Wednesday, 15 March 2023

मुलखावेगळी ती -लेखमाला

 

मुलखावेगळी ती -

निर्मला थोरमोटे

   



सौंदर्य म्हणजे कायम आनंद ! निसर्गाचे सौंदर्य माणसासाठी नुसते नेत्रसुखासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठी ,शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि मनशांती व आनंद मिळवण्यासाठी एक वरदान आहे. त्यामुळे पुढे भविष्यात हा निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी ,तो वृद्धिंगत होण्यासाठी आणि तो सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण संतुलित राखले पाहिजे. प्रदूषण रोखले पाहिजे, (नद्या, परिसर, नाले, ओढे, समुद्र व त्याचे किनारे, जंगले, शहरातील बागबगीचे, वाहनांचे धूर, प्लास्टिकचा वापर व कुठेही फेकून द्यायची सवय.) निसर्गाचं सौंदर्य वाढविणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी माणसाने जागे व्हायला हवे. एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला शासन एकटे किती पुरणार? त्यांना वेळीचं जागं करणं ही नैतिक वं सामाजिक जबाबदारी कुणी घ्यायला हवी. (पण कुणी? कारण शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात –ही वृत्ती) हे काम करताहेत निर्मलाताई थोरमोटे. स्वत:च्या सोसायटी पासून ते परिसरातील इतर सोसायट्या, बागा, टेकड्या,रस्ते, ट्रॅफिक, अशा विषयात निर्मला ताईंनी खूप वेगळं काम केलं आहे. ‘पर्यावरण वाचवा, जीव वाचवा’ हे म्हणायला सोप्पं आहे, पण लोकांच्या मनात हा विचार रुजविणे तेव्हढेच अवघड आहे.

आपल्याला एखाद्या पर्यटन स्थळी गेल्यावर जो निर्मल व खरा आनंद मिळतो तो तिथल्या वातावरणामुळे, स्वच्छ हवेमुळे. हे निर्माण करणं, केवळ आणि केवळ मनुष्याच्याच म्हणजे आपल्याच हातात आहे. प्रत्येकाने आपले घर आणि परिसर स्वच्छता करणं आणि शून्य कचरा व्यवस्थापन करणं हे कर्तव्य केलं पाहिजे. हे तुमचे कर्तव्य आहे असे लोकांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे. बापरे हे कसे शक्य आहे? कोण करणार हे काम? इथे कोणाला अशा कामासाठी फुरसत नाही. आणि काय अडलय लोकांना शिकवायचे? एव्हढी मोठी लोकसंख्या आणि पर्यावरण, शून्य कचरा व्यवस्थापन कोणाकोणा ला शिकवत बसणार? हा प्रश्न स्वाभाविक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ‘निर्मलाताई थोरमोटे’. निर्मलाताईंनी पर्यावरण क्षेत्रात काम केल्याचे कळले होते ,तो विषय बोलता बोलता लक्षात आले की, त्या प्रत्यक्ष झाडे लावत नाहीत, की शून्य कचरा व्यवस्थापना मध्ये कचरा उचलत नाहीत. तर लोकांमध्ये जागृती निर्माण करून या गोष्टी टाळता येतील, लोक स्वत:, पुढे येऊन, समजून घेऊन, यात सहभागी होतील असा वरवर आपल्याला अवघड दिसणारा प्रयत्न त्या सहज करतात. असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

पुणे शहरात गेल्या काही वर्षात कचरा निर्माण होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ‘कचरामुक्त शहर’ किंवा ‘कचरामुक्त आपले गाव’ हे मोठे आव्हान सर्वांसमोरच आहे. कचर्‍याचे व्यवस्थापन करायला, एक मोठे व्यवस्थापन शासकीय पातळीवर काम करत आहे. निर्मला ताईंनी स्व नुभवातून रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब,सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि प्रत्यक्ष नागरिक यांन बरोबर घेऊन मोठ मोठे उपक्रम राबवले आहेत.

इनर व्हील क्लबचे काम करता असताना मनोरंजना कडे कधी ओढा नसायचा पण सामाजिक काम, लोकांना बरोबर घेऊन उपक्रम करणे यातच रस असलेल्या निर्मला ताई आपल्या संवाद कौशल्याचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी करतात.

त्यांना हॉटेलिंग, मनोरंजन, गप्पा टप्पा ,पार्ट्या ,गॉसिपिंग अजिबात आवडत नाही. तोच वेळ चांगल्या क्रिएटिव्ह कामासाठी त्या देतात. त्यांचं काम वाढल्याने आणि त्याचा प्रसार आणखी वाढवण्यासाठी त्यांनी DO SAVE ही संस्था सुरू केली. DO SAVE यात व्यापक अर्थ दडला आहे. यातून त्या समाजाला पर्यावरण वाचवा, स्वच्छता ठेवा आरोग्य सांभाळा, शून्य कचरा व्यवस्थापन, रक्तदान करा जीव वाचवा, शून्य कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक आणि सॅनिटरी वेस्ट मॅनेजमेंट, पर्यावरण पूरक गणपती विसर्जन, रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम पाळा, रस्त्यावर असताना अॅम्बुलन्स सायरन वाजत असताना तिला पुढे जायला जागा कशी द्यायची हे समजून घ्या म्हणजे पेशंटचा जीव वाचू शकतो ,नुसते अॅम्बुलन्स आली वाटतं म्हणून विचार करत बसू नका,जागा करून द्यायची चटकन कृती करा. नुसते पर्यावरण वाचवा हा इवेंट म्हणून झाडे लावू नका, लावलेली झाडे, कशी वाढवायची व जपायची इकडेही लक्षं द्या. अशीच त्यांच्या कामाची यादी विचार करायला लावणारी आहे नक्कीच.

ईलेक्ट्रोनिक इंजिनीअर असणार्‍या पण समाजक्षेत्रात अधिकार वाणीने वावरणार्‍या निर्मला ताई स्वत: रेग्युलर रक्तदात्या आहेत.

‘आपला परिसर कचरा मुक्त करूया’ म्हणून अभियान त्यांनी राबविलं. स्वतच्या कचर्‍याचं योग्य व्यवस्थापन करून वीज, पाणी वाचवून, रसायन वापर टाळून, छोट्या छोट्या गोष्टी अमलात आणून प्रत्येकाने आपले घर पर्यावरण पूरक हरित घर करावे असे आवाहन ‘हरित घर सप्ताहा’त त्यांनी केलं. त्या म्हणतात, “घरातला ओला कचरा घरातच जिरवा बाहेर टाकू नका. माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे”. हे करण्यासाठी त्या म्हणतात, Refuse, Reduce, Reuse, Return, Recycle या 5 R वर भर द्या.

स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर, स्वच्छ देश. ही महत्वाची स्लोगन खूप काही शकविते. नुसतं कचरा व्यवस्थापन केल की आरोग्याचा केव्हढा मोठा प्रश्न मार्ग लागतो. निर्मला ताई अनेक माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधून सांगत आहेत की, कचऱ्याचे वर्गीकरण करा.

“तुमचा ओला कचरा तुम्ही स्वतःच जिरवा.

एक चौ.फूट मात्र इतक्या जागेत तुम्ही हे करू शकता.

प्लास्टिक कचरा (स्वच्छ आणि कोरडा) वेगळा करा आणि पुनर्प्रक्रियेसाठी पाठवा.

थर्माकोलचा वापर पूर्णपणे बंद करा.

इतरही कोरडा कचरा जमेल तितका वेगळा करा.

हे सगळं स्वतः करा आणि इतरांनाही सांगा.

पर्यावरण वाचवा...जीव वाचवा!”

स्वच्छता सर्वेक्षण 2022-23 च्या त्या ब्रॅंड अॅम्बेसिडर, धनकवडी- सहकार नगर वॉर्ड,म्हणून निवड , लातूर च्या येळम मित्र संस्थेने त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविले, स्वच्छ पुणे च्या उपक्रमात असलेल्या योगदाना बद्दल पुणे महानगर पालिकेने पण गौरविले, सामाजिक कामासाठी अचिव्हर अवॉर्ड . शांतीदूत परिवाराकडून ‘शांतीदूत जीवनदाता पुरस्कार’ ,लातूर च कोरोंना योद्धा पुरस्कार अशा त्यांच्या कामाची दखल अनेकांनी घेतली आहे.

- ले – डॉ. नयना कासखेडीकर

----------------------------------------

मुलखावेगळी ती-लेख माला

 

मुलखावेगळी ती

सौ. मृदुल गणेश पाठक

  

 सामाजिक मूल्य कुटुंबात रुजलेले असले आणि समाजाप्रती संवेदनशीलता असेल तर पूर्ण कुटुंबच आपल संपूर्ण आयुष्य समाजासाठी देतो. घरात लहानपणापासून हे सामाजिक संस्कार मुलांवर झालेली कुटुंबं फार वेगळी असतात. आपल्या वडिलांच्या समाज सेवेचा वारसा आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या संस्कारात वं सहवासात समाज सेवेचा घेतलेला वसा, पुढच्या पिढीपर्यंत नेणारी मुलखावेगळी ती- मृदुल ताई .दीनदयाल शोध संस्थान मध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या शिक्षण, महिला सबलीकरण आणि ग्रामविकास याच कामाला वाहून घेतलेल्या मृदुल ताई, अनेक अडचणी आल्या पण १९७८ पासून आज पर्यन्त सतत ४५ वर्षे अविरत सामाजिक काम करणार्‍या समाजशिल्पी आहेत, विद्यार्थी दशेतच सामाजिक कामाची आस असणार्‍या मृदुल भांगेनी शिक्षण झाल्यावर विवेकानंद केंद्राचं काम करण्याचं मनाशी ठरवलं होतं. आणि लग्न केलचं तर सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या आणि हुंडा न घेणार्‍या मुलाशीच करायचं असा पण केलेल्या मृदुलाताईना जोडीदार पण तसाच मिळाला. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी हा सामाजिक कामाचा पटच उलगडून दाखवला ,अत्यंत आनंदाने आणि समाधानाने अजूनही काम करत असलेल्या मृदुल ताईंना, समाजाला आपला उपयोग झाला याचा आणि नानाजी देशमुख या थोर व्यक्तीबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले याचा अभिमान आहे.    

त्यांनी कामाची सुरुवात कशी झाली हे सांगताना म्हणतात,  “वडील संघ स्वयंसेवक असल्याने सतत प्रचारक आणि कार्यकर्त्यांचे घरी येणे जाणे असे.संघ कार्यकर्ते विश्वनाथ लिमये नेहमी येत असत. ते सतत विचारात असत शिक्षणांतर काय ? मीही विचार केला की लग्न केंव्हातरी होणारच आहे आणि नाही झालं तरी तेच आयुष्यच ध्येय नाही आपल्या ,लग्न नाही झालं तर, राष्ट्र सेविका समितीचे काम आयुष्यभर करू एव्हढ मोठ काम आहे. ते करायचं हा विचार मनात पक्का झाला होता. मग हळू हळू गोंदिया च्या आजूबाजूच्या परिसरात समितीच्या शाखा सुरू करून त्याचं काम वाढवत गेले, आजही या शाखा सुरू आहेत याचा अभिमान वाटतो.  याच सुमारास नागपूरला दीनदयाल शोध संस्थान चे बालजगत चे काम सुरू झाले होते आणि ओळखीच्या काकूंनी हे स्थळ सांगितलं होतं. नानाजी देशमुख यांच्या बरोबर काम करतोय मुलगा हिलाही सामाजिक कामाची आवड आहे तर हे स्थळ पहावे. नानाजी देशमुखच मला बघायला आले होते. त्यांनी तेंव्हाच सांगितलं की लग्नानंतर तुला गोंदियाला शाळा सुरू करायची आहे. नानाजींची कल्पना अशी होती की परिवाराने प्रचारक म्हणून काम करावं. दिन दयाल संस्थेमध्ये समाजशिल्पी ही संकल्पना राबवली जायची.    

मा. नानाजी देशमुख यांच्या बरोबर काम करणार्‍या कार्यकर्ता गणेश पाठक यांच्याशी नानाजींच्या आशीर्वादाने लग्न झालं. समाजशिल्पी परिवारात मृदुलताई सामील झाल्या. सुरुवातिच्या कामाबद्दल त्या सांगतात, “ नानाजींची कल्पना अशी होती की परिवाराने प्रचारक म्हणून काम करावं. दिन दयाल संस्थेमध्ये समाजशिल्पी ही संकल्पना राबवली जायची. नानाजींनी राजकारणातून संन्यास घेऊन, मे ७८ मध्ये या सामाजिक कामाची सुरुवात केली होती.त्या पहिल्या दिवसापासून माझे पती नानाजीं बरोबर काम करत होते. मी लग्नानंतर गोंदिया तून गोंडा प्रकल्पात काम करायला गेले.वाहनाची सोय नाही. आजूबाजूच्या १५ गावातून फिरून काम सुरु केले. ३६ मुलांपासून शाळा सुरू केली.शिक्षण त्या भागातील लोकांना नवीनच होते. शिवाय मुलींना शिकवतात हेच माहिती नव्हते. अशा लोकांसाठी त्यांच्या मुलांमुलीसाठी हे काम होते. त्यांचा विकास हेच उद्दीष्ट.शाळांमधून राष्ट्रीय शिक्षण ही कल्पना नानाजींची होती. गोरखपुरला त्यांच्या कल्पनेतले पहिले शिशुमंदिर साकार झाले”.

 गोंडा प्रकल्पाच्या शैक्षणिक कामा साठी मला B.Ed करावं लागलं. आणि अयोध्या युनीवर्सिटीतून नवीनच सुरू झालेले एज्युकेशन मध्ये MA पण केलं.त्या काळात वीज कनेक्शन असून लाइट नसायचे ग्रामीण भागात. दिवसा फक्त शेतकर्‍यांसाठी लाइट यायचे. त्यामुळे अभ्यासासाठी रात्री कंदील किंवा लॅम्प वापरावा लागे . तिकडे स्त्रियांना घुंघट घालावे लागायचे ,अगदी महिलाना महिलांसमोर सुद्धा घुंघट घेऊनच बोलायला लागायचे. सतत संवाद साधून हे कमी झाले.भजनाचा ग्रुप करून त्यांना एकत्र आणायला सुरुवात केली. मी मुख्याध्यापिका असल्याने शाळेत जेंव्हा मुली यायला लागल्या, तेंव्हा त्यांची फी (१० रुपये फक्त,) भरायला वडिलांच्या ऐवजी आईनेच यावे असा आग्रह केल्याने, त्या महिला शाळेत यायला लागल्या. त्यातून त्यांचे दर महिन्याला एकत्रीकरण, खेळ ,प्रार्थना असे उपक्रम सुरू झाले. एक समितीच सुरू झाली. या निमित्ताने त्या महिला घराबाहेर पडू लागल्या. या केंद्रात मा. रज्जु भैय्या, उषा काकू, प्रमिलताई आणि अनेक मान्यवर कार्यकर्ते भेट द्यायला यायचे त्यांच्याशी संपर्क होत असे. सहवास होत असे. नानाजी बरोबरच काम होत असे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हीही घडत होतो. त्या वेळी माहिती नव्हतं की हे एव्हढे मोठे आहेत. ज्यावेळी त्यांना भारतरत्न मिळालं त्या कार्यक्रमाला आम्ही दिल्लीला गेलो त्यावेळी नानाजी किती मोठे व्यक्तिमत्व होते ते जाणवलं. कारण ते इतके साधे होते आणि आपल्यातलेच एक वाटत . अभिमान वाटला, अशा व्यक्तीचा सहवास आणि मार्गदर्शन आपल्याला जीवनातली नऊ वर्षे लाभले आहे.”

त्यानंतर बीड मध्ये काम सुरू करायचे होते. डोंगरी मध्ये साखर कारखान्यातल्या कामगारांच्या मुलांसाठी . ते काम आम्ही बघाव असे ठरलं. नानाजींच काम प्रत्येक गावाप्रमाणे, शहरं प्रमाणे, तिथल्या गरजा ओळखून योजलेले असायचे . मागसलेले गाव असेल त्याप्रमाणे तशी योजना ठरायची. गोंडा, नागपुर, बीड याठिकाणी काम उभा केलं, चित्रकूटला व्यवस्थित प्लॅन करून यशस्वी प्रयोग झाला. मग पुढे पुढे आधी १०० गावं नंतर ५०० गावं दत्तक घेऊन प्रत्येक ५ गावांमागे एक समाजशिल्पी परिवार कामाला लागला होता. तसे आवाहनच केले होते प्रत्येक परिवाराने आपल्या जीवनातला काही काळ समाजासाठी द्यावा. नानाजींची सौंदर्य दृष्टी खूप महत्वाची होती. अनेक गोष्टी त्यातून शिकायला मिळाल्या . जरी सामाजिक काम करत असलो तरी ते इतके व्यवस्थित हवे नीट नेटके हवे की कोणालाही तिथे यावेसे वाटले पाहिजे.

 महिलांसाठी छोटे छोटे कुटीरोद्योग आणि कलेच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय सुरू करून देणे त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण देणे आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे.जेणे करून महिला स्वतच्या पायावर उभ्या राहतील. हे काम खूप चांगलं उभं झालाय, त्यासाठी आधी महिलांसाठी कला वर्ग घेतले. शिवण क्लास घेतले. अनेक प्रकार शिकविले , बॅग, बाळंतविडे, ड्रेसेस. हँड एम्ब्रोयडरीला तर खूप मागणी आहे. ब्युटिपार्लर, बटाटा चिप्स मशीन्स, लेदर बॅग,कापड तयार करणे, शेवया बनविणे, असे उपयुक्त काम सुरू आहे. नोकरी करणार्‍या महिलांसाठी बाळांची सोय म्हणून पाळणाघर आणि बालवाडी सुरू केली. बीड भागात जशा गरजा होत्या तसे काम उभे केले. आदर्श शैक्षणिक मॉडेल तयार करायचे आणि लोकांना द्यायचे.  विद्यार्थ्याला दहावीनंतर व्यवसाय प्रशिक्षण द्यायचे ज्यामुळे नंतर त्याला नोकरी नाही मिळाली तरी तो काही उद्योग चालू करू शकेल.

गोंडा प्रकल्पात काम सुरू केल्यानंतर इतक्या वर्षांनी तिथे चार पाच वर्षापूर्वी जाण्याचा योग आला तो संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी नानाजी देशमुख यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांचा स्नेह संमेलन ठेवलं होतं. त्या 5 दिवसात आम्ही ज्यावेळी 90, 91 पर्यन्त गोंडा ला काम करत होतो त्यावेळी जेव्हढे विद्यार्थी शिकत होते, त्यांना आम्ही आलो असे कळताच,त्या सगळ्यांनी दिवसभराचे सकाळी, दूध, नाश्ता, जेवण, दुपारचं चहा, नाश्ता, रात्रीचे जेवण आणि रात्री दूध असे सात वेळांचे प्रत्येकाकडे वेळापत्रक ठरवून आम्हाला आग्रहाने नेलं. आज आता त्यांची मुले त्या शाळेत शिकत आहेत, प्रगती करत आहेत. असं समाधानकारक बदललेलं चित्र पाहायला मिळालं.  

 बीड ला वेगळ्या प्रकारे काम करावे लागले. खूप निरक्षर महिला होत्या. त्यांना आधी साक्षर करून निदान थोडे वाचता येईल असे शिकवून मग इतर प्रशिक्षण द्यावे लागले. त्यासाठी आम्ही छोट्या लायब्ररी सुरू केल्या, छोट्या गोष्टी शिकवून वाचायला लावून त्या सांगणे स्वत:च आपल्या विकासात पुढाकार घेऊन केले तर लवकर प्रगती होते.मागे वळून पाहताना समाधान वाटतं की आपण आपल्याला नेमून दिलेल्या कामाला न्याय दिला आहे.”  

  आता पूर्ण वेळ काम थांबवावे असा विचार केलेल्या मृदुला ताई काम पुन्हा कसं सुरू झालं ते सांगतात, “ २०१३ आम्ही आता या कामातून थांबायचे ठरवले.कारण पूर्ण वेळ आम्ही दोघांनी संस्था म्हणेल तसा व तिथे वेळ दिला होता.पुढे काय करावं हे ठरवलं नव्हतं .वर्ध्याला गेलो. तिथे खेळघर सुरू केलं. लहान मुलांना दिशा देणे हाच आमचा उद्देश होता. आम्ही एक गाव पण दत्तक घेतलं होतं पण कौटुंबिक कारणाने २०१८ ला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं. लॉक डाउन सुरू झालं . या काळात संस्कृत भारतीचा कोविद कोर्स केलं अभ्यास केलं. अहमदाबाद च्या एका युनिव्हर्सिटी साठी एक पुस्तक लिहिण्याचा योग आला. नंतर एकनाथजी रानडे यांच्यावरील मराठी पुस्तकाचा हिन्दी अनुवाद केला आहे”.

“सध्या राष्ट्र सेविका समितीने पश्चिम महाराष्ट्रचे सेवा विभागाचे दायित्व दिले आहे . तळेगावला मा. ताई आपटे यांच्या नावाने मोठी वास्तु बांधली आहे तिथले प्रकल्प सुरू आहेत, त्याचे उदघाटन नानाजी यांनीच  केलेले आहे. पुन्हा नानाजींच्या प्रकल्पात मी सामील झाले आहे .

