Wednesday, 16 September 2020

विचार–पुष्प, भाग –५०

                                                          उत्तरार्ध

  स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

                       विचार–पुष्प, भाग –५०


                            स्वामीजी आणि मॅडम कॅल्व्हे  

     अमेरिका आणि युरोप खंडात प्रचंड लोकप्रियता मिळवलेली रंगभूमीवरील गायिका मॅडम एम्मा कॅल्व्हे एका मेट्रोपोलियन ऑपेरा कंपनीबरोबर युरोपातून अमेरिकेत आलेली. तिची रंगभूमीवरची भूमिका, गायन सर्व काही तिनं गाजवलेले. त्यामुळे अमाप संपत्ति आणि प्रचंड लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली तरी सुद्धा ती मात्र मनातून पुरती दु:खी होती. खचलेली होती. पैसा आणि प्रसिद्धीमुळेच की काय, कला क्षेत्रात अशी परिस्थिति उद्भवते. पुरुषांच्या दृष्टीकोणातून स्त्री ही भोगवादीच वस्तु असते याचे तिने अनुभव घेतले. उत्कट आणि निरपेक्ष प्रेम तिला मिळत नव्हतं. दोन जणांशी ब्रेक अप झालं. त्यामुळे ती उध्वस्त झाली होती. ही दुसर्‍यांदा घडलेली घटना ताजी असतानाच ती आपल्या लहान मुलीला घेऊन अमेरिकेत आली होती. रंगभूमीची सेवा मात्र चालूच होती . तिच्या जवळच्या काहींना तिनं यातून बाहेर पडावं असा वाटत होतं. शिकागोमध्ये ज्या ऑडिटोरीयममध्ये तिचे कार्यक्रम होत होते, त्या ओपेरा हाऊसचे व्यवस्थापक मिलवर्ड अँडम्स यांच्याकडे त्यावेळी विवेकानंद राहत होते आणि वेदांताचे वर्ग घेत होते.अँडम्स यांनी कॅल्व्हेला, तू विवेकानंद यांना एकदा भेट” म्हणून सांगितलं.

अनेक वेळा सांगूनही तिच्या मनात नव्हते. मैत्रिणीने सुद्धा हेच सांगितले पण तिचेही ऐकले नाही. तिच्या मनात आत्महत्येचे विचार होते. ती या विचाराने बाहेर पडत असे .पण तिचे पाय आपोआप विवेकानंद राहत होते तिकडे  निवासस्थानाकडे वळत आणि आपण एका भयंकर स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटे. मग पुन्हा घरी येई. असे चार पाच वेळा झाले. शेवटी एका उद्विग्न क्षणी ती विवेकानंद यांना भेटायला गेली. नोकराने घराचे दार उघडले, कॅल्व्हे  बाहेर खुर्चीवर बसून राहिली. आपल्याच विचारात. थोड्या वेळाने आतून आवाज आला, “ये, मुली,ये ! कोणतीही भीती बाळगू नकोस”. कॅल्व्हे आत गेली आणि समोर विवेकानंद बसले होते त्यांच्याकडे बघत स्तब्ध झाली. कारण ध्यानअवस्थेत विवेकानंद बसले होते. त्यांची भगवी वस्त्रे, खाली नजर अशा अवस्थेतच ते तिच्याकडे न पाहता म्हणाले, “मुली किती विषण्ण आणि मन निराश करणारं, काळवंडून टाकणारं वातावरण तुझ्या भोवती आहे. मन शांत कर. ते फार आवश्यक आहे”. ती कोण? नाव काय? काहीही माहिती नसताना, तिच्याकडे न बघताच यांनी कशी आपल्या मनाची अवस्था ओळखली याचं तिला फार आश्चर्य वाटलं.

आपली परिस्थिति आणि समस्या केवळ आपल्यालाच माहिती आहेत तरीही हे एका अलिप्त आणि समाधान भावनेने आपल्याशी बोलत आहेत. यांना काय घडले ते कसं कळल असेल ? असं वाटून तिच्या लक्षात आलं की हे काहीतरी अद्भुत आहेत. ती विवेकानंद यांना म्हणाली, हे सारं तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला कोणी बोललं आहे का ? स्वामीजी म्हणाले, “माझ्याजवळ कोणी काही बोलले नाही. तशी काही जरूर आहे असं मला वाटत नाही. एखादं उघडं पुस्तक वाचावं तसं तुझं मन मला स्पष्ट दिसतं आहे. तुला सारं काही विसरून गेलं पाहिजे. पुन्हा एकदा प्रसन्न आणि आनंदी वृत्ती धारण कर.तब्येत सुधार,दु:खाचा सतत विचार करत बसू नको. भावनांना कोणते तरी रूप देऊन व्यक्त हो. ही गोष्ट आध्यात्मिक दृष्टीने आवश्यक आहे. कलेला तर आवश्यक आहेच. 

                            

या शब्दांचा आणि स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा काल्व्हे वर सखोल परिणाम झाला. या प्रभावामुळे तर आपल्या डोक्याला ताप देणार्‍या सार्‍या कटकटीच्या  गोष्टी डोक्यातून काढून टाकून, त्याऐवजी स्वत:चे सुस्पष्ट व शांतिप्रद विचार मनात निर्माण केले होते असं काल्व्हे ला वाटलं.स्वामीजींच्या या समर्थशाली विचाराने तिचे मन पुन्हा उल्हसित झाले. आणि ती तिथून बाहेर पडली. हा काही संमोहन विद्येचा परिणाम नव्हता.विवेकानंदांच्या मनाची शुद्धता, त्यांचे सामर्थ्यशाली पवित्र आचरण यामुळे हा परिणाम झालेला होता. मन एकदम निश्चिंत झाले होते.

ही भेट होण्या आधी एक दु:खद प्रसंग घडला होता. तिचा कार्मेंनचा  प्रयोग चालू होता.तिचा अभिनय आणि गाणं ही उत्तम सादर होत होतं. पण मनातून ती वैफल्य ग्रस्त होती. आणि आता पुढच्या अंकात आपण काम करू शकणार नाहीत असं तिच्या मनाने घेतलं. अशाही अवस्थेत ती मनाचा निग्रह करून रंगभूमीवर गेली. तो अंक ही उत्तम झाला, पण दुसर्‍याच क्षणी आपण काम करू शकणार नाही मला बरे वाटत नाही असे सांगून टाकले.आणि पुढचा अंक होऊ शकत नाही असे दिलगिरी पूर्वक सांगा म्हणून सुचविले. परंतु प्रेक्षकांनी तर तिचे काम डोक्यावर घेतले होते.त्यामुळे व्यवस्थापकांनी तिला हर प्रकारे समजाऊन सांगत रंगभूमीवर जवळ जवळ ढकललंच. मग काय काल्व्हे कलेशी निष्ठावान होती तिने पाय ठेवतच सर्व बाजूला सारून आपली भूमिका सादर करू लागली.तिच्या आतल्या वैफल्याच्या भावनांमुळे तिच्या आवाजात आर्तता आणि उत्कटता होती.या वेळचे गाणे तर अत्यंत सुंदर झाले.श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली होती.पण ती ते ऐकायला अजिबात उत्सुक नव्हती.तडक रंगमंचावरून आत गेली आणि कोचावर आडवी झाली आणि एक आश्चर्य वाटले की बाहेर एव्हढे लोक उभे आहेत मग या क्षणाला सारे निशब्द कसे?असा संशय येऊन ती दाराजवळ आली.तो समोर व्यवस्थापक आणि लोक गोळा होऊन बघताहेत.धीर करून व्यवस्थापकांनी सांगितलं,की “प्रयोग चालू असताना तुमच्या मुलीचा अपघाताने भाजून मृत्यू झाला आहे”. भयंकर धक्का होता तिला. या घटनेनंतर ती पार कोसळून गेली असणार . यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांमुळे तिची व  विवेकानंदांची भेट झाली होती त्यानंतर तीचं आयुष्य पुर्णपणे बदललं.

