Tuesday, 31 August 2021

नंदनवनातील पक्षी – मोर भाग 3

 

                                             नंदनवनातील पक्षीमोर

                                मोराचे जीवन आणि कलात्मक मोर

                                                               भाग-  तीन 

      


    मोराचं स्थान जसं प्राचीन साहित्य पासून अढळ आहे, उदा. स्कंदपुराण, वेद. त्या प्रमाणेच भारतीय चित्रकला, शिल्पकला, धातू आणि हस्तिदंत यावर कोरीव कामात शतकानुशतके मोराच्या प्रतिमेचा वापर केलेला आढळतो. कार्तिकेय, बाणासूर, वृषसेन, तसेच मौर्य, कुशाण यांच्या ध्वजांवर सुवर्णतारांनी तयार केलेले मोराचे चित्र असायचे.

  भारतात प्राचीन काळापासूनच वस्त्रांवर मोरांच्या विविध आकृत्या विणण्याची पद्धत होती. म्हणूनच पैठणी या पारंपरिक वस्त्राची किंमत मोरांच्या नक्षीकामवार ठरते. पैठण्या इतर साड्या, काठ, पदर, गालिचे यावर मोर विराजमान असतो. आता तर बेडशीट्स, कार्पेट्स, चादरी, ड्रेस मटेरियलवर सुद्धा मोराचे डिझाईन असते. ते मग भरतकाम केलेले, विणलेले, पेंटिंग केलेले, मण्यांचे मोर, ताटभोवतीच्या महिरपी मधले मोर इत्यादि.  पुठ्ठा,प्लायवूड जे जे उपलब्ध असेल त्या त्या प्रकारात मोर नक्षी बसवून एकदाचे रुखवत करायचे, हा उपक्रम जवळचे कोणाचे लग्न ठरले की हौसेने जबाबदारी घ्यायची असा छंदच होता लहानपणी.


आता तर नव्या रूपात मोर आपल्याला भेटतो तो विविध डिझाईन्स मध्ये विविध माध्यमातून. म्युरल, पॉट, कानातले, गळ्यातले सेट्स, हेअर बॅंड किंवा क्लचर, छत्रीवर सजावट, वारली किंवा तंजावर अशा वेगवेगळ्या पेन्टीग शैलीत, रांगोळीत, फुलापानांच्या रांगोळीत, फुलांचे स्टेज डेकोरेशन ,भिंतीवरचे पेंटिंग फार मनमोहक असते मोराचे. मेंदीसाठी पण मोर डिझाईन वापरतात.

  

आता तंत्रज्ञानाने पण मोराला आपल्यात सामावून घेतले आहे. अँड्रोइड फोन मध्ये मोराचा इमोजी आहे आणि गूगल चं डुडल पण एकदा मोराचं होतं. मंगळसूत्र आणि इयरिंग्स, अंगठी, माळेचे पदक यात तर एकाहून एक सरस मोराचे डिझाईन असते.पण हं, मोराचं हे सौंदर्य वस्तूत निर्माण करताना खूप कौशल्याचं काम असतं म्हणून ते किमती पण असतं.




सजावटी साठी मोर आहेच पण इतर ठिकाणी सुद्धा मोराचा संबंध नकळतपणे जोडला गेला आहे. योगासने आपण नेहमी करतो, त्यात वेगवेगळ्या पोश्चर्सना वेगवेगळी नावे दिलेली असतात. त्यातलेच एक योगासन म्हणजे 'मयूरासन' मयूरासनात अंतिम स्थितीत पूर्ण शरीर दोन्ही हातावर तोलून धरलेल्या मोराप्रमाणे दिसतं. मानवाला योगक्रियेदवारे प्रयत्न करून सिद्धि प्राप्त करून घ्यावी लागते. म्हणूनच अनेक आसनांची नावे पशुपक्षांच्या नावावरून घेतलेली आहेत. कारण त्या त्या पशूपक्षांच्या स्वाभाविक गुणधर्मांचा त्यासाठी विचार केलेला आहे.



