Tuesday 6 August 2019

गायक -श्रीधर फडके


एक मुलाखत---                  

बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त संगीतकार व गायक श्री श्रीधर फडके यांची मुलाखत -----
              

बाबूजीअर्थात, सुधीर फडके  हे नाव मराठी संगीतातले अजरामर असे नाव. बाबूजी यांचं जगाच्या पाठीवर हे आत्मचरित्र वाचून, तसंच त्यांच्या सहवासातून, त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या अनुभवातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख रसिक श्रोत्यांना होते. बाबूजी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. योगायोग असा की गदिमांचेही जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने बाबूजींचा वारसा जपणारे त्यांचे सुपुत्र, मराठी सुगम संगीतात आपल्या प्रतिभेने रसिकांची मने जिंकलेले,  श्रेष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांची बाबूजींच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारी मुलाखत. नव्हे, तर पुणे येथे कार्यक्रमानिमित्त आले असताना अत्यंत व्यस्त्तता असतांनाही त्यांनी बहुमूल्य वेळ दिला. त्यावेळी  त्यांच्याशी मारलेल्या या अनौपचारिक गप्पा.

श्रीधर जी :   “1942-43 च्या काळातील म्हणजे, अगदी सुरुवातीच्या काळातील परिस्थिति जगाच्या पाठीवर मध्ये बाबूजींनी  लिहिली आहे. त्यांना सर्वात पहिला चित्रपट मिळाला तो प्रभातने काढलेला हिन्दी पिक्चर गोकुळ. त्यातली गाणी फार सुंदर होती.  कहां हमारे श्याम चले....,  हे अतिशय सुंदर गीत, जी.एम. दुराणी (गुलाम मुस्तफा दुराणी) म्हणून नामवंत कलाकार होते, त्यांनी गायलंय. त्यांनी बाबूजींचं खुप कौतुक केलं. म्हणाले की, फडके साब आप इतना अच्छा गाते हो, मुझे क्युं गाने के लिये बुलाया ? जी.एम. दुराणी हे फार प्रसिद्ध व मोठे गायक, अभिनेता व संगीतकार होते त्यावेळचे".  
               
      "तुम्ही जगाच्या पाठीवर हे अभ्यासलं, तर तुम्हाला दिसेल, त्यावेळी बाबूजींच्या आयुष्याचा खूप खडतर प्रवास चालू होता. पण ते जिथे जिथे फिरले, जिथे जिथे गेले, उत्तर प्रदेशात, मध्य प्रदेशात, राजस्थान मध्ये गेले, तिथे तिथे त्यांना जे ऐकायला मिळालं, त्यातून ते समृद्ध होत गेले, शिवाय त्यांची विलक्षण प्रतिभा आणि प्रचंड बुद्धिमत्ता होती, संगीताचा आवाका मोठ्ठा होता त्यांचा, क्लासिकल उत्तम गायचे ते. ते कोल्हापूरला पाध्येबुवांकडे शिकले होते. त्यामुळे चित्रपटाचं गाणं नेमकं कसं करावं हे कौशल्य त्यांनी फार लवकर अभ्यास करून अवगत केलं. त्यामुळे कुठल्याही चित्रपटातलं त्यांचं गाणं बघा, अगदी त्यावेळेपासून ते अलीकडच्या चित्रपटापर्यन्त, वेगळं वाटत नाही . ते चित्रपटाच्या दृश्याला पोषक असतं, बाबूजींनी त्या वेळेपासून चित्रपट संगीताचा बाज बदलला. पॅटर्न बदलले. विलक्षण मोहक संगीत असे त्यांचे. मुखडा इतका आकर्षक असतो आणि अंतरेही खूप आकर्षक असत. एकातून एक असे उलगडत जातात. ते सर्व लॉजिकल असत.  हे फार महत्वाचं  आहे". 
     "संगीतकाराला सर्जनशीलताही महत्वाची आहे. या दोन्ही गोष्टी बाबूजींकडे होत्या.  कुठल्याही निर्मिती साठी प्रतिभा लागते, चाल सुचणं, काव्य समोर असताना एखाद्या कवितेला नेमकी चाल लावणं, ही फार विलक्षण गोष्ट असते. गोकुळ नंतर, वंदेमातरम  चित्रपट आला. कथा एका स्वातंत्र्यसैनिकावर होती. याची गीते गदिमांची  होती. मुख्य भूमिकेत होते पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाई. संगीत बाबूजींच होतं ,यातली किती तरी गाणी लोकप्रिय झाली. वेदमंत्राहुनी आम्हा, वंद्य वंदे मातरम ..., अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी ..,   झडल्या भेरी, झडतो डंका, पुढचे पाऊल पुढेच टाका...,  ही गाणी खूप लोकप्रिय झाली होती. देशभक्ती आणि स्वातंत्र्य या पार्श्वभूमीवर ही गाणी देशप्रेम जागविणारी होती. अजूनही वेद मंत्राहुनी आम्हा हे गाणं लोक आवडीने ऐकतात. हे बाबूजींचं यश आहे. गदिमा आणि बाबूजी यांची छान जोडी जमली होती. गदिमांच्या गाण्यांना जेंव्हा बाबूजींचं संगीत लाभायचं ना तेंव्हा ते वेगळच असायचं. इतर संगीतकारांनी पण छान चाली दिल्यात. पण गदिमा आणि बाबूजी म्हणजे एक अद्वैत होतं. जसे त्यांचे शब्द तशीच बाबूजींची चाल यायची. जसेच्या तसे भाव यायचे त्यात. त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे गीतरामायण’. गदिमांनी रामायणात जशा व्यक्तिरेखा लिहिल्या आहेत, तशाच बाबूजींच्या चाली आल्या आहेत”.
            
     बाबूजींच्या मनातल्या, श्रीरामाच्या प्रतिमेबद्दल श्रीधरजी सांगतात, “बाबूजी, रामाला, स्वत:च्या करणीने देवत्वाला पोहोचलेला माणूस, असे मानायचे. राम, रामचंद्र हा माणूसच ना? हा मानवावतार. पण स्वत:च्या कर्तृत्वाने ते पोहोचले ना? हे बाबूजींना फार अप्रूप होतं. बाबूजी तसे धार्मिक नव्हते. हिंदुत्व मानायचे, पण अंधश्रद्धा विरोधी होते. त्यांची श्रद्धास्थाने होतीच. शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ हेडगेवार  ही त्यांची श्रद्धास्थाने होती. ते रामजन्मभूमीच्या  सत्याग्रहातले पहिले अनुयायी होते. या रामानेच आपल्या देशाला एकत्र केलं अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच रामायण त्यांच्या हृदयातून आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार, विनोबा भावे, गोळवलकर गुरुजी, डॉ राजेंद्र प्रसाद, या सर्वांनी गीत रामायण ऐकलं. यशवंतराव चव्हाणांना तर गीतरामायण तोंडपाठ होतं”.       
           
