|| निर्गुण वारी अभंगमाला ||
संत सेना महाराज
( १२७८ ते १३५८ )
आई-प्रेमकुंवरबाई, वडील- देवीदास
वारकरी संप्रदायातले संत ज्ञनेश्वर आणि संत
नामदेव यांच्या काळातले एक भगवद भक्त. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड येथे
१२७८ मध्ये झाला. त्यांचे गुरु श्री रामानंदस्वामी. जसे संत नामदेव महाराज पंजाब
मध्ये जाऊन राहिले होते तसेच सेना महाराज मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आले होते. धर्मप्रचारासाठी
त्या त्या प्रांताची भाषा संतांनी शिकून घेतली होती भाषेचा अडसर आला नाही. त्यामुळे
संत सेना महाराज उत्तरेत आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे कार्य करणारे संत होत. त्यांच्या
हिन्दी रचना पण आहेत. गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात सुद्धा सेना महाराजांच्या
अभंगाचा समावेश आहे. संत जनाबाईंनी सेना महाराजांवर अभंग लिहिला आहे तो याप्रमाणे
-
सेना न्हावी
भक्त भला । तेणें देव भुलविला ॥१॥
नित्य जपे
नामावळी । लावी विठ्ठलाची टाळी ॥२॥
रुप पालटोनि
गेला । सेना न्हावी विठ्ठल झाला ॥३॥
काखें घेउनी
धोकटी । गेला राजियाचे भेटी ॥४॥
आपुले हातें
भार घाली । राजियाची सेवा केली ॥५॥
विसर तो पडला
रामा । काय करूं मेघःशामा ॥६॥
राजा अयनियांत
पाहे । चतुर्भुज उभा राहे ॥७॥
दूत धाडूनियां
नेला । राजियानें बोलाविला ॥८॥
राजा बोले
प्रीतिकर । रात्रीं सेवा केली फार ॥९॥
राजसदनाप्रति
न्यावें । भीतरींच घेउनी जावें ॥१०॥
आतां बरा
विचार नाहीं । सेना म्हणे करुं काई ॥११॥
सेना न्हावी
गौरविला । राजियानें मान दिला ॥१२॥
कितीकांचा शीण
गेला । जनी म्हणे न्हावी झाला ॥१३॥–
संत जनाबाई चा अभंग , हा घडलेला चमत्काराचा प्रसंग जनाबाईंनी लिहून
ठेवला आहे.
सेनाजींचा विवाह सुंदरबाई यांच्याशी झाला. वडिलांनी वृद्धात्वामुळे
आपला व्यवसाय सेनाकडे सोपविला आणि ते हरिभजनात वेळ घालवू लागले. पंढरपूरला
विठ्ठलाच्या दर्शनाची त्यांची शेवटची इच्छा अपुरी राहिली .त्यांनी सेनाला संगितले
तू एकदा दर्शनाला जाऊन माझी इच्छा पूर्ण कर. पुढे आई पण निवर्तली. सेना महाराज यांचे धार्मिक काम सुरूच होते.
उत्तर भारतातून तीर्थयात्रेला गेले महाराष्ट्रातील वारकरी भक्त बांधवगड मार्गे येताना
सेना महाराज यांच्याकडे मुक्कामाला असत.‘साधुसंत येती घरा, तोची
दिवाळी दसरा’ असा उत्साह त्यांच्याकडे यावेळी असे.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची माहिती सेना महाराजांना मिळत राही. पंढरपूर
तेंव्हा धार्मिक चळवळीचे केंद्र झाले होते. पंढरीची वारी करण्याची त्यांचीही तीव्र
इच्छा होई. ‘पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती, स्वप्नी पांडुरंग’ असा ध्यास होता. पण राजदरबारी सेवा असल्याने ते शक्य नव्हते. शिवाय राजा
रामसिंह यांच्या निधनानंतर राजपुत्र विरसिंह गादीवर बसला.
