Saturday, 21 June 2025

भाग ९ - अहिल्याबाईंचे महेश्वर

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

भाग ९  - अहिल्याबाईंचे महेश्वर

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)



मध्यप्रदेश मध्ये इंदूरपासून केवळ शहाण्णव किलोमिटर अंतरावर नर्मदेच्या तटावर वसलेले, महेश्वर म्हणजे होळकर राज्याची राजधानी. महेश्वर म्हणजे ‘भगवान शिवाचे घर’. महेश्वरचा किल्ला मुघल काळात बांधलेला होता, पण पेशव्यांकडून माळव्याची जहागिरी होळकरांना मिळाल्यानंतर मल्हाररावांनी किल्ल्यासकट वास्तु मंदिरे यांची डागडुजी करून नीट घडी बसवली. अहिल्याबाईनी पुढे आपल्या कारकिर्दीत १७६७ ते १७९५ या काळात महेश्वरचे रंग रूपच पालटले. महेश्वर एक संरक्षित शहर झाले. औरंगजेबाच्या काळात नष्ट केलेल्या हिंदू मंदिराचे अहिल्या बाईनी पुनर्निर्माण केले. इथे कालेश्वर, वृद्धकालेश्वर, केशव मंदिर, चतुर्भुजन मंदिर, बाणेश्वर, मातरगेश्वर,अशी काही मंदिरे दहाव्या शतकापासून अस्तित्वात होती.


सासरे मल्हारराव गेले, पुढे मुलगा मालेराव गेला. इंदूरच्या गादिला वारस नाही , बरोबर अनुभवी कोणी व्यक्ति नाही तरीही अहिल्याबाई डगमगल्या नाहीत. त्यानंतर माधवराव पेशवे यांनी अहिल्याबईना १७६७ साली अधिकृतपणे खासगी जहागिरीची अधिकारी बनवले. याच वेळी अहिल्याबाईनी आपली राजधानी इंदूरहून महेश्वर येथे हलवली. पुढचे सर्व आयुष्य त्यांनी महेश्वर या राजधानीतच घालविले.   

अहिल्याबाई यांनी खूप विचार विनिमय करून महेश्वर राजधानी म्हणून निवडले होते. याचे प्राचीन नाव महिष्मती. वायुपुराणातले महेश्वरपूर. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक सुंदर धार्मिक आणि व्यापरिक दृष्टीने महत्वपूर्ण शहर म्हणजे महेश्वर. इथल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार, प्रासाद, घाट यांची निर्मिती अहिल्याबईनी केली. इथला अहिल्या घाट म्हणजे सर्वात सुंदर असा घाट आहे. चारही दिशांना शिवाची लहान मोठी मंदिरे आहेत. ठिक ठिकाणी शिवलिंगे आहेत. याच्या पार्श्वभूमीवर होळकर राजवंशाची ऐतिहासिक खूण म्हणून असलेला महेश्वर किल्ला अहिल्याबाई होळकर घराण्याच्या कर्तृत्वाची साक्ष म्हणून दिमाखात उभा आहे.


या सर्वांवर अहिल्याबाईंचे बारकाईने लक्ष असे. आपले राजधानीचे शहर व त्यात राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी धर्मशाळ, नदीवर घाट, मंदिरे, रस्ते , पिण्याच्या पाण्यासाठी सोय म्हणून विहिरी व तलाव बांधले, तीर्थक्षेत्र च्या ठिकाणी प्रवासी, गोरगरीब, अपंग असहाय लोकांसाठी अन्नछत्र सुरू केले. त्यांना राहण्याची सोय केली.


                                 

त्यांचे आर्थिक नियोजन सुद्धा असे. आपल्या राज्यातल्या व्यापार वृद्धीसाठी अहिल्याबाई नेहमीच प्रोत्साहन देत असत. राज्याबाहेरच्या व्यापाऱ्याना सहाय्य म्हणून आपल्या राज्यात त्या व्यापारासाठी बोलावत. एकदा म्हैसूर राज्यात दुष्काळ पडला असताना हजारो जन मृत्युमुखी पडले. त्यातील शेंकडो विणकरांना अहिल्याबाईनी महेश्वर ला आणून जिवदान दिले, रोजगार दिल. आर्थिक सहाय्य केले. राहायला घरे दिली. माहेश्वरच्या किल्ल्यात हातमाग सुरू करून त्यात त्यांना कामावर ठेवले. त्या हातमागावर विणलेल्या साड्या लवकरच उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आल्या. प्रगती झाली.

महेश्वर ला आल्यावर महेश्वर किल्ल्यात त्यांनी विणकरांसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून दिली. तिथल्या सावकार व व्यापारी मंडळीना आदितवर व मंगळवार पेठची निर्मिती केली. विणकर लोकांचा व्यवसाय उभा राहीला. या विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विणलेले वस्त्र मोठ्या प्रमाणावर अहिल्याबाई स्वत: खरेदी करत. त्या स्वतासाठी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नतेवाईकांसाठी, घराण्यातील महिलांसाठी, पाहुणे मंडळींसाठी वा कुणी अचानक आलेल्या अतिथिना भेट म्हणून देण्यासाठी त्या खरेदी करत असत. हस्त कौशल्याच्या या महेश्वरी साड्यांची कीर्ती भारताबाहेर आहे. महेश्वर किल्ल्याच्या आत राजराजेशवर मंदिराच्या पुढे रेवा सोसायटी ही हातमाग करणाऱ्यांची संस्था म्हणून आज हस्त शिलपीचे काम उभे केले आहे. अहिल्याबाईनी दुष्काळाच्या काळात वेगवेगळ्या राज्यातल्या हैदराबाद, सूरत म्हैसूर इथल्या हातमाग कारागिराना महेश्वरला बोलावून काम दिले. त्यामुळे विणकरांची ही कारागिरी टिकली, कला टिकली, कारागीर टिकले. अजूनही हे काम महेश्वर येथे सुरू आहे.

रेवा सोसायटी हातमाग 

पाचव्या शतकापासून महेश्वर हे हातमागावरील वस्त्रासाठी विणकरांचे केंद्र होतेच. १९६४ साली अहिल्याबाईनी या वस्त्रोद्योगाला नवी ओळख दिली. नव्या सुविधा देऊन कर्नाटक, माळवा, गुजराथ, हैदराबाद येथून विणकरांना महेश्वरला बोलवून काम सुरू केले. सूती आणि सिल्क धाग्यानी जरी काठाच्या, विविध नक्षिच्या साड्या ही माहेश्वरची कायमची ओळख बनली. इथल्या इतिहासाची ओळख म्हणून अहिल्याबाईनी या साड्यांवर तिथल्या स्थापत्य कलेची नक्षी काढावी असे सांगितले होते. हीच खरी महेश्वरी साड्यांची ओळख आहे. पण अहिल्याबाईनी केलेल्या दूरदर्शी नियोजनामुळे आजही हे काम महेश्वर येथे सुरू आहे.

त्याच प्रमाणे छोटे छोटे ग्रामोद्योग सुद्धा निर्माण केले. त्यामुळे छोट्या व्यापऱ्याना बाजारपेठ मिळाली. त्यांचे जीवनमान सुधारले. यात काम करणारे सर्वच जाती धर्माचे कलाकार, विणकर, कारागीर कलात्मक वस्तु तयार करून विकू लागले. बांबू च्या वस्तु सुद्धा कारागीर उत्साहाने करू लागले. शेती साठी लागणाऱ्या वस्तु पण कारागीर तयार करत होते. सामाजिक विकासा बरोबरच आर्थिक विकासाची घडी नीट बसत होती.


                                                         

माळवा प्रांतात गोंड भिल्ल यांचा उपद्रव त्या काळात वाढत चालला होता . यात्रेकरू व्यापारी प्रवासी आणि प्रजेच्या लुटमारीच्या अनेक तक्रारी रोज येऊ लागल्या. दरोडे घालणे, रस्ते अडविणे, लूटमार चारही दिशांना सुरू होते, याला आळा घालण्यासाठी अहिल्याबाईनी युक्ति लढवली. आणि एक महत्वाची घोषणा केली. “जो कोणी आपल्या भागातील डाकू आणि चोर यांचे पारीपत्य करेल त्याच्या बरोबर माझी एकुलति एक मुलगी मुक्ता चा विवाह लावून देण्यात येईल”. आणि खरंच काय आश्चर्य यशवंतराव फणसे याने हा विडा उचलला आणि डाकू व चोरांचा बंदोबस्त केला. त्यामुळे अहिल्यादेवींनी खरचच दोघांचा विवाह लावून दिला. यशवंत फणसे त्यांचा जावई झाला. पुढे अहिल्याबाईंनी गोंड, भिल्ल यांना अभय देऊन त्यांना शेती, व्यापार आणि तीर्थयात्री यांचे रक्षण करण्याचे महत्वाचे काम सोपवले. उपजीविकेचे साधन नसल्याने. या जमाती असे कृत्य करत होत्या. दूषप्रवृत्तीचे परिवर्तन सत्प्रवृत्ती मध्ये झाले. हे एक समाज कल्याणच होते.

भारतातील विविध भागातील ब्राह्मण, विद्वान, ज्योतिष शास्त्री ,वेदशास्त्री, कीर्तनकार, कलाकार, विविध कारागीर यांना अहिल्याबईनी महेश्वरला बोलावून घेऊन तिथेच आश्रय दिला. सर्वाना काम दिले. यात आर्थिक घडी तर बसवलीच पण धार्मिक कृतीला महत्व देऊन हिंदू धर्माची पताका सतत फडफडत ठेवली. महेश्वरला राजधानी हलवण्यापूर्वीचे महेश्वर आणि नंतरचे महेश्वर यात आमूलाग्र बदल झाला. तो अहिल्याबाईंच्या अनेक निर्णयामुळेच. त्यांच्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत कधीच दुष्काळ पडला नाही कारण त्यांनी आर्थिक विकासाची घडीच तशी बसवली होती.अत्यंत धोरणाने. आदर्श राज्यकर्ता कसा असावा, त्याने काय व कसे काम करावे हे सर्व त्यांनी एका ग्रंथात लिहून ठेवले आहे ही मार्गदर्शक तत्वे त्यांनी धर्मशास्त्र विद्वानांकडून अहल्या कामधेनु हा आठ अध्यायांचा ग्रंथ लिहून त्यात सांगितली आहेत. राजाची कर्तव्ये काय हे त्यात सांगितले आहे. याचा अभ्यास आताच्या राज्यकर्त्या लोकानी नक्कीच करायला हवा. कारण ते अनुभवाचे बोल आहेत.

                 

मुक्ता व यशवंत राव फणसे यांची छत्री ,स्मारक 

  मुलगी मुक्ता व जावई फणसे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ आजच्या फणसे घाटावर एक छत्री तयार केली ही अहिल्याबाईनी केलेली शेवटची वास्तु निर्मिती. माहेश्वर नगरच्या गल्ल्या गल्ल्यात ,घराघरात, घाटांवर, किल्ल्यामध्ये, किल्ल्याबाहेर, बाजारपेठेत, मंदिरात, देवी अहिल्या प्रत्येकात स्मरणात आहेत. प्रत्येकाच्या तोंडी त्यांचेच नाव आहे. त्यांच्या बद्दल आदर आहे, त्या आपल्या कर्तृत्वाने तिथे अमर झाल्या आहेत. त्यांच्या सर्व आठवणी तिथले लोक आजही आत्मियतेने जपताना दिसतात.आज महेश्वर च्या ऐतिहासिक जागी अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ भव्य छत्री यशवंत राव होळकर यांनी बांधून इतिहास पुढच्या पिढीसाठी साक्षात समोर ठेवला आहे.

लेखन- डॉ. नयना कासखेडीकर,पुणे

----------------------------------------------      

 

भाग ८ - अहिल्याबाईंचे माहेर

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

भाग ८  - अहिल्याबाईंचे माहेर

 (जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)



चौंडी हे गाव २०२४-२५ या वर्षात शेकडो वर्षानंतर इतिहास जगविणारे तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. वर्षभर या गावात आदराने नाव घेणारे, अहिल्याबाईंची कामाची दखल घेणारे, त्यांना मानवंदना देणारे, या जन्मस्थळाला भेट देऊन त्यांच्या स्मृति जागवणारे, राजकीय दृष्ट्या स्मृतिस्थळ आणि विकास यांचा लेखाजोखा मांडून या चौंडीचा विचार करणारे अशा हजारो नागरिकांनी भेट दिली. नाहीतर या आधी महेश्वर, इंदोर या माळव्यातील गावांशी अहिल्यादेवींचे नाव जोडले होते. गेली अनेक वर्षेच काय वर्तमानातही लोकाना चौंडी माहिती नव्हते. आज अनेक महिला अभिवादन कार्यक्रमानिमित्त मात्र चौंडीला आल्या होत्या.प्रत्येकीच्या मनात कुतूहल होतं. काहीजणी तर अहिल्याबाई हे नाव आजच ऐकत होत्या. काहीना अहिल्याबाईनी एव्हढे काम केले आहे. ते कशा काळात, कशा परिस्थितीत ? याची आपल्याला आजच माहिती मिळते याचे आश्चर्य वाटत होते. खंत वाटत होती.

भारतभर हे वर्ष अहिल्यादेवींचे त्रिजन्मशताब्दी साजरे होत असताना मलाही याच दिवशी चौंडीला भेट देण्याचा योग आला. अहिल्यादेवी यांचे माहेर अर्थात जन्मगाव चौंडी. निजाम राजवटीमध्ये औरंगाबाद सुभ्यातल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात चौंडी गाव होते. अहमद निजामाच्या ताब्यात हे नगर होते त्यामुळे अहमदनगर असे त्याच्या नावानेच ओळखले जात होते.प्रदीर्घ काळ येथे दख्खनी मुस्लिम राजवट होती. मात्र स्वातंत्र्यानंतर ते निजामाचे राज्य जाऊन जामखेड तालुका अहमदनगर जिल्ह्यात आले. आणि आता या अहमदनगरला अहिल्याबाईंच्या माहेराला चौंडी च्या कन्येचा मान व आदर म्हणून अहिल्यानगर अशी ओळख मिळाली आहे आणि ही रास्तच आहे. अहिल्यादेवींचे चरित्र वाचल्यावर चौंडीला भेट दिल्यावर जाज्वल्य इतिहासाची साक्ष पटून अहिल्यादेवींचे कर्तृत्व आणि तो काळ आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.

चौंडी हे शहर आजच्या अहिल्यानगर पासून ८५ किलोमीटरवर तर, जामखेड पासून ३५ किलोमीटर वर वसलेले गाव. चौंडी च्य दक्षिणेला दक्षिण वाहिनी सीना नदी वाहते. अहिल्या बाईंचे वडील माणकोजी शिंदे (गावचे पाटील) यांचे हे गाव. याचे सुरुवातीच्या काळातले नाव मल्हारपीठ होते असेही सांगतात. सुशीलाबाई आणि माणकोजी शिंदे यांच्या पोटी जन्मलेले कन्यारत्न म्हणजे अहिल्या, जीने हिंदुस्तानात तब्बल २८ वर्षे तत्वाने, ज्ञानाने आणि न्यायाने आदर्श असे राज्य करून लोककल्याणकारी माता, पुण्यश्लोक राजमाता म्हणून जगभरात कीर्ती मिळवली.

माणकोजी शिंदे यांची गढी आज त्याच डौलात उभी आहे. जशी च्या तशी . अहिल्यादेवी यांच्या जन्म स्थळी चौंडी या गावी त्यांच्या कारकीर्दीचा इतिहास सांगणारी शिल्पसृष्टी उभी केली आहे. अहिल्येसह त्यांचे दोन भाऊ शहाजी आणि महादजी,तसेच आई सुशीलाबाई व वडील माणकोजी शिंदे यांची शिल्पे आपल्याशी बोलून जणू इतिहास सांगताहेत असेच वाटते. अहिल्येच्या जन्माने पावन झालेली खोली, व त्या बाहेर मल्हारराव होळकर, हरिहर बुक्क चंद्रगुप्त मौर्य यांची शिल्पे आहेत. लाकडी माळवदाचा चिरेबंदी पण ऐश्वर्यसंपन्न वाडा, माची, बुरूज, संरक्षक कठडे या सहित उभा आहे.इथे लक्षात येते की मल्हारराव होळकर अहिल्येचे सासरे असले तरी या तिच्या माहेरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाचे तेव्हढेच महत्व होते.

अहिल्याबाईंनी विकासाच्या यादीत आपल्या या जन्मगावालाही स्थान दिले आहे. त्यांनी २५० वर्षांपूर्वी इथल्या छोट्याशा सीना नदीवर रेखीव घाट बांधला होता तो अजूनही आपली ओळख कायम ठेऊन आहे. घाटावरच शिंदे आणि पाटलांच्या समाधी आहेत. शिलालेख आहेत. येथे चौंडेश्वरी ग्रामदेवता आणि महादेवाचे मंदिर आहे. याच मंदिरात ३०० वर्षापूर्वी छोटी अहिल्या वडील माणकोजी शिंदे यांच्या बरोबर महादेवाच्या पूजेला आली असताना पेशवे व मल्हारराव यांनी तिला पाहून होळकर घराण्याची सून म्हणून निश्चिती केली होती.

अहिल्याबाईंनी देशभरात मंदिरे घाट आणि बारव बांधल्या, त्यातलीच एक चौंडी पासून ८ किलोमिटर अंतरावर जवळा शिवारात शके १७०८ (उत्तरायण ,वैशाख शुद्ध शके १७०८ )मध्ये बारव बांधली होती. येथे असलेल्या शिलालेखात या पुरातन ऐतिहासिक बारव निर्माणचा उल्लेख आहे.५० बाय ५० फूट आकाराची चौकोनी बारव आतून अष्टकोनी आहे. यात मोटेने पाणी काढण्यासाठी सोय, खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.आत नंदकेश्वर शिवलिंग आहे. पाऊस पडला नाही तर याच बारवेत नंदकेश्वराची पूजा करून प्रार्थना केली जाते, ही परंपरा अजूनही सुरू आहे. बारवेच्या पश्चिमेला भैरवनाथाचे हेमाडपंथी मंदिर आहे, येथे दरवर्षी चैत्र अष्टमीला उत्सव साजरा केला जातो.

अलीकडे सीना नदीचे जलसंधारण कामात रुंदीकरण करण्यात आले. अहिल्यादेवींनी इथल्या मंदिरांचा पण जिर्णोद्धार केला होता. शेतकरी, कारागीर यांना अहिल्यादेवींनी माळवा प्रांतात जसे बळ दिले होते, त्या प्रमाणे इथल्या आताच्या परिस्थितीत इथला सांस्कृतिक विकास ,महेश्वर प्रमाणे कापड उद्योगास चालना जुने उत्सव व परंपरा यांनाही चालना मिळावी अशी रास्त अपेक्षा जनतेची आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात ऐतिहासिक गावातील शाळांचा विकास करण्याकरता,महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केला त्यात चौंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा समावेश आहे.

अशा या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे आता तीन एकर जागेत स्मृती स्तंभ बांधले आहे,मंदिराचा जिर्णोधार् करून त्यांच्या महेश्वर दरबाराची आठवण जागविणारी प्रतिकृति उभी केली आहे. अहिल्येच्या जन्मवेळच्या प्रसववेणा अनुभवलेला हा वाडा स्तब्ध तरी अभिमानाने आपल्याला साद घालतो. अशी ही अहिल्येच्या माहेरची वाट एकदा तरी जाऊन अनुभवावी .

© ले. डॉ. नयना कासखेडीकर, पुणे

------------------------------

भाग ७ - 'युद्धवीरांचा देव आणि अहिल्याबाई'

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

भाग ७  - 'युद्धवीरांचा देव आणि अहिल्याबाई'

 (जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)

                             

ही आहे होळकर राज्याची राज्यमुद्रा. द्वितीय तुकोजिराव होळकर यांच्या करकीर्दी पासून हा राज्याचा शिक्का म्हणून वापरण्यात येऊ लागला. या चिन्हामध्ये वर छत्री (राजछत्र) सूर्य, नंदी, घोडा, मध्यभागी भाला आणि रुंद पातीची तलवार,तर खाली गहू आणि अफुची रोपे अशी प्रतीके आहेत. होळकर घराण्यातील राजे शैवपंथी होते आणि खंडोबाचे उपासक होते. वीरपुरुष खंडोबाला शिवावतार मानतात.त्याने मल्लांचे  निर्दालन केले म्हणून त्याला मल्लारी असेही म्हणतात. पुढे त्याचेच मल्हारी झाले. दुसरे नाव मार्तंड (सूर्याचे नाव) आहे. असे हे मल्हारी मार्तंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे . तसेच होळकर घराण्याचेही कुलदैवत होते.  पुरातन काळापासून भारताची दक्षिण काशी असलेल्या जेजूरीचा हा मल्हारी मार्तंड शंकराचा अवतार समाजाला जातो. १३ व्या शतकात जेजूरी गड बांधल्याचा पुरावा तिथल्या शिलालेखात आढळतो.

 खंडोबाभक्त मल्हारराव होळकरांनी माळव्याची सुभेदारी मिळाल्यानंतर या गडाचे जीर्णोद्धाराचे काम केले. पोर्तुगीजांवर विजय मिळवून त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या घंटा, मल्हाररावांनी जेजूरीच्या खंडोबाला  दान केल्या. रंगमहाल, बालद्वारी, नगारखाना, दिपमाळा, वेशी, दगडी कमानी बांधले. पुढे धर्मनिष्ठ, दानशूर अहिल्याबाईंनी देशभरातल्या तीर्थस्थानी अनेक विकासकामे केली. त्याचप्रमाणे जेजूरी नगरीची जडण घडण केली. अहिल्यादेवी जेजूरीच्या विकासाच्या शिल्पकार समजल्या जातात. त्यांनी ऐतिहासिक होळकर तलाव, चिंचेची बाग, चिलावती कुंड, या वास्तूंची निर्मिती केली .१७७० मध्ये त्यांनी जेजूरी गडाला किल्ले सदृश तटबंदी बांधली. मंदिरासमोर दिपमाळा, अष्टकोनी टेहळणी बुरूज आहे. होळकर कुटुंबाने जेजूरी च्या खंडोबा देवस्थान साठी मुक्त हस्ताने दान केले आहे. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा सुरेख समन्वय अहिल्यादेवी यांनी साधला आहे.   

बारा ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, चारधाम आणि विविध पंथ आणि संप्रदाय या संगळ्यांसाठीच अहिल्याबाईनी विविध देणग्या देऊन सोयी व सुधारणा केल्या. तशा श्रीक्षेत्र जेजूरी येथे श्री मालखर गौतमेश्वर तालीमखाना, सरकारी वाद (दत्त पादुका व विहीर आहे) विठ्ठल राखुमाईचे मंदिर, किल्ला, श्री जनईचे कुरण, बाग, इमानी जमीन, मल्हार तलाव यांच्या व्यवस्था निर्माण केल्या. सगळयाना समान न्यायाने दान दिले.निरनिराळ्या तऱ्हेची मदत केली.

परकीयांच्या आक्रमणा आधी सर्व हिंदू राजे आपापल्या प्रांतातील तीर्थक्षेत्रांची काळजी घेत असत. त्यामुळे तीर्थक्षेत्रे ,विद्या संपन्न घराणे टिकून होते. परकीय आक्रमणानंतर हिंदू राज्येच विलयाला गेली. शेकडो वर्षे अशीच परिस्थिति राहिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लोककल्याणची आणि हिंदू संस्कृतीची संपन्न परंपरा पुन्हा अहिल्याबईनी भरतखंडात सुरू केली. होळकरांच्या राज्यात मंदीरे, धर्मशाळा, घाट ,जीर्णोद्धार यांची कामे, दुष्काळ किंवा सुकाळ असला तरी सतत सुरू राहत असत.त्यामुळेच भारत देशातील कारागीरांना सतत काम असे म्हणून ही कारागिरी व कौशल्य टिकून राहिलेले दिसते. विविध वास्तु व मंदिरांचे स्थापत्य शास्त्राचे नमुने सतत निर्माण होत राहिले. शिल्पकला टिकली व वाढीस लागली. अहिल्याबाईंचे तत्व  होते की, देवळांचा जीर्णोद्धार करणे म्हणजे आपयशाच्या खुणा धुवून टाकणे . त्यांची श्रद्धा अशी होती की हे राज्य आपण शंकराच्या आज्ञे वरुन चालवीत आहोत. म्हणून त्यांच्या पत्राच्या खाली सुद्धा त्यांची सही -- शंकर आज्ञेवरुन असे लिहीत. शंकरभक्त अहिल्यादेवी यांनी मृत्यूसमयी  ॐ नम: शिवाय ! हाच शब्द उच्चरला होता आणि अखेरच्या यात्रेला निघाल्या होत्या.

महाराष्ट्रातले हे खंडोबा कुल दैवत परंपरा होळकर घराण्याने इंदूरला नेली. हाच मराठी संस्कृतीचा माळव्यात प्रवेश होता. इंदोरच्या राजवाड्यात मल्हारी मार्तंडचे मंदिर आणि पूजा स्थान तयार केले गेले. आजही हे दैवत या राजवाड्यात विराजमान आहे. 

ले. डॉ. नयना कासखेडीकर,पुणे

----------------------------------------------

Sunday, 12 January 2025

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी भाग ६ - 'दानशूर अहिल्याबाई'

 

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी

भाग ६ - 'दानशूर अहिल्याबाई'

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)


अहिल्याबाईंनी राज्यकारभार हातात घेतल्यापासून म्हणजे इ. स. १७६७ ते १७९५ हा काळ संक्रमण अवस्थेचा होता.मुघली कारभाराची पद्धती विकृत झाली होती असा उल्लेख इतिहासात आहे. त्यामुळे मुघली करभाराला तोंड द्यायचे आणि आपली राज्यव्यवस्था अंमलात आणून ती वाढवायची व टिकवायची अशी दुहेरी जबाबदारी, त्या काळातील सुभेदारांवर पडली होती. पेशव्यांच्या बरोबर राहून मल्हारराव सुद्धा ही कामगिरी चोख करत होते. प्रांतात नवा जम बसवून त्यांनी तो अहिल्याबाईंच्या हाती सुपूर्द केला होता. अहिल्याबाईंनी तर आपल्या कामाने यावर कळसच चढवला.अहिल्याबाईंची कारकीर्द हा होळकर राजवटीचा सुवर्णकाळ होता असे म्हटले जाते.

‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’असा अहिल्याबाईंचा बाणा होता.राज्य कारभाराच्या अनुभवाप्रमाणेच मोठमोठाले ग्रंथ वाचून त्यावर चिंतन मनन सुद्धा असेलच.अभ्यास असेल. कारण त्यांच्या संग्रही असलेले ग्रंथ पाहिले की आपल्या धर्माबाबत त्या कशा उदार व विधायक वृत्तीच्या होत्या, धर्म आणि संस्कृती टिकविण्यात त्यांचा कसा सहभाग होता हे पटते, देवीचा संग्रह, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी पोथी, गीता, अणू वेदान्त, विष्णुसहस्त्र नाम, अमरकोष, पद्मपुराण, भागवत, सूर्यनमस्कार, श्रीसप्तशतीपाठ, श्री गणपती सहस्त्रनाम, श्री तुळशी प्रदक्षिणा,श्री अश्वत्थ प्रदक्षिणा, श्री अध्यात्म रामायण आणि इतर महत्वाचे ग्रंथ ही हस्तलिखिते त्यांच्या संग्रही होती.त्यांचं मोठं ग्रंथालय च होतं. होळकर राजघराणे हे सर्व सम आदराने करत असत. म्हणून संस्थानाबाहेर सुद्धा या क्षेत्रांचा आणि देवादिकांचा विचार होत असे.

राष्ट्राच्या म्हणजे प्रजाजनांच्या हिताचे निर्णय विशेषता आर्थिक सोय त्या आवर्जून करत. म्हणूनच त्या दानशूर धर्मकारिणी ठरल्या आहेत. इस्लामिक शासकांच्या काळात धुळीस मिळालेली अनेक हिंदू मंदिरे अहिल्याबाईंनी पुनःस्थापित केली. मुस्लिम आपली देवळे पाडतात तो त्यांचा धर्मांधपणा झाला,पण ही भग्न देवालये आपण नीट नाही केली तर आपली अस्मिता ती काय राहील? ती जपण्यासाठी देवालयांचा उद्धार करून मुस्लिमांना अनेक ठिकाणी समजाऊन सांगितले की बादशहाच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली आहे ,भाईचारा ठेवा, मी तुम्हास मशीद ही बांधून देते पण तुम्ही देवळांचा विध्वंस करू नका.दानधर्म करताना त्या भेदभाव करत नसत. श्रावणात फकीरांना सुद्धा सढळ हाताने दान देत आणि सांगत, “आम्ही आपल्या दर्ग्यास वर्षासने देतो, मंदिरांचा नाश करणाऱ्या आपल्या भावांना सांगा, धर्म वैर करायला शिकवीत नाही”. धर्म म्हणजे सन्मार्गावर ठेवणारे एक सूत्र. धर्म वैर करायला शिकवीत नाही ,बंधुभाव सांगतो. असे अहिल्याबाईंचे म्हणणे होते.

केवळ महेश्वरलाच ७० ते ८० मंदिरे जीर्णोद्धार केली व काही नवीन बांधली. महेश्वरच्या किल्ल्यावर वेदशास्त्र संपन्न पुजारी, याज्ञिकी, शास्त्री, महंत, कीर्तनकार, ज्योतिष शास्त्री अशांची किल्ल्यावर वस्ती करून त्यांची ही सोय लावली. नुसते देऊळ बांधून उपयोग नाही त्याकरता त्यानंतर त्याची पूजा, अर्चना व इतर व्यवस्था पण त्यांनी लावली होती.

प्रवास करणाऱ्या पांथस्थ ब्राह्मणाला धर्मकार्य म्हणून अन्नदान केलेच पाहिजे त्यासाठी अहिल्याबाईंनी वर्षभराची सोय म्हणून व्यवस्था लावली. नर्मदा परिक्रमा करणाऱ्याना चिखलदा येथे अन्न छत्र सुरू केले. अहिल्याबाई नेहमी म्हणत की, “स्नानाने देहशुद्धी होते, ध्यानाने मनशुद्धी होते आणि दानाने धनशुद्धी होते”. त्याग आणि सेवा तसेच दानधर्म याला आपल्या संस्कृतीत फार महत्व आहे. अहिल्याबाईंचे सारे जीवन, त्याग आणि सेवा यासाठीच खर्ची झालेले दिसते.त्याग आणि सेवा म्हणजे ईश्वर भक्ती च त्या मानत असत.विशेष म्हणजे अहिल्याबईनी खाजगी संपत्ति चा वापर अनेक देवळे आणि घाट बांधायला खर्च केलेली दिसते. त्याचा गाजावाजा व प्रसिद्धी न करता दानधर्म केला आहे. तसेच खाजगी खर्चासाठी सरकारी तिजोरीतिल पैसा वापरणे हा त्या गुन्हा समजत. माणसातलं माणूसपण सदैव वाढत राहावं यासाठी त्यांनी मंदिरे , पूजा अर्चना याचे महत्व जाणले होते.मंदिरात तेल वाती ची व्यवस्था अशा बारीक गोष्टींचा विचार त्या करत. 

काशी विश्वेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार ,मनकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट . चित्रकूटला श्रीरामाचे मंदिर बांधून रामपंचयातन ची स्थापना केली.जेजूरीचे मल्हार गौतमेश्वर मंदिर, परळीत वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, वेरूळ च्या घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार,गजनीच्या महंमदाने तोडफोड केलेले सोमनाथ चे मंदिर पुनः बांधले. मूर्तीची स्थापना केली. याशिवाय हृषीकेश,सुलपेशवर, सांगमणेर, नाशिक, दिंडोरी(निफाड), संबळ. श्री शैल्य,मंडलेश्वर, भुसावळ, गया, पंढरपूर, पुष्कर,चौंडी ,बद्रीनारायण ,गंगोत्री,अयोध्या, आलमपुर,उज्जैन, ओंकार मांधाता ,इथे मंदिरे बांधली. देवलयांची गरज त्यांनी ओळखली होती. प्रजेमध्ये सदाचार निर्माण करणं या हेतूने खाजगी पैशानेच देवळे, अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा, अनाथ आश्रम , घाट, पाणपोया, कुंड बांधून घेतल्या . ती कायम स्वरूपी चालू राहतील अशी आर्थिक व्यवस्था केली.पूजाऱ्याला उपजीविके साठी काही गावे धर्मादाय दिली. प्रेमाने आणि धर्मशक्तीने अहिल्याबाईनी भारतातील सर्व प्रांतांना जिंकले होते. हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धार कार्यात अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान खूप मोठे आहे. त्या भगवान शंकराच्या निस्सीम भक्त होत्या. आपले राज्य त्यांनी शिवार्पण करूनच राज्य कारभार केला होता.त्यांच्या दरबारी आदेशावर ‘श्रीशंकर आज्ञेवरुन’ अशी राजमुद्रा दिसते.

कवी माधव जूलियन म्हणतात,

कुणी काय बांधिले

स्थळे शोधूनी निसर्ग सुंदर रम्य मंदिरे घाट कुणी |

वा पडशाळा बांधून केले येते जाते लोक ऋणी ||

पुनरुद्धारे नवी पाहता किती मंदिरे भग्न जुनी |

धन्यवाद आसेतू हिमाचल मिळती कोणाला अजुनी ?

अन्नछत्रही विद्याभिक्षुक यात्रिक यास्तव करून सुरू |

संसृतीचिंतेतून सोडविले विद्याध्यापक धर्मगुरू?

जिच्या व्यक्तिगत उत्पन्नातून वाहे दानाची सरिता ,

ती गंगाजल निर्मल राणी कोण जिचा नच कोश रिता?

भोगपरान्मुख होय परी न घे कर्तव्याचा संन्यास |

निदिध्यास घे सदा शिवाचा योग कठीण हा अन्यास ||

राजयोग जनकाचा नाही भाकड गोष्ट पुराणीची |

रहस्य डावी इतिहासाची कथा अहिल्या राणीची ||

कांचनगंगा वाहवूनी जी उभवी यशाचा धवलगिरी |

होळकरकुलप्रभा ,कोण हो ततस्मृतिला न धारील शिरी?



--ले. डॉ. नयना कासखेडीकर

-----------------------------------------

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी भाग ५ – धैर्यशील अहिल्यादेवी

 

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी

भाग ५ – धैर्यशील अहिल्यादेवी

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)


बाजीराव पेशवे यांच्या बरोबर लढाईहून परतत असताना सैन्याचा तळ चौंडी गावात सीना नदीच्या काठी मुक्कामी होता. नदीकाठी असलेल्या महादेवाच्या देवळात छोटी अहिल्या देवदर्शनाला आली होती. नदीकाठी मैत्रिणींबरोबर ती वाळूत शिवलिंग तयार करत होती. तेव्हढ्यात सैन्याचा घोडा उधळला आणि मैत्रिणी ओरडून पाळल्या पण अहिल्या पिंडीचे रक्षण करत तशीच उभी राहिली होती आणि घोडा तिच्या बाजूने उधळून निघून गेला . मल्हारराव व बाजीराव हे पाहताच धावत आले आणि बाजीराव अहिल्येला रागवून म्हणाले, “इथे का थांबलीस पोरी? घोडा तुला तुडवून गेला असता तर? त्यावर धीट अहिल्या म्हणाली, “जे आपण घडवावे ते प्रसंगी जीव सांडूनही रक्षण करावे असेच वडिलधारी माणसे सांगतात , तेच मी केले, मी घडवलेल्या पिंडीचे मीच रक्षण केले. माझे काही चुकले का?” तिचे हे बाणेदार उत्तर ऐकून बाजीराव पेशवे म्हणाले, "मल्हारराव, हिला तुमची सून करा , तिला राज्याच्या लायक करा .ती राज्य नावारूपाला आणेल. राज्यकारभाराच्या अनेक पदराचं हिला शिक्षण द्या" आणि खरच लग्नानंतर अहिल्येचे असे सर्वच शिक्षण सुरू झाले. अहिल्या सर्वच विषयात प्रगती करत होती. वाचन आणि अभ्यासा बरोबरच हिशोब बघणे, वसूली जमा खर्च तपासणे, न्यायनिवाडे करणे, सरदारांना पत्रे पाठवणे, आणि मुख्य म्हणजे फौजा तयार ठेवणे, गोळाबारूद, बाण भाते, ढाल तलवारी सज्ज ठेवणे, ही कामे ती करत असे. सासरे बुवा मल्हारराव कौतुकाने म्हणत, “आम्ही तलवार गाजवतो, ती सुनबाईंच्या भरोशावर” विशेष म्हणजे अहिल्याबाई, पती खंडेरावांना पण रणविद्या शिकण्यास प्रोत्साहित करत असत. खंडेरावला यात रस नसे. त्यामुळे लग्नानंतर अवघ्या दहा वर्षांच्या काळात, अहिल्याबाई दिवसें दिवस जास्तच समर्थ होत गेल्या.

मल्हारराव सतत लढाया करण्यात गुंतलेले असत तेंव्हा, ते असतील तिथून पत्रे पाठवून अहिल्येला सल्ला देत, कामे करायला संगत. अहिल्या मल्हाररावांबरोबर रणांगणावर सुद्धा जात होत्या. अहिल्या आपल्या अनुपस्थितीत कारभार पहाते म्हणजे आपणच पाहतो असा खूप विश्वास वाटे त्यांना. त्यांचा पत्र संवाद फार छान आहे. ते म्हणतात, "अहिल्येस आशीर्वाद! तुम्ही इंदोरला आहात , सात हजार फौजेच्या तयारीत असावे, जंबुरा, तोफा, गाडे यात कुचराई नको, शागिर्दाप्रती वर्तन दयाळू ठेवावे.प्रजेकडुन रुपये येतात त्यांच्या सुखसोयी नेटक्या कराव्यात”.

त्याला अहिलेने पाठवलेले उत्तर- “तीर्थरुप वडिलांप्रति साष्टांग दंडवत. आशीर्वाद असू द्यावा, चुकभुल तर होणे आहेच, एकशे वीस जंबुर तोफा आणि बारूद पक्की सहा मण, सोबत तेज गोलंदाज, रोज दिडीने, पण निशाणी पक्की, आम्ही परीक्षा करून घेतली आहे. भरणा वसूल नेटका चालू आहे. आपल्या तलवारीस यशच आहे. आपल्या हुकूमाप्रमाणे शिकस्त करते". – आपली आज्ञाधारक - सौ.अहिल्या.”

१७५४ च्या कुंभेरीच्या लढाईत तर मल्हारराव, खंडेराव आणि अख्खे कुटुंबच अजमेर येथे गेले होते. तिथे सुद्धा अहिल्याबाई पहाटे उठून पुजा करत, सर्वांना अंगारा लावून, मग मुदपाखान्यात लक्ष घालून, पुढे जखमींवर उपचार करून, शस्त्रांस्त्रांची व्यवस्था करवून घेऊन, दिवसभर तोफखाना सांभाळायचा अशी दीड महीना कामे केली. मात्र याच लढाईत अहिल्येच्या भाळी वैधव्य आले. खंडेराव मारला गेला. छातीवर दगड ठेऊन मल्हार रावांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल सुरू केली. आता पुढचे आयुष्य प्रजेसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी घालवण्याचा 'पण' अहिल्याबाई यांनी केला.

पुढे अहिल्याबाईनी इंदोर मध्ये तोफांचा कारखाना उघडला . स्वत: जातीने त्यातील कामकाजाची धुरा सांभाळत . यातली युद्ध साहित्याची इत्थंभूत माहिती त्यांना होती.

पानिपतच्या युद्धात मल्हार रावांच्या हुकूमा प्रमाणे अहिल्या तोफखाना घेऊन ग्वाल्हेरला गेल्या होत्या. यात लाखो योद्धे मारले गेले. या युद्धाने खूप मोठे नुकसान झाले होते.पानिपतची रसद तुटली होती. अनेक सैनिक अन्न आणि पाणी, पाणी करत कोसळले होते. अहिल्या इंदोर ला येऊन राजवाड्यात असलेल्या जखमी लोकांना उपचार करू लागली. सेवा पथके उभारली. सगळ्यांना धीर देऊ लागली. वैद्यकीय उपचार सुरू केले, चुली पेटवून सर्वांना पोटभर खायला देत होती. हजारो लोक राबत होते. करुणेची प्रतिमा असलेली अहिल्या यावेळी जनतेची आई म्हणून सिद्ध झाली होती. ती आईच्या मायेची फुंकर युद्धात जखमी व असहाय्य झालेल्यांना घालत होती.

पानिपतच्या युद्धानंतर मल्हारराव सतत मोहिमांवर जाऊ लागले होते. पाच वर्षात उत्तरेकडील घडी त्यांनी नीट बसविली. या सुमारास अहिल्या इंदोरचा राज्य कारभार नीट सांभाळत होती. पानिपतच्या युद्धाच्या अनुभवावरुन लक्षात ठेऊन अहिल्याबाईंनी ठिकठिकाणी विहिरी खोदून घेतल्या जेणे करून सैन्याला युद्ध प्रसंगात कुठेही पाण्याची कमतरता भासणार नाही. दंगाफसादाच्या वेळी आश्रयस्थान हवे म्हणून धर्मशाळा बांधून घेतल्या . रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग याप्रमाणे अशा युद्ध समयी सुद्धा अहिल्याबाई न डगमगता , धैर्याने तोंड देत असत. पुढेही असेच अनेकदा प्रसंग आले, यातून निभावत, अनुभव घेत, शेवटच्या क्षणापर्यंत प्रजेसाठी दक्ष राहिल्या.

ले. डॉ. नयना देवेश्वर कासखेडीकर .


                                                            ------------------------------

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी भाग-४ - रूढी, परंपरा आणि अहिल्याबाई

 

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी

भाग-४ - रूढी, परंपरा आणि अहिल्याबाई

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)

अष्ट वर्षात भवेत कन्या .... या सूत्रा प्रमाणे अठराव्या शतकात मुलीचा आठव्या वर्षीच विवाह केला जाई. तसेच वयाच्या कुठल्याही वर्षी वैधव्य आले तरी ती पत्नी/मुलगी, नवर्‍याबरोबर सती जाई. अगदी ८,९ वर्षांच्या कोवळ्या बालिका पण केवळ प्रथा म्हणून सती जात. अशी अनेक बंधने स्त्रियांना त्या काळी पाळावी लागत होती. वास्तविक स्त्रियांना जी जाचक असत. अन्यायकारक असत आणि या बंधनाचे मूळ धर्माशी जोडले जाई. याचा काही लोक गैरफायदा सुद्धा घेत. ही सर्व बंधने स्त्रिया मुकाट्याने सहन करत, पाळत असत. याच वातावरणात अहिल्येचे आयुष्य गेले. परंपरेप्रमाणे तिचा विवाह लहान वयातच झाला. पण तिच्या तजेल बुद्धीने कळत्या वयापासूनच निरीक्षण, अनुभव यातून, बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक अशा परंपरा आणि रूढी या गोष्टींचा विचार केला. वृत्तीने धार्मिक असूनही या विरोधात विचार करतात म्हणून लोकांना आश्चर्य वाटे.  

       सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुळेच अहिल्यादेवीचे अस्तित्व उरले होते ते, केवळ तिला खंडेरावाबरोबर त्यांनी सती जाऊ दिले नाही म्हणून. प्रथेप्रमाणे अहिल्या सती गेली असती तर? एव्हढे मोठे कार्य उभेच राहले नसते. पण सती जाण्याचा प्रसंग अहिल्येवर २९ व्या वर्षी ओढवलाच होता. सासर्‍यांच्या रूपात एक पुरुषच या प्रथेविरुद्ध अहिल्येच्या मदतीला धाऊन आला होता. पण अहिल्येशिवाय घरात ज्या स्त्रिया होत्या त्या सर्वच सती गेल्या. मल्हाररावांच्या दोन पत्नी, खंडेरावच्या इतर बायका (सवती), मुलगा मालेरावाच्या दोन्ही बायका(वय वर्ष ८च्या ), मुलगी मुक्ता, दोन नातसुना, अशा स्वत:च्या घरातच १८ बायका सती गेल्या . याचे शल्य अहिल्यादेविना सतत बोचत राहिले. कारण त्यांनी कडाडून विरोध केला तरी काही झाले नाही. उलट सुना आणि नात सुना सती जात होत्या तेंव्हा अहिल्यादेविंना भूल देऊन झोपवले जात होते. त्यांना हा त्रास सहन होत नव्हता. घरातच भोगलेल्या या दु:खामुळे समाजासाठी सती विरोधात लोकांची मते सुधारण्यासाठी त्या सतत काम करत राहिल्या. ज्या रूढी परंपरा पटत नाहीत त्याच्या विरोधात जाऊन निर्णय पण घेतले. कृती केली.

दोन्ही सुना (मालेराव च्या बायका) सती जायला निघाल्या,तेंव्हा इवल्याशा पोरींना सतीची वस्त्रे नेसवली तेंव्हा त्या व्याह्यांना विरोध करत म्हणाल्या का जायचं एव्हढ्याशा पोरींनी सती? पण रूढी होत्या. व्याही म्हणाले, “आमचे घराणे सतीचे आहे, आमच्या घरात एकही विधवा नाही, आमच्याकडची कन्या पण सतीचं वाण घेऊनच जन्माला येते”. अहिल्यादेवी कळवळल्या. कुटुंबातील लोकांना पण वाटत होते की एव्हढी स्त्री पण धर्म विरोधी कृत्याला परवानगी देते. उलट अहिल्या सती न गेल्याने तीनेच धर्म विरोधी कृत्य केले आहे असे त्यांचे म्हणणे होते.

अहिल्यादेवींचे जसे हे सती विरोधी विचार होते तसे लग्न लावण्याच्या बाबतीत पण स्वत:च्याच घरात त्यांनी धारिष्ट्य दाखवून प्रयोग केला. तो म्हणजे, मुलगी मुक्ताचे लग्न ठरवताना,स्वयंवर सारखा पण ठेवला. या भागात प्रजेची सुरक्षितता, प्रवाशांची आणि रस्त्याने जाणार्‍या यात्रेकरूंची लूट करणार्‍या , भिल्ल लोकांचा जो बंदोबस्त करील त्याच मुलाशी माझ्या मुक्ताचे लग्न लावून देईन असा तो पण होता. यालासुद्धा लोकांनी नावे ठेवली. दूषण दिले. मुक्ता अठरा वर्षाची झाली आणि हा पण पूर्ण करणारा शूर युवक यशवंत फणसे याच्याशी मुक्ताचे लग्न लावून दिले. इथे लग्नाचे वय आणि स्वता विधवा असून मुक्ताच्या कन्यादानाचे कर्तव्य पार पाडत ही परंपरा अहिल्याबाईनी मोडीत काढली होती. लोकांना म्हणूनच हा धक्का होता.

अहिल्याबाईंच्या मते ज्या रूढी अंधारकडून उजेडकडे नेतात त्याच मानाव्यात. उजेडाकडून अंधाराकडे नेणार्‍या रूढी त्यांना मान्य नव्हत्या. लग्न वयाप्रमाणेच हुंडा पद्धत पण त्यांना अजिबात मान्य नव्हती. स्त्रियांना आदिशक्ती, देवी, देवतासम मानणे म्हणजे स्त्रियांच्या कौतुकाची नुसती ढोंगबाजी वाटायची त्यांना. तिला लग्न करून घरी आणताना मात्र हुंडा घेणे, मानपान करून घेणे, सोनेनाणे घेणे, पैसे घेणे हा सारा स्वार्थी खेळ ? मग काय त्यांनी राज्यात हुंडा बंदी केली. राज्यात कुठल्याही जाती जमातीत विवाह समयी कन्येच्या पालनकर्त्याकडून पैसे घेतल्यास तो गुन्हा समजण्यात येईल. असा आदेश त्यांनी काढला .   हुंडा घेणारा, हुंडा देणारा आणि मध्यस्थ या सगळ्यांना दंड ठोठावला जाण्याची कायद्यात तरतूद केली. त्या काळात हा निर्णय घेणे म्हणजे धैर्याचीच गोष्ट होती. वास्तविक त्यांना स्वताला याचा काय उपयोग ? पण सामाजिक चालीरीतिंचा स्त्रियांना त्रास होऊ नये हे प्रजेचे हित त्यांनी लक्षात घेतले होते.    

पितृपंधरवडयात त्यांच्या कडे श्राद्धे घातली जात. आजही स्त्रिया पाणी देत नाहीत. अंत्यविधी करत नाहीत. स्वता अहिल्यादेवी ही श्राद्धे करत. त्या म्हणत मला स्त्री त्या देवानेच केले आणि विधवा पण त्यानेच केले मग मी जशी आहे तशानेच कार्य करत्ये.

त्यांना वाटे स्त्रियांचा सन्मान म्हणजे माळवा प्रांतातला लौकिकअसला पाहिजे. विधवेकडून नजराणा घेणे ही राजयकारभाराची प्रथा म्हणजे शुद्ध दरोडाच आहे असे म्हणून त्यांनी विधवा महिलांना मूल दत्तक घेण्याची परवानगी दिली होती. म्हणजे वारस असतांना कुणी त्या विधवेला पैसे मागणार नाहीत.   

स्त्री असल्याने स्वता रूढी परंपरा व त्याची दु:खे भोगल्यामुळे ,स्त्रीत्वाची बंधने सांभाळून .संघर्ष करत करतच आपले जीवन कर्तव्यपूर्तीने सफल केले.       

-        लेखिका. डॉ. नयना कासखेडीकर, पुणे .

--------------------------------

Tuesday, 29 October 2024

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी भाग 3 – ‘लोकहितदक्ष अहिल्याबाई’

 




कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

भाग 3 – ‘लोकहितदक्ष अहिल्याबाई’

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- 13 ऑगस्ट १७९५,इंदोर.)


                                                           

            अहिल्याबाईंचा दिनक्रम अगदी आखीव रेखीव होता. पहाटे उठून स्नान आटोपून शंकराची पूजा. स्तोत्र पठण. थोडे दूध पिऊन मग दिवसभराच्या कामाची आखणी व आढावा घेणे, आलेल्या तक्रारींचे कागद वाचून ठेवणे. गुप्त पत्रे लिहिणे. कोतवालीत जाऊन कामे बघणे. तोपर्यंत भोजनाची वेळ होई मग भोजन आटोपून, न्यायदानाची कामे, हिशोब असे दिवसभर चाले. कधी कधी रात्री उशिरापर्यंत काम चाले. कधी हिशोबांचा गुंता झाला असेल तर त्या रात्रभर जागून स्वत: मार्गी लावत असत. १७६७ ला अहिल्याबाईंचा कारभार सुरू झाला . पाच वर्षे झाली तरी आर्थिक गणित नीट बसत नव्हते. घरात एका पाठोपाठ एक मृत्यू झालेले, पती खंडेराव, सासरे मल्हारराव, मुलगा मालेराव, आणि या तिघांच्या सती गेलेल्या बायका. स्वत:च्याच घरात तेरा जणी सती गेल्या होत्या. या सगळ्याची सल मनात ठेऊन त्या कारभार करत होत्या. आता फक्त मुलगी मुक्ताचाच त्यांना आधार होता. अशा मानसिक अवस्थेत सुद्धा अहिल्याबाई राज्याचा कारभार अत्यंत कर्तव्य निष्ठेने करत होत्या. प्रजेचा अपमान किंवा अनादर केलेला त्यांना आवडत नसे. त्यांच्या बरोबर असत्य किंवा अनुचित व्यवहार केलेलाही चालत नसे, त्यांच्या मते प्रजेसाठी आपण आहोत. गावात एखादा अनुचित प्रकार कानावर आला तर लगेच त्याला समज देत. हिशोबत गोंधळ असेल तर त्यांना तो लगेचच लक्षात येई. प्रजेच्या पाठीशी उभे राहून अधिकार्‍यांना जबाबदार धरत. वेळप्रसंगी त्याला अधिकार पदावरून काढून टाकत.

          एकदा गावात श्रीमंत व्यापारी मरण पावला. त्याच्या मागे फक्त पत्नी होती. मुलबाळ नव्हते. वारस नसल्याने सर्व संपत्ती सरकारजमा होईल, त्या ऐवजी त्यांच्या विधवा पत्नीने अहिल्यादेवीकडे ती दान करायची असे ठरविले. मात्र न्यायप्रिय अहिल्यादेविंनी विधवा पत्नीला बोलवून संगितले की, “हा पैसा तुमच्या पतीचा आहे, आता तुम्हीच त्याच्या मालक आहात. तुम्ही स्वेच्छेने हा पैसा एखाद्या अन्नछत्राला द्या, अनाथ मुलांचा शिक्षणाचा खर्च करा, पाणपोया उघडा, धर्मशाळा बांधून द्या. घाट बांधायला पैसे द्या, विहिरी खोदा, दानाचे सुख घ्या”. असा एक मोठा सामाजिक संदेश त्या काळात अहिल्यादेवी देत होत्या. पक्षपात, भेदभाव असे त्यांच्या ठायी नव्हतेच. सर्वांना न्यायपूर्ण वागणूक देत.
 
                        

त्या मृदु होत्या, मायाळू होत्या. तरीही वेळ आली तर तितक्याच कठोर पण होत्या. मल्हार राव हो;ल्करांचे बाजीराव पेशव्यांशी संबंध चांगले होते. ते तसेच त्यांच्या नंतर सुद्धा अहिल्याबाईंनी चांगले सांभाळले होते. त्या हुशार, व्यवहारी, मुत्सद्दी, धीट आणि फटकळ सुद्धा होत्या. त्यामुळे व्यवहार अगदी चोख असत. कोणाला त्यात काही गडबड करू देत नसत. केलीच तर चांगले फैलावर घेत. कोणाच्या स्वार्थी मनात कशाचे इमले आहेत हे त्या लगेच ओळखत.


                        

         एकदा, पुणे दरबारातून अहिल्याबाईंनी आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून, भेटायला हरिपन्त आले होते. त्यांनी हरिपंतांना स्पष्ट संगितले की, “सुभेदार मल्हाररावांपासून आमची निष्ठा बाजीराव पेशव्यां बरोबर आहे. हा एकनिष्ठेचा बेलभंडार आम्ही कधीच उचलला आहे तो काही उगीच नाही”. हरीपंताना लगेच सगळे ध्यानात आले. शिवाय महेश्वर मधल्या, बाजारपेठा, संशोधन केंद्रे, युद्धभंडार, चिलखते, भाला- बरच्या, तोफा हे सर्व पाहून ते थक्क झाले. त्यांच्या मनात आता अहिल्याबाई न्यायदान कसे करतात त्याचा अनुभव घ्यावा असे आल्याने ते शेतकर्‍याचा वेष घेऊन दरबारात आले. त्यावेळी एक कवी दरबारात आला आणि

देवी अहिल्ये, शुद्धमति तू, सर्वांची माता ,

ईश्वर आला तुझ्या स्वरूपे होऊनिया त्राता |

तव पायाशी तीर्थे सगळी, देवदेवळे ती,

स्वर्गामद्धे नारद तुंबर तव लीला गाती |

असे कवन गाऊ लागला. हे ऐकताच अहिल्यादेवी म्हणाल्या, “कविराज, तुमची माझ्याविषयी जी श्रद्धा आहे याचा मी आदर करते पण, माझे हे अतिशयोक्तीचे वर्णन मला पटत नाही. एकतर ईश्वराने माझ्या रूपात अवतार घेणे अशक्य आहे. नारद तुंबर स्वर्गात माझी लीला गाणं हे ही अशक्य आहे. देवांना आणी देवळांना तुम्ही माझ्या अभागिनीच्या पायाशी आणून ठेवलत. हा अपराध आहे तुमचा. कशासाठी गाता असे? चांगले काव्यगुण दैवाने मिळाले आहेत ते चार पैशांसाठी सत्ताधार्‍यांची कौतुके गाण्यात का दवडता ? त्या ऐवजी समाजाची दु:खे काव्यातून मांडा. ईश्वराची लीला रचा. शौर्याचे पोवाडे गा. मग सोन्याचे कडेही देईन. पण आज ती चोपडी इकडे द्या, नर्मदेत बुडविते. या तुम्ही.” हरिपन्त हा प्रसंग पाहून आश्चर्यचकीत झाले. देवलाही आपली स्तुति आवडते आणि अहिल्याबाई ? त्यांच्या विषयी केलेली स्तुति नर्मदेत फेकली ?


                                        
  
          असे अनेक प्रसंग घडले, इतिहासात त्याची नोंद आहे. काशी येथे अहिल्यादेविंनी ब्रम्हपूर स्थापन केले. कारण एकदा काशीचे ब्राह्मण अहिल्यादेवींकडे आले. मुसलमानांचा उच्छाद सुरू होता, वेदाभ्यास करायला जागा नव्हती. मुसलमान हल्ला करत तेंव्हा शिष्यगण सैरावैरा पळून जात, आश्रमास कोणी जागा देत नसे. अहिल्यादेवींनी एकाला त्या ब्राम्हणांबरोबर देऊन काशीला पाठवून ,आता हे आश्रमासाठी जागा शोधून देतील असे संगितले. ब्राम्हण आनंदले. पण त्या म्हणाल्या, “एक गोष्ट ध्यानात ठेवा, जी वास्तू बनेल त्याचे नाव ब्रम्हपुरी असेल. दर तीन महिन्यांनी आमचे गुप्तहेर कुठल्याही वेशात तिथे येतील, तिथली पाहणी करतील. ज्ञानदान नीट चालले असेल तर प्रश्नच नाही . तसे नसेल तर शिक्षा च”. अशा प्रकारे त्या प्रेम आणि शक्तीने जनतेचे हित, प्रजेची सोय नेहमी बघायच्या.वास्तविक वाराणशी महेश्वर पासून वेगळा प्रांत होता तरीही तिकडील लोक सुद्धा अहिल्याबाईंकडे असा न्याय मागायला यायचे. नुसत्या धर्मशाळा उघडल्या तरी त्यात सोयी करत. तिथे पहारेकरी असे, आतमध्ये तुळस आणि शिवलिंग मंदिर तसेच पाण्याची सोय म्हणून विहीर आणि अन्नछत्र एव्हढी सोय त्या लोकांसाठी त्या करत असत. अशा कामांमुळे व निर्णयांमुळे त्या लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्या होत्या.



- डॉ. नयना कासखेडीकर. पुणे



--------------------------------------