Saturday, 3 June 2023

देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती |

 

देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती |

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी सर त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत, त्या निमित्त त्यांच्याशी झालेला हृद्य संवाद.

                                       

         सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठेसारख्या ग्रामीण भागातून येऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या नामवंत विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू पदावर नियुक्ती झालेले प्राचार्य डॉ. एन.एस. उमराणी सर! अत्यंत अभिमानास्पद वाटणार्‍या या कामगिरीमागची प्रेरणा काय होती, त्यांचा इथवरचा प्रवास, त्यांची शालेय जीवनातील जडण घडण कशी झाली याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होतीच. साहजिकच त्यांचे मूळ गाव, सामाजिक पार्श्वभूमी, कुटुंब आणि बालपण या विषयाकडे प्रारंभी मोर्चा वळला. तोवर सर त्यांच्या कर्नाटक, विजापूरच्या सीमेवरील दक्षिण सोलापूरमध्ये असलेल्या भंडारकवठे या गावाकडे मनाने पोहोचले सुद्धा!

     रम्य ते बालपण, हा अनुभव सांगताना त्यांना आधी आठवते ती नदी, आईवडील,मित्र, शेतातले घर, शाळा आणि गाव. दुथडी भरून वाहणारी भीमा नदी, गावकर्‍यांना आपल्या नावेतून सुरक्षितपणे वाहतूक करून पलीकडच्या तीरावर पोहोचविणारे, पावसाळ्याआधी नावेची दुरूस्ती करणारे नावाडी, तर नदीवर खेळतांनाच्या आठवणी, पाणी कमी असताना, पेरु बोरं खायला नदीच्या पलीकडे कर्नाटकात जाणारी आम्ही मुले या सर्व आठवणी मनावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत असे सर म्हणतात.

पूर्वी एकूणच समाज कसा होता, सामाजिक वातावरण, एकोपा, भारतीय संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम’ चा अनुभव आणि अनुभवलेले प्रसंग सरांनी सांगितले. ते म्हणाले, ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या विचाराने कामे करणारी जनता होती. वेळप्रसंगी एकमेकांसाठी धावून जाणे, सहकार्य करणे, एकमेकांना सुख दु:खात साथ देणे यामुळे समाजात एकोपा व शांतता नांदत असे”.

“माझे आई वडील दोघेही शेतमजूर होते. शिक्षण नसले तरी त्यांचे आचार विचार, सामाजिक जाणीव, शिक्षित लोकांच्या बरोबर असलेली ऊठबस व चांगले संबंध, त्याच प्रमाणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात जे लोक गावासाठी काम करायचे त्यांच्याशी आई वडिलांचे खूप चांगले संबंध होते. आई वडील शेती बटाईने करायचे, जमीन मालकाने शेतातच एक झोपडी बांधून दिलेली होती, तिथे राहूनच शेतीची कामे करायचो. १९७२ला दुष्काळ पडला होता. रस्त्यांची कामे, नाला बंडीग कामे अशी दुष्काळी कामे करायला मी पण जायचो आईवडीलांबरोबर. मी ११ वर्षांचा होतो, मोठ्या माणसांपेक्षा जास्त काम करायचो तेंव्हा लोक कौतुक करायचे. एक रुपया रोज मजुरी मिळायची.पण आठवड्याच्या शेवटी हातावर मिळायचे सात रूपयांऐवजी फक्त साडेतीन रुपये. म्हणजे रोजचे पन्नास पैसेच, निम्मीच मिळायची कारण मी लहान होतो. हे पैसे मोजताना तेव्हा डोळ्यात पाणी आले. माझ्यासाठी हे धक्कादायक होते. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंतचे शिक्षण आणि नंतर दहावी पर्यन्त हायस्कूल होते. दहावी होईपर्यन्त मी सातत्याने काही ना काही शेतीकाम करत असे. शाळेच्या उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुटीतपण आम्ही काम करून शाळेचा खर्च, युनिफॉर्म, वह्या पुस्तके हा खर्च भरून काढत असू. परिस्थितीमुळे आई वडिलांना तेव्हढाच आर्थिक हातभार!”

आपली आर्थिक बाजू खूप मजबूत पाहिजे याची जाणीव त्यांना अश्या प्रसंगातून झाली होती. १९७२ सालच्या दुष्काळाने आर्थिक पिळवणुक आणि कष्टकर्‍यांचा अवमान याचा आघात त्यांच्या बालमनावर झाला होता.

दहावीनंतर सोलापूर शहरात संगमेश्वर कॉलेजमध्ये प्रवेश झाला. नवे शहरी वातावरण, हॉस्टेलला राहणे, परिस्थितीशी जुळवून घेणे यातून जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्याचे ते सांगतात. निम्नआर्थिक स्तरातल्या हुशार विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप होती ती आपल्याला मिळायची असे सांगताना, विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाणीव असणारे त्या कॉलेजचे प्राचार्य के. भोगीशयन यांच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. वर्षाच्या शेवटी मिळणारी स्कॉलरशिप दर महिन्याला खर्चायला काही रक्कम मिळावी म्हणून ती अॅडवान्स द्यायची असे ठरवल्याने खूप सोय झाली.

संगमेश्वर कॉलेज मधून १९८२ ला बी.कॉम. होत असताना वडिलांचे अचानक निधन झाले. पुढे एम.कॉम. होऊन प्राध्यापक होण्याचे स्वप्न बघितलेल्या उमराणी सरांच्या समोर आता पुढे काय? असा प्रश्न उभा राहिला आणि साहजिकच नोकरी शोधावी लागली. स्पर्धा परीक्षा देऊन बँक, रेल्वे, एअर इंडिया यांच्या परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि मुंबईत एअर इंडियातली नोकरी स्वीकारली. मोठे शहर, नावाजलेली कंपनी, वातानुकूलित चकचकीत ऑफिस अशा एकदम नव्या वातावरणामुळे अनेक नव्या गोष्टींची ओळख झाली. रहाणीमान सुधारलं. आईला दरमहा पैसे पाठवता येऊ लागले. आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर त्यांच्या कुटुंबाची तेव्हढीच भक्कम साथ होती.

एअर इंडिया सारखी चांगली स्थैर्य असलेली सोडून शिक्षण क्षेत्रात स्थिर होण्याचा निर्णय घेण्याचे कारण सांगताना ते म्हणतात, “ एम.कॉम. होऊन प्राध्यापकी करायची हे पहिल्यापासूनच मनात होत, ते स्वप्न होतं माझं. ते पूर्ण करण्यासाठी १९८८ ला एअर इंडिया सोडण्याचा निर्णय घेतला. आर्थिक स्थिति थोडी सुधारली होती, मग स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा पुन्हा उफाळून आली. तो विचार गप्प बसू देईना. मुंबई विद्यापीठातून एम.कॉम. केलं. पुढे शिवाजी विद्यापीठातूनपण एम.कॉम. केलं. बार्शीच्या सुलाखे कॉलेज मध्ये इंस्ट्रक्टरची नोकरी मिळाली. सन १९८८ ते १९९४ पर्यन्त ही नोकरी केली. याच काळात NET परीक्षा पास झालो”.

“सीनियर कॉलेजमध्ये काम करायची इच्छा होतीच. १९९४ला शाहू कॉलेजमध्ये रुजू झालो. १४ वर्षे काम केल्यानंतर म.ए.सो. जाहिरात आली आणि अर्ज केला. २००८ ते २०२३ गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या सेवेत प्राचार्य म्हणून काम केले. या काळात महाविद्यालायला विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGCचे) मानांकन मिळाले, तर महाविद्यालायाची शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक स्वावलंबन याची घडी सरांनी बसवली. म ए.सो.च्या दहा वर्षांच्या सेवेत शैक्षणिक गुणवत्ता वाढवली. इन्फ्रास्ट्रक्चर चांगले झाले. रिसर्च सेंटर सुरू झाले. विद्यार्थी संख्या वाढली.

आपल्या सेवेच्या काळात कॉलेजला नॅक कमिटीकडून ए श्रेणीचं मानांकन २०१० साली ३.३९ स्कोअर आणि २०१६साली ३.४५ स्कोअर असं दोनदा मिळालं, हे सांगताना सरांना समाधान आहे. ते म्हणतात, “शिक्षण क्षेत्रात महाविद्यालयाचा दर्जा चांगला राहण्यासाठी, व्यवस्थापन, प्राध्यापक, विद्यार्थी सर्वांचाच चांगला सहभाग आवश्यक असतो. महाविद्यालयाचे नाव मोठे होण्यासाठी आवश्यक ते कष्ट घेण्याची तयारी असायला लागते, ती सर्वांची जबाबदारी असते. एकमेकात सुसंवाद असणं महत्वाच असतं आणि काम करण्याची प्रेरणा देणंही गरजेचं असतं. तेच आम्ही केलं. भारतात आणि परदेशात महाविद्यालय पाहणीसाठी अभ्यास दौरे केले.

या पाहणीतून उच्च शिक्षण अभ्यासक्रम कसा असावा याची दृष्टी मिळाली, शिकविण्याच्या पद्धती कशा असाव्यात, आधुनिक काळात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा द्यायला पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर कसे असावे, प्रशासन कसे असावे, परीक्षा पद्धत कशी असावी याबद्दल एक दृष्टी आली. विद्यार्थ्यांचा पाठिंबापण महत्वाचा असतो. विद्यार्थ्यांच्या आकांक्षा काय आहेत, त्या कशा पूर्ण करायच्या हा ही महत्वाचा विषय या दौर्‍यात समजला. कारण या व्यवस्थेतला विद्यार्थी हा एक महत्वाचा घटक असतो. नॅक कमिटीच्या अपेक्षा समजून घेऊन त्यावर अभ्यास करून निर्णय घेतले. नियोजन केले. या काळात UGC ने पण स्वायत्तता दिली. तसेच पुणे विद्यपीठा कडून २०१४ ला बेस्ट कॉलेज आवर्ड म्हणून गौरव झाला.

यानंतर सरांनी २०१७ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून साडेचार वर्षे पदभार सांभाळला. MES मध्ये जे चांगलं काम केलं, त्याची ही पोचपावती मिळाली असे सरांना वाटते. कॉमर्स चा पहिला प्र-कुलगुरू होण्याचा मान सरांना मिळाला. ही नियुक्ती म्हणजे पत्नी महानंदा आणि मी- आमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण हाच होता, असे सर म्हणतात.

कोविड काळ सर्वांनाच काहीतरी शिकवून गेला. विद्यापीठही त्याला अपवाद नव्हते. उपचारांसाठी प्रारंभी रोग्याची चाचणी ही मोठीच समस्या होती. आवश्यक ती यंत्रणा उभी करून कोविड टेस्टिंग प्रयोगशाळा उभी केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठातील टेक्नॉलॉजी विभागाने व्हेंटीलेटर निर्मितीसुद्धा केली. सर्व्हे घेतले, या काळात जागृती निर्माण केली, शिक्षणाशिवाय अशी विधायक कामे सुद्धा विद्यापीठाने या काळात केली. प्रशासन, कर्मचारी, प्राध्यापक आणि त्यांच्यावरील कामाचा ताण, विद्यार्थ्यांसकट सर्वांच्या वाढलेल्या अपेक्षा विचारात घेऊन आत्मियतेने त्यावर तोडगा काढावा लागतो. समस्या कालही होत्या, आजही असणारच”. संवादावर सरांचा भर असतो. “कुलगुरू आणि मी असे दोघांनी मिळून विद्यापीठ आपले एक कुटुंब आहे अशा नात्याने एकत्र सांभाळले, त्याचे खूप समाधान वाटते”. असे सर म्हणतात.

जाता जाता त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण चांगलं असल्याच सांगितले. पुणे विद्यापीठाचे मोठे नाव आहे. संविधानिक मूल्ये जोपासण्यासाठी, लोकशाही अधिकाधिक बलशाली करण्यासाठी, तसेच ज्ञान निर्मितीद्वारे संपत्ती निर्माण करण्यासाठी उच्चशिक्षणाचा पसारा भरभक्कम असणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या सक्रिय आर्थिक सहभागाशिवाय उच्च शिक्षणाची आव्हाने पेलणे अशक्य आहे असेही ते म्हणाले.

सरांना ट्रेकिंगची आवड आहे. २००५ पासून आजपर्यन्त नियमितपणे दर रविवारी सर सिंहगड चढतात. त्यांचे महाराष्ट्रातील सर्व महत्वाचे किल्ले चढून झाले आहेत. मार्च २०२३मध्ये भूतानमधला टायगर नेस्ट ट्रेक त्यांनी केला. ट्रेकमुळे आपण ताजे तवाने होतो, कुठलाही ताण येत नाही, आत्मविश्वास वाढतो, व्यायाम होतो, स्ट्रेस टेस्ट आपोआपच होते आपली ! तर ग्रामीण साहित्य सरांना वाचायला आवडते. मराठीत व्यंकटेश माडगूळकर आणि इंग्रजीत आर. के. नारायण हे त्यांचे आवडते साहित्यिक. प्रामाणिकपणा आणि योग्य दिशेने कष्ट करत राहणं हा मंत्र सर सर्वांना देतात.

शैक्षणिक क्षेत्रात सर्वांना सामावून घेणारे, सामाजिक भान ठेवणारे, नेहमीच सर्वांना उत्तमोत्तम कामाची प्रेरणा देणारे, प्रगती करण्याची उर्मी देणारे नेतृत्व असेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे. बा.भ. बोरकरांची कविता ‘लावण्य रेखा’ याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे |
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे |

देखणी ती पाऊले जी, ध्यासपंथे चालती |
वाळ्वंटातूनीसुध्दा, स्वस्तिपद्मे रेखिती |

अध्यापनाचा ध्यास घेऊन त्याच मार्गावर यशस्वीपणे चालत राहिलेले उमराणी सर या महिन्यात लौकीकार्थाने निवृत्त होत आहेत. पण त्यांचा सामाजिक कामाचा ध्यास त्यांना निवृत्त होऊ देणार नाही. म्हणूनच पुढच्या योजलेल्या कामासाठी सरांना अनेक शुभेच्छा !(ही मुलाखत 29 मे 23 ला ई-विवेक व साप्ताहिक विवेक मध्ये प्रसिद्ध झाली.)

लेखन- डॉ. नयना कासखेडीकर, पुणे .

------------------------------

Monday, 15 May 2023

स्वामी विवेकानंद,एक महान यात्रिक,विचार – पुष्प, भाग ६८

 

उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार – पुष्प, भाग ६८

 स्वामी विवेकानंद,एक महान यात्रिक


       रामकृष्ण मिशन चे काम सुरू झाले. स्वामीजिंचा प्रवास, भेटीगाठी, काम वाढवण्याच्या दृष्टीने सुरूच होता. भारतात भारतीय शिष्य आणि परदेशी शिष्य काम करत होतेच. पण परदेशातील शिष्य यांच्याशी पण पत्रव्यवहाराने संपर्क होत होता. सतत मार्गदर्शन चालू होते, काश्मीर, पंजाब, खेतडी, नैनिताल, कलकत्ता, आल्मोरा, अमरनाथ, मायावती, पूर्व बंगाल असं सगळीकडे संचार झाला. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा दीड वर्षे ते पाश्चात्य देशांचा प्रवास करून परतले. बेलूर मठात पोहोचल्यावर मन प्रसन्न झाले. एक दिवस विश्रांती झाल्यानंतर एकेक वृत्तान्त कळू लागला. आपल्या कार्यासाठी ज्यांनी स्वतच्या देशाचा त्याग केला आणी आपल्या हिमालयासारख्या दुर्गम भागात राहून मोठ्या कष्टाने अद्वैत आश्रम उभा केला. आपले एक स्वप्न साकार केले ते सेव्हियर पती पत्नीने. त्यातले स्वत: सेव्हियर कार्य करता करताच निधन पावले, तर गुडविन आधीच गेले होते. या दोन इंग्रज शिष्यांनी भारतमातेच्या चरणी आपली जीवनपुष्पे वाहिली, याचे स्वामीजींना दु:ख झाले. मिसेस सेव्हियर मायावतीला होत्या, त्यांचे ताबडतोब सांत्वन करायला गेले पहिजे आणि तशी तार त्यांनी मिसेस सेव्हियर यांना केली. प्रकृती ठीक नसतानाही स्वामीजी प्रतिकूल हवामान व परिस्थितीत ,गैरसोयीचा प्रवास असतानाही ते शिष्यांबरोबर गेले.   

मदतीशिवाय त्यांना चालणेही कठीण झाले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला,  त्यावर बरोबर असलेल्या  विरजानंदाना ते म्हणाले, “पहा मी किती दुबळा आहे जणू वृद्ध होऊन गेलो आहे. हे एव्हढेसे चालायचे आहे तेही मला बिकट वाटते आहे, पूर्वी पर्वत प्रदेशात २५- २५ मैल चालायलाही काही वाटायचे नाही. माझ्या आयुष्याचा शेवट जवळ येत चालला आहे हेच खरं”. ते ऐकून विरजानंद मनातून हादरून गेले. मिसेस सेव्हियरना भेटणे आपले कर्तव्य आहे म्हणून हा खडतर प्रवास ते करत होते.मिसेस सेव्हियर ने आपले दु:ख बाजूला ठेऊन स्वामीजींचे स्वागत केले. पतीच्या निधनाचे दु:ख मोठे असतानाही आपण घेतलेले व्रत चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले, मायावतीला स्वामीजी पंधरा दिवस राहिले. सेव्हियर पती पत्नी ने  इथे अद्वैत आश्रमाचे काम मार्गी लावले होते. इथल्या वास्तव्यात अनेकजण स्वामीजींना भेटायला येऊन गेले. मायावती हून स्वामीजी कलकत्त्याला निघाले, बेलूर मठात आल्यावर आणखी एक धक्कादायक वृत्त समजले ते म्हणजे खेतडीचे राजा अजित सिंग यांचे अपघाती निधन झाले. या अकस्मात दुर्घटनेमुळे स्वामीजीना मोठा धक्का बसला. राजा अजित सिंग हा त्यांचा मोठा आधार होता.

     बेलूरला आल्यावर मठाच्या व्यवस्थेतील काही कायदेशीर पूर्तता आणि विश्वस्त मंडळ करून घेतले. ब्रह्मानंद ,शिवानंद, प्रेमानंद, सारदानंद, अखंडानंद, त्रिगुणातीतानंद, रामकृष्णानंद, अद्वैतानंद, सुबोधानंद, अभेदानंद, आणि तुरियानंद यांचे विश्वस्त मंडळ करून त्यांच्यावर कारभार सोपवला, यात त्यांनी एकही पाश्चात्य शिष्य घेतला नाही, ते दुरदृष्टीने कायदेशीर गुंतागुंत होऊ नये म्हणून. ६ फेब्रुवारीला रीतसर नोंदणी करण्यात आली. विवेकानंदांनी कोणतेही अधिकार पद स्वीकारले नाही. स्वत:च्या मालकीच्या जागेत रामकृष्ण संघाचे काम आले. भारताच्या इतिहासात एक नवे पान उघडले गेले होते, स्वामीजींनि पाहिलेले स्वप्न साकार झाले होते. फेब्रुवारीत रामकृष्ण परमहंस यांचं जन्मदिन बेलूर मठात साजरा झाला तेंव्हाही स्वामीजीना खूप समाधान वाटले.

   त्यानानंतर त्यांनी पूर्व बंगालचा प्रवास आखला आणि आई भुवनेश्वरी देविंची इच्छा पण पूर्ण करावी असे मनात होते. बंगालच्या या सुपुत्राने एकदा तरी आपल्या गावात यावे अशी तिथल्या लोकांची इच्छा होती. चंद्रनाथ आणि कामाख्यादेवी ही  तीर्थ क्षेत्रे भुवनेश्वरी देविंच्यासह स्वामिजिनी केली आणि आईसाठी काही केल्याचे समाधान त्यांना होते. या यात्रेत तिथल्या भेटी, स्वागत, आपल्या मुलाबद्दल लोकांचे प्रेम आणि आदर पाहून भुवनेश्वरी देविंना मनोमन समाधान वाटले. हाच तो आपला लहान बिले ना ? असे नक्की वाटले असेल.

पूर्व बंगाल आणि आसामचा हा प्रवास दोन महिन्यांचा झाला आणि स्वामीजींची प्रकृती आणखीनच ढासळली ,विश्रांती नाही, सतत कामाचा ताण यामुळे दम्याचा त्रास आणखीन बळावला .आपलं अखेरचा क्षण जवळ आला की के अशी शंका स्वामीजींच्या मनात डोकावली. प्रवासात ते अनेकांना पत्र लिहीत असत. अधून मधून जरा बारे वाटले की लगेच उत्साहाने पुढचे नियोजन करीत. एकदा त्यांचे शिष्य शरदचंद्र चक्रवर्ती भेटले तेंव्हा त्यांनी सहज प्रकृती बद्दल विचारले, तर स्वामीजी म्हणाले, “ अरे बाबा आता प्रकृतीची चौकशी कशाला करायची? प्रत्येक दिवशी शरीराचा व्यापार बिघडत चालला आहे. जे काही आयुष्याचे थोडे दिवस आता राहिले आहेत ते मी तुम्हा सर्वांसाठी काहीना काही करण्यात घालवेन आणि असा कार्यमग्न असतानाच एके दिवशी या जगाचा निरोप घेईन”.

'दुर्गापूजा उत्सव' बंगाल मधला महत्वाचा उत्सव, आता स्थिरावलेल्या बेलूर मठात दुर्गा पूजा व्हावी असे सगळ्यांच्याच मनात आले. स्वामीजींच्या अंगात बराच ताप होता. श्री दुर्गा प्रतिष्ठापना झाली होती. अष्टमीला मुख्य पूजेला स्वामीजी कसेबसे आले. नवमीला थोडे बरे वाटले तेंव्हा देवीसमोर त्यांनी काही भजने म्हटली. श्रीरामकृष्ण यांची आवडती भजने त्यांनी गायली. हे पाहून भुवनेश्वरी देवींना बरे वाटले. बरोबर केलेल्या  तीर्थयात्रेपासूनच त्यांना माहिती होते की आपल्या मुलाची प्रकृती अलीकडे ठीक नसते. त्याला भेटायला त्या मधून मधून मठात येत असत. आल्यावर बाहेरूनच ‘बिले..’ अशी हाक मारत आणि विश्वविख्यात बिले, संन्यासीपुत्र नरेन आईची हाक आल्यावर भरभर खाली येइ. दोघांच्या गप्पा होत. मग त्या परत जात.  

एकदा नरेंद्र लहान असताना आजारी पडला, तेंव्हा तो बरा व्हावा म्हणून बोललेला देवीचा नवस आपल्याकडून पूर्ण करायचा राहिला हे अनेक वर्षानी लक्षात आले. तेंव्हा आता कालीमातेला जाऊन, विशेष पूजा करून मुलाला तुझ्यासमोर लोळण घ्यायला सांगेन असा तो, आता पूर्ण करायला हवा. आईची इच्छा पूर्ण करायची म्हणून विवेकानंद बरे नसतानाही गंगेत स्नान करून कालिघाटावर ओल्या वस्त्रानिशी मंदिरात गेले. पूजा केली, तीन वेळा  लोळण घेतली, गाभाऱ्याला सात प्रदक्षिणा घातल्या. विधिपूर्वक होम हवन केले. आईला खूप समाधान झाले आणि इतक्या वर्षानी नवस पूर्ण झाल्याचा आनंद पण.

साधारण २८ जून चा दिवस, शुद्धानंदाना विवेकानंद यांनी पंचांग घेऊन बोलावले आणि ते चाळून, तिथी पाहून ठेऊन घेतले. नंतर ची ४,५, दिवस रोज ते पंचांग चाळायचे आणि स्वत:शीच काही विचार करायचे ,बाकी सर्व रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते. १ जुलैला विवेकानंद, मठाच्या बाहेर हिरवळीवर फेऱ्या मारत होते. त्यावेळी प्रेमानंदाना एका  जागेकडे बोट दाखवून म्हणाले, “माझ्या मृत्यूनंतर या ठिकाणी माझे दहन करा”. अंत्यसंस्काराचा एव्हढा स्पष्ट उल्लेख केलेला कोणाच्याच लक्षात आला नाही.

२ जुलै बुधवार – एकादशी, विवेकानंदांनी शास्त्रोक्त पद्धतीने उपवास केला होता. त्या दिवशी भगिनी निवेदिता बेलूर मठात स्वामीजींना भेटण्यास आल्या होत्या. त्यांच्यासाठी काही पदार्थ विवेकानंदांनी मागवले, हात धुण्यासाठी निवेदिता उठल्या तेंव्हा स्वामीजींनी त्यांच्या हातावर स्वत पाणी घातले, एक पंचा घेऊन हात पुसले. हे पाहून निवेदिता खजील झाल्या. त्या म्हणाल्या, "स्वामीजी हे मी तुमच्यासाठी करायचे तर तुम्हीच..?" स्वामीजी म्हणाले,  का? जिझसने तर आपल्या शिष्यांच्या पायांवर पाणी घातले होते ना? . पण ती त्यांची अखेरची वेळ होती असे निवेदिता म्हणणार पण आवंढा गिळला. कदाचित ही शेवटची वेळ..?ही खरचच दोघांची अखेरची भेट ठरली .

४ जुलैचा दिवस उजाडला. शुक्रवार, नेहमीपेक्षा स्वामीजी लवकर उठले. ध्यानसाठी देवघरात गेले. दारे खिडक्या बंद केल्या. तीन तास एकटे खोलीत होते. त्यानंतर दार उघडून बाहेर येताना कालिमातेचे गीत गुणगुणत बाहेर आले.श्री रामकृष्ण यांच्या प्रतिमेसमोर बसून इतका वेळ ध्यान मग्न झालेले विवेकानंद स्वतच्याच नादात मुग्ध असे बाहेर येऊन फेऱ्या मारू लागले ,इतरत्र कुठेही लक्ष नव्हते. सकाळी पण अतिशय प्रसन्नपणे हसत खेळत सर्वांच्या बरोबर अल्पोपहार घेतला होता . आणि आज आपल्याला उत्साह वाटतोय असेही म्हणाले होते. दुपारच्या जेवणानंतर तीन तास संस्कृत व्याकरणाचा वर्ग त्यांनी घेतला. दुपारनंतर प्रेमानंदांच्या बरोबर बेलूर मध्ये तीन किलोमीटर लांब पर्यन्त फेरफटका मारून आले.आल्यावर संन्यासांशी गप्पा झाल्या.

आल्यावर खोलीत जाऊन आपली जपमाळ मागवून घेतली, तासभर जप झाला. मग अंथरुणावर आडवे झाले उकडते आहे म्हणून थोडा वारा घालण्यास शिष्याला सांगितले.थोडे तळपाय चोळले तर बरे वाटेल म्हणून तेही शिष्याने चोळले. डाव्या कुशीवर वळलेले, हातात जपमाळ तशीच, पाठोपाठ दोन वेळ दीर्घ श्वास घेतला. नंतर काही हालचाल नाही. नऊ वाजले होते, जेवणाची घंटा वाजली. जवळचा शिष्य घाबरत घाबरत खाली आला. प्रेमानंद आणि निश्चयानंद वर धावत आले. रामकृष्ण यांचे नाव घेतले तर ही दीर्घ समाधी उतरेल स्वामीजींची, असे वाटले, पण नाही, डॉक्टर महेंद्रनाथ मजुमदार यांना बोलावले गेले. मध्यरात्री पर्यन्त बरेच प्रयत्न केले. प्राणज्योत मालवली आहे हे डॉक्टरांचे शब्द ऐकून सारा बेलूर मठच दु:खाच्या छायेत गेला.

स्वामीजींचे वय यावेळी ३९ वर्ष, ५ महीने, आणि २४ दिवस इतके होते. सगळीकडे वाऱ्या सारखी बातमी गेली. भारतात, परदेशात तारा  गेल्या. बेलूर मठाकडे चारी दिशांनी दर्शनासाठी लोंढे येऊ लागले. भुवनेश्वरी देवी पण आल्या. त्यांचा अवखळ बिले अवखळपणेच साऱ्या जगात फिरून येऊन आता शांतपणे पहुडला होता. भले जगासाठी तो कीर्तीवंत असला, तरी या जन्मदात्रीचा तो पुत्र होता. पुत्रवियोगाने तिच्या हृदयाला किती घरे पडले असतील? शब्दच नाहीत.   

बिल्व वृक्षाची जागा प्रेमानंदाना विवेकानंद यांनी ४,५ दिवसांपूर्वीच दाखवली होती. तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या या महान, असामान्य, अलौकिक सुपुत्राची ही जीवनयात्रा. (मालिका समाप्त)

-       © डॉ. नयना कासखेडीकर

------------------------------------- 

रामकृष्ण संघाची स्थापना,विचार – पुष्प, भाग ६७

 

उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार – पुष्प, भाग ६७

रामकृष्ण संघाची स्थापना

      स्वामी विवेकानंद कलकत्त्यात होते, बंगालमध्ये उत्साहाचे वातावरण होते, योगायोगाने श्रीरामकृष्णांचा जन्मदिवस ७ मार्च ला होता. पश्चिमेकडून विवेकानंद नुकतेच आल्यामुळे हा दिवस मोठ्या प्रमाणात दक्षिणेश्वरच्या कालीमंदिरात साजरा करण्यात आला, प्रचंड गर्दी. गुरुबंधु बरोबर विवेकानंद कालीमातेचे दर्शन घेऊन  श्रीरामकृष्णांच्या खोलीकडे वळले, ते ११ वर्षानी या खोलीत पाऊल ठेवत होते. मनात विचारांचा कल्लोळ होता. १६ वर्षांपूर्वी येथे प्रथम आल्यापासून ते आज पर्यन्त गुरु श्रीरामकृष्णांबरोबर चे दिवस, घडलेल्या अनेक घटना, प्रसंग आणि मिळालेली प्रेरणा-ते, हिंदू धर्माची पताका जगात फडकवून मायदेशी परतलेला नरेंद्र आज त्याच खोलीत उभा होता. त्यांच्या डोळ्यांसमोरून या कालावधीचा चित्रपटच सरकून गेला.

   या वास्तव्यात विवेकानंद यांना अनेकजण भेटायला येत होते. काही जण फक्त दर्शन घ्यायला येत. काहीजण प्रश्न विचारात, काही संवाद साधत. तर कोणी त्यांचा तत्वज्ञानावरचा अधिकार पारखून घ्यायला येत. एव्हढे सगळे घडत होते मात्र स्वामी विवेकानंद यांना आता खूप शीण झाला होता. थकले होते ते.परदेशातील अखंडपणे चाललेले काम आणि प्रवास ,धावपळ, तर भारतात आल्यावरही आगमनाचे सोहळे, भेटी, आनंद लोकांशी सतत बोलणे यामुळे स्वामीजींची प्रकृती थोडी ढासळली . त्याचा परिणाम म्हणजे मधुमेय विकार जडला. आता त्यांचे सर्व पुढचे कार्यक्रम रद्द केले. आणि केवळ विश्रांति साठी दार्जिलिंग येथे वास्तव्य झाले.   

 त्यांना खरे तर विश्रांतीची गरज होती पण डोळ्यासमोरचे ध्येय गप्प बसू देत नव्हते. कडक पथ्यपाणी सांभाळले, शारीरिक विश्रांति मिळाली, पण मेंदूला विश्रांति नव्हतीच, त्यांच्या डोळ्यासमोर ठरवलेले नव्या स्वरूपाचे प्रचंड काम कोणावर सोपवून देणे शक्य नव्हते.

   मात्र हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात साग, देवदारचे सुमारे दीडशे फुट उंचीचे वृक्ष, खोल दर्‍या, समोर दिसणारी बर्फाच्छादित २५ हजारांहून अधिक उंचीच्या डोंगरांची रांग, २८ हजार फुटांपेक्षा जास्त ऊंच असलेले कांचनगंगा शिखर, वातावरणातील नीरव शांतता, क्षणाक्षणाला बदलणारी आकाशातली लाल निळ्या जांभळ्या रंगांची उधळण, अशा मन उल्हसित आणि प्रसन्न करणार्‍या निसर्गाच्या सान्निध्यात स्वामीजी राहिल्यामुळे त्यांना मन:शान्ती मिळाली, आनंद मिळाला, बदल ही पण एक विश्रांतीच होती. एरव्ही पण आपण सामान्यपणे, “फार विचार करू नकोस, शांत रहा”, असे वाक्य एखाद्या त्रासलेल्याला समजवताना नेहमी म्हणतो. पण ही मनातल्या विचारांची प्रक्रिया थांबवणे शक्य नसते. शिवाय स्वामीजींसारख्या एखाद्या ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तिला कुणीही थांबवू शकत नाही. त्यात स्वामीजींचे कार्य अजून कार्यान्वित व्हायचे होते. त्याचे चिंतन करण्यात त्यांनी मागची अनेक वर्षे घालवली होती. आता ते काम उभे करण्याची वेळ आली होती.

    संस्था! एक नवी संस्था, ब्रम्हानंद आणि इतर दोन गुरुबंधु यांच्या बरोबर स्वामीजी संबंधीत विचार करून तपशील ठरवण्याच्या कामी लागले होते. येथे दार्जिलिंगच्या वास्तव्यात आपल्या संस्थेचे स्वरूप कसे असावे याचा आराखडा केला गेला. युगप्रवर्तक विवेकानंदांना आजच्या काळाला सुसंगत ठरणारी सेवाभावी, ज्ञानतत्पर, समाजहित वर्धक, शिस्त आणि अनुशासन असणारी अशी संन्याशांची संस्था नव्हे, ऑर्गनायझेशन बांधायची होती. त्याची योजना व विचार सतत त्यांच्या डोक्यात होते. ही एक क्रांतीच होती, कारण भारताला संन्यासाची हजारो वर्षांची परंपरा होती. आध्यात्मिक जीवनाचे आणि सर्वसंगपरित्याग करणार्‍या संन्याशाचे स्वरूप विवेकानंद यांना बदलून टाकायचे होते.

     दार्जिलिंगहून १ मे १८९७ रोजी स्वामीजी कलकत्त्याला आले. तेथे त्यांनी श्रीरामकृष्णांचे संन्यासी शिष्य आणि गृहस्थाश्रमी भक्त यांची बैठक बोलवून संस्था उभी करण्याचा विचार सांगितला. पाश्चात्य देशातील संस्थांची माहिती व रचना सांगितली. आपण सर्व ज्यांच्या प्रेरणेने हे काम करीत आहोत त्या श्रीरामकृष्णांचे नाव संस्थेला असावे असा विचार मांडला. श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधीला दहा वर्षे होऊन गेली होती. या काम करणार्‍या संस्थेचे नाव रामकृष्ण मिशन असे ठेवावे, आपण सारे याचे अनुयायी आहोत. हा त्यांचा विचार एकमताने सर्वांनी संमत केला.

     पुढे संस्थेचे उद्दिष्ट्य, ध्येयधोरण ठरविण्यात आले.आवश्यक ते ठराव करण्यात आले, श्री रामकृष्णांनी आपल्या जीवनात ज्या मूल्यांचे आचरण केले, आणि मानव जातीच्या भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणचा जो मार्ग दाखविला त्याचा प्रसार करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय निश्चित करण्यात आले. संस्थेचे ध्येय व कार्यपद्धती आणि व्याप्ती निश्चित केल्यावर पदाधिकारी निवडण्यात आले. विवेकानंद,रामकृष्ण संघाचे पहिले अध्यक्ष निवडले गेले.आध्यात्मिक पायावर उभी असलेली एवभावी आणस्था म्हणून १९०९ मध्ये रीतसर कायद्याने नोंदणी केली गेली. विश्वस्त मंडळ स्थापन झाले. खूप काम वाढले, शाखा वाढल्या, शिक्षण, रुग्णसेवा ही कामे वाढली, १२ वर्षे काळ लोटला. आता थोडी रचना बदलण्यात आली. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी ती रामकृष्ण मठ आणि सेवाकार्य करणारी ती संस्था रामकृष्ण मिशन अशी विभागणी झाली. या कामात तरुण संन्याशी बघून अनेक तरुण या कामाकडे आकर्षित होत होते, पण अजूनही तरुण कार्यकर्ते संन्यासी कामात येणे आवश्यक होते. नवे तरुण स्वामीजी घडवत होते. या संस्थेतील संन्याशाचा धर्म, आचरण, दिनचर्या, नियम, ध्यान धारणा, व्यायाम,शास्त्र ग्रंथाचे वाचन, त्या ग्रंथाचे रोज परीक्षण समाजवून सांगणे, तंबाखू किंवा कुठलाही मादक पदार्थ मठात आणू नये. अशा नियमांची सूची व बंधने घालण्यात आली. त्या शिवाय प्रार्थना, वर्षिक उत्सव, विविध कार्यक्रमांची योजना ,अशा सर्व नियमांची आजही काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते.     

स्वामी विवेकानंद यांच्या या संस्थेचे बोधवाक्य होते || आत्मनो मोक्षार्थ जगद्धिताय च ||

आज शंभर वर्षे  आणि वर १४ वर्षे अशी ११४ वर्षे हे काम अखंडपणे सुरू आहे.  (क्रमश:)  

   -  डॉ.नयना कासखेडीकर  

---------------------------- 

Friday, 5 May 2023

विचार – पुष्प ,भाग ६६ याची देही याची डोळा ..

 

उत्तरार्ध 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार – पुष्प ,भाग ६६

याची देही याची डोळा ..


 भारतभूमीवर पाऊल ठेवले आणि स्वामीजींचे स्वागत सोहोळे व स्वामीजींना भेटायला
, पाहायला येणार्‍यांची ही गर्दी या वातावरणाने सारा प्रदेश भारून गेला होता. २७ जानेवारीला स्वामीजी जाफन्याहून पांबन येथे आले. ते रामनाद संस्थानमध्ये उतरले. संस्थांनचे राजे भास्कर सेतुपती स्वत: स्वामीजींना सन्मानपूर्वक घेऊन आले.आल्या आल्याच स्वामीजींना त्यांनी व सर्व अधिकार्‍यानी साष्टांग नमस्कार केला. खास शामियान्यात औपचारिक स्वागत झालं.विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेला शिकागोला जावे म्हणून प्रयत्न करणार्‍यात राजे भास्कर सेतुपती होते. स्वागत समारंभा ठिकाणी घोडा गाडीने नेण्यात येत असताना लगेचच गाडीचे घोडे काढून लोकांनी स्वता ती गाडी ओढली आणि एव्हढेच काय स्वत: राजे सुद्धा गाडी ओढण्यात सहभागी झाले होते. स्वामीजींबद्दल एव्हढा आदर सर्वांनी दाखवला. एका संस्थांनाचा अधिपति एका संन्याश्याची गाडी ओढत होता हे दृश्य प्राचीन परंपरेची आठवण करून देत होते.

पांबन नंतर ते रामेश्वरला गेले. स्वामीजी स्वागताला उत्तर देण्यासाठी भाषणकर्ते झाले. त्यांच्या इंग्रजी भाषणाचे तमिळ भाषेत रूपांतर करून उपस्थितांना सांगण्यात येत होते. सर्वश्रेष्ठ धर्मपुरुषाचा सन्मान मंदिरातील पुजारी व व्यवस्थापक यांनी केला. सजवलेले ऊंट, हत्ती, घोडे असलेली मिरवणूक काढून रामेश्वर मंदिरापर्यन्त नेण्यात आली. इथल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “केवळ मूर्तिपूजा करण्यापेक्षा दरिद्री माणसाला दोन घास अन्न आणि अंग झाकण्यासाठी वस्त्र देणे हाच खरा धर्म आहे”.

    रामेश्वर नंतर रामनाद च्या सीमेवर जोरदार स्वागत करण्यात आले. स्वामीजींच्या आगमनार्थ तोफांची सलामी दिली, भुईनळे आतषबाजी केली, 'हर हर महादेव' च्या प्रचंड घोषणा देण्यात आल्या. रामनाद चे राजे स्वता स्वामीजींच्या गाडी समोर पायी चालत होते, पुढे पुढे तर स्वामीजींना घोडागाडीतून ऊतरवून, सजवलेल्या पालखीत बसविण्यात आले, भाषणे झाली, नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या करंडकातून स्वामिजींना मानपत्र अर्पण केले गेले. सत्कारादाखल उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, “प्रदीर्घ कालावधीची रात्र संपत आहे, अत्यंत क्लेशकारक दु:ख मावळू लागले आहे, मृतप्राय वाटणार्‍या शरीरात नवी चेतना जागी होत आहे, जाग्या होणार्‍या या भारताला आता कोणी रोखू शकणार नाही, तो पुन्हा निद्रित होणार नाही, बाहेरची कोणतीही शक्ति त्याला मागे खेचू शकणार नाही. अमर्याद सामर्थ्य असणारी ही भारतभूमी आपल्या पायांवर ताठ उभी राहत आहे”. केवळ या सुरुवातीच्या स्वागतासाठी उत्साहाने जमलेल्या स्वदेशातील बांधवांकडे बघून स्वामीजींना एव्हढा विश्वास वाटला होता. आणि आपला देश आता पुढे स्वत:च्या बळावर ताठपणे उभा राहील अशी खात्री त्यांना वाटली होती. एका निष्कांचन संन्याशाचा उत्स्फूर्तपणे होणारा गौरव ही स्वामीजींच्या जगातील कामाची पावती होती.

     रामनाद सोडल्यानंतर स्वामी विवेकानंद मद्रासच्या दिशेने रवाना झाले. आतापर्यंत छोट्या छोट्या शहरात व गावातील उत्साह आणि आनंद एव्हढा होता, आता तर मद्रास सारख्या मोठ्या शहरात मोठ्या लोकवस्तीच्या ठिकाणी भव्य सोहळे होणार होते. रामनाद, परमपुडी, मानमदुराई,मीनाक्षी मंदिरचे मदुराई, तंजावर असे करत स्वामीजी कुंभकोणमला आले.कुम्भकोणम नंतरच्या एका रेल्वे स्थानकावर गाडी थांबणार नव्हती तिथेही लोक स्वामीजींना बघायला आणि एकदा तरी त्यांचे दर्शन घ्यायला प्रचंड प्रमाणात जमले होते. गाडी थांबणार नाही असे दिसताचा लोक रेल्वे रुळांवर आडवे झाले आणि गाडी थांबवावी लागली तेंव्हा स्वामीजी डब्यातून बाहेर येऊन शेकडो लोकांनी  केलेले स्वागत स्वीकारले, छोटेसे भाषण केले. त्यांच्याप्रती आदर दाखवला.

        कुंभकोणमहून स्वामीजी मद्रासला आले. हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामीजींनी अमेरिकेला जावे यासाठी मद्रास मध्ये खूप प्रयत्न केले गेले होते. त्यामुळे पाश्चात्य देशात उदंड किर्ति मिळवून वेदांतचा प्रचार करून आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्वागताची तयारी खूप आधीपासून केली होती, एक स्वागत समिति स्थापन करण्यात आली होती. पद्धतशीरपणे  नियोजन केले गेले होते. वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध केले गेले. स्वामीजींच्या धडक स्वागत समारंभाची  वृत्ते प्रसिद्ध होत होती. त्यांनी पाश्चात्य देशात केलेल्या कामांवर अग्रलेख लिहिले गेले. विविध शाळा, संस्था, महाविद्यालये बाजारपेठा सार्वजनिक ठिकाणे येथे स्वामीजींना बोलावण्याचा धडाका सुरू होता. मद्रासमध्ये रस्ते, विविध १७ ठिकाणी कमानी, फलक, पताका यांची सजावट असे उत्सवी वातावरण होते. एगमोर स्थानकावर उतरल्यावर (६ फेब्रुवारी १८९७)  स्वागत समितीने स्वागत केले. घोष पथकाने स्वागतपर धून वाजविली. मिरवणूक काढण्यात आली. दुतर्फा लोक जमले होते, मोठ्या संख्येने स्त्रिया, मुले, प्रौढ, असे सर्व सामान्य नागरिक ते सर्व क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित होती.

स्वामीजींचा मद्रासमध्ये ९ दिवस मुक्काम होता. अनेक कार्यक्रम झाले. वेगवेगळ्या भाषेतील २४ मानपत्रे त्यांना देण्यात आली. खेतडीचे राजा अजितसिंग यांनी मुन्शी जगमोहनलाल यांच्याबरोबर स्वागत पत्र पाठवले होते. कोणी स्वागतपर संस्कृत मध्ये कविता लिहून सादर केली.

७ फेब्रुवारीला मद्रास मध्ये विक्टोरिया हॉल मध्ये मद्रास शहराच्या वतीने स्वामीजींचा मोठा सत्कार समारंभ झाला. जवळ जवळ दहा हजार लोक उपस्थित होते. असे सत्कार स्वामीजींनी याची देही याची डोळा अनुभवले, लोकांचे प्रेम आणि असलेला आदर अनुभवला. पण मनात, शिकागो ल जाण्यापूर्वी आणि शिकागो मध्ये गेल्यावर सुद्धा ब्राम्हो समाज आणि थिओसोफिकल सोसायटीने जो विरोध केला होता, असत्य प्रचार केला होता, वृत्तपत्रातून लेख, अग्रलेख यातून स्वामीजींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे शल्य होतेच, त्याचे तरंग आता मनात उमटणे साहजिकच होते. यातील काही अपप्रचाराला उत्तर देण्याची खर तर संधी आता मिळाली होती आणि ती संधी स्वामीजींनी घेतली सुद्धा. त्यांनी भाषण करताना अनेक खुलासे केले. धर्म नाकारणार्‍या समाज सुधारकांचा परखड परामर्श घेतला. भारताचे पुनरुत्थान घडवायचे असेल तर त्याचा मूळ आधार धर्म असायला हवा असे विवेकानंद यांना वाटत होते. भारतातील सुधारणावाद्यांचा भर सतत धर्मावर आणि भारतीय संस्कृतीवर केवळ टीका करण्यावर होता ते स्वामीजींना अजिबात मान्य नव्हते. मद्रासला त्यांची या वेळी चार  महत्वपूर्ण प्रकट व्याख्याने झाली. एका व्याख्यानात त्यांनी म्हटले की, “आम्हाला असा धर्म हवा आहे की, जो माणूस तयार करील, आम्हाला असे विचार हवे आहेत की, जो माणूस उभा करतील”.

स्वामीजींचे मद्रासला आल्यावर जसे जोरदार स्वागत झाले तसे ते नऊ दिवसांनी परत जाताना त्यांचा निरोप समारंभसुद्धा जोरदार झाला. इथून ते कलकत्त्याला गेले. स्वामीजींचे मन केव्हढे आनंदी झाले असणार आपल्या जन्मगावी परतताना, याची कल्पना आपण करू शकतो. बंगालचा हा सुपुत्र त्रिखंडात किर्ति संपादन करून येत होता.                  

     कलकत्त्याला स्वागतासाठी एक समिति नेमली होती, अनेक जण ही धावपळ करत होते. कलकत्त्यातील सियालदाह रेल्वे स्थानकावर स्वागतासाठी वीस हजार लोक जमा झाले होते. फलाट माणसांनी फुलून गेला होता. त्यांच्या बरोबर काही गुरु बंधु, संन्यासी, गुडविन, सेव्हियर पती पत्नी, अलासिंगा पेरूमल, नरसिंहाचार्य या सगळ्यांचे स्वागत केले गेले. सनई चौघड्याच्या निनादात आणि जयजयकारांच्या घोषणेत स्वामीजींचे पुष्प हार घालून स्वागत केले गेले. यावेळी परदेशातून सुद्धा अनेक मान्यवरांनी गौरवपर पत्रे पाठवली, त्याचे ही वाचन झाले व सर्वांना ती वाटण्यात आली. केवळ चौतीस वर्षाच्या युवकाने आपल्या कर्तृत्वाची असामान्य छाप उमटवली होती, त्याने बंगाली माणसाची मान अभिमानाने उंचावली होती. रिपन महाविद्यालय, बागबझार,काशीपूरचे उद्यान गृह, आलम बझार मठ, जिथे गुरूंचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प सारदा देवींसमोर सहा वर्षापूर्वी नरेंद्रने सोडला होता तिथे पाय ठेवताच आपण दिलेले वचन पुरे केले याचे समाधान स्वामीजींना वाटले, येथे रामकृष्णांनंद आणि अखंडांनंद यांनी दाराताच आपल्या नरेन चे स्वागत केले. पुजाघरात जाऊन श्रीरामकृष्णांना नरेन ने कृतार्थ होऊन अत्यंत नम्रतेने नमस्कार केला. नरेन ने ठाकूरांना नमस्कार केला तो क्षण गुरुबंधुना पण धन्य करून गेला. आता पुढच्या कार्याची आखणी व दिशा ठरणार होती. (क्रमश:) 

                    

-              -  डॉ.नयना कासखेडीकर   

----------------------------

Sunday, 30 April 2023

विचार – पुष्प ,भाग ६५,मातृभूमीचे पहिले दर्शन

                                                                             उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार – पुष्प ,भाग ६५

मातृभूमीचे पहिले दर्शन

  जहाजाने इंग्लंड सोडले आणि मातृभूमीच्या परतीचा प्रवास सुरू झाला. मनात अनेक स्वप्न बाळगुनच. इतकी वर्षे भारताबाहेरचे प्रगत देश पाहिलेपाश्चात्य संस्कृती अनुभवली, तिथले लोकजीवन पाहिलेत्यांचे सामर्थ्य आणि ऐश्वर्य पाहिले. तिथल्या लोकांचे त्यांच्या धर्माबद्दलचे विचार ऐकले, समजून घेतले, तिथला सुधारलेला समाज जवळून अनुभवला. वेळोवेळी आपला भारत देश आणि त्याच्या आठवणीने त्यांचे मन भरून यायचे. मनात तुलना व्हायचीच, आपल्या देशातले अज्ञान, काही रूढीपरंपरा, दारिद्र्य आठवले की मन दु:खी व्हायचे. पण आपल्या मातृभूमीचा वारसा, अध्यात्म, धर्म, विचार या बद्दल मात्र आदर वाटायचा आणि गौरवाने मान ताठ व्हायची.

   पण बाहेरच्या देशात त्यांना ख्रिस्त धर्म व त्याची शिकवणूक हे आणखी स्पष्ट अनुभवायला मिळत होतं. आता इंग्लंडहून निघून ते फ्रांसला उतरले होते. ख्रिस्त धर्म प्रसाराचा आरंभ जिथे झाला त्या इटलीत . ऐतिहासिक रोमन साम्राज्य आणि तिथल्या परंपरा, जगद्विख्यात चित्रकार लिओ नार्दो द व्हिंची च्या कलाकृती, पिसा चा झुकता मनोरा, उद्याने वस्तु संग्रहालये पाहण्याचा त्यांनी आनंद घेतला आणि काय आश्चर्य तिथे उद्यानात अचानक हेल पतिपत्नीची भेट झाली . दोघेही सुखावले. अमेरिकेत उतरल्यावर प्रथम ज्यांनी घरात आश्रय दिला होता त्यांची ही जणू निरोपाचीच भेट असावी.

     रोमचा इतिहास त्यांनी अभ्यासला होताच. युरोपातले रोम आणि भारतातले दिल्ली ही शहरे मानव जातीच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेली शहरे होत असे विवेकानंदांना वाटत असे.  त्यामुळे रोम मधील सौंदर्य आणि इतिहासाच्या खाणाखुणा सर्व पाहताना ते चटकन संदर्भ लावू शकत होते.संन्यासी असले तरी ते स्वत: कलाकार होते, रसिक होते म्हणून तिथल्या सौंदर्याचे दर्शन घेताना ते आनंदी होत होते.  योगायोगाने ख्रिस्त जन्माच्या दिवशी विवेकानंद रोम मध्ये होते. मेरीच्या कडेवरील बालरूपातील ख्रिस्त आणि आमच्या हिंदू धर्मातील बाळकृष्ण यात विवेकानंदांना साम्य वाटले. आणि मेरीचा मातृरूप म्हणून आदर पण वाटला. आई मेरी आणि बाळ येशू यांच्या विषयी भक्तीभाव मनात तरळून गेला. हेल पती पत्नी विवेकानंदांबरोबर इथे आठवडा भर होती. आणि ही साम्यस्थळांची वर्णने स्वामीजींकडून ऐकून ते दोघे भारावून गेले होते.विवेकानंदांच्या मनात सर्व धर्मांबद्दल आदरभाव होता तो त्यांच्या भाषणातून सगळ्यांनी अनुभवला होता. तरीही काही प्रसंग असे घडत ,की हिंदू धर्माबद्दल गरळ ओकणारे विवेकानंदांना भेटत, याच प्रवासात दोन ख्रिस्त धर्म प्रचारक जहाजावर होते. विवेकानंद त्यांच्याशी अर्थात हिंदू धर्म आणि ख्रिस्त धर्म यांची तुलना आणि श्रेष्ठत्व यावर बोलत होते. विवेकानंद यांच्यापुढे आपला टिकाव लागत नाही असे लक्षात आल्याने ते दोघे आता हिंदू देवदेवता आणि आचार विचार यांची टवाळी करण्यावर आले. स्वामीजींनी या निंदेकडे बराच वेळ दुर्लक्ष केलं.पण आता सहनशक्तीचा अंत झाला आणि स्वामीजींनी एकाची कॉलर पकडून, जवळ जवळ दरडाऊनच दम भरला की आता माझ्या धर्माबद्दल पुढे काही बोललात तर धरून समुद्रात फेकून देईन. त्यामुळे त्या धर्म प्रचारकांचे तोंड गप्प झाले. स्वामीजींना उदार मनोवृत्ती मुळे आपल्या धर्मा बद्दल कोणीही काहीही बोलेल ते आपण ऐकून घ्यायचे मुळीच पटत नव्हते. त्यात त्यांना दौर्बल्य तर वाटायचेच पण, पाश्चात्य देशातील लोकांना धर्मा धर्मातील भेद बाजूला सारून एकाच विश्वधर्माशी पोहोचावे असा विचार त्यांनी दिला होता आणि भारतात मात्र ख्रित धर्म प्रचारकांच्या प्रचारला बळी पडून अनेक हिंदू धर्मांतर करत होते, तर सुशिक्षित समाज याकडे दुर्लक्ष करत होता हे त्यांना अजिबात आवडले नव्हते.

    अशा अनेक गोष्टींना, प्रसंगांना विवेकानंद आपल्या भ्रमण यात्रेत सामोरे जात होते. “नरेन एक दिवस सारं जग हलवेल” असा त्यांच्या गुरूंचा रामकृष्णांचा शब्द खरा करून दाखवलेला हा नरेंद्र सहा वर्षांपूर्वी शारदा देविंचा आशीर्वाद घेऊन निघाला होता तो आता विश्व विजेता होऊन भारतात परतत होता. त्यामुळे त्यांच्या गुरुबंधूंना कोण आनंद झाला असेल ना? स्वामींनी सर्वधर्म परिषदेला शिकागो येथे जाण्यासाठी सर्वांनी कष्ट घेतले होते.ते सर्वजण खूप आनंदले होते. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी चालू होती. विवेकानंद सुद्धा  मातृभूमीला भेटायला उत्सुक होते. हा विचारच त्यांच्या अंगावर रोमांच उभे करत होता. भारताच्या आत्म्याला जाग आणण्यासाठी पुढे प्रयत्न करून हिमालयात अद्वैताश्रम उभा करायचे स्वप्न आणि योजना त्यांचे मन आखत होते. पंधरा जानेवारी चा सूर्योदय पहिला तो श्रीलंकेच्या किनार्‍यावरचा अर्थात तेंव्हाच्या सिलोन चा. जहाज पुढे पुढे जात होते तसतसे किनार्‍यावरीला नारळीच्या बागा दिसू लागल्या. कोलंबो बंदर लागले. भारताचे दर्शन झाल्याने स्वामीजींच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव होतेच. आता उतरल्यावर आपल्या बरोबर आलेले तीन पाश्चात्य सह प्रवासी म्हणजेच पाश्चात्य शिष्य यांची उतरल्यावर राहण्याची सोय करायची हाच विचार त्यांच्या डोक्यात होता.

   कोलंबो बंदरात जहाज थांबले आणि एक नाव घेऊन स्वामीजींना उतरवायला गुरु बंधु निरंजनानंद आणि काही प्रतिष्ठित नागरिक आले. विवेकानंद, सेव्हियर पती पत्नी, आणि गुडविन यांना त्या नावेतून किनार्‍यापर्यंत आणले. प्रचंड जमलेल्या जन समुदायाच्या साक्षीने पी कुमारस्वामी यांनी भला मोठा पुष्पहार घालून स्वामीजींचे स्वागत केले आणि सजवलेल्या घोडा गाडीत चौघांना बसवून त्यांची स्वागताप्रीत्यर्थ मिरवणूक सुरू झाली, हे सर्व अनपेक्षित होतंप्रचंड जल्लोषात स्वामी विवेकानंद यांचे पहिले स्वागत भारतात करण्यात आले.

    रस्त्यावरून जाताना नयनरम्य स्वागत सोहळा अनुभवत होते स्वामीजी,आणि विशेषत त्यांचे पाश्चात्य शिष्य. सुशोभित भव्य कमानी, स्वागत करणारे भव्य फलक, रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या पताका, घरांवर केलेली  सजावटप्रकांड, मंडप, व्यासपीठ, मस्तकावर होणारी पुष्पवृष्टी, मंगल वाद्यांचे स्वर, तमिळ व संस्कृत मध्ये म्हटले जाणारे मंत्र, नागरिकांनी लिहिलेले मानपत्र अहाहा केवढा तो आनंदी सोहळा होता. हा सोहळा उत्स्फूर्तपणे ,प्रेमापोटी होत होता. त्यात उच्च पदस्थापासून सर्व सामान्य लोकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. एखाद्या धनाढ्याचा प्रायोजित मॅनेज केलेला स्वागत सोहळा नव्हता, तो निष्कांचन असलेल्या एका सन्याशाच्या स्वागताचा सोहळा होता. या संस्कृतीमधून विवेकानंद यांना भारतीय आत्म्याचा एक सुंदर आविष्कार दिसला होता. यात ते आपल्या महान संस्कृतीचे वैशिष्ठ्य अनुभवत होते आणि ते जतन केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. इथेच सुरू झाली होती त्यांची गौरवयात्रा.

     ही तर सुरुवात होती भारतातल्या स्वागताची. छत्री,अबदागिरी, पताका, निशाणे, वाद्ये, मंत्र पठण, या सर्व पारंपारिक प्रकारांचा समावेश या स्वागतात केला गेला होता. जणू भगवान शिवाचा अवतार म्हणूनच विवेकानंद यांची पुजा केली होती. हा सर्व आश्चर्यकारक स्वागत सोहळा स्वत: गुड्विन यांनी पत्राने बुल यांना कळवला होता आणि म्हटले होते की, स्वामी विवेकानंद यांच्या बरोबर सेव्हीयर पतिपत्नी आणि मी, आम्हा तिघांच्याही वाट्याला हे जिव्हाळा असलेले स्वागत/सन्मान आले.

     त्यानंतर त्यांनी श्रीलंकेतले प्राचीन मोठे शहर अनुराधापुरम, जाफना इथे भेट दिली. २००० लोकांपुढे त्यांचे व्याख्यान झाले. सार्वजनिक सत्कार, मानपत्र३ किलोमीटर लांब रस्त्यावर केळीचे खांब दुतर्फा लावून सुशोभित केलेले. शेकडो लोकांची मशाली हातात घेऊन विवेकानंदांना आणण्यासाठी निघलेली मिरवणूक, त्यात पंधरा हजार लोकांचा सहभाग,आणि आसपासच्या लहान मोठ्या गावातून विवेकानंदांना पहाण्यासाठी अमाप उत्साहात आलेले लोक. त्यात गौरवपर झालेली भाषणे, विवेकानंद यांचे व्याख्यान आणि लोकाग्रहास्तव झालेले सेव्हीयर यांचे भाषण. हे सगळं कशाच द्योतक होतं? हा तर स्वामी विवेकानंद यांच्या बद्दलचा व्यक्त झालेला आदरभाव होता. त्यांच्या कामाची पावती होती. आता सुरू होणार होता पुढचा प्रवास ...(क्रमश:)

-            -      डॉ.नयना कासखेडीकर   

---------------------

  

Friday, 21 April 2023

विल्यम शेक्सपिअर आणि जागतिक पुस्तक दिन

 



विल्यम शेक्सपिअर आणि जागतिक पुस्तक दिन

                                           

२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा होतो. जगातल्या लेखकांचा व पुस्तकांचा सन्मान करणे आणि लोकांमध्ये वाचनाची सवय वाढीस लावणे हा उद्देश असतो.आपणही कुसुमाग्रजांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सजरा करतो तसाच, जगातील ख्यातकीर्त इंग्रजी कवी, नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा हा जन्म दिवस जगात पुस्तक दिन म्हणून साजरा होतो. हा दिवस सर्वप्रथम युनेस्कोने जाहीर केला. विशेष म्हणजे २३ एप्रिल हा शेक्सपिअर यांचा जन्म दिवस आणि मृत्यू दिवस पण आहे. (२३ एप्रिल, १५६४–२३ एप्रिल १६१६)

      नाट्यतंत्राचा कसून केलेला अभ्यास, अनुभव, अल्पावधीत नाट्य क्षेत्रात मिळालेले व्यावसायिक यश यामुळे शेक्सपिअर यांना ‘फादर ऑफ ड्रामा’ असेही म्हटले जाते. शेक्सपीअर १५९० ते १६१२ या काळात अखंड पणे नाटके लिहीत होता. त्यांच्या नाटकांचे विषय असत ऐतिहासिक, शोकात्मिका,सुखांतिका आणि सुख दुखाचे मिश्रण असणारे रोमान्स.१५९२ ते १५९४ या काळात प्लेगमुळे नाट्यगृहे बंद होती. या काळात विल्यम यांनी सुंदर काव्य निर्मिती केली. १५९४ मध्ये नाट्यगृहे पुन्हा चालू झाली तेंव्हा किंग्ज मेन नाट्य मंडळीमध्ये शेक्सपिअर झळकला. १५९४ ते १६०३ या काळात त्याने दर वर्षाला दोन नाटके लिहिली. इथून सुरू झाले त्यांचे वैभवचे दिवस.

     अशा जगप्रसिद्ध विल्यम शेक्सपिअर ची मराठी माणसाने आठवण काढलीच पाहिजे. कारण मराठी भाषेत शेक्सपिअर यांची अनेक नाटके आहेत. तीही अत्यंत गाजलेली. अनेक साहित्यिकांनी त्यांच्या नाटकांचा व साहित्याचा अनुवाद मराठीत केला आहे. तो तितकाच मराठी प्रेक्षकांना भावला आहे. अगदी ‘हॅम्लेट’ या नाटकाचं मराठीत गोपाळ गणेश आगरकर, गोविंद कानिटकर, आनंद बर्वे, नाना जोग, भा. द. खेर, परशुराम देशपांडे, नानासाहेब फाटक, सई परांजपे, प्रभाकर देशपांडे, वि.वा.शिरवाडकर(गगनभेदी ) यांनी हॅम्लेट मराठीत अनुवादीत केलाय. कवि मंगेश पाडगावकरांनी रोमिओ अँड जूलिएट केला. वीर वामनराव जोशी यांनी मेझर फॉर मेझर (संगीत झोटिंगशाही), मॅकबेथचा अनुवाद वि वा शिरवाडकर, शि. म. परांजपे, यांनी केला आहे आणि आपल्या सर्वांच्या ओळखीचे वि.वा. शिरवाडकरांचे गाजलेले ,आम्हा प्रेक्षकांनी अत्यंत गौरविलेले ‘नटसम्राट’ याची मराठीत ९ लेखकांनी भाषांतरे केली आहेत.

   To be? or not to be? that is the question

जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या
पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं ?
का फेकुन द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये?
आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने? ....


   हे अप्पासाहेब बेलवरकरांचे नटसम्राट मधील स्वगत, मराठी नाट्य रसिक प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून आहे. ‘नटसम्राट’ हे विल्यम शेक्सपिअर यांच्या कलाकृतीवरून प्रेरणा घेऊन लिहिलेले नाटक. आजही अनेक दशकानंतर या नाटकाचे नावीन्य तसेच आहे आणि ते तसेच टिकून राहील. विल्यम शेक्सपियर यांच्या नाट्य पंढरीचा स्वताला वारकरी समजणारे कुसुमाग्रज यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. मानवी जीवनाचा सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, आणि वैयक्तिक असा धांडोळा घेतला तर जे जे काही मनुष्य स्वभावाचे कंगोरे, उदा. कट -कारस्थाने, विश्वासघात, सत्यता, असत्य, अहंकार, मत्सर आणि लोभ, प्रेमातला संघर्ष,आणि जीवनमूल्ये रंगभूमीवर मांडून ती जगात सगळीकडे सारखीच आहेत हे सिद्ध झालं, ते शेक्सपिअर यांच्या साहित्यामुळेच. म्हणूनच जगातल्या जवळ जवळ सर्वच भाषेत त्यांचे साहित्य भाषांतरित झाले आहे आणि अमर झाले आहे.

   ऑथेल्लो हेही एक नाटक महादेवशास्त्री कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल. वि वा शिरवडकर यांनी अनुवाद केलेलं आहे. त्यांच्या नाटकनवरून ‘हॅम्लेट’, ‘अंगूर’ (हिन्दी) ‘मकबुल’ हिन्दी (मॅक बेथ वर आधारित) आणि ‘ओमकारा’(ऑथेल्लो वर आधारित) हे चित्रपट निघाले आहेत. अंगूर सिनेमा आपण सर्वांनीच पाहिला आहे. हा विनोदी चित्रपट १९८२ मध्ये प्रकाशित झाला. गुलजार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. याची कथा विल्यम शेक्सपिअर च्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकाची आहे. आज हा चित्रपट सर्वश्रेष्ठ विनोदी चित्रपट म्हणून नावाजला जातो.

                                                    

     शेक्सपिअर ची काव्ये आणि नाटके हे दोन साहित्य प्रकार अजरामर झाले आहेत. त्यांचे विशेष काव्य प्रकार म्हणजे सुनीत लिहिली (sonnets १४ ओळींची कविता) शिवाय दीर्घकाव्ये सुद्धा. त्यांनी ३८ नाटके, १५४ सुनीते, दीर्घ कविता, स्फुट कविता असे लेखन केले. शेक्सपिअर ची सुनीत-माला इंग्रजी साहित्यातला बहुमोल अलंकार मानला जातो.

    परभणीचे प्रभाकर देशपांडे तर शेक्सपिअर च्या नाटकाने झपाटलेलेच होते. त्यांनी तर शेक्सपियर यांच्या नाटकांचे अनुवाद केलेले पाच खंडच लिहिले आहेत. त्यात ७ शोकांतिका, ७ सुखांतिका, ७ नाटके, ८ ऐतिहासिक नाटके आणि इतर १५ नाटके असे पाच खंडात लिखाण केले आहे. हे खंड विशेष म्हणजे जागतिक ग्रंथ दिनी म्हणजे २३ एप्रिललाच २०१५ मध्ये प्रकाशित केले गेले. वाईचे गणेश ढवळीकर यांनीही शेक्सपिअरची, मर्चंट ऑफ व्हेनिस, सिंबेलाईन, ऑगस्टस सीझर, मॅकबेथ, हॅम्लेट, लिअर राजा, रोमिओ अँड जूलिएट , टेंपेस्ट ही नाटके कथारूपात मराठीत अनुवादीत केली आहेत.

    विल्यम शेक्सपिअर यांच्या साहित्याने सर्व जगालाच भुरळ पडलेली दिसते. याचा इतका प्रभाव होता की शेक्सपीअर यांच्या साहित्याची सूक्ष्म समीक्षा केली गेली. त्यांनी नाटकातून उभे केलेली पात्रे,काव्ये, प्रतीके, त्यांनी वाप्रलेले शब्द, वृत्त,राज्यशास्त्र, वैद्यक शास्त्र, ज्योतिष, नाट्य शास्त्र, संगीत या सगळ्या विषईंचे ज्ञान यांचा पण अभ्यास केला गेला. शेक्स पियर नाटककार म्हणून मोठा की कवि म्हणून मोठा यावे चर्चा झडल्या, त्यांच्या नाटकातील पात्रांची सूची तयार केली गेली,नाटकातील प्रसंग .घडामोडी आणि व्यक्ति प्रत्यक्षात होऊन गेल्या होत्या का याचा ही शोध घेतला गेला.

    जगातल्या मुख्य भाषा सोडाच पण मराठी सारख्या प्रादेशिक भाषेत पण त्यांच्या साहित्याला स्थान दिल्याचे दिसते. म्हणूनच त्यांच्या जीवनावरील, नाटकांवरील, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या काळातील इंग्रजी रंगभूमी वर अभ्यास झालेला दिसतो. मग ती शोकनाटये, सुखांतिका, सुनीते, कथा, कविता, त्यांच्या नाटकातील सौंदर्य स्थळे, मराठी नाटक आणि शेक्सपिअर असा सर्वच विषयांचा लेखाजोखा आपल्या मराठी भाषेमध्ये मांडला गेला आहे.


स्ट्रॅटफर्ड-ऑन-अॅव्हन या शेक्सपीअर यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक आहे. अॅव्हन नदीच्या काठावर एक नाट्यगृह, ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय आहे. यात शेक्सपीअर यांच्यावरील दहा हजारांवरील दुर्मिळ पुस्तके ठेवली आहेत. हस्तलिखिते आहेत. मार्च ते ऑक्टोबर या काळात येथील नाट्यगृहात शेक्सपीअरची नाटके सादर केली जातात. जगाच्या पाठीवरचा हा नावाजलेला कवी आणि नाटककार २३ एप्रिल चा महानायक (हीरो) आहे. अभ्यासकांना आणि वाचकांना एक दिशा देणारे त्यांचे साहित्य आहे. वाचकांनी आपल्या मराठी भाषेतली त्यांची साहित्यकृती नक्की वाचावी, समजून घ्यावी.

(हा लेख काल प्रकाशित झालेल्या 'साहित्य परिमळ' या ई साहित्य पत्रिकेत प्रसिद्ध झाला.हा अंक वाचण्यासाठी लिंक -- https://online.flippingbook.com/view/898043842/ )

- - डॉ. नयना कासखेडीकर
                                                              ----------------------------



Monday, 17 April 2023

भाग –६४. मातृभूमिकडे प्रयाण

                                                                           उत्तरार्ध 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार - पुष्प - उत्तरार्ध

भाग –६४. मातृभूमिकडे प्रयाण

                                     

    स्वामी विवेकानंद शिकागो ला सर्व धर्म परिषदेला येण्यापूर्वी भारतात ते परिव्राजक म्हणून फिरले होते आणि आता अमेरिकेत सगळीकडे परिव्राजक म्हणूनच फिरत होते. पण दोन्ही कडचे परिव्राजकत्व खूप वेगळे होते. दोन्हीकडील लोक, शिक्षण, परंपरा, तत्वज्ञान, धर्म, अध्यात्म ,विचार व मूल्य ,आर्थिक परिस्थिति सगळच वेगळं. इथे वैयक्तिक भेटीतून त्यांनी तळागाळातील भारत समजून घेतला तसच, आता दीड वर्षापासून ते अमेरिकेत फिरत होते. तेथेही भेटी घेणे, विविध चर्चा,भाषणे, सार्वजनिक ठिकाणची व्याख्याने, तिकडच्या विद्वान लोकांच्या भेटी, नामवंतांशी झालेल्या चर्चा, यामुळे तिकडची संस्कृती, ते लोक याचा जवळून परिचय होत होता. अनेक कुटुंबे विवेकानंद यांच्याशी पर्यायाने हिंदू तत्वज्ञानशी जोडले गेले होते. तिथल्या वृत्तपत्रातून विवेकानंद यांच्या विषयी अनेक वर्णने छापून आल्यामुळे लोकांना त्यांचा परिचय व्हायचा. त्यांच्या भेटीनंतर आणि ओळख पटल्यानंतर पाश्चात्य संस्कृतीतल्या स्त्रिया सुद्धा विवेकानंद यांच्याकडे मातृभावाने बघू लागल्या होत्या. भारतात जसे त्यांचे शिष्यगण तयार झाले होते तसे आता अमेरिकेत सुद्धा लोकांचा यातला रस वाढू लागला होता.त्यातून अनेक शिष्य ही तयार झाले.

सुरूवातीला सर्व धर्म परिषदेपर्यंत त्यांना कोणी ओळखतही नव्हते, नंतर मात्र ते तेंव्हापासून आणि नंतरही विद्वानात सुद्धा चांगलेच परिचित झाले. एक मानाचे स्थान त्यांना प्राप्त झाले होते. सुरूवातीचे विषय सुद्धा हिंदू धर्माचे प्रतिनिधी याच नात्याने असत. खरा हिंदू धर्म समजून सांगणे, गैरसमज दूर करणे, हेच उद्दिष्ट्य त्यांनी ठेवलेले दिसते.

आता स्वामीजींनी अमेरिकेचा निरोप घेऊन पुढच्या कार्याला लागायचे ठरवले होते, अनेक जणांना पत्र लिहून निरोप दिला. पंधरा एप्रिलला न्यू यॉर्क हून लिव्हरपुल ला निघाले.  बरेच जण जहाजावर निरोप द्यायला आले होते. आधी भारतात अडीच वर्षे परिव्राजक म्हणून ते फिरले, तसे अमेरिकेत सुद्धा जवळ जवळ ते अडीच वर्षे फिरले. आता ते इथून इंग्लंड ला निघाले होते. एस.एस. जर्मनीक जहाजाने किनारा सोडून अमेरिकेचा भूप्रदेश दिसेनासा होईपर्यन्त ते बाहेर उभे होते. या अमेरिकेच्या भूमिने आपल्याला काय काय दिले याचा लेखा जोखा मांडत.         

  स्वामीजी इंग्लंड ला पोहोचले. इथे एक आनंदाचा प्रसंग स्वामीजींनी अनुभवला. तो म्हणजे, पाच वर्षांनंतर गुरुबंधू सारदानंद यांची इंग्लंड मध्ये भेट. भारतभ्रमण सुरू होताना ते भेटले त्यानंतर स्वामीजींना अमेरिकेतील वास्तव्यात आलेले अनुभव, मिळालेले यश आणि किर्ती हे सारे बघून सारदानंद केव्हढे आनंदी झाले असतील याची कल्पना आपण करू शकतो. स्वामीजींना खूप वर्षानी आपल्या मातृभाषेत बंगालीत बोलायला मिळाले याचाही आनंद होता. पत्रव्यवहार होत असला तरी अनेक गोष्टी आता प्रत्यक्षात एकमेकांशी बोलायला मिळत होत्या त्याचे एक समाधान होते दोघांना. ही भेट झाल्यानंतर स्वामीजींनी आपल्या सर्व गुरुबंधूंना उद्देशून सविस्तर पत्र लिहिले, त्यात मठातील दैनंदिन व्यवहार कसा असावा, त्याचे नियम काय असावेत, मी भारतात परत आल्यानंतर आपल्याला एक संस्था उभी करायची आहे ती कशी असेल, त्याचे ध्येय काय असेल, ती कशी चालवायची, याचे चिंतन होते. ही संस्था म्हणजेच रामकृष्ण मिशन ची तयारी होय. रामकृष्ण मिशन चे काम पुढे कसे वाढले आणि त्याचा प्रसार कसा झाला हे आज आपण रामकृष्ण मठ आणि मिशन चे कार्य बघितले की कळते.



       इंग्लंडला जशी सारदानंदांची भेट झाली तशीच अचानक स्वामीजींचे लहान भाऊ महेंद्रनाथ यांची पण अनपेक्षित भेट झाली, ही बंधुभेट फार फार महत्वाची होती, कारण संन्यास घेतल्यापासून नरेंद्र ने घर सोडले होते, त्यानंतरची घरातली परिस्थिति, आर्थिक विवंचना, त्यांच्या आईना झालेला अत्यंत क्लेश, आणि आलेले सर्व वाईट अनुभवांचे महेंद्रनाथ दत्त साक्षीदार होते. म्हणून अनेक स्थित्यंतरांनंतर ही दोन भावांची भेट याला महत्व होते. महेंद्रनाथ वकिलीचा अभ्यास करायला इंग्लंडला आले होते. महेंद्रनाथांनी लिहीलेल्या लंडने स्वामी विवेकानंद या पुस्तकात या बंधुभेटीचा वृत्तान्त लिहिला आहे, महेंद्रनाथ दत्त हे पुढे ग्रंथकार म्हणून ओळखले जाऊ लागले. नरेंद्रचे (स्वामीजींचे)सर्वात धाकटे भाऊ भुपेंद्रनाथ दत्त बंगाल मधील सशस्त्र क्रांतिकारक चळवळीत सहभागी झाले. युगांतर मासिकाचे ते संपादक होते. अमेरिकेत ते पी एच डी झाले. त्यांनीही अनेक ग्रंथ लिहिले. नंतर ते साम्यवादी विचारांचे खंदे कार्यकर्ते आले, स्वामीजींचे चरित्र पण त्यांनी लिहिले आहे आणि द्रष्टा देशभक्त म्हणून स्वामीजींची प्रतिमा त्यातून त्यांनी उभी केली आहे. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्त यांची तीन मुले, एक संन्यासी, एक ग्रंथकार, आणि एक साम्यवादी असे तीन दिशांनी कार्य करणारे कीर्तीवंत असे पुत्र होऊन गेले.

  लंडन मध्ये स्वामीजींनी वर्ग सुरु केला होता. तिथे सीसेम क्लब नुकताच वर्षभरापूर्वी स्थापन झाला होता. बुद्धिजीवी आणि विचारवंत स्त्रिया आणि पुरुष असा दोघांचा हा क्लब होता. शिक्षणाचा सर्वांगीण विचार असा त्याचा उद्देश होता. त्यात आठवड्यातून एक दिवस साहित्य विषयक चर्चा होत असे. ठरलेले वक्ते येऊ शकणार नव्हते म्हणून स्वामी विवेकानंद यांना व्याख्यानासाठी अचानक बोलवण्यात आले. तिथे त्यांनी मांडलेले विचार फार महत्वचे होते. शाळेत दिले जाणारे भौतिक विद्येच्या क्षेत्रातील शिक्षण शेवटपर्यंत थेट पोहोचले पाहिजे. कारण स्वामीजींच्या मते समाजातील अज्ञान दूर करण्याची ही पहिली पायरी होती. आणि मानवामध्ये सुप्त असलेले पूर्णत्व प्रकाशात आणणे ही शिक्षणाची फलश्रुति होती. धर्माईतकेच शिक्षणाला महत्व आहे आणि धर्माचा जसा व्यापार होता कामा नये तसाच,  शिक्षणाचा बाजार होता कामा नये, असा स्वामी विवेकानंद यांचा दृष्टीकोण होता. भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धती त्यांना आदर्श वाटत होती.

युरोप मध्ये प्रवास चालू होता, आता तर अभेदानंद हे गुरुबंधु पण स्वामिजिना भेटले. मूलर यांच्याकडे विवेकानंद राहत होते तिथे अभेदानंद आलेले पाहताच स्वामीजींना कोण आनंद झाला होता. जूनलाच  स्वामीजींचा भारतात निरोप गेला होता की “कालीला ताबडतोब पाठवून द्या”. मग काय? स्वामीजी आणि काली पुढचे पंधरा दिवस वेदान्त विचाराच्या प्रसाराचे कार्य आणि फक्त त्याचीच चर्चा, असे आनंदात दिवस गेले. अभेदानंद सर्व वेद ग्रंथ, शतपथ ब्राह्मण, काही सूत्र ग्रंथ, असे अनेक ग्रंथ घेऊन आले होते. ही सर्व पुढच्या कामाची तयारी होती. सार्‍या मानव जातीला एक नवी दिशा द्यायची आहे असे स्वप्न स्वामीजींनी बघितले होते. आता विवेकानंद यांचे परदेशातील वास्तव्य संपत आले होते. इंग्लंड मध्ये अभेदानंद आणि  अमेरिकेत सारदानंद पुढचे काम बघणार होते. स्वामी विवेकानंद आता आपल्या मातृभूमिकडे परत येणार होते, ते जवळ जवळ साडे तीन वर्षांनंतर, त्यांना निरोप द्यायला सगळे जमले होते. १६ डिसेंबर १८९६ रोजी स्वामीजींनी इंग्लंड चा किनारा सोडला. मातृभूमी त्यांना बोलवत होती. 

(क्रमश :) 

© डॉ.नयना कासखेडीकर    

                                             -------------------