Wednesday 15 August 2018

मॅडम भिकाजी कामा ( मादाम कामा )


मॅडम भिकाजी कामा 


स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारी, मातृभूमीवर अपार श्रद्धा. प्रेम व निष्ठा असणारी,आपला देश स्वतंत्र आणि एकसंध झालेला दिसावा अशी इच्छा बाळगून स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या संपूर्ण क्रांतीपर्वात सक्रीय भाग घेणारी एकमेव महिला म्हणजे मॅडम भिकाजी रुस्तुम कामा.स्वातंत्र्य लढ्यातील त्यांची कामगिरी महिलांना ललामभूत ठरणारीच आहे.

एकशे अकरा वर्षापूर्वी म्हणजेच १८ ऑगस्ट १९०७ या दिवशी,स्वतंत्र भारताचा ध्वज एका आंन्तराष्ट्रीय मेळाव्यात फडकीवणाऱ्या धाडसी मॅडम कामांचे नाव भारताच्या स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक लढ्यात ठळकपणे लिहिले गेले आहेच.परंतु जगभरातही त्यांचे नांव आदराने घेतले जात असे.त्याचे कारण,हिंदुस्थानातल्या ब्रिटीशांच्या दडपशाहीचा अर्थ व स्वरूप,त्यांनी अमेरिका,फ्रान्स व इंग्लंड मध्ये जाऊन तिथल्या जनते समोर उलगडून दाखविला .हिंदुस्थानाबद्दल व स्वातंत्र्य मिळण्याबाबत तिथल्या जनतेला आपल्या भाषणातून,वृत्तपत्रीय लेखनातून,प्रसिद्धी पत्रकातून,बैठकांमधील चर्चातून जनमत वळवण्याचा प्रयत्न मडॅम कामा यांनी केला.

मडॅम कामा पारशी कुटुंबातल्या.इराण देश अरबांनी जिंकल्यावर,अनेक पारशी कुटुंबे स्थलांतरित होऊन,चीन व हिंदुस्थानात येऊन राहिले.जे हिंदुस्थानातल्या ठाणे येथील  बंदरात उतरले ते सर्व पारशी कुटुंब मुंबईत स्थाईक झाले.त्यापैकीच एका श्रीमंत पारशी कुटुंबात भिकाजींचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ या दिवशी झाला.त्यांचे नाव भिकाजी सोराबजी पटेल.आई जायजी आणि वडील सोराबजी फ्रामजी पटेल,एक प्रतिष्ठीत व श्रीमंत व्यापारी होते.
गोऱ्यापान वर्णाची,गुटगुटीत व अवखळ भिकू म्हणजे वडिलांची लाडकी मुलगी, मोठी झाल्यावर मुंबईच्या अलेक्झांड्रा नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इंस्टिट्युशन या शाळेत शिक्षण घेऊ लागली.

भिकू ,उत्तम घोड्यांच्या विक्टोरिया गाडीतून डौलाने शाळेत जात असे.त्या वेळच्या परिस्थितीत पारशी समाजातही मुलींनी शाळेत गेल्यास खळबळ माजत असे. परंतु दादाभाई नौरोजी व इतरांच्या पुढाकाराने मुलींना शाळेत घालण्याच्या प्रथेला पटेलांचीही मान्यता होती. पण भिकू महाविद्यालयात मात्र गेल्या नाहीत.तरीही लेखन-वाचन सुरूच ठेवले.गुजराथी,हिंदी,इंग्रजी,मराठी या भाषा उत्तम येत होत्या त्यांना.उत्तम संभाषणा बरोबरच खेळ व क्रिकेट यातही त्या प्रवीण होत्या.लग्नाचे वय झालेल्या भिकाजीचे लग्न,के.आर.कामा या प्राच्यविद्या पंडितांचे चिरंजीव रुस्तम खुर्शीद कामा यांच्याशी,३ ऑगस्ट १८८५ ला मोठ्या थाटामाटात पार पडले.भिकू पटेल आता भिकाजी रुस्तुम कामा झाल्या.रुस्तुम प्रसिध्द सोलीसीटर होते.

परंतु लग्नाआधी या बुद्धिमान आणि संवेदनशील भिकाजीवर तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा खोलवर प्रभाव पडत होता. दिवसेंदिवस देशभक्तीची ओढ आकर्षित करीत होती.सामान्यपणे लग्नानंतर तिचे मन बदलेल असे कुटुंबियांना वाटले.शिवाय रुस्तुम कामा इंग्रजांचे कट्टर भोक्ते.स्वातंत्र्य लढा सुरु होण्याआधी जी सौम्य आंदोलने होत होती,त्यात व समाजसेवेत पतीच्या विरोधाला न जुमानता काम करत.

मुंबईतल्या एका कॉंग्रेस अधिवेशनाला भिकाजी हजर राहिल्या आणि त्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली.तेंव्हापासून त्या कडव्या देशभक्त झाल्या. पती-पत्नीच्या राजकीय मतभेदांमुळे नाईलाजाने दोघांमध्ये फारकत झाली.देशाचा संसार तोच आपला संसार अशी मनाशी खुणगाठ बांधून मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले.


मुंबईला १८९६ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीच्या वेळी,पारसी फिवर हॉस्पिटल निघाले.त्यात भिकाजी कामांसह  अनेक पारशी महिला मानद परिचारिका म्हणून काम करीत.१८९९ मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा प्लेगच्या साथीने डोके वर काढले.यावेळी मात्र सेवा सुश्रुषा करता करता खुद्द भिकाजी कामांनाच प्लेगची लागण झाली.त्यांची प्रकृती खालावली.वैद्यकीय सल्ल्यानुसार,हवापालट आणि प्रकृती सुधारण्यासाठी त्या युरोप मध्ये गेल्या.जर्मनी, फ्रान्स, स्कॉटलंड इथे एक एक वर्ष राहिल्या.सुधारणा झाल्यावर १९०६ मध्ये त्या लंडन मध्ये आल्या.तब्बल चौतीस वर्ष त्या विलायतेत राहिल्या.त्यांचे घर म्हणजे स्वातंत्र्य समरातील क्रांतीविरांसाठीचेच घर झाले होते.मातृभूमीच्या सेवेचा निर्धार त्यांना गप्प बसू देईना.लंडनला दादाभाई नौरोजींनी लंडन इंडिया सोसायटी काढून ब्रिटीशांच्या हिंदुस्थानातील शोषणावर हल्ले चढवीत.भिकाजी कामा ही त्यांच्यात सहभागी होऊन काम करू लागल्या.ब्रिटीश संसदेवर निवडून येण्यासाठीभिकाजींनी नौरोजीना खूप मदत केली.याचं वेळी,शामजी कृष्ण वर्मा यांच्या आंदोलनाने जहाल रूप धारण केले होते.

दादाभाई नौरोजी व शामजी कृष्ण वर्मा ,ब्रिटिशांना सनदशीर मार्गाने हिंदुस्थानातून घालवून देता येईल असा विश्वास व्यक्त करीत आणि त्याच अनुरोधाने भिकाजी कामा खणखणीत आवाजात उत्तम अशा इंग्रजी भाषेतून लंडन च्या हाईड पार्क वरील सभेत, स्वातंत्र्यावरील भाषणे करीत.ही भाषणे आणि स्वातंत्र्याची घोषणा त्या काळात क्रांतिकारकच होती.त्यांच्या या घोषणांनी साम्राज्यवादी इंग्रजही हादरले होते.लंडन च्या हाय गेट भागात हिंदी तरुणांना सहाय्य करण्यासाठी इंडिया हाउस ही वास्तू उभी राहिली.त्याचे उद्घाटन हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे जहाल पुरस्कर्ते एच.एम.हिंडमन यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या सारख्या इतर जहाल इंग्रजांशी भिकाजी कामांची चांगली मैत्री झाली.दादाभाई नौरोजी,अॅनी बेझंट  यांच्या प्रमाणेच रशियन,फ्रेंच व जर्मन समाजवाद्यांशी भिकाजींचे चांगले मैत्रीचे संबंध होते.त्यामुळे रशियन क्रांतिकारकांशीही त्यांच्या ओळखी झाल्या.हिंडमन यांच्या ओळखीतूनही खूप जणांशी ओळखी झाल्या. या सर्वानांच भिकाजिंबद्दल अतिशय आदर व आपुलकी वाटत असे.या आपुलकी मुळेच मिसेस कामा ऐवजी त्या मॅडम कामा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

या काळात उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा ते निमित्त सांगून,हिंदुस्थानी युवक इंग्लंड ला जात असत. मॅडम कामा त्यांच्या संपर्कात राहून त्यांना हवी ती मदत करत असत. ‘ब्रिटीश पारतंत्र्यातून भारताची संपूर्ण मुक्तता हे साध्य व सशस्त्र क्रांती हे साधन’ हे ब्रीदवाक्य असणारी ‘अभिनव भारत’ ही संस्था स्वातंत्रवीर सावरकरांनी १९०४ मध्ये स्थापन  केली होती. बॅरिस्टर च्या उच्च शिक्षणासाठी सावरकर इंग्लंड ला गेल्यावर अभिनव भारतला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. लंडनला मॅडम कामाही त्याच्या सदस्य बनून काम करू लागल्या. या गुप्त शाखेचे सदस्य वाढविण्यासाठी तिचीच प्रकट संस्था म्हणून, फ्री इंडिया सोसायटीची स्थापना होऊन,इंडिया हाउस मध्ये बैठका सुरु झाल्या.मदनलाल धिंग्रा,ग्यानचंद वर्मा,वामनराव फडके,अय्यर,लाल हरदयाळ,वीरेंद्र चट्टोपाध्याय ,निरंजन पाल हे लंडन मध्ये वास्तव्यास असलेले बुद्धिवान तरुणही सावरकरांना सामिल झाले.

सावरकरांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची व क्रांतीप्रणालीची छाप पडून मॅडम कामाही त्या विचाराने भारावून गेल्या.त्या सशस्त्र क्रांतीवादी बनल्यामुळे त्यांच्या जहाल वक्तव्याला एक वेगळेच तेज चढले.या क्रांतिकारक कारवायांमुळे ब्रिटीश सरकारने त्यांना इंग्लंड सोडून जावे ,अन्यथा तुमच्या विरोधी कारवाई करावी लागेल अशी सूचना केली.मॅडम कामांनी विचार केला की,आपले स्वातंत्र्य गमावण्यापेक्षा लंडन सोडून जाणे केंव्हाही चांगले आणि त्या पॅरीसला बॅरिस्टर राणा यांच्याकडे जाऊन १९०७ मध्ये तिथेच स्थायिक झाल्या. 

पॅरीस ला आल्यावर मॅडम कामांनी अभिनव भारताच्या नावावरूनच न्यू इंडिया सोसायटीची स्थापना केली.वेगवेगळ्या हिंदी राष्ट्रवाद्यांमध्ये ऐक्य निर्माण करणे या उद्देशाने स्थापन केलेल्या या संस्थेचे अध्यक्ष के.आर.कोतवाल होते.हिंदुस्थानातील ब्रिटीशांची वाढलेली दडपशाही बघून आता यापुढे सशस्त्र लढ्यानेच स्वातंत्र्य मिळू शकेल याची त्यांना मनोमन खात्री पटली.आणि सावरकरांच्या लंडन मध्ये चाललेल्या लढ्याच्या परीस मधील त्या प्रमुख झाल्या.मॅडम कामा रशियन मार्गाचा पुरस्कार करू लागल्या.प्रत्येक माणसाला याचे महत्त्व पटवून द्यायला हवे असे त्यांना वाटत होते.

गांधीजी दक्षिण आफ्रिकेतील हिंदी जनतेची गाऱ्हाणी घेऊन १९०६ मध्ये लंडनला आले, तेंव्हाही मॅडम  कामांनी आपले विचार त्यांच्या समोर आवेशाने मांडले होते. बंगालच्या फाळणी नंतर लाला लजपत राय ,सरदार अजितसिंग यांना अटक करून स्थानबद्ध करून ठेवले होते. या पार्श्वभूमीवर बॅरीस्टर राणां नी पॅरीस येथे जाहीर सभा बोलावली.यात मॅडम कामानी मुख्य भाषण केले. त्या म्हणाल्या, “ हिंदुस्थानच्या स्त्री पुरुषांनो ,अशा पारदास्यात  जगण्यापेक्षा आपण सर्वच्या सर्व लोक नष्ट होऊन गेलो तरी चांगले असा निर्धार तुम्ही करा”.
शूर राजपुतांनो, शिखांनो,पठाणांनो,गुराख्यांनो,देशभक्त मराठ्यांनो,आणि बंगाल्यांनो,उद्योगी पारश्यांनो,मुसलमानांनो आणि सौम्य वृत्तीच्या जैनांनो,धीम्या वृत्तीच्या हिंदुनो,तुम्ही आपल्या स्वताच्या .परंपरांप्रमाणे जीवन का जगात नाहीत? चला पुढे व्हा.स्वराज्यातील स्वातंत्र्य,समता यांची प्रतिष्ठापना करा.तुमच्या स्वतासाठी आणि मुलाबाळांसाठी पुढे या.मानवी हक्कांची लढाई लढा.पौर्वात्य लोक  पाश्चीमात्यांना काही नवे शिकवू शकतात हे जगाला दाखवून द्या.

लाला लजपत राय यांना अटक झाली.या क्रूर अन्यायाविरुध्द आपला संताप अनावर झाला असताना ,ही गोष्ट कुणीही निमुटपणे सहन करू शकणार नाही.देशभक्त लाल लजपत राय यांना बंदिवसाच्या वाईट वातावरणात राहू देणे योग्य नाही.परकीय सत्ताधाऱ्यांच्या  आश्वासनानंतर तुम्ही विसंबून राहू नका.कारण ते हिंदुस्थानात आहेत.ते तुम्हांला सहाय्य करण्यासाठी नव्हे तर,तुमचे शोषण करण्यासाठी आहेत याची जाणीव ठेवा.आपला देश तत्काळ स्वतंत्र व्हायला हवा असेल तर आपण सर्वांनी एकी राखायला हवी.लाल लजपत राय यांचे शौर्य डोळ्यासमोर सतत ठेवले तर,सर्वाना सीमापार करण्यापूर्वी किंवा तुरुंगात टाकण्यापूर्वी सरकारने कितीही किल्ले आणि तुरुंग बांधले तरी ते अपुरेच पडतील.जो आपले स्वातंत्र्य गमावतो तो आपले शीलच गमावून बसतो.हे विसरून चालणार नाही.
मित्रहो,स्वाभिमान दाखवावा.वंदेमातरम मंत्राच्या स्फूर्तीने हिंदी लोकांनी एकत्र येऊन जागृत राहायला हवं.” कामांच्या भाषणा नंतर हे पत्रक काढून ते इंडिअन सोशालीजीस्ट या अंकात प्रसिद्ध करण्यासाठी शामजी कृष्ण वर्मांकडे लंडन ला पाठवले .ते जून १९०७ च्या अंकात जसेच्या तसे छापून ,तो अंक प्रसिध्द होण्यापूर्वीच शामजी वर्मा अटक टाळण्यासाठी परीस ला राहायला आले आणि स्वातंत्र्य लढ्यातील जहाल विचारांच्या कार्यकर्त्या म्हणून कामा प्रसिध्द झाल्या.येथील रशियन क्रांतीकारकांनाही कामांविषयी अधिक आस्था वाटू लागली.

१८ ऑगस्ट १९०७ ला जर्मनीतील स्टुटगार्ड येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस चे अधिवेशन भरविण्यात आले होते.याचे अध्यक्ष जर्मनीचेच पॉल सिंगेर होते.जगातल्या पंचवीस देशांतील एक हजार प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.पूर्व परीचायामुळे जां जोरे यांनी मॅडम कामांना ही येण्याचे आमंत्रण दिले होते.सावरकरांनी एक ठराव लिहून तो मड म कामांनी परिषदेत मांडावा असे ठरले.परिषदेत इतर सर्व राष्ट्रांचे ध्वज येणार .पण,हिंदू स्वातंत्र्य वाद्यांना त्यांचा ध्वज च नाही.हे क्रांतिकारकांच्या लक्षात आले.सावरकरांनी ध्वजाची कल्पना सर्वांसमोर मांडली.मग मॅडम कामांनी उंची रेशमी कापड विकत आणले.हिरवा,केशरी व तांबडा असे तीन रंग ,वरील बाजूस ‘आठ प्रांतांची आठ कमळे’ ,मधल्या पट्ट्यावर ‘वंदेमातरम’ हा मंत्र विणलेला.तर खालच्या पट्टीवर ‘सूर्य आणि चंद्र’ यांच्या आकृत्या असा स्वताच्या हाताने विणून हा ध्वज तयार केला.अशा प्रकारे हिंदुस्थानच्या पहिल्या राष्ट्र ध्वजाचा जन्मच लंडन मध्ये झाला.

ध्वज एकच असला तर परिषदेत जाईपर्यंत वाटेत काही अडचण येऊ नये या हेतूने कामांनी असे तीन ध्वज बनविले.त्यातला एक ध्वज आपल्या पोलक्यात लपवून पॅरीस ला नेला. दुसरे दोन ध्वज बॅरीस्टर राणांनी बाहेर नेले. बॅरीस्टर राणांबरोबर मडॅम कामा स्टुटगार्ड ला रवाना झाल्या.परिषदेत मॅडम कामा इंग्लंड च्या प्रतिनिधी म्हणून गेल्या असल्या तरी त्यांच्या ठराव मांडण्यावर आक्षेप घेऊन तो ठराव संमत होणार नाही पण, वाचून दाखविता येईल असे सांगितले.

व्याख्यान देण्यासाठी कामा व्यासपीठावर उभ्या राहिल्या.प्रास्ताविका नंतर शांतपणे त्यांनी ठराव वाचून दाखविला आणि आपल्या पोलक्यात दडवून ठेवलेला तिरंगी ध्वज मोठ्या कौशल्याने व नाट्यमयरित्या परिषदेत फडकविला.परिषदेतले सर्व उपस्थित चक्रावून गेले.तिरंगा फडकवून त्या खणखणीत व धीरगंभीर आवाजात म्हणाल्या, “This is the flag of Indian Independence .Behold it is boon. it is already sanctified by the blood of the martyred Indian youths! I call upon you, gentlemen! To rise and salute this flag of new India of Indian indepedance.”

“हा पहा हा हिंदू स्वातंत्र्याचा ध्वज आहे. आज याचा जन्म झालाय.हिंदुस्थानच्या तरुण हुतात्म्यांच्या रक्ताने तो आधीच पावन झालेला आहे. नागरिकहो उठा आणि या अभिनव भारताच्या, या हिंदवी स्वातंत्र्याच्या ध्वजाला प्रणाम करा”.या त्यांच्या स्फूर्तीदायक आवेशाने सर्व प्रतिनिधी भारावून गेले.आणि या ध्वजाला सर्वांनी उभे राहून अभिवादन केले.वातावरण एकदम भारावून गेले.या कृतीबरोबरच कामांचं खानदानी सौंदर्य ,उंची पोशाख,असे तेजस्वी व्यक्तिमत्त्व बघून सभागृहात जो तो म्हणू लागला, “She is an Indian Princess” .

कामांनी ध्वज फडकविल्यानंतर त्यावरील रंग व चिन्हांचा अर्थ सर्वाना समजावून सांगितला आणि स्वतंत्र हिंदुस्थानचा पहिला ध्वज, युरोपात फडकविणाऱ्या मॅडम कामा पहिल्या वीरांगना ठरल्या.कामांनी बनवलेल्या तिरंग्यात काही बदल करून आजचा राष्ट्र ध्वज बनविण्यात आलाआहे.प्धाच्या काळात परीस मध्ये सर्व हिंदी क्रांतिकारक एकत्र जमले कि,मॅडम  कामांच्या टेबलावर हा ध्वज दिमाखात उभा असे.कामांनी या ध्वजाचे बज व पदक ही बनवून घेतले होते.हे पदक त्या स्वतः पोलक्यावर लावीत असत.या लढ्याचा कामांनी अमेरिकेत जाऊन प्रचार केला.याचं वेळी लंडन येथे इंडिया हाउस मध्ये १८५७ च्या हुतात्त्म्यांच्या स्मरणार्थ १० मे १९०८ ला भव्य स्मृती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.अमेरिकेतून कामा नुकत्याच परीस ला पोहोचल्यामुळे त्या या समारंभाला उपस्थित राहू शकणार नव्हत्या,म्हणून त्यांनी बॅरीस्टर रानांच्या बरोबर ७५ रुपयांची देणगी व विशेष संदेशही पाठविला.ही देणगी राणानी सभेत जाहीर केली तेंव्हा टाळ्यांचा मोठा गजर झाला.तसेच त्यांचा संदेश वाचून दाखवण्यात आल्यानंतर देशभक्तांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

१९०८ मध्ये खुदिराम बोसांना मुझफ्फुरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.त्यावेळी देशभर शोकसभा घेण्यात आल्या.कॅक्सटन च्या हॉल मध्ये झालेल्या भाषणाच्या वेळी,मॅडम कामांनी ध्वज फडकविला आणि त्या म्हणाल्या, “याच ध्वजासाठी खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी देह ठेवले”. हे ऐकताच सर्व सभा उठून उभी राहिली.आणि हुतात्म्यांना मानवंदना दिली.वंदेमातरम चा जयघोष झाला.या भारावलेल्या वातावरणात कामांनी आवेशाने श्रोत्यांना विचारले, “तुम्ही काय आता स्वस्थ बसून स्वातंत्र्यासाठी स्त्रियांनीच पहिला प्रहर करावा म्हणून वाट पाहत बसणार आहात का?आणि देशद्रोह्यांना व रानटी लोकांना आपल्यावर राज्य करू देणार आहात काय ?.या भाषणाच्या प्रती लंडनहून हिंदुस्थानात टपालाने गुप्तपणे पाठविण्यात आल्या होत्या.
सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक १९०८ मध्ये मराठीत लिहून पुरे केले.त्याचे हस्तलिखित प्रसिध्द करण्याचे बरेच प्रयत्न झाले.इंग्रजांविरुध्द ते असल्याने कोणीच मुद्रक छपाई साठी तयार होईनात.त्यामुळे बाबाराव सावरकरांनी ते नाशिकहून पुन्हा सावरकरांना पाठवून दिले.शेवटी त्याचे इंग्रजीत भाषांतर करून युरोप मध्ये कुठेतरी प्रसिध्द करण्याचे ठरविले.

सावरकरांचे सहकारी वामनराव फडके व हरिश्चंद्र कोरेगावकर यांनी त्याचे भाषांतर केले. युरोप मधेही मुद्रक तयार होईनात.मॅडम कामांच्या महत्प्रयासानंतर  ‘रॉटरडॅम  शे आर्ट अँड बुक प्रिंटींग कंपनी हरिंग्वालिएट’ या मुद्रणालयात हॉलंड मध्ये ते गुप्तपणे छापले.

सरकारला सुगावा लागू न देता या पुस्तकाच्या विक्रीची व वितरणाची व्यवस्था कामांनी अगदी व्यवस्थित पणे केली. पुस्तकाचे प्राप्तीस्थळ म्हणून स्वतःचा पत्ता, ‘मिसेस बी.आर.कामा,पब्लिकेशन कमिटी, ७४९ थर्ड अव्येन्यू,न्यूयॉर्क’. असा देऊन वाचकांना ते नीट मिळेल याची कौशल्याने योजना आखली.निरनिराळ्या देशांत हिंदी तरुणांनी याच्या प्रति मागवून घेतल्या.हिंदुस्थानात सुद्धा कित्येक वेळी कामानीच चापून घेतलेल्या बेवर्ले कादंबरीच्या किंवा पिक् विक् पेपर्स च्या खोट्या वेष्टनातून पाठवलेल्या प्रती सुरक्षितपणे टपालान मिळत असत.असा हा क्रांतिकारक ग्रंथ आपल्या लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी मॅडम कामांनी अतोनात कष्ट घेतले.अनेक क्लृप्त्या लढविल्या.
   
हिंदुस्थानात इंग्रजांचे दडपशाहीचे नवेनवे अविष्कार घडतच होते. १९०९ मध्ये बाबाराव सावरकरांनी राजद्रोही कविता प्रसिध्द केल्या म्हणून त्यांना जन्म ठेपेची शिक्षा दिली गेली.त्याला उत्तर म्हणून मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीचा लंडन मधेच गोळ्या घालून वध केला. शामजी कृष्ण वर्मांनाही यात आरोपी करावं अशी मागणी वृत्तपत्रांनी केली. या पार्श्व भूमीवर मॅडम कामा जराही  विचलित झाल्या नाही. या प्रकरण नंतर लंडन मधील इंडिया हाउस बंद करण्यात आले.हिंदुस्थानाबाहेर राहूनच स्वातंत्र्याचा लढा चालू ठेवावा या उद्देशाने लाल हरदयाळ पॅरीस ला परत आले.

मॅडम कामांनी १० सप्टेंबर १९०९ ला हरदयाळांसाठी  ‘वंदेमातरम’ हे पत्र सुरु केलं.भारतीय स्वातंत्र्याच्या या मासिक मुखपत्रासाठी सर्व आर्थिक बोजा कामांनी स्वतः उचलला होता. हे मुखपत्र स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा येथून प्रसिध्द होत असे.यातील सर्व लिखाण कामा स्वतः संपादित करत असत.याची वितरण व्यवस्थाही कुशलपणे त्यांनी केली होती. याचा पुरावा ब्रिटीश सरकारला शोधूनही सापडला नव्हता.

कामांनी आता वीरेंद्र चट्टोपाध्याय यांच्यासाठी ,मदनलाल धिंग्रा यांच्या स्मरणार्थ मदन तलवार हे पत्रही सुरु केले.याचा पहिला अंक १ नोहेंबर १९०९ ला प्रसिध्द झाला. याच सुमारास स्वातंत्रवीर सावरकर दगदगीमुळे आजारी पडले.इकडे हिंदुस्थानात अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला. या असंतोषाचे मूळ सावरकरच आहेत असे उघडपणे इंग्रजी पत्रे म्हणू लागली.सावरकरांनी फ्रान्स ला जावे असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सुचविले.सावरकर पॅरीसला आले. आता राष्ट्रीय प्रयत्नांचे केंद्र परीस झाले होते.आजारी असलेल्या सावरकरांना मॅडम कामांनी स्वताच्या घरी ठेऊन त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली.सावरकरांच्या अटकेची शक्यता वाढली होती.अशा परिस्थितीत त्यांनी लंडन ला जाऊ नये म्हणून मड म कामांनी त्यांना सांगितले पण ते लंडनला रवाना झाले आणि मॅडम कामांची भीती खरी ठरली.लंडनला पोहोचताच सावरकरांना अटक करण्यात आली.याचा कामांना वज्र प्रहारासारखा धक्का बसला.सावरकरांना सोडविण्यासाठी त्यांनी आकाशपाताळ एक केले.या अवैध अटकेसाठी त्या सतत तीन महिने लढल्या.मार्सेलीसच्या समुद्रात मारलेल्या सावरकरांच्या जगप्रसिध्द उडी नंतर त्यांना पुन्हा झालेली अटक व घडलेल्या घटना यामुळे सावरकरांची सुटका हेच ध्येय ठेवून कामा धडपडत होत्या.सावरकरांविषयी विविध वृत्त पत्रातून माहिती लिहून जनमत तयार करीत होत्या.



