Saturday, 11 September 2021

शिकागोत स्वामी विवेकानंद

 

                                       शिकागोत स्वामी विवेकानंद

                                           

   श्रीरामकृष्ण परमहंस यांचे शिष्य म्हणून नरेन्द्रनाथ अडीच वर्षे परिव्राजक म्हणून भारतभर हिंडले ते आपला हिंदुस्तान समजून घ्यायला, आपली संस्कृती आणि आपला हिंदू धर्म याची परिस्थिति कशी आहे हे समजून घ्यायला, लोकजीवन समजून घ्यायला. पारतंत्र्याच्या काळात, इंग्रजी सत्तेच्या काळात आपल्या सामान्य हिंदू जनतेची उपेक्षा कशामुळे होत होती याची कारणं त्यांना या परिभ्रमणात समजली होती.

     आपल्या समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य दूर कसे होईल आणि भारताचे पुनरुत्थान कसे होईल? त्याच्या आत्म्याला जाग कशी येणार? याच प्रश्नावर जास्त वेळ ते चिंतन करत होते.

     प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले उदात्त आध्यात्मिक विचार आणि जीवनाची श्रेष्ठ मूल्ये खालच्या थरातील माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. सामान्य माणसाच्या सेवेसाठी आणी उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचा असा स्वामीजींचा निर्णय झाला. हे करण्यासाठी पाच दहा माणसं आणि पैसा हवाच. आता अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरते आहे. तिथे जाऊन त्यांना भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि तिकडून पैसा गोळा करून आणून इथे आपल्या कामाची ऊभारणी करावी, म्हणून सर्व धर्म परिषदेला अमेरिकेत जायचा त्यांचा निर्णय झाला.


  पाश्चात्य देशात आपला जाण्याचा उद्देश काय यासाठी, रामेश्वर, मद्रास, म्हैसूर, सिकंदराबाद आदि ठिकाणी त्यांचा प्रवास आणि व्याख्याने झाली. सर्वांनी मिळून पैशांची तयारी केली. म्हैसूरच्या राजांनी मोठी रक्कम दिली. खेतडीचे राजे अजित सिंग यांना तर खूप आनंद झाला, त्यांनीही मोठी सोय केली. जो काही खर्च येईल तो सर्व अजित सिंग देणार होते. शिवाय पश्चिमेकडे जाणार म्हणून तिथे शोभेल असा राजेशाही पेहराव तयार करून दिला. तर विवेकानंदांच्या आईला दरमहा काही रक्कम पाठवून आर्थिक मदत त्यांनी चालू केली, ज्यामुळे विवेकानंद निश्चिंत मनाने शिकागोला जाऊ शकले.

    शिकागोतल्या सर्व धर्म परिषदेचे विशेष निमित्त होते. कोलंबस अमेरिकेत उतरलेल्या घटनेला चारशे वर्ष पूर्ण झाली म्हणून मोठा महोत्सव अमेरिकेत भरवण्यात आला होता. या निमित्ताने जागतिक पातळीवरचा समारोह आणि प्रदर्शने भरविण्यात आली होती. बौद्धिक ज्ञानशाखांशी संबंधित एकूण वीस परिषदा झाल्या. त्यापैकी धर्म आणि तत्वज्ञान यावरची सर्व धर्म परिषद ही एक होती. ही परिषद शिकागोच्या आर्ट इंस्टीट्यूटच्या भव्य इमारतीत भरली होती. ११ सप्टेंबर १८९३ ला परिषदेचे उद्घाटन झाले. भारतातून आलेले इतर प्रतिनिधी होते- बुद्ध धर्माचे धर्मपाल, जैन धर्माचे विरचंद गांधी, ब्राह्म समाजाचे प्रतापचंद्र मुजूमदार व बी.बी.नगरकर, थिओसोफिकल सोसायटीच्या डॉ.अॅनी बेझंट व ज्ञानचंद्र चक्रवर्ती. 

समोर श्रोते होते उच्च विद्याविभूषित, विचारवंत, ख्यातनाम विद्वान, पत्रकार ई. उद्घाटनाच्या दुपारच्या सत्रात विवेकानंद यांचे एक छोटेसे भाषण झाले. शिकागो म्हटलं की सर्वांना आतापर्यंत एकच भाषण झालं असं वाटतं. परंतु विवेकानंदांनी उद्घाटन, समारोप या निमित्ताने आणि हिंदू धर्म विषय प्रबंध वाचन, अशी अनेक भाषणे दिली. त्याशिवाय प्रत्येक वेळी जे जे हिंदू धर्माबद्दल आरोप वा टीका करत असत, त्या त्या भाषणाला विवेकानंद उत्तरादाखल त्याचं खंडन करत असत. अशी त्यांची अनेक भाषणे या परिषदेत झाली. ही सर्व भाषणे खूप गाजली. एका लेखात सर्व देणं अशक्य आहे. थोडक्यात त्याचा गोषवारा असा -

