Sunday, 15 May 2022

आद्य पत्रकार देवर्षि नारद

 

आद्य पत्रकार देवर्षि नारद



॥ श्री गणेशायनमः ॥
नारद उवाच -
प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम।
भक्तावासं: स्मरै:नित्यंमायु:कामार्थसिद्धये ॥1॥
प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम ।
तृतीयं कृष्णंपिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥2॥
लम्बोदरं पंचमंच षष्ठं विकटमेवच ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ॥3॥
नवमं भालचन्द्रंच दशमंतु विनायकम ।

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥4॥ ..... ॥

इति श्रीमतनारदपुराणे संकष्टनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्‌ ॥

     लहानपणी रोज संध्याकाळी  प्रार्थना, श्लोक आणि पाढे म्हणताना सर्व प्रथम गणपती स्तोत्र म्हणायचो. मग मारुति स्तोत्र, रामरक्षा, इतर प्रार्थना, काही श्लोक, शेवटी पाढे म्हणायचे असे शिस्तीत ठरलेले असेल ते म्हणावेच लागे. हे सर्व म्हटल्याशिवाय जेवण नाही असा आजोबांचा नियम असे. त्याचा अर्था काय, ते कोणी लिहिले आहे किंवा असे कुठलेही प्रश्न त्या वयात पडत नव्हते. फक्त शिस्त पाळायची एव्हढं कळायचं. पण हे सर्व खूप मोठ्ठं झाल्यावर कळायला लागलं. नारद पुराणात लिहिलेलं हे गणपती स्तोत्र नारद मुनींनी लिहिलेलं आहे हे कळलं. नारद म्हणजे आम्हाला फक्त पौराणिक चित्रपट किंवा कथांमधून दिसले आहेत. पण पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेताना चिपळ्या आणि वीणाधारी नारदांचे एक वेगळे रूप समजले. ते म्हणजे,आद्य पत्रकार नारद ऋषि. नारायण नारायण !

नारायण नारायण .. असे विणेच्या झंकाराच्या पार्श्वभूमीवर उद्गार ऐकले की नारद मुनींचा प्रवेश होणार हे लगेच कळायच. जणू काही एंट्रीला may i come in असेच विचारत असतील आणि ज्या लोकांमध्ये एंट्री घेतली ते सर्व लोक साहजिकच सावध होत असणार. आज पत्रकारांना ओळखपत्र/ अॅक्रिडिटेशन दाखवून प्रवेश घ्यावा लागतो.  

देव ऋषि नारद आणि त्यांची परंपरा -

भगवान विष्णुंचे परम भक्त, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र  देवऋषि नारद. नारद मुख्यत: भक्ति मार्ग प्रवर्तक आणि कीर्तन संस्थेचे आद्य प्रवर्तक मानले जातात. तरी ते धर्मज्ञ, तत्वज्ञ, राजनीति तज्ञ आणि संगीतज्ञ होते. ते बृहस्पतीचे शिष्य होते.   

आपण पाहिलेल्या पौराणिक चित्रपटात एका हातात वीणा, दुसर्‍या हातात चिपळ्या घेऊन, नारायण नारायण असा उच्चार करणारे, स्वर्गलोक, पाताळलोक आणि मृत्यूलोक अशा त्रिलोकात मुक्तपणे  संचार करणारे  नारदमुनि यांच्याबद्दल खूप उत्सुकता वाटायची. यांना सगळं माहिती आहे, सगळीकडे यांचा वावर आहे, देव, दानव आणि मानव यांच्या जगात काय चाललय,  हे कसं काय याचं आश्चर्य वाटायचं. पण त्यांना वरदान मिळालं होतं ते कधीही कुठल्याही लोकांत संचार करू शकत. त्यामुळे ते सतत भ्रमण करत असायचे. तिथल्या सर्व सूचना आणि बित्तम बातम्या भगवान विष्णुपर्यन्त  पोहोचवायच्या. दानवांच्या कारवायांना आळा घालायचा, मानवांना दिशा द्यायची आणि देवांना माहिती द्यायची, सल्ला द्यायचा अशी लोककल्याणाबरोबर वार्ता प्रसाराची कामे नारदमुनी करत असत. शस्त्रांमध्ये त्यांना देवाचे मन असेच म्हटले आहे. म्हणून सगळीकडेच त्यांचं महत्वपूर्ण स्थान आहे. देवतांप्रमाणेच दानवांनी पण नारदांचा नेहमीच आदर केला आहे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा हे महत्व मान्य केल्याचं भागवत पुराणात सांगितलं आहे.     

त्यांच्यात देवत्व आणि ऋषित्व यांचा समन्वय होता असे म्हणतात. या तिन्ही लोकांत समन्वय साधायचा हे ही कार्य ते करत. म्हणून त्यांना आद्य पत्रकार म्हटले जाते. अध्यात्म, राजनीती, धर्म शास्त्र, यज्ञ प्रक्रिया, संगीत अशा अनेक विषयांचे त्यांना ज्ञान होते. त्यांना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांचे ज्ञान होते. देव आणि माणूस यांच्यातला दुवा म्हणजे नारद मुनि होते. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युगातही नारदमुनि देव व मानव यांच्यातील संवादाचे माध्यम होते. त्यांनी वार्ता प्रसारित करताना सद्गुणांची कीर्ती सांगणे हे काम हेतुत: केले. मुख्य म्हणजे खडानखडा माहिती नारदांना असायची.

      लोकांना न्याय मिळवून देण्याचीच त्यांची भूमिका असयची. पृथ्वी आणि पाताळ लोकातील भक्तांची खरी भक्ति भगवान विष्णु पर्यन्त पोहोचविणे, त्यांना न्याय मिळेल असा प्रयत्न करणे, लोकांवर होणार्‍या अन्यायाची माहिती देवांपर्यंत पोहोचविणे असे काम नारद करत असत. याचं आपल्याला माहिती असणारं उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद,ध्रुव बाळ आणि अंबरीश यांच्या कथा. नारद मुनींनी या सर्वांचं म्हणणं अनेक वेळा नारायणापर्यन्त पोहोचविले होते. त्यांना न्याय मिळवून देण्यात मदत केली होती. एव्हढच नाही तर, दु:खी दरिद्री लोकांचे दु:ख निवारण करणे, दुष्ट, अभिमानी, लोभी आणि भ्रष्टाचारी लोकांचा नायनाट करण्याचे उपाय पण ते सांगत.        

हिन्दी पत्रकारितेच्या विश्वात पहिले हिन्दी वृत्तपत्र उदंत मार्तंड हे जुगलकिशोर सुकुल यांनी ३० मे १८२६  रोजी साप्ताहिक स्वरुपात सुरू केले. त्यावर पहिल्या पानावर नारदांचा उल्लेख असे.

    नारदमुनी ऋग्वेदातील एक सूक्तकार म्हटले जातात. त्यांच्या ठिकाणी देवत्व आणि ऋषित्व यांचा समन्वय झालेला होता म्हणून त्यांना देवर्षी म्हणतात. असं म्हणतात की वायु पुराणात एकूण आठ देवर्षी असल्याचा उल्लेख आहे, त्यापैकी नारद हे अग्रगण्य आहेत. देवर्षी नारद यांच्याबद्दल अनेक पुराण ग्रंथात माहिती आहे.  नारद पुराण हे नारदांनी रचलेले पुराण आहे . अठरा पुराणांमद्धे हे पुराण सर्व श्रेष्ठ मानले गेले आहे.   

देवर्षी नारद समजले की त्यांचं कार्य समजेल आणि त्यांना विश्वातला पहिला पत्रकार आणि पत्रकारीतेतला आदि पुरुष का म्हटलं आहे ते कळेल. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे पत्रकारिता क्षेत्राला संबोधले जाते, जे स्थान दिलं जातं, तसेच भारतीय देवतांमध्येही ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या नंतर नारद यांचंच स्थान आहे.  

