Saturday, 28 August 2021

श्रावणमासी हर्ष मानसी

 

                     श्रावणमासी हर्ष मानसी ....

        


     पाऊस ! आषाढस्य प्रथम दिवसे- मेघदूतातल वर्णन, मग श्रावणधारा, ऊनपावसाचा लपंडाव, आकाशातलं इंद्र्धंनुष्य ही सगळी निसर्गाची वर्णने वाचणं आणि त्यांचा प्रत्यक्ष अनुभव हा चैतन्य निर्माण करणारा असतो. तर तरुण तरुणींना तो रोमॅंटिक वाटत असतो. आषाढ, ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद या चार महिन्यातला सगळ्यांचा आवडता महिना श्रावणच असतो. वैशाखाची काहिली संपवून पहिल्या पावसाचा मृद्गगंध, मन आणि शरीर सुखावून टाकतो. पावसाळी सहलीचा आनंद लुटण्याचा हा महिना. जवळच्या परिसरातील धबधबे, धरणाजवळील ठिकाणे माणसांनी तुडुंब भरलेले असतात. माध्यमेही श्रावणाचा आनंद दर्शकांना द्यायला उत्सुक असतात. म्हणून चालू असतात अखंड रोमॅंटिक गाणी. हिंदीत तर सावन का महिना खूपच लोकप्रिय. सगळ्या कवी आणि गीतकारांचा आवडता महिना, ज्यांचं आयुष्य या ऋतूंवर अवलंबून आहे त्या शेतकर्‍यान्च सुद्धा भविष्य ठरवणारा असा हा महिना. हिंदू पंचांगानुसार या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो.    

      रक्षाबंधन हा याच महिन्यातला सण. लहान मोठे सर्वजण राखीची म्हणजे राखीपोर्णीमेची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यात प्रत्येक जणाची वाट पाहणं वेगळं असतं. लहान बहीण भाऊ राखीच्या गिफ्ट मिळणार याची वाट पाहतात. मोठं झालं तरी गिफ्ट ची वाट पाहण्यात तेव्हढाच आनंद असतो.

     

     लहान गावात किंवा शहरात आता श्रावणात चालू असतात मंगळागौरीचे खेळ, त्यांची महिनाभर आधी प्रॅक्टीस. याच प्रमाणे स्त्रियांचा आवडता सण म्हणजे नागपंचमी. अजूनही ग्रामीण भागात चल ग सये, चल ग सये वारुळाला ... म्हणत नागोबाला पुजायाला जाण्याची प्रथा दिसते. याच महिन्यात श्रीकृष्णजन्माष्टमी, शेतकर्‍यांचा बैल पोळा, वरुण देवतेची पुजा म्हणजे नारळी पौर्णिमा असे उत्सव आणि सण असतात. म्हणून श्रावण हा उत्सवी आणि उत्साही महिना असतो.              

     श्रावण म्हटलं की आधी आठवते ती बालकवींची शाळेत शिकलेली आणि पाठ झालेली , श्रावणाचं हर्षभरीत वर्णन असणारी कविता,

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे
!

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
!

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे,
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे
!

उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा,
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा
!

बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते
!

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती ,
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती
!

सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला,
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला
!

फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती,
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
!

खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे,
मंजुळ पा
वा गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे!

देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात,
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
!

सगळ्या चराचर जीवसृष्टीला, माणसांना, पक्षांना, प्राण्यांना आनंददायी असलेला, मनभावन निसर्ग असतो, या महिन्यात निसर्गात फुलणारी फुले, देवपूजेची चाललेली लगबग सगळं सगळं उत्साह देणारं. याच महिन्यात असलेली व्रतवैकल्ये धर्माची जोड देऊन जरी साजरे करत असले तरी त्याचा संबंध सात्विकतेशी, ऋतुचक्राशी आणि जीवन शैलीशी असलेला दिसतो.

        श्रावण सुरू होताच ठेवणीतून बाहेर येतो जिवतीचा फोटो. घरातली आई आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या कल्याणसाठी, देव्हार्‍यात तो स्थानापन्न करून त्याला फूल पत्री, वस्त्र वाहून नैवेद्य दाखवते. आणि सुरू होतात सोमवार ते रविवारची साप्ताहिक व्रते. श्रावणी सोमवार, मंगळवारी मंगलागौर पूजन, बुधबृहस्पती पूजन, गुरुवारी गुरुचरित्र पठण, शुक्रवारी लक्ष्मीची पुजा आणि हळदीकुंकू, शनिवार मारूतीचा आणि रविवार सूर्य उपसनेचा. श्रद्धावान लोक असे धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्रावणात आणि चातुर्मासात करत असतात आणि आत्मिक समाधान मिळवतात.

   मला आठवतं, लहानपणी आजीची पुजा-अर्चा झाली की, श्रावणात रोज तिला कहाणी वाचून दाखवायची. शुक्रवारची कहाणी. खुलभर दुधाची आणि अजून काही. वर्षानुवर्षे वाचलेल्या, माहिती असलेल्या त्याच त्याच कहाण्या आजी प्रत्येक वेळी मन लावून ऐकायची, त्यात खरं तर काही नावीन्य नसे, पण मनातली श्रद्धा हेच एकमेव कारण. आणि मोठ्यांनी सांगितलं आहे ते ऐकायचं आणि करायचं देखील अशी परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली. त्यामुळे, उलट का? असा प्रश्न विचाराचा नाही.

अशीच गोष्ट नागपंचमीची. रूढी प्रमाणे चालत आलेली, आज तवा चुलीवर ठेवत नाहीत. किंवा भाजी चिरत नाहीत. असे परंपरेने संगितले गेलेले. नागपंचमीच्याच कहाणीत त्याचे उत्तर दडलेले आहे. कारण या कहाण्या अर्थात गोष्टी, या प्रबोधनासाठीच रचल्या गेल्या आहेत हे डोळसपणे वाचले की लक्षात येईल.  

       नागपंचमी हिंदुस्थानच्या सर्व भागात साजरा होणारा सर्प पूजेचा हा सण आहे. महाराष्ट्र, दक्षिण भाग, गुजरात, बंगाल सगळीकडे सर्प पुजा किंवा नागप्रतिमांची पुजा करतात. नागांचा अधिपति राखेश्वर म्हणजे शिव समजून डोंगराळ प्रदेशात पंचमीला पुजा केली जाते. उदयपूरला या दिवशी घराच्या दाराशी एक प्रकारची वनस्पति आणून ठेवतात म्हणजे विषारी प्राणी घरात येत नाहीत. तर नेपाळ मध्ये नाग आणि गरुड यांच्यात मोठ्ठ युद्ध झालं, तो हा दिवस विशेष उत्सव साजरा करतात. आगरा, अयोध्या, पंजाब, गढवाल मधेही सर्पपूजेची पद्धत आहे. हे सांगण्याचं कारण एव्हढच की, परमेश्वराच्या अतर्क्य शक्तीबद्दल मनुष्याला आश्चर्य वाटले त्यामुळे त्याची सेवा करणे म्हणजे त्यांनेच निर्माण केलेले सर्व प्राणी, झाडे यांची पुजा करणे महत्वाचे वाटले असावे. म्हणून नागपंचमी सारखे सण सुरू झाले असणार.

     मध्यंतरी मी मेळघाटात गेले होते. तिथे रस्त्याने जाताना कडेला छोटसं एक फुटाचं दगडाचं मंदिर होतं. त्यात एक दगडच विराजमान झाला होता. वर लिहिलं होतं, ||बाघ देव प्रसन्न || चौकशी केली तेंव्हा कळलं. की या जंगलात हे प्राणी वास्तव्यास असल्याने तो शक्तीशाली व आपला संरक्षणकर्ता आहे अशी तिथल्या आदिवासींची समजूत आहे. म्हणून या रस्त्याने जाताना आधी या बाघ देवाला नमस्कार करतात. म्हणजे खर तर दोघेही एकमेकांचं रक्षण करतात. अशा अनेक समजुती वेगवेगळे दिवस व सण साजरे करताना पाळत असलेले दिसतात.

       मंगळागौर पूजन महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नवविवाहितेने लग्नानंतर पाच वर्षे करायचे हे व्रत. बंगाल मध्येही मंगलचंडिका म्हणून या सौभाग्यदायिनी देवीची पुजा करण्याचा प्रघात आहे. पूर्वी ठराविक लोकांकडेच मंगळागौर साजरी व्हायची आता मात्र त्याला सामाजिक रूप येत चाललय. यात अनेक प्रकारे प्रबोधन होत असतं. पूर्वी नववधू लहान वयाच्या असायच्या. तिच्यावर चांगले व अपेक्षित संस्कार होणे महत्वाचे म्हणून अशा सण समारंभाची योजना असे. शिवाय निसर्गाची तिला ओळख व्हावी, झाडे पाने फुले, पत्री यांच्या संपर्काने त्यांचे महत्व समजावे व ओळख व्हावी. नाती समजावीत आणि ती कशी टिकवायची ते ही कळावे, तिला आणि सर्वांनाच आनंद मिळावा अस हे लोकशिक्षण च जणू. मंगळागौरीच्या खेळातून शास्त्र शुद्ध व्यायाम होतो त्यादृष्टीने ही ते खेळ महत्वाचे आहेत. सजावट, कलाकुसर, गाणी म्हणणे यातून काही सृजननिर्मिती होत असे. यातून एक महत्वाची गोष्ट घडत असे की सासू-सून-नणंद-जावा गाण्यामधून खुलेपणाने व्यक्त होत असत.

पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा !

तुझ्या भावाचं डोळं चकणं ग, रूप हेकणं ग पोरी पिंगा

भैन माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा !

 तुझ्या भैनीचं नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा

माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा !

 भाऊ तुझा ग भितो झुरळाला, काळ्या उंदराला पोरी पिंगा

भैन माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा !

 तुझ्या भैनीचं काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा

अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा !

    आपल्या मनातल्या गोष्टी उघडपणे बोलणे म्हणजे मर्यादा ओलांडली असे व्हायला नको म्हणून ही एक नामी संधी असे. या गाणी आणि खेळ यातून मनमोकळे पणे आपली मते, आपला मनातला राग बिनधास्त व्यक्त करून मोकळं व्हायचं आणि खेळीमेळी च्या वातावरणात नणंदा-भावजया, सासू-सुना यांची नाती आणखीनच खुलायची. नागपंचमी, मंगळागौर, गौरी गणपती, राखी पौर्णिमा या निमित्ताने त्या मुलीला माहेरच्या लोकांना भेटण्याची संधी दिली जायची, म्हणूनच,

फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे...,

पंचमीचा सण आला डोळे का ग ओले ?’

ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे यांनी गायलेल्या गदिमांच्या या गीतातील मुलींच्या डोळ्यात पाणी येते कारण ते वातावरण त्यांना ओढ लावते. नागपंचमीला फेर धरून गाणी म्हणणे, झिम्मा- फुगड्या, आट्या- पाट्या खेळणे, याबरोबरच यातील गाण्यांमधून काही पौराणिक कथा की ज्यातून जीवनमूल्ये शिकवली जातील, अशा कथांचं कथन होई. हीच मूल्ये तिला पुढच्या आयुष्यात स्वत:साठी उपयोगी पडत. कल्पनाशक्तीला वाव मिळे.

       नारळीपोर्णिमा शास्त्रा प्रमाणे वरुण देवतेची पुजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पोर्णिमा. हिंदुस्थानच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर असलेले लोक विशेषत: व्यापारी वर्गाला याचे जास्त महत्व. प्राचीन काळी ते जलमार्गाने प्रवास करीत असत आणि व्यापार आणि दळणवळण पण चालत असे. समुद्र हे वरूणाचे  स्थान समजले जाते. समारंभ पूर्वक समुद्राचे दर्शन घेऊन त्यास नारळ अर्पण करून समुद्रावर सत्ता गाजविणार्‍या वरुण देवाची आठवण ठेवणे व कृतज्ञता व्यक्त करणे असा उद्देश असतो. वर्षा ऋतुत हा समुद्र क्षुब्ध झालेला असतो. शिवाय हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या काळात मासेमारी करायला कोली बांधव जात नाहीत. श्रवण पौर्णिमेला सागर पूजन झाले की मासेमारी सुरू होते. श्रावण पौर्णीमेपासून जलमार्गावर वाहतूक सुरू होते. असा हा समुद्र पूजनाचा दिवस.ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.

