Thursday 27 August 2020

विचार–पुष्प, भाग-४३

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका   

                                विचार–पुष्प, भाग-४३   


                                आशिया ते अमेरिका प्रवास

       परिव्राजक म्हणून स्वामी विवेकानंद या आधी भारतात हवे तसे फिरले होते. पण हा प्रवास तसा नव्हता, आजही ते परिव्राजक होते, पण ही भ्रमंती ठरल्याप्रमाणेच, ठरलेल्या दिशेने आणि एका शिस्तीनेच करायची होती. तेरा हजार किलोमीटर अंतरावर जायचे होते.भारत भ्रमणात दरवेळी फिरताना त्यांच्याकडे सामान नसे. आता मात्र समान होते आणि पैसेही होते गरज म्हणून. सोय म्हणून. विवेकानंदांना याची सवय नव्हती. जहाजाचा प्रवास, सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, वागण्या बोलण्यातले शिष्टाचार पाळणे याला ते हळूहळू सरावले.

त्यांच्या या पी अँड ओ कपंनीच्या पेनिन्शूलर जहाजातून याच वेळी मुंबईचे शेठ छबिलदास जपानला आणि भारतातील औद्योगिक युगाचे प्रवर्तक मानले जाणारे सर जमशेटजी टाटा शिकागोसाठीच प्रवास करत होते. एक आठवड्याने पहिला पडाव झाला एक दिवसाचा सिलोन म्हणजे श्रीलंकेतील कोलंबो इथं.विवेकानंद शहरातून फिरून आले, एका बुद्धमंदिरात निर्वाण अवस्थेत शांतपणे पहुडलेली गौतम बुद्धाची प्रचंड मूर्ति त्यांनी पाहिली.

नंतर जहाज पेनांगला थोडा वेळ थांबून, हाँगकाँगला आले. सिंगापूर, मलाया, सुमात्रा यांचे दर्शन जहाजावरूनच झाले होते. हाँगकाँगला त्यांना खलाशी, कामगार, तिथले लोक यांचा व्यवहार पाहून तिथल्या दारीद्र्याची कल्पना आली. स्त्रियांची स्थिति समजली .अनेक गोष्टींची निरीक्षणे त्यांनी केली. चीनी मंदिरे आणि भारतीय मंदिरे पाहिली. कॅन्टनमध्ये चीनमधला पहिला बुद्धधर्मीय सम्राट आणि त्याचे पाचशे शिष्य यांच्या स्मरणार्थ उभे केलेले सर्वात मोठे बुद्धमंदिर पहिले. पण इथला बौद्ध मठ कसा असतो याची त्यांना उत्सुकता होती,

  इथे एक मजेदार घटना घडली. गाईडने बुद्ध मठाजवळ विवेकानंदांना नेलं, पण कुणाला आत प्रवेश नव्हता. विवेकानंदांनी कसेबसे त्याला मनवून आत प्रवेश केला तेव्हाढ्यात आतून दंडुके घेऊन काही लोक आले. बरोबरचे प्रवासी बाहेर पाळले, पण विवेकानंद यांनी त्या माणसाचा हात धरून ठेवला आणि त्याला म्हटले, चीनी भाषेत भारतीय योगी याला काय शब्द आहे? त्याने शब्द सांगितला. विवेकानंद जागचे हलले नाहीत. ठामपणे उभे राहिले आणि धावत येणार्‍या लोकांना त्या शब्दात आपण भारतीय योगी आहोत हे मोठयाने सांगितले. तसे चमत्कार झाला, सर्वांनी दंडुके खाली घेतले आणि सर्वजण नम्रपणे उभे राहिले.त्या मठवासी लोकांनी विवेकानंदांना हात जोडून विनंती केले की,भुते खेते आणि पिशाच्च यांची बाधा होऊ नये म्हणून तुम्ही ताईत द्यावेत . विवेकानंदांचा यावर अजिबात विश्वास नव्हता. पण हा विचार करण्याची ही वेळ नव्हती. त्यांचे समाधान करणे भाग होते. विवेकानंदांनी जवळचा कागद काढला, दोन तुकडे केले, त्यावर आडव्या उभ्या रेघा मारल्या, मधोमध ओम अक्षर लिहिले. आणि त्यांना दिले. त्याबरोबर त्यांनी आदराने तो घेतला आणि कपाळाला लावला. हे त्यांचे अज्ञान बघून विवेकानंदांना खूप कीव आली. याच जोडीला त्यांचे दारिद्र्य, अस्वच्छता हेही दिसले. नंतर त्या लोकांनी मठाच्या आतील भागात नेले तिथे, जुन्या हस्तलिखित पोथ्या ठेवल्या होत्या.त्या संस्कृतमध्ये होत्या आणि लिपी बंगाली होती. याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं. तिथे बुद्ध मंदिरात पाचशे अनुयायांपैकी काहींचे चेहरे विवेकानंदांना बंगाली वाटले होते. मग त्यांच्या लक्षात आले की, बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतातून जे भिक्षू गेले होते त्यापैकी अनेक बंगाल मधून गेले असले पाहिजेत. 

   हाँगकाँग सोडल्यानंतर जहाज नागासकी बंदरात थांबले होते. जपान मध्ये शिरताच त्यांना चीन आणि जपान यातला प्रचंड फरक जाणवला होता. त्यांना जपान मध्ये दिसलं होतं, स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रत्येक बाबतीतली सौंदर्य दृष्टी, आधुनिक विज्ञानाचा केलेला स्वीकार, याचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला होता.सरळ आणि रुंद रस्ते, शहराची नीटशी रचना, घराभोवती बगीचे, अशा शिकण्यासारख्या अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यांना मनोमन वाटलं की जास्तीत जास्त भारतीय तरुणांनी जपानला एकदा तरी भेट दिली पाहिजे, इथेही त्यांना जपानी मंदिरांमध्ये भिंतीवर जुन्या बंगाली लिपीत संस्कृत मंत्र लिहिलेले आढळले. चीन आणि जपान हे दोन्ही देश भारताशी नातं सांगणारे दिसले. भारताकडे आदराने पहाणारे दिसले. पण भारताची आजची स्थिति विवेकानंदांनी पाहिली होती. याची तुलना त्यांनी लगेच केली. त्यांनी इथूनच लगेच शिष्यांना एक पत्र लिहिलं आणि परखडपणे म्हटलं की,  "जरा इकडे या, हे लोक पहा आणि शरमेने आपली तोंडे झाकून घ्या. पण परंपरेने गुलाम असलेले तुम्ही इकडे कसे येणार?तुम्ही जरा बाहेर पडलात की लगेच आपली जात गमावून बसाल. गेली कित्येक शतके आपण काय करीत आलो आहोत?. "                

आशियामधून अजून जहाज बाहेर पडायचे होते, नव्या जगात पोहोचायला साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास अजून बाकी होता, पॅसिफिक महासागर पार व्हायचा होता. तोवरच विवेकानंदांनी मनातली ही व्यथा आपल्या शिष्यांना पत्रातून कळवली होती.

     चौदा जुलैला योकोहामाला जहाज बदलून 'एम्प्रेस ऑफ इंडिया' या जहाजात ते बसले. आशिया खंडाला मागे टाकून, पॅसिफिक महासागरातून नव्या दिशेकडे जहाज मार्गस्थ होत होते. भारतातून निघताना त्यांची तयारी अनुयायांनी छान करून दिली होती. पण त्यात गरम कपडे नव्हते. त्यामुळे हा थंडीतला प्रवास खूप त्रासदायक ठरला.

