Tuesday, 11 August 2020

विचार–पुष्प,भाग ३६

 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

                                 विचार–पुष्प,३६ 

                              परिव्राजक १४. मध्यभारत  

    जुनागडहून स्वामीजी पालिताणा, नडियाद, बडोदा इथे फिरले. जुनागडच्या दिवाण साहेबांनी बडोद्याला जाताना ज्यांच्या नावे परिचय पत्र दिलं होतं ते बहादुर मणीभाई यांनी बडोद्याला स्वामीजींची व्यवस्था केली होती. तिथून स्वामीजी लिमडीच्या ठाकूर साहेबांखातर महाबळेश्वरला गेले. ठाकुर साहेबांनी स्वामीजींकडून दीक्षा घेतली होती. तिथे ते एक दीड महिना राहिले. त्या काळात महाबळेश्वर हे एक श्रीमंत व्यापारी आणि धनवंत संस्थानिक यांचं, दिवस आरामात घालवण्याचं एक ठिकाण मानलं जात होतं. इथला मुक्काम आणि ठाकूर यांची भेट आटोपून, ते पुण्याहून ते खांडवा इथं गेले आणि तिथले वकील हरीदास चटर्जी यांच्याकडे उतरले.( चटर्जी यांनी हे घर डॉ. बी.पी.मिश्रा यांना विकून ते कलकत्ता इथे गेले,मिश्रा यांनी अजूनही स्वामीजींनी आराम केलेला पलंग वापरलेले कपाट व वस्तु जपून ठेवल्या आहेत.) दोन दिवसातच त्यांना स्वामीजी एक केवळ सामान्य बंगाली साधू नसून, ते असाधारण असं श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे हे कळलं. तिथे अनेक बंगाली लोक राहत होते, त्यांचीही स्वामीजींची ओळख झाली. काही वकील, न्यायाधीश, संस्कृतचे अभ्यासक असे लोक भेटल्यानंतर स्वामीजींचे उपनिषदातील वचनांवर भाष्य, संगीतावरील प्रभुत्व, आणि एकूणच त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे हे लोक भारावून गेले होते.(खांडवा म्हटलं की आठवण झाली ती अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार गांगुली यांची, हे सिनेसृष्टीतले गाजलेले कलावंत सुद्धा या खांडव्याचेच राहणारे.)

महेश्वर 
    खांडव्याहून स्वामीजींनी इन्दौर, उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर या ठिकाणी भेटी दिल्या. भारतातल्या  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवाचे स्थान असलेले उज्जैन शहर, महाकवी कालीदासांचे उज्जैन, दानशूर आणि कर्तृत्ववान असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे  इन्दौर आणि महेश्वर, अशी पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणं पाह्यला मिळाल्याने स्वामीजींना खूप आनंद झाला. ही ठिकाणं फिरताना स्वामीजींना खेडोपाड्यातली गरीबी दिसली. पण त्या माणसांच्या मनाची सात्विकता आणि स्वभावातला गोडवा पण दिसला. हीच आपली खरी संस्कृती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. याच्याच बळावर आपल्या देशाचं पुनरुत्थान घडवून आणता येईल असा विश्वास त्यांना वाटला होता. कारण त्यांना भारतातील सामान्य जनतेचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं. 

महांकालेश्वर, उज्जैन 

   या भागात त्यांनी जे पाहिलं आणि त्यांना जाणवलं ते वर्णन आपल्या दिवाण साहेबांच्या प्रवास वार्तापत्रात ते करतात. ते म्हणतात, “एक गोष्ट मला अतिशय खेदकारक वाटली ती म्हणजे, या भागातील सामान्य माणसांना संस्कृत वा अन्य कशाचेही ज्ञान नाही. काही आंधळ्या श्रद्धा आणि रूढी यांचे गाठोडे हाच काय तो सारा यांचा धर्म आहे आणि त्यातील सर्व कल्पना, काय खावे, काय प्यावे, किंवा स्नान कसे करावे एव्हढ्या मर्यादेत सामावल्या आहेत. धर्माच्या नावाखाली काहीही सांगत राहणारे आणि वेदातील खर्‍या तत्वांचा गंध नसलेले स्वार्थी व आप्पलपोटे लोक समाजाच्या अवनतीला जबाबदार आहेत”.

   हा प्रवास संपवून स्वामीजी पुन्हा खांडव्याला हरीदास चटर्जी यांच्याकडे आले. हरीदास पण स्वामीजींच्या व्यक्तिमत्वावर भारावून गेले होते. त्यातच शिकागो इथं जागतिक सर्वधर्म परिषद भरणार आहे ही बातमी त्यांना समजली होती. हरीदास बाबू स्वामीजींना म्हणाले, आपण शिकागोला जाऊन हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करावे. हा विषय स्वामीजींच्या समोर याआधी पण मांडला गेला होता. धर्मपरिषद म्हणजे, विचार मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ. पण स्वामीजी म्हणाले, प्रवास खर्चाची व्यवस्था होईल तर मी जाईन. धर्म परिषदेला जायला तयार असल्याची इच्छा स्वामीजींनी पहिल्यांदाच व्यक्त केली होती.

बॅ. रामदास छबिलदास यांचे घर 

बॅ.रामदास छबिलदास व कुटुंब 

हरीदास बाबूंचे भाऊ मुंबईत राहत होते. हरीदास बाबूंनी स्वामीजींना परिचय पत्र दिलं आणि सांगितलं की, माझे बंधू तुमची मुंबईत, बॅरिस्टर शेठ रामदास छबिलदास यांची ओळख करून देतील. त्यांची यासाठी काही मदत होऊ शकते. मध्यप्रदेशातली भ्रमंती संपवून स्वामीजी मुंबईला आले. हरीदास बाबूंच्या भावाने ठरल्याप्रमाणे स्वामीजींचा छबिलदास यांच्याशी परिचय करून दिला. छबिलदास यांनी तर स्वामीजींना आपल्या घरीच आस्थेने ठेऊन घेतले. छबिलदास आर्यसमाजी होते. स्वामीजी जवळ जवळ दोन महीने मुंबईत होते. छबिलदासांकडे स्वामीजींना काही संस्कृत ग्रंथ वाचायला मिळाले त्यामुळे ते खुश होते. छबिलदास एकदा स्वामीजींना म्हणाले, “अवतार कल्पना आणि ईश्वराचे साकार रूप यांना वेदांतात काहीही आधार नाही. तुम्ही तो काढून दाखवा मी आर्य समाज सोडून देईन”. आश्चर्य म्हणजे स्वामीजींनी त्यांना ते पटवून दिलं आणि छबिलदास यांनी आर्यसमाज खरंच सोडला. यामुळे त्यांच्या मनात स्वामीजींबद्दल खूप आदर निर्माण झाला हे ओघाने आलेच.

   आता स्वामीजी मुंबईहून पुण्याला जायला निघणार होते. छबिलदास त्यांना सोडायला स्टेशनवर आले होते. रेल्वेच्या ज्या डब्यात स्वामीजी चढले त्याच डब्यात योगायोगाने बाळ गंगाधर टिळक चढले होते. ते छबिलदास यांच्या जवळचे परिचयाचे असल्याने त्यांनी स्वामीजींचा परिचय करून दिला आणि यांची व्यवस्था आपल्या घरी करावी असे टिळकांना सांगीतले. बाळ गंगाधर टिळक नुकतेच राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले होते. तर स्वामीजींना राजकारणाशी काहीही कर्तव्य नव्हते पण, हिंदूधर्माविषयी प्रेम, संस्कृत धर्म ग्रंथांचा अभ्यास, भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, अद्वैतवेदांताचा पुरस्कार या गोष्टी दोघांमध्ये समान होत्या. तसच भगवद्गीते विषयी प्रेम हा एक समान धागा होता. देशप्रेमाचे दोघांचे मार्ग फक्त वेगळे होते. दोघांचा रेल्वेच्या एकाच डब्यातून मुंबई–पुणे प्रवास सुरू झाला.

( सर्व फोटो इंटरनेट वरुन साभार परत. )

 

© डॉ.नयना कासखेडीकर    

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा  

No comments:

Post a Comment