स्वामीजींच्या संपर्कात आल्यानंतर तिला अनेक विषय नव्याने कळले होते. त्यांच्याशी ती पटलेल्या न पटलेल्या गोष्टी व विषयांची चर्चा करू लागली होती. त्यांचे विचार ऐकून घेत होती. एकदा अमरत्व या विषयावर चर्चा सुरू होती.काल्व्हे या बद्दल म्हणाली, “मला ती कल्पनाच पटत नाही. मी माझ्या व्यक्तीत्वाला चिकटून राहणार.मग ते कितीही क्षुल्लक असेना. मला शाश्वत ऐक्यात मिसळून जाण्याची इच्छा नाही. तो नुसता विचारही मला भयंकर वाटतो. त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले. “एके दिवशी अथांग महासागरात पाण्याचा एक थेंब पडला. स्वत:ची ही स्थिति पाहून जलबिंदू रडत तक्रार करू लागला.जशी तुम्ही आता करताहात , महासागर जळबिंदुला हसला. त्याने जलबिंदुला विचारले, की, का रडतोस बाबा?तुझ्या रडण्याचं कारण मला नाही समजत. तू जेंव्हा मला येऊन मिळालास तेंव्हा तू आपल्या सर्व बंधुभागिनींना येऊन मिळालास. त्या इतर जलबिंदूनीच मी बनलो आहे.त्यामुळे तू ही साक्षात महासागररूप झालास. मला सोडून जाण्याची जर तुझी इच्छा असेल तर, एखाद्या सूर्यकिरणावर स्वार हो आणि एखाद्या ढगात जाऊन राहा की झाले. तेथून तू पुन्हा पिपासार्त पृथ्वीला आशीर्वादासारखा व वरासारखा होऊन एखाद्या जलबिन्दूच्या रूपाने खाली येऊ शकतोस.” 

स्वामीजी रूपकांच्या भाषेत बोलत असत असं काल्व्हे म्हणते. ती पुढे स्वामीजिंबरोबर, त्यांच्या स्नेही आणि शिष्यांसोबत तुर्कस्तान, इजिप्त, ग्रीस मध्ये सहलीला गेली होती.त्यांच्या बरोबर फादर लॉयसन,त्त्यांची पत्नी तसेच मिसेस मॅक्लाउड सहलीला होते. ती म्हणते या सहलीत, विज्ञान, तत्वज्ञान आणि इतिहास कोणतीच गुपिते स्वामीजिंपासून लपून राहिली नव्हती. त्यामुळे त्यांची जी विद्वत्तापूर्ण आणि ज्ञानपूर्ण चर्चा चाले ती मी लक्ष देऊन ऐकत असे. वादविवादात मी कधी भाग घेत नसे. पण विद्वान नामांकित असलेले फादर लॉयसन यांच्या बरोबर स्वामीजींची सर्व प्रकारची चर्चा चाले. धर्मासंबधी  चाललेल्या चर्चेत फादर यांना एखाद्या चर्च कौन्सिल ची तारीख खात्रीशीरपणे सांगता येत नसे, पण स्वामीजींना सांगता येई. स्वामीजी एखाद्या धार्मिक ग्रंथातील अवतरण सुद्धा अगदी बिनचूक सांगायचे .   

ग्रीसमध्ये इल्युसिसला भेट दिली तेंव्हा स्वामीजींनी त्याची सर्व रहस्ये समजाऊन सांगितली. तिथल्या सर्व मंदिरातून हिंडवले, जुन्या प्रार्थनांचे मंत्र हुबेहूब प्राचीन पद्धतीने म्हणून दाखवले. इजिप्त मधेही असाच तल्लिंनतेने ऐकण्याचा अनुभव सर्वांनी घेतला. सर्वजण शांतपणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत, एकदा तर, इतके की भान न राहिल्यामुळे तिथल्या स्टेशनवरील प्रतिक्षालयात स्वामीजींनी श्रोत्यांना आपल्या संभाषणाने खिळवून ठेवले होते. तेंव्हा गाडी निघून गेली तरी भान नव्हते. असे अनेक वेळा व्हायचे.

कॅल्व्हे या प्रवासातल्या आपल्या स्वामीजींच्या आठवणी सांगताना म्हणतात,  “कैरो मधला प्रसंग – कैरो मध्ये बोलता बोलता सर्वजण रस्ता चुकले आणि एका अत्यंत घाणेरड्या ओंगळ वाण्या रस्त्यावर येऊन पोहोचलो. आजूबाजूच्या घरांच्या खिडकीतून स्त्रिया स्वताचं अंग प्रदर्शन करीत होत्या. स्वामीजींचे याकडे लक्षच नव्हते. पण तेव्हाढ्यात बाहेर बसलेल्या, गलका करणार्‍या स्त्रिया स्वामीजींना खुणेने आपल्याकडे बोलावू लागल्या. इथून चटकन बाहेर पडावे म्हणून प्रयत्न केला पण  स्वामीजी अचानक त्या स्त्रियांपुढे जाऊन उभे राहिले.म्हणले, “ बिचार्‍या मुली, दुर्दैवी जीव, त्यांनी त्यांचे देवपण त्यांच्या सौंदर्यात निविष्ट केले आहे. पहा त्यांची आता काय दशा झाली आहे ती”. असे बोलून स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. त्या सर्व अत्रीय एकदम गप्प झाल्या आणि संकोचल्या. एकीने पुढे वाकून स्वामीजींच्या कफनीच्या टोकाचे चुंबन घेतले.आणि स्पॅनिश भाषेत देवमाणूस! देवमाणूस! असे म्हणू लागल्या, दुसरीने हात तोंडावर ठेऊन चेहरा लपविला”. अशा या स्वामीजींबरोबर च्या आठवणी कॅल्व्हेच्या  शेवटच्या आठवणी ठरल्या होत्या. कारण यानंतर स्वामीजी थोड्याच दिवसात भारतात निघून गेले. आणि वर्षभरातच त्यांनी महासमाधी घेतल्याचे कळले.कॅल्व्हे यांनी म्हटलंय, “ एकही पृष्ठ नष्ट न करता त्यांनी आपला जीवनग्रंथ लिहिला”. त्यानंतर काही वर्षानी काल्व्हे भारतात आली तेंव्हा, अखेरचा श्वास जिथे घेतला त्या स्वामीजींच्या बेलूर मठाला तिने भेट दिली. त्यांच्या आईला भुवनेश्वरी देवी यांना भेटली. या माऊलीनेच कॅल्व्हेला या मठात नेले होते .                        

काल्व्हे यांनी आपल्या आत्मचरित्रात हे सर्व लिहून ठेवले आहे. कॅल्व्हे जानेवारी १९४२ ला  वयाच्या ८३ व्या वर्षी निधन पावली. तिच्या उर्वरित आयुष्यात स्वामीजींमुळे खूप मोठा बदल झाला होता. योग्य आध्यात्मिक विचारांची समज आली होती. आत्महत्येपासून परावृत्त करून एक चांगले जीवन जगण्याचा मार्ग स्वामीजींनी तिला दाखवला होता. असे भारताबाहेर अनेक जण स्वामीजींच्या सहवासात आले त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला. काहींनी त्यांना रामकृष्ण संघाच्या कामात मदत केली, काही स्वामीजींचे शिष्य झाले.

भारताबाहेरील लोकांना एका भारतीय माणसानेच योग्य दिशा दाखवली होती, आज भारतातच रंगभूमी  आणि चित्रपट क्षेत्रात प्रसिद्धी आणि जीवघेणी स्पर्धा आणि कोटीच्या कोटी पैशांची उड्डाणे आणि त्यामुळे तरुण कलाकारांची, आयुष्याची झालेली वाताहत, कुटुंबाचं उध्वस्तपण हे बघितलं की वाटत यावर अंमल ठेवणारी व्यवस्थाच नाही ? जिथे विवेकानंद यांच्या रूपात पाश्चिमात्य देशात लोकांना मार्गदर्शन मिळत होतं. त्याच विवेकानंद यांच्या भारतात आज काय स्थिति आहे? राजकारण, प्रशासन किंवा कुठल्याही व्यवस्थेत भ्रष्टपणे काम करणारी माणसे/व्यक्ती लहानपणा पासून कशी घडली आहेत? कोणाच्या संगतीत घडली आहेत? आई वडिलांनी काय शिकविले आहे, काय संस्कार केले आहेत? हे अत्यंत महत्वाचे ठरते. कारण नरेंद्रला घडविणारे त्याचे पालक भुवनेश्वरी देवी, विश्वनाथ बाबू आणि गुरु रामकृष्ण परमहंस होते .          