पंचवीस जुलै १८९३ला संध्याकाळी जहाज व्हंकुव्हरला पोहोचले. इथून रेल्वेने दुसर्‍या दिवशी शिकागोला जायचे होते. इथे पहिल्यांदा विवेकानंदांनी अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले.     

                         

   अमेरिकेचा भूप्रदेश, उंच उंच पर्वत, खोल दर्‍या, पांढर्‍या शुभ्र हिमनदया, घनदाट अरण्ये, अशी निसर्गाची अनेक रुपे बघून त्यांचे मन प्रसन्न झाले. शिकागोकडे जाणार्‍या, या गाडीत अनेक देशांचे प्रवासी बसले होते. त्यात केट सॅनबोर्न ही पन्नाशीची बुद्धिवंत लेखिका होती, तिच्याशी विवेकानंद यांचा संवाद झाला. त्यांचा पत्ता घेतला. ओळख झाली. त्यांनी घरी येण्याचं निमंत्रण पण दिलं. ते पुढच्या मुक्कामात कामी आले.

    

केट सॅनबोर्न 
    तीस जुलैला विवेकानंद शिकागोला उतरले. इथल्या बारा दिवसांच्या सुरुवातीच्या वास्तव्यात एकामागून एक त्यांना धक्के बसले. पहिलं म्हणजे प्रचंड महागाई, रोज पाच डॉलर खर्च, दुसर म्हणजे सर्वधर्म परिषद सुरू होण्यास अजून पाच आठवडे बाकी आहेत, तिसरं म्हणजे या परिषदेला प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे असेल तर, कोणत्या तरी संस्थेचे अधिकार पत्र आवश्यक आहे, चौथं म्हणजे प्रतिनिधी म्हणून नाव नोंदविण्याची मुदतच संपली आहे. आता कोणालाही प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळणार नाही. आता पुढे काय? हे मोठे प्रश्न चिन्ह उभे होते.(यातील सर्व फोटो इंटरनेट वरुन साभार परत.) 

© डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

Tuesday 25 August 2020

विचार–पुष्प .भाग – ४२

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

                                       विचार–पुष्प .भाग – ४२ 

                                      सर्वधर्म परिषदेची तयारी
    संपूर्ण भारत भ्रमण करताना स्वामी विवेकानंद यांनी सत्ताधीशांपासून अगदी गरीब माणसापर्यंतचा भारत उघड्या डोळ्यांनी पाहिला. कान उघडे ठेऊन, त्यासर्वांशी त्यांच्या पातळीवरून संवाद साधला. हे सर्व अनुभव यायला वराहनगर मठ सोडून तीन साडेतीन वर्षाचा काळ मध्ये गेला होता. उघड्या आकाशाखाली आणि भव्य समुद्राने घेरलेल्या शिला खंडावर तीन दिवस तीन रात्री राहून चौथ्या दिवशी सकाळी नावेतून काही लोकांबरोबर स्वामीजी किनार्‍यावर परत आले. त्यांच्या भोवती गोळा झालेल्या लोकांनी त्यांना विचारलं, “तीन दिवस आपण त्या खडकावर कशासाठी ध्यानस्थ बसला होता? स्वामीजींनी त्यांना, आपण श्रीरामकृष्ण यांचे शिष्य आहोत हे सांगून, “गेली दोन अडीच वर्षे देशभर फिरत होतो, माझं मनही अनेक विषयांचा विचार करीत होतं. ज्या प्रश्नाचा शोध या सार्‍या भ्रमंतीत मी घेत होतो, त्याचं उत्तर मला त्या खडकावर मिळालं”. हे सांगितलं. स्वामीजींच्या जीवनातली ही सर्वात मोठी घटना होती. आज कन्याकुमारीच्या समुद्रातल्या त्या शिलाखंडाहून चिंतन करून उठलेले स्वामीजी आणि कलकत्त्याहून बाहेर पडलेले स्वामीजी ही दोन रूपं वेगळी होती. हे आतापर्यंतच्या प्रसंगावरून आपल्याला जाणवतेच.

                                    

   अध्यात्माबरोबरच त्यांच्यातल्या देशभक्तीचा विचार भ्रमण काळात पक्का होत गेला. खरं तर भारत देश पारतंत्र्यात होता, अन्याय अत्याचारांचा सामना करत होता. त्यासाठी अनेक चळवळी सुरू होत्या. पण स्वामीजींच्या मते ही अवस्था तात्पुरती असून आज ना उद्या संपेलच. पण, सर्वसामान्य जनतेची झालेली आजपर्यंतची उपेक्षा थांबवणं हे जास्त महत्वाचं वाटत होतं. त्यांच्या दृष्टीने इंग्रजी सत्ता हे याचं कारण नव्हतं. या उपेक्षेला त्यांच्या दृष्टीने समाजच जबाबदार होता.

आलसिंगा पेरूमाल 

  बेळगावच्या भेटीपासून त्यांचा रामेश्वर इथं जायचा विचार होता तो त्यांनी वेळोवेळी सांगितला होता. कन्याकुमारीहून ते रामेश्वर इथं जाऊन भगवान शिवाचं दर्शन घेऊन मनाशी केलेला संकल्प पूर्ण केला. तिथून ते पॉन्डिचरीला गेले. तिथे मन्मथनाथ भट्टाचार्य कामानिमित्त आलेले होते. त्यांच्याकडे स्वामीजी थांबले. त्यानंतर काम आटोपून दोघेही मद्रासला परतले, त्यांना घ्यायला मद्रास स्टेशनवर अलसिंगा पेरूमाल आणि त्यांचे मित्र आणि मन्मथनाथांच्या ओळखीचे  काही उच्चशिक्षित स्वागतासाठी हजर होते. दीड महिना स्वामीजी मद्रासला राहिले पण हे वास्तव्य त्यांना भविष्यातल्या कार्यारंभासाठी खूप महत्वाचे ठरले. त्यांना ह्या कामाला मदत करणारी माणसे प्रथम मद्रासलाच मिळाली. ती झोकून देऊन काम करणारी होती.

मद्रासला अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने होत होती, भेटी होत होत्या. श्रोत्यांवर त्याचा प्रभाव पडून तरुण वर्ग आकर्षित होत होता. प्रौढ आणि उच्च शिक्षित वर्ग ही आकृष्ट होत होता. तिथल्या एका साप्ताहिकात स्वामीजीन बद्दल लिहून आले. अशी प्रसिद्धी पहिल्यांदाच त्यांना मिळाली होती. एका ठिकाणी त्यांची प्रकट मुलाखत झाली त्यात तर त्यांना, वैदिक धर्माचे स्वरूप, हिंदुधर्मानुसार आदर्श मानवी जीवन, स्त्रीशिक्षण, श्राद्धासारखे धार्मिक विधी, यावरही प्रश्न विचारले लोकांनी. त्यांच्या कडून ऐकलेल्या विचारांच्या प्रकाशात पुढचे आयुष्य चालत राहण्याची जिद्द असणारे तरुण स्वामीजींना मद्रासला भेटले. त्यांना इथे अनुयायी मिळाले. केलेला संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठीचे पहिले पाऊल मद्रासला पडले होते. त्याला निमित्त झाले होते मन्मथबाबू भट्टाचार्य आणि आलसिंगा पेरूमाल.मंडम चक्रवर्ती आळसिंगा पेरूमाल हे त्यांचं नाव .