देवर्षी नारद यांची गुण वैशिष्ठ्ये लक्षात घेतली तर आजच्या पत्रकारांचीच ती वैशिष्ठ्ये आहेत हे लक्षात येते म्हणूनच हे गुण कोणते आहेत हे आजच्या पत्रकारिता क्षेत्रात काम करणार्‍यांनी समजून घ्यायला हवेत. सर्वत्र संचार करता करता तिथल्या घटनांनी आपलं ध्येय विचलित होऊ न देता पत्रकाराने आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. सतत सत्याचा शोध घेतला पाहिजे,  चौकस दृष्टी, निरीक्षण शक्ति, जिज्ञासा, संवाद कौशल्य, बहुश्रुतता, याबरोबरच  मैत्री आणि वैर बाजूला ठेवून सत्य, न्याय आणि वस्तुनिष्ठता आंगीकारली पाहिजे. पत्रकारिता करताना ती प्रामाणिकपणे केली पाहिजे, निर्भयपणे केली पाहिजे.

त्यासाठी आज वर्तमानाचे भान ठेवणे, समस्या माहित असणे, संबंधित विषयाचे मूलभूत ज्ञान असणे, आपल्या जीवन मूल्यांची ओळख असणे आणि महत्वाचं म्हणजे आपली परंपरा, आपले प्राचीनत्व, आपली संस्कृती काय आहे याचही ज्ञान असणे आवश्यक आहे,  आपल्या मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा माहिती असणेही आवश्यक आहे. असे सर्व विशेष गुण नारद यांच्यामध्ये होते. आजच्या पत्रकारितेत काम करणार्‍या सर्व नव पत्रकारांनी /विद्यार्थ्यानी या नारद जयंती निमित्त नारद- एक पत्रकार म्हणून समजून घ्यावेत आणि पत्रकारिता एक व्यवसाय म्हणून, नोकरी म्हणून न करता एक ध्येय म्हणून करावी, मग नक्कीच माध्यमांचे चित्र पालटेल .

- डॉ. नयना कासखेडीकर,पुणे                 

                         ----------------------------------------------


Wednesday, 12 January 2022

उत्तीष्ठत ! जाग्रत !

 

                                   उत्तीष्ठत ! जाग्रत !

श्रेष्ठ जीवनमूल्यांनी युक्त आणि आत्मजागृती झालेला असा समाज घडवण्याचे स्वप्न पहाणारे योगी, पण धर्म संघटक असलेले स्वामी विवेकानंद पाश्चात्य लोकानांही  शिकवण देऊन गेले, ही शिकवण आजच्या  जीवनशैलीच्या काळात अत्यंत उपयोगी पडणारी आहे.   



गेली दोन वर्षे जगभरात कोरोना या साथीच्या रोगाचे तांडव सुरू आहे. त्याचा प्रसार फार वेगात होतो आहे . भारताने या साथीत आपल्या लोकांसाठी आपल्याच देशात कोरोंना वर लस निर्माण केली जी जगात इतर देशांना पण पुरवता  आली. भारताने हा आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या सर्व पार्श्वभुमीवर स्वच्छता .आरोग्यादायी जीवनशैली, आहार विहार, योगसाधना, आयुर्वेद यावर पुन्हा पुन्हा चर्चा होत आहेत. लोकसंख्येचा विचार करता भारताच्या बाबतीत तर असा विचार होणं आवश्यकच आहे. आपल्याकडील पारंपरिक जीवनशैली आपल्या प्राचीन ग्रंथातून सांगितली आहे. हे ग्रंथ आजही आपल्याला मार्गदर्शक असेच आहेत. हेच स्वामी विवेकानंद ११८ वर्षापूर्वी आपल्या भारतीय लोकांना विशेषता तरुणांना वारंवार सांगत होते. त्यांचा भर तरुणांवर होता. आपला देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते. पण त्यासाठी तरुणांना दृष्टीकोण असला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे आणि हा दृष्टीकोण आपल्याच संस्कृतीत सामावला आहे फक्त तो तरुणांना देण्याची गरज आहे असे त्यांना वाटत होते.         

स्वामी विवेकानंद भारतीय तरुणांना म्हणताहेत, “तुम्हाला केवळ एक संदेश देण्यासाठी मी जन्माला आलो आहे. आणि तो संदेश आहे, की उठा जागे व्हा, माझ्या तरुण देशबंधुनो! या, माझ्या बरोबर उभे रहा. बाहेर पडा, खेडोपाड्यात जा. देशात सर्वत्र जा आणि धैर्याचा हा संदेश सर्वत्र पोहोचवा. सबलांपासून दुर्बलांपर्यंत. लोकांशी बोला, त्यांना प्रेरणा द्या. त्यांना समजू द्या की, त्यांच्या जवळ अपार सामर्थ्य आहे. आपल्या भवितव्याचे शिल्पकार आपणच आहोत हे त्यांना कळू  द्या. त्यांना आत्मनिर्भर होऊ द्या. आजवर अपार श्रद्धेच्या पोटीच श्रेष्ठ कार्य घडून आली आहेत. पुढे चला, माझ्या तरुण देशबांधवांनो, पुढे चला”.

भारत आणि भारताबाहेर जाऊन आल्यानंतर त्यांनी जे अनुभव घेतले, जे जे पाहिले, त्यावरुन त्यांनी आपल्या देशाला कशाची गरज आहे याचा विचार केला. आपल्या देशाचे पुनरुत्थान होण्यासाठी आवश्यक असलेली अलौकिक शक्ति आपल्याकडे आहे. मग उशीर कशाला? असे म्हणून विवेकानंद कामाला लागले. त्यांना कळून चुकले की भारताची परंपरा आणि प्राचिनता एव्हढी भक्कम आधारावर उभी आहे की तीच सर्व जगाला मार्गदर्शक ठरू शकेल.   

जेंव्हा तरुण नरेंद्र बोधगयेला जाऊन आल्यानंतर श्री रामकृष्ण परमहंस यांना म्हणाला होता, “ आपण निर्विकल्प समाधीमध्ये सच्चिदानंदात डुंबून राहू इच्छितो” तेंव्हा रामकृष्ण म्हणाले, “ एखाद्या विशाल वटवृक्षासमान होऊन हजारो लोकांना शांतीची सावली द्यायची सोडून, तू आपल्या व्यक्तीगत मुक्तीसाठी तडफडणार आहेस? तुझे ध्येय इतके क्षुद्र आहे का ? नरेंद्रने केवळ अध्यात्म जपजाप्य, समाधी यातच मग्न न राहता आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचा उपयोग, आपल्या देशबांधवांच्या सर्वांगीण कल्याणासाठी करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. गुरूंची इच्छा आणि स्वत:चा अनुभव, याच्या जोरावर नरेंद्रनाथांनी पुढे आपले आयुष्य खर्ची घातले.

हे काम करता करता सर्वात आधी नरेन्द्रनाथ आपला देश जाणून घ्यायला उत्सुक होते. अयोध्या, लखनौ आग्रा वृंदावन अशी ठिकाणे पहात पहात ते भारताच्या चारही दिशांना परिभ्रमण  करू इच्छित होते.असे तीर्थाटन अर्थात परिभ्रमण केल्याने त्यांना आपल्या देशाची स्थिति कळली. आपल्या लोकांचे दैन्य समजले. दास्य आणि दारिद्र्य समजले. आपसातील भेद, अज्ञान, सामर्थ्यहीनता, ही समाजातली कमतरता लक्षात आली. परिव्राजक म्हणून फिरल्यानंतर त्यांना वाटले की आपला समाज पुन्हा सामर्थ्यशाली झाला पाहिजे, त्याचं वैभव पुन्हा त्याला मिळालं पाहिजे, राष्ट्रोत्थान झालच पाहिजे.

