Saturday 7 November 2015

पोहे इंदौरी ? की ...

                                   
                                      पोहे इंदौरी ?  की ...
                  


पडला ना प्रश्न ?  ' पोहे ' महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांचे कधी सकाळच्या न्याहरीचे, पाहुणे आले कि पाहुणचाराचे, मधल्या वेळचे खाण्याचे, मुलगी दाखविण्याच्या पारंपारिक कार्यक्रमातले, आजकाल रात्रीच्या जेवणाचे सुद्धा. पोहे आमचा राष्ट्रीय पदार्थ म्हणा न हवा तर. कारण इंदौरला गेलात तर कळेल की संपूर्ण मध्यप्रदेशात आपले हे मराठी पोहे  किती प्रसिद्ध आहेत. इंदौरचे पोहे, गरम जिलेबी आणि शेव जगभर प्रसिद्ध आहे. "हां भाई हां इसकी चर्चा दुनियाभर में है. पोहा इंदौर के जनजीवन का हिस्सा है".
      
        महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशची बॉर्डर गाठलीत कि या पोह्यांचा सिलसिला सुरु होतो. ३० वर्षापूर्वी आम्ही  जळगावहून देवासला जात होतो. पहाटे पावणेपाचला बडवाहला गाडी आली. सर्व प्रवासी उतरून गरम-गरम पोहे खात होते. रात्रभराच्या प्रवासाने डोळे तारवटलेले होते. मी बसमध्ये बसल्या बसल्याच, "काय मूर्खपणा आहे हा? " अशा अविर्भावात ते दृश्य नाईलाज म्हणून पाहत होते. या पोह्यांची प्रसिद्धी आम्हाला माहिती  नव्हती. देवासला गेल्यावर मध्य प्रदेशातील पोह्यांची महती कळली. आपण याला मुकलो असे क्षणभर दुःख झाले. त्याची भरपाई इंदौरला केली.

       
           तीस वर्षानंतर पुन्हा इंदौरला जाण्याचा योग आला. यावेळी मांडव पाहायला जायचे होते. अचानक ठरलेल्या दोन दिवसाच्या ट्रीपमध्ये मांडवला मुक्कामी जाण्यापेक्षा इंदौरला मुक्काम करावा म्हणून ठरले आणि खरेदी करण्यापेक्षा सराफ्यातल्या खाऊ गल्लीला भेट देऊ व जेवणाऐवजी प्रसिद्ध पोहे-जिलेबी चा आणि इतर पदार्थांचा बढीया आस्वाद लेऊ असे उद्दिष्ट ठरविले. कारण ‘सराफा – सराफा’. हा सराफा काय आहे आणि इंदौरची खाद्यसंस्कृती काय आहे हे बघायचेच होते.
      
           इंदौर मुक्कामी पोहोचलो. हॉटेलच्या वेटरने उद्या सकाळच्या चहा व ब्रेकफास्ट बद्दल विचारले होते. त्याला फक्त चहा हवा असे सांगितले , कारण बाहेर जाऊन इंदौरी पोह्यांची चव घ्यायची होती. चक्क सकाळी उठून, चहा घेऊन, हॉटेल खालीच समोर एका गल्लीत टपरीवजा दुकाने थाटली होती. तिथे आमची टीम दाखल झाली. दुकानात इतर पदार्थही होते. पण पोहे नक्की असतात कसे? आपल्यापेक्षा काय वेगळे आहे त्यात? उत्सुकता होती. मुलांना दटावलं. वडा-पाव वगैरे काहीही घ्यायचं नाही. फक्त पोहे आणि पोहेच घ्यायचे.
सर्व मुलांची नाराजी होतीच. “पोहे काय घरी कायमच असतात. इथेही तेच का खायचे?” त्यांचं बरोबरच होतं. “वेगळं ट्राय करू”.
कोणी म्हणालं, “इथे छपन्न भोग आहेत तिथे आपल्याला जायचंय” .
“म्हणजे हॉटेलचं नाव का बाबा?” 
“अरे ५६ भोग म्हणजे ५६ प्रकारची मिठाई असते”.
“नाही नाही, ५६ मिठाईंची दुकाने आहेत त्या भागात”. असा प्रत्यकाने स्वताचा अर्थ काढला होता.


           पण या ठिकाणी संध्याकाळी जायचे होते. हा विषय थांबवत पोहे खायला समोरच्या टपरीवर आम्ही गेलो. बागेत भेळ खातो तसे कागदात पोहे, त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू  असे प्रत्येकाने हातात घेऊन खाल्ले. गरम जिलबी ची चव घेतली. इंदौरी पोहे असं म्हटलं कि माझ्या मनात मराठी अस्मिता जागी व्हायची. पोहे ‘आमचे’ आणि नाव ‘इंदौरी’? कुठेतरी मराठीपणाची सूक्ष्म शंका वाटायची .
या पोटभर केलेल्या ब्रेक फास्ट वर सबंध दिवस निघाला. शहरात फेरफटका मारला. प्रसिध्द राजवाडा, होळकर साम्राज्याचा इतिहास असलेल म्युझियम पाहिलं. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास वाचताना आमची मान उंचावली. पण पोहे? अहिल्याबाई होळकरांकडे करत असतील नं पोहे? तुम्हाला हा प्रश्न म्हणजे मूर्खपणा वाटेल. होय, होळकर परिवारासाठी पोहे बनवले जात होते अण्णा उर्फ श्री.पुरुषोत्तम जोशी यांच्या प्रशांत उपहार गृहात.

            श्री पुरुषोत्तम जोशी. लागली लिंक. मराठी माणूस जिथे जाईल तिथे आपली मराठी संस्कृती रुजते. जोशी आपल्या आत्याकडे इंदौर ला गेले आणि तिकडचेच झाले. गोदरेज कंपनीत सेल्समनशिप केली. पण स्वतःचा उद्योग  सुरु करावा असं मनात होत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनच वर्षांनी त्यांचे स्नॅक्स सेंटर सुरु झाले. इंदौर मधल्या मिल कामगारांसाठी पोहे सुरु झाले. महाराष्ट्रातील पोहे इथे आले आणि इंदौरच्या खवय्या रसिकांवर राज्य करू लागले. अजूनही करताहेत. इंदौरच्या ८० % लोकांची आवडती डिश पोहेच आहे. आज सुद्धा इथे तयार झालेले पोहे मुंबई आणि दिल्लीच्या अनेक कुटुंबासाठी विमानाने पाठवले जातात. ही डिश सर्व थरातल्या लोकांसाठी तेव्हढीच आवडती आहे. त्यामुळे गरीब श्रीमंत असा भेदच उरत नाही. छुट्टी हो या वर्किंग डे इंदौरच्या हजारो घरांमध्ये रोज पोह्यांचा आस्वाद घेतला जातो. आज मितीला वीस हजार किलो पोहे रोज खाल्ले जातात, असे एका पाहणीत समजले आहे. नवी जीवनशैली आणि नव्या संस्कृतीचा काहीही परिणाम न झालेले असे पोहे हे इंदौरचे आयकॉन आहे.


