Thursday, 8 July 2021

संत नामदेव

  

|| निर्गुण वारी अभंगमाला ||

 संत नामदेव (रेळेकर)

(जन्म-१२७०- नरसी,हिंगोली,वैकुंठगमन-१३५० )

(आई-गोणाई,वडील-दामाशेटी)

  

संत शिरोमणि नामदेव संत ज्ञांनेश्वर यांच्या समकालीन, आपल्या कीर्तनाने प्रत्यक्ष पांडुरंगालाही डोलायला लावणारे श्री विठ्ठलाचा सगळ्यात जवळचा सखा. मराठवड्यातल्या हिंगोली जिल्ह्यात नरसी बामणी या गावचा जन्म. आता हे गाव नरसी नामदेव म्हणून ओळखले जाते. वडिल दामाशेटी यांचा कपडे शिवणे हा व्यवसाय होता.त्यांचे पूर्वजही भगवद्भक्त आणि सात्विक वृत्तीचे होते. त्यांचे बालपण पंढरपूर येथे गेले. लहानपणापासूनच ते विठ्ठल भक्त होते.त्यांची भक्ति म्हणजे,  

तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल ॥ देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल । पिता विठ्ठल ॥ बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल । गुरूदेवता विठ्ठल ॥ निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥ म्हणूनी कळीकाळा । पाड नाही ॥४॥
अशी होती.

ज्ञानेश्वर माऊलीन्चा संतांचा उपदेश सामान्य लोकांमध्ये रुजविणार्‍या नामदेवांना या भक्तिमार्गाचा आधारस्तंभ मानतात. म्हणूनच म्हणतात,

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ॥ नामा तयाचा किंकर । तेणे केलासे विस्तार ॥
जनार्दन एकनाथ । ध्वज उभारीला भागवत ॥ भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥

 त्यांचा बालपणीचा एक प्रसंग सांगतात, की, बाहेरगावी जायचे असल्याने वडिलांनी एक दिवस देवळात जाऊन विठ्ठलाची पूजा व नैवेद्य  दाखविण्यास नामदेवाला सांगितलं . लहानग्या नामदेवाने जाऊन पुजा करून तो दुधाचा नैवेद्य  पांडुरंगाला दाखवला. आणि आता देव हा नैवेद्य खाईल म्हणून वाट पाहत किती वेळ तिथेच बसून राहिला. तरी देव काही नैवेद्य खाईना. पुन्हा नामाने हात जोडून प्रार्थना केली.म्हणाला देवा ,तू जर आज नैवेद्य खाणार नसलास तर मी इथून हलणार नाही. भगवंतणे त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. बराच वेळाने नामदेव म्हणाला, विठोबा तू जर नैवेद्य खाणार नाहीस तर मी तुझ्या पायावर डोके आपटून प्राण देईन .बापरे? त्याच्या या निरागस भक्तीने केलेल्या अपेक्षेला विठ्ठलाने मानले आणि खरच प्रकट होऊन दिलेला नैवेद्य आनंदाने खाल्ला. तर एकदा कुत्र्याने पोळी पळवली ,पण त्याला हाकलायच्या ऐवजी नामदेव त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावला, कारण कुत्र्याला कोरडी पोळी खायला लागू नये. अशी त्याची भक्ति. भक्तीचे असे अनेक प्रसंग जसे त्यांच्या चरित्रात आहेत तसे घुमान, पंजाब येथे त्यांच्या मंदिरात भिंतीवर चित्र रूपात काढलेले आहेत. ते पाहून पंजाबतल्या त्यांच्या जीवनाची कथा आपल्याला समजते.  हे प्रसंग म्हणजे त्याच्या पांडुरंगा वरच्या भक्तीचे दाखले आहेत. याकडे चमत्कार म्हणून न बघता श्रद्धा म्हणून बघावे,      

