Friday, 20 August 2021

स्वातंत्र्य युद्ध : काव्यातील देशभक्तीची प्रेरणा

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त लेख -

स्वातंत्र्य युद्ध : काव्यातील देशभक्तीची प्रेरणा

    

   भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळ भारतातचीच नाही तर जगाच्या इतिहासातील सर्वाधिक महत्वाची जनतेची चळवळ होती. स्वातंत्र्याचा लढा हा फक्त १५० वर्षांचा नव्हता तर ते मिळवण्यासाठी भारताने जवळ जवळ १००० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यासाठीं संघर्ष केला आहे. अनेक आक्रमणे परतवून लावली आहेत. ब्रिटिश लोकांनी १८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून आपली सत्ता उभी केली.

मराठी मुलूखात इंग्रजी राजवट इ .स. १८१८ मध्ये सुरू झाली. ब्रिटिश राजवटीचा सर्वच क्षेत्रात समाजाला त्रास होऊ लागला. इंग्रजी शाळा आणि इंग्रजी शिक्षण यामुळे हिंदू संस्कृतीवरच घाला घालणारे वातावरण तयार होत होते. हिंदू लोकांचे ख्रिस्त धर्मात धर्मांतराचा समाजावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. गुलामगिरी, पिळवणूक, व्यापारांचे खच्चीकरण, हस्तव्यवसायचा नाश, असे अनेक बाजुंनी हिंदू समाज भरडला जात होता. त्या वेळचे समाज सुधारक वृत्तपत्रातून या राजवटीवर कोरडे ओढत होते. पुढे पुढे तर इंग्रजी राजवटी विरोधात बंड होऊ लागले. महाराष्ट्रात इंग्रजी राजवट आल्यापासून १८१८ पासून १८८५ पर्यन्त बंगाल, बिहार, ओरिसा, तमिळनाडू, गुजराथ, ऊत्तर प्रदेश अशा ठिकठिकाणी सशस्त्र उठाव होऊ लागले. महाराष्ट्रात खांदेश, धार, बीड, नांदेड, कित्तूर, विजापूर येथील उठाव, रामोशांचा उठाव, सावंतवाडी, कोल्हापूर, सातारा, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नरगुंद, जमखिंडी, मुधोळ, बेळगाव इथला उठाव असे अनेक उठाव झाले. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. १८५७ चा उठाव हा सर्वात मोठा स्वातंत्र्य मिळविण्याच्या प्रयत्नातला उठाव होता. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, ब्रिटीशांना इथून हुसकावून लावण्यासाठी हिंदुस्थानात, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, वंगभंग चळवळ, देशभक्ती चळवळ, मिठाचा सत्याग्रह, स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ, छोडो भारत आंदोलन, क्रांतिकारकांचे बलिदान अखेरीस भारत पाकिस्तान अशी फाळणी. अशा घटना घडल्या. विद्वान, पुरोहित, पंडित, मौलवी, लेखक, कलावंत, जमीनदार, शेतकरी, कारागीर असे सर्वजण ब्रिटिश सरकारच्या विरोधात गेले.

लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागृती निर्माण करणे, जुलमी कायद्यांविरूद्ध लढा लढणे, त्याचवेळी दुष्काळला सामोरं जाणे या घटनांनी हिंदू लोकात असंतोष माजला होता. राष्ट्रीय चळवळीचा प्रचार प्रसार, दि हिंदू , केसरी-मराठा, अमृतबाजार पत्रिका, सुधारक, बंगालचा खागीकटा, व्हॉईस ऑफ इंडिया या वृत्तपत्रातून होत होता. यातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी व जागृती करण्यासाठी अनेक साहित्यिक, कवी यांनीही आपली लेखणी चालवली होती. यात वृत्तपत्रांचे समाजसुधारक पत्रकार, कामगार वर्ग, लेखक, कवी, सामाजिक पुढारी, उत्कट देशभक्तीने प्रेरित झालेल्या, स्वातंत्र्याच्या आशा आकांक्षा असलेले क्रांतिकारक, आपापल्या परीने साहित्यातून सुद्धा आपले विचार मांडून जनजागृती करत होते.वृत्तपत्रांनी या काळात महत्वाची भूमिका बजावली होती. विचार व्यक्त करण्याचं आणि विचारांचा प्रसार करण्याचं वृत्तपत्र एक महत्वाचं माध्यम होतं. प्रखर देशभक्ती आणि प्रखर राष्ट्रीयत्व याचा पुरस्कार त्यांनी केला होता.

