Wednesday, 7 July 2021

संत भानुदास

 

                                || निर्गुण वारी अभंगमाला ||

                                                             संत भानुदास

                                     (जन्म- ई.स.१४४८,पैठण ,समाधी -पंढरपूर -१५०६)     

                                      

पैठण चे संत भानुदास म्हणजे संत एकनाथ यांचे पणजोबा. दामाजी यांचे समकालीन. संत एकनाथ यांच्या कुळातले प्रसिद्ध पुरुष . ज्यांनी चौदाव्या शतकाची अखेर पहिली आणि पंधराव्या शतकाची सुरुवात पाहिली.

आमुचिये कूळीं पंढरीचा नेम ।
मुखीं सदा नाम विठ्ठलांचें ॥१॥
न कळे आचार न कळे विचार ।
न कळे वेव्हार प्रपंचाचा ॥२॥
असों भलते ठायीं जपूं नामावळी ।
कर्माकर्म होळी होय तेणें ॥३॥
भानुदास म्हणे उपदेश आम्हां ।
जोडिला परमात्मा श्रीराम हा ॥४॥

  म्हणजे कुळ परंपरेने भानुदास यांच्या घरात विठ्ठलभक्ती चालत आलेली होती. त्यामुळे पंढरीची वारी त्यांनी कधीही चुकवली नाही .तसंच ते सूर्योपासक सुद्धा होते. भानुदास दृढ निश्चयी, सत्य निष्ठ, निर्भय आणि स्वभावाने सरळ होते. 

    भानुदास यांनी गौळण, बाळक्रीडा, करुणा, विठ्ठल माहात्म्य, पंढरी महात्म्य, नाम महिमा, रामनाम महिमा, फुगडी, कला,अद्वैत अशा विविधांगी विषयावर रचना लिहिल्या आहेत.

त्यांची ही गौळण

वृदांवनीं वेणू कवणाच माये वाजे । वेणुनादें गोवर्धनू गाजे ।
पुच्छु पसरुनि मयोर विराजे । मज पाहतां भासती यादवराजे ॥१॥
तृण चारा चरूं विसरली । गाई व्याघ्र एके ठायीं जालीं ।
पक्षीं कुळें निवांत राहिली । वैरभाव समुळ विसरली ॥२॥
यमुना जळ स्थिर स्थिर वाहे । रविमंडळ चालतां स्तब्ध होये ।
शेषकूर्म वराह चकित राहे । बाळा स्तन देऊ विसरली माये ॥३॥
ध्वनी मजुंळ मंजुळ उमटती । वांकी रुणझुण रुणझूण वाजती ।
देव विमानीं बैसानि स्तुती गाती । भानुदासा फावली प्रेम भक्ति ॥४॥

महीपतिबुवा ताहराबाद्कर यांनी त्यांच्या ग्रंथात भानुदास यांचे चरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी अनेक उदाहरणे  व त्यांच्या आयुष्यातले प्रसंग दिले आहेत. भानुदास यांच्या बालपणीचा एक प्रसंग आहे, भानुदास हे सूर्याचा अवतार आहेत, अशी पैठणच्या गावकर्‍यांची समजूत होती, नाथांनी पण म्हटलं आहे,

ज्याने बाळपणी आकळिला भानु । स्वये जाहला चिद्‍भानु । जिंकोनी मानाभिमानु । भगवत्पावनु स्वये जाला ॥

 सूर्योपासक असलेल्या ब्राम्हण दांपत्याचा मुलगा भानुदास, आईवडिलांचा अत्यंत लाडका होता. त्याचा व्रतबंध झाल्यानंतर एके दिवशी वडील काही कारणाने त्याला रागावले असता, तो खिन्न मनाने गावातल्या प्राचीन सूर्यनारायणाच्या देवळात जाऊन बसला. सूर्यनारायणाचे भावभक्तीने स्मरण केले, स्तुती केली. खिन्न बसलेल्या अवस्थेत पाहून सूर्यनारायण मनुष्यरूपात प्रकटले आणि छोट्या भानुदासास दूध पाजले. आणि सांगितले की अखंड भगवंताचे स्मरण करीत बैस, तुझ्यावर काहीही संकट आले तर, ते मी निवारण करीन. असे सात दिवस भानुदास त्याच मंदिरात राहिला. एक दिवस मंदिराबाहेर आलेला भानुदास गावकर्यांनी पहिला आणि ती बातमी त्याच्या आईवडिलांना दिली. इकडे आई-वडील भानूदासाला शोधून शोधून दु:ख करत बसले होते. बातमी कळल्यावर गावकर्‍यांसहित दिवट्या हातात घेऊन, आई वडील भानुदासला शोधत मंदिरात आले. तेंव्हा भानुदास आतमध्ये सूर्यनाराणाच्या मूर्तीच्या पायावर डोके ठेऊन झोपले होते. ते पाहून भानुदासला त्यांनी उठवले आणि सात दिवस उपाशी तापाशी असलेल्या आपल्या मुलाला पोटाशी धरून विचारू लागले. भानुदास म्हणाला, एक मोठा तेजस्वी असा माणूस रोज इथे येऊन मला दूध पाजतो. या प्रसंगापासून सर्व गावकरी, हा तेजस्वी पुरुष म्हणजे सूर्यनारायणच आहे असे समजून भानुदासला ही ते मानू लागले. आई वडील त्याला घरी येऊन आले. भानुदासाची हरिभजन गोडी कायम होती. पुढे लग्न झाले. आई वडील दोघेही निवर्तले.

नामाचा महिमा शुक सांगे ।
परिक्षिती राजा जाणे अंगें ॥१॥
जपतांचि रामकृष्ण नामें ।
दहन होतीं कर्माकर्में ॥२॥
नामें दया शांति क्षमा ।
नामें शीतळ शंकर उमा ॥३॥
नाम जप ध्यानीं मनीं ।
भानुदास वंदितो चरणीं ॥४॥

  त्यानंतर भानुदास यांची आर्थिक कुचंबणा सुरू झाली. बायका मुलांना उपाशी राहावे लागे. जवळच्या लोकांनी त्यांना चरितार्थ चालवण्यासाठी मदत केली. १०० रुपयांचे कापड देऊन तू आता यावर कापड व्यवसाय कर व पैसे कमव असे सांगितले. भानुदास तसे करू लागले. सचोटीने व्यापार केल्यामुळे फायदा होऊ लागला. त्यामुळे शत्रू निर्माण झाले. बाजारातील इतर व्यापारी लोकांनी धंदा बसवण्यासाठी त्यांचे नुकसान केले. मालाची लूट केली, त्यांचे घोडे सोडून दिले, ईश्वराला भक्ताची काळजी असते. त्याच वेळी दरोडेखोर येऊन त्यांनी लुटलेला माल घेऊन गेले. पण भानुदास जेंव्हा परतले तेंव्हा त्यांचा घोडा धरून एक जण उभा होता. भानुदास यांना जेंव्हा कळले की आपल्यामुळे देवाला श्रम झाले आहेत म्हणून हा धंदा आता करायचा नाही. आणि तेंव्हा त्यांनी सर्व कापड व्यापार्‍यांना वाटून टाकले. पुढचं आयुष्य हरिभजनात घालवलं. आषाढी कार्तिकीला नियमाने पंढरपूरला जाणे सुरू झाले. 

देखोनियां पंढरपुर ।
जीवा आनंद अपार ॥१॥
टाळ मृदंग वाजती ।
रामकृष्ण उच्चरिती ॥२॥
दिड्यापताकाचा मेळ ।
नाचती हरुषें गोपाळ ॥३॥
चंद्रभागा उत्तम ।
स्थानास्नानं पतीतपावन ॥४॥
पुंडलिका लागतां पायां ।
चुकें येरझार वायां ॥५॥
पाहतां विठ्ठलमूर्ति ।
भानुदासांसी विश्रांती ॥६॥

भानुदास महाराज यांचे वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत असे मानतात.  कारण भानुदास महाराजांनी पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती विजयनगरहून पुन्हा पंढरपूर मध्ये आणली. त्याची एक आख्यायिका आहे .  विद्यानगर (विजयनगर) साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा स्वारीवर निघाला असता, पंढरपूरमध्ये आला. विठुरायाची मूर्ती पाहून, श्री विठ्ठलाला आपल्या नगरीत नेऊन प्रतिष्ठापना करावी असा विचार त्याच्या मनात आला. पंढरीनाथची आज्ञा मिळण्याची वाट पाहत तो सात दिवस तिथेच ठाण मांडून बसला. देवाने मग दृष्टान्त दिला की, मी पुंडलिका साठी येथे वास्तव्य केले आहे. मी इथून हलणार नाही. पण  पांडुरंगाने त्याचीही परीक्षा पाहण्याचे ठरवले. आणि त्याला अट घातली की, वैदिक ब्रम्हणांनी शुचिर्भूत होऊन, मला सोवळ्याने उचलावे, वाटेत कुठेही खाली ठेऊ नये. आनंदाने राजाने, प्रधानाला तशी व्यवस्था करायला सांगितले आणि पंढरपूर ते विजयनगर पर्यन्त गावोगावच्या वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांना ठिकठिकाणी उभे करून मूर्ती खाली न ठेवता नेण्याची व्यवस्था करण्यात आली. इकडे पंढरीत अनेक वारकरी, बडवे आणि भक्तांनी परोपरीने काकुळतीला येऊन विनविले, मूर्ती नेऊ नका म्हणून, पण कोणालाही न जुमानता मूर्ती नेली आणि पंढरपूर जणू प्राण गेल्यासारखे निस्तेज झाले .विजयनगर मध्ये मूर्ती स्थापन झाली. महिपतींनी वर्णन केले आहे,

मेळवूनियां वैष्णव वीर । कीर्तन करीतसे नृपवर ।
दिंड्या पताकांचे भार । मंगळतुरे लाविले ॥
पूजा अभिषेक करून प्रीती । सिंहासनी स्थापित पांडुरंगमूर्ती ॥
महाउत्सव करीत भूपति । आनंद चित्तीं न समाये ॥
वस्त्रे भूषणे देऊनि फार । रायें गौरविले वैष्णव वीर ।
द्रव्यदक्षिणा वांटोनियां थोर । सुखी द्विजवर ते केले ॥
रत्नजडित अलंकार । अमुल्य वस्त्रें मुक्ताहार ।
लेवोनि पुजिला रुक्मिणीवर । हर्षें अंतर कोंदले ॥

पांडुरंगाने स्वनात येऊन राजाला सांगितले की, तुझ्या आग्रहाखातर ,पंढरपूर सोडून मी इथे आलो आहे, जर तुझ्या हातून काहीही अन्याय झाला तरी मी लगेच पंढरपूरला निघून जाईन. त्यामुळे राजा अगदी दक्षतेने काळजी घेऊ लागला, चूक होणार नाही हे पाहू लागला. देवळात बंदोबस्त ठेवला. पुजा-अर्चा सर्व सुरळीत होते, पण खरा भक्तिभाव नव्हता, शुद्ध प्रेम नव्हतं, या भावनेने भक्त देवळात जाईनासे झाले. इकडे पंढरपुरला आषाढीसाठी लाखो भक्त जमू लागले. विठ्ठलाच्या मुर्ती रुपातल्या अस्तित्वाअभावे पंढरी भकास झाली होती. एका ज्येष्ठ भक्ताने सुचविले विजयनगरला जाऊन कुणीतरी मूर्ती पुन्हा पंढरपूर मध्ये आणावी॰ पण कोणी जबाबदारी घेइना, कडीकुलूपातली बंदिस्त मूर्ती कशी आणायची, तर कोणी म्हणे,  देव तर चराचरात आहे, मूर्ती आणण्याचे प्रयोजनच काय? सबबी सांगू लागले. शेवटी भानुदास पुढे आले. तुमची आज्ञा असेल तर मी जाऊन मूर्ती घेऊन येतो, तुम्ही निश्चिंत रहा. आणि मनोमन चिंतन करत विजयनगरला भानुदास दाखल झाले. कुलूपबंद मंदिरातल्या विठोबाला भेटायचे कसे हा विचार करतच हात लावताच सर्व कुलुपे भराभर उघडली गेली. भानुदास विठ्ठलासमोर उभे राहिले. पुंडलिकाची आठवण देऊन त्याला जाब विचारू लागले, पंढरीला चला म्हणून विनवू लागले,   

चंद्रभागेतीरीं उभा विटेवरी । विठो राज्य करी पंढरिये ॥
ऋद्धि सिद्धि वोळंगती परिवार । न लाहाती अवसर ब्रह्मादिकां ॥
सांडुनी इतुकें येथें बिजे केलें । कवणें चाळविलें कानडिया ॥
 रखुमाई आई ते जाहली उदास । पुंडलिका कैसें पडिलें मौन ॥
भक्त भागवत सकळ पारुषले । नि:शब्दचि ठेले तुजवीण ॥
धन्य पंढरपुर विश्वाचे माहेर । धन्य भीमातीर वाळुवंट ॥

भानुदास म्हणे चालें आम्हासवें । वाचाऋण देवें आठवावें ॥

देवाने ते पाहून प्रसन्न होऊन आलिंगन दिले आणि आपल्या गळ्यातला तुळशीहर भानुदासच्या गळ्यात घातला, प्रसाद दिला. देवाच्या हातून तुळशीहाराबरोबर रत्नहार सुद्धा चुकून गळ्यात पडला. भानुदासला याची कल्पना नव्हती. ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघून गेले. पांडुरंगानेच मंदिर पुन्हा कुलूपबंद केले. पहाटे आरतीच्या वेळी लक्षात आले की मूर्तीच्या गळ्यात रत्नहार नाही, दहाही दिशांना शोध सुरू झाला. नदिकिनारी विठ्ठलाचे नामस्मरण करत असलेले भानुदास दिसले, त्यांच्या गळ्यात तुळशीहार आणि रत्न हार होता. मुद्देमालासहित चोर सापडला म्हणून त्याला घेऊन राजाकडे गेले. चोराला सुळावर द्यावे असे फर्मान दिले गेले. या प्रकाराचे भानुदास यांना आश्चर्य वाटले. ते म्हणतात,

जै आकाश कडकडो पाहे । ब्रह्मगोळ भंगा जाये ॥
वडवानळ त्रिभुवन खाये । तै मी तुझीच वाट पाहें गा विठोबा ।
न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥
सप्तही समुद्र समरस होती । जै हे विरुनी जाय क्षिती ।
पंचभुते प्रळय पावती । तरि मी तुझाचि सांगाती गा विठोबा ॥
भलतैसें जड पडो भारी । नामा न टळॊं निर्धारी ॥
जैशी पतिव्रता प्राणेश्वरीं । भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा ॥

विठ्ठला तुला नेण्याकरता मी इथे आलो आणि तूच माझी अशी परीक्षा घेण्याचे ठरवलेसं होय? नकळत रत्न हार गळ्यात टाकून मलाच सुळावर चढवण्याची युक्ति चांगली आहे तुझी? हे निर्वाणीचे बोल ऐकताच ,ज्या सुळावर भानुदास जाणार होते त्याला, त्याच क्षणी पांडुरंगाने फळाफुलाने बहरलेला सुंदर वृक्ष बनविले. ही वार्ता राजाला गेली. त्याच क्षणी त्याला उमगले की आपण पांडुरंगाच्या भक्ताचा, एका सत्पुरुषाचा छळ केला आहे. आपण अपराध केला आहे. धावतच तो भानुदास यांच्या समोर येऊन उभा राहिला. त्यांची क्षमा मागितली. भानुदास यांना सगळा प्रकार लक्षात आला, ते सद्गदित झाले. पांडुरंगाला स्मरू लागले. राजाने त्यांना हात धरून मंदिरात आणले, देवाने सांगितले, हे राजा, आता तू माझे रूप आठवून सुखात रहा. मी आता भानुदास बरोबर पंढरीला चाललो. 

   भानुदास नम्रपणे म्हणाले देवा तुझी इतकी जड मूर्ती मी एकटा कसा पंढरपूरपर्यंत नेऊ? हे ऐकताच चमत्कार झाला पांडुरंगाने आपले रूप करंगळी इतके लहान केले. भानुदासाने लगेच ती आपल्या जवळ ठेवली. पंढरीची वाट आनंदाने ते चालू लागले. हा प्रसंग राजालाही अनपेक्षित होता.पंढरीला आल्यावर मूर्ती पुन्हा पूर्ववत मोठी झाली। देवाने सांगितले, आता सर्वांना निरोप धाडा की मी आलो आहे. सर्व भक्त माझी वाट पाहत होते. विठ्ठलाच्या आगमनाची वार्ता कळताच भक्त गोळा झाले. रामकृष्णहरी चा जयघोष सुरू झाला. चंद्रभागेवर स्नान, मग पालखीतून मिरवून आणून पुनर्स्थापना केली गेली. हा दिवस कार्तिक शुद्ध एकादशीचा होता. पांडुरंगाने भानुदास यांना त्यावेळी म्हटले की,

न फिटेची तुझा उपकार । दृष्टीसी दाविले पंढरपुर ।
मी तुझे वंशी अवतार । घेईन साचार निश्चिती ॥

भानुदास यांच्या भक्तीतून उतराई होण्यासाठी त्यांच्या कुळात  एकनाथाच्या रूपात जन्म घेतला असे म्हणतात. संत निळोबराय म्हणतात, भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार । क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरीतीर ॥

पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल दर्शनाला जाताना गरुड मंडपात उजवीकडे भानुदास महाराजांची समाधी आहे.

                                                   || जय जय रामकृष्ण हरी ||  

© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .

No comments:

Post a Comment