|| निर्गुण वारी अभंगमाला ||
(१६०८ –जांब ते १६८२- सज्जनगड)
आई-राणू बाई , वडील- सूर्याजीपंत.
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची |
नुरवी: पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची ॥१॥....
भक्तांचे दु:ख हरण करणारा भक्ताला सुख प्राप्त करून देणारा
बुद्धी आणि ज्ञानाची देवता ,भारतवर्षाचं आराध्य दैवत असलेल्या गणपती
बाप्पाचं मनोहर वर्णन करणारी ही आरती, जी घराघरात लहान
मोठ्यांच्या तोंडी असणारी, रोज पूजापाठा मध्ये म्हटली जाणारी
आरती, समर्थ रामदासांनी लिहीली आहे. अष्टविनायकातील एक
विनायक म्हणजे मोरगावचा मयूरेश्वर. ही मूर्ति बघून त्यांना ही आरती सुचली. म्हणजे
लिहिण्याची प्रेरणा मिळाली. सामान्य लोकांना समजेल अशा मराठीत ही लिहिली गेली आहे.
लहानपणापासूनच
सूर्याची आणि रामाची उपासना ते करत असत. वयाच्या पाचव्या वर्षी मौंजिबंधनानंतर
तीव्र मेधाशक्तीमुळे त्यांचे प्राथमिक अध्ययन लवकर पूर्ण झाले. मग त्यांनी
सूर्यनमस्कार, मल्लविद्या याचा अभ्यास केला आणि शरीर सामर्थ्य मिळवलं.
सवंगड्यांबरोबर रमण्यात त्यांना रस असे, पाण्यात डुंबणे, एकांतात बसणे, झाडावर चढणे. रानावनात हिंडणे असे
छंद त्यांना होते. त्यांच्या आईला हे आवडत नसे .एकदा आई त्यांना रागावली आणि
म्हणाली, “नारोबा पुरूषांना संसाराची काहीतरी काळजी पाहिजे”.
हे ऐकून नारायण रुसून अडगळीच्या खोलीत जाऊन बसला आणि चिंतनात मग्न झाला. शोधाशोध
झाल्यावर आईला नारायण, या खोलीत असल्याचे दिसले. त्या
म्हणल्या नारोबा इथे अंधारात काय करतोस? नारायणाचे उत्तर
होते, “आई चिंता करितो विश्वाची”. लहान वयातच ज्येष्ठ बंधू
अनुग्रह देत नाही म्हणून, नारायणाने रुसून मारुति मंदिरात
जाऊन अनुष्ठान केले आणि प्रभू रामचंद्रांकडून त्यांना अनुग्रह मिळाल्याचे चरित्रात
म्हटले जाते. अनुग्रह घेतल्यानंतर सुरू झाला त्यांचा एकांतवास आणि मौन. शेवटी आईने
लग्न ठरविले अगदी बारा वर्षांचे असताना. नारायणाकडून वचन घ्रेतले की बोहोल्यावर चढेन.
लग्न मुहूर्तावर, अंतरपाट धरला गेला, ‘शुभमंगल सावधान!’ म्हटलं आणि सावधान झालेला
नारायण प्रपंच करण्यापासून खरच सावधान झाला, मंडपातून पळाला, नंतर नाशिकच्या टाकळी येथे गेला. आई, भाऊ आणि घराचा
त्याग करून या वयात तो तपश्चर्येचे ध्येय पूर्ण करायला लग्नमंडपातून पळाला. कशाकारता
तर, जगाच्या उद्धाराकरता !
तिथल्या गुहेत राहून आता फक्त तपश्चर्या, स्नान संध्या, नित्यकर्मे, कंबरे एहढया पाण्यात उभे राहून, ‘श्रीराम जयराम जयजय राम’ हा मंत्रोच्चार, नंतर
मधुकरी मागून आणून जेवण, विश्रांति,
दुपारी ग्रंथ अभ्यास, कीर्तन -पुराण ऐकणे, वाल्मिकी रामायण लिहिणे, नामस्मरण असे सतत बारा
वर्षे चालू होते. केव्हढा हा निग्रह होता? तेही लहान वयात.
