Wednesday, 3 January 2018

मुक्काम पोस्ट रत्नागिरी - भाग २

                                             मुक्काम पोस्ट रत्नागिरी - भाग २

     
     रत्नागिरीच्या मुक्कामात लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीचे मनापासून दर्शन घेतले. वेगवेगळ्या भेटींमधून एक प्रश्न सारखा विचारला जात होता, थिबा पॅलेस बघितला? आणि तो बघण्याची उत्सुकता जास्तच ताणली जायची. रत्नागिरीत आल्यावर बघण्याच्या यादीत पहिल्या  टॉप टेन मधलं हे ठिकाण ‘थिबा राजवाडा’. पण त्याची फारशी माहिती कुणी सांगितली नव्हती. डोळ्यासमोर म्हैसूर, कोल्हापूर, भोर, इंदौर, बडोदा,जयपूर आणि पुण्यातल्या विश्रामबागवाडा सारखे वाडे आले. आठवत होती संस्थाने आणि राजघराणी. साधारण असाच असावा थिबा राजवाडा ! पण थिबा?  हे  कसलं नाव? ऐकायला विचित्रच वाटलं. म्हटलं असेल, थिबा राजा रत्नागिरीला भेट देऊन गेला म्हणून त्याच्या नावाने तो प्रसिध्द असेल. कळेलच इतिहास. आज थिबा राजवाडा बघायला सूर्यास्ताच्या वेळी जायचं असं ठरलं. कारण चांगला व्ह्यू टिपायचा होता.
  
  


     रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यापासून आत वळलो. वळणावळणाच्या रस्त्याने राजवाड्यासमोर आलो. कल्पना केली होती, गेट मधून शिरताना समोर उत्तम बगीच्याची रचना असेल, आत प्रवेश देणारे गार्ड असतील. छे तसं काहीच नव्हतं. गाडी थेट आत जाऊन राजवाड्यासमोरच जाऊन थांबली. राजवाड्यासमोर सर्वत्र गवत वाढलेले. इथे एकेकाळी सुंदर बगीचा असल्याच्या खाणाखुणा आहेत. भोवतालच्या परिसरात जुनी झाडे अभिमानाने उभी आहेत, इतिहास माहिती असल्यासारखी. समोर राजवाड्याची तीन मजली ब्रह्मी  शैलीतील देखणी वास्तू एकाकी पडल्यासारखी उभी आहे. होय, एकाकी थीबाचा एकाकी पॅलेस .
  
  


     आताच्या म्यानमार म्हणजे पूर्वीच्या ब्रह्म्देशाच्या राजा थिबा मिनला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी १९१० मध्ये बांधलेला हा राजवाडा, गेली १०७ वर्षे त्याच्या दर्दभऱ्या कहाणीसह  रत्नागिरीच्या समुद्रकिनारी उभा आहे. ब्रिटीश राजसत्तेविरुद्ध बंड पुकारल्याने राजा थिबाला आयुष्याची तीस वर्षे रत्नागिरीत स्थानबद्धतेत काढावी लागली. १९१६ पर्यंत म्यानमारच्या या राजा- राणीचं वास्तव्य या राजवाड्यात होतं. २७ एकराचा भव्य परिसर, त्याच्या मधोमध कोकणातील जांभा दगड, ब्रह्म देशाचे बर्मा टिक वूड आणि ब्रिटीशांचे स्थापत्य विशारद यातून एका वेगळ्याच शैलीची ब्रह्मदेश व भारत यांना जोडणारा दुवा असलेली ही वास्तू तयार झाली आणि इथेच नाती जुळली ब्रम्हदेश व रत्नागिरी व महाराष्ट्राची.

  

     चौदा खोल्या, दोन मोठाली दालने, स्वयंपाकघर, सज्जे, कोकणातल्या घरांसारखा  कौलारू व्हरांडा, मध्यभागी मोकळा चौक, त्यात मध्यभागी  चुन्याच्या निवळीवर चालणारे कारंजे, वास्तूच्या पुढे व मागील बाजूस बागेची रचना. जागोजागी कमानी असलेल्या काचेच्या खिडक्या असा, सुरेख रचना असलेला हा पॅलेस. पश्चिमेची सूर्यकिरणे अंगावर घेतलेला राजवाडा जसा उजळून निघतो तसाच पूर्वी दिव्यांची सोय नसताना या राजवाड्यात तेलाचे दिवे लावले जायचे, तेंव्हा हा राजप्रासाद रात्रीसुद्धा उजळून निघायचा. दिवाळीत दीपोत्सव असायचा. तेंव्हा रत्नागिरीकर या सौंदर्याचे दर्शन घ्यायला आवर्जून यायचे. आता वर्षातून एकदा २६ जानेवारीला थिबा राजवाड्यात कला संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते तेंव्हा हा पॅलेस प्रकाशझोतात येऊन त्याच्या अस्तित्वाची मोहर रत्नागीरीकरांवर उमटवत असतो. या पॅलेसच्या सौंदर्यावर ‘कहाणी थिबा राजाची’, ’ग्लास पॅलेस’ अशा कथा कादंबऱ्याही प्रसिध्द आहेत.
  
  

     या सुंदर राजवाड्याचा इतिहास मात्र मनाला वेदना देणारा आहे. ब्रह्मदेशातील कोनबाँग या राजघराण्यात थिबाचा जन्म १ जानेवारी १८५९ रोजी मंडाले येथे झाला. वडील राजा मिन्डॉन आणि आई सिम्बुमाशीन. १८७८ मध्ये थिबाला राजघराण्याचे वारस म्हणून घोषित केलं आणि पंधरा दिवसात राजा मिन्डॉन  यांचा मृत्यू झाला. तर वयाच्या १९ व्या वर्षी युवराज थिबा राज्याच्या गादीवर बसला. ब्रम्ह्देशाच्या राजवटीतला ‘थिबा मिन’ हा शेवटचा राजा ठरला. वय लहान असलं तरी  जनतेच्या कल्याणाची अनेक कामे त्याने केली होती. कायदा व सुव्यवस्था याची घडी बसवली. देशातली गुलामगिरी संपवली. त्या देशाचा थिबा हा सर्वोच्च पाली पदवीधर होता. ब्रह्मदेशाचा राजा म्हणून त्याला केवळ सात वर्षे राज्य करता आलं.
     

     १८८५ मध्ये ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करताना आपला मोर्चा ब्रम्हदेशाकडे वळवला होता. सलग ३ वर्ष राजा थिबाने ब्रिटिशांशी टक्कर दिली. शरण जाणं किंवा युध्द करणं यापैकी एक पर्याय त्याला निवडायचा होता ! घराण्याचा वारसा टिकवणं महत्वाच होतं. त्यामुळे ब्रिटीशांशी युद्धाला सामोरं जायचं त्याने ठरवले. दुर्दैवाने पंधरा दिवसातच त्याचा पराभव झाला.२९ नोहेंबर १८८५ ला राजा थिबा शरण आला आणि त्याचे भविष्य बदलले. एप्रिल १८८६ ला ब्रिटिशांनी त्याला देशापासून आणि जनतेपासून लांब ठेवण्यासाठी,  कुटुंबासह भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर रत्नागिरी शहरात आणून ठेवले. तो महत्वाचा राजबंदी असल्याने, ब्रिटीशांनी त्याला राहायला बंगला, मानधन, काही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. सुरुवातीला दिलेला बंगला जुना आणि अपुरा आहे अशी तक्रार व्हॉइसरॉयकडे केल्यानंतर  ब्रिटीशांनी त्याला रत्नागिरीच्या दक्षिणेला भाट्ये खाडीच्या कडेला नवा मोठा बंगला १९१० मध्ये बांधून दिला. तोच हा ‘थिबा राजवाडा’. तो थिबाच्या पसंतीने आणि त्याच्या देखरेखेखाली बांधला असे म्हणतात.
     
     या नव्या राजवाड्यात राहण्याचे भाग्य थिबाला फक्त पाच ते सहा वर्षेच मिळालं. डिसेंबर १९१६ मध्ये  त्याचा मृत्यू झाला. शेवटचा श्वाससुद्धा या राजाने नजरकैदेतच घेतला. धोरणी ब्रिटिशांनी थिबाचा अंत्यसंस्कार म्यानमारमध्ये म्हणजे ब्रह्मदेशात नेऊन करण्यास बंदी घातली. असेच बहादुरशाह जफर ह्याला अटक करून रंगूनला कैदेत ठेवले होते. त्याच्या मृत्यूनंतरही मृतदेह भारतात आणण्यास ब्रिटिशांनी बंदी घातली आणि रंगूनमधेच दफन करायला लावले. या दोन्ही घटनेत ब्रिटिशांना भीती होती कि त्या त्या देशात जाऊ दिल्यास, त्यांची मोठी स्मारके होतील आणि ती लोकांची स्फूर्तिस्थाने होतील. आपल्या राजवटीस विरोध वाढेल.

     मातृभूमीपासून तुटलेल्या थिबाचे अंत्यसंस्कार तरी त्याच्या देशात - म्यानमारमध्ये व्हावेत म्हणून  राणीने खूप प्रयत्न केले. ब्रिटीश सरकारबरोबर अडीच वर्ष पत्रव्यवहार चालू होता. ती अडीच वर्ष थिबाचे पार्थिव सांभाळण्यात आले, पण शेवटपर्यंत ब्रिटिशांनी मागणी धुडकावून लावली. शेवटी १९ मार्च १९१९ ला रत्नागिरीतच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्युनंतर हा राजवाडा ब्रिटिशांच्या ताब्यात होता.

     हातात सत्ता असेल, त्याबरोबरच विवेक, संवेदनशीलता व चांगला दृष्टीकोण असेल तर अनेक चांगल्या घटना घडू शकतात. याचं उदाहरण म्हणजे, जनता पक्षाच्या राजवटीत परराष्ट्रमंत्री या नात्याने मा.अटल बिहारी वाजपेयी, ब्रह्मदेशाच्या दौऱ्यावर गेले असताना, एकेकाळचा भारताचा सम्राट व थोर कवी म्हणून    बहादुरशाह जफर यांच्या स्मृतीस्थळास त्यांनी भेट दिली. त्यावेळी तिथे सगळ्यांना राजा थिबा व त्याच्या भारतात असलेल्या वंशजांची आठवण झाली. भारत व ब्राह्म्देशाच्या या दोन महान व्यक्तींच्या आठवणी व स्मृती अवशेष यांची आता अदलाबदल करण्याचा विचार झाला. इथल्या टूटू चा अर्ज मागविण्यात आला. मानधन मंजूर केलं गेलं. तिला काही प्रॉपर्टी देण्याचे ठरले...पण हाय! जनता सरकार पडलं. आणि राजा थिबाला मिळणारा न्याय तिथेच गोठला. नाहीतर हा निर्णय देशाच्या सांस्कृतिक धोरणाचा खूप मोठा व महत्वाचा टप्पा ठरला असता.     
     

आपला देश आणि राज्य सोडून दुसऱ्या देशातल्या एका लहान शहरांत ३३ वर्ष आयुष्य काढलं. तेही ऐन उमेदीच्या वयात असताना. वैवाहिक जीवन पण दुखा:तच गेलं. त्याची पत्नी राणी सुपायालत, तिची बहिण आणि त्याच्या चार मुली इथे राहत होत्या. फाया गाई, फाया लत, फाया, फाया गलाय अशा चार मुली. यातल्या फाया गाईने राजवाड्यात असलेल्या रखवालदाराबरोबर लग्न केले. गोपाळ सावंत त्यांचे नाव, त्यांना दोन मुले होती. त्यापैकी थोरली मुलगी म्हणजे टूटू !


थिबा राजाच्या मृत्युनंतर राणी सुपायलात मुलींना घेऊन रंगूनला परत गेली.  फाया गाई (१९४७ ला इंग्रज गेल्यानंतर) रंगूनला परतली, परंतु परधर्मीयाशी लग्न केले म्हणून तिला ब्रह्मदेशात स्वीकारले नाही आणि तिचे जगातले एकमेव माहितीचे ठिकाण असलेल्या रत्नागिरीत ती पुन्हा परतली. वडिलांप्रमाणे तिचे दुर्दैवाचे फेरे चालूच होते. विपन्नावस्थेत असतानाच, ती पण निधन पावली. नवरा गोपाळ यांचे आधीच निधन झाले होते. तिचे अंत्यसंस्कार जिल्हाधिका-यांनी नी वर्गणी गोळा करून केले.
  