मोराची नावे -

 मोराला प्रादेशिक भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. मराठीत मोर/मयूर (नर) आणि मयूरी/लांडोर(मादी) म्हणतात. प्राचीन असल्याने संस्कृत भाषेत, मयु: म्हणजे किन्नर, सुरेल आवाजाचा यक्ष म्हटलं जातं. मोराला संस्कृत मध्ये पस्तीस नावं आहेत. उदाहरणार्थ- कलापी, चंद्रकी, नीलकंठ, भुजंगभुक, मेघनाद, लासक, शिखंडी,.... ईत्यादि अनेक .  इंग्रजी मध्ये मोर व लांडोर जोडीला, पीकॉक-पीहेन, राजस्थानी भाषेत मोरला- मोरली, तेलगूत मगनेमलि–अगनेमलि, तामिळमध्ये मयिल-पेडै , आसामी, बंगाली आणि उरिया मध्ये मयूर-मयूरी, पंजाबीत मोर-मोरनी तर याशिवाय, फारसी भाषेत ताऊस, फ्रेंच मध्ये पों, ग्रीक मध्ये पावो, सिंहली भाषेत मोनार अशी नावे आहेत. भारतात आढळणार्‍या मोराचे शास्त्रीय नाव पॅव्हो क्रिस्टेटस असे आहे. भारताबरोबरच श्रीलंका, बांगलादेश, ब्रह्मदेश, इथेही मोर आढळतो. मोराला नागांतक सुद्धा म्हणतात.   



मोर (पॅव्हो क्रिस्टेटस)- हा मोर भारतात सगळीकडे आढळतो, अगदी हिमालयात १६००मीटर उंचीवरसुद्धा. उष्ण कटिबंधात आणि समशीतोष्ण कटिबंधात मोर जास्त आढळतात. आशिया खंडात त्याच्या दोन जाती आहेत. पॅव्हो क्रिस्टेटस आणि दुसरी पॅव्हो म्युटिकस. हा रंगाने हिरवा असलेला मोर प्रामुख्याने ब्रम्हदेशात आढळतो. जगातल्या पांढरा, लाल, हिरवा आणि निळा या जातीं/प्रकारांमध्ये भारतीय निळा मोरच सर्वात आकर्षक आहे. विदर्भातील लोणार परिसर, चित्रकूट, मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात संख्या जास्त आहे. 


मोर राष्ट्रीय पक्षी का झाला ?

  मोराच्या लोभस सौंदर्यामुळे भारत सरकारने २६ जानेवारी  १९६३ ला मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. इतके विविध पक्षी असताना मोरालाच राष्ट्रीय पक्षी म्हणून मान का मिळाला? होय नक्कीच काहीतरी कारण असणार ना? त्यामागे थोडा इतिहास आहे. जागतिक स्तरावर पक्षी संरक्षण विषयक विचार करण्यासाठी जपान मध्ये टोकियो येथे सर्व देशातले प्रतींनिधी जमले होते. या सभेत प्रत्येक देशाने आपल्या देशाचा एक विशिष्ट पक्षी निवडून त्याला पक्षांचा राजा असा मान द्यावा असे सांगण्यात आले. खर तर यामागे कारण होता की, आपल्या देशातील वन्य पशू पक्षी ही आपलीय राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिचे रक्षण करणे सर्व सामान्य जनतेचे सुद्धा कर्तव्य आहे. यासाठी एक समिति नेमून वन्य प्राण्यांचे रक्षण या मुद्द्यावर विचार झाला. वृत्तपत्रातून अभिप्राय मागविण्यात आले. प्रत्येक राज्याने आपले अभिप्राय दिले . या विषयावर १९६१ साली भारतीय वन्य प्राणी बोर्डाची बैठक उटकमंड (उटी) येथे भरली होती. जेंव्हा आपला राष्ट्रीय पक्षी ठरवायचा होता तेंव्हा, इतर अनेक पक्षांची नावे सुद्धा शर्यतीत होती. या बैठकीत सारस (बगळा), ब्राह्मणी घार, माळढोक, हंस आणि मोर या नावावर चर्चा झाली होती. अनेक पक्षांमधून एक पक्षी निवडताना काही निकष ठरवण्यात आले. त्यातला एक म्हणजे तो पक्षी भारतीय संस्कृती आणि परंपरेचा भाग असला पाहिजे. दुसरा- सामान्य माणसालाही तो ओळखता यावा. आणखी एक निकष म्हणजे या पक्ष्याचे अस्तित्व/ वावर देशाच्या सर्व भागात असावा. एव्हढंचं नाही तर, त्याची काव्याची कसोटी, लोकांची आवड, या बरोबरच, रंग, शरीर सौष्ठव, कलात्मकता, कंठस्वर या वैशिष्ट्यांचाही विचार करण्यात आला.या सगळ्या कसोट्यात पास झालेला म्हणजे, हे सगळे निकष पूर्ण करणारा पक्षी अर्थात सौंदर्यवान मोरच होता. भारताप्रमाणे श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे , तसेच म्यानमारचा (ब्रम्हदेश) राष्ट्रीय पक्षी पण मोरच आहे.