         इंदौरच्या मिल कामगारांसाठी सुरु केलेलं हे मेस वजा पोह्याचं दुकान आज त्यांची तिसरी पिढी चालवतेय जेलरोड, ए.बी.रोड, यशवंत रोड,आणि नवरतन बाग असे चार आऊटलेट्स. इथे पोहे रसिकांसाठी रोज सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत ४० ते ५० किलो पोहे तयार होतात. जवळ जवळ ६५ माणसे हे काम करतात. १९५० मध्ये पंडित नेहरू कॉंग्रेस अधिवेशनासाठी इंदौरला आले असताना त्यांनी या पोह्यांचा आस्वाद घेतला.त्यांनी प्रभावित होऊन अण्णांना बोलावले आणि सांगितले, “यह तो अवाम का नाश्ता है”. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, माधवराव सिंधिया आणि ब-याच जणांनी याचा आस्वाद घेतला आहे. असा हा पोह्यांचा इंदौरी प्रवास.

           रायपूर शहरातही जयस्तंभ चौकात कांदा पोह्याचा ठेला आहे. सकाळी सहा ते दहा या वेळेत पोहे विक्रेते साहू महिना दोन लाख रुपये कमावतात. नागपूरच्या ‘के.पी की टपरी’ वाले प्रसिध्द पोहे विक्रेते रूपम साखरे पोहे व्यवसायातून वर्षाला लाखो रुपये कमावतात आणि दरवर्षी कुटुंब घेऊन वर्ल्ड टूर ला जातात. गेली ३५ वर्षे ते हा व्यवसाय करतात. रोज सकाळी भाजी घ्यायला आपल्या होंडा सिटी गाडीने जातात. त्यांची ‘चना पोहा डिश’ प्रसिध्द आहे. बघा आपल्या पोह्यांनी कसा बिझिनेस दिलाय. हे झालं मराठी पोह्याचं राज्याबाहेरील चित्र .


            कोकणातल्या वाडीत डोकावलं तर पोह्यांची परंपरा अजून वेगळी दिसेल. परंपरेनुसार दिवाळीत फराळाच्या पदार्थांमध्ये लाडू, चकली, चिवडा, करंज्या,..ही यादी. पण कोकणातल्या दिवाळीत म्हणजे नरक चतुर्दशी ‘चावदिस’ या दिवशी या फराळाच्या पदार्थांना स्थान नाही, तर फराळाला आलेल्या लोकांसाठी केलेले पारंपारिक पद्धतीचे पोहे याचे महत्व असते. या दिवशी सकाळी नातेवाईक आणि शेजा-यांना एकमेकांच्या घरी पोहे खायला यायचं आमंत्रण दिलं जातं. तिखट पोहे, गोड पोहे, दुध पोहे, गुळ पोहे, बटाटा पोहे असे प्रकार आणि त्या बरोबर  केळीच्या पानात सजवलेली रताळी, काळ्या वाटण्याची उसळ देतात. सिंधूदुर्गात ही प्रथा आजही पाळतात. म्हणजे घरात भातापासून तयार केलेले पोहेच या दिवशी वापरतात.  

          हा सिझन भाताचं नवं पीक येण्याचा असतो. हा भात, पोहे तयार करण्यासाठी आदल्या दिवशी भिजत घालतात, तो सकाळी गाळून घेऊन, मडक्यात भाजला जातो. नंतर उखळीत मुसळीने कांडला जातो. या कांडपणी नंतर तयार झालेले हे पोहे चुलीवरच शिजवले जातात. या वाफाळलेल्या अस्सल गावठी भाताच्या पोह्यांची चव असते निराळीच. या सिझनच्या पहिल्या पोह्यांचा नेवैद्य  देवाला दाखवून मग आस्वाद घायची ही परंपरा.
इंदौरी पोह्यांचे ‘उर्ध्वयू’ अण्णा उर्फ पुरुषोत्तम जोशी कोकणातलेच हो.


ले – डॉ. नयना कासखेडीकर .

Saturday 5 September 2015

'कृष्ण' समजून घ्या

'कृष्ण' समजून घ्या



        श्रीकृष्णाचं मोहक रूप सर्वाना आवडतं.मोठ्यांना आणि छोट्यांनाही. आई-बाबांना वाटतं आपला मुलगा असाच व्हावा. कारण त्यांना कृष्ण कसा होता हे माहित असतं. मुलानो तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो बघितलात तर तुम्हालाही त्याचं आकर्षण वाटेल. तुमची आजी किंवा आई रोज देवपूजा करते, त्या देवघरातला बाळकृष्ण कधी बघितलांत तुम्ही? तो तुमच्या आमच्या घराघरांत आहे. पण तुम्हाला माहिती आहे ती फक्त दहीहंडी आणि आज गावा-गावात दहीहंडी फोडणारे स्पर्धेतले गोविंदा.
      
गोकुळाष्टमी म्हणजे ,भाद्रपद महिना, कृष्ण पक्ष, अष्टमी, रोहिणी नक्षत्र. या मुहूर्तावर श्रीकृष्णाचा जन्म झाला तो दिवस. वृंदावन, मथुरा, गोकुळ, नंदगाव या ठिकाणी हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वासुदेव आणि देवकीचा हा पुत्र, भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानतात. श्रीकृष्ण म्हणजे अज्ञानाच्या घोर अंधकारात तळपणारा दिव्य प्रकाश, ज्याने सगळ्या भारत वर्षाला दिशा दाखविली आजही ती आपल्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहे.


      कृष्ण म्हणजे एक अजब रसायनच होतं. कृष्णाची कितीतरी रूपं आपल्याला दिसतात. गोपिकांबरोबर खेळणारा, गोवर्धन उचलणारा, कालियामर्दन करणारा, माळरानात आपल्या सवंगड्यांबरोबर  गायी राखणारा, आपल्या मुरलीने मंत्रमुग्ध करणारा. सुदाम्याचे पोहे ही गोष्ट तुम्हाला माहिती असेलच. आज तुम्ही शाळेत किंवा आपल्या मित्र मैत्रीणीना फ्रेन्डशिप बेल्ट बांधता. बाजारात गेलात कि राख्यांप्रमाणे हे बेल्ट सुद्धा तुम्ही आवर्जून विकत आणता. कारण मार्केट मध्ये जे प्रदर्शन केल जातं ते तुम्हाला अधिक महत्त्वाचं वाटतं. आपल्या भारतीय संस्कृतीत मित्र, गुरुजन, आईवडील, निसर्ग आणि जीवनाबद्दलचं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. ते तुम्ही वाचा, ऐका.समजून घ्या.
       
      मुलांनो आज तुम्हाला तुमचे आई-बाबा तुम्हाला हवे ते आणून देतात. म्हणजे, कॉम्प्यूटर, मोबाईल, वेगवेगळे गेम , आय पॉड, आता नवीन निघालेला टॅब, नवे तऱ्हेतऱ्हेचे कपडे आणि मागाल ते. या साधनांचा उपयोग तुम्ही करता. आपल्या मोबाईल वरून मैत्रीचे मेसेज पाठवता. मित्रानो, मैत्रीचा एव्हढाच अर्थ तुम्हाला ठाऊक आहे. मैत्री फक्त एक दिवसांचीच असते का? नाही. मैत्रीचा अर्थ कळण्यासाठी सुदामा आणि श्रीकृष्ण यांची मैत्री कशी होती ते माहित करून घ्या.
         
 सुदामा एक गरीब ब्राह्मण होता. श्रीकृष्ण आणि बलराम जिथे सांदिपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेत होते, त्यांच्या बरोबर सुदाम सुद्धा शिक्षण घेत होता. त्यांची घट्ट मैत्री होती. शिक्षण पूर्ण करून श्रीकृष्ण आधीच निघून गेले होते.पाठोपाठ सुदामाही आपल्या जन्मभूमी असलेल्या गावाला जाऊन गृहस्थाश्रमी राहू लागला. आपल्या पत्नीला तो नेहमी आपल्या उदार मित्रासंबंधी कृष्णासंबंधी सांगत असे. आनंदी आणि समाधानी स्वभावाचा सुदामा कधीही कुणाकडे काही मागत नसे. कुणी काही दिलेच तर देवाला अर्पण करायचा. असे गरीबीतच दिवस चालले होते.एकदा त्याची पत्नी सुदामाला म्हणाली," तुम्ही तुमच्या मित्राच्या कृष्णाच्या उदारतेबद्दल आणि मैत्रीबद्दल सतत सांगता, तसंच ब्राह्मणांचे परमभक्त साक्षात लक्ष्मीपति श्रीकृष्णचंद्र तुमचे परम मित्र आहेत, मग एकदा जाऊन सांगा त्याला आपली गरीब परिस्थिती. ते आपल्याला नक्की मदत करतील".

           
      पत्नीच्या आग्रहामुळे सुदाम्यालाही मित्राच्या भेटीची ओढ लागली. सुदामा बरेच दिवस प्रवास करून द्वारकेला पोहोचला. फाटक्या कपड्यातील एक दरिद्री ब्राम्हण पाहून द्वारपालांनी श्रीकृष्णांना जाऊन सांगितलं," कि हा दरिद्री ब्राम्हण स्वताला आपला मित्र म्हणवतो आहे व नाव सुदामा सांगतो आहे". 'सुदामा' हे नाव ऐकताच कृष्ण आहे तसाच धावत बाहेर आला आणि आपल्या मित्राला मिठी मारली. श्रीकृष्णाच हे वत्सल रूप पाहून सुदाम्याच्या डोळ्यातले आनंदाश्रू थांबेनात. नंतर श्रीकृष्णाने सुदाम्याला आपल्या महालात नेले आणि त्याला  राजमहालातल्या पलंगावर बसवून त्याची पाद्यपूजा करू लागले. पाय धुण्यासाठी आणलेले पाणी घ्यायची गरजच पडली नाही, कारण आपल्या प्रिय मित्राची दीनवाणी अवस्था पाहून श्रीकृष्णाच्या अश्रूंच्या वर्षावातच मित्राचे पाय ओले झाले होते. असा होता करुणेचा सागर श्रीकृष्ण. या मित्र भेटी नंतर सुदामा घरी येऊन पाहतो तर घर ऐश्वर्य संपन्न झाले होते, पण कुठल्याही ऐश्वर्याच त्याला कधीच आकर्षण नव्हतं.आसक्ती नव्हती. अशी होती त्यांची निस्वार्थी मैत्री. सुदामाने श्रीकृष्णाला फ्रेन्डशिप बेल्ट बांधला नव्हता . मित्र मैत्रिणींची गरज एकच दिवस नाही , आयुष्यात नेहमीच लागते. खरा मित्र तो असतो जो संकटातही  साथ देतो.    



     नेहमी आपल्याला भिंतीवर च्या फ्रेम वर किंवा पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करून त्याला युध्दनितीचा उपदेश करणारा कृष्ण दिसतो. गीतेसारखं मोठ्ठं तत्वज्ञान त्यानं अर्जुनाला सांगितलं.कुरु क्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला कर्मज्ञान सांगताना गीतेची जी रचना झाली ती म्हणजे हिंदू धर्मातला सर्वात महत्त्वाचा ग्रंथ ठरला. महाभारत, शास्त्र आणि पुराणातल्या वर्णनानुसार कृष्णाची मुख्य तीन रूपं आहेत. महाभारतातला कुशल राजकारणी होता.
 


पण आपल्या लक्षात राहतो तो बाललीला करणारा, म्हणजे शिंक्यावरच्या मटक्यातून लोणी चोरून खाणारा बाल श्रीकृष्ण. त्याच्या अनेक लीला आपल्याला थक्क करतात. माखनचोर कन्हैया का होता माहिती आहे? श्रीकृष्णाच म्हणणं होतं की गायीच्या दुधावर सर्व प्रथम हक्क आहे तो वासरांचा. पण जे असे लोक होते कि खाण्यापिण्यात कंजुषपणा करून लोणी जमवून ते विकण्याचा उद्योग करायचे. अशा घरांत कृष्ण लोणी चोरत असे. गोपिकांनी तक्रार केल्यानंतर मी लोणी खाल्लंच नाही असा कांगावा करत असे. इथे कृष्ण सामाजिक न्यायासाठी या लीला करायचा.
         एकदा बाल श्रीकृष्णाने माती खाल्ली होती, बलरामाने हे यशोदेला सांगितले, मग यशोदा माता रागावली, "दाखव माती खाल्लीस का?" कृष्णाने तोंड उघडायला नकार दिला. त्यामुळे यशोदेची खात्री पटली कि नक्कीच माती खाल्ली आहे. पण पुन्हा तोंड दाखव या तिच्या आग्रहामुळे कृष्णाने आपले तोंड उघडले आणि यशोदेला संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन झाले. गीतेतला कृष्ण विश्व व्यापी स्वरूप होता.


     श्रीकृष्णाचं आणखी एक नाव आहे 'गिरिधारी'.कृष्ण. लहान असताना ब्रज प्रांतात लोक इंद्राची पूजा करत असत.कारण इंद्र पृथ्वीवर पाऊस पडत असे.पण कृष्ण म्हणाला,भले इंद्र स्वर्गाचा राजा असेल पण त्याहीपेक्षा गोवर्धन पर्वत आम्हाला जास्त महत्वाचा आहे कारण आमच्या गायींचं पोषण करून तोच तर गायींना वाढवितो, त्यामुळे पूजा करायचीच असेल तर गोवर्धनाची करा आणि त्यावर्षी लोकांनी इंद्राच्या ऐवजी गोवर्धनाची पूजा केली. तेंव्हा इंद्राने रागाने मुसळधार पाऊस पाडला. सगळीकडे पाणीच पाणी झाले. लोक कृष्णाकडे धावत आले. कृष्ण म्हणाला चला गोवार्धनाजवळ जाऊ. त्याची पूजा केली आहे. तोच आपले रक्षण करेल आणि सगळ्यांनी मिळून गोवर्धन उचलला व त्याखाली ब्रज लोकांनी त्यांच्या गायींसकट आश्रय घेतला. आपल्या भूमीवरच्या लहानात लहान वस्तू बद्दल सुद्धा आपल्याला अभिमान हवा आणि सर्वांनी मिळून एखादी गोष्ट केली तर ती अशक्य नक्कीच नसते. या गोष्टींचा बोध आपण घ्यायला पाहिजे.   

