|| निर्गुण वारी अभंगमाला ||
(१६९८-साखरखेर्डा,१७५३–पैठण)
आई –उमा ,वडील- शंकर
श्रीहरी संकीर्तनाचे तत्व सांगून अमृतराय
यांनी असंख्य लोकांना भक्तिमार्गाला लावले. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे
सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी ते काव्यातून मांडले.सामाजिक परिस्थितीत परिवर्तन
होत जाते तस तसे साहित्य संस्कृतीतही बादल होत जातो. नवे प्रवाह येतात तसेच, अमृतराय यांनी ही नवा प्रकार कटाव,चुर्णिका, पदे लिहिली. लोकांमध्ये भगवत भक्तीकडे ओढ
निर्माण केली. मराठी, हिन्दी, फारसी, उर्दू, संस्कृत, कानडी या
भाषांमध्ये त्यांनी प्रासादिक रचना लिहिल्या.अनुप्रास, उत्प्रेक्षा
अशा अलंकारांनी युक्त असलेल्या रचना ठेक्यावर म्हणता येऊ लागली आणि त्या लोकांना
आवडू लागल्या. त्यांचे गुरु मध्वनाथ यांनीच त्यांना ईश्वर भक्तीकडे वळविले. अमृतराय
यांनी या विषयावर सुरस आख्याने आणि सुंदर पदे रचली.
ते
लहानपणापासूनच ऐश्वर्यासंपन्न होते. कुलकर्णी पद त्यांच्या कडे होते. वयाच्या
अकराव्या वर्षीच त्यांनी कटिबंध रचना करून ईश्वराला सादर केली.आणि हरिकथा निरूपणास
प्रारंभ केला. आचार्य अंबिका सरस्वती यांच्या कडून अमृतराय यांनी वेदान्त,तत्वज्ञान, शास्त्र,पुराणं आणि भागवत यांचा अभ्यास केला. शिवाय लहनपानापासून वडिलांच्या बरोबर
झालेला प्रवास, संत ,सत्पुरुष आणि
विद्वानांच्या भेटी व सहवास होऊन ते अधिक ज्ञानसंपन्न होत होते. ऐश्वर्य,भाषा प्रावीण्य, पांडित्य, विद्वत्ता, शीघ्र कवित्व, भव्य शरीर यष्टी आणि अजानबाहू ,आकर्षक व्यक्तिमत्व असे अमृतराय यांचे वर्णन ग्रंथात दिले आहे. अमृतराय
त्यांचे आई वडील निवर्तल्यानंतर ते साखरखेर्डा सोडून औरंगाबाद येथे राहण्यास आले.
दिवसभर काम आणि रात्री खडकेश्वर महादेवाजवळ कीर्तन असा दिनक्रम सुरू होता. मध्वमुनी
एकदा या कीर्तनास आले. कीर्तन झाल्यावर त्यांनी नाव विचारले,
तसे त्यांनी ‘अमृत’ नाव सांगितले. त्यावर
मध्वनाथ म्हणाले, “अहाहा,नाव किती
सुंदर ! त्याच प्रमाणे वाणीही किती गोड आहे. या अमृतने अमृतमय वाणीचा उपयोग अमृतासारखा
केल्यास बाळ, तुझा आणि बहुजन समाजाचा उद्धार होईल”. हे ऐकताच
अमृतराय यांचा विवेक जागा झाला. हा गुरु शिष्य संवाद ५२ प्रश्नोत्तरांचा आहे. यानंतर
त्यांनी मध्वमुनीश्वरांचे शिष्यत्व पत्करले. त्यांचा गुरुपदेश काव्यरूपात
सांगितला.
कटाव या वृत्तात गणेश स्तुति अमृतराय यांनी
बांधली आहे. त्यांच्या मूळ आवाजात ती आहे.
अमृतराय यांची
भाषा साधी, सोपी, सरस आणि परिपक्व होती. त्यांची हिन्दी भाषा सुद्धा चांगली होती. त्यांनी
त्यात कवने लिहिली आहेत. या काव्यात भक्तिरस, वैरागी आणि
प्रसंगी शृंगार रस सुद्धा आहे, त्यांची काव्ये म्हणजे , १
गणपतिवर्णन, २
जगदंबा वर्णन, ३ ध्रुवचरित्र. ४ शुकचरित्र,
५ सुदाम-चरित्र, ६ नारदी, ७ कृष्णचरित्र, ८ द्रौपदीवस्त्रहरण, ९ रामचंद्रवर्णन, १० कृष्णवर्णन, ११ राधावर्णन, १२ कृष्णध्यान, १३
मृत्तिाकाभक्षण, १४ वत्सला-हरण, १५
रासक्रिडा, १६ कुंजवन विहार, १७
कृष्ण-लीला, १८ चंद्रावळी, १९
दुर्वासयात्रा, २० पारिजात-काख्यान, २१
जीवदशावर्णन, २२ उपदेश, २३ पूतनावध,
इत्यादि .
सुदाम चरित्रात कृष्णाच्या अपरिमित ऐश्वर्याचे अप्रतिम
वर्णन त्यांनी केले आहे. द्रौपदी वस्त्रहरणात अनेक वस्त्रांची आणि त्यासाठी
प्रसिद्ध असलेल्या पेठांची नावे ,भोजनातील पदार्थ,
रासक्रीडेतील राग रागिण्या पाहून अनुभवता
येते. त्यांची कविता कटावबद्ध असल्याने ते वर्णन साजेसे ठरते. कविवर्य मोरोपंतानी सन्मणिमालेंत म्हटले आहे,
'' कीर्तनसुखार्य
झाला अवतारचि अमृतराय जीवाचा ।'' कीर्तनकार आपल्या कीर्तनात
रंग भरण्यास अमृत राय यांचा कटाव वापरतात.
त्यांनी लिहिलेले हे
शुक्रचरित्रांतील
वसंतवर्णन :—
वसंत
संतत सुलता प्रसवी, कंदर्पाची सत्ता बसवी,
समीर
दर्पहि वायु सूचवी, पुष्प वाटिका रम्य नेटका,
टाकंटीका
विस्तीर्ण चेटका, वस्ति खेटका,
मंत्रें
समान सूत्रें साधुनि, कळा कूसरि,
निबीड
दूरी शतिळ छाई, विकसित
जाई जुई शेवंती,
चमेलीचंपा-गंधमालिती, मंदाराच्या सगळ्या पंक्ती,
कोरांटी
बहु रंग रंगिती, आराटीची
नाहीं जाती,
फुलें
मोगरे पिंवळी जाती, गोकर्णी गोकर्ण आकृती,
एक
सुकृतीं तुळशी नवती, जैसे चेंडू फुलले झेंडू,
गेंद
शेंदरे लोक आदरे कानिं खोविती,
तुरे लाविती,
घट्ट
फुलांचे बट्ट मोगरे, द्वार पांगरे,
निंद्य
कळीचे कळवळती, भळभळीत
फुलले,
मल्लिकांच्या
दीर्घवल्लिका, कळिका
फुलल्या,
अपार
तेथें पारिजात, जळिं
बारिजात, कर तरंगते,.... हे सुंदर असे
निसर्गातल्या वसंत ऋतूचे वर्णन फार मोहक वाटते.
तर सुदाम चरित्राचे वर्णन असे आहे की, त्यातून
आपल्याला पदार्थ कळतात,विशेषणे समजतात. भाज्या कळतात आणि
त्याकाळातली संस्कृती कळते.