एकदा अशीच घटना घडली. सेनामहाराज यांच्याकडे महाराष्ट्रातून आलेला
साधूसंतांचा मुक्काम होता.त्यांच्या व्यवस्थेत घरीच खूप वेळ गेला आणि राजदरबारी
सेवेला उशीर झाला. वाट पाहून राजा विरसिंह ने घरी बोलवण्यास सेवकांना पाठवले. सेना
महाराज यांच्या पत्नीने त्यांना सांगितले, “पाहुणे मंडळी घरी आली आहेत थोड्याच वेळात येतील”
सेवकांनी राजाला सांगितले, साधूसंतांची सेवा झाल्याशिवाय सेनाजी
दरबारी येणार नाहीत त्यांना साधू महत्वाचे आहेत. हा निरोप ऐकून राजा संतापला, “सेना कसा आला नाही? ताबडतोब माझ्यापुढे बांधून हजार
करा त्याला.त्वरित देहदंडाची शिक्षा द्या त्याला”.शिपाई हा हुकूम घेऊन बाहेर पडताच, काखेत धोकटी अडकवलेले सेनाजी राजासमोर हजर. राजाला नवल वाटले, शिपायांना सेना कसा दिसला नाही?
सेना हसतच राजाला म्हणाला, “आज अचानक संत मंडळी घरी आली, म्हणून उशीर झाला. माफी असावी”. शिपायांना परत येण्याचा निरोप राजाने
पाठवला आणि सेना राजाची सेवा करण्यास बसला. विरसिंह च्या डोक्याला सेनाच्या हाताचा
स्पर्श होताच,राजाला वेगळीच अनुभूति आली. आपण कुष्ठरोगाच्या व्याधीतून
मुक्त झाल्यासारखे वाटले. दाढी चालू असताना राजाला आरशामध्ये भगवंताचे रूप दिसे
प्रत्यक्ष पहिले की सेना दिसे. काहीतरी वेगळे आहे हे त्याच्या लक्षात आले. त्या
नंतर राजाने त्याचा सत्कार केला आणि सेनाच्या वेशातील भगवंत पांडुरंग परत गेला.
थोड्या वेळाने खरा सेना काम आटोपून सेवेसाठी दरबारात आला. आपण आत्ता तर माझी मालीश
आणि हजामत करून गेलात, पुन्हा का आलात?
मी तुमच्या धोकटीत मोहरा टाकल्या. सेनाने हातातली धोकटी उघडून पाहिली तर काय ? खरच त्यात मोहरा होत्या. झालेला प्रकार सेनाच्या लक्षात आला. एका
भक्तासाठी पांडुरंग धावत आला, आणि आपण ज्याला आपला सेवक समजतो त्याच्यावर
प्रत्यक्ष भगवंताचे कृपाछत्र आहे याची जाणीव राजा विरसिंहला झाली. सेनाजिना
त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. ही कथा प्रत्यक्ष सेना महाराजांच्या अभंगात आहे,
अभंगा बरोबरच त्यांनी ओवी, गौळण, विराण्या, पाळणा, आरत्या, भारुडे अशा प्रकारात रचना केल्या आहेत. आळंदी, त्र्यंबक आणि सासवड महात्म्य काव्यातून लिहिले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
यांना आदरांजली वाहिली जणू. नामदेव महाराजांच्या तोंडून या भावंडांबद्दल खूप ऐकले
पण आपण यांना पाहू शकलो नाही भेटलो नाही याचे शल्य त्यांना टोचत राहिले. म्हणूनच
या तिन्ही ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. त्याची महती ते आळंदी महात्म्य मध्ये वर्णन
करतात,
आळंदी
माहात्म्य --- ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥ १ ॥
ज्ञानदेव
माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥ २ ॥
ज्ञानदेव
माझे सोयरे धायरे । जिवलग निर्धारे ज्ञानदेव ॥ ३ ॥
सेना म्हणे
माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेव ॥ ४ ॥
त्र्यंबक
महात्म्य सांगताना ते म्हणतात, --
शिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥ १ ॥
तया माझा
नमस्कार । वारंवार निरंतर ॥ २ ॥
सव्य नांदे
कैलासराणा । मागें गंगा ओघ जाणा ॥ ३ ॥
सेना घाली
लोटांगण । वंदि निवृत्तिचे चरण ॥ ४ ॥
गौळण-
गाय चारी
घननीळा । सवें गोपाळांचा मेळा ।
मोहिलें
वेणुनादें सकळां । स्वानंदे गाई नाचती ।
गोपिका
परमानंदें गाती । गोपाळ प्रेमें डुल्लती ॥ १ ॥
भला भला
तूं श्रीहरी रे ॥ ध्रु० ॥
वासुदेव -
टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन ।
आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥ १ ॥
नका पाहूं काळ वेळां । दान देई वासुदेवा ।
व्हां सावध झोपेला । सेना न्हावी चरणीं लागला गा ॥ ५ ॥
संकटकाळी विठूराया भक्तांसाठी धावत येतो,अशी उदाहरणे बहुतेक संतांच्या चरित्रात आपल्याला दिसतातच. हेच
वर्णन वर संत जनाबाईच्या अभंगात आहे.
