Thursday, 23 July 2026

आकाशवाणी आणि मी

 

आकाशवाणी आणि मी


“ ३११.५५ मीटर्स अर्थात ९६३ किलोहर्ट्झ वर आकाशवाणीचे हे जळगाव केंद्र आहे”. Opening signature tune झाली कि, ही उद्घोषणा करून केंद्र सुरु करायचे आणि आमची ड्युटी सुरु. पुढचे काही तास आम्ही AIR वर live. २०० किलोमीटर परिसरात या केंद्राचे श्रोते होते. केव्हढा हुरूप होता तो !

महाविद्यालयात शिकत असतांना आकाशवाणीत माझा गमतीशीर प्रवेश झाला. त्यावेळी रेडिओचे युग होते. कारण सकाळ रेडिओवरील पहिल्या सिग्नेचर ट्यूनने व्हायची आणि रात्र सुद्धा रेडिओवरील कार्यक्रमाने. त्यामुळे बहुतेक सर्व श्रोते रेडिओशी घट्ट नाते जोडून असायचे. एव्हढेच काय सर्वांचे दिवसाचे वेळापत्रक आकाशवाणीच्या कार्यक्रमाप्रमाणे जोडलेले असायचे. गावातल्या, शहरातल्या कॉलनी अथवा गल्लीतल्या, चाळीतल्या प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळच्या ‘सातच्या बातम्यांचा’ आवाज येत असे. तसाच तो ‘बिनाका गीतमालिकेचा’ पण येई.

  ऐंशीच्या दशकांत, साधारण १९८२, ८३ चा काळ. असेच एकदा रेडिओवरील कार्यक्रम ऐकतांना निवेदन करणाऱ्या युवक युवतींची भाषा आम्हाला काही ऐकायला आवडत नव्हती. अतिशय अशुद्ध आणि कशीतरी रेलू वाटायची. अरे, आपण तर यांच्यापेक्षा शुद्ध व चांगले बोलू शकतो, आपल्याला देतील का बोलायला हे लोक? चला प्रयत्न करायला काय हरकत आहे, असे म्हणून एक मैत्रीण व मी आकाशवाणी जळगाव केंद्रात गेलो. तिथे भेटलो आणि आमची ही भाषेची तक्रार सांगितली. आमची टेस्ट घेतली, स्टुडीओत माईकवर, बोलायला आणि काही मजकूर वाचायला सांगितला आणि मग काय! दुसर्या दिवशी या म्हणून सांगितले. लगेच दुसर्या दिवशी धडधडत्या अंत:करणाने आकाशवाणीत पोहोचलो. युवावाणीच्या संध्याकाळच्या कार्यक्रमात आम्हाला कार्यक्रमाचे live compering करायला सांगितले. यशस्वीपणे ते केले. त्यानंतर एकदा एक विषय देऊन त्यावर भाषण द्यायला सांगितले. विषय होता हुंडा बंदी. वा, काय प्रसिद्धी मिळाली या talk ला. हुंडाबळीच्या रोज घटना घडत होत्या. हुंडाबंदीवर जोरदार भाषण लिहून काढून ते वाचलं होतं. अगदी तावातावात. अगदी आता आता पर्यंत ते सांभाळून ठेवले होते. बहुतेक सगळ्या ओळखीच्यांनी ते ऐकले होते. शाबासकी दिली होती. आपला आवाज एकाच वेळी एव्हढ्या लोकांनी ऐकला होता? नक्कीच अप्रूप होते ते, आपण हे करू शकतो असा आत्मविश्वास आणखीन दृढ झाला होता. त्याच वेळी उद्घोषक दत्ता सरदेशमुख यांनीही आमची धडपड बघून रीतसर ऑडीशन द्यायला सांगितली. पास होण्याची खात्री होतीच आणि सुरु झाला होता आकाशवाणीचा माझा प्रवास.


