Saturday, 1 May 2021

बलराज साहनी

 

बलराज साहनी

नमस्कार रसिक,वाचक - श्रोते.
आज १ मे, श्रेष्ठ हिन्दी चित्रपट अभिनेता, लेखक बलराज साहनी यांचा जन्मदिवस. त्यांची आठवण म्हणून त्यांचा थोडक्यात परिचय. हा परिचय वाचता वाचता त्यांच्यावर चित्रित झालेली तुमची आवडती गीते सुद्धा ऐका .    

बलराज साहनी- साहित्य, कला-संस्कृती, पत्रकारिता, चित्रपट अशा सर्व क्षेत्रात आपली मोहोर उमटविणारा प्रसिद्ध कलाकार. त्या काळातला पदवीधर नट . त्यांचं जीवन म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्यच.  आई लक्ष्मी आणि वडील हरवंश लाल साहनी, बलराज यांचा जन्म रावळपिंडी येथे १ मे १९१३ रोजी झाला. त्यांचं खर नाव युधिष्ठिर होतं, पण त्यांच्या आत्याला ते नीट उच्चारता येत नव्हतं. त्या रजिस्टर म्हणून हाक मारत असत. त्यामुळे आजूबाजूचे लोक सुद्धा त्यांना त्याच नावाने हाक मारू लागले. म्हणून त्यांचे नाव बदलून बलराज असे ठेवले. त्यांनी लाहोर विद्यापीठातून हिन्दीमध्ये पदवी आणि इंग्रजी भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यामुळे साहित्य क्षेत्राशी चांगला परिचय होता, अभ्यास होत होता. त्यांनी स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ दोन्हीही अनुभवले होते.

                                  (प्रत्येक गीत ऐकण्यासाठी त्या शब्दांवर क्लिक करा) 


                          

त्यांना शालेय वयापासूनच नाटकाची आवड होती. संगीताची आवड होती. उर्दू
, इंग्रजी आणि पंजाबी आणि हिन्दीमध्ये काव्य लेखन, कथा लेखन, काही पत्रिका संपादन करणं, नियतकालिकात लेखन करणं, मंडे मॉर्निंग सारखं साप्ताहिक चालवण आणि आजूबाजूचे  सामाजिक, राजकीय वातावरण यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व घडत होतं. त्यांनी रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मध्ये हिन्दी /इंग्रजी शिक्षक म्हणून तर महात्मा गांधी यांच्याबरोबर वर्ध्याला राहून काम केलं. पुढे लंडन येथे चार वर्षे रेडियो BBC वर उद्घोषक म्हणून काम केलं. नंतर ते हिंदुस्थानात परतले आणि काही काळ इप्टाचे काम केले. साम्यवादी विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांना खरं तर साहित्य लेखनात रस होता, चित्रपटात काम करणं आवडत नव्हतं. कॅमेर्‍यासमोर उभं राहीलं की ते अस्वस्थ होत. पण अभ्यास करण्याची आणि भूमिकेतून प्रत्यक्ष पात्र हुबेहूब रंगवण्याची कला त्यांच्यात होती. आवाज चांगला होता. नाटकातून अभिनय चालू होता. चित्रपटासाठी विचारणा होत होती म्हणून त्यांनी लाहोर सोडून मुंबईला जाण्याचं ठरवलं. पत्नी दमयंती, मुलं परीक्षित आणि शबनम यांना घेऊन मुंबई गाठलं. त्यांचा पहिला चित्रपट धरती के लाल होता. दमयंती बरोबर गुडिया हा सिनेमा केला. दमयंती यांच्या अकालीनिधना मुळे वर्षभरात त्यांनी संतोष चांडक यांच्याशी विवाह केला आणि अभिनय क्षेत्रात स्वत:ला झोकून दिल. 


चित्रपट क्षेत्रातला संघर्ष सुरू झाला आणि एकसे एक सिनेमे त्यांनी दिले. ते सर्व आपल्या अभिनयाने अजरामर केले. जस्टीस, दूर चले, हलचल यानंतर, दो बिघा जमीन या चित्रपटाने त्यांना खूप नाव झाले. गरीब शेतकर्‍याची ही कहाणी आहे. ही कथा मूळ रवींद्रनाथ टागोर यांच्या दुई बिघा जोमी... या कवितेवरून घेतली आहे. विमल रॉय यांच्या या चित्रपटाची पटकथा हृषीकेश मुखर्जी यांची आहे, यातला रिक्षावाला प्रसंग खूप बोलका आहे, त्याचा एक किस्सा  आहे .  