      म्हणून त्यांना भारतात असलेली इंग्रजांची सत्ता, गुलामी, अशा वर्तमान अवस्थेत, देशातील आध्यात्मिक संस्कृती कशी आहे, सामान्य लोक कसे जगताहेत? शिक्षणाची काय परिस्थिति आहे? सनातन धर्म सगळीकडे कसा आहे? याची सगळीकडे हिंडून माहिती करून घ्यावीशी वाटली. त्यासाठी त्यांनी कश्मीर ते कन्याकुमारी पर्यन्त शहरे, खेडी, विविध लोक, शेतकरी, गरीब, दीन दुबळे, राजे रजवाडे, संस्थानिक आणि जे जे आवश्यक त्यांच्या भेटी घेत, अवलोकन करता करता भ्रमण केले. त्यांना दिसलं की जनतेत धर्माबद्दल आस्था आहे पण सामाजिक जीवनात गतीशीलता नाही. दोष धर्माचा नाही पण धर्माचा धंदा झाल्यामुळे समाजजीवन पंगु झालं आहे. त्यांना मातृभूमीचं पुनरुत्थान घडवून आणायच होतं. तीचं आध्यात्मिक सामर्थ्य क्षीण झालं आहे. सगळा समाज भुकेकंगाल आहे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे. अध्यात्मिकतेच्या बळावर त्यानं सारं जग जिंकलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. पाश्चिमात्य लोकांची संस्कृती आणि चालीरीती व त्यांच्या डामडौलावर न भुलता, आपली ही मातृभूमी कशी आहे ते समजून घेतली पाहिजे.  आपल्या भारतीय समाजाचा जीवनहेतु काय आहे आणि त्याच्या अस्तित्वाची प्रेरणा कशात आहे, याचा शोध घेतला पाहिजे. आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक आदर्श आपण विसरून गेलो आहोत, हे आपले खरे दारिद्र्य आहे. आपल्या ठायी स्वत:च्या अस्मितेचे भान उत्पन्न होईल तेंव्हाच आपले सारे प्रश्न सुटतील”.

खरच आहे आपल्याकडे जे अध्यात्म आहे, वेद, उपनिषदे यासारखे अनेक प्राचीन ग्रंथ आहेत. त्यात आपल्या जीवन जगण्याचे, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व सार सांगितले आहे. जीवनपद्धती सांगितली आहे. हा आपल्या संस्कृतीचा मूळ पाया आहे जो इतर कुठल्या ही देशात नाही आणि एव्हढी प्राचीन परंपराही नाही. म्हणूनच स्वामी विवेकानंद जेंव्हा सर्व ठिकाणी भारताबाहेर फिरले तेंव्हा त्यांना हेच जाणवलं होतं की, भारताकडे एव्हढी समृद्ध प्राचिनता असूनही भारत अधोगतीकडे का चाललाय? तर भारताच्या अधोगती च्या मुळाशी कोणतीही धडपड न करण्याची, उद्युक्त न होण्याची आणि कठोर परिश्रम न घेण्याची प्रवृत्ती आहे, पुढे जाण्याची ईर्ष्या नाही. इच्छा नाही, स्वत:च्या हिमतीवर उभे राहण्याचा गुण आपल्यात नाही. त्यामुळे काहीतरी प्रेरणा मिळेल, धीर मिळेल असे स्फुरण जो पर्यन्त चढत नाही तोपर्यंत काहीही घडणार नाही.      

जेंव्हा  स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेला उपस्थित राहण्यासाठी म्हणून अमेरिकेत शिकागो येथे गेले, त्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर त्यांना आपला देश आणि इतर देश यांच्यातली तफावत जाणवत होती. ते बघितलेल्या गोष्टींची आपल्या देशाशी तुलना करायचे, अगदी प्रवासाच्या सुरुवातीलाच जहाजाने  जाता जाता त्यांना जपान, चीन असे देश लागले. ते बघून त्यांना भरून आले की आपल्या देशाला हजारो वर्षांची परंपरा आहे, उज्ज्वल वारसा आहे, बळकट असं अध्यात्म आहे, धर्मविचार आहे, हे भूषणावह असे प्राचीनतेचे श्रेय कुठे हरपले आहे? आज आपल्या मातृभूमीतले हे वैभव, त्याचा मागमूसही दिसू नये याचे दु:ख त्यांना झाले.

जपान मध्ये जेंव्हा जहाज थांबले होते तेंव्हा खूप मोठा फरक त्यांना जाणवला. स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रत्येक बाबतीत दिसणारी त्यांची सौंदर्य दृष्टी, रुंद रस्ते, घराभोवती बागा व शहराची नीट रचना , आधुनिकतेच्या काळात केलेला विज्ञानाचा स्वीकार, असे पाश्चात्य जगाचे आव्हान स्वीकारून जपान ताठ मानेने उभा आहे याचेही त्यांना कौतुक वाटले. तिथे त्यांना संस्कृतमध्ये मंदिरातील भिंतींवर श्लोक लिहिलेले  आढळले. तिथल्या पुरोहितांना संस्कृत कळत नव्हते, पूरोहित आधुनिक दृष्टीकोण असणारे होते. हे सर्व बघून विवेकानंद यांना वाटले शक्य तितक्या भारतीय तरुणांनी जपानला भेट दिली पाहिजे, कारण जपान पासून आपण शिकाव्यात अशा खूप गोष्टी आहेत. योकाहोमा ला पोहोचताच त्यांनी जहाजातूनच आपल्या मद्रासच्या शिष्यांना पत्र लिहिले की, जरा इकडे या, हे लोक पहा,आणि शरमेने आपले तोंड झाकून घ्या. पण त्यांना हे माहिती होतं की परंपरेने गुलाम असण्याची सवय भारतीयांना जडली आहे ती जाणार थोडीच ? आणि जात ? तिची तर खूप सवय, जरा इथून बाहेर पडले की आपण आपली जात गमावून बसू अशी भीती या लोकांना वाटतेय. शेकडो वर्षे खाणेपिणे, गुलामी, जुन्या पुराण्या चालीरीती पाळणे, आणि महत्वाकांक्षा काय तर एखादी नोकरी मिळवणे किंवा फार फार तर वकील होणे. एव्हढेच”. विवेकानंद कोणाचीही तमा न बाळगता निर्भीडपणे पुढे म्हणतात की, या तर, प्रथम माणसे व्हा. ज्यांचा नेहमी प्रगतीला विरोध असतो त्यांना झुगारून द्या. आपल्या बिळातून बाहेर पडा. आणि सभोवताली दृष्टी टाका सारी राष्ट्रे कशी दौडत चालली आहेत ते पहा. तुमचे आपल्या देशावर प्रेम असेल तर पुढे या. अधिक चांगल्या आणि उच्च दर्जाच्या गोष्टी हस्तगत आपण प्रयत्न करूया, मागे वळून मुळीच पाहू नका, पुढेच जात रहा” केव्हढा विचार आहे या मागे .

त्यांना अनुभवाने माहिती होते की चांगल्या कामात विघ्ने आणणारे लोक काही कमी नसतात. कर्तृत्व, पौरुष आणि पराक्रम या गुणांचे विवेकानंद यांना आकर्षण होते. अमेरिकेस जाताना खर तर अजून कित्येक किलोमीटर प्रवास व्हायचा होता, पॅसिफिक महासागर पार व्हायचा होता. पण त्या क्षणाला जे त्यांनी पाहिले ते आपल्या भूमीवरच्या लोकांना लगेच सांगावे अशी आंतरिक इच्छा निर्माण झाली होती आणि जपान सारखा प्रगतीत पुढे असणारा देश सुद्धा भारताबद्दल आदर बाळगतो याचा त्यांना जेव्हढा अभिमान वाटला तेव्हढेच वाईट वाटले आणि भारताची दुरवस्था डोळ्यासमोर उभी राहिली.

