|| निर्गुण वारी अभंगमाला ||
(जन्म- १५३३ पैठण, मृत्यू- १५९९-पैठण,फाल्गुन
वद्य षष्ठी)
आई- रुक्मिणी , वडील- सूर्यनारायण.
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा….
समाधि
न ये ध्याना…
हरली भवचिंता ।।
`दत्त दत्त’ ऐसें
लागलें ध्यान। हारपले मन झाले उन्मन ।
`मी-तू’पणाची झाली बोळवण। एका जनार्दनीं
श्रीदत्तध्यान ।।
देवपूजा करताना किंवा गणेश उत्सवात आपण नेहमीच आरती
संग्रहातील पाच पैकी एक आरती दत्ताची म्हणतोच. उत्पत्ती, स्थिति आणि लय ही तीनही तत्व एकाच ठिकाणी असलेल्या दत्तदर्शनाचं हे वर्णन
केलं आहे नाथ महाराजांनी म्हणजे संत एकनाथांनी. असं म्हणतात श्री दत्तात्रेयांनी
एकनाथांना आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या
एकनाथांना हा अद्वैताचा अनुभव आला होता. या दत्तारतीमध्ये ते सर्व भाव प्रकट झाले
आहेतच, पण आता आपल्या सर्वांना माहिती असलेल्या त्यांच्या
रचना म्हणजे ओंकार स्वरूपा.. , वारियाने कुंडल हाले..., काया ही पांढरी..., गुरु परमात्मा परेशु..., नको वाजवू श्रीहरी मुरली रे ...., माझे माहेर
पंढरी...., रामनाम ज्याचे मुखी....,
रुपे सुंदर सावळा गे माये..., आणि खूप प्रसिद्ध असलेले विंचू
चावला... भारुड आणि सत्वर पाव ग मला..., दादला नको ग बाई ..., हे लोकगीत. या सर्वच रचना आपल्याला खूप आवडतात कारण त्या पटतात. त्यातले
भाव मनाला भिडतात. सगळ्या रचना गेय आहेत.श्रीकृष्णा च्या पदांमध्ये सुंदर, भावपुर्ण शब्दचित्र रंगवले आहे. अशा
अत्यंत विविध विषयांवर वाङ्गमय निर्मिती करून संत साहित्य परंपरा पुढे नेलेले संत
एकनाथ महाराष्ट्रातले एक श्रेष्ठ संत कवी. त्यांचा जन्म पैठणचा. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी शुद्धीकर, रुक्मिणी स्वयंवर या वाङ्गमयाचे निर्माता.
राम नाम ज्याचें मुखी ।
तो नर धन्य तिनी लोकीं ॥१॥
राम नाम वदता वाचें ।
ब्रह्म सुख तेथें नाचे ॥२॥
राम नामें वाजे टाळी ।
महादोषां होय होळी ॥३॥
एकनाथ लहान असतानाच त्यांचे आई,वडील निवर्तले. पुढे त्यांचा सांभाळ आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी
यांचे वडील म्हणजे सूर्योपासक संत भानुदास. ते कसे विठ्ठल भक्त होते, त्यांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायांनी नेलेली पंढरपूरची श्री विठुरायाची
मूर्ती पंढरीत परत आणली. हा इतिहास याच अभंगमालेतील संत भानुदास या लेखात पाहिला.
त्याच घरातले संत एकनाथ, एकनाथ तल्लख बुद्धीचे होते. आजोबांनी त्यांची मौंज करून दिली आणि नंतर त्याला शिक्षण
देण्यासाठी विद्वान पंडितांची नेमणूक केली. अध्ययन सुरू होते. ईश्वरभक्तीचे वेड
बालवयापासूनच त्यांना होते. समाजाला मार्गदर्शन करायचं तर त्या मार्गदर्शकला
ईश्वराची प्रचिती यायला हवी, नाहीतर नुसती पोपटपंची होईल असा
दृढ समज एकनाथांचा होता. पण त्यासाठी ईश्वरकृपा आवश्यक आहे आणि ती गुरूंशिवाय
मिळणार नाही. म्हणून अशा समर्थ गुरूंच्या शोधात एकनाथ होते. एकदा मंदिरात गेले
असताना याच विचारात ते चिंतन करत होते तेंव्हा, एका वृद्ध
गृहस्थाने त्यांना सांगितले की, “तुला आत्मज्ञान प्राप्त
करून घ्यायचं असेल तर, देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी
यांच्याकडे जा”. मग पैठणहून एकनाथ तहान-भूक विसरून पायी देवगिरीला पोहोचले.
वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी देवगिरी येथील जनार्दन
स्वामींकडे जाऊन शिष्यत्व घेतले. हा दिवस फाल्गुन वद्य षष्ठी होता. जनार्दन स्वामी
दत्तोपासक होते.सुरूवातीला हा मुलगा रुसून घरातून पळून आला आहे असे त्यांना वाटले
पण चौकशी केल्यानंतर एकनाथांनी संगितले की, “आपल्या चित्ताला अनुताप झाल्यामुळे आपण आलो आहोत”. त्यांच्याकडे सहा
वर्षे राहून संस्कृत शास्त्रे, पुराणे,
अमृतानुभव, ज्ञानेश्वरी सारखे आध्यात्मिक ग्रंथ अध्ययन आणि
योगाभ्यास केला. पुढे सात वर्षे तीर्थयात्रा केली. यावेळी काही दिवस गुरु जनार्दन
स्वामीही त्यांच्या बरोबर यात्रेस होते.
तीर्थ यात्रेनंतर
गुरूंच्या आदेशाप्रमाणे ते पैठणला येऊन गृहस्थाश्रमात राहिले. याच काळात आजी
आजोबांनी त्यांचा विवाह गिरीजा यांच्याशी लावून दिला. संसार सुरू झाला. त्यांचा
परमार्थिक दिनक्रम शिस्तबद्ध होता. संसारी जीवनातही मन ईश्वरमग्नच असे. सकाळी लवकर
उठून चिंतन, गोदावरी स्नान,
गीतेचे पारायण, जेवणानंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन, रात्री देवळात लोकांसमोर कीर्तन असा दिन क्रम असायचा. त्यांना गोदावरी
आणि गंगा या दोन मुली आणि हरिपंडित हा मुलगा होता. हरिपंडितने नंतर नाथांचे
शिष्यत्व पत्करले. याच हरीपंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी
पंढरपूर येथे नेण्याची सुरुवात केली.
तेराव्या शतकात
संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी जी भक्तिमार्गाची प्रतिष्ठापना केली होती ती
पुढच्या काळात यवनांच्या सत्तेत क्षीण झाली होती, त्याचे पुनरुज्जीवन संत एकनाथांनी केले. मध्ये अडीचशे वर्षांचा काळ गेला.
भक्तीपंथाची त्यांनी शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली असे म्हणतात. संत
ज्ञानेश्वरांची समाधी अडीचशे वर्षांनंतर लोकांच्या विस्मरणात गेली होती ती
एकनाथांनी शोधून काढली, १५८३ मध्ये समाधीचा चौथरा आणि गाभारा
एकनाथांनी बांधून जीर्णोद्धार केला. आळंदीची वारी पुन्हा सुरू केली. १५८४ मध्ये ज्ञानेश्वरीची
संहिता शुद्ध केली आणि ती शुद्ध प्रत लोकांना दिली. म्हणूनच त्यांना मराठी भाषेतले
पहिले संपादक म्हटले जाते. लोकोद्धारासाठी त्यांनी लेखणी हाती घेतली आणि
लोकभाषेतून, बोली भाषेतून भारुड, अभंग, स्फुटे लिहिली. दोनशे पेक्षा जास्त हिन्दी भाषेत त्यांनी रचना लिहिल्या. अंधश्रद्धा
आणि जातीयतेच्या विरोधात त्यांनी लिहिले आणि प्रत्यक्ष जीवनही जगले. स्वधर्म, स्वराज्य आणि स्वराष्ट्र याविषयी समाज
अज्ञानी होता. समाज सुधारण्यासाठी एकनाथांनी जगदंबेला सद घातली ‘बये दार उघड..’
म्हणत, रूढी आणि परंपरांवर भारुडातून प्रहार केले. सामान्य
लोकांना ज्ञानाच्या मार्गापेक्षा भक्तिमार्ग सोपा आहे,
मोक्षासाठी तो पुरेसा आहे असे त्त्यांनी सांगितले आहे.
चतु:श्लोकी भागवत ही नाथांची पहिली रचना. भागवत पुराणाच्या
नवव्या अध्यायातील श्लोकांवरील हे भाष्य १०३६ ओव्यांचे आहे. आध्यात्मिक
स्वरुपाच्या स्फुटात हस्तामलक वरील ६७४ ओव्यांची रसाळ टीका ,शुकाष्टक हे
संस्कृत अष्टका वरील ४४७ ओव्यांचे विवरण, ४० हजार ओव्यांचे
भावार्थ रामायण लिहिले त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. लघु गीता ,स्वात्म बोध, हरिपाठ, एकनाथी
भागवत, ही एकनाथांची सर्वश्रेष्ठ रचना मनाली जाते. हे
चिरंजीवी पद, आनंदलहरी, अनुभवानंद ,अभंग, गौळणी, भारुडे त्यांनी
लोइहिले . रुक्मिणी स्वयंवर हे भागवत संप्रदायातील पहिले आणि पारंपरिक आख्यान
समजले जाते. भावार्थ रामायण मध्ये त्यांनी बाल अयोध्या,
अरण्य, किष्किंधा, सुंदर ही कांडे
लिहिली आहेत. सहावे युद्ध कांड
अर्धवट लिहून झाले. कारण त्यांनी यावेळीच आपण समाधी घेणार असल्याचे जाहीर केले.
यावरील एक प्रसंग आहे, गावोबा हा गोदाकाठच्या कुलकर्ण्यांचा मुलगा. पुरणपोळी आवडते म्हणून रोज
त्यासाठी आईकडे हट्ट करणारा. परिस्थितीमुळे रोज पुरण पोळी देणं शक्य नसल्याने, आईने त्याला नाथांकडे पाठवले आणि हरिपंडिताप्रमाणे यालाही आपण सांभाळावे
असे गिरीजा बाई आणि नाथांना सांगितले. गावोबास आता रोज पुरण पोळी मिळू लागली. तिथे
पडेल ते काम तो करत असे. थोडासा वेडसर होता. पण रोज नाथांचे कीर्तन ऐकायचा. नाथांनी
त्याला मंत्रोपदेश दिला तेंव्हा तो म्हणाला मी ‘एकनाथ’ या शब्दाशिवाय दुसरा मंत्र म्हणणार नाही. आणि जेंव्हा भावार्थ
रामायणाच्या युद्धकांडाचा ४५वा भाग पूर्ण होण्याधीच नाथांनी समधीचा निर्णय जाहीर
केला, तेंव्हा ते लिहिणार्या एका रामायण कर्त्याने त्यांना
अकरा दिवस मागितले होते. तेंव्हा नाथांनी मरण अकरा दिवस लांबवले होते आणि सांगितले
की मी जरी नसलो तरी राहिलेले रामायण गावोबा पूर्ण करेल. नाथांनी विनोदच केला असे
वाटून लोक हसले. पण नाथ जे बोलतात ते खरे होतेच. नाथांनी गावोबाच्या मस्तकावर हात
ठेवला आणि आश्चर्य म्हणजे गावोबाने नाथांसमोरच ४५ वा अध्याय लिहून काढला. हे लिखाण
नाथांचे कोणते आणि गावोबाचे कोणते हा फरक सुद्धा लक्षात येत नाही. असे अनेक प्रसंग
चरित्रात दिले आहेत.
याशिवाय त्यांनी बहुजन लोकांसाठी पुराणकथा लिहिल्या, त्यात तुळशी माहात्म्य, सीता मंदोदरीची एकात्मता, हळदुली आणि कृष्णदान या श्रीकृष्ण कथा, ध्रुव, प्रल्हाद, उपमन्यु, सुदामा
यांची नाट्यमय लघु चरित्र कथा, संतांच्या संक्षिप्त जीवनकथा
लिहिल्या. १२५ विषयांवर त्यांनी जवळजवळ ३०० भारुडे लिहिली आहेत. त्यांच्या अभंगाचे
विषय गुरुभक्ती, परमार्थ, सामाजिकता
असे आहेत. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा होती. एका जनार्दन म्हणून स्वत:चा ते
उल्लेख करीत.
औरंगाबाद /संभाजीनगर जिल्ह्यात पैठण येथे नाथषष्ठीचा सोहळा
म्हणजे महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाची यात्रा समजली जाते. पंढरपूर च्या
खालोखाल इथे भाविक येतात. मोठा उत्सव होतो. पैठण हे दक्षिण काशी म्हणून ओळखले
जाते.
एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की
साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी
आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या
गाभाऱ्याध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. नाथषष्ठीचा इतिहास आहे. फाल्गुन
वद्य षष्ठीला पाच घटना घडल्या होत्या। नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी
उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी
म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.
संत एकनाथांच्या काही रचना
काम क्रोध लोभ
दंभ मद मत्सर
षड् वैरी तत्पर हे चि येथें,
क्षुधा तृषा मोह शोक जरा मरण
षड् ऊर्मि पूर्ण देही हे चि
आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा वासना
हे अठरा गुण जाणा देहामाजीं
एका जनार्दनी त्यजुनि अठरा
तो चि संसारामाजीं शुध्द
भावार्थ:
अनिवार वासना, रागीटपणा, हवरटपणा, दांभिकपणा,गर्विष्टपणा,
मत्सर हे माणसाचे सहा शत्रू असून ते माणसाचा विनाश करण्यासाठीं
अत्यंत तत्पर असतात. भूक, तहान, मोह,
शोक, वार्धक्य या सहा माणसाच्या नैसर्गिक
ऊर्मी आहेत. आशा (भविष्य -कालीन ईच्छा) मानसिक ईच्छा, कल्पना,
शारिरीक वासना, अनावर ओढ असे अठरा मानवी
देहाचे गुण आहेत असे समजावें या अठरा गुणांचा त्याग करणारा या जगांत शुध्द,
सात्विक समजला जातो असे एका जनार्दनी या भजनांत स्पष्ट करतात.
उदार धीर
-निधि । श्रीविठ्ठल -नाम आधीं
पतित-पावन सिध्दि ।श्रीविठ्ठल - नाम आधीं
सुख-सागर-निधि ।श्रीविठ्ठल -नाम आधीं
एका जनार्दनी बुध्दि । श्रीविठ्ठल-नाम आधीं
भावार्थ:
जो औदार्य व धैर्य यांचा ठेवा आहे अशा विठ्ठलाचे नामस्मरण आधी
करावे.ज्याच्याकडे पतितांना पावन करणारी सिध्दि आहे अशा विठ्ठलाला आधीं
स्मरावें.जो सुख देणारा सागरनिधी आहे अशा विठ्ठलाचे नाम आधीं जपावे.एका जनार्दनी
म्हणतात,विठ्ठलनामस्मरण करण्याची बुद्धी सद्गुरूंकडे
मागावी.
हरिपाठ
आवडीनें भावें
हरि-नाम घेसी। तुझी चिंता त्यासी सर्व आहे
नको खेद धरूं कोणत्या गोष्टीचा। पति तो लक्ष्मीचा जाणतसे
सकळ जीवांचा करितां सांभाळ। तुज मोकलील ऐसें नाहीं
जैसी स्थिति आहे तैशा परि राहे। कौतुक तूं पाहें संचिताचें
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा। हरि-कृपें त्याचा नाश झाला
भावार्थ:
लक्ष्मीचा पति सर्व जीवांचे पालन-पोषण, सांभाळ करणारा व सर्वांची चिंता करणारा आहे,सर्व
कांही जाणणारा आहे. या परमेश्वरी शक्तिवर विश्वास ठेवून ज्या परिस्थितीत आहे तिचा
स्विकार करावा व भविष्यात जे घडेल त्याचा संचित म्हणून अंगिकार करावा.या घटना
आपल्या प्रारब्धाचा भोग आहेत असे मानावे.कोणत्याही गोष्टीचा खेद न करता मनापासून
हरिचे नामस्मरण करावे.त्यामुळे हरिकृपा होऊन प्रारब्धातील दु:खांचा नाश होईल असे
एका जनार्दन सांगतात.
|| जय
जय रामकृष्ण हरी ||
---------------------------------------------
No comments:
Post a Comment