      म्हैसूरचे असलेले आलसिंगा पेरूमाल मद्रासला एका शाळेचे मुख्याध्यापक होते. वेदांताचे अनुयायी आणि कट्टर वैष्णवपंथी. गरीबी असली तरी ध्येयवादा मध्ये ती आली नाही. त्यांनी मुख्याध्यापक असूनसुद्धा स्वामीजींना अमेरिकेत जाता यावे म्हणून दारोदार फिरून पंचवीस पैशांपासून सामान्य लोकांकडून वर्गणी गोळा केली होती, आयुष्यात काहीतरी करावे असे त्यांना वाटत होते, ते स्वामीजींची भेट झाल्यावर त्याला दिशा मिळाली होती. अलसिंगांनी घेतलेल्या कष्टामुळे स्वामीजी अमेरिकेत जाऊ शकले.

    स्वामीजींचा मद्रासला असा मोठा जनसंपर्क झाला होता. ही ख्याती हैदराबादला जाऊन पोहोचली होती. आणि स्वामीजींनी हैदराबादला भेट द्यावी असे एक पत्र आल्याने स्वामीजींनी ते निमंत्रण स्वीकारलं. कमी वेळात इतकी सूत्र हलली, की हैदराबाद स्टेशन वर स्वामीजींना घ्यायला पाचशे माणसे आली होती. दुसर्‍या दिवशी सिकंद्राबादहून शंभर जण भेटायला आली आणि “आमच्या कॉलेज मध्ये एक प्रकट व्याख्यान द्यावे” असा आग्रह केला. विषय होता, पाश्चात्य देशात जाण्यातील माझा उद्देश’. या व्याख्यानाला हजार श्रोते उपस्थित होते. स्वामीजींच्या विवेचनात उदात्तता होती, तात्विक चिंतन होते, देशप्रेम होते, आपल्या मातृभूमीचं पुनरुत्थान आणि वेदवेदांन्तातील उत्कृष्ट तत्वे पाश्चात्य जगासमोर ठेवावीत अशी एक भारतीय धर्मप्रवक्ता म्हणून अमेरिकेला जाण्याची आपली भूमिका आहे, असे या व्याख्यानात स्वामीजींनी सांगितले. इथे दहा बारा दिवस ते राहिले. नुकतीच ते वयाची तिशी पूर्ण करत होते. हैद्राबादला पण सार्वजनिक व्यासपीठावर ते पहिल्यांदाच बोलले होते. सर्वा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी त्यांना आदराची वागणूक दिली. त्यांच्या विचारांचे स्वागत केले. ते पुन्हा मद्रासला परतले.

    अमेरिकेला जाण्याच्या संकल्पाला अजून श्री रामकृष्णांचा आदेश मिळत नव्हता, तोपर्यंत त्यांचे निश्चित होत नव्हते. त्यातच एक घटना घडली. त्यांना एकदा रात्री स्वप्न पडलं की आपल्या आईचं निधन झालं. त्यांना आईबद्दल खूप आदर आणि प्रेम होतं. पण घरदार सोडून आल्यामुळे आणि प्रपंचाच्या गोष्टीत अडकू नये म्हणून ते संपर्क ठेवत नसत. पत्रही पाठवत नसत. मन दोलायमान झाले, कलकत्त्याहून काहीतरी कळणे आवश्यक होते. हे त्यांनी मन्मथबाबूंना सांगितलं. मन्मथबाबूंनी मनाचे समाधान व्हावे म्हणून स्वामीजींना एका भविष्य सांगणार्‍या व्यक्तीकडे नेले. त्या सिद्ध माणसाने स्वामीजीची पूर्ण माहिती सांगीतली, धर्मोपदेशाच्या कामासाठी तुम्ही लवकरच कुठेतरी दूरदेशी जाल, तुमच्या बरोबर सतत तुमचे गुरु असतील आणि आई बद्दल विचारले आई कुशल आहे हे ही सांगीतले आणि स्वामीजींचा जीव भांड्यात पडला. मन हलक झालं. थोड्याच वेळात कलकत्त्याहून तार आली, भुवनेश्वरीदेवी कुशल आहेत. मनाचा वारू कसा धावत असतो. संवेदनशील मनात किती आणि कसे विचार येत असतात. त्याचा परिणाम कसा होतो हे स्वामीजींच्या या घटनेवरून दिसतो. हा एव्हढा उद्योग ते देशातील लोकांसाठी करत होते पण आई, जन्मदात्री माता, तिचं स्थान हृदयामध्ये कायम असतं. तिचा विसर जराही पडला नव्हता. हीच ती भारतीय मूल्यं. आज याची पण शिकवण गरजेची आहे.     

गुरुमाता सारदा देवी 
आई भुवनेश्वरी देवी 

  आता मन निश्चिंत झालं होतं. दूर जायचे तर गुरुमाता श्री सारदादेवींचा आशीर्वाद घेणं पण आवश्यक होतं. माताजींना पत्र लिहून आशीर्वाद मागितला. अमेरिकेला जाण्याचा संकल्प कळवला. त्यांनी आशीर्वादाचे पत्र पाठवले. हे पत्र मिळाले आणि स्वामीजीचे मन हर्षभरीत झाले. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. कोणाला कळू नये म्हणून स्वामीजी समुद्रावर एकटेच गेले आणि मन शांत झाल्यावर परत आले. तोवर सर्व भक्तगण जमा झाले होते. “माताजींनी आशीर्वाद दिला आहे, आता कोणतीही अडचण नाही. निर्णय ठरला. मी सर्वधर्म परिषदेला अमेरिकेस जाणार”हे जाहीर केले. अनुयायी तर खूप खुश झाले. निधि संकलन कामाला जोरात सुरुवात झाली. आता एकदम दिशाच बदलून गेली. उत्साहाचे वातावरण तयार झाले. पैसे गोळा करण्याचा प्रयत्न अलसिंगा यांच्या पुढाकाराने जोरदार सुरू झाला.

    एक दिवस अचानक खेतडीचे महाराज राजा अजितसिंग आणि त्यांचे सचिव जगमोहनलाल स्वामीजींना भेटायला दत्त म्हणून हजर.अजितसिंग यांना मुलगा झाला होता आणि त्याप्रीत्यर्थ त्यांनी एक समारंभ ठेवला होता. त्यासाठी स्वामीजींना आमंत्रण द्यायला स्वत: आले होते.पण आपण ३१ मेला अमेरिकेला जाण्याच्या गडबडीत आहोत त्यामुळे शक्य नाही होणार असे स्वामीजींनी सांगीतले, जगमोहनलाल यांनी आपण एक दिवस तरी यावे असा आग्रह केला आणि आपण पश्चिमेकडे जाणार आहात हे महाराजांना खूप आवडले आहे. जो काही पैसा लागेल तो महाराज व्यवस्था करतील, आपण फक्त चलावे असे म्हटले.

    आतपर्यंत म्हैसूर बंगलोर, हैद्राबाद इथून काही पैसे गोळा झाले होते.म्हैसूरच्या राजांनी पण मोठी रक्कम दिली. स्वामीजींचा खेतडीला जाण्याचं बेत ठरला आता पैसे गोळा करण्याचे प्रयत्न कराची आवश्यकता नव्हती. अलसिंगा आनंदित झाले, स्वामीजींची आर्थिक सोय पूर्ण होणार होती. स्वामीजी सर्वांचा निरोप घेऊन जगमोहनलाल यांच्या बरोबर खेतडीला निघाले. मुंबईहून जहाजाने अमेरिकेला निघण्याचे आधीच ठरले होते. त्यासाठी मुंबईत काही तयारीसाठी स्वामीजी थांबले. तिथे ब्रम्हानंद, तुरीयानंद यांची भेट झाली.स्वामीजींच्या जाण्याची बातमी सगळीकडे पोहोचली.

