Tuesday, 29 July 2014

'वालचंदनगर'......एक आठवण.


                        'वालचंदनगर'......एक आठवण.  

    वालचंदनगर पुण्यापासून अवघ्या १३५ किलोमीटर अंतरावर वसलेलं ५८० एकराचं मॉडर्ण टाऊनशिप, महाराष्ट्र राज्यातील इंदापूर तालुक्यात,नीरा नदीकाठी वसलेली इंडस्ट्रीज लिमिटेडची एक आदर्श अशी उद्योग नगरी. जिथे रोड, पाणी, वीज, शिक्षण, औषध, ड्रेनेज या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होत्या. खरं तर कळंब या खेड्याच्या परिसरातील ही मुरबाड जमीन शेठ वालचंद हिराचंद यांनी साखर कारखान्यासाठी निवडली होती. इंग्लंडमधील मार्सलंड प्राईस कंपनीच्या सहकार्याने साखर कारखाना आणि त्याच्याशी संबंधित जोडधंदे त्यांनी १९३३ मध्ये सुरु केले होते. पर्यायाने या कारखान्यात काम करणा-या कर्मचा-यांसाठी टुमदार वसाहत तयार केली. तिला सुरुवातीला कळंब वसाहत म्हणूनच ओळखत. सुरुवातीला हे शास्त्रीय व अद्ययावत पद्धतीने उसाची शेती आणि साखर निर्मिती केंद्र होते पुढे १९५५ मध्ये औद्योगिक यंत्रसामग्री बनण्यावर लक्ष केंद्रित केले. पुढे सिमेंट, क्षेपणास्त्रांचे सुटे भाग, उपग्रहक्षेपण साधने, बाष्प जनित्रे. अणुभट्टी साधने, युध्द नौकांसाठी गियरबॉक्स यांचे उत्पादन येथे होत होते.

    अशा या छोट्या वसाहतीत सहकारी तत्त्वावर चालणारं पुरवठा भांडार, सहकारी बँक, पोस्टऑफिस, जलशुद्धीकरण प्रकल्प, सुंदर सार्वजनिक बगीचा, क्रीडांगण, चित्रपट गृह या सर्व सोयी होत्या. इथलं टाईम टेबल म्हणजे कारखान्याच्या ड्युटी बदलणा-या भोंग्यावर चालत असे. वेगळीच संस्कृती होती इथे. इथली एक पद्धत मला फार आवडली होती. ती म्हणजे दस-याच्या दिवशी हे कारखाने सर्वाना बघण्यासाठी दिवसभर खुले असत. आम्ही ते बघायला आवर्जून जात असू. आजही ही प्रथा चालू आहे.                   
    वालचंदनगरच्या आठवणी मनात आहेतच. पण, फेसबुकच्या पेजवर टाकलेल्या फोटो मुळे त्या सतत टवटवीत राहतात. आम्ही पोस्ट कॉलनी आणि मॉडीफायडी मेन कॉलनीत, दोन्हीकडे राहिलो. वालचंदनगरच्या एका सुंदर टाउनशिपमध्ये घालवलेल्या बालपणात आईवडिलांचे संस्कार तर होतेच. पण वालचंदनगरनेही आम्हाला शेजारधर्म शिकविला, अठरापगड जातीच्या लोकातही आम्ही इथेच मेरा भारत महान अनुभवला. शेजारच्या घरातलं दु;ख आमचही दु;ख असे तर त्याचं सुख सुद्धा आमचं  सुख असे.                                 
    सी टाईप मध्ये तर आम्ही गल्लीतली सर्व मुले जणू एकत्रच वाढत होतो. पिसाळ, चौरे, चव्हाण, मिंड, कुलकर्णी, कोकणे, सांगळे, गुरखा, खैरनार, गोडसे, देवळे यांची घरे म्हणजे आमचीच घरे. झोपण्या शिवाय घरात थांबतंय कोण? रात्रीचं जेवण तर रोजच अंगणातली अंगत पंगत. काहींचा घरात, तर काहींचा बाहेर चुलीवरच संध्याकाळचा स्वयंपाक होई. भाकरी भाजल्याचा खमंग वास गल्लीभर पसरे.