इथेच समर्थांनी,
‘अनुदिनी अनुतापे तापलो रामराया,
परम दीनदयाळस नीरसीं मोहमाया
अचपल मन माझे नावरें आवरीतां
तुजविण शिण होतो धाव रे धाव आता ||
हे करुणाष्टक लिहिलं. यात त्यांची भगवंतविषयी असलेली अं:तकरणातली
करुणा, स्तोत्र रूपात आहे. असे म्हणतात की, करुणाष्टके म्हणजे समर्थांचेच आत्मचरित्र आहे. यात त्यांचा स्वताशीच साधलेला
संवाद पण दिसतो. त्यांनी लिहिलेले श्रीमद दासबोध, आत्मराम
आणि मनाचे श्लोक हे समर्थ संप्रदायचे महत्वाचे ग्रंथ समजले जातात. जवळ जवळ
चाळीस हजार ओवीसंख्या भरेल एव्हढे काव्य समर्थांनी केले आहे. मनाचे श्लोक, पदे आरत्या, लिहिल्या. सगळ्याच संतांना भगवंताच्या
भेटीची ओढ लागलेली दिसते त्याच प्रमाणे समर्थांनी सुद्धा ही विरह वेदना काव्यातून
मांडली आहे. या खडतर तपश्चर्येबरोबर समाजाकडून त्रास सहन करावा लागला. लोकांच्या निंदेला सामोरे
जावे लागले.
अन्न नाही वस्त्र नाही | सौख्य नाही जनामध्ये
आश्रयो पाहता नाही
| बुद्धि दे रघुनायका
संसारी श्लाघ्यता नाही | सर्वही लोक हासती
यातून त्यांचा होत असलेला कोंडमारा व्यक्त होतो. अशा
अवस्थेत बारा वर्ष तपश्चर्या पूर्ण झाली ,
सदा सर्वदा योग तुझा घडवा , तुझे कारणी देह माझा पडावा |
नुपेक्षि कदा गुणवंता अनंता रघुनायका मागणे हीची आता |
नको द्रव्य दारा नको येरझारा नको मानसी ज्ञान गर्वे
फुगारा|
सगुणा माझा लाविरे भक्तिपंथा रघुनायका मागणे हेची आता
||
या करुणाष्टकतील ओळीतून समर्थांच्या मन:स्थितीची
कल्पना आपल्याला येते.
टाकळीच्या तपश्चर्येनंतर आता ते बारा वर्षे तीर्थाटनास
गेले. त्यात त्यांनी भारत भ्रमण केले. कश्मीर ते कन्याकुमारी व द्वारका ते जगन्नाथ
पुरी अशा चारही दिशांना ते फिरले. काशी, प्रयाग, गया, अयोध्या, श्रीनगर, बद्रीनारायण, केदारनाथ, पंजाब, मानस सरोवर, तिकडे दक्षिणेतली तीर्थे सगळीकडे
हिंडले, ते अनुभवा वरून याबद्दल म्हणतात,
नाना तीर्थे थोरथोरे । सृष्टीमधे अपारे । सुगमे दुर्गमे दुष्करे ।
पुण्यदायके ॥
ऐसी
तीर्थे सर्वही करी । ऐसा कोण रे संसारी । फिरो जाता जन्मवरी । आयुष्य पुरेना ॥
या काळात त्यांनी समाजाचे निरीक्षण केले. संत महंतांना
भेटले. वेगवेगळ्या उपासना पद्धतीचे परीक्षण केले. त्यांच्या तेजस्वी
व्यक्तिमत्वाने लोक प्रभावित व्हायचे. तीर्थाटनामुळे त्यांच्या लक्षात आलं की, पारतंत्र्य
आणि अत्याचारा मुळे भारतीय समाज अत्यंत दीन झाला आहे. त्यांचा आत्मविश्वास गेला
आहे. शक्ति संघटित नाही याचे चिंतन सतत ते करत होते. कारण विश्वाची चिंता निवारायलाच
ते घराबाहेर पडले होते. घर सोडून तपश्चर्येला गेल्यापासून चोवीस वर्षानी ते परत
घरी जांब येथे आईला भेटायला आले, राणुबाईंना खूप आनंद झाला. पण
काय, भेट घेऊन लगेच थोड्याच दिवसात नारायण निघाला.
आता पुढच्या
कार्यासाठी शांत असा कृष्णाकाठाचा प्रदेश त्याने निवडला होता. महाबळेश्वर, कराड, मिरज, कोल्हापूर, येथे
त्यांचे शिष्य तयार झाले. वेण्णास्वामी, कल्याण स्वामी, दत्तात्रेयस्वामी, अक्काबाई,
भीमस्वामी, सतीबाई हे इथलेच शिष्य गण . हनुमान उपासना आणि
रामोपासना सुरूच होती. पुढे मसूर येथे रामनवमी उत्सव चालू केला. पुढे १६४८ मध्ये चाफळ
येथे राममंदिर बांधले. तिथेही उत्सव सुरू झाला. फिरताना ते ठिकठिकाच्या
संप्रदायाच्या संतांची भेट घेत होते. त्यामुळे सांप्रदायिक सद्भाव निर्माण होत
होता. ‘बहुत लोक मेळवावे, येक
विचारे भरावे’ या
सूत्राने त्यांचे कार्य चालू होते. शिष्य गोळा करून त्यांच्यावर संस्कार करण्याचं, त्यांना शिकवण्याचं काम समर्थांनी केलं. शिष्यांना साक्षर केलं.