    स्वामीजी खेतडीला समारंभाला पोहोचले. समारंभ थाटामाटात पार पडला. स्वामीजींनी नव्या युवराजांना  आशीर्वाद दिले. या मुक्कामात आणि याआधीही स्वामीजींच्या महाराजांशी घरगुती गप्पा पण व्हायच्या. श्रीरामकृष्ण यांची समाधी घरदारचे पाश तोडून बाहेर पडणे हा इतिहास महाराजांना माहिती होतं. संन्यास घेतला तरी मनाच्या कोपर्‍यात भावंडांची काळजी, आईची मनाची चिंता आणि त्यांचे कसे चालले आहे याचं शल्य त्यांना बोचत होतं हे महाराजांना माहिती होतं. बोलता बोलता मद्रासला आताच पडलेल स्वप्न कदाचित महाराजांना स्वामीजींनी संगितले असेल, महाराज अजितसिंग यांचं मनही द्रवलं. स्वामीजींचे मन किती पोळत असेल या विचारांनी असं अजितसिंग यांच्याही मनात आलं. त्यांनी स्वामीजींना आश्वस्त केलं, “मी तुमच्या मातोश्रींना दरमहा शंभर रुपये पाठवत जाईन. आपण ही चिंता मनातून काढून टाका”. हे उत्स्फूर्त बोलणे ऐकून क्षणभर स्वामीजी आनंदित झाले. नरेंद्रने घर सोडल्यावर सात वर्षानी ही अडचण दूर होणार होती.तेही अजितसिंग यांच्या औदार्यामुळे. पुढे स्वामीजींनी त्यांना पत्र पाठवून म्हटले आहे की, मी जो काही आज या जगत आहे तो तुम्ही केलेल्या सहाय्यामुळे आहे. एका घोर चिंतेतून मुक्त होणं हे मला तुमच्यामुळे शक्य झाले. त्यामुळे मी जगाला सामोरे जाऊ शकलो. ही मदत अजितसिंग यांच्याकडून १९०१ पर्यन्त त्यांचे निधन होईपर्यंत शंभर रुपये दरमहा मिळत होते. त्यामुळे स्वामीजींची खेतडीची ही भेट महत्वाचीच ठरली होती.  

स्वामीजींची सर्व व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी जगमोहनलाला यांना त्यांच्या बरोबर मुंबईला पाठवले होते. अमेरिकेला जाताना, अंगावर गुढग्यापर्यन्त पोहोचणारा रेशमी झुळझुळीत भगव्या रंगाचा झगा, कमरेभोवती गुंडाळलेला तशाच रंगाच्या कापडाचा आडवा पट्टा, आणि मस्तकावर केशरी रंगाचा फेटा, हा विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला शोभून दिसणारा वेष, ही राजा अजितसिंग यांनी दिलेली एक राजेशाही देणगी होती आणि विविदिशानंद चे स्वामी विवेकानंद हे नाव सुद्धा खेतडीच्या अजितसिंगानीच अमेरिकेला जाताना बदलायला लावले होतं.   

मुंबईला मद्रासहून आलसिंगा आले होते, मुंबईला जगमोहनलाल यांनी बाजारात नेऊन स्वामीजींना झगा आणि फेटा यासाठी उत्तम भारीपैकी रेशमी कापड घेतलेतसेच तुम्ही महाराजांचे गुरु आहात महाराजांना शोभेल अशा राजेशाही थाटात तुमचा प्रवास झाला पाहिजे.म्हणून जहाजाचे आधीचे दुसर्‍या वर्गाचे तिकीट बदलून त्यांनी पहिल्या वर्गाचे तिकीट काढून दिले. आपल्या गुरुच्या व्यवस्थेत काहीही कमी पडू दिले नाही महाराजांनी .

   ३१ मे या दिवशी विवेकानंद यांनी मुंबई सोडली.पी अँड ओ कंपनीच्या पेनिन्शूलर जहाजातून ते जाणार होते. थेट जहाजपर्यंत सोडायला अलसिंगा आणि जगमोहनलाल गेले होते. भोंगा वाजला, दोघांनी स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला. दोघांच्याही डोळ्यात आसवं तरळली. स्वामीजी अखेर अमेरिकेला निघाले हे पाहून अलसिंगांना आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान झाले. जहाजाने किनारा सोडला. विवेकानंदांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा मागे पडला होता आणि जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली होती.      

© डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

 

Monday 24 August 2020

हलधारी बलराम

हलधारी बलराम 

श्रीकृष्ण आपल्या सर्वांच्या मनावर राज्य करतो आहे गेली अनेक वर्षे. त्याच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण त्याचा भाऊ बलराम याबद्दल फारशी माहिती नाही. यदू कुळात जन्मलेला बलराम म्हणजेच बलभद्र हा कृष्णाचा मोठा (सावत्र) भाऊ. कृष्णाला विष्णुचा अवतार, तर बलरामला शेषनाग अवतार मानले जाते. दोन्ही भावांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. प्रत्येक अडचण आणि संकटाच्या वेळी श्रीकृष्णाच्या बरोबर बलराम असायचा.बलरामाची हलधर, हलायुध, आणि संकर्षण ही नावे पण आहेत. बलरामाला सात सख्खे भाऊ आणि एक बहीण सुभद्रा होती. त्याची पत्नी रेवती. रेवती ही रेवत राजाची कन्या होती. बलरामाच्या शक्तीच्या अनेक आख्यायिका आहेत. बलवानांमधला तो सर्व शक्तिवान होता म्हणून त्याला बलभद्र पण म्हणतात. लहानपणापासूनच तो शांत आणि गंभीर वृत्तीचा होता. कृष्ण त्याचा सदैव आदर करत असे.
Add caption

महाभारतातील युद्धात काहीजण सामील झाले नव्हते त्यात बलराम हा सुद्धा एक होता. 

उत्तरेत बलरामाला बलदाऊ म्हणतात. बलदाऊ शक्तीशाली होता.नांगर हे बलरामाचे हत्यार असून खांद्यावर घेऊन तो हिंडत असे. त्याचा पराक्रम पुराणातल्या अनेक कथांमध्ये वर्णन केला आहे. त्याने जरासंधला अनेक वेळा पराजित केले होते. तो गदा युद्धात विशेष प्रवीण होता. शिवाय तो उत्तम कुस्तीपटू होता आणि मुष्टियुद्धातही तरबेज होता. कंसाच्या तालमीमध्ये कृष्णाने चाण्णूरला तर बलरामाने मुष्टिकाला ठोसे मारून ठार मारले होते. त्याने अनेक लढाया लढल्या होत्या. दुर्योधन त्याचा शिष्य होता. महाभारताच्या युद्धात कृष्णाने विनंती करूनही त्याने भाग घेतला नाही, कारण त्याच्या मते, दुर्योधन आणि अर्जुन आमचे चांगले मित्र आहेत.अशा धर्म संकटावेळी दोघांचीही बाजू न घेणंच उत्तम.

एकदा युद्धाची तयारी चालू असताना एक दिवस बलराम पांडवांच्या छावणीत अचानक पोहोचले. दाऊभैय्याला पाहून श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर आनंदीत झाले. सर्वांनी त्यांना वंदन केले. बलराम धर्मराजाच्या जवळ बसले आणि दु:खी अंतकरणाने म्हणाले, मी किती वेळा कृष्णाला सांगितलं की, पांडव आणि कौरव दोन्हीही आम्हाला सारखेच आहेत. दोघांनीही मूर्खपणा करायचे ठरवले आहे. त्यात आपल्याला पडायची आवश्यकता नाही. पण कृष्ण माझं ऐकेल तर ना? कृष्णाचं अर्जुनावर इतकं प्रेम आहे की तो कौरवांच्या विरुद्ध बाजूने लढणार आहे. आता ज्या पक्षात कृष्ण आहे त्याच्या विरुद्ध पक्षात मी कसा जाऊ? भीम आणि दुर्योधन या दोघांनीही माझ्याकडूनच तर गदा शिकली आहे. दोघेही माझे शिष्य आहेत. दोघांवरही माझे सारखेच प्रेम आहे. या दोघा कुरुवंशाचे आपसात लढणे मला मनाला पटत नाही. त्यामुळे मी तीर्थयात्रेला चाललोय.असे सांगून तो युद्ध सुरू होण्यापूर्वीच तीर्थयात्रेला निघून गेला. 

आपापसातील यादवीमुळे यदूवंशाचा नाश झाला तेंव्हा बलरामाने आपला अवतार संपवला असे म्हणतात. मथुरेजवळ बलदेव शहरात, बलरामाचे मंदिर आहे.मथुरेमध्ये हे सर्वात प्राचीन असे वल्लभ संप्रदायचे मंदिर मानले जाते. ते यमुनेच्या काठावर वसले आहे. या गावात बलदेवाचे राज्य होते, त्याचे शासन होते. त्यामुळे मथुरा आणि आसपासच्या गावात त्याला दाऊजी पण म्हटले जाते. त्या मंदिरात भगवान बलदेव आणि रेवतीची मूर्ती आहे. असं म्हणतात की, त्या मूर्ती इ.स. १५८० च्या आसपास तयार केल्या गेल्या. तिथेच बलभद्र सरोवर पण आहे. दर मार्गशीर्ष पौर्णिमेला मोठा उत्सव भरतो.इथे होळी (हुरंगा)आणि दीपावली तसेच गुरु पौर्णिमा उत्साहाने साजरे केले जातात. 

ओरिसा राज्यातील पुरी येथे मोठा रथयात्रेचा ऊत्सव साजरा केला जातो.भारतातले हे एक प्रसिद्धमंदिर आहे. लाखो भाविक येथे यात्रेच्या वेळी येतात. आणि जगन्नाथाचे दर्शन घेतात. जगन्नाथपुरी च्या त्रिमूर्ति मधे कृष्ण, सुभद्रा आणि बलराम तिघेही विराजमान असतात. दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयाच्या दिवशी रथयात्रा सुरू होते. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची मूर्ती नीमवृक्षाच्या लकडापासून बनवली जाते. विविध रंग, फुलाने, रत्न, दागिन्याने सजवले जाते. पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचं सांगितलं जातं. दरवर्षी ओडिशाच्या पुरी इथं असलेल्या जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते. हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव असतो. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितियेला ही रथयात्रा संपन्न होते.
जगन्नाथ मंदिर देशातील चार धाम पैकी एक आहे. भगवान जगन्नाथची रथयात्रा जगन्नाथपुरी येथे आषाढ शुक्ल द्वितीयापासून सुरू होते आणि दशमी तिथीला संपते.

Add caption

रथयात्रा फक्त भारताताच नाही तर संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरी केली जाते. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी पुरी येथे जगभरातून भाविक दाखल होतात. ओडिशातील पुरी इथल्या रस्त्यावरून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची भव्य रथयात्रा काढली जाते. या पवित्र यात्रेत भगवान बालभद्रचा रथ सर्वात पुढे असतो, याला तालध्वज म्हटलं जातं. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो याला दर्पदलन किंवा पद्मा रथ असं संबोधलं जातं. सर्वात शेवटी भगवान जगन्नाथाचा रथ असतो, ज्याला नंदी गरुडध्वज म्हटलं जातं.

ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते. गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही तीन भावंडे तीन रथांत बसून जातात, अशी यामागील धारणा आहे. पैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बाकीचे दोन रथ थोडे लहान असतात. सिंहद्वार येथून देव आपआपल्या रथात बसून निघतात. भारतभरांतून आणि परदेशांतूनही आलेली सर्व जाति-धर्म-संप्रदायांची भक्त मंडळी मिळून हे रथ ओढतात. जनकपुरी येथे भगवान तीन दिवस लक्ष्मीसन्निद्ध राहतात अशी व्यवस्था आहे. या उत्सवात विविध धार्मिक विधी संपन्न होतात. खरं पाहिलं तर ही रथयात्रा भगवान विष्णूचे अवतार जगन्नाथ देवालाच समर्पित असते.

बलरामाच्या खांद्यावर असलेला नांगर कृषीचा अर्थात धनशक्तीचं प्रतीक आहे. तर मुसळ हे बळाचं म्हणजेच संघटनशक्तीचं म्हणजेच जनशक्तीचं प्रतीक आहे. म्हणजेच बलरामांचे नांगर हे नवनिर्मितीचं, सृजनाचं तर मुसळ हे दुष्टांच्या निर्दालनाचं व सज्जनांच्या रक्षणाचं आश्वासक प्रतीक आहे.

जयदेव यांनी आपल्या 'गीत गोविंद' या काव्यात म्हणलं आहे की, ‘केशव धृतहलधर रूप धरे, जय जगदीश हरे’। म्हणजेच जगदीश्वराने हलधारी बलरामाचं रूप धारण केलं आहे. त्यावरून आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की, हलधर हा जगदीश्वर आहे, म्हणजेच आपल्या देशातला शेतकरी हाच भारताचा भाग्यविधाता आहे.

अशा या बलरामांना जयंती निमित्त अभिवादन!

©डॉ.नयना कासखेडीकर

Wednesday 19 August 2020

विचार–पुष्प, भाग -४१

      ‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

                                  विचार–पुष्प, भाग -४१ 
                                                   
 
                                 परिव्राजक १९. कन्याकुमारी 

 स्वामीजी धारवाड, बंगलोर करत करत म्हैसूरला आले. म्हैसूर संस्थांचे दिवाण सर के. शेषाद्री अय्यर यांच्याकडे स्वामीजी राहिले होते. त्यांनी म्हैसूर संस्थानचे महाराज चामराजेंद्र वडियार यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी स्वामीजींना संस्थानचे खास अतिथि म्हणून राजवाड्यावर ठेऊन घेतले. एव्हढी सत्ता आणि वैभव असलेल्या या तरुण महाराजांना धर्म व तत्वज्ञान याविषयी आस्था होती. म्हैसूर हे भारतातील सर्वात मोठ्या संस्थांनांपैकी एक होते. इथे अनेक विषयांवर स्वामीजी बरोबर चर्चा आणि संवाद घडून येत. 
महाराज चामराजेंद्र वडियार 
   महाराजांशी स्वामीजींचे चांगले निकटचे संबंध निर्माण झाले होते. त्यांनी एकदा स्वामीजींना विचारलं स्वामीजी मी आपल्यासाठी काय करावं ? त्यावर तासभर झालेल्या चर्चेत स्वामीजी म्हणाले, “भारताचा अध्यात्म विचार पाश्चात्य देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान घेतले पाहिजे. आपल्या समजतील सर्वात खालच्या थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे आणि धर्माची खरी तत्वे सामान्य माणसाला समजून सांगितली पाहिजेत. शिकागोला जाण्याचा विचार ही त्यांनी बोलून दाखवला होता, यावर महाराजांनी आवश्यक ती सर्व मदत तत्काळ करण्याची तयारी दाखवली होती पण, स्वामीजींनी प्रत्येक वेळेसारखा इथेही नकार दिलेला दिसतो. तरीही महाराजांनी स्वामीजींनी त्यांच्या आवडीची भेटवस्तू आमच्या कडून घ्यावी याचा खूप आग्रह केला आणि बाजारात कारकूनाबरोबर एक हजार रुपये देऊन स्वामीजींबरोबर पाठविले. त्यामुळे स्वामीजी त्यांच्या कौतुकासाठी सर्व बाजार फिरले आणि त्यांना बरं वाटावं म्हणून एक सर्वात उत्तम सिगारेट घेतली. ती एक रुपयाची होती. ती तिथेच ओढून संपवली. असे हे निरिच्छ वृत्तीचे स्वामीजी राजेरजवाड्यात पाहुणचार घेत ठिकठिकाणी राहिले होते पण, तेंव्हाही त्यांच्या डोळ्यासमोर खेडोपाड्यातली दरिद्री जनता आणि राज्यकर्त्याकडून दीन दुबळ्या प्रजेचे काहीतरी कल्याण होईल एव्हढाच विचार असायचा. 
म्हैसूर राजवाडा 

   क्वचित एखादाच राजा हे करू शकतो असा त्यांचा अनुभव होता. त्यातलेच हे म्हैसूरचे महाराज होते. त्यांना स्वामीजींनी शिकागोहून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे “हे उदार महाराजा, मानवाचे जीवन फार अल्पकालीन आहे आणि या जगात हव्याशा वाटणार्याट सुखाच्या गोष्टी केवळ क्षणभंगुर आहेत. पण जे इतरांसाठी जगतात तेच खर्‍या अर्थाने जगतात. भारतातील तुमच्यासारखा एखादा सत्ताधीश जर मनात आणेल, तर तो या देशाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी महान कार्य करू शकेल. त्याचे नाव पुढच्या पिढ्यांत पोहोचेल आणि जनता अशा राजाबद्दल पूज्यभाव धरण करेल”. यावरून स्वामीजीं स्वत:साठी काहीही मागत नसत. महाराजांनी स्वामीजींची पाद्यपूजा कराची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. शेवटी त्यांनी स्वामीजींचा आवाज एखादी आठवण म्हणून ध्वनीमुद्रित करून द्यावा अशी कल्पक मागणी केली. त्याला होकार दिला आणि त्या वेळच्या फोनोग्रामच्या तबकडीवर चार पाच मिनिटांचे बोलणे रेकॉर्ड करून घेतले. बर्‍याच  वर्षांनंतर तो पुसट झाला. मग महाराजांचा निरोप घेऊन स्वामीजी केरळ प्रदेशात गेले. 


 त्रिचुर, कोडंगल्लूर,एर्नाकुलम, कोचीन इथे फिरले. केरळ, मलबार या भागातल्या जुनाट चालीरीती आणि ख्रिस्त धर्मी मिशनर्यांंचा तिथे चाललेला धर्मप्रचार या गोष्टी स्वामीजींच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटलं की हिंदू धर्माच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही. स्वामीजींना उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आलेले अनुभव वेगळे होते. त्यांच्या लक्षात आले की, दक्षिणेत पाद्री लोक खालच्या वर्गातील लाखो हिंदूंना ख्रिस्त धर्मात घेत आहेत. जवळ जवळ एक चतुर्थांश लोक ख्रिस्त धर्मात गेले आहेत. (असा स्पष्ट उल्लेख स्वामीजींच्या चरित्र ग्रंथात आहे). 

 कोचीनहून स्वामीजी त्रिवेंद्रमला आले. एर्नाकुलम पासून त्रिवेंद्रम सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर, बैलगाडी आणि पायी प्रवास करताना केरळचं निसर्ग वैभव त्यांना साथ करत होतं. आंबा, फणस, नारळ यांची घनदाट झाडी, लहान मोठ्या खाड्या, पक्षांचे मधुर आवाज असा रमणीय रस्ता स्वामीजी चालत होते.
सुंदरराम 
    त्रिवेंद्रमला स्वामीजी सुंदरराम यांच्याकडे राहत असताना घरातील लहान, मोठे, नोकर, चाकर यांच्याशी पण मनमोकळे बोलत असत. एकदा, सुंदरराम यांचा चौदा वर्षांचा मुलगा रामस्वामी याला स्वामीजी म्हणाले, “तू अगदी तरुण आहेस,लहान आहेस. माझी फार इच्छा आहे की तू कधीतरी उपनिषदं, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता यांचा निष्ठापूर्वक अभ्यास कर. या तिन्हीना मिळून प्रस्थानत्रयी म्हणतात. त्याच बरोबर इतिहास पुराणाचा पण अभ्यास कर. या तोलामोलाचे ग्रंथ तुला सार्या जगात दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत. कोणतीही गोष्ट कशामुळे निर्माण झाली, तिचं पर्यवसान कशात होणार, ती का अस्तित्वात आली आणि तिची दिशा कोणती? हे जाणून घेण्याची जिज्ञासा केवळ मानवप्राण्यातच असू शकते तिचा पूर्ण उपयोग करून घे”. 

   कन्याकुमारी भारत वर्षाच्या दक्षिणेचे शेवटचे टोक. त्रिवेंद्रम हून नव्वद किलोमीटर. डिसेंबरला त्रिवेंद्रमहून स्वामीजी निघाले आणि कन्याकुमारीला पोहोचले. संपूर्ण वंदेमातरम या गीतातलं मातृभूमीचं वर्णन स्वामीजींनी ऐन तारुण्यात ऐकलं होतं. याच वर्णनाचा भारत देश स्वामीजींनी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे हजारो किलोमीटर प्रवास करून पालथा घातला होता. डोळ्यात साठवून ठेवला होता. अशी ही स्वदेशाची आगळीवेगळी यात्रा करायला त्यांना अडीच वर्ष लागली होती. कन्याकुमारीच्या आपल्या मातृभूमीच्या दक्षिण टोकावरच्या खळाळत्या लाटांच्या हिंदुमहासागराला ते भेटणार होते आणि या अथांग सागराला वंदन करून आपल्या विराट भ्रमणाची पूर्तता करणार होते. 
कन्याकुमारी देवी 
    स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरातील कालीमातेचं/जगन्मातेचं दर्शन घेऊन परिव्राजक म्हणून प्रवास सुरू केला तो आता कन्याकुमारी मंदिराच्या दर्शनाने संपणार होता. या मंदिरात स्वामीजी गेले आणि कन्यारूपातील जगन्मातेचं दर्शन घेऊन बाहेर आले. तशी समोर लांबवर नजर गेली, दीड फर्लांग अंतरावर दोन प्रचंड शिलाखंड दिसले. आपल्याच भूमीवरच्या या शिलाखंडावर जायची त्यांना मनोमन इच्छा झाली. तिथे गेलो तर खर्याह अर्थाने मातृभूमीचे दक्षिण टोक आपण गाठले असा अर्थ होईल. म्हणून कसही करून त्या खडकांवर आपण जाव असं वाटून ते किनार्याअवर आले. जवळच होड्या होत्या. काही कोळी पण उभे होते. स्वामीजींनी चौकशी केली. त्या नावेतून खडकापर्यंत पोहोचविण्यास नावाडी तयार होते, फक्त पैसे द्यावे लागणार होते. स्वामीजी तर निष्कांचन होते. एक पैसा सुद्धा जवळ नव्हता. झळ त्यांनी त्या उंच लाटांमध्ये उडी घेतली पोहत पोहत जाऊन ते खडक गाठले. समुद्राला रोजचे सरावलेले असतांनाही नावाडी स्तब्धच झाले. लाटा उसळणार्याऊ तर होत्याच पण तिथे शार्क माशांपासून पण धोका होता हे त्यांना माहिती होतं. हे पाहून दोन तीन नावाडी पाठोपाठ गेले. सुखरूप पोहोचले हे बघून, त्यांना काही हवे का विचारले. आम्ही आणून देऊ असे सांगीतल्यावर थोडे दूध आणि काही शहाळी पुरेशी आहेत असे स्वामीजींनी सांगितले. स्वामीजी या शिलाखंडावर तीन दिवस, तीन रात्र राहिले.