 नाही म्हणायला लहानपणी, आकाशवाणीच्या pune केंद्रावर ‘बालोद्यान’ हा मुलांचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी live असायचा. त्यात आम्ही सुट्टीच्या काळात प्रत्यक्ष सहभागी व्हायचो. बालगोपालांचा मेळाच भरे. मुलांशी प्रत्यक्ष संवाद होत असे. मनोरंजन, बालकलाकारांचे सादरीकरण असे ही असायचे, पुण्यात रंगमंचावर सादर होणारी तेंव्हाची बालनाट्ये, आकाशवाणीचा बालोद्यान कार्यक्रम, गणेश उत्सवातील देखावे, मेळे व त्यातील सहभाग, या सगळ्याचे गारुड मनावर असे.

वालचंदनगरला राहत होतो, मी तेंव्हा आठवीत शिकत होते. माझी आई तिथून शेळगाव (इंदापुर) जवळ अपडाऊन करायची. तिचे पहिल्यापासुनचे वेळापत्रक म्हणजे रेडिओच्या वेळा व कार्यक्रमच होते. त्यामुळे सकाळच्या सातच्या mumbai केंद्रावरच्या बातम्या हा अविभाज्य भाग होता आमच्या दैनंदिन जीवनाचा आणि त्यानंतर दर रविवारी लागणारी “मीने मीने ...टेकाडे भाऊजी ...” ही ‘प्रपंच’ श्रुतिका. अप्रतिम. हे मुंबई केंद्र आठवीत असतांना ऐकताना वाटले नव्हते कि आपणही अशाच मालिकेत पुढे भविष्यात भाग घेणार आहोत. असो. आकाशवाणीच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले. व्यक्तिमत्व विकासाला पोषकच होते सारे.

उद्घोषिका बरोबरच वेगवेगळ्या विभागांत केलेले काम मग ते शैक्षणिक विभाग, कृषी विभाग, युवावाणी, ड्रामा, महिला विभाग, प्रत्येक विभागांत केलेले, production/ कार्यक्रम निर्मितीचे काम, drama artist म्हणून सहभाग, रेकॉर्डिंग, dubbing, निवेदन, live कार्यक्रम, ‘झुंबर’ या कौटुंबिक श्रुतीकेतला दीर्घ काळ सहभाग, नभोनाट्यांतील सहभाग, हे सर्व करताना केलेली धावपळ, केलेला अभ्यास. अनेक तज्ञ लोकांच्या झालेल्या भेटी, घेतलेले प्रशिक्षण आणि अनुभवी लोकांचे मार्गदर्शन याला तोड नाही. डॉ.उषा शर्मा त्यापैकीच एक. आजसुद्धा आमची मैत्री कायम आहे. हे आज जवळ जवळ ३६ वर्षांनी आठवले तरी ऊर अभिमानाने भरून येतो. ९० च्या दशकात जळगाव आकाशवाणी केंद्रात उद्घोषिका म्हणून घेतलेल्या अनुभवाचा भविष्यात अनेक ठिकाणी उपयोग झाला. सर्व meltron मशीन्सशी मैत्री झाली होती. पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर इथल्या pune आकाशवाणीचा प्रवास सुरु झाला. इथे मात्र जबाबदाऱ्या, Ph.D. चा अभ्यास यामुळे ट्रान्स्मिशन केले नाही, सेक्शनलाच काम केले. कै.मा.नीलकंठ कोठेकर सर एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व! त्यांना गुणांची चांगली पारख होती. पुन्हा पुण्यात ते भेटले. Ph.D thesis चा पहिला ड्राफ्ट त्यांनाच दाखवला होता. जळगावला असतांना डिप्लोमा इन जर्नालीझम मुक्त विद्यापीठाच्या आणि बॅचलर व मास्टर डिग्रीच्या वेळी ही त्यांचे मार्गदर्शन होतेच. १९९५ पासून माझा मोर्चा पत्रकारितेकडे वळला.