त्यांच्या कडून ग्रंथ लिहून घेतले. त्यांच्यातले काही प्रवचनकार व कीर्तनकार तयार
केले. धर्माला आलेली अवकळा दूर करणे हा
त्यांचा या मागील हेतु होता. समर्थ संप्रदायतल्या अध्यायनातला काही भाग आजही धुळे
येथील वाग्देवता मंदिरात पाहायला मिळतो. हस्तलिखिते तंजावरच्या सरस्वती महालात
पाहायला मिळतात. यात ज्योतिषशास्त्र,खगोलशास्त्र, गणित, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र
हे ग्रंथ आहेत.त्यांच्या शिष्यांनी केलेल्या तुकाराम महाराजांच्या समग्र गाथेच्या
३५० नकला उपलब्ध आहेत. वेण्णा बाईनीच २०० नकला लिहिल्या होत्या. हे शिष्य
वेगवेगळ्या संतांचा अभ्यास करत असत.
समर्थांचे चिंतन वेगवेगळ्या विषयांवर होते. अभ्यास होता.
समर्थ फार मोठे संगीताचे जाणकार होते असा दाखला ग्रंथात दिला गेला आहे. गायनी
कलेचे स्तवन त्यांनी केले आहे. कीर्तनकारांसाठी त्यांनी पावक, गौडी, कल्याण, केदार, अहेरी, धनश्री, सारंग, देसी, जयजयवंती, शंकराभरण, वैरोळी, आसावरी, मारू, काफी, हुसेनी, वसंत या रागांमध्ये पदांची रचना केली.
मृदंग वादनाचा ही त्यांचा अभ्यास होता. गाणारा आणि ऐकणारा श्रोता दोघेही तेव्हढेच
तयार असले म्हणजे मैफलीत रंग भरतो असे त्यांचे म्हणणे होते. कीर्तन करणार्याचा गळा आणि ऐकणार्याचे कान तयार हवेत हे सांगताना
समर्थांनी कीर्तन कसे गावे? कसे गाऊ नये? याबद्दल मार्गदर्शन केले आहे. गातांना खाकरत किंवा घसा साफ करत गाऊ
नये.
गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळो नये,
गौप्य गुज गर्जो नये, गुण गावे
घष्टणी घिसणी घस्मरणे , घसर घसरू घसा खाणे
घुम घुमोची घुमणे, योग्य नव्हे ||
समर्थांनी विविध ठिकाणी शक्तीची देवता मारुतीची स्थापना
केली होती, समाजाला बलोपासना चे महत्व पटवून देण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात हनुमान मंदिरे स्थापन केली. बलोपासना आणि त्यांच्या
संप्रदायाची स्थापना करताना तरुणांसमोर त्यांनी शक्तीचे व तेजाचे प्रतीक मारुतिराया
ठेवले.
मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।
‘‘जय जय रघुवीर समर्थ’’ --- हेच
त्यांचे म्हणणे होते
त्यांचे अकरा मारुती आजही लोकांच्या श्रद्धेचा विषय आहेत.
ते मारुती म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रातलेच मसूर, उंब्रज, शहापूर, माजगाव, शिंगणवाडी, मनपाडळे, बोरगाव, बत्तीस शिराळा, चाफळ, पारगाव,यांचे वर्णन वेण्णा स्वामींनी त्यांच्या अभंगात केले आहे. एव्हढंच काय समर्थांनी
स्थापन केलेली मारुती मंदिरे रायगड, प्रतापगड आणि
सिंहगडावरही आहेत. त्याच प्रमाणे मठ सुद्धा स्थापन केले. त्यांची जबाबदारी एकेका
शिष्याला वाटून दिली.
इस्लामी राजवटीत भीतीने लोकांनी देवांच्या मूर्ति डोहात, नदीत
बुडवल्या होत्या, त्या त्यांनी बाहेर काढून पुन्हा
प्रतिष्ठापना केली, मंदिरे बांधली,
देवांचे सार्वजनिक उत्सव सुरू केले.राष्ट्रोद्धार आणि धर्मोद्धार हेच त्यांचे
ध्येय होते. त्यांनी जागोजागी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. मनाचे श्लोक, दासबोध, असे इतर ही साहित्य निर्माण केले.