नामदेवाने आता व्यवसाय पुढे चालवावा आणि संसार करावा असे वाटून आई वडिलांनी राजाई यांच्याशी विवाह लावून दिला. संसार वाढला, व्याप वाढला. गरजा पण वाढल्या, पत्नी राजाई आणि मुले नारा, विठा, गोंदा, महादा आणि मुलगी लिंबाई असा त्यांचा परिवार. पण नामाची विठ्ठल भक्ति दिवसेंदिवस वाढतच होती.संसारात लक्ष नाही सर्व लक्ष विठ्ठल नामस्मरणात.विठ्ठलाशी एकरूप होण्यात. आई गोणाई च पण एक प्रसंग आहे, स्वायनपक करून गोणाई नामदेवची वाट पाहत बसली. नामदेवाचा पत्ता नाही ,शेवटी कंटाळून, चिडून ती देवळात बघायला गेली तर काय , मंदिरात नामदेव, पुतळया सारखे देवापुढे उभे होते.संथपणे तिने नांदेवाचा हात ओढला तसा नामदेव जमिनीवर धडकन पडला. ते पाहून घाबरलेल्या गोणाई ने नामदेवला पोटाशी धरले , नामदेव म्हणाले, आई मी विठ्ठलाच्या ध्याणे मग्न असताना तू त्याची आणि माझी अशी ताटातुट का केलीस तू माझी आई नाहीस , नामदेवा काय म्हणतोस हे ? नऊ महीने पोटात वागवून तुला लहानाचा मोठा केला. तो याच साठी काय?अरे बाबा विठोबाचा नाद सोड. आपला संसार बुडवू नकोस. काही पराक्रम करून जन्माचं सार्थक कर,असली कसली भक्तीची तर्‍हा तुझी?  आणि आता विठ्ठलाकडे मोर्चा वाळवून त्याला म्हणाली, “विठ्ठला आम्ही तुझी काडीचीही ओशाळी नसता तू माझ्या मुलाला असा वेडापिसा करून का सोडलास?  बर्‍या बोलाने माझ्या पोरला माझ्या स्वाधीन कर, याच्या हातात भोपळा देऊन तू आम्हाला मात्र भिकेची वेळ आणलीस. कसली रे मेल्या तुझी दया? नामाला नेईन, नाहीतर जीव देईन हाच माझा निश्चय”. अग आई तू जसे माझ्यावर प्रेम करतेस तेच प्रेम कर तू विठ्ठलावर.गोणाई आणखीनच चिडली म्हणाली, नामदेवा ... तुला नेल्यावचून जाणार नाही इथून नाहीतर विठोबा सहित पांढरी गिळून टाकीन. शेवटी नामदेव पुढे काही घडायच्या आत गोणाई बरोबर घरी निघाले. मुळा विषयी कळकळ आणि प्रेम असणार्‍या साध्याभोळ्या आईचा हा संवाद. पत्नी राजाई पण या भक्तीला कंटाळते पण तिला सुद्धा अनुभव येतो, नामदेवाची किती मोठी योग्यता आहे कळते. सामर्थ्य कळते. नामदेवांच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत.

साधारण १२१२ मध्ये नामदेवांची आणि ज्ञानेश्वरांची पहिली भेट आळंदी येथे झाली. गुरुपदेशाचे महत्व त्यांना कळले . या भेटीनंतर नामदेवांच्या आयुष्यात बदल झाला. ज्ञांनेश्वर आणि इतर संतांबरोबर त्यांनी तीर्थयात्रा केल्या. ते भक्तीप्रचारासाठी महाराष्ट्रातून निघून भारताच्या चारही दिशांना फिरले. कर्नाटक, तामिळनाडू,रामेश्वर,गुजरात,सौराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब .हरयाणा,हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेले. हि त्यांची पदयात्रा होती. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी यात म्हटल्याप्रमाणे जनतेचा आध्यात्मिक विकास करण्याचा त्यांचा ध्यास होता. जेंव्हा गोरोबा काका कुंभार यांच्याकडे तेर येथे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर या संतांचा मेळा जमला होता त्या नंतरच नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरु म्हणून लाभले होते. त्यांच्या तीर्थयात्रेची साक्ष या सर्व प्रांतात, मंदिरांच्या रूपाने आजही आहे. सामाजिक समरसता, भक्ति, मानवता, भूतदया ,प्रेम .आदर या सर्व गोष्टी त्यांच्या अभंगातून आपल्याला शिकवण देतात.  