संघटन तर करायचेच पण जोडलेल्या लोकांना काम करण्यास प्रवृत्त पण करायचे हे महत्वाचे आहे. माझ्या मुली पण लग्नानंतर स्वेच्छेने कामात आहेत, समितीचा काम करतात. मुलीची मुलगी माझी नात समितीशी जोडली आहे आणि माझी आई पण समितीचं काम करते अशा आम्ही चार पिढ्या या कामात आहोत . नानाजींचे म्हणणे होते संपूर्ण परिवार कामात हवा, समाजशिल्पी परिवार !                                  

 अनेक अडचणीं ना तोंड देत काम करावं लागत पण अडचणी आपण कुटुंबात काम करतो तेंव्हाही असतातच , त्या सोडवतच आपण पुढे जात असतो, तसच या कामात सुद्धा अडचणी सोडवत पुढे जायचं”.अशा मृदुल ताई पाठक प्रामाणिक पणे समाज कार्य करणार्‍या मुलखावेगळ्या कार्यकर्त्या आहेत.(ही मुलाखत विश्व संवाद केंद्र,आणि इतर पोर्टल्स वर प्रसिद्ध झाली)

-      -  डॉ नयना कासखेडीकर

-       ----------------------------   

Friday, 10 March 2023

मुलखावेगळी ती...

 

 मुलखावेगळी ती...

मृण्मयी परळीकर 

      एखाद्या हिर्‍याला पैलू पाडल्यावर तो अधिक चमकू लागतो किंवा तो अधिक तेजस्वी होतो. असेच हिरे प्रत्येकाच्या कुटुंबात मुलांच्या रूपाने असतात. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा पालकांच्या छत्राखाली मिळतच असतो. पण त्याही पेक्षा त्यांच्या आयुष्याला चांगले वळण देण्याची गरज असते. धैर्यवान, सामर्थ्यवान, निरोगी, नीतीमूल्ये आणि सामाजिक मूल्यांचे भान असणारी मुले घडविणे पालकांचे कर्तव्य असते. कुटुंबा बरोबरच शाळांमधून, महाविद्यालयातून आणि समाजात घडणार्‍य चांगल्या गोष्टीतून मुलांवर संस्कार होत असतात. अशाच वातावरणात घडलेली युवती स्वत: पुरता विचार न करता देश पातळीवर विचार करू लागते. आजची हि मुलूखावेगळं काम करणारी, आई आणि वडिलांनी सामाजिक संस्कारांनी घडविलेली मृण्मयी परळीकर ,साप्ताहिक विवेकच्या पाठ्यवृत्तीसाठी 370 कलम रद्द केल्यानंतरचा बदललेला कश्मीर अभ्यासण्यासाठी धाडस दाखविणारी मृण्मयी.

तिच्याशी बोलल्यावर, दोनच वर्षापूर्वी पोस्ट ग्रॅजुएट होऊन बाहेर पडलेली राज्यशास्त्राची विद्यार्थिनी, असा देशपातळीवरचा, तोही एकेकाळी धगधगत्या असलेल्या, आजही अशांत असलेल्या कश्मीर बद्दल विचार करते याचे कौतुक वाटले.

                                 

कश्मीर सारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भारतातल्या नंदनवनाचा आम्ही आमच्या पातळीवर फक्त पर्यटन म्हणून विचार करतो. कारण कश्मीर कळत्या वयापासूनच सिनेमांमध्ये पाहिलेलं असत, तेंव्हा पासून हा प्रदेश बघायची सुप्त ओढ सर्वांनाच असते.हि इच्छा वेगवेगळ्या टुर्स बरोबर जाऊन पूर्ण करूनही घेत असतो आपण, पण यातल्या किती जणांना कश्मीरमधल्या निसर्ग सोडून असलेल्या परिस्थिति बद्दल ची जाणीव असते? ट्रीप, खरेदी, फोटोसेशन, मौज मजा ,तिथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणं झालं की, टूरचं इतिकर्तव्य समाप्त. परंतु मृण्मयी ला नियंत्रण रेषेला लागून असलेल्या पाकिस्तान पासून ६ किलोमिटर वर असलेल्या ‘मच्छल’ एरियात जवानांना आणि लोकांना प्रेरणा देत उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ,कारगिल चे जवानांचे स्मृति स्थळ आणि सर्वात मोठा भारताचा तिरंगा बॉर्डरवर फडकताना पाहिला की तरुण मृण्मयी नतमस्तक होते. जवानांचे बलिदान बघून अश्रु ओघळू लागतात. हे बघत असताना मनात ज्या राष्ट्रीय भावना आलेल्या असतात त्यामुळे कश्मीर मध्ये जाऊनही गुलमर्ग वगैरे ठिकाणी जाऊन वेगळे निसर्ग सौंदर्य बघायला जायची मृण्मयीला गरज वाटत नाही. म्हणून ती आपल्या पेक्षा वेगळी आहे.
  

                                

मृण्मयी ज्ञानप्रबोधिनित शिकली. तिने पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयात राज्यशात्र घेऊन २०२०ला मास्टर डिग्री घेतली आणि Teach for india साठी टिचिंग फेलो आणि फेलो अडव्हायजर म्हणून काम करते. Tree Foundation साठी पण २०१८ साली छत्तीसगड मध्ये जाऊन प्रोजेक्ट केलं. (Transformation through Research, Education & Empowerment) अरुणाचल प्रदेशात जाऊन काम केलं. आणि ३७० कलम रद्द झाल्यानंतरचा कश्मीर प्रदेश त्या नंतर ३ वर्षानी काय बदलला आहे. कसा बदलला आहे हे जाणून घेण्यासाठी कश्मीर दौर्‍यावर गेली. सद्द स्थिति काय हे जाणून घ्यायला तिने तिथल्या आठवडाभराच्या वास्तव्यात विविध स्तरांतील व्यावसायिक, शेतकरी, कारागीर, युवक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, महिला, राजकारणी, सरपंच, शरणागत अतिरेकी, लष्करी अधिकारी ते या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालांपर्यंत अनेकांच्या भेटी घेतल्या. गप्पा मारल्या. वेगवेगळ्या प्रश्नांमधून त्यांच्या मनातल्या भावना, सल समजून घेण्याचा प्रयत्न केला.

भारतीय राज्यघटनेतील काश्मीर बद्दलची जी कलमं आहेत ३७० आणि ३५ अ, जी जम्मू कश्मीरला स्वायत्तता आणि विशेष दर्जा देणारी होती ती एकत्र कधीच रद्द होऊ शकणारी नाहीत आणि जर रद्द झालीच तर अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे गंभीर चित्र उभे केले गेले होते. पण खरच ही कलमं रद्द होऊन तीन वर्षे झाली मग आता काय झालं असेल कश्मीर मध्ये ? असा स्वाभाविक प्रश्न मृण्मयीला पडला आणि तिने या अभ्यासासाठी जाण्याचे ठरवले. कारण देशात घडणार्‍या घटना घडामोडींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम ती अनुभवत होती. या कलमांमुळे भारतापेक्षा कश्मीर ची घटना वेगळी, ध्वज वेगळा, सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आणि दळण वळण बाबी सोडल्या तर कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे लोकांच्या मनाशी आणि हृदयाशी न भिडता फक्त कागदावरच राहिला. मृण्मयी ज्या तरुणांना भेटली त्यांनाही, “ही कलमं म्हणजे आमची अस्मिता आहे आमची ओळख आहे ती आम्ही गमावून बसलो आहोत असे वाटते” अशा भावना व्यक्त केल्या. याचाच फायदा घेऊन पाकिस्तान आणि इतर काही देशांनी कश्मीर सतत अशांत राहील असे प्रयत्न केले.

पण रिसर्च करणारा एक तरुण म्हणाला, इथल्या सतत सक्रिय असणार्‍या अतिरेकी संघटना, त्यांना असलेला पाकिस्तानचा पाठिंबा आणि दीर्घ काल कुठलीही ठोस कृती, कार्यक्रम नसल्याने तरुण वर्ग अतिरेकी कारवायांकडे आकर्षित झाला आहे. लहान मुलांना सुद्धा गन चालवून बघण्याचे आकर्षण आहे. ही अॅक्टिविस्ट तरुण मुलं सधन कुटुंबातली आहेत, कुणाला कलेक्टर व्हावसं वाटतय, कुणाला देशासाठी सैन्यात जावेसे वाटतेय, ती चांगल्या संधीच्या शोधात आहेत” असे आशादायक चित्र मृण्मयी ने अनुभवले.

मच्छल मध्ये मराठा रेजिमेंट काम करते तिथे शिवरायांचा पुतळा तर आहेच. पण, तिथे शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. मच्छल मेला भरतो, लष्कराचं ढोल लेझीम पथक आहे. सीमा सुरक्षा या मुख्य कामा पलीकडे जाऊन, सर्व काश्मिरी लोकांना देशाच्या प्रवाहात आणण्यांचे जिवापाड प्रयत्न लष्कराचे जवान करतात. कलमं रद्द झाल्यानंतर आणखी एक बदल झाला की, आत्ता पर्यन्त अस्तित्वात नसलेले पक्के रस्ते तिथे बांधले गेले. दळण वळणाची साधने निर्माण झाली.


                                
                   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित मुलांच्या हातात तिरंगा आणि मनात देशभक्ति

मृण्मयी म्हणते, कश्मीर मध्ये शिक्षणाचा अभाव नाही, तर राष्ट्रीय शिक्षणाचा अभाव आहे. प्रेरणा देणारी व्यक्तिमत्वे चंद्र शेखर आझाद ,स्वामी विवेकानंद, राणा प्रताप यांची चरित्रच तिथे माहिती नाहीत. त्यामुळे असे आदर्शच डोळ्यासमोर नाहीत मुलांच्या. तिथे घडणार्‍य अतिरेकी कारवायांबद्दल तरुणांच्या मनात चीड आहे.

मृण्मयी जेंव्हा तिथल्या राज्यपालांना भेटते तेंव्हा “ही कलमं रद्द होणं आवश्यकच होतं. ती रद्द झाल्यामुळे राष्ट्राच्या मुख्य धारेत, मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होते आहे. इथे लागू नसलेले जवळजवळ १८० कायदे थेट लागू झाले. त्यासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया करावी लागली नाही. पुढेही करावी लागणार नाही.

विकासासाठी, समृद्धीसाठी शांतता आवश्यक असते. इथे सतत दहशतीचं वातावरण. शांततेशिवाय प्रगती साधणार कशी? ३७०, ३५ अ रद्द झाल्यामुळे इथे शांतता नांदू शकेल. आता काश्मिरी वेगळा न राहता भारताचा, या राष्ट्राचा, नागरिक म्हणून ओळख बळकट होईल आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते पूरक ठरेल.” असे कश्मीर च्या परिस्थितीचे आश्वासक बोल तिला ऐकायला मिळतात आणि राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यावर तिथे राबवत असलेल्या अनेक योजनांची यादीच तिला ऐकायला मिळते. हीच तिथल्या बदलांची नांदी आहे असे मृण्मयी म्हणते.

शेती, शिक्षण, उद्योजकता, सामाजिक विकास, कायदेप्रक्रिया, अंतर्गत व सीमा सुरक्षा, पर्यटन, कला, क्रीडा, खाद्य, संस्कृती, ऊर्जा, तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, या सर्वच क्षेत्रांत सकारात्मक बदलांना सुरुवात झाली आहे .

निसर्ग सौंदर्याने नटलेले,भारतातले नंदनवन असलेले कश्मीर!

दैदीप्यमान इतिहास लाभलेले कश्मीर!

सिंधु, झेलम, चिनाब सारख्या नद्यांनी समृद्ध असलेले कश्मीर !

कवी कल्हणच्या राजतरंगिणी खंडात ,महाभारतात, हडप्पा सारख्या प्राचीन अवशेषात हजारो वर्षांचा इतिहास सांगणारी, कश्यप ऋषींची ओळखली जाणारी ही भूमी, अशी दु:खी का?

सुवासिक अत्तरे तयार होणार्‍या या भूमीला दहशतवादी कृत्यांचा वास का?

लहान मुले आणि तरुणाईला बंदुका हाताळण्याचे आकर्षण का?

शत्रुपासून देशाचं रक्षण करणार्‍या, आपली सगळी स्वप्न बाजूला सारून आलेल्या, भारतीय सैनिकांचं वीरमरण ?

आता तर 370 कलम रद्द केलय, मग अजूनही परिस्थिति अशी आहे? असे एक नाही, अनेक प्रश्न मृण्मयी ला एक राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून पडलेले. याची उत्तरे शोधण्यासाठी केलेला कश्मीर प्रवास, 370 कलम रद्द केल्यानंतर बदललेला कश्मीर बघण्याची उत्सुकता असलेल्या मृण्मयीच्या विचारांची बैठक चांगली घडली आहे हे लक्षात येतं.
                                 

चांगले शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या चांगल्या संधी सोडून सेवा वृत्तीने आणि जोखीम घेऊन काम करण्याची प्रेरणा मृण्मयीला तिच्या कुटुंबातून आणि शाळा कॉलेज मधूनच मिळाली. असे अभ्यास करण्याची संधी मृण्मयी सारख्या योग्य व्यक्तिला मिळाली तर स्वताला सिद्ध करून दाखवणारी ती चांगली यंग ‘अचिव्हर’ असेल यात शंका नाही. केवळ महिला दिनीच अशांचा विचार करण्याऐवजी मुलीच्या जन्मापासून आयुष्यभरच तिला चांगल्या संधी देऊन, तिच्याकडे चांगले लक्ष देऊन, जडण घडण केली तर अशा अनेक ‘अचिव्हर’ तयार होतील असे वाटते .(मृण्मयी मंदार परळीकर हिची, महिला दिन ८ मार्च २०२३ रोजी विश्व संवाद केंद्रातर्फे मुलाखत घेता आली आणि या निमित्ताने तिचा परिचय सर्वांना करून देता आला याचे समाधान वाटले. हाच विषय ‘मुलखावेगळी ती’ घेऊन विश्व संवाद च्या पोर्टल वर या मालिकेत प्रसिद्ध झाला.)

© डॉ. नयना कासखेडीकर

---------------------------

Monday, 20 February 2023

ललित कलांची जननी ‘साहित्य’

 

ललित कलांची जननी साहित्य

     मनुष्याचे विचार अभिव्यक्त करण्याचे प्रमुख माध्यम 'साहित्य' आहे. समाजाला अर्थपूर्ण दिशा देण्याचे काम साहित्य करते. अखिल भारतीय स्तरावर संस्कार भारतीचे काम, साहित्य आणि चित्र, शिल्प, रंगावली, नाट्य, संगीत, नृत्य आणि लोककला अशा विविध कलांमध्ये सुरू आहे. साहित्य विभागामध्ये विशेषत: लेखन आणि वाचन ही कार्ये येतात. साहित्य विभाग (विधा) ही इतर ललित कला विधांची जननी आहे असे म्हणता येईल. कारण चित्रकला, नृत्यकला, शिल्पकला, रंगावली, नाटक, संगीत आणि लोककला या सर्व ललित कलांची अभिव्यक्तीची एक भाषा आहे आणि भाषेचा आधार शब्द आहे. तो लिखित असतो. या शब्दाला एक अर्थ असतो, एक विचार असतो, विचारधारा असते, संस्कृती असते, त्याचे आदानप्रदान होताना किंवा संवाद साधताना भाषाच आधार असते. या सर्व कलांना आस्वाद्य बनविण्याचे कार्य भाषा करत असते. शिवाय त्याचा आशय सतत ताजा ठेवण्याचं कार्यही भाषा करते.

शब्द आणि अर्थ यांचे एकत्रित अस्तित्व म्हणजे 'साहित्य' असे म्हणतात. इंग्रजी टीकाकार ए.सी. ब्रॅडली यांनी ‘व्हेअर साऊंड अँड मीनिंग आर वन’ अशी साहित्याची व्याख्या केली आहे. शब्द म्हणजे ध्वनी किंवा अक्षरसमूह, त्याचे तयार झालेले वाक्य आणि वाक्य समुहातून तयार होणारा आशय म्हणजेच शब्द असतो. त्यात संवेदना, विचार आणि कल्पना असतात. शब्द आहेत म्हणूनच त्यातून मानवाच्या भावना व्यक्त होतात. शब्दसुमनांची गुंफण करत वाक्यांचे अलंकार निर्माण होतात आणि सर्व शक्तिनिशी ते नाद, गंध आणि रंग उधळीत जातात. त्याच शब्दांच्या कविता होतात, पुढे गीतांच्या रचना होतात आणि लोकप्रिय संगीत कलेतून गाणी निर्माण होतात, जी श्रोत्यांच्या मनावर पिढ्यान पिढ्या राज्य करतात. त्याचप्रमाणे कथा- कादंबर्‍या होतात, नाटके लिहिली जातात. यात लेखकाची प्रतिभा असते. त्यातून उत्कट भावाविष्कार, अनेक कल्पनाविलास, चिंतन, विचार यांचे दर्शन घडते. साहित्यात मानवी जीवनातले व्यावहारिक चित्रण असते, भाष्य केलेले असते. काल्पनिक, वैचारिक याबरोबरच जीवनाचे वास्तववादी चित्र पण दिसते.

साहित्य म्हणजे नुसते शब्द नाहीत, नुसता लिखित मजकूर नाही, तर आपल्या संस्कृतीचा व्यापक इतिहास आहे. जो विविध कलांमधून व्यक्त होत असतो, तो शब्दांमुळेच टिकून आहे. असे हे ललित साहित्य, कलाविश्वातील मनोरंजना बरोबरच उच्च अभिरुची रुजवत असते.

                                         

अगदी आदिम काळात चित्रभाषा होती. गुहा चित्रे, लेण्यातील चित्रे, आदिवासींची चित्रकला(वारली) यातून त्या काळातली संस्कृती व पद्धती समजे. त्या नंतरच्या काळात मौखिक साहित्य परंपरा होती. नंतर ती लिखित स्वरुपात आली. उदा. वेद, धर्मग्रंथ, रामायण महाभारत, पुराणे, शास्त्रे इत्यादि. प्राचीन संस्कृत वाद्मयातिल सर्व ग्रंथ श्लोकबद्ध असत. काव्यात असत. मौखिक असल्याने ते गेय व पाठांतरास सोपे असे. म्हणून ते पठणाद्वारे प्रसारित व्हायचे. हे ज्ञान एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे प्रसारित व्हायचे.

      प्राचीन काळात काव्य हाच वाड्मय प्रकार प्रामुख्याने होता. त्यात गद्य, पद्य, नाटक हे प्रकार असत. संस्कृत वाद्मयात याची उदाहरणे सापडतात. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना अशी व्याख्या डॉ मध्यावरव पटवर्धन यांनी मांडली आहे. तत्वज्ञान, नीती, व्याकरण असे शास्त्रीय ग्रंथसुद्धा पद्य प्रकारात असत. ते मौखिक मार्गाने टिकवून ठेवण्याची पद्धत सगळीकडे होती. मुद्रणकलेचा शोध गटेनबर्गने लावला आणि कागदावर अक्षरे उमटू लागली तसे जगभरात गद्य साहित्य तयार होऊ लागले. रोजनिशी, स्मरणिका, चरित्र, आत्मवृत्त, कादंबरी लेखन प्रकार भरभराटीस लागले. दीर्घ लांबीचे साहित्य तयार होऊ लागले. पुढे ललित आणि ललितेतर वाद्मयीन साहित्य प्रकार असे वर्गीकरण झाले. आज आपण ज्या साहित्यातून विविध सौंदर्याच्या पातळीवर आस्वाद घेत असतो, असे ललित प्रकार म्हणजे, काव्य, कथा, कादंबरी, नाटके, एकांकिका, नाट्यछटा, प्रहसने, महानाटये, अतिनाट्य, नाट्यगीत, कथाकाव्य, महाकाव्य, खंडकाव्य, नृत्यनाट्य, भावगीत, बॅलड, मुक्तछंद, वात्रटिका, लोककथा, लोकगीते, गोंधळ, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडे, लावणी, आरत्या इत्यादि आहेत. असे ललित साहित्य प्रकार चार घटका मनोरंजन, विरंगुळा आणि जीवनातील ताणतणाव यापासून सुटका याबरोबरच सामाजिक सुधारणा, रूढी-परंपराबद्दल मार्गदर्शन, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, मानवी मूल्ये, प्रबोधन, जिज्ञासातृप्ति आणि अलौकिक आनंद देतात. त्यातून काही गोष्टींचा नवा अर्थ समजतो. सांस्कृतिक मूल्यांची जाणीव होते, जीवनातल्या समस्यांवर प्रकाश टाकला जातो. मानवी जीवन व तत्वज्ञान याचीही माहिती मिळते. मग एखादी कथा चित्रपट किंवा नाटकाचा आत्मा असते. तर एखादी काव्यरचना घेऊन गायकांच्या स्वरात एखादा संगीतकार वेगळा आकार देतो आणि त्या रचना, गाण्याची महफिल, विविध कार्यक्रम यातून नाट्यगीते, भावगीते, चित्रगीते, भक्तिगीते, बालगीते, लोकगीते, स्फूर्तीगीते या माध्यमातून सादर केल्या जातात.