देशभक्तीचा प्रसार केला. समाज प्रबोधन करताना त्यांनी भारुड,
वासुदेव, डफगाणे, गोंधळ, बहुरूपी, पांगुळ, खेळिया, वाघ्या हे लोक काव्य प्रकार वापरले आहेत.
त्यांनी गणपती, श्रीराम, मारुति, श्रीकृष्ण, विठ्ठल,शंकर, देवी, खंडोबा यांच्या
बद्दल अभंग आणि मंगलाचरण लिहिले आहे. श्री विठ्ठलाबद्दल ते लिहितात आणि पंढरपूरचे
वर्णन त्यांनी केले आहे.
पंढरिऐसें
तिन्ही ताळीं । क्षेत्र नाहीं भूमंडळीं ॥१॥
दुरुनि देखता
कळस । होय अहंकाराचा नाश ॥२॥
होतां
संतांचिया भेटी । जन्ममरणा पडे तुटी ॥३॥
चंद्रभागेमाजीं
न्हातां । मुक्ति लाभे सायुज्यता ॥४॥
दृष्टी न पडे
ब्रह्मादिकां । प्राप्त जालें तें भाविका ॥५॥
रामदासा जाली
भेटी । विठ्ठलपायीं दिधली मिठी ॥६॥
विठ्ठलाची
स्तुती करताना समर्थांना राम, विठ्ठल आणि कृष्ण तिघे एकरूप वाटतात.
समर्थांचे मनाचे श्लोक म्हणजे मानवी जीवनाचे रहस्य आहे .
यात ते भक्त कसं असावा किंवा त्याचे गुण काय असतात ते सांगतात.गणाधीश जो ईश सर्वां
गुणांचा ..समर्थांची ही प्रार्थना/श्लोक आपण नेहमी म्हणतो
दिनाचा
दयाळु मनाचा मवाळू | स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू |
तया अंतरी
क्रोध संताप कैन्चा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |
ज्याचे हृदय मायाळू आहे,,जो अनाथांवर आणि गरिबांवर दया
करतो, जो प्रेमळ आहे, कृपाळू आहे आणि
जो सेवकांचा सांभाळ करतो त्याच्या मनात दुसर्याबद्दल मुळीच राग नसतो. असा भक्त
धन्य होय.
सदा सर्वदा
सज्जनाचेनि योगें | क्रिया पालटे भक्तीभावार्थ लागे |
क्रियेविण
वाचाळता ते निवारी | तुटे वद संवाद तो हीतकारी |
हे मना सज्जन्न -साधू -संतांच्या संगतीमुळे आचारणामध्ये बदल
घडतो आणि भगवंताची जाणीव होऊन त्याच्याबद्दल भक्ती वाटू लागते. स्वत: आचरण
केल्याशिवाय फुकटची बडबड करू नकोस, ज्यामुळे वाद विवाद संपतो, ते संभाषण परमार्थाच्या
दृष्टीने हितकारक असते.
नको रे मना वद हा खेडकरी नको रे मना भेद नाना विकारी
नको रे मना सीकऊं पुढीलांसी अहंभाव जो
राहिला तुजपासी||
हे मना वादावादी करणे हे अत्यंत वाईट आहे. वादातील वायफळ
चर्चा माणसांमध्ये भेद निर्माण करते आणि नाना प्रकारचे विकार निर्माण करते.
तेंव्हा तुझ्याजवळ जो अहंभाव आहे तो तू इतरांना शिकवू नकोस.
जगांत सर्व सुखी कोणीच नाही ,ते तूच शोधून बघ ,पूर्व जन्मी जे कर्म केलं आहे त्या
प्रमाणे या जन्मी भोगावे लागते , विचार कर. हे ही ते
श्लोकांमधून आपल्याला सांगतात.आपल्या दु:खाला आपणच जबाबदार असतो असे समर्थ
सांगतात.
जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधूनी पाहे,
मना त्वां चि रे पूर्वसंचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ||
भुजंगप्रयात वृत्तामध्ये असलेले हे श्लोक म्हणजे ‘मनोपनिषद’ आहे असे आचार्य विनोबा भावे म्हणतात. परखडपणे व्यावहारिक जीवनावर, संसारिक जीवनावर समर्थांनी भाष्य केलंय. समाजाला कायमच उपयोगी पडेल असे मार्गदर्शन केले.
१६८२ मध्ये त्यांनी
सज्जनगडावर रामनामचा घोष करून देह सोडला. आज ज्या ठिकाणी त्यांच्या वर
अंत्यसंस्कार केले त्याठिकाणी राममंदिर आहे आणि तळघरात समाधी आहे.
|| जय जय
रघुवीर समर्थ ||
© डॉ,नयना कासखेडीकर,पुणे
------------------------------
No comments:
Post a Comment