    © डॉ.नयना कासखेडीकर  

----------------------------------------



Monday, 14 September 2020

विचार–पुष्प, भाग –४९

                                 उत्तरार्ध

 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

                विचार–पुष्प, भाग –४९                       

                               

            सर्वधर्म परिषदेनंतर शिकागोतील वास्तव्य 

 ११ सप्टेंबरला शिकागो येथे सर्व धर्म परिषद उद्घाटन जोरदार झालं.स्वामीजींचे स्वागतपर छोटेसे भाषण ही आपण पाहिले. परिषदेला आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था अनेक वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली होती. स्वामी विवेकानंद यांची सोय जे. बी. लायन यांच्याकडे केलली होती. लायन यांच्याकडे आधीच परप्रांतातून अनेक प्रतीनिधी राहायला होते. घर जरी प्रशस्त मोठं असलं तरी गर्दी झाली. त्यात विवेकानंद यांना लायन यांच्याकडे ११ सप्टेंबरला रात्री पाठवण्यात आले. लायन यांच्या पत्नी एमिली यांनी आपल्या मुलाला दुसरीकडे पाठवून ती खोली रिकामी करून ठेवली. कोण येणार हे माहिती नसल्याने त्यांच्या मनात शंका आली की आपल्याकडे दक्षिण अमेरिकेतील लोक उतरले आहेत त्यांच्या बरोबर हा कृष्णवर्णीय प्रतिनिधी कसा काय चालेल? कारण दक्षिण अमेरिकेत वर्णभेद खूप होता. मग त्यांनी मिस्टर लायन यांना सुचविले की यांची सोय हवं तर आपण शेजारच्या ऑडिटोरियम मध्ये करूया.  

श्री लायन 

मिस्टर लायन गप्पच. ते उठून खाली जाऊन वर्तमानपत्र वाचून आले. तिथे स्वामीजी भेटले आणि तसेच वरती येऊन एमिली यांना म्हणाले, “आपले इतर पाहुणे जरी इथून गेले तरी हरकत नाही, मला काही वाटणार नाही. पण हे भारतीय पाहुणे अतिशय बुद्धीमान असून इतकी मनोवेधक व्यक्ती यापूर्वी आपल्याकडे कधीच आली नव्हती. त्यामुळे त्यांना हवे तेव्हढे दिवस इथे ठेवले तरी चालेल. त्यांची इच्छा असेल तेव्हढे दिवस त्यांना इथे राहुदे”. विवेकानंद लायन यांच्याकडे राहिले आणि त्या घरचेच एक सभासद होऊन गेले, इतके त्यांच्यात मिसळले. यावरून लायन किती उदार विचारांचे होते हे लक्षात येते. वर्णभेदाचा विचार त्यांनाही करावा लागला होता. अमेरिकेत पोहोचल्यापासूनच विवेकानंदांना अशा अनेक चित्रविचित्र अनुभवांना सामोरे जावे लागले होते.

इथे, नुकत्याच अमेरिकेत घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. २०० वर्षांचा काळ लोटला तरी अमेरिकेत वर्णभेदाची चिंगारी मधूनच पेटते हे आता नुकतच सगळ्यांनी पाहिलं आहे. काळे गोरे या वादात मूळ कैरोलीनाचा असलेला आफ्रिकी अमेरिकन जॉर्ज फ्लॉयड याला मिनियापोलीस मध्ये नकली नोटेने बिल दिले अशा तक्रारीवरून पोलिसांची कारवाई होताना जीवाला मुकावे लागले. याचा परिणाम असा झाला की अमेरिकेत सगळीकडे त्या विरूद्ध आवाज उठवला गेला. मोर्चे निघाले, हिंसक वळण लागले. वॉशिंग्टन डी.सी,अटलांटा, फिनिक्स,डेनवर, लॉस एंजिल्स, लास वेगास सगळीकडे त्याचे पडसाद उमटले. एखादा चुकीचा विचार मनुष्याच्या मनात रूजला की तो बाहेर निघणे फार कठीण जाते. म्हणून चांगले विचार समाजात रुजविणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य असते. वर्तमानात सध्या चांगले कशाला म्हणायचे हेच लोकांना आधी शिकवावे लागेल. असो .              

शिकागो क्लबमध्ये विवेकानंद यांनी लायन यांच्या मित्रांसमोर मत व्यक्त करताना म्हटले होते, “आजपर्यंत मला भेटलेल्या व्यक्तींमध्ये लायन हे ख्रिस्तांशी सर्वात अधिक साम्य असलेले आहेत, अशी माझी धारणा आहे”.

लायन यांची नात कॉर्नेलिया कोंगर यावेळी सहा वर्षांची होती. तिची विवेकानंदांची चांगली मैत्री जमली. निरागस आणि अजाण अशा  कॉर्नेलियाला स्वामीजी मोर,पोपट, वानर यांच्या गोष्टी सांगत. झाडे, फुले यांची मनोरंजक माहिती सांगत. विवेकानंद संध्याकाळी बाहेरून आले की लगेच मांडीवर जाऊन बसत मला गोष्ट सांगा म्हणून ति मागे लागे. यावेळी विवेकानंद वास्तविक तीशीचे होते, पण त्यांचे लहान मुलांशी वागण्याचे कौशल्य मात्र आजी आजोबांच्या वयातले असे. कार्नेलियाचे वडील तरुण वयातच स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे तिच्या आईवर मोठा आघात झाला होता. अजूनही तो ताजा होता. त्यातून ती बाहेर आली नव्हती. घरात तिच्याशी वागता बोलताना विवेकानंद काळजी घेत. त्यांच्या व्याख्यांनांना ती जात असे. त्यातले नीट कळायला हवे म्हणून तिने पौर्वात्य तत्वज्ञानाचा परिचय करून घेतला. आणि पुढे स्वामी विवेकानंद यांचे ग्रंथ अभ्यासले.

एमिली लायन 
एमिली लायन यांचा स्वभाव वागणं बोलणं यामुळे त्यांना, त्या आपल्या आई भुवनेश्वरी देवी सारख्या वाटत. म्हणून ते त्यांना मदर म्हणत असत.एमिली यांनीही विवेकानंद यांना पुत्रवत प्रेम दिलं, तिथले  उच्चवर्गीय सामाजिक शिष्टाचार शिकविले. त्यांना आपल्या एखाद्या अज्ञाना बद्दल संकोच नाही वाटायचा. घरी आल्यावर ते ती गोष्ट समजून घ्यायचे. ज्ञानात भर घालायचे.

त्यांना बाहेर व्याख्यान दिल्यावर जे मानधन मिळत असे, ते पैसे ते आपल्या रुमालात बांधून आणत असत आणी एमिली लायन यांच्यासमोर ठेवत असत. जवळ जवळ सत्तर ऐंशी डॉलर असत.संन्यासी, त्यात पैसे बाळगायची एकतर सवयच नव्हती. मग एमिली यांना न मोजताच ते पैसे देऊन सांगत, “हे तुम्ही सांभाळा”. एव्हढा विश्वास. विवेकानंद कशासाठी पैसे जमवत आहेत हे लायन यांनाही माहिती होते.त्यांनी मग पैसे कसे सांभाळायचे हे त्यांना शिकविले. नाणी ओळखायची शिकविले. पैसे ठेवण्यासाठी त्यांनी तर बँकेत खातेच उघडून दिले.

मिसेस लायन स्त्रियांसाठी असलेल्या रुग्णालयाच्या अध्यक्षा होत्या. एकदा त्या विवेकानंदांना तिथे घेऊन गेल्या. विवेकानंद यांनी तिथल्या सर्व गोष्टींची बारीक सारिक माहिती घेतली. तिथल्या अधिकारी डॉक्टर्स, नर्सेस सर्वांशी बोलून कामाची पद्धत जाणून घेतली.तिथलं बालमृत्यूचं प्रमाण जाणून घेतलं. भोजन गृहातले आचारी आणि कपडे धुणारे कर्मचारी यांच्याशी ही संवाद साधला. अशाच पद्धतीने त्यांनी उत्सुकतेने शिकागो मधली वस्तु संग्रहालये, दालने, विद्यापीठे पाहिली. छोट्या कोर्नेलियाच्या  बालवाडीत सुद्धा जाऊन आले. आपल्या देशात स्त्रियांसाठी रुग्णालये नाहीत आणि मुलींसाठी शाळा नाहीत याची त्यांना खंत वाटली.

शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या कर्नल वेलॅन्ड यांनी त्यांच्या शिकागोत उघडलेल्या शाळेत विवेकानंद यांना भेट द्यायला बोलावले. लहान मुलांवर संस्कार व्हावेत असा त्यांचा उद्देश होता. मुलांसमोर विवेकानंद यांनी केलेले भाषण मुलांना फार आवडले. ते झाल्यावर बाहेर पडत असताना शाळेतल्या एकमेव भारतीय विद्यार्थ्याने, खाली वाकून स्वामीजींच्या अंगावरील वस्त्राला आदराने स्पर्श केला. ते पाहून शेजारील मुलीने विचारले तू हे काय केलेस? कोण आहेत हे पाहुणे?तो भारतीय विद्यार्थी म्हणाला, “हे  स्वामी विवेकानंद आहेत, भारतातून आले आहेत. फार मोठे संत आहेत”. त्या मुलीला आश्चर्य वाटलं, आता तर संत कुठेच नाहीत?”मुलगा म्हणाला, इथं तुमच्या देशात नाहीत. पण आमच्या भारतात आजही आहेत”.

 असे अनुभव स्वामीजी घेत होते . एक दिवस ते एमिली लायन यांना म्हणाले, आज मला एका सुंदर गोष्टीचा शोध लागला आहे. लायन यांनी विनोदाने विचारले की, कोण आहे ती? विवेकानंद हसत सुटले आणि म्हणाले, अहो ती कोणी मुलगी नाही.ती गोष्ट म्हणजे संघटना. कोणतेही काम पद्धतशिरपणे व्हावयास हवे असेल तर, अमेरिकेत आहेत तशा वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या स्वतंत्र संस्था हव्यात त्यांचे नियम हवेत, कामात शिस्त हवी. असे केले तर खर्‍या अर्थाने कोणतेही काम होऊ शकते आणि सतत चालू राहू शकते”. हे सर्व सत्य त्यांच्या मनात आल होतं आता पर्यन्त केलेल्या निरीक्षणातून. इथून पुढे त्यांची या विचारांची पकड घट्ट झाली. आता त्यावर चिंतन पण सुरू झाले.त्यातूनच निर्माण झाली ती आपल्या सर्व गुरुबंधूंना एकत्र बांधून ठेवेल अशी संस्था उभी करण्याचे स्वप्न. याचा संबंध आपल्या देशातील धार्मिक आणि सामाजिक परिस्थितिशी घालून एक संस्था मूर्तरूपात आणावी अशी संकल्पना मनात रूजली. इथे लायन यांच्याकडे स्वामीजी जवळ जवळ दीड ते दोन महीने राहिले, या काळात त्यांनी तिथल्या सुंदर इमारती व वास्तुसौंदर्य, तिथलं संगीत, सुखसोयी,यांच्याकडे अभ्यासपूर्ण बघितले.त्यांनी 1898 मध्ये पत्रात मेरी यांना लिहिलं की,तुमचे घर आणि तुम्ही सर्व जणांनी मला एव्हढे प्रेम दिले आहे की, आपले पूर्वजन्मीचे काहीतरी नाते असले पाहिजे.  

श्री हेल 

                 

याच प्रमाणे परिषदेला आल्यानंतर सर्वप्रथम पत्ता शोधत शोधत कंटाळून स्वामीजी रस्त्यावर बसले असताना मिसेस बेली हेल यांनी त्यांना घरी नेले होते, तेही कुटुंब विवेकानंदांना घरच्यासारखेच मिळाले होते. विवेकानंद यांच्या आयुष्याच्या अखेरीस पर्यन्त त्यांचा हेल कुटुंबीयांशी संपर्क होता. पुढे पुढे कुठूनही ते प्रवास करून आले की सरळ हेल यांच्याकडेच येत. हेल यांच्या मेरी आणि हॅरिएट, जॉर्ज हेल यांच्या बहिणीच्या इजाबेल आणि मॅक किंडले यांन ते बहिणी मानत. तर मिसेस हेल यांना मदर म्हणत. सगळे जण स्वामीजींची चांगली व्यवस्था ठेवत आणि काळजी घेत असत. स्वामीजींना इथे मोकळेपणा वाटत असे. स्वास्थ्य लाभत असे.

हेंरीएटा ,मेरी हेल, इसाबेल, हॅररिएट

परिषद संपल्यानंतर विवेकानंद यांनी प्रा.राईट यांनाही पत्रे लिहिली आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. राईट यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला पत्र लिहायला वेळ पुरेसा नव्हता आणि केवळ औपचारिक पत्र लिहू नये असे वाटल्याचे प्रांजळ पणे सांगितले. तसेच इथल्या परिषदेत केवळ राईट यांच्यामुळे आणि परमेश्वरमुळेच शक्य झाले. हे सर्व श्रेय स्वामीजींनी राईट यांना दिले आहे. हे लिहिताना स्वामीजींनी आता आपण पाश्चात्य जीवनाशी जुळवून घेण्याचे ठरविले आहे. असेही लिहिले आहे. कारण कपडे आणि अन्न पदार्थ यात त्यांना जुळवून घेणं क्रमप्राप्त होतं. आणि नंतर ते तिथे सन्यासी वेष सोडून पाश्चात्य वेषात दिसतात. हा बदल त्यांनी केला. बहिरंगाला अखेर काहीही महत्व नाही असे ते आधीही वारंवार सांगत असत.

अमेरिकेतली एकूण संस्कृती, आचार-विचार, तिथली परिस्थिति आणि आपला उद्देश याचा ताळमेळ स्वामीजींनी घातला. संन्याशाचा वेष जाऊन कोट पॅंट घातले तरी आपल्या मनात जे विचार आहेत जे उद्देश आहेत ते तसेच कायम असणं महत्वाचं आहे.

भारतात उद्योगधंदे उभे करण्यासाठी अमेरिकन उद्योगपतींचे मन वळवावे, म्हणजे भारतातल्या लोकांना तंत्र कळेल आणि गरीब जनतेला दोन वेळच अन्न मिळेल असं त्यांना वाटलं होतं, शिवाय देणग्या गोळा  कराव्यात असाही त्यांनी विचार केला होता पण त्यातली अव्यवहार्यता त्यांच्या लक्षात आल्यावर हे विचार त्यांनी मनातून काढून टाकले. नुसती देणगी मागितल्याने हळूहळू त्यात लाचारीचा भाव येतो आणि आपण भिक्षेकरी आहोत असे वाटू लागते असा विचार त्यांनी केला.पूर्वेकडून अनेक लोक जसे योजना घेऊन अमेरिकेत येतात आणि आवश्यकते पेक्षा जास्त निधि घेऊन जातात तसेच आपणही गणले जाऊ. यात स्वाभिमान राहणार नाही. मग यापेक्षा वेगळा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे आपल्याला व्याख्यानाद्वारे जो पैसा मिळेल तेव्हढाच आपण घ्यायचा असे त्यांनी ठरवले. हाच मार्ग बरा आहे असे त्यांनी राईट आणि मिसेस वुड्स यांनाही पत्रातून कळवला. परिषद होऊन महिनाच होत होता तेंव्हाच हा निश्चय पक्का केला.

परिषद संपल्यावर विवेकानंद अनेक ठिकाणी राहिले. जिथे जिथे राहत आणि ज्यांना भेटत त्यांचा दृष्टीकोण आमुलाग्र बदलत असे. या काळातल्या आठवणी त्या त्या व्यक्तींनी लिहून ठेवल्या आहेत. काही आठवणी स्वामीजींनी स्वत: सांगितल्या आहेत. अमेरिका आणि युरोप खंडात अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली रंगभूमीवरची गायिका मॅडम एम्मा कॅल्व्हे हिची विवेकानंद यांची भेट तीच आयुष्य बदलून टाकणारी ठरली.उद्विग्न अवस्थेत ती विवेकानंद यांना भेटली आणि........क्रमश:

© डॉ.नयना कासखेडीकर   

Friday, 11 September 2020

विचार–पुष्प,भाग-४८

 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

                      विचार–पुष्प,भाग-४८ 

                    असामान्य, अद्वितीय, स्वामी विवेकानंद

 आणि सर्वधर्म परिषद सुरू झाली. धर्मविषयक वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होत होत्या. यात प्रामुख्याने दोन भाग केले होते, पहिला भाग होता, प्रत्येक धर्मातील तत्वचिंतन आणि विविध सिद्धांत, तर दुसर्‍या भागात, परमेश्वराचे स्वरूप, धर्माचे महत्व, ईश्वरी साक्षात्कार, परमेश्वरचा अवतार, अंनैतिकतेच्या कल्पना असे विषय ठेवले होते. या चर्चा  दहा दिवस चालल्या होत्या. तर उत्तरार्धात चर्चेचे विषय होते, कौटुंबिक जीवन, ललितकला, विज्ञानातील शास्त्रे, नीतीविषयी सिद्धांत, अखिल मानवमात्रा विषयीचे प्रेम, ख्रिस्तधर्मप्रचारक मिशनर्‍यांची कार्यपद्धती. भिन्न धर्माच्या अनुयायांनी एकमेकांना समजून घ्यावे हा हेतु होता.

  परिषदेच्या चौथ्या दिवशी, बॉस्टनचे रेव्हरंड जोसेफ कुक यांनी आवेशात विषय मांडला, तो असा, “आपण ईश्वराला टाकू शकत नाही किंवा आपली सद्सद्विवेक बुद्धी बाजूला सारू शकत नाही. मानवाच्या आत्म्याला शांती देईल, आपल्या पापांचे भान राखून ईश्वरापुढे नम्र होण्यास शिकवेल, असा कोणता धर्म या पृथ्वीवर वा परलोकात कोठे असेल, तर तो ख्रिस्त धर्म हा एकमेव होय”.

याशिवाय आपल्यावरची टीका समजून घेणारे आणि त्या टीकेपासुन आपण काय शिकावे याचा विचार करणारे पण काहीजण होते. रशियातून आलेले सर्जी वोल्कोन्सकी आणि केंब्रिजचे कर्नाल थॉमस वेंटवर्ध हिगीसन्स हे दोन जण समजून घेणारे होते. धर्म आकाशा एव्हढा व्यापक आणि सर्वांचा समावेश करून घेणारा हवा असं मत त्यांनी मांडलं. तर विवेकानंदांच्या विचारांचं त्यांनी स्वागत केलं.

हिंदुधर्मातील मूर्तीपूजेवर ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून फार टीका होत असे. तिला उद्देशून बॉस्टनच्या रेव्हरंड ई.एल.रेक्सफोर्ड यांनी आपल्या निबंधात म्हटले की, “जोवर कोणतेही दैवत रूप एखाद्या व्यक्तीच्या विनम्र `मनाला आणि अंतकरणाला धरून ठेवीत आहे तोवर न्यायाच्या दृष्टीने विचार केला, तर कोणाही माणसाला त्यावर निष्ठूरपणे प्रहार करता येणार नाही . एखादी मूर्ती फोडून टाकण्याचा खरा अधिकार या जगात एकाच व्यक्तिला असतो. आणि ती म्हणजे, जीने त्या मूर्तीची पूजा केली असते. त्या मूर्तीचे आपल्या दृष्टीने आता काही काम उरले नाही हे केवळ ती व्यक्तीच म्हणू शकते. आणि हे निश्चित आहे की, जी ईश्वरी शक्ती या सर्व आकारांच्या द्वारे, कार्य करीत आहे आणि त्या सर्वांना आपले माध्यम बनवीत आहे, ती दिव्य शक्ती एखाद्या ओबडधोबड मूर्तीच्या द्वारा देखील आपल्या बालकापर्यंत पोहोचू शकते”. ख्रिस्ती धर्माचे बहुतेक सारे प्रतिनिधी हिंदू धर्मावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत.

    विवेकानंदांच्या भाषणातून चैतन्य सळसळत असायचे त्यामुळे हा विलक्षण प्रभाव कसा रोखायचा ही चिंता सतत धर्मोपदेशकांना होती. म्हणून त्यांचा हिंदू धर्मावरचा हल्ला परिषद पुढे जात होती तसतसा प्रखर होत गेला.

              
  विवेकानंदांनी आपला हिंदू धर्मावरचा निबंध नवव्या दिवशी सादर केला. सकाळपासून आरोप प्रत्यारोप,टीका असे करत विवेकानंदांना संध्याकाळी पाच वाजता व्यासपीठ मिळाले. विषय हिंदू धर्म आहे हे माहिती असल्याने कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. सर्वजण जागा मिळावी म्हणून तासभर आधी येऊन बसले होते. काहींना प्रवेश मिळू शकला नाही इतकी गर्दी झाली. कोलंबस सभागृह गच्च भरले होते. स्त्रियांची संख्या जास्त होती.

      आठवडा झाला विवेकानंद आपल्या हिंदू धर्मावर होत असलेली टीका आणि ख्रिस्त धर्माचा गौरव ऐकत आले होते. हिंदू धर्माला कमी लेखले जात होते त्यामुळे, स्वामीजींचा स्वाभिमान डिवचला गेला होता. त्यांनी या टीकेचा कठोर शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, “ आम्ही पूर्वेकडून आलेले प्रतिनिधी गेले काही दिवस इथे बसलो आहोत आणि एका अधिकारपदाच्या भूमिकेतून आम्हाला सांगितलं जात आहे की, आम्ही सर्वांनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार करायला हवा. का? तर ख्रिस्त धर्मीय राष्ट्रे आज सर्वात अधिक प्रगतिशील आहेत.

आम्ही आता आमच्या आसपास पाहतो, तर आम्हाला असं दिसतं की इंग्लंड हे ख्रिस्त धर्मीय राष्ट्र आज जगात सर्वात पुढारलेले आहे आणि ते पंचवीस कोटी लोकांच्या मानेवर पाय रोवून उभं आहे. आम्ही इतिहासात मागे वळून पाहतो, तर आम्हाला आढळून येतं की, ख्रिस्तधर्मी युरोपच्या समृद्धीचा प्रारंभ स्पेन पासून झाला. त्या स्पेनच्या समृद्धीची सुरुवात झाली ती, मेक्सिको वर आक्रमण करण्यापासून,आपल्या बांधवांचे गळे कापून ख्रिस्त धर्म प्रगतीशील होत जातो. अशा प्रकारची किंमत देऊन मिळणारी समृद्धी सौम्य प्रकृतीचा हिंदू स्वीकारणार नाही.

       मी इथे बसलो आहे. आणि मी जे काही सारं ऐकलं तो असहिष्णु वृत्तीचा कळस होता. इस्लाम धर्माचे गोडवे गायलेले मी आता ऐकले, हे मुसलमान भारतात हातात तलवार घेऊन अत्याचार करीत आले आहेत. रक्तपात आणि तलवार ही हिंदूंची साधनं नाहीत. त्यांचा धर्म सर्वांविषयीच्या प्रेमाच्या आधारावर उभा आहे. यावर श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

           

 
 हे तर जगातल्या ख्रिस्त धर्मियांबद्दल झाले. पण, भारतात मिशनरी हिंदू धर्माचा प्रचार करतात त्याला म्हणावे तेव्हढे यश येत नाही. यावर विवेकानंद म्हणाले, “एका हातात बायबल आणि दुसर्‍या हातात तलवार घेऊन तुम्ही येता.ज्या तुमचा धर्म केवळ कालपरवाचा म्हणावा, ते तुम्ही आम्हाला उपदेश करण्याकरता येता ज्या आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी तुमच्या धर्माइतकीच उदात्त तत्त्वं आणि भगवान येशू ख्रिस्ताएव्हढीच पावन जीवनं यांचा आदर्श हजारो वर्षांपूर्वीच घालून दिला आहे. तुम्ही आम्हाला पायाखाली तुडविता आणि आपल्या पायाखाली असणार्‍या धुळी एव्हढीच किंमत आम्हाला देता. आमच्या लोकांना दारू पिण्यास शिकवून तुम्ही त्यांना अधोगतीचा रस्ता दाखविता. आमच्या स्त्रियांचा तुम्ही अपमान करता. आमच्या धर्माची हेटाळणी करता, की जो धर्म अनेक दृष्टीने तुमच्या धर्मापेक्षा सरस आहे, कारण तो माणुसकी अधिक जपणारा आहे. आणि असं सारं केल्यावर तुम्ही विचारात पडता की भारतात ख्रिस्ती धर्माचा एव्हढा थोडा प्रसार का होतो? याचं कारण मी सांगतो, याचं कारण हे आहे की, तुम्ही मंडळी त्या येशू ख्रिस्तासारखी नाही, की ज्याच्या बद्दल आम्हाला आदर वाटावा. तुम्हाला असं वाटतं का, त्याच्याप्रमाणच सर्वांसाठी प्रेमाचं संदेश घेऊन, त्याच्या सारखी ऋजुता व नम्रता धारण करून आणि इतरांसाठी कष्ट घेण्याची व काहीतरी सोसण्याची तयारी ठेऊन तुम्ही आमच्या दाराशी आलात,तर आम्ही तुमचं स्वागत करणार नाही? नाही, तसं कधी होणार नाही. अशा भूमिकेनं जो कुणी आमच्याकडे येईल त्याचं म्हणणं आम्ही आमच्या प्राचीन ऋषींचं म्हणणं ऐकण्याइतकच आदरानं ऐकू”.

विवेकानंदांनी मिशनर्‍यांच्या प्रचार पद्धतीवर कडक टीका केली आणि त्यांनी काय केल तर भारतात त्यांचं स्वागत होईल हे ही संगितले. वीस सप्टेंबरला पापी मानवाचा ख्रिस्ताच्या द्वारा होणार उद्धार आणि पेकिंगमधील (आताचा प्रचलित उच्चार बियींग)  धर्म हे दोन विषय मांडले गेले. पण यावरची चर्चा लवकर आटोपली. कारण काही नियोजित वक्तेच आले नव्हते. सभागृह तुडुंब भरलेले. याचवेळी विवेकानंद व्यासपीठावर आलेले दिसले. तर लोकांना हा एव्हढा आनंद झाला.

