Wednesday 15 August 2018

मॅडम भिकाजी कामा ( मादाम कामा )


मॅडम भिकाजी कामा 


स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारी, मातृभूमीवर अपार श्रद्धा. प्रेम व निष्ठा असणारी,आपला देश स्वतंत्र आणि एकसंध झालेला दिसावा अशी इच्छा बाळगून स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या संपूर्ण क्रांतीपर्वात सक्रीय भाग घेणारी एकमेव महिला म्हणजे मॅडम भिकाजी रुस्तुम कामा.स्वातंत्र्य लढ्यातील त्यांची कामगिरी महिलांना ललामभूत ठरणारीच आहे.

एकशे अकरा वर्षापूर्वी म्हणजेच १८ ऑगस्ट १९०७ या दिवशी,स्वतंत्र भारताचा ध्वज एका आंन्तराष्ट्रीय मेळाव्यात फडकीवणाऱ्या धाडसी मॅडम कामांचे नाव भारताच्या स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक लढ्यात ठळकपणे लिहिले गेले आहेच.परंतु जगभरातही त्यांचे नांव आदराने घेतले जात असे.त्याचे कारण,हिंदुस्थानातल्या ब्रिटीशांच्या दडपशाहीचा अर्थ व स्वरूप,त्यांनी अमेरिका,फ्रान्स व इंग्लंड मध्ये जाऊन तिथल्या जनते समोर उलगडून दाखविला .हिंदुस्थानाबद्दल व स्वातंत्र्य मिळण्याबाबत तिथल्या जनतेला आपल्या भाषणातून,वृत्तपत्रीय लेखनातून,प्रसिद्धी पत्रकातून,बैठकांमधील चर्चातून जनमत वळवण्याचा प्रयत्न मडॅम कामा यांनी केला.

मडॅम कामा पारशी कुटुंबातल्या.इराण देश अरबांनी जिंकल्यावर,अनेक पारशी कुटुंबे स्थलांतरित होऊन,चीन व हिंदुस्थानात येऊन राहिले.जे हिंदुस्थानातल्या ठाणे येथील  बंदरात उतरले ते सर्व पारशी कुटुंब मुंबईत स्थाईक झाले.त्यापैकीच एका श्रीमंत पारशी कुटुंबात भिकाजींचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ या दिवशी झाला.त्यांचे नाव भिकाजी सोराबजी पटेल.आई जायजी आणि वडील सोराबजी फ्रामजी पटेल,एक प्रतिष्ठीत व श्रीमंत व्यापारी होते.
गोऱ्यापान वर्णाची,गुटगुटीत व अवखळ भिकू म्हणजे वडिलांची लाडकी मुलगी, मोठी झाल्यावर मुंबईच्या अलेक्झांड्रा नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इंस्टिट्युशन या शाळेत शिक्षण घेऊ लागली.

भिकू ,उत्तम घोड्यांच्या विक्टोरिया गाडीतून डौलाने शाळेत जात असे.त्या वेळच्या परिस्थितीत पारशी समाजातही मुलींनी शाळेत गेल्यास खळबळ माजत असे. परंतु दादाभाई नौरोजी व इतरांच्या पुढाकाराने मुलींना शाळेत घालण्याच्या प्रथेला पटेलांचीही मान्यता होती. पण भिकू महाविद्यालयात मात्र गेल्या नाहीत.तरीही लेखन-वाचन सुरूच ठेवले.गुजराथी,हिंदी,इंग्रजी,मराठी या भाषा उत्तम येत होत्या त्यांना.उत्तम संभाषणा बरोबरच खेळ व क्रिकेट यातही त्या प्रवीण होत्या.लग्नाचे वय झालेल्या भिकाजीचे लग्न,के.आर.कामा या प्राच्यविद्या पंडितांचे चिरंजीव रुस्तम खुर्शीद कामा यांच्याशी,३ ऑगस्ट १८८५ ला मोठ्या थाटामाटात पार पडले.भिकू पटेल आता भिकाजी रुस्तुम कामा झाल्या.रुस्तुम प्रसिध्द सोलीसीटर होते.

परंतु लग्नाआधी या बुद्धिमान आणि संवेदनशील भिकाजीवर तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा खोलवर प्रभाव पडत होता. दिवसेंदिवस देशभक्तीची ओढ आकर्षित करीत होती.सामान्यपणे लग्नानंतर तिचे मन बदलेल असे कुटुंबियांना वाटले.शिवाय रुस्तुम कामा इंग्रजांचे कट्टर भोक्ते.स्वातंत्र्य लढा सुरु होण्याआधी जी सौम्य आंदोलने होत होती,त्यात व समाजसेवेत पतीच्या विरोधाला न जुमानता काम करत.

मुंबईतल्या एका कॉंग्रेस अधिवेशनाला भिकाजी हजर राहिल्या आणि त्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली.तेंव्हापासून त्या कडव्या देशभक्त झाल्या. पती-पत्नीच्या राजकीय मतभेदांमुळे नाईलाजाने दोघांमध्ये फारकत झाली.देशाचा संसार तोच आपला संसार अशी मनाशी खुणगाठ बांधून मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले.


मुंबईला १८९६ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीच्या वेळी,पारसी फिवर हॉस्पिटल निघाले.त्यात भिकाजी कामांसह  अनेक पारशी महिला मानद परिचारिका म्हणून काम करीत.१८९९ मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा प्लेगच्या साथीने डोके वर काढले.यावेळी मात्र सेवा सुश्रुषा करता करता खुद्द भिकाजी कामांनाच प्लेगची लागण झाली.त्यांची प्रकृती खालावली.वैद्यकीय सल्ल्यानुसार,हवापालट आणि प्रकृती सुधारण्यासाठी त्या युरोप मध्ये गेल्या.जर्मनी, फ्रान्स, स्कॉटलंड इथे एक एक वर्ष राहिल्या.सुधारणा झाल्यावर १९०६ मध्ये त्या लंडन मध्ये आल्या.तब्बल चौतीस वर्ष त्या विलायतेत राहिल्या.त्यांचे घर म्हणजे स्वातंत्र्य समरातील क्रांतीविरांसाठीचेच घर झाले होते.मातृभूमीच्या सेवेचा निर्धार त्यांना गप्प बसू देईना.लंडनला दादाभाई नौरोजींनी लंडन इंडिया सोसायटी काढून ब्रिटीशांच्या हिंदुस्थानातील शोषणावर हल्ले चढवीत.भिकाजी कामा ही त्यांच्यात सहभागी होऊन काम करू लागल्या.ब्रिटीश संसदेवर निवडून येण्यासाठीभिकाजींनी नौरोजीना खूप मदत केली.याचं वेळी,शामजी कृष्ण वर्मा यांच्या आंदोलनाने जहाल रूप धारण केले होते.

दादाभाई नौरोजी व शामजी कृष्ण वर्मा ,ब्रिटिशांना सनदशीर मार्गाने हिंदुस्थानातून घालवून देता येईल असा विश्वास व्यक्त करीत आणि त्याच अनुरोधाने भिकाजी कामा खणखणीत आवाजात उत्तम अशा इंग्रजी भाषेतून लंडन च्या हाईड पार्क वरील सभेत, स्वातंत्र्यावरील भाषणे करीत.ही भाषणे आणि स्वातंत्र्याची घोषणा त्या काळात क्रांतिकारकच होती.त्यांच्या या घोषणांनी साम्राज्यवादी इंग्रजही हादरले होते.लंडन च्या हाय गेट भागात हिंदी तरुणांना सहाय्य करण्यासाठी इंडिया हाउस ही वास्तू उभी राहिली.त्याचे उद्घाटन हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे जहाल पुरस्कर्ते एच.एम.हिंडमन यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या सारख्या इतर जहाल इंग्रजांशी भिकाजी कामांची चांगली मैत्री झाली.दादाभाई नौरोजी,अॅनी बेझंट  यांच्या प्रमाणेच रशियन,फ्रेंच व जर्मन समाजवाद्यांशी भिकाजींचे चांगले मैत्रीचे संबंध होते.त्यामुळे रशियन क्रांतिकारकांशीही त्यांच्या ओळखी झाल्या.हिंडमन यांच्या ओळखीतूनही खूप जणांशी ओळखी झाल्या. या सर्वानांच भिकाजिंबद्दल अतिशय आदर व आपुलकी वाटत असे.या आपुलकी मुळेच मिसेस कामा ऐवजी त्या मॅडम कामा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