पण साहित्यात महाकवी कालिदास यांनी त्यांच्या काव्यात मोराला आणखीनच उच्च स्थान खूप आधीच दिलेले आहे. कालिदासाच्या ऋतुसंहार या खंड काव्यात सहा ऋतूंचे वर्णन आहे. प्रत्येक ऋतुत वृक्षलता आणि पशुपक्ष्यांवर होणारे परिणाम  आहेत, वर्षा ऋतूच्या भागात (श्लोक चौदा) भुंग्यांच्या स्थितीचे वर्णन आहे की, कमळे दिसली नाहीत तरीही भुंगे गुंजारव करत पिसारा फुलवून नाचणारा मोर बघून भ्रमित झाले आणि कमळे समजून मोरावरच भाळले आहेत.

विविध शैलीतील पेंटिंग्स 



मेघदूतात सुद्धा पत्नीविरहाने व्याकूळ झालेल्या यक्षाने  मेघाला अलकानगरीत जायला सांगितले असते. यावेळी अलकानगरी पर्यंतचा मार्ग सांगताना वाटेत काय काय लागेल ही भौगोलिक माहिती कालिदासाने सांगितली आहे. सुवर्ण केशरी रंगाचा आम्रकुट पर्वत, विंध्य पर्वताच्या अंगावर पसरलेली अवखळ नर्मदा, नर्मदेत डुंबणारे रानहत्ती, शुभ्र बगळ्यांच्या माळा, वाटेवरची केतकीची वने आणि आर्त केकारव करणारे मोर दिसतील. निसर्गातले त्या त्या ऋतुतले पशू पक्ष्यांचे वर्णन पण कालिदासाने केले आहे. निसर्गात इतके विविध प्रकारचे पक्षी असताना कालिदासाला फक्त मोरच सांगावासा वाटला याचं उत्तर मोराचं आकर्षित करणारं सौंदर्य आणि त्याचं संस्कृतिक महत्त्व.




कालिदासाच्या शाकुंतल नाटकात सुद्धा कण्वाश्रम सोडून शकुंतला सासरी जायला निघते तेंव्हा तेंव्हा आश्रमातील माणसे, पाळीव पशुपक्षी, झाडे, लता, फुले सुद्धा दु:खी होतात. लता-वेली अश्रु गाळू लागतात, हरणे कोवळ्या दर्भाचे घास घेणे सोडतात, वृक्षाची पाने गळून पडतात आणि मोर, नाचणे सोडतात असे वर्णन कवीने केले आहे. जेंव्हा तपोवनात आनंदी प्रसंग असतो तेंव्हा मोर आनंदाने नाचतो. दु:खी प्रसंगात त्यालाही दु:ख होते. असा हा निसर्ग, पशू पक्षी, मनुष्य जीवनाशी एकरूप झालेला पुराणातल्या कथांमध्ये दिसतो. यावरून पशू- पक्ष्यांविषयीचे प्रेम आणि भोवतालच्या निसर्गात समरस होणे हे आपल्या संस्कृतीचे प्राचीन वैशिष्ट्य पण दिसते.           

मोराचे प्रकार -

  निळा मोर आपल्याकडे भारतात आणि श्रीलंकेत आढळतो. तर, हिरवा मोर थायलंड, मलेशिया, जावा, दक्षिण चीन,चीनमध्ये मोराला आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानतात.  म्यानमार आणि भारतात मणीपुर, मिजोराम मध्ये आढळतो. पांढरा मोर भारत (आसाम), जपान आणि पूर्वेकडील देशात आढळतो. लाल मोर आफ्रिका, कांगो खोरे आणि झायरच्या जंगलात आढळतात. सोनेरी मोर बर्मा आणि ईशान्येकडच्या राज्यात आढळतात. मोराचं आयुष्य २५ ते ३० वर्ष असतं. मोर (नर) आणि लांडोर (मादी) यामध्ये सुंदर पिसारा फक्त मोरालाच असतो. त्याचा उपयोग मोर, लांडोरीला आकर्षित करण्यासाठी करत असतो. मोराच्या नाचण्याचा कालावधी  आणि पिसांची संख्या यावरून लांडोर मोराची साथीदार म्हणून निवड करते.