     लाटांच्या अखंड गंभीर नादाबरोबर स्वामीजींचे चिंतन सुरू झाले. कलकत्त्यातून बाहेर पडल्यापासुनचे सर्व दिवस, त्यात आलेले अनुभव, सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. जगन्मातेचं ध्यान आणि भारत मातेचं चिंतन तीन दिवसात झालं. 

   प्रश्नचिन्ह – प्राचीन इतिहास असलेला हा विशाल देश, इतिहासाचे केव्हढे चढउतार, सार्याि जगाला हेवा वाटेल असे प्राचीन काळातील द्रष्ट्या ऋषीमुनींनी दिलेले आध्यात्मिक धन. पण तरीही आज भारत कसा आहे? त्याची अस्मिताच हरवलेली दिसत आहे. सगळ्या मानव जातीने स्वीकारावीत अशी शाश्वत मूल्यं पूर्वजांकडून लाभली आहेत तरीही त्यातल्या तत्वांचा त्याला विसर पडला आहे. अभिमान वाटावा असं भूतकाळाचा वारसा आहे पण वर्तमानात मात्र घोर दुर्दशा आहे. यातून समाजाचं तेज पुनः कसं प्रकाशात आणता येईल? अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधायची होती. उपाय शोधायचे होते. 

    आपल्या समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य दूर कसे होईल आणि भारताचे पुनरुत्थान कसे होईल?त्याच्या आत्म्याला जाग कशी येणार? याच प्रश्नावर जास्त वेळ चिंतन करत होते. 

आज या शिलाखंडावर विवेकानंद स्मारक उभे आहे  
    प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले उदात्त आध्यात्मिक विचार आणि जीवनाची श्रेष्ठ मूल्ये खालच्या थरातील माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. सामान्य माणसाच्या सेवेसाठी आणी उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचा असा स्वामीजींचा निर्णय झाला. हे करण्यासाठी पाच दहा माणसं आणि पैसा हवाच. पण या दरिद्री देशात पैसे कुठून मिळणार? त्यांना आलेल्या अनुभवा नुसार धनवान मंडळी उदार नव्हती. आता अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरते आहे. तिथे जाऊन त्यांना भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि तिकडून पैसा गोळा करून आणून इथे आपल्या कामाची ऊभारणी करावी. आता उरलेले आयुष्य भारतातल्या दीन दलितांच्या सेवेसाठी घालवायचे असा संकल्प स्वामीजींनी केला आणि शिलाखंडावरून ते परतले. तीन दिवस तीन रात्रीच्या चिंतनातून प्रश्नाचं उत्तर स्वामीजींना मिळालं होतं.

 © डॉ.नयना कासखेडीकर

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा


Sunday 16 August 2020

विचार–पुष्प, भाग - ४०

 ‘स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

                विचार–पुष्प, भाग - ४०                            

 

             परिव्राजक १८. गोमंतक

 बेळगावहून स्वामीजी मार्मा गोवा मेलने निघाले आणि मडगाव येथे उतरले. बेळगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर विष्णुपंत शिरगावकर यांनी गोव्यातल्या व्यवस्थेसाठी मडगाव इथले त्यांचे विद्वान मित्र सुब्राय लक्ष्मण नायक यांना परिचय पत्र दिले होते आणि स्वामीजींची निवास आणि भोजन व्यवस्था करायला सांगितली होती. स्वामीजींना घ्यायला स्टेशनवर नायक स्वत: जातीने हजर होते, तेही शेकडो लोकांच्या समवेत. आणि काय आश्चर्य त्यांनी स्वामीजींना घोडा गाडीतून मिरवणूक काढून समारंभपूर्वक घरी नेले. हे सर्व स्वामीजींना खूपच अनपेक्षित होते. आयुष्यात त्यांना असा अनुभव प्रथमच आला होता. स्वामीजींचा परिचय झाल्यावर त्यांनी सुब्राय नायक यांना आपला गोव्याला येण्याचा हेतु सांगितला. ख्रिस्त धर्माविषयीचे मूळ ग्रंथ त्यांना इथे अभ्यासायचे होते. ज्या ज्या प्रांतात जी जी वैशिष्ठ्ये असायची त्याची माहिती ते करून घेत.   

    सुब्राय नायक हे तीव्र मेधाशक्ती असलेले वेदान्त आणि आयुर्वेद शास्त्राचे जाणकार होते. शिवाय संस्कृतमधील न्यायमीमांसा व  ज्योतिष यातही पारंगत होते. नायक हे त्यावेळी धार्मिक आणि सामाजिक नवजागरणाची धुरा वहात होते. त्यांच्यासाठी तर स्वामीजींचे आपल्या घरात वास्तव्य आणि सहवास म्हणजे एक चांगली पर्वणीच होती.

   मठग्राम म्हणजेच मडगाव हे पोर्तुगीजांचा प्रभाव असलेले दक्षिण गोव्यातले ऐतिहासिक शहर. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मध्यभागी पश्चिम घाटात वसलेला गोवा समुद्र तटावरील रमणीय भूभाग म्हणून सर्वांनाच आकर्षित करतो. १५१० पासून हा भाग पोर्तुगीजांच्या हुकूमाखाली जवळ जवळ साडेचारशे वर्ष होता. पोर्तुगीजांनी साम, दाम, दंड, भेद य मार्गाने इथले अनेक तालुके काबीज केले होते. आशियातले सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रा स्थळ, बसिलिका ऑफ बॉम जिझस इथे गोव्यात आहे. प्राचीन मंदिरं आहेत. या वास्तू वैशिष्ठ्यपूर्ण वास्तूकलेसाठीही प्रसिद्ध आहेत. विवेकानंदांचा गोव्याला भेट देण्याचा हाच उद्देश होता. देवदर्शना बरोबरच गोव्यातली प्रमुख स्थळे, तिथली धर्मपीठे, जुने चर्च, फोंडा प्रदेशातील मंदिरे, पुरातन देवालये यांची माहिती करून घेणे आणि या प्रदेशातील ग्रामीण आणि शहरी लोकजीवन, समाजावरील धर्माचा प्रभाव व इतिहास जाणून घेणे हा पण दूसरा उद्देश होता.

