Tuesday, 26 August 2025

आमचे पारंपरिक खेळ

                                     आमचे पारंपरिक खेळ

        आपल्याला अभिजात कला आणि विद्या यांच्याप्रमाणे खेळांचासुद्धा एक प्राचीन वारसा लाभला आहे. शारीरिक सुदृढतेसाठी व्यायाम ही आपल्या समाधानी जीवनासाठीची एक नितांत आवश्यकता फार पूर्वीपासूनच समजली गेली आहे. आपले पारंपरिक स्वरूपाचे खेळ, हे आपला देश, आपली संस्कृती आणि लोकजीवन यांचा अविभाज्य भाग आहेत. मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे समाजव्यवस्थाच आमुलाग्र बदलत चालली आहे. पूर्वीच्या सामाजिक रचनेत पुस्तक वाचन आणि विविध प्रकारचे मैदानी खेळ याला महत्वाचे स्थान होते. आताची जीवनशैली अधिक सोयीस्कर, जलद, सुखावह झालेली आहे. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल हे साधन आल्याने पालक आणि मुले एका वेगळ्याच जगात वावरत आहेत. आधीच्या पिढीत वेगळे वातावरण होते. एकत्र कुटुंब व्यवस्था होती, साहजिकच घरात संस्कार करणारे आजी-आजोबा, एकमेकात सुसंवाद असणारे पालक आई-वडील, गावात-शहरात खेळायला असलेली मोकळी मैदाने, घरासमोरील अंगण, फिरायला व सायकलिंगला मोकळे रस्ते, सकाळ संध्याकाळचा निवांत वेळ, या सगळ्या गोष्टी मुलांच्या जडणघडणीत महत्वाच्या असत. पारंपरिक खेळ या जडणघडणीचा भाग होता. आता या पारंपरिक खेळांची जागा मोबाईल गेम्सने घेतली आहे आणि भयावह दुष्परिणाम सतत दिसत आहेत, सिद्ध होत आहेत.


                                      

वैदिक काळामध्ये स्वसंरक्षण व आत्मबल वाढवण्यासाठी शारीरिक शिक्षण दिले जायचे. ते युद्धोपयोगी असे. त्यात धनुर्विद्या, घोडदौड, रथ चालविणे याबरोबरच योग विद्या, सूर्य नमस्कार, प्राणायाम हेही शिकविले जात असे. नंतरच्या मध्ययुगीन काळामध्ये लढाऊ वृत्ती वाढीस लागण्यासाठी व टिकण्यासाठी इतर शारीरिक शिक्षणाचा समावेश करण्यात आला. त्यात अश्वारोहण, मुष्टी युद्ध, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती यांचा समावेश होता. यामुळे शरीर स्वास्थ्य ही टिकून राहत असे. छत्रपती शिवरायांच्या काळात युवकांना बलसंवर्धन व युद्धाचे शिक्षण मिळू लागले. समर्थ रामदास स्वामींनी तर राष्ट्रभक्ती बरोबरच बलोपासना करण्याचे तंत्र शिकवून आपला शिष्यवर्ग निर्माण केला होता. त्यांनी हनुमान मंदिरे स्थापन करून भक्ती बरोबर शक्ती संवर्धनासाठी दंड, बैठका, सूर्यनमस्कार, कुस्ती, वजन उचलणे, लाठी काठी, दांडपट्टा, ढाल तलवार, जंबिया व भाल्याने युद्ध खेळणे असे प्रशिक्षण सुरू केले. त्याचेच पुढे आखाडे झाले. देवाचे चिंतन करण्यापूर्वी वैयक्तिक विकासावर ( म्हणजे उच्च आत्मबल आणि सुदृढ शरीर ) चिंतन करण्याचा त्यांनी उपदेश केला. धर्मप्रचारक बलवान असला पाहिजे असे त्यांना वाटत असे. त्यातूनच शरीर कसदार व बलवान, घाटदार बनविण्याचे व्यायाम प्रकार म्हणजे मल्लखांब, मल्लविद्या इ. वर भर देण्यात आला. कालांतराने यातील काही प्रकार खेळ म्हणून मान्यता पावून त्याच्या स्पर्धा होऊ लागल्या, विजेतेपद मिळवण्याची चुरस वाढली, विजयी संघांना पारितोषिके देण्यात येऊ लागली.


                                  

खेळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे असतात तसेच ते मनोरंजनसाठी सुद्धा महत्वाचे ठरतात. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच खेळांमुळे आत्मविश्वास वाढतो, अंगी लवचिकता येते, चापल्य येते, स्नायू बळकट होतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते, व्यक्तीची निर्णय क्षमता विकसित होते, नेतृत्व गुणांचा विकास होतो, संयम शिकायला मिळतो, संघभावनेने वागण्याचे धडे मिळतात.


                                   

खेळांचे अनेक प्रकार आहेत, परंतु मुख्य दोन प्रकार. एक म्हणजे बैठे खेळ आणि दुसरे मैदानी खेळ. बुद्धिबळ, कॅरम, पत्ते, सागरगोटे, सोंगट्या, काचकवड्या, भातुकली हे खेळ बसून खेळले जातात, म्हणून ते बैठे खेळ. यात बुद्धीचा वापर केला जातो. अशा खेळात तर्कशक्ती वाढते. तर खो खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आदि खेळ मैदानात खेळले जातात. यात भरपूर शारीरिक हालचाली असतात, कौशल्याची कसोटी लागते. आपले पारंपरिक खेळ म्हणजे कबड्डी, खो-खो, गोट्या, विटीदांडू, लंगडी, आट्यापाट्या, लगोरी, फुगडी, ठिक्कर ,झिम्मा, भिंगऱ्या, भोवरा इत्यादि.


                                      

याशिवाय आणखी खेळ आहेत. लपंडाव, शिवाजी म्हणतात, तळ्यात-मळ्यात, पकडा-पकडी, विषामृत, डोंगराला आग लागली, डब्बा ऐस पैस, मामाचं पत्रं हरवलं, आबा धोबी,पोत्यात पाय घालून पळणे, नाव-गांव-फळ-फूल, आंधळी कोशिंबीर, दोरीवरच्या उड्या, लुटुपुटूची लढाई या सगळ्या खेळात पूर्वी लहान मुले मनसोक्त रमायची, खेळायची. यातून मुलांच्या शरीर व मनावर चांगले व योग्य संस्कार होत असत. इतिहासात डोकावल्यावर आपल्या संस्कृतीतले लोकजीवन कसे होते हे कळतेच, पण खेळ व व्यायाम यासाठी त्या काळात काय साधने वापरत याचाही अंदाज येतो.


                                      

क्षत्रिय लोकांच्या शारीरिक विकासासाठी धनुर्विद्या, तलवारबाजी, घोडेस्वारी, मल्ल युद्ध, कुस्ती, भालाफेक याचे प्रशिक्षण दिले जात असे. त्या शिवाय बैलगाडी स्पर्धा व नौका नयन स्पर्धापण होत असत. हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या उत्खनन अवशेषात सिंधु संस्कृतीत कित्येक प्रकारचे अस्त्र, शस्त्र ,खेळणी आणि खेळ उपकरणे सापडली आहेत. पौराणिक कथांमधील बलराम, भीम, हनुमान, जांबूवंत, जरासंध यांची मल्लयुद्ध प्रसिद्ध आहेत. वैदिक काळात शिकार करणे, हत्तींना वश करणे, रथांची शर्यत, असे अनेक खेळ होते. पूर्वी तर द्यूत खेळणे व रथ शर्यत हा राज्याभिषेकाच्या विधीचाच एक भाग होता. पुरुष आणि स्त्रियामध्ये चेंडू खेळण्याची प्रथा होती. पकडा पकडी, लपाछपी हे खेळ मुलींमध्ये खेळले जात. पौराणिक काळातील इतिहासावरून स्वयंवरासाठी झालेल्या स्पर्धेमध्ये शारीरिक क्षमताच तपासल्या जायच्या. याचे उदाहरण म्हणजे सीतास्वयंवर हे आपल्याला माहिती आहे. तर अर्जुनाचे नेमबाजीचे कौशल्य आपण वाचले आहे. गुरु द्रोणाचार्यांनी घेतलेल्या परीक्षेत अर्जुनाने आपल्याला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो आहे हेच सांगितले आणि यावरून एकाग्रता किती महत्वाची असते ते सिद्ध होते. खेळांमध्ये एकाग्रता महत्वाची असते.

युद्धकला भारतात सर्वप्रथम सुरू झाल्या. योग कलासुद्धा भारतातच सुरू झाल्या. याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इतके ते प्राचीन आहे.

बुद्धिबळ खेळ हा आता जगप्रसिद्ध खेळ झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्या स्पर्धा भरवल्या जातात. पण रावणाच्या पत्नीने मंदोदरीने सर्वात प्रथम हा खेळ रावण बरोबर खेळल्याचे इतिहास सांगतो. सहाव्या शतकात या खेळाला शतरंज म्हटले जाऊ लागले. तर, हा खेळ युरोप मध्ये गेल्यावर त्याला chess नाव पडले.


                                   

सापशिडी हा खेळसुद्धा भारतीय खेळ आहे. याला मोक्षपटसुद्धा म्हणतात. हा खेळ जगभरात खेळला जातो. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी तयार केला होता. नैतिकतेचे धडे शिकविणारा हा खेळ सतराव्या शतकात तंजावर मध्ये प्रसिद्ध झाला. नैतिकतेवर आधारित हा खेळ इंग्रजांना पण भावला आणि तो त्यांनी १८९२ मध्ये इंग्लंड ला नेला. तिथून तो युरोपीय देशात गेला आणि ल्युडो किंवा स्नेक्स अँड लॅडर्स नावाने ओळखला जाऊ लागला.


                                     

कबड्डी - हा भारतीय सामूहिक खेळ आहे. याला हुतुतूपण म्हटले जाते. यात स्वसंरक्षण शिकवले जाते. महाभारतात या खेळाचा उल्लेख आहे. खो खो खेळसुद्धा प्राचीन भारतीय खेळ आहे. यात स्वसंरक्षण आणि आक्रमण व प्रती आक्रमण ही कौशल्ये शिकवली जातात.


                               

द्युत क्रीडा – महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध या द्यूतक्रिडेमुळेच झाले होते. इतिहासातील वर्णनावरून वेगवेगळ्या प्रसंगावरून द्यूत हा खेळ म्हणजे दुर्व्यसन मानले गेले होते. जिंकले तर वर्ष मंगलमय होते आणि द्यूतात हारले तर वर्षभर धनाची हानी होत राहते. द्यूतक्रीडा हे एक मनोरंजनाबरोबरच धनसंपत्ति जमविण्याचे त्या काळातले साधन होते. भारतीय संस्कृति व कलांमध्ये एक प्रमुख भाग म्हणून द्यूतक्रीडा समजली जायची.


                                                  

सागोल कांगजेई (पोलो)- आताच्या पोलो खेळाचे हे भारतीय प्राचीन रूप आहे. सागोल म्हणजे घोडा आणि कांगजेई म्हणजे घोड्यावर बसून चेंडू खेळण्यासाठी एका टोकाला त्रिकोणी लाकडी टोक असलेला वेताची लांब काठी. भारतातील मणिपुरचा हा प्राचीन खेळ समजला जातो. इसवी सन पूर्व ३१०० वर्षांपूर्वी या खेळाची सुरुवात मणिपुरमध्ये झाल्याचे इतिहास सांगतो. राजा खंगेम्बाच्या कारकिर्दीत हा खेळ खूप लोकप्रिय झाला होता. हा खेळ म्हणजे एक लढाऊ प्रशिक्षण असायचे. यातील खेळाचे खरे योद्धे लहान पण वेगवान, चपळ व शक्तिशाली असे मणिपुरी घोडे असतात. हा खेळ जगभरातल्या पोलो खेळाचे मूल स्वरूप मानले जाते. हा नुसता खेळ नाही तर मणीपुरचा इतिहास व संस्कृतीपण आहे. मणिपुर येथील मैतेई योद्ध्यांचा वारसा आहे. दरवर्षी नोहेमबर मध्ये सांगाई महोत्सवात संगोल कांगजेई स्पर्धा होतात. इंफाळमध्ये जगातले सर्वात जुने पोलो ग्राउंड आहे. ब्रिटीशांना हा खेळ खूप आवडला तो त्यांनी त्यांच्या देशात नेला, त्याचे नियम निश्चित केले. मोठे घोडे, मोठे मैदान असे बदल करून स्वत:चे नाव देऊन नवा खेळ पोलो म्हणून प्रसिद्ध केला. नंतर तो जगभर पसरला, आता जागतिक स्तरावर याच्या प्रतिष्ठित स्पर्धा भरतात. म्हणजे पोलो हा खेळ भारताने जगाला दिलेला खेळ म्हणजे एक देणगीच आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची अशीच गोष्ट आहे.


                                          

मार्शल आर्ट -मणीपुरी युद्धकला ‘थांग-ता’. वसाहतवादी राजवटीने या कलेवर बंदी घातली होती. पण योद्ध्यांनी ही कला कौटुंबिक परंपरा म्हणून नंतर जपली व वाढवली आणि आजतागायत जिवंत ठेवली आहे. यात तलवार आणि भाला या शस्त्रावर प्रभुत्व मिळवून लढण्याच्या आणि स्व-संरक्षणाच्या युक्त्या शिकविल्या जातात. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी विकसित केलेले हे कौशल्य म्हणजे त्यांची जिवनशैलीच आहे.

तिरंदाजी- bow and arrow – धनुष्याच्या सहाय्याने आपल्या लक्षाच्या दिशेने बाण सोडणे व त्याचा वेध घेणे म्हणजे तिरंदाजी. हजारो वर्षापासून प्रचलित असलेली ही धनुर्विद्या आहे. सुरुवातीला युद्धाचे आणि शिकारीचे साधन म्हणून याचा वापर होत होता. याची मुळे पाषाण युगापासून दिसतात. ग्रीक, रोमन आणि आर्मेनियन यांच्या इतिहासात निष्णात धनुर्धारी अश्या वीरांचे उल्लेख आहेत. भारतात एकापेक्षा एक सरस असे धनुर्धर होते. आपल्या इथे पौराणिक कथांमध्ये कर्ण, अभिमन्यु, एकलव्य, अर्जुन, भीष्म, द्रोण, प्रभू श्रीराम, शिव ही व्यक्तिमत्वे नेमबाजीसाठी ओळखली जात होती.


                                

विदेशी खेळसुद्धा भारतात खेळले जातात. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, गोल्फ, हे प्रामुख्याने पाश्चिमात्य देशातून आपल्याकडे आलेले आहेत व लोकप्रिय झाले आहेत. क्रिकेटच्या ‘वेडाचे’ वेगळे वर्णन करण्याची आवश्यकताच नाही.




                                     

लंगडी, खो-खो, कबड्डी, गोट्या, विटीदांडू, मल्लखांब, रस्सीखेच हे खेळ भारतीय परंपरेतून विकसित झालेले आहेत. हे खेळ शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी उपयुक्त ठरले आहेत. प्राचीन काळी खेळासाठी नैसर्गिक साधनसामग्री वापरली जात होती, उदा. दगड, लाकूड, माती. आज खेळांसाठी अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे, जसे की फायबर बॅट, सिंथेटिक बॉल, कृत्रिम मैदान. पण तरीही पारंपरिक खेळातला आनंद हल्लीच्या पिढीतील मुलांना मिळत नाही, घेत येत नाही. याचे कारण व्यायामाचे महत्व वाटत नाही. दुर्दैवाने बहुसंख्य पालकांनासुद्धा याची गरज वाटत नाही. आई-वडीलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. प्रत्येकजण करियरमागे व स्पर्धेत टिकण्यासाठी धावतोय. मोबाईलच्या आत्यंतिक आहारी गेलेले लोक आहेत आणि त्याच्या ‘व्यसनातून’ त्यांना कसे सोडावयाचे हा एक यक्ष प्रश्न समाजधुरीणांच्यासमोर निर्माण झालेला आहे. साहजिकच आपल्या परंपरा पाळायला, त्या पाळण्याचा आग्रह धरून त्या अंमलात आणायला मोठ्यानाच जमत नसेल तर आजची पिढी म्हणजे लहान मुले ही सुद्धा अनभिज्ञच राहतील. त्यांना खेळांचे महत्व कसे कळणार? त्याचे लाभ कसे कळणार ?


                                            
लाभ - खेळांमुळे शरीर तंदुरुस्त व सुदृढ राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि स्नायू मजबूत होतात. धावणे, पोहणे या प्रकारच्या खेळांमुळे हृदय व फुफुसे मजबूत होतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर खेळ मनावरचा ताण-तणाव कमी करतात, व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतात आणि त्याची निर्णयक्षमता अधिक चांगली होते. सहकार्यभावना वाढीस लागते. तसेच खेळांमुळे आनंद व सकारात्मक विचारसरणी निर्माण होते. भारतीय पारंपरिक खेळांचा विचार केल्यास खो-खो, कबड्डी इ. खेळांसाठी फार साहित्याची आवश्यकता नसते. काही खेळांसाठी अत्यल्प साधने लागतात. ते खेळ खेळण्यासाठी विशेष अशा पूर्व अटी आवश्यक नसतात. सैलसर कपडे आणि मोकळे मैदान इतकेच आवश्यक असते. मागील अनेक वर्षांपासून क्रीडाक्षेत्रात अनेकविध व्यावसायिक संधीही निर्माण होत आहेत. एखाद्या क्रीडाप्रकारांत करीयर करायची महत्वाकांक्षा बाळगून अनेक युवक-युवती पुढे येतांना दिसतात. त्यांना उत्कृष्ठ मार्गदर्शन करणारी तज्ज्ञ मंडळीही सुदैवाने उपलब्ध आहेत. शासकीय पातळीवर अनेकविध प्रयत्न व उपक्रम आखले जात आहेत. लहानपणापासूनच भावी खेळाडूतील गुण हेरून त्याला त्यात प्राविण्य मिळवता यावे यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न केले जातात. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. त्यांना क्रीडाविषयक सोई-सुविधा देऊन, त्यांच्यातील ‘स्पार्क’ हेरून खेळाडूला घडवण्याचा प्रयत्न केला जातो.

आपले पारंपरिक खेळ शारीरिक विकासाबरोबरच, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक दृष्टीने ही महातवाचे ठरतात, आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत अश्या विचारातून ही भावी पिढी शारीरिक तंदुरुस्त व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायची असेल, सामाजिक एकता टिकवायची असेल आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावायचे असेल तर, सहज साध्य होणारे, सुलभ असणारे, आर्थिक दृष्टीने परवडणारे, मनाला आनंद देणारे, व्यक्तिमत्व विकसित करणारे, अनेक सामाजिक लाभ मिळणारे असे हे सर्व पारंपरिक खेळ माहिती करून घेऊन खेळले पाहिजेत. नालंदा आणि तक्षशीला या प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये लष्करी प्रशिक्षण, कुस्ती, धनुर्विद्या, पोहणे, श्वासोच्छवासाचे व्यायाम, योग हे अभ्यासक्रमाचे अविभाज्य भाग होते. हा विचार प्रत्येक घरात, शाळांमध्ये, समाजामध्ये, रुजवला पाहिजे. हे खेळ जपले पाहिजेत. कारण हा आपल्या संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे, जो मागच्या पिढीकडून आपल्याला मिळाला आहे.

ले. डॉ नयना कासखेडीकर .

------------------

राज्यकर्ती अहिल्याबाई

 

राज्यकर्ती अहिल्याबाई

राजकारणात  फक्त पुरुषांचीच मक्तेदारी आहे. महिलांना त्यातले काय कळते? असा दृष्टिकोन नेहमी दिसतो. एकोणिसाव्या शतकाच्या सामाजिक सुधारणेच्या काळापर्यंत स्त्रीचे विश्व म्हणजे चूल आणि मूल एव्हढेच मर्यादित होते. एव्हढेच नव्हे तर तिने त्या पलीकडे जाऊच नये. शिकू नये नाहीतर ती बिघडेल अशी भीती काही जणांना होती.पण इतिहासात डोकावले तर अशी अनेक उदाहरणे दिसतात कि स्त्रिया राजकारभारात प्रत्यक्ष कामात नसल्या तरी अप्रत्यक्षपणे सल्ला देण्याचे काम उत्तम करत होत्या. प्रत्यक्ष कामात त्यांना संधी नसेच. पण संधी मिळाली तर त्या उत्तम राज्य कारभार चालवू शकतात. चांगले कौशल्य साधू शकतात. शिक्षण मिळाले तर चांगले संधीचे सोने करू शकतात. हे अनुभवाने सिद्ध होत गेले आहे. या स्त्रिया प्रजेचे हित लक्षात घेतात. राज्याचे चांगले रक्षण करतात.

अहिल्याबाई होळकर या त्यातल्याच एक राज्यकारभार चालवणाऱ्या उत्तम राजकारणी होत्या. वेगवेगळ्या कालखंडात स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला तर ,अनेक धुरंधर स्त्रिया दिसतात. हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छाअसे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या मातोश्री जिजाबाई होत. हे हि ईच्छा शिवाजींच्या मनात बीजरूपाने रोवणाऱ्या मातोश्रीच  होत्या. असे संस्कार बालपणापासूनच शिवाजी महाराजांवर आई जिजाबाई यांनी केले होते. राज्य कारभारातील अनेक कौशल्ये त्यांनी बाल शिवाजींना शिकवली होती.

पेशवाईच्या कालखंडात पण कर्तृत्ववान स्त्रिया होत्या. अहिल्या बाई होळकर त्या पैकीच एक . रणांगणावर सुद्धा जीवाची बाजी लावणाऱ्या स्त्रिया भारतातीलच. राणी लक्ष्मीबाई यांचेही कर्तृत्व आपल्याला माहिती आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिलांचा सहभाग होता. त्या नंतरच्या काळात सुद्धा अनेकींनी राजकारणात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

कुटुंबात स्त्री हि मुख्य घटक असते.लोकशाहीमध्ये तिचा वाटा निम्मा आहेच. तशी ती समाजात, चळवळीत,सार्वजनिक जीवनात, हातात तर राजकीय जीवनात सुद्धा ती महत्वाची भूमिका बजावत आहे. स्त्री जात्याच संवेदनशील असल्याने कुटुंब सांभाळतांना ती चोख जबाबदारी बजावते त्या प्रमाणेच इतर क्षेत्रात सुद्धा तशीच कर्तव्य बजावत असते.

फक्त तिला जाणणारा. तिची हुशारी, कौशल्य याची पारख करणारा समाज अथवा कुटुंब  हवे. ज्याला ते कळेल तोच स्त्रियांना संधी देईल. कारण अजूनही बऱ्याच अंशी पुरुषी वर्चस्व असलेल्या समाजात स्त्रियांना महत्वाची संधी मिळेलच असे नाही.अगदी हेच अहिल्याबाई यांच्या बाबत घडले असे म्हणता येईल.

  पूर्वी लहान वयात लग्न  होत असत. त्यामुळे सासरी घरात सून म्हणून जरी प्रवेश झाला असला तरी लहान वयातल्या या सुनेवर घरातले वडीलधारे संस्कार करत असत. अहिल्येचे खंडेरावांशी लग्न वयाच्या आठव्या वर्षीच झाले. होळकरांचे तर सुभेदार घराणे होते.त्यामुळे घरातले वातावरण, कामाचा प्रकार, हे सगळंच अहिल्याबाईंना लहानपणापासून परिचयाचे झाले होते. लहान अहिल्येची चुणूक बघून मल्हारराव तिलाच महत्वाची कामे सांगत असत.याच वातावरणात तीची जडणघडण होत होती. तिची बुद्धीमत्ता ,अंगभूत कौशल्ये, हजरजबाबीपणा, निर्णय क्षमता हे सासरे मल्हाररावांनी ओळखले होते. तिला लहान वयातच सांगितलेली कामे ती चोखपणे करत असे. हे ओळखूनच  मल्हररावांनी मुलगा खंडेराव याच्या निधनांनंतर अहिल्येला सती जाऊ न देता तिच्यावर विश्वास दाखवला होता. खंडेराव च्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी काहीही सल्ला मसलत किंवा हितगुज करायचे असल्यास अहिल्या बाईंनाच ते विषय सांगत असत. इतकी अहिल्याबाई बद्दल मल्हार रावांना खात्री वाटत असे.

मल्हारराव मग खंडेराव आणि पुढे मुलगा मालेराव हेच वारस म्हणून सत्तेत होते.परंतु मुलगा खन्डेराव च्या मृत्युनंन्तर मल्हारराव अहिल्येकडेच खरा वारस म्हणून बघत होते. ते अहिल्येमध्येच खंडेराव बघत होते. मुलाचे दुःख तर मल्हाररावांना होतेच तेंव्हापासून ते अहिल्येची सतत मदत घेऊ लागले, त्यामुळे अहिल्येचा राज्यकारभारातील कामाचा आलेख दिवसेंदिवस चढताच राहिला. सुभेदारांच्या सर्व सूचना व त्यांनी दिलेली उद्दिष्ट्ये व्यवस्थितपणे पूर्ण करणे /सर्व परगण्यातील व्यवहार त्या चोख बघत असल्याने आता माळवा / इंदूर प्रांतांची मल्हाररावांना काळजी नव्हती राहिली. राजकीय परिस्थितीवर सुद्धा अहिल्येचे बारकाईने लक्ष होते हेही त्यांना दिसले.

 मल्हारराव मोहिमेवर गेले की सर्व कारभार अहिल्या बघत असे. मल्हाररावांच्या सूचनेनुसार सर्व व्यवस्था करीत असत. हिंदुस्थानात अब्दालीच्या करामतींच्या बातम्या कानवर येत होत्या. त्याने मथुरा वृंदावनात मुंडक्यांच्या राशी घातल्या, हे कळल्यावर त्यांनी ठरविले की, हिंदूंना आता चिरेबंद आश्रयस्थाने हवीत . त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधून घेतल्या.   

          राजकारण करता करता एकाच वेळी ब्रिटिश चोहोबाजूंनी वाढत असता, आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न करत होत्या. राज्यात पाणी पुरवठा सुधारणा घडवल्या. त्यांनी अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या, चिरेबंदी विहिरी खोदल्या, राज्यातून उन्हाळ्यात प्रवास करणार्‍या लोकांसाठी पाणपोया बांधल्या, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, नद्यांवर घाट बांधले, स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी व सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवर्‍या बांधल्या, वेळोवेळी आक्रमणात उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

 पुलांचे बांधकाम, रस्ते निर्मिती, रस्ते दुरूस्ती, डाक व्यवस्था,रायते साथी शिक्षणाची व्यवस्था ग्रंथ संग्रह व ग्रंथ निर्मिती,आरोग्यासाठी दवाखाने , औषधी बागा, शेतीसाठी सिंचना सोयी, जमीनिसाठी ९\ ११चा  कायदा ,माळरानावर वृक्षलागवड  आरक्षित गायरान , करप्रणाली ,विद्वान आणि कलाकार यांना राजाश्रय अशा अनेक गोष्टी केल्या .

    मालेरावच्या निधनापर्यंत हातात सत्ता नसताना अहिल्याबाई राज्यकारभारात लक्ष देत होत्याच पण खऱ्या अर्थाने त्या मालेरावच्या मृत्यूनंतरच राज्यकर्त्या झाल्या. म्हणूनच हातात राज्याचा कारभार प्रत्यक्षपणे नसतांना सुद्धा अनेक विषय हाताळण्याचा अनुभव अहिल्या बाईंना आतपर्यंत काम केल्यामुळे होता. तसंच स्वतंत्रपणे राज्यकारभार हातात येईपर्यंतच्या काळात अहिल्या बाई अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सामोऱ्या गेल्या होत्या. एक स्त्री म्हणून सामाजिक, कौटुंबिक स्तरावर अनेक रूढी परंपरांचे मणामणांचे ओझे त्यांनी सांभाळले होते. सती सारख्या प्रथांना बळी पडलेल्या स्त्रिया त्यांच्या कुटुंबातच त्यांनी पाहिल्या होत्या. सती जाणं, वारसा हक्क, हुंडा पद्धती, विधवांचे अधिकार,अशा अनेक प्रथांचा स्त्रियांना काय त्रास भोगाव लागतो ते अहिल्याबाईंनी स्वतःअनुभवले होते. एक स्त्री म्हणून सर्व जाणीव आणि संवेदनशीलता त्यांच्यात होती. म्हणून त्यांच्या राज्यात समाजातील स्त्रियांना अहिल्याबाई एक हक्काचा आधार वाटत होत्या. अहिल्याबाईंनी अनेक स्त्रियांना परंपरेच्या काही जोखडातून मुक्त करून तिच्या व्यक्तिमत्व विकासाला वाट दिल्याचे दिसते. स्वातंत्र्य दिल्याचे दिसते. त्यांचे सुधारणावादी विचार यातून लक्षात येतात.         

     राज्य कारभारातले सर्व समस्या विषय अहिल्या बाई सहज पणे सोडवत असत. मग आर्थिक व्यवस्था, सामाजिक प्रश्न, लोकांचे हिताचे निर्णय, न्याय व्यवस्था, अगदी रणांगण अथवा युद्ध विषय, त्या संबधीचे निर्णय घेणं, हिशोब हे सर्व अहिल्याबाई कौशल्याने हाताळत असत. कुटुंबातील अनुभव प्रत्यक्ष घेतले होतेच पण आपल्या राज्यावर झालेले आक्रमण हेही त्यांनी पाहिले. पानिपत च्या युद्धात पराभव झालेला व त्याचे दुःख आणि परिणाम त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. यावेळी अहिल्येची सासरेबुवांना खूप मदत झाली. सुभेदाराची कर्तव्ये  ही   आपलीही  जबाबदारी समजून सून अहिल्या पुढे सरसावली.पानिपतानंतर सासूबाई गौतमा बाई यांचे निधन झाले त्यामुळे संसारात तत्वज्ञान सांगणाऱ्या, मैत्रीपूर्ण वागणाऱ्या, धीर देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या सासूबाई पण गेल्या. जाताना अहिल्येला सांगून गेल्या कि तुला इथून पुढे कुटुंबाबरोबर राज्य कारभार आणि म्हातारे होत आलेले सुभेदार सासरे, मल्हारराव याना तुलाच सांभाळावे लागणार आहे. असा सगळ्यांचाच आधारवड म्हणजे अहिल्याबाई होत्या. प्रजेच्या कल्याणाबरोबरच त्या इतरांचीही काळजी घेत असत.  

     प्रजेबरोबरच प्राणी, पक्षी यांच्या आयुष्याचा विचार सुद्धा राज्यकर्ती  म्हणून अहिल्याबाई करत असत. त्यांचे कार्य इंदूर उज्जैन पर्यन्त्च मर्यादित नव्हते. केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी, ते द्वारका असे चारही दिशांना होते. विशेष म्हणजे सर्व प्रांतातील माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांनी गंगेचे पाणी महाशिवरात्रीला प्रांताप्रांतात कावडीने नेण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे प्रांतीय भारत जोडला गेला. ते कुठलीही सक्ती न करता, सात्विकता या त्यांच्या गुणामुळेच. माणसांबरोबरच पशू, पक्षी, प्राणी यांचाही विचार त्या करत. त्यांच्यासाठी डोण्या, वैद्यकीय उपचाराची सोय केली होती. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी हकीम व वैद्य नेमले, एव्हढेच काय मुंग्या व जलचर प्राण्यांसाठी सुद्धा साखर, कणकेच्या गोळ्या असे  अन्नदान करीत. गोरगरिबांना सणासुदीला अन्नदान, कपडे ,थंडीपासून संरक्षण म्हणून घोंगड्या वाटप करीत.

त्यांच्याकडे दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथसंग्रह होता. विद्वान आणि कलावंत यांची त्या कदर करीत, योग्य तो मानसन्मान देत. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी इतर प्रांतातील शास्त्री, पंडित, वैद्य व वैदिक यांना आणून,राहण्याची सोय करून त्यांनी एक प्रकारे ज्ञान संवर्धन व संरक्षण केले. उदा. काशी येथील ब्रह्मपुरी,

 कायदा आणि न्यायदानात सुद्धा योग्य दिशेने काम करत असत. त्या इतक्या चाणाक्ष होत्या कि त्या काळात कायद्यात आवश्यक ते बदल  (सुधारणा) त्यांनी करवून घेतले होते. जे समाजाच्या हिताचेच होते.राज्याचे आर्थिक धोरण सुद्धा त्या कौशल्याने हाताळत असत. जगाच्या इतिहासात उत्कृष्ट प्रशासिका म्हणून अहिल्याबाई होळकर यांची नोंद आहे  .

अठराव्या शतकातील, २८ वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्ती म्हणजे अहिल्यादेवी . अहिल्यादेवी यांचा राज्याचा काळ ( १७६७ - गादीवर बसून ते १७९५- निधन होईपर्यंत )म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले सोनेरी पान.  

  लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावेत म्हणून योग्य ते धोरण त्यांनी आखले होते. राज्यकारभार चालवताना त्यांनी जनतेच्या अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीबरोबरच, समता शांतता, बंधुता, न्याय, विचार स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मुल्यांची जपणूक त्यांच्या काळात झालेली दिसते.

    अहिल्याबाईंच्या बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा ,प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म टिकला, संस्कृती संवर्धन झाले. कलेला प्रोत्साहन मिळाले. चरीतार्थाची साधने उपलब्ध झाली. त्यांनी आपल्या सासर्‍यांचे ,होळकर घराण्याचे नाव स्व -कर्तृत्वाने इतिहासात अजरामर केले.

     अठराव्या शतकातील, 28 वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्तीची ओळख तुम्हा आम्हाला झाली ती गुणांची जाण असणाऱ्या केवळ आणि केवळ मल्हारराव होळकर यांच्यामुळेच .नाहीतर सर्व सामान्य अहिल्या खंडेरावांच्या मृत्यनंतर सती गेली असती तर एक कर्तृत्ववान राज्यकर्ती महिला म्हणून अहिल्या बाई कुणालाच समजल्या नसत्या. त्यांच्या राज्यकारभाराने अनेक मापदंड आजच्या राज्यकर्त्यांना घालून दिले आहेत, अनेक आदर्श उदाहरणे समोर ठेवली आहेत.राज्य कर्त्यांची कर्तव्ये काय असली पाहिजेत हे दाखवून दिले आहे. एक सामान्य स्त्री      बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा, प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म आणि संस्कृती टिकून ठेऊ शकते याचे पुढच्या पिढीला धडे देऊन गेली आहे. या राज्यकर्तीला शतशः प्रणाम !  (हा लेख 'राजकारणातील महिलांचा सहभाग' या विशेषांकात प्रसिद्ध झाला.)

ले. डॉ. नयना कासखेडीकर ,पुणे 

—------------------------------------------------------------

Saturday, 21 June 2025

कलांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती

 

(राष्ट्र समर्पित कलासाधना या विषयावरील सांस्कृतिक वार्तापत्राच्या २६ जानेवारी २०२५ च्या अंकात हा प्रमुख लेख म्हणून प्रसिद्ध झाला.)

कलांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती

 राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयत्व या संकल्पना एकमेकांशी संलग्न आहेत. एखाद्या विशिष्ठ भूमीवर कायमस्वरूपी वस्ती करून राहणाऱ्या लोकांचा समुदाय सार्वभौम सरकार स्थापन करतो, ते राज्य असते आणि अशा राज्यातील लोकाना जेव्हा आपल्या या प्रदेशाविषयी प्रेम, आदर आणि अभिमान वाटतो, तेंव्हा त्याला राष्ट्र म्हणतात’. कलांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती कशी हे समजून घेताना आधी राष्ट्रभक्ती म्हणजे काय ते समजून घ्यायला हवे. खरं तर राष्ट्रभक्तीची भावना अगदी पूर्वीपासून आहे.मानवी उत्क्रांतीची अवस्था पाहिली की लक्षात येते की मानव जेंव्हा समूह करून राहायला लागला तेव्हापासून तो राहात असलेल्या  परिसराबद्दल, बरोबरच्या लोकांबद्दल आपुलकी, प्रेम, सहवेदना या भावना निर्माण झाल्या. पुढे या भावनांचा  विस्तार झाला तेंव्हा याच भावना वेगळ्या परिस्थितीत राष्ट्राशी निगडीत झाल्या. 

    सगळ्यांना या राष्ट्राविषयी प्रेम,अभिमान आणि निष्ठा असणे यालाच राष्ट्रीयत्व असे म्हणतात. एकाच वंशात जन्मलेले लोक राष्ट्र निर्माण करू शकतात असे म्हणतात. म्हणूनच आम्ही आपल्या राष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हणतो. याचे महत्वाचे घटक म्हणजे,भौगोलिक एकता, समान इतिहास, समान वंश, समान भाषा, समान धर्म, समान संस्कृती, समान राजकीय उद्दिष्टे ,समान आदर्श आणि स्व-राज्य. या घटकांचा उद्देश मुख्यत: स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जागृती निर्माण करणे, त्यासाठी लोकांना एकत्र आणून एकता आणि सहकार्याची भावना, राष्ट्रप्रेम जागृत करणे व ती कायम राखणे तसेच  विचार व भावनांचे आदान प्रदान करणे, संस्कृतीचे जतन करणे हा होता. जनतेला राष्ट्राप्रती संवर्धन, संरक्षण आणि समर्पण असा संदेश देण्याचे प्रभावी काम कलांच्या माध्यमातून होते.

   कला म्हणजे आपल्या मनातील  विचार आणि भावना यांची अभिव्यक्ति !. जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशाची कला वेगवेगळी आहे. इजिप्शियन कला, मेसोपोटेमियन कला, सुमेरियन कला, ग्रीक कला, रोमन कला इत्यादि. या कला त्या त्या देशाची परंपरा आणि आदर्श यावर आधारित आहेत . युरोपचा राष्ट्रवाद पाहिला तर त्यांच्या राष्ट्राच्या विकासात भाषा, लोकसंगीत, लोककाव्य, लोकनृत्य आणि संगीत या कलांचा मोठा वाटा आहे.

   आपल्याकडील कला प्राचीन आहेत. आपल्या देशाच्या कलेमध्ये सुद्धा  याचप्रमाणे आपले आदर्श, आपल्या परंपरा आपली मूल्ये ,विचार यांचे प्रतिबिंब दिसते. राष्ट्रीयत्वाचा/राष्ट्रभक्तीचा विचार सुद्धा आपल्याकडे प्रथम साहित्यातून, तदनंतर विविध ललित कलांमधून दिसायला लागला. कारण आपल्या संस्कृतीत जीवन जगण्यासाठीची मूल्ये, अगदी मानवाच्या उत्क्रांती पासूनच आहेत. पण वैयक्तिक आयुष्यात असतात त्या प्रमाणेच या मूल्यांचा उपयोग राष्ट्रासाठी केला गेला तर समाजात एकात्मतेची भावना लवकर रुजते. राष्ट्राप्रति निष्ठा वाढते. तीच राष्ट्राच्या विकासासाठी ,प्रगतीसाठी आवश्यक असते. राष्ट्राबद्दल जेव्हढी निष्ठा अधिक, तेव्हढी राष्ट्राची प्रगती जास्त, तेव्हढा  विकास चांगला .सामाजिक ऐक्य/समता, न्याय आणि एकता ही सामूहिक मूल्ये राष्ट्रभक्ती मध्ये महत्वाची असतात .प्रत्येक संस्कृतीत वेगवेगळी मूल्ये आढळतात. म्हणूनच पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृती वेगळी आहे. न्याय, निष्ठा, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मैत्री, वक्तशीरपणा, सहनशीलता आणि प्रामाणिकपणा ही मूल्ये म्हणजे मार्गदर्शक तत्वे असतात. हेच सर्व विषय विविध कलांमधून मांडले जातात. .    


 राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीयत्वाचा विचार इतिहासातील काही महत्वाची घटनांवरून १९ व्या  शतकात सुरू झाल्याचे दिसते. वर्षानुवर्षे अनेक आक्रमणे झेलत भारत पुन्हा पुन्हा ठामपणे उभा  राहत  होता,त्यामागे धर्माचे अधिष्ठान होते. धर्मच आपल्या प्राचीन  संस्कृतीचा भक्कम पाया होता. पण जेंव्हा ब्रिटिशांच्या अंमलाखाली भारत आला तेंव्हा साम्राज्यवाद आणि वसाहतवाद यांच्या विरोधात झालेल्या जागृतीतून १९ व्या  शतकात राष्ट्रवाद ही संकल्पना आशिया आणि आफ्रिका खंडात निर्माण झाली.आणि कला हे राष्ट्रीय आंदोलनाचे माध्यम बनले . प्रथम साहित्यातून याचे हुंकार येऊ लागले. याचे उदाहरण म्हणजे बंकिमचंद्रांची आनंदमठकादंबरी आणि त्यातील स्वातंत्र्यलढ्यातील घोषणा असलेले  वंदे मातरम हे गीत.यातून मिळणारी देशभक्तीची प्रेरणा आपण आज सुद्धा अनुभवतो. राष्ट्रहित हेच माझे हित आहे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे.अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करायला लागते . ते काम कलांच्या माध्यमातून प्रभावीपणे होऊ शकते.जे राष्ट्र एकत्र गाईल तेच एक राहीलअसे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी एकदा आपल्या भाषणात म्हटले होते.

     समाजावर राष्ट्रीय संस्कार करण्याचे काम ललितकलांच्या माध्यमातून चांगले होऊ शकते या अनुभवातून   भारतीयांनी  मुळातच भारतीय कलांची आपापली वैशिष्ट्ये जपली आहेत.कलांचे ध्येय असते लोकांना त्यांचे अर्थपूर्ण अस्तित्व दाखवणे, मनास तोषविणे. कला लोकांना शिक्षित करते आणि त्यांचे प्रबोधन करते. आपल्या  ६४ भारतीय कलांपैकी.नृत्य. नाटक, संगीत,चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, चित्रण छायाचित्रण, कॅलिग्राफी, ग्राफिक्स, लोककला, हस्तकला या सामाजिक व्यवहारातील कला आहेत. माध्यम वेगवेगळे आहे पण या कालांमधून शब्द, रंग, रूप, आकार,आवाज भावना व्यक्त करण्याची शैली लोकांना आकर्षित करते.त्यांच्या मनावर परिणाम करते. एक प्रकारे संवाद साधत असते . म्हणून यातून प्रसारित झालेल्या भावना अधिक परिणामकारक उद्देश साधणाऱ्य ठरतात, मग जगाच्या पार्श्वभूमीवर आपला देश हा माझा देश असा अभिमान जागृत होतो. एकदा समाज या विचाराने प्रेरित झाला की राष्ट्रप्रेमाची भावना याच दृष्टिकोनातून विचार व कृती करायला लागतो. अनुकरण करायला लागतो. कारण कला हे प्रभावी माध्यम आहे.त्यांचा आविष्कार सौंदर्यात्मक असतो .या सौंदर्याच्या अनुभवाबरोबर  आपण कलेतून वास्तवाचा शोध पण घेत असतो.                       

                                 

             आपल्या राष्ट्रीयते चा आधार हिंदू धर्म आणि संस्कृती आहे. म्हणूनच ते राष्ट्रीय एकात्मकतेचे मूळ आहे. आपल्या कडील शिल्पकला, मूर्तिकला, वास्तुकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य, नाट्य,संगीत,हा कलांचा प्राचीन वारसा आहेच.भारतीय कलांचा उद्गम हजारो वर्षापासूनचा आहे.त्याचा अलीकडचा प्रवास अभ्यासला  तर या कलांवर सांस्कृतिक, भौगोलिक,आणि धार्मिक प्रभाव आढळतो.विशेषत: भारतीय उपखंडातील सर्व प्रदेशातील बौद्ध ,जैन,हिंदू, मुस्लिम या धर्माचा प्रभाव दिसतो. प्राचीन लेण्यांची शैली बघितली तर दगडातून कोरलेल्या अनेक आकृती, प्रसंग, वेशभूषा,काही उत्सव,यातून त्या काळाच्या संस्कृतीचे दर्शन आपल्याला घडते. विशेषतः लाकडावरील काम ,धातुकाम, चित्रकाम, कुंभारकाम,याचे ऐतिहासिक प्राचीन पुरावे हडप्पा मोहेंजदडो संस्कृतीत सापडले आहेत.हे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे.साहजिकच यातील काही प्रतीके राष्ट्रभक्तीची प्रेरणा देण्यासाठी या काळात वापरलेली दिसतात .मौर्य काळातला सारनाथ येथील अशोक स्तंभ ,१९५० मध्ये हे प्रतीक राष्ट्रीय प्रतीक म्हणून निश्चित केले गेले. त्या स्तंभावारील अशोक चक्र आपल्या देशाच्या तिरंगा झेंड्यावर मध्ये घेण्यात आले. आपल्या संस्कृतीतील ऐतिहासिक चिन्हे/प्रतीकेच राष्ट्रीय प्रतीके म्हणून पुढच्या काळात आपल्याला दिसतात.राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत ही राष्ट्रीय प्रतीके राष्ट्रा बद्दल प्रेम व निष्ठा हा भाव मनात जागविणारी असतात.

   पण राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रभक्ती प्रकर्षाने दिसली ती भारत पारतंत्र्यात असताना. ब्रिटिशां विरुद्ध स्वातंत्र्याचा लढा देत असताना.जेंव्हा स्वबोध झाला तेंव्हा. समाजातील सर्व स्तरातील लोकानी मिळून  बलाढ्य अशा वसाहतवादी ब्रिटिश साम्राज्याला शरणागती पत्करायला लावली. १७५७ मध्ये  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल मध्ये प्लासीची लढाई जिंकली आणि स्वत:चे साम्राज्य उभे केले त्यांच्या साम्राज्याच्या विरोधातले आंदोलन जवळ जवळ १८६ वर्षे चालले होते.

 कंपनी सरकारचा कालखंड १७५७ ते १८५८ होता आणि ब्रिटिश साम्राज्याचा पुढे कालखंड १८५८ ते १९४७ असा होता. १८५७ चा लढा हे पहिले संघटित आंदोलन होते.

        त्यानंतरच्या घटना होत्या १८८५ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस ची स्थापना, १९०५ मध्ये बंगालचं  विभाजन, वंगभंग आंदोलन, लाल बाल पाल यांचा सहभाग, १९१५ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात आंदोलन, पुढे खिलाफत चळवळ, असहकार आंदोलन, चौरीचौरा  कांड, आझाद हिंद सेना स्थापना, भारत छोडो आंदोलन,१९४२ ची ऑगस्ट क्रांती आणि १९४७ला विभाजनाच्या दु:खात भारत स्वतंत्र झाला


मराठी मुलूखात इंग्रजी राजवट इ .स. १८१८ मध्ये सुरू झाली. ब्रिटिश राजवटीचा सर्वच क्षेत्रात समाजाला त्रास होऊ लागला. इंग्रजी शाळा आणि इंग्रजी शिक्षण यामुळे हिंदू संस्कृतीवरच घाला घालणारे वातावरण तयार होत होते. हिंदू लोकांचे ख्रिस्त धर्मात धर्मांतराचा समाजावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. गुलामगिरी, पिळवणूक, व्यापारांचे खच्चीकरण, हस्तव्यवसायाचा नाश, अशा अनेक बाजुंनी हिंदू समाज भरडला जात होता. त्या वेळचे समाज सुधारक वृत्तपत्रातून या राजवटीवर कोरडे ओढत होते. क्लेश देणार्या  घटनांचं प्रतिबिंब साहित्यातून पण उमटत होतं.

 विद्वान, पंडित, पुरोहित,, मौलवी, लेखक, कलावंत, जमीनदार, शेतकरी, कारागीर असे सर्वजण ब्रिटिश सरकारच्या विरोधात गेले. यात सामील होऊन त्यांनी. घरादाराचा त्याग केला, कोणी फकीरी पत्करली. अनेक स्वातंत्र्यवीरांनी परिणामांची तमा न बाळगता रणांगणात उडी घेतली. यात शाहीर आणि अनामिक कवी अग्रेसर होते.या काळात शाहीरांच्या आणि कवींच्या काव्य रचनांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांच्या गीतांनी लोकांच्या मनातील स्फुल्लिंग चेतविले आणि  स्वातंत्र्याच्या भावनेने भारावून जाऊन आपणही काहीतरी केले पाहिजे असे प्रत्येकाला वाटू लागले. लोकांना सकाळपासूनच स्वातंत्र्याची आठवण करून देऊन त्यांच्या मनात ही ज्योत पेटवण्याचे काम प्रभात फेऱ्यांची गीते करू लागली होती. एखादे गीत असे – ‘साखरझोपा कसल्या घेता राष्ट्र जळत असता?’ प्रभात फेरीतले पहाटेचे  हे गीत ऐकून लोकांच्या खरंचच झोपा उडत असत.


 यातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी व जागृती करण्यासाठी क्रांतीकारकांप्रमाणेच  भारतातील अनेक साहित्यिक, कवी यांनीही आपली लेखणी चालवली होती..हजारो देशभक्तिपर रचना निर्माण झाल्या ज्या सतत प्रेरणा देत होत्या. राष्ट्रभक्तीचे बीज रोवत होत्या. रविंद्रनाथ टागोर , बंकिम चंद्र चटटोपाध्याय, सुमित्रानन्दन पंत. हरिवंशराय बच्चन, मैथिली शरण गुप्त, माखनलाल चतुर्वेदी, महादेवी वर्मा, सूर्यकांत त्रिपाठी, रामधारी सिंह दिनकरते अटल बिहारी वाजपेयी अशा विचारवंत देशभक्तांच्या कविता साहित्य, कथा यातून समाजाला जागे करण्याचे काम झाले आहे.   

महाराष्ट्रात सुद्धा अगदी वसंत बापट, विंदा करंदीकर,,कुसुमाग्रज , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,कवी अनिल , कवि अज्ञातवासी, कवि यशवंत, माधव जूलियन, सेनापती बापट, स्वा. सावरकर, शाहीर गोविंद, भा.रा. तांबे, बा. भ. बोरकर, दु .आ. तिवारी, गोविंदाग्रज,आणि मराठी मध्ये देशभक्तीचा प्रवाह पहिल्यांदा आणणारे कवी  विनायक.इत्यादि. आपल्या पूर्वजांचे वैभव आणि त्यांची वीर वृत्ती याचे लोकांना स्मरण करून देऊन त्यातून त्यांना स्फूर्ती देणे ,पारतंत्र्यविषयी लोकांच्या मनात चीड उत्पन्न करणे या ध्यासाने विनायक कविता लिहित.दु आ तिवारी यांनी  मराठ्यांची संग्राम गीते लिहिली आहे. बा. भा. बोरकर यांची स्वातंत्र्यलक्ष्मीस कविता ,भा. रा. तांबे यांची रे हिंदबांधवा थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवालीअशी शौर्य दाखवणारी कविता .रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले? अशी स्वातंत्र्याची ललकारी देणारे, स्वातंत्र्य शाहीर कवि गोविंद यांच्या काव्य रचनेतून व्यक्त झालेली देशभक्तीची तळमळ, त्यांनी केलेल्या काव्य गायनामुळे  ब्रिटिशांनी शिक्षा केली होती. राष्ट्राबद्दल अस्मिता जगावण्याची इतकी मोठी शक्ति कवी गोविंद यांच्या कवितेत होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्यातील शब्द अन  शब्द राष्ट्रप्रेमाने भारलेला आहे. त्यांच्या  कवितेत दिव्य आणि दाहक स्वरूपात राष्ट्रीय जाणीव दिसते. आर्य बंधू हो उठा उठा, का मठासारखे नटा सदाहा स्वदेशीचा फटका तरुणांना स्फूर्ती देत होता.  


 साहित्य, गीते, पोवाडे, पदये ,फटके, प्रार्थना,बोधवाक्ये, जात्यावरच्या ओव्या, मेळ्याची गाणी, आंदोलनातील घोषणा,नाटकातील पदे, चित्रपट गीते, कीर्तन, भारुड, तसेच चित्रकला, रांगोळी, पेन्टिंग, अशा विविध कला माध्यमातून याचे दर्शन झाले आहे. माणुसकीचे पाईक आम्ही, या भारतात बंधु भाव नित्य वसू दे, या मातीचे मोल आम्हाला, देश हीच माता , बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, जाग जाग भारता , ए मेरे वतन के लोगो, मेरे देश की धरती.., भारत हमको जान से प्यारा है .., अशी अनेक देशभक्तीपर रचना लोकाना प्रेरणा देत होत्या. मनामनात  देशभक्ती जागवत होत्या. त्यामुळे हा लढा द्यायला लोकाना प्रेरणा मिळत होती धीर मिळत होता. राष्ट्रभक्तीपर गीत, कविता एकत्र येऊन गायल्यामुळे यातून सर्व हेवेदावे विसरून राष्ट्रभक्तीची सामूहिक भावना जागृत होते. 

याच पार्श्वभूमीवर काही नाटके लिहिली गेली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संन्यस्त खड्गहे नाटक देशावर संकट आले असताना झोपी गेलेल्या लोकाना जागे करण्यासाठी लिहिले होते. मॅझिनीचे चरित्र मराठीमध्ये लिहून लोकांना देशाच्या स्वातंत्र्याचे महत्व कळावे म्हणून सावरकरांनी केव्हढे तरी कष्ट घेतले. वृत्तपत्रे, साहित्य, काव्य या द्वारे जनजागृती चालूच होती.


चित्रपट ही दृश्यकला अत्यंत परिणामकारक आहे.आजादी ,उपकार, हम हिंदुस्तानी, गंगा जमून, जागृती, बूट पॉलिश, रोजा, हकीकत, काबुलीवला, लिडर, पूरब और पश्चिम, जिस देश मे गंगा बहती है, नया दौर, हमराही, द लीजेंड ऑफ भगत सिंह (Bhagat Singh- 2002)  स्वातंत्र्य सैनिकांवर बनवलेला हा चित्रपट,  रंग दे बसंती (Rang De Basanti- 2006), ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवणारे चित्रपट लगान (Lagaan- 2001), भारत पाक युद्धावर आधारीत बॉर्डर (Border- 1997), केसरी (Kesari- 2019), कारगिल युद्धावर बेतलेला एलओसी कारगिल (LOC Kargil- 2003), गोल्ड (Gold- 2018), चक दे इंडिया (Chak De India- 2007), राज़ी (Raazi- 2018), उरी (Uri The Surgical Strike - 2019), स्वदेश, सरफरोश, क्रांति, गांधी, वीर सावरकर,. मंगल पांडे, शहीद. जुनून, मदर इंडिया या चित्रपटांनी मनोरंजनाबरोबर राष्ट्रीय विषयातून राष्ट्रभक्तीची भावना लोकांमध्ये जागृत केली.

आता इलेक्ट्रॉनिक माध्यमात चित्रपटा इतक्याच प्रभावीपणे  राष्ट्रभक्ती विषयावरील मालिका ,कार्यक्रम,यांची निर्मिती होत असते. मिले सूर मेरा तुम्हारा..  या सर्व भाषिक गाण्याने तर इतिहास निर्माण केला.


संगीत  ही कला नाट्य, नृत्य आणि गीते यांना जोडून येते. शास्त्रीय संगीता पासून ,ए मेरे वतन के लोगो,हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, अशा वर्णनाचे भक्तिगीते, भावगीते ,भजने अभंग हे सर्व गीतप्रकार लोकांच्या मनावर वर्षानुवर्षे राज्य केले आहे. संतांनी आपल्या काव्याने भक्ती आंदोलनात भारताला जोडण्याचे काम केले आहे. त्यांचं मुख्य उद्देश बंधुत्व भावना जागृत करणे आणि देशाची संस्कृती व साहित्य तसेच अखंडता कायम राखण्याचे काम केले आहे. मीरा बाई नामदेव कबीर. सूरदास, तुलसीदास ही काही उदाहरणे होत . राष्ट्रीय एकता टिकवण्यासाठी आकाशवाणी आणि चित्रपटाने आपली भूमिका बजावली आहे. आवाज दो हम एक है….’ मोहम्मद रफी यांनी गायलेले या गीताने  देशातील अनेक कोटी लोकाना एकता या सूत्रात बांधून ठेवल्याचे दिसते.सामूहिक राष्ट्रगान खूप प्रभावी ठरते. संगीता मध्ये संपूर्ण राष्ट्र एकेतेच्या सूत्रात बांधून ठेवण्याची शक्ति असते.रविंद्रनाथ टागोर यांचे राष्ट्रगीत -जण गण  मन.. , बंकिम चंद्रांचे वंदेमातरम ..,प्रादेशिक भाषेत लिहिलेली देशभक्तीपर गीते,अब तुम्हारे हवाले वतन साथीओ.. ए मेरे वतन के लोगो..,  मॉ तुझे सलाम .. अशी गीते श्रोत्यांच्या मनात राष्ट्र भावना जागृत करतात.     


   
दशावतारी नाटके, लळित, तमाशा, बहुरूपी व खेळे (उत्स्फूर्त पणे विषय मांडणी), शाहीरी, नाटके, एकांकिका, प्रहसने, पथ नाटय, नृत्य नाट्य (कथा द्वारे विषय मांडणी) , महानाट्य, (बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा व इतर ऐतिहासिक महानाट्य ) लोककलेतील वासुदेव, जोगत्या, गोंधळी, गोसावी, शिमग्याची सोंगे, वारकरी भजने, वाघ्या या माध्यमातून सुद्धा राष्ट्रभक्तीचा विचार मांडला जातो. यात राष्ट्रभक्ती म्हणजे फक्त स्वातंत्र्याचा इतिहासच नव्हे तर राष्ट्राचा विकास, राष्ट्राची अखंडता, संस्कृतीचे संवर्धन. सामाजिक मूल्ये, नैतिक मूल्ये, कुटुंब व्यवस्था, न्याय ,एकता, सामाजिक समरसता, आपल्या संस्कृति व परंपरा यांचं इतिहास व महत्व आणि ते टिकवण्यासाठी प्रयत्न असे राष्ट्र भक्तीचे, राष्ट्रप्रेमाचे विषय, काळ  व परिस्थिति बघून मांडले गेले आहेत, मांडले जातात. राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण होऊन मानवतावाद रुजविण्यासाठी केवळ मनोरंजनच नाही तर, प्रबोधनातून लोक जागृतीची आवश्यकता आहे असे वाटून शाहीरी कवितेचा जन्म झाला ज्यातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडण घडणीत क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची शक्ति होती. असे शाहीरी पोवाडे गायले गेले. रचले गेले. याचा  उपयोग निरक्षर समाजाला नवी जाणीव करून देण्यासाठी आणि नवी दृष्टी  देण्यासाठी झाला.यातून पुढे लोकनाट्य, तमाशे, संगीत जलसे, मेळे या कलांचा वापर राष्ट्रीय प्रबोधन  करण्यासाठी होऊ लागला.यातूनच राष्ट्रीय भावनेने कला पथके निर्माण झाली. अण्णा भाऊ साठे,अमर शेख यांचे प्रसिद्ध पोवाडे लोकांमध्ये जागृती करणारे ठरले.अशा लोककलांमधून राष्ट्रीय विषय तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता येतात.


नृत्यकला ही एक अत्यंत कौशल्य असलेली कला आहे .हावभाव आणि विविध हस्तमुद्रा याद्वारे कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. याला ताल, लय, वाद्य, पदन्यास याची जोड असल्याने प्रेक्षक ते दृश्य बघताना एकाग्र होतो. यातून श्रृंगार रस, हास्य रस, करुण रस, क्रोध रस, भय रस, वीर रस, जुगुत्सा रस, विस्मय रस, शान्त रस दाखवले जातात. वीर रस असलेला कुठलाही राष्ट्रीय विषय सादर होतो तो परिणामकारक असतो.भारतीय नृत्याच्या विविध शैली व प्रकार आहेत. भरतनाट्यम, कुचीपुडी, कथ्थक,कथकली, मोहिनीअट्टम, मणीपुरी, यक्षगान, ओडिसी या शैली आहेत. आदिम संस्कृतीपासून नृत्य ही लोक परंपरा होती ती पुढे विकसित झाली. विशेष म्हणजे या कलेचे वैशिष्ट असे की यात गुरु शिष्य परंपरा असते जी भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ आहे. नृत्याचा उपयोग चित्रपटात मोठ्या प्रमाणात दिसतो. प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील संचलनात भारताच्या राष्ट्रीयता दाखवणारे असे अनेक चित्ररथ, नृत्य प्रकार ,संस्कृती, वैशिष्टपूर्ण असतात,     

 

          रांगोळी ही अशीच एक कला आहे तिला भू -अलंकरण म्हटले आहे, म्हणजे या नावातच आपल्या राष्ट्राची संस्कृती दिसते. आपण ज्या भूमीवर राहत आहोत त्या भूमीची स्वच्छता करून, तिला सजविणे, तिची पूजा करणे म्हणजेच या भूमीबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करणे हा संस्कार आपल्या संस्कृतीत आहे.रांगोळी  कला मांगल्य आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. घरात देवापुढे, जेवताना ताटा भोंवती, औक्षण करताना, दारासमोरील अंगण, परिसर, एखाद्या पूजा विधी, लग्न, कार्यक्रम, मंगल विधी या प्रसंगी त्या त्या विषयाचे महत्व सांगणारी रांगोळी रेखाटली जाते.ही कला म्हणजे भूमीवरील चित्रकला आहे.वेदकालापासून याची सुरुवात झालेली आढळते. त्या काळात फक्त यज्ञा भोवती रेखटली जाणारी रांगोळी आता भव्य स्वरूपात व अनेक विषय मांडणारी कला झाली आहे.आता रांगोळीची माध्यमे, तंत्रज्ञान यामुळे ती विकसित होऊन त्यात नवनवे प्रयोग होत आहेत. रांगोळी च्या रेखाटनातून आपला गौरवशाली इतिहास सांगणारे प्रसंग, राष्ट्रहित असणारे विषय, महाभारत, रामायण या सारख्या महाकाव्यातील प्रसंग, स्वातंत्र्याचा इतिहास, व्यक्तिचित्र असे अनेक राष्ट्रीय विषय रांगोळी कलेच्या प्रदर्शनातून आतापर्यंत मांडले गेले आहेत. सडा संमार्जन करून रांगोळी काढून घरा पुढे मंगलमय पवित्र असे वातावरण निर्मिती पासून, सुशोभना पासून एखादी कथा किंवा गोष्ट चित्रातून सांगावी अशी ही कला क्षणभंगुर आहे हे माहिती असून सुद्धा कलाकार त्यात जीव ओतून ती निर्माण करतात. सत्यमेव जयते , पाणी वाचवा , करोंना सारख्या लाटे मध्ये स्वच्छतेचा संदेश, आरोग्य, पर्यावरण, गुरुपौर्णिमा, कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम अथवा पायघड्या,  लग्न कार्ये, सण उत्सव यातील सजावट रांगोळी शिवाय पूर्णच होत नाही  मुख्य म्हणजे हा एक आता सामूहिक संस्कार पण झाला आहे. जेंव्हा समूहाने ही रांगोळी काढली जाते तेंव्हा माझ्या राष्ट्राची ही कला या गोष्टीने स्वाभिमानाने मान ताठ होते.

एकूणच मानवी जीवनात कलांचे महत्वपूर्ण स्थान आहे. कला मनुष्याला एकत्र आणणारे साधन आहे. भारतीय कलांची वैभवशाली परंपरा आहे आणि त्याचा  उपयोग राष्ट्र एक राहायला ,राष्ट्र जोडायला, प्रेम आणि सौहार्द वाढायला ,सहकार व विश्वास वाढायला होतो. याचे सर्वात प्रभावी ठरलेले उदाहरण म्हणजे आयोध्येचे राम मंदिर प्रतिष्ठापना झाली तेंव्हाचे वातावरण, उत्स्फूर्त प्रतिसाद होय.प्रभू श्रीराम हे भारतीय भक्तीचे तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे बोलके उदाहरण आहे. श्रीरामाची भक्ती राष्ट्रातील प्रत्येक प्रांतात सारखीच आहे. भाषा वेगळी असेल पण भाव तोच आहे.त्या संबंधित साहित्य,गीते, नाटके ,नृत्याविष्कार,पुस्तके, ग्रंथ याद्वारे लोकांच्या मनामनात श्रीराम पोहोचला आहे. नव्हे मनात श्रीराम भक्ती अजूनही जागृत आहे. श्रीराम हा विषय विविध कलां च्या माध्यमातून राष्ट्रातील लोकांना जोडणारा ठरला आहे.मराठीत गदिमांचे गीत रामायणही अजरामर कलाकृती ठरली. 


कला हे माध्यम राष्ट्रीयतेचा संस्कार करण्याचे प्रभावी माध्यम आहे. म्हणून त्याचे संवर्धन काटेकोरपणे झाले पाहिजे. जेंव्हा राष्ट्रावर एखादे संकट येते तेंव्हा संपूर्ण राष्ट्र तन मनाने एक होऊन एकत्र उभे राहते  तेंव्हा राष्ट्रीय एकतेचे प्रत्यक्ष रूप आपल्यासमोर येते. हे संस्कार लोकांवर करण्याची जबाबदारी कलाकार आणि कला संस्था यांची आहे. तेंव्हाच संस्कृती बरोबर राष्ट्राविषयी सकारात्मक जनमत घडविण्याचे काम कला करू शकतात.     

स्वामी विवेकानंद म्हणतात, “राष्ट्रीयता का आधार धर्म व संस्कृती ही होता है, हिंदू धर्म का प्रबंध ही हिंदुत्व की राष्ट्रीय परिभाषा है, ईसे राष्ट्रीय परिप्रेक्ष्य में समझने पर हमे हमारे विशाल देश की बाहरी विविधता में अंतर्निहित एकता के दर्शन होते है, सहस्त्राब्दीयोंसे  यह भारत वर्ष आर्यावर्त एक संघ सांस्कृतिक राष्ट्र रहा है”.

(यातील सर्व फोटो गुगल वरुन साभार परत . )

      

 © ले. डॉ.नयना कासखेडीकर, पुणे .

-------------------------------------------------

 

ऋतु हिरवा ऋतु बरवा

 

सकाळ ( गुढीपाडवा) विशेषांक श्रावण लेख २०२५

ऋतु हिरवा ऋतु बरवा

श्रावण आला गं वनी श्रावण आला.

दरवळे गंध मधुर ओला..

 


गदिमांनी श्रावणाच्या महिन्याचे अत्यंत बोलके वर्णन या कवितेत के;ले आहे. ग्रीष्म ऋतुतले ज्येष्ठ आणि आषाढ सरून वर्षा ऋतूच्या श्रावण भाद्रपदाकडे निसर्गाची वाटचाल सुरू होते आणि सगळा निसर्गच बदलतो . आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे आपले सण आणि व्रते महीने आणि ऋतु यांच्या समिकरणातूनच साजरे होतात.

   श्रावणात सृजनाचा उत्सव चालू होतो. निष्पर्ण झालेले वृक्ष, लता -वेली, झाडं- झुडपं, भेगाळलेली कोरडी शेतजमीन, पाण्याविना ओस पडलेले तलाव व पाणवठे, ओढे या सृजनाच्या उत्सवात न्हाऊन निघतात, एक नवचैतन्याची लहर निसर्गात दौडते . पहिल्याच पावसाने निसर्ग शुचिर्भूत होतो. पहिल्या पावसाचा मृद्गंध मन आणि शरीर सुखावून टाकतो.  सगळी धूळ झटकून झाडं नव्या पालवी सहित चकचकीत आणि टवटवीत दिसू लागतात. उन्हाच्या काहिलीने झालेली मरगळ दूर होते. पहिला जोरात पाऊस येतो, तोपर्यंत कावळ्याची पिल्लं मोठी झालेली असतात. आषाढातच त्यांनी घरटी बांधून अंडी घातलेली असतात. श्रावण सुरू होतो त्या आधीच कावळ्याच्या पिल्लांचे नवे जीवन सुरू झालेले असते.(माझ्या घरासमोरच्या वडाच्या झाडावरील वर्षानुवर्षे घेतलेला अनुभव) निसर्ग जसा आनंदाने बहरतो तसंच मानवी मन सुद्धा या ऋतु परिवर्तनाने आनंदाने बहरते. साहित्यिक आणि कवींना या मनभावन श्रावणाचा मोह होणार नाही असे कसे? म्हणून तर पाऊस आणि श्रावण याची अनेक वर्णने साहित्यात दिसतात. म्हणून आषाढ, ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद या चार महिन्यातला ‘सावन का महिना’ खूप लोकप्रिय महिना असतो.      

     शेतकरी दादा शेतं तयार करून चातकासारखी वाट पाहताच असतात पावसाची.आषाढवारीला गेलेल्या शेतकर्‍यांनी /वारकर्‍यांनी पंढरीच्या पांडुरंगाला भेटून, ‘चांगला पाऊस पाड बाबाअसं साकडं घातलेलं च असतं. सगळ्या चराचर जीवसृष्टीला, माणसांना, पक्षांना, प्राण्यांना आनंददायी असलेला, मनभावन निसर्ग असतो, या महिन्यात निसर्गात फुलणारी फुले, देवपूजेची चाललेली लगबग सगळं सगळं उत्साह देणारं. याच महिन्यात असलेली व्रतवैकल्ये धर्माची जोड देऊन जरी साजरे करत असले तरी त्याचा संबंध सात्विकतेशी, ऋतुचक्राशी आणि जीवन शैलीशी असलेला दिसतो. आपल्या आरोग्यासाठी चातुर्मासाच्या निमित्त आणि सणाच्या निमित्ताने का होईना योग्य आहार विहार ,सद्धर्म पाळणे, व्रतस्थ राहणे आणि अनुशासन पाळणे या गोष्टी माणसांकडून केल्या जात आहेत.मनुष्याला एक शिस्तीची चौकट आखून द्यावी लागते कोणीतरी (कर्मकांड नव्हे) मग सद्भावना, सदहेतू आणि सत्कार्य हातून घडतं.     

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे.तर इंग्रजी कॅलेंडर नुसार जुलै किंवा ऑगस्ट मध्ये येणारा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना. श्रावण म्हणजे अशी समजूत आहे की शिव कैलासावरून उतरून शिवालयात विराजमान होतात. फक्त संपूर्ण श्रावण महिना हा भोलेनाथ आपल्या शिवभक्तांची गार्हाणी ऐकत असतो. बाकी वेळ संपूर्ण सृष्टीचे संचालन करण्यात जातो. म्हणून श्रावण महिना शिवभक्त भक्तिभावाने शिवाची सेवा करत असतात. 


कावड यात्रा हा एक सेवेचा आणखी एक मार्ग असतो. देशातल्या पवित्र नद्यांचे जल आणून त्याने शिवाभिषेक करण्याचा संकल्प भक्तगण करतात. ज्यामुळे शिव खुश होऊन भक्ताना आशीर्वाद देतात मनोकामना पूर्ण होते असा समज आहे. अशी कावड घेऊन जाणाऱ्या शिवभक्ताला कांवरिया म्हणतात. दिल्ली ते हरिद्वार तसेच इतर ही कावड पथ असतात त्यावरून दिल्ली, हरियाणा, पंजाब, यूपी, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश इथून हजारो शिवभक्त या कावड यात्रेत अथवा कावड मेळयात सामील होतात. वाराणसी आणि बैदयनाथ धाम येथे शिवाला जलअभिषेक करतात. या वैदिक अनुष्ठानाच्या वातावरणात ब्रह्मचर्य, शुद्ध विचार, सात्विक आहार, नैसर्गिक दिनचर्या असणाऱ्या कांवरिया भक्तांचा भक्तीभाव हा अद्भुत मिलाफ अनुभवायला मिळतो.

श्रावण महिन्यात बहुतेक प्रत्येक दिवशी एकतरी धर्मकृत्य केलं जातं. श्रावणी सोमवार,जसे सोमवारी एकभुक्त किंवा नक्त राहायचे, दर सोमवारी शिवामुठ, मंगळवारी मंगळागौरीची पूजा, बुधवारी बुधबृहस्पती पूजन, गुरुवारी गुरुचरित्र पठन, शुक्रवारी वरदलक्ष्मीची पूजा, शनिवार मारूतीरायाचा तर रविवार आदित्य म्हणजेच सूर्य पूजेचा. याच प्रमाणे दूर्वा गणपती व्रत, सितला सप्तमी, पुत्रदा एकादशी, अजा एकादशी, श्रावणातली शिवरात्र, द्वादशीची वत्स द्वादशी साजरी करतात. शिवाय देवस्थानात वेगवेगळे कथा-पुराणं, मंत्रजागर असे विशेष उत्सव होतात. अगदी प्रत्येक श्रावणी सोमवार सुद्धा एक सण म्हणून साजरा होतो. श्रावण हा महिना चातुर्मासातला श्रेष्ठ महिना मानला जातो. नुसतं महाराष्ट्रात नाही तर इतर प्रांतातही या महिन्यात विविध उत्सव असतात.

 उदाहरणार्थ- उत्तरेत झुलान यात्रा, रक्षाबंधन, नंदोत्सव आणि जन्माष्टमी आणि विशेषता दक्षिण भागात श्रावणात नागपंचमी, श्रावणी, पोवती पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ष्ण जन्माष्टमी, नंदोत्सव, पिठोरी अमावास्या, मातृदिवस, कावड यात्रा, खांदेशात कानबाई उत्सव.

कानबाई उत्सव खांदेश 

श्रावणी सोमवार –शिवामुठ –शिवामुठ म्हणजे श्रावणात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला एक मूठ वेगवेगळे धान्य अर्पण करणे.तांदूळ, तीळ, मुग आणि जव या धान्यांनी शिवामुठ वाहिली जाते. पाचवा सोमवार आलाच तर सत्तू ची शिवामुठ वाहतात. याला शिवमुष्टि व्रत सुद्धा म्हणतात.


इथेही महादेवाला पूजून आपल्या मागण्या देवाला सांगून त्याच्याकडून आशीर्वाद घ्यावेत. मागण्या काय तर, त्याच्या अनेक आख्यायिका आढळतात. पण त्या समाजातले प्रतिबिंब च असते. आवडते- नावडते, सख्खे –सावत्र अशा नात्यांमध्ये असणारा दुरावा घरातल्या स्त्रीला नकोसा असतो. मग मनशांती मिळून, सकारात्मक भाव मनात निर्माण होऊन, आयुष्याकडे योग्य दिशेने बघण्याचा दृष्टिकोण मिळावा, नात्यांमधील प्रेम वाढावे, आयुष्य सुंदर आणि सुखाचे व्हावे म्हणून अशा कथातून, कहाण्यातून स्त्रियांना मार्गदर्शन होत असावे. उदा . “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” हे व्रत करून शिवपूजा करून उपवास करून शिवामुठ वाहावी. आशा श्रवणातल्या सर्व सोमवारी महादेवची पूजा,करावी शिव महिमा गावा, शिवमंत्र, शिवाष्टक,शिव तांडव स्तोत्र, शिव चाळीस, शिओव महिम्न स्तोत्र, जप श्रद्धा आणि भक्तीने करून गंगा जल. बेल पत्रं, अक्षता वाहून परिपूर्ण पूजा करावी असे श्रावणात अपेक्षित असते. शिवलिंग हे ब्रह्मांडाचे प्रतीक मानले गेले आहे. तर ब्रह्मांडात सर्व ग्रह समाविष्ट असतात. प्राचीन ग्रंथात सुद्धा शिवामुठ बद्दल उल्लेख आढळतो. उपास तपास व अशी व्रते मनुष्याला संयम राखायला शिकवतात. नियम पाळायला शिकवतात.

     श्रावण सुरू होताच ठेवणीतून बाहेर येतो जिवतीचा फोटो. घरातली आई आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या कल्याणसाठी, देव्हार्‍यात तो स्थानापन्न करून त्याला फूल पत्री, वस्त्र वाहून नैवेद्य दाखवते. संतती रक्षण म्हणून ही पूजा असते. एक मातृ शक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जरा जीवंतिका पूजन .  श्रद्धावान लोक असे धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्रावणात आणि चातुर्मासात करत असतात आणि आत्मिक समाधान मिळवतात. जीवतीच्या या प्रतिमेवर नरसिंह, कालीयामर्दन करणारा  कृष्ण, (गदिमांच्या- सर्प फणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही, अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही.. या गीतात संपूर्ण वर्णन आहे) मुलांना खेळवणाऱ्या जरा जीवंतिका(जीवंतिका म्हणजे दीर्घायु प्रदान करणारी देवी) आणि बुध -बृहस्पती असतात.


                                                  जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।

रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।

श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी दिपपुजेच्या दिवशी विदर्भात झाडीपट्टीत जिवती हा सण वैशिष्ट्यपूर्ण असतो. आई वडिलांची सेवा करणाऱ्या श्रावण बाळाची आठवण म्हणून हा दिवस साजरा होतो. हा भाव किती सुंदर आहे. यावेळी स्वयंपाक घरातील देव्हाऱ्याजवळची भिंत शेणाने सारवून त्यावर जिवती चितारतात. हे चित्र असते खांद्यावर कावड घेतलेल्या त्यात आपले आईवडील घेऊन चाललेल्या श्रावण बाळाचे. त्याशिवाय तुळस, चंद्र, सूर्य, मोर, झाडे, शेत, नांगर, वखार, कामगार नाग अशी चिन्हे सुद्धा असतात. गृहीणींचे चित्र कौशल्य या बरोबरच आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे आशीर्वाद असतात.     

आणखी एक म्हणजे श्रावण महिना कहाण्यांचा सुद्धा उत्सव च नाही का?

मला आठवतं, लहानपणी आजीची पुजा-अर्चा झाली की, श्रावणात रोज तिला कहाणी वाचून दाखवायची.हे माझं काम आणि ती अगदी तल्लीन होऊन ,दाद देत या कहाण्या ऐकत असे. शुक्रवारची कहाणी. खुलभर दुधाची आणि अजून काही. वर्षानुवर्षे वाचलेल्या, माहिती असलेल्या त्याच त्याच कहाण्या आजी प्रत्येक वेळी मन लावून ऐकायची, त्यात खरं तर काही नावीन्य नसे, पण मनातली श्रद्धा हेच एकमेव कारण, अशीच गोष्ट नागपंचमीची. रूढी प्रमाणे चालत आलेली, आज तवा चुलीवर ठेवत नाहीत. किंवा भाजी चिरत नाहीत. असे परंपरेने सांगितले गेलेले. नागपंचमीच्याच कहाणीत त्याचे उत्तर दडलेले आहे. कारण या कहाण्या अर्थात गोष्टी, या प्रबोधनासाठीच रचल्या गेल्या आहेत हे डोळसपणे वाचले की लक्षात येईल. 


श्रवणातली शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजे ‘हरियाली तीज’हा एक सण साजरा केला जातो.भगवान शिव आणि देवी पार्वती ची पूजा करून आपल्या सुखी संसारासाठी, वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद मागण्याचा हिंदू विवाहित महिलांचा पवित्र दिवस. हरियाली  तीज उत्तर भारतात विशेषता,उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या भागात साजरी करतात. तसा हा दिवस शिव व पार्वती यांच्या पुनर्मीलनाचा दिवस मानतात.तसेच अविवाहित महिला अर्थात कुमारिका आपल्याला असा पती मिळावा जो भगवान शिवाचे  जेव्हढे पार्वती साठी प्रेम आहे तसेच प्रेम आम्हाला आमच्या पतीकडून मिळावे म्हणून शिव पार्वतीची पूजा करून, निर्जल उपवास धरून व्रत करतात. असे उपवास, भक्ती मार्ग म्हणजे भारतीय कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्था टिकवण्याचे सात्विक मार्ग आहेत. (अंधविश्वास सोडून) लग्न व्यवस्थेमुळे जी सुंदर नाती निर्माण होतात ती टिकण्यासाठी , सकारात्मक जीवन होण्यासाठी, एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम वाढण्यासाठी मुलांसाठी, पतीसाठी आणि कुटुंबासाठी अशी महिलांची व्रते खरंच हितकारक आहेत.              

 नागपंचमी ,श्रावण वद्य पंचमी- हिंदुस्थानच्या सर्व भागात साजरा होणारा सर्प पूजेचा हा सण आहे. महाराष्ट्र, दक्षिण भाग, गुजरात, बंगाल सगळीकडे सर्प पुजा किंवा नागप्रतिमांची पुजा करतात. नागांचा अधिपति राखेश्वर म्हणजे शिव समजून डोंगराळ प्रदेशात पंचमीला पुजा केली जाते. उदयपूरला या दिवशी घराच्या दाराशी एक प्रकारची वनस्पति आणून ठेवतात म्हणजे विषारी प्राणी घरात येत नाहीत. तर नेपाळ मध्ये नाग आणि गरुड यांच्यात मोठ्ठ युद्ध झालं, तो हा दिवस विशेष उत्सव साजरा करतात. आगरा, अयोध्या, पंजाब, गढवाल मधेही सर्पपूजेची पद्धत आहे. हे सांगण्याचं कारण एव्हढच की, परमेश्वराच्या अतर्क्य शक्तीबद्दल मनुष्याला आश्चर्य वाटले त्यामुळे त्याची सेवा करणे म्हणजे त्यांनेच निर्माण केलेले सर्व प्राणी, झाडे यांची पुजा करणे महत्वाचे वाटले असावे. म्हणून नागपंचमी सारखे सण सुरू झाले असणार.


नागपंचमी, मंगळागौर, गौरी गणपती, राखी पौर्णिमा या निमित्ताने त्या मुलीला माहेरच्या लोकांना भेटण्याची संधी दिली जायची, म्हणूनच,

फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे...,

पंचमीचा सण आला डोळे का ग ओले ?’

ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे यांनी गायलेल्या गदिमांच्या या गीतातील मुलींच्या डोळ्यात पाणी येते कारण ते वातावरण त्यांना ओढ लावते. नागपंचमीला फेर धरून गाणी म्हणणे, झिम्मा- फुगड्या, आट्या- पाट्या खेळणे, याबरोबरच यातील गाण्यांमधून काही पौराणिक कथा की ज्यातून जीवनमूल्ये शिकवली जातील, अशा कथांचं कथन होई. हीच मूल्ये तिला पुढच्या आयुष्यात स्वत:साठी उपयोगी पडत. कल्पनाशक्तीला वाव मिळे.


निसर्ग पूजक भारतीय लोक वृक्ष, झाडे, पत्री, फुले, जमीन/ वसुंधरा,पशू, पक्षी प्राणी यांच्या बद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतात. मध्यंतरी मी मेळघाटात गेले होते. तिथे रस्त्याने जाताना कडेला छोटसं एक फुटाचं दगडाचं मंदिर होतं. त्यात एक दगडच विराजमान झाला होता. वर लिहिलं होतं, ||बाघ देव प्रसन्न || चौकशी केली तेंव्हा कळलं. की या जंगलात हे प्राणी वास्तव्यास असल्याने तो शक्तीशाली व आपला संरक्षणकर्ता आहे अशी तिथल्या आदिवासींची समजूत आहे. म्हणून या रस्त्याने जाताना आधी या बाघ देवाला नमस्कार करतात. म्हणजे खर तर दोघेही एकमेकांचं रक्षण करतात. अशा अनेक समजुती वेगवेगळे दिवस व सण साजरे करताना पाळत असलेले दिसतात.

    मंगळागौर पूजन महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नवविवाहितेने लग्नानंतर पाच वर्षे करायचे हे व्रत. बंगाल मध्येही मंगलचंडिका म्हणून या सौभाग्यदायिनी देवीची पुजा करण्याचा प्रघात आहे. श्रावणातली मंगळागौर म्हणजे गौरी गौरी सौभाग्य देअशी प्रार्थना करत मांडलेली पार्वतीची पूजा. मंगळागौर म्हणजे पार्वतीच्या रुपातील अन्नपूर्णा. मंगळागौरीची पूजा करणं हे विशेषता महाराष्ट्रातले पारंपरिक व्रत. पुराण ग्रंथात भगवती मंगल चंडिका स्तोत्र आहे . शिव शंकराने तिला जगन्माता म्हटलं आहे. ही भगवती सर्व संकटनाचा नाश करणारी आणि सदैव कल्याण करण्यात तत्पर असणारी आहे. सढळ हाताने शुभ, मंगल करणारी, मंगल ग्रहाची पण इष्ट देवता असणारी मंगलाधिष्ठात्री आहे .या स्तुतीतले हे वर्णन भगवान शंकराने भगवतीची उपासना करताना केलेलं आहे असे म्हंटले आहे. या मंगला देवीची सर्व प्रथम श्री शंकराने उपासना केली त्यानंतर, देवता, मुनि आणि नंतर मानवाने ही उपासना सुरू केली.मग विश्वात सगळीकडे ही पूजली जाऊ लागली. स्त्रियांनी सुद्धा आपले कल्याण व्हावे म्हणून या देवीची उपासन केली. आणि बरोबरच आहे आपले आयुष्य सुखासमाधानात जावे,मुला-बाळांचे कल्याण व्हावे, संकटे येऊ नयेत असे कुणाला वाटणार नाही? त्यामुळे मनाला विश्वास देणारी एक शक्ती आपण मानत असतो.हा मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळेच अशा उपासना होत असतात.पद्धती वेगवेगळ्या असतात एव्हढंच. ही संस्कृती मनुष्याने आपले जीवन सुखकर व आनंदी व्हावे म्हणून ती निर्माण केली आहे.ती तो सामूहिक पद्धतीने पाळत असतो ,यात आपले विविध सण, उत्सव, पूजा-अर्चा यासारख्या धार्मिक गोष्टी आणि त्या निमित्ताने वडीलधारी माणसे लहान मुलामुलींवर जीवनातल्या चांगल्या मूल्यांचा संस्कार करत असतात.    


                                         मम पुत्र पौत्रादिवृद्धये अवैधव्य भर्तुरारोग्यादि सकलकामना

                             सिद्धीद्वारा श्री शिवमंगलागौरी प्रीत्यर्थं पञ्च-वर्षात्मकं मंगलागौरीव्रतम करिष्ये !

असा संकल्प नवीन लग्न झालेल्या मुली या पूजेच्या वेळी करतात. यातला धार्मिक दृष्टीकोण थोडा बाजूला ठेऊन पाहिलं तर, तो एक प्रकारचा कौटुंबिक संस्कार सुद्धा आहे. हिंदू धर्मातील कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठीचा मूल्यसंस्कारच. कारण शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. पती-पत्नी मधील प्रेम आणि निष्ठा याचं हे उदाहरण आहे. मंगळागौर पूजेचे हे अधिष्ठान म्हणजे हेच आदर्श आमच्यात यावेत. अशी मनोकामना करतात.

मंगळागौरी पूजनानिमित्त समवयस्क मैत्रिणी व बहिणी जमलेल्या असताना आपले अनुभव एकमेकांना सांगताना, गप्पा मारताना आणि एक मनोरंजन म्हणून सुद्धा मंगळागौरीचे खेळ व गाणी म्हणण्याची पद्धत आहे. यात रात्री जागरण करून हे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. हे खेळ म्हणजे सर्वांगाला व्यायाम होणारे असतात. ती एक प्रकारची आसनेच असतात.स्त्रियांना फक्त घरातली कामेच करावी न लागता त्यांना मनोरंजन पण हवे ,आनंद मिळावा या हेतूने गाण्याची ही जोड देऊन हे खेळ खेळले जातात.हे जिम्नास्टिकच आहे.मनाची एकाग्रता, शरीराची लवचिकता, नेम साधणे हे सर्व आजच्या आरोबीक्स प्रमाणे  गीतांच्या तालावर व चालींवर खेळले जातात.     

            

                                                                  

जवळ जवळ ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात. यात खेळताना स्वयंपाक घरातील वस्तूंचा वापर केलेला असतो. या गीतांतून त्या नवविवाहितेच्या मनातील विचारच प्रगट होत असतात. आचार विचार महत्वाचे आहेत पण आता याच्या जोडीला परंपरा म्हणून दागिन्यांना पण महत्व आलेलं आहे. नटण मुरडण, खेळणं बागडण हे जात्याच स्त्री विशेष गुण. मनात काहीतरी असतं, कुठेतरी खुपत असतं, काही गुपित पण असतं, तर कुठला आनंद आणि कुठल तरी दु:ख, कोणाला तरी सांगावसं वाटतं, तिथे औपचारिकता नको असते. पण यासाठी भेटायला हवं ना? मग निमित्तही हवं त्याला.

नारळीपोर्णिमा शास्त्रा प्रमाणे वरुण देवतेची पुजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पोर्णिमा. हिंदुस्थानच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर असलेले लोक विशेषत: व्यापारी वर्गाला याचे जास्त महत्व. प्राचीन काळी ते जलमार्गाने प्रवास करीत असत आणि व्यापार आणि दळणवळण पण चालत असे. समुद्र हे वरूणाचे  स्थान समजले जाते. समारंभ पूर्वक समुद्राचे दर्शन घेऊन त्यास नारळ अर्पण करून समुद्रावर सत्ता गाजविणार्‍या वरुण देवाची आठवण ठेवणे व कृतज्ञता व्यक्त करणे असा उद्देश असतो. वर्षा ऋतुत हा समुद्र क्षुब्ध झालेला असतो. शिवाय हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या काळात मासेमारी करायला कोली बांधव जात नाहीत. श्रवण पौर्णिमेला सागर पूजन झाले की मासेमारी सुरू होते. श्रावण पौर्णीमेपासून जलमार्गावर वाहतूक सुरू होते. असा हा समुद्र पूजनाचा दिवस.ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.


श्रावण पौर्णिमा दक्षिण भारतात ‘नारळी पौर्णिमा’ ,मध्य भारतात ‘काजरी पूनम’,उत्तर भारतात ‘रक्षाबंधन’,आणि गुजराथ मध्ये ‘पवित्रोपना’ म्हणून साजरी करतात. खरं तर सण आणि उत्सवांची विविधता हेच आपल्या भारतीय परंपरेचे वैशिष्ट्य आहे. 

यालाच पोवती पौर्णिमाही म्हणतात, सुटची पोवती करून ती विष्णु, शिव आणि सूर्य यांना अर्पण करतात.     हाच दिवस वैदिक धर्म पाळणार्‍यांसाठी श्रावणी म्हणून पाळला जातो. या तिथीला जानवे बदलायचा विधी सांगितला आहे. तर गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा हा पहिला दिवस असतो.

      कृष्ण जन्माष्टमी - याच महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी असते. श्रवणात वद्य अष्टमीला रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून हा दिवस कृष्ण जयंती, गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणून ओळखतात.  तो दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात.सबंध हिंदुस्थानात गोकुळ,मथुरा वृंदावन, द्वारका, पुरी, इथे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. वृंदावन मध्ये या दिवशी दोलोत्सव साजरा करतात. कोकणात व महाराष्ट्रात दहीहंडी वा गोपाळकाला होतो. दुसऱ्या दिवशी उत्तर भारतात नंदोत्सव साजरा केला जातो.


  पिठोरी अमावास्या- पोळा- श्रावण अमावास्येला बैल पोळा साजरा करतात. शेतकरी लोक आपल्या खिलार्‍या बैलांना रंगवून, सजवून त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढतात, पुजा करतात,त्यांचे औक्षण करतात.  गोडधोड करून त्यांना खाऊ घालतात. आपल्या उपयुक्त व वर्षभर आपल्यासाठी राबणार्‍या या गुरांबद्दल आदरभाव दाखविण्याचा हा दिवस. या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही.  बहिणाबाई चौधरी यांनी ‘बैल पोया’ या कवितेत याचं महत्त्व सांगितलं आहे. त्या म्हणतात,

आला आला शेतकर्‍या, पोयाचा रे सन मोठा,

आता बांधा रे तोरन, सजवा रे घरदार |

करा अंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले  शेंदूर,

उठा उठा बहिनाई, चुले पेटवा पेटवा |

आज बैलाले निवद, पुरणाच्या पोया ठेवा,

वढे नांगर वखार, नही कष्टाले गनती |

पीक शेतकर्‍या हाती, याच्या जिवावर शेती ||

या सणाला दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर असेही म्हणतात. हा सण पाळण्यामागे अशी समजूत आहे की, धनधान्य आणि गोधनाची समृध्द्धी होते.पशुपूजन म्हणजे कृतज्ञ होणच. 

 


 चातुर्मास म्हणजे पवासाळयातील चार महीने. आणि श्रावण हा तर चतुर्मासातला श्रेष्ठ व पवित्र मानला जाणार महिना. पावसाळा हा ऋतु नाही म्हटलं तरी आरोग्य बिघडवणारा असतो काही वेळा. या कालावधीत पचनशक्ति मंदावते. पावसामुळे बाहेरचे वातावरण आरोग्याला हानिकारक व रोगराईला पोषक असते. अशुद्ध व गढूळ पाणी वापरात येते. साहजिकच सर्दी, ताप, खोकला, पोट बिघडणे हे आजार उद्भवतात. त्यामुळे पचायला हलका आणि साधा आहार घ्यायला लागतो. यालाच आपल्या पूर्वजांनी धार्मिक जोड देऊन एकभुक्तं राहणं, उपवास करणं, एक धान्य खाण यासाठी नेम धर्म आखून दिले त्याचा शास्त्रीय फायदा व अर्थ लक्षात घेतला तर कसे ऊपयोगाचेच आहेत हे लक्षात येईल. नीट विचार केला तर लक्षात येईल की, चातुर्मासात आहार विहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्रत वैकल्ये करायला सांगितली आहेत. 

   कुठल्याही गोष्टींचा धार्मिक संबंध लावताना तो डोळसपणे बघावा. अंधश्रद्धेने नको. आजची नवी पिढी चौकस आहे. तिला प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय आधार हवा आहे आणि हा शास्त्रीय आधार हिंदू धर्मात आहे. पालकांनी/मोठ्यांनी तो अभ्यासला पाहिजे.  परंपरेने चालत आलेल्या रूढी आहेत त्या तशाच्या तशा नवी पिढी स्वीकारणार नाहीत. त्यामुळे नवा अर्थ देऊन, पण पहिलेच महत्व कायम ठेऊन त्यांच्या पर्यन्त तो पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या पालकांवरती आहे.    

      ऋतुचक्र आणि आपले हे उत्सव, व्रत वैकल्ये एकमेकांशी निगडीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यन्त पाळला जाणारा चातुर्मास. नियम पाळणे, धार्मिक पुजा-पाठ, पारायण करणे, उपासना करणे या बरोबरच उपवास धरणे. यात आपल्या दिनचर्येची ऋतूंशी सांगड घातलेली दिसते. आणि ओघानेच आपल्या आरोग्याशी पण. खर तर ही आपल्या ऋषीमुनींची आपल्याला देणगीच आहे. त्याची नीट व्यवहार्यता, उद्देश, त्यातलं वैद्यक शास्त्र हे पण आपण समजून घेतले पाहिजे. आपले उत्सव, जत्रा, सण, समारंभ, प्रवचने, कथा, कीर्तने यातून आपली कायिक, वाचिक आणि मानसिक प्रगती व्हावी हाच उद्देश आहे. म्हणूनच परंपरा पाळताना समजून उमजून पाळाव्यात.


तर असा हा इंद्रधनु ल्यायलेला ,ऋतु हिरवा ऋतु बरवा, मनभावन श्रावण, सणांचा महिना खूप काही शिकवण देणारा असतो यात शंका नाही.

 © डॉ. नयना कासखेडीकर,पुणे .

---------------------------------------