        श्रीकृष्णावर त्याच्या आयुष्यात जन्मापासूनच अनेक संकटे आली, पण तो कधी व्यथित झाला नाही. प्रत्येक वेळी धीरानं सामोरा गेला. नेतृत्व,मैत्री, संकटात तारणारा, सामाजिक न्याय देणारा, प्रेम देणारा, गोकुळातल्या लोकांना आनंद आणि उल्हास वाटणारा, अशी कृष्णाची अनेक रूपं आहेत.

      मित्रांनो, आपले सण आणि उत्सव शिकवण देणारे आहेत. आजच्या गोकुळाष्टमीला तुम्ही निश्चय करा कि मी फक्त दहीहंडी उत्सवात सामील होणार नाही, तर  कृष्णाच्या कथा असलेली पुस्तके वाचून त्यातले गुण समजावून घेईन आणि त्याप्रमाणे कृती करेन .


( सदर लेख 'बालनगरी' या मासिकात प्रसिद्ध झाला होता )
 - डॉ.नयना कासखेडीकर, पुणे.

Friday 19 June 2015

ती

                                  
 ती
               परवाच इंटरनेट वर एक बातमी वाचली. वरवर पाहिलं तर बातमी साधीच. दोन बहिणींनी कष्टाने नोकरी करून आपल्या आईवर हृदयशस्त्रक्रिया करून घेतली. वाटलं त्यात काय नवल? साधारणता असं मुलं करतातच ना. पण नाही, ती आई मुलांना घेऊन कुठल्या भागात राहतेय आणि काय परिस्थितीत राहतेय हे  इथे महत्वाचं. नवरा कुठे निघून गेलाय माहिती नाही. तो तीन वर्षे बेपत्ता आहे. ४२ वर्षाची ती, पदरी आठ मुलं. १२ ते २१ वयोगटातील. नव-याच्या पश्चात चार वर्षे प्रतिकूल परिस्थितीत लढा दिला आणि आपल्या आठ मुलांना घेऊन तिनं सिरीया गाठलं. सीरियाच्या राजधानीत दमास्कस मध्ये ती खान दानून शेल्टर मध्ये गेल्या वर्षा पासून राहतेय. इथे तिला खूप सुरक्षित वाटतं.

              आपल्या जीवनात सुरक्षा महत्वाची असतेच. ऊन, वारा, पाऊस, थंडी,यापासून सुरक्षा म्हणून आपण शेल्टर मिळवतोच. पण, आज माणसांपासून माणसाला भीती आहे. जर ती स्त्री असेल आणि तीही अशी एकटी, घरदार नसलेली, वा-यावर सोडून दिलेली, वैधव्य आलेली, एकेरी पालकत्व स्वीकारलेली असेल. तर, तिला कायम धास्ती असते जगण्याची. तिला गरज असते पैशांची आणि आधाराची.

              सिरीयातल्या या सत्य घटनेतली ‘ती’ खंबीर होती. डगमगली नाही. कोणाच्याही आधाराशिवाय आठ मुलांना घेऊन कुठ जायचं? कसं सांभाळायचं? या सगळ्यांना खाऊ काय आणि कुठून घालायचं? केव्हढे अवघड प्रश्न तिच्या समोर होते. पण तिने मुलांना बापाची उणीव भासू दिली नाही. मुलांना काही कमी पडू दिले नाही. कष्ट करून सगळ्यांना शिक्षण दिलं. मुलांचं खाणं-पिणं  अभ्यास, शाळा, कपडे अशा मुलभूत गरजा नेटाने पूर्ण केल्या. घरकाम, शिवणकाम, विणकाम, भरतकाम करून मुलांना चांगलं जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला.

             जगातली प्रत्येक आई जे करते तेच तिनेही केलं. या सगळ्या आयुष्याच्या धकाधकीत स्वताकडे दुर्लक्ष केलं किंवा झालं. अशी अवस्था सगळ्या तीं ची असते. मग त्या ‘ती’ चा संसार आलिशान बंगल्यातला असो, मध्यम वर्गीय घरातला असो कि झोपडीतला असो. राबणे अतिशय समर्पक शब्द. सगळ्यांची राबण्याची पातळी वेगळी एव्हढंच. नवरा असेल तरी किंवा नसेल तरी, कधी ती शरीराने मोडलेली असते, मनाने खचलेली असते, भीतीने धास्तावलेली असते. स्वताकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नसतो. ती अशिक्षित आणि गरीब असेल तर काय मृत्यूच समोर असतो. ‘ती’ला धर्म नसतो, जात नसते, माणुसकी हा धर्म आणि स्त्री ही जात. संसार संभाळणे, मुलांचे भविष्य घडविणे हेच तिचे कर्म. मग जीव पणाला लागला तरी चालेल. उद्याची आशाच आज आलेल्या संकटाला समर्थपणे तोंड द्यायला तिला बळ देते.

             आज सिरीयातल्या ‘ति’नं  केलेल्या कष्टाचं चीज झालं. मोठ्या दोन्ही मुली नोकरीला लागल्या.एक सायकॉलॉजी ची पदवी घेऊन शिक्षिका झाली आहे. दुसरी एका NGO मध्ये काम करून पैसे मिळवतेय. दिवस पालटले खरे पण ‘ति’ची तब्येत खालावली. आठ आठ बाळंतपणं ,घर चालविणे, सोपी गोष्ट नव्हतीच. अखेर जो परिणाम व्हायचा तो झालाच. मधुमेह झाला, आता हृदय रोगाचा सामना. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं. एव्हढा मोठा खर्च त्या लहान मुलांनी पेलला. प्रतिकूल परिस्थितीत रोज मुलांना शाळेत नेलं. सगळे जण शिकून मोठे झाले आणि या लहानग्यांच्या जीवावर तिचं ऑपरेशन झालं. या घटनेनं तिला धन्य वाटतं. त्या माउलीला समाधान वाटणारच. चांगली बरी झाल्यावर ‘ती’ पुन्हा तिच्या पहिल्या आयुष्याला नव्यानं सुरुवात करणार आहे. शेल्टर मधल्या महिलांना व्यावहारिक सल्ला ती देणारं आहे.

            ‘ती’ला सुरुवातीलाच सांगितल्या प्रमाणे इथे शेल्टर मध्ये इतकं सुरक्षित का वाटतंय आणि आनंदही का होतोय याचं कारण, ज्या प्रांतात ती राहतेय तिथं सुरक्षितता म्हणजे काय हे तिला चांगलं माहिती आहे. इराक आणि सिरियात, पळवून आणलेल्या किशोरवयीन मुली किरकोळ किमतीला विकल्या जात आहेत. ऐकून धक्काच बसेल अशी परिस्थिती आहे. सिगारेटच्या पाकिटाच्या बदल्यात तेथे मुली मिळतात. इथे इसीसने गुलामांचे बाजार सुरु केले आहेत. मुलींचे अपहरण हा त्यांच्या धोरणाचा भाग आहे. याच्याच जोरावर तरुणांना इसिसमध्ये आकृष्ट केले जाते. महिलांच्या बदल्यात तिथे युध्द खेळले जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या लैंगिक हिंसाचार विरोधी दूत झैनाब बानगुरा यांनी मध्यंतरी एप्रिल मध्ये इराक आणि सिरीयाला भेटी दिली. तेथील इसीस सैनिकांनी चालवलेल्या लैंगिक हिंसाचाराला आळा घालण्याचा कृती आराखडा त्या तयार करीत आहेत

            तिला ज्या ठिकाणी आसरा मिळाला तिथे UNHCR तर्फे महिला आणि मुलांसाठी अनेक उपक्रम चालविले जातात. वोकेशनल ट्रेनिंग, मानसिक आधार, मनोरंजनात्मक कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण मिळते. अशा ठिकाणी तिला आणि तिच्या मुलांना आयुष्य जगण्याचा अनुभव आणि आधार मिळाला. इथं  तिला जे मिळालंय त्यामुळे तिचा विश्वास आणखी वाढलाय. इथून चांगली बरी झाल्यावर ती स्वताच्या घरी जाऊन पहिलं जीवन पुन्हा सुरु करणार आहे. बातमीतल्या ‘ती’ ला पुढच्या जीवन प्रवासासाठी शुभेच्छा. माझ्या शुभेच्छा तिच्या पर्यंत पोहोचणार नाहीत माहिती आहे मला.

                                 हे माते, ‘सलाम’ तुझ्या शक्तीला आणि धीराला.

- डॉ.नयना कासखेडीकर   


Tuesday 12 May 2015

इतिहासाचा श्वास - निनाद बेडेकर

इतिहासाचा श्वास - निनाद बेडेकर

(डावीकडुन ) निनादजी  बेडेकर आणि योगेंद्र जी 

            शिवस्मरणाने भारलेला लेखक, गडांचे जतन आणि त्याच्या इतिहासाबद्दल जागृती करण्यासाठी महाराष्ट्रातल्या ६१ किल्ल्यांवर गड प्रेमींना आणि नवयुवकाना घेऊन भ्रमंती करणारे आणि विदेशी पर्यटकांनाही किल्ले आणि इतिहासाबद्दल मार्गदर्शन करणारे, कवीभूषणांच्या शिवाजीराजांच्या काव्यावरील सौंदर्य स्थळे उलगडून दाखविणारे, शिवारायांच्या व्यवस्थापन कौशल्याचा परिचय करून देणारे, स्वदेशी आणि विदेशी इतिहासकारांनी लिहिलेल्या दुर्मिळ इतिहास ग्रंथांचा १६ व्या शतकापासुनचा इतिहास अभ्यासण्यासाठी, शिवाजी महाराज मुघल यांच्या विषयी असलेली मते, प्रवासवर्णने, पत्रव्यवहार, असा दस्तऐवज असलेला सुमारे ५००० पुस्तकांचा संग्रह करणारे, एव्हढंच नाही तर या अभ्यासासाठी मोडी, पर्शियन, अरेबिक, शिकस्त, उर्दू, फार्सी या भाषाही अवगत करणारे निनादजी बेडेकर. बैठकांमध्ये भेटले, व्याख्यानातून भेटले. कार्यक्रमात भेटले. अगदी थोडेसेच पण खूप महत्वाचे. त्यांच्या घरी दर वर्षी गुरुपौर्णिमेला जायचो तेंव्हाची त्यांची भेट म्हणजे अप्रतिम मैफीलच असायची. या मैफिलीचा गेली पंधरा वर्षे आम्हाला लाभ मिळाला आहे. आम्ही संस्कार भारतीचे सामान्य कार्यकर्ते, काही वयाने, अनुभवाने लहान- मोठे, कमी-जास्त पण त्यांच्या लेखी जणू आम्ही त्यांच्यासारखेच इतिहास अभ्यासक असायचो आणि ते आम्हाला मैत्रीच्या नात्याने एखादी गोष्ट शेअर करावी तसे ते अनेक घटना, अभ्यास, त्यासाठी  धडपड करून मिळवलेली माहिती, दस्तऐवज, भाषांतर करताना आलेल्या अडचणी, विविध भाषातील कागद पत्रे, तन्मयतेने दाखवीत असत. त्यांच्या चेहे-यावर सामान्य लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवल्याचा आनंद आणि समाधान दिसायचं. तेव्हढाच आनंद नव्हे त्याहीपेक्षा जास्तच आनंद आणि समाधान आम्हाला मिळायचं. एव्हढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या सान्निध्यात आपण भरून पावलो असं दरवर्षी या त्यांच्या भेटीनं वाटत राहायचं. दहा मिनिटांसाठीची ही भेट तीन तासांची कधी व्हायची ते कळायचं देखील नाही.
  
          दोन वर्षापूर्वी  कणकवलीत वास्तव्यास असताना वृत्तपत्रात वाचले कि दुर्ग साहित्य संमेलन विजयदुर्ग किल्ल्यात होणार आहे आणि निनादजीना त्यात गौरविले जाणार आहे. दुस-याच दिवशी विजयदुर्गला गेले असताना तिथल्या गाईडनेही हा मोठा सुंदर कार्यक्रम असतो. तुम्ही याच असा सल्ला दिला होता.शिवाय निनाद्जींचा सत्कार आणि व्याख्यान यासाठी जायची इच्छा होती.पण काही कारणाने दुस-याच दिवशी मला पुण्याला परतावे लागले.कार्यक्रमाला जाता येणार नाही म्हणून  मी हळहळले.दोन दिवसांनी मा.देगलूरकर सर भेटले त्यांना सांगितलं विजयदुर्गला झालेल्या कार्यक्रमाला जाता आले नाही.तेंव्हा त्यांच्याकडून कळले बेडेकर सर दवाखान्यात आहेत.तब्येत खूप बिघडली आहे.या कार्यक्रमाला ते जाऊच शकले नव्हते .त्याच्यानंतरच्या भेटीत निनाद्जी म्हणाले, "मी खूप आजारी होतो, वर जाऊन परत आलोय.आता बोनस लाईफ जगतोय".   

