Sunday, 11 April 2021

कहाणी लंडनच्या आजीबाईंची

  

v पुस्तक परिचय                 

    कहाणी लंडनच्या आजीबाईंची

     सातासमुद्रापलीकडून नुकताच लंडन मध्ये येऊन दाखल झालेला २,४ दिवसात अजिबाईंच्या घरचाच व्हायचा. दिवसभर कामात वेळ जायचा पण, संध्याकाळ झाली की हुरहूर लगायची आणि घरच्या मंडळींची आठवण बेचैन करायची तेंव्हा, रात्री जेवायला ज्या घरी जायचे तिथे जेवणानंतर मनातल्या आपल्या घरच्यांच्या आठवणी सांगायच्या, मन मोकळं करायचं आणि निवांत व्हायचं. गप्पा मारता मारता त्या आजीच्या घरचेच होऊन जायचे. ते घर होते, पंचवीस, हुप लेन, लंडन. अर्थात लंडनच्या अजिबाईंच. हो सगळ्यांनाच ऐकून माहिती आहेत लंडनच्या या आजीबाई.

                                   
    एकदा पूना गेस्ट हाऊस चे कै.चारुकाका सरपोतदार यांच्या मुलाखत घ्यायला गेले होते, त्यांनीही परदेश प्रवासातल्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यात लंडनच्या आजींच्या हातच्या पुरणपोळया खाल्याची आठवण सांगून त्यांचे कौतुक केले होते, बर्‍याच वेळा अनेकांच्या कडून ऐकलं होत, वाचलं होतं लंडनच्या अजिबाईंच्या बद्दल. तेंव्हा फार विशेष वाटलं नाही. पण हे पुस्तक हातात आलं आणि या लंडनच्या आजींचं मोठेपण, त्यांनी घेतलेले कष्ट मुळातून समजलं. विदर्भातल्या, खेड्यातल्या एका मराठमोळ्या निरक्षर स्त्रीने एका पाश्चिमात्य देशात, तिथली माणसं, रितीरिवाज, भाषा, परंपरा संस्कृती माहिती नसताना लंडनमध्ये एक कर्तबगार आजीबाई बनारसे म्हणून संपूर्ण ब्रिटन मध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यांचा १९४७ ते १९८३ पर्यन्त चा (निधन) प्रवास मनाचा ठाव घेणारा आहे. प्रेरणा देणारा आहे. लंडनला येऊन प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चा व्यवसाय सुरू करणं, तो वाढवण, अनेकांना रोजगार देणं, आपली संस्कृती तिथे जोपासण आणि सर्वांना जोपासला लावणं, महाराष्ट्र मंडळाच उपाध्यक्ष व अध्यक्षपद सांभाळणे, युरोपातल्या पहिल्या हिंदूंच्या मंदिराची, साईबाबा मंदिराची निर्मिती, इंडिया कल्चरल सेंटर ची स्थापना, गणपती ऊत्सव, राणी एलिझाबेथ वरील प्रेम - ते ब्रिटन मधली एक नामवंत व्यक्ती म्हणून या आजींचा हा प्रवास थक्क करणारा आहे. फक्त आजीबाई वनारसे, लंडन’. एव्हढ्याच पत्त्यावर ३० वर्षे आजींची पत्र न चुकता मिळत होती. किती नाव कमावलं होतं आजींनी .  

   आचार्य अत्रे, सुधीर फडके, पु.ल.देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, वसंत बापट, शांता शेळके, पं जितेंद्र अभिषेकी, हृदयनाथ मंगेशकर,असे दिग्गज आणि बरेच जण आजींच्या घरी उतरले आहेत. लंडन भेटी नंतर, आचार्य अत्रे तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा घोषणा देताना गमतीने म्हणायचे, “बेळगाव, कारवार, निपाणी पंचवीस हुप लेन सह  संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”.चळवळीच्या घोषणेमध्ये गमतीने का होईना आजींचे नाव घेणे ते ही आचार्य अत्रे यांनी म्हणजे केव्हढा मोठेपणा देत होते त्यांच्या कर्तृत्वाला याचीच साक्ष आहे.         

     लेखिका सरोजिनी वैद्य यांनी ही कहाणी अर्थात आजींचे चरित्र लिहिले आहे. ही चरित्र कथा जेंव्हा पहिल्यांदा लंडन मध्ये २४ सप्टेंबर १९९६ ला प्रसिद्ध झाली, तेंव्हा ती आवृत्ती दोन अडीच महिन्यात संपली. आता २०१७ ला त्याची नववी आवृत्ती काढायला लागली होती. आणि इतक्या उशिरा का होईना ते पुस्तक हातात पडले होते. आणि पुस्तकातल्या लंडनच्या आजींना भेटण्यासाठी उत्सुक होते मी. एका बैठकीत वाचून तृप्त झाले मन. एका भारतीय स्त्रीचा अभिमान वाटला. सर्वांनी अभिमानाने वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक. अवश्य वाचावे.

  © - डॉ. नयना कासखेडीकर.

                             

                             ----------------------------------------

Wednesday, 17 February 2021

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके

 

                                   आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके

 “वासुदेव बळवंत फडके यांची प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्याची कल्पना, त्यासाठी प्रणार्पण करण्याची तयारी म्हणजे सातपुडा पर्वतरांगांसमोर हिमालय जेव्हढा उंच दिसेल तितके फडके सर्वसामान्यांपेक्षा थोर होते” इति अमृतबझार पत्रिका १५ नोहेंबर १८७९ 

             

   

                                             

भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतले सशस्त्र क्रांतिचे आद्य प्रवर्तक म्हणजे वासुदेव बळवंत फडके. मुळातच संवेदनशील मनाचे आणि स्वाभिमानी. रायगड जिल्ह्यातल्या शिरढोण गावचे त्यांचे मूळ घराणे. त्यांचे आजोबा अनंतराव, कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. ऐतिहासिक घराण्यात वासुदेव यांचा जन्म झाला होता. कुस्ती घोडेस्वारी, तलवार चालविणे याचे प्रशिक्षण त्यांना मिळाले होते. त्यामुळे मुळातच लढाऊ वृत्ती अंगात होती.  

 

कल्याण, मुंबई आणि पुणे येथे थोडेसे शिक्षण झाल्यावर वासुदेव नोकरीस लागले. रेल्वेतल्या नोकरी नंतर, लष्कराच्या हिशोब खात्यात त्यांना १८६३ मध्ये नोकरी मिळाली आणि दोनच वर्षात १८६५ मध्ये मुंबईहून पुण्यात बदली झाली. ते १८६५ ते १८७९ या काळात पुण्यात राहिले. त्यांच्या क्रांतिकारक होण्याला हाच पुण्यातला काळ कारणीभूत ठरला. १८७३ ते १८७५ या विशेषता दोन वर्षात न्यायमूर्ती रानडे इंग्रजांच्या अन्यायविरुद्ध व्याख्यानातून जनजागृती करत असत. त्याचवेळी दुष्काळाचे संकट, अन्न पाण्याचे दुर्भिक्ष्य, कॉलरा आणि देवीची साथ यामुळे थैमान चालले होते. अनेक जण मृत्यूमुखी पडले. यात अनाथ झालेली मुले अनाथाश्रमात वाढवून त्यांना ख्रिश्चन केले जाईल अशी गुप्त योजना ख्रिश्चन धर्म प्रसारकांनी आखली होती. महाराष्ट्रातील ही सर्व आपत्ती, तरुण वासुदेव यांना बघवत नव्हती. इंग्रजांच्या दरबारी नोकरीस असून सुद्धा त्यांच्या विरुद्ध उठाव करण्याचे त्यांनी ठरविले आणि दीर्घ सुट्टी काढून खेडोपाड्यात प्रवास सुरू केला. ओसाड पडून निर्मनुष्य झालेली गावच्या गावं आणि गुरे व मृत मनुष्यांचे सापळे बघून त्यांचे अंतकरण पिळवटून निघाले.        

 

पुण्यात ते सदाशिव पेठेत, खजिना विहीरीजवळच्या लक्ष्मीनृसिंह मंदीरालागत राहत होते. याच काळात पुणे राजकीय घडामोडींचे मुख्य केंद्र झाले होते. कारण भारताची आर्थिक स्थिति ब्रिटीशांच्या स्वार्थी आणि अन्यायकारक आर्थिक धोरणांमुळे खालावत चालली होती. ब्रिटीशांच्या स्वार्थी आणि अन्यायकारक धोरणांची जाणीव पुण्यात राहणार्‍या लोकांना झाली. या नृसिंह मंदिराच्या वास्तव्यात ते असतानाच सशस्त्र लढ्याची ठिणगी पडली होती. त्यामुळे ही वास्तू इतिहासाची आजही साक्षीदार आहे.