आता अमेरिकेत पोहोचल्यावर तिथले लोक, सुधारलेल्या व उच्च शिक्षित स्त्रिया, शहरे, वाहतूक, तिथले वातावरण, घरे, लोकांची वागणूक या सर्वांचे निरीक्षण विवेकानंद करत होते. त्यांच्या नजरेतून महत्वाच्या गोष्टी टिपल्या जात होत्या. सर्व धर्म परिषदेला वेळ होता आणि तिथे तब्बल ७०० एकर जमिनीवर भरवलेले अवाढव्य असे कोलंबियन एक्स्पोझीशन (औद्योगिक प्रदर्शन)भरले होते. विवेकानंद ते पाहून आश्चर्य चकित झाले. तिथे असणारी सुबत्ता, विज्ञानाचा वापर, तंत्रज्ञान, अद्ययावत संशोधन, यंत्रे, उपकरणे, सर्वसर्व बघण्यासारखे होते. ते मानवाच्या बुद्धीचे आणि कर्तृत्वाचे प्रदर्शनच होते म्हणा ना. भौतिक प्रगती होती ती. तिथल्या नैतिकतेचे पण त्यांनी अनुभव घेतले. त्यांना हे लक्षात आले की जरी भौतिक प्रगतीत हे देश पुढे असले तरी त्या देशांना आपल्यासारखा अध्यात्माचा पाया नाही त्यामुळे त्यांची जीवनशैली नुसता देखावा आहे . शाश्वत नाही. त्यांच्याकडे शिक्षण आहे पण संस्कृती नाही. या उलट आपल्याकडे जीवन जगण्याचा शाश्वत असा आधार आहे. फक्त दारिद्र्य आणि अज्ञान दूर व्हायला हवे. त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे , ते मिळाले की नवा दृष्टीकोण मिळेल, आत्मविश्वास वाढेल.

आत्मनिर्भर भारताचा विचार स्वामी विवेकानंद यांच्या समोरच सुरू झाला होता. याच प्रदर्शना जमशेटजी टाटा भाग घ्यायला गेले होते. जाताना ते स्वामी विवेकानंद यांच्या बरोबर जपान ते शिकागो च्या प्रवासास होते. त्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेतून, त्याग आणि तपस्या याचे पुनरु:जीवन करण्याची योजना टाटांनी आखली आणि बंगलोर इथे विज्ञान विषयाला वाहिलेली, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था उभी केली.     

त्यांनी अशा प्रगतिच्या व विकासाच्या अनेक गोष्टी पाहिल्या आणि त्यातील मोठमोठ्या उद्योजक जॉन डी रॉकफेलर, तिकडचे तत्वज्ञ अशा लोकांच्या भेटीतून तिथल्या विकासाचे मर्म समजून घेतले. आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास, आपल्याकडे शेती, विविध कला, कारागिरी आणि कौशल्ये आहेत त्याचा विकास व्हयायला हवा. त्याचे शिक्षण प्रशिक्षण, देऊन लघु उद्योग, मध्यम उद्योग, मोठे उद्योग यांना प्रेरणा द्यायला हवी. आपण करू शकतो असा विश्वास मनात निर्माण करून त्या तरुणांना बळ द्यायला हवे.

आज घडीला भारतात तरुणांना आकर्षित करणारी अनेक क्षेत्रे आहेत, अनेक संधी आहेत. अन्नधान्य उत्पादन , ऊर्जा क्षेत्र आहे, संरक्षण क्षेत्र आहे औषध निर्माण आहे, तंत्रज्ञान क्षेत्र आहे. मुख्य आहे संशोधन क्षेत्र. आता कोरोना काळात औषध क्षेत्रात भारताला यात लागणार्‍या औषधे व वस्तूंची निर्मिती करण्याची संधी मिळाली आहे. अशा संधी घेऊन स्वावलंबी होणं केंव्हाही देशाच्या दृष्टीने हिताचेच आहे.       

भारत स्वयंपूर्ण झाला तर भारताची अर्थव्यवस्था सुधारेल. भारताची निर्यात वाढली तर त्यातून परकीय चलन जमा होईल. अर्थव्यवस्था बळकट होईल आपण जी वस्तूंची आयात करतो त्या वस्तु जर भारतातच आपण उत्पादित करू लागलो तर आपला पैसा बाहेर जाणार नाही, त्यामुळे भारताचा खर्च कमी होईल आणि वस्तूंची टंचाई भासणार नाही. तसेच किमती पण माफक राहतील, चलनवाढ होणार नाही. दर वाढणार नाही. देशातच खूप उत्पादन झाल्यामुळे वस्तूंच्या किमती आटोक्यात राहतील आणि या वस्तूंची निर्यात करता येईल जेणे करून पुन्हा त्यावर परकीय गंगाजळी वाढेल.

स्वामी विवेकानंद यांनी जो देशाच्या पुनरुत्थानाचा मार्ग सांगितला की, “या देशाचे जीवन म्हणजे धर्म, याला धर्माचीच भाषा उमगते. धर्म हेच याचे प्राणतत्व, तुमचे राजकारण, समाज, महापालिका, प्लेगनिवारण कार्य, दुष्काळ निवारण, या गोष्टी केवळ धर्माच्याच माध्यमातून होतील, एरव्ही तुम्ही कितीही हातपाय हलवले तरी, आक्रंदने  केली तरी त्याचा काही उपयोग नाही”. कसा याचा विचार आपण जरूर करू. आत्मनिर्भर होण्यासाठी , विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे आपले अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याची आजही आवश्यकता आहे.  

-       डॉ. नयना कासखेडीकर.                   

Monday, 20 September 2021

भुलाबाई-भोंडला – लोकपरंपरा

 

                                भुलाबाई-भोंडला – लोकपरंपरा  

    

संस्कार भारतीचा महाभोंडला 

भाद्रपदात गौरी गणपती झाले की मुलींना वेध लागतात ते भुलाबाई किंवा भोंडल्याचे .त्या अगदी वाटच बघत असतात. लहानपणी भातुकली खेळायचा जसा तिचा हक्क च असतो, तसाच हा भोंडला किंवा हादगा आणि भुलाबाई उत्सव तिचा हक्काचा असतो. मनोरंजना बरोबरच त्यातून तिला शिक्षण पण मिळत असतं. असे शिक्षण देण्याची सुरुवातीला आपली मौखिक परंपरा होती. जात्यावरच्या ओव्या, दळणकांडण करताना म्हणायची गाणी. लग्न कार्यातली किंवा शुभ प्रसंगी म्हणायची मंगलगाणी, शेतातली कामे उरकताना म्हणायची गाणी, डोहाळजेवण, बारसे, पाळणा, विहीण म्हणणे असे अनेक प्रसंग गीतातून वर्णन करून साजरे केले जायचे. पणजी, आजी यांच्याकडून नातीपर्यंत सर्वजण ही मौखिक परंपरा सांभाळायच्या. यातून मंगलमय वातावरण तयार व्हायचे, उत्साह वाढायचा. तर जीवन जगण्याची ओढ निर्माण व्हायची. कारण जगण्यात आनंद असला तर जीवन सुसह्य होत जाते. म्हणूनच उत्सवप्रियता आपल्या सर्वांना जास्त प्रिय होती आणि आहे. साने गुरुजींनी म्हणूनच म्हटलं आहे की, “ नित्य क्रमाचे जेंव्हा उत्सव होतात तेंव्हा आयुष्य ही एक आनंदयात्रा होते”.            