 

गरीब, अशिक्षित टूटू राजघराण्यातील असून सुद्धा पोरकी झाली. टूटू ला आपण राजवंशातील आहोत याचीही कल्पना नव्हती. टूटू आता महाराष्ट्रीयन झाली. तिला फक्त ग्रामीण मराठी भाषा येत होती. पुढे तिने व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या शंकर पवार याच्याशी लग्न केले. तिला सात मुले होती. गोधड्या शिवणं, कागदी फुले करून विकणे, शेणाच्या गोवऱ्या थापून त्या विकणं अशी कष्टाची कामे करून आयुष्य काढलं. स्वत:च्या मुलांबरोबर अनाथ मुलांचा सांभाळ सुद्धा केला टूटू ने ! १७ वर्षापूर्वी, ऑक्टोबर २००० ला वयाच्या ९४ वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. सोनं, हिरे, माणके वापरणारा राजा थिबा, त्याची नात टूटू  यांचं प्रारब्ध कसं होतं ? टूटू ची मुलं, नातवंडे भारतीय/मराठी आहेत. थिबाचा वंश आजही भारतात अस्तित्वात आहे. थिबा राजाच्या आयुष्याची शोकांतिका मनाला चटका लावून जाते.
                                             



                      (सर्व फोटो वरील पहिले दोन राजवाड्याचे सोडून इंटरनेट वरून साभार परत) 
                                                          -----------------------------


- डॉ नयना कासखेडीकर, पुणे.  

Thursday, 7 December 2017

मुक्काम पोस्ट रत्नागिरी - भाग १



रत्नागिरीच्या दीर्घ मुक्कामातला पहिलाच दिवस.

भेट द्यायच्या स्थळांची यादी मोठ्ठी होती. रत्नदुर्ग किल्ला, मत्स्यालय, पांढरा समुद्र, काळा समुद्र, पतित पावन मंदिर, विठ्ठल मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, लोकमान्यांचे जन्म स्थान, थिबा पॅलेस, मालगुंड, गणपतीपुळे, नारळ संशोधन केंद्र आणि बरेच काही. पण पहिलं आकर्षण होतं ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी आणि लोकमान्य टिळकांची जन्मभूमी असलेली स्थळं डोळेभरून पाहणं. 
मागच्याच गल्लीत असलेले टिळकांचे जन्मस्थान, उतरलेल्या निवासस्थानापासून पायी जाण्यासारखेच. निघालो. अरुंद गल्लीच्या तोंडाशी वळलो. वन वे ट्रफिक होती, दुकानावरील पाट्या वाचत जाताना कळलं की,  ही ‘टिळक आळी’ आहे . इथूनच अभिमानानं उर भरून यायला लागला. मनात कसलातरी आनंद होत होता. तेव्हढ्यात समोर चौकात दिसली श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान गणेशमंडळ टिळक आळी वास्तू. त्याच्या बाजूलाच होतं स्त्रियांचं लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, जिथे भगिनी मंडळ, शिशु विहार, संस्कार वर्ग आणि हेल्थ क्लब होतं. पिंपळपार देवस्थानच्या थोडं पुढे गेल्यावर उजव्या हाताला लागते, महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याने जपलेली लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाची वास्तू. जशीच्या तशी, सारवलेली. नीटनेटकी, सर्व खाणाखुणा जिथल्या तिथेच असलेली, डौलाने, अभिमानाने उभी आहे लोकमान्यांचा इतिहास सांगत.



लहानपणापासून लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि जयंतीला भाषणांत ऐकलेलं आणि घोकून घोकून पाठ केलेलं आणि अजूनही मनावर कोरलं गेलेलं वाक्य होतं,

“लोकमान्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी  रत्नागिरीतल्या चिखली या गावी झाला”.

आज या वास्तूला भेट दिल्यावर मोठा खुलासा मला झाला होता तो हा की, टिळक कुटुंबाच्या कुळाचे गाव चिखलगाव होते आणि त्यांचा जन्म रत्नागिरीत ह्याच वास्तूत झाला होता. या क्षणी लगेच मी, टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी  रत्नागिरीतल्या चिखली या गावी झाला.  
हे वाक्य डोक्यातून डीलिट करून टाकले.

त्यांची ही जन्म वास्तू एक मोठा पुरावाच होता डोळ्यासमोर. तिथे कुठेही चिखली हा उल्लेखच नव्हता मुळी. मन बेचैन झालं. आणि आम्ही स्वतः शाळेत असाच चुकीचा इतिहास, चुकीचा संदर्भ शिकत आलो. शिकवीत आलो आणि आमचे शिक्षक? चुकीचं शिकवत होते? मनात या प्रश्नांचा गोंधळ उडाला. कारण पुस्तकात जे दिलं होतं तेच तरत्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं. मी आत्ता शाळेतले, कॉलेजमधले मित्र मैत्रिणी आणि संपर्कातले शिक्षक अशा सर्वजणांना हा प्रश्न विचारून कन्फर्म केलं. सर्वांनी चिखली असच शिकल्याचं सांगितलं. एक मैत्रीण अपर्णा म्हणाली, “शाळेत चिखलीच शिकलो पण परवाच रत्नागिरीला भेट दिल्याने तीन तीनदा वाचलं कि जन्म रत्नागिरीला झाला म्हणून. मलाही हे शॉकिंग होतं.” चला माझ्याप्रमाणे आणखी कुणाचाही गोंधळ दूर झाला होता तर. चिखली/चिखलगाव हा मुद्दा बाजूला ठेऊन जन्म रत्नागिरी येथेच झाला हे महत्वाचे. ह्याची चर्चा करण्याचं कारण म्हणजे सर्वांनी रत्नागिरी हे जन्मगाव लक्षात ठेवावं चिखली नाही, इतकंच.


ही समोरची सुबक सुंदर दोन मजली वास्तू, ओसरी, वर जायचा जिना, घराची मागची बाजू आणि लांब पर्यंत असलेली आंबा, फणस नारळ पोफळी ची झाडं. या टुमदार बंगलीच्या प्रेमात न पडाल तरच नवल. दरवर्षी येथे टिळक जन्मोत्सव साजरा केला जातो. एकूणच टिळक आळी लोकमान्यांच्या आठवणीने भारलेली वाटली.
इथे भेट देऊन चिखली विषयी अज्ञान दूर झाल्यामुळे सार्थक झाल्यासारखं वाटलं.

आता मोर्चा होता पतित पावन मंदिराकडे. स्वातंत्र्यलक्ष्मी चौकाजवळ सामाजिक समतेचे प्रतिक असलेले ‘पतित पावन मंदिर’. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर खळबळ उडवून देणारे, विविध जातीतील सुमारे दीड हजार लोकांचे सहभोजन सावरकर यांनी याचं मंदिरात घडवून आणले. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचेही सहभोजन कोल्हापूरच्या सत्यशोधक चळवळीतील नेते भाई बागल यांच्या पत्नीच्या अध्यक्षतेखाली पार पडले.



रत्नागिरीच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासात या मंदिराला मानाचे स्थान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सांगण्यानुसार श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी वीस गुंठे जमीन विकत घेऊन, दीड लाख रुपये खर्च करून, १९३१ च्या जानेवारीत हे मंदिर बांधून पूर्ण केले. या मंदिरातल्या लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना भागोजी शेठ कीर व त्यांच्या पत्नीच्या हस्ते झाली.सावरकर यांचा समतेचा दृष्टीकोण, पूजा प्रार्थनेचा समान अधिकार आणि स्त्री पुरुष समानता हे या पतित पावन मंदिराच्या रुपात सतत आपल्यासमोर असेल.

मंदिराच्या आवारात आलो, दिवाळीच्या खुणा अजून तशाच होत्या. दिवाळी होऊन १५/२० दिवस झाले होते. बाहेर मोठा आकाशकंदील, होऊन गेलेल्या उत्सवाची साक्ष देत होता, तर मंदिरात प्रवेश करताच मंडपात काढलेल्या रांगोळीतून सौंदर्याचा साक्षात्कार घडत होता. गाभाऱ्यात लक्ष्मी नारायणाची मूर्ती जणू काही स्वातंत्रवीर सावरकर यांचा स्पर्श झाल्याच्या अभिमानात उभी होती.



हे मंदिर बांधण्याचे कारण घडले ते विठ्ठल मंदिरातला लढा. सावरकरांनी सर्वाना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून लढा पुकारला होता आणि या संघर्षामुळे बहुजन लोकांना सभामंडपापर्यंत प्रवेश देण्यात आला होता.

या मंदिरात गेलो आणि  सावरकर चित्रपटाचे शुटींग करतानाचे बाबूजी अर्थात सुधीर फडके आठवले.  स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल जी भक्ती आणि प्रेम मनात होतं तेव्हढीच बाबूजी बद्दल. २० वर्षापूर्वी कोकणात गेलो असताना मालगुंड येथे सकाळी सकाळीच वर्तमान पत्र वाचलं आणि एका बातमीने लक्ष वेधलं. बातमी होती, वीर सावरकर यांच्या वरील चित्रपटाचे शुटींग विठ्ठल मंदिरात चालू आहे. बहुजनांना मंदिर प्रवेश हाच विषय शूट होणार होता. त्यासाठी स्थानिक लोकांनी पारंपारिक वेषात हजर राहावे. असे आवाहन केले होते. ट्रीपला आलो असल्याने पारंपारिक वेष वगैरे जवळ अर्थातच नव्हता. तरी ते शुटींग बघायला आणि बाबूजी आपल्याला भेटतील या ओढीने मालगुंड हून रत्नागिरीला पोहोचलो. 



विठ्ठल मंदिरात गर्दी होती. मोठा मॉब होता. पोहोचलो तेंव्हा नुकताच ब्रेक झाला होता. बाबूजी आणि तेंव्हाचे आमदार डॉ.अशोक मोडक बसले होते. मोडक सरांची ह्यांची ओळख असल्याने आणि अचानक भेट झाल्याने, थोड्या गप्पा झाल्या. बाबुजींशी ओळख परीचय झाला. आता एक आठवण म्हणून फोटो काढू का अशी परवानगी घेऊन सगळे बाबुजींबरोबर पोज देऊन उभे राहिले आणि काय? दुर्दैव ! कॅमेऱ्यातला रोलच संपला. मग हीच पोज कॅमेऱ्या ऐवजी मनातच साठवली.असो. 

पण वीर सावरकर चित्रपट बघताना ,बच्चे कंपनीला आवर्जून नेऊन दाखवताना, बाबुजींनी या वयात घेतलेली मेहनत आठवून ,त्यांचा ध्यास पाहून प्रत्येक वेळी मनोमन नतमस्तक होत होते. आज पुन्हा एकदा त्याच विठ्ठल मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुधीर फडके यांना विनम्र अभिवादन केले. समाधानाने.  

अशा ऐतिहासिक रत्नागिरीचा अन्य फेरफटका पुढच्या भागात.  क्रमश:
                                             ----------------------------



-  डॉ. नयना कासखेडीकर, पुणे               

Thursday, 2 November 2017

रहस्यमय हॅलोवीन

                                

                               रहस्यमय हॅलोवीन   


       अंतराळवीरांनी चंद्रावर जेंव्हा पहिले पाउल ठेवले तेंव्हा त्यांना जो आनंद झाला असेल तेव्हढा किंवा त्यापेक्षा जरा जास्तच आनंद झाला होता, जेंव्हा आम्ही अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ( विमानातून  उतरल्यावर ) ठेवले तेंव्हा. साहजिकच होते. ऐकलेल्या आणि सिनेमात पाहिलेल्या, बातम्यात पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष पाहणार होतो. त्यामुळे कमालीची उत्सुकता होती, कुतूहल होते. विमानतळावरून घरी पोहोचायला कमीत कमी १०० च्या स्पीड ने  एक दीड तास लागणार होता. अमुक एका अव्हेन्यू कडे जाण्यास हायवे वरील रस्त्याला नंबर दिले होते. ज्या भागात जायचे आहे त्या भागाचा नंबर माहिती हवा आणि अर्थात शहराचा भूगोलही माहिती हवा, घरी जाताना मोठ्या इमारती, रस्ते, शिस्तीत जाणाऱ्या मोटारी, अटलांटा विमानतळावरचे प्रचंड मोठे पार्किंग, विमानतळावरचा प्रवेश किंवा निकास (exit) फी,  पेट्रोल पंप, पार्किंग फी, हे सगळे रोकड विरहित व्यवहार ( cashless) ,सगळीकडे cardने व्यवहार .पैसे सांभाळण्याचे अजिबात टेन्शन नाही. केव्हढा रिलीफ वाटला.