जपानचे पेंटिंग 

रागमाला पेंटिंग्स 


  प्राचीन संस्कृत कवींनी या पिसार्‍याला नयन मनोहर इंद्र्धनुष्य म्हटलेले आहे. तर संस्कृतमध्ये मोराला 'भुजंगभुक' म्हटले आहे. कारण नागासारखा विषारी सर्प, मोर सहज पचवू शकतो. पंखांची सळसळ, शरीराचं थरथरविणे, मोठयाने किंकाळी फोडणे आणि मोहक अदा सादर करणे हे केवळ आणि केवळ लांडोरीसमोर भाव खाण्यासाठीच असते. जोपर्यंत लांडोर त्याच्याकडे लक्षं देत नाही तोपर्यंत मोर नाचत राहतो. याचं जणू परीक्षण करूनच लांडोर त्या मोराला आपला जीवनसाथी निवडते. मला तर हे स्वयंवरच वाटते.

   पावसाळा हा मोराचा जननकाळ. मोराचे पिसारा फुलवत नाचणे हे लांडोरीसाठी असले तरी त्याला जेंव्हा जेंव्हा आनंद होतो तेंव्हा ही तो असाच नाचतो. मोराचा केकारव वर्षाऋतूचे आगमन सुचवितात. ग्रीष्म ऋतु संपता संपता शेतकर्‍यांना, येणार्‍या पावसाची पूर्वसूचना मोराकडूनच मिळते. त्यामुळे मोराचा आनंदोत्सव काळ असणारा हा वर्षाऋतु शेतकर्‍यान्चाही आनंदोत्सव असतो.  






     त्यांचा विणीचा काळ जानेवारी ते ऑक्टोबर असतो. एकांतात आणि सुरक्षित ठिकाणी जमिनीवर  काटेरी झाडाझुडुपात ते घरटे तयार करतात.मादी एका वेळी चार ते सहा अंडी घालते. अंडी पिवळ्या रंगाची असतात. २८दिवस अंडी उबविल्यानंतर आणखी महिनाभराने पिल्ले उडू लागतात. या विणीच्या हंगामानंतर मोराची पिसार्‍यातली सर्व सुंदर मोरपिसे गळून पडतात. पुन्हा विणीच्या काळाआधी पिसे उगवतात. ही पिसे साधारण दोनशे असतात. अशी ही गळून पडलेली पिसे गोळा करून त्याच्या आकर्षक वस्तु  तयार केल्या जातात. भारतातील खेड्यातील लोक ही पिसे पाश्चिमात्य देशांना विकतात. आता कायद्यानेच मोरांना संरक्षण देण्यात आल आहे. मोर पाळणे, त्याची शिकार करणे यावर भारतात बंदी आहे. तरीही जेंव्हा आपण मोरपिसांच्या वस्तूंकडे आकर्षिलो जातो तेंव्हा लक्षात येत की हा अवैध धंदा सुरू आहे, हे वाईट आहे.

    कीटक, धान्य, डाळी, पिकांचे कोवळे कोंब,पाली, लहान साप असे त्यांचे अन्न असते. मोर एकटा कधीच राहत नाही, समूहाने राहतो. स्वत:च्याच तोर्‍यात दिसणारा मोर अतिशय जागृत असतो. आदिवासी क्षेत्रातील मोराला तर 'जागल्या' म्हणतात. शत्रूची सूक्ष्म चाहूल पण त्याला कळते. वाघ, कोल्हा आणि रानमांजर हे मोराचे शत्रू असतात. ते दिसताच मोर इतरांना सावध करतो. चपळतेने झाडावर चढला तर ठीकच पण, जमिनीवरच बिबट्या आणि मोर समोरासमोर आले तर मात्र बिबट्या मोराला संमोहित करतो ,जागच्या जागी स्थिर उभा राहतो. पण शत्रूपासून सुटायला हवे हे कळत नाही आणि अतिशय चपळ असलेला मोर बळी पडतो. संध्याकाळ नंतर मोर विश्रांतीसाठी झाडावर बसतात आणि बिबट्या पासून रात्री संरक्षण मिळावं म्हणून पर्णहीन झाडावर बसतात. सकाळी खाली येतात. मोराची पिल्ले आठ महिन्याची झाल्यावर स्वतंत्र राहू लागतात. आठ महिन्यांनंतर नर पक्ष्याला पिसारा येऊ लागतो आणि तो मोठा होण्यासाठी चार वर्षे लागतात. चार वर्षानी पुन्हा विणीचा काळ येतो, मोर पिसारा फुलवून धुंद नाचू लागतो,त्याच ते नृत्य बघून आम्हीही बेधुंद होतो . हे नृत्य असंच टिकण महत्वाचं आहे. कारण मोरांची संख्या कमी कमी होत राहिली तर ?                             