या काळात उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा ते निमित्त सांगून,हिंदुस्थानी युवक इंग्लंड ला जात असत. मॅडम कामा त्यांच्या संपर्कात राहून त्यांना हवी ती मदत करत असत. ‘ब्रिटीश पारतंत्र्यातून भारताची संपूर्ण मुक्तता हे साध्य व सशस्त्र क्रांती हे साधन’ हे ब्रीदवाक्य असणारी ‘अभिनव भारत’ ही संस्था स्वातंत्रवीर सावरकरांनी १९०४ मध्ये स्थापन  केली होती. बॅरिस्टर च्या उच्च शिक्षणासाठी सावरकर इंग्लंड ला गेल्यावर अभिनव भारतला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. लंडनला मॅडम कामाही त्याच्या सदस्य बनून काम करू लागल्या. या गुप्त शाखेचे सदस्य वाढविण्यासाठी तिचीच प्रकट संस्था म्हणून, फ्री इंडिया सोसायटीची स्थापना होऊन,इंडिया हाउस मध्ये बैठका सुरु झाल्या.मदनलाल धिंग्रा,ग्यानचंद वर्मा,वामनराव फडके,अय्यर,लाल हरदयाळ,वीरेंद्र चट्टोपाध्याय ,निरंजन पाल हे लंडन मध्ये वास्तव्यास असलेले बुद्धिवान तरुणही सावरकरांना सामिल झाले.

सावरकरांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची व क्रांतीप्रणालीची छाप पडून मॅडम कामाही त्या विचाराने भारावून गेल्या.त्या सशस्त्र क्रांतीवादी बनल्यामुळे त्यांच्या जहाल वक्तव्याला एक वेगळेच तेज चढले.या क्रांतिकारक कारवायांमुळे ब्रिटीश सरकारने त्यांना इंग्लंड सोडून जावे ,अन्यथा तुमच्या विरोधी कारवाई करावी लागेल अशी सूचना केली.मॅडम कामांनी विचार केला की,आपले स्वातंत्र्य गमावण्यापेक्षा लंडन सोडून जाणे केंव्हाही चांगले आणि त्या पॅरीसला बॅरिस्टर राणा यांच्याकडे जाऊन १९०७ मध्ये तिथेच स्थायिक झाल्या. 

पॅरीस ला आल्यावर मॅडम कामांनी अभिनव भारताच्या नावावरूनच न्यू इंडिया सोसायटीची स्थापना केली.वेगवेगळ्या हिंदी राष्ट्रवाद्यांमध्ये ऐक्य निर्माण करणे या उद्देशाने स्थापन केलेल्या या संस्थेचे अध्यक्ष के.आर.कोतवाल होते.हिंदुस्थानातील ब्रिटीशांची वाढलेली दडपशाही बघून आता यापुढे सशस्त्र लढ्यानेच स्वातंत्र्य मिळू शकेल याची त्यांना मनोमन खात्री पटली.आणि सावरकरांच्या लंडन मध्ये चाललेल्या लढ्याच्या परीस मधील त्या प्रमुख झाल्या.मॅडम कामा रशियन मार्गाचा पुरस्कार करू लागल्या.प्रत्येक माणसाला याचे महत्त्व पटवून द्यायला हवे असे त्यांना वाटत होते.

गांधीजी दक्षिण आफ्रिकेतील हिंदी जनतेची गाऱ्हाणी घेऊन १९०६ मध्ये लंडनला आले, तेंव्हाही मॅडम  कामांनी आपले विचार त्यांच्या समोर आवेशाने मांडले होते. बंगालच्या फाळणी नंतर लाला लजपत राय ,सरदार अजितसिंग यांना अटक करून स्थानबद्ध करून ठेवले होते. या पार्श्वभूमीवर बॅरीस्टर राणां नी पॅरीस येथे जाहीर सभा बोलावली.यात मॅडम कामानी मुख्य भाषण केले. त्या म्हणाल्या, “ हिंदुस्थानच्या स्त्री पुरुषांनो ,अशा पारदास्यात  जगण्यापेक्षा आपण सर्वच्या सर्व लोक नष्ट होऊन गेलो तरी चांगले असा निर्धार तुम्ही करा”.
शूर राजपुतांनो, शिखांनो,पठाणांनो,गुराख्यांनो,देशभक्त मराठ्यांनो,आणि बंगाल्यांनो,उद्योगी पारश्यांनो,मुसलमानांनो आणि सौम्य वृत्तीच्या जैनांनो,धीम्या वृत्तीच्या हिंदुनो,तुम्ही आपल्या स्वताच्या .परंपरांप्रमाणे जीवन का जगात नाहीत? चला पुढे व्हा.स्वराज्यातील स्वातंत्र्य,समता यांची प्रतिष्ठापना करा.तुमच्या स्वतासाठी आणि मुलाबाळांसाठी पुढे या.मानवी हक्कांची लढाई लढा.पौर्वात्य लोक  पाश्चीमात्यांना काही नवे शिकवू शकतात हे जगाला दाखवून द्या.

लाला लजपत राय यांना अटक झाली.या क्रूर अन्यायाविरुध्द आपला संताप अनावर झाला असताना ,ही गोष्ट कुणीही निमुटपणे सहन करू शकणार नाही.देशभक्त लाल लजपत राय यांना बंदिवसाच्या वाईट वातावरणात राहू देणे योग्य नाही.परकीय सत्ताधाऱ्यांच्या  आश्वासनानंतर तुम्ही विसंबून राहू नका.कारण ते हिंदुस्थानात आहेत.ते तुम्हांला सहाय्य करण्यासाठी नव्हे तर,तुमचे शोषण करण्यासाठी आहेत याची जाणीव ठेवा.आपला देश तत्काळ स्वतंत्र व्हायला हवा असेल तर आपण सर्वांनी एकी राखायला हवी.लाल लजपत राय यांचे शौर्य डोळ्यासमोर सतत ठेवले तर,सर्वाना सीमापार करण्यापूर्वी किंवा तुरुंगात टाकण्यापूर्वी सरकारने कितीही किल्ले आणि तुरुंग बांधले तरी ते अपुरेच पडतील.जो आपले स्वातंत्र्य गमावतो तो आपले शीलच गमावून बसतो.हे विसरून चालणार नाही.
मित्रहो,स्वाभिमान दाखवावा.वंदेमातरम मंत्राच्या स्फूर्तीने हिंदी लोकांनी एकत्र येऊन जागृत राहायला हवं.” कामांच्या भाषणा नंतर हे पत्रक काढून ते इंडिअन सोशालीजीस्ट या अंकात प्रसिद्ध करण्यासाठी शामजी कृष्ण वर्मांकडे लंडन ला पाठवले .ते जून १९०७ च्या अंकात जसेच्या तसे छापून ,तो अंक प्रसिध्द होण्यापूर्वीच शामजी वर्मा अटक टाळण्यासाठी परीस ला राहायला आले आणि स्वातंत्र्य लढ्यातील जहाल विचारांच्या कार्यकर्त्या म्हणून कामा प्रसिध्द झाल्या.येथील रशियन क्रांतीकारकांनाही कामांविषयी अधिक आस्था वाटू लागली.

१८ ऑगस्ट १९०७ ला जर्मनीतील स्टुटगार्ड येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस चे अधिवेशन भरविण्यात आले होते.याचे अध्यक्ष जर्मनीचेच पॉल सिंगेर होते.जगातल्या पंचवीस देशांतील एक हजार प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.पूर्व परीचायामुळे जां जोरे यांनी मॅडम कामांना ही येण्याचे आमंत्रण दिले होते.सावरकरांनी एक ठराव लिहून तो मड म कामांनी परिषदेत मांडावा असे ठरले.परिषदेत इतर सर्व राष्ट्रांचे ध्वज येणार .पण,हिंदू स्वातंत्र्य वाद्यांना त्यांचा ध्वज च नाही.हे क्रांतिकारकांच्या लक्षात आले.सावरकरांनी ध्वजाची कल्पना सर्वांसमोर मांडली.मग मॅडम कामांनी उंची रेशमी कापड विकत आणले.हिरवा,केशरी व तांबडा असे तीन रंग ,वरील बाजूस ‘आठ प्रांतांची आठ कमळे’ ,मधल्या पट्ट्यावर ‘वंदेमातरम’ हा मंत्र विणलेला.तर खालच्या पट्टीवर ‘सूर्य आणि चंद्र’ यांच्या आकृत्या असा स्वताच्या हाताने विणून हा ध्वज तयार केला.अशा प्रकारे हिंदुस्थानच्या पहिल्या राष्ट्र ध्वजाचा जन्मच लंडन मध्ये झाला.

ध्वज एकच असला तर परिषदेत जाईपर्यंत वाटेत काही अडचण येऊ नये या हेतूने कामांनी असे तीन ध्वज बनविले.त्यातला एक ध्वज आपल्या पोलक्यात लपवून पॅरीस ला नेला. दुसरे दोन ध्वज बॅरीस्टर राणांनी बाहेर नेले. बॅरीस्टर राणांबरोबर मडॅम कामा स्टुटगार्ड ला रवाना झाल्या.परिषदेत मॅडम कामा इंग्लंड च्या प्रतिनिधी म्हणून गेल्या असल्या तरी त्यांच्या ठराव मांडण्यावर आक्षेप घेऊन तो ठराव संमत होणार नाही पण, वाचून दाखविता येईल असे सांगितले.

व्याख्यान देण्यासाठी कामा व्यासपीठावर उभ्या राहिल्या.प्रास्ताविका नंतर शांतपणे त्यांनी ठराव वाचून दाखविला आणि आपल्या पोलक्यात दडवून ठेवलेला तिरंगी ध्वज मोठ्या कौशल्याने व नाट्यमयरित्या परिषदेत फडकविला.परिषदेतले सर्व उपस्थित चक्रावून गेले.तिरंगा फडकवून त्या खणखणीत व धीरगंभीर आवाजात म्हणाल्या, “This is the flag of Indian Independence .Behold it is boon. it is already sanctified by the blood of the martyred Indian youths! I call upon you, gentlemen! To rise and salute this flag of new India of Indian indepedance.”

“हा पहा हा हिंदू स्वातंत्र्याचा ध्वज आहे. आज याचा जन्म झालाय.हिंदुस्थानच्या तरुण हुतात्म्यांच्या रक्ताने तो आधीच पावन झालेला आहे. नागरिकहो उठा आणि या अभिनव भारताच्या, या हिंदवी स्वातंत्र्याच्या ध्वजाला प्रणाम करा”.या त्यांच्या स्फूर्तीदायक आवेशाने सर्व प्रतिनिधी भारावून गेले.आणि या ध्वजाला सर्वांनी उभे राहून अभिवादन केले.वातावरण एकदम भारावून गेले.या कृतीबरोबरच कामांचं खानदानी सौंदर्य ,उंची पोशाख,असे तेजस्वी व्यक्तिमत्त्व बघून सभागृहात जो तो म्हणू लागला, “She is an Indian Princess” .

कामांनी ध्वज फडकविल्यानंतर त्यावरील रंग व चिन्हांचा अर्थ सर्वाना समजावून सांगितला आणि स्वतंत्र हिंदुस्थानचा पहिला ध्वज, युरोपात फडकविणाऱ्या मॅडम कामा पहिल्या वीरांगना ठरल्या.कामांनी बनवलेल्या तिरंग्यात काही बदल करून आजचा राष्ट्र ध्वज बनविण्यात आलाआहे.प्धाच्या काळात परीस मध्ये सर्व हिंदी क्रांतिकारक एकत्र जमले कि,मॅडम  कामांच्या टेबलावर हा ध्वज दिमाखात उभा असे.कामांनी या ध्वजाचे बज व पदक ही बनवून घेतले होते.हे पदक त्या स्वतः पोलक्यावर लावीत असत.या लढ्याचा कामांनी अमेरिकेत जाऊन प्रचार केला.याचं वेळी लंडन येथे इंडिया हाउस मध्ये १८५७ च्या हुतात्त्म्यांच्या स्मरणार्थ १० मे १९०८ ला भव्य स्मृती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.अमेरिकेतून कामा नुकत्याच परीस ला पोहोचल्यामुळे त्या या समारंभाला उपस्थित राहू शकणार नव्हत्या,म्हणून त्यांनी बॅरीस्टर रानांच्या बरोबर ७५ रुपयांची देणगी व विशेष संदेशही पाठविला.ही देणगी राणानी सभेत जाहीर केली तेंव्हा टाळ्यांचा मोठा गजर झाला.तसेच त्यांचा संदेश वाचून दाखवण्यात आल्यानंतर देशभक्तांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

१९०८ मध्ये खुदिराम बोसांना मुझफ्फुरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.त्यावेळी देशभर शोकसभा घेण्यात आल्या.कॅक्सटन च्या हॉल मध्ये झालेल्या भाषणाच्या वेळी,मॅडम कामांनी ध्वज फडकविला आणि त्या म्हणाल्या, “याच ध्वजासाठी खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी देह ठेवले”. हे ऐकताच सर्व सभा उठून उभी राहिली.आणि हुतात्म्यांना मानवंदना दिली.वंदेमातरम चा जयघोष झाला.या भारावलेल्या वातावरणात कामांनी आवेशाने श्रोत्यांना विचारले, “तुम्ही काय आता स्वस्थ बसून स्वातंत्र्यासाठी स्त्रियांनीच पहिला प्रहर करावा म्हणून वाट पाहत बसणार आहात का?आणि देशद्रोह्यांना व रानटी लोकांना आपल्यावर राज्य करू देणार आहात काय ?.या भाषणाच्या प्रती लंडनहून हिंदुस्थानात टपालाने गुप्तपणे पाठविण्यात आल्या होत्या.
सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक १९०८ मध्ये मराठीत लिहून पुरे केले.त्याचे हस्तलिखित प्रसिध्द करण्याचे बरेच प्रयत्न झाले.इंग्रजांविरुध्द ते असल्याने कोणीच मुद्रक छपाई साठी तयार होईनात.त्यामुळे बाबाराव सावरकरांनी ते नाशिकहून पुन्हा सावरकरांना पाठवून दिले.शेवटी त्याचे इंग्रजीत भाषांतर करून युरोप मध्ये कुठेतरी प्रसिध्द करण्याचे ठरविले.

सावरकरांचे सहकारी वामनराव फडके व हरिश्चंद्र कोरेगावकर यांनी त्याचे भाषांतर केले. युरोप मधेही मुद्रक तयार होईनात.मॅडम कामांच्या महत्प्रयासानंतर  ‘रॉटरडॅम  शे आर्ट अँड बुक प्रिंटींग कंपनी हरिंग्वालिएट’ या मुद्रणालयात हॉलंड मध्ये ते गुप्तपणे छापले.

सरकारला सुगावा लागू न देता या पुस्तकाच्या विक्रीची व वितरणाची व्यवस्था कामांनी अगदी व्यवस्थित पणे केली. पुस्तकाचे प्राप्तीस्थळ म्हणून स्वतःचा पत्ता, ‘मिसेस बी.आर.कामा,पब्लिकेशन कमिटी, ७४९ थर्ड अव्येन्यू,न्यूयॉर्क’. असा देऊन वाचकांना ते नीट मिळेल याची कौशल्याने योजना आखली.निरनिराळ्या देशांत हिंदी तरुणांनी याच्या प्रति मागवून घेतल्या.हिंदुस्थानात सुद्धा कित्येक वेळी कामानीच चापून घेतलेल्या बेवर्ले कादंबरीच्या किंवा पिक् विक् पेपर्स च्या खोट्या वेष्टनातून पाठवलेल्या प्रती सुरक्षितपणे टपालान मिळत असत.असा हा क्रांतिकारक ग्रंथ आपल्या लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी मॅडम कामांनी अतोनात कष्ट घेतले.अनेक क्लृप्त्या लढविल्या.
   
हिंदुस्थानात इंग्रजांचे दडपशाहीचे नवेनवे अविष्कार घडतच होते. १९०९ मध्ये बाबाराव सावरकरांनी राजद्रोही कविता प्रसिध्द केल्या म्हणून त्यांना जन्म ठेपेची शिक्षा दिली गेली.त्याला उत्तर म्हणून मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीचा लंडन मधेच गोळ्या घालून वध केला. शामजी कृष्ण वर्मांनाही यात आरोपी करावं अशी मागणी वृत्तपत्रांनी केली. या पार्श्व भूमीवर मॅडम कामा जराही  विचलित झाल्या नाही. या प्रकरण नंतर लंडन मधील इंडिया हाउस बंद करण्यात आले.हिंदुस्थानाबाहेर राहूनच स्वातंत्र्याचा लढा चालू ठेवावा या उद्देशाने लाल हरदयाळ पॅरीस ला परत आले.

मॅडम कामांनी १० सप्टेंबर १९०९ ला हरदयाळांसाठी  ‘वंदेमातरम’ हे पत्र सुरु केलं.भारतीय स्वातंत्र्याच्या या मासिक मुखपत्रासाठी सर्व आर्थिक बोजा कामांनी स्वतः उचलला होता. हे मुखपत्र स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा येथून प्रसिध्द होत असे.यातील सर्व लिखाण कामा स्वतः संपादित करत असत.याची वितरण व्यवस्थाही कुशलपणे त्यांनी केली होती. याचा पुरावा ब्रिटीश सरकारला शोधूनही सापडला नव्हता.

कामांनी आता वीरेंद्र चट्टोपाध्याय यांच्यासाठी ,मदनलाल धिंग्रा यांच्या स्मरणार्थ मदन तलवार हे पत्रही सुरु केले.याचा पहिला अंक १ नोहेंबर १९०९ ला प्रसिध्द झाला. याच सुमारास स्वातंत्रवीर सावरकर दगदगीमुळे आजारी पडले.इकडे हिंदुस्थानात अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला. या असंतोषाचे मूळ सावरकरच आहेत असे उघडपणे इंग्रजी पत्रे म्हणू लागली.सावरकरांनी फ्रान्स ला जावे असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सुचविले.सावरकर पॅरीसला आले. आता राष्ट्रीय प्रयत्नांचे केंद्र परीस झाले होते.आजारी असलेल्या सावरकरांना मॅडम कामांनी स्वताच्या घरी ठेऊन त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली.सावरकरांच्या अटकेची शक्यता वाढली होती.अशा परिस्थितीत त्यांनी लंडन ला जाऊ नये म्हणून मड म कामांनी त्यांना सांगितले पण ते लंडनला रवाना झाले आणि मॅडम कामांची भीती खरी ठरली.लंडनला पोहोचताच सावरकरांना अटक करण्यात आली.याचा कामांना वज्र प्रहारासारखा धक्का बसला.सावरकरांना सोडविण्यासाठी त्यांनी आकाशपाताळ एक केले.या अवैध अटकेसाठी त्या सतत तीन महिने लढल्या.मार्सेलीसच्या समुद्रात मारलेल्या सावरकरांच्या जगप्रसिध्द उडी नंतर त्यांना पुन्हा झालेली अटक व घडलेल्या घटना यामुळे सावरकरांची सुटका हेच ध्येय ठेवून कामा धडपडत होत्या.सावरकरांविषयी विविध वृत्त पत्रातून माहिती लिहून जनमत तयार करीत होत्या.



मॅडम कामा चतुरस्त्र क्रांतिकारक होत्या.त्यांची देशभक्ती त्यांच्या कुटुंबातील स्वाभिमानी व्यक्तीतही फोफावली होती.मुंबईच्या इतर पारशी महिलाही कामांच्या क्रांती प्रणालीमुळे भरल्या गेल्या होत्या.
बाबाराव सावरकर तुरुंगात गेल्यानंतर कुटुंबाची वाताहत झाली.कामांना याची कल्पना होती.त्या बाबारावांच्या पत्नी येसूवहिनी यांना मदत म्हणून दर महिन्याला ३० रुपये पाठवीत असत.त्यांची वेळो वेळी विचारपूस करून धीर देत असत. हा सगळा वृत्तांत अंदमानातल्या सावरकरांना धाकट्या भावाकडून पत्रातून कळत असे. ते वाचून कामांविषयी अधिकच जिव्हाळा वाटू लागे.स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे बंधू डॉ सावरकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात, “मी इकडे आल्यापासून मॅडम कामा या तुला जणू दुसऱ्या आईच होत आलेल्या आहेत. आणि उदात्तपणे व एकाग्र चित्ताने आपल्या आयुष्यातील अत्यंत संकटमय काळात आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.फ्रान्स वर जर्मनीची स्वारी झाल्यानंतर तुला मॅडम कामांचे पत्राद्वारे वर्तमान कळणार नाही. अशी मला खूप भीती वाटत होती.पण या जागतिक गोंधळाच्या परिस्थितीतही त्यांना तुझी आठवण होतेच आणि त्या तुला नियमितपणे पत्र पाठवतात,हे  निश्चितपणे कळल्यावर मला फार आनंद झाला.अशा विश्वासपूर्ण उदात्त आणि प्रेमळ हाताच्या एका स्पर्शानेही मानवते वरील विश्वास आपल्या अंतकरणात पुन्हा जिवंत होतो.त्यांच्या या आस्थेला मी किती मौल्यवान समजतो हे मला त्यांना सांगता येत नाही ही शोचनीय गोष्ट आहे. तरीही प्राप्त परिस्थितीत मॅडम कामांना माझी ही वाहावा आणि आदराची भावना आपल्या नातेवाईकांपैकी कोणालाही कळविण्याच्या आधी कळव.कारण ते आपल्यासाठी काही करतात त्यात नवल ते काय?पण त्या करतात आणि इतके करतात हेच खरे नवलकारक आहे”.

अंदमानातून सावरकरांना वर्षातून एकदाच कुटुंबाला पत्र पाठवता येत असे.त्या प्रत्येक पत्रात ते कामांची चौकशी करत असत. डॉ सावरकर हा निरोप पत्राने, कामांना पोहोचवत असत. डॉ सावरकर तर कामांना मदर ऑफ दि रेव्होल्युशनरी पार्टी  म्हणत.अशा प्रकारे स्वातंत्रवीर सावरकरांच्या क्रांतीजीवनात मॅडम कामांच खूप आधार होता.
१९१७ मध्ये रशियन क्रांती झाली.एव्हाना सावरकर आणि मडम कामांचे नांव युरोपभर गाजले होतेच.रशियाचा सर्वाधिकारी असलेला खुद्द लेनिन सुद्धा मॅडम कामांना भेटायला आला होता. त्यांनी तर रशियाला येऊन राहण्याचे आमंत्रण च दिले होते कामांना.पण ते त्यांनी नाकारले.कारण त्यांना हिंदुस्थानात मायभूमीला परत जायचे होते.

सरकारचे कामांच्या हालचालींवर बारीक लक्ष होते.त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. कामा आता वृद्धत्वामुळे आजारी झाल्या होत्या.अर्धांग वायूचा झटका येऊन गेलेला होता.आपला मृत्यू तरी हिंदुस्थानात व्हावा असे त्यांना वाटत होते.१९६५ च्या सुमारास सर कावसजी जहांगीर युरोपला गेले असताना ,कामांना भेटायला गेले.त्यांची अवस्था पाहून,कावसजींचे  मन हेलावले.त्यांनी मंत्रालयात विनंती करून कामांना हिंदुस्थानात नेण्याची परवानगी घेतली. 

'मी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राजकारणात भाग घेणार नाही' अशी हमी सरकारने त्यांच्या कडून लिहून घेतली.
आणि तेहेतीस वर्षांनी १९३५ ला मॅडम कामा हिंदुस्थानात परत आल्या. परत येताना त्यांनी या वृध्धावस्थेतही आक्षेपार्ह सामान व आपला स्वातंत्र्यध्वज  बरोबर आणला होता.कामांना पारसी हॉस्पिटल मध्येच भारती केले गेले.प्रकृतीत चढ उतार चालूच होता. डॉ.सावरकरही त्यांना येऊन भेटत असत. ११ ऑगस्ट १९३६ ला त्या अत्यवस्थ झाल्या आणि १२ ऑगस्ट १९३६ ला त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली.  

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याचे क्रांती कुंड सातासमुद्रापार अखंड धगधगत राहावे यासाठी आपल्या आयुष्याची समिधा देणाऱ्या भिकाजी कामा यांचं आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुन्हा एकदा पुण्यस्मरण.

                                                                                         

लेखन - डॉ. नयना कासखेडीकर, पुणे.