१३ फेब्रुवारी हा जागतिक रेडीओ दिन म्हणून साजरा होत असतो. कारण याच दिवशी १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिले प्रसारण झाले. आज सिंहावलोकन करताना, AI च्या नव्या जगात प्रवेश करताना, माध्यमांच्या आधुनिक युगांत वावरताना, आकाशवाणी/ रेडीओ हे माध्यम अगदी तळागाळापर्यंत, दुर्गम भागात, यशस्वीपणे पोहोचणारे आणि खात्रीचे होते, विश्वासार्ह होते, नव्हे अजूनही आहेच हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवते.

‘आकाशवाणी जळगाव केंद्र’ मध्यम लहरीवर प्रसारित होत असलेले हे all india radioचे खानदेशमधील ग्रामीण व शहरी भागाला जोडणारे एक महत्वाचे माध्यम. प्रादेशिक केंद्र. अर्थातच मराठी. या केंद्राची स्थापना १९७६ मध्ये झाली पण केंद्र प्रत्यक्षात १९७८ पासून सुरु झाले. या केंद्राचे कार्यक्रम शिरसोली या जळगावपासून ११ किलोमीटरवर असलेल्या प्रक्षेपण केंद्रातून सहक्षेपित होतात. जळगाव, धुळे, नाशिक व बुलढाणा या जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि जडणघडणीत जळगाव आकाशवाणी केंद्राचा मोठा वाटा आहे. शिक्षण, कला, शेती, हवामान, आरोग्य, विज्ञान, क्रीडा, संस्कृती, व्यापार, अशा विषयातून, महिला, बाल, युवक, शेतकरी या सर्वांनाच मार्गदर्शन आणि मनोरंजन करणारी ही संस्थाच आहे जणू. विशेषतः या माध्यमाचा नैसर्गिक आपत्तीमध्ये थेट माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी जास्त उपयोग होतो. रेडीओ हे जनसंवादाचं सर्वत्र, सहज उपलब्ध होणारे, टिकाऊ, बहुमुखी असं माध्यम आहे.

जळगाव केंद्र news on AIR App आणि १०२.१ वरील FM वर सुद्धा हे ऐकू येते. रेडीओ कम्युनिकेशनमध्ये रेडीओ लहरींचा वापर करून माहिती अवकाशात वाहून नेली जाते. या क्षमतेला ‘बँडविड्थ’ म्हणतात. ‘हेनरिक हर्ट्झ’ या जर्मन भौतिक शास्त्रज्ञाने ११ नोहेंबर १८८६ या दिवशी रेडीओ लहरींचे अस्तित्व पहिल्यांदा सिद्ध केले. या रेडीओ सम्प्रेषणाला प्रथम वायरलेस टेलिग्राफी म्हटले गेले. रेडीओच्या पहिल्या दोन दशकाला ‘रेडीओ टेलीग्राफी युग’ म्हटले गेले. या काळात रेडीओचा वापर व्यक्ती-व्यक्ती, व्यावसायिक, राजनैतिक व लष्करी मजकूर संदेशाचे वहन करण्यासाठीच होत होता. कारण ऑडीओ मोड्युलेशनसाठी आवश्यक असणाऱ्या सतत लहरींचे प्रसारण होऊ शकत नव्हते.


    रेडीओचा इतिहास बघितला तर त्याचे प्रसारण, शोध, कालरेषा यावर संशोधन होत असताना हर्ट्झ, लॉर्ड रेले, ऑगस्टो रीघी, ओलीव्हर यांच्या प्रमाणेच भारतीय भौतिकशास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी केलेले प्रयोगसुद्धा लक्षात घेतले गेले. १९०८ च्या सुमारास औद्योगिक देशांनी आंतरखंडांमधील टेलिग्राम ट्रॅफिकची देवाणघेवाण करण्यासाठी आणि त्यांच्या वसाहती आणि नौदल ताफ्यांशी संवाद साधण्यासाठी शक्तिशाली ट्रान्सोसेनिक ट्रान्समीटरचे जगभरातील नेटवर्क तयार केले. पहिल्या महायुद्धादरम्यान, सतत लहरी रेडिओ ट्रान्समीटर, रेक्टिफाइंग इलेक्ट्रोलाइटिक आणि क्रिस्टल रेडिओ रिसीव्हर डिटेक्टरच्या विकासामुळे रेजिनाल्ड फेसेंडेन आणि इतरांनी अॅम्प्लिट्यूड मॉड्युलेशन (AM) रेडिओटेलीफोनी साध्य केली, ज्यामुळे ऑडिओ प्रसारित करता आला.