सुब्राय नायक यांचे घर 
       सुब्राय नायक यांच्या घराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. चारशे वर्षापूर्वी धर्मांध ख्रिश्चनांनी मडगावची ग्रामदेवता असलेल्या श्री दामोदर मंदिराचा आणि गावातल्या इतर हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. हिंदूंना गावात एकही मंदिर शिल्लक राहिलं नाही. अशा परिस्थितीत नायक कुटुंबाने श्री दामोदर या आपल्या कुलदेवतेला राहत्या घराच्या मोठ्या गर्भगृहात स्थान देऊन वाचविले आणि पुढे सर्व हिंदूंना ते भक्तीसाठी खुले करून दिले. इथेच नंतर मठग्रामस्थ हिंदू सभेची स्थापना केली गेली. मडगावातल्या आबाद फारीया  रोडवरचं नायक मॅन्शन सामाजिक संस्कृतिक आणि नियमित उपक्रमाचं स्थान बनलं. याला दामोदर साल म्हणून ओळखतात. साल म्हणजे हॉल. गोव्यातील काही विशिष्ट घरांपैकी सुब्राय नायक यांचं पारंपारिक चौसोपी वाड्याचे एक प्रशस्त घर जिथे स्वामीजी काही दिवस राहिले होते.


 
 

स्वामीजी राहिलेली खोली व वस्तू 
    स्वामीजींच्या सहवासामुळे त्यांची समाजोद्धाराची तळमळ, वैदिक तत्वज्ञानाद्वारे लोकांची उन्नती करण्याची त्यांची क्षमता, जीवनातील सर्वोच्च कर्तव्याविषयी असलेली अत्त्युच निष्ठा पाहून सुब्राय नायक प्रभावित झाले . स्वामीजींच्या गायन वादनातल्या परिपक्वतेचा अनुभव सुद्धा यावेळी गोवेकर मंडळींनी घेतला.

लयभास्कर खपृमामा पर्वतकर 
   इथल्या वास्तव्यात स्वामीजींनी एकदा एक चीज काही रागातून पाऊण तास गायली. सर्वजण आश्चर्य चकित झाले. नायक यांनी, लयकारीची उत्तम जाण असलेले प्रसिद्ध तबला वादक व संगीतातल्या पिढीजात घराण्यात जन्मलेले खाप्रूजी अर्थात लक्ष्मणराव पर्वतकर, यांना बोलवून घेतले आणि स्वामीजींसमोर तबला वादन करायला सांगितले. त्यांनी सफाईदार तबलावादन सादर केले. हे ऐकून स्वामीजी म्हणाले, “लाकडाच्या खोक्याच्या कडेवर बोटे फिरवून आवाज काढता, तसाच आवाज वरच्या चामड्याच्या थरातून काढता आला पाहिजे”. खाप्रुजींना हे काही पटेना. त्यांना वाटलं स्वामी चेष्टाच करताहेत. तोच स्वामीजी उठले, कोचावरून खाली बैठक मारून बसले आणि तबल्याच्या चामड्यातून सुंदर आवाज काढून दाखविला. हा प्रकार पाहून सर्व श्रोते दि:ग्मूढ झाले. पर्वतकर यांनी स्वामीजींची क्षमा मागून साष्टांग नमस्कार घातला. याच खाप्रूमामा पर्वतकरांना पुढे १९३८ मध्ये प्रख्यात गायक अल्लादिया खाँ यांच्या हस्ते लयभास्कर पदवीने गौरविण्यात आले. स्वामीजींची भेट ही पर्वतकर मामांच्या आयुष्यातली भाग्याचीच घटना म्हणायला हवी.

राशेल सेमिनरी,रायतूर 
  स्वामीजींना गोव्यातील ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुरातन लॅटिन ग्रंथातून ख्रिश्चन धर्माचा इतिहास व तत्वज्ञान याचा अभ्यास करायचा होता. तिथल्या समाजावर होणार्‍या धर्मपरिवर्तनाचा प्रभाव जाणून घ्यायचा होता. असे दुर्मिळ ग्रंथ इथे उपलब्ध होते. रायतूर (राशेल) येथील सेमिनरी १५७६ मध्ये बांधलेले असे प्राचीन होते, तिथे प्राचीन हस्तलिखिते आणि मडगावतील प्रसिद्ध वकील जुजे फिलिप अल्वारीस यांना बोलवून स्वामीजीची ओळख करून दिली आणि सेमिनरी व तिथले ग्रंथ दाखविण्याची सोय नायक यांनी केली. तिथल्या पाद्रींची ओळख करून दिली, स्वामीजी दोन दिवस रायतूरला सेमिनरीत राहिले, स्वामीजींनी त्या सेमिनरीतल्या विद्यार्थ्यांची पण भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. आजही त्या लायब्ररीत स्वामीजींचा फोटो लावला आहे.

वाचनालय वेंगुर्ला 
  रायतूरच्या भेटीनंतर मडगावात स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाची जिकडे तिकडे चर्चा झाली. दूरदुरून पाद्री लोक तसेच ख्रिश्चन समाजातील अनेक विद्वान, जज्ज, बॅरिस्टर मडगावमध्ये त्यांना भेटायला येत. स्वामीजी फ्रेंच, लॅटिन, इंग्रजी भाषेत त्यांना आपली अभ्यासपूर्ण मतं समजाऊन सांगत. अशी अधिकारसंपन्न व्यक्ती सर्वजण प्रथमच पाहत होते, हे बघून सगळीकडे त्यांचं कौतुक होत होतं. सुब्राय नायक यांनी तर स्वामीजींच्या गुण गौरवासाठी श्री दामोदरच्या प्रांगणात मोठी सभा भरवली. याला लोक प्रचंड संख्येने हजर होते. त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेला जाण्यासाठी स्वामीजींना शुभेच्छा दिल्या. स्वामीजी वेंगुर्ल्याच्या नगर वाचनालयात संचित,प्रारब्ध व क्रियामाण या विषयावर व्याख्यान द्यायला पण गेले होते. वेंगुर्ला हे अरब,डच, पोर्तुगीज या राजसत्तांनी निर्माण केलेलं महत्त्वाच व्यापारी बंदर होतं. इथे १६३८ मध्ये डच वखार होती. हा इतिहास जाणून घेण्यासाठी स्वामीजी प्रत्यक्ष तिथे गेल्याचे दिसते.

   

मंगेशी मंदिर 
म्हाळसा देवी मंदिर 

गोवा येथील कवळ्याच्या शांतादुर्गा मंदिरात त्यांनी काली मातेचं एक पद खड्या आवाजात म्हणून लोकांना मंत्रमुग्ध केलं होतं. म्हाडदोळच्या म्हाळसादेवी पुढे सुंदर ख्याल गायन केलं, श्री मंगेशाच्या देवळात रागदारीतलं ध्रुपद गायन केलं.

नायक यांच्या घरात लावलेला फोटो 

   असा भरगच्च कार्यक्रम गोवा इथं पार पाडून स्वामीजी पुढच्या प्रवासासाठी धारवाडला जायला निघाले. तेंव्हा सुब्राय नायकांबरोबर अनेक प्रतिष्ठित लोक, शेकडो नागरिक, कॅथॉलिक पाद्री निरोप द्यायला आले होते. निघण्यापूर्वी नायकांनी स्वामीजींना एक फोटो काढून मागितला होता. हाच फोटो आज पण त्या दामोदर साल मध्ये लावला आहे. ज्या खोलीत ते राहिले ती खोली, त्या वस्तु आज ही नायकांच्या वारसांनी सुरक्षित जपून ठेवल्या आहेत. सुब्राय नायकांनी पुढे १९१० मध्ये संन्यास घेतला आणि ते स्वामी सुब्रम्हण्यानंद तीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले.  (वेंगुर्ला व मडगाव येथील सर्व फोटो मी काढलेले आहेत बाकी इंटरनेटवरून साभार परत.) 

© डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा