Tuesday, 20 July 2021

संत विष्णुदास

 

                                                      || निर्गुण वारी अभंगमाला ||

                                            संत विष्णुदास  (कृष्णा रावजी धांदरफळे)

(जन्म-१८४४ ,धांदरफळ,नगर ,समाधी-१९१७ माहूर)

  


कुलस्वामिनी रेणुका माता माहुरगड ही अनेकांची कुलदेवी आहे. तिचा आणि गडावरच्या श्री दत्तात्रेयांचा भक्त म्हणजे श्रीमत्परमहंस परिवराजक श्री सद्गुरू पुरुषोत्तमानंद सरस्वती उर्फ विष्णुदास महाराज. संत कवि विष्णुदास . लहानपणापासूनच त्यांना हरिभक्तीचा सत्संगाचा आणि कीर्तन प्रवचनाची ओढ होती. त्यांनी गुरुचरित्राची पारायणे लहान असताना केली होती. नरसोबावाडी गेले असताना श्री दत्तात्रेयांची पदे, अष्टके म्हणण्यचे अवीट सुख त्यांना मिळाले होते .  लग्न झाल्यानंतरही त्यांचे मन संसारात रमेना . त्यांना संतसंगतीत राहावे, तीर्थक्षेत्री जावे, हरिभजनात वेळ घालवावा असे वाटे. त्या प्रमाणे ते गुरुमंत्र घेऊन संसारा पासून दूर झाले. देव भेटावा एव्हढीच ओढ होती, त्या नुसार ते गावोगावी हिंडत होते.

कांता कांचन राज्य वैभव नको ।
कैवल्यही राहुं द्या ।
होऊ द्या अपदा, शरीर अथवा ।
काळासी हीराउं द्या ॥
पाहूं द्या रुप एक वेळ नयनीं ।
ही माझि आराधना ॥
स्वामी दत्ता, दयाघना अवधुता ।
श्रीअत्रिच्या नंदना ॥

या ओढीने ते तीर्थयात्रेला निघाले . पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, विजापूर,धारवाड, हुबळी,हम्पी, आस करत करत ते श्री क्षेत्र बासर येथे पोहोचले. इथल्या सरस्वतीच्या दर्शनाने ते प्रसन्न झाले तिथे त्यांनी आरती लिहिली आणि इथेच त्यांचे काव्य सुरू झाले. भक्ति हाच विषय त्यांनी काव्यासाठी निवडला. पुढे ते माहुरला आले. ध्यानधारणा, सुरू झाली. दत्तभेटीच्या ओढीतून माहुरला आल्यावर ते रेणुकाभक्त झाले. लौकिकाची आस त्यांना नव्हती. भौतिक सुखांची अपेक्षा करणार्‍याच्या यादीत विष्णुदासांना मात्र फक्त दर्शनाची,  भेटीची आणि सहवासाची आशा होती. त्यांच्या काव्यातून दत्तभक्तीच्या अनेक छटा दिसतात.

 उठि उठि गा दत्तात्रया । तूं सुखदायक लोकत्रया || ही भूपाळी,श्रीगुरु द्त्तात्रय माऊली । विष्णुस्वामी म्हणे पावली । स्मरतां अविलंबें धांवली । सामावली मजमार्जी ॥’ हे कवन यातून दत्ताचे दर्शन त्यांनी भक्तांना घडविले.   

त्यांना तहान भूक विश्रांति काही सुचेनसे झाले होते. फक्त दत्तात्रयाचा ध्यास मनात होता. मग तरीही दत्तात्रेय आपल्याला का भेटत नाहीत? ते दत्तात्रयांना स्पष्टच विचारतात,

तू तो समर्थ दत्त दाता |

नाम सोडिले का आता ?

जगन्माते लेकुरवाळे |

काय निघाले दिवाळे?

कृपासिंधू झाला रिता |

कोण्या अगस्ती करिता |

सुकीर्तीची साठवण |

काय नाही आठवण?

भागीरथी का बाटली?

कामधेनु का आटली?

चंद्र थंडीने पोळला,

कल्पवृक्ष का वाळला?

विष्णुदास म्हणे कनका,

ढंग लावू नका नका ||

 त्यांनी आपल्या आध्यात्मिक साधनेने, अधिकाराने महाराष्ट्राच्या संत मालिकेत आपले नाव स्थिर केले. त्यांनी जे आध्यात्मिक चिंतन केलं, अभ्यास केला. मनन केलं त्यातून स्वत:ची एक बैठक तयार केली.

विष्णुदास यांनी श्लोक, देवदेवतांच्या आरत्या,अष्टके, अभंग यातून आपल्या अनुभावातून लिखाण केले. त्या शिवाय त्यांनी पोवडे, लावणी, नाटक, चरित्र हे लेखन प्रकार सुद्धा हाताळले. हरिकथा आणि भागवत कथा हे भागवत धर्माच्या भक्तांचे अगदी आवडते विषय. विष्णु दास यांनी हे हरिकथा आणि हरिप्रिया कथा विषय पण लिहिले. त्यांनी आख्यान .काव्या, पद रचना. कटाव,लिहिले . हरीकथे मध्ये त्यांनी श्रीकृष्ण लीला सांगितली आहे. त्यात त्यांनी अनेक प्रसंग, श्रीकृष्णाचा धावा, रासक्रीडेचे पद,गोपीचा शोक असे लिहिले आहेत. त्यांकया अरत्या आणि अष्टके सर्व देवीच्या मंदिरात चालित गायले जातात. मराठवाड्यात ग्रामीण भागात नाट्य चळवळ उभी करण्यात विष्णुदास यांचे महत्वाचे योगदान होते.

विष्णुदास यांनी सुरूवातीला नाटके आणि लावण्या लिहिल्या. त्या खूप प्रसिद्ध झाल्या. पण नंतर आध्यात्मिक वळणावर आल्यावर ते लिखाण थांबले. त्यांनी एका काव्यात म्हटले आहे,

तदनंतर मातापुरी केला बहू नाटक छंद

मोडिली कविता कटिबंध ||

गायिका उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं माझी रेणुका माऊली हे संत विष्णूदासांचं गीत सर्वांच्या परिचयाचं आहे. 

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली
जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली

हाके सरशी घाई घाई
वेगे धावतची पाई 
आली तापल्या उन्हात नाही आळस मनात
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली

खाली बैस घे आराम
मुखावरती आला घाम
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली

माझी रेणुका माउली, माझी रेणुका माउली
माझी रेणुका माउली, माझी रेणुका माउली

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली
कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली

संत कवी असलेले श्री विष्णुदास हे सर्वांना अल्पपरिचित आहेत . श्री टेंबे स्वामीसारख्यांचा सहवास आणि इतर साधू संतांचा सहवास त्यांना लाभला .भक्तिमय वातावरणात ते माहुर येथे आनंदात राहिले.तिथेच त्यांनी अखेरची विश्रांति घेतली.

                                              || जय जय रामकृष्ण हरी ||  

 

© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .

                                               -------------------------

No comments:

Post a Comment