Monday, 5 September 2022

स्वातंत्र्य लढ्यात स्त्रीयांचे योगदान

 

स्वातंत्र्य लढ्यात स्त्रीयांचे योगदान

 

भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही जगातल्या इतिहासातली सर्वाधिक महत्वाची सामान्य जनतेची चळवळ आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी मिळून बलाढ्य अशा वसाहतवादी ब्रिटिश साम्राज्याला शरणागती पत्करायला लावली. म्हणून जगाच्या इतिहासात या लढ्याला महत्वाचे स्थान आहे. हा लढा समाप्त झाला तो १५ ऑगस्ट१९४७ ला.  

स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात व  प्रमुख घटना बघितल्या तर हिंदुस्थानच्या जनतेने वर्षानुवर्षे काय काय आणि किती भोगले होते याची कल्पना येते. यासाठी पुरुषांच्या बरोबर स्त्रिया सुद्धा लढल्या. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात त्या काळातील प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणार्‍या ,रूढी परंपरेने जखडल्या असताना,अनेक प्रकारची बंधने पाळावी लागत असताना समाजातल्या अनेक थरातील महिलांनी स्वयंस्फूर्तीने ,जबाबदारी घेऊन स्वातंत्र्य लढ्यात कामगिरी केल्याचे दिसते.त्यांच्यापुढे आदर्श होते ते १८५७ च्या स्वातंत्र्याच्या उठावात, स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढलेल्या योद्ध्या राणी लक्ष्मीबाई व तिच्या सहकारी, अवधची बेगम हजरत महल, इंदूरच्या होळकर घराण्यातली राणी भीमाबाई, मद्रास प्रांतातील शिवगंगा संस्थांनाची राणी वेलुंचीयार, कित्तूरची राणी चेन्नमा.     



स्वातंत्र्य लढ्यात सामील असणार्‍या आंदोलक आणि क्रांतिकारी यात महाराष्ट्रातले तात्या टोपे
, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे, शिवराम राजगुरू, वीर सावरकर, चाफेकर बंधु, बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट आणि असंख्य देशभक्त होते.  

या सर्व घटना मनाला क्लेश देणार्‍या होत्या. त्याचं प्रतिबिंब वृत्तपत्रे आणि साहित्यातून उमटत होते. आनंदमठ- बंकिम चंद्र चट्टोपाध्याय, स्वा. सावरकर यांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर, महात्मा गांधी यांचं हिंद स्वराज्य, यातून लोकांमध्ये जागृती होत होती. वेळोवेळी ब्रिटीशांच्या अन्यायाला कंटाळून देशप्रेमी, देशभक्त आपल्या भावनांना लिखाणातून वाट करून देत होते. काही जाहीरपणे, काही एकमेकांशी संवादातून, दैनंदिन व्यवहारात व्यक्त होत.स्त्रिया सुद्धा या विषयावर आपली मते प्रकट करत. लिहित. विशेषता शिक्षणाचा प्रसार होऊ लागला तसे महिलाही वाचू लिहू लागल्या. विचार करू लागल्या.   

 १९ व्या शतकात हिंदुस्थानात साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार वाढत गेला .त्यामुळे लोकांना ज्ञानाची गोडी लागली होती.दळणवळणाची साधने निर्माण झाली होती. पुढे विद्यापीठे निर्माण झाली. इथल्या लोकांना शिक्षणातून लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद, समाजवाद या संकल्पना कळू लागल्या. दृष्टीकोण बदलला. सतीप्रथा, बालविवाह, केशवपन, नरबळी, अस्पृशता या प्रथा बंद करण्यासाठी सुधारक प्रयत्न करत असले तरी ब्रिटीशांनी याचा फायदा घेतला. मिशनर्‍यांनी तर स्त्री शिक्षणाचा उपयोग धर्मांतराचा मार्ग म्हणून केला.स्त्रियांना शिक्षण देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. बंगाल मध्ये याची सुरुवात झाली. मग महाराष्ट्रात .

 समाज सुधारक जनजागृती पर लेखन करू लागले. शिक्षणामुळे व्यापक दृष्टीकोण तयार झाला आणि स्वातंत्र्य आंदोलनाला चालना पण मिळाली. उपेक्षित लोक ही जागृत झाले आणि ख्रिश्चन धर्म प्रसार रोखण्याचे प्रयत्न होऊ लागले. अशा प्रकारे ब्रिटीशांनी त्यांच्या सोयीसाठी केलेल्या शिक्षण व सोयी, सुधारणा यांचा फायदा भारतीय लोकांना झाला. या सुधारणा भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची जागृती निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्या.

भाऊ दाजी लाड,विष्णुशास्त्री पंडित, गोपाल हरी देशमुख, जगन्नाथ शंकर शेठ, बाळशास्त्री जांभेकर,महात्मा ज्योतिबा फुले, ताराबाई शिंदे,पं .रमाबाई ,महर्षी धोंडो केशव कर्वे,या सुधारकांनीही स्त्री सुधारणेसाठी प्रयत्न केले. शिक्षणामुळे सजग झालेल्या स्त्रिया, रूढी परंपरा यांचे जोखड बाजूला करत त्या स्वत:ला बदलू पहात होत्या. स्त्री नेतृत्व उदयाला येत होतं. स्त्रिया आत्मविश्वासाने स्त्रियांसाठीच अनेक क्षेत्रात सामाजिक काम करू लागल्या. स्त्रियांच्या संघटना निर्माण होत होत्या.क्रांतिकारक बाबाराव सावरकर यांनी तर १९०५ साली स्वदेशीचा पुरस्कार करणारी आत्मनिष्ठ युवतीसंघ ही स्त्री संघटना नाशिक येथे स्थापन केली.



त्या वेळची भारतातील एकूणच परिस्थिती ब्रिटीशांच्या विरोधात होती त्याचा परिणाम म्हणून देशभक्त, क्रांतिकारक,पुढारी नेते, समाज सुधारक सर्वच जनता स्वातंत्र्यासाठी पेटून उठली होती. स्त्रिया सुद्धा मागे नव्हत्या. शिवाय अनेक क्रांतीकारकांना पकडून तुरुंगात डांबले होते त्यांच्या घरातील स्त्रिया धैर्याने आलेल्या परिस्थितीला तोंड देत होत्या. आपल्याच मैत्रिणींचे संघटन पण एका बाजूला करत होत्या. स्वदेशी ही चळवळ ,सभा, चर्चा, भेटी असे उपक्रम स्त्रिया करत. बाबाराव सावरकर यांच्या पत्नी सरस्वती बाई म्हणजेच स्वा.सावरकर यांच्या येसूवहिनींचे नाव आवर्जून घ्यावे लागते.तिन्ही सावरकर बंधू देशासाठी आयुष्यभर लढले. घरातली कर्ती पुरुष मंडळी जेंव्हा क्रांतिकारक म्हणून देशासाठी स्वताला तन,मन, धनाने वाहून घेतात तेंव्हा आमच्या संस्कृतीतल्या स्त्रिया सुद्धा त्यांना मनापासून साथ देत कुटुंब सावरतात, वेळ पडलीच तर देशासाठी आपल्या घरातल्या लोकांबरोबर स्वत:ही कामाला लागतात. आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषांनी घरादारवर तुळशीपत्र ठेवले असते तरी स्त्रिया न डगमगता त्याला सामोरे जातात. हेच काम येसु वहिनी, यमुनाबाई यांनी केले. संपूर्ण घरच देशासाठी काम करत राहिले. याचे मुख्य कारण घरातील पुरूषांना सामाजिक सुधारणा, स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा, स्पृश्य अस्पृश्यता, जाती भेद निर्मूलन ,स्त्रीयांचे घराबाहेर पडणे, त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेणे, या गोष्टी सावरकरांच्या घरापासून घडत होत्या. म्हणून प्रसंगी येसुवाहिनी, यमुनाबाई आणि शांताबाई या तिन्ही सावरकर घराण्यातल्या धीरोदात्त स्त्रिया पती विरह, हालअपेष्टा, उपासमार सहन करत ध्येयाने स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात खंबीरपणे उभ्या राहिलेल्या दिसतात. आत्मनिष्ठ युवती समाज स्थापन करून यांनी स्त्रियांमध्ये क्रांतिकार्‍याच तत्वज्ञान रुजविले, स्वदेशी वापरा बद्दल जागरूकता निर्माण केली, स्त्रियांच्या मनात देशभक्तीची आस  जागविली,साप्ताहिक बैठका घेऊन त्यात स्फूर्तीगीते स्त्रियांकडून सामूहिक रूपात म्हणून घेत. सर्वांना शपथ घ्यायला लावित की, “मी शिवरायांना व भवानी दुर्गादेवीला साक्ष ठेवून सांगते की, मी स्वदेशी मालच वापरेन, स्वदेशावर प्राणापलीकडे प्रेम करेन. प्राणपणाने स्वातंत्र्याकरिता झटेन. हे व्रत म्हणून मी पालन करेन व आजन्म स्वदेश स्वातंत्र्याची व्रती म्हणून मी मला म्हणवून घेईन. त्यात मला सर्वश्रेष्ठ समाधान लाभो.” तसच, केसरीतील ब्रिटीशांविरोधात आलेले लेख व अग्रलेख सर्वांना वाचून दाखवीत आणि स्त्रियांमध्ये मत परिवर्तन घडवीत.

अशा प्रकारे सर्वच क्रांतिकारकांच्या आणि देशभक्तांच्या घरातून स्त्रिया सुद्धा कामाला लागल्या होत्या. सामान्य देशभक्ताच्या घरातील स्त्रिया आपला पती ब्रिटीशांच्या विरोधात आंदोलनात सहभागी झाल्यानंतर तुरुंगवास भोगायला कैदेत जातो, तेंव्हा तर लहान लहान मुले आणि संसार कसा सांभाळायचा असा मोठा प्रश्न या स्त्रियांना असे.

काहीं स्त्रियांनी तर स्वातंत्र्य चळवळीत नेतृत्व केले, हेरगिरी केली, भूमिगतांना सहकार्य केलं आणि तुरुंगवास सुद्धा भोगला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची चळवळ याबरोबरच समांतर सुरू असलेले सामाजिक सुधारणा हे ही काम स्त्रिया करत होत्या. ब्रिटीश  विरोधाने सगळा भारतच ढवळून निघाला होता.

    मॅडम भिकाजी कामा -  परदेशात राहून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करणे अत्यंत अव्घ्जड गोष्ट तेही एका स्त्रीने हे आश्चर्यकारक होतं. १८ ऑगस्ट १९०७ या दिवशी,स्वतंत्र भारताचा ध्वज एका आंन्तराष्ट्रीय मेळाव्यात फडकीवणाऱ्या धाडसी मॅडम कामांचे नाव भारताच्या स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक लढ्यात ठळकपणे लिहिले गेले आहेच.परंतु जगभरातही त्यांचे नांव आदराने घेतले जात असे.त्याचे कारण,हिंदुस्थानातल्या ब्रिटीशांच्या दडपशाहीचा अर्थ व स्वरूप,त्यांनी अमेरिका,फ्रान्स व इंग्लंड मध्ये जाऊन तिथल्या जनते समोर उलगडून दाखविला. हिंदुस्थानाबद्दल व स्वातंत्र्य मिळण्याबाबत तिथल्या जनतेला आपल्या भाषणातून, वृत्तपत्रीय लेखनातून, प्रसिद्धी पत्रकातून, बैठकांमधील चर्चातून जनमत वळवण्याचा प्रयत्न मडॅम कामा यांनी केला.

  बंगालच्या फाळणी नंतर पॅरिस मध्ये एक सभा बोलावली होती त्यात मॅडम कामा यांचे भाषण झाले, त्या म्हणाल्या, “ हिंदुस्थानच्या स्त्री पुरुषांनो ,अशा पारदास्यात  जगण्यापेक्षा आपण सर्वच्या सर्व लोक नष्ट होऊन गेलो तरी चांगले असा निर्धार तुम्ही करा”. शूर राजपुतांनो, शिखांनो, पठाणांनो, गुराख्यांनो, देशभक्त मराठ्यांनो आणि बंगाल्यांनो, उद्योगी पारश्यांनो, मुसलमानांनो आणि सौम्य वृत्तीच्या जैनांनो, धीम्या वृत्तीच्या हिंदुनो, तुम्ही आपल्या स्वताच्या. परंपरांप्रमाणे जीवन का जगात नाहीत? चला पुढे व्हा.स्वराज्यातील स्वातंत्र्य,समता यांची प्रतिष्ठापना करा.तुमच्या स्वतासाठी आणि मुलाबाळांसाठी पुढे या. मानवी हक्कांची लढाई लढा. पौर्वात्य लोक  पाश्चीमात्यांना काही नवे शिकवू शकतात हे जगाला दाखवून द्या.

हिंदुस्थानच्या पहिल्या राष्ट्रध्वजाचा जन्म लंडन मध्ये झाला. जर्मनीतील स्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतर्राष्ट्रीय समाजवादी कोंग्रेसच्या अधिवेशनात मॅडम कामा उपस्थित राहिल्या होत्या. सावरकरांनी लिहून दिलेला ठराव या अधिवेशनात मांडावा असे ठरले. मॅडम कामा व्यासपीठावर उभ्या राहिल्या आणि शांतपणे ठराव वाचून दाखविला . बरोबर पोलक्यात लपवलेला ध्वज होता तो नाट्यमय रित्या त्यांनी फडकावला. आणि गंभीर आवाजात म्हणल्या, “   “हा पहा हा हिंदू स्वातंत्र्याचा ध्वज आहे. आज याचा जन्म झालाय.हिंदुस्थानच्या तरुण हुतात्म्यांच्या रक्ताने तो आधीच पावन झालेला आहे. नागरिकहो उठा आणि या अभिनव भारताच्या, या हिंदवी स्वातंत्र्याच्या ध्वजाला प्रणाम करा”.या त्यांच्या स्फूर्तीदायक आवेशाने सर्व प्रतिनिधी भारावून गेले.आणि या ध्वजाला सर्वांनी उभे राहून अभिवादन केले.वातावरण एकदम भारावून गेले.”



सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक १९०८ मध्ये मराठीत लिहून पुरे केले.त्याचे हस्तलिखित प्रसिध्द करण्याचे बरेच प्रयत्न झाले.इंग्रजांविरुध्द ते असल्याने कोणीच मुद्रक छपाई साठी तयार होईनात.
 मॅडम कामांच्या महत्प्रयासानंतर हॉलंड मध्ये ते गुप्तपणे छापले.

सरकारला सुगावा लागू न देता या पुस्तकाच्या विक्रीची व वितरणाची व्यवस्था कामांनी अगदी व्यवस्थित पणे केली. पुस्तकाचे प्राप्तीस्थळ म्हणून स्वतःचा पत्ता, ‘मिसेस बी.आर.कामा,पब्लिकेशन कमिटी, ७४९ थर्ड अव्येन्यू,न्यूयॉर्क’. असा देऊन वाचकांना ते नीट मिळेल याची कौशल्याने योजना आखली. असा हा क्रांतिकारक ग्रंथ आपल्या लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी मॅडम कामांनी अतोनात कष्ट घेतले.अनेक क्लृप्त्या लढविल्या.

 मॅडम कामांनी १० सप्टेंबर १९०९ ला हरदयाळांसाठी  ‘वंदेमातरम’ हे पत्र सुरु केलं.भारतीय स्वातंत्र्याच्या या मासिक मुखपत्रासाठी सर्व आर्थिक बोजा कामांनी स्वतः उचलला होता. हे मुखपत्र स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा येथून प्रसिध्द होत असे.यातील सर्व लिखाण कामा स्वतः संपादित करत असत.याची वितरण व्यवस्थाही कुशलपणे त्यांनी केली होती. याचा पुरावा ब्रिटीश सरकारला शोधूनही सापडला नव्हता.

 कमला देवी चट्टोपाध्याय या नाट्य कलावंत आणि समाज सुधारक पण त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. ब्रिटीशांनी अटक केलेल्या पहिल्या महिला होत. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. त्यांनी अखिल भारतीय महिला परिषद स्थापन केली. स्त्रियांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक लघूद्योग सुरू केले.

कॅप्टन लक्ष्मी सहगल - शांतपणे काम करणार्‍या महिलांनी लढायची वेळ आलीच तर तेही काम करू हे दाखवून दिले ते,नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत दाखल होऊन,कॅप्टन म्हणून काम करणार्‍या लक्ष्मी सहगल यांनी. विशेष म्हणजे त्यांनी दुसर्‍या महायुद्धात भाग घेतला होता आणि त्यांना ब्रह्मदेशात तुरुंगवास भोगावा लागला होता.    

अरुणा असफ अली- द ग्रँड ओल्ड लेडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले महत्वाचे नाव . भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले होते.त्या तर इंग्रजाच्या हातात सापडत नव्हत्या, शेवटी त्यांना पकडून देणार्‍यास ५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ब्रिटीशांविरोधी आंदोलन केले म्हणून तुरुंगात पण त्यांना जावे लागले. ही आंदोलने भारतभर चालू होती.

कनकलता बरूवा- स्वातंत्र्य लढ्यातील वीरबाला. असम मध्ये १९४२ च्या आंदोलनात भाग घेतला. त्याचे नेतृत्व कनकलता यांनी केले. ब्रिटीशांनी अडवले आणि लाठीमार केला त्यातच या वीर बालेला वीरमरण आलं.  

मातंगिनी हाजरा यांनी भारत छोडो आंदोलनात आणि आशकर चळवळीत भाग घेतला हातात ध्वज घेवून वंदेमातरम च्या घोषणा देत असताना आंदोलनावर गोळीबार झाला ,मातंगिंनींना 3 गोळ्या लागल्या. मृत्यू आला तरी हातातला ध्वज त्यांनी खाली पडू दिला नाही.    

 बिहारच्या ताराराणी श्रीवास्तव – सामान्य कुटुंबातल्या तारा राणी यांचे लग्न , महात्मा गांधी यांच्या आंदोलांनातील एक कार्यकर्ता फुलेन्दू बाबू यांच्याशी झाले. १९४२ च्या आंदोलनात फुलेन्दू यांच्याबरोबर तारा राणी यांनीही सहभाग घेतला. सीवानच्या पोलिस स्टेशनवर भारतीय झेंडा फडकवण्यासाठी आंदोलनकर्ते निघाले ,इन्कलाब झिंदाबाद घोषणा देत असताना पोलिसांनी गोळीबार केला. त्यात फुलेन्दू यांचा अंत झाला, तरीही पुढे भारत स्वतंत्र होईपर्यंत ताराराणी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

मूलमती-   काकोरी कटातील सहभागी असलेल्या रामप्रसाद बिस्मिल यांना ब्रिटीशांनी अटक केली होती. तुरुंगात त्यांना भेटायला आई मूलमती गेल्या असताना कोलमडलेल्या रामप्रसाद यांना धीर दिला आणि तुझ्यासारखा मुलगा पोटी जन्माला आल्याचा अभिमान वाटतो असे सांगितले.रामप्रसाद यांना १९२७  मध्ये फाशी झाली. मृत्यूनंतर शोकसभेत या धैर्यशील मातेने सांगितले की, माझ्या एका मुलाने देशासाठी प्राण दिले आता पुढच्या लढाईसाठी माझा हा दुसरा मुलगा तयार आहे. 

सुचेता कृपलानी – गांधीवादी विचारसरणीच्या सुचेता कृपलानी ,स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री . स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय असलेल्या सुचेता यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. भूमिगत राहून आंदोलन केले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्य अधिवेशनात पंडित जवाहर लाल नेहरूंच्या भाषणा आधी वंदेमातरम गायले होते.  १९४० मध्ये त्यांनी अखिल भारतीय महिला कॉंग्रेसची स्थापना केली.

सरोजिनी नायडू – एक कवयित्रि अन स्वातंत्र्य सेनानी होत्या. साहजिकच त्यांच्या कवितेत राष्ट्रीय भावना उमटत होत्या. पं. जवाहरलाल नेहरू आणि रविंद्रनाथ टागोर या कवितांचे चाहते होते. त्या हिन्दी आणि इंग्रजीत कविता करत. या कवितांमुळे त्यांना भारताची नाईटेंगल किंव भारत कोकिला म्हणत. ही उपाधी त्यांना महात्मा गांधी यांनी दिली होती. महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात बदल झाला.  नागरी हक्क, महिला मुक्ती,या विचारांच्या त्या समर्थक होत्या. जालियन वाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर रविंद्रनाथ टागोर यांनी नाइट हुड ही पदवी तर, नायडू यांनी कैसर-ए-हिंद हा मिळालेला पुरस्कार परत केला होता.    

उषा मेहता – स्वातंत्र्यालाढ्यत भूमिगत रेडियो स्टेशन चालू करून स्वातंत्र्य लढा कुठे चालू आहे, कोण कोण सहभागी आहेत,ब्रिटीशांचे अन्यायकारक काम कसे चालू आहे,देशाच्या कुठल्या भगत चळवळ जोरात चालू आहे, त्याचे स्वरूप याची माहिती रेडियो वरुन त्या द्यायच्या.नेताजी सुभाष चंद्र बोस यांनाही या चळवळीची माहिती या रेडियो मुळे कळत असे.पोलिसांचे लक्ष चुकविण्यासाठी हे केंद्र त्यांना सतत दुसरीकडे हलवावे लागत असे.   

अॅनी बेझंट-  एक विदेशी भगिनी थिओसॉफीच्या प्रचारासाठी भारतात आलेल्या. पण इथे आल्यावर त्यांनी होमरूळ चळवळ  सुरू करून भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले.

बिना दास - अशा अनेक वेगवेगळ्या वयाच्या महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारी कामे केली आहेत. बांगलातील कृष्णनगर या गावातील बिना दास या कॉलेज कन्येने सायमन कमिशनाला विरोध करण्यासाठी मुलींचा गट तयार केला, ती पदवीधर झाल्यानंतर १९३२ साली, पदवीदान समारंभात ती व्यासपीठावर पदवी घेण्यास गेली. बंगालचे गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन यांच्या हस्ते पदवी स्वीकारताना बिनाने आपल्या पदरात लपवलेले पिस्तूल काढून जॅक्सनवर  गोळ्या झाडल्या. पण दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. पण बिनाला ९ वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. “मी माझ्या मातृभूमीच्या प्रेमामुळे पिस्तूल झाडले, तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मंजूर आहे” असे न्यायाधीशांना सांगितले.

महाराष्ट्रात ज्या गृहिणी होत्या किंवा उघड उघड चळवळीत भाग घेऊ शकत नव्हत्या, त्या मुली व स्त्रिया हस्तलिखित पत्रके तयार करून वाटणे, माहिती देणे, बातम्या पोहोचविणे, गुप्त संदेशाच्या चिठ्ठ्या नेऊन देणे ,स्फोट द्रव्ये सांगितल्या ठिकाणी नेऊन ठेवणे आदि जिवावर उदार होऊन कामे करत होत्या. प्रेमा कंटक, हंसा मेहता, पद्माबाई हरोलीकर, भक्तीबा देसाई, खांदेशातल्या लीला पाटील, सातार्‍याच्या काशीबाई हणवर, राजूताई बिरनाळे , हंसा ताई पाटील यांचा फार मोठा सहभाग होता.विशेषता १९४२ च्या लढ्यात स्त्रीयांचे प्रमाण लक्षणीय होते. वर्ध्याच्या १४ वर्षीय अंजनाताई नंदरधने, जानकीदेवी बजाज, तर चिमुर आष्टी खडकी, चंद्रपूर,भंडारा, नागपुर, अमरावती, अकोला, यवतमाळ , सोलापूर, नगर, नाशिक, पुणे, बार्शी, इथे सहभागी झालेल्या मुली व महिला यांचेही योगदान आहे. लढ्यात भाग घेतलेल्या महिलांची यादी खूप मोठी आहे. अनेक ज्ञात तर अनेक जणी अज्ञात आहेत.भारताच्या स्वातंत्र्यालढ्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आहे. त्यांच्या शिवाय हे स्वातंत्र्य मिळणं खरच शक्य नसतं झालं एव्हढे काम या स्त्रियांनी केले आहे. भारतीय स्त्री कणखर आहे, धैर्यवान आहे. निष्ठावान आहे, विचाराने प्रगल्भ आहे, मनाने आणि शरीराने बलवान आहे ,गरज पडली तर आक्रमक आहे, ती चांगले नेतृत्व करू शकते या सर्व गुणांमुळेच तिने इतिहास गाजवला आहे, त्यांचे कार्य पुढच्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील यात शंका नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लढ्यातल्या सर्व सहभागी रणरागिणींना विनम्र अभिवादन! 

सर्व फोटो गुगल वरुन साभार परत, हा लेख सप्टेंबर २०२२ च्या एकता मासिकात/विशेषांकात प्रकाशित झाला.  

-       डॉ. नयना कासखेडीकर,पुणे .


 -----------------------------------      

Tuesday, 2 August 2022

जय देवी मंगळागौरी...

 

जय देवी मंगळागौरी...

 श्रावणातली मंगळागौर म्हणजे ‘गौरी गौरी सौभाग्य दे’ अशी प्रार्थना करत मांडलेली पार्वतीची पूजा. मंगळागौर म्हणजे पार्वतीच्या रुपातील अन्नपूर्णा. मंगळागौरीची पूजा करणं हे विशेषता महाराष्ट्रातले पारंपरिक व्रत.अशाच प्रकारची सौभाग्यदायिनी पूजा बंगालमध्ये मंगलचंडिका नावाने करतात. पुराण ग्रंथात भगवती मंगल चंडिका स्तोत्र आहे . शिव शंकराने तिला जगन्माता म्हटलं आहे. ही भगवती सर्व संकटनाचा नाश करणारी आणि सदैव कल्याण करण्यात तत्पर असणारी आहे.सढळ हाताने शुभ, मंगल करणारी, मंगल ग्रहाची पण इष्ट देवता असणारी मंगलाधिष्ठात्री आहे .या स्तुतीतले हे वर्णन भगवान शंकराने भगवतीची उपासना करताना केलेलं आहे असे म्हंटले आहे. या मंगला देवीची सर्व प्रथम श्री शंकराने उपासना केली त्यानंतर, देवता, मुनि आणि नंतर मानवाने ही उपासना सुरू केली.मग विश्वात सगळीकडे ही पूजली जाऊ लागली. स्त्रियांनी सुद्धा आपले कल्याण व्हावे म्हणून या देवीची उपासन केली. आणि बरोबरच आहे आपले आयुष्य सुखासमाधानात जावे,मुला-बाळांचे कल्याण व्हावे, संकटे येऊ नयेत असे कुणाला वाटणार नाही? त्यामुळे मनाला विश्वास देणारी एक शक्ती आपण मानत असतो.हा मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळेच अशा उपासना होत असतात.पद्धती वेगवेगळ्या असतात एव्हढंच. ही संस्कृती मनुष्याने आपले जीवन सुखकर व आनंदी व्हावे म्हणून ती निर्माण केली आहे.ती तो सामूहिक पद्धतीने पाळत असतो ,यात आपले विविध सण, उत्सव, पूजा-अर्चा यासारख्या धार्मिक गोष्टी आणि त्या निमित्ताने वडीलधारी माणसे लहान मुलामुलींवर जीवनातल्या चांगल्या मूल्यांचा संस्कार करत असतात.  


  

       वटसावित्री, मंगळागौरी, हरितालिका हे तसे हिंदू धर्मातले कौटुंबिक धार्मिक सण.नवविवाहिता श्रावणात शिव आणि गणपती सहित पार्वतीची पूजा करतात.

मम पुत्र पौत्रादिवृद्धये अवैधव्य भर्तुरारोग्यादि सकलकामना

सिद्धीद्वारा श्री शिवमंगलागौरी प्रीत्यर्थं पञ्च-वर्षात्मकं मंगलागौरीव्रतम करिष्ये !

असा संकल्प नवीन लग्न झालेल्या मुली या पूजेच्या वेळी करतात. यातला धार्मिक दृष्टीकोण थोडा बाजूला ठेऊन पाहिलं तर, तो एक प्रकारचा कौटुंबिक संस्कार सुद्धा आहे. हिंदू धर्मातील कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठीचा मूल्यसंस्कारच. कारण शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. पती-पत्नी मधील प्रेम आणि निष्ठा याचं हे उदाहरण आहे. मंगळागौर पूजेचे हे अधिष्ठान म्हणजे हेच आदर्श आमच्यात यावेत. शिवाय पुजा समूहाने म्हणजे आपल्या नवविवाहित मैत्रिणी,बहिणी यांच्या समवेत एकत्रित पणे ही आराधना करणे म्हणजे एक सामुहिक संस्कारच.

  नवीन लग्न झालेल्या सुनेला/मुलीला या निमित्ताने आपल्या घरातिल नातेवाईक मंडळींचा परिचय व्हावा, आपले हितचिंतक, ओळखीचे यांचा परिचय व्हावा ,जवळून ओळख व्हावी व हे संबंध आणखी दृढ व्हावेत म्हणून या प्रसंगी हळदी कुंकू करण्याचे प्रघात पडले. त्याच बरोबर प्रत्यक्ष भेटीमुळे होणारा आनंद  आणि तो एकमेकात वाटताना मिळणारे समाधान सुद्धा वेगळेच . 

मंगळागौरी पूजनानिमित्त समवयस्क मैत्रिणी व बहिणी जमलेल्या असताना आपले अनुभव एकमेकांना सांगताना, गप्पा मारताना आणि एक मनोरंजन म्हणून सुद्धा मंगळागौरीचे खेळ व गाणी म्हणण्याची पद्धत आहे. यात रात्री जागरण करून हे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. हे खेळ म्हणजे सर्वांगाला व्यायाम होणारे असतात. ती एक प्रकारची आसनेच असतात.स्त्रियांना फक्त घरातली कामेच करावी न लागता त्यांना मनोरंजन पण हवे ,आनंद मिळावा या हेतूने गाण्याची ही जोड देऊन हे खेळ खेळले जातात.हे जिम्नास्टिकच आहे.मनाची एकाग्रता, शरीराची लवचिकता, नेम साधणे हे सर्व आजच्या आरोबीक्स प्रमाणे  गीतांच्या तालावर व चालींवर खेळले जातात. 


    यात अनेक प्रकारच्या फुगड्या, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, कोंबडा,गाठोड, कीकीचे पान, नखोल्या, आई मी येऊ का?, भोवर भेंडी,पिंगा ,  सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा असे जवळ जवळ ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात. यात खेळताना स्वयंपाक घरातील वस्तूंचा वापर केलेला असतो. या गीतांतून त्या नवविवाहितेच्या मनातील विचारच प्रगट होत असतात. आचार विचार महत्वाचे आहेत पण आता याच्या जोडीला परंपरा म्हणून दागिन्यांना पण महत्व आलेलं आहे. नटण मुरडण, खेळणं बागडण हे जात्याच स्त्री विशेष गुण. मनात काहीतरी असतं, कुठेतरी खुपत असतं, काही गुपित पण असतं, तर कुठला आनंद आणि कुठल तरी दु:ख, कोणाला तरी सांगावसं वाटतं, तिथे औपचारिकता नको असते. पण यासाठी भेटायला हवं ना? मग निमित्तही हवं त्याला.

    पूर्वी लहान वयात मुलींचे लग्न होत असे. मुलगी म्हणून बंधने असत. खेळण्या बागडण्याचे वय असताना सुद्धा तिला सासरी एका शिस्तीत राहावे लागे. कारणाशिवाय कुठे जायचं नाही, उशिरा पर्यन्त बाहेर थांबायचे नाही. मग पुढे पुढे या रूढीच होऊन गेलेल्या दिसतात.  सासरच्या लोकांबद्दल तक्रार करायची नाही. घरात बोलायची सोय नाही मग कोणापाशी बोलणार? जिवाभावाच्या मैत्रिणीच. दुसरं कोण? त्या एक तर समदु:खी असतात. आपल्याच सारख्या आनंद आणि दु:खाच्या अनुभावातून ती ही गेलेली असते. त्यामुळे तिला माझे मन जास्त च कळेल या भावनेतून ही अशी गीते लिहिली गेली असणार. यासाठीच भेटण्यासाठी, एकत्र येण्यासाठी निमित्त असायची ती श्रावणात मंगळागौर जागविणे, भाद्रपदात हरितालिका जागविणे, भोंडला किंवा हादगा किंवा भुलाबाईची पुजा करणे.  वटसावित्री, नागपंचमी, संक्रांत, चैत्र गौर हे सुद्धा अशा निमित्त केलेले हळदी कुंकू समारंभ. पण विशेषत: लहान मुलींना एकत्र आणणे, त्यांना निसर्ग शिक्षण देणे, वनस्पतींची ओळख करून देणे, कुटुंब संस्थेतल्या नात्यांची ओळख पक्की करून देणे, पाककृती किंवा पदार्थ ओळखणे, सजावट, मांडणी स्वच्छता यातलं कला कौशल्य दाखविणे, संस्कार करणं अशा अर्थाने त्यांना शिक्षण द्यायचे ते त्यांना साजेशा अशा खेळातून, गाण्यातून. कारण हे सर्व त्या मुलीला तिच्या आयुष्यात उपयोगी पडणार असतं.

माहेरी जाणे वनस्पतींची ओळख, आयुर्वेदाची ओळख, औषधी वंनस्पती बद्दल माहिती, संयम, आदर, प्रेम ,किचन मधली ओळख, पदार्थ शिकणे, गाणी म्हणणे , याबरोबरच जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूल्ये तिला शिकविणे हा उद्देश असायचा आजही हा उद्देश आवश्यक आहे. 

आज मंगळागौर पूर्वी जी घरातच असायची ती आता सामाजिक झाली आहे. सर्वच जण आता हे खेळ आपल्याकडे मुलींना बोलवून कार्यक्रम म्हणून ठेऊ लागले आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे, सामाजिक संस्कार घडतो आहे. हे खेळ सामाजिक उपक्रम म्हणून करण्यात संस्कार भारती या संस्थेचे मोठे योगदान आहे हे जवळून अनुभवले आहे. आपल्या संस्कृतीचा जागर असाच होत राहिला पाहिजे . वेळ नाही च्या निमित्ताने या गोष्टी केल्या नाहीत तर अनेक संस्कार करायचे राहून जातील आणि सतत वरच्या वर्गात ढकलल्या सारखे होईल. काही गोष्टी शिकायच्या आणि शिकवायच्या राहतील.एकत्र कुटुंबं व्यवस्था जाऊन 3 जणांच माझं कुटुंब झालच आहे , वैयक्तिक स्वार्थ बोकळतो आहे, नाती नको आहेत . यावर हे कसे टिकवायचे याचे उत्तर म्हणजे ती शिकवण्याच्या परंपरा पाळणे होय. नव विवाहित मुलींनो या परंपरा डोळसपणे पाळत रहा आपोआप शिक्षण मिळत राहील. सर्वांना मंगळागौरीच्या शुभेच्छा !   (सर्व फोटो गूगल वरुन साभार)

-       © डॉ. नयना कासखेडीकर.

------------------------

Monday, 1 August 2022

मनभावन हा श्रावण

 

मनभावन हा श्रावण


   ‘विदर्भात उष्णटेची लाट’, ‘अमुक गावाला टॅंकरद्वारा पाणीपुरवठा’, ‘धरणात पाणीसाठा कमी’ उन्हाळ्यात रोज माध्यमातून येणार्‍या अशा बातम्या, तर, वीज महामंडळाचा वीजकपातीचा आदेश आपला ताण अधिकच वाढवतात. उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा जाहीर होतो आणि आधल्याच दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज खरा होत जोरदार बरसू लागतो तो. यंदा असच झालं. बरस रे घना असं  म्हणण्याची वेळ आली नाही. कधी एकदा हा ऋतु संपतोय असं होता होता, आकाशात काळे मेघ जमतात ज्याची आपण आतुरतेने वाट पहात असतो. कवी कल्पनेतला पाऊस शब्दातून कधीच बरसून गेलेला असतो.  म्हणजे आकाशात आलेल्या ढगांचा मोरांना झालेला आनंद बघून ढग सुद्धा गहिवरतात आणि बरसायला सुरुवात करतात म्हणे. अशोकजी परांजपे यांच्या कवितेचं असच तर भावगाणं होतं, बागेश्री रागातलं.   

केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर,

गहिवरला मेघ नभी .सोडला गं धीर ||

मोर तर एक पक्षी. त्याला सुद्धा आनंद होतो, मग आपण तर माणूस. आपल्या भाव-भावना अजूनच तीव्र असतात. अशा प्रकारे आषाढाला निरोप देत श्रावण अवतरतो. हिंदू पंचांगानुसार या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो.    

       
     श्रावणात सृजनाचा उत्सव चालू होतो. निष्पर्ण झालेले वृक्ष, लता वेली झाडं झुडपं ,भेगाळलेली कोरडी शेतजमीन ,पाण्याविना ओस पडलेले तलाव व पाणवठे,ओढे या सृजनाच्या उत्सवात न्हाऊन निघतात ,एक नवचैतन्याची लहर निसर्गात दौडते . पाहिल्याच पावसाने निसर्ग शुचिर्भूत होतो. सगळी धूळ झटकून झाडं नव्या पालवी सहित चकचकीत आणि टवटवीत दिसू लागतात.उन्हाच्या काहिलीने झालेली मरगळ दूर होते. पहिला जोरात पाऊस येतो, तोपर्यंत कावळ्याची पिल्लं मोठी झालेली असतात. आषाढातच त्यांनी घरटी बांधून अंडी घातलेली असतात.श्रावण सुरू होतो त्या आधीच कावळ्याच्या पिल्लांचे नवे जीवन सुरू झालेले असते.(माझ्या घरासमोरच्या वडाच्या झाडावरील वर्षानुवर्षे घेतलेला अनुभव) निसर्ग जसा आनंदाने बहरतो तसंच मानवी मन सुद्धा या ऋतु परिवर्तनाने आनंदाने बहरते.साहित्यिक आणि कवींना या मनभावन श्रावणाचा मोह होणार नाही असे कसे? म्हणून तर पाऊस आणि श्रावण याची अनेक वर्णने साहित्यात दिसतात.    

     शेतकरी दादा शेतं तयार करून चातकासारखी वाट पाहताच असतात पावसाची.आषाढवारीला गेलेल्या शेतकर्‍यांनी /वारकर्‍यांनी पंढरीच्या पांडुरंगाला भेटून, ‘चांगला पाऊस पाड बाबा’ असं साकडं घातलेलं च असतं.   सगळ्या चराचर जीवसृष्टीला, माणसांना, पक्षांना, प्राण्यांना आनंददायी असलेला, मनभावन निसर्ग असतो, या महिन्यात निसर्गात फुलणारी फुले, देवपूजेची चाललेली लगबग सगळं सगळं उत्साह देणारं. याच महिन्यात असलेली व्रतवैकल्ये धर्माची जोड देऊन जरी साजरे करत असले तरी त्याचा संबंध सात्विकतेशी, ऋतुचक्राशी आणि जीवन शैलीशी असलेला दिसतो.आपल्या आरोग्यासाठी चातुर्मासाच्या निमित्त आणि सणाच्या निमित्ताने का होईना योग्य आहार विहार ,सद्धर्म पाळणे, व्रतस्थ राहणे आणि अनुशासन पाळणे या गोष्टी माणसांकडून केल्या जात आहेत.मनुष्याला एक शिस्तीची चौकट आखून द्यावी लागते कोणीतरी (कर्मकांड नव्हे) मग सद्भावना, सदहेतू आणि सत्कार्य हातून घडतं.      

    श्रावण महिन्यात बहुतेक प्रत्येक दिवशी एकतरी धर्मकृत्य केलं जातं. जसे सोमवारी एकभुक्त किंवा नक्त राहायचे, मंगळवारी मंगळागौरीची पूजा,बुधबृहस्पती पूजन, गुरुवारी गुरुचरित्र पठन, शुक्रवारी लक्ष्मीची पूजा शनिवार मारूतीरायाचा तर रविवार सूर्य पूजेचा. शिवाय देवस्थानात वेगवेगळे कथापुराणं, मंत्रजागर असे विशेष उत्सव होतात. अगदी श्रावणी सोमवार सुद्धा एक सण म्हणून साजरा होतो. श्रावण हा महिना चातुर्मासातला श्रेष्ठ महिना मानला जातो. नुसतं महाराष्ट्रात नाही तर इतर भागातही या महिन्यात विविध उत्सव असतात.

      उत्तरेत झुलान यात्रा, रक्षाबंधन, नंदोत्सव आणि जन्माष्टमी आणि विशेषता दक्षिण भागात श्रावणात नागपंचमी, मंगळागौर, श्रावणी पोवती पौर्णिमा, नारळी पौर्णिमा श्रीकृष्ष्ण जन्माष्टमी, पिठोरी अमावास्या इत्यादी उत्सव साजरे केले जातात.

      श्रावण सुरू होताच ठेवणीतून बाहेर येतो जिवतीचा फोटो. घरातली आई आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या कल्याणसाठी, देव्हार्‍यात तो स्थानापन्न करून त्याला फूल पत्री, वस्त्र वाहून नैवेद्य दाखवते. श्रद्धावान लोक असे धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्रावणात आणि चातुर्मासात करत असतात आणि आत्मिक समाधान मिळवतात.आणखी एक म्हणजे श्रावण महिना कहाण्यांचा सुद्धा उत्सव च नाही का?

     मला आठवतं, लहानपणी आजीची पुजा-अर्चा झाली की, श्रावणात रोज तिला कहाणी वाचून दाखवायची. आणि ती अगदी तल्लीन होऊन ,दाद देत या कहाण्या ऐकत असे. शुक्रवारची कहाणी. खुलभर दुधाची आणि अजून काही. वर्षानुवर्षे वाचलेल्या, माहिती असलेल्या त्याच त्याच कहाण्या आजी प्रत्येक वेळी मन लावून ऐकायची, त्यात खरं तर काही नावीन्य नसे, पण मनातली श्रद्धा हेच एकमेव कारण, अशीच गोष्ट नागपंचमीची. रूढी प्रमाणे चालत आलेली, आज तवा चुलीवर ठेवत नाहीत. किंवा भाजी चिरत नाहीत. असे परंपरेने संगितले गेलेले. नागपंचमीच्याच कहाणीत त्याचे उत्तर दडलेले आहे. कारण या कहाण्या अर्थात गोष्टी, या प्रबोधनासाठीच रचल्या गेल्या आहेत हे डोळसपणे वाचले की लक्षात येईल.  

          नागपंचमी हिंदुस्थानच्या सर्व भागात साजरा होणारा सर्प पूजेचा हा सण आहे. महाराष्ट्र, दक्षिण भाग, गुजरात, बंगाल सगळीकडे सर्प पुजा किंवा नागप्रतिमांची पुजा करतात. नागांचा अधिपति राखेश्वर म्हणजे शिव समजून डोंगराळ प्रदेशात पंचमीला पुजा केली जाते. उदयपूरला या दिवशी घराच्या दाराशी एक प्रकारची वनस्पति आणून ठेवतात म्हणजे विषारी प्राणी घरात येत नाहीत. तर नेपाळ मध्ये नाग आणि गरुड यांच्यात मोठ्ठ युद्ध झालं, तो हा दिवस विशेष उत्सव साजरा करतात. आगरा, अयोध्या, पंजाब, गढवाल मधेही सर्पपूजेची पद्धत आहे. हे सांगण्याचं कारण एव्हढच की, परमेश्वराच्या अतर्क्य शक्तीबद्दल मनुष्याला आश्चर्य वाटले त्यामुळे त्याची सेवा करणे म्हणजे त्यांनेच निर्माण केलेले सर्व प्राणी, झाडे यांची पुजा करणे महत्वाचे वाटले असावे. म्हणून नागपंचमी सारखे सण सुरू झाले असणार.

    

       मध्यंतरी मी मेळघाटात गेले होते. तिथे रस्त्याने जाताना कडेला छोटसं एक फुटाचं दगडाचं मंदिर होतं. त्यात एक दगडच विराजमान झाला होता. वर लिहिलं होतं, ||बाघ देव प्रसन्न || चौकशी केली तेंव्हा कळलं. की या जंगलात हे प्राणी वास्तव्यास असल्याने तो शक्तीशाली व आपला संरक्षणकर्ता आहे अशी तिथल्या आदिवासींची समजूत आहे. म्हणून या रस्त्याने जाताना आधी या बाघ देवाला नमस्कार करतात. म्हणजे खर तर दोघेही एकमेकांचं रक्षण करतात. अशा अनेक समजुती वेगवेगळे दिवस व सण साजरे करताना पाळत असलेले दिसतात.

       मंगळागौर पूजन महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नवविवाहितेने लग्नानंतर पाच वर्षे करायचे हे व्रत. बंगाल मध्येही मंगलचंडिका म्हणून या सौभाग्यदायिनी देवीची पुजा करण्याचा प्रघात आहे. नागपंचमी, मंगळागौर, गौरी गणपती, राखी पौर्णिमा या निमित्ताने त्या मुलीला माहेरच्या लोकांना भेटण्याची संधी दिली जायची, म्हणूनच,

‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे...,

पंचमीचा सण आला डोळे का ग ओले ?’

ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे यांनी गायलेल्या गदिमांच्या या गीतातील मुलींच्या डोळ्यात पाणी येते कारण ते वातावरण त्यांना ओढ लावते. नागपंचमीला फेर धरून गाणी म्हणणे, झिम्मा- फुगड्या, आट्या- पाट्या खेळणे, याबरोबरच यातील गाण्यांमधून काही पौराणिक कथा की ज्यातून जीवनमूल्ये शिकवली जातील, अशा कथांचं कथन होई. हीच मूल्ये तिला पुढच्या आयुष्यात स्वत:साठी उपयोगी पडत. कल्पनाशक्तीला वाव मिळे.

        
      नारळीपोर्णिमा – शास्त्रा प्रमाणे वरुण देवतेची पुजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पोर्णिमा. हिंदुस्थानच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर असलेले लोक विशेषत: व्यापारी वर्गाला याचे जास्त महत्व. प्राचीन काळी ते जलमार्गाने प्रवास करीत असत आणि व्यापार आणि दळणवळण पण चालत असे. समुद्र हे वरूणाचे  स्थान समजले जाते. समारंभ पूर्वक समुद्राचे दर्शन घेऊन त्यास नारळ अर्पण करून समुद्रावर सत्ता गाजविणार्‍या वरुण देवाची आठवण ठेवणे व कृतज्ञता व्यक्त करणे असा उद्देश असतो. वर्षा ऋतुत हा समुद्र क्षुब्ध झालेला असतो. शिवाय हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या काळात मासेमारी करायला कोली बांधव जात नाहीत. श्रवण पौर्णिमेला सागर पूजन झाले की मासेमारी सुरू होते. श्रावण पौर्णीमेपासून जलमार्गावर वाहतूक सुरू होते. असा हा समुद्र पूजनाचा दिवस.ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.


       हाच दिवस वैदिक धर्म पाळणार्‍यांसाठी श्रावणी म्हणून पाळला जातो. या तिथीला जानवे बदलायचा विधी सांगितला आहे. तर गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा हा पहिला दिवस असतो.

      कृष्ण जन्माष्टमी - याच महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी असते. श्रवणात वद्य अष्टमीला रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. तो दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात.सबंध हिंदुस्थानात गोकुळ,मथुरा वृंदावन, द्वारका, पुरी, इथे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे असे समजले जाते.  

      पिठोरी अमावास्या- पोळा- श्रावण अमावास्येला बैल पोळा साजरा करतात. शेतकरी लोक आपल्या खिलार्‍या बैलांना रंगवून, सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढतात, पुजा करतात, गोडधोड करून त्यांना खाऊ घालतात. आपल्या उपयुक्त व वर्षभर आपल्यासाठी राबणार्‍या या गुरांबद्दल आदरभाव दाखविण्याचा हा दिवस. बहिणाबाई चौधरी यांनी बैल पोया या कवितेत याचं महत्त्व सांगितलं आहे. त्या म्हणतात, 

आला आला शेतकर्‍या, पोयाचा रे सन मोठा,

आता बांधा रे तोरन, सजवा रे घरदार |

करा अंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले  शेंदूर,

उठा उठा बहिनाई, चुले पेटवा पेटवा |

आज बैलाले निवद, पुरणाच्या पोया ठेवा,

                                                    वढे नांगर वखार, नही कष्टाले गनती |           

पीक शेतकर्‍या हाती, याच्या जिवावर शेती ||

   

   पावसाळा हा ऋतु नाही म्हटलं तरी आरोग्य बिघडवणारा असतो काही वेळा. या कालावधीत पचनशक्ति मंदावते. पावसामुळे बाहेरचे वातावरण आरोग्याला हानिकारक व रोगराईला पोषक असते. अशुद्ध व गढूळ पाणी वापरात येते. साहजिकच सर्दी, ताप, खोकला, पोट बिघडणे हे आजार उद्भवतात. त्यामुळे पचायला हलका आणि साधा आहार घ्यायला लागतो. यालाच आपल्या पूर्वजांनी धार्मिक जोड देऊन एकभुक्तं राहणं, उपवास करणं, एक धान्य खाण यासाठी नेम धर्म आखून दिले त्याचा शास्त्रीय फायदा व अर्थ लक्षात घेतला तर कसे ऊपयोगाचेच आहेत हे लक्षात येईल.

         कुठल्याही गोष्टींचा धार्मिक संबंध लावताना तो डोळसपणे बघावा. अंधश्रद्धेने नको. आजची नवी पिढी चौकस आहे. तिला प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय आधार हवा आहे आणि हा शास्त्रीय आधार हिंदू धर्मात आहे. पालकांनी/मोठ्यांनी तो अभ्यासला पाहिजे.  परंपरेने चालत आलेल्या रूढी आहेत त्या तशाच्या तशा नवी पिढी स्वीकारणार नाहीत. त्यामुळे नवा अर्थ देऊन, पण पहिलेच महत्व कायम ठेऊन त्यांच्या पर्यन्त तो पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या पालकांवरती आहे.     

      ऋतुचक्र आणि आपले हे उत्सव, व्रत वैकल्ये एकमेकांशी निगडीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यन्त पाळला जाणारा चातुर्मास. नियम पाळणे, धार्मिक पुजा-पाठ, पारायण करणे, उपासना करणे या बरोबरच उपवास धरणे. यात आपल्या दिनचर्येची ऋतूंशी सांगड घातलेली दिसते. आणि ओघानेच आपल्या आरोग्याशी पण. खर तर ही आपल्या ऋषीमुनींची आपल्याला देणगीच आहे. त्याची नीट व्यवहार्यता, उद्देश, त्यातलं वैद्यक शास्त्र हे पण आपण समजून घेतले पाहिजे. आपले उत्सव, जत्रा, सण, समारंभ, प्रवचने, कथा, कीर्तने यातून आपली कायिक, वाचिक आणि मानसिक प्रगती व्हावी हाच उद्देश आहे. म्हणूनच परंपरा पाळताना समजून उमजून पाळाव्यात.

तर असा हा इंद्रधनु ल्यायलेला ,ऋतु हिरवा ऋतु बरवा, मनभावन श्रावण साजरा करायला तयार रहा सगळे.     

 

    लेखन- डॉ. नयना कासखेडीकर,पुणे .

 

-------------------------------------

Thursday, 14 July 2022

गोपाळ गणेश आगरकर

 

 गोपाळ गणेश आगरकर 

(१८५६ ते १८९५)

 

           गोपाळ गणेश आगरकर थोर समाजसुधारक आणि विचारवंत,लेखक,पत्रकार आणि शिक्षणतज्ञ . सातारा जिल्हयातले टेंभू गावचे, घरची गरीबी. पण त्याला तोंड देत शिक्षण पूर्ण केले. पुणे येथे डेक्कन कॉलेज मध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले .याच काळात त्यांची बाळ गंगाधर टिळक यांच्याशी ओळख झाली.सामाजिक बदल घडवण्यासाठी शिक्षणाचा विस्तार आवश्यक वाटून विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या जहाल विचारांच्या गटात ते टिळकांबरोबर सामील झाले. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात नव्या युगाचा आरंभ झाला होता.स्वातंत्र्य मिळविणे आणि लोकशिक्षण हे समान सूत्र तिघांच्या ठायी होते. लोकशिक्षण व लोकजागृती यासाठी लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर, वामन शिवराम आपटे, महादेव बल्लाळ जोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी १८८० मध्ये न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केले. आजचे रमणबाग शाळा, टिळक रोडवरील शाळा, नवीन मराठी शाळा, अहिल्यादेवी हायस्कूल,बीएमसीसी कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज या नामवंत संस्था आजही कार्यरत आहेत. स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आगरकर यांनी अध्यापनाचे काम केले आणि केसरीचे संपादकपद सांभाळले.सुरूवातीला ही शाळा नाना वाड्यात भरत असे, यात राम गणेश गडकरी, केशवसुत ,यासारखे प्रतिभावंत घडले होते.वर्षभरतच न्यू इंग्लिश शाळेचा लौकिक पसरला . पण शाळेच्या बाहेरच्या लोकांचे प्रबोधन कसे होणार ही चिंता सतावत होती. देशाच्या समस्या कशा सुटणार ?म्हणून मग जनजागृतीसाठी वृत्तपत्राचा उपयोग प्रभावी शस्त्र म्हणून करण्याचे त्यांनी ठरविले.

       १८८१ ला टिळक व आगरकरांनी मराठी भाषेत ’केसरी’ आणि इंग्रजी भाषेत ’मराठा’ ही साप्ताहिकं सुरू केली. केसरी च्या संपादनाची जबाबदारी आगरकरांनी सांभाळली. इतिहास, अर्थ विषय आणि सामाजिक विषयावर आगरकर लिहीत असत.लोकांच्या डोळ्यात अंजन घालणे आणि सरकारचा अन्याय लोकांसमोर आणणे हे वृत्तपत्रातून होऊ लागले. वर्षभरात च विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे अकाली निधन झाले .तर वृत्तपत्रातून कोल्हापूर संस्थानच्या बातम्या दिल्याने तिलक आणि आगरकर या दोन्ही संपादकांवर खटला भरण्यात आला. १८८२ ला दोघांना चार महिन्यांची कैद झाली. डोंगरीच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं. या तुरुंगात असताना आगरकर यांनी शेक्सपियर च्या ‘हॅम्लेट’ नाटकाचे ‘विकारविलसित’ नावाने भाषांतर केले (१८८३)आणि ‘डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस’ (१८८२)हे कैद्यांच्या जीवनावरील पहिले पुस्तक तुरुंगात लिहिले. तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा जोमाने काम सुरू झाले.

       विद्यार्थी दशेत असताना च त्यांनी मिल,स्पेन्सर, गिबन, रुसोया विचारवंतांचे ग्रंथ अभ्यासले होते. त्यामुळे वैचारिक बैठक पक्की होती.शिवाय ते विज्ञाननिष्ठ होते. ग्रंथात दिलेले कुठलेही विचार स्वताला पटल्याशिवाय मानत नसत. ते बुद्धिप्रामाण्यवादी व उदारमतवादी होते. तशाच त्यांच्या सामाजिक भूमिका असत. त्यांनी वर्तमानपत्रातून समाजातील दोषांविषयी परखडपणे व निर्भीडपणे लेखन केले. आपल्या समाजाचे मागासलेपण नाहीसे झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. महाराष्ट्रातल्या समाज प्रबोधंनाच्या चळवळीत गोपाळ गणेश आगरकर यांचे स्थान अनन्यसाधारण होते.

       त्यांनी १८८८ साली केसरी मराठातून बाहेर पडून आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रसारासाठी सुधारक हे पत्र चालू केले. हे साप्ताहिक प्रामुख्याने सामाजिक सुधारणा या विषयाला वाहिलेले होते. अंधश्रद्धा, चुकीच्या समजूती, सामाजिक रूढी या विषयांवर यातून सतत प्रहार होत असे. पाश्चात्य ज्ञांनाच्या आधारे स्वकीयांचे प्रबोधन करणे हा एक हेतु होताच. सुधारका च्या मराठी आवृत्तीचे संपादक स्वत: आगरकर होते तर इंग्रजी आवृत्ती चे संपादक गोपाळ कृष्ण गोखले होते.बालविवाह हा प्रश्न आगरकर यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता.वैधव्य, सतीची चाल, केशवपन या गोष्टी त्यांना अजिबात पटत नसत.कायद्याने हे बंद झाले पाहिजे असे त्यांना वाटे.लोकमान्य टिळक यांना राजकीय प्रश्नांची तीव्रता अधिक वाटत असे तर आगरकर यांना सामाजिक प्रश्नांची अधिक जाणीव होती. याच विषयावर मतभेद झाल्याने केसरी सोडून त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सहाय्याने सुधारक हे स्वतंत्र पत्र चालू केले.

       सामाजिक प्रश्नात तर्कशुद्ध भूमिका घेऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे हे ध्येय त्यांनी ठरवल्यामुळे नुसत्या एखाद दुसर्‍या लेखाने काम भागणार नव्हते. हातात स्वातंत्र्य असलेले वृत्तपत्र हवे असल्यानेच त्यांनी सुधारक काढले.

       इंग्रजी राजवटीत, प्रगत असलेल्या पाश्चात्य संस्कृतीचे पदार्पण एकोणीसाव्या शतकात हिंदुस्थानात झाले त्यावेळी  अनेक नव्या मूल्यांचा इथल्या लोकांना परिचय झाला. अनेक अपरिचित गोष्टींचा परिचय झाला. चांगलं काय? अयोग्य काय? यावर विचारमंथन सुरू झाले. नव्या विचारांची जडण घडण सुरू झाली . त्यामुळे त्या वेळचे समाज सुधारक पुढे येऊन बदल घडवण्यात अग्रेसर होऊ लागले त्यातलेच एक अगरकर . हे एकोणीसावे शतक प्रबोधनयुग च होते. या युगातले अल्पयुषी ठरलेले महापुरुष म्हणून बाळशास्त्री जांभेकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर ओळखले जातात. आगरकर यांनी महाराष्ट्राचा विवेक जागृत केला.

     ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’ हे व्रत आगरकर यांनी जन्मभर पाळलं. समाजातील रूढी,अज्ञान अंधश्रद्धा ,अपसमज दूर व्हावीत म्हणून आगरकर यांनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना प्रत्येक ठिकाणी झुंजावे लागले. पण सामाजिक सुधारणांची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली.

      आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात त्यांनी मोलाची भर घातली, पल्लेदार वाक्ये, मुद्देसूद प्रतिपादन, अन्वर्थक अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. केशवसुत, ह. ना. आपटे यांसारख्या थोर साहित्यिकांवर आगरकरांचा वैचारिक व भाषिक प्रभाव होता. त्यांचे कवि,काव्य,काव्यरति आणि शेक्सपियर,भावभूति व कालिदास या साहित्य विषयक निबंधांनी टिकाकारांचे लक्ष वेधुन घेतले. त्यांचे आणखी ग्रंथ म्हणजे शेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र (१९०७), वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण. विकारविलसिताच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी, यासंबंधीची मते त्यांनी मांडली आहेत. त्यांचे केसरीतील निवडक निबंध (१८८७) आणि सुधारकातील वेचक लेख (निबंधसंग्रह १८९५) प्रसिद्ध आहेत.

     आगरकर सात वर्षे विरोधाला तोंड देत देत सुधारकातून भूमिका मांडत राहिले.या गदारोळत तब्येतीकडे दुर्लक्ष झाल्याने तब्येत खालावली. त्यातच अनेक आपत्ति कोसळत होत्या, बरोबरचे सहकारी ही एकापाठोपाठ जग सोडून गेले. आगरकर खचले होते.मृत्युची चाहूल त्यांना लागली होती. आपण गेल्यावर आपल्या पत्नीने केशवपन करू नये म्हणून तिच्या मनाची तयारी त्यांनी केली. आणि स्वाभिमानाने आणि स्वावलंबनाने आपल्या मुलांचा सांभाळ तिने करावा असे संगितले.आपल्या आंत्यसंस्काराची इतरांना झळ लागू नये म्हणून पैशांची एक पुरचुंडी ‘माझ्या प्रेतदहनार्थ’ असे लिहून बांधून ठेवली आणि १७ जून १८९५ रोजी, "झोप येते मी स्वस्थ निजतो तुम्ही झोपा" असे पत्नीला यशोदाबाईना सांगून मृत्युला शांतपणे सामोरे गेले.

लेखन- डॉ. नयना कासखेडीकर

-------------------------------------