Tuesday, 20 July 2021

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

  

                                       || निर्गुण वारी अभंगमाला ||

                           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (माणिक नामदेव इंगळे)

                           (जन्म- १९०९ – यावली,अमरावती. निर्वाण- १९६८-मोझरी)

                                आई- मंजुळामाय, वडील- बंडोपंत(नामदेव)

                            
तुकडोजी महाराज महाराष्ट्रातील एक आधुनिक संत. आध्यात्मिक क्षेत्रातले महान योगी, नेतृत्व करणारा नेता, कुशल संघटक, वक्ता आणि संगीतकार.

  खंजिरीच्या ठेक्यावर मराठी व हिन्दी पद गाऊन श्रोत्यांना तल्लीन व्हायला लावत, जातिभेद पळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिऊ नका, देशावर प्रेम करा, व्यसने त्यागा या विषयावर ते प्रबोधन करत असत.  घरची अत्यंत गरीबी, शिक्षण फक्त प्राथमिक चौथी पर्यंतच. पण लहान पणापासूनच ते गुलाब महाराज, हरीबुवा, अशा संतांच्या सान्निध्यात आले. वरखेड इथले समर्थ आडकोजी महाराज हे त्यांचे गुरु.  खंजिरीवर गाणी म्हणण्याचा त्यांना लहान पणापासूनच नाद. आत्मज्ञानाची अनुभूती घेण्यासाठी घर सोडून रामटेक, रामदिघी आणि सालबर्डी इथल्या घनदाट जंगलात जाऊन ते राहिले.

   आडकोजी बाबा जेंव्हा समाधिस्त झाल्याचे कळले तेंव्हा त्यांना खूप धक्का बसला. मग ते पुन्हा घरी जाऊन आई वडिलांच्या सेवेत राहू लागले, पण मनात वैराग्य भावना कायम होतीच. जंगलात ल्या वास्तव्यात त्यांनी ध्यानधारणा आणि योगाभ्यास केला होता. भजनाच्या निमित्ताने त्यांनी तिर्थस्थळांचे दर्शन घेतले होते. तर समाजाचे जवळून परीक्षण केले होते. देशाची प्रगती व्हायला हवी असेल तर सामान्य लोकांची स्थिति सुधारली पाहिजे असे त्यांना वाटले. देशातल्या खेड्यांचा कायापालट झाला पाहिजे. त्यासाठी समाजात शिस्त आली पाहिजे, स्वच्छतेचे महत्व वाटले पाहिजे, ते मनावर बिंबवले तर खेडी लख्ख होतील .त्यासाठी सूत कताई. शाळा, जागोजागी दवाखाने, व नियमित प्रार्थना याची जोड द्यायला हवी हे त्यांच्या लक्षात आले.

भजनाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण लोकांचे प्रबोधन केले. मनी नाही भाव देवा मला पाव... सारखी उत्स्फूर्त आणि प्रेरणा देणारी हजारो भजने त्यांनी लिहिली.

    मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
देव अशान, भेटायचा नाही हो।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o

मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चाँदीचा देव, त्याला चोराचं भेव ।
लाकडाचा देव,त्याला अग्नीचं भेव ।
देव बाजारचा… ….॥१॥

 देवाच देवत्व नाही दगडात ।
देवाच देवत्व नाही लाकडात ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा………॥२॥

भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा… ……॥३॥

देवाचं देवत्व आहे ठायी ठायी ।
मी-तू गेल्याविण अनुभव नाही।
तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वाही ।
देव बाजारचा……….॥४॥

   आत्मज्ञानाची अनुभूति झाल्यावर ते पुन्हा लोकांमध्ये येऊन राहिले. त्यांची सहज आणि सोप्या शब्दातली गाणी लोकांच्या हृदयाला भिडत. खंजिरीच्या तालावर जीवनाचं वास्तव सांगणारी, शिक्षण देणारी, गाणी हे त्यांचा वैशिष्ट्य होतं. अंधश्रद्धा निर्मूलन,जातिभेद निर्मूलन, देवावरची डोळस श्रद्धा, शिक्षणाचे महत्व, सर्व धर्म समभाव, असे विषय त्यांनी गाण्यातून जनतेला समजविले. त्यासाठी भजन- कीर्तनाचा मार्ग निवडला.  

भोग हा चुकेना कोणा, देव-दानवा ।

सृष्टि भोग भोगी देही, मागचा नवा ॥धृ॥

संत-साधु योगी-मौनी, प्राक्तना चुकविना कोणी ।

मृत्युपरी पावे ग्लानी, दुःख या जिवा ॥कोणा०॥१॥

 सामाजिक बंधुभावाचे महत्व सांगणारे गीत सर्वांना माहिती आहे . या भारतात बंधुभाव नित्य वसू दे.... चौथीच्या बालभारती पुस्तकातली लहान मुलांवर संस्कार करणारी ही कविता --

                                          या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे ||

 नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी

मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी

स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे

दे वरचि असा दे ||

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना

हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना

उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे

दे वरचि असा दे

जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी

खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे

दे वरचि असा दे ||

 सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी

ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी

तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे

दे वरचि असा दे ||

याच बरोबर शाळेत आम्ही शिकलेली कविता, राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली,

ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ||  ही सर्वांना ज्ञात आहेच. अशा त्यांच्या प्रासादिक रचनात लोककल्याणाची त्यांची तळमळ, समाजहित सांगणारा स्पष्टपणा दिसतो.

   संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यासारख्या संतांच्या काळची सामाजिक परिस्थिति वेगळी होती. मात्र तुकडोजी महाराजांच्या काळात देश पारतंत्र्याच्या जोखडाखाली पिचून गेला होता. त्यांच्या भजनात राष्ट्रीय ऐक्य, स्वातंत्र्य, विषमता, दु:ख हेही विषय असायचे. त्यांनी सुरूवातीला तुकड्यादास या नावाने काही रचना लिहिल्या. त्यांच्या रचनांमध्ये सामाजिक परिस्थितीचे चित्रण असायचे. आपल्या देशाचे सुजलाम सुफलाम चित्र त्यांनीही रंगविले होते. खेड्यातल्या लोकांचा विकास हाच त्यांचा ध्यास होता.

त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ म्हणजे लोकशिक्षणाचा आदर्श  वस्तूपाठ आहे. त्यांच्या कल्पनेतले गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे रूप आपल्याला ग्रामगीतेत दिसते. त्यांनी खेडोपाड्यात प्रत्यक्ष जाऊन ग्रामसंस्कृतीचे उत्कट दर्शन घेतले. ते त्यासाठी आयुष्यभर भटकत राहिले. ते म्हणत, “माझा देव साधनारूपाने देवळात व रानात असला, अनुभवरूपाने तो मनात व चिंतनात असला तरी कार्यारूपाने तो जनात आहे. विस्तीर्ण रूपात पसरलेली गावे हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे”.

   त्यांनी ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माण, ग्रामआरोग्य, ग्रामशिक्षण, ग्रामकुटुंब, ग्रामप्रार्थना, ग्रामसेवा, ग्राममंदिर, ग्रामसंस्कार, ग्रामउद्योग, ग्रामसंघटन, ग्रामआचार यांचा असा सूक्ष्मविचार त्यांनी ग्रामगीतेत सांगितला आहे. गाव सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, सुसंस्कृत व्हावा, सुशिक्षित व्हावा ,परस्परस्नेहभाव जागवावा, श्रमप्रतिष्ठा वाढावी अशी तळमळ व्यक्त करून ही ग्रामगीता त्यांनी ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे. या ग्रामगीतेचे वचन खेडोपाड्यातून अत्यंत आदराने केले गेले, आजही केले जात आहे.

     जसं समर्थ रामदासांनी कसं लिहावं ? हे एका समासात सांगितलं आहे तसं,संत तुकाडोजी यांनी काय वाचावं आणि कशासाठी वाचावं हे ग्रामगीतेत सांगितलं आहे. आपण जे वाचतो त्याच मर्म आपल्याला कळायला हवं. ज्या प्रकारच आपलं जीवन आहे त्याला उपयुक्त असेच वाचन आपण केले पाहिजे.

 लोक त्यांना तुकडोजी म्हणून ओळखू लागले. स्वातंत्र्यलढ्याची चळवळ त्यांनी ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविली. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांची प्रेरणा महत्वाची ठरली. चिमुर, आष्टी व बेनोडा यातील चळवळीचे ते प्रेरणास्थान होते.

बोल बोल बा ! बोल भारता ! चिंतातुर का असा ?

हाल-बेहाल तुझी लालसा ॥धृ॥

स्वातंत्र्याच्या उन्नत शिखरी निर्भय सेना तुझी ।

सोडुनी आज दशा का अशी ?

वेदांताची उंच गर्जना, भार ऋषींचे तसे ।

सोडुनी वन-वन का फिरतसे ?

भारतमय श्रृंगार तुझा तो काय कुठे लोपला ?

बावरा फिरशी का एकला ?

दे हाक रामकृष्णासम व्हाया उभे ।

तुझि सत्य हाक ही कळेल त्यांच्या सभे

धावतील ओढाया असुरांच्या जिभे ।

तुकड्यादास म्हणे पाहवेना, अम्हा त्रास हा असा ।

मिळो स्वातंत्र्य पुन्हा जगदिशा !

     या लढ्यात त्यांनी सांस्कृतीक व आध्यात्मिक कार्यक्रमांतून चळवळीबद्दल लोकांचे प्रबोधन केले. यावेळी त्यांना चंद्रपूरला अटक करून नागपुर व रायपूर येथील तुरुंगांत १०० दिवस ठेवले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी सामाजिक चळवळीचे काम हाती घेतले. नागपूरजवळील मोझरी गावांत गुरुकुंज आश्रम स्थापन केला. त्यांनी ग्रामीण पुन:र्निर्माणाचे मूलभूत व रचनात्मक  काम हाती घेतले. महात्मा गांधी, डों. राजेंद्रप्रसाद आदींनी त्यांच्या या कामाची वाखाणणी केली व गौरव केला. एका भव्य कार्यक्रमात देशाचे प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी “...आप संत नही, राष्ट्रसंत है” असे सदगतीत होऊन उद्गार काढले आणि तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी देऊन गौरविले. तेव्हापासून ते लोकांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून माहीत झाले. आवेशपूर्ण, भावनांनी ओतप्रोत भरलेले व मनाचा ठाव घेणारे त्यांचे खंजिरीभजन हा वैशिष्ठ्यपूर्ण व परिणामकारक उदबोधनाचा प्रकार ठरला.

