Tuesday, 6 July 2021

संत गोरा कुंभार

 



|| निर्गुण वारी अभंगमाला ||

संत गोरा कुंभार

 (जन्म- १२६७, तेर, ते मृत्यू(समाधी)- १३१७,तेर)

आई –रखुमाई ,वडील- माधवबुवा

                                            
 
       महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातले संतांमध्ये जेष्ठ असलेले गोरोबा, पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते.संत ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज यांच्याच काळातले ते संत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर गावी ते राहत.त्यांच्या जन्माचा उल्लेख ग्रंथात आहे .

कुल्लाळवंशी एक जाण |

महादू कुंभार नामाभिधान |

तया गावीचे वतन |

करी भजन श्रीहरिचे |

तया पोटी झाला सुत |

गोरा कुंभार जगविख्यात |

अकराशे एकोण्णवदात |

प्रभव नामसंवत्सर ||

       त्यांचे घराणेच धार्मिक आणि सदाचारी वृत्तीचे होते. परंपरेने गरत विठ्ठल भक्ति होती आणि वडील शिवभक्त ही होते. त्यांचे वडील माधवबुवा गावकर्यांमध्ये संत म्हणूनच ओळखले जायचे.त्यामुळे गोरोबांवर धार्मिक संस्कार होतेच. आई वडिलांच्या कष्टाच्या कुंभार कामात गोरोबही काम करू लागले. दूरवरून गाढवावरून माती वाहून आणणे, कुंभारवाडयात माती मळणे, मडकी गाडगी तयार करणे,ती विकणे व अर्थाजन करणे असे काम सुरू झाले. वडिलांना त्यांचे खूप कौतुक वाटे. किती छान काम करतोस ,कष्ट करतोस, पण देवाला मात्र विसरू नकोस, गोरोबही काम करून झाले की, देवळात जाऊन देवाची भक्ति करत असे. आई राखूमईला ही गोरोबा देवळात जाऊन भक्ती करतो म्हणून आनंद वाटायचा . ती म्हणायची, “गोरोबा तू चांगल्यांच्या सहवासात रहा, भक्तांकडून चांगल्या गोष्टी शिक”.गोरोबा मोठा झाला तसं रखुमाईने माधव बुवांना सांगितलं, ‘पोरगं कळतं झालय, सोयरीक पहा की आता, जोडीदारीण आणली तर कष्टाळू पोराला तेव्हढीच मदत होईल’.आणि गोरोबांचं लग्न होऊन पत्नी संती घरात आली.ती सुद्धा कष्टाळू. गोरोबा आध्यात्मिकतेकडे लक्षं देऊ लागले. संती पण विठ्ठलभक्त होती.

“तुझे रूप चित्ती राहो | मुखी तुझे नाम ||

देह प्रपंचाचा दास | सुखे करी काम ||

देहधारी जो तो त्याचे | विहित नित्यकर्म ||

तुझ्या परी वाहिला मी | देहभाव सारा ||

उडे अंतराळी आत्मा | सोडुनी पसारा ||

नाम तुझे घेतो गोरा | होऊनी निष्काम ||

   हा प्रसिद्ध अभंग त्यांचाच. कोणीही शुद्ध भावाने वारकरी पंथात यावे कपाळी बुक्का लावावा आणि गळ्यात माळ घालावी, नामस्मरण करत आपले जीवन सुरू ठेवावे, शुद्ध अंत:करणात देवाची भक्ति फुलली म्हणजे तिचा दरवळ सगळीकडे पसरतो. असा विचार ते अभंगातून मांडतात. त्यांचे तेवीस अभंग आहेत .

      त्यांना वडिलकीच्या नात्याने सर्वजण गोरोबा काका म्हणूनच हाक मारीत. त्यांचा परंपरागत व्यवसाय कुंभार व्यवसाय होता. प्रपंच आणि हा व्यवसाय सांभाळून भागवत धर्माचा प्रसार करण्याचं काम ते करत. शिवाय संतांचा सहवास पण त्यांना लाभत होता. कुटुंबाची दरवर्षी वारीला जायची परंपरा गोरोबा नियमितपणे चालवत होते. त्यांच्या मते आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असतो. तो कुठेही राहत असला तरी दैनंदिन कामे करून, सतत मनात मानवाच्या कल्याणाचा ध्यास त्याच्या मनात असला पाहिजे, कोणत्या जातीत जन्माला आला ते महत्वाचे नाही तर त्या देहाचे सार्थक करणे महत्वाचे आहे. चांगल्यांचा सहवास आणि भक्तीची जाणीव असणं आवश्यक आहे. ते स्वत: काम करताना भक्तिरसात बुडून जाऊन बेभान होऊन काम करत असत. त्यांना कशाचेही भान उरत नसे. असे अनेक प्रसंग घडल्याचे आपण अनेक कथांमधून ऐकले आहे. संत गोरा कुंभार या चित्रपटात सुद्धा हा प्रसंग दाखवला आहे.

     एकदा त्यांची बायको, त्यांना मुलाकडे लक्ष द्यायला सांगून पाणी आणण्यासाठी निघून गेली.त्यावेळी गोरोबा चाकावर मडकी घडविण्याचे काम करत होते ,तोंडाने नामस्मरण सुरू होते उन्मनी अवस्थेत त्यांचे माती तुडविण्याचे काम चालू असताना ते बाळ त्या माती आणि पाण्याच्या चिखलात केंव्हा तुडविले गेले याचे गोरोबांना भान नव्हते. बायको आल्यानंतर बघते तर काय आपलं बाळ पायाखाली तुडवलं जाऊन गतप्राण झालेलं. गोरोबांनी जेंव्हा तिचा हंबरडा ऐकला तेंव्हा ते भानावर आले .काय झालं? समोरचं ते दृश्य बघून आपण काय करून बसलो हे लक्षात आल. खूप पश्चाताप झाला.याच्याही आख्यायिका सांगितल्या जातात. त्यांचे चरित्र म्हणजे मौखिक परंपरेतून टिकलेले साहित्य आहे. आणखी एक प्रसंग सांगतात. गोरोबांनी संतांची एक परीक्षा घेतल्याचा. तो असा, तेर धोकी येथे निवृत्तीनाथ ,ज्ञानोबा,सोपानदेव,मुक्ताबाई,नामदेव,चोखामेळा ,विसोबा खेचर या संतांचा मेळा जमला होता,या वेळी ज्ञानोबांच्या म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून ‘कोणाचे मडके (डोके)किती पक्के’ अशी प्रत्येकाच्या डोक्यावरू मारून परीक्षा घेतली होती.

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशोधडी आपणियाशी ॥१॥
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं, मायबापा ॥२॥
एकत्व पाहतां अवघें लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें, मायबापा ॥३॥
म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा
तुम्हा आम्हा ठावा कैसे काय, मायबापा ॥४॥

       या अभंगातून त्यांच्या आध्यात्मिक अवस्थेचे आपल्याला दर्शन होते. निर्गुण निराकार परमेश्वरचा संगतीने आपण अंतर्बाह्य बदलून जातो. देशोधडीला लागतो म्हणजे व्यक्तिमत्वात परिवर्तन होते. परमेश्वराचे चिंतन केल्याने अनुभावातून आपल्याला सगळीकडे परमेश्वर दिसू लागतो. म्हणजे आपला दृष्टीकोण बदलतो असे गोरोबा सांगतात.अशी अवस्था सर्वच संतांची झाली आहे , नामस्मरणामुळे परमेश्वरशी आपण एकरूप होतो त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे भगवंताचे रूपच दिसू लागते .अशा उन्मनी अवस्थेचा अनुभव सतत गोरोबांनी घेतला होता.
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे ।
तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥

मज रूप नाहीं नांव सांगू काई ।
झाला बाई काई बोलूं नये ॥

बोलतां आपली जिव्हा पैं खादली ।
खेचरी लागली पाहतां पाहतां ॥

ह्मणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखीं मिठी पडली कैसी ॥

आणि

केशवाचे भेटी लागलेसे पिसे,
विसरलो कैसे देहभान
झाली झडपणी झाली झडपणी
संचरले मन आदी रूप
न लिंपेचि कर्मी न लिंपेची धर्मी
न लिंपे गुणधर्मा पुण्यपापा
म्हणे गोरा कुंभार सहज जीवनमुक्त
सुखरूप अद्वैत नामदेव

या दोन्ही अभंगातून गोरोबा कसे एकरूप होत होते हे कळते.

     माणसाने जे काम हाती घेतले ते किती एकरूप होऊन करावे की त्यात कोणताच स्वार्थ असू नये, याचे संत गोरोबा हे उदाहरण आहे. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात भक्तिरस भरलेला आहे हे त्यांच्या अभंगावरून दिसते. त्यांच्या अभंग रचना कमी असल्या तरी त्या समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथे आहेत.

                                       
 संत गोरा कुंभार यांनी २० एप्रिल १३१७ मध्ये समाधी घेतली. हे समाधी मंदिर तेर ढोकी ,उस्मानाबाद येथे आहे.

|| जय जय रामकृष्ण हरी ||



© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .

------------------------------

No comments:

Post a Comment