|| निर्गुण वारी अभंगमाला ||
संत ज्ञानेश्वर
(१२७५-आपेगाव
ते १२९६-आळंदी)
आई-रुक्मिणी बाई,वडील-विठ्ठलपंत कुलकर्णी
संत ज्ञानेश्वर- भागवत संप्रदायचे प्रवर्तक, योगी आणि तत्वज्ञ. सातशे आठशे वर्षापासून सर्व स्तरातील,सर्व पिढीतील समाजाच्या मनात अढळ श्रद्धास्थान म्हणून आजही कायम असणारे आणि पुढच्या पिढीतही ते अढळ राहणारे एकमेवाद्वितीय संत ज्ञानेश्वर !
भावार्थदीपिका, (ज्ञानेश्वरी) अमृतानुभव .चांगदेव पासष्टी,
हरिपाठाचे अभंग अशा त्यांच्या काव्य रचना. समाजातल्या सर्व थरातल्या सामान्य
लोकांना नीट समजले पाहिजे म्हणून सोप्या भाषेत अध्यात्म समजावून सांगीतलेले ज्ञानेश्वर
सर्वांना आजही आध्यात्मिक प्रेरणा देतात. ही प्रेरणा आणि मराठी संस्कृतीवर असलेला
प्रभाव आजही आपली साक्ष देतो. त्यांनी संस्कृत भाषेतले गीतेचे ज्ञान मराठी
माध्यमात, प्राकृत भाषेत आणले. मराठीतले हे श्रेष्ठ वाङ्गमय
समजले जाते.
‘अखंड तेवत राहणारा चमत्कार तुला करायचा आहे’, असे गुरु निवृत्तीनाथ यांनी ज्ञानाला सांगितले. तो चमत्कार म्हणजे, “आपले मार्गदर्शक तत्वज्ञानाचे ग्रंथ वेद, श्रुति, शास्त्रे, भागवत, रामायण
महाभारत हे सर्व संस्कृत मध्ये आहेत, ते आपल्या जनतेला समजत
नाही, त्यामुळे धर्माचे महत्व ही कळत नाही. म्हणून ते मागे
पडतात. तेंव्हा हे तू प्राकृत भाषेत लोकांना समजावून सांग”. गुरूंनी दिलेली आज्ञा
मानून दुसर्याच दिवशी ज्ञानदेवांनी हातात लेखणी घेतली आणि-
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशू । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवॄत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ती सुवेष ।
जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥
भगवदगीतेवरील भाष्य भावार्थदीपिका
म्हणजेच ज्ञानेश्वरी अठरा अध्यायात सर्व सामान्यांसाठी तयार केला. यावर आजपर्यंत
अनेकांनी जुन्या प्रतींवर संशोधन केलं आहे. मराठीतला हा सर्व श्रेष्ठ ग्रंथ मानला
जातो. हा ग्रंथ हिन्दी, तामिळ, कन्नड इंग्रजी अशा एकूण एकवीस भाषांमध्ये भाषांतरित झाला आहे.याचा शेवट
हा पसायदान आहे . जे ज्ञंनेश्वरांनी विश्वाच्या कल्याणासाठी मागितले होते. इंग्रजीमध्ये
जसा शेक्सपियर श्रेष्ठ वाटतो तेव्हढे मराठी भाषेत ज्ञानेश्वर आहेत. ज्ञानेश्वरी हा
गीतेवर चढवलेला अलंकार आहे असे मानतात.
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
यात मराठी भाषेचा अभिमान आणि महत्व त्यांनी सांगितले आहे.
तर ज्ञानयोग,भक्तियोग कर्मयोग याबद्दल ९०००
ओव्या आहेत. अमृतानुभव हा ग्रंथ तर तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे, हरिनामाचे
महत्व सांगणारा हरिपाठ आहे. जेष्ठांच्या प्रत्येकाच्या तोंडी आजही हा हरिपाठ आहे. स्फुट
काव्ये ज्यात अभंग आणि विराण्या आहेत .
भक्तीचे अनेक प्रकारे वर्णन ज्ञंनेश्वरांनी त्यांच्या अभंग
रचनेतून केले आहे.
घनु
वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा ।
भवतारकु
हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥ १ ॥
चांदु वो
चांदणे । चांपे वो
चंदने
।
देवकी
नंदनेविण | नावडे वो ॥ २ ॥
चंदनाची
चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो
वनमाळी । वेगीं भेंटवा का ॥ ३ ॥....
अध्यात्म
ज्ञान सांगण्यासाठी ज्ञंनेश्वरांनी काव्याचा आधार घेतला. कारण वेदांतासारखा विषय
सामान्य लोकांना समजावणे अवघड होते . या काव्यातून त्यांनी विचार मांडण्यासाठी अनेक
दृष्टान्त आणि उपमा दिले, जे लोकांना सहज समजतील. धर्माला अनुसरून
जगातले व्यवहार चालावेत म्हणून धर्माचे तत्व सर्वसामान्यांना कळावे अशी तळमळ
ज्ञानेश्वरांना होती. स्वधर्म नाहीसा झाला तर सर्व सुखच नाहीसे होईल असे
ज्ञानदेवांना वाटे. सुख कशाला म्हणतात, ते कसे प्राप्त करायचे, साधन काय याचे वर्णन त्यांच्या अभंगातून,
ज्ञानेश्वरीतून आले आहे. प्रपंच आणि परमार्थ सुद्धा यातून ते सांगतात.
सर्व संतांनी त्यांच्या
अभंगातून समाजाला बंधुभाव, सामाजिक सौख्य,भक्तिमार्ग यांची शिकवणूक दिली आहे. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ .. असे म्हणत विश्वाची
काळजी वाहणार्या संत ज्ञानेश्वर यांनी धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. भागवत
धर्म आणि वारकरी संप्रदायचा पाया रचला. संत नामदेव, संत
सावता माळी, संत गोरोबा कुंभार, संत
नरहरि सोनार, संत चोखा मेळा यांचे अनौपचारिक नेतृत्व त्यांनी
केले. समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. धर्मप्रसाराचं कार्य केलं. वांड्गमय निर्मितीचं कार्य केलं.
आध्यात्मिक लोकशाहीचं बीज पेरलं. संत नामदेव, चोखामेळा, सावता
माळी, नरहरी सोनार, आणखी काही भक्तगण
यांच्याबरोबर या चारही भावंडांनी तीर्थाटन केलं. येता येता पंढरीस जाऊन आले. आता
आपले काम संपले आहे असे त्यांना वाटू लागले. निवृत्ती नाथांनी आपल्या लहानग्या
शिष्याचे, ज्ञानोबाचे ‘ज्ञानेश्वर
महाराज’ घडविले होते. जेंव्हा ज्ञानेश्वरांनी समाधी
घेण्याचे ठरविले. निवृत्तीनाथ म्हणाले, “ज्ञाना, तू माझ्यापेक्षा लहान आहेस, मी तुझा गुरु आहे.
तेंव्हा तुझ्या आधी मला समाधी घ्यायला हवी. पण तू माझ्या आधी जात आहेस”.
ज्ञानाने त्यांना समजावून
सांगितले की, आजपर्यंत
तुम्ही दाखवलेल्या वाटेवरूनच मी चालत आलो आहे. आता पर्यन्त मी परमेश्वराची अनेक
रुपे पाहिली. आता मला त्याला भेटण्याची ओढ लागली आहे. तुम्ही दिलेल्या मार्गानेच
मी आजही जात आहे”. या बातमीने सर्वांच्या दु:खाचा आवेग वाढतच होता. ज्ञानेश्वरांनी
कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८ ला आळंदीला सर्वांसमक्ष
इंद्रायणीकाठी संजीवन समाधी घेतली. भजन कीर्तन अभंगाच्या नामघोषात, टाळ मृदंगांच्या अखंड गजरात भावाबहीणींची भेट घेऊन ज्ञानोबा समाधीस्त
झाले! निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे ज्ञाना पावन झाला ! ज्ञाना पावन झाला !
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी
पावन ।|
तुझें तुज ध्यान कळों आले
तुझा तूंचि देव तुझा
तूंचि भाव
फिटला संदेह अन्यतत्वी||
निवृत्ति परमानुभव नेमा
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन||
|| जय जय रामकृष्ण हरी ||
© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .
---------------------------------------------
No comments:
Post a Comment