Monday, 12 July 2021

संत नामदेव बाबा

 

|| निर्गुण वारी अभंगमाला ||

संत नामदेव बाबा

संत नामदेव महाराज यांची ओळख आधीच्या लेखात झाली आहेच. पण त्यांच्या पंजाबमधल्या कामाची ओळख प्रत्यक्ष गुरुदासपुरला गेल्यावर झाली. एखादं स्थान महात्म्य काय असतं याचा साक्षात्कारच झाला जणू.  

आमच्या महाराष्ट्रातल्या विठुचा गजर तिकडे शेकडो मैल दूर पंजाब मध्ये गुरुदासपुर जिल्ह्यातल्या घुमान मध्ये ८०० वर्षापूर्वी झाला. ही विठ्ठलभक्ति पंजाबी बांधवांमध्ये प्रसारित करण्याचं काम महाराष्ट्रातल्या आमच्या संत नामदेव महाराजांनी केलं. संत नामदेव महाराजांचे साहित्य मराठी प्रमाणे पंजाबी भाषेत सुद्धा आहे.

२०१५ मध्ये जेंव्हा साहित्य संमेलन घुमान येथे ठरले तेंव्हाच जायचे ठरवले होते. तेंव्हा विचार होता फक्त साहित्य संमेलनास उपस्थित राहणे. श्रवणभक्ती करणे. नवा विचार घेऊन येणे. त्यासाठी आम्ही संस्कार भारतीचे सहा जण पश्चिम महाराष्ट्रातून संमेलनाला गेलो. संमेलांनासाठी महाराष्ट्रातून सोडलेल्या विशेष रेल्वेने ६० तास प्रवास करून बियासला उतरलो. रेल्वेतून उतरण्यापासून संबधित कार्यकर्ते आमच्या अगदी बॅग धरून, अदबीने बसच्या व्यवस्थेपर्यंत घेऊन जात होते. हे संमेलांनासाठी या विशेष रेल्वेतून उतरलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी होते. अतिशय काळजी घेत होते. मला तर कळत नव्हतं की आपण कोण आहोत?  आपण मुलाकडचे वर्‍हाडी असल्यासारखे वाटायला लागले. 


तिकडे घुमानला उतरल्यावर राहण्याची व्यवस्था, संमेलांना ठिकाणी व्यवस्था, रस्त्यारस्त्यात काही लंगर उभे केलेले, काही ठिकाणी ऊसाचा ताजा ताजा रस काढून देऊन आलेल्यांची सेवा करणारे, अदबीने नमस्कार करून स्वागत करणारे ? एव्हढा आपलेपणा ? खूप लाजायला झालं. आपण काही विशेष कुणी नाही, तरी का? असा सतत पडलेला प्रश्नच. दुकानात गेलो तर दुकानदार हात जोडून स्वागताला उभे ! नमस्कार करून आगत - स्वागत करून, खरेदी झाल्यावर घरी जेवायचे आमंत्रण देऊ करणारे, आज उद्या केंव्हाही या जेवायला. आमच्या घराला तेव्हढेच पाय लागतील तुमचे? आं? आपल्या चेहर्‍यावरून यांना काय समजतय असं वाटलं. हो खरच, तसच होतं. महाराष्ट्रातली मंडळी संमेलनाला येणार हे कळल्यापासून ते सर्व लोक उत्सुक होतेच. कारण त्यांच्या संत नामदेवजी महाराजांचे भक्त त्यांच्या गावातून घुमानला आले होते हेच त्यांच्या साठी अत्यंत महत्वाचे होते. घुमान  मधल्या प्रत्येक दुकानात संत नामदेव यांचा हार घातलेला फोटो होता. तो फोटो शीख संतांचाच वाटत होता. संत नामदेव महाराज असे कसे असू शकतील अशी शंका आली. पण देश तसा वेष , म्हणून संतांनी सुद्धा त्या त्या लोकांमध्ये मिसळून जाऊन काम केले आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावर पटले. दुकानातून बाहेर पडताना, “दीदी शामको खाना खाने आओ, आज नही तो कल सुबह आओ” हा त्यांचा आपल्याबद्दलचा आदर, छोट्याशा घुमान गावामध्ये ठिकठिकाणी नामदेव महाराजांचे फोटो असलेले फलक, पताका, पंजाबी भाषेतून लिहिलले बोर्ड, स्वागताच्या कमानी वातावरण भारलेले होतं हे खरं. संमेलना ठिकाणी जेवणाची अति उत्तम व्यवस्था, महाराष्ट्रियन आणि पंजाबी संस्कृतीचं खाद्य पदार्थांचं मिलन. भरगच्च कार्यक्रमातून वेळात वेळ काढून संत नामदेव महाराजांच्या मंदिर व इतर ठिकाणी जायचं होतं.

संमेलनाला विशेष दिंड्या पण आल्या होत्या. पंढरपूर, नरसी गावचे लोक सुद्धा आवर्जून आले होते. एरव्ही संत नांदेवांचे सुमन कल्याणपूर यांनी गायलेला चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती.. , पंडित भिमसेनजींनी गायलेला - पंढरी निवासा सख्या पांडुरंगा.. रात्र काळी घागर काळी, यमुनाजळे ही काळी वो माय -हे गोविंद पोवळे यांच्या आवाजात ऐकलेल्या अभंगातून संत नामदेव यांचा परिचय लहानपणापासूनच होत होता. पण इथे आल्यावर घुमानचा हा परिचय काही वेगळा, खूप काही शिकवणारा, अभिमान वाटणारा असा होता. संत नामदेव महाराज इतक्या लांब पंजाब मध्ये कसे आले असतील? कशासाठी ? याचा इतिहास मराठी माणसाला माहिती असायला हवा,

    गुरुपदेश झाल्यानंतर संत ज्ञानदेव यांचा नामदेवांना ६,७ वर्ष सहवास मिळाला, एकदा ज्ञानदेव नामदेवांना पंढरपूरला भेटायला आले आणि तेंव्हा तीर्थयात्रा करण्याची इच्छा बोलून दाखवली. आधी नामदेव तयार नव्हते कारण त्यांच्या मते सर्व तीर्थे पंढरीजवळच आहेत मग कशाला बाहेर जायचे असे मत होते. पण साक्षात परब्रम्ह मूर्ती ज्ञानेश्वर आपल्या संगतीचा आदर करत आहेत आणि नाही का म्हणायचे? आणि ईश्वरानेच दृष्टान्त दिला तीर्थयात्रेस जावे म्हणून. मग काय ज्ञानदेव आणि नामदेव, इतर भक्त मंडळींबरोबर तीर्थयात्रेस गेले. त्यामुळे तीर्थाटनाचा वेगळा अनुभव त्यांनी घेतला. महाराष्ट्राबाहेरचे विविध क्षेत्र त्यांना पाहाला मिळाले, अनेक साधूसंतांची भेट व सहवास मिळाला. अनेक अनुभव मिळाले. अनेक प्रसंग घडले. या यात्रेनंतर श्री नामदेव यांना नवी दृष्टी मिळली. आल्यानंतर संत ज्ञानेश्वर यांनी काही दिवसांनी  समाधी घेण्याचा विचार सांगितला. आळंदीला ही समाधी घेतली . संत नामदेव महाराजांनी याचे करुण वर्णन समाधिच्या अभंगात केले आहे.

नामा म्हणे आता लोपला दिनकर ,बाप ज्ञानेश्वर समाधिस्त ,

नामा म्हणे देवा ज्ञानदेव सृष्टी पडेल का दृष्टो पुन्हा आता ?

संत अंतरला, सखा झाला दूर, आता पंढरपूर कैसे कंठू? आणि नामदेवांना खूप दु:ख झाले , हळूहळू हे गाव सोडून, दूर जाण्याचा विचार पक्का होऊ लागला. उदास झालेले नामदेव महाराज इथून पुढच्या उत्तर आयुष्यात भक्तीचा प्रसार करायला पुन्हा तीर्थाटनास गेले. उत्तरेतून पंजाब कडे गेले. त्यांनी सांगितलेच होते की मी पंढरी बरोबर नेईन, मी जिथे राहीन तिथेच पंढरी होईल. श्री नामदेवांचे चरित्र त्यांच्याच अभंगातून कळते, पंजाबी भाषेत सुद्धा त्यांचे चरित्र आहे.

अमृतसर जिल्ह्यात ते भूतभिंड, मरड आणि भट्टीवाल येथे राहिले. भट्टीवाल येथे नामदेव जी राहत होते तिथल्या तलावाला आजही नामियाना तलाव असे ओळखतात. तिथेही त्यांचे शिष्य झाले. नंतर ते ध्यानधारणेसाठी जंगलातील एका शांत आणि निवांत स्थळी राहिले, ते म्हणजे घोमान. तिथे असताना अत्याचारी मुघलांच्या विरोधात त्यांनी सर्वांना एकत्र करुन जनजागृती केली. शिष्य जमविले. त्यांच्या आश्रमा शेजारीच लोकांनी वस्ती केली. आणि घोमान हे नवे गाव निर्माण झाले.


आजूबाजूच्या च्या गावातील लोक निरनिराळ्या समस्यांना तोंड देत होती. पाणी रोग राई,अन्याय  अत्याचार ,शिवाय रूढी परंपरा व्यसने चालीरीती या सर्व विषयात संत नामदेव महाराज यांनी  लोकांचे प्रबोधन केले. जनजागृती केली. संत नामदेव महाराज यांना इस्लामी राजवटीत पंजाब मध्ये मुघल राज्यकर्त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्यांची अनेक वेळा कठोर परीक्षा घेतली गेली.त्यांना त्रास दिला. पण दिव्यात्वाची प्रचिती आलीच. नंतरच्या काळात घुमान मध्ये फिरोज तुघलक याने संत नामदेव महाराज यांची मशिदीसारखी समाधी बांधली. मात्र त्याचे नूतनीकरण सरदार जस्सासिंह  रामगढिया यांनी केले. आता घुमट मशिदी सारखा असून बाकी मंदिर स्वरुपात वास्तु आहे. शिखपंथात मंदिर ही संकल्पना नाही मात्र संत नामदेव महाराज यांचे एकमेव मंदिर आहे, त्यात राधा कृष्णाच्या मूर्ती आहेत. शिवलिंग आहे. हजारो भाविक इथे भेट देतात. संत नामदेव महाराज हे पंजाबतील सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक  व राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक मानले जातात.  



पंजाबातील त्यांचं कार्य खूप मोठ्ठं आहे .उल्लेखनीय म्हणजे शीख संप्रदायांच्या आदिग्रंथात संत नामदेव महारांजच्या ६२ पदांचा समावेश आहे. ही पदे तिथे प्रात:स्मरणीय मानली जातात. गुरुदासपुर जिल्ह्यात घुमान मध्ये नामदेव दरबार, नामदेव चरण कमाल आणि नामदेव तपियाना हे नामदेव महाराज यांची तप करण्याची जागा आज गुरुद्वारा म्हणून आहे, नामदेव महाराज यांच्या नावाने अशी पाच गुरुद्वारा आहेत. अशी प्रचंड मोठी मंदिरे आहेत.या तपियाना बाहेर एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले संत नामदेवांच्या भक्तीचे. मुख्य गेट बाहेर सर्व भक्त आत जाताना चप्पल बूट बाहेर काढून जात होते. तिथे एक भक्त स्त्री सर्वांच्या चप्पला बूट कापडाने स्वच्छ पुसून इकडे तिकडे पडलेल्या चपला पुन्हा नीट लावून ठेवत होती. आत दर्शनाला एका वेळी जाणार्‍यांची संख्या ५,१० नव्हती शेकड्याने होती. असे हजारो लोक दिवसभर येत होते. तिची ही सेवा मात्र अखंड चालू होती. मग कळलं की, ही सेवा संत नामदेव महाराजांच्या भक्तांची म्हणजेच नामदेव बाबांची समजून ती हे करत होती. हे नामदेव महाराज यांच्या अनोख्या भक्तिचं हे  उदाहरण प्रत्यक्ष पाहीलं.    

श्री नामदेवजयंतीचा उत्सव तिथे लाखोंच्या उपस्थितीत होतो. तिथे त्यांना नामदेव बाबा म्हणून ओळखतात. गुणगान गातात. पंजाबी भाषेतलं शबद कीर्तन आपल्या सारखेच वारकरी कीर्तन असते. अशा प्रकारे हा घुमानचा इतिहास आणि संत नामदेव बाबांचा इतिहास  व त्याचे महत्व प्रत्यक्ष आम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळाले, खूप अप्रूप वाटले , माय मराठीचा झेंडा पंजाबी भाषिक भूमीत फडकला, तिथेच पुन्हा हा विठ्ठल नामाचा गजर आणि साहित्याचा जयघोष दुमदुमला होता. महाराष्ट्रात जसे नांदेड इथे शीख गुरुद्वारा हे तीर्थक्षेत्र आहे, तसेच घुमान हे पंजाबतील मराठी माणसाचे तीर्थक्षेत्र वाटले तर नवल नाही.

|| जय जय रामकृष्ण हरी ||  

 

© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .

                                            ---------------------------

 

No comments:

Post a Comment