हाच दिवस वैदिक धर्म पाळणार्‍यांसाठी श्रावणी म्हणून पाळला जातो. या तितिथीला जानवे बदलायचा विधी सांगितला आहे. तर गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा हा पहिला दिवस असतो.

                            

     कृष्ण जन्माष्टमी - याच महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी असते. श्रवणात वद्य अष्टमीला रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. तो दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात.सबंध हिंदुस्थानात गोकुळ,मथुरा वृंदावन, द्वारका, पुरी, इथे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे असे समजले जाते.   

                                      

       पिठोरी अमावास्या- पोळा- श्रावण अमावास्येला बैल पोळा साजरा करतात. शेतकरी लोक आपल्या खिलार्‍या बैलांना रंगवून, सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढतात, पुजा करतात, गोडधोड करून त्यांना खाऊ घालतात. आपल्या उपयुक्त व वर्षभर आपल्यासाठी राबणार्‍या या गुरांबद्दल आदरभाव दाखविण्याचा हा दिवस. बहिणाबाई चौधरी यांनी बैल पोया या कवितेत याचं महत्त्व सांगितलं आहे. त्या म्हणतात,  

आला आला शेतकर्‍या, पोयाचा रे सन मोठा,

आता बांधा रे तोरन, सजवा रे घरदार |

करा अंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले  शेंदूर,

उठा उठा बहिनाई, चुले पेटवा पेटवा |

आज बैलाले निवद, पुरणाच्या पोया ठेवा,

                                                   वढे नांगर वखार, नही कष्टाले गनती |           

पीक शेतकर्‍या हाती, याच्या जिवावर शेती ||

    पावसाळा हा ऋतु नाही म्हटलं तरी आरोग्य बिघडवणारा असतो काही वेळा. या कालावधीत पचनशक्ति मंदावते. पावसामुळे बाहेरचे वातावरण आरोग्याला हानिकारक व रोगराईला पोषक असते. अशुद्ध व गढूळ पाणी वापरात येते. साहजिकच सर्दी, ताप, खोकला, पोट बिघडणे हे आजार उद्भवतात. त्यामुळे पचायला हलका आणि साधा आहार घ्यायला लागतो. यालाच आपल्या पूर्वजांनी धार्मिक जोड देऊन एकभुक्तं राहणं, उपवास करणं, एक धान्य खाण यासाठी नेम धर्म आखून दिले त्याचा शास्त्रीय फायदा व अर्थ लक्षात घेतला तर कसे ऊपयोगाचेच आहेत हे लक्षात येईल.

         कुठल्याही गोष्टींचा धार्मिक संबंध लावताना तो डोळसपणे बघावा. अंधश्रद्धेने नको. आजची नवी पिढी चौकस आहे. तिला प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय आधार हवा आहे. परंपरेने चालत आलेल्या रूढी आहेत त्या तशाच्या तशा नवी पिढी स्वीकारणार नाहीत. त्यामुळे नवा अर्थ देऊन, पण पहिलेच महत्व कायम ठेऊन त्यांच्या पर्यन्त तो पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या पालकांवरती आहे.      

      ऋतुचक्र आणि आपले हे उत्सव, व्रत वैकल्ये एकमेकांशी निगडीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यन्त पाळला जाणारा चातुर्मास. नियम पाळणे, धार्मिक पुजा-पाठ, पारायण करणे, उपासना करणे या बरोबरच उपवास धरणे. यात आपल्या दिनचर्येची ऋतूंशी सांगड घातलेली दिसते. आणि ओघानेच आपल्या आरोग्याशी पण. खर तर ही आपल्या ऋषीमुनींची आपल्याला देणगीच आहे. त्याची नीट व्यवहार्यता, उद्देश, त्यातलं वैद्यक शास्त्र हे पण आपण समजून घेतले पाहिजे. आपले उत्सव, जत्रा, सण, समारंभ, प्रवचने, कथा, कीर्तने यातून आपली कायिक, वाचिक आणि मानसिक प्रगति व्हावी हाच उद्देश आहे. म्हणूनच परंपरा पाळताना समजून उमजून पाळाव्यात.  

 © डॉ. नयना कासखेडीकर,पुणे .

                                            ----------------समाप्त -----------------  

No comments:

Post a Comment