१९५२ च्या काळातली  गोष्ट, उन्हाळा होता. रस्त्यावरून एक माणूस दोन मुलांना घेऊन चालला होता. त्याने एका सायकल रिक्षावाल्याला थांबवले आणि ही रिक्शा मला चालवू द्या, मी हवे ते पैसे देईन, म्हणून विनंती करू लागला. रिक्षावाला खुश झाला. खराब रस्त्यावरून रिक्शा चालवण्याला तेव्हढीच सुट्टी. आणि आता कळेल की काय त्रास होतो रिक्शा चालवताना यालाही. असेही मनात आले. आणि त्वरित ती व्यक्ती  दोन मुलांना मागे बसवून भर उन्हात खराब रस्त्यावरून रिक्शा चालवू लागली. रिक्षावाल्याला कल्पना नव्हती की हा माणूस म्हणजे दुसर तिसरं कोणी नसून बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता बलराज साहनी आणि ती दोन मुले म्हणजे त्यांचीच मुले परीक्षित आणि मुलगी शबनम आहे म्हणून. या चित्रपटात रिक्षावाल्याची आपली भूमिका उठावदार व्हावी म्हणून बलराज साहनी हा सराव आठवडाभर करत होते. एक उच्चशिक्षित व्यक्ति रिक्षावाला कसा साकारू शकेल या विमल रॉय आणि अनेकांच्या विचाराला योग्य उत्तर त्यांच्या भूमिकेनं दिल होतं. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट भारतीय सिनेमा क्षेत्रात सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून गणला जातो. आणखी किस्से आहेत याचे. या सिनेमात दूध घालणार्‍या दूधवाल्या भैय्याचे पात्र ते साकारणार होते. त्यासाठी ते मुंबईच्या जोगेश्वरी मध्ये राहणार्‍या उत्तर प्रदेशातील भैयांच्याकडे जाऊन रोज चक्कर मारत, त्यांचे उठणे-बसणे, त्यांची भाषा, बोलणे, पेहराव, अगदी ते कसे खातात, ते डोक्यावरचा फेटा कसा बांधतात, हे अभ्यासत. सूक्ष्म निरीक्षण करत.

 गीत- ज्योति कलश छलके...    चित्रपट –भाभी की चूडिया  


१९६१ मध्ये प्रदर्शित झालेला काबुलीवला हा सिनेमा मुंबईच्या एका अफगाणी दुकानदाराबरोबर तब्बल एक महिना राहून त्यांनी आपल्या भूमिकेसाठी निरीक्षण केले. काबुलीवला हा चित्रपट सुद्धा लोकप्रिय झाला.

१९५१ च्या हलचल या सिनेमात  त्यांची जेलरची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी आर्थर रोडवरील जेलमध्ये जेलरबरोबर काही दिवस राहून या भूमिकेचा अभ्यास केला. असा अभ्यास ते प्रत्येक भूमिकेचा करूनच, सर्व तयारीनिशी सादर व्हायचे. लाजवंती, हकीकत, गर्म हवा, वक्त, दो रास्ते, या सर्वच चित्रपटात हे आपण अनुभवतो. गर्म हवा हा चित्रपट म्हणजे,  फाळणीच्या वेळी उत्तर भारतातल्या मुसलमान कारागीराची, आता भारत की पाकिस्तान ? हा निर्णय घेणारी कथा आहे त्यात चप्पल तयार करणार्‍या एका वयस्कर कारागीराची भूमिका बलराज यांनी साकारली . समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे अभ्यासोनी प्रगटावे असे त्यांचे वैशिष्ट होते. विद्यार्थ्यांसामोर व्याख्यान देण्याआधी सुद्धा ते अभ्यास करत.

 गीत- ओ मेरी जोहरा जबिन ..     चित्रपट- वक्त


ते साहित्यिकसुद्धा होते, मेरा पाकिस्तानी सफर’, मेरा रुसी सफरनामा ही त्यांची प्रवास वर्णने आहेत. मेरी फिल्मी अमरकथा हे आत्मचरित्र आहे. बाजी आणि कुर्सी या चित्रपटाच्या पटकथा त्यांनी लिहिल्या आहेत.

१९६९ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले २०१३ मध्ये भारताच्या टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित केले. १३ एप्रिल १९७३ रोजी बैसाखीच्याच दिवशी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. या मातब्बर अभिनेत्याला आदरांजली.

 - डॉ. नयना कासखेडीकर               

----------------------------------------

3 comments: