|| निर्गुण वारी अभंगमाला ||
(जन्म-१३९०,मंगळवेढा,मृत्यू-१४६८, पंढरपूर)
(आई – नर्तिका शामा)
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या / शामा
नर्तिकेच्या(गणिका) घरी जन्मलेली विठ्ठलभक्त, पंधराव्या शतकातल्या संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई, मुक्ताबाई, भागवत संप्रदायातल्या एक प्रमुख संत
म्हणजे कान्होपात्रा. बाराव्या शतकात त्या वेळी मंगळवेढ्यात बिदरच्या बहामनी
राज्याचा जुल्मी सत्तेचा अंमल होता.
संत कान्होपत्रा यांनी, आपल्या अभंगातून समाजातील संवेदनशील विषयांचे प्रश्न समाजासमोरच मांडून
जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. परंपरेला नाकारून संवेदनशील
कान्होपात्रा पांडुरंगाच्या भक्तीमुळे त्याच्या चरणी लीन होते .स्वत:च्या
जीवनातल्या वेदनेने व्याकुळ झाल्यामुळे, आर्त आणि उत्कट
भावना तिच्या अभंगातून व्यक्त होतात.
कान्होपात्राला आईनेच आई व वडील दोघांचे प्रेम दिले. गोड
गळा आणि सौंदर्य लाभलेल्या कान्होपात्राला घडवताना आई शामा नीट काळजी घेई. पण
समाजामध्ये त्यांना सन्मानाने जगण्याचे जिणे नाकारले होते. पारंपरिक देहव्यवसायला
नाकारून सुद्धा समाजातील लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण तिला सतत घायाळ करत
असे. आपल्याला चारचौघिंसारखे समाजात मिसळता येत नाही, समाजात आपल्याला प्रतिष्ठा नाही, देवळात
दर्शनाला जाता येत नाही. देव कसा आहे बघता येत नाही, या
सगळ्याची कान्होपात्राला खंत वाटत राही. जशजशी ती मोठी होत होती तसे तिला नृत्य
आणि गायनाचे धडे मिळू लागले.त्यात ती भक्तिरसातली भजने शिकली. ती तिला अत्यंत आवडायची.
श्रीकृष्णाच्या लीला ती काव्यातून म्हणायची. संत ज्ञानेश्वर यांच्या विरहिण्या आणि
अभंग तिला खूप आवडायचे. कान्होपात्रा नामदेव महाराजांचे कृष्णलिलांवरचे अभंग देहभान
हरपून गात असे. तेंव्हा पासूनच कृष्णाचं रूप तिच्या मनात पक्कं ठसलं होतं.
आयुष्याची स्वप्ने बघण्याच्या वयात आल्यावर परिस्थितीची
कल्पना तिला आली आणि तेंव्हाच विरक्तीही यायला लागली. स्वार्थी आणि वासनांध जगाची
भीती वाटू लागली. आपला सुंदर देह कलंकित होऊ न देता विठ्ठलाच्या चरणी लीन झाली. त्यामुळे
मन भक्तीतच रमू लागले. तीच्या भावविश्वात आता फक्त परमेश्वरच होता. पण तिथेही शंका
होतीच, आपली भक्ति परमेश्वर स्वीकारील का, देवानेही आपल्याला झिडकारले तर? असा मोठा प्रश्न
तिच्यापुढे उभा असे.
पण दृढ निश्चय केला की आता या मार्गावरच चालायचे . मागे
फिरायचे नाही. भगवंतलाच शरण जायचे.
पतित तू पावना ।
म्हणविसी नारायणा ॥१॥
तरी सांभाळी वचन ।
ब्रीद वागविशी जाण ॥२॥
याति शुद्ध नाही भाव ।
दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥
मुखी नाम नाही ।
कान्होपात्रा शरण पायी ॥४॥
तिरस्काराने बघणार्या समाजापासून दूर
जाऊन जिथे शुद्ध, निर्मळ आनंद मिळतो त्या
जगात कान्होपात्राला जायच होत. वरकर्यांसोबत ती पंढरपूरला आषाढी वारीला जाऊ
लागली. आई शामा ही तिची भक्तिची ओढ बघून तिला वारीला पाठवत असे. संतांची आणि तिची
भेट झाली. वारकर्यांची भेट झाल्यावर तिला कळले की जगात चांगली माणसे पण आहेत.
गावात आलेली वारकरी दिंडी बघायला गेली
तेंव्हा ,तिने आपली व्यथा वारीतल्या एका वारकर्याला बोलून
दाखविली.उपेक्षित जीवन, लहानपणापासून आईची होत असलेली
कुचंबणा, स्वत:चं मन मारून पोटासाठी देहविक्रय करणे हे पाहून
उबग आला आहे असे सांगितले.यावर ते तिला सांगतात, “मुली देवाच्या
दरबारी कुणी हीन किंवा कुणी पतित नसतो. त्याच्या दृष्टीने सर्व भक्त त्याचीच लेकरे
असतात. तो सर्वांवर सारखीच माया करतो. कोणीही असला तरी त्याची भक्ति परमेश्वराच्या
चरणी रुजू होतेच. त्याच्या दारी तुझी कधीही उपेक्षा होणार नाही”. याचा
कान्होपात्राला खूप आनंद झाला. आपण पंढरीला जाऊ शकतो,
विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतो याबद्दल ती आश्वस्त झाली.
धावतच येऊन आईला सांगितले ,आई आज आपल्या गावात पंढरीला
निघालेल्या वारकर्यांच्या मुक्काम आहे. मलाही त्यांच्या बरोबर जायची इच्छा आहे, आई म्हणाली, कान्हा अगं हे कसं शक्य आहे? आपण पतित आहोत. हीन आहोत , “अगं आई, देवाजवळ उच्च नीच काही नसत, सर्वजण त्याला सारखेच
असतात” .या कान्हाच्या बोलण्याचे तिला कौतुक वाटले. पण तुला कोण बरोबर नेणार? अगं वारकरी मंडळी हो म्हणाली आहे , मी जाऊ ? शेवटी, आई शामा ने तिला परवानगी दिली. कान्हा
वारकर्यांच्या पंढरीच्या मेळ्यात चोखोबांच्या दिंडीत सामील झाली. तिथे तिला
निरव्याज प्रेम मिळाले. आपुलकी मिळाली, स्नेह मिळाला. सगळे
तिची काळजी घेत, कौतुक करीत.कान्होपात्राला ही वेगळीच
अनुभूति मिळत होती.
हरली भूक तहान निमाली,
संतांची देखिली चरणांबुजे
किर्तनाचे रंगी, अनंदे नाचतां,
कान्होपात्रा चित्तां समाधान ||
स्वार्थी
लोकांच्या मनोरंजना पेक्षा स्वताला विसरून देवाचं गुणगान करण्यात तिला जास्त आनंद
वाटू लागला. नामदेव महाराजांना जसा पांडुरंग भेटला तसा आपल्यालाही भेटावा अशी तिची
इच्छा होती.
पंढरपूराहून
कान्होपात्रा मंगळवेढ्याला परत आली ती आनंदातच. आता शरीर मंगळवेढ्यात आणि मन
पंढरपूरमध्ये अशीच ती राहू लागली. फक्त भक्ति आणि भक्ति.
परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी
नामस्मरण हाच उत्तम मार्ग आहे.अभंगातून त्याही आता सांगू लागल्या,
घ्यारे
घ्यारे मुखी नाम,अंतरी धरूनिया प्रेम,
माझा आहे भोळा बाप,घेतो ताप हरोनी ,
आपुलिया नामासाठी, धावे संकटी लवलाही,
घ्या रे घ्या मुखी नाम ,कान्होपात्रोचा माधव ||
नामस्मरणात मोठी शक्ति असते म्हणून ती अखंड नामस्मरण करत होती. अजूनही
परमेश्वर प्राप्त झाला नाही म्हणून दर्शनासाठी कान्हो पात्रा आसुसलेली होती. संतांच्या
सहवासामुळे, वारकरी भक्तांच्या संगतीमुळे
तिची हरिनामाची भक्ति अजूनच दृढ होऊ लागली. विठ्ठलच आपला सर्वेसर्वा आहे . ईश्वराला
कान्होपत्रा आर्त विनवणी करतात,
जिवीचा जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई
सांवळे डोळसे करुणा येऊदे काही
शरण कान्होपात्रा तुजला वेळोवेळी पाही ,करुणा येऊ दे काही ...
अशी दर्शनासाठी अधीर झालेली कान्होपात्रा आर्त विनवणी
करते. मी जन्मतच पतित आहे अजून मी
भक्तीच्या उंचीवर पोहोचले नाही ,माझे अपराध पोटात घाल, मला दर्शन दे, माझ्या जन्माचं सार्थक कर.
अगा वैकुंठीच्या राया ,अगा विठ्ठल सखया,
अगा नारायणा, अगा वसुदेवनंदना ,
अगा पुंडलिक वरदा, अगा विष्णु तू गोविंदा
अगा रखुमाई च्या कांता , कान्होपात्रा राखी आतां ||
उत्कट भक्तीतून कान्होपात्रा आता ज्ञानेश्वर
महाराज आणि नामदेव महाराजांसारखी अभंग रचना करू लागली. त्यातून भक्तीतला आनंद
व्यक्त होत होता. अनुभव मांडत होत्या. आता हीन आणि पतित असण्याची भावना त्यांच्या
मनातून नाहीशी झाली होती. भेदाभेद विसरून भक्तिमार्गावर चालण्याचा मार्ग दाखवणार्या
ज्ञानेश्वरांबद्दल आदर होता, तो अभंगातून दिसतो. आळंदीला जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर
त्यांचे अंतकरण भरून येते.
शिव तो निवृत्ती ,विष्णु ज्ञानदेव पही,
सोपान तो ब्रम्हा मूळ माया मुक्ताबाई,
धन्य धन्य धन्य निवृत्ती राया,
धन्य ज्ञानदेव सोपानराया,
धन्य कान्होपात्रा अजी झाली भाग्याची,
भेटी झाली ज्ञानदेवा ची म्हणुनिया ||
त्यांची आई कान्होपात्राला भक्तीतरसात बुडून गेलेली पाहत
होत्या. आता आपले वय झाले आहे म्हणून तिने कान्होपात्राला जवळ बोलवून सांगितले की, “तुझी भक्ती, हरिभजनाची आवड मला माहिती आहे, तू लहान होती तोवर
ठीक होतं, आता मी म्हातारी झाले आहे,
दिवसभर अभंग आणि भजनात वेळ न घालवता, पोट भरण्यासाठी तू हे
पुढे बघावस” नाही आई , मला आत्मशांतीचा
मार्ग सापडला आहे मी तोच धरणार. मग मात्र आईने समजावणे सोडून दिले.
कान्होपात्राच्या सौंदर्याची ख्याती बिदरच्या बादशहाच्या
कानावर होतीच, एक दिवस त्याने तिला पकडून आणण्यासाठी आपले
सरदार मंगळवेढयास पाठवले. समाजाचे रक्षकच भक्षक झाले तर न्याय कोणाकडे मागायचा? पण अंगातले बळ एकवटून ती आल्या प्रसंगाला तोंड द्यायला सिद्ध होते. अवघ्या
२२ किलो मिटरवर असलेल्या पंढरपूरास कान्होपात्रा धावत जाते,
विठ्ठलाला साकडे घालते, आपल्या शीलाचे रक्षण करावे म्हणून
आर्त मागणे मागते. व्याकुळ होऊन विनवणी करते. या दुष्टांपासून मला वाचव. माझ्या
देहाची विटंबना होऊ देऊ नकोस. मी देह विसर्जनाचा निर्णय घेतला आहे.
नको देवराया अंत आता पाहू,
प्राण हा सर्वथा फुटो पाहे ,
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले ,
मजलागी जाहले तैसे देवा ||
कान्होपात्रा चे मोजकेच २३ अभंग आहेत पण त्यातून तिची व्यथा, वेदना, व्यक्त होताना दिसते. संतांविषयीचा
आदर भाव, विठ्ठलाविषयीचा भक्तीभाव , त्याच्या
दर्शनाची तळमळ त्यातून व्यक्त होते. स्त्री जीवनाची आर्तता आणि तिच्या आयुष्याच्या
प्रसंगातून प्रांजळ, पवित्र व शुद्ध मनाचे प्रतिबिंब त्या
अभंगातून दिसते.
|| जय जय रामकृष्ण हरी ||
© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .
---------------------------------------------
No comments:
Post a Comment