                               

या साहित्याच्या आधारेच बहुतेक सर्व ललित कलांचे सादरीकरण होत असते.मनुष्याला विचार करण्याची क्षमता ईश्वराने बहाल केली आहे. त्याद्वारे या शब्द शक्तीचा वापर तो अभिव्यक्त होण्यासाठी करत असतो. या शब्दाबरोबर नाद लय, ताल, गंध आणि रंग येतात तेंव्हा नवीन निर्मिती होते. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।।
शब्दची आमुच्या जीवीचे जीवन। शब्दे वाटू धन, जनलोक।।
तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा करू।।’ आपले विचार प्रथम साहित्यातून आणि नंतर इतर कलांतून प्रकट होतात.

शब्दशक्तीचे एक सुंदर उदाहरण म्हणजे संतांच्या अभंग रचना. निर्गुण निराकार शक्तीचे सगुण रूप भक्तांच्या मनात तंतोतंत उभे करणारे हे शब्द. अशा अनेक भक्तिरचना शतकानुशतके आपल्या मनावर राज्य करत आहेत. ‘मोगरा फुलला..’, ‘ओम नमो जी आद्या’, ‘घणू वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा’..., अशा अनेक संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या रचना स्व.लता मंगेशकर यांच्या आवाजात अजरामर झाल्या आहेत. वेगवेगळ्या गायकांनी संतांच्या रचना मधून लोकांच्या मनात भक्तीभाव निर्माण केला आहे.

बुगडी माझी सांडली गं.. ही आशाताई भोसले यांच्या आवाजातली लावणी असो किंवा ‘पदरावरती जरतारीचा, मोर नाचरा हवा,

आई मला नेसव शालू नवा’..

गदिमांची ही लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात अजरामर होते. जगदीश खेबुडकरांच्या 'आज प्रीतीला पंख हे लाभले रे' .. अशी गीते जीवनाचे स्वप्न रंगवायला शिकवतात. 'अरे संसार संसार' या गीतातून कवयित्री बहिणाबाई चौधरी, संसार कसा असतो याची कल्पना देतात.

                                                
चित्रपट आणि नाटके या माध्यमातून संदेश दिला जातो. समाज प्रबोधन, इतिहास, देशभक्ती आणि जगात वागावे कसे याचेही मार्गदर्शन नाटके व चित्रपटातून होत असते. 'संगीत शारदा', 'एकच प्याला', 'नटसम्राट', 'सन्यस्त खड्ग', 'जग काय म्हणेल'? तो मी नव्हेच, अशा नाटकांनी समाजाला संदेश दिला. साधी माणसं, शामची आई, वहिनीच्या बांगड्या, वंदे मातरम, या चित्रपटांनीही इतिहास घडविला.

                                                     
 नृत्य नाट्यातूनही कथा रंगविल्या जातात. चित्रकला, रंगावली, शिल्पकला या कला माध्यमातून अनेक विषय मांडले जातात. चरित्र, व्यक्तिचित्र असे विषय सुद्धा यातून मांडता येतात. कै. बाबासाहेब पुरंदरे यांचं महानाट्य 'जाणता राजा' हे छत्रपती शिवरायांचे चरित्रच आहे. हाच इतिहास चित्रकलेतून,शिल्प कलेतून,रंगावलीतून,सादर करता येतो. सर्व ललित कलांचा आधार म्हणजे साहित्य आहे, नव्हे ती जननीच आहे .

(हा लेख संस्कार भारतीच्या पिंपरी चिंचवड च्या साहित्यवैभव या पहिल्या अंकासाठी लिहिला होता. या अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका व कन्नड मराठी अनुवादिका डॉक्टर उमा ताई कुलकर्णी यांच्या हस्ते मराठी भाषा दिना निमित्त १७ फेब्रुवारी २३ला प्रसिद्ध झाला. )

© लेखन- डॉ. नयना कासखेडीकर.

---------------------

Saturday, 4 February 2023

विद्याधर गोखले



नाटककार विद्याधर गोखले

(जन्म- १९२४, अमरावती . मृत्यू-१९९६,लखनौ )


                               

     अंगणी पारिजात फुलला, धीर धर भामिनी, कशी केलीस माझी दैना, जय जय रमारमणा श्रीरंग, जय गंगे भागीरथी, ऋतुराज आज वनि आला, मानिनी सोड तुझा अभिमान, धन संपदा न लगे मला ती, भरे मनात सुंदरा.. ही विद्याधर गोखले यांच्या नाटकातील अत्यंत श्रवणीय नाट्यगीते आपण अनेक वर्षे ऐकत आलो आहोत. त्याच प्रमाणे,


विश्वनाट्य सूत्रधार तूच शामसुंदरा ।

चातुरी तुझी अगाध कमलनयन श्रीधरा ॥

सुई-दोरा नसुनी करी, रात्रीच्या घन तिमीरी ।
कशिदा तू काढतोस गगनपटी साजिरा ॥

मधुबिंदू मधुकरांस, मेघबिंदू चातकास ।
ज्यास-त्यास इष्ट तेच पुरविसी रमावरा ॥

कुंचला न तव करांत, तरिही तूच रंगनाथ ।
अमिट रंग अर्पितोस जगत रंगमंदिरा ॥

रंगमंचावर सादर होणारी ही शंकरा रागातली त्यांची ‘नांदी’ अर्थात, हे नाट्यगीत नाटकापूर्वीचे वातावरण तयार करते. यात शंकराची स्तुति आहे. अर्थात नटराज हे शंकराचेच रूप.या स्तुतीत जसा रंगभूमीवर नाटकाचा सुत्रधार असतो तसा विश्वाच्या रंगभूमीचा सुत्रधार भगवंत आहे असे कल्पीले आहे. हे सुंदर वर्णन नाटककार विद्याधर गोखले यांनी केले आहे.

संगीत रंगभूमीच्या कठीण काळात विद्याधर गोखले यांनी आपल्या नव्या नाटकांद्वारे संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले. १९६०नंतरच्या कालखंडातली, ‘पंडितराज जगन्नाथ’ (१९६०), सुवर्णतुला(१९६१), ‘मंदारमाला’ (१९६३), ‘मदनाची मंजिरी’ (१९६५), ‘जय जय गौरीशंकर’ (१९६६), ‘मेघमल्हार’ (१९६७), ‘चमकला धृवाचा तारा’ (१९६९), ‘स्वरसम्राज्ञी’ (१९७२) आणि ‘बावनखणी’ (१९८३) ही संगीत नाटकं त्यांनी लिहिली. जवळ जवळ दोन दशके त्यांनी फक्त संगीत नाटकेच लिहिली आणि मराठी संगीत रंगभूमीला नव संजीवनी पुन्हा प्राप्त झाली. यात रागदारीवर आधारित अशा शास्त्रीय रचना त्यांनी केल्या.

यशवंत देव, नीलकंठ अभ्यंकर, प्रभाकर भालेराव, पंडित राम मराठे, छोटा गंधर्व, वसंत देसाई असे दिग्गज संगीतकार त्यांच्या गीतांना संगीतकार म्हणून लाभले. प्रसाद सावकार, भालचंद्र पेंढारकर, पंडित राम मराठे, रामदास कामत, जयश्री शेजवाडकर, प्रकाश घांग्रेकर, मधुवंती दांडेकर, किर्ति शिलेदार, विश्वनाथ बागुल, पंडित वसंतराव देशपांडे, मधुबाला जव्हेरी, अनंत दामले अशा दिग्गजांचा स्वराविष्कार या नाटकांना लाभला होता. ही सर्व नाट्यगीते लोकप्रिय झाली आहेत. यात शृंगारिकता या बरोबर तत्वज्ञान पण दिसते. तर त्यांच्या नाटकाचे विषय पण संशोधांनात्मक असेच दिसतात. त्यांचे पंडितराज जगन्नाथ हे नाटक. अजरामर काव्य गंगालहरी लिहिणारे पंडितराज जगन्नाथ हे सतराव्या शतकात होऊन गेले, त्यांच्यावर नाटक लिहायचे सुचण्याचे कारण म्हणजे विद्याधर गोखले यांनी लहानपणी शाळेत असताना वाचलेला श्लोक आणि त्याचा अर्थ समजून घेण्याची त्यांची जिज्ञासा .

‘नाट्य गंगेच्या किनारी,

स्थिति नो रे दध्या:क्षणमपि मदांधेक्षण सखे !

हा संस्कृत श्लोक लोकमान्य टिळकांच्या केसरी या वृत्तपत्रावर छापलेला असे. त्यांचे वडील संभाजी गोखले यांचे मित्र वीर वामनराव जोशी यांना विचारले असता त्याचा अर्थ तर समजावून सांगितलाच, पण या सुंदर श्लोकाचा कर्ता जगन्नाथ पंडित आहेत तेही त्यांना समजले. त्यातला वीर रस भावला होता त्यांना. त्यामुळे कॉलेज मध्ये गेल्यावर विद्याधर गोखले यांनी जगन्नाथ पंडित यांचे सर्व ग्रंथ वाचून काढले. त्यांचे चरित्र, त्यांचे वाद्मय वाचून काढले, अभ्यास केला. आणि या महापंडिताच्या जीवनावर नाटक लिहिण्याचे ठरवले.

कालिदास, भवभूती आणि जयदेव यांच्या परंपरेतील अखेरचा महान संस्कृत कवि आणि प्रसिद्ध साहित्य शास्त्रज्ञ म्हणजे पंडित जगन्नाथ मानले जातात. त्यांचा वाड्मयीन कर्तृत्व काळ १६३० ते १६६० मानला जातो. अकबर, जहांगीर आणि शहाजहान या तीन राजवटी पंडितराजांनी पाहिल्या होत्या. पंडितराज ही पदवी शाहजहान नेच दिली होती. प्रतिभावंत जगांनाथांच्या जीवनावर हे नाटक विद्याधर गोखले यांनी लिहिलेले आहे. अशा इतिहासावर नाटक लिहायचे म्हणजे खूप काळजीपूर्वकच लिहिले गेले पाहिजे, तसे हे नाटक लिहून झाल्यावर त्यांनी नटवर्य केशवराव दाते,मामा पेंडसे, संगीत दिग्दर्शक वसंत देसाई, इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी, चित्रकार द.ग.गोडसे, विजय तेंडुलकर, भालचंद्र पेंढारकर अशा दिग्गजांना दाखवून त्याचे अनेकवेळा वाचन करून ,चर्चा करून मगच ते रंगभूमीवर आणले. याचा पहिलं प्रयोग ९ ऑक्टोबर १९६० ल झाला. यातील ‘जय गंगे भागीरथी’,’नयन तुझे जादूगार’, ‘मदनाची मंजिरी साजिरी’, ‘सावन घन गरजे बजाए’ ही पदे लोकप्रिय झाली.

यानंतर त्यांचे सुवर्णतुला हे नाटक आले आणि पाठोपाठ संगीत मंदारमाला. याचेही कथानक सतराव्या- आठराव्या शतकातले आहे. यातली पदेही लोकांना आवडली. मराठी मनाला तर या गीतांनी भुरळ घातली. आजही रसिकांची ही गीते आवडती आहेत. ती आहेत, जयोस्तुते हे उषा देवते, जय शंकरा गंगाधरा, बसंत की बहार आयी, सो~हम डमरू बाजे, हरी मेरो जिवनप्राण आधार.

स्वरसम्राज्ञी हे नवे संगीत नाटक सामाजिक विषयावर आधारित आहे. प्रसिद्ध इंग्रजी नाटक वाचल्यानंतर ते गोखले यांना इतके आवडले की त्यांना वाटले यातली ही नायिका आपल्या संगीत क्षेत्रात वावरली तर? आणि या कथेवरुन स्वरसम्राज्ञीच्या नाट्यलेखानास सुरुवात झाली. नवे नवे कलाकार संगीत रंगभूमीवर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पेशवे काळावर आधारित विषय हा पण त्यांच्या नाटकाचा विषय झाला आणि ‘बावनखणी’ हे संगीत नाटक निर्माण झाले.

ध्येयवादी नट, नाटककार आणि तसे काम करणार्‍या नाट्यसंस्था निर्माण व्हाव्यात अशी तळमळ विद्याधर गोखले यांना होती. त्यांनी लिहीलेल्या प्रत्येक नाट्यकृतीच्या प्रस्तावना जरी वाचल्या तरी हे लक्षात येते. मराठी नाटकाचा संसार मांडण्याचे काम विद्याधर गोखले यांच्या ‘रंगशारदा’ या नाट्य संस्थेने केले. ही संस्था संगीत नाटकांना प्राधान्य देत होती. नाटके नुसतीच न लिहिता त्यांनी ती आपल्या रंगशारदे तर्फे रंगमंचावर पण आणण्याचे काम केले.

सार्वजनिक काम करणे हा त्यांची आवड होतीच, पण नाटक हा त्यांचा छंद होता. लेखन /पत्रकारिता हा व्यवसाय. त्यांनी १९६० ते १९८३ या काळात १४ नाटके लिहिली. त्याचे विषय ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक होते. ‘स्वरसम्राज्ञी’, ‘मदनाची मंजिरी’( शेक्सपियर च्या TWELFTH NIGHT या नाटकाचे स्वैर रूपांतर), ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’ ही त्यांची नाटके पाश्चात्य साहित्यकृतीवर आधारित नाटके होती . गालिब यांच्यावर आधारित त्यांची अभ्यासपूर्ण पुस्तके आहेत. त्यात ‘शायरीचा शालिमार’, ‘शायरेआजम’, ‘गजलसम्राट गालिब’ ही पुस्तके गालिबचे काव्य आणि चरित्र सांगते. ‘शंकर सुखकर’ हा नाट्यविषयक संदर्भ ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला आहे. कवीकथा हे त्यांचे पुस्तक सुद्धा गाजले. त्यात संस्कृत, मराठी, हिन्दी, उर्दू, फारसी कवींच्या कथा आहेत.

मा. विद्याधर गोखले ज्येष्ठ नाटक कार होते तसेच ते पत्रकार आणि संपादक पण होते.नाटककार गोखले या बरोबरच ते ओळखले जात ते ज्येष्ठ संपादक म्हणून. खरं तर सुरूवातीला ते कुर्ल्याच्या एका शाळेत इंग्रजी, मराठी व संस्कृत विषयाचे अध्यापन करत होते. या शाळेत ते विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी लोकसत्ता या दैनिकात अनेक वर्ष पत्रकारिता केली. काही वर्षे संपादक म्हणूनही जबाबदारी पेलली. पत्रकारिता करत असतानाच त्यांनी नाट्य लेखनास सुरुवात केली. संस्कृत व उर्दू साहित्याचा त्यांचा अभ्यास होता.

त्यांचं राजकीय व्यक्तिमत्व सुद्धा तत्वनिष्ठ होतं. १९८९ मध्ये त्यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडणूक जिंकली व राजकीय कार्य सुरू झाले. पत्रकार. नाटककार, वक्ता, शिक्षक, राजकारणी, साहित्यिक, व्याख्याते, संस्कृतप्रेमी असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले विद्याधर गोखले यांचे ४ जानेवारी २३ पासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यांना शतश: अभिवादन !
                                     

                                     त्यांच्या नाटकातील काही नाट्य गीते ऐका खालील लिंकवर

https://www.aathavanitli-gani.com/Song/Vishwa_Natya_Sutradhar

https://www.aathavanitli-gani.com/Song/Ruturaj_Aaj_Vani_Aala

https://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Kelis_Majhi_Daina

https://www.aathavanitli-gani.com/Song/Anagani_Parijat_Phulala

https://www.aathavanitli-gani.com/Song/Bhare_Manat_Sundara

लिंक्स आठवणीतली गाणी साभार परत ,धन्यवाद

मासिक 'एकता' फेब्रुवारी 2023 चा अंक यात हा लेख प्रकाशित झाला .



--- ले. - डॉ. नयना कासखेडीकर 
 ------------------------------------------------------------------

Friday, 4 November 2022

तीर्थ विठ्ठल ....

 



तीर्थ विठ्ठल ....

संत नामदेव (रेळेकर)

                                                 
(जन्म-१२७०- नरसी,हिंगोली,वैकुंठगमन-१३५० )

(आई-गोणाई,वडील-दामाशेटी)

तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल ॥ देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल । पिता विठ्ठल ॥ बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल । गुरूदेवता विठ्ठल ॥ निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥ म्हणूनी कळीकाळा । पाड नाही ॥४॥

आज कार्तिक शुद्ध एकादशी! कार्तिक एकादशीला वारकरी सांप्रदायात विशेष महत्व आहे. आषाढी वारी प्रमाणे कार्तिकी वारी करणारे सुद्धा असंख्य वारकरी भक्त महाराष्ट्रात आहेत.चातुर्मासात आषाढी एकादशी पासून कार्तिक शुक्ल दशमी पर्यन्त शेषशय्येवर झोपी गेलेले भगवान विष्णु या दिवशी जागे होतात, म्हणून या एकादशीला प्रबोधिनी किंवा देवऊठी एकादशी म्हणतात.या दिवशी भगवान विष्णूच्या दामोदर रूपाची पुजा करतात. देव जागे होऊन पुन्हा कल्याणकारी कामाला सुरुवात करतात अशी श्रद्धा आहे.

आजचे अजून महत्व म्हणजे आजच कार्तिक एकादशीला संत नामदेवांची जयंती असते. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार करणारे आद्य प्रचारक संत नामदेव महाराज मराठीतले पहिले चरित्रकार व आत्मचरीत्रकार होते.भागवत धर्माचा प्रचार भारतभर करत त्यांनी भावनिक एकात्मता आणि सामाजिक समरसता साधली होती. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हेच त्यांचे ध्येय होते. जनतेचा आध्यात्मिक विकास त्यांना साधायचा होता. संत नामदेवांची आणि संत ज्ञानेश्वरांची पहिली भेट आळंदी येथे झाली. गुरुपदेशाचे महत्व त्यांना कळले. या भेटीनंतर नामदेवांच्या आयुष्यात बदल झाला. विसोबा खेचर त्यांचे आध्यात्मिक गुरु होते. ज्ञांनेश्वर आणि इतर संतांबरोबर त्यांनी तीर्थयात्रा केल्या. ते भक्तीप्रचारासाठी महाराष्ट्रातून निघून भारताच्या चारही दिशांना फिरले. कर्नाटक, तामिळनाडू, रामेश्वर, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब .हरयाणा,हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेले. हि त्यांची पदयात्रा होती. त्यांच्या तीर्थयात्रेची साक्ष या सर्व प्रांतात, मंदिरांच्या रूपाने आजही आहे. सामाजिक समरसता, भक्ति, मानवता, भूतदया ,प्रेम .आदर या सर्व गोष्टी त्यांच्या अभंगातून आपल्याला शिकवण देतात.

संत नामदेव हे एक अभ्यासू आणि बहुश्रुत होते हे अनेक कीर्तनातून आपण सर्व जण ऐकतोच, संत नामदेव यांनी आपल्या अभंगातून आणि भक्ति गीतातून समता व ईश्वर भक्तीची शिकवण दिली. संत नामदेव यांनी आत्मस्वरूप स्थिति, उपदेशपर, आत्मसुख, भक्तवत्सलता, नाम महिमा, गौळण, करुणा, कृष्ण माहात्म्य, नाम संकीर्तन माहात्म्य, पंढरी माहात्म्य, पौराणिक चरित्रे, काही कथा लिहिल्या आहेत. अतिशय मार्गदर्शक अभंग रचना आहेत.

संत नामदेव म्हणजे आपल्या कीर्तनाने प्रत्यक्ष पांडुरंगालाही डोलायला लावणारा पांडुरंगाचा सगळ्यात जवळचा सखा होता असे म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलीन्चा संतांचा उपदेश सामान्य लोकांमध्ये रुजविणार्‍या नामदेवांना या भक्तिमार्गाचा आधारस्तंभ मानतात. म्हणूनच म्हणतात,

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ॥ नामा तयाचा किंकर । तेणे केलासे विस्तार ॥
जनार्दन एकनाथ । ध्वज उभारीला भागवत ॥ भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥

सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भागवद्भ भाव मानावा ,हाच खरा भागवत धर्म आहे . जे जे भेटे भूत ,ते ते मानिजे भगवंत हे भक्तीयोगाचे सूत्र त्यांनी निश्चित केले. याचे अनेक प्रसंग त्यांच्या चरित्रात आढळतात. संत नामदेव एकदा जेवत असताना त्यांच्या ताटातली पोळी कुत्र्याने पळविली, ते पाहून नामदेव त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळतात आणि म्हणतात, “हे माझ्या देवा अशी कोरडी पोळी खाऊ नका तिला जरा तूप तरी लावून खा” असा हा प्राणिमात्रांच्या ठिकाणचा त्यांचा भक्तीभाव. असा हा विठ्ठलमय भक्त संत नामदेव, त्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी विठ्ठलच दिसायचा.

                                               
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।

जय देव जय देव ।। धृ० ।।
पंढरपूरला अठ्ठावीस युगांपासून विठ्ठल विटेवरी उभा आहे, त्याच्या डाव्या हाताला रखुमाई उभी असून, त्यांचे हे रूप अत्यंत शोभा देणारं आहे. पुंडलिकासाठी विठ्ठल पंढरीला येऊन राहिला आहे. त्याच्या चरणी वाहणारी चंद्र्भागा सर्व भक्तांचा उद्धार करत आहे. हे वर्णन केले आहे संत नामदेव यांनी. तुम्ही नक्कीच ओळखलं असेल की ही रचना म्हणजे आपण म्हणतो ती विठ्ठलाची आरती आहे.

यात संत नामदेव यांनी पंढरीचा महिमा वर्णन करताना आषाढी आणि कार्तिक एकादशीला दरवर्षी येणारे भक्तजन,त्यांचा चंद्र्भागेतिरी जमलेला मेळावा, त्यांचा भक्तीभाव, विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ आणि केवळ कळस दर्शनाने सुद्धा आनंदलेले वैष्णवजन आणि हा सोहळा व त्याचे महत्व नामदेव महाराज या आरतीत सांगतात. शिवाय घालीन लोटांगण ही प्रार्थना आपण गणेश उत्सवात गणपती आरती नंतर नेहमीच तोंड पाठ म्हणतो. लयीत म्हणतो. ही संपूर्ण प्रार्थना म्हणजे चार कडवी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या कवींनी लिहिलेली आहे. त्यातले पहिलेच कडवे संत नामदेव महाराजांचे आहे.

घालीन लोटांगण, वंदीन चरण,

डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन,
भावे ओवाळीन म्हणे नामा ।। १ ।।

यात कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन, एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. ही प्रार्थना कृष्णाला उदेशून आहे. गणपतीला नव्हे.

संत नामदेव यांचे अभंग मग ते कुठलेही असोत एकदा म्हटले की सतत गुणगुणत राहतो आपण, त्यांनी अनेक गवळणी लिहिल्या आहेत. पैकी -

रात्री काळी घागर काळी । यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥
बुंथ काळी बिलवार काळी । गळां मोतीं एकावळी काळी वो माय ॥२॥
नामदेव गाथेतली ही गौळण आपण नेहमी ऐकतो.यातील काळी रात्र.काळी यमुना, काळी कृष्णमूर्ती याचे वर्णन करताना भक्ताच्या मनस्थितीतचे वर्णन नामदेव महाराज करतात. परमेश्वर दर्शनाची व भक्तीची ओढ आणि तळमळ या प्रतिमांमधून व्यक्त झालेली दिसते. गौळणीतल्या गोपींचे कृष्णावर जसे प्रेम आहे,तसेच प्रेम नामदेव महाराजांना विठ्ठलाचे आहे.विरहाचे दु:ख आहे. भेटीची प्रतीक्षा आहे. मिलनाची आस आहे. संत नामदेवांना विठ्ठल म्हणजे त्यांची जननी होती. म्हणून ते एका रचनेत म्हणतात,

पक्षिणी प्रभाते चारियासी जाये । पिलें वाट पाही उपवासी ॥१॥
तैसें माझें मन करी वो तुझी आस । चरण रात्रंदिवस चिंतितसे ॥२॥

पहाटेच्या वेळी चारा आणायला गेलेल्या पक्षिणीची तिचे छोटे उपाशी असलेले पिल्लू वाट पाहत रहाते. त्याला जशी आस आहे तशीच आस मला तुझ्या भेटीची आहे.

आत्मसुख कशात आहे हे सांगताना त्यांनी जवळ जवळ २०० अभंगातून उपदेश केला आहे. संत नामदेवांच्या अभंग गाथेत २५०० अभंग आहेत. त्यांनी हिंदीत व ब्रज भाषेत पण रचना केल्या आहेत, तर गुरुग्रंथ साहिब मध्ये गुरुमुखीत सुद्धा लिहिले आहे. त्याचा समावेश गुरुग्रंथ साहेब मध्ये आहे. संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांचे चरित्र लिहिले आहे, आत्मचरित्र लिहिले आहे.

त्यांचा एक आत्मसुख अभंग-

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥
नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥
अनाथाचा नाथ होसी तूं दयाळा । किती वेळोवेळां प्रार्थू आतां ॥३॥
नामा म्हणे जीव होतो कासावीस । केली तुझी आस आतां बरी ॥४॥

वारकरी संप्रदायचे तत्वज्ञान म्हणजे भक्तिमार्ग होता. सदाचार,शुद्ध अंतकरण,नामस्मरन भजन कीर्तन, या माध्यमातून संतांनी जनतेला समजेल अशा लोक भाषेतून सामान्य लोकांना उपदेश केलेला दिसतो. यात त्यांचे स्वतचे अनुभव ,तत्वज्ञान आणि जीवन यांची सांगड संतांनी घातली आहे. संत ज्ञानेश्वरांची समाधी ही नाम देवांच्या आयुष्यातील महत्वाचा ,प्रत्यक्ष पाहिलेलं प्रसंग आहे. त्यातून त्यांना संत ज्ञांनेश्वर यांचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली आहे. संत नामदेवांनी इतर संतांची चरित्रे अभंगाच्या माध्यमातून लिहिली आहेत. त्यांनी कीर्तन प्रकाराला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली . कीर्तनातून त्यांनी संतांची चरित्रे सांगण्याचा पायंडा पडला. त्या मागे भक्ती ही प्रेरणा आहेच.

विठ्ठलाच्या दर्शनाला येणार्‍या संतांच्या चरणाचा स्पर्श आपल्याला घडावा ही त्यांची भक्ती . म्हणून पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्याच्या पाहिल्याच पायरीजवळ त्यांनी आषाढ वद्य त्रयोदशीला समाधी घेतली.

                             

नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे ।
संत पाय हिरे देती वल ।।

                       अशा संत शिरोमणी असलेल्या ,संत नामदेव महाराज यांना विनम्र अभिवादन !

लेखन – डॉ. नयना कासखेडीकर

------------------------------------

Thursday, 29 September 2022

आदिशक्तीचे पूजन –घटस्थापना

 

  आदिशक्तीचे पूजन –घटस्थापना

 
ज घटस्थापना. शारदीय नवरात्रारंभ. आपल्या जीवनातल्या विशेष सर्व कार्यशक्ती स्त्रीलिंगी रूपातच आहेत.नावे वेगवेगळी असली तरी मूळ रूप आदिशक्तीचेच असते. म्हणूनच भारतीयांनी स्त्रीला समाजाच्या मर्यादा,लज्जा, संस्कृती यांचं प्रतीक मानलं आहे. शक्तीरूपातली देवी हीच सर्वांची आदिशक्ती असून ती अत्यंत सामर्थ्यवान आहे असेही मानले गेले आहे. याच कारणामुळे देवीची अनेक व्रते करण्याची प्रथा सुरू झाली. देवीचे नवरात्र हे त्या पैकीच एक. मातृरूपात असणार्‍या शक्तिचे पूजन करण्याचे आणि आदिशक्तीची आराधना करण्याचे, जागर करण्याचे पर्व आहे.

या देवी सर्वभूतेषू मातृरूपेण संस्थितः

नमस्तस्यै: नमस्तस्यै: नमस्तस्यै: नमो नमः।।

सर्व विश्वात मातृरूपात वास करणारी हे भगवती देवी तुला नमस्कार असो.

सर्व प्राणिमात्राच्या मध्ये शांतिरूपात राहणारी, शक्ति रूपात असणारी, बुद्धिरूपात असणारी, चैतन्य रूपात वास करणारी, निद्रारूपात, क्षुधा रूपात, छायारूपात, तृष्णारूपात, क्षमारूपात असणारी आणि लज्जा, श्रद्धा, सौन्दर्य आणि ऊर्जा रूपात, लक्ष्मी रूपात, वृत्ती, स्मृति, दया, समाधान, अशा विविध रूपात  वास असणार्‍या हे देवी तुला नमस्कार असो  असं वर्णन असणारी शक्ति ही स्त्री देवता आहे. हे आमच्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांचे आदराचे स्थान दर्शवणारी, आमच्या हिंदू धर्म ग्रंथातली पुराण काळापासून चालत आलेली परंपरा आहे.

 
नवरात्रात लोक आपली आध्यात्मिक आणि मानसिक शक्ति वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात.  ते या काळात उपवास, संयम, नियम पाळणे, भजन व पूजन करणे, साधना करणे, व्रतस्थ राहणे या गोष्टींवर भर देतात.

पौराणिक कथेनुसार असुरांकडून सृष्टीचा नाश होताना देवदेवतांना बघवेना. मग ही सृष्टी वाचवण्यासाठी त्यांनी जगदंबेची आराधना केली आणि या सृष्टीला वाचवावं म्हणून विनंती केली, तेंव्हा  भगवती देवी व असुरांमद्धे युद्ध झालं. देवीने असूरांचा वध करून देव देवतांना निर्भय केलं, आश्वस्त केलं. तेंव्हापासून या व्रताची सुरुवात झाली असे मानतात. जगात जेंव्हा जेंव्हा असुर किंवा त्यांच्या सारखे क्रूर लोक स्वत:च्या बळाने सज्जनांना छळतात, तेंव्हा तेंव्हा जगज्जननी व विश्वाची पालनकर्ती देवी भक्तांच्या मदतीला धावून येते. म्हणूनच भक्त तिची आराधना, भक्ती करतात, उपासना करतात.

त्यात घटस्थापना, माळा चढविणे, अखंड नंदादीप लावणे आणि कुमारिका/ कन्या पूजन करणे. हे नवरात्राचे मुख्य भाग असतात. स्कंद पुराणात कुमारिकेचे वयाप्रमाणे प्रकार सांगितले आहेत.हे पूजन म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान च आहे एक प्रकारे.

      घटस्थापना करतात म्हणजे, कलशाखाली असलेल्या काळ्या मातीमध्ये सप्तधान्य पेरून नऊ दिवस त्याची नीट काळजी घेतात. या नऊ दिवसात ,नवव्या दिवशी त्या धान्याचे सुंदर तृणात रूपांतर झालेले दिसते.हे सृजन च असते, निर्मिती असते. आणि निसर्गाची खरी पुजा असते. हे देवी तू धन धान्याने आम्हा सर्व तुझ्या लेकरांना असेच समृद्ध कर अशी  कृतज्ञता या देवी जवळ भक्त व्यक्त करत असतात असे वाटते.

घटाला चढवण्यात येणारी माळ सुद्धा या ऋतुत येणार्‍या विविध फुलांच्या च असतात. शेवनती, सोनचाफा,अनंत,मोगरा,चमेली, गोकर्ण,कृष्ण कमळ, अबोली,तेरडा, तीलाची फुले, बेल,कर्दळ, झेंडू, कण्हेर,जास्वंद, गुलाब, अशा विविध रंगी व सुवासिक फुलांच्या माळा वाहण्याचा प्रघात आहे.

     जगातील दुष्ट लोकांचे प्राबल्य कमी करण्यासाठी, लोकांची त्यातून सुटका करण्यासाठी ईश्वर अवतार घेतो अशी समजूत आहे. ईश्वर निर्गुण असल्याने त्याला जेंव्हा कार्य करायचे असते तेंव्हा तो अवतार घेऊन आपल्या शक्तिदेवीला प्रेरित करतो आणि ही शक्ति वेगवेगळ्या रूपात प्रगट होते म्हणून त्या अवतारांची पुजा करतात. ज्या उर्जेतून तेजस्वी तार्‍यांचा, सूक्ष्म मानवी मनाचा, भावनांचा जन्म होतो ती ऊर्जा/शक्ति म्हणजे देवी असे म्हटले जाते. ब्रम्हा, विष्णु, महेश या प्रमाणे पार्वती, लक्ष्मी, सरस्वती ही शक्तीची तीन रुपे मानली जातात. या शक्तीचे मुख्य नऊ आणि इतर अनेक असे अवतार मानले जातात. 

    
    विविध महिन्यात महत्व असलेल्या चैत्र गौर, अन्नपूर्णा-चैत्र, ज्येष्ठ गौर व हरितालिका-भाद्रपद, मंगळागौर-श्रावण, अश्विनातील ललिता ही शक्तीची सौम्य रुपे मानली जातात. तर दुर्गा, काली, चंडी ही  देवीची रौद्र रूपं. पृथ्वीवरील राक्षसांच्या निःपातासाठी या शक्तीने / देवीने रौद्र रूप घेतले. नऊ दिवस युद्ध करून त्यांचा नाश केला.

   आम्ही एकेकाळी स्त्रीला अबला मानलं होतं. पण शक्तीरूपातली देवी हीच सर्वांची आदिशक्ती असून ती अत्यंत सामर्थ्यवान आहे असेही मानले गेले आहे. याच कारणामुळे देवीची अनेक व्रते करण्याची प्रथा सुरू झाली. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस चालणारा हिंदूंचा दुर्गा देवीचा उत्सव, अर्थात शारदीय नवरात्र’. ऋतुंवरून प्रचारात आलेला हा उत्सव धार्मिक उत्सव पण आहे.

  दुर्गा किंवा काली ही सर्वांची कुलदेवता असल्याने भारतात हा उत्सव एक कुलाचार सुद्धा असतो. यावर इथला प्रादेशिक ठसा उमटलेला आहे. 

  
   उत्तर भारतात नवरात्र उत्सव म्हणजे प्रभू रामचंद्रांनी दुष्ट शक्तिवर मिळविलेला विजय म्हणून साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तीपासून वाचवणारी शक्ति म्हणून देवीचे पूजन होते. रजपूत लोकांनी उत्तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली. ते लोक शिवोपासक होते. रजपूत लोक देवीच्या ऐवजी नवरात्रात तोफेची पुजा करतात. त्यावर त्रिशूळाचे चिन्ह काढतात.

   महाराष्ट्रातसुद्धा मराठ्यांच्या राज्यस्थापनेनंतर आपले उपास्य दैवत भवानीदेवीच्या पूजेचा प्रसार झाला. चारही दिशांना ही देवालये स्थापित झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा आई भवानी जगदंबेची पूजा बांधली होती हा इतिहास सर्व परिचित आहेच. पेशवे काळातसुद्धा दसर्‍याआधी वार्षिक दुर्गोत्सव साजरा करण्याची प्रथा होती. 


     पश्चिम भारतात गुजरातमध्ये नवरात्रात नऊ दिवस अखंड दीप लावून शक्ति जागर म्हणून गरबा मांडला जातो. यात गरबा म्हणजे गर्भदीप लावला जातो. सछिद्र मातीच्या घटात दिवा तेवत ठेवतात. हा घट म्हणजे मनुष्याच्या शरीराचे प्रतीक आणि आतला तेवत असलेला दिवा म्हणजे शुद्ध आत्म्याचे प्रतीक मानले जाते. ही आत्मरूपी ज्योत अखंड तेवत राहो, उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना आदिशक्ती दुर्गादेवीकडे केली जाते.

     पुर्वेकडे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडे नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस दुर्गापुजा केली जाते. यातील सिंहावर आरुढ झालेली देवी हातात सर्व शस्त्र घेतलेली आहे. ती महिषासुरमर्दिनी आहे.

  दक्षिण भारतात बाहुल्यांचे प्रदर्शन कोलू असते. ते बघायला सर्वजण एकमेकांच्या घरी जातात. कर्नाटकात नवरात्रात रात्रभर पुराण कथांवर आधारित यक्षगानचे प्रयोग नऊ दिवस केले जातात. दुष्टांवर विजयाचे प्रतीक म्हणून मोठ्या थाटामाटात म्हैसूर दसरा साजरा केला जातो. काही भागात नवमीला आयुधांची पूजा करतात.

   केरळमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर लहान मुलांचा विद्यारंभ केला जातो. भाषा आणि वेष नि आहार वेगवेगळा, पद्धती वेगवेगळ्या, पण या संस्कृतीतून दिला जाणारा संदेश एकच. विविधतेतून एकता हेच या संस्कृतीचे वैशिष्ट्य, हीच परंपरा. अनेक काव्यातून वाड्मयातून शक्ति देवीची स्तुती केलेली दिसते.               

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।


तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

     नऊ दिवसात देवीची म्हणजे आदिशक्तीची ही नऊ रुपे पूजली जातात. ऊर्जा हे देवीचे मूळ तत्व, संरक्षणाची देवता दुर्गादेवी, ऐश्वर्याची देवता लक्ष्मीदेवी आणि ज्ञानदेवता सरस्वतीदेवी या शक्ति रूपात आपण मानतो. हे मानणे म्हणजेच आपल्या मनातील द्वंद्वाच्या, त्रासदायक नकारात्मक भावनांना दूर सारून सकारात्मक दृष्टीचा स्वीकार करणे आहे. कारण जेंव्हा एखादा मनुष्य लहान, मोठ्या संकटाचा सामना करत असतो, तेंव्हा तो आधार शोधतो. मन:शान्ती कशात मिळेल हे शोधतो आणि ती त्याला अध्यात्मामधून, साधनेमधून, कुठल्याही रुपातल्या आराधनेमधून मिळते. ही रुपे अर्थातच शक्तीची असतात. त्याची मनुष्याने प्रतीके शोधली. कारण अमुर्ताला मूर्त स्वरूप दिले की आश्वासक वाटत असते. म्हणून वेगवेगळ्या प्रतिकातून सूचक अर्थ निघत असतात. प्रतिकांचा वापर आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून दिसतो. प्रतीक म्हणजे एखादं चिन्ह किंवा खूण.

  देवीची नवरात्रे चार प्रकारची आहेत. शारदीय, वासंतिक, शाकंभरी आणि गुप्त नवरात्र. तर इतर नवरात्र म्हणजे चंपाषष्टीला खंडोबाचे नवरात्र असते आणि मार्गशीर्षात नृसिंहाचे नवरात्र असते.

मन:शान्ती मिळवण्यासाठी, विशेषता महिलांनो लक्षात घ्या की, मनात भाव व शुद्धता हवी, देवावर/ शक्तिवर विश्वास व श्रद्धा हवी, मन शरीर व परिसर स्वच्छता हवी, सात्विकता हवी. त्यासाठी नुसतं रोज वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या (नवरात्रीचे नऊ रंग, दांडिया, गरब्यासाठी ऊंची ड्रेस आणि अॅक्सेसरीज आणि त्याला जोडून होणार्‍या पार्ट्या) आणि दागिने परिधान करणं, आपल्या दिसण्या-असण्याचा भपका सादर करणं म्हणजे भक्ती नाही की पूजा होत नाही. तुम्ही स्वत:च एक शक्ति आहात, मातृदेवता आहात, मार्गदर्शक आहात ! जर तुम्हीच हे समजून नाही घेतलंत तर तुमची मुले व मुली /पुढची पिढी चुकीच्याच पायंड्यांवरून जात राहतील. आपल्या देशाची सांस्कृतिक प्रतिके आणि आपल्या हिंदू धर्मातील एक शक्तिपूजा, लोक परंपरा, त्यांचा निसर्गाशी असलेला मूळ कार्यकारण भाव, मूळ तत्व हे शोधा, डोळसपणे समजून घ्या आणि ते तुमच्या मुलांना सांगा, म्हणजे ती देखल्या देवा दंडवत असं करणार नाहीत.   

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हणूनच स्पष्ट केलय,

मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव  
देव अशा
नं, भेटायचा नाही हो।
    देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o
देवाच देवत्व नाही दगडातं ।
देवाच देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात 
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥

थोडक्यात, मनुष्य हा बुद्धीमान प्राणी आहे. त्याला बुद्धी आहे म्हणूनच तो चराचराचा, निसर्गाचा, प्राणिमात्रांचा विचार करतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, आदर व्यक्त करतो. तसाच तो या अमूर्त शक्तीची पूजा करतो. हे आपल्या देशाचे सांस्कृतिक महत्व आहे. ते मूळ भावात आपण जपले पाहिजे.            

       आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा बाजार होत नाही ना याकडे आपणच जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. सध्या स्वत:च्या व्यवसायसाठी, स्वार्थासाठी, अधिक नफा कमवण्यासाठी नवे नवे फंडे तयार करून त्याचे मार्केटिंग करण्यात अनेकजण आघाडीवर आहेत. यात माध्यमेही पुढे आहेत.त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीचे  महत्व त्यांना आहे,  यात कुठेही स्त्रीयांचे / लोकांचे कल्याण किंवा देवाची भक्ती हा भाव नाही आणि नसतो. स्त्रियांच्या भावनांना आवाहन केले की स्त्रिया बळी पडतात. याचाच उपयोग करून घेतला जातो. तेंव्हा आयाबायांनो, मैत्रीणिंनो सणावारी आपल्या संस्कृतीशी बादरायण संबंध जोडून भुलवणार्‍याना लगेच ओळखा. बळी पडू नका. आणि शुद्ध भावाने यंदाची घटस्थापना करा, शक्ति देवतेची उपासना करा. तिच्यापासून संकटाचा सामना करण्याची आणि दुष्ट शक्तींचा बीमोड करण्याची प्रेरणा घ्या एव्हढंच सांगते.         

सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके |
 शरण्ये
त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते ||

 

लेखिका-  डॉ. नयना कासखेडीकर,


-------------------------------