   १९५५ मध्ये जपान येथे संपन्न झालेल्या विश्वधर्मपरिषदेत भारतातून तुकडोजी महाराजांना आमंत्रीत केले गेले. त्यावेळीही लोकांनी त्यांची खूप वाहवा केली.या प्रसंगी त्यांचे भजन सादर झाले होते ते दिल्ली च्या राजघाटावर नेहमी ऐकवले जाते.ते असे- 

                                          हर देश में तू ...

हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक, तू एकही है ।

तेरी रंगभुमि यह विश्वंभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥धृ॥

सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।

फ़िर नहर बनी नदियॉं गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥

चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।

कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥

यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।

तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥

    १९५६ मध्ये त्यांनी राष्ट्रातील विविध जाती, पंथ, धर्माच्या संस्थांचे प्रमुख व साधू यांचे मोठे संघटन केले. अश्या प्रकारचे संघटन प्रथमच होत होते. यापूर्वीही त्यांनी सालबर्डी येथे महारुद्र योजना आयोजीत केली होती. त्यातही तीन लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. सर्व धर्मांकडे सारख्याच नजरेने पहा असे सांगणार्‍या तुकडोजी महाराजांनी आपली वाणी, लेखणी, शक्ती आणि भक्ती याचे सर्व सामर्थ्य एकवटून समाजजागृतीचे कार्य केले.

  १९४५ चा बंगालचा दुष्काळ, १९६२ चे चीनचे आक्रमण, १९६५ मधील पाकीस्तानबरोबरचे युद्ध, (या दोन्ही युद्ध प्रसंगी त्यांनी सीमेवर जाऊन सैन्याला धीर देण्यासाठी विरगीते गायली होती.) १९६२ मधील कोयनाचा भूकंप अशा विविध राष्ट्रसंकटाच्या वेळी त्यांनी प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत केली.त्यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला होता. त्यांनी अनेक महत्वाच्या सम्मेलनांचे अध्यक्षपद भूषविले. भारत सेवक समाज, हरिजन सम्मेलन, भारतीय वेदान्त सम्मेलन, आयुर्वेद सम्मेलन अश्या अनेक प्रसंगी त्यांनी व्याख्यानातून प्रबोधन केले. महिलांची उन्नती हा त्यांच्या प्रबोधनाचा एक महत्वाचा विषय होता. कुटुंब व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था आणि समाज व्यवस्था ही स्त्री वर कशी अवलंबून असते हे ते कीर्तनातून मांडत. देयशातले तरुण हे राष्ट्राचे आधार स्तंभ असतात त्यामुळे ते बलोपासक असावेत नीतिमान व सुसंस्कृत असावेत तेंव्हाच ते राष्ट्राचे संरक्षण करू शकतील असेही ते प्रबोधनपर सांगत. त्यांनी ब्रम्ह, नाशिवंत देह, संसार वं परमार्थ, मानवी प्रयत्न, ईश्वर, विश्व धर्म आणि प्रार्थना हे तत्वज्ञान विषय मांडले.     

 संत तुकडोजी महाराज यांचे साहित्यिक योगदानही मोठे आहे. मराठी व हिन्दी भाषांमध्ये त्यांनी रचना केल्या आहेत. मराठीत सुमारे ३००० भजने, २००० अभंग, ५००० ओव्या, तसेच धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय विषयांवरील तसेच औपचारिक व अनौपचारिक शिक्षणासंबंधीचे ६०० पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. मराठी भाषेत त्यांची ३० पुस्तके आहेत. उदा. ओवीबद्ध ग्रामगीता, अनुभवसागर भजनांजली, लोकशाहीचे पोवाडे, दारूबंदी, अरुणोदय, भक्तीकुंज, राष्ट्रीय नवजागृती ,लहर की बरखा ,अनुभव प्रकाश इत्यादि. त्यांनी ग्रामगीतेतून लोकांना भोंदूबाबांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला आहे. खुळ्या कल्पनांवर ताशेरे ओढले आहेत.

 शेवटच्या दिवसात ते कॅन्सरने आजारी झाले आणि या आजारातच त्यांचे दि. ११ ऑक्टोबर, १९६८ रोजी निधन झाले. त्यांच्या मोझरी गावच्या गुरुकुंज आश्रमासमोरच त्यांची समाधी आहे. ती आजही सर्व सामान्यांना जीवन जगण्याची योग्य दिशा आणि प्रेरणा देते.

                                                || जय जय रामकृष्ण हरी ||  

 

© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .

                                            -------------------------------

No comments:

Post a Comment