 


११ सप्टेंबरचे उद्घाटनपर भाषण –

     “अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधुनो” या पहिल्याच वाक्याला कानठळ्या बसणारा टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या भाषणाला टाळ्या पडल्या होत्या पण पहिल्याच संबोधनाला असा प्रतिसाद नव्हता मिळाला, त्यांनाही आश्चर्य वाटले. टाळ्या थांबण्याची वाट पाहत विवेकानंद थांबले होते. शांतता झाल्यावर त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. “सुंदर शब्दांमध्ये जे आपले स्वागत केले गेले आहे त्याबद्दलचा आनंद अवर्णनीय आहे. जगातील सर्वात प्राचीन असा हिंदू धर्म, त्यातील सर्वसंगपरित्यागी संन्याशांची परंपरा यांच्या वतीने मी जगातील सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मन:पूर्वक धन्यवाद देतो”.  त्यांनी परिषदेच्या आयोजकांचे आभार मानले. आधी बोललेल्या वक्त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रत्येक मताबद्दलची सहिष्णुता आणि सर्व जगातील धर्म विचारांच्या बाबतीतली स्वीकारशीलता हे हिंदू धर्माचे वैशिष्ठ्य आहे असे सांगून, पारशी लोक आपल्या जन्मभूमीतून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. त्यांना निश्चिंतपणे राहण्यासाठी आसरा मिळाला, ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगून, अशा देशातून आपण आलो आहोत आणि अशा धर्माचा मी प्रतिनिधी आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो, याचा त्यांनी उल्लेख केला. सा-या जगातून इथे आलेल्या सर्व धर्म प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आज सकाळी जी घंटा वाजवली गेली, ती सर्व प्रकारच्या धर्मवेडेपणाची मृत्युघंटा ठरेल, लेखणी किंवा तलवार यांच्या सहाय्याने केल्या जाणार्‍या मानवाच्या सर्व प्रकारच्या छळाच्या तो अंतिम क्षण असेल आणि आपआपल्या मार्गाने एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेल्या मानवांपैकी कोणाविषयीही, कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा अनुदार भाव यानंतर शिल्लक राहणार नाही, असा मला पूर्ण विश्वास आहे”. असे पाच मिनिटांचे आपले भाषण विवेकानंदांनी थांबवले आणि पुन्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

     हे छोटसं भाषण हा एक उत्स्फूर्त आविष्कार होता. विवेकानंदांनी  परिषदेच्या उद्दिष्टालाच स्पर्श केला होता. स्वागतपर भाषणाला उत्तर म्हणून अशी चोवीस भाषणे झाली त्यात विवेकानंदांचे विसावे भाषण होते. अजून खरा विषय तर मांडला जायचा होता. ही परिषद सतरा दिवस चालू होती. रोज तीन-तीन तासांची तीन सत्रे होत.

  सर्वधर्म परिषद सुरू झाली. धर्मविषयक वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होत होत्या. यात प्रामुख्याने दोन भाग केले होते, पहिला भाग होता, प्रत्येक धर्मातील तत्वचिंतन आणि विविध सिद्धांत, तर दुसर्‍या भागात, परमेश्वराचे स्वरूप, धर्माचे महत्व, ईश्वरी साक्षात्कार, परमेश्वराचा अवतार, अनैतिकतेच्या कल्पना असे विषय ठेवले होते. या चर्चा दहा दिवस चालल्या होत्या. तर उत्तरार्धात चर्चेचे विषय होते, कौटुंबिक जीवन, ललितकला, विज्ञानातील शास्त्रे, नीतीविषयी सिद्धांत, अखिल मानवमात्राविषयीचे प्रेम, ख्रिस्त धर्मप्रचारक मिशनर्‍यांची कार्यपद्धती. भिन्न धर्माच्या अनुयायांनी एकमेकांना समजून घ्यावे हा याचा हेतू होता.