१९२० मध्ये प्रसारण सेवा देणारी अनेक रेडीओ स्टेशन सुरु झाली. पुढे नियोजित सेवा सुरु झाली. रोटेड्राममध्ये नेदरलंड, कॅनडा, लंडनमध्ये चेम्सफोर्ड, नंतर मेक्सिको, क्युबा, ऑस्ट्रेलियात मेलबर्न, तसेच न्यूझीलंड, डेन्मार्क इथेही स्टेशन सुरु झाली. १९२२ मध्ये अमेरिकन स्टेशन निर्माण झाली. औद्योगिक प्रसारणही सुरु झाले. फ्रांस, सोविएत युनियन,चीन, बेल्जीयम, चेकोस्लोव्हेकिया, जर्मनी, स्पेन, इटली, जपान, नॉर्वे, पोलंड सर्वांनी ही सेवा सुरु केली. अगदी सुरुवातीला याचा उपयोग फक्त एखादा महत्वाचा निरोप पाठवणे एव्हढाच होता. पुढे विद्यापीठात याचा उपयोग केला गेला. शेतकर्यांना कृषी बाजार अहवाल पाठवण्यासाठी झाला. व्यवसायासाठी उपयोग झाला. हे सर्व काम हौशी आणि प्रायोगिक स्तरावर सुरु होते.

पुढे डेट्रॉईट न्यूज या वृत्तपत्राने जेंव्हा रेडीओ स्टेशन सुरु केले तेंव्हा ते खरे एक ‘नवे माध्यम’ म्हणून लोकांनी अनुभवले. ही स्टेशन्स म्हणजे हाताने बनवलेली उपकरणे होती. काही कार्यक्रमाच्या प्रयोगामुळे देशभर हे माध्यम लोकप्रिय झाले, सामान्य लोकांना खूप जवळचे वाटू लागले. श्रोत्यांना आकर्षित कसे करायचे, त्यांना सतत जोडून कसे ठेवायचे यावर सतत विचार करून रेडीओ कार्यक्रम याचे स्वरूप लोकांच्या लक्षात आले. त्यांच्या सर्जनशीलतेमुळे हे माध्यम हळूहळू स्थानिक भाषेतील एक अभिव्यक्तीचे माध्यम बनले. पुढे सुनियोजित प्रसारण सुरु झाले.

अनेक ट्रान्समीटर मधून येणाऱ्या रेडीओ लहरी एकमेकांमध्ये व्यत्यय न आणता, एकाच वेळी हवेतून जातात कारण प्रत्येक ट्रान्समीटरच्या रेडीओ लहरी हर्ट्झ, किलो हर्ट्झ, मेगा हर्ट्झ, किवा गिगा हर्ट्झ मध्ये मोजल्या जाणार्या वेगवेगळ्या फ्रीक्वन्सीवर आधारित असतात.

एकोणिसाव्या शतकात बिनतारी संदेश बरोबर रेडीओचा उदय झाला. भारतात २३ जुलै हा राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो. १९२४ मध्ये मद्रासमध्ये पहिला रेडिओ क्लब स्थापन झाला होता. लाहोर, अलाहाबाद, पेशावर, डेहराडून इथेही हौशी रेडीओ क्लब सुरु होते.बडोदा, त्रिवेंद्रम, हैद्राबाद, औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा नभोवाणी सुरु होती. म्हैसूरमध्ये १९३५ मध्ये सुरु झालेल्या नभोवाणीला ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. आकाशवाणी म्हणजे आकाशातून येणारा आवाज, तेच नाव पुढे १९५६ मध्ये भारत सरकारने भारतातील सर्व केंद्रांना अधिकृतपणे दिले.