 

   न्या.महादेव गोविंद रानडे आणि लहुजी वस्ताद साळवे यांचा वासुदेव यांच्यावर प्रभाव पडला होता. त्याच सुमारास एक घटना घडली. त्यांची आई मुंबईला अत्यंत आजारी झाली असताना सुट्टी दिली नाही. आई गेलीच. त्यांना आईच्या अंत्यदर्शनासाठी सुद्धा रजा दिली नाही. मन फारच अस्वस्थ झाले. तसेच ते शिरढोणला गेले, पण आईचे दर्शन झाले नाही. परत आल्यावर कार्यालयात इंग्रजांच्या रोषाला सामोरे जावे लागलेच. वर्षभराने पुन्हा आईच्या वर्षश्राद्धासाठीही रजा दिली गेली नाही आणि तेंव्हाच त्यांनी इंग्रजांच्या विरोधात प्रतिशोध घ्यायचा ठरविले. स्वता घेतलेल्या अशा अनुभवामुळे देशाभिमान जास्तच जागृत झाला. परदेशी मालावर बहिष्कार घातला. स्वदेशीचे  व्रत घेतले. सामाजिक कामही करत होते.

   

    वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तु वापरण्याची शपथ त्यांनी घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय, निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये १८७४ मध्ये पूना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते, त्यांनी दत्त माहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.   

व्यायामाने शरीर कमावले, मल्लविद्या शिकले. लहुजी वस्तादांच्या आखाड्यात तलवारबाजी, बंदूक चालविणे, दांडपट्टा, घोडदौड अशा विद्याही त्यांनी पारंगत केल्या. युद्धकला शिकले. आपल्या सहकार्‍यांनाही शिकवले. पुढे तर शनिवार वाड्यासामोर ते वीरश्रीयुक्त व्याख्याने देऊ लागले. वैध चळवळीचा मार्ग त्यांनी स्वीकारला, पण उपयोग होत नव्हता. परिस्थिति आणखीन गंभीर होत होती. नुसती व्याख्याने देऊन जनतेला इंग्रजांविरोधात लढण्याचे प्रयत्न साध्य होईनात. आपल्या पूर्वजांनी दिलेले इतिहासातील लढे आठवून आपणही हे करू शकतो असा आत्मविश्वास जागृत होऊन, सशस्त्र लढा द्यायचा, इंग्रज सरकारला त्राही माम करून सोडायचे आणि स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायचे त्यांनी ठरविले.

 

   त्याच वेळी रामोशी सुद्धा इंग्रजांच्या अन्यायाला कंटाळले होते. रामोशींची सेना या चळवळी साठी वासुदेव यांच्या बरोबर उभी राहिली. ब्रिटीशांच्या विरोधात लढा उभारायचा असेल तर इतर लोकांना ही सामावून घ्यायला हवे असे क्रांतिवीर लहुजी साळवे यांनी वासुदेव यांना पटवून दिले. फौज उभी राहिली. पण त्यांच्या खर्चासाठी कोणीही मदत करेना. इंग्रजांचा रोष कोणीही श्रीमंत, ओढवून घेण्यास तयार होत नव्हते. धनाढ्य लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले पण त्याचाही उपयोग झाला नाही. मग छोट्याशा सैन्यासह ते सैन्य गावागावात श्रीमंतांकडे आणि सरकारी खजिन्यावर धाडी टाकू लागले. त्याचा हिस्सा घेऊन शेवटी शेवटी तर काही जण परत निघून गेले. वासुदेव यांना कळेना की यांना पैशांपालीकडे राष्ट्रभक्ती, देशप्रेम कसे समजून सांगावे. शेवटी ते हताश झाले. आत्मसमर्पण करावे असा विचार मनात आला, तब्येत बिघडली. आपण आता फार दिवसाचे सोबती नाही असे त्यांना वाटू लागले. पण दरम्यान श्रीशैलमला रघुनाथ मोरेश्वर भट भेटले आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला. आता रामोशींच्या ऐवजी रोहिल्यांचे हजारो सैनिक पुन्हा जमा झाले. आत्मसमर्पणाचा विचार मनातून काढून टाकला. गाणगापुरात येऊन राहिले. थोडी तब्येत सुधारली. पुन्हा पुण्याकडे निघाले. 

 

  सशस्त्र उठाव सर्वदूर पसरवायचा प्रयत्न होता. त्याच वेळी लुटारूंनी टाकलेले छापे वासुदेव यांच्या नावावर गोवले जात होते. वास्तविक त्यांचा यात काहीही संबंध नव्हता. इकडे इंग्रज हा उठाव दडपण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारची धावपळ सुरू झाली. झडत्या सत्र सुरू झाले. त्यांच्या सर्व नातेवाईकांना एकत्र करून बंदिस्त केले. पत्नीला जुन्नर येथून शिरढोणला आणून चाळीस जणांच्या पहार्‍यात ठेवलं. या कामगिरीवर मेजर डॅनियल हा अधिकारी होता. त्याने सर्व हैद्राबाद पर्यन्त प्रदेश पिंजून काढला. वासुदेव यांना पकडून देणार्‍यास सरकारने बक्षीस जाहीर केले.

    

  विजापूर जिल्ह्यात देवरनावडगी गावातील बौद्ध विहारात अत्यंत श्रमाने थकून, तापाने फणफणलेल्या अवस्थेत डॅनियलला फितुरा मुळे वासुदेव सापडले.  निद्रित अवस्थेत वासुदेव यांना ओळखून तो त्यांच्या छातीवर जाऊन बसला आणि गदागदा हलवत “मी तुला पकडले आहे आमच्या स्वाधीन हो” म्हणून सांगितले पण वासुदेव यांनी तशाही अवस्थेत द्वंद्वयुद्ध खेळण्याचे आव्हान डॅनियलला दिले. डॅनियल बरोबर अनेक सशस्त्र माणसे होती. वासुदेव व गोपाळ मोरेश्वर हे दोघेच होते . किती पुरे पडणार? शेवटी पकडले गेले. दिवस होता,२१ जुलै १८७९. वासुदेव यांना पकडल्याची बातमी सर्व वृत्तपत्रात झळकली ती वाचून सर्वांना हळहळ वाटली. 

 

    पुण्यात आणून वासुदेव यांचा बंदिस्त कोठडीत आठवडाभर अनन्वित छळ करण्यात आला. या स्वाभिमानी क्रांतिकारकाने छळ सहन केला पण, माहिती दिली नाही. या प्रचंड छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तो फसला. आता यूरोपियन सैनिकांचा पहारा आणखीनच कडक झाला. पुढील दोन महीने काहीही हालचाल झाली नाही. वासुदेव यांनीच सरकारला ही आठवण करून दिली आणि तिसर्‍या महिन्यात कोर्ट केस सुरू झाली. न्यायमूर्ति रानडे आणि इतर देशभक्त यांनी वासुदेव यांचा विचार करून, सार्वजनिक काका म्हणून प्रसिद्ध असलेले वकील गणेश वासुदेव जोशी यांनी वासुदेव यांचे वकीलपत्र घ्यायचे ठरवले. पुण्यात त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. रामोशी,रोहिले, काही मित्र मंडळी या साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. कोर्टात वाचून दाखवलेल्या पत्रात लिहिलं होतं,  “वासुदेव बळवंत हा एक असामान्य देशभक्त असून, त्याने आपले सर्व जीवन देशकार्यासाठी वेचले आहे”.

 

   सरकारविरोधी सशस्त्र युद्ध पुकारणे, त्यासाठी मनसे, शस्त्रास्त्र गोळा करणे यासाठी फाशीची शिक्षा आरोपपत्रात सुचवली होती. ब्रिटिश सरकार उलथवून टाकण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांना अंदमानला काळ्या पाण्याची कडक शिक्षा देण्यात आली. ते ऐकून वासुदेव देशबांधवांना म्हणाले,  “पारतंत्र्याच्या या असह्य जीवनातून आपणास सोडविण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय देऊन कृपा केली आहे”. कोर्टातून त्यांना सशस्त्र पाहर्‍यातून नेत असताना जमलेल्या हजारो नागरिकांनी त्यांचा जयजयकार केला. दुसर्‍या दिवशी वर्तमान पत्रात एक ध्येयवेडा देशभक्त अशा मथळ्यांचे अग्रलेख छापून आले.

 

     दिलेली कडक शिक्षा सौम्य करावी म्हणून वासुदेव यांच्या तर्फे अपील करण्यात आले पण हायकोर्टाने काळ्या पाण्याची शिक्षा कायम केली. फक्त अंदमान ऐवजी त्यांना येमेन येथील एडन द्वीपकल्पावर पाठवावे असा शेरा मारला. ५ जानेवारी १८८० रोजी, मुंबईहून बोटीने एडनला त्यांना नेण्यात आले. कारागृहात पुन्हा छळ सुरू झाला. दोन दोन महीने तेलाच्या घाण्याला जुंपून काम करावे लागे, सतत फिरल्याने चक्कर येई. या छळातून निसटायचा त्यांनी प्रयत्न केला पण, पुन्हा पकडले गेले. आता पायात बेड्या ठोकल्या. पळून गेल्याचा गुन्हा केला म्हणून पुन्हा जास्त शिक्षा. या शिक्षेने तब्येत जास्तच खचत चालली होती. त्यात क्षय झाला. एडन ची हवा सर्वांना त्रासदायकच होती. शिवाय कोठडीत मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध १८८१ मध्ये त्यांनी अन्नत्याग केला. प्रायोपवेशन सुरू केले. एडन येथे असणारे डॉक्टर बर्वे यांनी वासुदेव यांना अन्नत्यागापासून परावृत्त केले. क्षयरोग इतका वाढला की वासुदेव आता अस्थिपंजर झाले. अंथरुणाला खिळलेले जर्जर वासुदेव आता पळून जाऊ शकत नाही अशी खात्री झाल्यावर त्यांच्या बेड्या काढून टाकण्यात आल्या. शेवटी एडनच्या कारागृहात च १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचे निधन झाले . एडन च्या किनार्‍यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या या आदि क्रांतिकारकाने जाता जाता हिंदुस्थानात स्वातंत्र्याची ज्योत मना मनात पेटवली.

 

 ©-डॉ.नयना कासखेडीकर

                                          --------------------------

 


Tuesday, 12 January 2021

मातृदेवो भव!

 

                                          मातृदेवो भव!

                   आज स्वामी विवेकानंद यांची जयंती , त्यानिमित्त विशेष लेख

                                   

   स्वामी विवेकानंद यांनी आपल्या अवघ्या  ३९ वर्षांच्या आयुष्यात हिंदू धर्माची श्रेष्ठता कशा कशात आहेत हे सार्‍या जगाला दाखवून दिले. कुठेही विकासाच्या आड धर्म येत नाही हे सांगीतले. जगात प्रगती, संस्कृती आणि शांतता याला धर्माचा अडथळा कुठेही येत नाही हेही समजविले.

    हिंदू धर्मावरचा विश्वास त्यांनी हिंदूंच्या मनात नुसता वाढवला नाही तर त्या प्रमाणे ते स्वत:च्या आचरणात सुद्धा तो आणायचे. त्याच प्रमाणे हिंदू संस्कृतीचा गौरव जागतिक पातळीवर नेला. हिंदू परंपरा किती समृद्ध आहे ते जगाला दाखविले.

    त्यांच्या मते ज्या देशात स्त्रियांना योग्य सन्मान मिळतो आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला अनुकूल वातावरण ज्या देशात निर्माण करण्यात येतं त्या देशाचीच प्रगती होते. खरं तर विवेकानंद एक संन्यासी होते, त्यांचा विवाह नव्हता झाला. मग त्यांना माता, पत्नी, कन्या आणि भगिनी यांच्या भूमिका कशा कळतील असे सर्वांना वाटेल. असे असले तरी स्वामीजी जेंव्हा जेंव्हा धर्म प्रचारक म्हणून अखंड देशात व देशाबाहेर फिरले तेंव्हा तेंव्हा, त्यांना स्त्री जीवनाचा जवळून परिचय झाला होता. त्यामुळे, त्यांना  पाश्चिमात्य स्त्री जीवन आणि भारतीय स्त्री जीवन यांचा जवळून अभ्यास करता आला. त्यांच्यात फरक काय, त्यांच्या समस्या काय, त्यावर उपाय काय असे मूलभूत चिंतन त्यांनी केले होते. त्यांच्या चिंतनातून बाहेरील देशात आणि हिंदू लोकांना सुद्धा स्त्री जीवनात प्रगती होण्यासाठी आपली काय मुख्य कर्तव्य आहेत ह्याचे मार्गदर्शन मिळाले होते. जे आजही तेव्हढेच मार्गदर्शक ठरेल.

                                         
 सर्वात आधी विवेकानंद यांनी आपली आई भुवनेश्वरी देवी तसेच गुरुमाता शारदा देवी यांचे जीवन पाहिले होते, त्यांचे आदर्श अनुभवले होते. लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार झाले होते त्याचा मोठेपणी डोळसपणे विचार केला होता त्यांनी.

   ग्रंथांमधून अभ्यासलेल्या स्त्रियांबरोबरच, परिव्राजक म्हणून फिरताना देशातील स्त्रियांची स्थिती काय आहे ते त्यांना दिसले होते. तर अमेरिका, युरोप, येथे फिरून तिथले स्त्री जीवन पण त्यांनी पाहिले होते. यावरून त्यांना हिंदू कुटुंबाचे जे दर्शन झाले त्याबद्दल ते म्हणतात, “सीता सावित्रीच्या या पुण्यक्षेत्र भारतात स्त्रीयांचे जे चारित्र्य आढळले, त्यांच्या ठायी जी सेवावृत्ती, सहनशीलता, दया, संतोष व भक्ती हे गुण पाहण्यात आले, तसे ते मला या पृथ्वीच्या पाठीवर इतर कुठेही दिसले नाहीत”.   

   भारतात आणि परदेशात त्यांना परस्पर विरोधी आदर्श दिसले होते. प्रत्येक राष्ट्राच्या काही परंपरा आणि काही आदर्श असतात, तसे ते भारतात तर होतेच. परंपरेप्रमाणे प्रत्येकाचे मापदंड वेगळे असतात. त्यांना दिसलं होतं की, भारतात विधवा विवाह म्हणजे अध:पतन तर अमेरिकेत तो नीतिसंमत होता. 

                                       

     आदर्श स्त्री जीवन म्हटलं की आपल्या मनात मातृभाव च येतो. हा भाव आई या नात्यातच मग, अगदी देव संकल्पनेत सुद्धा विठू माऊली, संत सज्जनांना ,ज्ञानेश्वर माऊली आणि कुटुंबात व समाजातील वडीलधार्‍या मंडळीतील स्त्री या सर्व मातेसमान मानल्या जातात. देव संकल्पनेतील स्त्री देवता जशी मातृ शक्ति मानली जाते तसेच आपला देश म्हणजे भारत ही सुद्धा भारतमाता म्हणून आपण कल्पितो.पण,पाश्चात्य देशात मात्र स्त्री म्हणजे पत्नीत्व च असते हे स्वामी विवेकानंद यांचे निरीक्षण आहे.

    स्वामीजी या भिन्न आदर्शांचे स्वरूप काय व का याचा मागोवा घेतात. त्यात त्यांनी भारतीय कुटुंबात पत्नीचे स्थान, जिच्या पासून आपल्याला हा देह लाभला आहे तिचे समाजात असलेले माहात्म्य, जी नऊ महीने आपल्याला तिच्या उदरात वाढवते तिचे स्थान, वेळ आली तर हजारो वेळा आपले बलिदान ही देते तिचे समाजात असलेले स्थान, जी आपले अपराध मोठ्या प्रेमाने आपल्या पोटात घालते, ज्यामुळे तिच्या आपल्यावरील प्रेमात जराही खंड पडत नाही तिचे स्थान, याचा भारतीय दृष्टीकोनातून विचार करतात. त्त्या उलट मनाविरुद्ध झाले म्हणून शुल्लक  कारणावरून चिडून, कोर्टात जाऊन घटस्फोट घेतात त्या पत्नीचे पाश्चात्य देशात काय स्थान, (आता आपल्याकडेही अशा घटना घडू लागल्या आहेत,) अमेरिकन समाजातले मातेचे स्थान काय ? असे प्रश्न ते प्रत्यक्ष अनुभवावर अमेरिकेतल्या स्त्रियांना विचारतात.

ते विचारतात, “अमेरिकन महिलांनो, सांगा तुमच्या समाजात मातेचे स्थान कुठे आहे? मातेला सर्वोच्च स्थान देणारा पुत्र मला या देशात आढळला नाही . आईच्या अगोदर मरण आल्यास तिच्याच मांडीवर डोके ठेऊन मरण यावे अशी आमची भावना असते. अशा मातेची तुमच्याकडे काय कदर आहे? स्त्रीचे स्त्रीत्व काय फक्त हाडामांसाच्या शरीरातच असते काय? नारीला फक्त शरीर संबंधातच बंदिस्त केलं आहे तुमच्याकडे. मात्र ज्याच्या समोर जाण्याची काम भावनेला हिंम्मत होणार नाही किंवा पशुत्त्व ज्याला स्पर्श करू शकणार नाही असा आई शब्द आहे. भारताचा हाच आदर्श आहे.              

    आमच्या सांप्रदायिक प्रथांनुसार सुद्धा प्रत्येक स्त्रीला आम्ही आई मानतो. एखाद्या लहान बलिकेला सुद्धा आम्ही माता मानतो. असे विवेकानंद यांच्या जीवनातील काही प्रसंग ही आपल्याला माहिती आहेत. एका नर्तीकेला, एका गायिकेला, सुद्धा त्यांनी माता म्हणूनच पाहिले होते. मातृत्व किंवा मातृशक्तीच ही आपल्या स्त्रीत्वाचा सर्वोच्च आविष्कार भारतीय मानतात. त्यात स्वार्थ नाही, मूर्तीमंत सहनशीलता आहे, क्षमा आहे, अशी मूर्ति म्हणजे आमची आई असते. तीच आमचा आदर्श असते. म्हणूनच भगवंताच्या प्रेमाची साक्ष आमच्या आई मधेच आम्हाला पटते.  म्हणून तर म्हंटलं आहे की, कुपुत्रो जयेत क्वचिदपि कुमाता न भवति कुपुत्र जन्माला येऊ शकतो पण कुमाता मात्र कधीही असू शकत नाही.

   ही हिंदू मातांची थोरवी सांगताना स्वामीजी घरातलं सासू-सुनेचं उदाहरण देतात. तरुण मुलाच्या पत्नीचे आणि आईचे पटत नसेल, पत्नी आईच्या मर्जी विरुद्ध वागत असेल तर त्या तरुणाला खपत नाही, कारण तो मातृपूजक असतो. आई त्याला पूजनीय असते. वात्सल्य प्रेम हा आदर्श भारतात आपल्या शास्त्रात सांगितला  आहे. पाश्चात्य लोक व्यक्तिस्वातंत्र्यवादी आहेत. हाच फरक दोन संस्कृतीत आहे.

  स्वामी विवेकानंद म्हणतात, “ हे भारता विसरू नकोस की तुझ्या स्त्री जीवनाचा आदर्श आहे सीता, सावित्री, दमयंती. विसरू नकोस की, तुझा उपास्य देव आहे सर्वस्वत्यागी उमानाथ शंकर, विसरू नकोस की तुझा विवाह, तुझी धनदौलत, तुझे जीवन यापैकी काहीही तुझ्या इंद्रियसुखासाठी नाही, वैयक्तिक सुखासाठी नाही, विसरू नकोस की, जन्मापासून तुझ्या जीवनाचे जगदंबेच्या चरणी बलिदान झाले आहे, तुझा सारा समाज त्या विराट महामायेची केवळ छाया आहे याचा कधीही विसर पडू देऊ नकोस”.

आज च्या पिढीला हे आदर्श पटणार नाहीत कदाचित, पण असे आदर्श असल्यानेच आजही चांगुलपणा सत्यता, प्रमाणिकता, त्याग यासारखी मूल्ये टिकून आहेत. ती काळाच्या कसोटीवर सुद्धा खरी उतरली आहेत, यापुढेही उतरतील.   

   म्हणून पत्नीपदापेक्षा मातृपद सर्व श्रेष्ठ मानले आहे. जननी हे शक्तीचे पहिले विकसित रूप आहे असे विवेकानंद म्हणतात. आपली आई म्हणजे सर्वशक्तिमान व्यक्ती अशी बालकाची भावना असते. जन्मदात्या आईच्या ठिकाणी जगन्मातेचा जो अंश आहे त्याची उपासना केल्याने श्रेष्ठत्व प्राप्त होते.

      प्रत्येक स्त्री बद्दल आपल्या मनात मातृभावच असायला हवा. आपल्या विवाहित पत्नी व्यतिरिक्त अन्य स्त्रियांकडे प्रत्येक पुरुषाने माता, कन्या किंवा बहीण या भावनेनेच बघावे आणि अजून महत्वाचा  विचार ते मांडतात की, ज्यांना धर्मगुरूची पदवी हवी असेल त्याने सर्वच स्त्रियांकडे मातृभावाने पाहायला हवे.. त्याच जाणिवेने तिच्याशी वागायला हवे.

  स्वामी विवेकानंद यांनी जगभरातल्या स्त्रिया पहिल्या होत्या, त्यांना भेटले होते, अनेक स्त्रिया त्यांच्या शिष्या झाल्या, त्यांच्या कार्यात सहभागी झाल्या. त्यांनी समाजातील अनेक स्त्रियांना जीवनात योग्य मार्गदर्शन केले.

 स्वामीजींनी आपल्या कडील स्त्रियांच्या समस्यांचा जसा अभ्यास केला होता. तसाच पाश्चात्य स्त्रियांचा पण केला होता. त्यावरून आपल्या कडे चारित्र्य निर्माण करणार्‍या शिक्षणाबरोबरच स्त्रियांना धर्म, गृहव्यवस्था कला, बाल संगोपन याचेही शिक्षण द्यायला हवे असे तेव्हा त्यांनी सुचविले होते, स्वत:चे प्रश्न किंवा समस्या सोडवायला स्त्रिया स्वत: समर्थ कशा बनतील याचा विचार त्यांनी मांडला होता.

   आज इतक्या वर्षानी परिस्थिति बदलली आहे. पण त्यांचा, भारतातील स्त्रियांचं जीवन सर्व दृष्टीने उन्नत करणे ज्यामुळे भारताचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल हा विचार आज सुद्धा तितकाच आवश्यक आहे. स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोण आपल्याकडील सर्वांना दिशा देणारा आहे. रूढी, परंपरांपेक्षाही आज स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवायचे असतील तर स्वामी विवेकानंद यांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टीकोण समजून घेतला पाहिजे असे वाटते.  मातृदेवो भव ! 

     ©  डॉ. नयना कासखेडीकर

            -----------------------------------------

Friday, 16 October 2020

विचार–पुष्प, भाग –५८

                                     उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५८

ग्रीनएकर ची रिलीजस कॉन्फरन्स

    नव्या सूर्याच्या चैतन्याने विवेकानंद पुन्हा ताजेतवाने झाले. उदात्त जीवनाकडे घेऊन जाणारे विचार व्याख्यानातून ते मांडतच होते. परिचित व्यक्तींच्या आग्रहाखातर त्यांचे वेगवेगळ्या व्यक्तींकडे वास्तव्य होत होते. शिकागोहून ते आता ग्युएर्न्सी यांच्याकडे न्यूयॉर्कला आले. एव्हढ्या या विचारांच्या लढाईत विवेकानंद यांना आपल्या हिंदू धर्माबद्दल कुणी काहीही चांगले लिहिलेले कुठे दिसले, तर ते अत्यंत आनंदी होत असत. त्यांच्या वाचनात एक ख्रिस्त धर्मीय व्यासंगी, संस्कृत भाषेचा अभ्यास असलेले डॉ.मोनियर विल्यम्स यांना हिंदू धर्म कसा दिसतो ते वाचायला मिळाले. ते त्यांनी पत्रातून मिसेस हेल यांना कळविले आहे. त्यात म्हटले आहे,

     “हिंदूधर्माचा विशेष असा आहे की त्याला कोणाही परधर्मीयाला आपल्या धर्मात आणण्याची गरज वाटत नाही आणि तसा कोणताही प्रयत्न तो करीत नाही, हिंदू धर्म सर्वांचा स्वीकार करणारा, सर्वांना जवळ घेणारा आणि सर्व आपल्या ठायी सामावून घेण्याइतका व्यापक आहे. सर्व प्रकारच्या मन:प्रवृत्तीच्या माणसांना मानवेल असे काहीतरी देण्यासारखे या हिंदू धर्माजवळ आहे. मानवी मन, त्याचे स्वरूप आणि प्रवृत्ती यामध्ये जी अमर्याद विविधता आढळते तिच्याशी जुळवून घेण्याची तेव्हढीच अमर्याद अशी जी क्षमता आहे ते त्याचे खरे खुरे सामर्थ्य आहे”. विल्यम पुढे म्हणतात, “नेमके बोलायचे झाले तर, स्पिनोझाचा (डच फिलॉसॉफर,जन्म १६३२ मृत्यू १६७७) जन्म होण्याआधी दोन हजार वर्षे हे हिंदू, स्पिनोझाच्या विचारांचे पुरस्कर्ते होते. डार्विनच्या(जन्म १८०९ मृत्यू १८८२, इव्होल्यूशन सिद्धांत मांडला) जन्माआधी अनेक शतके त्याच्या सिद्धांताचा स्वीकार करणारे होते आणि आताच्या आपल्या काळातील हक्सले (बायोलोजिस्ट -जन्म-१८२५ मृत्यू-१८९५) यांचे विचार मान्य करणार्‍यांच्या शेकडो वर्षे आधी हे हिंदू, उत्क्रांतीवादी होऊन गेले होते किंवा त्यांनी तसे केले त्यावेळी उत्क्रांती या शब्दातील अर्थ व्यक्त करणारा शब्द देखील जगातील कोणत्याही भाषेत नव्हता”. असे सगळे वर्णन वाचून विवेकानंद यांना डॉ. मोनियर विल्यम्स यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचे कौतुक वाटले. कारण एका प्रज्ञावंताचे ते निरीक्षण होते. हा आनंद झाला म्हणूनच त्यांनी हेल यांना हे पत्र लिहून कळवलं.

                               
    आता विवेकानंद न्यू यॉर्क जवळच्याच फिशिकल येथील हडसन नदीच्या काठावर असलेल्या ग्युएर्न्सी यांच्या निवासस्थानी राहायला आले होते. इथे त्यांना मन:शान्ती मिळाली होती. याच काळात एक दखल घेण्यासारखी घटना घडली. आपले गाव सोडून आपण परक्या शहरात किंवा गावात गेलो असू आणि तिथे कुणी आपल्या गावचे भेटले तर आपल्याला जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो. त्याच्या बद्दल आपल्याला आपुलकी आणि जिव्हाळा वाटतो. सर्वधर्म परिषदेत विवेकानंद यांना एक नरसिंहाचारी म्हणून भारतीय तरुण भेटला होता. तिथे तो वाईट संगतीत राहून भरकटला होता. अधून मधून तो विवेकानंद यांना भेटत असे आणि काही मदत मागत असे. पण हे सर्व बघून विवेकानंद फार दुखी झाले. त्याला आपल्या देशात- भारतात- परत पाठवणे योग्य आहे असा विचार स्वामीजींनी केला. मग त्यांनी अलसिंगा यांना पत्र लिहून कळवले आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी करायला सांगितली. त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याची घरी जाण्याची व्यवस्था केली. तो भारतात सुखरूप पोहोचला, हे सर्व श्रेय विवेकानंद यांचेच. एक भारतीय तरुण परदेशात भुकेला आणि अनाथ राहू नये असे विवेकानंद यांना वाटले होते.

                  

   
विवेकानंद यांची पुढची भेट इंग्लंडला व्हावी असे एकाने सुचविले होते पण जगन्मातेचा आदेश आल्याशिवाय स्वामीजी थोडेच जाणार? पण सर्वत्र व्याख्याने दौरे, संभाषणे चर्चा मुलाखती असे भरपूर होत होते. आता विवेकानंद यांना वाटत होतं की, प्रत्यक्ष काहीतरी काम इथे सुरू व्हायला हवे. न्यूयॉर्क संस्थानात मिस फिलिप्स यांची कुठेतरी रम्य अशी जागा आहे, असे त्यांना कळले होते आणि तिथे आपण हिमालय उभा करू आणि आश्रमाची स्थापना करू असा विचारही त्यांच्या मनात आला होता. मनात असा विषय येणं ही सकारात्मकता निर्माण झाली होती ती मनस्थिती ठीक झाल्यामुळेच .

    याच दरम्यान  ग्रीनएकर इथले एक आमंत्रण मिळाले. एक वेगळ्या प्रकारचा मेळावा आयोजित केला गेला होता. २७ जुलैला  विवेकानंद ग्रीनएकर इथे मेळाव्यासाठी पोहोचले. दोन दिवस आधी मनात जी आश्रमाची कल्पना आली होती तसाच रम्य परिसर इथे योगायोगाने होता. फार्मर यांच्या मालकीची ग्रीन एकर मेन संस्थानात इलीयटजवळ खूप मोठी जमीन होती.  

                      

  
इथे असे नव्या नव्या कल्पना त्यांना पाहायला आणि अनुभवायला मिळत होत्या. सर्व धर्म परिषद असो, कोलंबियन औद्योगिक प्रदर्शन कल्पना असो, आता हा ग्रीनएकरचा मेळावा सुद्धा एक वेगळीच संकल्पना होती. एखादी कल्पना मनात आली की ती प्रत्यक्षात यशस्वी करण्यासाठी आवश्यक कष्ट घेऊन नियोजन करणे हे पाश्चात्यांचं वैशिष्ट्य स्वामीजींना फार फार भावल होतं. सर्वधर्म परिषदेच्या धर्तीवर वर्षभरातच हा मेळावा आयोजित केला होता. ही कल्पना होती मिस सारा जे.फार्मर यांची. सर्व धर्म परिषद ही औपचारिक होती. तिथे व्याख्याने देऊन सर्व जण आपापल्या स्थानी परत गेले होते. पण आता तसे नव्हते. धर्माची निरनिराळी मते असणार्‍या सर्व व्यक्तींनी पंधरा दिवस एकत्र राहावे, कुठलीही कार्यक्रमाची चौकट असू नये. मुक्त संवाद व्हावा, मोकळेपणाने संभाषण व्हावे आणि सर्वांना मुक्त प्रवेश. सारा फार्मर यांची अशी अभिनव कल्पना स्वामीजींना आवडलीच.

     फार्मर यांच्या मालकीची मोठी जागा होती तिथे हिरवेगार शेत, जवळच वाहणारी नदी, सुसज्ज विश्रामगृह, छोटी छोटी स्वतंत्र निवासस्थाने, बाजूलाच पाईन वृक्षाचे जंगल असा शांत आणि निसर्गरम्य परिसर . शिवाय परिसरात तंबू, त्याला नाव होते हॉल ऑफ पीस /शांतिमंदिरउभे केलेले. कोणी कुठेही रहा, इथे कुठलीही मूर्तिपूजा नव्हती फक्त वैचारिक कार्यक्रम होणार होता. परस्परांना समजून घ्यावे, एकमेकांशी बोलावे, सामूहिक चर्चा करावी, गप्पा गोष्टी माराव्यात, इच्छा असेल तर शांत व निवांत बसावे, असा एकूण विषय होता. सतत औपचारिक व्याख्याने देऊन स्वामी विवेकानंद कंटाळले असताना अशी निसर्गात शांत राहण्याची संधी मिळाली म्हणून ते प्रसन्न झाले होते. इथे ग्रीनएकर मध्ये ख्रिस्त धर्मातील विविध पंथाचे प्रतिनिधी, बुद्धिमंत व विचारवंत सहभागी झाले होते.

                     

 
डॉ. एडवर्ड एव्हरेट हेल, मिस जोसेफाईन लॉक, अर्नेस्ट  एफ.फेनोलेसा, फ्रॅंकलिन बी. सॅनबोर्न, मिसेस आर्थर स्मिथ, मिसेस ओली बुल, गायिका मिस एम्मा थर्स्बी, हे उपस्थित होते. रोज सकाळचे प्रमुख भाषण झाले की जो तो आपल्याला हव्या त्या विषयाकडे वळे, वक्ता आणि श्रोता यांच्यात अनौपचारिक नाते असे. पाईन वृक्षाखाली व्याख्याने चालत. विवेकानंद याच्या भोवती खूप जण गोळा होत आणि त्यांचे आध्यात्मिक विचार तन्मयतेने ऐकत असत. इथे श्रोत्यांना वेदान्त विचारांचा लाभ होत असे. सर्व धर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष हिंदू धर्म ते सांगत असत. त्यासाठी ते उपनिषद, भगवतगीता, अवधूतगीता, भतृहरी, संत मीराबाई, शंकराचार्यांचे निर्वाणषटक यातील दाखले देत असत. सर्व श्रोते एकरूप होऊन जात आणि विवेकानंद त्यांच्याकडून चिदानंदरूप: शिवोहम!  शिवोहम!  हे चरण आळवून घेत, हे म्हणत म्हणतच श्रोते आपल्या स्थानी परतत असत. जिथे बसून पाईन वृक्षाखाली विवेकानंद यांनी व्याख्यान दिले होते तो पाईन वृक्ष पुढे विवेकानंद यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला. हा ग्रीन एकरचा उपक्रम पुढे काही वर्ष चालू होता. नंतर याच वृक्षाखाली बसून सारदानंद आणि अभेदानंद यांनी तिथे प्रवचन दिले होते.

                            
   ‘हॉल ऑफ पीस मध्ये म्हणजे तंबू मध्ये विवेकानंद यांचे स्वतंत्र व्याख्यान झाले होते. त्याला मिसेस बुल उपस्थित होत्या. विवेकानंद यांनी मुख्य धडा दिला की, “सर्व धर्माच्या प्रेषितांचा आपण मान ठेवला पाहिजे. त्यांच्या शिकवणुकीचा आदरपूर्वक अभ्यास केला पाहिजे, त्या त्या धर्माच्या अनुयायांनी हे जपले पाहिजे की, आपल्या वर्तनामुळे,आपल्या महापुरुषांनी दाखवून दिलेल्या ईश्वर प्राप्तीच्या मार्गात कोणतेही किल्मिष मिसळले जाऊ नये. प्रत्येक धर्मातील दोष उणिवा आणि काही ठिकाणी भयानक असलेले भाग आपल्याला आढळतील ते भाग बाजूला ठेवावेत आणि मानवाच्या आत्मिक विकासासाठी पोषक असणारे असे एक ईश्वर, आत्म्याचे अमरत्व, सारे प्रेषित आदरार्ह आणि सारे धर्म विचारात घेण्यासारखे आहेत. या गोष्टींवर भर द्यावा. जसे एखाद्या कुटुंबात प्रत्येकाला कामे वाटून दिलेली असतात, तसेच मानव जातीच्या या कुटुंबात प्रत्येक धर्माकडे काही कामगिरी सोपविली आहे. सर्व मानवांना देण्यासारखा सत्याचा काही अंश प्रत्येक धर्माजवळ आहे त्याचा स्वीकार करा आणि तशी दृष्टी धारण करा. हीच सर्वधर्म समन्वयाची दिशा ठरेल. तिचा खरा उपयोग आहे”. अशी स्पष्ट आणि रेखीव मांडणी विवेकानंद यांनी केली असल्याचा बुल यांनी म्हटलं आहे.

सारा फार्मर यांच्यासमवेत

    ग्रीनएकरला स्वामी विवेकानंद सात-सात, आठ-आठ तास बोलत असत. असे नवे नवे आयाम विवेकानंद यांना कळत जात होते तस तसे त्यांना अमेरिकेतल्या पुढच्या कार्याची दिशा ठरवायला मदत होत होती. अशा प्रकारे ग्रीनएकरचा  कार्यक्रम छान पार पडला. आता विवेकानंद १३ ऑगस्टला ग्रीनएकरहून प्लायमाउथ आले, तिथे फ्री रिलीजस असोसिएशनच्या वार्षिक कार्यक्रमासाठी कर्नल थॉमस वेंटवर्थ हिगिन्सन यांनी निमंत्रण दिले होते. केव्हढी मानाची गोष्ट होती की, अशा वार्षिक कार्यक्रमांना प्रमुख अतिथि म्हणून स्वामीजींना बोलवले जात होते. एव्हढा लौकिक त्यांना मिळाला होता. रामकृष्ण परमहंस यांनी महासामद्धी घेऊन आता आठ वर्षांचा काळ लोटला होता. त्यांनी सांगितलेल्या कामाच्या शोधात स्वामीजी भारतात फिरल्या नंतर आता ते अमेरिकेत आले होते. त्यांनी इथवरच्या प्रवासात अनेक अनुभव घेतले, अनेक घटना घडल्या, पण त्यांचे अंतर्मन नव्या दिशेचा शोध घेतच होते. ग्रीनएकरचा त्यांचा अनुभव खूप चांगला होता. याचवेळी त्यांना, आपण आपल्या धर्माबद्दल काही लिहावे असे वाटले होते. त्यासाठी  शांतता हवी आणि वेळ सुद्धा. असे त्यांनी अलसिंगा यांना पत्रात म्हटले आहे की, “ ज्या दिवसात व्याख्याने नसतात तेंव्हा हातात लेखणी घ्यावी असे मनात आहे”. हेच त्यांनी मिसेस स्मिथ यांनाही पत्रात कळवले आणि ते सारा बुल यांच्या कानावर गेले आणि त्यांनी विवेकानंद यांना लगेच आपल्या घरी केंब्रिजला बोलावले. त्याप्रमाणे ते ऑक्टोबर मध्ये सारा बुल यांच्याकडे गेले. सारा बुल यांचे घर असलेले केंब्रिज अतिशय शांत, गर्दी नाही असे होते. तिथे त्यांनी विवेकानंद यांना स्वस्थपणे राहता येईल अशी व्यवस्था केली. सारा चॅपमन बुल. कोण होत्या त्या?......  क्रमश:

(यातील सर्व फोटो इंटरनेट वरून साभार)

 © डॉ.नयना कासखेडीकर    

---------------------------------------- 

Monday, 5 October 2020

विचार–पुष्प, भाग –५७

                                               उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५७

                     नवा सूर्य

     गेल्या दिडदोन महिन्यांची काळरात्र संपून, आता नवा सूर्य उगवला होता.एप्रिलमध्ये मद्रास येथे घडलेल्या घटना विवेकानंद यांना कळता कळता दोन महीने लागले. जुलै प्रसन्नता घेऊन उजाडली. विवेकानंद मनातून सुखावले. त्यांच्या मनात एकच सल होती ती म्हणजे, अमेरिकेत परिचय झालेल्या लोकांसमोर आपली वैयक्तिक प्रतिमा खराब करण्याचा झालेला घृणास्पद प्रकार. पण वैयक्तिक पेक्षाही त्याच बरोबर हिंदू धर्माचीही प्रतिमा ? ती पुसून काढली तरच त्यांना आपल्या धर्माबद्दल पुढे काम करता येणार होतं. नाहीतर सुरू केलेलं काम, त्याचं काय भविष्य? आणि उज्ज्वल भारत घडवायच स्वप्न होतं ते ? म्हणून सत्य काय ते सर्वांना कळलं पाहिजे, त्या दृष्टीने त्यांचे गुरु बंधु ही कामाला लागले होते. विशेषत: अलासिंगा पेरूमल खूप धडपड करत होते.

मद्रासला एका जाहीर सभेचा आयोजन केलं गेलं. पंचायप्पा सभागृह खचाखच भरून गेलं होतं. अध्यक्ष होते दिवाण बहादुर एस सुब्रम्हण्यम अय्यर. राजा सर रामस्वामी मुदलीयार यांनी सूचना केली आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या परिषदेत केलेल्या उज्ज्वल कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला, सी रायचंद्र रावसाहेब यांनी. त्या बरोबरच अमेरिकेतल्या नागरिकांना धन्यवाद देणारा ही ठराव मांडला गेला.रामनद च्या राजेसाहेबांनी अभिनंदनाची तार पाठवली. किती विशेष गोष्ट आहे की, ज्या व्यक्तीसाठी अभिनंदन म्हणून कार्यक्रम करायचा ती इथे प्रत्यक्षात हजर नाही पण तरी एव्हढा मोठा कार्यक्रम? त्याला मोठ्या संख्येने सर्व थरातील लोक उपस्थित राहिले होते. काय होतं हे सगळं? हिंदू धर्माच्या जागरणासाठी विवेकानंद यांनी केलेल्या कामाची ही तर फलनिष्पत्ती होती.

कलकत्त्यात अजून असं काही नियोजन झालं नव्हतं. पण शिकागो च्या सर्वधर्म परिषदेत उपस्थित असलेले धर्मपाल, आलमबझार मठात गेले आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या सर्व कार्याचे व यशाचे वृत्त त्यांच्या गुरु बंधूंना सांगीतले. शिवाय धर्मपाल यांचे कलकत्त्यात, हिंदुधर्म अमेरिकेत आणि स्वामी विवेकानंद या विषयावर एक व्याख्यान आयोजित केले गेले. याला अध्यक्ष होते महाराजा बहादुर सर नरेंद्र कृष्ण, याशिवाय जपान मधील बुद्धधर्माचे प्रमुख आचार्य, उटोकी यांचे ही या सभेत भाषण झाले. हा कार्यक्रम मिनर्व्हा चित्रमंदिरात झाला. याला नामवंत लोक उपस्थित होते. हे सर्व वृत्त इंडियन मिरर मध्ये प्रसिद्ध झाले होते,  आपोआपच विवेकानंद यांच्या विरुद्ध प्रचारा ला एक उत्तर दिलं गेलं होतं.सर्वधर्म परिषदेत स्वामीजींनी संगितले होते की, हिंदुधर्माला बुद्ध धर्माची गरज आहे आणि बुद्ध धर्माला हिंदू धर्माची गरज आहे आणि हे ध्यानात घेऊन दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे गेले पाहिजे. हे म्हणणे धर्मपाल यांना पटले होते हे आता सिद्ध झाले होते.

या दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांचे वृत्त प्रसिद्ध झालेले ही वृत्त आणि ठरावांच्या संमत झालेल्या प्रती अलासिंगा यांनी अमेरिकेतिल वृत्तपत्रांना पाठवल्या.प्रा.राइट,मिसेस बॅगले  आणि मिसेस हेल यांनाही प्रती पाठवल्या गेल्या, औगस्टच्या बोस्टन इव्हिंनिंग ट्रान्सस्क्रिप्ट मध्ये मद्रासला झालेल्या सभेचे वृत्त आले. हे स्वामीजींना कळले. तसेच शिकागो इंटर ओशन यातही गौरवपूर्ण असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. हजारो मैल दूर,  एकट्या असणार्‍या,सनातनी ख्रिस्ती धर्माच्या प्रचारकांच्या  विरुद्ध लढणार्‍या विवेकानंद यांना हे समजल्यानंतर हायसे वाटले. थोडा शीण हलका झाला. या नेटाने केलेल्या कामाबद्दल त्यांनी अलसिंगा यांचे कौतुक केले.

अलसिंगा पेरूमल 
आणि ..... मग इतर लोकांना पण जाग आली. आता मद्रास नंतर कुंभकोणम, बंगलोर या ठिकाणी सुद्धा अशा सभा झाल्या. मधल्या दोन महिन्यात सारी सामसुम होती. त्यावेळी विवेकानंद यांनी मिसेस हेल यांना पत्र लिहिले आणि विनवणी केली की, “मला आईसारखे समजून घ्या म्हणून, वात्सल्याची विनवणी! माणूस अशा प्रसंगी किती एकाकी पडतो, त्याची मानसिक स्थिति कशी होते, अशा प्रसंगामुळे नैराश्य आणणारी खरी स्थिति होती. अशाच काळात आधार हवा असतो.अशाच मनस्थितीत विवेकानंद मिसेस बॅगले  यांच्या कडे त्यांनी बोलावलं म्हणून अनिस्क्वामला गेले.जवळ जवळ २० दिवस तिथे राहिले. याचवेळी प्रा. राइट पण तिथे होते. योगायोगाने भारतातील वृत्ते पोहोचली ती या दोघांनंही समजली. या आधी जुनागडच्या दिवाण साहेबांनी प्रा. राइट यांना आणि मिसेस हेल यांनाही पत्रे लिहिली होती ती मिळाली होती. त्यात विवेकानंद यांना असलेला भारतीयांचा पाठिंबा लिहिला होता.पाठोपाठ म्हैसूरच्या राजांचेही पत्र आले. हे राइट आणि बॅगले यांना दिसल्यामुळे विवेकानंद समाधानी झाले.

याला उत्तर म्हणून विवेकानंद मन्मथनाथ भट्टाचार्य यांना लिहितात, “अमेरिकेतील स्त्रिया आणि पुरुष, तेथील चालीरीती आणि सामाजिक जीवन याविषयी सांगून, ते म्हणतात, "मद्रासला झालेल्या सभेचा वृत्तान्त देणारे सारे कागदपत्र व्यवस्थित मिळाले. शत्रू आता चूप झाला आहे. असे पहा की, येथील अनेक कुटुंबामधून मी एक अपरिचित तरुण असूनही त्यांच्या घरातील तरुण मुलींच्या बरोबर मला मोकळेपणाने वावरू देतात. आणि माझेच एक देशबांधव असलेले मजुमदार मी एक ठक आहे असे सांगत असताना ते त्याकडे लक्षही देत नाहीत, केव्हढ्या मोठ्या मनाची माणसे आहेत ही. मी शंभर एक जन्म घेतले तरी त्यांच्या या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही.हा उभा देश आता मला ओळखतो. चर्चमधील काही सुशिक्षित धर्मोपाध्याय यांनाही माझे विचार मानवतात. बहुसंख्यांना मान्य होत नाहीत. पण ते स्वाभाविक आहे. माझ्याविरुद्ध गरळ ओकून मजुमदार येथील समाजात त्यांना याआधी असलेली, तीन चतुर्थांश लोकप्रियता गमावून बसले आहेत. माझी जर कोणी निंदा केली, तर येथील सर्व स्त्रिया त्याचा धिक्कार करतात. या पत्राची कोठेही वाच्यता करू नये. तुम्हीही समजू शकाल की, तोंडाने कोणताही शब्द उच्चारताना मला अतिशय सावध राहावयास हवे. माझ्यावर प्रत्येकाचे लक्ष आहे. विशेषता मिशनरी लोकांचे”

“कलकत्त्यामद्धे माझ्या भाषणाचे वृत्त छापले आहे त्यात राजकीय पद्धतीने माझे विचार व्यक्त होतील अशा पद्धतीने सादर केले आहेत. मी राजकरणी नाही आणि चळवळ करणारा कुणी नाही मी चिंता करतो फक्त, भारताच्या आत्म्याची, त्याच्या स्वत्वाची, ती जाग आली की सर्व गोष्टी आपोआप होतील.कलकत्त्यातील मंडळींना सूचना द्यावी की, माझी भाषणे व लेखन यांना खोटेपणाने कोणताही राजकीय अर्थ चिटकवला जाऊ नये. हा सारा मूर्खपणा आहे”. असे त्यांनी अलासिंगना कळवले आहे.

अभेदानंद 
यानंतर सप्टेंबरला कलकत्ता येथे ही विवेकानंद यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करणारि प्रचंड सभा झाली. यासाठी अभेदानंद यांनी घरोघरी जाऊन पैसे गोळा केले होते.अपार कष्ट घेतले. सर्व थरातील चार हजार नागरिक याला उपस्थित होते .राष्ट्रीय पातळीवरील विवेकानंदांच्या गौरवाचा हा कार्यक्रम होता. अध्यक्ष होते, पियारी मोहन मुखर्जी . कळकतत्यातील थोर व नामवंत व्यक्ति. दुसरे होते कळकतत्यातील नामवंत संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य माहेश्चंद्र न्यायरत्न . याची दखल इंडियन मिरर ने खूप छान घेतली .यात अभिनंदांनचे ठराव तर होतेच, पण कलकत्त्याच्या नागरिकांनी विवेकानंद यांना लिहिलेली पत्रे होती. कलकत्ता ही विवेकानंद यांची जन्मभूमी होती त्यामुळे या घटनेला खूप महत्व होतच .शिवाय असत्य प्रचार केलेल्या प्रतापचंद्र मजुमदार यांचीही कर्मभूमि होती. ब्राह्मसमाजाचे धर्मपीठ पण कलकत्ताच होते. हे वृत्त विवेकानंद यांच्या हातात पडले आणि ते कृतकृत्य झाले बस्स.... जगन्मातेचा विजय झाला होता.आपलीम मातृभूमी आपल्या पाठीशी उभी आहे अशा पूर्ण विश्वासाने स्वामी विवेकानंद यांच्या डोळ्यातून, हेल भगिनींना हे कळवताना अश्रूंचा पूर लोटला होता. मनस्ताप आणि निराशा काळाच्या पडद्याआड गेलं आणि नव्या चैतन्याने. उत्साहाने विवेकानंद ताजेतवाने झाले पुढच्या कार्याला लागायचे होते ना? गुरुबंधूंना ते म्हणतात, “तुम्ही सारे कंबर कसून जर माझ्याभोवती उभे राहिलात तर, सारे जग जारी एकत्र आले तरी आपल्याला त्याचे भय मानण्याचे कारण नाही”. असा यानंतर उगवलेला नवा सूर्य त्यांना आत्मविश्वास देत होता. 

               

                                   

© डॉ.नयना कासखेडीकर    

----------------------------------------

Saturday, 3 October 2020

विचार–पुष्प, भाग –५६

                                          उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५६ 

आपलेच झाले परके


      अमेरिकेत मत्सराचा अग्नी कसा भडकला होता ते आपण पाहिले. जे लोक जागतिक स्तरावर सर्व धर्म भेद ओलांडण्याचा विचार मांडत होते ते यात सहभागी होते हे दुर्दैवच म्हणायचे. भारतात सुद्धा त्याची री...ओढत हिंदू धर्म कसा संकुचित व बुरसटलेला आहे, हे ओरडून सांगितले जात होते. पण स्वामी विवेकानंद मात्र हिंदू धर्मातील प्राचीन ऋषींचे उदात्त विचार परदेशात समजावून देत होते. त्यात कुठल्या धर्माची सीमा आडवी येत नव्हती. वा देशाची नाही. हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आज पण आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे.

भारतात प्रसिद्ध झालेले विवेकानंद यांच्या विरोधातले लेख अमेरिकेत पुन्हा प्रसिद्ध केले जात. हे लेख तिथल्या ‘लॉरेन्स अमेरिकन’, ‘आऊटलुक’ आणि ‘डेट्रॉईट फ्री प्रेस’ मध्ये छापून आल्याने सगळ्या लोकांना वाचायला मिळत असत. या विषारी प्रचारामुळे लोक दुरावत चालले होते. परिषदेवेळी मित्र झालेले डॉ.बॅरोज बोलेनसे झाले. एव्हढा सतत प्रचार वाचून प्रा. राईट सुद्धा थोडे साशंक झाले. हे बघून विवेकानंद अस्वस्थ झाले. होणारच ना. कलकत्त्यात इंडियन मिरर या वृत्तपत्रात याचा प्रतिवाद होत असायचा. यात विवेकानंद यांच्या कार्याचे वर्णन, परिषदेची माहिती, चर्चा, त्यांनी मिळवलेले यश हे सर्व छापून येत होतं. माध्यमे कसं जनमत घडवतात याचं हे उत्तम ऊदाहरण आहे. म्हटलं तर चांगल्या कामासाठी माध्यमांचा खूप चांगला उपयोग आहे पण वाईट कामांना किंवा विघातक कामाला प्रसिद्धी देऊन खतपाणी घालणे हे समाजाला अत्यंत घातक आहे. पण भारतात. जगातल्या प्रसिद्धी माध्यमांची ओळख भारतीय लोकांना नव्हती. त्यामुळे इथे आलेली वृत्त अमेरिकेतल्या लोकांनाही अधिकृतरीत्या कळावित असे कोणाच्या लक्षात आले नाही. कलकत्त्यात ‘इंडियन मिरर’ मध्ये १० एप्रिल १८९४ या दिवशीच्या अग्रलेखात विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले होते.ते असे होते, “अमेरिकेला जाऊन हिंदू धर्माचा एक प्रवक्ता म्हणून विवेकानंदांनी जे नेत्रदीपक यश मिळवले आहे, त्याबद्दल त्यांना एक सन्मानपत्र लिहून आपली कृतज्ञता व्यक्त करणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे. ज्यांनी सर्वधर्म परिषदेचे आयोजन केले त्या अमेरिकन लोकांचेही आपण कृतज्ञ असावयास हवे. कारण त्यांनी त्या परिषदेच्या निमित्ताने विवेकानंदांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्यामुळे, त्यांना आपले पुढील कार्य करण्यासाठी पाया भरता आला”. विवेकानंद यांना जे अपेक्षित होते तेचं यात म्हटले होते, पण हा मजकूर त्यांच्या हातात नव्हता. तसाच मधेच बोस्टन मध्ये भारतातील आलेला मजकूर छापला होता ते कात्रण मिसेस बॅगले यांनी विवेकानंद यांना पाठवले. त्याबरोबर बोटभर चिठ्ठी सुद्धा नव्हती यावरून त्यांची गंभीरता लक्षात आली. उत्तम परीचय झालेली ही मोठ्या मनाची लोकं, त्या क्षणी अशी वागली याचे स्वामीजींना किती दु:ख झाले असेल.

आता हे सारं त्यांना असह्य होत होतं. शेवटी त्यांनी एक मार्ग निवडला आणि त्याबद्दल मद्रासला आलसिंगा आणि कलकत्त्याला गुरुबंधूंना पत्र पाठवले. त्यात लिहिले होते, मद्रास व कलकत्त्यात दोन सार्वजनिक सभा घ्याव्यात, त्यात नामवंतांचा सहभाग असावा. त्यांची विवेकानंद यांच्या कार्याची पावती देणारी प्रातिनिधिक भाषणे व्हावीत, अभिनंदन करणारा ठराव संमत करावा, आणि अमेरिकेतील लोकांना धन्यवाद देणारा दूसरा ठराव असावा. या सभांचे वृत्त भारतीय वृत्त पत्रात प्रसिद्ध व्हावे. आणि त्यांच्या प्रती इथे अमेरिकेत डॉ बॅरोज आणि प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक यांना पाठवावीत अशी विनंतीपर पत्र पाठवली.

स्वत:ची प्रसिद्धी हा भाग यात नव्हता. पण हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून जी लोकं त्यांच्या बरोबर आदराने उभी होती, मदत करत होती त्यांच्या मनातून संदेह निर्माण झाला तर, केलेल्या कामावर पाणी च फिरणार ही भीती होती. कारण हिंदू धर्माची ध्वजा एका चारित्र्यहीन माणसाने हातात घेतली आहे असे चित्र तिथे रंगविले जात होते. हा ध्वजाचा अपमान होता. मिशनर्‍यांचा काही भरवसा राहिला नव्हता. काय करतील ते सांगता येत नाही अशी परिस्थिति उद्भवली होती.

डेट्रॉईट मध्ये आयोजित एका भोजन समारंभात घडलेला प्रसंग. यावेळी विवेकानंद यांनी कॉफीचा पेला उचलला तर त्यांना आपल्या शेजारी एकदम श्रीरामकृष्ण उभे असल्याचे दिसले, ते म्हणत होते, “ ती कॉफी घेऊ नकोस, त्यात विष आहे. विवेकानंदांनी एक शब्दही न बोलता तो कॉफीचा पेला खाली ठेवला. अशी आठवण गुरुबंधुनी सांगितली आहे. यावरून केव्हढी गंभीर परिस्थिति तिथे झाली होती याची कल्पना येते. एका सर्वसंग परित्यागी संन्याशाला स्वत:च्या अभिनंदनाचे ठराव करून अमेरिकेत पाठवावेत असे स्वत:च लिहावे लागले होते. यामुळे त्यांच्या मनाची काय अवस्था व किती घालमेल झाली असेल ?

त्यांनी जुनागड चे दिवाण साहेब, खेतडी चे राजे, यांनाही पत्र लिहिली. मेरी हेल यांनाही पत्र लिहून आपल मन मोकळं केलं. सर्वधर्म परिषदेचं महाद्वार ज्यांनी आपल्यासाठी उघडलं होतं त्या प्रा. राईट यांच्या मनात तरी आपल्याबद्दल संशयाची सुई राहू नये असे विवेकानंद यांना वाटत होते. ती दूर करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे असेही त्यांना वाटले म्हणून त्यांनी तसे पत्र राईट यांनाही लिहिले. ते लिहितात, “ मी धर्माचा प्रचारक कधीही नव्हतो, आणि होऊ ही शकणार नाही. माझी जागा हिमालयात आहे, माझ्या मनाला एक समाधान आहे की, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मी परमेश्वराला म्हणू शकतो की, हे भगवन, माझ्या बांधवांची भयानक दैन्यवस्था मी पहिली, ती दूर करण्यासाठी मी मार्ग शोधला, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी पराकाष्ठेचा प्रयत्न केला. पण माला यश आले नाही. तेंव्हा तुझी इच्छा असेल तसे होवो”. तर मिसेस हेल यांना विवेकानंद लिहितात. “या सार्वजनिक जीवनाला आपण कंटाळून गेलो आहोत. माताजी तुमच्या सहानुभूतीचा मला लाभ होईल? शेकडो बंधनांच्या ओझ्याखाली माझे हृदय आक्रंदत आहे”.

दरम्यान विवेकानंद यांच्या हातात जुनागड चे हरिभाई देसाई आणि खेतडीचे अजित सिंग यांची पत्रे आली. लगेच ती प्रा. राईट यांना पाठवली.

अगदी एकाकी पडले होते ते. महिनाखेरीस विवेकानंद हेल यांच्या कडे आले. या सर्व घटनांनी ते अतिशय थकून गेले होते. शरीराने नाही तर मनाने. याचवेळी हेल यांना एक अनामिक पत्र आले की, विवेकानंद यांना तुमच्या घरी ठेऊन घेऊ नका म्हणून, हा एक खोटा आणि चारित्र्यहीन माणूस आहे. हेल यांनी हे पत्र घेतले आणि फाडून ,तुकडे करून पेटत्या शेगडीत टाकले.

प्रतापचंद्र यांची मजल तर पुढे गेली होती. त्यांनी श्री रामकृष्ण यांच्यावरही प्रतिकूल शब्दात टीका करण्याचे सोडले नव्हते. वास्तविक त्यांनी नरेंद्रला या आधी पहिले होते, रामकृष्ण यांच्यावर तर श्रेष्ठत्व सांगणारा सुंदर लेख लिहिला होता. एकदा संध्याकाळी मेळाव्यात प्रतापचंद्र बोलत असताना श्रीराम कृष्ण आणि विवेकानंद यांच्याबद्दल निंदा करणारे काही बोलले.

हे दीड दोन महीने जणू काळ रात्रच होती स्वामीजींसाठी. पण ती आता संपत आली होती. नवा सूर्य उगवणार होता आणि मनातल्या व्यथा नाहीशा होऊन क्षितिजावर प्रसन्नता प्रकाशमान होणार होती.

© डॉ.नयना कासखेडीकर

----------------------------------------