       गायक म्हणून बाबूजींची वैशिष्ठ्य सांगताना ते म्हणाले, “बाबूजींचे चित्रपटातले गाणे चालू झाल्यानंतर त्यांनी त्यांचा पहिला अनुभव सांगितला आहे, जेंव्हा बाबूजी कोल्हापूरला होते तेंव्हा एचएमव्ही कंपनी नवीन आर्टिस्ट शोधत आले होते, वसंतराव कामेरकर हे त्यांचे नवे अधिकारी होते. माधवराव माडगावकर रेकॉर्डिस्ट होते. बाबूजींना त्यांनी गाणं म्हणायला सांगितलं. बाबूजी गायला लागले, जोरात गायलं तर, रेकॉर्डिंग होतांना त्यावर खड्डा पडायचा, तेंव्हा रेकॉर्ड मेणाच्या असायच्या. 7, 8 रेकॉर्ड खराब झाल्या. काय करावं हे एचएमव्ही च्या लोकांना कळेना, शेवटी माधवराव माडगावकरांनी बाबूजींना समजावून सांगितलं की, तुम्ही चांगलं गाता परंतु कंट्रोल्ड व्हॉईस पाहिजे. कुठला शब्द दाबून म्हणायाचा हे व्हॉईस कल्चर समजून सांगीतले. बाबूजींनी त्याचा खूप अभ्यास केला. बाबूजींनी माडगावकरांना फार मोठ श्रेय दिलंय आपल्या गायकीसाठी.  विशेषत: रेकॉर्डिंग साठी गाणं कसं गावं याबद्दल. बाबूजींनी 1948 पासून ते1993 / 94, पर्यन्त जी चित्रपटगीतं गायली आहेत ना, ती त्या त्या नटाना, नायकांना, मग राजा परांजपे असोत, राजा गोसावी, असोत, सूर्यकांत असोत, रमेश देव, अरुण सरनाईक असोत. ती त्या त्या पात्रांना योग्य वाटतात. चित्रपट पाहताना ती व्यक्तिरेखाच गीत गातेय असं प्रेक्षकांना वाटतं. तसा आवाज होता बाबूजींचा. विलक्षण गोड, माधुर्य, दुसरं म्हणजे भाव व्यक्त करणं. भावनाशील गाणं म्हणणं फार अवघड असतं. मी आता म्हंटलं की भाव ओता, तर तसं होणार नाही, ते इथून हृदयातून आलं पाहिजे. त्या गाण्यात तो भाव दिसला पाहिजे”.    
       
    पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावर गीत रामायणाचे पहिले गीत 1 एप्रिल 1955 ला  स्वयें श्री राम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती. प्रसारित झालं. ही गीतांची मालिका 19 एप्रिल 1956 पर्यन्त रामनवमी पर्यन्त वर्षभर चालू होती. वाल्मिकिंच रामायण जसं अजरामर झालं आहे तेव्हढच गदिमां नी रचलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत रामायण चिरंजीव झालं आहे. 
          
   गदिमांची रससिद्ध प्रज्ञा आणि बाबूजींची सांगीतिक प्रतिभा यांचा अजोड आविष्कार म्हणजे गीतरामायण. या गीत रामायणाने निर्मितीनंतर गेली पासष्ट वर्षे मराठी मनावर अधिराज्य केलंय. गदिमा आणि बाबूजी यांनी श्रीरामाचे मूर्तीमंत चित्र या कथेतून उभं केलंय. कवीच्या शब्दातील भावना बाबूजींनी जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आजही लोकप्रिय असलेल्या बाबूजींच्या गीतरामायणा बद्दल श्रीधर फडके यांनी समाधान व्यक्त केले आणि गीतरामायण बाबूजींसारखं दुसरं कोणीच म्हणू शकत नाही असा दृढ विश्वास ही व्यक्त केला. ते म्हणतात, “ते इतक विलक्षण आहे, की त्यातलं वर्णन गाण्यातून व्यक्त करताना त्यातले भाव  तसेच व्यक्त करावे लागतात. शूर्पणखेचं गाणं असेल, शूर्पणखा रावणाकडे गेल्यानंतरच वर्णन, तिचे नाक कापल्यानंतरचे वर्णन, तर राम किती सुंदर होता हे तिच्या तोंडून निघलेल वर्णन हे गदिमांनी एका अंतर्‍यात आणलय.  कुंभकर्णाचं गाणं आहे, योग्य समयी जागविले ... , नंतर प्रभू रामचंद्रांची गाणी, सीतेच गाणं, लक्ष्मण, भरत, कौसल्या या सगळ्या व्यक्तिरेखांची गाणी तशीच्या तशी  भावपूर्ण  मांडल्यामुळे त्या प्रसंगाची चित्रे डोळ्यासमोर उभी राहतात. म्हणून ती लोकांना भावली आहेत. गदिमांचं वैशिष्ठ्य काय की शब्दात ते चित्र दिसायचे आणि बाबूजींचं वैशिष्ठ्य म्हणजे ते चित्र स्वरातून दिसायचे. हे महत्वाच आहे. मी गीत रामायण चालू ठेवलं आहे ते टिकण्यासाठीच, मी माझ्या परीने ते म्हणण्याचा प्रयत्न करतो. पण बाबूजींसारखं ते कोणीच म्हणू शकत नाहीत”.
           
    गीत रामायणातली 56 गीते ही भूप. मिश्र काफी, जोगिया, भैरवी, पिलु, शंकरा, केदार, मारू बिहाग, मधुवंती तोडी, सारंग, मालकंस अशा विविध रागांवर आधारित आहेत. ही गीते इतकी लोकप्रिय झाली की, त्याची आजपर्यंत हिन्दी, गुजराती, कानडी, बंगाली, आसामी, तेलगू, मल्याळी, संस्कृत, कोंकणी या भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. विशेष म्हणजे ही त्या भाषात सुद्धा बाबूजींनी दिलेल्या मूळ चालींवरच गायली जातात. यावरून गीत रामायणाची प्रादेशिक भाषातही असलेली लोकप्रियता लक्षात येते.
          
     भविष्यात गीतरामायण टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगताना श्रीधर फडके म्हणाले, “ गीत रामायण आतापर्यंत टिकल आहे, ते टिकणारच आहे, पण पुढच्या पिढीने ते टिकवण्यासाठी त्याचा त्यांनी नीट अभ्यास करावा. काही जण गीतरामायण गातात. अवश्य गावं. कौतुकच आहे. पण ते पूर्ण गाणं गात नाहीत. चार अंतरे नका म्हणू. जेंव्हा गदिमांनी तो प्रसंग रामायणातून, गीतात उभा केलेला आहे, त्याचे  दहा अंतरे असतील,  तर ते  दहाही अंतरे म्हटलेच पाहिजेत. त्याशिवाय ती कथा, तो संपूर्ण प्रसंग आणि वातावरण निर्मिती होणारच नाही . गीताचा अर्थ लोकांना कळणार नाही. आणि अजून एक, एखादा भावगीत किंवा भक्तीगीताचा कार्यक्रम चालू आहे, त्यात एक रामायणातल गीत म्हणायचं. अजिबात नाही करायच. बाबूजी कधीही करायचे नाहीत असं. त्यांचा तो नियम होता आणि तो मीही पाळतो. रामायणाचा पूर्ण अर्थ कळणे आणि रामायणाचे पावित्र्य टिकवणे, हे झालच पाहिजे. त्यासाठी पूर्ण रामायण म्हटलं गेलं पाहिजे”.
              
  ‘वीर सावरकर  या महत्वाकांशी चित्रपटची निर्मिती बाबूजींनी केली. हा निर्मितीचा प्रवास आत्यंतिक खडतर झाला, संकटांनी बाबूजींची परीक्षाच पाहिली पण कोणत्याही अडचणीला न जुमानता, त्यांनी हे अडथळ्यांचे डोंगर पार केले, निर्मितीची ही एकहाती लढाई चिवटपणे लढत बाबुजी जिंकले आणि ही अप्रतिम कलाकृती रसिकांना सादर केली. बाबूजींची अतूट  श्रद्धा होती स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकर यांच्यावर....या विषयी श्रीधर म्हणतात,  “घरात ताण असायचाच ! गंभीर वातावरण होत, पण बाबुजी खंबीर होते आणि दुसरं म्हणजे आईची त्यांना संपूर्ण साथ होती, ती त्यांच्या मागे उभी होती, मला वाटतं हे महत्वाचे होते. मी नोकरीस होतो आणि मला फारसे काही करता येण्यासारखे नव्हते, पण माझी आई, पत्नी, काका, काकू, मुली सगळे त्यांच्या पाठीशी होते. त्यांच्या पाठीशी लोक ही उभे होते खंबीरपणे, त्यांचा बाबूजींवर विश्वास होता. बाबूजींवर टीकाही झाली. या कामासाठी दादरहून पार्ल्याच्या कार्यालयात ते बसने जात असत. पण एकदा प्रवासात ते पडले, त्यांना ओळखणार्‍या एक माणसाने त्यांना मदत केली पण मग ट्रस्टने ठरवले की त्यांना वाहन द्यायलाच पाहिजे. ही निर्मिती त्यांनी एका ध्येयाप्रती केली. ते अतिशय साधेपणाने, तत्वनिष्ठेने जगले.
            
   बाबूजीन्चे कुटुंबियांसाठी व्यक्तिमत्व कसे होते सांगताना श्रीधरजी म्हणतात , “बाबूजींना मी अण्णा म्हणायचो. घरात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या बद्दल भितियुक्त आदर होता मनात. त्यांच्याशी थेट बोलायची हिम्मत होत नसे. मग मध्यस्थ असायची आई. तिच्या मार्फत बाबूजींना सांगायचे. काही मुले वडीलांशी, मित्रा सारखे बोलतात वागतात, आईवडिलांविषयी सर्वांनाच प्रेम असतं, पण बाबूजींबद्दल त्यांच्या स्वभावामुळे स्वच्छता टापटीप, शिस्त, त्यांची तत्त्वे यामुळे त्यांच्याशी बोलण्याची हिम्मत व्हायची नाही. जराशी भीती वाटायची. धाक वाटायचा.
           
      स्वच्छता आणि नीटनेटकेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात भरलेला  होता. स्वच्छतेचे धडे त्यांनीच आम्हाला दिले, नीटनेटकेपणा अतिशय प्रिय, धूळ आवडत नसे, हे सगळे धडे  त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच दिले, गादी घालतांना चादरीला सुरकुत्या पडता कामा नयेत, गादीवर पाय देऊन चालायचे नाही, पाणी वाया घालवावायचे नाही, आंघोळ करणे, दात घासणे, याबाबतीत तर ते फारच जागरूक होते. साध्या साध्या  गोष्टी व्यवस्थित करण्यावर त्यांचा भर असायचा. संध्याकाळी जेवण झाल्यावर भांडी आवरणे, घासणे, लावून ठेवणे ई. साठी आईला मदत करीत. कोणी भेटायला आले तर त्यांच्यासाठी चहा करणे अशी अनेक कामे ते करीत. माझ्या मते आमच्यावर झालेले हे संस्कार होत.
          
    दुसरं म्हणजे स्वभाव निश्चयी होता. एखादे काम करायचे ठरवले की ठरविले. त्यात बदल  नाही. एखाद्या गाण्याची चाल ठरविली की त्यात बदल नसे. एखादा निर्माता किंवा दिग्दर्शकाने त्यांना एखादी चाल अशी नको, अशी हवी असे सुचविले आणि त्यांना वाटले की तो बदल आवश्यक वाटला तरच ते करीत अन्यथा तीच चाल कायम ठेवत, नि म्हणत, की तुम्ही संगीतकार बदला, पण मी चाल नाही बदलणार.  अशी गाणीच पुढे खूप लोकप्रिय झाली ...त्यांनी बालगंधर्वांच्या गायकीचा अभ्यास केला होता. पुलं नी  लिहून ठेवलंय की, गायकी आत्मसात केलेले म्हणजे सुधीर फडके...बालगंधर्व त्यांच्याकडे गायलेत ! याशिवाय हिराबाई बडोदेकर, आशाबाई (भोसले) ...गाणे बसवून घ्यायचे, जागा नि जागा घोटवून घ्यायचे...आशाबाईंनी याचा विशेष उल्लेख केला आहे.. जागा, शब्दोच्चार ...म्हणूनच तर त्यांच्या गाण्यात फडकेंचे बाबूजी दिसतात !
            
    संघ स्वयंसेवक बाबूजी कसे होते हे सांगताना, ते म्हणाले, “संघाचा स्वयंसेवक म्हणून बाबूजींचा पहिल्यापासूनच संबंध. यामुळे मा. अटलजी, मा. बाळासाहेब देवरस आदि अनेक थोर आमच्या घरी आलेले आहेत..वेळ असेल तेव्हा ते शिवाजी पार्कच्या शाखेत जात असत..उत्सवासाठी जात असत..तळजाईच्या शिबिरासाठी त्यांनी हिंदू सारा एक .. हे गीत म्हंटले होते..(प.पू. डॉक्टर हेडगेवार यांचेवरील ) लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष... तसेच चाहीये आशीष माधव (मा. श्रीगुरूजीवरील गीत) ही गीतंही लोकांच्या स्मरणात आहेत !
        
   बाबूजींच्या कार्यकर्ता म्हणून गोवा मुक्ति संग्रामच्या आठवणी श्रीधर फडके यांनी जागविल्या. “या संग्रामात ते संघ स्वयंसेवक म्हणूनच गेले होते आणि बाकी स्वयंसेवकांना एकत्र आणून त्यांनी गोवा, दादरा नगर हवेली हा भाग पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला आणि भारत सरकारला परत दिला...आपल्या देशाचा भूभाग गत साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे आणि मुक्त करणे आपले कर्तव्य आहे..त्यासाठी  घर दर मुलगा सगळे सोडून ते त्यात सहभागी झाले.. माझी आई सुद्धा त्यात होती..त्यात राजा वाकणकर, नाना काजरेकर, बाबूजी, बाबासाहेब पुरंदरे असे अनेक जण होते.. तसेच गोवा स्वातंत्र्यवीर मोहन रानडे, तेलू मस्कारेन्हास् यांच्या मुक्ततेसाठी सुद्धा पुष्कळ लढले.... या लढ्यासाठी बाबूजी लंडनला २-३ वेळा, आणखी इतर ठिकाणी बरेच वेळा जाऊन आले..मला वाटते हेगला सुद्धा गेले होते..त्यांच्या मुक्ततेसाठी समिति स्थापन केली होती.. त्यासाठी ते तत्कालीन  पंतप्रधान श्रीमती इंदिराजींना सुद्धा भेटले  होते”.
          
    “बाबूजी अष्टपैलू होते.. संगीतकार.. सर्वोत्तम , गायक  म्हणून सर्वोत्तम.. त्यांची देशभक्तीची भावना प्रखर होती.. आपण देशाचे, समाजाचे देणे लागतो ही भावना त्यांच्या मनात सदैव जागृत होती.. देशासाठी काहीही त्याग करायची तयारी होती.. अगदी प्राण देण्याची आवश्यकता असेल तर त्यालाही ते सदैव तयार होते”.
        
  ‘जगाच्या पाठीवर या अपूर्ण आत्मचरित्रातील उल्लेख फार हृदयस्पर्शी आहेत, त्यामुळे वाचतांना मन भरून येते (असे त्यांना अनुभव आल्यामुळे )... पुढे काय काय घडले त्याबद्दल उत्सुकता आहे हे विचारताच , “त्यांच्या  आयुष्यावर लवकरच एक  चरित्रपट येतोय. दोन तासांच्या अवधीचा... त्याची तयारी झाली आहे, लतादीदी, आशाबाई यांच्याकडूनही माहिती विचारली  आहे ... पण दोन तासांत काय मांडायचे असा प्रश्न पडलाय”.
            
   एखाद्या वटवृक्षाच्या छायेत बाकी झाडं वाढत नाहीत, खुरटतात, असा जगाचा अनुभव असतांना तुम्ही मात्र बाबूजींच्या सारखच काम केलय... यावर प्रसन्नपणे स्मित हास्य करीत श्रीधर फडके म्हणाले, “मी त्यांच्याकडून गाण नाही  शिकलो, मी शास्त्रीय संगीत नाही शिकलो हे मला जाणवतं .. पण माझी शैली - स्टाईल आपोआप तयार झाली, हे मुद्दाम करून काही होत नाही, तर आपोआप होते.... ऐकून ऐकून जे कानावर पडले तेच काय ते शिक्षण .. तेच संस्कार ..पण जे काही केल त्याचं दोघांना (म्हणजे बाबूजी आणि मातोश्री) फारच अप्रूप होते, समाधान होत..त्यांनी गाणं कस करायला पाहिजे, मुखडा, नंतर अंतरा, त्याबद्दल संगितले ..पण एकदा सांगितल्यावर नंतर पुन्हा विचारायला गेलो असताना, “यापुढे तुझ्या चाली तुच बांधल्या पाहिजेत. तरच तुझी शैली तयार होईल” म्हणून संगितले...आणि बाबूजींनी मला कधीही गाणं शिक असा आग्रह केला नाही. तुझ्या आवडीचं जे आहे ते आधी शिक. कारण त्यांना इंजिनियर व्हायचं होतं पण ते शक्य नाही झालं. त्यांचं म्हणणं होतं विद्यार्थ्यानी आधी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. मला करियर बद्दल स्वातंत्र्य दिल होतं. म्हणूनच मी आवडीच्या क्षेत्रात शिक्षण, नोकरी करून मग निवृत्तींनंतर आता पूर्ण वेळ गाणं च करतोय”.
           
             "जन्म शताब्दीच्या निमित्ताने एक सांगावेसे वाटते की, बाबूजींचे गाणे आणि त्यांनी समाजासाठी केलेले काम सर्वांपर्यंत पोहोचावे आणि त्यांचे पुतळे उभे करू नका त्याऐवजी एखादे नवे होणारे कलामंदीर किंवा नाट्यगृह असेल त्याला बाबूजींचे नाव द्या, तिथे एखादी संगीताची लायब्ररी करा ज्यात भारतीय आणि अमेरिकन, क्यारेबियन, चायनीज, यूरोपियन अशा आणि इतर देशांच्या संगीताचा अभ्यास करता येईल. काव्याची पुस्तके ठेवावी, त्याचा अभ्यास करावा. संगीताचे विविध फॉर्म्स ऐकता येतील अशी व्यवस्था करावी   
अशा या पिता पुत्रांनी मराठी संगीत क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. या अनुभवाच्या आणि तत्वांच्या आधारावर नव्या पिढीला ती तत्वं नक्कीच मार्गदर्शक ठरतील. 

मुलाखत – डॉ. नयना कासखेडीकर, पुणे.


Sunday 31 March 2019

सावरकरांचे विचार शाहीरी कलेतून पोहोचविणार्‍या विनता काळे-जोशी





स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात विनता ची मुलाखत ----

सावरकरांची अभ्यासपूर्ण चरित्रं अनेकांनी लिहिली. प्रबंध लिहिले. चिकित्सा केली. त्यातून हिंदुत्व निष्ठ सावरकर,विज्ञाननिष्ठ सावरकर, भक्तांचे सावरकर असे सावरकरांचे दर्शन झाले. त्यांचा व्यक्तीगत सावरकर हा पण एक पैलू आहे. त्यातली त्यांची रक्ताच्या नात्यातली माणसे कुटुंबात,सामाजिक कार्यात,आणि देशकार्यात पण एकमेकांना धरून होती, आधार देत राहिली. सावरकर तीन भाऊ ,एक बहीण यांच्या नात्याची वीण  शेवटपर्यंत घट्ट होती .

त्यांच्या कुटुंबातली विनता जोशी, माहेरची विनता काळे .स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे भाऊ डॉक्टर नारायण राव सावरकर त्यांची नात. त्यांच्या धाकट्या मुलीची मुलगी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पातून उलगडलेले सावरकर प्रेम आणि अभिमान.  



“आईचं माहेर सावरकर , सावरकरांच्या घरातच एका अर्थाने जन्म झाला, म्हंटल्यानंतर आपोआपच रक्तातले गुण रक्तात उतरतात. घरातूनच  बाळकडू मिळालं त्यामुळे  वाचनाचा दांडगा छंद ही होताच. विविध क्रांतिकारकांची चरित्र, स्वातंत्र्याचा विस्तृत इतिहास, खुद्द सावरकरांनी लिहिलेली पुस्तके तर होतीच पण इतरही लेखकांची उदा. पु. ल. देशपांडे यांची पुस्तके , गदिमा यांचं काव्य, इतरही अनेक पुस्तके वाचल्यामुळे बुद्धीही प्रगल्भ होत गेली. लहानपणी वाचलेली पुस्तके, त्यामुळे फार कळत होत असे नाही, ती भाषा त्या लहान वयाला झेपत नव्हती म्हणा, त्या गोष्टी डोक्यावरुन जायच्या, पण जस मोठ होत गेले तसा अर्थ लागत गेला, आणि 1983 साल जस जवळ आल, तस सावरकरांचे जन्मशताब्दी वर्ष आता आहे,  हे जरा गाजायला लागले, मी तेव्हा दहावीत गेले होते. आणि मला वाटले की आतापर्यंत जे आपण वाचले आहे ते, लोकांपर्यंत पोहोचले तर पाहिजे, ज्या प्रमाणात पोहोचवायस हवे होते तेवढ्या  प्रमाणात ते पोहोचलेले नाही हे त्या शालेय जीवनात पण जाणवत होते. कळायच की खूप कमी माहिती आहे लोकांना सावरकरांबद्दल...मग काही तरी आपण याच्यापास्न काम करू या, सावरकरांच काम पोहोचवायच”
..  
जन्मशताब्दी निमित्ताने काहीतरी कार्यक्रम करण्याचा कुटुंबातून ठरलं होत का किंवा तसे काही मार्गदर्शन मिळाल का ? यावर विनता जोशींनी त्यांच्या शालेय जीवनापासूनचा आढावा घेतला आणि समाज प्रबोधनासाठी पोवाडा हे माध्यम कसं स्वीकारलं ते सांगितलं.

“घरातून सावरकर जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणून काहीतरी कर असं काही संगितले नव्हते..पण विरोध कुठल्याही  कामाला नव्हता.. म्हणजे लहानपणापासून मतस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, पुर्णपणे होतं. सावरकरांच्या घरात जन्म झाला म्हणून आता त्यांचेच साहित्य वाच असं काही बंधन नव्हते. आम्ही कुठलेही विचार मांडू शकत होतो. मत मांडू शकत होतो. मात्र माझ्याच मनाला असं वाटत होतं की आपण काही वेगळा कार्यक्रम केला पाहिजे, काय करायचं हे मात्र निश्चित होत नव्हते. शाळेच्या वयात आपण गोंधळलेले असतो..हे पण करावं .. ते पण करावं असं वाटत असते...पण दरम्यान काय झाले आमच्या शाळेत एक डोंबिवलीच्या बाई आल्या होत्या..त्यांनी आम्हाला एक पंधरा मिनिटांचा छोटासा पोवाडा झाशीच्या राणीच्यावर केलेला म्हणून दाखवला..डफ बिफ घेऊन ..खूप भारावून गेलो आम्ही.. म्हणजे तोपर्यंत पोवाडा आम्हाला माहिती नव्हता. पण समोर बसून जेव्हा पोवाडा ऐकला, तेव्हा त्या माध्यमाची ताकद कळली. आणि आम्ही एकदमच भारावून गेलो. 

आमच्या ग्यादरींगला आम्ही आमच्या वर्गशिक्षिका पोळ बाईंना विचारलं की, करू का असा पोवाडा सादर?” तेव्हा, तुम्ही तुमचाच मिळवा असं सांगून त्यांनी परवानगी दिली. पण म्हंटले की काहीतरी दृश्य बसवा त्यावरची.  सुरूवातीला आम्ही शाहीर बाबासाहेब देशमुखांनी लिहिलेला तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडा बसवला...तो कार्यक्रम फारच सुंदर प्रभावी झाला.  शाळेच्या स्नेह संमेलनात हे प्रथमच घडले..तेव्हाच माझ्या लक्ष्यात आल की पोवाडा हे फार ताकदीचे माध्यम आहे आणि आपल्याला काय सांगायचे आहे ते चित्र जसाच्या तसं यातून आपण लोकांपुढे उभे करू शकतो., माझ्या मनात विचार आला की आपण तात्यांच्या (सावरकरांच्या ) जीवनावरच जर असा पोवाडा सादर केला तर त्यांचे जीवन लोकांसमोर येईल. तात्यांची पुस्तके वाचून त्यांचे विचार लोकांना सांगून कितपत प्रभावी होतील माहीत नाही.  त्यापेक्षा पोवाड्यातून चरित्रच समोर प्रभावीपणे मांडू शकतो अस वाटलं.निदान सावरकरांची गोष्ट तरी जनमानसात माहिती होईल”.



“आणि मग शाहीर गोविंद स्वामी आफळे यांनी लिहिलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पोवाडा मला माहिती होता. त्यांना पुण्याला येऊन भेटले. त्यांचा सावरकर घराण्याशी स्नेह होताच पहिल्यापासून. मी त्यांचा पोवाडा म्हणणार हे ऐकून ते खुश झाले, ते म्हणाले, अगदी माझा पोवाडा जरूर म्हण. जन्मशताब्दी सुरू होणाच्या चार दिवस आधी तो पोवाडा हातात मिळाला. मग मी आणि माझ्या आई बाबांनी तो ऐकून त्याच सगळं निवेदन लिहून काढलं आणि 28 मे 1983 ला नाशिकला पसावा नाट्यगृहात साने गुरुजी कथा मालेत पहिल्यांदा मी आणि माझ्या मैत्रिणीने निवेदनासकट सादर केला. सगळ्यांना खूप आवडलं, कुणीही कंटाळले नाहीत”.

पोवाड्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर लोकांपर्यंत पोहोचण्याची कल्पना यशस्वी झाल्याचे सांगताना त्या म्हणतात,  
“एक कळलं की सगळ्यांना सावरकरांची ही गोष्ट आवडली आहे. तिथेच इतरांनी पुढचे निमंत्रण दिले की आमच्याकडे सावरकरांचा हा पोवाडा सादर करावा म्हणून. कुठेही याची जाहिरात करावी लागली नाही. तेंव्हापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. माझं दहावीचं वर्ष, नंतर बारावीचं सायन्स चं वर्ष, पण मी कुठेही मागे हटले नाही. कधी कधी प्रॅक्टिकल बुडवून कार्यक्रम करून यायचे. इतकी त्या कार्यक्रमात मी बुडून गेले होते. तेंव्हापासून ठरवलं की पोवाडेच कार्यक्रम म्हणून करायचे. लोकांची अपेक्षा खूप वाढली. त्यांना आता मोठा कार्यक्रम हवा होता. अजून एक संकल्पना समोर आली की जयोस्तुते आणि सागरा प्राण तळमळला ही गाणी तर मंगेशकरांनी अजरामर करून ठेवली आहेत. ती लोकांची तोंडपाठ आहेत, त्यांच्या मनात त्या गाण्यांना खूप मोठ्ठं स्थान आहे. पण जी गीते, कविता, माहिती लोकांना माहिती नाहीत, जी सावरकरांनी रचली आहेत आणि त्या गाण्यांची प्रचंड मोठी ताकद आहे, अशी गाणी घेऊन, जसं, अनादि मी अनंत मी’, किंवा प्रियकर हिंदुस्तान’,  तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु हे हिंदू एकता गीत, शस्त्र गीत अशी सावरकरांची गाणी आणि दोन पोवाडे घेऊन आमचा एक कार्यक्रम चालू झाला”.

“1986 ची गोष्ट आहे, त्यावेळी अरुणाचल प्रदेशात चाळीस हजार आदिवासी लोकं ख्रिश्चन धर्मात गेले होते. धर्मांतराचा खूप मोठा प्रश्न समोर आला होता तेंव्हा . देशभर विश्व हिंदू परिषदेतर्फे हिंदू एकता जनजागरण अभियान चालवलं गेलं होतं. तसं ते नाशिक जिल्ह्यात पण आलं.मुख्यता आदिवासी लोकांसाठी त्या भागात ते सुरू होत. नेत्यांची, विविध वक्त्यांची भाषणे व्हायची. पण लोकांना नुसती भाषणे कंटाळवाणे व्हायला नको म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने माझे पोवाडे त्याला जोडले. सुरूवातीला पोवाडे मग भाषणे, पुन्हा पोवाडे, गाणी असा कार्यक्रम रंगायचा, खूप गर्दी व्हायची . नाशिक जिल्ह्याच्या  सर्व आदिवासी भागात जाऊन आले. कार्यक्रम वाढतच गेले. काही वेळा तर दिवसातून तीन तीन कार्यक्रम होत. याच 2,3 वर्षात माझे अडीचशे ते पावणेतिनशे कार्यक्रम झाले.
1989 ला लग्नानंतर पुण्यात आले. थोडा खंड पडला. एक दोन एक दोन कार्यक्रम व्हायचे. आधीच्या सहकारी नाशिकमधल्या. आता पुण्यात एकटी कार्यक्रम करायला लागले लहान लहान.
पुढे स्वरूप वाढले मागणी वाढली. 1997 साली मात्र स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. तेंव्हा पुणे महापालिकेने खास महिलांसाठी पोवाडा स्पर्धा आयोजित केली होती. शोभा ठाकुर या मैत्रिणीच्या मदतीने भाग घेतला. पहिला नंबर मिळाला. आणि आता ग्रुप तयार झाला. नंतर बालचित्रवाणी, बाहेर च्या गावातून असे जोरात कार्यक्रम सुरू झाले.

बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद मिळणं ही गोष्ट त्या स्वाभिमानाने सांगतात,
“पण पुन्हा एकदा कार्यक्रमाला मोठं स्वरूप मिळालं ते अबुधाबी व दुबईच्या कार्यक्रमाला. प्रसिद्धीची आणि जाहिरातीची सवयच नव्हती. पण अचानक एक दिवस दुबईहून फोन आला. माझी एका वेबसाइट वरील मुलाखत वाचून पूर्वी विद्यार्थी परिषदेच्या कामात ओळखणारा आणि महाराष्ट्र मंडळाच काम करणार्‍या एकाचा की,  तुमचा कार्यक्रम आम्हाला अबुधाबी आणि दुबई साठी हवाय असा फोन. हे सगळ स्वप्नवतच होत. हा कार्यक्रम होता आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या बरोबर. त्यांचा 2 तास आणि माझा 2 तास असा कार्यक्रम अप्रतिम प्रतिसादात रंगला. हा कार्यक्रम असा होता की सावरकर आणि स्वातंत्र्य संग्राम, शिवाजींच्या काळापासून, तेंव्हापासून आम्ही लढ्वय्ये आहोत, ते आम्ही, सावरकर आमचे क्रांतिकारकांचे मुकुटमणि आहोत. ते त्यांची काव्ये इथपर्यन्त आम्ही येतो. बाबासाहेबांनी यावेळी जाहीर गौरवोद्गार काढले ते म्हणजे मला आशीर्वाद होते. सन्मान होता.  अवॉर्ड होत आमच्यासाठी ते”.



अजून एक मोठी गोष्ट .पु. ल देशपांडे यांच्या समोर माझा हा कार्यक्रम सादर झाला. ते पार्किंसन्स ने आजारी होते. पण त्यांच्या घरी त्यांच्या समोर केलेला कार्यक्रम,ते आजारी असतांनाही दिलेली दाद हे मोठे आशीर्वादाचे क्षण होते .
एकदा 92, 93 साली बाळासाहेब देवरस नाशिकला नजरकैदेत होते, तेंव्हा माझी मुलगी लहान होती. मी  नाशिकला होते. बाळासाहेब देवरासांना कळलं की इथे सावरकरांची नात आहे आणि ती सावरकर यांची गाणी आणि पोवाडे छान सादर करते. त्यांनी मला निरोप पाठवून बोलावून घेतलं आणि त्यांच्या समोर मी पोवाडा आणि सावरकरांची गाणी सादर केली. हा माझ्यासाठी खूप सन्मानचा योग होता. एव्हढ्या मोठ्या व्यक्तिने बोलावून घेणे यातच मी कृतकृत्य झाले होते. त्यांनी काढलेले प्रशंसोद्गार खूप अभिमानाची गोष्ट होती. त्यांची सावरकरांची गाणी पाठ होती. त्यांनी अगदी हे गाणं म्हणून दाखव म्हणून एकेक सांगून गाणं  म्हणवून घेतलं. ते स्वता सावरकर भक्त होते. जयोस्तुते’..  सुद्धा म्हणायला लावलं होतं”.

विनायक दामोदर सावरकर या नावाचं वलय समाजात किती मूळापर्यंत आहे याची अनुभूती विनता जोशी यांना कार्यक्रम करताना सतत येत होती. 
                “हे कार्यक्रम मी चालू केले तेंव्हा यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सावरकर पोहोचविणे हाच मुख्य उद्देश होता. तो बर्‍याच अंशी यशस्वी झाला. अगदी छोट्या आदिवासी पाड्यावर सुध्हा पोवड्यातून सांगीतलेली सावरकरांची गोष्ट जास्त आवडत होती. त्यांना तर हे काहीच माहिती नसत जिथे त्यांना त्यांच्या गरजच भागविण कठीण असतं तिथे अशी काही माहिती असणं दूरच.
           
पोवाडा हे माध्यम कसं प्रभावी आहे हे सांगताना त्यांनी ते प्रेक्षकांना किती कळतं याबद्दल ही निरीक्षण नोंदविलं. त्या म्हणाल्या,   पोवाडा हे माध्यम फार वेगळं आणि प्रभावी आहे. कुठलाही एक चांगला विचार समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर पोवाडा अत्यंत प्रभावी माध्यम आहे. लय, ताल, संगीत, अभिनय, आवाज यामुळे दृक श्राव्य माध्यम नसतानाही एक दृश्य तुम्ही तुमच्या म्हणण्यातून उभं करू शकता अशी ताकद आहे. बर्‍याच ठिकाणी असा अनुभव आला की लोकांना सावरकरांबद्दल जी काहीच  माहिती नव्हती ती पोवाड्यातून पोहोचते आहे. कारण चरित्रच आहे त्यांचं त्यात . असेही काही अनुभव आहेत उदा. गणेश उत्सवात हा कार्यक्रम ठेवला तर त्यांना काहीही देणं घेण नसतं. स्टेजवर काय चाललाय काही कळत नाही. हे अनुभव घेऊन आता मला स्टेजवर उभं राहिल्यानंतर लगेच एका मिनिटातच प्रेक्षक ओळखू येतो की त्यांना सावरकर कळणार आहेत की नाही? अशा वेळी ओळखून सुरूवातीला त्यांना तानाजीचा पोवाडा ऐकवायचा. नाट्यरूपात, करूणरस, वीररस घेऊन मग शौर्यरसाकडे घेऊन जायचं. असे वेगवेगळे अनुभव येतात.

कार्यक्रमाला प्रेक्षक किती रसिकतेने दाद देतो किंवा किती गांभीर्याने पाहत असतो याचा त्यांना आलेला अनुभव प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.              
   एकदा तर एका मोठ्या उच्चभ्रू सोसायटीच्या कार्यक्रमात माझ्या आधीच्या कथाकथनाच्या कार्यक्रमात महिलांमध्ये गप्पा, चौकशा सुरू होत्या. ते पाहून  शेवटी कलाकाराने कथाकथन थांबवले. कलाकाराबद्दल साधं आदर राखण्याचा भाग आपण पाळू शकत नाही याच फार वाईट वाटलं. मग पोवाडा सुरू होण्या आधी मी स्पष्ट केल. की, “ कथाकथनालाच अशी वेळ येत असेल, तर माझा पूर्ण वेगळा, देशभक्तीचा आणि देशप्रेमाचा कार्यक्रम आहे, आज तुम्ही ज्या गप्पा मारताय, चैनीत जगताय न त्यासाठी खूप जणांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलय. ज्या वेळेला तुमचा भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतात तुमचं जन्म झाला.  पण हे स्वातंत्र्य तुम्ही का भोगू शकताय? आणि आत्ता सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, आपल्या घरादारची पर्वा न करता, जे सीमेवर आता खडा पहारा देताहेत न त्यामुळे तुम्ही इथे शांतपणे, निर्भयपणे बसू शकता आहात”. या शब्दांची जादू झाली. माझा कार्यक्रम पिनड्रॉप सायलेन्स मध्ये झाला. सगळ्यांनी शांतपणे ऐकला. त्यांना खूप आवडला, समजला. असे खूप वेगवेगळे अनुभव आले”.
          
लोकांना सावरकर अजून कळले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणतात, “मला अजूनही वाटतं की सावरकर अजूनही पोहोचले नाहीत पेक्षा सावरकर अजूनही कळलेच नाहीत. सुशिक्षित लोकांनाही ते अजून कळले नाहीत. सावरकरांच हिंदुत्व कळलच नाही अजून लोकांना. हिंदुत्व म्हणजे हिंदुईजम किंवा कट्टरवाद नव्हे. हिंदुत्वाची व्याख्याच अशी आहे,    

आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
      
     
सिंधु नदीपासून सागरा पर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण भूमीवर ज्याची श्रद्धा आहे ,या शब्दातच सगळं येतं. सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे ,ज्याचं या देशावर प्रेम आहे तो हिंदू. अशी विशाल व्याख्या होती हिंदूची. म्हणजे हे हिंदुत्व, धर्मात अडकलं आहे का?  माझी जर का श्रद्धा हिंदू भूमीवर आहे तर मी हिंदू आहे. माझा धर्म माझ्या घरात जो काही असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, पारशी असेल जो असेल तो. पण माझ्या मनात देशाबद्दल प्रेम असेल, ती माझी पितृभू पुण्यभू असेल तर मी हिंदू आहे.

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार हे झेपलेच नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी सावरकरांच्या अनुयायांनीच त्यांचा पराभव केला. सावरकर समजाऊन सांगण्यात त्यांचे अनुयायी पण कमी पडतात. की नक्की सावरकरांना काय म्हणायचं आहे? हे अनुयायांना कळलेल नसतं. दोन वाक्य उचलून त्याचा अर्थ लागत नाही. त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध परत परत वाचावे लागतात. मी लहान वयात वाचलेले निबंध मला नाही कळले ,पण मोठं झाल्यावर बुद्धी प्रगल्भ झाल्यावर पुन्हा वाचले तर थोडे थोडे कळले. प्रत्येक वेळी ते नव्याने समजतात. सावरकर हा इतका मोठा विषय आहे. एव्हढे पैलू असलेला हा माणूस की जो क्रांतिकारकांचा मुकुटमणी होताच. पण त्याच वेळेला ते लेखक होते. कवि होते, नाटककार होते विज्ञाननिष्ठ होते, समाजसुधारक होते. रत्नागिरीत त्यांनी जे समाज सुधारण्याचं काम केलय ते भल्या भल्या समाजसुधारकांनी केलं नाहीये असं काम आहे. पण आज सावरकर समाजसुधारक म्हणून अजूनही आम्ही स्वीकारले नाहीत. त्या वेळेला मोठी मोठी सहभोजनं घालणं,पतितपवन सारखं मंदिर बांधणे की जे देशातल पहिलं मंदिर आहे . त्या मंदिरातल्या मूर्तिची प्रतिष्ठापनाच  हरिजनांच्या हस्ते झालेली आहे. ते सगळ्यांसाठी खुलं केलं गेलं. ही इतिहासातली खूप मोठी कामगिरी आहे.

तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधु बंधू
तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू.
ब्राम्हण वा क्षत्रीय चांग, जरी झाला,
कसलेही रूप वा रंग, जरी ल्याला.
तो महार अथवा मांग, सकलाला ,
ही एकची आई हिंदू जाती आम्हांस, तिला वंदू .

1925 साली हे सर्वमान्य हिंदू गीत मोठमोठ्या सभांमधून हजारो लोकांनी एक कंठाने वृंदगीता प्रमाणे म्हणण्याचा परिपाठ महाराष्ट्र भर झाला होता. इतर भाषतून अनुवाद होऊन तिथेही ते असेच गायले जात होते.
हे इतक सुंदर गाणं आहे सावरकरांच ते लोकांना माहितीच नाही .अशी गाणी निवडून ती लोकांपर्यंत पोहोचवायची हा उद्देश आहे कार्यक्र्म करण्यामागे. त्यातून त्यांचे विचार काय होते हे लोकांना कळेल.

सावरकर लोकांना कळले नाहीत हे सांगताना त्या समाधान व्यक्त करतात की बर्‍याच संस्था आणि शाळांमधून आता सावरकर या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. ही समाधानाची बाब आहे. की त्या निमित्ताने सावरकर साहित्य वाचले जाईल. कारण तसे विषय दिले असतील म्हणजे समाजसुधारक सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर,देशभक्त सावरकर असे. तर ती मुले त्या विषयाच्या अनुषंगाने वाचन करतील आणि आपली मते मांडतील. हे एक चांगलं चित्र आहे की आताची पिढी जरा सावरकर विषय वाचायला लागली आहेत. त्यांना त्यातलं कळायला लागलं आहे. सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध, विचार या पिढीला प्रचंड आवडणारे आहेत. आता नव्या पिढीला प्रत्येक गोष्टी मगच विज्ञान समजाऊन सांगायला लागत. ती आज गरज आहे. कारण सावरकरांनी प्रत्येक गोष्ट विज्ञानाधारीत सांगितली आहे. त्यांनी धर्मग्रंत्यह वाचू नका असं नाही सांगितलं, त्यांच्या मते प्रत्येक धर्मग्रंथ हा इतिहास म्हणून कपाटात असलाच पाहिजे आपल्या. पण ज्या कालबाह्य  झालेल्या रूढी आहेत त्या आताच्या काळाला सुसंगत नसतील तर बाजूला ठेवल्या पाहिजेत. त्यांनी युरोपच उदाहरण दिलं की जेंव्हा युरोपने बायबलला सन्माननीय ग्रंथ म्हणून कपाटात ठेवले तेंव्हाच त्यांची प्रगती झाली. त्यावेळेला समाजाला संघटित करायची गरज होती म्हणून ते लिहिलं गेलं होत. आता गरज नाही परिस्थिति बदलली आहे . परंपरा पळण्यात परिस्थितीनुसार बदल झाले पाहिजेत.त्यातलं विज्ञान ते सांगत. बदल हा उत्क्रांतीच दर्शवतो न. तुमच्यात बदल झाले पाहिजेत. विचारात बदल झाले पाहिजेत. या सर्व अनुषंगाने सावरकर अजूनही तेव्हढ्याच याने लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. असे वाटते.   

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध आजच्या मुलांपर्यंत कसे पोहोचतील याबद्दल विनता म्हणतात, की हे सावरकरांचे विचार आजच्या मुलांना समजले पाहिजेत. पण त्याची भाषा जरा क्लिष्ट असल्याने ती कदाचित जशीच्या तशी समजणार नाही, तेंव्हा त्यांच्याकडून ती पुस्तकं वाचून घेऊन त्यावर चर्चा घडवून आणायला हवी. त्यांच्याकडून च त्यांना काय समजले हे काढून घेऊन त्यावर परिसंवाद घडवून आणायचा. त्यांना सावरकर आपले वाटायला लागतात कारण त्यांना कळत की हे तर आपल्यासारखे च विचार आहेत. मुलांना खूप आवडत असं. इतिहासाची गोष्ट घ्या ना, आपल्याकडे शाळेत इतिहास नीट शिकवला जात नाही. सावरकरांबद्दल तर इतिहासात काहीच नाही. दोन तीन ओळींशिवाय. सावरकरांनी समुद्रात उडी मारली आणि त्यांना अंदमानात शिक्षा झाली एव्हढाच इतिहास शाळेत शिकवला जातो. सावरकरच काय अनेक क्रांतिकारक आहेत ज्यांच्या बद्दल इतिहासात काही शिकवलं जात नाही.
शाळेत मुलांना इतिहास कसा शिकवला पाहिजे याबद्दल त्यांचा अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे. 

इतिहास नीट समजला तर चांगली गोष्ट होईल मुलांसाठी. माझ्या मुलींच्या शाळेत मी सावरकरांचा पोवाडा त्यातल्या प्रसंगासहित बसवला होता, मुलांनी खूप छान अप्रतिम सादर केला. पुढे ते पाचवीत गेले, त्यांच्या परीक्षेत प्रश्न होता कारणे द्या मध्ये , चाफेकर बंधूंनी  Rand चा वध केला. माझ्या पोवड्यात जी मुले होती त्यांनी या प्रश्नाचं सविस्तर उत्तर निवेदांनासहित लिहिलं. कारण ते त्या नाटकात या भूमिका जगले होते. त्यामुळे सर्व पाठ होते आणि समजले ही होते. पुस्तकात एव्हढंच  होत की, पुण्यात प्लेगची साथ आली. चाफेकर बंधूंनी Rand ल गोळ्या घालून मारलेत्यांच्या इतिहासाच्या बाईंनी विचारलं, अरे एव्हढी पान -पान उत्तर आणली कुठून तुम्ही? गोष्ट च्या गोष्ट कुठून आणलीत? मुलं म्हणाली आम्ही केलं होत न नाटक आणि पोवाडा, काकूंनी आम्हाला छान शिकवलं होत.त्यातूनच लिहिलं आम्ही .  मग मलाही बाईंनी शाळेत बोलावून घेतलं. मी त्यांना सांगितलं की इतिहास हा पाठांतर करून घ्यायचा विषय नाही. सनावळी घोकण्याचा उपयोग नाही. ते प्रसंग त्यांना शिकवले गेले पाहिजेत. छोट्या छोट्या प्रसंगातून गोष्टीतून तो त्यांना जास्त चांगला समजतो.त्यांच्या मनावर ठसतो. तो परीक्षा घेण्याचा विषयच नाही. बाजीरावांनी किती साली काय केल हे विचारण्यापेक्षा ते कशी एकही लढाई हरले नाहीत ते कसे जिंकत गेले हे सांगा. हे कोणालाच संगितले जात नाही”.

सावरकर जिथे जिथे फिरले तिथे तिथे भेटी देऊन विनता ताईंनी या विषयाचं  पुन्हा एकदा जागरण केल. याबद्दल त्यांनी सांगितलं.

“सावरकर जिथे जिथे गेले राहिले व काम केल तिथे तिथे जाऊन मी कार्यक्रम केले. भगूर,नाशिक, रत्नागिरी, पुणे- फर्ग्युसन कॉलेज, सावरकर स्मारक, मुंबई, अंदमान, लंडन सुधा. अंदमानात वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर जाऊन कार्यक्रम करते. लंडन मध्ये यावर्षी 15 ऑगस्ट ल स्वातंत्र्य दिना दिवशी तिथल्या महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम करायला मिळाला. तिथे माझ्या हस्ते ध्वजारोहण झालं. हा अविस्मरणीय अनुभव होता माझा. यावेळी मनात भावनांचा कल्लोळ होता. ज्या ब्रिटीशांनी सावरकरान्वर अनन्वित अत्याचार केले ,त्यांच्याच देशात आपल्याच स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्ट ला त्यांच्याच नातीच्या हस्ते ध्वजारोहण, ही रोमांचकारी घटना होती माझ्यासाठी. डोळ्यात पाणी आलं. आजही भरून येतं. उपस्थिती तर खूप होती. त्यांचं ऑडिटोरियम खचाखच भरल होत जे एरव्ही 20 - 25 लोक असतात. त्यामुळे पदाधिकार्‍यांनाही खूप आश्चर्य वाटलं. हे सगळ सावरकरांवरचं प्रेम, आदर आणि आपल्या देशावरच प्रेम होत. लंडनला मुलाखत पण झाली टीव्ही वर .



“अंदमानला तर लोकांना सावरकरांबद्दल खूप आदर आहे. मी अनुभवते आहे.रोस आयलंड च्या अनुराधा ताई राव आहेत त्यांचा विलक्षण अनुभव आहे. त्सुनामी मध्ये सर्व काही गेल त्या एकट्याच उरल्या घरातल्या. पण त्या रोस आयलंड च संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा करतात. त्याच अनुषंगाने त्या सांगतात की अंदमानातल, मी एकाच व्यक्तिमत्वाला मानते ते म्हणजे माझ्या या अंदमानात सावरकर होते त्यांना . त्या सावरकरांबद्दल बोलतात तेंव्हा जाज्वल्य अभिमानाने बोलतात. भरून येत, नाहीतर अंदमानात जे जे लोक पर्यटक येतात त्यातल्या कित्येकांना सावरकर या नावा पलीकडे काहीही माहिती नसतं. पर्यटन तुम्ही जरूर करा पण ज्या स्थानाला जे महत्व आहे जी शुचिर्भूतता आहे, जे पावित्र्य आहे त्याचा भंग करू नका. हे आपल्याच कडे आहे, परदेशात हे सांगावं लागत नाही लोकांना” .    

“ सावरकरांचा माफीनामा या न कळलेल्या विषयाची चर्चा चालू आहे ती लाजिरवाणी आहे. केवळ राजकीय आहे. इतिहासाचं राजकारण केल्याने खरा इतिहास अजून कळलेला च नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यात किती ज्ञात-अज्ञात वीर झाले ते कोणापर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यांची नावं सुधा माहिती नाहीत कोणाला. अंदमानात बंगाली जास्तीत जास्त क्रांतिकारक, मग पंजाबी आणि फक्त तीनच महाराष्ट्रियन क्रांतिकारक होते. त्यातले दोन तर सावरकर बंधुच .एक जोशी. जगाच्या इतिहासात असं एकमेव उदाहरण असेल की एकाच घरातले दोन सख्खे भाऊ एकाच वेळी शिक्षा भोगताहेत पण,  2 महीने त्या एकमेकांना माहिती नव्हतं की ते एकाच तुरुंगात आहेत”.
आपल्या शाहीरी कलेबद्दल त्यांनी आठवण सांगितली.

“सगळ्यांना प्रश्न पडतो की शाहीरी कला कशी काय तुमच्याकडे? मी जेंव्हा सावरकरांवर कार्यक्रम चालू केले तेंव्हा माझी आज्जी लक्ष्मीबाई सावरकर होत्या.म्हणजे नारायणरावांच्या पत्नी. जसे माझे पोवाडे तिने ऐकले, तेंव्हा तिची ताबडतोब प्रतिक्रिया होती, अगं, तू तर अगदी ह्यांच्या सारखी म्हणजे डॉक्टर नारायण रावांसारखी तुझ्याकडे ही कला आली आहे”. माझे आजोबा डॉक्टर नारायणराव सावरकर हे लहान पणापासून उत्तम पोवाडे गायचे. म्हणजे तात्यांचे पोवाडे मित्रमेळयातून सादर करायचे ते माझे आजोबाच.      
असे सावरकर विचार पोहोचविण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय. मी माझ्या परीने करते आणि करतच राहणार आहे”.
तुमच्यासाठी अंदमानच्या कोठडीतील सादरीकरण--  
      


       मुलाखत –  डॉ. नयना कासखेडीकर