    पहिला खाजगी हौशी रेडीओ क्लब ऑफ बॉम्बे ने जून १९२३ मध्ये देशात प्रथम प्रसारण सुरु केले. त्यातून प्रेरणा घेऊन भारतातले पहिले औपचारिक प्रसारण मुंबई केंद्रावरुन १ जुलै १९२७ ला सुरु केले गेले आणि रेडीओ या नव्या माध्यमाचे युग सुरु झाले. सुरुवातीला मर्यादित श्रोत्यांसाठी प्रसारण होत असे. ४८ किलोमीटर परिसरातच हे प्रक्षेपण ऐकू यायचे. भजन, शास्त्रीय संगीत, बातम्या, सरकारी सूचना, सामाजिक भाषणे असत. उद्दिष्टे होती- देश विदेशातील बातम्या संकलित करून बातमी पत्रे देणे, जनतेला माहिती पुरविणे, मनोरंजन करणे , प्रबोधन करणे, सल्ला व मार्गदर्शन देणे. हे Indian Broadcasting Company मार्फत होत असे. ही कंपनी १९३० मध्ये बंद झाली आणि भारत सरकारने हे काम स्वताकडे घेतले.१९३० ते १९३६ ब्रिटीश सरकारने नियंत्रण ठेवले आणि all india radio ची (AIR) स्थापना झाली. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन air चे काम सुरु झाले. लोकांना माहिती देणे, लोकांना शिक्षण देणे आणि लोकांचे मनोरंजन करणे या त्रिसूत्रीवर आकाशवाणीचे काम सुरु आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात आकाशवाणीचा अधिक विकास झालेला दिसतो. आज आकाशवाणीची देशभरात सुमारे पाचशे ते सहाशे प्रसारण केंद्रे आहेत. भौगोलिक क्षेत्राच्या ९०% भागात ती आहेत. ९९.१९% लोकसंख्येपर्यंत ती पोहोचली आहे. २३ भाषा आणि १८२ बोलीभाषेत ही केंद्रे कार्यक्रमांची निर्मिती करत असतात. ते अत्यंत दुर्गम, ग्रामीण आणि सीमावर्ती भागातील श्रोत्यांपर्यंत आकाशवाणीच्या माध्यमातून पोहोचतात.

आकाशवाणी हे जगातील रेडीओचं सर्वात मोठं जाळं असलेले आणि देशातील सर्व लोकांपर्यंत पोहोचणार जनसंवादाचे माध्यम आहे. ‘भारत देश स्वतंत्र झाला’ ही अधिकृत ऐतिहासिक घोषणा या देशातील लाखो लोकांनी रेडिओवरून ऐकली आणि आनंद साजरा केला. ते किती परिणामकारक आहे ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात १९४७ मध्ये भाग घेतलेल्या अनेकांनी अनुभवले आहे. स्वातंत्र्य लढ्यात रेडिओ ने सर्व देशभक्तांना, सामान्य लोकांना, साहित्यिक व लेखक आणि कवींना, क्रांतीकारकांना, विचारवंताना, राजकारण्यांना, सैन्याला अशा सर्वाना स्वातंत्र्य या विषयाबद्दल एकत्र बांधून ठेवले. अशी मोठी शक्ती या माध्यमा मध्ये आहे. विश्वासार्हता हे खरे याचे वैशिष्ट्य आहे. प्रसारण हे जरी तांत्रिक दृष्ट्या महत्वाचे असले तरी मानवी सहभाग, मानवी विचार हे ही महत्वाचे आहे. त्यामुळे AI च्या नव्या जगात AI tools वापरून केलेले सादरीकरण यापेक्षा प्रत्यक्ष माणसाचा सहभाग असलेले सादरीकरण जास्त विश्वासार्ह असेल हे नक्की .

कारण रेडीओ हे माध्यम युद्धात, संकटात आणि आज आकर्षण असलेल्या अनेक नव्या डिजिटल माध्यमाच्या गर्दीत सुद्धा खात्रीशीर माध्यम आहे, हे जगभरात सिद्ध झाले आहे. अगदी पहिल्या महायुद्धापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत ते तंत्रज्ञानाचा एव्हढा मोठा विकास झाल्यानंतर सुद्धा आजच्या गाझा पट्टीतील युद्धापर्यंत, ‘रेडिओ’ हे प्रसार माध्यम महत्वाची भूमिका अखंडपणे बजावत आहे. या सर्व भौगोलिक अडचणीतून वाट काढत, कमी खर्चात, जास्त वेगाने व क्षणात माहितीचा प्रसार करणारे हे माध्यम आहे. त्यासाठी तुमच्याकडे फक्त रिसिव्हर म्हणजे रेडीओ फ़्रिक़्वेन्सि मिळणारे यंत्र/ट्रांझिस्टर हवे. बस्स. कारण तुम्हाला फक्त आवाज ऐकायचा आहे, आणि इथेच खात्री आणि विश्वासाची कसोटी लागते ती आकाशवाणीकडे आहे. ज्या लोकांना माहितीची आवश्यकता आहे त्यांच्या पर्यंत ती विश्वसनीयरित्या पोहोचली पाहिजे. म्हणून रेडीओ वरचा आवाज हा अधिक विश्वासक व आश्वासक दोन्हीही असतो.

चक्रीवादळ, पूरस्थिती, भूस्खलन, त्सुनामी किंवा भूकंप झालेल्या क्षेत्रात तसेच युद्धभूमीवर सर्व उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणी पुढे काय वाढून ठेवले आहे? आत्ता त्या क्षणाला आपण काय करायचे? कुठे जायचे? संरक्षण कुठे मिळणार आहे? हे सर्व निर्णय घ्यायला, त्या क्षणी मार्गदर्शनाची गरज असते. ते रेडिओवरील संदेशाने मिळते.

याचे उदाहरण म्हणजे आता गाझा पट्टीतील ऑक्टोबर २०२३ मध्ये हमास ने केलेल्या हल्ल्यात सर्व उध्वस्त झाले. अनेक रेडीओ स्टेशन्स (२३स्टेशन्स) बंद पडली. मोठी जीवितहानी, शोकाकुल व भ्यायलेले नागरिक, सर्व व्यवहार ठप्प, रोगराई च्या प्रसाराची भीती, वीज नाही, आर्थिक महासंकट, पायाभूत सुविधांचा नाश, अन्न टंचाई, महागाई, उपासमार, पण अशा कोलमडलेल्या परिस्थितीत आणि युद्धजन्य परीस्थितीत विश्वसनीय प्रसारण होणे आवश्यक असते. गाझा पट्टीत ‘जमान एफ.एम.स्टेशन’ पुन्हा सुरु करून, प्रसारण सुरु झाले त्यामुळे लोकांना मोठा आधार वाटला असेल. अशा परिस्थितीत रेडिओ म्हणजे जीवदायिनी रेखा ठरते.

करोना साथीच्या काळात रेडिओवरील बिहार झारखंड मध्य प्रदेश इथे शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षण आकाशवाणीच्या प्रसारणावर अवलंबून होते. स्मार्ट फोन व इंटरनेट उपलब्ध नसलेल्या ठिकाणी आकाशवाणीने हे काम केले. ओरिसा तामिळनाडू सारख्या किनारी प्रदेशात मच्छीमार आकाशवाणीच्या हवामान बुलेटीन वर अवलंबून होते. २०१९ च्या फणी या तीव्र चक्रीवादळावेळी रेडिओच्या अलर्ट मुळेच अनेकजण सुरक्षितपणे किनार्यावर परतले. मोबाईल ला नेटवर्क नसतांना रेडिओच आपत्कालीन संदेश साधन म्हणून कामाला आले.

अशा बिकट प्रसंगी रस्ते बंद, फोन बंद, दळणवळण पूर्णतः कोलमडलेले, आताचे इंटरनेट कनेक्शन सुद्धा बंद झाले तर अशा परिस्थितीवर फक्त आणि फक्त रेडिओच मात करू शकतो. सगळे जग एकत्र जोडण्यासाठी ‘रेडिओ सिग्नल’ एक खात्रीशीर आधार होता, आहे आणि उद्याही असेल. रेडिओ चा सिग्नल नेहमीच युद्ध क्षेत्रातील संकट समयी, सुरु असलेल्या मदत कार्यात, संदेश जलद पोहोचवण्याच्या कामात. डिजिटल माध्यमांपर्यंत किंवा अवकाशातील दूरस्थ सीमेपर्यंत सुद्धा सर्वांच्या पुढे ताकदीने उभा असेल, कार्यरत असेल. कारण हे आवाजाचे तरंग अदृश्य असले तरी, तेच आज कुठल्याही बदलत्या तंत्रज्ञानातसुद्धा लोकांपर्यंत संदेश पोचविण्यात अग्रेसर असतील. त्यांचे रक्षण करण्यात आघाडीवर असतील आणि लोकांना जोडून ठेवण्यात ताकदवान असतील.

भारतात २००२ मध्ये कम्युनिटी रेडिओचा प्रवास सुरु झाला. पहिले कम्युनिटी रेडीओ स्टेशन फेब्रुवारी २००४ मध्ये सुरु झाले. आता भारतात ५२८ कम्युनिटी रेडीओ स्टेशन्स आहेत. अनेक विद्यापीठे, शैक्षणिक संस्था यांनी अशी कम्युनिटी रेडीओ स्टेशन्स सुरु केली आहेत. आरोग्य, शिक्षण, पोषण, शेती, सामाजिक विकास हे विषय घेऊन स्थानिक भाषा अथवा बोली भाषांमध्ये प्रसारण होत असल्याने, सांस्कृतिक दृष्ट्या ही सर्व समाजाशी जोडले जातात व लोक परंपरा, संगीत व मौखिक परंपरा व वारसा जपण्यात यशस्वी होत आहेत.

भारतीय लष्कराचा उत्तराखंड मध्ये ज्योतिर्मठ आणि j&k मधील राजौरी मधील एफ एम रेडीओ स्टेशन, बुंदेलखंड मधील महिलांचा कम्युनिटी रेडीओ, कच्छ मधील बोली भाषेतला कम्युनिटी रेडीओ, दिल्लीतील तिहार तुरुंगातील कैद्यांनी चालवलेला रेडीओ अभिव्यक्ती, असे हे लोकांशी थेट संवादाचे माध्यम खूप परिणामकारक आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ‘मनकी बात’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागरिकांशी थेट होत असलेला संवाद.

भारतातले रेडीओ उडान २०१४ मध्ये सुरु झालेले पहिले online रेडीओ स्टेशन, जे दृष्टीबाधित लोक /प्रस्तुतकर्ता व स्टाफ चालवतो. त्यांचे आज १२० देशात सव्वा लाख श्रोते आहेत.

अशा प्रकारे रेडिओचे अनेक व्यावहारिक उपयोग आहेत, ज्यामध्ये प्रसारण, व्हॉइस कम्युनिकेशन, डेटा कम्युनिकेशन, रडार, रेडिओ लोकेशन आणि रिमोट कंट्रोल यांचा समावेश आहे.

                             रेडीओच्या शोधकर्त्यांना मानाचा मुजरा.

 

डॉ. नयना कासखेडीकर, पुणे

--------------------------------

2 comments:

  1. तुझा आकाशवाणीचा प्रवास, आठवणी खूपच सुखद आणि 'नयन ' रम्य ! त्याच बरोबर या सुंदर प्रसार माध्यमाचा इतिहासही खूप माहितीपूर्ण.

    ReplyDelete
  2. आकाशवाणी माध्यमाची सखोल माहिती मिळाली. खूपच छान माहिती पूर्ण लेख आहे.

    ReplyDelete