               

      गाडी कॉलनीत शिरली .कॉलनी कसली हो? नंदनवनच वाटले. शिरल्यापासून अगदी आत टोकापर्यंत च्या  परिसरातील, घरांप्रमाणेच घराबाहेरील चढ-उतारावरील कटिंग केलेली लॉन्स, कटिंग केलेली लहान मोठी झाडे, झुडुपे, रस्त्याशेजारील फूटपाथ सगळं सगळं नीट नेटकं. एखाद्या चित्रकाराने काढलेल्या निसर्ग चित्रापेक्षाही सुंदर.
गॅरेज मध्ये गाडी विसावली, त्याच दाराने आम्ही घरांत प्रवेश केला. आत गेल्यावर ही जाहिरात आहे का घर? असे वाटावे. मात्र संपूर्ण रस्त्यांवर घरी येईपर्यंत कुठलीही जाहिरात बाजी. बोर्ड, होर्डींग्स, साइन्स चे दर्शन नाही. वास्तविक ट्रम्प आणि हिलरी यांच्या निवडणुकीच्या जाहिराती तरी नक्की दिसतील असे वाटले होते. ते पण नाही.

     अत्यंत घाईत ठरविलेल्या अमेरिका वारीचे नियोजन आम्ही, बहिण आणि मेव्हणे यांच्यावरच सोपविले होते. कमीत कमी वेळात, सर्व सांभाळून जास्तीत जास्त वेळेचा सदुपयोग आणि समाधान कसे देता येईल याचा, कष्ट घेऊन त्यांनी विचार केला होता आणि नियोजन सुद्धा. विश्रांती नंतरचा पहिला दिवस उजाडला. अजून औत्सुक्य संपले नव्हते. अनिता (माझी बहिण) म्हणाली चला चक्कर मारून येऊ. अक्षरधाम पाहून येऊ. नवे हिंदू टेम्पल झाले आहे. इथेही मंदिरेच पहायची? मुलांचा कडवट चेहरा. पण निघालो. अप्रतिम मंदिर व परिसर पाहून, बाहेरच असलेल्या दुकानात शिरलो. आमच्या पाठोपाठच आत शिरलेल्या व्यक्तीने आम्हाला विचारले आपण याआधी भेटलोय कुठेतरी. आम्ही भारतातून आलो आहोत, हे सांगितल्यावर मग हिंदीतून संवाद सुरु झाला बराच वेळ तो चालला. या प्रसंगाने आम्हीही सुखावलो होतो हे खरे. भारतीय असल्याची ओढ आणि एकमेकांविषयी वाटणारे प्रेम.. दुसरे काय? दिवाळीत होणाऱ्या महाप्रसादाला येण्याचे निमंत्रण घेऊन बाहेर पडलो.

              

मुख्य रस्त्याला लागलो. पुढेच नर्सरी होती. अनिताला लॉन कापणा-या  माळ्याला भेटायचे होते आणि पम्पकिन पहायचे होते. पम्पकिन भाजीवाल्याकडे न घेता नर्सरीत कशाला घेते ? असा प्रश्न मला पडला होता. एखाद्या मॉल ची एन्ट्री वाटावी असे त्या फॅमिली नर्सरी चे प्रवेश दार होते. आत शिरल्यावर इनडोअर आणि आउटडोअर सजावटीच्या वस्तू, आणि बरेच काही लक्ष वेधून घेत होते. मला आपल्याकडील दिवाळीच्या तयारीची आठवण होत होती.कुंभार वाडा आठवला,विविध आकाराच्या पणत्या,दिवे,मूर्ती ,किल्ल्यावरची मातीची खेळणी, किल्ल्याच्या प्रतिकृती, रांगोळ्या, लक्ष्मी पूजनाची  तयारी यांची एव्हाना सर्व दुकानं थाटली असतील. उत्सवाचे वातावरण,प्रफुल्लीत करणारे! तशीच कुणकुण इथेही लागली .काहीतरी, इथला सण असणार. नर्सरीत पम्पकिन खरेदी करण्याला काहीतरी संदर्भ नक्की असणार.

           

आतमध्ये गेलो, भोपळ्यांचे कितीतरी प्रकार. मला दोन तीनच प्रकार माहिती होते. लहानात लहान आकारापासून ते मोठ्यात मोठ्या आकाराचे असे इथे भोपळ्यांचे पीकच आले होते. नुकतीच कापणी झाल्यासारखे. म्हटलं, असेल ह्यांचा बैसाखी, ओणम सारखा हार्वेस्ट फेस्टिवल. विविध आकाराचे भोपळे,भोपळ्याच्या आकाराचे प्लास्टिक चे कंदील, भयानक मुखवटे, वटवाघळे, काळ्या मांजरी, कोळी, कोळीष्टके, हाडांचे सापळे, भीतीदायक मुखवटे, अॅक्सेसरीज, अशा अनेक वस्तूंनी या नर्सरी बरोबरच इतर दुकाने, ऑफिसेस, फार्मर्स मार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॉल,रंगीबेरंगी सजली होती.ऑक्टोबर महिन्यात इथे हॅलोवीन साजरा होणार होता.त्याची पूर्वतयारी महिनाभर आधी सुरु झाली होती.हळू हळू आम्हाला हॅलोवीन ची सजावटही पाहायला मिळणार होती.

          

          मधल्या काळात आमचे फिरणे ,स्थलदर्शन चालू होते.जिथे जिथे जात होतो, तिथे तिथे पम्पकिन काही पाठ सोडत नव्हते. सुंदर सजावटी दिसत होत्या. नासा मध्ये सुद्धा होती. न्यूयॉर्क चे The Met  अर्थात, दी मेट्रोपोलीटन म्यूझीयम, मोमा, नायगरा, फिलाडेल्फिया, मॅनहटन, सार्वजनिक ठिकाणे. इथेही हॅलोवीन च्या सांस्कृतिक खुणांचे दर्शन होत होते.
            

जाता- येता, घरा बाहेर, अंगणात अक्राळविक्राळ, मुखवटे, भुते, हाडांचे सांगाडे अशा भीतीदायक सजावटी केल्या होत्या. कुणाच्या अंगणात पम्पकिन च्या सजावटी, लक्ष वेधून घेत होते, पण भीती वाटत होती ते बघताना. काही घराबाहेर तर लाईट इफेक्ट्स, हॉरर संगीत,फ्युम,बापरे !

