|| निर्गुण वारी अभंगमाला ||
संत जनाबाई
(जन्म- १२५८ गंगाखेड ,मृत्यू- पंढरपूर -१३५० )
आई- करूंड, वडील- दमा
विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा || किंवा, दळिता कांडिता, तुज गाईन अनंता ||,ये गं ये ग विठा बाई आणि संतभार पंढरीत, थोर गायक
आणि गायिका आशा भोसले, पं. जितेंद्र अभिषेकी, यांनी गायलेले हे अभंग सर्व श्रोत्यांना परिचित आहेत. हे अभंग अत्यंत
लोकप्रिय झाले आहेत. कारण जनाबाईचे विठ्ठलाशी नातेच तसे आहे. कधी तिला तो जिवलग
वाटतो, कधी पिता वाटतो, तिच्यावर जे जे
प्रसंग येतात त्या त्या प्रमाणे ती देवाचा धावा करते आणि देव तिला मदत करतो. इतक
त्या देवाचं आणि जना बाईच जवळचं नातं आहे. ती विठ्ठलाशी कसा संवाद साधते, मनातल्या गोष्टी सांगते आणि देवही तिच्या मदतीला धावतो.
जनी ह्मणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा ।
विनविते सांगा । महिमा साधुसंतांचा ॥१॥
किंवा
तुळशीचे बनीं ।
जनी उकलिते वेणी ॥१॥
हातीं घेऊनियां लोणी ।
डोई चोळी चक्रपाणि ॥२॥
माझे जनीला नाहीं कोणी ।
ह्मणुनी देव घाली पाणी ॥३॥
जनी सांगे सर्व लोकां ।
न्हांऊं घाली माझा पिता ॥४॥
हे
अभंग असोत. यातून तिला हवी असलेली मदत कशी देव करतो याचं वर्णन त्यांच्या अभंगातून
कळतं. मात्र या सगळ्यामागे एका अनाथ मुलीची/स्त्रीची कहाणी आहे. ती ही त्या
काळातली. जनाबाई विठ्ठलाला, ये गं ये गं विठाबाई या अभंगात मातृरूपात पाहते. कारण आई वडिलांच्या
निधनाने ती पोरकी झाली, अनाथ झाली, संत
नामदेवांच्या वडीलांनी दामाशेटीनी तिला आपल्या घरी आश्रय दिला. एका संतांच्या घरी
राहायला मिळाल्याने तीचं उत्तर आयुष्यसुद्धा भक्तिमय झालं. इतकं की, स्वत:ला नामयाची दासी म्हणवून घेई.
माय मेली बाप
मेला । आतां सांभाळीं विठ्ठला ॥१॥
मी तुझें गा
लेकरुं । नको मजशीं अव्हेरूं ॥२॥
मतिमंद मी
तुझी दासी । ठाव द्यावा पायांपाशीं ॥३॥
तुजविण सखे
कोण । माझें करील संरक्षण ॥४॥
अंत किती
पाहासी देवा । थोर श्रम झाला जीवा ॥५॥
सकळ जिवाच्या
जीवना । ह्मणे जनी नारायणा ॥६॥
तुळशीचे बनी, जनी उकलते
वेणी | या अभंगात किती छान आणि साधं वर्णन आहे. जनाबाईनी काय
कल्पना केली आहे, जनी तुळशीच्या वनात उभी आहे, वेणी सोडते आहे म्हणजे केस मोकळे करते आहे, कृष्ण
(चक्रपाणि) हातात लोणी घेऊन तिच्या केसांना आता लावणार आहे. माझ्या जनीला म्हणजे
मला कोणी नाही, आई असती तर तिने न्हाउ घातलं असतं, पण देव आहे नं, तोच पाणी घालणार आहे. असं म्हणून जनीची
सोय झाली आहे ती देवामुळेच. तो पिता म्हणूनच ही सोय, याचा
तिला केव्हढा आनंद आहे.