नवव्या  दिवसाचे भाषण-

     या परिषदेत  विवेकानंद यांना हिंदू धर्मावरची टीका, आरोप प्रत्यारोप, ऐकावे लागले होते, पण नवव्या दिवशी त्यांनी हिंदू धर्मावरचा त्यांचा निबंध सादर केला. इतर धर्मियांच्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, त्याचा कठोर शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, “ आम्ही पूर्वेकडून आलेले प्रतिनिधी गेले काही दिवस इथे बसलो आहोत आणि एका अधिकारपदाच्या भूमिकेतून आम्हाला सांगितलं जात आहे की, आम्ही सर्वांनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार करायला हवा. का? तर ख्रिस्त धर्मीय राष्ट्रे आज सर्वात अधिक प्रगतिशील आहेत. आम्ही आता आमच्या आसपास पाहतो, तर आम्हाला असं दिसतं की इंग्लंड हे ख्रिस्त धर्मीय राष्ट्र आज जगात सर्वात पुढारलेले आहे आणि ते पंचवीस कोटी लोकांच्या मानेवर पाय रोवून उभं आहे. आम्ही इतिहासात मागे वळून पाहतो, तर आम्हाला आढळून येतं की, ख्रिस्तधर्मीय युरोपच्या समृद्धीचा प्रारंभ स्पेन पासून झाला. या स्पेनच्या समृद्धीची सुरुवात झाली ती, मेक्सिकोवर आक्रमण करण्यापासून ! आपल्या बांधवांचे गळे कापून ख्रिस्त धर्म प्रगतीशील होत जातो. अशा प्रकारची किंमत देऊन मिळणारी समृद्धी सौम्य प्रकृतीचा हिंदू स्वीकारणार नाही. मी इथे बसलो आहे आणि मी जे काही सारं ऐकलं तो असहिष्णु वृत्तीचा कळस होता. इस्लाम धर्माचे गोडवे गायलेले मी आता ऐकले. हे मुसलमान भारतात हातात तलवार घेऊन अत्याचार करीत आले आहेत. रक्तपात आणि तलवार ही हिंदूंची साधनं नाहीत. त्यांचा धर्म सर्वांविषयीच्या प्रेमाच्या आधारावर उभा आहे. यावर श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

     २० सप्टेंबरला पेकिंगमधील धर्म हा विषय हेडलँड यांनी मांडला तेव्हा त्याला जोरदार उत्तर देत विवेकानंदांनी त्याचाही खरपूस समाचार घेतला.

२७ सप्टेंबर- समारोपाचे भाषण –

     शेवटच्या दिवशी ७ ते ८ हजारांनी खचाखच भरलेले कोलंबस आणि वॉशिंग्टन सभागृह - हा ऐतिहासिक गर्दीचा उच्चांक गाठणारा होता. सर्वधर्म परिषदेच्या समारोपात तर, एखाद्या संगीत मैफिलीची भैरवीने सांगता होते तसे विवेकानंदांनी सर्व धर्माच्या अनुयायांना संदेश देऊन भाषण संपवले. ते म्हणाले, “कोणत्याही ख्रिस्ती माणसानं हिंदू वा बौद्ध होण्याची गरज नाही किंवा कोणत्याही हिंदू वा बौद्ध माणसाने ख्रिस्त होण्याची गरज नाही. प्रत्येकानं दुसर्‍या धर्मातलं सारभूत तत्व ग्रहण करायचे आहे. त्याच वेळी आपलं वैशिष्ट्यही जपायचं आहे आणि अखेर स्वत:च्या स्वाभाविक प्रवृत्तीला अनुसरून आपला विकास करून घ्यायचा आहे”.

   स्वामीजींनी सर्वांच्या मनात विश्वबंधुत्वाचा भाव निर्माण केला. ते म्हणाले, “आपले मार्ग भिन्न असले, विचारधारा वेगळ्या असल्या, तरी आपण सर्वजण भिन्न मार्गाने जात असलेल्या पूर्णतेचे यात्रिक आहोत”.

     शिकागोच्या सर्व धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंदांची संबोधने आणि श्रोत्यांचा त्यांस मिळालेला तुडुंब प्रतिसाद  म्हणजे भारताच्या गौरवाचं  सुवर्णाक्षरांनी लिहिलेल पान होतं. विश्वबंधुत्व आणि विश्वधर्म याचा उद्गाता असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान यात असामान्य, अद्वितीय अशी कामगिरी केली होती. त्यांचे नाव अमेरिकेच्या कानाकोपर्‍यात पोहोचले होते. विवेकानंद आता वैश्विक स्तरावर  स्वामी विवेकानंद झाले होते. त्यांनी भारताबाहेर जाऊन केलेला आपल्या उच्च संस्कृतीचा जागर, हिंदू धर्माची वैशिष्ठ्ये, तत्वज्ञान, आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान व प्रेम, आज या शिकागोच्या परिषदेनंतर १२८ वर्षानी आपण जाणून घेणे, माहिती करून घेणे अत्यंत महत्वाचे ठरेल. कारण त्याची आज नितांत आवश्यकता आहे. 

- डॉ. नयना कासखेडीकर, पुणे.

 

                                -----------------------------------------      

4 comments: