नदी आणि संस्कृती
गंगेच यमुनेचैव, गोदावरी सरस्वती,
नर्मदा, सिंधू, कावेरी, जलेस्मिन् सन्निधिं कुरु ,
पापोहं पापकर्माहं, पापात्मा पाप संभवः
पाही
माम् कृपया गंगे, सर्व पाप हरा भव.
“हे पाण्याने संपूर्ण, परिपूर्ण भरलेल्या समुद्रासहित सर्व नद्यांनो आमचे कल्याण करा” असे म्हणत नद्यांना प्रणाम करून आपले जीवन सार्थकी लागल्याची भावना प्रत्येकाची असते आणि अशी परंपरा, प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.
आपल्या वैदिक काळातल्या साधुसंतांनी, ऋषीमुनींनी, आचार्यांनी नदीकडे केवळ पाण्याचा एक प्रवाह म्हणून न पाहता एक ईश्वरी आविष्कार म्हणून पाहिले आहे. या काळातले नदीचे स्वरूप असे होते की नदीच्या दर्शनाने, पवित्र सात्विक भाव उचंबळून यावेत आणि स्तोत्ररूपी काव्ये सुचावीत. नद्यांचं अस्तित्व आणि त्याचे आपल्या जीवनातले महत्त्व यामुळे नद्यांविषयीची श्रद्धा आपण विशेष प्रयत्नाने हजारो वर्षे जतन करून ठेवली आहे. गोदावरी नदी प्रमाणे इतर नद्याही म्हणजे
सिंधु, गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा या नद्या पण स्तोत्रांचा विषय
झाल्या आहेत. भारतातील मुख्य आणि पवित्र मानलेल्या दैवतरूपी मानलेल्या नद्यांची
स्तोत्रे रचली गेली आहेत. आप, पर्जन्य आणि सरिता अशी सुक्ते
रचली गेली. वेदकाळाप्रमाणे पुराण काळातही महर्षि वाल्मिकी यांचं गंगाष्टक, याज्ञवल्क्य यांची सरस्वती प्रार्थना, महर्षि
व्यासांचं गंगादशहरा स्तोत्र, मार्कंडेय यांचं स्कंदपुरणातलं
नर्मदास्तोत्र आणि वामन पुराणातलं सरस्वती स्तोत्र,
शुकदेवांचं कल्की पुराणातल गंगास्तवन, अशी नद्यांची स्तोत्रे
रचली गेली.
एव्हढंच नाही तर, इतिहासात पण सहाव्या शतकात भगवान आद्य
शंकराचार्य, महाकवी कालिदास, तुलसीदास, जगन्नाथ पंडित, वामन पंडित,
कविवर्य मोरोपंत, यांनी नदीवर काव्य,
स्तुति, स्तोत्र लिहिलेली आहेत. नद्यांबद्दलचा आदरभाव अनेक
साधकांनी आणि कवींनी पण आधुनिक काळात आपल्या साहित्यातून व्यक्त केला आहे. उदा.वासुदेवानंद
सरस्वती, दासगणू महाराज, स्वातंत्र्यवीर
सावरकर, ग. दि. माडगूळकर ही ऊदाहरणांची माळ ओवण्याचे कारण
म्हणजे आपली संस्कृती जेव्हढी प्राचीन, तेव्हढाच प्राचीन
इतिहास नद्यांचाही दिसतो. हे प्राचीन उल्लेख म्हणजे नदीचे महत्त्व आणि अस्तित्व
सांगणारे पुरावे आहेत.
जगातील सगळीच संस्कृती नदीच्या काठावर व
आजूबाजूच्या सुपीक प्रदेशात वसलेली आढळते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ टायग्रीस,
युफ्रेटिस, सिंधू, हवांग, नाईल या नद्यांच्या काठी साडेचार हजार ते दहा हजार
वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. पश्चिम युरोपात नद्यांच्या काठी १३ राजधान्या
होत्या. अमेरिकाही नदीच्या अनुषंगानेच वसली. आपल्या गंगा सिंधु खो-य़ांचे सिकंदरापासून
मोगलापर्यंत सगळ्यांनाच आकर्षण होते. आर्थिक समृद्धी नद्यांच्या खो-यांमुळेच आली.
कारण नद्या, पर्वत
प्रदेशातून सुपीक माती आणून, ती मैदानी प्रदेशात पसरवतात.
त्यामुळे शेतीला विशेष उपयुक्त असतात. अनादी काळापासून अन्नाचा प्रमुख स्त्रोत
म्हणून नदीचा उपयोग होत आला आहे. अन्नउत्पादना बरोबरच, मासेमारी, शेती आणि पाणी असे
एकमेकांवर अवलंबून असणारे जीवसृष्टीचे एक चक्र आहे. यात नदीचं अस्तित्व अत्यंत महत्वाचं
आहे.
युरोप -सव्हा |
विकास प्रक्रियेत अग्रणी असलेली अनेक महत्वाची शहरे नदीकाठीच वसली आहेत. विश्वाचा विचार केला तर, जगातील महत्वाची, प्रगतिशील शहरे म्हणजे न्यूयॉर्क-हडसन नदीच्या काठी, बीजिंग-योंगदिंग आणि चावोबाई नदीकिनारी, मॉस्को हे शहर मोस्कवा नदीकाठी, लंडन-थेम्स नदीकाठी, टोकियो शहर सुमिदा नदीकाठी, कॅनबेरा-मोलोंगलो नदीकाठी, अमस्टरडॅम शहर अम्सेल या नदीवर वसलेली आहेत.
भारतात, दिल्ली कानपुर, लखनौ, उज्जैन, गुवाहाटी, आग्रा, अयोध्या, प्रयाग, मथुरा, वाराणसी ,काशी-हरिद्वार, द्वारका, नाशिक, पैठण, आळंदी, गाणगापूर, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर नृसिंहवाडी ही क्षेत्र नदीच्या तीरावर असल्याने त्या त्या नद्यांचे महत्व वाढले आहे. नद्यांमुळे ही क्षेत्र तीर्थक्षेत्र झाली आहेत. भारतातील प्रमुख नद्या गंगा, यमुना, ब्रम्ह्पुत्र, गोदावरी, सिंधु, कावेरी आणि कृष्णा. पैकी प्राचीन नदी म्हणजे गंगा अर्थात ‘गंगा मैया’, ‘श्री गंगाजी’. प्राचीन काळापासून वाहणारी ही नदी आजही वाहतेय आपल्यासाठी. जगातील प्राचीन नगर आणि प्राचीन संस्कृतीचं शहर, ‘वाराणसी’ याच गंगेच्या तीरावर वसले आहे. आज वाराणसी धार्मिक, शैक्षणिक, पर्यटन, सांस्कृतिक व उद्योग नगरी म्हणून सुपरिचित आहे.
तसेच यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, क्षिप्रा,
गोदावरी या नद्याही पूजनीय आहेत. त्या मनुष्याच्या कल्याणासाठी, सुखसमृद्धीसाठी
निरंतर वाहत असतात. या सगळ्या नद्यांनी वर्षानुवर्षे अनेक स्थित्यंतरे पहिली आहेत. अनेक
संस्कृती अनुभवली आहे.
भारतीय संस्कृती अनेक मानव वंश आणि असंख्य
जातींनी मिळून तयार झाली आहे. आपल्या या खंडप्राय देशात वसलेल्या अनेक जाती
जमातींनी देश-काल-परिस्थितीला धरून आपापल्या सांस्कृतिक परंपरा निर्माण केल्या
आहेत. या परंपरा, धर्म-पंथ, आचार-विचार, श्रद्धा, काही संकेत, पूजास्थाने, देवता, यात्रा, उत्सव, व्रते, पर्वे, साहित्य, कला, सामाजिक
चालीरीती, या रूपात दिसून येतात. यात
खूप विविधता आहे. तरीही त्यामागचा भाव एकच आहे. उद्देश एकच आहे.
यामुळेच विविध
प्रांतात विविध नद्या असूनही नदीचे महत्व व तिच्या बद्दलचा आदरभाव भारतात सगळीकडे
सारखाच आढळतो. वैदिक काळापासून आपल्या ऋषीमुनींनी नद्यांना देवतास्वरूपात पाहिले
आहे. वेदोत्तर काळात मात्र या सरीतारूपी दैवताला साकार व सगुण रूप प्राप्त झालं.
कारण या नद्यांना पोषणकर्त्या मानलं गेलं. तेंव्हापासून नदीचं हे सगुण रूप स्त्री
रूपी मूर्तीत साकार झालेलं दिसतं. माहेश्वर पुराणात सरिता मूर्तीचे विज्ञान आणि
काही संकेत सांगीतलेले आहे. म्हणून नद्यांच्या
काठी तीर्थक्षेत्र निर्माण झाल्याचे दिसते. मूर्तिच्या पाठोपाठ नद्यांच्या काठावर, घाटावर त्यांची मंदिरे आली. आपल्याकडे
पवित्र मानल्या गेलेल्या गंगा, यमुना,
सरस्वती, गोदावरी नर्मदा कावेरी या मुख्य नद्यांच्या
ऐतिहासिक काळापासून बनवलेल्या मूर्ति उपलब्ध आहेत. काही लेण्यामधून, मध्यप्रदेशातील उदयगिरी येथे चौथ्या शतकातील लेणीत गंगा, यमुना सरस्वती यांचा त्रिवेणी संगम असलेलं शिल्प आहे. वेरूळच्या
लेण्यातही सोळाव्या आणि एकविसाव्या लेणीत गंगेची मूर्ती आढळते. काही लेण्यात नद्यांच्या
मूर्ती व त्यांच्या कथा कोरलेल्या आढळतात. इतिहास काळातील काही राजांनी नाण्यांवर, राजमुद्रांवर गंगा दाखविली आहे असा उल्लेख आहे.
सरस्वती
मूर्ति - वेरूळच्या सोळाव्या लेणीत सरस्वतीची कमळात उभी असलेली मूर्ति आहे. भारुत
येथील कलडा येथे पद्मपिठावर सरस्वती उभी आहे. शिवाय मथुरा, बीकानेर, तंजावर
मध्ये बृहदीश्वर मंदिरात, होयसळेश्वर मंदिरात.
गंगा मूर्ति - उत्तर प्रदेशात गंगोत्रि, मुखवा, हरिद्वार, गढमुक्तेश्वर, प्रयागराज,
वाराणसी, त्रिवेणी घाट, मथुरा, तर आंध्र परदेशात, अमरावतीत उत्खननात सापडलेली, अनंतपुर, दोडप्पा मंदिरात, राजशाही, बेसनगर तसेच ओरिसा आणि बंगाल मध्येही आहेत.
नागपुर, मुर्शिदाबाद, हेमवती, भोपाळ, उज्जैन, धार, विदिशा, सागर आणि अमेरिकेतील बोस्टन येथील
वस्तुसंग्रहालयात गंगेच्या मूर्ति आढळतात. गंगेच्या अनेक कथा शिल्पबद्ध झालेल्या
आहेत.
यमुना मूर्ति –
ऊत्तर प्रदेशात जमनोत्री, मध्यप्रदेशात खजुराहो, धुवेला, भेडाघाट, महाराष्ट्रात वेरूळ लेणे येथे यमुनेच्या
मूर्ति आहेत.
अमरकंटक |
गोदावरी
मूर्ति - गंगाद्वार म्हणजे त्र्यंबकेश्वर जवळ ब्रम्ह्गिरीवर गोदावरीचा जिथे उगम
झाला तिथे मंदिरात गोदावरीची मूर्ति आहे. त्र्यंबकेश्वर इथे कुशावर्त तीर्थावर, नाशिक येथे रामकुंडासमोर, राक्षसभुवन, आंध्र प्रदेशात रायली, राजमहेंद्री व भद्राचलम येथे पुष्कर घाटावर गोदावरीची मूर्ति आहे.
कृष्णा मूर्ति
- महाबळेश्वर, कराड, वाई, माहुली, लिंब, औदुंबर, सांगली, हरीपुर, नरसोबावाडी इथे कृष्णेची मंदिरे व मूर्ति आहेत.
पंढरपूरला भिमेचे मंदिर आहे. सासवडला कर्हेचे मंदिर आहे. कराडला
कोयनेचे मंदिर आहे.कृष्णा बाई
अशी ही भारतीय नद्यांची सगुण रुपे म्हणजेच नद्यांची मंदिरे
आहेत. जगाचा विचार करता, ख्रिस्त पूर्व, रोमन
आणि इजिप्शियन संस्कृतीत आपल्याप्रमाणेच नाईल नदीला देवता स्वरूप मानलेले आढळते.
नाईल नदीमुळे इजिप्तच्या प्रजेचे पोषण होते. समृद्धी निर्माण होते, म्हणून नाईल ही पुरुष देवता आणि इजिप्त ची जनता त्यांची मुले अशी कल्पना
असलेल एक शिल्प वॅटिकन शिल्प संग्रहालयात आहे. तर आजही नाईल नदीचा उत्सव इजिप्त
मध्ये साजरा केला जातो. इजिप्त मध्ये
अजूनही वफा-अल-नील साजरा होतो, नाईलला पूर येण्याचा उत्सव!
आणखी एक नाईल रिव्हर
फेस्टिवल स्पर्धा असते.
या उत्सवाच्या दरम्यान खाणे, पिणे, नृत्य यांची रेलचेल
असते, नदीच्या पाण्यात एका विशिष्ट प्रकारच्या होडीतून (त्यालाच कायक असे म्हणतात)
व बोटींमधून नदी पार करण्याच्या विविध प्रकारच्या साहसी स्पर्धा आयोजित करतात.
नाईल नदीच्या फेनधवल पाण्यातून, फेसाळणाऱ्या लाटांमधून जलभ्रमण हा एक अवर्णनीय
अनुभव असतो .
आपल्या संस्कृतीत व्रते वेदकालापासून चालत आली
आहेत. म्हणजे एखादी इष्ट गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल, तर एखाद्या देवतेची पुजा करणे, त्यासाठी दैनंदिन वर्तनावर निर्बंध घालून विशिष्ट महिन्यात, विशेष तिथीला, एखादे धार्मिक कृती करणे किंवा
निर्बंध पालन करण्याची प्रतिज्ञा करणे म्हणजे व्रत करणे. नदीला दैवत मानल्यानंतर तिने
प्रसन्न व्हावे इष्ट फळ द्यावे म्हणून अशी व्रते व उत्सव करण्याची पद्धत आहे. आपल्या
ऋषीमुनींनी नद्यांप्रमाणेच पर्वते आणि अरण्ये यांनाही दैवत स्वरूपातच पाहिले आहे.
म्हणून आजही श्रेष्ठ देवतांचा सन्मान, वृक्षपूजन, विहीरींचे उत्सव, दर्या खोर्यातला विहार, पर्वत यात्रा, तळ्यांचे उत्सव, समुद्र स्नानाचे पर्व, भूगर्भातल्या खाणींची पुजा, नद्या व सरोवरांच्या स्नानासाठी यात्रा व उत्सव केले जातात. एखादी दरी
खोर्यातील यात्रा करणे किंवा पर्वत यात्रा करणे यामुळे नद्यांची उगम स्थाने
माहिती होणे, नदी प्रवाहांची माहिती मिळणे, पशुपक्षी आणि वन्य जीव, वनसंपत्ति यांची ही माहिती
होत असणार. या यात्रेमुळे भौगोलिक ज्ञान वाढणे हा मोठा फायदाच होत असणार.
या उत्सवापैकी
नद्यांचे उत्सव करण्यामागे पण नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबर क्षमा, दया, दानशीलता, या सद्गुणांची जोपासना व्हावी हा उद्देश असतो.
नदीविषयी
कृतज्ञता व्यक्त करण्यसाठी, नद्यांचे पावित्र्य राखण्यासाठी नदीचे उत्सव आणि
कृतज्ञता सोहळे करण्याची परंपरा आपल्याकडे आहे, अशा धार्मिक उत्सावांमागे
मनोरंजनाबरोबर लोकशिक्षण हा उद्देश पण आहे .
आपल्याकडे
वेगवेगळ्या नदींचे वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. सिंधु, झेलम, गंगा, तापी, गोदावरी, कृष्णा, क-हा, कावेरी, महानदी या
नद्यांचे उत्सव होतात. उत्सव नदीच्या जन्मदिनाप्रमाणे पण असतात. गंगेचा जन्मदिवस ज्येष्ठ
महिन्यात असतो. गंगादशहरा व्रत, गंगापूजन, गंगा सप्तमी, गंगासागर मेळावा मकरसंक्रांत यात्रा, नर्मदेचा माघ महिन्यात, तापीचा आषाढात, गोदावरीचा माघात, तर कावेरीचा तुळा संक्रमण दिन
ऑक्टोबर मध्ये.
कश्मीर
मध्ये झेलमचा उत्सव दरवर्षी भाद्रपद शुक्ल त्रयोदशीला करतात. नदीचा जन्मोत्सव हे
तिथले वैशिष्ठ्य आहे. नदीच्या दोन्ही काठांवर हजारो पणत्या लावून किनारे सुशोभित
केले जातात. तर दिव्यांनी सुशोभित केलेल्या नावा नदीतून मिरवणुकीने नेल्या जातात.
गोदावरी ,नाशिक |
बंगाल मधेही ‘सोदो’ हे कोळी लोकांचे
व्रत साजरे होते. प्रयाग येथे मकरसंक्रांतीला गंगास्नानासाठी मोठी यात्रा भरते.
अशी ही गंगेची महती.
गोदावरीचे
उत्सव त्र्यंबकेश्वर, नाशिक, राक्षसभुवन आणि नांदेड इथे होतात. गोदावरीचे
स्नान हे गंगा स्नानाइतकेच पवित्र मानले गेले आहे. दर बारा वर्षानी गुरु सिंह
राशीत असतो तेंव्हा नाशिकला मोठा मेळा भरतो. या काळात साक्षात गंगा गोदावरीला
गुप्त रीतीने भेटण्यास येते असे पुराणात सांगीतले आहे. आणि सर्व देवाधिदेव
गोदावरीच्या सान्निध्यात याच काळात येतात म्हणून सिंहस्थ या कुंभपर्वात मोठी
यात्रा भरते. तसेच प्रभू रामचंद्राने गोदावरी नदी भद्राचलम तीर्थाजवळ ओलांडली होती.
त्याची आठवण म्हणून तेथे रामाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
वाईचा कृष्णामाईचा उत्सव गेली शेकडो वर्षे
नियमित चालू आहे. या पुजा-अर्चना बरोबरच मानवाला त्याच्या दैनंदिन व्यवसायातून आणि
चिंता-व्यथेतून बाजुला काढून त्याच्या शरीराला विश्रांती व मनाला आनंद मिळवून देणे, त्याला सामाजिक सुखाचा अनुभव
घडविणे या उद्देशाने मानवी समाजात उत्सवाची प्रथा रूढ झाली असावी.
वर्षांतून
ठराविक दिवशी माणसाने समाजात मिसळावे, सर्वानी मिळून निसर्ग आणि ललित कला यांचा रस घ्यावा, आपले भावजीवन समृद्ध करावे, हा या उत्सवांमागील
मुख्य हेतु असावा. उत्सवाच्या दृष्टीने विचार करता मध्ययुगापासून उत्सव हे ऋतु
परिवर्तन, पितृपूजा, गणदेवता, ग्रामदेवता इ. धार्मिक विषयांशीच संबंधित असत. गुरू सिंह
राशीमध्ये जातो तेव्हा सिंहस्थ पर्व साजरा केला जातो. गुरू कुंभ राशीत गेला, की कुंभमेळा साजरा होतो, तर गुरू कन्या राशीत गेला,
की कन्यागत महापर्वकाल होतो. सिंहस्थ गोदावरीच्या तीरावर, कुंभमेळा गंगेच्या तीरावर तर कन्यागत महापर्वकाल कृष्णा तीरावर होतो.
अशी आपली संस्कृती की त्यात नदिविषयी कृतज्ञता, आदर, महत्त्व सांगितले आहे. भारतात दरवर्षी नद्यांचे लहान- मोठे उत्सव सुरू असतात. त्यातील
सुमारे २५० उत्सव प्रसिद्ध आहेत. गुरू ग्रहाचा प्रत्येक राशीमध्ये वर्षभर मुक्काम
असतो. त्या वेळी देशाच्या विविध भागांमध्ये नद्यांच्या किनारी जे उत्सव सुरू असतात
त्यांनाच महापर्वकाल म्हणतात.
नद्याच आमचं खरं पालन पोषण करतात. प्राचीन काळातच नाही तर आजही नद्यांवरच आपल जीवन अवलंबून आहे. प्राचीन काळात नदीला पूज्य मानायची परंपरा होती ती याच मुळे. आजही ही परंपरा काही प्रमाणात पाळली जाते. पण याचा मूळ उद्देश च आपण विसरलो आहोत. नदीचा हा सन्मान अवश्य झाला पाहिजे तरच आपण स्वच्छता आणि पवित्रता चिरकाल टिकवू शकू. आज नदीची स्वच्छता याबरोबरच नदी वाचवणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकासाच्या नावाखाली अनियोजित विकास आणि औद्योगिकीकरण केल्यामुळे नद्यांवर मोठ्ठ संकटच ओढवल. याशिवाय दिवसें न दिवस वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण, जंगलतोड, कमी पाऊस, आटते जलस्त्रोत, उपलब्ध जलसाठ्यांचा गैरवापर यांच्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे. व हा एक गंभीर मुद्दा बनला आहे
हळू हळू नद्या कोरड्या पडत चालल्या आहेत. गेल्या १० वर्षात
शिवाय ग्लोबल वार्मिंग समस्या आहेच. ग्लोबल वार्मिंग मुळे तापमानवाढीमुळे समुद्रतटीय क्षेत्रांत नेहमीपेक्षा जास्त पाऊस पाडतो आणि पूर येतो, हा पूर जास्त माती वाहून नेतो आणि तिथे वाळवंट तयार होऊ लागते. शेतीला सुपीक असणारी हि जमीन अतिवृष्टी मुळे नापीक व्हायला लागते. नद्याही आटल्या आणि जमीनही नापीक झाली तर काय?
नदीला आम्ही
आजपर्यंत केवळ जलस्त्रोत म्हणून नाही पाहिलं, आम्हाला जीवन देणाऱ्या देवीच्या
स्वरुपात पाहिलं. पुढच्या पिढीलाही हे ज्ञान व महत्व सांगायला हवं. त्यांना
दृष्टीकोण आपणच द्यायला हवा. चला पुन्हा एकदा नतमस्तक होऊया. गंगेची प्रार्थना
करूया,
सौभाग्यदा भारतवर्षधात्री सौभाग्य भूता
जगतो विधात्री |
धात्री प्रबोधस्य महामगोदा गोदावरी सावतु न:सुगोदा || (टेंब्ये स्वामी गोदावरी स्तोत्र)
अर्थ - सौभाग्य देणारी भारतवर्षाची पोषणकर्ती
सौभाग्यमूर्ती, जगाची
निर्माती, ज्ञानदा, जलाचा प्रचंड साठा
असलेली, गोदा शुभंकरी आमचे रक्षण करो.
नमामि गंगे !
© ले. डॉ. नयना कासखेडीकर.
thanks!
ReplyDelete