Monday 12 July 2021

संत तुकाराम

 

                                || निर्गुण वारी अभंगमाला ||

                                                            संत तुकाराम

                                                (१६०८ देहू ते १६५०- देहू )

                                     आई – कनकाई, वडील- बोल्होबा अंबिले.

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम,पंढरीनाथ महाराज की जय”!

जगद्गुरू तुकाराम महाराज की जय !

 

या जयघोषावरुन लक्षात आलंच असेल की, तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणून मानले जायचे आणि आताही मानले जाते. विचारवंत कवी असल्या बरोबरच ते समाज सुधारक सुद्धा होतेच. म्हणूनच त्यांच्या कार्याने तुका झालासे कळस भागवत धर्माचा ते कळस झाले. त्यांचे आराध्य दैवत म्हणजे विठोबा आणि गुरु- बाबाजी चैतन्य. इतिहासात आपण वाचलं आहेच की, संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना क्षात्रधर्म म्हणजे काय ते सांगितले होते, राजधर्म समजविला होता, त्यांची भेट झाल्याचे दाखले इतिहासात आहेत. तुकाराम महाराज यांचा वंश परंपरागत व्यवसाय वाण्याचा आणि सावकारीचा होता. या सुखवस्तू आणि प्रतिष्ठित घरात विठ्ठल भक्ति पूर्वापार होती. त्यांच्या घराण्यातले प्रथम पुरुष विश्वंभर यांनी त्यांच्या नदीकाठच्या घरात विठ्ठल-रखूमाईचे देऊळ बांधले होते. या घराला देऊळवाडाच म्हणत. त्यामुळे घरातील या मंदिरातच भजन, कीर्तन, पुराणे ऐकत तुकोबा बहुश्रुत झाले होते. त्यांच्या आत्मचरित्रपर अभंगातून त्यांच्या वेळच्या सर्व परिस्थितीची आपल्याला कल्पना येते. त्यांचे लहान वयातच  लग्न झाले. दुष्काळ, प्रापंचिक अडचणी व संकटे यांना सतत सामोरे जावे लागले, सावकारीचा पारंपरिक व्यवसाय बंद झाला. पण विठ्ठल भक्तीत खंड नव्हता. पण त्यानंतर मात्र यातून मुक्त होत, प्रवचन कीर्तन करत त्यांचा भक्तिमार्ग जास्तच बळकट झाला. देहु गावाजवळ भंडारा डोंगरावर शांत वातावरणात त्यांची उपासना चालू झाली. शाश्वताचा शोध चालू असताना त्यांना परब्रम्ह विठ्ठल भेटला असे मानले जाते.

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले |

तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा |

मृदु सबाह्य  नवनीत  , तैसे सज्जनांचे चित्त |

ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धारी जो हृदयी |

दया करणे जे पुत्रासी ,तेचि दासा आणि दासी |

तुका म्हणे सांगू किती, तोचि भगवंताच्या मूर्ती ||

जे आयुष्यात त्रासलेले पिडलेले आहेत, त्यांना जो आपले म्हणतो म्हणजे समजून घेतो, त्याला मदत करतो,  तोच सज्जन असतो म्हणजेच त्याच्याच ठिकाणी देव असतो इतका साधा सरळ आणि सोपा भक्तीचा मार्ग त्यांनी अभंगातून सर्व सामान्य लोकांना सांगितला. तुकोबांच्या अशा सोळा अभंगाचा महात्मा गांधी यांनी येरवडा तुरुंगात कारावास भोगत असताना १९३० मध्ये इंग्रजीत अनुवाद केला होता. त्यांच्या विचारांवर ही तुकोबारायांचा प्रभाव होता असे दिसते. जे का रंजले गांजले ... या अभंगाचा अनुवाद तो असा-

Know  him to be a true man who takes to his bosom those who are in distress. Know that God resides in the heart of such a one. His heart is saturated with gentleness through and through. He receives as his only those who are forsaken. He bestows on his man servants and maid servants the same affection he shows to his children. Tukaram says:  What need is there to describe him further? He is the very incarnation of divinity... 15.10.1930

  

 संत तुकाराम महाराजांनी चुकीच्या गोष्टींवर आणि दांभिकपणावर अभंगातून रोखठोकपणे प्रबोधन केले आहे. जे आजही लोकांना उपयोगी पडेल, पटेल. प्रतिकूल सामाजिक परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागले होते. पण तरीही त्यांनी समता आणि मानवता हीच शिकवण समाजाला दिली आणि संदेश दिला की, 

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद भ्रम अमंगळ ||

त्यांच्या कुठल्याही अभंगात त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने परिस्थिति समजावून सांगितली आहे. त्या भाषेत कुठलेही अलंकार वापरले नाहीत, फुलोरा नाही ,अशी अनेक उदाहरणे आहेत.

नाही निर्मळ मन, काय करील साबण |

आपल्याला या शब्दांचा अर्थ लगेच, त्या क्षणीच समजतो.साबण अत्तरे, सेंट, आजचे बाजारात उपलब्ध असलेले बॉडी स्प्रे, डिओडरंट कितीही अंगावर फुंकरले तरी मन निर्मल किंवा शुद्ध नसेल तर, मनात वाईट विचार असेल तर, त्या फवार्‍यांचा उपयोग काय? आजच्या छानछौकीच्या जगात किती किती खरं आहे हे . आजच्या जाहिरात युगात बेधुंद वावरणार्‍या लोकांनी तुकोबांनी सांगितलेल्या गोष्टींचा विचार जरूर करावा .   

                                                                              किंवा

वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं वनचरें |

पक्षी ही सुस्वरे आळविती ||

येणें सुखे रुचे एकांतचा वास |

नाही गुण दोष अंगा येत ||

आकाश मंडप पृथूवी आसन |

रमे तेथे मन क्रीडा करी ||

कंथा कुमंडलू देह उपचारा |

जाणवितो वारा अवसरू ||

हरिकथा भोजन परवडी विस्तार |

करोनी प्रकार सेवूं रुची ||

तुका म्हणे होय मनासी संवाद |

आपुलाची वाद आपणांसी ||

 तुकोबांनी या रचनेतून पर्यावरणा संबंधी वर्णन केले आहे. शेकडो वर्षापूर्वीचे हे वर्णन निसर्गातील सान्निध्यामुळे कसा प्रसन्न व सुखकारक असा एकांत मिळतो. निसर्गातील प्राणी, पक्षी, लता, वेली, झाडे, वारा, पाणी याबरोबर आपण एकरूप झाल्यावर ते आपल्याशी संवाद साधतात. त्यांच्यात व आपल्यात एक नात्यांचा बंध तयार होतो. आज पर्यावरण हा विषय आता शाळेपासून मुलांना आणि माणसांना सुद्धा शिकवण्याची वेळ आली आहे. मनुष्याने भौतिक प्रगतिच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास केला आहे, त्या काळात हे काहीही नव्हतं तेंव्हाचं  हे सुखद वर्णन नक्कीच माणसाला धडा घेण्यासारखे आहे. त्यांच्या निसर्ग विषयक काव्यामद्धे कावळा.कोंबडा,तितर,घार, घुबड, चकोर,चातक, पारवा, पोपट, बगळा,मोर ससाणा,सारस, हंस,राजहंस यांचा समावेश आहे. या उपमा ते आपल्या मन:स्थितीला देतात .  

                                   सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा  | गाय ते कोकिळा वसंतेसी|

तैसे माझे मन एकविध जाले , नवडे विठ्ठलेविण दुजे |

                                                                          आणि

                             भेटीलागी जीवा लागलीसे आस ,पाहे रात्री दिवस वाट तुझी |

पूर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन  तैसे माझे मन वाट पाहे |

 त्यांच्या जीवनात एक अत्यंत लहान पण महत्वाचा प्रसंग घडला. एकदा तुकोबा एकादशी निमित्त आळंदीला संत ज्ञानेश्वरांच्या दर्शनाला गेले होते. वाटेत शेतात कणसे डौलाने डोलत होती, त्यावर पाखरांचा थवा मनसोक्त दाणे टिपत होता. जवळ येताच त्यांच्या हालचालीमुळे पक्षांचा थवा उडून गेला, आपल्याला पाहताच पक्षी उडून गेल्याचे कळल्यावर तुकोबा मनातून दु:खी झाले. त्यांच्या मनात आलं आपल्याला पक्षी घाबरून उडाले? त्यांना आपलं भय वाटलं?असं का? आपणही चैतन्यमय आणि पाखरं सुद्धा चैतन्याचाच अविष्कार.जोंधळ्याची कणसं निसर्गातलं चैतन्यच. तुकोबांचं अंत:करण हेलावून गेलं. ते मनात म्हणाले,

अवघी भूते साम्या आली | देखिली म्या कै होती ||

आपली भीती कुणालाही वाटू नये, चैतन्यमय वाटणारे सर्व भूतमात्र यांचा अनुभव आपल्याला सर्व सारखाच यावा . जो जो आपल्याला भेटेल तो आपल्याला स्वत:प्रमाणेच वाटावा.  

अध्यात्माचा अभ्यास, मनन  चिंतन आणि गीता,भागवत. ज्ञानेश्वरी, संतांच्या गाथा, रामायण या सर्वांचा त्यांचा व्यासंग होता. यातूनच ते काव्यातून आपले विचार मांडू लागले, लोक जागृती करू लागल्याचे दिसते. असे म्हणतात की पांडुरंगाने नामदेवांसहित स्वनात येऊन, नामदेवांची शतकोटी अभंगाची संख्या अपुरी राहिली आहे, ती तू पूर्ण कर असा तुकोबांना दृष्टान्त दिला आहे. आणि तुकोबा अभंग लिहू लागले.

नामदेवे केले स्वप्नामाजी जागें सवें पांडुरंगे येउनियां |

सांगितलें काम करावें कवित्व | वाउगें निमित्य बोलों नको ||

या अभंगांचा कै. दिलीप चित्रे यांनी अनुवाद केला आहे तो विश्व साहित्य कोशात घेतला आहे. तुकोबा या अर्थाने जागतिक पातळीवर पोहोचले आहेत.संत तुकाराम महाराज यांचे गाथेतले अभंग जवळ जवळ पाच हजारांवर आहेत.

हे सर्व अभंग म्हणजे त्यांनी घेतलेल्या अनुभवांची शिदोरी आहे. शुद्ध परमार्थ धर्म कसा असला पाहिजे त्याचे मार्गदर्शन आहे. समजातल्या विसंगतीवर, अपधर्मावर,कर्मकांडावर, आणि दिसत असलेल्या थोतांडावर त्यांनी चांगले कोरडे ओढले आहे.

याशिवाय त्यांच्या अभंगातून मनुष्य जीवनातील भावनिक कल्लोळ ,मानसिक ताणतणाव व होणारी उलघाल .संघर्ष ,आपली मूल्ये या सगळ्यांचे दर्शन होते. म्हणून सामान्य लोकांना हे अभंग किंवा या कविता आपल्या वाटतात.  

बहिणाबाई शिऊरकर म्हणतात, तुकोबाचे हात लिहिताती जे जे | ते ते सहजे पांडुरंग ||

बहिणी म्हणे लोक बोलती  सकळ तुकोबा  केवळ पांडुरंग

 मराठी साहित्यात संत तुकाराम महाराज यांच्या गाथेचे महत्वाचे स्थान आहे. त्यातले संदर्भ वैश्विक आहेत असे अनेक अभंगावरून लक्षात येते. आपला तो वारसा आहे.

हे सर्व अभंग त्या काळात मौखिक स्वरूपातच निर्माण झाले . ते टाळमृदुंगाच्या तालावार ऐकणे म्हणजे  म्हणजे ब्रम्हानंदी लीन होण्याचा श्रोत्यांनी अनुभव घेणेच आहे. पंडित भीमसेनजींच्या आवाजात ते ऐकताना हाच अनुभव आपण घेतो. पुढील काही शेकडो वर्षे या अभगांचा प्रभाव लोकांवर पडलेला आहे.

अनेक लेखकांनी आणि साहित्यिकांनी तर विल्यम शेक्सपियर आणि तुकोबांची तुलना केली आहे, साम्य दाखविले आहे. नावात काय आहे? असे शेक्सपियर विचारतो, तसे तुकोबा पण म्हणतात,

तुका म्हणे राजहंस ढोरा नावें, काय तया घ्यावे अळंकाराचे || म्हणजे एखाद्या बैलाचे नाव राजहंस ठेवले, तर त्या बैलाला या अलंकारिक नावाचा काय उपयोग आहे? अशा अनेक जागतिक उदाहरणातून तुकोबांची तुलना होते. साधर्म्य दिसते. ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांनीही असेच मत त्यांच्या कवितेत व्यक्त केले आहे. विंदांनी तर दोघांची भेटच घडवली आहे. बघा-  

तुकोबाच्या भेटी| शेक्स्पीअर आला |
तो झाला सोहळा| दुकानात ||
जाहली दोघांची| उराउरी भेट
|
उरातले थेट| उरामध्ये ||
तुका म्हणे "विल्या,| तुझे कर्म थोर |
अवघाची संसार| उभा केला" ||
शेक्स्पीअर म्हणे, | "एक ते राहिले
|
तुवा जे पाहिले | विटेवरी"||
तुका म्हणे, "बाबा| ते त्वा बरे केले
|
त्याने तडे गेले| संसाराला ||
विठ्ठल अट्टल |त्याची रीत न्यारी |
माझी पाटी कोरी | लिहोनिया"||
शेक्स्पीअर म्हणे,| "तुझ्या शब्दांमुळे
|
मातीत खेळले| शब्दातीत"||
तुका म्हणे, "गड्या| वृथा शब्दपीट |
प्रत्येकाची वाट |वेगळाली ||
वेगळीये वाटे| वेगळाले काटे |
काट्यासंगे भेटे| पुन्हा तोच
||
ऐक ऐक वाजे| घंटा ही मंदिरी
|
कजागीण घरी| वाट पाहे"||
दोघे निघोनिया| गेले दोन दिशा|
कवतिक आकाशा| आवरेना||
...      विंदा करंदीकर

अशा या तुकोबारायांची पालखी आषाढीवारी साठी देहुतल्या देऊळ वाड्यातून प्रस्थान ठेवते. वारकरी विठ्ठल माय होऊन जातात.

नाचत पंढरिये जाऊ रे खेळिया |

विठ्ठल रखुमाई पाहू रे ||

असे पंढरीला गेलेले भक्त आणि पंढरीचे वर्णन तुकोबाराय करतात,



खेळ मांडियेला वाळवंटी घाई  

नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान केला पावटनी
एका एका लागतील पायी रे ||

गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा  
हार मिळवती गळा रे
टाळ मृदुंग घाई पुष्पाची वरुषाव
अनुपम्य सुख सोहळा रे ||

महाकवी तुकोबाराय यांना साष्टांग प्रणीपात |

|| जय जय रामकृष्ण हरी ||  

 

© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .

 -----------------------------------------

No comments:

Post a Comment