              

इकडे आमची दिवाळीची तयारी  जोरात सुरु होती. आकाशकंदील. लाईट च्या माळा,पणत्या लावून दिव्यांच्या उत्सवाची तयारी.३१ ला दिवाळी पडावा, आमचा प्रकाशाचा उत्सव आणि ३१ ऑक्टोबर ला यांचा हॅलोवीन . दोन्ही टोकाचे विसंगत वाटत होते.

                     

बालगोपाळांची ‘ट्रिक ऑर ट्रीट’

दिवेलागणीची वेळ झाली ,बाहेर लहान लहान मुले त्यांच्या पालकांसह ,विविध वेशभूषेत घरोघरी जात होती. परीकथेतील राजकुमारी, नायक, ममी, ड्रॅक्युला, चेटकीण, हॅरी पॉटर यांचे वेश घालून, हातात भोपळ्याच्या आकाराच्या बादल्या, बास्केट्स घेऊन जात होती.बाहेर हे काय वातावरण आहे हे पाहायला आम्ही कॉलनीत एक चक्कर मारली.घरात पण मुलांसाठी चॉकलेट ,खाऊ ची तयारी झाली होती.ते पाहून मला संक्रांत आणि दसरा आठवला आणि लहानपण आठवल.तेंव्हा ही मुले घरोघरी जाऊन ‘ट्रिक ऑर ट्रीट’? असे ओरडत, खाऊ देणार कि घाबरवू? आणि खाऊ, भेटवस्तू घेऊन जातात. हॅलोवीन च्या कॉस्च्युम्स ची आणि पार्टीची लहान मोठे आतुरतेने वाट पाहत असतात.हा हॅलोवीन चा एक प्रकार.याशिवाय घोस्ट टुर्स  आयोजित करतात. कॉस्चुम पार्टी, हॉंटेड हाउसला भेट, हॉरर स्टोरी सांगणे, हॉरर फिल्म पहाणे हे उत्सव साजरे करण्याचे प्रकार .

              

हॅलोविन पाककृती

या सणा निमित्त कैंडी अॅपल, पीनट बटर बॉल्स, ओवन कॅरॅमल कॉर्न अणि भोपळ्याचे ब्रेड, स्वीट्स यांचा स्वाद घेतला जातो.

                  

हॅलोविन चे मूळ ब्रिटन अणि आयर्लंड संस्कृतीत सापडतात.त्यांच्याकडे नोहेम्बर महिन्याचा पहिला दिवस हा नविन वर्षाचा दिवस मनला जाई अणि उन्हाळ्याचा शेवटचा दिवस.ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत पशुपालन, शेतीची बरीचशी कामे उरकली जात. थंडी सुरु होणार.खरे तर ऋतू बदलाची जाणीव करून देणारा हा सण.हार्वेस्ट फेस्टिवल, जगात ही कल्पना सगळीकडे सारखीच. नवीन पीक हाती आलं आहे त्यामुळे या समृद्धीने आनंदोत्सव साजरा करतात ही तर परंपराच आहे .

         हॅलोविन या शब्दाचा पहिला वापर सोळाव्या शतकात केला गेला, जो स्कॉटीश संस्कृतीची ओळख देतो. केल्ट आय सी मध्ये हा सण म्हणून साजरा करतात.तो नववर्षाभिनंदन म्हणूनच.त्यामुळे नवे वर्ष संतांचा दिवस/संन्यासी दिवस असेल, या दिवशी संत पद मिळालेल्या व न मिळालेल्या सर्व संतांचे स्मरण केले जाते.त्याला आल हॉलोज डे किंवा होली डे म्हणतात. तर त्याचा आधला दिवस हा, वर्षभरात कुटुंबातले जे कोणी निधन पावले असतील त्यांना शांत करण्याचा दिवस. त्या रात्री मृतात्मे येतात, ते या दिवशी नव्या शरीराच्या शोधात येतात व मर्त्य मानवाच्या जगात सहज प्रवेश करतात असा समज होता.त्यातले दुष्ट आत्मे आपल्यावर  प्रभावी ठरू नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी व आपल्या घरापासून पळवून त्यांना लावण्यासाठी घराबाहेर स्मशानरूपी सजावट करण्याची प्रथा हॅलोवीन सणाला आहे. इथे मला आपली भारतीय संस्कृती आठवली .पितृ पंधरवडा.आपणही पंधरा दिवस आपल्या पितरांच्या आठवणीप्रीत्यर्थ राखून ठेवतो. आवश्यक ते विधी करतो. आपल्या परंपरेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हॅलोवीन म्हणजे सर्वपित्री अमावास्याच म्हणावी नाही का?

                     

इसवि सनानंतर पहिल्या शतकात रोमन साम्राज्यात पोमोना या फळझाडाची रोमन देवतेची पूजा करण्यासाठी हा सण साजरा होऊ लागला. अॅपल बॉबिंग हा हॅलोवीन चा खेळ प्रसिध्द आहे.   

             आयर्लंड मधून अमेरिकेत आलेल्या विस्थापितांनी हा सण अमेरिकेत आणला. अमेरिका कॅनडा, पोर्तोरिको, आयर्लंड,ब्रिटन मध्ये हा सण साजरा  केला जातो.

                   

अमेरिकेतले हॅलोवीन चे वैशिष्ट्य म्हणजे jack o Lantern, भोपळ्याचा तयार केलेला भला मोठा कंदील. भोपळ्याला मानवी डोक्याचा आकार देऊन, त्यावर नाक, डोळे, तोंड कोरून, मुखवटा तयार केला जातो. ३१ ऑक्टोबरला रात्री भोपळ्यात मेणबत्ती लावून तो कन्दिलासारखा मुख्य दाराबाहेर ठेवला जातो. जक या अत्यंत हुशार पण आळशी आयरिश माणसाची कथा या ‘jack o Lantern’ शी जोडलेली आहे. दुष्ट प्रवृत्ती /आत्मे भोपळ्यामुळे दूरच राहतात अशी श्रद्धा आहे.

          अशा या हॅलोवीन ची मजा गेल्या वर्षी अमेरिकेत अनुभवली आणि त्या मागचे रहस्य पण उलगडले. आज ३१ ऑक्टोबर म्हणून आठवण आली.

                              
                  
हा सण साजऱ्या करणाऱ्या समस्त बांधवाना Happy Halloween  / शुभेच्छा!       


-- डॉ.नयना कासखेडीकर  

Sunday, 17 September 2017

योजकस्तत्र दुर्लभः।

                                                 
                                                                   पुस्तक परीक्षण



अमंत्रं अक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्।

अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्रदुर्लभः।।



ज्यात मन्त्रशक्ति नाही असे एकहि अक्षर नाही.
ज्याला औषधी गुण नाही असे मूळ नाही.
पूर्णतः निरुपयोगी असा माणूस नाही.
पण या सगळ्यांना कामाला लावणारा म्हणजे योजक- तो दुर्मिळ असतो.

     योजना करणारा योजक दुर्मिळ असतो, पण तो असला की काय बदल घडतात हे सगळी जनता बघतेय. अनुभवते आहे. भारतातल्या परीवर्तनाचा शिलेदार मा पंतप्रधान नरेंद्र मोदी ! त्यांच्याच बद्दल लेखक डॉ.भा.ना.काळे यांनी ‘योजकस्तत्र दुर्लभ:’ हे पुस्तक लिहून त्यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीतले त्यांनी घेतलेले कष्ट, लावलेली शिस्त, घेतलेले निर्णय, परदेशात निर्माण केलेली भारताची एक वेगळीच प्रतिमा या सगळ्या विषयांचा उहापोह केला आहे.

     






या पुस्तकात आठ प्रकारणे आहेत. त्यात लेखकाने, नरेंद्र मोदी लहानपणापासून कसे घडत होते, तेंव्हापासून संघात त्यांच्यावर कोणते संस्कार झाले, त्यांनी संघाशी जोडलेले नाते, इथपासून ते पंतप्रधान झाल्यानंतरची अडीच वर्षे, यात त्या त्या काळातली सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध व भारताला भेडसावणाऱ्या समस्या आणि देशाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न याचा अतिशय मार्मिक शब्दात आढावा घेतला आहे.

     ॐ केशवाय नम: या पहिल्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, त्यापूर्वीचा हिंदुस्थान आणि संघाच्या मुशीतून घडणारा स्वयंसेवक ही माहिती नव्याने संघात येणाऱ्या व संघाबाहेरच्या अज्ञानी लोकांना व टीकाकारांना अत्यंत उपयोगी व मार्गदर्शक वाटते. केवळ ऐकीव आणि द्वेषाने प्रचार केलेल्या गोष्टी किती खोट्या असतात व वास्तव वेगळेच असते हे या प्रकरणातून उमगते. आरोग्यासाठी योगासने, व्यायाम, शुद्ध आचार विचार, मातृभूमीसाठी त्यागवृत्ती, कमालीची समर्पण भावना, हाती घेतलेल्या कार्याप्रती निष्ठा, शिस्त, शाकाहार, ब्रम्हचर्य, निर्व्यसन अश्या कित्येक गुणांचा समुच्चय मोदींच्या व्यक्तीमत्वात झालेला दिसतो.

     दुसऱ्या प्रकरणात १९४७ ला स्वतंत्र झालेल्या भारतात, चीन, पाकिस्तान, ताश्कंद करार यावेळी काय घडलं आणि १९५१-५२ मध्ये झालेली पहिली सार्वत्रिक निवडणूक ते २००९ च्या पंधराव्या सार्वत्रिक निवडणुकीचा धांडोळा लेखकाने घेतला आहे. यापैकी दीर्घकाळ कॉंग्रेस/युपीएची केंद्रात सत्ता होती. या विरोधी सरकारच्या काळातही  नरेंद्र मोदी यांनी तब्बल १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ तयार केले जे इतर राज्यांनाही मार्गदर्शक ठरले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांनी चौथ्यांदा घवघवीत यश मिळवलं. देशात आणि विदेशातही त्यांना कसे आणि काय काय अडथळे येत होते आणि ते सर्वाना कसे सामोरे गेले याचे यथार्थ वर्णन या प्रकरणात आहे. गुजरातचा विकास काय व कसा केला ? जामनगर मधली निवडणूक, वीज, पाणी, रस्ते या जनतेच्या मुलभूत समस्यांचे निराकरण, दारूबंदी, पर्यटन, व्यापार, अर्थव्यवस्था या माहितीमुळे गुजराथ मॉडेल ठळकपणे समोर येते.

     प्रचारकार्य हे या पुस्तकातील सर्वात मोठे प्रकरण. पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी प्रकाश झोतात आले कसे आणि लोकांच्या गळ्यातले ताईत झाले कसे याचं तंत्र समजून घ्यायचं तर हे प्रकरण इंटरेस्टिंग आहे. २००१ ची निवडणूक, गोधरा, बाबरी मशीद, दंगली, युरोपात येण्याची बंदी असे अनेक प्रसंग, त्याचा प्रचार-अपप्रचार, तर    २०१४ च्या निवडणुकीचे हाताळलेले प्रचारतंत्र, मागील १३ वर्षातील उल्लेखनीय काम, मोदी यांचे झंझावाती प्रचारदौरे, सभा, रॅली, नव्या टेक्नॉलॉजीचा त्यांनी प्रचारासाठी करून घेतलेला समर्पक उपयोग, त्याचा परिणाम, चहावला मुलगा, (चायवाला !) याची विरोधकांनी उडवलेली टर, अगदी त्यांचे वैयक्तिक जीवन सुद्धा टीका करताना सोडले नाही. असे प्रतिमा मलीन करण्याचे उद्योग का व कसे केले याचे लेखकाने यथार्थ वर्णन केले आहे.