पुढे राजाने सेनाजींकडे दीक्षा मागितली.
त्यानंतर आपण तीर्थयात्रेला महाराष्ट्रात जातोय असे सांगून पंढरीला आले. सर्व संत
मंडळी आणि भक्त यांच्या भेटीचा सोहळा
त्यांनी अनुभवला चंद्रभागेत स्नान पुंडलिक आणि विठुरायचे नयनमनोहर दर्शन
झाले . याचा अनुभव त्यांच्या शब्दात
“विटेवरी उभा नीट देखिला गे माये।
निवाली
कांती हरपला देहभाव ॥१ ॥
ते
रूप पाहता मन माझे वेधले॥
नुठेचि
काही केले तेथुनि गे माये॥ २॥
अवघे
अवधियांचा विसर पडियेला॥
पाहता
चरणाला श्रीविठोबाच्या॥ ३॥
सेना
म्हणे चला जावू पंढरीसी॥
जिवलग
विठ्ठलाशी भेटावया॥ ४ ॥
पंढरीनगरी सेना महाराजांना खूप आवडली. संतांचा सहवास आणि पवित्र
वातावरण, रामकृष्ण हरीचा जयघोष,
सामाजिक समतेचे वातावरण हे सर्व सेना महाराजांना आनंद देत होतं.
घेतां नाम
विठोबाचें । पर्वत जळती पापांचे ॥ १ ॥
ऐसा नामाचा
महिमा । वेद शिणला झाली सीमा ॥ २ ॥
नामें
तारिलें अपार । महा पापी दुराचार ॥ ३ ॥
वाल्हा
कोळी ब्रह्महत्यारी । नामें तारिला निर्धारीं ॥ ४ ॥
सेना बैसला
निवांत । विठ्ठल नाम उच्चारीत ॥ ५ ॥
किंवा
जाता पंढरिस सुख वाटे जीवा ||
आनंदे केशवा भेटतांचि ||
वारकरी संप्रदायचा प्रचार त्यांनी केला.
त्यातून समाज प्रबोधन केले. विठ्ठलाचे नाम स्मरण हे सहज सुलभ आहे . अवघड नाही. हे
सांगताना ते अनेक पौराणिक संदर्भ देतात आणि सांगतात ईश्वराच्या नाम स्मरणाने
मुक्ती मिळते.
मराठी मातीशी एकरूप होऊन महाराष्ट्रात बरीच वर्षे राहिल्यानंतर ते शेवटी शेवटी पुन्हा बांधवगडला गेले.तिथेच त्यांनी समाधी घेतली. बांधवगढला मोठे समाधी मंदिर होते. पंढरपुरला सुद्धा प्रदक्षिणा मार्गावर संत सेना नाव्ही महाराज समाधी मंदिर आहे. तिथेही समाधी उत्सव साजरा होत असतो .
|| जय जय रामकृष्ण हरी ||
© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .
---------------------------------------------
No comments:
Post a Comment