संसारीक माणसांना नामदेवांनी फार सुंदर असा आत्मपरिक्षण करायला लावणारा अभंग लिहिला आहे. त्यात बालपण. तरुणपण, साठीचं म्हातारपण ,आणि एकदम वृद्धावस्था हे जीवन कसे असते ते सांगून तुम्ही कसे वागले पाहिजे याचा बोध करून ते देतात.

बाळपणीं वर्षे बारा । तीं तुझीं गेलीरें अवधारा । तैं तूं घांवसी सैरा । खेळाचेनि विनोदें ॥१॥
ह्मणवोनि आहेस नागर तरुणा । तवं वोळगे रामराणा । आलिया म्हातारपणां । मग तुज कैंचि आठवण ॥२॥
तुज भरलीं अठरा । मग तूं होसी निमासुरा । पहिले पंच-विसीच्या भरा । झणें गव्हारा भुललासी ॥३॥
आणिक भरलिया सात पांचा । मग होसी महिमेचा । गर्वें खिळेल तुझी वाचा । देवा ब्राह्मणांतें न भजसी ॥४॥

तुज भरलिया सांठीं । मग तुझ्या हातीं येईल काठीं । मग ती अडोरे लागती । म्हणती बागुल आलारे ॥८॥
म्हणती थोररे म्हातारा । कानीं झालसि बहिरा । कैसें न ऐकसी परिकरा । नाम हरिहरांचें ॥९॥

खोकलिया येतसे खंकारा । म्हणती रांडेचा म्हातारा । अझूनि न जाय मरण द्वारां । किती दिवस चालेल ॥१२॥

हे वर्णन आजही लागू होते. मनुष्य स्वभाव व त्याचे जीवनातील चढउतार अगदी नेमके सांगितले आहेत.  

संत नामदेव भागवत धर्माचे आद्य प्रचारक होते. संत ज्ञानेश्वर यांच्या नंतर त्यांनी सुमारे पन्नास वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला. भागवत धर्म अगदी पंजाबात नेण्याच मोठं काम नामदेव महाराजांनी केलं आहे. थोडं थोडकं नव्हे तर तब्बल वीस वर्षे ते पंजाब येथे राहिले. त्यामुळे तिथेही त्यांचे भक्त आहेत . तिथे त्यांना शीख बांधव नामदेव बाबा म्हणून ओळखतात. इथेही त्यांचे बहोरदास लढ्ढा, विष्णुस्वामी, केशव कलधारी हे शिष्य आहेत. गुरुदासपूर हि त्यांची शेवटी कर्मभूमी झाली होती.घुमानला साहित्य सम्मेलनाला गेले, तेंव्हा आपल्या नामदेवांचे तिथे काय महत्व आहे याची प्रचिती आली. प्रत्येक घराघरात आणि दुकानात सर्व ठिकाणी संत नामदेव यांचे फोटो गुरु गोविंदसिंग यांचे बरोबर लावले आहेत.     

नामदेव हे एक अभ्यासू आणि बहुश्रुत होते हे अनेक कीर्तनातून आपण सर्व जण ऐकतोच, संत नामदेव यांनी आपल्या अभंगातून आणि भक्ति गीतातून समता व ईश्वर भक्तीची शिकवण दिली. संत नामदेव यांनी आत्मस्वरूप स्थिति, उपदेशपर, आत्मसुख, भक्तवत्सलता, नाम महिमा, गौळण, करुणा, कृष्ण माहात्म्य, नाम संकीर्तन माहात्म्य, पंढरी माहात्म्य, पौराणिक चरित्रे, काही कथा लिहिल्या आहेत. अतिशय मार्गदर्शक अभंग रचना आहेत.

दिवस गेले वायांविण । देवा तुज न रिघतां शरण ।
बाळत्व गेलें अज्ञानपण । तैं आठवण नव्हेचि ॥१॥
आला तारुण्याचा अवसरु । सवेंचि विषयाचा पडिभरु ।
कामक्रोध मदमछरु । अति व्यापारु तृष्णेचाअ ॥२॥
सवेंचि वृद्धपण पातलें । सकळ इंद्रियें सोडिलें ।
देहन करीच म्हणितलें । आंतर पडलें भक्तीसी ॥३॥
कांही हित नव्हेची माझें । दास्य न घडेचि तुझें ।
आयुष्य वेचिलें वीण काजे । धरणी वोझें पैं जालोम ॥४॥
पुनरपि जन्मा येईन मागुता । कोण जाणे कैसी अवच्छा ।
तुज मी ध्याईन अनंता । ऐसा लहाना कैंज होईन ॥५॥
तुझ्या नामाचा वोरस । तेणें चुके गर्भवास ।
नामा म्हणे विष्णुदास । देई सौरस आपुलें नामीं ॥६॥

आत्मसुख कशात आहे हे सांगताना त्यांनी जवळ जवळ २०० अभंगातून उपदेश केला आहे.

आम्हां सांपड्लें वर्म । करुं भागवतधर्म ॥१॥
अवतार हा भेटला । बोलूं चालूं हा विसरला ॥२॥
अरे हा भावाचाअ लंपट । सांडुनि आलासे बैकुंठ ॥३॥
संतसंगतीं साधावा । धरूनि ह्रदयीं बांधावा ॥४॥
नामा म्हणे केउता जाय । आमुचा गळा त्याचे पाय ॥५॥
 

आणि

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥
नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥

संत नामदेवांच्या अभंग गाथेत २५०० अभंग आहेत. त्यांनी हिंदीत व ब्रज भाषेत पण रचना केल्या आहेत, तर गुरुग्रंथ साहिब मध्ये गुरुमुखीत सुद्धा लिहिले आहे. त्याचा समावेश गुरुग्रंथ साहेब मध्ये आहे. संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांचे चरित्र लिहिले आहे, आत्मचरित्र लिहिले आहे.   

भक्तवत्सलता सांगणार्‍या त्यांच्या रचना ही छान आहेत. जनाबाई नामयची दासी होती . म्हणजे शिष्या.तिचे आई वडिल निवर्तल्यावर, पोरकी झाल्याने तिला दामाशेटी यांनी आपल्याकडे आश्रय दिला त्यामुळे जनाबाई नांदेवांच्या कुटुंबातल्याच एक सदस्य झाल्या.नामदेवांची आर्त विठ्ठल भक्ती, त्यांचे अभंग लेखन, भजन कीर्तन यांचे तिला जवळून ज्ञान होत असे,  नामदेवांनाच गुरु मानून ती भक्तिचळवळीत सामील झाली. नामदेव गाथेत तिचे ३४० अभंग सामील केले आहेत. त्यातील एक रचना तिची विठ्ठल भक्ति दर्शविणारी.

पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा ॥१॥
घार हिंडते आकाशीं । झांप घाली पिल्लापासी ॥२॥
माता गुंतली कामासी । चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥
वामर हिंडे झाडावरी । पिलीं बांधुनी उदरीं ॥४॥
तैंसी आम्हासी विठ्ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ॥५॥

संत नामदेव ऐंशी वर्षाचे आयुष्य जगले. त्यांची समाधी पंढरपूरला विठ्ठल मंदिराची पायरी म्हणून व घुमान,पंजाब येथे आहे.

|| जय जय रामकृष्ण हरी ||  

 

© डॉ.नयना कासखेडीकर,पुणे .

                                            ---------------------------

 

No comments:

Post a Comment