स्वातंत्र्य लढ्यातील टिळकयुग आणि गांधीयुग या काळामध्ये, स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कविता लिहिली गेली. यातून सविनय कायदेभंग चळवळ, स्वदेशीचा स्वीकार, बहिष्कार, असहकार, कायदेभंग असे विषय या काळात लिहिले जात होते. धर्मभेद, जातिभेद बाजूला सारून इंग्रजांविरोधी सर्वांनी लढावे असे आवाहन होत होते. स्त्री शक्तीला गीतांमधून जागृत करणे हाही एक उद्देश कविता लिहिण्यामागे असे. शिवाय क्रांति कार्याचा गौरव, क्रांतिकारकांचा गौरव, सशस्त्र प्रतिकाराची गरज हे विषय लिहिले जात. त्यामुळे इंग्रजी राजवटी विरुद्ध विषय असल्याने या कवितांवर बंदी घालण्यात येई, साहित्य सरकारकडून जप्त करण्यात येई. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महाराष्ट्रभाट या टोपण नावाने लिहिलेले ‘गोमांतक’ या काव्यावर अशीच बंदी घातली गेली. त्यांचा ‘श्री बाजी देशपांडे आणि ‘सिंहगडचा पोवाडा’, कवि गोविंद यांचा ‘अफझलखान वधाचा पोवाडा’,’अभिनव भारतमाला’, यांच्यावर बंदी घातली गेली. शाहीर अश्विनीकुमार यांचा ‘भगतसिंगचा पोवाडा’, लक्ष्मण खानविलकर यांची प्रभात फेरीची ‘राष्ट्रीय पद्यावली’, श्रीपाद सातवळेकर यांचे ‘वैदिक राष्ट्रगीत’ यावर बंदी घातली गेली. साने गुरुजींची ‘सत्याग्रही’, ‘देशभक्त किती ते मरती’, ‘तूफान झालो’, ‘स्वातंत्र्य’, ‘सुसंस्कृत कोण? ‘प्रतिज्ञा’ आणि ‘खंडकाव्य’ या त्यांच्या पत्री काव्यसंग्रहातील कविता आक्षेपार्ह वाटल्याने सरकारने संग्रहावरच बंदी घातली होती. 

अशा सारखी गीते, काव्य रचना संपूर्ण भारतात त्या काळात प्रेरणा देत होते. ब्रिटिश सरकार अशा रचना, आणि त्याची पुस्तके जप्त करत होते, त्यावर बंदी घालत होते. ही सर्व काव्ये समाजात जनजागृती करत होती. राष्ट्राबद्दलची अस्मिता जागृत करत होती. त्यातल्याच काही रचना ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून सर्वमान्य झाल्या. त्यातलं ‘वंदे मातरम..., ‘जन गण मन...ईत्यादि. आनंदमठ या कादंबरीतले गीत, वंदे मातरम स्वातंत्र्य लढ्यातील काळात घोषगीतच बनले. तर पुढच्या काळात काही गीतांना चाली लावून ती अजरामर झाली, लोकप्रिय झाली. स्वातंत्र्योत्तर काळातही भारतात सर्व भाषांमध्ये राष्ट्रप्रेम गीते लिहिली गेली. उदा. कवि प्रदीप यांचे गीत- ‘ए मेरे वतन के लोगो ....’ राम सिंह ठाकुर यांचे कदम कदम बढाये जा.. , प्रेम धवन यांचे ‘ए मेरे, प्यारे वतन ...’, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे, ‘जयोस्तुते..., आणि इतर अनेकांची प्रेरणा देणारी वीरश्रीयुक्त गीते स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आजच्या पिढीच्या डोळ्यासमोर उभा करतात. तर मधल्या पिढीला त्या काळाची आठवण करून देतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य जरी १९४७ साली मिळाले असले तरी त्याचा लढा त्या आधीच्या काळात दिलेला होता आणि या प्रेरणेची राष्ट्रीय गीते आणि रचना त्या आधी पन्नास वर्षे लिहायला सुरुवात झाली होती.

मराठी साहित्यातील देशभक्तीचा प्रवाह, कवि विनायक यांच्यापासून सुरू झाला. पूर्वजांचे वैभव आणि त्यांची वीर वृत्ती याचे लोकांना स्मरण करून देऊन त्यातून त्यांना स्फूर्ति देणे, पारतंत्र्याविषयी लोकांच्या मनात चीड उत्पन्न करणे याच ध्यासाने विनायक कविता लिहीत

लोकमान्य टिळकांचा कारावास, चाफेकर बंधूंची फाशी, शिवजयंती, गणेशोत्सव, रशिया- जपान युद्ध, जहाल-मवाळ यांचा वाद, या विषयवार सुद्धा त्यांनी कविता केल्या आहेत. त्यांनी हिरकणी, अहिल्या, पन्ना, रानी दुर्गावती, संयोगिता तारा, पद्मिनी, कृष्णकुमारी वीरमती इ. ऐतिहासिक स्त्रियांच्या जीवनांतील प्रसंगांवर आदर्श सुंदर काव्ये लिहिली आहेत. हतभागिनी, मातृभक्तीचे लेणे, जन्मसार्थक्य या त्यांच्या कविताही आहेत. त्यांनी आपल्या राष्ट्रीय कवितेतून पूर्वजांच्या पराक्रमाची गौरवगाथा वर्णन केली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘राष्ट्र भक्तांचे आणि हुतात्म्यांचे बलिदान कधीच व्यर्थ ठरत नाही’ . ते ‘महाराष्ट्रलक्ष्मी’ या आपल्या कवितेत म्हणतात- ‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावी काळ ,बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ ’ असा अभिमान ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात.

आधुनिक मराठी कवितेचा जन्म केशवसुतांपासून झाला असे मानतात. त्यांचे विषय लौकिक जीवन, वैयक्तिक भाव भावना, भोवताली घडणार्‍या घडामोडी असे असत. सामाजिक वातावरणामुळे त्यांना राष्ट्रीय स्वातंत्र्य व समाज सुधारणेचा ध्यास लागला होता. तुतारी, नवा शिपाई, स्फूर्ति, मूर्तीभंजन, गोफण केली छान, अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, मजुरावर उपासमारीची पाळी, एका भारतीयाचे उद्गार यात केशवसूत आपला प्रक्षोभ व्यक्त करतात. त्यांची तुतारी ही कविता सामाजिक क्रांतिचे स्तोत्र ठरली आहे असे म्हटले जाते. ते त्यांच्या कवितेत राष्ट्रवादाबरोबर समाज, बंधुभाव, मानवता या मूल्यांचा पुरस्कार करतात. आपले राष्ट्र फक्त स्वतंत्र न होता ते बलसंपन्न आणि समतेच्या विचाराने एकत्र आले पाहिजे असा विशाल विचार ते कवितेत मांडतात.’

राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हटले जाते, एव्हढे त्यांचे साहित्य विशेष पैलू असणारं आहे. कविता, विनोदी कथा, नाटक असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. ‘गोविंदाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी सुमारे दिडशे कविता लिहिल्या. लोकमान्य टिळक, स्वराज्याच्या मागणीसाठी इंग्लंडला गेले तेंव्हा गोविंदाग्रजांनी लोकमान्य टिळकांना उद्देशून ‘भारत वर्षाचा आशीर्वाद’ हे काव्य लिहिले होते . महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पोवाडा सदृश एक मोठी कविता ‘पानपतचा फटका’ लिहिली.हा सर्व काळ राजकीय स्थित्यंतराचा काळ होता. गडकरींचा त्यांचा उमेदीचा काळ टिळक युगाने भारलेला होता. त्यांची आणखी एक कविता महाराष्ट्राचे गौरवगान करणारी सुप्रसिद्ध आहे.

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ धृ. ॥

दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांचे घराणे उत्तर हिंदुस्थानातले होय. रजपूत व मराठे यांच्या पराक्रमाने भारून गेलेल्या तिवारींनी देशभक्ती आणि वीरशक्ती यांचा गौरव करणारी स्फूर्तीपर गीते लिहिली.‘काव्यकुसुमांजली’ व ‘काव्यरत्नमाला’ या स्फुट कविता. यांव्यतिरिक्त तिवारींनी ‘मराठ्यांची संग्राम गीते’ ‘मनोहरलीला’ ‘ऐतिहासिक खंडकाव्य’ ‘काव्यतुषार’, ‘चंडीशतक’ अशी विविध प्रकारची दीर्घकाव्येही लिहिली. शौर्य, वीर्य, स्वातंत्र्य अशा भावनांची उत्कटता त्यांच्या काव्यात अवतरते. त्यासाठी झुंजलेल्या वीरांचा त्यांना अभिमान वाटे. ‘झाशीची संग्रामदेवता’ या काव्यसंग्रहात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या पराक्रमाचे वर्णन येते. ‘मेरी झाँसी नही दूंगी’ या प्रतिज्ञेपासून तिच्या बलिदानापर्यंतच्या पराक्रमावर त्यांनी दहा कवने लिहिली आहेत.

कविवर्य बा. भ. बोरकर अत्यंत संवेदनशील. त्यांच्यावर देशातील अनेक घटनांचा प्रभाव पडला आणि तो त्यांच्या कवितेत दिसतो. त्यांना देशाबद्दल ज्वलंत अभिमान आहे आणि गुलामगिरीबद्दल चीड आहे ते कवितेत प्रतिबिंबीत होते. त्यांच्या ‘महाराष्ट्र गीत’ ‘भगवती स्वतंत्रतेस’, ‘स्वातंत्र्य लक्ष्मीस’, ’स्वातंत्र्याची सिंहगर्जना’ या कवितेत स्वातंत्र्याचा ध्यास दिसतो. त्याचप्रमाणे थोर हुतात्मे आणि महात्मेयांच्या बद्दल त्यांना वाटणारा आदर जाणवतो. सर्वस्वाचे बलिदान देणार्‍या वीरांना ते ‘तेथे कर माझे जुळती’ या कवितेत वंदन करतात.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

याच प्रमाणे कवि भा.रा.तांबे यांची कविता,

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ||

ही सर्वज्ञात आहेच. भा. रा. तांबे यांना पारतंत्र्याची अत्यंत चीड होती. इंग्रजी सत्तेविरूद्ध त्यांनी आपल्या कवितेतून आवाज उठवलेला दिसतो. घटोत्कच माया, तरुणाचे पाते, अर्जी ऐका हो सरकार, साम्राज्यवादि, मातृभूमीप्रत कोण रोधील? अशातून ती चीड व्यक्त होते.

नाशिकचे भूमीपुत्र कवी गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद- नाशिकचे भूमीपुत्र.

राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे!
धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे!
ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते!
हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!

अशा काव्यांतून स्वातंत्र्याची ललकारी देणारे, राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण करणारे आद्य कवी म्हणून कवी गोविंद ओळखले जातात. स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका वठविणाऱ्या सावरकरांच्या अभिनव भारत ऊर्फ मित्रमेळा संघटनेच्या कार्यात कवी व एक मुत्सद्दी म्हणून त्यांनी भूमिका निभावली होती.

राष्ट्रीय जाणिवेच्या कविता लिहिणारे आपल्या सर्वांना माहिती असणारे या कालखंडातील महत्वाचे कवी म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ‘श्रीमंत सवाई माधवरावाचा रंग’ ही त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी लिहिलेली पहिली कविता. बाजीप्रभू, तानाजी यांच्यावरील पोवाडे रचना त्यांनी केली. त्यांच्या कवितेचा गाभा हा राष्ट्रप्रेम किंवा देशभक्ती हाच होता. त्यांच्या कवितेने मनामनात देशभक्तीची प्रेरणा जागवली आहे. सागरास, सांत्वन, बेडी, पहिला हप्ता, चांदोबा चांदोबा भागलास का?, मूर्ति दुजी ती, माझे मृत्यूपत्र, आत्मबल, सायंघंटा अशा दर्जेदार काव्यरचना मराठी साहित्याला बहाल केल्या. मृत्युपत्रात तर ‘स्वातंत्र्य देवतेसाठी मरण म्हणजे जनन’ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या बरोबरच त्यांचे दोन्ही बंधू श्री. बाबाराव आणि श्री. गणेशराव सावरकर मित्रमेळ्यासाठी क्रांतिगीते लिहून तरुणांना स्फूर्ति देत होते. सावरकरांच्या कवितेत राष्ट्रीय जाणीव अत्यंत दिव्य आणि दाहक स्वरुपात दिसते.

याशिवाय माधव काटदरे, साने गुरुजी, आज्ञातवासी, कुसुमाग्रज, सेनापति बापट, माधव ज्युलियन, यशवंत, कवि अनिल, विंदा करंदीकर, वसंत बापट, कुंजविहारी, अमर शेख, आण्णा भाऊ साठे या कवींनी सुद्धा आपल्या कवितातून इंग्रजी राजवटीच्या विरोधात चीड, संताप व्यक्त केला. त्यातून राजकीय जागृती घडवून आणली. अशा कविता प्रसिद्ध होऊ लागताच इंग्रज सरकारने त्या जप्त करून नष्ट करायला सुरुवात केली. या कवितातून सत्याग्रह, असहकार अशा चळवळींना प्रेरणा मिळत असे. कवींनी आपल्याला पटलेले आणि भावलेले स्वातंत्र्य लढ्याच्या मार्गाचे वर्णन यातून केले आहे. या स्वातंत्र्य लढ्यामुळेच या कविता निर्माण झाल्या तशाच त्या या चळवळींना प्रेरणा देणार्‍या ठरत होत्या. यातून स्त्री शक्तीला ही जागृत करण्याचे काम होत होते. म्हणून हिंदुस्थानातील शूर स्त्रीयांचे वर्णन कवितेतून होत होते. स्वातंत्र्य मिळवण्याची भावना त्या वेळी प्रत्येकात होती त्यामुळेच आपापला योग्य वाटणारा मार्ग कवींनी काव्याच्या माध्यमातून मांडला. या राष्ट्रीय कविता आपल्याला स्वातंत्र्याचा इतिहास सांगतात.

© डॉ.नयना कासखेडीकर.


No comments:

Post a Comment