    भारतीय लोकसाहित्यात अशा लोकगीतांची परंपरा समृद्ध आहे . प्राचीन वैदिक वाड:मयात त्याची मुळे आढळतात. अगदी जन्मापासून अंत्यविधी पर्यन्त जे धार्मिक विधी असतात त्याची त्या त्या प्रसंगाची गीते प्रत्येक भाषेत दिसतात. मग त्या त्या प्रांतातल्या ज्या परंपरा आहेत, व्रतवैकल्ये आहेत, चालीरीती आहेत, त्याचे वर्णन अशा लोकगीतातून आपल्याला घडत असते.

अशा साहित्यात मुख्यत: शिव-पार्वती, राधा-कृष्ण आणि राम-सीता हा विषय समान धागा म्हणून सर्व प्रांतात दिसतो. यात प्रेम भावना, आदर्श नाते संबंध, निष्कलंक चारित्र्य, आदर्श पती किंवा कुटुंब प्रमुख, विवाहसंस्था, प्रतिष्ठा असे अनेक विषय यातून प्रसृत होत असतात. लोकसाहित्यातील अनेक प्रकारात उदा. लोककथा, बोधकथा, भारुड, ओव्या, स्त्री गीते, उखाणे म्हणी, कूट प्रश्न, सवाल जबाब, लोकनाट्य यातून आपल्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर जे जे प्रसंग,विधी,संस्कार होत असतात त्या त्या वेळचे वर्णन या गीतातून येते. आपल्या सण उत्सवांशी निगडीत किंवा ऋतु बदलांप्रमाणे ही लोकगीते असतात. मनोरंजन, कल्पकता, चातुर्य, शहाणपण यातून सांगीतलेले असत. ही गीते वेगवेगळ्या भाषेत जरी असली तरी त्यांचा आविष्कार आणि समान दुवा ही संस्कृती च असते.

    आसामी भाषेतली बिहू गीते, बंगाली भाषेतली तुसू गीते, पंजाबी मधली तिजा गीते, तमिळ भाषेतली तिरूविळपात्तु अशी ही वेगवेगळी सण आणि उत्सव गीते आहेत. रोगनिर्मूलनासाठी धार्मिक विधी गीते असतात. ऋतु गीते, होळी गीते, कृषिगीते, वर्षागीते, नौका गीते, कोळीगीते तर, काश्मिरी, तेलुगू, मल्याळम, उर्दू, आसामी यात लग्न गीते असतात त्याला वेगवेगळी नावे आहेत. 

महाराष्ट्रात विविध भागात विविध रंगी संस्कृती ची रुपे आढळतात. आदिवासी जमातीमध्येही अशीच काही लोकगीते ,नाचाची गाणी, सणाची गाणी, लग्नाची गाणी, असतात.आपल्यासारखीच जात्यावर दळताना ओव्या असतात तशाईच भोजपुरी मध्ये धन्य दळताना गीते म्हणतात त्याला ज्यंतसार म्हणतात. त्या त्या गीतातून त्या प्रदेशाची संस्कृती आपल्याला कळत असते. 

    भारतात विवाहप्रसंगी म्हणायची लोकगीत सगळीकडे दिसतात. मुलीला सासरी पाठवताना म्हणायची वियोगाची गाणी,भोजपुरी मध्ये आहेत. कश्मीर मध्ये विवाहगीते समुहाने म्हणायची आहेत. पंजाब मध्ये तर विधीनप्रमाणे गीते आहेत. वधूकडची  आणि वराकडची गीते वेगवेगळी असतात. गुजराती लग्न गीतात वधूवरांना राम-सिता किंवा कृष्ण- रुक्मिणी समजून गीते म्हणतात. यात विरह भावाला महत्व दिलेले असते. ओरिसा मध्ये तर वधूने स्वत:च गीते म्हणण्याची प्रथा आहे आणि यात नवरी मुलगी आपल्या माहेरच्या नात्यांची ताटातुट होताना जो वियोग होतो, त्यातील आई वडील, भाऊ बहिणी यांच्या नात्यातील भावना यांचं वर्णन करत असते.      

     स्त्री गीते – भारतातली लोकशाही ,लोक संस्कृती आणि कृषि संस्कृती या सर्वांमध्ये स्त्री ही नेहमी मध्यवर्ती भूमिकेतच राहिली आहे. लोकसंसख्येच्या पन्नास टक्के स्थान असलेली स्त्री .खर तर तीचं सगळीकडे अस्तित्व अगदी महत्वाच असतं. कर्तृत्व असतं.अनुभव पण असतो. काली माता, दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी, गौरी या रूपात ती लोकदेवता- स्त्री देवता असते . तीचं माहात्म्य सांगणारी गीतं गायली जातात. शेतीसंबंधी कृषि गीते ,सण उत्सवासंबंधी गीते, धार्मिक गीते गायली जातात. पण....  पण, मनात काहीतरी असतं, कुठेतरी खुपत असतं, काही गुपित पण असतं, तर कुठला आनंद आणि कुठल तरी दु:ख, कोणाला तरी सांगावसं वाटतं, तिथे औपचारिकता नको असते. पण यासाठी भेटायला हवं ना? मग निमित्तही हवं त्याला.

   पुर्वी मुली लहान वयातच लग्न होऊन सासरी जायच्या, नंतरच्या टप्प्यात तिचं लग्नाचं वय जरी वाढलं तरी ती एक मुलगी, आणि १६,१८ फार फार तर २१,२२ अस वय असायचं. मोठी झाली तरी घरातली लग्नाची मुलगी ही जबाबदारीच ओझं असायची. कारण ज्या ज्या काळात तिच्या बाबतीत वाईट अनुभव येत गेले तिथे तिथे मग तिला बंधने घातली जाऊ लागली यात तिची काळजी हाच भाग असायचा, कारणाशिवाय कुठे जायचं नाही, उशिरा पर्यन्त बाहेर थांबायचे नाही.मग पुढे पुढे या रूढीच होऊन गेलेल्या दिसतात.  सासरच्या लोकांबद्दल तक्रार करायची नाही. घरात बोलाची सोय नाही मग कोणापाशी बोलणार? जिवाभावाच्या मैत्रिणीच. दुसरं कोण? त्या एक तर समदु:खी असतात. आपल्याच सारख्या आनंद आणि दु:खाच्या अनुभावातून ती ही गेलेली असते. त्यामुळे तिला माझे मन जास्त च कळेल या भावनेतून ही अशी गीते लिहिली गेली असणार. यासाठीच भेटण्यासाठी, एकत्र येण्यासाठी निमित्त असायची ती श्रावणात मंगळागौर जागविणे, भाद्रपदात हरितालिका जागविणे, भोंडला किंवा हादगा किंवा भुलाबाईची पुजा करणे.  वटसावित्री, नागपंचमी, संक्रांत, चैत्र गौर हे सुद्धा अशा निमित्त केलेले हळदी कुंकू समारंभ. पण विशेषत: लहान मुलींना एकत्र आणणे, त्यांना निसर्ग शिक्षण देणे, वनस्पतींची ओळख करून देणे, कुटुंब संस्थेतल्या नात्यांची ओळख पक्की करून देणे, पाककृती किंवा पदार्थ ओळखणे, सजावट, मांडणी स्वच्छता यातलं कला कौशल्य दाखविणे, संस्कार करणं अशा अर्थाने त्यांना शिक्षण द्यायचे ते त्यांना साजेशा अशा खेळातून, गाण्यातून. कारण हे सर्व त्या मुलीला तिच्या पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणार असतं. हा असतो भोंडला .  

  आपले लोकजीवन आणि कृषीप्रधान संस्कृती, भौगोलिक दृष्ट्या प्रत्येक प्रांतात जरा वेगवेगळी आहे. त्यावर आधारित काही सण ऋतुंप्रमाणे साजरे केले जातात. कोकण, खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा अशा ठिकाणी नवीन आलेल्या पिकांचे, धान्याचे स्वागत करण्याचा उत्सव केला जातो. त्यातच या लहान मुली भुलाबाईचा उत्सव साजरा करतात. भुलाबाई आणि भुलोजी ची म्हणजे शंकर पार्वती ची स्थापना करतात. नव्या पिकांचं, कृषि लक्ष्मीचं स्वागत करण्याचा हा उत्सव विदर्भात मानला जातो.   निसर्गा बरोबरच तिच्या स्त्री सुलभ भावना त्यात गाण्यातून व्यक्त होत असतात. विदर्भातला भुलाबाई उत्सव ३१ दिवसांचा तर पश्चिम महाराष्ट्रातला भोंडला घटस्थापनेपासून कोजागिरीपर्यंत साधारण सोळा दिवस चालणारा. भुलाबाई उत्सवात शंकर, पार्वती आणि त्यांचं बाळ यांची आरास मांडून पुजा करतात. पार्वती महिनाभरसाठी माहेरी आलेली असते. म्हणून आपली मुलगी समजून तीचं माहेरपण खूप उत्साहात साजरं करतात. माहेर ! मग तिचे आनंदाचे दिवस ! अशी कल्पना करून त्याचे नियोजन होते. तर भोंडला म्हणजे हस्त नक्षत्रातला .

वेदकालीन ऋषिजनांनी सूर्य चंद्र आदींची प्रार्थना करून त्यांच्या प्रीत्यर्थ यज्ञ याग असे काही करत असताना मास, ऋतु, नक्षत्र या संबंधित काही सिद्धांत अनुभवाच्या आधारावर ठरवले. त्यावरूनच आपली कालगणना ,पंचांग याचे नियोजन केले गेले आहे. पण अशी माहिती, हिंदू सणांचा इतिहास आपल्या मुला मुलींना माहिती नसतात. त्यातून स्त्रियांना व मुलींना नसायच्याच. आताही तशीच परिस्थिति आहे. कारण वेगळे आहे एव्हढेच. गुढीपाडवा, अक्षयतृतीया,चातुर्मास, नारळी पौर्णिमा, संक्रांत, होळी असे ऋतूवरून निश्चित केलेले सण आहेत. तर काही कौटुंबिक आहेत उदा. वटसावित्री, मंगलागौरी, पिठोरी अमावास्या, हरितालिका, ऋषिपंचमी  ही कुटुंबासाठी ठरवलेली व्रते आहेत. या सर्वांप्रती कृतज्ञता दाखविण्याची संधी म्हणजे पूजा अर्चना वगैरे करत असत.    

 शेतीप्रधान भारतात तर उगवलेल्या पिकांमुळे झालेला आनंद हा उत्सव म्हणून च साजरा होत आला आहे. रब्बी हंगामातली पिके मोठी होत असताना, ती टिकावित आणि आणखी चांगली तरारून वर यावीत म्हणून हस्त नक्षत्राची पूजा बांधली जाते, पावसाळ्यातल्या या चार महिन्यात हस्त नक्षत्राला मानांचं स्थान असत. हस्त नक्षत्रात मुसळधार पाऊस असतो. त्यामुळे यावेळी हत्तीला प्राधान्य दिलेले असते. त्याची प्रतिमा पाटावर काढून किंवा रांगोळीतून काढून समृद्धीच्या या प्रतिकाची पुजा करून त्या भोवती फेर धरून गाणी म्हणायची पद्धत आहे. भोंडल्याची सुरुवात याच अर्थपूर्ण गाण्याने करतात .

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे
बा माळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे

हस्त नक्षत्रावर सर्वांचीच भिस्त . हस्तात होणारा पाऊस हा हत्ती पाण्यात बुडेल एव्हढा असायला हवा अशी अपेक्षा असते. म्हणून आनंदी आनंद असतो. त्याचे महत्व सांगण्यासाठी

हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा ।।
दहा मधले आठ गेले
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।
ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।।
एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं

नक्षत्राच्या माहिती बरोबर वारांचे महत्व सांगणारे गीत म्हणजे

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।
यातून आध्यात्मिक गोडी लावण्याचे काम साधले जाते. 
 कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा  धावून || धृ ||
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण,  आली यशोदा  धावून...||1||
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
|

या गाण्यातून कशाबद्दल काय काय कल्पना केल्या जातात, कोणत्या उपमा दिल्या जातात आणि कृष्ण कसा हट्ट करतो हे दाखवले आहे.

काही गीतातून कौटुंबिक चित्र उभं राहतं. नाती कशी असतात. त्याची बंधने कशी असतात.नात्यातला आदर कसा असतो? कसा असायला हवा? याचही चित्रण दिसतं.  

नणंद भावजयींचे नाते एक वेगळेच नाते असते. नणंद बाईंना जरा आपल्या भावाच्या बायकोपेक्षा जास्त च मान पान हवा असतो.

सासूबाई तर काय त्यांच्याच तोर्‍यात. जरा सुनेने माहेरी जायचं म्हटलं तर नाराजीचा सूर. मग ही कामाची यादीच सुनेपुढे मांडतात. माहेरी जायच्या आधी सून बाईंनी दळण कांडण करून ठेवायचं, तिखटमिठाचं पाळं भरून ठेवायचं,गिरणीतून पीठ आणून ठेवायचं,भाजी बिजी आणून ठेवायची, कपडे धुवून ठेवायचे अशी सगळी कामे झाल्याशिवाय तिची इच्छा पूर्ण नाही व्हायची.  हे तर अलीकडच्या काळात ही घडत होतं. म्हणून ते तेंव्हाच्याही काळातल गाणं -- 

कारल्याचा वेल लाव गं सुने...
कारल्याचा वेल लाव गं सुने ,लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥
कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥
कार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥

म्हणजे कारल्याचा वेल लाव, तो वाढू दे, त्याला फूल येऊदे ,फळ लागू दे, आता त्याची भाजी कर, ती तू पण खा, मागचं उष्ठ खरकटं आवर आणि आता जा माहेरा, असा तिच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जायचा. भावनांची कोंडी व्हायची . मग कसं प्रेम वाटणार? आणि तुलनेने माहेर, आजोळ चांगलच वाटणार. 

म्हणून अक्कण माती चिक्कण माती या गाण्यात

अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं
अशी आपली सून माहेरला गेली आहे तिला घ्यायला सासरची मंडळी जातात वयाने लहान असल्याने तिला काहीतरी आमिष दाखवलं की ती लगेच येईल असे वाटून आमिष दाखवले जाते .

अरडी ग बाई परडी

परडी एव्हढं काय गं? हे गीत. किंवा

 सासरच्या वाटे कुचूकुचू काटे

माहेरच्या वाटे नारळ फुटे
कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासरा पाहुणा आला गं बाई
सासऱ्याने काय काय आणले गं बाई
सासऱ्यानी आणल्या पाटल्या गं बाई
पाटल्या मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
    झिपरं कुत्रं सोडा गं बाई....

   या गाण्यातून सूनबाईंना घ्यायला आलेल्या लोकांनी वेगवेगळी आमिषे दाखवली आहेत, पण ती काही सासरी /घरी यायला तयार नाही. सासरचे लोक पाटल्या पोहे हार, गोठ,राणीहार, हे दागिने घेऊन येतात. पण जेंव्हा नवरा मंगळसूत्र घेऊन येतो तेंव्हाच ही सुनबाई त्याच्याबरोबर सासरी- घरी जायला तयार होते. अशी ही हट्टी सून या गीतात दाखवली आहे.

  अशा प्रकारे एक प्रकारचं लोकजीवनच अशा खेळातून,उत्सवातून आपल्याला पहायला मिळतं. असे सामाजिक शिक्षण देणारे उत्सव, व्रते आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत. तो टिकवला पाहिजे. काळा नुसार त्यात बदल होत राहणार. पण मुख्य उद्देश विसरता कामा नये. म्हणून भलतंच रूप त्याला देऊ नये. अशीच पुढच्या पिढीकडून अपेक्षा आहे. भोंडला, भुलाबाई किंवा हादगा अशा लोक परंपरा सामाजिक मूल्यांचे धडे देणार्‍या आहेत. लहान मुलींचे/स्त्रीयांचे व्यक्तिमत्व विकसित करणारे आहे. नैतिकता शिकवणार्‍या आहे. नातेसंबंध टिकविणार्‍या आहेत, हे त्या मुलीच्या पालकांनी सतत लक्षात ठेवलं पाहिजे. तिच्या भविष्याचा विचार अशा छोट्या छोट्या परंपरेतून या निमित्ताने तिच्यात रुजवला पाहिजे. आपल्या पूर्वजांकडून चांगले संस्कार करण्यासाठीच असे उत्सव निर्माण केले गेले आहेत.कालच गणपती विसर्जन झालं. आज मुलींनी भुलाबाई भुलोजीला आमंत्रण दिलं असेल,आता हा महिना त्यांचा आनंदाचा असेल.सर्वांना शुभेच्छा !          

 

©  डॉ. नयना कासखेडीकर   

                            ---------------------- 

Saturday, 11 September 2021

शिकागोत स्वामी विवेकानंद

 

                                       शिकागोत स्वामी विवेकानंद

                                           

   श्रीरामकृष्ण परमहंस यांचे शिष्य म्हणून नरेन्द्रनाथ अडीच वर्षे परिव्राजक म्हणून भारतभर हिंडले ते आपला हिंदुस्तान समजून घ्यायला, आपली संस्कृती आणि आपला हिंदू धर्म याची परिस्थिति कशी आहे हे समजून घ्यायला, लोकजीवन समजून घ्यायला. पारतंत्र्याच्या काळात, इंग्रजी सत्तेच्या काळात आपल्या सामान्य हिंदू जनतेची उपेक्षा कशामुळे होत होती याची कारणं त्यांना या परिभ्रमणात समजली होती.

     आपल्या समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य दूर कसे होईल आणि भारताचे पुनरुत्थान कसे होईल? त्याच्या आत्म्याला जाग कशी येणार? याच प्रश्नावर जास्त वेळ ते चिंतन करत होते.

     प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले उदात्त आध्यात्मिक विचार आणि जीवनाची श्रेष्ठ मूल्ये खालच्या थरातील माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. सामान्य माणसाच्या सेवेसाठी आणी उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचा असा स्वामीजींचा निर्णय झाला. हे करण्यासाठी पाच दहा माणसं आणि पैसा हवाच. आता अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरते आहे. तिथे जाऊन त्यांना भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि तिकडून पैसा गोळा करून आणून इथे आपल्या कामाची ऊभारणी करावी, म्हणून सर्व धर्म परिषदेला अमेरिकेत जायचा त्यांचा निर्णय झाला.


  पाश्चात्य देशात आपला जाण्याचा उद्देश काय यासाठी, रामेश्वर, मद्रास, म्हैसूर, सिकंदराबाद आदि ठिकाणी त्यांचा प्रवास आणि व्याख्याने झाली. सर्वांनी मिळून पैशांची तयारी केली. म्हैसूरच्या राजांनी मोठी रक्कम दिली. खेतडीचे राजे अजित सिंग यांना तर खूप आनंद झाला, त्यांनीही मोठी सोय केली. जो काही खर्च येईल तो सर्व अजित सिंग देणार होते. शिवाय पश्चिमेकडे जाणार म्हणून तिथे शोभेल असा राजेशाही पेहराव तयार करून दिला. तर विवेकानंदांच्या आईला दरमहा काही रक्कम पाठवून आर्थिक मदत त्यांनी चालू केली, ज्यामुळे विवेकानंद निश्चिंत मनाने शिकागोला जाऊ शकले.

    शिकागोतल्या सर्व धर्म परिषदेचे विशेष निमित्त होते. कोलंबस अमेरिकेत उतरलेल्या घटनेला चारशे वर्ष पूर्ण झाली म्हणून मोठा महोत्सव अमेरिकेत भरवण्यात आला होता. या निमित्ताने जागतिक पातळीवरचा समारोह आणि प्रदर्शने भरविण्यात आली होती. बौद्धिक ज्ञानशाखांशी संबंधित एकूण वीस परिषदा झाल्या. त्यापैकी धर्म आणि तत्वज्ञान यावरची सर्व धर्म परिषद ही एक होती. ही परिषद शिकागोच्या आर्ट इंस्टीट्यूटच्या भव्य इमारतीत भरली होती. ११ सप्टेंबर १८९३ ला परिषदेचे उद्घाटन झाले. भारतातून आलेले इतर प्रतिनिधी होते- बुद्ध धर्माचे धर्मपाल, जैन धर्माचे विरचंद गांधी, ब्राह्म समाजाचे प्रतापचंद्र मुजूमदार व बी.बी.नगरकर, थिओसोफिकल सोसायटीच्या डॉ.अॅनी बेझंट व ज्ञानचंद्र चक्रवर्ती. 

समोर श्रोते होते उच्च विद्याविभूषित, विचारवंत, ख्यातनाम विद्वान, पत्रकार ई. उद्घाटनाच्या दुपारच्या सत्रात विवेकानंद यांचे एक छोटेसे भाषण झाले. शिकागो म्हटलं की सर्वांना आतापर्यंत एकच भाषण झालं असं वाटतं. परंतु विवेकानंदांनी उद्घाटन, समारोप या निमित्ताने आणि हिंदू धर्म विषय प्रबंध वाचन, अशी अनेक भाषणे दिली. त्याशिवाय प्रत्येक वेळी जे जे हिंदू धर्माबद्दल आरोप वा टीका करत असत, त्या त्या भाषणाला विवेकानंद उत्तरादाखल त्याचं खंडन करत असत. अशी त्यांची अनेक भाषणे या परिषदेत झाली. ही सर्व भाषणे खूप गाजली. एका लेखात सर्व देणं अशक्य आहे. थोडक्यात त्याचा गोषवारा असा -

 


११ सप्टेंबरचे उद्घाटनपर भाषण –

     “अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधुनो” या पहिल्याच वाक्याला कानठळ्या बसणारा टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या भाषणाला टाळ्या पडल्या होत्या पण पहिल्याच संबोधनाला असा प्रतिसाद नव्हता मिळाला, त्यांनाही आश्चर्य वाटले. टाळ्या थांबण्याची वाट पाहत विवेकानंद थांबले होते. शांतता झाल्यावर त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. “सुंदर शब्दांमध्ये जे आपले स्वागत केले गेले आहे त्याबद्दलचा आनंद अवर्णनीय आहे. जगातील सर्वात प्राचीन असा हिंदू धर्म, त्यातील सर्वसंगपरित्यागी संन्याशांची परंपरा यांच्या वतीने मी जगातील सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मन:पूर्वक धन्यवाद देतो”.  त्यांनी परिषदेच्या आयोजकांचे आभार मानले. आधी बोललेल्या वक्त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रत्येक मताबद्दलची सहिष्णुता आणि सर्व जगातील धर्म विचारांच्या बाबतीतली स्वीकारशीलता हे हिंदू धर्माचे वैशिष्ठ्य आहे असे सांगून, पारशी लोक आपल्या जन्मभूमीतून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. त्यांना निश्चिंतपणे राहण्यासाठी आसरा मिळाला, ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगून, अशा देशातून आपण आलो आहोत आणि अशा धर्माचा मी प्रतिनिधी आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो, याचा त्यांनी उल्लेख केला. सा-या जगातून इथे आलेल्या सर्व धर्म प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आज सकाळी जी घंटा वाजवली गेली, ती सर्व प्रकारच्या धर्मवेडेपणाची मृत्युघंटा ठरेल, लेखणी किंवा तलवार यांच्या सहाय्याने केल्या जाणार्‍या मानवाच्या सर्व प्रकारच्या छळाच्या तो अंतिम क्षण असेल आणि आपआपल्या मार्गाने एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेल्या मानवांपैकी कोणाविषयीही, कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा अनुदार भाव यानंतर शिल्लक राहणार नाही, असा मला पूर्ण विश्वास आहे”. असे पाच मिनिटांचे आपले भाषण विवेकानंदांनी थांबवले आणि पुन्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

     हे छोटसं भाषण हा एक उत्स्फूर्त आविष्कार होता. विवेकानंदांनी  परिषदेच्या उद्दिष्टालाच स्पर्श केला होता. स्वागतपर भाषणाला उत्तर म्हणून अशी चोवीस भाषणे झाली त्यात विवेकानंदांचे विसावे भाषण होते. अजून खरा विषय तर मांडला जायचा होता. ही परिषद सतरा दिवस चालू होती. रोज तीन-तीन तासांची तीन सत्रे होत.

  सर्वधर्म परिषद सुरू झाली. धर्मविषयक वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होत होत्या. यात प्रामुख्याने दोन भाग केले होते, पहिला भाग होता, प्रत्येक धर्मातील तत्वचिंतन आणि विविध सिद्धांत, तर दुसर्‍या भागात, परमेश्वराचे स्वरूप, धर्माचे महत्व, ईश्वरी साक्षात्कार, परमेश्वराचा अवतार, अनैतिकतेच्या कल्पना असे विषय ठेवले होते. या चर्चा दहा दिवस चालल्या होत्या. तर उत्तरार्धात चर्चेचे विषय होते, कौटुंबिक जीवन, ललितकला, विज्ञानातील शास्त्रे, नीतीविषयी सिद्धांत, अखिल मानवमात्राविषयीचे प्रेम, ख्रिस्त धर्मप्रचारक मिशनर्‍यांची कार्यपद्धती. भिन्न धर्माच्या अनुयायांनी एकमेकांना समजून घ्यावे हा याचा हेतू होता.

नवव्या  दिवसाचे भाषण-

     या परिषदेत  विवेकानंद यांना हिंदू धर्मावरची टीका, आरोप प्रत्यारोप, ऐकावे लागले होते, पण नवव्या दिवशी त्यांनी हिंदू धर्मावरचा त्यांचा निबंध सादर केला. इतर धर्मियांच्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, त्याचा कठोर शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, “ आम्ही पूर्वेकडून आलेले प्रतिनिधी गेले काही दिवस इथे बसलो आहोत आणि एका अधिकारपदाच्या भूमिकेतून आम्हाला सांगितलं जात आहे की, आम्ही सर्वांनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार करायला हवा. का? तर ख्रिस्त धर्मीय राष्ट्रे आज सर्वात अधिक प्रगतिशील आहेत. आम्ही आता आमच्या आसपास पाहतो, तर आम्हाला असं दिसतं की इंग्लंड हे ख्रिस्त धर्मीय राष्ट्र आज जगात सर्वात पुढारलेले आहे आणि ते पंचवीस कोटी लोकांच्या मानेवर पाय रोवून उभं आहे. आम्ही इतिहासात मागे वळून पाहतो, तर आम्हाला आढळून येतं की, ख्रिस्तधर्मीय युरोपच्या समृद्धीचा प्रारंभ स्पेन पासून झाला. या स्पेनच्या समृद्धीची सुरुवात झाली ती, मेक्सिकोवर आक्रमण करण्यापासून ! आपल्या बांधवांचे गळे कापून ख्रिस्त धर्म प्रगतीशील होत जातो. अशा प्रकारची किंमत देऊन मिळणारी समृद्धी सौम्य प्रकृतीचा हिंदू स्वीकारणार नाही. मी इथे बसलो आहे आणि मी जे काही सारं ऐकलं तो असहिष्णु वृत्तीचा कळस होता. इस्लाम धर्माचे गोडवे गायलेले मी आता ऐकले. हे मुसलमान भारतात हातात तलवार घेऊन अत्याचार करीत आले आहेत. रक्तपात आणि तलवार ही हिंदूंची साधनं नाहीत. त्यांचा धर्म सर्वांविषयीच्या प्रेमाच्या आधारावर उभा आहे. यावर श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

     २० सप्टेंबरला पेकिंगमधील धर्म हा विषय हेडलँड यांनी मांडला तेव्हा त्याला जोरदार उत्तर देत विवेकानंदांनी त्याचाही खरपूस समाचार घेतला.

२७ सप्टेंबर- समारोपाचे भाषण –

     शेवटच्या दिवशी ७ ते ८ हजारांनी खचाखच भरलेले कोलंबस आणि वॉशिंग्टन सभागृह - हा ऐतिहासिक गर्दीचा उच्चांक गाठणारा होता. सर्वधर्म परिषदेच्या समारोपात तर, एखाद्या संगीत मैफिलीची भैरवीने सांगता होते तसे विवेकानंदांनी सर्व धर्माच्या अनुयायांना संदेश देऊन भाषण संपवले. ते म्हणाले, “कोणत्याही ख्रिस्ती माणसानं हिंदू वा बौद्ध होण्याची गरज नाही किंवा कोणत्याही हिंदू वा बौद्ध माणसाने ख्रिस्त होण्याची गरज नाही. प्रत्येकानं दुसर्‍या धर्मातलं सारभूत तत्व ग्रहण करायचे आहे. त्याच वेळी आपलं वैशिष्ट्यही जपायचं आहे आणि अखेर स्वत:च्या स्वाभाविक प्रवृत्तीला अनुसरून आपला विकास करून घ्यायचा आहे”.

   स्वामीजींनी सर्वांच्या मनात विश्वबंधुत्वाचा भाव निर्माण केला. ते म्हणाले, “आपले मार्ग भिन्न असले, विचारधारा वेगळ्या असल्या, तरी आपण सर्वजण भिन्न मार्गाने जात असलेल्या पूर्णतेचे यात्रिक आहोत”.

     शिकागोच्या सर्व धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंदांची संबोधने आणि श्रोत्यांचा त्यांस मिळालेला तुडुंब प्रतिसाद  म्हणजे भारताच्या गौरवाचं  सुवर्णाक्षरांनी लिहिलेल पान होतं. विश्वबंधुत्व आणि विश्वधर्म याचा उद्गाता असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान यात असामान्य, अद्वितीय अशी कामगिरी केली होती. त्यांचे नाव अमेरिकेच्या कानाकोपर्‍यात पोहोचले होते. विवेकानंद आता वैश्विक स्तरावर  स्वामी विवेकानंद झाले होते. त्यांनी भारताबाहेर जाऊन केलेला आपल्या उच्च संस्कृतीचा जागर, हिंदू धर्माची वैशिष्ठ्ये, तत्वज्ञान, आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान व प्रेम, आज या शिकागोच्या परिषदेनंतर १२८ वर्षानी आपण जाणून घेणे, माहिती करून घेणे अत्यंत महत्वाचे ठरेल. कारण त्याची आज नितांत आवश्यकता आहे. 

- डॉ. नयना कासखेडीकर, पुणे.

 

                                -----------------------------------------