                         

विवेकानंदांचे चार शब्द जरी ऐकायला मिळाले तरी ते श्रोत्यांना हवे असत. इतक त्यांचं आकर्षण होतं. कित्येक वेळा कंटाळवाणी झालेली भाषणे ऐकून श्रोते निघून जातील अशी भीती वाटली की व्यासपीठावरून सांगितले जायचे की सत्राच्या शेवटी विवेकानंद थोडा वेळ बोलणार आहेत.  मग श्रोते सहनशीलतेने बसून राहत.

20 सप्टेंबरला पेकिंगमधील धर्म हा विषय श्री हेडलँड यांनी मांडला. चीनच्या धार्मिक परिस्थितिबद्दल जी विधाने हेडलँड यांनी केली त्याचा खरपूस समाचार विवेकानंदांनी घेतला. विवेकानंद यांनी ऐनवेळी विषय मांडला, कारण चीनवर होणारी टीका पर्यायाने भारतावर टीका होती. चीनमध्ये बुद्ध धर्म होता. बुद्ध धर्माबद्दल विवेकानंदांना आदर होता. यावर ते म्हणाले, “अमेरिकेतील माझ्या ख्रिस्तधर्म बांधवांनो, चीनी जनतेच्या आत्म्याचा उद्धार व्हावा यासाठी मिशनरी तेथे जातात. चीनमधल्या भीषण दरिद्र्याचा उल्लेख येऊन गेला. मला असं विचारायचं आहे, त्यांच्या आत्म्याचं राहू देत, त्यांची शरीर भुकेमुळे गतप्राण होऊ नयेत म्हणून मिशनर्यांनी कोणते प्रयत्न केले?   

    भारतातील तीस कोटी लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोकांना एकवेळचं जेवण ही पुरत नाही. त्यांना मिशनरी जरूर मदत करतात पण केंव्हा? ते आपला धर्म सोडून ख्रिस्त धर्म स्वीकारतील तेंव्हा. मग हिंदूंना ती मदत मिळत नाही. पूर्वेकडच्या देशांना आज खरी गरज आहे, ती चतकोर भाकरीची. आमच्याकडे धर्म नको इतका आहे. त्यांना अन्न हवं आहे. पण त्यांना धोंडे मिळतात. तेंव्हा तुम्हाला मानवी बंधुत्वाचा अर्थ समजावून द्यायचा असेल तर, हिंदूंशी सहानुभूतीने वागा. मग भले हिंदूंनी आपला धर्म टाकला नाही तरी त्याचा विषाद मानू नका. मिशनरी जरूर पाठवा, पण रोजचे दोन घास अन्न सुलभतेने मिळण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे हे शिकवण्यासाठी पाठवा. तत्वज्ञानातल्या सिद्धांतांचे घोट पाजण्यासाठी पाठवू नका”. ज्यांनी ज्यांनी भारतातल्या दारिद्र्याचा उपहासात्मक उल्लेख केला होता, त्यांना उत्तर म्हणून ते म्हणाले, माणसाची किंमत भारतात, तो दरिद्री आहे का धनवान यावर केली जात नाही. धर्माची शिकवणूक देणार्‍यांच्या बाबतीत तर दरिद्री असणं हे भूषण मानलं जातं. मी स्वत: निष्कांचन आहे. मला ओळखणारे काही लोक इथे व्यासपीठावर आहेत, ते तुम्हाला ग्वाही देतील की, माझं उद्याचं जेवण कुठे आहे हे मला माहिती नाही. अशा अवस्थेत माझी गेली कित्येक वर्षे गेली आहेत. तेंव्हा जवळ पैसा असणं की नसणं याला महत्व नाही. भारतात तर पैसे घेऊन जो धर्म सांगतो तो भ्रष्ट मानला जातो”.

समारोप करताना ते म्हणाले, “आपण सर्वजण जाणतो की, जो ख्रिस्ताचा अनुयायी होत नाही त्याला ख्रिस्त धर्मियांकडून कोणतीही मदत मिळणार नाही. मानवाचं मूलभूत स्वातंत्र्य, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य या गोष्टींना या देशात खूप मोठा मान आहे असं मी कितीतरी वेळा ऐकत आलेलो आहे. मी अद्याप धीर सोडलेला नाही. सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!”  अशा प्रकारे धर्मविषयक सर्व तात्विक प्रश्नांचा ऊहापोह वेगवेगळ्या कार्यक्रमातून झाला.

     विवेकानंदांच्या निबंधाबद्दल भगिनी निवेदिता यांनी मत व्यक्त केले की, असे म्हणता येईल की जेंव्हा त्यांनी बोलण्यास प्रारंभ केला,तेंव्हा त्यांचा विषय होता, हिंदूंच्या धर्मविषयक कल्पना. पण जेंव्हा त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला, तेंव्हा हिंदू धर्म एका नव्या रूपात अवतीर्ण झाला”. तर रोमां रोलां यांनी म्हटलंय, “विवेकानंदांचा निबंध हा भारतामध्ये तीन हजार वर्षात धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान या संदर्भात जे काही चिंतन होत आले होते, त्याचा सारभूत निष्कर्ष होता”. 

निबंधाची मांडणी करता करता विवेकानंदांनी भिन्न धर्माच्या अनुयायांना आपलेसे करून घेतले होते. सर्वांच्या मनात भाव निर्माण केला की आपले मार्ग भिन्न असले, आपल्या विचारधारा वेगळ्या असल्या, तरी  आपण सर्वजण भिन्न मार्गाने जात असलेले पूर्णतेचे यात्रिक आहोत. हेच ते विश्वबंधुत्व होते.

विवेकानंद जे बोलत होते ते फक्त एखाद्या ग्रंथाच्या आधारे नव्हते ,विचारांच्या आधारे नव्हते तर स्वत:च्या अनुभवावर आधारित बोलत होते. त्यामुळे सर्व लोकांना ते खात्रीने पटत होते. सतरा दिवस चाललेली ही परिषद समारोपाकडे वाटचाल करत होती.

 २७ सप्टेंबर, परिषदेचा समारोप. आतापर्यंतच्या इतिहासात कधी झाली नव्हती अशी गर्दी लोटली होती. चोहोबाजूंनी श्रोते तासभर आधीपासून येत होते. कोलंबस आणि वोशिंग्टन सभागृह गच्च भरून गेले होते. सात ते आठ हजार लोक उपस्थित होते . ज्यांना प्रवेश मिळाला नाही ते लांबपर्यंत रस्त्यांवर उभे होते. ही परिषद उद्घाटनापासूनच उत्तरोत्तर यशस्वी होत होती. विवेकानंद व्यासपीठावर दुसर्‍या रांगेत बसले होते. त्या क्षणाला त्यांच्या मनाची अवस्था वेगळी होती. अस्वस्थ होती. लोकांना ते अज्ञात होते, पण आज ते समारोपाला जमलेल्या प्रचंड जनसमुदायातील आणि शिकागो शहरातील प्रत्येकाच्या परिचयाचे झाले होते, त्यांना ओळखत नाही असा एकही माणूस नव्हता. शिकागो शहरात त्यांची मोठमोठी छायाचित्रं लागली होती. त्यावर लिहिले होते, हिंदू संन्यासी विवेकानंद’. ती सर्वांच लक्ष वेधून घेत होती.ते पाहताच येणारे जाणारे त्या छायाचित्रापुढे नतमस्तक होत होते. विवेकानंदांचे नाव अमेरिकेच्या कानाकोपर्‍यात वृत्तपत्राद्वारेपण पोहोचले होते.  

सर्वधर्म परिषदेच्या समारोपात एखाद्या संगीत मैफिलीची भैरवीने सांगता होते तसे विवेकानंदांनी सर्व धर्माच्या अनुयायांना संदेश देऊन भाषण संपवले. ते म्हणाले, “ कोणत्याही ख्रिस्ती माणसानं हिंदू वा बौद्ध होण्याची गरज नाही, किंवा कोणत्याही हिंदू वा बौद्ध माणसाने ख्रिस्त होण्याची गरज नाही. प्रत्येकानं दुसर्‍या धर्मातल सारभूत तत्व ग्रहण करायचे आहे. त्याच वेळी आपलं वैशिष्ट्यही जपायच आहे. आणि अखेर स्वत:च्या स्वाभाविक प्रवृत्तीला अनुसरून आपला विकास करून घ्यायचा आहे”.


भारताच्या गौरवाचं हे सुवर्णाक्षरांनी लिहिलेल पान होतं. विश्वबंधुत्व आणि विश्वधर्म याचा उद्गाता असलेले स्वामी विवेकानंद
, असामान्य! अद्वितीय !   

(सर्व फोटो इंटरनेट वरून साभार परत) 

 

© डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ऐकण्यासाठी You Tube चॅनेल च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन या भागाचा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

 

 

Thursday, 10 September 2020

विचार–पुष्प, भाग -४७

 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

       विचार–पुष्प, भाग -४७                                                          

             सर्वधर्म परिषद उद्घाटन- ११सप्टेंबर १८९३

  सर्वधर्मपरिषद  ही मानवजातीच्या धार्मिक इतिहासातली सर्वात महत्वाची घटना. ही परिषद म्हणजे आपल्याला वाटेल की नेहमी संस्थांच्या होतात तशीच काहीशी ही परिषद असणार. शिकागोला सुरूवातीलाच स्वामी विवेकानंद यांनी ज्या भव्य औद्योगिक प्रदर्शनला भेट दिली होती, ते प्रदर्शन एका महत्वाच्या निमित्तानं भरवलं गेलं होतं. त्याला पार्श्वभूमी आहे. कोलंबस अमेरिकेत उतरलेल्या घटनेला चारशे वर्ष पूर्ण झाली म्हणून अमेरिकेत प्रचंड मोठा महोत्सव होत होता. त्या निमित्ताने जागतिक पातळीवरील अनेक परिषदा आणि प्रदर्शने आयोजित केली गेली होती. हे औद्योगिक प्रदर्शन त्याचाच एक भाग होता. म्हणून यात मनुष्याच्या भौतिक क्षेत्रातली प्रगती आणि अमेरिकेबरोबरच जगातल्या सुधारलेल्या तसेच, अनेक रानटी समाजाचे दर्शन घडवणार्‍या माणसांचे पूर्ण पुतळे, त्यांचे पोशाख, त्यांची अवजारे व हत्यारे, त्यांची खाद्यसंस्कृती, याची माहितीपर मांडणी केली होती. 

   


त्याचप्रमाणे मानवाने केलेली बौद्धिक ज्ञान शाखांची आणि विचारांची वाटचाल याचाही विचार व्हायला पाहिजे असे आयोजकांच्या लक्षात आले. म्हणून १५ ते २८ ऑक्टोबर १८९३ अशा पाच महिन्यांमध्ये वीस परिषदांचं नियोजन करण्यात आल होतं .त्यात अर्थशास्त्र, संगीत, वृत्तपत्रांचे कार्य, महिलांची प्रगती, औषधे आणि शस्त्रक्रिया, व्यापार आणि अर्थव्यवहार, राजव्यवहार आणि कायदा सुधारणा, यांच्या परिषदा झाल्या.

या परिषदेत  जगातल्या त्या त्या विषयांचे तज्ञ सहभागी झाले होते. पण मानवाचे वैचारिक क्षेत्र याची उणीव राहिली असे आयोजकांना वाटून, त्यांनी धर्म आणि तत्वज्ञान या विषयांचे जगातले तज्ञ एका व्यासपीठावर येऊन वैचारिक देवाण घेवाण करतील  तर ते तुलनेने व्यापक ठरेल.या दिशेने विचार सुरू झाला . प्रसिद्ध वकील, विचारवंत चार्ल्स कॅरोल बॉनी यांना ही कल्पना सुचली. सर्वांनी ती उचलून धरली.

                               

यासाठी १८९० ला एक समिति स्थापन करण्यात आली. अध्यक्षपद अर्थातच बोनी यांच्याकडे आले. जगात असणारे धर्मपीठं, पंथ, संप्रदाय यांची माहिती गोळा करण्यात आली. सर्व प्रमुखांना पत्रे आणि पत्रके पाठवली. या अडीच वर्षांच्या काळात दहा हजार पत्र आणि चाळीस हजार परिपत्रके पाठवण्यात आली. जगभरात सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या. त्याच तीन हजार समित्या होत्या. या आकडेवारीवरून आपल्याला ही परिषद किती मोठ्या प्रमाणावर होती ते लक्षात येत.                      

 आपला भारत देश यात असणारच, होय होता. प्रचंड भारतातली विविधता, धर्म पंथ संप्रदाय पण कितीतरी. तरी भारताला एकच समिती होती. या समितीत सामाजिक सुधारणा पुरस्कर्ते आणि रूढी व परंपरांना विरोध करणारे, मद्रासच्या हिंदू वृत्तपत्राचे संपादक जी एस अय्यर, ब्राह्म समाजाचे मुंबईचे बी बी नगरकर व  कलकत्त्याचे प्रतापचंद्र मुजूमदार हे होते. इथे हे लक्षात येते की एव्हढी मोठी धर्म परिषद पद्धतशिरपणे आखणी करून केलेली होती.

                     
नियोजन करताना जगातल्या सर्व धर्माच्या प्रवक्त्यांना एकत्र आणणे,सर्व धर्मात मानी असलेली आणि शिकवली जाणारी समान तत्वे लक्षात घेऊन त्यावर अभ्यासकांची व्याख्याने ठेवणे, कोणत्या धर्माचे काय वैशिष्ट्य आहे त्याचा शोध घेणे, एका धर्म कडून दुसर्‍या धर्माला काय घेता येईल अशा गोष्टी शोधून आणि त्याच बरोबर शिक्षण ,श्रम, संपत्ति, दारिद्र्य मद्यपान निषेध अशा चालू असणार्‍या समस्या सोडवण्यासाठी मार्ग सुचविणे जगत शांतता नांदण्यासाठी ,राष्ट्रीय बंधुभावाच्या आधारे सर्वांना एकत्र आणणे या उद्देशाने ही परिषद भरवली जात होती. यामुळे परस्पर सामंजस्य वाढेल. समाज एकमेकांच्या जवळ येतील, असे त्यांना वाटत होते. खरच या परिषदेचा हेतु किती छान व उपयोगी होता. पण यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत राहिल्या.    

    कोणाला वाटत होते, ही परिषद म्हणजे ख्रिस्त धर्मविरोधी कट आहे, तर कोणी म्हणे ख्रिस्त धर्माच्या तत्वांना हरताळ फासला जाईल, कोणी म्हणे जगात सर्वश्रेष्ठ धर्म ख्रिस्त धर्म आहे, मग इतर धर्मांबरोबर परिषद कशाला हवी? अशी अनेक मते होती. मात्र संयोजकांचा हेतु चांगलाच होता. जगातली जी जी राष्ट्र समृद्ध प्रगत आणि सामर्थ्यसंपन्न होती  ती राष्ट्र ख्रिस्त धर्मियांची होती. पण धर्माचे श्रेष्ठत्व नुसते भौतिक प्रगतीवर आणि समृद्धीवर न ठरता माणसाच्या मनाचे सुसंस्कृत, सदाचरणाने व्यापक असलेले सामर्थ्य यावर पण असते, तेच त्याचे सामर्थ्य असते.असा विचार यामागे होता. त्यामुळे काही विरोध असतांनाही परिषद होऊ घातली होती.

                       
 
ही सर्वधर्म परिषद शिकागो मधील आर्ट इंस्टिट्यूट च्या भव्य अशा इमारतीत भरली होती. कोलंबस आणि वॉशिंग्टन ही दोन भव्य सभागृह या इमारतीत होती. आजूबाजूला तीस लहान मोठ्या खोल्या होत्या. इथे सत्र दिवस परिषदेचे काम चालले होते. विषया नुसार गट पाडण्यात आले होते.कोलंबस सभगृहात चार हजार जण मावतील अशी आसन व्यवस्था होती. तर मोकळ्या जागेत एक हजार प्रेक्षक उभे राहू शकत होते एव्हढी जागा होती. याशिवाय उरलेले तेव्हढेच प्रेक्षक शेजारच्या वॉशिंग्टन सभागृहात बसून राहत आणि त्यांच्यासाठी तीन दिवसांनंतर कोलंबस मध्ये होणारा प्रत्येक कार्यक्रम पुन्हा होत असे.

     ११ सप्टेंबर १८९३ उजाडला. सकाळचे दहा वाजले. आर्ट इंस्टिट्यूट च्या आवारात भल्यामोठ्या घंटेचे दहा टोले वाजले. हे दहा टोले म्हणजे, जगातील दहा धर्माच्या वतीन दिले गेले होते. बोनी यांनी जगातल्या प्रमुख दहा धर्मांची निवड केली होती. हा घंटानाद झाला आणि जगातून आलेले सर्व धर्माचे प्रतींनिधी मिरवणुकीने सभागृहकडे निघाले. या मिरवणुकीत सर्वात पुढे अमेरिकेतील चर्चचे मुख्य पदाधिकारी कार्डिनल गिबन्स आणि परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स कॅरोल बॉनी, त्यामागे कोलंबियन एक्स्पोझिशन च्या महिला अध्यक्षा मिसेस पॉटर पामर व उपाध्यक्षा मिसेस चार्ल्स एच. हेंरोटीन आणि त्यामागे सर्व प्रतींनिधी या क्रमाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. यातून जागतिक सर्वधर्माचे, अनेकरंगी विविधतेचे दर्शन होत होते.चार ते पाच हजार लोक उपस्थित होते तरी निस्तब्ध शांतता पसरली होती. सर्वांच लक्ष वेधून घेणारे ते दृश्य होतं. सर्वांच्या मनात कुतूहल आणि उत्कंठा होती. मिरवणूक सभागृहात प्रवेशली. सभागृहात पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा दोन प्रमुख गटात प्रतींनिधींना बसण्याची व्यवस्था केली होती. हे व्यासपीठ पन्नास फुट लांबीचे आणि दहा फुट रुंदीचे होते.

           
 भारतातून आलेले इतर प्रतींनिधी होते, बुद्धधर्माचे धर्मपाल,जैन धर्माचे विरचंद गांधी, ब्राह्म समाजाचे प्रतापचंद्र मुजूमदार व बी. बी. नगरकर, थिओसोफिकल सोसायटीच्या डॉ. अॅनी बेझंट व ज्ञानचंद्र चक्रवर्ती.

सर्वजण आसनास्थ झाले. सभागृहात ऑर्गनचे गंभीर सूर उमटले आणि सर्वांनी उभं राहून प्रार्थना व श्लोक म्हटले. एका सुरात जणू सर्वजण जगन्नियंत्याची प्रार्थना करत होते, हा ऐतिहासिक क्षण होता.

पहिला दिवस उद्घाटन कार्यक्रमाचा होता.सुरूवातीला सर्व धर्म प्रतींनिधींचे स्वागत करणारी भाषणे झाली. एमजी त्याला उत्तर देणारी प्रतिनिधींची आठ भाषणे झाली. विवेकानंद हे सारं वातावरण भारलेल्या मनाने पाहत होते अनुभवत होते. विशाल जंसमूह पद्धतशिरपणे आखलेला एक सुंदर कार्यक्रम त्यांना प्रथमच पाहायला मिळत होता. याचवेळी त्यांना आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव झाली होती. नाव पुकारल्या नंतर एकामागून एक वक्त्यांची भाषणे होत होती .उत्तम प्रतिसाद मिळत होता.

विवेकानंद पुरते गोंधळून गेले होते, आत्मविश्वास वाटेना, आपण बोलू शकू का? घसा कोरडा पडला . छाती धडधडत होती. शब्द फुटेना. कारण ते काहीच तयारी करून आले नव्हते. सर्वजण तयारीने आले होते . दोन तीन वेळा नाव पुकारले तर आता नको म्हणून ते उठले नव्हते. ते अनेक वेळा असे बोलले असतांनाही भीती वाटत होती कारण आताचा प्रेक्षक वेगळा होता,

शिकागो शहरातले उच्च विद्याविभूषित श्रोते समोर होते. ख्यातनाम विद्वान होते. विचारवंत होते, पत्रकार होते. सार्‍या जगातून आलेले प्रतींनिधी विद्वान प्रवक्ते तर होतेच, पण ते अधिकृत प्रतिनिधी होते. त्यांच्या मागे त्यांची संस्था उभी होती. आपल्या मागे तर कोणीच नाही. म्हणून विवेकानंद यांचा धीर सुटला होता एका क्षणी. पण अचानक उपनिषदातील अहम ब्रह्मास्मि हे वचन मनात चमकले आणि त्याच क्षणी त्यांच्या हृदयात सामर्थ्य संचारले.

दुपारच्या सत्रात चार प्रतिनिधींची भाषणे झाली. आता पुन्हा विवेकानंदांचे नाव पुकारले गेले. तेंव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या फ्रेंच प्रतींनिधी जी.बॉनेट मॉवरी त्यांना म्हणाले, आता थांबू नका, बोला! तेंव्हा विवेकानंद आसनावरून उठले, विद्येची देवता सरस्वतीचे मनोमन स्मरण केले. समोरील प्रेक्षकांवरुन दृष्टी फिरवली आणि म्हणाले,

 “अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधुनो” या पाहिल्याच वाक्याला कंठाळ्या बसणारा टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या भाषणाला टाळ्या पडल्या होत्या पण पाहिल्याच संबोधनाला असा प्रतिसाद नव्हता मिळाला, त्यांनाही आश्चर्य वाटले. टाळ्या थांबण्याची वाट पाहत विवेकानंद थांबले होते. शांतता झाल्यावर पुन्हा बोलायला सुरुवात केले. “सुंदर शब्दांमध्ये जे आपले स्वागत केले गेले आहे त्याबद्दलचा आनंद अवर्णनीय आहे. जगातील सर्वात प्राचीन असा हिंदू धर्म, त्यातील सर्वसंगपरित्यागी संन्याशांची परंपरा यांच्या वतीने मी जगातील सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मन:पूर्वक धन्यवाद देतो”.  त्यांनी परिषदेच्या आयोजकांचे आभार मानले. आधी बोललेल्या वक्त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रत्येक मताबद्दलची सहिष्णुता आणि सर्व जगातील धर्म विचारांच्या बाबतीतली स्वीकारशीलता हे हिंदू धर्माचे वैशिष्ठ्य आहे असे सांगून, पारशी लोक आपल्या जन्मभूमीतून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. त्यांना निश्चिंत पणे राहण्यासाठी आसरा मिळाला. ही ऐतिहासिक घटना सांगून, अशा देशातून आपण आलो आहोत आणि अशा धर्माचा मी प्रतींनिधी आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो. सार्‍या जगातून इथे आलेल्या सर्व धर्म प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आज सकाळी जी घंटा वाजवली गेली, ती सर्व प्रकारच्या धर्म वेडेपणाची मृत्युघंटा ठरेल, लेखणी किंवा तलवार यांच्या सहाय्याने केल्या जाणार्‍या मानवाच्या सर्व प्रकारच्या छळाच्या तो अंतिम क्षण असेल आणि आपआपल्या मार्गाने एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेल्या मानवांपैकी कोणाविषयीही कोणाचाही कोणत्याही प्रकारचा अनुदार भाव यानंतर शिल्लक राहणार नाही. असा मला पूर्ण विश्वास आहे”. असे पाच मिनिटांचे आपले भाषण विवेकानंदांनी थांबवले. आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

हे छोट भाषण उत्स्फूर्त आविष्कार होता. विवेकानंदांनी  परिषदेच्या उद्दिष्टालाच स्पर्श केला होता. स्वागतपर भाषणाला उत्तर म्हणून अशी चोवीस भाषणे झाली. त्यात विवेकानंदांचे विसावे भाषण होते. अजून खरा विषय तर मांडला जायचा होता. ही परिषद सतरा दिवस चालू होती. रोज तीन तीन तासांची तीन सत्रे होत.

  पहिल्याच दिवशीच्या प्रतिसादाने आणि एव्हढ्या अडचणी पार पाडून झालेल्या सहभागाने विवेकानंद खर तर शिणले होते पण रात्री अंथरुणावर पडल्यावर झोप न लागता डोळ्यासमोर समृद्ध अमेरिका आणि आपली दीन दरिद्री मातृभूमी यामधलं प्रचंड अंतर बघून आपल्या देशबांधवांच्या विषयी त्यांच्या मनात करुणा दाटून आली, अस्वस्थ होऊन डोळ्यातून अश्रु वाहू लागले. सकाळच्या यशानंतर पण ते हुरळून नाही गेले तर, जगन्मातेला त्यांनी म्हटले, “माझ्या देशबांधवांचं अपार दारिद्र्य दूर होणार नसेल तर हे नाव आणि किर्ती घेऊन मला काय करायचं आहे? कोण जाग आणेल भारतातल्या सर्व सामान्य जनतेला? जगन्माते कृपा कर, ते कसं करता येईल याचा मला काही मार्ग दाखव”.(सर्व फोटो इंटरनेट वरुन साभार परत)

  © डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ऐकण्यासाठी You Tube चॅनेल च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन या भागाचा यू ट्यूब व्हिडिओ बघावा