|| निर्गुण वारी अभंगमाला ||
(जन्म- तेरावे शतक, मेव्हुनपुरी-बुलढाणा , मृत्यू- ई.स.१३३८
मंगळवेढा)
(आई-
सावित्री ,वडील- सुदामा )
लहानपणापासूनच त्यांना परमेश्वर भक्तीची गोडी लागली होती.
मंगळवेढ्याहून पंढरीला जाणारे वारकरी पाहिले की त्यांचे मन आनंदत असे. कोणीही
विठ्ठल भक्त दिसला तरी त्यांना परमावधीचा आनंद होई.संत ज्ञांनेश्वर महाराज आणि संत
नामदेव महाराज व भक्तांच्या अनेक गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या तेंव्हाच त्यांची
इच्छा होती की, या थोर विभूतींना आपण भेटावे,
कोणी पंढरिसी जाती वारकरी,
तयाचे पायांवरी भाळ माझे||
आनंदे तयांसी भेटेन आवडी,
अंतरीची गोडी घेईन सुख||
ते माझे मायबाप सोयरे सज्जन,
तयांवरी तनुमन ओवाळीन ||
विठ्ठल नामात
सतत दंग असणार्या, संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सामाजिक वेदना मांडून भक्तीचा आशावाद
सांगितला आहे, ते म्हणतात, मंदिरात
बंदिस्त असला तरी मंदिराच्या पायरीशी उभे राहून, त्या सख्या
पांडुरंगाशी आमचा मुक्तपणे संवाद होणारच, दु:खाच्या वाळवंटात
आम्ही भक्तीचा मळा फुलवू आणि परमात्म्याशी एकरूप होऊ. समाजामुळे त्यांना त्रास
झाला तरी त्यांनी कोणाला दोष दिला नाही. आपले हे सर्व भोग आहेत असेच त्यांना वाटे.
त्या विषयी चोखोबांनी आत्मनिवेदनात म्हटलं आहे,
शुद्ध चोखामेळा, करी नामाचा सोहळा |
जातीहीन मी महार |
पुर्वीनिळाचा अवतार |
कृष्ण निंदा घडली होती |
म्हणूणी महार जन्म प्राप्ती |
चोखा म्हणे विटाळ |
आम्हा पूर्वीचे फळ ||
वर्ण व्यवस्थेमुळे क्षुद्र आणि स्त्रिया यांच्यावर अनेक बंधने
होती. पण याचवेळी भागवत धर्माच्या स्थापनेमुळे आणि जनजागृतीमुळे सर्व लोकांना
भक्तिमार्ग खुला झाला. याच काळात (तारीख उपलब्ध नाही)चोखोबांचा जन्म झाला. उच्च
वर्णीयांसारखे राहण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वत:च्याच समाजाकडून त्यांना त्रास झाला . शेवटी अत्यंत निराश होऊन
विठ्ठल भक्तीकडे ओढले गेले. उद्विग्न होऊन ते म्हणतात,
चोखा म्हणे मज आला से गहिवर |
न सुचे विचार काय करू ||
काय हे दुख किती या यातना |
सोडावी नारायणा यातोनिया ||
या भक्तीतून त्यांनी आपले मोठेपण सिद्ध केले.त्यांची पत्नी
सोयराबाई, लहान बहीण निर्मळा, मेव्हणे
बंका आणि मुलगा कर्ममेळा सगळेच जण नित्यनेमाने पांडुरंग भक्ति करत असत. निर्मळा
सुद्धा समाज प्रबोधन करण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. त्या चोखोबांना गुरु मानत.
नामसाधनेचा सोपा मार्ग आपल्याला चोखोबांनीच सांगितला असं त्या म्हणतात.
चोखा म्हणे निर्मळेशी । नाम गाय अहर्निशी ॥
तेणे संसार
सुखाचा । इह परलोकी साचा ॥
साधन हेचि थोर
असे । शांती क्षमा दया वसे ॥
पोटापाण्याच्या उद्योगात मोलमजुरी करत असताना सुद्धा चोखोबांच्या तोंडी पांडुरंगाचेच नाव असे, चोखोबा यांच्या पत्नी सोयराबाई यांचे बाळंतपण स्वत: विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले होते अशी कथा आहे. सोयराबाईच्या ही अभंग रचना आहेत. तर त्यांचे मेव्हणे बंका महारा आणि बहीण निर्मळा यांचेही अभंग आहेत.
ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा |
काय भुललासी वरलीया रंगा |
चोखा डोंगापरी भाव नाही डोंगा |
काय भुललासी वरलिया सोंगा |
चोखोबांच्या रचनांतून वेदना जाणवते आपल्याला. संत
कान्होपात्रा या नाटकातलं हे पद आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. ही चोखोबांची
रचना बालगंधर्व यांच्या स्वरात आहे.
जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार |
बहू भुकेला मी जाहलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो||
अमुची केली हीन याती, तुज कां न कळे श्रीपती |
अशा या त्यांच्या रचंनामधून परमेश्वराची भक्ति, तळमळ, उपेक्षेची खंत दिसते.
‘आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण। वेदांचे वचन न कळे आम्हा।।
इतरांसारखे आपणही विठ्ठलाला
मंदिरात जाऊन भेटावे असे त्यांना वाटे, पण सावळ्या विठ्ठलाचं गोजिरं रूप
मंदिराच्या दारातूनच पहावे लागे.
सुख तयाचे चरणीं । अवघी सुकृतांची खाणी
॥२॥
महापातकी नासले । चोखट नाम हें चांगले ॥३॥
महाद्वारी चोखामेळा । विठ्ठल पाहातसे
डोळां ॥४॥
हा सर्व भेद दूर व्हावा .सर्वांना समान हक्क मिळावेत याचा प्रयत्न चोखोबांनी भक्तिमार्गाने केला. अभंगातून केला. चोखोबांना परमेश्वराची भक्ति करण्यासाठी सुद्धा यातना भोगाव्या लागल्या.
त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिणमुख वाहात चंद्रभागा ॥२॥
सकळ संतांचा मुगुटमणि देखा । पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥
चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकासी अखंडित ॥४॥
बहुत तीर्थें फिरोनियां आलों । मनासवें झालों वेडगळची ॥२॥
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या । मनाच्या राहिल्या वेरझारा ॥३॥
चोखा म्हणे पाहतां पंढरी भूवैकुंठ । मनाचे हे कष्ट दूर गेले ॥४॥
कर जोडोंनीया दोन्ही,चोखा जातो लोटांगणी |
महाविष्णूचा अवतार ,प्राणसाखा ज्ञानेश्वर ||
अशा प्रकारे चोखोबांनी
प्रणसाखा म्हणून त्यांना गौरविले आहे, आभार मानले आहेत.
नाथा
घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥ धृ ॥
उंबरठ्यासी
कैसे शिवू आम्ही जातिहीन|
रूप
तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन|
पायरीशी
होऊ दंग गावूनी अभंग॥ १ ॥
वाळवंटी
गावू आम्ही वाळवंटी नाचू।
चंद्रभागेच्या
पाण्याने अंग अंग न्हाऊ।
विठ्ठलाचे
नाम घेऊ होउनी निःसंग ॥ २॥
आषाढी-कार्तिकी
भक्तजन येती।
पंढरीच्या
वाळवंटी संत गोळा होती।
चोखा
म्हणे नाम घेता भक्त होती दंग॥ ३॥
संत बंका, चोखोबा विषयी म्हणतात,
‘चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तिचा आगर।।
चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साऊली।।
चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।’
तर, संत नामदेव जेंव्हा चोखोबांच्या अपघाती
निधनाची बातमी समजते तेंव्हा मंगळवेढ्याला येतात, आपल्या
शिष्याबद्दल ते म्हणतात,
‘चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा
माझा।।
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति। मोही
आलो व्यक्ति तयासाठी।।
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी
विघ्न पडो नदी।।
नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी। घेत
चक्रपाणी पितांबर।।
मंगळवेढा इथे गावकुसाचे काम चालू असताना दरड कोसळून त्याखाली त्यांचा मृत्यू झाला, नामदेव महाराजांनी तिथे स्वत: येऊन त्यांच्या अस्थि गोळा करून पंढरीस आणल्या. आज तेथे विठ्ठलाच्या मंदिरा बाहेरच चोखोबा यांची समाधी आहे. ज्या महाद्वारातून चोखोबा विठ्ठलाचे दर्शन घेत होते तिथेच आजही ते जणू विठ्ठलाच्या संगतीत राहत आहेत. मंगळवेढा इथे सुद्धा त्यांची समाधी आहे.
|| जय जय रामकृष्ण हरी||
© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .
--------------------------------------------
No comments:
Post a Comment