Thursday 14 July 2022

गोपाळ गणेश आगरकर

 

 गोपाळ गणेश आगरकर 

(१८५६ ते १८९५)

 

           गोपाळ गणेश आगरकर थोर समाजसुधारक आणि विचारवंत,लेखक,पत्रकार आणि शिक्षणतज्ञ . सातारा जिल्हयातले टेंभू गावचे, घरची गरीबी. पण त्याला तोंड देत शिक्षण पूर्ण केले. पुणे येथे डेक्कन कॉलेज मध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले .याच काळात त्यांची बाळ गंगाधर टिळक यांच्याशी ओळख झाली.सामाजिक बदल घडवण्यासाठी शिक्षणाचा विस्तार आवश्यक वाटून विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या जहाल विचारांच्या गटात ते टिळकांबरोबर सामील झाले. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात नव्या युगाचा आरंभ झाला होता.स्वातंत्र्य मिळविणे आणि लोकशिक्षण हे समान सूत्र तिघांच्या ठायी होते. लोकशिक्षण व लोकजागृती यासाठी लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर, वामन शिवराम आपटे, महादेव बल्लाळ जोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी १८८० मध्ये न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केले. आजचे रमणबाग शाळा, टिळक रोडवरील शाळा, नवीन मराठी शाळा, अहिल्यादेवी हायस्कूल,बीएमसीसी कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज या नामवंत संस्था आजही कार्यरत आहेत. स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आगरकर यांनी अध्यापनाचे काम केले आणि केसरीचे संपादकपद सांभाळले.सुरूवातीला ही शाळा नाना वाड्यात भरत असे, यात राम गणेश गडकरी, केशवसुत ,यासारखे प्रतिभावंत घडले होते.वर्षभरतच न्यू इंग्लिश शाळेचा लौकिक पसरला . पण शाळेच्या बाहेरच्या लोकांचे प्रबोधन कसे होणार ही चिंता सतावत होती. देशाच्या समस्या कशा सुटणार ?म्हणून मग जनजागृतीसाठी वृत्तपत्राचा उपयोग प्रभावी शस्त्र म्हणून करण्याचे त्यांनी ठरविले.

       १८८१ ला टिळक व आगरकरांनी मराठी भाषेत ’केसरी’ आणि इंग्रजी भाषेत ’मराठा’ ही साप्ताहिकं सुरू केली. केसरी च्या संपादनाची जबाबदारी आगरकरांनी सांभाळली. इतिहास, अर्थ विषय आणि सामाजिक विषयावर आगरकर लिहीत असत.लोकांच्या डोळ्यात अंजन घालणे आणि सरकारचा अन्याय लोकांसमोर आणणे हे वृत्तपत्रातून होऊ लागले. वर्षभरात च विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे अकाली निधन झाले .तर वृत्तपत्रातून कोल्हापूर संस्थानच्या बातम्या दिल्याने तिलक आणि आगरकर या दोन्ही संपादकांवर खटला भरण्यात आला. १८८२ ला दोघांना चार महिन्यांची कैद झाली. डोंगरीच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं. या तुरुंगात असताना आगरकर यांनी शेक्सपियर च्या ‘हॅम्लेट’ नाटकाचे ‘विकारविलसित’ नावाने भाषांतर केले (१८८३)आणि ‘डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस’ (१८८२)हे कैद्यांच्या जीवनावरील पहिले पुस्तक तुरुंगात लिहिले. तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा जोमाने काम सुरू झाले.

       विद्यार्थी दशेत असताना च त्यांनी मिल,स्पेन्सर, गिबन, रुसोया विचारवंतांचे ग्रंथ अभ्यासले होते. त्यामुळे वैचारिक बैठक पक्की होती.शिवाय ते विज्ञाननिष्ठ होते. ग्रंथात दिलेले कुठलेही विचार स्वताला पटल्याशिवाय मानत नसत. ते बुद्धिप्रामाण्यवादी व उदारमतवादी होते. तशाच त्यांच्या सामाजिक भूमिका असत. त्यांनी वर्तमानपत्रातून समाजातील दोषांविषयी परखडपणे व निर्भीडपणे लेखन केले. आपल्या समाजाचे मागासलेपण नाहीसे झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. महाराष्ट्रातल्या समाज प्रबोधंनाच्या चळवळीत गोपाळ गणेश आगरकर यांचे स्थान अनन्यसाधारण होते.

       त्यांनी १८८८ साली केसरी मराठातून बाहेर पडून आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रसारासाठी सुधारक हे पत्र चालू केले. हे साप्ताहिक प्रामुख्याने सामाजिक सुधारणा या विषयाला वाहिलेले होते. अंधश्रद्धा, चुकीच्या समजूती, सामाजिक रूढी या विषयांवर यातून सतत प्रहार होत असे. पाश्चात्य ज्ञांनाच्या आधारे स्वकीयांचे प्रबोधन करणे हा एक हेतु होताच. सुधारका च्या मराठी आवृत्तीचे संपादक स्वत: आगरकर होते तर इंग्रजी आवृत्ती चे संपादक गोपाळ कृष्ण गोखले होते.बालविवाह हा प्रश्न आगरकर यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता.वैधव्य, सतीची चाल, केशवपन या गोष्टी त्यांना अजिबात पटत नसत.कायद्याने हे बंद झाले पाहिजे असे त्यांना वाटे.लोकमान्य टिळक यांना राजकीय प्रश्नांची तीव्रता अधिक वाटत असे तर आगरकर यांना सामाजिक प्रश्नांची अधिक जाणीव होती. याच विषयावर मतभेद झाल्याने केसरी सोडून त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सहाय्याने सुधारक हे स्वतंत्र पत्र चालू केले.

       सामाजिक प्रश्नात तर्कशुद्ध भूमिका घेऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे हे ध्येय त्यांनी ठरवल्यामुळे नुसत्या एखाद दुसर्‍या लेखाने काम भागणार नव्हते. हातात स्वातंत्र्य असलेले वृत्तपत्र हवे असल्यानेच त्यांनी सुधारक काढले.

       इंग्रजी राजवटीत, प्रगत असलेल्या पाश्चात्य संस्कृतीचे पदार्पण एकोणीसाव्या शतकात हिंदुस्थानात झाले त्यावेळी  अनेक नव्या मूल्यांचा इथल्या लोकांना परिचय झाला. अनेक अपरिचित गोष्टींचा परिचय झाला. चांगलं काय? अयोग्य काय? यावर विचारमंथन सुरू झाले. नव्या विचारांची जडण घडण सुरू झाली . त्यामुळे त्या वेळचे समाज सुधारक पुढे येऊन बदल घडवण्यात अग्रेसर होऊ लागले त्यातलेच एक अगरकर . हे एकोणीसावे शतक प्रबोधनयुग च होते. या युगातले अल्पयुषी ठरलेले महापुरुष म्हणून बाळशास्त्री जांभेकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर ओळखले जातात. आगरकर यांनी महाराष्ट्राचा विवेक जागृत केला.

     ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’ हे व्रत आगरकर यांनी जन्मभर पाळलं. समाजातील रूढी,अज्ञान अंधश्रद्धा ,अपसमज दूर व्हावीत म्हणून आगरकर यांनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना प्रत्येक ठिकाणी झुंजावे लागले. पण सामाजिक सुधारणांची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली.

      आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात त्यांनी मोलाची भर घातली, पल्लेदार वाक्ये, मुद्देसूद प्रतिपादन, अन्वर्थक अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. केशवसुत, ह. ना. आपटे यांसारख्या थोर साहित्यिकांवर आगरकरांचा वैचारिक व भाषिक प्रभाव होता. त्यांचे कवि,काव्य,काव्यरति आणि शेक्सपियर,भावभूति व कालिदास या साहित्य विषयक निबंधांनी टिकाकारांचे लक्ष वेधुन घेतले. त्यांचे आणखी ग्रंथ म्हणजे शेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र (१९०७), वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण. विकारविलसिताच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी, यासंबंधीची मते त्यांनी मांडली आहेत. त्यांचे केसरीतील निवडक निबंध (१८८७) आणि सुधारकातील वेचक लेख (निबंधसंग्रह १८९५) प्रसिद्ध आहेत.

     आगरकर सात वर्षे विरोधाला तोंड देत देत सुधारकातून भूमिका मांडत राहिले.या गदारोळत तब्येतीकडे दुर्लक्ष झाल्याने तब्येत खालावली. त्यातच अनेक आपत्ति कोसळत होत्या, बरोबरचे सहकारी ही एकापाठोपाठ जग सोडून गेले. आगरकर खचले होते.मृत्युची चाहूल त्यांना लागली होती. आपण गेल्यावर आपल्या पत्नीने केशवपन करू नये म्हणून तिच्या मनाची तयारी त्यांनी केली. आणि स्वाभिमानाने आणि स्वावलंबनाने आपल्या मुलांचा सांभाळ तिने करावा असे संगितले.आपल्या आंत्यसंस्काराची इतरांना झळ लागू नये म्हणून पैशांची एक पुरचुंडी ‘माझ्या प्रेतदहनार्थ’ असे लिहून बांधून ठेवली आणि १७ जून १८९५ रोजी, "झोप येते मी स्वस्थ निजतो तुम्ही झोपा" असे पत्नीला यशोदाबाईना सांगून मृत्युला शांतपणे सामोरे गेले.

लेखन- डॉ. नयना कासखेडीकर

-------------------------------------