Tuesday, 20 July 2021

वेण्णा स्वामी

  

                                         || निर्गुण वारी अभंगमाला ||

                                                           वेण्णा स्वामी

                                     (जन्म- १६२७-२८,  समाधी-सज्जनगड ,१६७८)

                                      आई- राधिकाबाई, वडील- गोपाजीपंत गोसावी               

                                          

एक स्त्री असूनही मठाधिपती झालेली ,संस्कृती विचार धारेचा प्रसार करणारी, विपुल लेखन करणारी ,आध्यात्मिक अधिकार मिळवलेली वेणाबाई. वैदिक काळात स्त्रीला उच्च तात्विक अधिष्ठान होतं. पण पुढे परंपरा आणि रूढींमुळे त्यांचे काही अधिकार काढून घेतले गेले. त्या आध्यात्मिक ज्ञानापासून वंचित राहिल्या. यादवकाळात मात्र धर्मभक्ति चळवळ सुरू झाली आणि स्त्रियांना आणि क्षुद्रांना भक्तीचा अधिकार मिळाला. इथूनच मराठी साहित्यात संत कवयित्री तयार झाल्याचं दिसतं. आध्यात्मिक उन्नतीची ही संधी या स्त्री संतांनी घेतली.

मध्ययुगाच्या अंधकारमय परिस्थितितून बाहेर पडून महिला संतांनी विचारांचे जागरण घडवले ते ऐतिहासिक ठरले आहे. संतांच्या परंपरेत स्त्री संतांचा मौलिक वाटा आहे. सामाजिक कुचंबणा, घरची परिस्थिति, दारिद्र्य, कौटुंबिक छळ या गोष्टी सहन करून त्यांनी योगदान दिले आहे. यातल्या पहिल्या स्त्री संत महादाईसा तर शेवटची स्त्री संत वेणाबाई . मध्ये मुक्ताबाई, जनाबाई, लाडाई, आऊबाई, लिंबाई, सोयराबाई, निर्मळा,कान्होपात्रा, बहिणाबाई, बयाबाई अशा स्त्री संत होऊन गेल्या.

मिरजच्या देशपांडे घराण्याची सून वेणाबाई बालविधवा झाली, त्यामुळे सोळाव्या शतकात विधवा स्त्रीने घरकाम करणे, देवाचे नामस्मरण करणे, धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे अशी बंधने पाळावी लागत. दुसरे अधिकार नव्हते. वेणा लहानपणापासूनच विरक्त, बुद्धीमान, जिज्ञासू, वाचन कीर्तनाची आणि श्रवणाची  आवड असणारी होती. समर्थ मिरज आणि कोल्हापूर येथे नेहमी किर्तनासाठी जात. त्यांचे कीर्तन ऐकायला वेणा आवर्जून जाई. तिचे आई वडील समर्थांचे अनुग्रह घेतलेले होते आणि सासू सासरे संत एकनाथांचे अनुग्रहीत होते. तिच्या आध्यात्मिक जीवनाला घरातून विरोध नव्हताच.पण निन्दकच जास्त होते. गुरु समर्थ रामदासांची आणि वेणाबाईची पहिली भेट तिचे जीवन बदलणारी झाली. एकदा समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागायला घरी आले तेंव्हा,

सदा सर्वदा योग तुझा घडावा,

तुझे कारणी देह माझा पडावा

उपेक्षू नको गुणवंता अनंता

रघुनायका मागणे हेची आता || जय जय रघुवीर समर्थ ||

हे धीरगंभीर आवाजात कानावर पडले आणि अगदी ओझरते दर्शन झाले होते पण, पुन्हा काही दिवसांनी ते आले असता वेणाबाई तुळशीजवळ एकनाथी भागवत वाचत बसल्या होत्या. समर्थांनी विचारले,

समर्थ- काय वाचतेस बाळ ?

वेणाबाई - एकनाथी भागवत.

समर्थ- जे वाचते ते कळते का ?

वेणाबाई- महाराज, मनाच्या आकाशात शंकांचे तारे उगवतात,पण कोणाला विचारू?

समर्थ- तुला असलेल्या शंका मला विचार !

मग काय वेणाबाईंनी दहा कडव्यात पंचवीस प्रश्न विचारले. त्यात त्यांनी जीव कोण, आत्मा कसा असतो, प्रपंच म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, बद्ध कोण आणि मुक्त कोण, सगुण निर्गुण म्हणजे काय, ज्ञानी कोण, चैतन्य कसे असते. समाधान कोणते असे मार्मिक प्रश्न विचारले. 

वेणाबाई -- वक्तयासी पुसे जीव हा कवण |
शिष्याचे लक्षण सांगा स्वामी ||
.सांगा स्वामी आत्मा कैसा तो परमात्मा |
बोलिजे अनात्मा तपो कवण ||
 आहे कैसे शून्य कैसे ते चैतन्य |
समाधान अन्य ते कवण ||
 सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण |
पंचवीस प्रेष्ण ऐसे केले ||

समर्थांनी वेणाबाईच्या प्रश्नांची उत्तरे दिली , जीव म्हणजे अज्ञान, आत्मा आणि परमात्मा म्हणजे आपल्या देहात जो वास करतो तो आत्मा, सर्व विश्वात चराचरात वास करतो तो अंतरात्मा आणि विश्वाला पुरून उरतो तो परमात्मा असतो.

प्रपंच म्हणजे पाचांच्या समुदायाचे नियंत्रण .हा प्रपंचही खरा नसतो ,आपला कुटुंब, घर,संपत्ति, याला आपण प्रपंच म्हणतो, मायेनेच निर्माण होतो आणि मायेनेच नष्ट होतो.

समाधान तेंव्हाच मिळते जेंव्हा आपण आपली देहबुद्धी ,सोडू मी पणा सोडून देऊ.

ब्रम्ह म्हणजे श्रीराम, श्रीकृष्ण या सारख्या देवतांच्या मूर्ती . त्यांच्यात प्रत्यक्ष देवता शक्तीरूपाने आहे असे आपण मानतो, तेंव्हा ते सगुण ब्रम्ह आहे अशी आपली भावना असते. पंढरीचा विठुराया हा सगुण रूपच आहे त्याच्याच आधारे आपण निर्गुण ब्रह्म मिळवायचा प्रयत्न करत असतो. निर्गुण म्हणजे जे निर्विकार आहे निराकार आहे ते ,

या प्रश्नांची उत्तरे वेणाबाईंना मिळाली आणि त्या खूप प्रभावित झाल्या. हेच आपले गुरु असे त्यांच्या मनात आले.       
 वेणाबाईंनी लिहिलेला श्रीरामाचा अभंग
बंदविमोचन राम ।
माझा बंदविमोचन राम ॥ धृ ॥

सकळही ऋषिमुनी भजती जयासी ।
एकचि तो सुखधाम ॥१॥

सद्गुरुकृपा ओळखिला जो ।
कौसल्येचा राम ॥२॥

भावभक्तीच्या सुलभसाधनी ।
पुरवी सकळही काम ॥३॥

शरण ही वेणा आत्मारामा ।
पावली पूर्णविराम ॥४॥

 आपल्या आवडीचा परमार्थ मार्ग शोधण्यासाठी लोकांच्या निंदेची पर्वा न करता, आपल्या आईवडिलांचा व कुटुंबाचा त्याग केला. मठ जीवन पत्करले, स्वत:चा प्रपंच नव्हता, पण मठाचा प्रपंच त्यांनी सांभाळला. जीवनाचे मार्गदर्शक म्हणून त्यांना समर्थ रामदासांसारखे श्रेष्ठ गुरु लाभले होते. त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व घडवले होते. समर्थांनी ११०० मठ स्थापन केले होते. त्यातल्या एका मठाची म्हणजे मिरजेच्या मठाची जबाबदारी वेणाबाईंना दिली. तेंव्हा गावात एकच चर्चा, की मिरजेत समर्थांनी रामदासी मठ स्थापन केला आहे आणि त्याची मठाधिपती स्त्री आहे. त्यातून ती विधवा आहे, मग कसा चालेल हा मठ? महंत होणं कसं चालेल विधवा असून? मग रुढींचे काय? समर्थांनी वेण्णा स्वामींना परमार्थ आणि वैराग्याचा उपदेश करूनच, पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला होता. त्यांना खात्री होती की माझ्या या शिष्येचं वर्तनच लोकांच्या या चर्चेला उत्तर देईल. समर्थ स्वत: सुधारकांचे अग्रणी होते, क्रांतिकारक होते, परंपरागत रूढी आणि यवनांच्या आक्रमणामुळे हिंदू समाज खचून गेला होता, त्यामुळे समर्थांना सामाजिक सुधारणा अपेक्षित होती. ते वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले होते. स्त्रीयांना शिष्यत्व देऊन, त्यांना शिक्षित करण्याचं समर्थांनी धाडसी आणि क्रांतिकारक पाऊलच उचललं होतं. ही खरी स्त्री मुक्ति म्हणावी. समर्थप्रताप ग्रंथकर्ते गिरीधर गोसावी यांनी वेणाबाई बद्दल म्हटले आहे,

"वेणाबाई मुख्य भक्तीसंस्थान। सदासर्वदा समर्थध्यान।।
बाहेक्षेत्री समर्थांसि जाले हनुमंतदर्शन। श्रीरामलिंगीं देवाल्यीं ते वेळी।।"

समर्थांच्या सर्व स्त्री शिष्या त्यांना स्वत:च्या मुलीप्रमाणे होत्या. समर्थांनी वेणाबाईला आशीर्वाद दिला होता की, “जनसेवा करा, ज्ञानदान करा, राष्ट्रधर्म जागवा आणि शक्तीची प्राणप्रतिष्ठा करा”.त्यांना माहिती होत की वेण्णा राममय होऊन काम करत आहे. गेली सात वर्षे गुरूंच्या बरोबर राहून काम केलं होतं आता मठाचं काम सुरू केल्याने पितृतुल्य सद्गुरूंचा, समर्थांचा सहवास आपल्याला लाभणार नाही याचं वेणाला खूप वाईट वाटलं, या विचाराने डोळे पाणावले. गुरूंनी मठ सोपवल्यानंतर, ते परत जाताना वेणाबाई ने साश्रू नयनांनी निरोप दिला, पण एक गोष्ट मागितली ती म्हणजे समर्थांच्या खडावा मागितल्या. समर्थ म्हणाले, “साक्षात रघुपतींचा इथे वास असताना दासांच्या पादुका हव्यात कशाला?” वेणाबाई म्हणतात, “रामरायांनी दिल्याच होत्या ना ? आमच्या मनी गुरु आणि देव एकच आहेत”. या बरोबर आणखी एक मागणी केली की, आपल्या अजाण वेणाला अंत:काळी आपल्या पायाशी आसरा द्यावा. गुरूचे चरण हेच शिष्याला वंदनीय असतात, आदरणीय असतात, वेणाबाईंनी प्रभू श्रीराम आणि भरताचा दाखला दिला आहे. 

परमार्थाशिवाय केलेला प्रपंच उपयोगाचा नाही. समर्थांनी अनुभवावर आधारित जे ज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ मानले होते. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात, असेही त्यांनी ठासून सांगितले. कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गांचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष्य त्यांनी शिष्यांपुढे ठेवले, अनेक दंडक त्यांनी घालून दिले. गुरूंच्या कसोटीला वेणाबाई उतरल्या होत्या तेंव्हाच त्यांना मठात प्रवेश मिळाला होता. त्यांचे आराध्य दैवत त्यांनी श्रीराम मानले होते.

काव्य निर्मितीचे श्रेय वेणाबई समर्थांनाच म्हणजे आपल्या गुरूंनाच देतात.

समर्थ देवे वेणाबाईसी वरदणे दिधली,

सीता स्वयंवरे रामायणे वदविली|

वेणाबाईंनी आपला शिष्यवर्ग जमविला होता. पूर्वी स्त्रियांनी आपल्या काव्यासाठी ओवी छंद वापरला आहे. संत मुक्तबई आणि जनाबाई यांची गीते ओवीबद्ध आहेत, तशीच वेणाबाईंच्या रचना आख्यान, काव्य प्रकारातल्या आहेत. वेणाबाईंनी सीतास्वयंवर हे आख्यान काव्य रचलेले आहे. हे श्रेष्ठ आख्यान काव्य  मानल जातं. उच्च दर्जाचे मानले जाते. त्या सीता स्वयंवराची फलश्रुति सांगताना म्हणतात,

भक्ती करीता याचे पठण, अथवा करिता श्रवण |

ज्याचे मनोरथ पूर्ण, करता राम समर्थ |

जे रघोत्तमाचे चरित्र, ते सर्व भावे पवित्र |

ज्याच्या श्रवणे सत्पात्र, धन्य  होई जे त्रिजगी ||

काव्यातून सांगितलेली कथा याचा अभिमान त्यांना होता. पण आख्यान काव्याच्या कसोटीला उतरलेले हे काव्य सुरस बनवण्याचा प्रयत्न वेणाबाईंनी केला होता. आख्यान काव्य प्रकार हा पंडिती काव्याची मिरासदारी मनाली जाते. पण महादंबा आणि वेणाबाई या स्त्री संतांनी आख्यान प्रकारातून संत साहित्यात ,कथा, काव्याचे बीज रुजवल्याचे दिसते. सगळ्याच स्त्री संतांनी भक्तिमार्गाचा अवलंब करून मोक्षप्राप्तीसाठी  धडपड केलेली दिसते. परंपरेने नाकारलेले आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आणि अर्थातच त्या स्त्री असल्याने त्यांच्या लिखाणामध्ये त्यांचे स्त्री मन डोकावते. स्त्री सुलभ भावना जाणवतात. हळुवारपणा, कोमलता सुद्धा दिसतेच. त्याच बरोबर आर्तता, उत्कंठता आणि तृप्ती पण त्यात दिसते. सीता स्वयंवर ही एका स्त्रीचीच गोष्ट ना. त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला आहे .

सीता स्वयंवरात वेणाबाई सीतेच्या अंगावरील दागिन्यांचे वर्णन करतात,

हिरव्या रत्नाचे अलंकार, भोवर्‍या कारले भांगार,

जानकी वाहता सुंदर, सभा हिरवी भासली,

हिरव्या कनकाच्या कीळा, हिरवे दावी रविमंडळा.

चंद्र आणि नक्षत्र माळा, भूगोल हिरवा भासला.

हिरवे कनक तेजोरासी,  हिरवी रत्ने कोंदणासी.

सुंदर भूषणे जिनसजिनसी, माता कौसल्या वाहातसे ||

वेणा बाईंना जणू हिरव्या रंगाची भुरळ पडली होती. तर एका ठिकाणी वेणा बाई रामाच्या सौंदर्याचे वर्णन करताना रामाच्या मूर्तीत दुर्वांच्या जुडीचे दर्शन घेतात.    

वेणा बाई महंतपदाला पोहोचलेली पहिली स्त्री, वेणाबाईंनी इतर संतांप्रमाणेच मोक्षप्राप्ती साठी  भक्तिमार्गाचा अवलंब केला आहे. ईश्वराला शरण गेल्या आहेत.  म्हणूनच त्या म्हणतात,

तुझी तुझी तुझी तुझी पावना रामा,

भावे अभावे कुभावे , परी तुझी पावना रामा.

सगळ्याच स्त्री संत त्यांच्या कर्तृत्वाने अजरामर ठरल्या आहेत. वेणा बाईंनी भक्तीकरता विषाचा प्याला पचवला अशी आख्यायिका आहे,स्वत:च्या वैधाव्याला मोठ्या धीटपणे, धैर्याने सामोरे जाऊन स्वत:ची आध्यात्मिक उन्नती त्यांनी करून घेतली.त्यांनी उपदेश रहस्य, कौल, वेदांतावर पंचीकरण, रामायणाची दीड हजार श्लोकांची कांडे, संहासन, सीतास्वयंवर चे चौदा समास.त्यात १५६८ ओव्या आहेत आणि अभंग, पदे असे स्फुट लेखन केले आहे.त्यांचा मुळातच व्यासंग होता, रामायण महाभारत भागवत याचं वाचन झालं होतं.संतांची चरित्र वाचली होती. कीर्तन करणार्‍या त्या एकमेव स्त्री शिष्या होत्या.      

मिरज येथे वेणाबाईंचा मठ आहे तो रामदास स्वामींनी १६५६ मध्ये बांधला आहे. वेणाबाईची समाधी सज्जनगडला आहे.  

                                            || जय जय रामकृष्ण हरी ||  

 

© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .

                                            -------------------------

 

No comments:

Post a Comment