    एकमेकांची प्रेमाने विचारपूस करणे, प्रत्येक अडचणीच्या वेळी मदतीला जाणे, हक्काने शेजारी जाऊन जेवणे किंवा एखादी गोष्ट मागणे, शेजारच्यांनीही, चुकले तर हक्काने व तितक्याच अधिकाराने रागावणे. हे सगळ चालत होतं. कोणालाही राग नाही, हसत-खेळत व्हायचं सगळ. नोकरी करणा-या आई वडिलांना घरी एकट्या असणा-या आपल्या मुलांची अजिबात काळजी करण्याची गरज नसे. वातावरणच तसे होते. शेजा-यांवर विश्वास होता. वागण्यात चांगुलपणा होता. आपलेपणा होता. आज किती बदलंलय सगळ? आज घरातलेच सख्खे भाऊभाऊ, भाऊबहिण यांच्यात तो अधिकारही राहिला नाही. हक्कही नाही. शेजारी तर फार लांब. काही ग्रामीण भागात अजून असे वातावरण दिसते.    
    सर्व मित्र एका वयाचे नसतानाही एकमेकांना सांभाळून घेणारे. आमची आई नोकरी करणारी म्हणून या सगळ्यांनी आम्हा तीन भावंडांना नेहमीच सांभाळून घेतलं. कुणाच्या घरातलं बाळ रडत असेल तर,ए जरा बघ ह्याच्याकडे, मी जरा धुणं धुवून येते, असं विश्वासाने सांगितलं जायचं. शाळेतून घरी आल्यावर बालसुलभ नियमाप्रमाणे दफ्तर घरात टाकून लगेच खेळायला बाहेर. मग तहान लागली कि पटकन कोणाच्याही घरात जावून पाणी प्यायचे. खैरनार काकुंचे आमच्याकडे सतत लक्ष असे.
     इथले सणावाराचे दिवस आठवणीचा ठेवा आहेत, मग तो दसरा, नागपंचमी गणेश उत्सव, कोणताही असो. नागपंचमी सण विशेष लक्षात राहिला. अशा सणांची गोडी आणि महत्व मुलीच्या जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. नागपंचमीला मेंदीचा पाला आणून, वाटून ती लाऊन, नव्या बांगड्या भरून, नवे कपडे घालून, पूजेच साहित्य घेऊन पोस्ट कॉलनीतून एस.टी.स्टँडकडे जाणा-या रस्त्यावर रेल्वे रुळाच्या बाजूलाच असलेल्या वारुळाला पुजायला जाणे, झाडावर बांधलेल्या झोक्यावर मनसोक्त खेळणे, पंचमीचा फेर धरून, जागरण करणे. परिट मावशींच्या आवाजातलं ` धौम्य ऋषी सांगतसे राम कथा पांडवा `आणि फेराची इतर गाणी म्हणायची. या सगळ्या लोकगीतातून आणि बायकांच्या चर्चांमधून अनेक मूल्यांची ओळख व्हायची. गल्लीच्या कोप-यावर रात्री जागून खेळलेल्या सुरपाट्या, लगो-या, उन्हाळ्याच्या सुटीत मोठ्ठ वऱ्हाड घेऊन बागेतल्या वेलींच्या मांडवाखाली बाहुला-बाहुलीच लावलेलं लग्न, कधीच नाही विसरणार. उसाचे लोड आले कि अरे," लोड आला लोड आला " असे ओरडत जीवाच्या आकांताने धावत जाऊन, पळत पळत जाऊन, चालत्या रेल्वेतून ऊस काढणे आणि जिंकून आल्याच्या अविर्भावात ते ऊस घरी घेऊन येणे, बुचाच्या झाडाखाली बुचाची फुले गोळा करणे, अशी अनेक प्रकारची मज्जा आम्ही अनुभवली.
    गणेश उत्सवात तर खूप मज्जा येई. दहा दिवस भरगच्च कार्यक्रम. कधी सिनेमा, कधी गाण्याचा कार्यक्रम, कधी कोप-यावर स्टेज बांधून सार्वजनिक मनोरंजनाचा कार्यक्रम असे. याच स्टेजवर आम्ही इतर गाणी व लावण्यावरती नाचण्याची हौस भागवून घेतली आणि शिकण्याचीही. क्लबच्या मैदानावर तर दहा दिवस उत्तमोत्तम कार्यक्रम रंगत असत. 'ही श्रींची इच्छा' नाटक, पंडित भीमसेन जोशींची महफिल, व्वा आनंद सोहळाच होता तो. अशा दर्जेदार कार्यक्रमांची ओळख इथेच झाली आम्हाला. तीही लहान वयात झाली हे महत्त्वाचं. बालमनावरचे संस्कार फार महत्त्वाचे ठरतात. या वयात जे जे चांगले-वाईट समोर घडत असते, दिसत असते, ते ते आणि आई वडिल एकमेकांशी आणि नातेवाईकांशी कसे वागत असतात ते मनावर बिंबत असते. ज्याचा त्या मुलांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम होत असतो. 

    १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे शाळेतील खूप उत्साहाचे दिवस. आमचा हा दिवस तर पहाटे तीनलाच सुरु होई. कारण आमची आजी जेंव्हा आमच्याकडे असायची तेंव्हा ती पहाटे काकड आरतीसाठी तीनलाच उठे आणि आम्हालाही उठवे. अंघोळ करून शाळेचा युनिफॉर्म घालून, आधी दारातल्या वेलीवरची आणि झाडांची फुले तोडून आजीला आणून द्यायची, नुकत्याच उमललेल्या फुलांचा सुगंधी दरवळ आसमंतात पसरलेला असे. या टाउनशिप मध्ये विशेषतः पोस्ट कॉलनी परिसरात प्रत्येकाच्या अंगणात (इथे प्रत्येक सिंगल रूमला सुद्धा घरासमोर आंगण आणि गेट होतं, आज बिल्डिंगला आंगण नाहीच, पार्किंग असतं.) जाई-जुई, चमेली, कुंद, मोगरा, बटमोगरा, शेवंती फुललेल्या असत. हा दरवळ अजूनही जसाच्या तसा मनात साठवून आहे. या सुगंधामुळे दिवसाची पहाट आणि सकाळ अत्यंत प्रसन्न वाटायची.
    आजीला भजनाला घेऊन जाणं,  तिला हात धरून देवळात नेणं, त्यांच्या बरोबर त्यांच्या भजनी मंडळात सामील झालं की, जरा कृष्णाचं गाणं चालीत म्हणून दाखव गं, नाहीतर राधा-कृष्णावरच्या भजनावर नृत्य करून दाखव, पुस्तकातली कहाणी वाचून दाखव अशी छोटी छोटी पण क्रियेटीव्ह कामे आम्ही करत असू. मोठ्या माणसांबद्दल आदर ठेवायला घरात-बाहेर दोन्हीकडे शिकविले जायचे. आज अनेक घरात आजी आजोबा नकोच असतात.  आज नेचरच बदललंय. हा एक तरुण पिढीच्या चिंतनाचा विषय आहे. असो पण कळत्या वयात आलेले अनुभव आणि मिळवलेला आनंद कायम लक्षात राहतो हे खरं.

     इयत्ता आठवीनंतर शाळा सोडल्यानंतर ३५ वर्षांनी वालचंदनगरला जाण्याचा योग आला तो महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शालेय नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून आणि तेही माझ्याच वर्धमान विद्यालय या शाळेत. स्पर्धा संपेपर्यंत ५ दिवस मुक्काम होता. खूप आनंद झाला होता.सगळ्या जुन्या आठवणी ,वातावरण याची आठवण येत होती. आणखी योगायोग म्हणजे शेवटच्या दिवशी अवधानी सर अचानक भेटले. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सरांचा मोठा सहभाग असे. त्यांनी ३५ वर्षानंतर मला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. मीच त्यांना ओळखल होतं. मी हिम्मत करून विचारलंच सर तुम्ही अवधानी सर न? ते शाळेत युवा दिनासाठी आले होते. स्वामी विवेकानंद जयंतीला, युवा दिन म्हणून या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी ते दर वर्षी बोलवतात. कार्यक्रम प्रीप्लान होता. तरीही त्यांनी मला माजी विद्यार्थी म्हणून शाळेत नेले आणि मला विद्यार्थांना संबोधित करण्याची संधी लाभली.

वालचंदनगरचे विद्यार्थी सातासमुद्रापार गेले आहेत. साहजिकच ते आपल्या या गावाच्या बातमीवर लक्ष ठेऊन असतात. वर्तमान पत्रात बातमी आली कि आम्ही अभिमानाने वाचतो. अशा खूप गोष्टी आहेत. विशेष म्हणजे आशिया खंडातली सर्वात मोठी दुर्बीण या वालचंदनगर इंडस्ट्रीज ने बनविली आहे. तसेच अलिकडे २०१३ मध्ये भारताने मंगळ मोहिमेसाठी पाठवलेल्या पहिल्या 'मंगल याना'च्या प्रक्षेपकासाठी रॉकेट मोटार केसिंग, नोझल्स तयार केल्या होत्या. ज्याचा उपयोग या यानाच्या अवकाशभ्रमणा दरम्यान पृथ्वीच्या कक्षेतून जाताना प्रचंड फोर्स मधून हे रॉकेट वर नेण्यासाठीच्या प्रक्षेपकाच्या यंत्रणेत झाला होता. या इंडस्ट्रीजने 'वालचंद हार्वेस्टर' हे किफायतशीर ऊस तोडणी यंत्र विकसित केले आहे.     
असं हे वालचंदनगर जगाच्या नकाशावर तर पोहोचलं आहेच पण माझ्या मनाच्या नकाशावर सुद्धा कोरलं गेलंय. (सर्व फोटो इंटरनेट वरून साभार परत.)   

- डॉ.नयना कासखेडीकर.