' मांडुनि स्वस्तिक सुवर्ण पाट, अडणीवर सोन्याचें ताट,
भंवता फल शाखांचा थाट, कांठीं वरण पिंवळें दाट,
मीट मिरें वरि आलें लिंबू, तुतिया खोबरें,
किसून कोशिंबीर सुंदर, आम्ल रायतें, रुचिर आयतें कोमळ अंगीं, सगळीं वांगीं, शुभ्र कारलीं, मेथी, पोथी वोथी
केळें, कोथिंबीर हळदीसह काथी ताथी साथी चरुसह चाकवत चुका,
चवळ पिवळी, कवळया शेंगा, चिमकुरा दळ चिरुनी, चांगली चमचमीत फोडणी देउनि
चरारित चारोळीं सांभारें, मउ चिमणी बोंडें , चिंचपान चिंचोळीं तोंडें, कोहळा काशीफळें, कांकडि कुहिरिया, कमळकंद कोंवळी काचरी, दूध भोपळे, दिव्य दोडके, दाळ
दिंड शेवाळ वाळकें, शेंगा सुरण अरुवार परवरें, पडवळी तोंडली, कोंडली कंदमूळ फळ फूल पत्र तरु वेलमाल
घृतपाचिक शाका, वडे नसति वावडे, सार
आवडे, तिखट तिळवडे सारबिज वडे, सहित
पापडे, कथिक वडे, आणिक कोरवडे, शिर्या-सगटगट पुर्या, बर्या गुरवळया, काचोर्या सांजोर्या, मालत्या बोटवे, शुभ्र देटवे, सायसहित शेवाया, शर्करा
पायस लुचया, मांडे पांडुरवर्ण पूर्ण पोळिया, घृतें घोळिल्या द्विजें गिळिल्या, दुरडी भरूनि
धिरडीं, भाजुक साजुक नाजुक राजसवाणे, कानवल्यासी
मानवले, साखरफेण्या घिवर घारगे, मोतीचूर
जिलेबी दळिया, बारिक ओदन दे अनुमोदन, घमघमाट
तो अमोद न राहे, भात केशरी परम कूसरी, दहीं
दूध धृत मधु साखर, निंबू घन राब चांबभर पन्हें फुटांचे,
मठ्ठा मिठ्ठा, मटमटा बहु मधुर लापसी, लोणकडें थिजलें गाईचें तूप मधूर सुवासिक महा चंगाळ, थोर
घंगाळ, वाटीभर एकएक घरींचें, सोळा हजार
पदार्थ आले निजभाग्यें भोजनीं, अन्न ब्रह्मरसानुभवानें विप्र
जेविला....
अशासारखी त्यांनी चरित्रे लिहिलीत, आख्यानपर कविता
लिहिल्या आहेत. स्फुट, काव्य रचना आणि काही पदे रचली आहेत.
त्यांच्या कटाव रचना प्रासादिक आहेत. जेंव्हा विठ्ठल भक्तांना विठोबा माऊलीचे
दर्शन होते तेंव्हा ते खूप आनंदित होतात. असा आनंद सर्वांनाच होतो असे नाही.
ज्ञानेश्वर यावर म्हणतात की, “ज्यांची पूर्व जन्माची पुण्याई
असेल तरच त्यांच्यात ईश्वराची आवड उत्पन्न होते, म्हणजे
ज्यांनी नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली
असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होईल”. त्याप्रमाणेच ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांनी विठ्ठल भेटल्याचा अनुभव
घेतला आहे तसेच अमृतराय यांनीही हा अनुभव घेतला. ते यावरच म्हणतात की,
अजि मी ब्रह्म पाहिले
अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी
कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले....
जयजयवंती रागातील हा अभंग आशा भोसले यांनी अजरामर करून
ठेवला आहे. याशिवाय सर्वांना माहिती असलेली रचना म्हणजे,
भक्ताचीया काजासाठी, साधुचिया प्रेमासाठी, सोडली मी लाज रे ||
जोत्स्ना भोळे
यांनी गायलेली अमृतराय यांची ही रचना आपण नेहमी ऐकतो.
असेच अमृतराय यांची कटाव वृत्तामधली ‘गणेश स्तुती’ अतिशय सुंदर आहे . कटाव वृत्त म्हणजे आताच्या रॅप
संगीताजवळ जाणारा प्रकार आहे तो गाण्यासाठी अवघड समजला जातो. वैशिष्ट्य पूर्ण लय
आणि ताल असणारी रचना –डॉ.अशोक रानडे यांचं निरूपण असलेले समूहस्वरातील गीत ऐकण्यासारखे आहे .
आनंदे वंदावा गणनायक तो
मंगलदायक
रुंड
मथन करि जननी जनक निज रुंड मालधर
अमल कुंड तो तृतिय नयन परि तनय
विनय
विभु वक्रतुंड निज धुंडिराज करि
शुंड सरळ मुनी
धुंडिती जनी वनी झुंडनिकाबहु
विकट तुंड गण
पुंडरीक मणी हार प्रलंबित
कुंडतीश कटिबंध तनुद्भव पुंड दमन मणी कुंडल
श्रुतीयुगी गंडस्थळी अळी चंद्रखंडरघर
गुणगण मंडित
किर्ती अखंडित खंड दुरित चय
पंडित गामिनी
तांडव करि जो पदमभवांडी
मंडलाकृती चंड पराक्रम
विदण्ड खंडन विपक्ष दंडन
स्वभक्त मंडन सुखात मुनिवर
सकल चराचर पावन करीनिज प्रसाद
देवून पुरवी मनोरथ
विघ्नविनाशक तो.. विघ्नविनाशक
तो.. विघ्नविनाशक तो..
परम कृपालय भालविलस दली मालदान रसपान करिती
कलीकाल कापती परनिर्दाळण करित
समरी जो
पालन करि सुर चालक त्रिभुवनी शंभुबाल भवजाल तेच जंजाळ
कटन कर वाल स्मरण ते सप्तताल
करि
नृत्य सरस तो झुणझुणझुणझुण
प्रणित नुपुरे खुळखुळखुळखुळ
वाले वाकी पदी फुंफुंफु करि
नागबंध कटि
लळलळलळलळ ललित कुंडले चपचपचपचप न्यस्त पाऊले
किणीकिणीकिणीकिणी क्षुद्र
घंटिका दणदणदणदण
उठति गुंजरव गुंगुंगुंगुं भ्रमर गुंजति खणखणखणखण ताल वाजती
धिक धिक धिलांग मृदूंग रवमृदु
धिमिधिमिधिमिधिमि किट थथथथ
थरीकिट थरीकिट सा रे ग म सा रे
ग म प ध नि .. नि ध प म ग रे सा
सप्तस्वर मुखी भेद आलापित
स्वर वर्तुनिया वेष्टन संगीत तननम तननम राग रागिणी धृपद त्रिवट गती
गद्य पद्य विभुरुद्य सद्य करि
प्रबंध निबंध जगतल लगबग विसरुनी तटस्थ मौन्य मुद्रा पुरवी
सादर समुदायसवे आयकतो....
या लिंक वर जरूर ऐकावी -- https://www.youtube.com/watch?v=OollbxSYo9Q
दामाजी पंतांच्या
रसद मध्ये, धन्य
श्रीगुरू अमृतराय| वंदावे पाय ब्रम्हगिरी हरी चरणी |तत्पर जैसे पाडस त्या हरिणीचे |असा आपल्या गुरूंचा
उल्लेख केला आहे. त्यांनी आपले अवतार कार्य इ.स. १७५३ मध्ये जलसमाधी घेऊन संपविले.
महाराज समाधीस्त होणार म्हणून चैत्र शुद्ध षष्ठीला पंचक्रोशीतले सर्व लोक पैठणला
गोदावरीच्या काठी तीर्थावर जमले.संतांच्या भजनाने आसमंत दुमदुमला. लोकांनी साश्रू
नयनांनी, ‘तुम्ही आम्हाला सोडून असे
जाऊ नका’ म्हणून विनवणी केली. आशीर्वादाची मागणी केली.
तेंव्हा अमृतराय यांनी काव्यरूपी आशीर्वाद दिले की,
तुम चिरंजीव कल्याण रहो,
हरिकथा सुरस पियो |
हरिकीर्तन के साथी सजन |
बहुत बरस जिओ |
चैत्र शुद्ध षष्ठीलाच
अमृतराय यांच्या जीवनात जन्म, उपनयन, गुरुपदेश ,रामकृष्ण दर्शन,चतुर्थाश्रम
स्वीकार आणि जलसमाधी या महत्वाच्या घटना घडल्या. या षष्ठींना अमृत षष्ठी म्हणतात. अमृतषष्ठी
दरवर्षी साजरी होते.
|| जय जय
रामकृष्ण हरी ||
(फोटो व संदर्भ इंटरनेट वरुन साभार परत.)
© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे
-----------------------------------
No comments:
Post a Comment