Monday 20 September 2021

भुलाबाई-भोंडला – लोकपरंपरा

 

                                भुलाबाई-भोंडला – लोकपरंपरा  

    

संस्कार भारतीचा महाभोंडला 

भाद्रपदात गौरी गणपती झाले की मुलींना वेध लागतात ते भुलाबाई किंवा भोंडल्याचे .त्या अगदी वाटच बघत असतात. लहानपणी भातुकली खेळायचा जसा तिचा हक्क च असतो, तसाच हा भोंडला किंवा हादगा आणि भुलाबाई उत्सव तिचा हक्काचा असतो. मनोरंजना बरोबरच त्यातून तिला शिक्षण पण मिळत असतं. असे शिक्षण देण्याची सुरुवातीला आपली मौखिक परंपरा होती. जात्यावरच्या ओव्या, दळणकांडण करताना म्हणायची गाणी. लग्न कार्यातली किंवा शुभ प्रसंगी म्हणायची मंगलगाणी, शेतातली कामे उरकताना म्हणायची गाणी, डोहाळजेवण, बारसे, पाळणा, विहीण म्हणणे असे अनेक प्रसंग गीतातून वर्णन करून साजरे केले जायचे. पणजी, आजी यांच्याकडून नातीपर्यंत सर्वजण ही मौखिक परंपरा सांभाळायच्या. यातून मंगलमय वातावरण तयार व्हायचे, उत्साह वाढायचा. तर जीवन जगण्याची ओढ निर्माण व्हायची. कारण जगण्यात आनंद असला तर जीवन सुसह्य होत जाते. म्हणूनच उत्सवप्रियता आपल्या सर्वांना जास्त प्रिय होती आणि आहे. साने गुरुजींनी म्हणूनच म्हटलं आहे की, “ नित्य क्रमाचे जेंव्हा उत्सव होतात तेंव्हा आयुष्य ही एक आनंदयात्रा होते”.            

    भारतीय लोकसाहित्यात अशा लोकगीतांची परंपरा समृद्ध आहे . प्राचीन वैदिक वाड:मयात त्याची मुळे आढळतात. अगदी जन्मापासून अंत्यविधी पर्यन्त जे धार्मिक विधी असतात त्याची त्या त्या प्रसंगाची गीते प्रत्येक भाषेत दिसतात. मग त्या त्या प्रांतातल्या ज्या परंपरा आहेत, व्रतवैकल्ये आहेत, चालीरीती आहेत, त्याचे वर्णन अशा लोकगीतातून आपल्याला घडत असते.

अशा साहित्यात मुख्यत: शिव-पार्वती, राधा-कृष्ण आणि राम-सीता हा विषय समान धागा म्हणून सर्व प्रांतात दिसतो. यात प्रेम भावना, आदर्श नाते संबंध, निष्कलंक चारित्र्य, आदर्श पती किंवा कुटुंब प्रमुख, विवाहसंस्था, प्रतिष्ठा असे अनेक विषय यातून प्रसृत होत असतात. लोकसाहित्यातील अनेक प्रकारात उदा. लोककथा, बोधकथा, भारुड, ओव्या, स्त्री गीते, उखाणे म्हणी, कूट प्रश्न, सवाल जबाब, लोकनाट्य यातून आपल्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर जे जे प्रसंग,विधी,संस्कार होत असतात त्या त्या वेळचे वर्णन या गीतातून येते. आपल्या सण उत्सवांशी निगडीत किंवा ऋतु बदलांप्रमाणे ही लोकगीते असतात. मनोरंजन, कल्पकता, चातुर्य, शहाणपण यातून सांगीतलेले असत. ही गीते वेगवेगळ्या भाषेत जरी असली तरी त्यांचा आविष्कार आणि समान दुवा ही संस्कृती च असते.

    आसामी भाषेतली बिहू गीते, बंगाली भाषेतली तुसू गीते, पंजाबी मधली तिजा गीते, तमिळ भाषेतली तिरूविळपात्तु अशी ही वेगवेगळी सण आणि उत्सव गीते आहेत. रोगनिर्मूलनासाठी धार्मिक विधी गीते असतात. ऋतु गीते, होळी गीते, कृषिगीते, वर्षागीते, नौका गीते, कोळीगीते तर, काश्मिरी, तेलुगू, मल्याळम, उर्दू, आसामी यात लग्न गीते असतात त्याला वेगवेगळी नावे आहेत. 

महाराष्ट्रात विविध भागात विविध रंगी संस्कृती ची रुपे आढळतात. आदिवासी जमातीमध्येही अशीच काही लोकगीते ,नाचाची गाणी, सणाची गाणी, लग्नाची गाणी, असतात.आपल्यासारखीच जात्यावर दळताना ओव्या असतात तशाईच भोजपुरी मध्ये धन्य दळताना गीते म्हणतात त्याला ज्यंतसार म्हणतात. त्या त्या गीतातून त्या प्रदेशाची संस्कृती आपल्याला कळत असते. 

    भारतात विवाहप्रसंगी म्हणायची लोकगीत सगळीकडे दिसतात. मुलीला सासरी पाठवताना म्हणायची वियोगाची गाणी,भोजपुरी मध्ये आहेत. कश्मीर मध्ये विवाहगीते समुहाने म्हणायची आहेत. पंजाब मध्ये तर विधीनप्रमाणे गीते आहेत. वधूकडची  आणि वराकडची गीते वेगवेगळी असतात. गुजराती लग्न गीतात वधूवरांना राम-सिता किंवा कृष्ण- रुक्मिणी समजून गीते म्हणतात. यात विरह भावाला महत्व दिलेले असते. ओरिसा मध्ये तर वधूने स्वत:च गीते म्हणण्याची प्रथा आहे आणि यात नवरी मुलगी आपल्या माहेरच्या नात्यांची ताटातुट होताना जो वियोग होतो, त्यातील आई वडील, भाऊ बहिणी यांच्या नात्यातील भावना यांचं वर्णन करत असते.      

     स्त्री गीते – भारतातली लोकशाही ,लोक संस्कृती आणि कृषि संस्कृती या सर्वांमध्ये स्त्री ही नेहमी मध्यवर्ती भूमिकेतच राहिली आहे. लोकसंसख्येच्या पन्नास टक्के स्थान असलेली स्त्री .खर तर तीचं सगळीकडे अस्तित्व अगदी महत्वाच असतं. कर्तृत्व असतं.अनुभव पण असतो. काली माता, दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी, गौरी या रूपात ती लोकदेवता- स्त्री देवता असते . तीचं माहात्म्य सांगणारी गीतं गायली जातात. शेतीसंबंधी कृषि गीते ,सण उत्सवासंबंधी गीते, धार्मिक गीते गायली जातात. पण....  पण, मनात काहीतरी असतं, कुठेतरी खुपत असतं, काही गुपित पण असतं, तर कुठला आनंद आणि कुठल तरी दु:ख, कोणाला तरी सांगावसं वाटतं, तिथे औपचारिकता नको असते. पण यासाठी भेटायला हवं ना? मग निमित्तही हवं त्याला.

   पुर्वी मुली लहान वयातच लग्न होऊन सासरी जायच्या, नंतरच्या टप्प्यात तिचं लग्नाचं वय जरी वाढलं तरी ती एक मुलगी, आणि १६,१८ फार फार तर २१,२२ अस वय असायचं. मोठी झाली तरी घरातली लग्नाची मुलगी ही जबाबदारीच ओझं असायची. कारण ज्या ज्या काळात तिच्या बाबतीत वाईट अनुभव येत गेले तिथे तिथे मग तिला बंधने घातली जाऊ लागली यात तिची काळजी हाच भाग असायचा, कारणाशिवाय कुठे जायचं नाही, उशिरा पर्यन्त बाहेर थांबायचे नाही.मग पुढे पुढे या रूढीच होऊन गेलेल्या दिसतात.  सासरच्या लोकांबद्दल तक्रार करायची नाही. घरात बोलाची सोय नाही मग कोणापाशी बोलणार? जिवाभावाच्या मैत्रिणीच. दुसरं कोण? त्या एक तर समदु:खी असतात. आपल्याच सारख्या आनंद आणि दु:खाच्या अनुभावातून ती ही गेलेली असते. त्यामुळे तिला माझे मन जास्त च कळेल या भावनेतून ही अशी गीते लिहिली गेली असणार. यासाठीच भेटण्यासाठी, एकत्र येण्यासाठी निमित्त असायची ती श्रावणात मंगळागौर जागविणे, भाद्रपदात हरितालिका जागविणे, भोंडला किंवा हादगा किंवा भुलाबाईची पुजा करणे.  वटसावित्री, नागपंचमी, संक्रांत, चैत्र गौर हे सुद्धा अशा निमित्त केलेले हळदी कुंकू समारंभ. पण विशेषत: लहान मुलींना एकत्र आणणे, त्यांना निसर्ग शिक्षण देणे, वनस्पतींची ओळख करून देणे, कुटुंब संस्थेतल्या नात्यांची ओळख पक्की करून देणे, पाककृती किंवा पदार्थ ओळखणे, सजावट, मांडणी स्वच्छता यातलं कला कौशल्य दाखविणे, संस्कार करणं अशा अर्थाने त्यांना शिक्षण द्यायचे ते त्यांना साजेशा अशा खेळातून, गाण्यातून. कारण हे सर्व त्या मुलीला तिच्या पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणार असतं. हा असतो भोंडला .  

  आपले लोकजीवन आणि कृषीप्रधान संस्कृती, भौगोलिक दृष्ट्या प्रत्येक प्रांतात जरा वेगवेगळी आहे. त्यावर आधारित काही सण ऋतुंप्रमाणे साजरे केले जातात. कोकण, खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा अशा ठिकाणी नवीन आलेल्या पिकांचे, धान्याचे स्वागत करण्याचा उत्सव केला जातो. त्यातच या लहान मुली भुलाबाईचा उत्सव साजरा करतात. भुलाबाई आणि भुलोजी ची म्हणजे शंकर पार्वती ची स्थापना करतात. नव्या पिकांचं, कृषि लक्ष्मीचं स्वागत करण्याचा हा उत्सव विदर्भात मानला जातो.   निसर्गा बरोबरच तिच्या स्त्री सुलभ भावना त्यात गाण्यातून व्यक्त होत असतात. विदर्भातला भुलाबाई उत्सव ३१ दिवसांचा तर पश्चिम महाराष्ट्रातला भोंडला घटस्थापनेपासून कोजागिरीपर्यंत साधारण सोळा दिवस चालणारा. भुलाबाई उत्सवात शंकर, पार्वती आणि त्यांचं बाळ यांची आरास मांडून पुजा करतात. पार्वती महिनाभरसाठी माहेरी आलेली असते. म्हणून आपली मुलगी समजून तीचं माहेरपण खूप उत्साहात साजरं करतात. माहेर ! मग तिचे आनंदाचे दिवस ! अशी कल्पना करून त्याचे नियोजन होते. तर भोंडला म्हणजे हस्त नक्षत्रातला .

वेदकालीन ऋषिजनांनी सूर्य चंद्र आदींची प्रार्थना करून त्यांच्या प्रीत्यर्थ यज्ञ याग असे काही करत असताना मास, ऋतु, नक्षत्र या संबंधित काही सिद्धांत अनुभवाच्या आधारावर ठरवले. त्यावरूनच आपली कालगणना ,पंचांग याचे नियोजन केले गेले आहे. पण अशी माहिती, हिंदू सणांचा इतिहास आपल्या मुला मुलींना माहिती नसतात. त्यातून स्त्रियांना व मुलींना नसायच्याच. आताही तशीच परिस्थिति आहे. कारण वेगळे आहे एव्हढेच. गुढीपाडवा, अक्षयतृतीया,चातुर्मास, नारळी पौर्णिमा, संक्रांत, होळी असे ऋतूवरून निश्चित केलेले सण आहेत. तर काही कौटुंबिक आहेत उदा. वटसावित्री, मंगलागौरी, पिठोरी अमावास्या, हरितालिका, ऋषिपंचमी  ही कुटुंबासाठी ठरवलेली व्रते आहेत. या सर्वांप्रती कृतज्ञता दाखविण्याची संधी म्हणजे पूजा अर्चना वगैरे करत असत.    

 शेतीप्रधान भारतात तर उगवलेल्या पिकांमुळे झालेला आनंद हा उत्सव म्हणून च साजरा होत आला आहे. रब्बी हंगामातली पिके मोठी होत असताना, ती टिकावित आणि आणखी चांगली तरारून वर यावीत म्हणून हस्त नक्षत्राची पूजा बांधली जाते, पावसाळ्यातल्या या चार महिन्यात हस्त नक्षत्राला मानांचं स्थान असत. हस्त नक्षत्रात मुसळधार पाऊस असतो. त्यामुळे यावेळी हत्तीला प्राधान्य दिलेले असते. त्याची प्रतिमा पाटावर काढून किंवा रांगोळीतून काढून समृद्धीच्या या प्रतिकाची पुजा करून त्या भोवती फेर धरून गाणी म्हणायची पद्धत आहे. भोंडल्याची सुरुवात याच अर्थपूर्ण गाण्याने करतात .

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे
बा माळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे

हस्त नक्षत्रावर सर्वांचीच भिस्त . हस्तात होणारा पाऊस हा हत्ती पाण्यात बुडेल एव्हढा असायला हवा अशी अपेक्षा असते. म्हणून आनंदी आनंद असतो. त्याचे महत्व सांगण्यासाठी

हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा ।।
दहा मधले आठ गेले
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।
ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।।
एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं

नक्षत्राच्या माहिती बरोबर वारांचे महत्व सांगणारे गीत म्हणजे

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।
यातून आध्यात्मिक गोडी लावण्याचे काम साधले जाते. 
 कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा  धावून || धृ ||
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण,  आली यशोदा  धावून...||1||
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
|

या गाण्यातून कशाबद्दल काय काय कल्पना केल्या जातात, कोणत्या उपमा दिल्या जातात आणि कृष्ण कसा हट्ट करतो हे दाखवले आहे.

काही गीतातून कौटुंबिक चित्र उभं राहतं. नाती कशी असतात. त्याची बंधने कशी असतात.नात्यातला आदर कसा असतो? कसा असायला हवा? याचही चित्रण दिसतं.  

नणंद भावजयींचे नाते एक वेगळेच नाते असते. नणंद बाईंना जरा आपल्या भावाच्या बायकोपेक्षा जास्त च मान पान हवा असतो.

सासूबाई तर काय त्यांच्याच तोर्‍यात. जरा सुनेने माहेरी जायचं म्हटलं तर नाराजीचा सूर. मग ही कामाची यादीच सुनेपुढे मांडतात. माहेरी जायच्या आधी सून बाईंनी दळण कांडण करून ठेवायचं, तिखटमिठाचं पाळं भरून ठेवायचं,गिरणीतून पीठ आणून ठेवायचं,भाजी बिजी आणून ठेवायची, कपडे धुवून ठेवायचे अशी सगळी कामे झाल्याशिवाय तिची इच्छा पूर्ण नाही व्हायची.  हे तर अलीकडच्या काळात ही घडत होतं. म्हणून ते तेंव्हाच्याही काळातल गाणं -- 

कारल्याचा वेल लाव गं सुने...
कारल्याचा वेल लाव गं सुने ,लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥
कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥
कार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥

म्हणजे कारल्याचा वेल लाव, तो वाढू दे, त्याला फूल येऊदे ,फळ लागू दे, आता त्याची भाजी कर, ती तू पण खा, मागचं उष्ठ खरकटं आवर आणि आता जा माहेरा, असा तिच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जायचा. भावनांची कोंडी व्हायची . मग कसं प्रेम वाटणार? आणि तुलनेने माहेर, आजोळ चांगलच वाटणार. 

म्हणून अक्कण माती चिक्कण माती या गाण्यात

अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं
अशी आपली सून माहेरला गेली आहे तिला घ्यायला सासरची मंडळी जातात वयाने लहान असल्याने तिला काहीतरी आमिष दाखवलं की ती लगेच येईल असे वाटून आमिष दाखवले जाते .

अरडी ग बाई परडी

परडी एव्हढं काय गं? हे गीत. किंवा

 सासरच्या वाटे कुचूकुचू काटे

माहेरच्या वाटे नारळ फुटे
कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासरा पाहुणा आला गं बाई
सासऱ्याने काय काय आणले गं बाई
सासऱ्यानी आणल्या पाटल्या गं बाई
पाटल्या मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
    झिपरं कुत्रं सोडा गं बाई....

   या गाण्यातून सूनबाईंना घ्यायला आलेल्या लोकांनी वेगवेगळी आमिषे दाखवली आहेत, पण ती काही सासरी /घरी यायला तयार नाही. सासरचे लोक पाटल्या पोहे हार, गोठ,राणीहार, हे दागिने घेऊन येतात. पण जेंव्हा नवरा मंगळसूत्र घेऊन येतो तेंव्हाच ही सुनबाई त्याच्याबरोबर सासरी- घरी जायला तयार होते. अशी ही हट्टी सून या गीतात दाखवली आहे.

  अशा प्रकारे एक प्रकारचं लोकजीवनच अशा खेळातून,उत्सवातून आपल्याला पहायला मिळतं. असे सामाजिक शिक्षण देणारे उत्सव, व्रते आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत. तो टिकवला पाहिजे. काळा नुसार त्यात बदल होत राहणार. पण मुख्य उद्देश विसरता कामा नये. म्हणून भलतंच रूप त्याला देऊ नये. अशीच पुढच्या पिढीकडून अपेक्षा आहे. भोंडला, भुलाबाई किंवा हादगा अशा लोक परंपरा सामाजिक मूल्यांचे धडे देणार्‍या आहेत. लहान मुलींचे/स्त्रीयांचे व्यक्तिमत्व विकसित करणारे आहे. नैतिकता शिकवणार्‍या आहे. नातेसंबंध टिकविणार्‍या आहेत, हे त्या मुलीच्या पालकांनी सतत लक्षात ठेवलं पाहिजे. तिच्या भविष्याचा विचार अशा छोट्या छोट्या परंपरेतून या निमित्ताने तिच्यात रुजवला पाहिजे. आपल्या पूर्वजांकडून चांगले संस्कार करण्यासाठीच असे उत्सव निर्माण केले गेले आहेत.कालच गणपती विसर्जन झालं. आज मुलींनी भुलाबाई भुलोजीला आमंत्रण दिलं असेल,आता हा महिना त्यांचा आनंदाचा असेल.सर्वांना शुभेच्छा !          

 

©  डॉ. नयना कासखेडीकर   

                            ---------------------- 

Saturday 11 September 2021

शिकागोत स्वामी विवेकानंद

 

                                       शिकागोत स्वामी विवेकानंद

                                           

   श्रीरामकृष्ण परमहंस यांचे शिष्य म्हणून नरेन्द्रनाथ अडीच वर्षे परिव्राजक म्हणून भारतभर हिंडले ते आपला हिंदुस्तान समजून घ्यायला, आपली संस्कृती आणि आपला हिंदू धर्म याची परिस्थिति कशी आहे हे समजून घ्यायला, लोकजीवन समजून घ्यायला. पारतंत्र्याच्या काळात, इंग्रजी सत्तेच्या काळात आपल्या सामान्य हिंदू जनतेची उपेक्षा कशामुळे होत होती याची कारणं त्यांना या परिभ्रमणात समजली होती.

     आपल्या समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य दूर कसे होईल आणि भारताचे पुनरुत्थान कसे होईल? त्याच्या आत्म्याला जाग कशी येणार? याच प्रश्नावर जास्त वेळ ते चिंतन करत होते.

     प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले उदात्त आध्यात्मिक विचार आणि जीवनाची श्रेष्ठ मूल्ये खालच्या थरातील माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. सामान्य माणसाच्या सेवेसाठी आणी उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचा असा स्वामीजींचा निर्णय झाला. हे करण्यासाठी पाच दहा माणसं आणि पैसा हवाच. आता अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरते आहे. तिथे जाऊन त्यांना भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि तिकडून पैसा गोळा करून आणून इथे आपल्या कामाची ऊभारणी करावी, म्हणून सर्व धर्म परिषदेला अमेरिकेत जायचा त्यांचा निर्णय झाला.


  पाश्चात्य देशात आपला जाण्याचा उद्देश काय यासाठी, रामेश्वर, मद्रास, म्हैसूर, सिकंदराबाद आदि ठिकाणी त्यांचा प्रवास आणि व्याख्याने झाली. सर्वांनी मिळून पैशांची तयारी केली. म्हैसूरच्या राजांनी मोठी रक्कम दिली. खेतडीचे राजे अजित सिंग यांना तर खूप आनंद झाला, त्यांनीही मोठी सोय केली. जो काही खर्च येईल तो सर्व अजित सिंग देणार होते. शिवाय पश्चिमेकडे जाणार म्हणून तिथे शोभेल असा राजेशाही पेहराव तयार करून दिला. तर विवेकानंदांच्या आईला दरमहा काही रक्कम पाठवून आर्थिक मदत त्यांनी चालू केली, ज्यामुळे विवेकानंद निश्चिंत मनाने शिकागोला जाऊ शकले.

    शिकागोतल्या सर्व धर्म परिषदेचे विशेष निमित्त होते. कोलंबस अमेरिकेत उतरलेल्या घटनेला चारशे वर्ष पूर्ण झाली म्हणून मोठा महोत्सव अमेरिकेत भरवण्यात आला होता. या निमित्ताने जागतिक पातळीवरचा समारोह आणि प्रदर्शने भरविण्यात आली होती. बौद्धिक ज्ञानशाखांशी संबंधित एकूण वीस परिषदा झाल्या. त्यापैकी धर्म आणि तत्वज्ञान यावरची सर्व धर्म परिषद ही एक होती. ही परिषद शिकागोच्या आर्ट इंस्टीट्यूटच्या भव्य इमारतीत भरली होती. ११ सप्टेंबर १८९३ ला परिषदेचे उद्घाटन झाले. भारतातून आलेले इतर प्रतिनिधी होते- बुद्ध धर्माचे धर्मपाल, जैन धर्माचे विरचंद गांधी, ब्राह्म समाजाचे प्रतापचंद्र मुजूमदार व बी.बी.नगरकर, थिओसोफिकल सोसायटीच्या डॉ.अॅनी बेझंट व ज्ञानचंद्र चक्रवर्ती. 

समोर श्रोते होते उच्च विद्याविभूषित, विचारवंत, ख्यातनाम विद्वान, पत्रकार ई. उद्घाटनाच्या दुपारच्या सत्रात विवेकानंद यांचे एक छोटेसे भाषण झाले. शिकागो म्हटलं की सर्वांना आतापर्यंत एकच भाषण झालं असं वाटतं. परंतु विवेकानंदांनी उद्घाटन, समारोप या निमित्ताने आणि हिंदू धर्म विषय प्रबंध वाचन, अशी अनेक भाषणे दिली. त्याशिवाय प्रत्येक वेळी जे जे हिंदू धर्माबद्दल आरोप वा टीका करत असत, त्या त्या भाषणाला विवेकानंद उत्तरादाखल त्याचं खंडन करत असत. अशी त्यांची अनेक भाषणे या परिषदेत झाली. ही सर्व भाषणे खूप गाजली. एका लेखात सर्व देणं अशक्य आहे. थोडक्यात त्याचा गोषवारा असा -

 


११ सप्टेंबरचे उद्घाटनपर भाषण –

     “अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधुनो” या पहिल्याच वाक्याला कानठळ्या बसणारा टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या भाषणाला टाळ्या पडल्या होत्या पण पहिल्याच संबोधनाला असा प्रतिसाद नव्हता मिळाला, त्यांनाही आश्चर्य वाटले. टाळ्या थांबण्याची वाट पाहत विवेकानंद थांबले होते. शांतता झाल्यावर त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. “सुंदर शब्दांमध्ये जे आपले स्वागत केले गेले आहे त्याबद्दलचा आनंद अवर्णनीय आहे. जगातील सर्वात प्राचीन असा हिंदू धर्म, त्यातील सर्वसंगपरित्यागी संन्याशांची परंपरा यांच्या वतीने मी जगातील सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मन:पूर्वक धन्यवाद देतो”.  त्यांनी परिषदेच्या आयोजकांचे आभार मानले. आधी बोललेल्या वक्त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रत्येक मताबद्दलची सहिष्णुता आणि सर्व जगातील धर्म विचारांच्या बाबतीतली स्वीकारशीलता हे हिंदू धर्माचे वैशिष्ठ्य आहे असे सांगून, पारशी लोक आपल्या जन्मभूमीतून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. त्यांना निश्चिंतपणे राहण्यासाठी आसरा मिळाला, ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगून, अशा देशातून आपण आलो आहोत आणि अशा धर्माचा मी प्रतिनिधी आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो, याचा त्यांनी उल्लेख केला. सा-या जगातून इथे आलेल्या सर्व धर्म प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आज सकाळी जी घंटा वाजवली गेली, ती सर्व प्रकारच्या धर्मवेडेपणाची मृत्युघंटा ठरेल, लेखणी किंवा तलवार यांच्या सहाय्याने केल्या जाणार्‍या मानवाच्या सर्व प्रकारच्या छळाच्या तो अंतिम क्षण असेल आणि आपआपल्या मार्गाने एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेल्या मानवांपैकी कोणाविषयीही, कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा अनुदार भाव यानंतर शिल्लक राहणार नाही, असा मला पूर्ण विश्वास आहे”. असे पाच मिनिटांचे आपले भाषण विवेकानंदांनी थांबवले आणि पुन्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

     हे छोटसं भाषण हा एक उत्स्फूर्त आविष्कार होता. विवेकानंदांनी  परिषदेच्या उद्दिष्टालाच स्पर्श केला होता. स्वागतपर भाषणाला उत्तर म्हणून अशी चोवीस भाषणे झाली त्यात विवेकानंदांचे विसावे भाषण होते. अजून खरा विषय तर मांडला जायचा होता. ही परिषद सतरा दिवस चालू होती. रोज तीन-तीन तासांची तीन सत्रे होत.

  सर्वधर्म परिषद सुरू झाली. धर्मविषयक वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होत होत्या. यात प्रामुख्याने दोन भाग केले होते, पहिला भाग होता, प्रत्येक धर्मातील तत्वचिंतन आणि विविध सिद्धांत, तर दुसर्‍या भागात, परमेश्वराचे स्वरूप, धर्माचे महत्व, ईश्वरी साक्षात्कार, परमेश्वराचा अवतार, अनैतिकतेच्या कल्पना असे विषय ठेवले होते. या चर्चा दहा दिवस चालल्या होत्या. तर उत्तरार्धात चर्चेचे विषय होते, कौटुंबिक जीवन, ललितकला, विज्ञानातील शास्त्रे, नीतीविषयी सिद्धांत, अखिल मानवमात्राविषयीचे प्रेम, ख्रिस्त धर्मप्रचारक मिशनर्‍यांची कार्यपद्धती. भिन्न धर्माच्या अनुयायांनी एकमेकांना समजून घ्यावे हा याचा हेतू होता.

नवव्या  दिवसाचे भाषण-

     या परिषदेत  विवेकानंद यांना हिंदू धर्मावरची टीका, आरोप प्रत्यारोप, ऐकावे लागले होते, पण नवव्या दिवशी त्यांनी हिंदू धर्मावरचा त्यांचा निबंध सादर केला. इतर धर्मियांच्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, त्याचा कठोर शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, “ आम्ही पूर्वेकडून आलेले प्रतिनिधी गेले काही दिवस इथे बसलो आहोत आणि एका अधिकारपदाच्या भूमिकेतून आम्हाला सांगितलं जात आहे की, आम्ही सर्वांनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार करायला हवा. का? तर ख्रिस्त धर्मीय राष्ट्रे आज सर्वात अधिक प्रगतिशील आहेत. आम्ही आता आमच्या आसपास पाहतो, तर आम्हाला असं दिसतं की इंग्लंड हे ख्रिस्त धर्मीय राष्ट्र आज जगात सर्वात पुढारलेले आहे आणि ते पंचवीस कोटी लोकांच्या मानेवर पाय रोवून उभं आहे. आम्ही इतिहासात मागे वळून पाहतो, तर आम्हाला आढळून येतं की, ख्रिस्तधर्मीय युरोपच्या समृद्धीचा प्रारंभ स्पेन पासून झाला. या स्पेनच्या समृद्धीची सुरुवात झाली ती, मेक्सिकोवर आक्रमण करण्यापासून ! आपल्या बांधवांचे गळे कापून ख्रिस्त धर्म प्रगतीशील होत जातो. अशा प्रकारची किंमत देऊन मिळणारी समृद्धी सौम्य प्रकृतीचा हिंदू स्वीकारणार नाही. मी इथे बसलो आहे आणि मी जे काही सारं ऐकलं तो असहिष्णु वृत्तीचा कळस होता. इस्लाम धर्माचे गोडवे गायलेले मी आता ऐकले. हे मुसलमान भारतात हातात तलवार घेऊन अत्याचार करीत आले आहेत. रक्तपात आणि तलवार ही हिंदूंची साधनं नाहीत. त्यांचा धर्म सर्वांविषयीच्या प्रेमाच्या आधारावर उभा आहे. यावर श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

     २० सप्टेंबरला पेकिंगमधील धर्म हा विषय हेडलँड यांनी मांडला तेव्हा त्याला जोरदार उत्तर देत विवेकानंदांनी त्याचाही खरपूस समाचार घेतला.

२७ सप्टेंबर- समारोपाचे भाषण –

     शेवटच्या दिवशी ७ ते ८ हजारांनी खचाखच भरलेले कोलंबस आणि वॉशिंग्टन सभागृह - हा ऐतिहासिक गर्दीचा उच्चांक गाठणारा होता. सर्वधर्म परिषदेच्या समारोपात तर, एखाद्या संगीत मैफिलीची भैरवीने सांगता होते तसे विवेकानंदांनी सर्व धर्माच्या अनुयायांना संदेश देऊन भाषण संपवले. ते म्हणाले, “कोणत्याही ख्रिस्ती माणसानं हिंदू वा बौद्ध होण्याची गरज नाही किंवा कोणत्याही हिंदू वा बौद्ध माणसाने ख्रिस्त होण्याची गरज नाही. प्रत्येकानं दुसर्‍या धर्मातलं सारभूत तत्व ग्रहण करायचे आहे. त्याच वेळी आपलं वैशिष्ट्यही जपायचं आहे आणि अखेर स्वत:च्या स्वाभाविक प्रवृत्तीला अनुसरून आपला विकास करून घ्यायचा आहे”.

   स्वामीजींनी सर्वांच्या मनात विश्वबंधुत्वाचा भाव निर्माण केला. ते म्हणाले, “आपले मार्ग भिन्न असले, विचारधारा वेगळ्या असल्या, तरी आपण सर्वजण भिन्न मार्गाने जात असलेल्या पूर्णतेचे यात्रिक आहोत”.

     शिकागोच्या सर्व धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंदांची संबोधने आणि श्रोत्यांचा त्यांस मिळालेला तुडुंब प्रतिसाद  म्हणजे भारताच्या गौरवाचं  सुवर्णाक्षरांनी लिहिलेल पान होतं. विश्वबंधुत्व आणि विश्वधर्म याचा उद्गाता असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान यात असामान्य, अद्वितीय अशी कामगिरी केली होती. त्यांचे नाव अमेरिकेच्या कानाकोपर्‍यात पोहोचले होते. विवेकानंद आता वैश्विक स्तरावर  स्वामी विवेकानंद झाले होते. त्यांनी भारताबाहेर जाऊन केलेला आपल्या उच्च संस्कृतीचा जागर, हिंदू धर्माची वैशिष्ठ्ये, तत्वज्ञान, आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान व प्रेम, आज या शिकागोच्या परिषदेनंतर १२८ वर्षानी आपण जाणून घेणे, माहिती करून घेणे अत्यंत महत्वाचे ठरेल. कारण त्याची आज नितांत आवश्यकता आहे. 

- डॉ. नयना कासखेडीकर, पुणे.

 

                                -----------------------------------------