 रांगोळीतला मोर  




    मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे, तो टिकवणं आमच कर्तव्य आहे. जेव्हढा आपला देश आपल्यासाठी महत्वाचा आहे, तेव्हढीच ही देशातली नैसर्गिक संपत्ती टिकविणे पण महत्वाचं आहे. त्यांना जगण्यासाठी अन्न,पाणी आणि निवारा उपलब्ध नसेल तर हे पशू पक्षी स्थलांतर करून दुसरीकडे जातील. म्हणूनही त्यांची संख्या कमी होईल. संख्या कमी होण्याचे दुसरे कारण शिकार आहे. या पशू पक्ष्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी मानवाचे अतिक्रमण होणे हे पण एक मुख्य कारण, आणि त्यांच्या परिसरात हवा प्रदूषण, धूर यांचा वाढता त्रास.

     महाराष्ट्रात असे अभयारण्य आहे, मराठवाड्यात बीड शहारच्या डोंगराळ भागात पाटोदा तालुक्यात नायगाव मयूर अभयारण्य आहे. या वनात मोर खूप प्रमाणात आहेत. हे राखीव क्षेत्र १९९४ साली सुरू झालं. १९९४ ला इथे १०,००० मोर होते. हे अभयारण्य डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. यात २०१८-१९ मध्ये २२५२ मोर (नर) आणि ५९५१ मोर ,लांडोर(मादी) होते. पावसाळा सुरू होताच मोर व लांडोरच्या जोड्या रस्त्याच्या दुतर्फा मुक्त पणे फिरत असतात. मोराचे अभयारण्य म्हणजे मोरांसाठी असलेले खास संरक्षित क्षेत्र तयार केले असले तरी या सर्व गोष्टींचा विचार पर्यावरण म्हणून केला गेला पाहिजे.

                                                        कांगा चित्रशैली 

    पावसाचे कमी प्रमाण, वृक्षतोड, वनामध्ये विदेशी वनस्पतींची लागवड केल्याने मोरांचे अन्न-( टोळ, फुलपाखरे, सरडे, गांडूळ, साप यांचे प्रमाण कमी), एकाच प्रकारच्या वनस्पतींमुळे अन्नसाखळी बिघडल्याने मोरांची संख्या कमी होते. म्हणून वृक्षलागवड, फळे, फुले येणार्‍या वनस्पतींची लागवड, मोरांच्या शिकारीला आळा घालणे असे आवश्यक उपाय आहेत.असे केले तरच मोरांना नंदनवन उपलब्ध होईल आणि हे नंदनवनातले मोर, जी हजारो वर्षे आपली संपत्ती आहे ती टिकेल आणि पुढच्या अनेक वर्षांनंतरच्या पिढिंना मोर फक्त चित्रात न दाखवता प्रत्यक्ष दाखवता येतील. आमच्या पिढीने मुलांना प्रत्यक्ष जाऊन मोर दाखवले,

    पुण्याजवळ शिरूर तालुक्यात मोराची चिंचोली गाव आहे .तिथे मोरदर्शनाचा आनंद घेता येतो. तर असा आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर, हे मोर आणि पृथ्वी तलावरचे सर्व पक्षी, प्राणी,कीटक, वनस्पती ही आपली संपत्ती आपण जपूया, तिचे संवर्धन करूया, त्यांच्या अधिवासवर आपण माणसं अतिक्रमण करतो ते टाळूया, निसर्गाची साखळी पूर्वी सारखीच सुरू राहण्यास मदत करूया हीच सर्वांना विनंती !   

             बघूया मोराचे विविध प्रकार -   https://www.youtube.com/watch?v=eQj_4JO0ikQ

                              (या तिन्ही लेखांचे सर्व फोटो आणि विडिओ गुगल वरुन साभार)

 

© ले. डॉ.नयना कासखेडीकर.पुणे

                                                         ------ समाप्त -----   

 

No comments:

Post a Comment