मॅडम कामा चतुरस्त्र क्रांतिकारक होत्या.त्यांची देशभक्ती त्यांच्या कुटुंबातील स्वाभिमानी व्यक्तीतही फोफावली होती.मुंबईच्या इतर पारशी महिलाही कामांच्या क्रांती प्रणालीमुळे भरल्या गेल्या होत्या.
बाबाराव सावरकर तुरुंगात गेल्यानंतर कुटुंबाची वाताहत झाली.कामांना याची कल्पना होती.त्या बाबारावांच्या पत्नी येसूवहिनी यांना मदत म्हणून दर महिन्याला ३० रुपये पाठवीत असत.त्यांची वेळो वेळी विचारपूस करून धीर देत असत. हा सगळा वृत्तांत अंदमानातल्या सावरकरांना धाकट्या भावाकडून पत्रातून कळत असे. ते वाचून कामांविषयी अधिकच जिव्हाळा वाटू लागे.स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे बंधू डॉ सावरकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात, “मी इकडे आल्यापासून मॅडम कामा या तुला जणू दुसऱ्या आईच होत आलेल्या आहेत. आणि उदात्तपणे व एकाग्र चित्ताने आपल्या आयुष्यातील अत्यंत संकटमय काळात आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.फ्रान्स वर जर्मनीची स्वारी झाल्यानंतर तुला मॅडम कामांचे पत्राद्वारे वर्तमान कळणार नाही. अशी मला खूप भीती वाटत होती.पण या जागतिक गोंधळाच्या परिस्थितीतही त्यांना तुझी आठवण होतेच आणि त्या तुला नियमितपणे पत्र पाठवतात,हे  निश्चितपणे कळल्यावर मला फार आनंद झाला.अशा विश्वासपूर्ण उदात्त आणि प्रेमळ हाताच्या एका स्पर्शानेही मानवते वरील विश्वास आपल्या अंतकरणात पुन्हा जिवंत होतो.त्यांच्या या आस्थेला मी किती मौल्यवान समजतो हे मला त्यांना सांगता येत नाही ही शोचनीय गोष्ट आहे. तरीही प्राप्त परिस्थितीत मॅडम कामांना माझी ही वाहावा आणि आदराची भावना आपल्या नातेवाईकांपैकी कोणालाही कळविण्याच्या आधी कळव.कारण ते आपल्यासाठी काही करतात त्यात नवल ते काय?पण त्या करतात आणि इतके करतात हेच खरे नवलकारक आहे”.

अंदमानातून सावरकरांना वर्षातून एकदाच कुटुंबाला पत्र पाठवता येत असे.त्या प्रत्येक पत्रात ते कामांची चौकशी करत असत. डॉ सावरकर हा निरोप पत्राने, कामांना पोहोचवत असत. डॉ सावरकर तर कामांना मदर ऑफ दि रेव्होल्युशनरी पार्टी  म्हणत.अशा प्रकारे स्वातंत्रवीर सावरकरांच्या क्रांतीजीवनात मॅडम कामांच खूप आधार होता.
१९१७ मध्ये रशियन क्रांती झाली.एव्हाना सावरकर आणि मडम कामांचे नांव युरोपभर गाजले होतेच.रशियाचा सर्वाधिकारी असलेला खुद्द लेनिन सुद्धा मॅडम कामांना भेटायला आला होता. त्यांनी तर रशियाला येऊन राहण्याचे आमंत्रण च दिले होते कामांना.पण ते त्यांनी नाकारले.कारण त्यांना हिंदुस्थानात मायभूमीला परत जायचे होते.

सरकारचे कामांच्या हालचालींवर बारीक लक्ष होते.त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. कामा आता वृद्धत्वामुळे आजारी झाल्या होत्या.अर्धांग वायूचा झटका येऊन गेलेला होता.आपला मृत्यू तरी हिंदुस्थानात व्हावा असे त्यांना वाटत होते.१९६५ च्या सुमारास सर कावसजी जहांगीर युरोपला गेले असताना ,कामांना भेटायला गेले.त्यांची अवस्था पाहून,कावसजींचे  मन हेलावले.त्यांनी मंत्रालयात विनंती करून कामांना हिंदुस्थानात नेण्याची परवानगी घेतली. 

'मी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राजकारणात भाग घेणार नाही' अशी हमी सरकारने त्यांच्या कडून लिहून घेतली.
आणि तेहेतीस वर्षांनी १९३५ ला मॅडम कामा हिंदुस्थानात परत आल्या. परत येताना त्यांनी या वृध्धावस्थेतही आक्षेपार्ह सामान व आपला स्वातंत्र्यध्वज  बरोबर आणला होता.कामांना पारसी हॉस्पिटल मध्येच भारती केले गेले.प्रकृतीत चढ उतार चालूच होता. डॉ.सावरकरही त्यांना येऊन भेटत असत. ११ ऑगस्ट १९३६ ला त्या अत्यवस्थ झाल्या आणि १२ ऑगस्ट १९३६ ला त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली.  

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याचे क्रांती कुंड सातासमुद्रापार अखंड धगधगत राहावे यासाठी आपल्या आयुष्याची समिधा देणाऱ्या भिकाजी कामा यांचं आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुन्हा एकदा पुण्यस्मरण.

                                                                                         

लेखन - डॉ. नयना कासखेडीकर, पुणे.

Friday 18 May 2018

कमलाबाई गोखले


                                                 कमलाबाई गोखले 
                              भारतीय चित्रपटातली पहिली स्त्री कलाकार

       एकोणिसावे शतक आणि विसावे शतक खरं तर सामाजिक सुधारणांचा काळ. या काळात अनेक सामाजिक स्थित्यंतरे होत होती. पण तरीही पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीचं जगणं तेच राहीलं. स्त्री घराबाहेर पडून नोकरी करू लागली होती. कतृत्व गाजवू लागली.अनेक दुख आणि अपमान मनात ठेऊन मुलगी,पत्नी, आई अशा भूमिका समर्थपणे सांभाळू लागली होती. याच काळात जिथे रंगभूमीवर स्त्रियांच्या भूमिका पुरुष साकारत असत. अशा काळात रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या, स्वताच्या कर्तृत्वाचा वैशिष्ठ्यपूर्ण ठसा उमटविणाऱ्या, रंगभूमीवरच्या पहिल्या स्त्री कलाकार आणि भारतीय चित्रपटातील पहिली बालनटी म्हणजेच कमलाबाई गोखले. रुपेरी पडद्यावरची भारतीय सिनेअभिनेत्री, पूर्वाश्रमीच्या कमला कामत. प्रसिद्ध नट चंद्रकांत गोखले व प्रसिध्द तबला वादक लालजी गोखले आणि सुर्यकांत गोखले यांच्या त्या मातोश्री आणि आजचे आघाडीचे लोकप्रिय नट व दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्या त्या आजी.


        कमलाबाई या, दुर्गाबाई कामत आणि मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मधील प्रा.आनंद नानोजकर यांची कन्या. कमलाबाई दिसायला सुंदर. संगीताची उत्तम जाण, आवाज खणखणीत असलेल्या, लहानपणापासूनच नाटकात कामे करीत. अर्थार्जनासाठी फिरत्या नाटक कंपनीत नोकरी धरणाऱ्या कमलाबाईंच्या आईं दुर्गाबाई, अभिनयाबरोबर उत्तम पेंटिंग करत. गाणं म्हणत. बीन, दिलरुबा, सतार पण वाजवीत. त्यामुळे कमलाबाईंवर संगीताचेही संस्कार झालेले होत होते. अचानक कमलाबाईना चित्रपटात काम करण्याची अभूतपूर्व संधी मिळाली. कमलाबाईंचे वडील आनंद नानोजकर दादासाहेब फाळके यांचे जवळचे मित्र.भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी चित्रपट तंत्र अवगत नसलेल्या काळात अत्यंत परिश्रम घेऊन ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय चित्रपटाची निर्मिती केली. या यशस्वी निर्मितीनंतर १९१४ मध्ये त्यांनी ‘भस्मासुर मोहिनी’ आणि ‘सत्यवान सावित्री’ या दोन चित्रपटांची निर्मिती केली.

       ‘मोहिनी भस्मासुर’ ची जुळवाजुळव करताना दादासाहेब फाळके दुर्गाबाईंच्या घरी आले होते. तेंव्हा अंगणात खेळत असलेली लहान कमला त्यांना दिसली.त्यांनी कमला च्या वडिलांना विचारलं, “मोहिनी भस्मासुर मध्ये मोहिनीची भूमिका करायला कमलाला पाठवता का? वडील आश्चर्याने म्हणाले, कमल? आणि तीही सिनेमात? दादासाहेब म्हणाले, “अहो, चित्रपट पौराणिक आणि सात्विक आहे. तिला काम करायला काहीच हरकत नाही. शिवाय काम घराच्या शेजारीच तर आहे. तिच्याबद्दल काळजी करण्याचं काहीच कारण नाही. माझ्या मुलीसारखीच ती आहे. बघता बघता तीच काम संपून जाईल. वाटलं तर तुम्हीही या चित्रीकरणाच्या वेळी”.असे दादासाहेबांनी समजून सांगितल्यावर त्यांनी कमलाला चित्रपटात  मोहिनीच्या कामासाठी परवानगी दिली. एव्हढंच नाही तर रोज ते स्वतः आपल्या मुलीला घेऊन चित्रीकरणासाठी जात. चित्रीकरण सुरु झालं खरं, पण आता दादासाहेबांसमोर पार्वतीच्या भूमिकेसाठी स्त्री पात्राचा प्रश्न उभा राहिला. ओळखीतून खूप प्रयत्न केले पण सगळीकडे नकारच मिळाला. ते वेश्यावास्तीतही जाऊन आले. त्यांनाही सिनेमात स्त्रीने काम कारण इभ्रतीचं वाटेना. हे प्रयत्न ते कमलाच्या वडिलांना वेळोवेळी सांगत होते.




       एक दिवस मनाचा हिय्या करून दादासाहेबांनी त्यांना विचारलं, दुर्गाबाईंना पार्वतीचं काम करायला परवानगी देता का?कमलामुळे स्टुडीओतलं वातावरण आतापर्यंत दुर्गाबाई आणि आनंदरावांना परिचयाचं झालं होतं. त्यामुळे फार आढेवेढे न घेता त्यांनी पत्नी दुर्गाबाईंनाही परवानगी दिली आणि पार्वती आणि मोहिनी या दोन प्रमुख स्त्री भूमिकांसाठी दादासाहेब फाळके यांना खुद्द स्त्रिया मिळाल्या. अशा तऱ्हेने भारतीय चित्रपटातल्या दुर्गाबाई या पहिल्या नायिका ,तर कमला बाई पहिल्या बालनटी ठरल्या. खरं तर ही मोठी ऐतिहासिक घटना होती. कारण याआधी ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटात तारामती आणि इतर स्त्री भूमिका पुरुषांनीच केल्या होत्या. मोहिनी भस्मासुर हा चित्रपट २७ डिसेंबर १९१३ ला प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचं भाग्य कमलाबाईंना मिळालं. तो एक संस्कारच होता आणि याचा, कमला बाईंना खूप अभिमान वाटत होता.

       कमलाबाईनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं, ते हॅम्लेट या नाटकाद्वारे. यावेळी त्यांचं वय होतं अवघं पाच वर्ष. सौंदर्य, आवाजाची देणगी, उत्तम पाठांतर, यामुळे रंगभूमीवर त्या विविध कामे करीत असत. विशेषता बॅक स्टेजवर प्रॉम्पटिंग ची जबाबदारी बऱ्याचदा पार पाडीत असत.आईं दुर्गाबाईं बरोबर कमलाचेही विविध नाटक कंपन्याच्या नाटकात काम करणे चालू होते.
 
      स्वत:ची नाटक कंपनी, शेतीवाडी, घरदार अशा पिढीजात असलेल्या गोखले घराण्यातील रघुनाथ यांच्याशी कमला बाईंचा विवाह झाला.आणि अर्थातच रघुनाथ आणि रामभाऊ या दोन भावांच्या चित्ताकर्षक नाटक मंडळीत मालकीणबाई आणि अभिनेत्री म्हणून सुद्धा त्यांचा प्रवेश झाला.रघुनाथ राव गोखले यांचं घराण चिपळूण गुहागर मार्गावरील वेळणेश्वरचं. पण पोटापाण्यासाठी कर्नाटकातल्या कागवाड इथं सधन शेतकरी म्हणून स्थायिक झालेलं. पिढीजात श्रीमंती मुळे रघुनाथ व त्यांचे भाऊ, वामनराव, रामभाऊ व विष्णुपंत या देखण्या भावांनी शेतीकडे लक्ष न देता, हौस म्हणून नाटकात कामे करण्यास सुरुवात केली.

       रघुनाथराव, किर्लोस्कर नाटक कंपनीत संगीतप्रधान नाटकात काम करत असत. तर रामभाऊ शेक्सपियर ची गद्य नाटके करीत असत. किर्लोस्कर कंपनी डबघाईला आल्यानंतर या दोघांनी मिळून ‘चित्ताकर्षक नाटक मंडळी’ ही नाटक कंपनी सुरु केली. ही कंपनी म्हणजे एक मोठा संसारच होता. सतत नाटकाचे दौरे असत. कमलाबाईनी लग्नानंतर घराबरोबर या कंपनीची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्यामुळे कंपनीतल्या लोकांचे जेवणखाण, कपडेलत्ते, औषधोपचार व इतर सोयीसुविधा हे सर्व बिनबोभाट चालायचं. त्यांचे हे दोन्ही संसार समांतर चालू होते.
कमलाबाईना तीन अपत्ये होती. मधुसूदन उर्फ लालजी,चंद्रकांत आणि सुर्यकांत.मोठ्या लालजीचा जन्म तर कमलाबाई नाटकाच्या दौऱ्यावर असतांना, प्रवासातच बोटीवर झाला.

कमलाबाई, रघुनाथराव तीन मुलं, दीर रामभाऊ असा हा परिवार. कागवाड हून शेतीचं धान्य, पैसा, नाटक कंपनीची मिळकत, असे  बरे आनंदाचे दिवस चालले होते. त्यातच अचानक अल्पशा आजाराने रघुनाथ रावांना ऐन पंचविशीत देवाज्ञा झाली आणि १७ वर्षे चाललेल्या चित्ताकर्षक नाटक मंडळीचा कणाच मोडला. पैसा बंद झाला. त्या काळी ज्या वैभवशाली नाटक कंपन्या होत्या, त्यात चित्ताकर्षक मंडळी सुद्धा होती.

 रघुनाथ रावांच्या निधनाने कंपनी बंद पडली तरी, खचून न जाता, स्वस्थ बसायचं नाही असं म्हणून कमलाबाई धीराने कंबर कसून उभ्या राहिल्या. वेगवेगळ्या नाटक कंपन्यांकडे कामे मिळवण्याचा प्रयत्न करू लागल्या. आई दुर्गाबाई, स्वताची तीन मुलं, दीर रामभाऊ व स्वतःचा कुत्रा पण यांची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि एक दिवस मिरजेच्या तवन्नापा चिवटे यांच्या ‘मनोहर स्त्री संगीत मंडळी’ या कंपनीत कमलाबाईंना काम मिळालं. सौंदर्य, आवाज, अभिनय आणि संगीत या गुणांमुळे त्यांना प्रमुख भूमिका मिळाल्या. खड्या आणि सुरेल आवाजामुळे स्त्री नाटक कंपनीत, कमलाबाई पुरुषांच्या भूमिकाच करत. 

  मानापमान मधला धैर्यधर. संशयकल्लोळ मधला अश्विन शेठ, सौभद्र मधला कृष्ण, मृच्छकटिक मधला चारुदत्त या प्रमुख पुरुष भूमिका त्या रंगवत. ज्या काळात स्त्री भूमिकाही पुरुषच साकारायचे त्या काळात प्रवाहाच्या विरुध्दपुरुष भूमिका एका स्त्रीनं करणं हि केव्हढी धैर्याची गोष्ट होती. ही भूमिकाही इतकी बेमालूम असायची कि मानापमान मधल्या धैर्यधराची भूमिका बघून एक मुलगी कमलाबाई ना पुरुष समजून त्यांच्या प्रेमात पडली. ती इतकी कि,या दौऱ्यात तीने या धैर्यधराला भेटायला दोन चार गावांपर्यंत प्रवास करून पाठलाग देखील केला.

     चिवटेंच्या नाटक कंपनीतल्या व्यवहाराची शिस्त त्यांना फार आवडे. काम सुरु होते. पण जीवन संघर्षाला आता सुरुवात झाली होती. मग त्यांनी मनोहर स्त्री मंडळीत काम केलं. ही पण कंपनी बंद पडल्यावर सामाजिक विषयावर नाटक करणारी लेले बंधूंची ‘नाट्यकला प्रसारक मंडळी’ या मोठ्या कंपनीत कमला बाईना बोलावणं आलं. एव्हाना त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली होतीच. या कंपनीत सारोळकरांच्या ‘पेशव्यांचा पेशवा’ या नाटकातील कमलाबाईचं काम अत्यंत गाजलं. पुण्यातल्या थिएटर मध्ये तर हाउस फुल्ल बोर्ड लागायचा. निम्मा प्रेक्षक वर्ग कमलाबाईंचाच असायचा. 

      या कंपनीत आल्यावर कमलाबाईना अभिनय दृष्ट्या व वैचारिक दृष्ट्या उत्तम मार्गदर्शन मिळालं. रंगभूमीवर नट कसा दिसावा, रंगमंचावर कसं वावरावं, अभिनय कसा करावा, गाणं म्हणताना, सुरुवात व शेवट कशी करावी, या महत्वाच्या गोष्टी तिथल्या तालीम मास्तरांनी शिकवल्या.
याच कंपनीत स्वातंत्रवीर सावरकर यांचे संगीत ‘उ:शाप’ नाटकही चालू होते. त्यातही कमलाबाईनी काम केले. स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानहून सुटल्यानंतर, रत्नागिरी ला नजर कैदेत असतानाही त्यांनी हिंदू समाज संघटीत व एकजीव होण्यासाठी काम केले. रत्नागिरी येथे पतितपावन मंदिराची स्थापना केली. अस्पृशता निवारणावरील उशाप हे नाटक बसविताना त्याच्या तालमी सुद्धा पोलीस संरक्षणात होत असत. या तालमी पतित पावन मंदिरातच होत असत. ब्रिटीश गव्हर्नर ने त्यावर आक्षेप घेऊन या नाटकाच्या स्क्रिप्ट चे ताबडतोब इंग्रजीत भाषांतर करून मागितले होते.अशा प्रकारे कमला बाईंचा इतक्या अडचणींवर मात करून रंगभूमीसाठी आणि नंतर पोटापाण्याची सोय म्हणून प्रवास चालूच होता .
 
      पुढे नंदू खोटे यांची रेडिओ स्टार्स कंपनी, त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांची डेक्कन स्पार्क, मग गुर्जर गंधर्वांची हिंदप्रताप थिएट्रिकल कंपनी असा प्रवास चालू होता. एकदा तर त्या सरळ कर्नाटकात जाऊन गरुड नाटक मंडळीत दाखल झाल्या. ‘लंकादहन’ या नाटकातल्या सीतेच्या भूमिकेसाठी जिद्दीने कानडी भाषा शिकल्या. कुटुंबापासून दूर राहावे लागे म्हणून पुन्हा ही कंपनी सोडली. पुढची नोकरी मिळेपर्यंत कुटुंबाचे हाल व्हायचे.कागवाड ची शेतीवाडी ,दुर्लक्ष्य झाल्यामुळे कुणीतरी गिळंकृत केली. यावेळी चक्क धर्मशाळेचा आश्रय घ्यावा लागला. काही वेळा नाटकातील प्रवेश व गाणी सादर करून पैसे मिळवत त्या.पण ही व्यवस्था कायमची नव्हती. त्यामुळे पुढे पुढे कुटुंब घेऊन देवळात जाऊन त्या राहू लागल्या. अशी तात्पुरती सोय व्हायची. कर्ज काढून घर चालविणे हा प्रकार त्यांना अजिबात मान्य नव्हता. कष्ट करून जेव्हढे पैसे मिळतील तेव्हढ्यावरच भागवायचे असा बाणा.

      मिरजेच्या कृष्णेश्वराच्या देवळात राहात असतांना औंध चे पंतप्रतिनिधीनी लिहिलेला ‘कीर्तन सुमनहार’ हा ग्रंथ व काही पुस्तके कमलाबाईंच्या दिरांनी, रामभाऊंनी त्यांना आणून दिली आणि सांगितले, “ही पुस्तकं वाच,पाठ कर आणि गावोगावी कीर्तन कर. कीर्तनकाराच्या अंगी बहुरुपिपणा असावा लागतो.रसाळ वाणी गायन, नृत्य आणि आख्यान या विषयावर विलक्षण हुकुमत असावी लागते”. अशा प्रकारे भगवी कफनी घालून त्या देवळातून कीर्तन करून पैसा मिळवीत.अशा परिस्थितीत तिन्ही मुलांचे शिक्षण आपल्याला करता येत नाही याचं दु:ख कमलाबाईना होई. त्यांना लिहिता वाचता येत होतं. मराठी, हिंदी,उर्दू, कानडी या भाषा पण येत होत्या. त्यामुळे त्यांनी घरच्या घरीच मुलांना लिहायला वाचायला शिकविले.

     कमला बाईंच्या गाण्यातले प्राविण्य बघून व कीर्तने ऐकून,पुण्याजवळच्या भोर संस्थानच्या महाराजांनी त्यांची दरबार गायिका म्हणून नेमणूक केली होती. दोन ते तीन वर्ष त्या तिथे राहिल्या. नाटकातून प्रदीर्घ काळ काम केलेल्या कमला बाईंची आपल्या कलेवर, विद्येवर आणि मायबाप प्रेक्षकांवर किती निष्ठा होती त्याचा हृदयद्रावक प्रसंग आहे. केळकरांच्या नाटक कंपनीचा दौरा सोलापूरला होता. तिथल्या नूतन संगीत थिएटरात नाटक मंडळींची राहण्याची सोय होती. दीर रामभाऊ खूप आजारी होते.

कमलाबाई : माझे दीर आता शेवटच्या अवस्थेत आहेत.केंव्हा जातील याचा भरवसा नाही.जेंव्हा नाटक असेल तेंव्हा त्यांची विंगमध्ये कॉट टाकून झोपण्याची व्यवस्था करा. असे केळकरांना सांगून व्यवस्था करवून घेतली.नाटक चालू असताना ,मधून मधून त्या रामभाऊन्ची चौकशी करून पुन्हा रंगभूमीवर आपला प्रवेश करत असत.अशा स्थितीत पहिला अंक संपला आणि रामभाउनी प्राण सोडला.केळकर म्हणाले,
केळकर: आता पुढलं नाटक बंद करूया.प्रेक्षकांना त्यांचे पैसे परत देऊन टाकू.मी प्रेक्षकांना घडलेला प्रकार सांगतो.
कमलाबाई : थांबा,कुठल्याही कारणांन नाटक बंद होतं कामा नये.प्रेक्षक आपला वेळ,पैसा,खर्च करून नाटक बघायला आलेले असतात,त्यांचा विरस होता कामा नये.माझ्या वैयक्तिक दु:खासाठी त्यांना परत पाठवणं योग्य नाही. माझे दीर आता गेलेलेच आहेत ते काही आता परत येणार नाहीत.” असं म्हणत कमला बाईनी काळजावर दगड ठेऊन अशाही परिस्थितीत संपूर्ण नाटक सादर केलं आणि प्रयोगानंतरच आपल्या दु:खाला मोकळी वाट करून दिली. एव्हढी निष्ठा .

    पतिनिधना नंतर मुलांना मोठं करत ,आई व दीर यांनाही सांभाळत कमला बाईनी खूप कष्ट घेतले. अनेक संकटाशी धैर्याने सामना केला. मानाने जगल्या. मुलंही मोठी झाली. लालजींना संगीताची आवड असल्याने त्यांनी प्रसिध्द तबला नवाज थिरकवाँ साहेबांची शागिर्दी पत्करली. सुर्यकांत गोखलेनीही पंडित लालजी आणि थिरकवाँ साहेबांकडे तबल्याचे धडे गिरविले. आणि दोघेही प्रसिध्द तबला वादक झाले. 


तर चंद्रकांत गोखलेंनी नाट्य व सिनेमा क्षेत्रात जवळ जवळ पाऊण शतक गाजवलं. या सृष्टीत चतुरस्त्र अभिनेता म्हणून आपला ठसा उमटविला. मोठा झाल्यावर स्वतः या क्षेत्रात उडी घेऊन आईच्या कष्टांना पूर्ण विराम दिला होता. चंद्रकांत सात-आठ वर्षांचे असताना मनोहर स्त्री नाटक कंपनीत कमला बाई नोकरी करत होत्या. तेंव्हा पुन्हा हिंदू हे नाटक चालू होते. या नाटकात महादाजींच काम करणारा मुलगा आजारी झाल्यानं अचानक ते काम करण्याची संधी चंद्रकांत यांना मिळाली. रंगभूमीवरच त्याचं हे पहिलच पाऊल होतं. पण चंद्रकांत नी सुंदर काम केलं इतकं कि, स्टेजवर त्यांच्या अंगावर चांदीच्या व इतर नाण्यांचा पाऊस पडला. इतकं नाटक उत्तम रंगलं. नाटक संपल्यानंतर कमला बाईनी त्याला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, “किट्या लवकर घरी चल,आज तुझी मी दृष्ट काढणार आहे.”रंगभूमीवरच्या या पहिल्याच पदार्पणाला आईचा इतका भरभरून आशीर्वाद मिळाल्यानं चंद्रकांतला खूप आनंद झाला.

      कमला बाईनी नाटक,मूकपट आणि चित्रपट यातील प्रत्येक व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करून दिला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत २०० हून अधिक नाटकांत, मूकपट  व ३५ पेक्षाही अधिक चित्रपटातून भूमिका साकारल्या. त्या सगळ्याच नायिका रसिकांच्या कायम लक्षात राहतील. त्यांनी भूमिका केलेले हिंदी चित्रपट होते ,
अफ़गान अबला (१९३४),अंबरीश (१९३४),अल्लादीन और जादुई चिराग (१९५२),आख़री ग़लती (१९३६),एक नज़र (१९७२),औरत का दिल (१९३३),कृष्ण सुदामा (१९३३),ग़रीब का लाल (१९३९),गहराई (१९८०),गुणसुंदरी सुशीला (१९३४),चंद्रहास (१९३३),चाबुकवाली (१९३८),चार चक्रम (१९३२),देवी देवयानी शर्मिष्ठा (१९३१),नवजीवनम कमला (१९४९),नास्तिक कमला (१९५४),नीति विजय (१९३२),प्रभुका प्यारा (१९३६),बॅरिस्टर्स वाईफ़ (१९३५),बाल्यकालसखी (१९६७),बिख़रे मोती (१९३५),बे ख़राब जन (१९३६),भूतियो महाल (१९३२),भूल भुलैयाँ (१९३३),भोला शिकार (१९३३),मिर्ज़ा साहिबाँ (१९३३),मोहिनी भस्मासुर (१९३१),राजरानी मीरा (१९३३),लाल-ए-यमन लालारुख (१९३३),शैल बाला (१९३२),सोना चाँदी (१९४६),स्टंट किंग (१९४४),स्ट्रीट सिंगर (१९३८),हक़दार (१९४६),हलचल (१९७१).


 
    अशा तल्लख स्मरणशक्ती, तत्वनिष्ठ, निडर, शूर, कष्टाळू, काम तत्पर, धैर्यशील, चाणाक्ष अशा जवळ जवळ ८० वर्षे रंगभूमीची इमाने इतबारे सेवा केलेल्या, भारतीय चित्रपट आणि मराठी रंगभूमीवरची पहिली अभिनेत्री कमलाबाई गोखले १८ मे १९९७ रोजी वयाच्या शहाण्णव्या वर्षी हे जग सोडून गेल्या, नाही मृत्युनंतर देहदान करून अमर जाहल्या. या आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला शतश: नमन!

 आठवण --- आकाशवाणीसाठी तेजशलाका या मालिकेत कमला बाई गोखले या विषयावर लेखन करण्यासाठी मा.चंद्रकांत गोखले यांना पुण्यात त्यांच्या राहत्या घरी भेटले होते. कमलाबाई यांच्याबद्दल माहिती हवी असे सांगितले. उद्या सकाळी अमुक वाजता या म्हणाले. बसने लांब उतरून, घर शोधत येईपर्यंत २०-२५ मिनिटे उशीर झाला होता. flat सापडला एकदाचा. जरा घाबरतच गेले. उशीर झालाय तेंव्हा जावे कि नाही असे वाटत होते. पण आज टाळलं तरी नंतर जावं लागणारच होतं. म्हणून तशीच गेले. 

दारावरची बेल वाजवली. मुख्य दार उघडच होतं. फक्त जाळीचं दार लावलं होतं. ती वेळ मला दिलेली असल्याने ते वाट बघत होतेच. मनात धाकधूक चालली होती. जरा वेळाने ते स्वतः दार उघडायला आले. दार उघडले, मी नाव सांगितलं, काल फोन केला होता त्याप्रमाणे आले आहे सांगितलं. काहीही बोलले नाहीत ,या नाही, काहीच नाही. त्यांच्या पाठोपाठ मीही आत गेले. प्रचंड दडपण आलं होतं. आत आल्यावर म्हणाले, आता माझ्या जेवणाची वेळ झाली आहे, बसावं लागेल तुम्हांला. म्हटलं चालेल. मी थांबते. 


एका अर्थी बरेच झाले उशीर झाला ते. कारण मला बराच वेळ थांबता आलं, त्याचं जेवण होईपर्यंत त्या खोलीतील पुरस्कार पाहत बसले. जणू लायब्ररीच होती ती. त्यामुळे घरात कपाटाच्या कपाटं भरून भिंतीभर मानचिन्हे ,पुरस्कार ,ढाली,आणि गौरवच गौरव असलेल्या भिंती बघायला मिळाल्या. ते सर्व वाचत थांबले तेव्हढा वेळ. बघता बघता मनात विचार आला कि एव्हढी ही बक्षिसे आहेत, ही लिहून ठेवली असतील का? याची सूची करायला पाहिजे. एकदा प्रसिध्द भावगीत गायक गजाननराव वाटवे यांची मुलाखत घेताना त्यांनी हीच खंत व्यक्त केली होती. ही बक्षिसे, फोटो,पुरस्कार यांची आम्ही गेल्यानंतर किंमत शून्य, फक्त राहते अडगळ नाहीतर जागा भंगारमध्ये आणि हे सर्व बघताना मला ते आठवलं.चंद्रकांत गोखले यांच्या घरातील हे दृश्य डोळे दिपवणार होतं. घराणंच नाट्य-सिनेमा-संगीत या कलाक्षेत्रातल्या कारकीर्दीचं. जवळ जवळ ८५ वर्षांची चार पिढ्यांची कारकीर्द होती ती. मला मनापासून वाटत होतं कि याचं काहीतरी डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. नव्हे आपणच करूया त्यांना विचारून. 

तेव्हढ्यात चंद्रकांतजी त्यांचा डबा खाऊन मी बसले होते तिथे आले आणि मी भानावर आले कि अरे आपल्याला मुलाखत घ्यायची आहे, गप्पा मारायच्या आहेत. कमलाबाई गोखले यांच्या बद्दल. त्यांना मी पुन्हा विषय सांगितला. ते म्हणाले बेबी बद्दल ? माझा प्रश्नार्थक चेहरा बघून त्यांनी खुलासा केला मी माझ्या आईला बेबी म्हणूनच हाका मारत असे. थोड्या गप्पा झाल्या. काही माहिती त्यांनी दिली. कारण कुठेही संदर्भासाठी मला कमलाबाई गोखले यांची माहिती मिळत नव्हती. मी म्हटलं हो त्यांच्या बद्दल सविस्तर माहिती हवी आहे.तुम्ही सांगा मी लिहिते. मला खूप उत्सुकता होती, कधी संवाद सुरु होईल असे वाटत होते. म्हटलं पुस्तक, स्मरणिका असं काही असेल तर ते पण द्याल का?

बोलण्यापेक्षा मी बेबीवर लिहिलं आहे ते आधी वाचा, आणखी काही लागलं तर सांगीन. असं म्हणून त्यांनी एक मासिक वजा पुस्तक आणून दिलं. आणि ते आत निघून गेले. कदाचित आताच वाचावं आणि परत द्यावं म्हणून? ते मी चाळल. इतके जुने संदर्भ लक्षात थोडे राहणार होते? मी विचारल हे पुस्तक घेऊन जाते, परत आणून देते. चेहऱ्यावर त्यांची नाराजी दिसली .मग म्हटलं झेरोक्स काढून घेते, पण त्यासाठी ते बाहेर न्यावं लागणार होतं. त्यांना विश्वास नाही वाटला, बरोबरच आहे. हि संपदाच आहे ,ती परत नाही मिळाली तर?ते म्हणाले झेरॉक्स काढून लगेच आणून द्या, नाही आलात तर? हो आता लगेच आणून देते. त्यांची शिस्त आणि काळजी याची मला जाणीव होती. मला त्यांच्या बोलण्याचं काही वाटलं नाही. झेरॉक्स काढून आणून द्यायला अर्धा तास गेला. त्यांच्या हातात परत पुस्तक आणून दिलं, त्याच्या बद्दल त्यांना हायसं वाटलं असणार नक्की. पण माझ्या बद्दल चा विश्वास दृढ झालेला दिसला. पुन्हा मौन. काहीच बोलले नाहीत.फक्त एक कटाक्ष. त्यांच्या कटाक्षात मला दिसला आनंद आणि धन्यवादाची भावना, त्यांना मिळालेला त्यांच्या आईचा आठवणींचा शब्दरूपी ठेवा खरच मौल्यवान होता. त्यामुळे सुरुवातीला मला वाटलेली शिस्त मोडल्याची अपराधीपणाची भावना, आदरयुक्त भीती नाहीशी होऊन त्या जागी विश्वास संपादन केल्याचा आनंद होता, त्या आनंदातच मी घरी परतले पुढचं स्क्रिप्ट लिहायला. मनातल्या मनात या वयातले चंद्रकांत जी, त्यांची एव्हढी मोठी कारकीर्द, अनेकविध अनुभवांनी काठोकाठ भरलेल जीवन, आईं कमलाबाई यांच्या रंगभूमीचा वारसा चालवणाऱ्या ,आईची शब्बासकी मिळवणाऱ्या .आईबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर असलेल्या चंद्रकांत गोखले यांना मनोमन मानाचा मुजरा!
                                 ---------------------------------------------------------

       डॉ.नयना कासखेडीकर ,पुणे.          

Wednesday 3 January 2018

मुक्काम पोस्ट रत्नागिरी - भाग २

                                             मुक्काम पोस्ट रत्नागिरी - भाग २

     
     रत्नागिरीच्या मुक्कामात लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीचे मनापासून दर्शन घेतले. वेगवेगळ्या भेटींमधून एक प्रश्न सारखा विचारला जात होता, थिबा पॅलेस बघितला? आणि तो बघण्याची उत्सुकता जास्तच ताणली जायची. रत्नागिरीत आल्यावर बघण्याच्या यादीत पहिल्या  टॉप टेन मधलं हे ठिकाण ‘थिबा राजवाडा’. पण त्याची फारशी माहिती कुणी सांगितली नव्हती. डोळ्यासमोर म्हैसूर, कोल्हापूर, भोर, इंदौर, बडोदा,जयपूर आणि पुण्यातल्या विश्रामबागवाडा सारखे वाडे आले. आठवत होती संस्थाने आणि राजघराणी. साधारण असाच असावा थिबा राजवाडा ! पण थिबा?  हे  कसलं नाव? ऐकायला विचित्रच वाटलं. म्हटलं असेल, थिबा राजा रत्नागिरीला भेट देऊन गेला म्हणून त्याच्या नावाने तो प्रसिध्द असेल. कळेलच इतिहास. आज थिबा राजवाडा बघायला सूर्यास्ताच्या वेळी जायचं असं ठरलं. कारण चांगला व्ह्यू टिपायचा होता.
  
  


     रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यापासून आत वळलो. वळणावळणाच्या रस्त्याने राजवाड्यासमोर आलो. कल्पना केली होती, गेट मधून शिरताना समोर उत्तम बगीच्याची रचना असेल, आत प्रवेश देणारे गार्ड असतील. छे तसं काहीच नव्हतं. गाडी थेट आत जाऊन राजवाड्यासमोरच जाऊन थांबली. राजवाड्यासमोर सर्वत्र गवत वाढलेले. इथे एकेकाळी सुंदर बगीचा असल्याच्या खाणाखुणा आहेत. भोवतालच्या परिसरात जुनी झाडे अभिमानाने उभी आहेत, इतिहास माहिती असल्यासारखी. समोर राजवाड्याची तीन मजली ब्रह्मी  शैलीतील देखणी वास्तू एकाकी पडल्यासारखी उभी आहे. होय, एकाकी थीबाचा एकाकी पॅलेस .
  
  


     आताच्या म्यानमार म्हणजे पूर्वीच्या ब्रह्म्देशाच्या राजा थिबा मिनला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी १९१० मध्ये बांधलेला हा राजवाडा, गेली १०७ वर्षे त्याच्या दर्दभऱ्या कहाणीसह  रत्नागिरीच्या समुद्रकिनारी उभा आहे. ब्रिटीश राजसत्तेविरुद्ध बंड पुकारल्याने राजा थिबाला आयुष्याची तीस वर्षे रत्नागिरीत स्थानबद्धतेत काढावी लागली. १९१६ पर्यंत म्यानमारच्या या राजा- राणीचं वास्तव्य या राजवाड्यात होतं. २७ एकराचा भव्य परिसर, त्याच्या मधोमध कोकणातील जांभा दगड, ब्रह्म देशाचे बर्मा टिक वूड आणि ब्रिटीशांचे स्थापत्य विशारद यातून एका वेगळ्याच शैलीची ब्रह्मदेश व भारत यांना जोडणारा दुवा असलेली ही वास्तू तयार झाली आणि इथेच नाती जुळली ब्रम्हदेश व रत्नागिरी व महाराष्ट्राची.

  

     चौदा खोल्या, दोन मोठाली दालने, स्वयंपाकघर, सज्जे, कोकणातल्या घरांसारखा  कौलारू व्हरांडा, मध्यभागी मोकळा चौक, त्यात मध्यभागी  चुन्याच्या निवळीवर चालणारे कारंजे, वास्तूच्या पुढे व मागील बाजूस बागेची रचना. जागोजागी कमानी असलेल्या काचेच्या खिडक्या असा, सुरेख रचना असलेला हा पॅलेस. पश्चिमेची सूर्यकिरणे अंगावर घेतलेला राजवाडा जसा उजळून निघतो तसाच पूर्वी दिव्यांची सोय नसताना या राजवाड्यात तेलाचे दिवे लावले जायचे, तेंव्हा हा राजप्रासाद रात्रीसुद्धा उजळून निघायचा. दिवाळीत दीपोत्सव असायचा. तेंव्हा रत्नागिरीकर या सौंदर्याचे दर्शन घ्यायला आवर्जून यायचे. आता वर्षातून एकदा २६ जानेवारीला थिबा राजवाड्यात कला संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते तेंव्हा हा पॅलेस प्रकाशझोतात येऊन त्याच्या अस्तित्वाची मोहर रत्नागीरीकरांवर उमटवत असतो. या पॅलेसच्या सौंदर्यावर ‘कहाणी थिबा राजाची’, ’ग्लास पॅलेस’ अशा कथा कादंबऱ्याही प्रसिध्द आहेत.
  
  

     या सुंदर राजवाड्याचा इतिहास मात्र मनाला वेदना देणारा आहे. ब्रह्मदेशातील कोनबाँग या राजघराण्यात थिबाचा जन्म १ जानेवारी १८५९ रोजी मंडाले येथे झाला. वडील राजा मिन्डॉन आणि आई सिम्बुमाशीन. १८७८ मध्ये थिबाला राजघराण्याचे वारस म्हणून घोषित केलं आणि पंधरा दिवसात राजा मिन्डॉन  यांचा मृत्यू झाला. तर वयाच्या १९ व्या वर्षी युवराज थिबा राज्याच्या गादीवर बसला. ब्रम्ह्देशाच्या राजवटीतला ‘थिबा मिन’ हा शेवटचा राजा ठरला. वय लहान असलं तरी  जनतेच्या कल्याणाची अनेक कामे त्याने केली होती. कायदा व सुव्यवस्था याची घडी बसवली. देशातली गुलामगिरी संपवली. त्या देशाचा थिबा हा सर्वोच्च पाली पदवीधर होता. ब्रह्मदेशाचा राजा म्हणून त्याला केवळ सात वर्षे राज्य करता आलं.
     

     १८८५ मध्ये ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करताना आपला मोर्चा ब्रम्हदेशाकडे वळवला होता. सलग ३ वर्ष राजा थिबाने ब्रिटिशांशी टक्कर दिली. शरण जाणं किंवा युध्द करणं यापैकी एक पर्याय त्याला निवडायचा होता ! घराण्याचा वारसा टिकवणं महत्वाच होतं. त्यामुळे ब्रिटीशांशी युद्धाला सामोरं जायचं त्याने ठरवले. दुर्दैवाने पंधरा दिवसातच त्याचा पराभव झाला.२९ नोहेंबर १८८५ ला राजा थिबा शरण आला आणि त्याचे भविष्य बदलले. एप्रिल १८८६ ला ब्रिटिशांनी त्याला देशापासून आणि जनतेपासून लांब ठेवण्यासाठी,  कुटुंबासह भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर रत्नागिरी शहरात आणून ठेवले. तो महत्वाचा राजबंदी असल्याने, ब्रिटीशांनी त्याला राहायला बंगला, मानधन, काही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. सुरुवातीला दिलेला बंगला जुना आणि अपुरा आहे अशी तक्रार व्हॉइसरॉयकडे केल्यानंतर  ब्रिटीशांनी त्याला रत्नागिरीच्या दक्षिणेला भाट्ये खाडीच्या कडेला नवा मोठा बंगला १९१० मध्ये बांधून दिला. तोच हा ‘थिबा राजवाडा’. तो थिबाच्या पसंतीने आणि त्याच्या देखरेखेखाली बांधला असे म्हणतात.
     
     या नव्या राजवाड्यात राहण्याचे भाग्य थिबाला फक्त पाच ते सहा वर्षेच मिळालं. डिसेंबर १९१६ मध्ये  त्याचा मृत्यू झाला. शेवटचा श्वाससुद्धा या राजाने नजरकैदेतच घेतला. धोरणी ब्रिटिशांनी थिबाचा अंत्यसंस्कार म्यानमारमध्ये म्हणजे ब्रह्मदेशात नेऊन करण्यास बंदी घातली. असेच बहादुरशाह जफर ह्याला अटक करून रंगूनला कैदेत ठेवले होते. त्याच्या मृत्यूनंतरही मृतदेह भारतात आणण्यास ब्रिटिशांनी बंदी घातली आणि रंगूनमधेच दफन करायला लावले. या दोन्ही घटनेत ब्रिटिशांना भीती होती कि त्या त्या देशात जाऊ दिल्यास, त्यांची मोठी स्मारके होतील आणि ती लोकांची स्फूर्तिस्थाने होतील. आपल्या राजवटीस विरोध वाढेल.

     मातृभूमीपासून तुटलेल्या थिबाचे अंत्यसंस्कार तरी त्याच्या देशात - म्यानमारमध्ये व्हावेत म्हणून  राणीने खूप प्रयत्न केले. ब्रिटीश सरकारबरोबर अडीच वर्ष पत्रव्यवहार चालू होता. ती अडीच वर्ष थिबाचे पार्थिव सांभाळण्यात आले, पण शेवटपर्यंत ब्रिटिशांनी मागणी धुडकावून लावली. शेवटी १९ मार्च १९१९ ला रत्नागिरीतच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्युनंतर हा राजवाडा ब्रिटिशांच्या ताब्यात होता.

     हातात सत्ता असेल, त्याबरोबरच विवेक, संवेदनशीलता व चांगला दृष्टीकोण असेल तर अनेक चांगल्या घटना घडू शकतात. याचं उदाहरण म्हणजे, जनता पक्षाच्या राजवटीत परराष्ट्रमंत्री या नात्याने मा.अटल बिहारी वाजपेयी, ब्रह्मदेशाच्या दौऱ्यावर गेले असताना, एकेकाळचा भारताचा सम्राट व थोर कवी म्हणून    बहादुरशाह जफर यांच्या स्मृतीस्थळास त्यांनी भेट दिली. त्यावेळी तिथे सगळ्यांना राजा थिबा व त्याच्या भारतात असलेल्या वंशजांची आठवण झाली. भारत व ब्राह्म्देशाच्या या दोन महान व्यक्तींच्या आठवणी व स्मृती अवशेष यांची आता अदलाबदल करण्याचा विचार झाला. इथल्या टूटू चा अर्ज मागविण्यात आला. मानधन मंजूर केलं गेलं. तिला काही प्रॉपर्टी देण्याचे ठरले...पण हाय! जनता सरकार पडलं. आणि राजा थिबाला मिळणारा न्याय तिथेच गोठला. नाहीतर हा निर्णय देशाच्या सांस्कृतिक धोरणाचा खूप मोठा व महत्वाचा टप्पा ठरला असता.     
     

आपला देश आणि राज्य सोडून दुसऱ्या देशातल्या एका लहान शहरांत ३३ वर्ष आयुष्य काढलं. तेही ऐन उमेदीच्या वयात असताना. वैवाहिक जीवन पण दुखा:तच गेलं. त्याची पत्नी राणी सुपायालत, तिची बहिण आणि त्याच्या चार मुली इथे राहत होत्या. फाया गाई, फाया लत, फाया, फाया गलाय अशा चार मुली. यातल्या फाया गाईने राजवाड्यात असलेल्या रखवालदाराबरोबर लग्न केले. गोपाळ सावंत त्यांचे नाव, त्यांना दोन मुले होती. त्यापैकी थोरली मुलगी म्हणजे टूटू !


थिबा राजाच्या मृत्युनंतर राणी सुपायलात मुलींना घेऊन रंगूनला परत गेली.  फाया गाई (१९४७ ला इंग्रज गेल्यानंतर) रंगूनला परतली, परंतु परधर्मीयाशी लग्न केले म्हणून तिला ब्रह्मदेशात स्वीकारले नाही आणि तिचे जगातले एकमेव माहितीचे ठिकाण असलेल्या रत्नागिरीत ती पुन्हा परतली. वडिलांप्रमाणे तिचे दुर्दैवाचे फेरे चालूच होते. विपन्नावस्थेत असतानाच, ती पण निधन पावली. नवरा गोपाळ यांचे आधीच निधन झाले होते. तिचे अंत्यसंस्कार जिल्हाधिका-यांनी नी वर्गणी गोळा करून केले.
  
 

गरीब, अशिक्षित टूटू राजघराण्यातील असून सुद्धा पोरकी झाली. टूटू ला आपण राजवंशातील आहोत याचीही कल्पना नव्हती. टूटू आता महाराष्ट्रीयन झाली. तिला फक्त ग्रामीण मराठी भाषा येत होती. पुढे तिने व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या शंकर पवार याच्याशी लग्न केले. तिला सात मुले होती. गोधड्या शिवणं, कागदी फुले करून विकणे, शेणाच्या गोवऱ्या थापून त्या विकणं अशी कष्टाची कामे करून आयुष्य काढलं. स्वत:च्या मुलांबरोबर अनाथ मुलांचा सांभाळ सुद्धा केला टूटू ने ! १७ वर्षापूर्वी, ऑक्टोबर २००० ला वयाच्या ९४ वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. सोनं, हिरे, माणके वापरणारा राजा थिबा, त्याची नात टूटू  यांचं प्रारब्ध कसं होतं ? टूटू ची मुलं, नातवंडे भारतीय/मराठी आहेत. थिबाचा वंश आजही भारतात अस्तित्वात आहे. थिबा राजाच्या आयुष्याची शोकांतिका मनाला चटका लावून जाते.
                                             



                      (सर्व फोटो वरील पहिले दोन राजवाड्याचे सोडून इंटरनेट वरून साभार परत) 
                                                          -----------------------------


- डॉ नयना कासखेडीकर, पुणे.