            कदाचित मागच्याच वर्षी ची भेट त्यांची. त्यांनी एक सुंदर पेंटिंग दाखविले. काही परदेशातली पेंटिंग्ज होती. इतिहासाच्या अभ्यासाबरोबर आणि कामाबरोबर त्यांच्यातल्या चित्रकार फिनिक्स नं पुन्हा भरारी घेतली होती आणि मागे पडलेली चित्रकला पुन्हा सुरु केली होती. आजारपणात चित्रकलेने त्यांना आनंद नक्कीच दिला असेल. शांत, ऋजूता, आदर, असलेले निनादराव इतिहासाचा श्वास होते. त्यांच्या कुठल्याही भेटीतले टेक्निकल प्रास्ताविक आटोपले कि गाडी इतिहासावरच येई. संस्कार भारतीचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे पुणे महानगरातल्या सर्व कार्यकर्त्याना मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. आज त्यांच्या दु:खद निधनाची बातमी कळली आणि खूप हळहळ वाटली. सर्व कार्याकार्त्यंची हीच अवस्था आहे आज. संस्कार भारतीच्या कामातील ते एक बिनीचे शिलेदार होते. घरातले वडीलधारी कितीही वृद्ध झाली तरी ही मंडळी आपला आधार असतात. त्यांच्या जाण्याने हा आमचा आधार गेलाय अस वाटतंय.

 -डॉ.नयना कासखेडीकर

Tuesday 27 January 2015

कॉमन मॅन

कॉमन मॅन

           ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री आर.के.लक्ष्मण (रासिपुरम कृष्णास्वामी लक्ष्मण) यांना डी.एस.के.इंटरनॅशनल कॅम्पस तर्फे डी.एस.कुलकर्णी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं अशी फोटोबातमी डिसेंबरच्याच वृत्तपत्रात वाचली. आनंद झाला होता. यापूर्वीही त्यांना व्यंगचित्रांसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे, बी.डी.गोएंका अवॉर्ड, शंकराचार्य अवॉर्ड, भारत भूषण पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, मराठवाडा विद्यापीठाची, म्हैसूर व दिल्ली विद्यापीठाची डि.लिट् आणि अनेक मानाचे नागरी पुरस्कारही. सर्वच व्यंगचित्रकारांचं भाष्य सामान्य माणसाला बातमी इतकंच आवडत असतं. परंतु, आर.के.लक्ष्मण यांचं व्यंगचित्र प्रत्येक सामान्याला आपलंच प्रातिनिधिक चित्र वाटत असतं. सर्व सामान्य भारतीयांच्या मानसिकतेचं अचूक भान त्यांच्या कॉमन मॅन मधून व्यक्त होत असतं.

       ‘कॉमन मॅन’. महागाईनं त्रस्त झालेला, राजकारणाचा बळी ठरणारा, आता रॉकेल ऐवजी गॅस सिलेंडर साठी आणि रेशनसाठी रांगा लावणारा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षणक्षेत्रातील सामान्यांचं आर्थिक शोषण, वीज, पाणी प्रश्न, असे अनेक प्रश्न रोजच सामान्य माणसाला सतावत असतात. कोणीही दखल घेत नाही. असे वर्षानुवर्षे चाललेच आहे. समाजातल्या गर्भश्रीमंत, सेलिब्रेटी, राजकारणी व स्वतःला शिक्षण नसूनही पैश्याच्या जोरावर उच्चभ्रू समजणा-यांना याचं भानही नसतं. शिवाय काही वेळा जो सामान्य नागरिक यात भरडला जात असतो त्यालाही कळत नसतं. याशिवाय सामान्य माणसाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील घडामोडींची माहिती नसते. अशा वेळी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारी व्यवस्था म्हणजे पत्रकारिता. त्याची माध्यमे आज अनेक आहेत. पण यापूर्वीची प्रभावी माध्यमे वृत्तपत्रेच होती. टाइम्स ग्रुपचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ हे मोठं साखळी वर्तमानपत्र.

     आर.के.लक्ष्मण.लहानपणीच कार्टूनिस्ट व्हायचं ठरवलेला संवेदनशील कलाकार. म्हैसूर युनिव्हर्सीटीतून बी.ए. केल्यानंतर, फ्रीलान्सर म्हणून स्वराज या वर्तमानपत्रातून त्याचं  व्यंगचित्र प्रसिध्द होऊ लागलं. आर.के.लक्ष्मण फ्री प्रेस जर्नल आणि इलस्ट्रेटेड विकलीत कथांसाठी चित्र, मुलांच्या मासिकासाठी कॉमिक स्ट्रिप्स काढत. पण त्यांचं स्वप्न होतं राजकीय व्यंगचित्र काढणं. त्यामुळे या कामात त्यांना रस वाटत नव्हता. आपली बौद्धिक क्षमता गंजतेय आणि राजकीय व्यंगचित्रांचा प्राण असलेली आपली विडंबन शक्ती मंदावतेय असे त्यांना वाटे. त्याच्या जोडीला व्यंगचित्रांचे चाहते, “टाइम्स मध्ये तुमची व्यंगचित्र कधी प्रकाशित होणार”? असे विचारीत. तेंव्हा त्यांना फार क्लेश व्हायचा. कारण टाइम्स मध्ये ते प्रसिध्द होणं ही अभिमानाची गोष्ट होती. मग त्यांनी स्वान्तसुखाय रोज व्यंगचित्र काढणं चालू केलं. टाइम्स मध्ये  नोकरी धरल्यावर सुरुवातीला एकदा, मग आठवड्यातून तीनदा, मग फक्त रविवारच्या पुरवणीसाठी आणि पुढे पुढे रोज ते प्रसिध्दही होऊ लागलं.            

           
टाइम्स ऑफ इंडिया मधून श्री आर.के.लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ अधून मधून लोकांना भेटत असे. ते तिथे व्यंगचित्रकार म्हणून नोकरीस होते. त्यांना वाटलं की, सामान्य माणसाच्या समस्यांवर मल्लिनाथी करण्यासाठी टाइम्स मध्ये रोज एक भाष्य केलं तर ते प्रभावी होईल. त्यासाठी अर्थातच त्यांचा कॉमन मॅन होताच आणि त्यांनी वर्षाचे ३६५ दिवस ‘एक कॉलम’चं छोटंसं व्यंगचित्र देण्याचं ठरवलं. वाचकांची राजकीय समज फारशी न ताणता, सोपं, पण परिणामकारक चित्र कि ज्यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व स्थानिक घटना सामान्य माणसा च्या बौद्धिक पातळीवर नेऊन उभं करायचं आणि अद्भुत कल्पनाशक्तीच्या आधारे परिस्थितीतील विसंगतीवर अचूक बोट ठेवायचं हा त्यांचा उद्देश होता. हे असं वर्षभर चालवायचं म्हणजे आव्हानच होतं. या सदराचं नाव होतं, ‘यू सेड इट’

         मला आठवतंय, आम्ही लहानपणी रोज सकाळी दुकानातून आजोबांना वर्तमानपत्र आणून दयायचो, तेंव्हा प्रत्येक पेपरच्या घडीवर ‘बाळूकाका बाळराणे’ , ‘जाता जाता’, ‘काय सांगता’? ही एक कॉलमची व्यंगचित्रे रोज बघायचो. त्याचा अर्थ लहानपणी कळायचा नाही. तेंव्हा अशी पहिल्या पानावर व्यंगचित्र म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण होतं. याच काळातलं यू सेड इट (कसं बोललात?) हे अत्यंत लोकप्रिय व्यंगचित्र. महाराष्ट्र टाइम्स मध्ये ‘कसं बोलतात’ या शीर्षकाखाली ती प्रसिध्द होऊ लागली. राजकीय स्थितीवर निर्भीडपणे आपल्या चित्रातून भाष्य करणारे व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले.  


         
यू सेड इट या भाष्यातलं चित्र होतं, धोतर आणि चौकडीचा कोट, डोक्याला टक्कल, नाक फुगीर, आखूड मिशा आणि डोळ्यावर चष्मा असणारा आणि चेह-यावर भांबावलेले भाव असलेला माणूस. कॉमन मॅन. हे चित्र भारतातील कोट्यावधी मूक जनतेचं प्रातिनिधिक चित्र होतं. अवती भोवती घडणा-या घटनांचा तो मूक साक्षीदार असायचा.  ह्या व्यंगचित्राने तब्बल ५० वर्षे सामान्य लोकांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यू सेड इट हे सदर प्रसिध्द करायची तारीख ठरली आणि त्याच वेळी लंडनच्या ‘इव्हिनिंग स्टँडर्ड’च्या संपादकांचं आर.के.लक्ष्मण यांना पत्र आलं. डेव्हिड लो  ‘डेली मेल’ मध्ये जॉईन झाल्याने त्यांच्या जागी आर.के.लक्ष्मण यांना काम करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. पत्रात होतं , “ प्रिय लक्ष्मण, टाईम्स ऑफ इंडियातील तुमची काही व्यंगचित्र पाहून मी प्रभावित झालो. या देशात येऊन काम करण्याच्या कल्पनेत तुम्हाला कितपत स्वारस्य आहे? जर असेल तर तुम्ही आमच्या वृत्तपत्रात सामील व्हायचा विचार करावा....”अशा आकर्षक ऑफर चे तेही परदेशातील. कोणाला नाही आकर्षण वाटणार? तसे आर.केंनाही मनातून जावेसे वाटले.

         ही बातमी हा हा म्हणता सगळीकडे पसरली. अभिनंदन, निरोप समारंभ,भोजन पार्ट्या,कॉकटेल पार्ट्या,आयोजित केल्या जात होत्या. सर्वजण समजत होते कि,आर.के. लंडनला जायच्या तयारीत आहेत.अभिनंदनाचे संदेश येऊन धडकत होते. एक दिवस तुम्ही अमेरिकेत जाल असे भविष्य हितचिंतक वर्तवित होते. मनातील देशभक्तीची भावना आणि परदेशात स्थायिक होणा-या डॉक्टर,व्यापारी,इंजिनियर यांच्या पेक्षा भिन्न व्यवसाय व त्याची गरज यामुळे आर.के.लक्ष्मण यांना मनातून हे पटले नव्हते. त्यांच्या मते पाश्चात्य समाजजीवन हे एकसुरी आहे. तसेच राजकीय जीवनात सर्वच जण सभ्य आचरण करणारे त्यामुळे, फक्त वास्तव घटनांची चित्रं काढणारा एक साधा कलाकार म्हणून जीवन जगावं लागेल ही काळजी त्यांना वाटत होती. भारतातील बहुरंगी ,अनेकरंगी सामाजिक व राजकीय जीवन हे व्यंगचित्रकाराला पर्वणी असते. या वातावरणाची उणीव तिकडे जाणवली असती. तर वृत्तपत्रातील अनिश्चितता हाही एक त्यांच्या काळजीचा विषय होता. ह्या विषयीची संदिग्धता कायम ठेऊन आर.के.यांनी ब्रिटीश नागरिक व्हायला तात्पुरती स्थगिती दिली आणि यू सेड इट सदराच्या तयारीला ते लागले. लंडनची ऑफर त्यांनी स्विकारली असती तर? कॉमन मॅन चा जन्म झाला नसता.
              
     ‘यू सेड इट’ मध्ये रस्त्यांची अवस्था, तुंबलेलं सांडपाणी, गटारी, पाणी टंचाई, कच-याचा प्रश्न आणि असेच स्थानिक प्रश्न येत होते. त्याच बरोबर दुष्काळग्रस्त खेडी ते विमानतळावरील स्वागत, या विषयांच्याही पुढे यातला ‘कॉमन मॅन’ मंत्र्याबरोबर परदेशी दिसू लागला. पण तो परदेशी गेला तरी आधी होता तसाच होता. दिवसेंदिवस कॉमन मॅन लोकप्रिय होत होता.या कॉमन मॅन ने चांगलाच विश्वास संपादन केला होता.त्याचे अनेक किस्से आहेत.


   दिल्लीला टाइम्स सुरु झाल्यानंतर त्याचा खप वाढविण्यासाठी आर.के.लक्ष्मण यांनी काढलेल्या आठ वर्षातल्या भारतीय आणि परदेशी घटनांवरील व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरवलं गेलं. या प्रकारचं प्रदर्शन प्रथमच दिल्लीत भरत होतं. लोकांनी याला प्रचंड प्रतिसाद दिला होता. हे प्रदर्शन पाह्यला एक प्रख्यात व्यंगचित्रकार सुद्धा आले होते. त्यांनी आर.के.लक्ष्मण यांची चित्रे पाहून त्यांचे कौतुक करताना हेही सांगितले कि, “तुमच्या व्यंगचित्रातून तो चौकडीचा कोट घातलेला, मिशा असलेला,चष्मा लावणारा सामान्य माणूस काढून टाका. हा गरीब सामान्य माणूस तुमच्या कलेच्या विकासाआड येत आहे”. पण आर.के.यांनी हा सल्ला न मानता आपले काम चालूच ठेवले आणि तीन दशका नंतर टाईम्स ऑफ इंडियाच्या १५० व्या वर्धापनदिना निमित्त टपाल खात्याने  जे खास तिकीट प्रसिध्द केले त्यावर हा कॉमन मॅन झळकला. ही या कॉमन मॅन च्या आणि आर.के.लक्ष्मण यांच्याही गौरवाचीच गोष्ट होती.

 आर.के यांची विषयाची हाताळणी, विनोदबुद्धी, रेखाटन कौशल्य वेगळंच आहे. अतिशय संयमित. त्यामुळेच चोखंदळ वाचकांना ती व्यंगचित्रे आवडतात. पण या कॉमन मॅन ने लोकांना इतकं जिंकलं होतं की पुढे पुढे  आर.के.लक्ष्मण यांना, टपाल खात्यातील उशीर, सदोष टेलिफोन यंत्रणा, अव्वाच्या सव्वा येणारी विजेची बिले, शाळेतील भ्रष्टाचार याविषयी तक्रार करणारी पत्रे येऊ लागली. एक तर पत्र मजेशीर होतं. त्यात म्हटलं होतं, ‘कृपया ४७ डाऊन ही गाडी अमुक ठिकाणी काही मिनिटे थांबवावी. त्यामुळे ऑफिसातून घरी जाण्यासाठी पुढच्या गाडीची मला चार तास मला वाट पहावी लागणार नाही.’ बिच्चारा सामान्य माणूस?जीवन जगण्याच्या रोजच्या लढाईत हतबल झालेला असतो. आपल्या समस्येवर कोण उपाय करू शकतो?आपल्या प्रश्नाचं  समाधानकारक उत्तर कोण देऊ शकतं?याचं व्यासपीठ कॉमनमॅन शोधत असतो. आश्चर्य म्हणजे या लोकशाहीच्या दरबारात  त्याला प्रशासनापेक्षा, नेत्या-पुढा-यांपेक्षा कलाकाराबद्दल जास्त विश्वास वाटतो.

    एकाने तर व्यंगचित्र आवडलं म्हणून तीन रुपये मनीऑर्डर ने आर.के.ना पाठविले होते. त्यांच्याकडे म्हणे आनंद व्यक्त करण्याची ही पद्धत होती. पण आर्थिक परिस्थिती फार चांगली नसल्याने एव्हढीच रक्कम तो पाठवू शकला होता.

        एका ख्रिश्चन चाहत्याने आर.के.ना, आपल्या प्रिय पत्नीचा चेहरा संगमरवरात कोरून द्यावा अशी विनंती केली होती. कारण त्याची पत्नी आर.के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची चाहती होती. ती गेल्याने तिच्या थडग्यावर चेहेरा खोदावा, तोही स्वतः आर.केंनी. अशी या पतीची इच्छा होती.

         
अशा काय कोणाच्या इच्छा असतील सांगता येत नाही. कॉमन मॅन च्या प्रभावामुळे सामान्य लोकांना आर.के.लक्ष्मण च आपल्याला न्याय मिळवून देतील असे वाटत असे. जुगारी मंडळीना तर म्हणे यांच्या व्यंगचित्रांचं गूढ आकर्षण वाटायचं. त्यांना वाटायचं आर.के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रात भाग्यशाली आकडा लपलेला आहे. त्यांचं लॉजीकच वेगळं होतं. व्यंगचित्रात हाताची दिसणारी दोन बोटे, दिव्यांच्या खांबांची संख्या, दृश्यातील एकूण मोटारी, बसच्या रांगेतील माणसांचा आकडा असा काहीही संबंध ते लावत असत. एकेदिवशी एक गलेलठ्ठ श्रीमंत आर.कें ना भेटायला आला आणि उद्या प्रसिध्द होणारं व्यंगचित्र पाहायला मिळेल का ? अशी पैशाच्या मोबदल्यात  विनंती करू लागला. जेणे करून त्यात लपलेला आकडा सर्वांच्या आधीच समजून प्रतिस्पर्ध्यावर मात करता येईल. मग अशांना समजून सांगणं, कायदा सांगणं हे काम त्यांना करावं लागे. बापरे कॉमन मॅनची अजबच लोकप्रियता.

         असा हा कॉमन मॅन चा ब्रॅन्ड भारतात तर होताच पण परदेशातही प्रसिध्द होता. आर.के.लक्ष्मण अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, व्हिएन्ना, ऑस्ट्रेलिया या देशात व्याख्यानासाठी जात असत. एकदा त्यांना फ्रांकफुर्ट च्या हायडलबर्ग विद्यापीठाने आमंत्रित केलं होतं. ४० किलोमीटरवर असलेल्या हायडलबर्ग ला जाण्यासाठी फ्रांकफुर्ट विमानतळावर आर.कें.ना घ्यायला येणार होते. विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी खूप रस्ते असल्याने नेमकं कुठून बाहेर जायचं या विचारात असताना आर.कें.ना एका पॅसेजमध्ये एकजण मोठा 
फलक /Placard हातात धरून उभा असलेला दिसला. त्या फलकावर आर.केंचे नाव लिहिण्याऐवजी त्यांच्या व्यंगचित्रातील कॉमन मॅन चं चित्र काढलं होतं. ते आर.केंना विद्यापीठात घेऊन जायला आलेले प्राध्यापक होते. त्यांनी ही युक्ती वापरली होती. असं हे कॉमन मॅन चं भारतीय व्यक्तिमत्व जगात ओळखलं जात होतं. आर.के.यांनी जिथे जिथे प्रवास केला तिथे तिथे हा कॉमन मॅन पोहोचला.

     आपल्या जन्मगावी म्हैसूर विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली. टाईम्स मध्ये त्यांनी जवळ जवळ ५० वर्षे नोकरी केली. यू सेड इट हे व्यंगचित्र सदर ५० वर्षे चालवलं. सदर सुरु करताना मात्र त्यांना, आपण निदान वर्षभर तरी हे सदर सलग चालविले पाहिजे अशी काळजी वाटत होती. मिश्कील, खट्याळ, खुमासदार या वैशिष्ट्यांमुळे ते किती लोकप्रिय ठरले ते यावरून कळतेच.

     
याशिवाय त्यांनी अनेक निबंध,प्रवासवर्णन व लघुकथा लिहिल्या आहेत. द मेसेंजर आणि द हॉटेल रिव्हिएरा या दोन कादंब-याही लिहिल्या आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांची ,बेस्ट ऑफ लक्ष्मण, टाईम्स ची द इलोक़्वंट ब्रश आणि फिफ्टी इयर्स ऑफ इंडिपेंडन्स थ्रू द आईज ऑफ लक्ष्मण ही पुस्तकेही आहेत. द टनेल ऑफ टाईम हे त्याचं आत्मचरित्र मराठीत लक्ष्मणरेषा म्हणून आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर अनेक गोष्टी कळल्या. त्यापैकी एक, त्यांचा चित्राचा आवडता विषय म्हणजे गणपती आणि कावळे. कावळ्याचं त्यांना लहानपणापासूनच आकर्षण होतं. कावळा म्हटलं कि बहुतेक त्याच्याकडे आपण  तिरस्कारानेच बघतो. पण आर.के.यांना हा कावळा म्हणजे सर्वोत्कृष्ट पक्षी वाटतो. कारण तो कुठेही कसल्याही पार्श्वभूमीवर उठून दिसतो. तो हुशार, धूर्त आणि सावध असतो. विविध मूडमध्ये आढळतो. त्यांनी वाशिंग्टन मधील संग्रहालयातून कावळ्या वर माहिती मिळवली. अभ्यास केला. कावळ्याच्या चित्रांची प्रदर्शनेही भरविली. रसिकांना हे नवीनच होते. मी सुद्धा हे वाचल्यापासून माझी कावळ्याकडे बघण्याची दृष्टीच बदलली. खरंच त्यांच्या व्यंगचित्रांनी कॉमन मॅनला पण दृष्टी दिली, शिकविलं. असा हा कलाकार म्हणजे एक लखलखता हिराच. हे लखलखलेपण आज निस्तेज झालं आहे.


-  डॉ.नयना कासखेडीकर