखत नाही असा एकही माणूस नव्हता. शिकागो शहरात त्यांची मोठमोठी छायाचित्रं लागली होती. त्यावर लिहिले होते, हिंदू संन्यासी विवेकानंद’. ती सर्वांच लक्ष वेधून घेत होती.ते पाहताच येणारे जाणारे त्या छायाचित्रापुढे नतमस्तक होत होते. विवेकानंदांचे नाव अमेरिकेच्या कानाकोपर्‍यात वृत्तपत्राद्वारेपण पोहोचले होते.  

सर्वधर्म परिषदेच्या समारोपात एखाद्या संगीत मैफिलीची भैरवीने सांगता होते तसे विवेकानंदांनी सर्व धर्माच्या अनुयायांना संदेश देऊन भाषण संपवले. ते म्हणाले, “ कोणत्याही ख्रिस्ती माणसानं हिंदू वा बौद्ध होण्याची गरज नाही, किंवा कोणत्याही हिंदू वा बौद्ध माणसाने ख्रिस्त होण्याची गरज नाही. प्रत्येकानं दुसर्‍या धर्मातल सारभूत तत्व ग्रहण करायचे आहे. त्याच वेळी आपलं वैशिष्ट्यही जपायच आहे. आणि अखेर स्वत:च्या स्वाभाविक प्रवृत्तीला अनुसरून आपला विकास करून घ्यायचा आहे”.


भारताच्या गौरवाचं हे सुवर्णाक्षरांनी लिहिलेल पान होतं. विश्वबंधुत्व आणि विश्वधर्म याचा उद्गाता असलेले स्वामी विवेकानंद
, असामान्य! अद्वितीय !   

(सर्व फोटो इंटरनेट वरून साभार परत) 

 

© डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ऐकण्यासाठी You Tube चॅनेल च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन या भागाचा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

 

 

Thursday, 10 September 2020

विचार–पुष्प, भाग -४७

 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

       विचार–पुष्प, भाग -४७                                                          

             सर्वधर्म परिषद उद्घाटन- ११सप्टेंबर १८९३

  सर्वधर्मपरिषद  ही मानवजातीच्या धार्मिक इतिहासातली सर्वात महत्वाची घटना. ही परिषद म्हणजे आपल्याला वाटेल की नेहमी संस्थांच्या होतात तशीच काहीशी ही परिषद असणार. शिकागोला सुरूवातीलाच स्वामी विवेकानंद यांनी ज्या भव्य औद्योगिक प्रदर्शनला भेट दिली होती, ते प्रदर्शन एका महत्वाच्या निमित्तानं भरवलं गेलं होतं. त्याला पार्श्वभूमी आहे. कोलंबस अमेरिकेत उतरलेल्या घटनेला चारशे वर्ष पूर्ण झाली म्हणून अमेरिकेत प्रचंड मोठा महोत्सव होत होता. त्या निमित्ताने जागतिक पातळीवरील अनेक परिषदा आणि प्रदर्शने आयोजित केली गेली होती. हे औद्योगिक प्रदर्शन त्याचाच एक भाग होता. म्हणून यात मनुष्याच्या भौतिक क्षेत्रातली प्रगती आणि अमेरिकेबरोबरच जगातल्या सुधारलेल्या तसेच, अनेक रानटी समाजाचे दर्शन घडवणार्‍या माणसांचे पूर्ण पुतळे, त्यांचे पोशाख, त्यांची अवजारे व हत्यारे, त्यांची खाद्यसंस्कृती, याची माहितीपर मांडणी केली होती. 

   


त्याचप्रमाणे मानवाने केलेली बौद्धिक ज्ञान शाखांची आणि विचारांची वाटचाल याचाही विचार व्हायला पाहिजे असे आयोजकांच्या लक्षात आले. म्हणून १५ ते २८ ऑक्टोबर १८९३ अशा पाच महिन्यांमध्ये वीस परिषदांचं नियोजन करण्यात आल होतं .त्यात अर्थशास्त्र, संगीत, वृत्तपत्रांचे कार्य, महिलांची प्रगती, औषधे आणि शस्त्रक्रिया, व्यापार आणि अर्थव्यवहार, राजव्यवहार आणि कायदा सुधारणा, यांच्या परिषदा झाल्या.

या परिषदेत  जगातल्या त्या त्या विषयांचे तज्ञ सहभागी झाले होते. पण मानवाचे वैचारिक क्षेत्र याची उणीव राहिली असे आयोजकांना वाटून, त्यांनी धर्म आणि तत्वज्ञान या विषयांचे जगातले तज्ञ एका व्यासपीठावर येऊन वैचारिक देवाण घेवाण करतील  तर ते तुलनेने व्यापक ठरेल.या दिशेने विचार सुरू झाला . प्रसिद्ध वकील, विचारवंत चार्ल्स कॅरोल बॉनी यांना ही कल्पना सुचली. सर्वांनी ती उचलून धरली.

                               

यासाठी १८९० ला एक समिति स्थापन करण्यात आली. अध्यक्षपद अर्थातच बोनी यांच्याकडे आले. जगात असणारे धर्मपीठं, पंथ, संप्रदाय यांची माहिती गोळा करण्यात आली. सर्व प्रमुखांना पत्रे आणि पत्रके पाठवली. या अडीच वर्षांच्या काळात दहा हजार पत्र आणि चाळीस हजार परिपत्रके पाठवण्यात आली. जगभरात सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या. त्याच तीन हजार समित्या होत्या. या आकडेवारीवरून आपल्याला ही परिषद किती मोठ्या प्रमाणावर होती ते लक्षात येत.                      

 आपला भारत देश यात असणारच, होय होता. प्रचंड भारतातली विविधता, धर्म पंथ संप्रदाय पण कितीतरी. तरी भारताला एकच समिती होती. या समितीत सामाजिक सुधारणा पुरस्कर्ते आणि रूढी व परंपरांना विरोध करणारे, मद्रासच्या हिंदू वृत्तपत्राचे संपादक जी एस अय्यर, ब्राह्म समाजाचे मुंबईचे बी बी नगरकर व  कलकत्त्याचे प्रतापचंद्र मुजूमदार हे होते. इथे हे लक्षात येते की एव्हढी मोठी धर्म परिषद पद्धतशिरपणे आखणी करून केलेली होती.

                     
नियोजन करताना जगातल्या सर्व धर्माच्या प्रवक्त्यांना एकत्र आणणे,सर्व धर्मात मानी असलेली आणि शिकवली जाणारी समान तत्वे लक्षात घेऊन त्यावर अभ्यासकांची व्याख्याने ठेवणे, कोणत्या धर्माचे काय वैशिष्ट्य आहे त्याचा शोध घेणे, एका धर्म कडून दुसर्‍या धर्माला काय घेता येईल अशा गोष्टी शोधून आणि त्याच बरोबर शिक्षण ,श्रम, संपत्ति, दारिद्र्य मद्यपान निषेध अशा चालू असणार्‍या समस्या सोडवण्यासाठी मार्ग सुचविणे जगत शांतता नांदण्यासाठी ,राष्ट्रीय बंधुभावाच्या आधारे सर्वांना एकत्र आणणे या उद्देशाने ही परिषद भरवली जात होती. यामुळे परस्पर सामंजस्य वाढेल. समाज एकमेकांच्या जवळ येतील, असे त्यांना वाटत होते. खरच या परिषदेचा हेतु किती छान व उपयोगी होता. पण यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत राहिल्या.    

    कोणाला वाटत होते, ही परिषद म्हणजे ख्रिस्त धर्मविरोधी कट आहे, तर कोणी म्हणे ख्रिस्त धर्माच्या तत्वांना हरताळ फासला जाईल, कोणी म्हणे जगात सर्वश्रेष्ठ धर्म ख्रिस्त धर्म आहे, मग इतर धर्मांबरोबर परिषद कशाला हवी? अशी अनेक मते होती. मात्र संयोजकांचा हेतु चांगलाच होता. जगातली जी जी राष्ट्र समृद्ध प्रगत आणि सामर्थ्यसंपन्न होती  ती राष्ट्र ख्रिस्त धर्मियांची होती. पण धर्माचे श्रेष्ठत्व नुसते भौतिक प्रगतीवर आणि समृद्धीवर न ठरता माणसाच्या मनाचे सुसंस्कृत, सदाचरणाने व्यापक असलेले सामर्थ्य यावर पण असते, तेच त्याचे सामर्थ्य असते.असा विचार यामागे होता. त्यामुळे काही विरोध असतांनाही परिषद होऊ घातली होती.

                       
 
ही सर्वधर्म परिषद शिकागो मधील आर्ट इंस्टिट्यूट च्या भव्य अशा इमारतीत भरली होती. कोलंबस आणि वॉशिंग्टन ही दोन भव्य सभागृह या इमारतीत होती. आजूबाजूला तीस लहान मोठ्या खोल्या होत्या. इथे सत्र दिवस परिषदेचे काम चालले होते. विषया नुसार गट पाडण्यात आले होते.कोलंबस सभगृहात चार हजार जण मावतील अशी आसन व्यवस्था होती. तर मोकळ्या जागेत एक हजार प्रेक्षक उभे राहू शकत होते एव्हढी जागा होती. याशिवाय उरलेले तेव्हढेच प्रेक्षक शेजारच्या वॉशिंग्टन सभागृहात बसून राहत आणि त्यांच्यासाठी तीन दिवसांनंतर कोलंबस मध्ये होणारा प्रत्येक कार्यक्रम पुन्हा होत असे.

     ११ सप्टेंबर १८९३ उजाडला. सकाळचे दहा वाजले. आर्ट इंस्टिट्यूट च्या आवारात भल्यामोठ्या घंटेचे दहा टोले वाजले. हे दहा टोले म्हणजे, जगातील दहा धर्माच्या वतीन दिले गेले होते. बोनी यांनी जगातल्या प्रमुख दहा धर्मांची निवड केली होती. हा घंटानाद झाला आणि जगातून आलेले सर्व धर्माचे प्रतींनिधी मिरवणुकीने सभागृहकडे निघाले. या मिरवणुकीत सर्वात पुढे अमेरिकेतील चर्चचे मुख्य पदाधिकारी कार्डिनल गिबन्स आणि परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स कॅरोल बॉनी, त्यामागे कोलंबियन एक्स्पोझिशन च्या महिला अध्यक्षा मिसेस पॉटर पामर व उपाध्यक्षा मिसेस चार्ल्स एच. हेंरोटीन आणि त्यामागे सर्व प्रतींनिधी या क्रमाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. यातून जागतिक सर्वधर्माचे, अनेकरंगी विविधतेचे दर्शन होत होते.चार ते पाच हजार लोक उपस्थित होते तरी निस्तब्ध शांतता पसरली होती. सर्वांच लक्ष वेधून घेणारे ते दृश्य होतं. सर्वांच्या मनात कुतूहल आणि उत्कंठा होती. मिरवणूक सभागृहात प्रवेशली. सभागृहात पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा दोन प्रमुख गटात प्रतींनिधींना बसण्याची व्यवस्था केली होती. हे व्यासपीठ पन्नास फुट लांबीचे आणि दहा फुट रुंदीचे होते.

           
 भारतातून आलेले इतर प्रतींनिधी होते, बुद्धधर्माचे धर्मपाल,जैन धर्माचे विरचंद गांधी, ब्राह्म समाजाचे प्रतापचंद्र मुजूमदार व बी. बी. नगरकर, थिओसोफिकल सोसायटीच्या डॉ. अॅनी बेझंट व ज्ञानचंद्र चक्रवर्ती.

सर्वजण आसनास्थ झाले. सभागृहात ऑर्गनचे गंभीर सूर उमटले आणि सर्वांनी उभं राहून प्रार्थना व श्लोक म्हटले. एका सुरात जणू सर्वजण जगन्नियंत्याची प्रार्थना करत होते, हा ऐतिहासिक क्षण होता.

पहिला दिवस उद्घाटन कार्यक्रमाचा होता.सुरूवातीला सर्व धर्म प्रतींनिधींचे स्वागत करणारी भाषणे झाली. एमजी त्याला उत्तर देणारी प्रतिनिधींची आठ भाषणे झाली. विवेकानंद हे सारं वातावरण भारलेल्या मनाने पाहत होते अनुभवत होते. विशाल जंसमूह पद्धतशिरपणे आखलेला एक सुंदर कार्यक्रम त्यांना प्रथमच पाहायला मिळत होता. याचवेळी त्यांना आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव झाली होती. नाव पुकारल्या नंतर एकामागून एक वक्त्यांची भाषणे होत होती .उत्तम प्रतिसाद मिळत होता.

विवेकानंद पुरते गोंधळून गेले होते, आत्मविश्वास वाटेना, आपण बोलू शकू का? घसा कोरडा पडला . छाती धडधडत होती. शब्द फुटेना. कारण ते काहीच तयारी करून आले नव्हते. सर्वजण तयारीने आले होते . दोन तीन वेळा नाव पुकारले तर आता नको म्हणून ते उठले नव्हते. ते अनेक वेळा असे बोलले असतांनाही भीती वाटत होती कारण आताचा प्रेक्षक वेगळा होता,

शिकागो शहरातले उच्च विद्याविभूषित श्रोते समोर होते. ख्यातनाम विद्वान होते. विचारवंत होते, पत्रकार होते. सार्‍या जगातून आलेले प्रतींनिधी विद्वान प्रवक्ते तर होतेच, पण ते अधिकृत प्रतिनिधी होते. त्यांच्या मागे त्यांची संस्था उभी होती. आपल्या मागे तर कोणीच नाही. म्हणून विवेकानंद यांचा धीर सुटला होता एका क्षणी. पण अचानक उपनिषदातील अहम ब्रह्मास्मि हे वचन मनात चमकले आणि त्याच क्षणी त्यांच्या हृदयात सामर्थ्य संचारले.

दुपारच्या सत्रात चार प्रतिनिधींची भाषणे झाली. आता पुन्हा विवेकानंदांचे नाव पुकारले गेले. तेंव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या फ्रेंच प्रतींनिधी जी.बॉनेट मॉवरी त्यांना म्हणाले, आता थांबू नका, बोला! तेंव्हा विवेकानंद आसनावरून उठले, विद्येची देवता सरस्वतीचे मनोमन स्मरण केले. समोरील प्रेक्षकांवरुन दृष्टी फिरवली आणि म्हणाले,

 “अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधुनो” या पाहिल्याच वाक्याला कंठाळ्या बसणारा टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या भाषणाला टाळ्या पडल्या होत्या पण पाहिल्याच संबोधनाला असा प्रतिसाद नव्हता मिळाला, त्यांनाही आश्चर्य वाटले. टाळ्या थांबण्याची वाट पाहत विवेकानंद थांबले होते. शांतता झाल्यावर पुन्हा बोलायला सुरुवात केले. “सुंदर शब्दांमध्ये जे आपले स्वागत केले गेले आहे त्याबद्दलचा आनंद अवर्णनीय आहे. जगातील सर्वात प्राचीन असा हिंदू धर्म, त्यातील सर्वसंगपरित्यागी संन्याशांची परंपरा यांच्या वतीने मी जगातील सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मन:पूर्वक धन्यवाद देतो”.  त्यांनी परिषदेच्या आयोजकांचे आभार मानले. आधी बोललेल्या वक्त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रत्येक मताबद्दलची सहिष्णुता आणि सर्व जगातील धर्म विचारांच्या बाबतीतली स्वीकारशीलता हे हिंदू धर्माचे वैशिष्ठ्य आहे असे सांगून, पारशी लोक आपल्या जन्मभूमीतून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. त्यांना निश्चिंत पणे राहण्यासाठी आसरा मिळाला. ही ऐतिहासिक घटना सांगून, अशा देशातून आपण आलो आहोत आणि अशा धर्माचा मी प्रतींनिधी आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो. सार्‍या जगातून इथे आलेल्या सर्व धर्म प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आज सकाळी जी घंटा वाजवली गेली, ती सर्व प्रकारच्या धर्म वेडेपणाची मृत्युघंटा ठरेल, लेखणी किंवा तलवार यांच्या सहाय्याने केल्या जाणार्‍या मानवाच्या सर्व प्रकारच्या छळाच्या तो अंतिम क्षण असेल आणि आपआपल्या मार्गाने एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेल्या मानवांपैकी कोणाविषयीही कोणाचाही कोणत्याही प्रकारचा अनुदार भाव यानंतर शिल्लक राहणार नाही. असा मला पूर्ण विश्वास आहे”. असे पाच मिनिटांचे आपले भाषण विवेकानंदांनी थांबवले. आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

हे छोट भाषण उत्स्फूर्त आविष्कार होता. विवेकानंदांनी  परिषदेच्या उद्दिष्टालाच स्पर्श केला होता. स्वागतपर भाषणाला उत्तर म्हणून अशी चोवीस भाषणे झाली. त्यात विवेकानंदांचे विसावे भाषण होते. अजून खरा विषय तर मांडला जायचा होता. ही परिषद सतरा दिवस चालू होती. रोज तीन तीन तासांची तीन सत्रे होत.

  पहिल्याच दिवशीच्या प्रतिसादाने आणि एव्हढ्या अडचणी पार पाडून झालेल्या सहभागाने विवेकानंद खर तर शिणले होते पण रात्री अंथरुणावर पडल्यावर झोप न लागता डोळ्यासमोर समृद्ध अमेरिका आणि आपली दीन दरिद्री मातृभूमी यामधलं प्रचंड अंतर बघून आपल्या देशबांधवांच्या विषयी त्यांच्या मनात करुणा दाटून आली, अस्वस्थ होऊन डोळ्यातून अश्रु वाहू लागले. सकाळच्या यशानंतर पण ते हुरळून नाही गेले तर, जगन्मातेला त्यांनी म्हटले, “माझ्या देशबांधवांचं अपार दारिद्र्य दूर होणार नसेल तर हे नाव आणि किर्ती घेऊन मला काय करायचं आहे? कोण जाग आणेल भारतातल्या सर्व सामान्य जनतेला? जगन्माते कृपा कर, ते कसं करता येईल याचा मला काही मार्ग दाखव”.(सर्व फोटो इंटरनेट वरुन साभार परत)

  © डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ऐकण्यासाठी You Tube चॅनेल च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन या भागाचा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

Tuesday, 8 September 2020

विचार–पुष्प,भाग-४६

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

विचार–पुष्प,भाग-४६ 


                                    सर्व धर्म परिषदेच्या पूर्व संध्येला

    प्रा. जॉन हेनरी राइट स्वामीजींना एका निर्णायक क्षणी साक्षात परमेश्वर म्हणून भेटले. सर्व धर्म परिषदेच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या सर्व सोडवण्यासाठी ते पुढे सरसावले. या परिषदेच्या व्यवस्थापनेतील बरेच प्रमुख कार्यकर्ते राइट यांच्या ओळखीचे होते. प्रा.राइट यांनी प्रतिनिधी निवड समितीचे अध्यक्ष, निवास व्यवस्था पहाणारे प्रमुख यांना पत्रे पाठवली. त्यात त्यांनी लिहिलं, “मला असे आढळून आले आहे की, अमेरिकेतील आपल्या सर्वांचे ज्ञान एकत्रित केले, तरी त्याहून त्या तरुण संन्याशाची विद्वत्ता अधिक भरेल”. असे प्रशस्तिपत्रच जणू त्यांनी पुढे पाठवले होते. त्या बरोबरच स्वामीजींच्या शिकागो पर्यन्त ची प्रवास व्यवस्था केली. कारण त्यांना स्वामीजींची आर्थिक अडचण माहिती होती. शिवाय बरोबर काही पैसे पण दिले आणि संबंधित पदाधिकार्‍यांना परिचय पत्र पण दिली. अशा बहुतेक सर्व अडचणी त्यांनी दूर केल्या होत्या. पैसे मदत म्हणून घेताना स्वामीजींना फार संकोच वाटत होता. हे पाहून, मिसेस राइट यांनी आईच्या पत्रात वर्णन केले ते असे, आपल्याकडचे मिशनरी जसे व्रतस्थ जीवन घालवतात तसेच जवळ जवळ भारतातील सन्याशांचे पण असते. पण एक फरक आहे तो महत्वाचा आहे . की भारतातले संन्यासी केवळ निर्धन असतात. दारिद्र्य हा शब्द फक्त वापरण्यापुरता नाही तर अक्षरश: तसे जगतात, आपल्यासमोर जे येईल त्यावर ते गुजराण करतात.

                   
  आता विवेकानंद निघाले सालेम इथं. तारीख २८ ऑगस्ट १८९३ . विवेकानंदांना मिसेस सॅनबोर्न यांच्या घरी भेटलेल्या मिसेस तन्नत वुड्स यांच्या घरी. त्याही प्राध्यापक होत्या. त्यांनी पुस्तके लिहिली होती. त्यांचा काही संस्थांशी संबंध होता. विमेन्स नॅशनल प्रेस असोसिएशन च्या उपाध्यक्षा होत्या. स्त्रीयांचे प्रश्न आणि अधिकार यावर त्या काम करत. त्यांची दी थॉट अँड वर्क्स क्लब ही संस्था होती. या संस्थेत त्यांनी विवेकानंदांची दोन व्याख्याने आयोजित केली. विषय होता भारतीयांचा धर्म आणि भारताची आजची परिस्थिती

       या व्याख्यानला खूप लोक उपस्थित होते. विषय धर्माचा असल्याने अनेक धर्मोपदेशक होतेच. मिशनरी होते. त्यामुळे अनेक खटके उडाले, वादविवाद झाले, प्र्श्नोत्तरे झडली. मिशनर्यांनी आपल्या भारतातल्या कामाचा डांगोरा अमेरिकेत पिटला होताच. त्यामुळे तिथे भडकपणे रंगवलेला हिंदू धर्माचा भाग आणि विपरीत देश असं चित्र उमटल होतं. भारत हा अतिशय मागासलेला आणि रानटी देश आहे आणि तिथे मिशनर्‍यांच्या कामामुळे थोडी फार सुधारणा होत आहे असा तिथल्या लोकांचा समज झाला होता. पण आता विवेकानंदांच्या या व्याख्यानामुळे त्यांच्यातले भारताबद्दलचे गैरसमज दूर झाले. नाहीतरी एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू समजत नाही तो पर्यन्त गैरसमज मनात ठाण मांडून असतात. त्याप्रमाणेच आपले मत तयार होत असते.    

      मिशनर्‍यांच्या कामाला महत्व न दिल्यामुळे त्यांनी स्वामीजींना चिडून विरोध केला होता, भारतातील स्त्रियांची स्थिति, स्त्रियांची बुरखा पद्धती, तर जगन्नाथाच्या रथाखाली आपले शरीर झोकून देण्याची अघोरी प्रथा यावर खूप प्रश्न विचारले गेले. विवेकानंदांनी योग्य ती उत्तरे दिली.आज सुद्धा काही परंपरा भारतात सुरू आहेत. अशा ज्या गोष्टी आपल्या देशात होतात त्या माहिती आहेत आणि त्याला स्वामीजींचा विरोध पण आहे. अशा गोष्टींचं समर्थन स्वामीजी करूच शकणार नव्हते म्हणून त्यांनी या परंपरा कशा निर्माण झाल्या त्या कशा हिंदू धर्मात महत्वाचा भाग नाहीत असे विचार मांडले. उत्तरे दिली. तर, आपला देश रानटी आणि असंस्कृत देश नाही हे सांगण्यावर भर दिला. यावरून परदेशात एकाकी पणे अशा सर्वांना तोंड देणे किती अवघड होते तरी ते स्वामीजींनी समर्थपणे पेललेले दिसते.

तन्नत वुड्स

    वुड्स यांनी या दोन व्याख्यानांनंतर छोट्या मुलांसाठी आपल्या घरासमोरच्या बागेतच एक व्याख्यान ठेवलं. यावेळी विवेकानंदांनी भारतातील मुले, त्यांचे खेळ, तेथील शाळा, शिकवण्याची पद्धत यांची माहिती मुलांना दिली. याला खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याची वृत्तपत्रात प्रसिद्धी पण झाली. वुड्स यांच्या घरी स्वामीजी एक आठवडा राहिले. त्यांच्या अगत्यशील वागण्याने स्वामीजींना आनंद झाला होता. जेंव्हा सुरूवातीला आपण निराधार होतो, त्या काळात ज्यांनी आपल्याला प्रेमाची वागणूक दिली,त्या देशात त्यांनी मला घरच्या सारखे वागवले त्यांना मी विसरुच शकत नाही असे म्हणून वर्षभराने ते पुन्हा भेटायला गेले तेंव्हा, निघताना त्यांनी आपली आठवण म्हणून वुड्स यांना आपल्या वस्तु, दंड, धाबळी, ट्रंक भेट म्हणून दिल्या. वुड्स कुटुंबियांनी त्या जपून ठेवल्या होत्या. १९०० साली ब्रिटिश म्युझियमने चांगली किंमत देऊ केली आणि त्या वस्तु मागितल्या असता, वुड्स यांचा मुलगा प्रिन्स याने त्याला नकार दिला. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे गुण अमेरिकेतून घेण्यासारखे आहेत.

  सर्वधर्म परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दरवाजा उघडून देणारे आणि मार्गदर्शन करणारे प्रा.राइट यांना तर स्वामीजी विसरुच शकत नाहीत. प्रा. राइट यांना शतश: वंदन!

चार सप्टेंबर, स्वामीजी सालेमहून सॅराटोगा स्प्रिंग्स इथे गेले. फ्रॅंकलिन सॅनबोर्न यांनी निमंत्रण दिले होते. इथे अमेरिकन सोशल सायन्स असोसिएशन ची परिषद होणार होती, त्यात विवेकानंदांना बोलायचे होते, ही संस्था वेगवेगळ्या विषयातील संशोधक आणि प्राध्यापक यांची होती. पण स्वामीजींचा सन्मान म्हणून बोलवले होते. यानंतर डॉक्टर हॅमिल्टन यांच्या घरी दोन व्याख्याने झाली. सॅराटोगाला एकूण पाच व्याख्याने झाली .पाचसहा दिवसात पाच व्याख्याने. स्वामीजींची सकारात्मक घोडदौड चालू होती.

या काळात स्वामीजीच्या अनेकांशी भेटी झाल्या, परिचय झाले, अनेकांकडे त्यांना राहता आले. जनजीवन त्यांना पाहता आले. धर्मोपदेशकांचा विरोध कळला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथल्या लोकांना कोणते विषय आवडतात, कोणत्या विचारांचा श्रोत्यांवर चांगला व प्रतिकूल परिणाम होतो, आपल्या बोलण्याची पद्धत कशी ठेवायला पाहिजे, काय टाळले पाहिजे, याची जाणीव या अनुभावातून त्यांना झाली. याचा उपयोग त्यांना परिषदेत बोलण्यासाठी होणार होता.

     अनेक अडचणींवर मात करून, आता ९ सप्टेंबरला विवेकानंद सॅराटोगाहून मोठ्या आत्मविश्वासाने, निश्चिंत आणि प्रसन्न मनाने शिकागोला निघाले. शिकागो चे स्थानक ओळखीचे झाले होते. स्टेशनवर उतरल्यावर सर्वधर्म परिषदेच्या कार्यालयाचा पत्ता ज्या कागदावर लिहून घेतला होता तो कागदच सापडेना. इकडे तिकडे चौकशी केली, उपयोग नाही झाला.काही मार्ग दिसेना. रात्र झाली. शेवटी समोरच उभ्या असलेल्या मालगाडीत एका डब्यात आश्रय घेतला. सकाळी उठून शिणलेले  स्वामीजी कार्यालयाचा पत्ता विचारत घरोघर फिरले,कोणी  लक्ष दिलं नाही, गेट बाहेर काढलं, दारं उघडली नाहीत. स्त्रियांनी घाबरून दरवाजे बंद करून घेतले, जवळ जवळ चार किलोमीटर ते फिरले पण काही मार्ग निघाला नाही.वर्णभेदाचा असाही अनुभव त्यांनी घेतला. शेवटी थकून रस्त्याच्या कडेला हताश होऊन स्वस्थ बसले. त्याच वेळी समोर रस्त्यापलीकडे असलेला एका घरचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक प्रौढ स्त्री बाहेर आली. रस्ता ओलांडून ती स्वामीजींजवळ आली आणि विचारलं, “आपण सर्वधर्म परिषदेसाठी प्रतींनिधी म्हणून आला आहात का?” अहो आश्चर्यम !स्वामीजीन कडून होकार मिळाला आणि त्या स्वामीजींना घेऊन समोर घरात गेल्या. एका खोलीत त्यांची व्यवस्था करून दिली. स्टेशनवरचं सामान मागवून घेतलं.चहा नाश्ता झाल्यावर त्या स्वामीजींना परिषदेच्या कार्यालयात घेऊन गेल्या.

   
ही प्रौढ स्त्री म्हणजे मिसेस जॉर्ज डब्ल्यू हेल. त्यांना घराच्या खिडकीतून समोर स्वामीजी बसलेले दिसले होते. हे परिषदेसाठी आले असावेत असे त्यांना वाटले. सकाळपासून अनेक दारं स्त्रियांनीच बंद केली होती पण स्वामीजींना आपण होऊन दार एका वात्सल्यपूर्ण स्त्रीनेच उघडलं होतं. अमेरिकेत अशा अनेक स्त्रिया त्यांना भेटल्या. पण ज्या क्षणी मिसेस हेल यांनी माझ्या घरी चला असे म्हटले होते त्या क्षणापासून स्वामीजींन कोणतीच व्यक्तीगत आणि व्यावहारिक अडचण आली नाही. अमेरिकेतल्या हेल कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध निर्माण झाले ते कायमचेच.

शेवटी स्वामीजी सर्व धर्म परिषदेच्या कार्यालयात पोहोचले.त्यांची इतर पौर्वात्य प्रतिनिधींच्या बरोबर तात्पुरती व्यवस्था केली होती. त्यानंतर , २६२,मिशिगन अव्हेन्यू इथे राहणार्‍या श्री जॉन डब्ल्यू. लायन यांच्याकडे निवासाची सोय केली होती, स्वामी विवेकानंद, सर्व धर्म परिषदेचे एक कार्यवाह, डॉ.जॉन एच.बॅरोज यांच्या खोलीत बसले होते ही  ११ सप्टेंबरच्या वृत्तपत्रात बातमी झाली, ती परिषदेचा अधिकृत प्रतीनिधी म्हणून .

हिंदू धर्माचा प्रतिनिधी. सौम्य मुद्रा, तेजस्वी चेहरा, बुद्धिमत्तेचा निदर्शक, भगव्या रंगाचा झगा, डोक्याला केशरी फेटा, असा वेष परिधान केलेल्या स्वामी विवेकानंदांना जगाच्या ऐतिहासिक धार्मिक परिषदेला सहभागी होण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. उद्या एक सुंदर अपूर्व दिवस उगवणार होता.  

  © डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ऐकण्यासाठी You Tube चॅनेल च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन या भागाचा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

 

Friday, 4 September 2020

विचार–पुष्प, भाग-४५

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

 विचार–पुष्प, भाग-४५ 


                             प्रा.जॉन हेनरी राइट आणि स्वामीजी  

मिसेस जॉन्सन

केट सॅंनबोर्न



केट सॅंनबोर्न मेटकाफ इथे राहत होत्या. त्या अनेक वर्षे ललित वाङ्ग्मय या विषयाचे अध्यापन करीत होत्या. त्या लोकप्रिय वक्त्या होत्या, लेखिका होत्या. गाडीतल्या ओळखीत त्यांनी विवेकानंदांना सांगितले होते की, ज्ञानाच्या क्षेत्रात अनेक व्यक्तींशी आपला संपर्क आहे. त्यांच्याशी आपला परिचय करून द्यायला मला आवडेल. विवेकानंद त्यांच्या घरी गेले ते सर्वधर्मपरिषदे आधी. या काळात त्यांची खरच अनेक ठिकाणी भाषणे, भेटी व्याख्याने आणि विद्वानांच्या ओळखी झाल्या.

 
महिला सुधार गृह 
 
    जवळच असलेल्या शेरबॉर्न इथल्या महिला सुधार गृहाच्या प्रमुख, मिसेस जॉन्सन स्वामीजींना भेटायला आल्या. त्यांनी संस्था बघायला विवेकानंदांना बोलावले. ते गेले तो प्रत्यक्षात महिलांचा तुरुंग होता आणि त्याला सुधारगृह असे नाव होते. इथल्या गुन्हेगार स्त्रियांना सौजन्याने वागवले जाते. त्यांच्यावर संस्कार केले जातात आणि एक नागरिक म्हणून त्यांना समाजात पुन्हा प्रतिष्ठेचे स्थान दिले जाते. हे सर्व विवेकानंदांना खूप आवडलं. किती उदात्त, किती सुंदर.  ते पाहिल्यानंतरचा हा त्यांचा उद्गार होता. कैद्यांना सुद्धा समाजात स्थान मिळण्यासाठी इथे प्रयत्न आणि आपल्याकडे शतकानुशतके होत असलेले गरिबांवरील अन्याय असा विचार लगेच त्यांच्या मनात आला, आपल्या देशात अशा लोकांचा आपण काय विचार करतो? त्यांची सुटका नाही. वर येण्याचा मार्ग नाही. हे आठवून त्यांच्या मनाला वेदना झाल्या. माणसाला माणूस म्हणून वागवणे हेच त्यांना आवडत होते.

वृत्तपत्रीय प्रसिद्धी 
  
  या तुरुंगात स्वामीजींनी २२ ऑगस्टला पुन्हा भेट दिली. भारतातील चालीरीती आणि जीवन पद्धती या विषयावर त्यांनी तिथल्या गुन्हेगार स्त्रियांसमोर व्याख्यान दिले. अमेरिकेत गेल्यानंतरचे त्यांचे हे पहिलेच भाषण होते. दुसर्‍या दिवशी याची बातमी पण बोस्टनच्या इव्हिंनिंग ट्रान्सक्रिप्टया नियतकालिकात आली. तिथल्या वृत्तपत्रात आलेला त्यांना हा पहिलाच उल्लेख. विवेकानंद बोस्टनला सॅंनबोर्न यांच्याबरोबर आल्याची बातमी पण प्रसिद्ध झाली. फ्रमिंगहॅमच्या फ्रमिंगहॅम ट्रिब्युन यात पण बातमी आली. सॅनबोर्न यांनी स्वामीजींना घेऊन जवळच हनवेल इथे छोटी ट्रीप केली. स्वामीजींचा पायघोळ झगा आणि फेटा यामुळे, ते राजबिंडे दिसत आणि खरच असा उल्लेख असलेली बातमी पण आली. त्यात वर्णन होते, भारतातील एक राजा, स्वामी विवेकानंद यांना घेऊन केट सॅनबोर्न हनवेल कडे रवाना’. सॅनबोर्न यांनी उत्साहाने विवेकानंदांना आसपासच्या परिसरात फिरवले त्यामुळे त्यांना अमेरिकेतल्या छोट्या गावातील समाज, लोक,जवळून पाहायला मिळाले.

  शेरबोर्न च्या तुरुंगातील भेटीची बातमी वृत्तपत्रात आली पण बोस्टन च्या एका महिला मंडळातील कार्यक्रमाची बातमी आली नाही. तो कार्यक्रम होता पंडिता रमाबाई यांनी विधवांच्या शिक्षणाला सहाय्य मिळावे म्हणून, केलेल्या प्रयत्नांना अमेरिकेत प्रतिसाद मिळत होता, त्यातलाच एक कार्यक्रम. त्यासाठी तिथे ठिकठिकाणी महिला मंडळे स्थापन झाली. स्वामीजींचे भाषण भारतातील बालविधवांची स्थिती यावर व्याख्यान झाले. पण वृत्तपत्रात बातमी नाही.

     
   न्यूयॉर्कच्या सॅराटोगा स्प्रिंग्स इथे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकन सोशल सायन्स असोसिएशन या संस्थेचे संमेलन होणार होते त्यात व्याख्यान देण्याचे निमंत्रण द्यायला फ्रॅंकलिन सॅनबोर्न  आले होते. त्याआधीच प्रा.जॉन हेनरी राइट यांची ही भेट झाली होती, शनिवार रविवार त्यांनी स्वामीजींना आपल्या कडे राहायलाच बोलावले.

अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर अनिस्क्वाम या टुमदार खेड्यात ते सुटीला येत. प्रा.राइट, हार्वर्ड विद्यापीठात भाषाशास्त्र, प्राचीन इतिहास संशोधन, ग्रीसचा इतिहास या विषयाचे प्राध्यापक होते. अमेरिकेतील विद्वान मंडळीत त्यांचे नाव घेतले जात होते. अशा लोकांमध्ये स्वामीजींचा वावर, त्यांची ओळख, त्यांच्याशी झालेली चर्चा यामुळे त्यांची जणू सर्वधर्मपरिषदेची रंगीत तालीमच होत होती की. त्यांच्याकडे विविध विषयांवर चर्चा झडत असत आणि विवेकानंदांचे सखोल तात्विक चिंतन ऐकले तेंव्हा श्रीमती राइट इतक्या भारावून गेल्या की विवेकानंद त्यांच्याकडून गेल्यावर, त्यांनी आपल्या आईला पत्रात लिहिलंय, “त्यांचे वय कालगणनेच्या दृष्टीने तीस वर्षाचे आहे, पण विद्वत्ता आणि सुसंकृतपणा या दृष्टीने ते कितीएक युगांचे आहे”. अशी एकेकांची स्वामीजींबद्दलची निरीक्षणे होती. स्वामीजी फक्त शनिवार रविवार हे दोनच दिवस त्यांच्या कडे राहिले होते, त्यांच्या बरोबरच्या धर्म, तत्वज्ञान आणि अध्यात्म या विषयांवर होणार्‍या गप्पांमधून, चर्चेतून, विवेचनातून राइट पतीपत्नींनी स्वामीजींचं सूक्ष्म अवलोकन केलेलं दिसतं.

  

प्रा.राइट यांच्याशी विवेकानंदांचे सर्व बोलणे अध्यात्म, धर्म आणि तत्वज्ञान या विषयावर चालत असे. विवेकानंदांच्या भेटीत राइट कुटुंबाला झालेला परिचय मिसेस राइट यांनी सविस्तरपणे लिहून ठेवला आहे. ते घरात सगळ्यांना कसे प्रिय होते हे सांगितलं, त्यांना तीन मुले होती. तेरा वर्षांची एलिझाबेथ, दहा वर्षांचा ऑस्टीन आणि दोन वर्षांचा जॉन. ऑस्टीन बद्दल त्यांना जास्त प्रेम असायचे. एक वर्षाने विवेकानंद पुन्हा राइट यांच्याकडे भेटायला गेले तेंव्हा त्यांनी मुलांसाठी मिठाई नेली होती. पण ऑस्टीनला त्यांनी ‘Light of Asia’ हे एडविन ऑर्नोल्ड यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं. तो मोठा झाल्यावर कधीतरी वाचेलच असा स्वामीजींना विश्वास होता. म्हणजे अपेक्षा होती. ऑस्टीन मोठा झाल्यावर आईवडिलां इतकीच स्वामीजींची आठवण होती. ते सर्व स्वामीजींचा आमचे स्वामीजी असा उल्लेख करत असत. पुढे तर ऑस्टीन च्या मुलीलाही आपल्या वडिलांकडून स्वामीजींचा परिचय झाला होता. असे राइट यांच्या तीन पिढ्यात स्वामीजींना ओळखत होते हे विशेष आहे. इतकं देशासाठी झटलेल्या स्वामीजींच्या आपल्याच देशात आजही अनेक लोकांना स्वामी विवेकानंद यांची ओळख नाही. याचं उत्तर स्वामीजींच्याच विचारात मिळतं ते म्हणजे माणसं आपला इतिहास वाचतच नाहीत.

प्रा. राइट यांनी अनिस्काम च्या यूनिव्हर्सल चर्च मध्ये विवेकानंदांचे व्याख्यान घडवून आणले. त्यात त्यांनी भारतीयांची जीवनपद्धती हा विषय मांडला. त्यात सांगितलं की, “आज भारताला खरी गरज धर्माची नसून त्यांना आधुनिक औद्योगिक युगाला उपयोगी पडेल असे शिक्षण मिळण्याची आहे”. या प्रभावी व्याख्यानचा असा परिणाम झाला की, श्रोत्यांनी भारावून जाऊन त्या क्षणीच, भारतात एखादी शाळा काढण्यासाठी वर्गणी गोळा केली. विवेकानंदांनी शाळा सुरू करण्याचा कोणताच विचार व्यक्त केला नव्हता. तरीही लोकांनी पैसे गोळा केले याचे विवेकानंदांना खूप हसू आले. म्हणजे ते भाषणच एव्हढं प्रभावी होतं. शाळा कोण काढणार, कोण चालवणार याचा जराही विचार न करता गरज आहे त्याला मदत एव्हढाच विचार त्यांनी केला होता. स्वामीजींचं अमेरिकेत झालेलं पहिलं सार्वजनिक व्याख्यान होतं हे. या आधीची व्याख्याने स्त्रियांसमोर संस्थेपुरती होती.

युनिवर्सल चर्च 

   राइट यांच्या सारखे विद्वान प्राध्यापक सुद्धा विवेकानंदांच्या व्यासंग आणि विचारांनी प्रभावित झाले होते. सर्वधर्म परिषदेला उपस्थित राहण्याचा विचार आपण सोडून दिला आहे असे प्रा. राइट यांना स्वामीजींनी बोलताना सांगीतले. पण त्यांनी तसे करू नये यासाठी राइट यांनी स्वामीजींचे मन वळवले. ते म्हणाले, “सर्व अमेरिकेला तुमचा परिचय होण्याचा हा एकच मार्ग आहे”. पण आपल्याजवळ कोणतेही अधिकार पत्र नाही हे स्वाभाविकपणे तोंडून निघून गेले. त्यावर प्रा. राइट यांचं उत्स्फूर्त उत्तर होतं, “स्वामीजी, सर्वधर्म परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तुमच्याकडे अधिकार पत्र मागणे म्हणजे, सूर्याने आपला प्रकाशण्याचा अधिकार सिद्ध करावा असे त्याला म्हणण्यासारखे आहे”.  केव्हढा हा उत्स्फूर्तपणे झालेला गौरव!   (सर्व फोटो इंटरनेट वरून साभार परत)                      

  © डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ऐकण्यासाठी You Tube चॅनेल च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन या भागाचा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

Thursday, 3 September 2020

विचार–पुष्प, भाग-४४

 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

                             विचार–पुष्प, भाग-४४ 


                              ते ... पाच आठवडे

   आलीया भोगासी असावे सादर ! केव्हढा मोठा धक्का? ज्या सर्वधर्म परिषदेत भाग घ्यायला अमेरिकेत आलो ते ध्येय च साध्य होणार नाही? आपल्यासाठी सर्व शिष्यांनी एव्हढी धडपड केली ती सर्व व्यर्थ जाणार? मनातून स्वामीजी नक्कीच खूप अस्वस्थ झाले असतील. आपलीही चूक त्यांच्या लक्षात आली. म्हणजे या विषयीचं अज्ञान जाणवलं. कारण सर्वधर्म परिषद भरवण्याची योजना गेली दोन वर्ष चालू होती. जगातले सर्व प्रमुख धर्म, पंथ,संप्रदाय त्या त्या धर्माच्या विविध संस्था यांच्याशी पत्रव्यवहार चालू होता. त्यामुळे त्या त्या देशासाठी समित्याही स्थापन झाल्या होत्या. एव्हढच काय भारतासाठीही समिति झाली होती. पण याची तिळभरही कल्पना स्वामीजींना आणि त्यांच्या शिष्यांना नव्हती. शिवाय अशी अधिवेशने कशी भरतात,त्याची पद्धत काय असते, हे ही माहिती नव्हते. शिष्यांनाही वाटलं की एकदा अमेरिकेला पोहोचले की पुढचं सगळं आपोआप होईल. या त्रुटी लक्षात आल्या. आणखी एक महत्वाचं कारण होतं, या धर्म परिषदेसाठी केलेल्या भारतीय समितीत परंपरांबरोबर धर्माला विरोध करणारे ब्राह्म समाजाचे आणि सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते. की जे स्वामीजींना पण ओळखत होते. त्यांनी महाबोधी समिति आणि जैन समिती च्या प्रतींनिधींना परवानगी दिली होती. भारतातला प्रमुख धर्म हिंदू असला तरी त्याच्या प्रतिनिधित्वाबद्दल विचार केला गेला नव्हता. दुर्दैवच म्हणावं.

   परिषदेला अजून वेळ होता तोवर शिकागोतले हे थंडीचे दिवस कसे निघणार?जवळचे पैसे तर भराभर संपत होते. आता सर्वात गरज होती ती पैशांची. थंडीसाठी गरम कपडे घेण्यासाठी शंभर डॉलर्स लागणार होते. स्वामीजी हताश झाले त्यांनी आलसिंगा ना तार केली, सर्व पैसे संपत आलेत उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मद्रासला आलसिंगा यांनी भरभर वर्गणी गोळा करून तीनशे रुपये आणि मन्मथनाथ यांनी पाचशे रुपये पाठवले. एका दुर्बल क्षणी आपण तार केली असे त्यांनी पत्रात म्हटले. पण त्यांचा निर्धार पक्का होता, काही झाले तरी मागे हटायचे नाही. परिषदेत भाग घ्यायचाच.

    इथली व्यवस्था लागेपर्यंत स्वामीजी वेळ सत्कारणी लावत होते. तिथे जे औद्योगिक प्रदर्शन भरलं होतं ते पहायला रोज जात. ते अवाढव्यच होतं. सातशे एकर जागेवर ते उभं केलं होतं. या कामासाठी दोन वर्ष, सात हजार मजूर काम करत होते. सातशे जखमी झाले, अठरा मृत्यूमुखी पडले. यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना येते. त्यात वेगवेगळे विभाग होते, रचना सुंदर होती. अडीच कोटीहून अधिक लोकांनी याला भेट दिली होती. यात विज्ञानातील अद्ययावत संशोधन, त्याचा उपयोग, यंत्रे उपकरणे, हे सर्व मांडलं होतं. यातलं मानवाची बुध्दी आणि कर्तृत्व स्वामीजींना आकर्षित करणारं होतं. त्यांना ते आवडलं होतं. ते आठवडाभर रोज बघायला जात.

ओद्योगिक प्रदर्शन व्याप्ती 

   त्या प्रदर्शनात स्वामीजींना अनेक अनुभव आले. अमेरिकन वृत्तपत्राची नीतीमत्ता कशी याचा अनुभव आला.  कपूरथळयाचे महाराज प्रदर्शनात फिरत होते. पहिल्याच दिवशी प्रदर्शनात एक वार्ताहर एका भारतीय माणसाची मुलाखत घेत होता, तो भारतीय लोकांची अवस्था सांगू लागला, दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रात हा महाराज दिसतो तसा नाही ,तो हलक्या जातीचा आहे, हे सर्व राजे ब्रिटीशांचे गुलाम आहेत, ते नैतिकतेने वागत नाहीत असं काही स्वामीजींना उद्देशून सनसनाटी वृत्त दिले, भारतातील एक विद्वान प्रदर्शनास भेट देतो अशी स्तुति करून, ते न बोललेली वाक्ये त्यांच्या तोंडी घातली होती.

                       

   
त्यांच्या वेषामुळे सर्वांच लक्ष वेधलं जायचं. प्रदर्शन पाहता पाहता एकदा तर मागून कुणीतरी त्यांच्या फेट्याचं टोक ओढलं. स्वामीजींनी मागे वळून इंग्रजीतून आपली नाराजी व्यक्त केली. तसे, सद्गृहस्थ स्वामीजीना इंग्रजी येतं हे ऐकून, वरमून म्हणाले तुम्ही असा पोशाख का करता? कुतूहल म्हणून कुणी विचारलं तर ठीक, पण असा मागून ओढणं हा असभ्यपणाच. प्रदर्शन पाहताना एकदा गर्दीत तर त्यांना मागून ढकललं आणि मुद्दाम धक्का पण मारला गेला होता. असाही अनुभव त्यांना आला. वरच्या वर्गातील सुशिक्षित लोक असे वागतात याचं त्यांना आश्चर्य वाटलं. 

  


   बोस्टनला तर आणखीनच वाईट अनुभव. स्वामीजी रस्त्यावरून जात असताना त्यांना आपल्या मागून कुणीतरी येत असल्याचा भास झाला. त्यांनी मागे वळून पाहिले तर, काही मुलांचा आणि मोठ्या माणसांचा जमाव मागून येत असल्याचे दिसले ते पाहून स्वामीजी वेगात चालू लागले, तसे ते ही लोक वेगात आले. क्षणात आपल्या खांद्यावर काहीतरी आदळलं  हे कळताच स्वामीजी धावत सुटले आणि अंधार्‍या गल्लीत नाहीसे झाले. थोड्या वेळाने मागे पहिले तर तो जमाव निघून गेला होता. स्वामीजींनी सुटकेचा निश्वास टाकला. स्वामीजींना लक्षात आली पाश्चात्य देशातली वर्णभेदाची विषमता. समतेचं तत्व पाश्च्यात्यांकडून शिकावं असं भारतात अनेक वर्ष शिकवलं जात होतं. तिथेच हे अनुभव आले. पाश्चात्य संस्कृतीतल्या गुणदोषांची आल्या आल्याच जवळून ओळख होत होती. स्वामीजींवरील हा हल्ला परदेशात झाला होता . इथे प्रकर्षाने आठवण झाली ती नुकत्याच पालघर मध्ये झालेल्या निर्दोष साधूंच्यावरील हल्ल्याची. त्यात त्यांना प्राणास ही मुकावे लागले. जी सर्वसामान्य प्रत्येक माणसाला प्रचंड धक्का देणारी होती. आपल्याच देशात घडलेली ही घटना समता बंधुत्वाबद्दल काय सांगते?   

     आता विवेकानंदांना आर्थिक अडचण सोडवण महत्वच होतं. बोस्टनला राहील तर स्वस्त पडेल असं कळल्याने ते तिकडे जाण्याचं प्रयत्न करू लागले. स्वामीजी प्रथम जहाजातून व्हंकुव्हरला उतरून शिकागोला जाणार्‍या कॅनेडियन पॅसिफिक या गाडीत बसले तेंव्हा, स्वामीजिंना भेटलेल्या केट सॅंनबोर्न यांनी पत्ता दिला होता तो बोस्टन जवळचा होता. या पहिल्याच भेटीत ओळख झालेल्या स्वामीजींचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय की, “रेल्वेत मी विवेकानंदांना प्रथम पाहिलं, त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व हा पौरुषाचा एक उत्तुंग आविष्कार होता. त्यांचे इंग्रजी माझ्यापेक्षाही अधिक चांगले होते. प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याशी त्यांचा परिचय होता. शेक्सपियर किंवा लॉङ्गफेलो किंवा टेनिसन, डार्विन, मूलर, आणि टिंडॉल यांची वचने त्यांच्या मुखातून अगदी सहजपणे बाहेर पडत होती. बायबलमधील उतारे त्यांच्या जिभेवर होते. सारे धर्म आणि संप्रदाय याची त्यांना माहिती होती आणि त्या सर्वांविषयीची त्यांची दृष्टी सहिष्णुतेची होती. त्यांच्या सान्निध्यात असणे हेच एक शिक्षण होते”.असा ठसा त्यांच्या मनात पाहिल्याच भेटीत उमटला होता. ही एक चांगली आनंद देणारी बाब होती.  

                                         

     विवेकानंदांनी केट सॅंनबोर्न यांच्याकडे जाण्याचं ठरवलं आणि शिकागोहून रेल्वेने बोस्टनला आले. विश्रांगृहात थांबून त्यांनी आल्याची तार केली त्याला उत्तर आलं की, आजच्या दुपारच्या गाडीने तडक इकडे या. तिथून त्यांचे घर चाळीस किलोमीटर वर गूसव्हिल इथे होते. त्या स्वता विवेकानंदांना घ्यायला आल्या आणि त्यांना घरी घेऊन गेल्या.इथूनच सुरू झाला त्यांच्यासाठी अनुकूल घटनांचा काळ.(प्रदर्शनाचे फोटो इंटरनेट वरुन साभार परत.)

© डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा