Sunday, 29 August 2021

नंदनवनातील पक्षी - मोर

 

                                           नंदनवनातील पक्षी - मोर

                                                     भाग-  एक

                            ( सूचना- यातील गाणी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऐका )


     नाच रे मोरा आंब्याच्या वनांत

नाच रे मोरा नाच !

ढगांशी वारा झुंजला रे,

काळा काळा कापूस पिंजला रे,

आता तुझी पाळी, मीच देते टाळी

फूलव पिसारा नाच ! 

https://www.youtube.com/watch?v=IEq0s6_kl-c

   लहानपणी या गाण्यातूनच मोर या सुंदर पक्ष्याची ओळख झाली. म्हणजे या बालगीतात आम्ही मोर बघायचो. आकाशात ढग आले आहेत, तिकडे पाऊस पडण्याची लगबग आणि इकडे मोर आनंदून पिसारा फुलवून नाचतोय, हे आनंदी दृश्य डोळ्यासमोर या बालगीतातून उभं राहायचं. चिमण्या किंवा कावळे असे पक्षी कधीही, केंव्हाही, कुठेही आपल्याला सहज दर्शन देतात. तसे मोरांचे दर्शन सहज शक्यच नसायचे, (तुम्ही कुठल्या भागात राहता यावरही अवलंबून) देवबाप्पा या चित्रपटातलं हे ग. दि. माडगुळकर यांचे गीत आकाशवाणी च्या केंद्रावरून नेहमीच प्रसारित व्हायचं. अजूनही लहान मुलांचं हे आवडत गीत आहे. अशीच मोराची ओळख करून देणारी आणखी एक ग. दि. माडगुळकर यांचीच रचना म्हणजे,

                                                       पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा

आई मला नेसव शालू नवा,

  बांधीला सैलसर बुचडा मानेवरी,

   माळीला सुरंगी गजरा त्यावरी....

                              https://www.youtube.com/watch?v=XdVUk0rMl0g

  मल्हारी मार्तंड या चित्रपटातली सुलोचना चव्हाण यांनी गायलेली ही लावणी एका पैठणी किंवा शालूची आठवण करून देतं, ते खास लग्नाला आलेल्या मुलींना. कारण पैठणी ही भारतातली उत्कृष्ट रेशमापासून बनवलेली वैशिष्ट्यपूर्ण आणि महागडी साडी. राजघराण्यातल्या महाराणीप्रमाणे आपणही दिसावे असे तिला वाटत असते.  पदरावरच्या मोराच्या नक्षीकामामुळे पैठणी ओळखली जाते. भारतातील विणकर वस्त्रप्रावरणांवर मोराकृती विणण्यात अत्यंत कुशल आहेत. पैठणी म्हणजे महाराष्ट्राचे पारंपरिक महावस्त्र, पूर्वी ते मोरपंखी रंगातच विणलेले असायचे. मोराला या वस्त्रावर मानाचे स्थान मिळाले ते त्याच्या रंगामुळे आणि सौंदर्यामुळेच.    

  

   आता तर, आपल्याकडे एक तरी पैठणी ठेवणीत असावीच असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. पैठणी हा तिचा वैयक्तिक आनंद असतो. पैठणी असो व कशीदाकारी केलेली आवडती ऊंची /भारी साडी, त्या साडीला ती खूप जपत असते. अशा साड्यांवरची नक्षी शांता बाई शेळके यांनी त्यांच्या काव्यात वर्णन केली आहे. तिची आठवण होते. हे काव्य म्हणजे लोकप्रिय लावणी ...आशा ताईंनी गायलेली सर्वांना ताल धरायला लावणारी ही रचना ..  

रेशमाच्या रेघांनी ,

लाल काळ्या धाग्यांनी ,

कर्नाटकी कशिदा मी काढिला

        हात नका लावू माझ्या साडीला ....

 नवी कोरी साडी लाख मोलाची

भरली मी नक्षी फूलवेलाची

गुंफियले राघु मोर,राघू मोर जोडीला

हात नका लावू माझ्या साडीला ....

                       https://www.youtube.com/watch?v=cEHJSDv5Gm4

   आयुष्याचं स्वप्न बघताना काही आनंदाचे क्षण असे असतात की, वैवाहिक जीवनात अशा अनेक आनंदी क्षणाचे वाटेकरी दोघेही जण असतात, पण ते स्त्रीसुलभ मन आनंदी संसाराचं स्वप्न रंगविते आणि त्या विचाराने तिच्या मनरूपी मोराचा पिसारा फुलतो असं वर्णन गीतकार जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या या गीतात केलंय. मन कसं आनंदी असावं? तर मोर, पिसारा फुलवताना जसा आनंदी असतो तसं.  

                                               बाई-बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला

चिमनी मैना, चिमना रावा
चिमन्या अंगणी, चिमना चांदवा
चिमनी जोडी, चिमनी गोडी
चोच लाविते, चिमन्या चा-याला
चिमनं, चिमनं, घरटं बांधलं चिमन्या मैनेला
बाई-बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला

https://www.youtube.com/watch?v=NvZBEoynXNo

कवि कल्पनेत हा मोर स्त्रीच्या आयुष्यात लहानपणी आलेला असतो तो लग्न होईपर्यंत तिच्या मनाला वेगवेगळ्या रूपात आनंद देत असतो. साहित्यिक आणि कवि यांच्या साहित्यातून अशा अनेक गोष्टींची, निसर्गाची, पशू पक्ष्यांची ओळख आपल्याला होत असते. आपल्या भावविश्वातल्या अनेक कल्पना आपल्याला कवितेत पाहायला मिळतात. कवि अशोकजी परांजपे यांच्या गीतात अशीच काहीशी भावना आहे. आकाशात मेघ आल्यानंतर मोर आनंद व्यक्त करतात. मोराचा हा आनंद बघून मेघही गहिवरतात आणि बरसायला सुरुवात करतात. बागेश्री रागातलं हे एक सुंदर, आपल्या आवडीचं गीत. आपल्याही मनात भावनांचे तरंग उमटवते.   

केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर ।।
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर ।।
पापणीत साचले, अंतरात रंगले ।
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले ।
ओठांवरी भिजला ग आसावला सूर ।।

https://www.youtube.com/watch?v=aEZXMEDmeOE

केवड्याच्या वनात मोराला नाचताना पाहून ढगांना गहिवरून आले आणि त्यांनी वर्षाव केला. आकाशात आलेल्या ढगांना पाहून मोर नाचू लागतात हीच कल्पना त्यांनी या प्रेमगीतात मांडली आहे. प्रत्यक्षात सुद्धा एका विशिष्ट वातावरणात मोराचा अवर्णनीय आनंद ओसंडून वाहत असतो. वैशाखाचे दिवस संपून वर्षा ऋतुकडे वाटचाल चालू होते. मे महिन्यातल्या उष्णतेच्या काहिलीचे तप्त वातावरण जाऊन आकाशात मेघराजांनी गर्दी केलेली असते. झाडाचे पान हालत नाही, अगदी कुंद आणि स्तब्ध वातावरण. आता कुठल्याही क्षणी काळे ढग बरसणार असे वाटतानाच ढगांचा गडगडाट सुरू होतो, विजा चमकू लागतात आणि एकदाचा पाऊस येतो तो धुंद सुगंध घेऊनच. 

                                                       आला पाऊस मातीच्या वासात गं

मोती गुंफित मोकळया केसांत गं ....

    वर्षा ऋतूची आठवण करून देणार्‍या या शांता बाईंच्या कवितेतल्या वर्णनाप्रमाणे आल्हाददायक वातावरण होतं, मधेच दूरवरच्या पावसानं तापलेली माती भिजल्याचा गंध येतो आणि याच वेळी दाट झाडीतून मयूरराज डौलात बाहेर पडतात. बरोबर लांडोरी पण असतात. मोर केकारव करत आपला सुंदर पिसारा फुलवून, तालबद्ध नृत्य करतात. मोर, मयूरीं(लांडोर) पुढे स्वताला सिद्ध करत असतो. तिला आकर्षित करत असतो. मोराच्या या धुंद नृत्याने पृथ्वीवरच्या या वनश्रीला शोभा येते. भारतातल्या हजारो पक्ष्यांमध्ये पृथ्वीवरचा हा नितांत सुंदर पक्षी मोर आणि त्याचा हा सुंदर देखावा आपलं मन मोहून टाकतो. कवि मंगेश पाडगावकरांच्या कवितेत या सुंदर वर्षा ऋतूचे वर्णन आहे ,

                                           श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।

   उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ।।

 किंवा विना चिटको यांचं भावगीत

                                      

                                       अंबरातल्या निळ्या घनाची शपथ तुला ,

मयूरा रे फुलावीत ये रे पिसारा –गायक- रामदास कामत


https://www.youtube.com/watch?v=WfwSqdZPoNo


       इथे इथे बैस ले मोला, बाळ घाली चारा .... या बडबड गीता बरोबरच, बालगीत,लोकगीत,भावगीत,भक्तीगीत अशा सर्व प्रकारातल्या गीतांमधून मोर आम्हा रसिकांना भेटतो.  निसर्गातल्या या सुंदर पक्ष्याचा परिचय करून देण्याचं काम या मान्यवर गीतकारांनी केल आहे. मोर हा विषय मनात आला की अशा गीतांच्या ओळी चटकन आठवतातच. मोराचं पिसारा फुलवून नाचणं हे जसं प्रत्यक्ष आनंद देणारं असतं, तसच, कवि महाशयांनी साहित्यात, मनुष्य जीवनातल्या अनेक आनंद देणार्‍या घटनांना मोराची उपमा दिली असते. सर्व पक्ष्यांमध्ये त्याच्या सौंदर्यामुळेच, त्याचं डौलदार असणं, दिसणं, त्याचं ओरडणं(केकारव), नाचणं, त्याचा रंग, त्याचे सर्वांपेक्षा विशेष रूप यामुळेच सर्वजण त्यावर लुब्ध होताना दिसतात. मोर इतका सुंदर आहे की त्याची उपमा देण्याची इच्छा होणारच. मग आम्ही जेंव्हा साडी  घ्यायला दुकानात जातो तेंव्हा मोरपंखी रंगाची साडी अथवा कापड दाखवा असा सांगतो. हे तर रंगाबद्दल, पण त्याच्या मोहक शरीररचने बद्दल सुद्धा सर्वांना आकर्षण वाटते. म्हणून तर कवि योगेश यांना, जीवाशिवाची बैल जोडी कशी आहे याच वर्णन करतांना मोराचीच आठवण होते, आणि ते म्हणतात,

 

डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा, हे तांबडी माती या सिनेमातलं गीत, तुम्ही आम्ही अनेक वेळा ऐकलेलं आहे. अशा चित्रपट गीतांप्रमाणे प्राचीन साहित्यात, लोककथा, पुराणकथा, दंतकथा यात मोराचं वर्णन आणि संदर्भ दिसतात.कवि ग्रेस यांनी सुद्धा मोराच्या सौंदर्याचं वर्णन त्यांच्या कवितेत केलं आहे. ते म्हणतात,


'चंद्र’ [चंद्रमाधवीचे प्रदेश]
कंठात दिशांचे हार lनिळा अभिसार l
वेळूच्या रानी l
झाडीत दडे l देऊळ गडे l
येतसे जिथून मुलतानी ll

लागली दरीला ओढ l कुणाची गाढ l
पाखरे जाती l
आभाळ चिंब l चोचीत बिंब l
पाउस जसा तुजभवती ll
-कवि ग्रेस


तर ग.दि. माडगूळकर यांनी मोरच्या आणि मेघाच्या मैत्रीचं वर्णन अर्थात सजीव चित्रण त्यांच्या एक गीतात केलय.


घन घन माला, नभी दाटल्या, कोसळती धारा |

   केकारव करी मोर काननी, उभवून उंच पिसारा || 


https://www.youtube.com/watch?v=WXrOR7bCyzE  


मन्ना डे यांनी गायलेलं हे वरदक्षिणा या चित्रपटातलं गीत वर्षाकालीन संध्याकाळचे वर्णन करणारे आहे,  

     मोरांचा टाहो म्हणजे कर्णमधुर स्वर असं वर्णन प्राचीन संस्कृत साहित्यात कवींनी केलेलं दिसतं.  अठराव्या शतकातील मराठी कविवर्य मोरोपंत यांनी आपल्या एका काव्य रचनेला केकावली असं नाव दिलं. मोराच्या ओरडण्याला वाड:मयात मधुर केकारव म्हटले आहे. वेदांमध्ये स्कंद पुराणात मोरांचा व लांडोरींचा उल्लेख सापडतो. देवांचा सेनापति कार्तिकेय आणि देवी सरस्वती चं वाहन मयूर आहे. ही देवतांची चित्रे आपल्या मनात लहानपणापासून ठसलेली आहेत. आणखी एक प्रसिद्ध प्रतिमा म्हणजे श्रीकृष्ण याची. श्री जगन्नाथाष्टकम या स्तोत्रात वृंदावनातल्या स्वामी जगन्नाथाचे वर्णन करून, हे जगन्नाथा मला दर्शन द्या असे मागणे मागितले आहे.ते असे,


वामकरी ती धरली मुरली,मोरपिसे अन शिरावरी,

रेशीम शेला कटी बांधला,कटाक्ष टाकी सख्यांवरी

अद्भुत लीला प्रकट कराया केली वृंदावन वसती

जगन्नाथ तो स्वामी माझा दर्शन देवो शीघ्रगती ||

     


बाळकृष्ण काय किंवा कोणत्याही रुपातला श्रीकृष्ण डोळ्यासमोर आला तरी, डोक्यावरील शिरोभूषणावर खोचलेलं मोराचं पीस हीच कृष्णाची ओळख लक्षात राहते. पुराणकथा किंवा चित्रामध्ये मोरच जणूकाही नायक असतो.    

                                 

                      

   सरस्वतीचं वीणा वादन चालू असतं तेंव्हा त्या तालावर मोर नृत्य करतो असे म्हटले आहे. रघुवंशात रघुराजाच्या जन्माच्या वेळी जेंव्हा स्त्रिया आनंदाने गाणी गाऊ लागल्या तेंव्हा मोरसुद्धा त्या तालावर नाचत होते असे वर्णन आहे आणि रामायणात, जेंव्हा राम वनवासात निघाले होते तेंव्हा मोरांनी अतिशय दु:ख झाल्याने आपले नृत्य व गायन बंद केले होते असे म्हटले आहे. तर भागवतात, कृष्ण जेंव्हा गोकुळातून मथुरेला जायला निघतो तेंव्हा मोराने दु:खाने नृत्य बंद केले असेही वर्णन आहे. असा हा नंदनवनातला मोर साहित्यातून अमर झाला आहे.

(भाग दोन क्रमश:)

  © ले. डॉ.नयना कासखेडीकर.पुणे   

                                                      

                                                        -----------------

Saturday, 28 August 2021

श्रावणमासी हर्ष मानसी

 

                     श्रावणमासी हर्ष मानसी ....

        


     पाऊस ! आषाढस्य प्रथम दिवसे- मेघदूतातल वर्णन, मग श्रावणधारा, ऊनपावसाचा लपंडाव, आकाशातलं इंद्र्धंनुष्य ही सगळी निसर्गाची वर्णने वाचणं आणि त्यांचा प्रत्यक्ष अनुभव हा चैतन्य निर्माण करणारा असतो. तर तरुण तरुणींना तो रोमॅंटिक वाटत असतो. आषाढ, ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद या चार महिन्यातला सगळ्यांचा आवडता महिना श्रावणच असतो. वैशाखाची काहिली संपवून पहिल्या पावसाचा मृद्गगंध, मन आणि शरीर सुखावून टाकतो. पावसाळी सहलीचा आनंद लुटण्याचा हा महिना. जवळच्या परिसरातील धबधबे, धरणाजवळील ठिकाणे माणसांनी तुडुंब भरलेले असतात. माध्यमेही श्रावणाचा आनंद दर्शकांना द्यायला उत्सुक असतात. म्हणून चालू असतात अखंड रोमॅंटिक गाणी. हिंदीत तर सावन का महिना खूपच लोकप्रिय. सगळ्या कवी आणि गीतकारांचा आवडता महिना, ज्यांचं आयुष्य या ऋतूंवर अवलंबून आहे त्या शेतकर्‍यान्च सुद्धा भविष्य ठरवणारा असा हा महिना. हिंदू पंचांगानुसार या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो.    

      रक्षाबंधन हा याच महिन्यातला सण. लहान मोठे सर्वजण राखीची म्हणजे राखीपोर्णीमेची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यात प्रत्येक जणाची वाट पाहणं वेगळं असतं. लहान बहीण भाऊ राखीच्या गिफ्ट मिळणार याची वाट पाहतात. मोठं झालं तरी गिफ्ट ची वाट पाहण्यात तेव्हढाच आनंद असतो.

     

     लहान गावात किंवा शहरात आता श्रावणात चालू असतात मंगळागौरीचे खेळ, त्यांची महिनाभर आधी प्रॅक्टीस. याच प्रमाणे स्त्रियांचा आवडता सण म्हणजे नागपंचमी. अजूनही ग्रामीण भागात चल ग सये, चल ग सये वारुळाला ... म्हणत नागोबाला पुजायाला जाण्याची प्रथा दिसते. याच महिन्यात श्रीकृष्णजन्माष्टमी, शेतकर्‍यांचा बैल पोळा, वरुण देवतेची पुजा म्हणजे नारळी पौर्णिमा असे उत्सव आणि सण असतात. म्हणून श्रावण हा उत्सवी आणि उत्साही महिना असतो.              

     श्रावण म्हटलं की आधी आठवते ती बालकवींची शाळेत शिकलेली आणि पाठ झालेली , श्रावणाचं हर्षभरीत वर्णन असणारी कविता,

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे
!

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
!

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे,
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे
!

उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा,
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा
!

बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते
!

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती ,
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती
!

सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला,
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला
!

फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती,
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
!

खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे,
मंजुळ पा
वा गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे!

देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात,
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
!

सगळ्या चराचर जीवसृष्टीला, माणसांना, पक्षांना, प्राण्यांना आनंददायी असलेला, मनभावन निसर्ग असतो, या महिन्यात निसर्गात फुलणारी फुले, देवपूजेची चाललेली लगबग सगळं सगळं उत्साह देणारं. याच महिन्यात असलेली व्रतवैकल्ये धर्माची जोड देऊन जरी साजरे करत असले तरी त्याचा संबंध सात्विकतेशी, ऋतुचक्राशी आणि जीवन शैलीशी असलेला दिसतो.

        श्रावण सुरू होताच ठेवणीतून बाहेर येतो जिवतीचा फोटो. घरातली आई आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या कल्याणसाठी, देव्हार्‍यात तो स्थानापन्न करून त्याला फूल पत्री, वस्त्र वाहून नैवेद्य दाखवते. आणि सुरू होतात सोमवार ते रविवारची साप्ताहिक व्रते. श्रावणी सोमवार, मंगळवारी मंगलागौर पूजन, बुधबृहस्पती पूजन, गुरुवारी गुरुचरित्र पठण, शुक्रवारी लक्ष्मीची पुजा आणि हळदीकुंकू, शनिवार मारूतीचा आणि रविवार सूर्य उपसनेचा. श्रद्धावान लोक असे धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्रावणात आणि चातुर्मासात करत असतात आणि आत्मिक समाधान मिळवतात.

   मला आठवतं, लहानपणी आजीची पुजा-अर्चा झाली की, श्रावणात रोज तिला कहाणी वाचून दाखवायची. शुक्रवारची कहाणी. खुलभर दुधाची आणि अजून काही. वर्षानुवर्षे वाचलेल्या, माहिती असलेल्या त्याच त्याच कहाण्या आजी प्रत्येक वेळी मन लावून ऐकायची, त्यात खरं तर काही नावीन्य नसे, पण मनातली श्रद्धा हेच एकमेव कारण. आणि मोठ्यांनी सांगितलं आहे ते ऐकायचं आणि करायचं देखील अशी परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली. त्यामुळे, उलट का? असा प्रश्न विचाराचा नाही.

अशीच गोष्ट नागपंचमीची. रूढी प्रमाणे चालत आलेली, आज तवा चुलीवर ठेवत नाहीत. किंवा भाजी चिरत नाहीत. असे परंपरेने संगितले गेलेले. नागपंचमीच्याच कहाणीत त्याचे उत्तर दडलेले आहे. कारण या कहाण्या अर्थात गोष्टी, या प्रबोधनासाठीच रचल्या गेल्या आहेत हे डोळसपणे वाचले की लक्षात येईल.  

       नागपंचमी हिंदुस्थानच्या सर्व भागात साजरा होणारा सर्प पूजेचा हा सण आहे. महाराष्ट्र, दक्षिण भाग, गुजरात, बंगाल सगळीकडे सर्प पुजा किंवा नागप्रतिमांची पुजा करतात. नागांचा अधिपति राखेश्वर म्हणजे शिव समजून डोंगराळ प्रदेशात पंचमीला पुजा केली जाते. उदयपूरला या दिवशी घराच्या दाराशी एक प्रकारची वनस्पति आणून ठेवतात म्हणजे विषारी प्राणी घरात येत नाहीत. तर नेपाळ मध्ये नाग आणि गरुड यांच्यात मोठ्ठ युद्ध झालं, तो हा दिवस विशेष उत्सव साजरा करतात. आगरा, अयोध्या, पंजाब, गढवाल मधेही सर्पपूजेची पद्धत आहे. हे सांगण्याचं कारण एव्हढच की, परमेश्वराच्या अतर्क्य शक्तीबद्दल मनुष्याला आश्चर्य वाटले त्यामुळे त्याची सेवा करणे म्हणजे त्यांनेच निर्माण केलेले सर्व प्राणी, झाडे यांची पुजा करणे महत्वाचे वाटले असावे. म्हणून नागपंचमी सारखे सण सुरू झाले असणार.

     मध्यंतरी मी मेळघाटात गेले होते. तिथे रस्त्याने जाताना कडेला छोटसं एक फुटाचं दगडाचं मंदिर होतं. त्यात एक दगडच विराजमान झाला होता. वर लिहिलं होतं, ||बाघ देव प्रसन्न || चौकशी केली तेंव्हा कळलं. की या जंगलात हे प्राणी वास्तव्यास असल्याने तो शक्तीशाली व आपला संरक्षणकर्ता आहे अशी तिथल्या आदिवासींची समजूत आहे. म्हणून या रस्त्याने जाताना आधी या बाघ देवाला नमस्कार करतात. म्हणजे खर तर दोघेही एकमेकांचं रक्षण करतात. अशा अनेक समजुती वेगवेगळे दिवस व सण साजरे करताना पाळत असलेले दिसतात.

       मंगळागौर पूजन महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नवविवाहितेने लग्नानंतर पाच वर्षे करायचे हे व्रत. बंगाल मध्येही मंगलचंडिका म्हणून या सौभाग्यदायिनी देवीची पुजा करण्याचा प्रघात आहे. पूर्वी ठराविक लोकांकडेच मंगळागौर साजरी व्हायची आता मात्र त्याला सामाजिक रूप येत चाललय. यात अनेक प्रकारे प्रबोधन होत असतं. पूर्वी नववधू लहान वयाच्या असायच्या. तिच्यावर चांगले व अपेक्षित संस्कार होणे महत्वाचे म्हणून अशा सण समारंभाची योजना असे. शिवाय निसर्गाची तिला ओळख व्हावी, झाडे पाने फुले, पत्री यांच्या संपर्काने त्यांचे महत्व समजावे व ओळख व्हावी. नाती समजावीत आणि ती कशी टिकवायची ते ही कळावे, तिला आणि सर्वांनाच आनंद मिळावा अस हे लोकशिक्षण च जणू. मंगळागौरीच्या खेळातून शास्त्र शुद्ध व्यायाम होतो त्यादृष्टीने ही ते खेळ महत्वाचे आहेत. सजावट, कलाकुसर, गाणी म्हणणे यातून काही सृजननिर्मिती होत असे. यातून एक महत्वाची गोष्ट घडत असे की सासू-सून-नणंद-जावा गाण्यामधून खुलेपणाने व्यक्त होत असत.

पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा !

तुझ्या भावाचं डोळं चकणं ग, रूप हेकणं ग पोरी पिंगा

भैन माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा !

 तुझ्या भैनीचं नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा

माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा !

 भाऊ तुझा ग भितो झुरळाला, काळ्या उंदराला पोरी पिंगा

भैन माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा !

 तुझ्या भैनीचं काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा

अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा !

    आपल्या मनातल्या गोष्टी उघडपणे बोलणे म्हणजे मर्यादा ओलांडली असे व्हायला नको म्हणून ही एक नामी संधी असे. या गाणी आणि खेळ यातून मनमोकळे पणे आपली मते, आपला मनातला राग बिनधास्त व्यक्त करून मोकळं व्हायचं आणि खेळीमेळी च्या वातावरणात नणंदा-भावजया, सासू-सुना यांची नाती आणखीनच खुलायची. नागपंचमी, मंगळागौर, गौरी गणपती, राखी पौर्णिमा या निमित्ताने त्या मुलीला माहेरच्या लोकांना भेटण्याची संधी दिली जायची, म्हणूनच,

फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे...,

पंचमीचा सण आला डोळे का ग ओले ?’

ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे यांनी गायलेल्या गदिमांच्या या गीतातील मुलींच्या डोळ्यात पाणी येते कारण ते वातावरण त्यांना ओढ लावते. नागपंचमीला फेर धरून गाणी म्हणणे, झिम्मा- फुगड्या, आट्या- पाट्या खेळणे, याबरोबरच यातील गाण्यांमधून काही पौराणिक कथा की ज्यातून जीवनमूल्ये शिकवली जातील, अशा कथांचं कथन होई. हीच मूल्ये तिला पुढच्या आयुष्यात स्वत:साठी उपयोगी पडत. कल्पनाशक्तीला वाव मिळे.

       नारळीपोर्णिमा शास्त्रा प्रमाणे वरुण देवतेची पुजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पोर्णिमा. हिंदुस्थानच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर असलेले लोक विशेषत: व्यापारी वर्गाला याचे जास्त महत्व. प्राचीन काळी ते जलमार्गाने प्रवास करीत असत आणि व्यापार आणि दळणवळण पण चालत असे. समुद्र हे वरूणाचे  स्थान समजले जाते. समारंभ पूर्वक समुद्राचे दर्शन घेऊन त्यास नारळ अर्पण करून समुद्रावर सत्ता गाजविणार्‍या वरुण देवाची आठवण ठेवणे व कृतज्ञता व्यक्त करणे असा उद्देश असतो. वर्षा ऋतुत हा समुद्र क्षुब्ध झालेला असतो. शिवाय हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या काळात मासेमारी करायला कोली बांधव जात नाहीत. श्रवण पौर्णिमेला सागर पूजन झाले की मासेमारी सुरू होते. श्रावण पौर्णीमेपासून जलमार्गावर वाहतूक सुरू होते. असा हा समुद्र पूजनाचा दिवस.ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.

हाच दिवस वैदिक धर्म पाळणार्‍यांसाठी श्रावणी म्हणून पाळला जातो. या तितिथीला जानवे बदलायचा विधी सांगितला आहे. तर गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा हा पहिला दिवस असतो.

                            

     कृष्ण जन्माष्टमी - याच महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी असते. श्रवणात वद्य अष्टमीला रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. तो दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात.सबंध हिंदुस्थानात गोकुळ,मथुरा वृंदावन, द्वारका, पुरी, इथे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे असे समजले जाते.   

                                      

       पिठोरी अमावास्या- पोळा- श्रावण अमावास्येला बैल पोळा साजरा करतात. शेतकरी लोक आपल्या खिलार्‍या बैलांना रंगवून, सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढतात, पुजा करतात, गोडधोड करून त्यांना खाऊ घालतात. आपल्या उपयुक्त व वर्षभर आपल्यासाठी राबणार्‍या या गुरांबद्दल आदरभाव दाखविण्याचा हा दिवस. बहिणाबाई चौधरी यांनी बैल पोया या कवितेत याचं महत्त्व सांगितलं आहे. त्या म्हणतात,  

आला आला शेतकर्‍या, पोयाचा रे सन मोठा,

आता बांधा रे तोरन, सजवा रे घरदार |

करा अंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले  शेंदूर,

उठा उठा बहिनाई, चुले पेटवा पेटवा |

आज बैलाले निवद, पुरणाच्या पोया ठेवा,

                                                   वढे नांगर वखार, नही कष्टाले गनती |           

पीक शेतकर्‍या हाती, याच्या जिवावर शेती ||

    पावसाळा हा ऋतु नाही म्हटलं तरी आरोग्य बिघडवणारा असतो काही वेळा. या कालावधीत पचनशक्ति मंदावते. पावसामुळे बाहेरचे वातावरण आरोग्याला हानिकारक व रोगराईला पोषक असते. अशुद्ध व गढूळ पाणी वापरात येते. साहजिकच सर्दी, ताप, खोकला, पोट बिघडणे हे आजार उद्भवतात. त्यामुळे पचायला हलका आणि साधा आहार घ्यायला लागतो. यालाच आपल्या पूर्वजांनी धार्मिक जोड देऊन एकभुक्तं राहणं, उपवास करणं, एक धान्य खाण यासाठी नेम धर्म आखून दिले त्याचा शास्त्रीय फायदा व अर्थ लक्षात घेतला तर कसे ऊपयोगाचेच आहेत हे लक्षात येईल.

         कुठल्याही गोष्टींचा धार्मिक संबंध लावताना तो डोळसपणे बघावा. अंधश्रद्धेने नको. आजची नवी पिढी चौकस आहे. तिला प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय आधार हवा आहे. परंपरेने चालत आलेल्या रूढी आहेत त्या तशाच्या तशा नवी पिढी स्वीकारणार नाहीत. त्यामुळे नवा अर्थ देऊन, पण पहिलेच महत्व कायम ठेऊन त्यांच्या पर्यन्त तो पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या पालकांवरती आहे.      

      ऋतुचक्र आणि आपले हे उत्सव, व्रत वैकल्ये एकमेकांशी निगडीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यन्त पाळला जाणारा चातुर्मास. नियम पाळणे, धार्मिक पुजा-पाठ, पारायण करणे, उपासना करणे या बरोबरच उपवास धरणे. यात आपल्या दिनचर्येची ऋतूंशी सांगड घातलेली दिसते. आणि ओघानेच आपल्या आरोग्याशी पण. खर तर ही आपल्या ऋषीमुनींची आपल्याला देणगीच आहे. त्याची नीट व्यवहार्यता, उद्देश, त्यातलं वैद्यक शास्त्र हे पण आपण समजून घेतले पाहिजे. आपले उत्सव, जत्रा, सण, समारंभ, प्रवचने, कथा, कीर्तने यातून आपली कायिक, वाचिक आणि मानसिक प्रगति व्हावी हाच उद्देश आहे. म्हणूनच परंपरा पाळताना समजून उमजून पाळाव्यात.  

 © डॉ. नयना कासखेडीकर,पुणे .

                                            ----------------समाप्त -----------------  

Friday, 20 August 2021

स्वातंत्र्य युद्ध : काव्यातील देशभक्तीची प्रेरणा

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त लेख -

स्वातंत्र्य युद्ध : काव्यातील देशभक्तीची प्रेरणा

    

   भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळ भारतातचीच नाही तर जगाच्या इतिहासातील सर्वाधिक महत्वाची जनतेची चळवळ होती. स्वातंत्र्याचा लढा हा फक्त १५० वर्षांचा नव्हता तर ते मिळवण्यासाठी भारताने जवळ जवळ १००० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यासाठीं संघर्ष केला आहे. अनेक आक्रमणे परतवून लावली आहेत. ब्रिटिश लोकांनी १८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून आपली सत्ता उभी केली.

मराठी मुलूखात इंग्रजी राजवट इ .स. १८१८ मध्ये सुरू झाली. ब्रिटिश राजवटीचा सर्वच क्षेत्रात समाजाला त्रास होऊ लागला. इंग्रजी शाळा आणि इंग्रजी शिक्षण यामुळे हिंदू संस्कृतीवरच घाला घालणारे वातावरण तयार होत होते. हिंदू लोकांचे ख्रिस्त धर्मात धर्मांतराचा समाजावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. गुलामगिरी, पिळवणूक, व्यापारांचे खच्चीकरण, हस्तव्यवसायचा नाश, असे अनेक बाजुंनी हिंदू समाज भरडला जात होता. त्या वेळचे समाज सुधारक वृत्तपत्रातून या राजवटीवर कोरडे ओढत होते. पुढे पुढे तर इंग्रजी राजवटी विरोधात बंड होऊ लागले. महाराष्ट्रात इंग्रजी राजवट आल्यापासून १८१८ पासून १८८५ पर्यन्त बंगाल, बिहार, ओरिसा, तमिळनाडू, गुजराथ, ऊत्तर प्रदेश अशा ठिकठिकाणी सशस्त्र उठाव होऊ लागले. महाराष्ट्रात खांदेश, धार, बीड, नांदेड, कित्तूर, विजापूर येथील उठाव, रामोशांचा उठाव, सावंतवाडी, कोल्हापूर, सातारा, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नरगुंद, जमखिंडी, मुधोळ, बेळगाव इथला उठाव असे अनेक उठाव झाले. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. १८५७ चा उठाव हा सर्वात मोठा स्वातंत्र्य मिळविण्याच्या प्रयत्नातला उठाव होता. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, ब्रिटीशांना इथून हुसकावून लावण्यासाठी हिंदुस्थानात, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, वंगभंग चळवळ, देशभक्ती चळवळ, मिठाचा सत्याग्रह, स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ, छोडो भारत आंदोलन, क्रांतिकारकांचे बलिदान अखेरीस भारत पाकिस्तान अशी फाळणी. अशा घटना घडल्या. विद्वान, पुरोहित, पंडित, मौलवी, लेखक, कलावंत, जमीनदार, शेतकरी, कारागीर असे सर्वजण ब्रिटिश सरकारच्या विरोधात गेले.

लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागृती निर्माण करणे, जुलमी कायद्यांविरूद्ध लढा लढणे, त्याचवेळी दुष्काळला सामोरं जाणे या घटनांनी हिंदू लोकात असंतोष माजला होता. राष्ट्रीय चळवळीचा प्रचार प्रसार, दि हिंदू , केसरी-मराठा, अमृतबाजार पत्रिका, सुधारक, बंगालचा खागीकटा, व्हॉईस ऑफ इंडिया या वृत्तपत्रातून होत होता. यातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी व जागृती करण्यासाठी अनेक साहित्यिक, कवी यांनीही आपली लेखणी चालवली होती. यात वृत्तपत्रांचे समाजसुधारक पत्रकार, कामगार वर्ग, लेखक, कवी, सामाजिक पुढारी, उत्कट देशभक्तीने प्रेरित झालेल्या, स्वातंत्र्याच्या आशा आकांक्षा असलेले क्रांतिकारक, आपापल्या परीने साहित्यातून सुद्धा आपले विचार मांडून जनजागृती करत होते.वृत्तपत्रांनी या काळात महत्वाची भूमिका बजावली होती. विचार व्यक्त करण्याचं आणि विचारांचा प्रसार करण्याचं वृत्तपत्र एक महत्वाचं माध्यम होतं. प्रखर देशभक्ती आणि प्रखर राष्ट्रीयत्व याचा पुरस्कार त्यांनी केला होता.

स्वातंत्र्य लढ्यातील टिळकयुग आणि गांधीयुग या काळामध्ये, स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कविता लिहिली गेली. यातून सविनय कायदेभंग चळवळ, स्वदेशीचा स्वीकार, बहिष्कार, असहकार, कायदेभंग असे विषय या काळात लिहिले जात होते. धर्मभेद, जातिभेद बाजूला सारून इंग्रजांविरोधी सर्वांनी लढावे असे आवाहन होत होते. स्त्री शक्तीला गीतांमधून जागृत करणे हाही एक उद्देश कविता लिहिण्यामागे असे. शिवाय क्रांति कार्याचा गौरव, क्रांतिकारकांचा गौरव, सशस्त्र प्रतिकाराची गरज हे विषय लिहिले जात. त्यामुळे इंग्रजी राजवटी विरुद्ध विषय असल्याने या कवितांवर बंदी घालण्यात येई, साहित्य सरकारकडून जप्त करण्यात येई. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महाराष्ट्रभाट या टोपण नावाने लिहिलेले ‘गोमांतक’ या काव्यावर अशीच बंदी घातली गेली. त्यांचा ‘श्री बाजी देशपांडे आणि ‘सिंहगडचा पोवाडा’, कवि गोविंद यांचा ‘अफझलखान वधाचा पोवाडा’,’अभिनव भारतमाला’, यांच्यावर बंदी घातली गेली. शाहीर अश्विनीकुमार यांचा ‘भगतसिंगचा पोवाडा’, लक्ष्मण खानविलकर यांची प्रभात फेरीची ‘राष्ट्रीय पद्यावली’, श्रीपाद सातवळेकर यांचे ‘वैदिक राष्ट्रगीत’ यावर बंदी घातली गेली. साने गुरुजींची ‘सत्याग्रही’, ‘देशभक्त किती ते मरती’, ‘तूफान झालो’, ‘स्वातंत्र्य’, ‘सुसंस्कृत कोण? ‘प्रतिज्ञा’ आणि ‘खंडकाव्य’ या त्यांच्या पत्री काव्यसंग्रहातील कविता आक्षेपार्ह वाटल्याने सरकारने संग्रहावरच बंदी घातली होती. 

अशा सारखी गीते, काव्य रचना संपूर्ण भारतात त्या काळात प्रेरणा देत होते. ब्रिटिश सरकार अशा रचना, आणि त्याची पुस्तके जप्त करत होते, त्यावर बंदी घालत होते. ही सर्व काव्ये समाजात जनजागृती करत होती. राष्ट्राबद्दलची अस्मिता जागृत करत होती. त्यातल्याच काही रचना ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून सर्वमान्य झाल्या. त्यातलं ‘वंदे मातरम..., ‘जन गण मन...ईत्यादि. आनंदमठ या कादंबरीतले गीत, वंदे मातरम स्वातंत्र्य लढ्यातील काळात घोषगीतच बनले. तर पुढच्या काळात काही गीतांना चाली लावून ती अजरामर झाली, लोकप्रिय झाली. स्वातंत्र्योत्तर काळातही भारतात सर्व भाषांमध्ये राष्ट्रप्रेम गीते लिहिली गेली. उदा. कवि प्रदीप यांचे गीत- ‘ए मेरे वतन के लोगो ....’ राम सिंह ठाकुर यांचे कदम कदम बढाये जा.. , प्रेम धवन यांचे ‘ए मेरे, प्यारे वतन ...’, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे, ‘जयोस्तुते..., आणि इतर अनेकांची प्रेरणा देणारी वीरश्रीयुक्त गीते स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आजच्या पिढीच्या डोळ्यासमोर उभा करतात. तर मधल्या पिढीला त्या काळाची आठवण करून देतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य जरी १९४७ साली मिळाले असले तरी त्याचा लढा त्या आधीच्या काळात दिलेला होता आणि या प्रेरणेची राष्ट्रीय गीते आणि रचना त्या आधी पन्नास वर्षे लिहायला सुरुवात झाली होती.

मराठी साहित्यातील देशभक्तीचा प्रवाह, कवि विनायक यांच्यापासून सुरू झाला. पूर्वजांचे वैभव आणि त्यांची वीर वृत्ती याचे लोकांना स्मरण करून देऊन त्यातून त्यांना स्फूर्ति देणे, पारतंत्र्याविषयी लोकांच्या मनात चीड उत्पन्न करणे याच ध्यासाने विनायक कविता लिहीत

लोकमान्य टिळकांचा कारावास, चाफेकर बंधूंची फाशी, शिवजयंती, गणेशोत्सव, रशिया- जपान युद्ध, जहाल-मवाळ यांचा वाद, या विषयवार सुद्धा त्यांनी कविता केल्या आहेत. त्यांनी हिरकणी, अहिल्या, पन्ना, रानी दुर्गावती, संयोगिता तारा, पद्मिनी, कृष्णकुमारी वीरमती इ. ऐतिहासिक स्त्रियांच्या जीवनांतील प्रसंगांवर आदर्श सुंदर काव्ये लिहिली आहेत. हतभागिनी, मातृभक्तीचे लेणे, जन्मसार्थक्य या त्यांच्या कविताही आहेत. त्यांनी आपल्या राष्ट्रीय कवितेतून पूर्वजांच्या पराक्रमाची गौरवगाथा वर्णन केली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘राष्ट्र भक्तांचे आणि हुतात्म्यांचे बलिदान कधीच व्यर्थ ठरत नाही’ . ते ‘महाराष्ट्रलक्ष्मी’ या आपल्या कवितेत म्हणतात- ‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावी काळ ,बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ ’ असा अभिमान ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात.

आधुनिक मराठी कवितेचा जन्म केशवसुतांपासून झाला असे मानतात. त्यांचे विषय लौकिक जीवन, वैयक्तिक भाव भावना, भोवताली घडणार्‍या घडामोडी असे असत. सामाजिक वातावरणामुळे त्यांना राष्ट्रीय स्वातंत्र्य व समाज सुधारणेचा ध्यास लागला होता. तुतारी, नवा शिपाई, स्फूर्ति, मूर्तीभंजन, गोफण केली छान, अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, मजुरावर उपासमारीची पाळी, एका भारतीयाचे उद्गार यात केशवसूत आपला प्रक्षोभ व्यक्त करतात. त्यांची तुतारी ही कविता सामाजिक क्रांतिचे स्तोत्र ठरली आहे असे म्हटले जाते. ते त्यांच्या कवितेत राष्ट्रवादाबरोबर समाज, बंधुभाव, मानवता या मूल्यांचा पुरस्कार करतात. आपले राष्ट्र फक्त स्वतंत्र न होता ते बलसंपन्न आणि समतेच्या विचाराने एकत्र आले पाहिजे असा विशाल विचार ते कवितेत मांडतात.’

राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हटले जाते, एव्हढे त्यांचे साहित्य विशेष पैलू असणारं आहे. कविता, विनोदी कथा, नाटक असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. ‘गोविंदाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी सुमारे दिडशे कविता लिहिल्या. लोकमान्य टिळक, स्वराज्याच्या मागणीसाठी इंग्लंडला गेले तेंव्हा गोविंदाग्रजांनी लोकमान्य टिळकांना उद्देशून ‘भारत वर्षाचा आशीर्वाद’ हे काव्य लिहिले होते . महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पोवाडा सदृश एक मोठी कविता ‘पानपतचा फटका’ लिहिली.हा सर्व काळ राजकीय स्थित्यंतराचा काळ होता. गडकरींचा त्यांचा उमेदीचा काळ टिळक युगाने भारलेला होता. त्यांची आणखी एक कविता महाराष्ट्राचे गौरवगान करणारी सुप्रसिद्ध आहे.

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ धृ. ॥

दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांचे घराणे उत्तर हिंदुस्थानातले होय. रजपूत व मराठे यांच्या पराक्रमाने भारून गेलेल्या तिवारींनी देशभक्ती आणि वीरशक्ती यांचा गौरव करणारी स्फूर्तीपर गीते लिहिली.‘काव्यकुसुमांजली’ व ‘काव्यरत्नमाला’ या स्फुट कविता. यांव्यतिरिक्त तिवारींनी ‘मराठ्यांची संग्राम गीते’ ‘मनोहरलीला’ ‘ऐतिहासिक खंडकाव्य’ ‘काव्यतुषार’, ‘चंडीशतक’ अशी विविध प्रकारची दीर्घकाव्येही लिहिली. शौर्य, वीर्य, स्वातंत्र्य अशा भावनांची उत्कटता त्यांच्या काव्यात अवतरते. त्यासाठी झुंजलेल्या वीरांचा त्यांना अभिमान वाटे. ‘झाशीची संग्रामदेवता’ या काव्यसंग्रहात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या पराक्रमाचे वर्णन येते. ‘मेरी झाँसी नही दूंगी’ या प्रतिज्ञेपासून तिच्या बलिदानापर्यंतच्या पराक्रमावर त्यांनी दहा कवने लिहिली आहेत.

कविवर्य बा. भ. बोरकर अत्यंत संवेदनशील. त्यांच्यावर देशातील अनेक घटनांचा प्रभाव पडला आणि तो त्यांच्या कवितेत दिसतो. त्यांना देशाबद्दल ज्वलंत अभिमान आहे आणि गुलामगिरीबद्दल चीड आहे ते कवितेत प्रतिबिंबीत होते. त्यांच्या ‘महाराष्ट्र गीत’ ‘भगवती स्वतंत्रतेस’, ‘स्वातंत्र्य लक्ष्मीस’, ’स्वातंत्र्याची सिंहगर्जना’ या कवितेत स्वातंत्र्याचा ध्यास दिसतो. त्याचप्रमाणे थोर हुतात्मे आणि महात्मेयांच्या बद्दल त्यांना वाटणारा आदर जाणवतो. सर्वस्वाचे बलिदान देणार्‍या वीरांना ते ‘तेथे कर माझे जुळती’ या कवितेत वंदन करतात.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

याच प्रमाणे कवि भा.रा.तांबे यांची कविता,

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ||

ही सर्वज्ञात आहेच. भा. रा. तांबे यांना पारतंत्र्याची अत्यंत चीड होती. इंग्रजी सत्तेविरूद्ध त्यांनी आपल्या कवितेतून आवाज उठवलेला दिसतो. घटोत्कच माया, तरुणाचे पाते, अर्जी ऐका हो सरकार, साम्राज्यवादि, मातृभूमीप्रत कोण रोधील? अशातून ती चीड व्यक्त होते.

नाशिकचे भूमीपुत्र कवी गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद- नाशिकचे भूमीपुत्र.

राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे!
धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे!
ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते!
हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!

अशा काव्यांतून स्वातंत्र्याची ललकारी देणारे, राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण करणारे आद्य कवी म्हणून कवी गोविंद ओळखले जातात. स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका वठविणाऱ्या सावरकरांच्या अभिनव भारत ऊर्फ मित्रमेळा संघटनेच्या कार्यात कवी व एक मुत्सद्दी म्हणून त्यांनी भूमिका निभावली होती.

राष्ट्रीय जाणिवेच्या कविता लिहिणारे आपल्या सर्वांना माहिती असणारे या कालखंडातील महत्वाचे कवी म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ‘श्रीमंत सवाई माधवरावाचा रंग’ ही त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी लिहिलेली पहिली कविता. बाजीप्रभू, तानाजी यांच्यावरील पोवाडे रचना त्यांनी केली. त्यांच्या कवितेचा गाभा हा राष्ट्रप्रेम किंवा देशभक्ती हाच होता. त्यांच्या कवितेने मनामनात देशभक्तीची प्रेरणा जागवली आहे. सागरास, सांत्वन, बेडी, पहिला हप्ता, चांदोबा चांदोबा भागलास का?, मूर्ति दुजी ती, माझे मृत्यूपत्र, आत्मबल, सायंघंटा अशा दर्जेदार काव्यरचना मराठी साहित्याला बहाल केल्या. मृत्युपत्रात तर ‘स्वातंत्र्य देवतेसाठी मरण म्हणजे जनन’ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या बरोबरच त्यांचे दोन्ही बंधू श्री. बाबाराव आणि श्री. गणेशराव सावरकर मित्रमेळ्यासाठी क्रांतिगीते लिहून तरुणांना स्फूर्ति देत होते. सावरकरांच्या कवितेत राष्ट्रीय जाणीव अत्यंत दिव्य आणि दाहक स्वरुपात दिसते.

याशिवाय माधव काटदरे, साने गुरुजी, आज्ञातवासी, कुसुमाग्रज, सेनापति बापट, माधव ज्युलियन, यशवंत, कवि अनिल, विंदा करंदीकर, वसंत बापट, कुंजविहारी, अमर शेख, आण्णा भाऊ साठे या कवींनी सुद्धा आपल्या कवितातून इंग्रजी राजवटीच्या विरोधात चीड, संताप व्यक्त केला. त्यातून राजकीय जागृती घडवून आणली. अशा कविता प्रसिद्ध होऊ लागताच इंग्रज सरकारने त्या जप्त करून नष्ट करायला सुरुवात केली. या कवितातून सत्याग्रह, असहकार अशा चळवळींना प्रेरणा मिळत असे. कवींनी आपल्याला पटलेले आणि भावलेले स्वातंत्र्य लढ्याच्या मार्गाचे वर्णन यातून केले आहे. या स्वातंत्र्य लढ्यामुळेच या कविता निर्माण झाल्या तशाच त्या या चळवळींना प्रेरणा देणार्‍या ठरत होत्या. यातून स्त्री शक्तीला ही जागृत करण्याचे काम होत होते. म्हणून हिंदुस्थानातील शूर स्त्रीयांचे वर्णन कवितेतून होत होते. स्वातंत्र्य मिळवण्याची भावना त्या वेळी प्रत्येकात होती त्यामुळेच आपापला योग्य वाटणारा मार्ग कवींनी काव्याच्या माध्यमातून मांडला. या राष्ट्रीय कविता आपल्याला स्वातंत्र्याचा इतिहास सांगतात.

© डॉ.नयना कासखेडीकर.