     प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत धीराने सामोरा गेलेला अन तावून सुलाखून बाहेर पडलेला माणूस २०१४ मध्ये निवडून दिला तर नक्कीच उत्कृष्ठ प्रशासन अन आर्थिक विकास या उद्दिष्ठांची पूर्ती होणार हे प्रचारकार्यातून  लोकांच्या लक्षात आले. या निमित्ताने नरेंद्र मोदी व्यक्ती म्हणून कसे आहेत हे निवडणुकीच्या काळातील प्रचारात लोकांना समजून सांगाव लागले नाही तर आपोआप त्यांच्या कामाने ओळखता आले. ते सरळमार्गी आहेत, ते दारू पीत नाहीत, कुठलेही व्यसन त्यांना नाही. स्त्री शिक्षणाबद्दल त्यांचे प्रगतीशील विचार आहेत, घोषणा देऊन आकर्षित करणारे ते नाहीत, ठरवलेले काम ते पूर्ण करत्तात, राष्ट्रकार्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करतात. पैशापासून दूर आहेत व भ्रष्टाचार नाही ! माणसं जोडण्याची व ती सांभाळण्याची हातोटी हे लेखकाने उदाहरणासहित स्पष्ट केलय. जे आपल्यालाही अनुभवाने दिसतंय. त्यांच्या बद्दलच्या अनेक गोष्टी नव्याने समजल्या. गैरसमज दूर झाले. मला वाटतं या पुस्तकाचा उद्देश तोच आहे.

     लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत नेहमीपेक्षा जास्त मतदान झालं. ६६.४% एव्हढे. जे यापूर्वी झाले नव्हतं. भारतातल्या जनतेला आता घराणे आणि परंपरेने चालणारे राजकारण नको होते. बदल हवा होता तो त्यांनी कौल देऊन करून दाखवला. ते मोदी यांचं व्यक्तिमत्व जवळून समजल्यामुळेच. निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. त्यांची वयोवृद्ध आई मतदान करायला रिक्षातून गेली. अलिशान गाडीतून नाही. संसदेत प्रवेश करताना प्रथम ते पहिल्या पायरीवर डोके ठेऊन नतमस्तक झाले. हा प्रसंग आणि त्यांच्या ठायी दिसणारा संस्कार व मूल्यांबद्दल असणारा आदरभाव याचं दर्शन वेळोवेळी बातम्या व टीव्ही, वर्तमानपत्रे आदि माध्यमातून वेळोवेळी झाले आहे. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर झालेले परिवर्तन लेखकाने यात विषद केले आहे.     

 पिन्डे पिन्डे मतिर्भिन्न: कुंडे कुंडे नवं पया ||
 जातो: जातो: नवाचारा: नवा वाणी मुखे मुखे ||

कोणाकडून काम करून घेता येईल, कसं करून घेता येईल, योग्य कामासाठी योग्य व्यक्ती कोणती- याची चुणूक मंत्रिमंडळ स्थापन करताना दिसली. आपल्या मंत्रिमंडळातील पदे कर्तव्यदक्ष, निष्णात अशा व्यक्तींना त्यांनी  दिली. या व्यक्ती कशा आहेत व त्यांची वैशिष्टे लेखकाने सांगितली आहेत. त्यांचाही परिचय यातून होतो.

     देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर, निवडणुकांपूर्वी केलेल्या भाषणात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडण्याची तयारी सुरु झाली. स्वच्छता अभियान, गंगा सफाई, परदेशी संबंधातील सुधारणा, व्यापार-वृद्धी, खेडी व लहान गावांचा विकास, यासाठी नागरिकांचा सहभाग, पोषक वातावरण निर्मिती, त्या बरोबरीने भ्रष्टाचार आणि लपवून ठेवलेला पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी निर्णय, सरकारचा कर चुकवून परदेशी बँकातील गुंतवलेला काळा पैसा उजेडात आणणे, पावसाचे पाणी अडवा पाणी जिरवा, सौर उर्जा, अशा कामांची सुरुवात झाली. बांगला देशाचा घुसखोरी, अतिक्रमण आणि सीमाप्रश्न  पंतप्रधान झाल्यावर त्यांनी दोन वर्षात मार्गी लावले. सीमा ठरवून घेण्यात आल्या,     
     ‘योग’ हे भारताचे वैशिष्ट्य ! याचे विसरत चाललेले महत्व लक्षात घेऊन भारतात पुन्हा प्रसार करता करता, आंतरराष्ट्रीय स्तरावर योग पोहोचविणे त्यांना आवश्यक वाटले आणि २४ सप्टेंबर २०१४ ला राष्ट्रसंघात केलेल्या भाषणात मोदींनी या बद्दल अपेक्षा व्यक्त केली, तर संयुक्त राष्ट्रसंघाने ११ डिसेंबर २०१४ ला त्याला मान्यताही दिली. २१ जूनचा दिवस हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळला जाऊ लागला.

      पुस्तकातल्या, केल्याने देशाटन या प्रकरणात देशात आर्थिक विकास व्हायला हवा असेल तर परदेशी गुंतवणूक  वाढली पाहिजे आणि आपली  निर्यातही वाढली पाहिजे, त्यासाठी मेक इन इंडिया अशी घोषणा देऊन नुसते न थांबता व्यापारवृद्धी साठी प्रयत्न केले. त्यासाठी परदेशी दौरे केले. २०१४ मध्ये ३४ देशांना भेटी दिल्या,२०१५ मध्ये सहा देशांना, तर २०१६ मध्ये अमेरिकेत दौरा केला हे सांगितले आहे. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, पाकिस्तान, हे दौरे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यास कारणी लागले असे म्हणता येईल. याबरोबरच लष्करात, वन रँक वन पेन्शन, जन धन योजना, भारतातील सर्व राज्यात एकच समान कर जी.एस.टी सेवा कर याची योजना, नद्याजोड प्रकल्प, पर्यटन विकास, आरक्षण, बेटी बचाव बेटी पढाव, मेक इन इंडिया आदि महात्वाकांशी उपक्रमांबरोबरच सबका साथ सबका विकास ही मोदींची घोषणा, अशा सगळ्या विषयांची थोडक्यात सामान्य माणसाला समजेल अशी माहिती डॉ.भा.ना.काळे यांनी या पुस्तकात दिली आहे. आपले पंतप्रधान कसे आहेत हे देशातल्या प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे.

     योजकस्तत्र दुर्लभ: हे पुस्तक नागपूरच्या ज्ञानेश प्रकाशनने प्रकाशित केले आहे. पुस्तकाचा विषयच महत्वाचा असल्याने पुस्तकाबद्दल लिहायचे तर पंतप्रधान मोदींबद्दल व त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल लिहायलाच हवे. देशाभिमानाचा विचार करता आमच्या पंतप्रधानांचा आम्हाला परिचय असायलाच हवा.
 ----------------------------------------------------------------------------------                                                                                                                         

 --- डॉ. नयना कासखेडीकर