झाडलोट करी
जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां
शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी
भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी ह्मणे
विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥
जनाबाईना वाटते, देव भक्ताच्या भक्तीला भुलतो आणि भक्तासाठी
मनुष्याच्या दृष्टीने हलकी कामे ही मदत म्हणून करतो. हा एक तिच्या तणावमुक्त
अवस्थेचा अभंग, देव तिला कुठे कुठे आणि कसा कसा मदत करतो हे
जनाबाईने अभंगातून सांगितले आहे. आपल्याला सुद्धा रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक
अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक वेळा मदत लागते. वयोवृद्धांना, आजारी लोकांना, लहान मुलांना आणि एकटे असणार्यांना
सुद्धा. आपण एकटे आहोत ही जाणीव वेदना देणारी असते. अशा वेळी मदत झाली तर अडचण
सुलभतेने सोडवली जाते. जनाबाईना असेच जेंव्हा जेंव्हा एकटे वाटत असे, तेंव्हा तेंव्हा देव तिच्या सोबतीला असे. असे कसे घडले असेल अशी शंका
आपल्याला येत असेल, पण ही कल्पना जरी असली तरी त्यावरून
आपल्याला जनाबाईंची भक्ती किती ताकदवान होती, देवाबद्दलचा
विश्वास केव्हढा होता आणि ती किती एकरूप झाली होती हेच दिसते. देवानेच तिला आई
वडिलांची, जवळच्या माणसाची माया दिली आहे. प्रेम दिले
आहे.
एके दिवशीं
न्हावयास । पाणी नव्हतें विसणास ॥१॥
देव
धांवोनियां आले । शीतळ उदक घे घे बोले ॥२॥
आपुल्या हातें
विसणीं । घाली जनीच्या डोयी पाणी ॥३॥
माझ्या
डोईच्या केसांस । न्हाणें नव्हतें फार दिवस ॥४॥
तेणें मुरडी
केसांस । कां ह्मणे उगीच बैस ॥५॥
आपुल्या हातें वेणी घाली । जनी ह्मणे माय झाली ॥६॥
जनाबाई
रोज कामे करत असताना पंढरीनाथ प्रत्येक वेळी हजर असतो. उखळीत कांडप करताना, विठ्ठलाला
खूप श्रम होतात, तो घामाघूम होतो, हाताला
फोड येईपर्यन्त तो काम करतो, इतकी मदत झाल्यावर जना निश्चिंत
होण्याबरोबर तिला पंढरीनाथांची काळजी वाटते आणि तेव्हढीच धन्यताही वाटते.
साळी सडायास
काढी । पुढें जाउनी उखळ झाडी ॥१॥
कांडितां
कांडितां । शीण आला पंढरिनाथा ॥२॥
सर्व अंगीं
घाम आला । तेणें पितांबर भिजला ॥३॥
पायीं पैंजण
हातीं कडीं । कोंडा पांखडूनि काढी ॥४॥
हाता आला असे
फोड । जनी ह्मणे मुसळ सोड ॥५॥
तिला स्वत:ला मातृत्व अथवा सांसारिक जीवन
अनुभवता आले नाही, पण त्या जाणिवा मात्र तिने मांडल्या. लहान मूल आणि आई यांच्यातील
नात्यांचे भावबंध कसे असतात ते तिला माहिती आहेत. कारण तिने लहानपणीच हा विरह सहन
केला आहे.
पक्षी जाय
दिगंतरां । बाळकांसी आणी चारा ॥१॥
घार हिंडते
आकाशीं । झांप घाली पिल्लापासीं ॥२॥
माता गुंतली
कामासी । चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥
वामर हिंडे
झाडावरी । पिलीं बांधुनी उदरीं ॥४॥
तैंसी आह्यासी
विठ्ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ॥५॥
जनी स्वत: बरोबर इतर ठिकाणी पण लक्ष देऊन आहे. तिला इतर संत
भक्तांचे बाबतीत ही माहिती आहे. त्यावर सुद्धा ती व्यक्त होते. सेना महाराज यांच्याबद्दल,
चोखा मेळा यांच्याबद्दल, ज्ञानोबाबद्दल ती
व्यक्त झाली आहे. द्रौपदी बद्दलसुद्धा तिचा अभंग आहे. जो देवाचा धावा करतो
त्याच्या पाठीशी देव उभा राहतोच अशी उदाहरणे जांनाबाईच्या अभंगात दिसतात. सेना
महाराज यांच्या बद्दल त्या म्हणतात,
पंढरीच्या राया । माझी विनवणी पायां ॥१॥
काय वर्णू
हरिच्या गोष्टी । अनंत ब्रह्मांडें याचे पोटीं ॥२॥
सेना न्हावी
याचे घरीं । अखंड राबे विठ्ठल हरी ॥३॥
राम चिंता
ध्यानीं मनीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥
एव्हढच काय रामायणात जे जे प्रसंग घडले आहेत आणि दुर्जनांचा नाश
होऊन सज्जनांचा आणि सत्याचा विजय झाला आहे ते सर्व विठुराया तुझ्या नामजपामुळेच, तुझा धावा केल्यामुळेच झाला आहे असे जनीला वाटते. तिची आध्यात्मिक प्रगती,
असीम परमेश्वर भक्ती, परमार्थिक उन्नती हे सगळे नामदेवांमुळे
शक्य झाले आहे, जिकडे तिकडे तिला हरीच दिसतो .
जनी दृष्टि
पाहे । जिकडे तिकडे हरि आहे ॥१॥
मग म्हणे वो
देवासी । तुमच्या नामयाची दासी ॥२॥
नामयाचा प्रसाद । झाला जनीला आनंद ॥३॥
म्हणून ती म्हणते बाई मी लिहिणे शिकले, पण कसे ?
बाई मी
लिहिणें शिकलें सद्गुरायापासीं ॥ध्रु०॥
ब्रह्मीं झाला
जो उल्लेख । तोचि नादाकार देख ।
पुढें
ओंकाराची रेख । तूर्या ह्मणावें तिसी ॥१॥
जनाबाईंचे ३५० अभंग आहेत . दिवाळीच्या सणवार सुद्धा जनाबाई म्हणते ,
सण दिवाळीचा
आला । नामा राउळासी गेला ॥१॥
हातीं धरुनी
देवासी । चला आमुच्या घरासी ॥२॥
देव तेथुनी चालिले । नामयाच्या घरा आले ॥३॥
गोणाईनें
उटणें केलें । दामाशेटीनें स्नान केलें ॥४॥
पदर काढिला माथ्याचा । बाळ पुशिला नंदाचा ॥५॥
हातीं घेउनी
आरती । चक्रपाणी ओंवाळती ॥६॥
जेऊनियां
तृप्त झाले । दासी जनीनें विडे दिले ॥७॥
एकदा
पंढरपूरला देवळासमोर राहत असलेल्या गरीब जनाबाईनेच देवाच्या गळ्यातले पदक चोरले
असा आळ तिच्यावर येतो. तिने याचे विश्लेषण अभंगातून असे केले आहे की,
धरिला पंढरीचा चोर, गळा
बांधुनियां दोर |
हृदय बंदिखाना केला, आत विठ्ठल कोंडिला
||
मी
सोनं नाणं नाही चोरलं, मी तर विठुरायला चोरून माझ्या
हृदयात बंदिस्त केलंय. संत कबीरसुद्धा जनाबाईना भेटल्याचा प्रसंग आहे.
देवाची
भेट घ्यायला लांब कशाला जायला हवे? तुमच्या इथे पण देव आहे. तिच्या लेखी देव म्हणजे फक्त आणि फक्त
पांडुरंगच. तो पंढरीत असताना, तीर्थयात्रेला किंवा प्रवास
करून देवाला भेटण्याचे, त्याच्या दर्शनाचे काय अडले आहे असे
तिला वाटते. ती म्हणते,
पंढरी सांडोनी
जाती वाराणसी । काय सुख त्यांसी आहे तेथें ॥१॥
तया पंचक्रोसी
ह्मणती मरावें । मरोनियां व्हावें जीवनमुक्त ॥२॥
नको गा विठोबा
मज धाडूं काशी । सांगेन तुजपाशीं ऐक आतां ॥३॥
नामदेवांच्या
घरातले विठ्ठलभक्ति माय वातावरण, भजन कीर्तन, आर्त भक्ती,
नामदेवांचे अभंग लिहिणे, हे सगळे तिने जवळून अनुभवले होते.
यातून तिची भक्ती फुलली, नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या अभंग
रचना म्हणता म्हणता तिलाही काव्य स्फुरू लागले असावे. भक्तबरोबरच ती स्वत:च्या
जाणिवा काव्यातून मांडायला लागली. मग हळूहळू वारकरी संप्रदायात ती सामील झाली. संत
नामदेवांच्या घरात सगळेच विठ्ठल भक्त होते. जनी पण त्यांच्या सारखीच. पण
कुटुंबातलीच एक सदस्य आणि दासी असणारी जनी तिच्या या योगदानामुळे भक्तांची संत
जनाबाई झाली. तिचे गुरु संत नामदेवांनी समाधी घेतल्यावर तिनेही आपले जीवन संपविले
. देवचरणी लीन झाली. संत जनाबाई यांची समाधी तिच्या गावी गंगाखेड इथे आहे. इथून
दरवर्षी जनाबाईंची दिंडी आषाढीला पंढरीला जाते. ही नामयाची दासी आपल्या गुरूंइतकीच
लोकांच्या मनात राज्य करून आहे, हे खरच.
|| जय जय रामकृष्ण हरी ||
------------------------------------
No comments:
Post a Comment